Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘आयटीआय’च्या खरेदीत घोळ

$
0
0

prasad.panse@timesgroup.com

पुणे : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांच्या (आयटीआय) अस्तित्वातच नसलेल्या तुकड्यांसाठी कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली आहे. शासननिर्णयाद्वारे दीड हजार तुकड्या सुरू करण्याचे जाहीर करून त्यासाठी खरेदी प्रक्रिया पूर्ण केल्यावर वर्षभरातच नव्या जीआरद्वारे या तुकड्या रद्द करण्यात आल्या. गेल्या दहा वर्षात 'आयटीआय'च्या अस्तित्वातच नसलेल्या किंवा बंद होणाऱ्या अशा तब्बल तीन हजारहून अधिक तुकड्यांसाठी ही खरेदी करण्याच्या उच्चाधिकाऱ्यांच्या कौशल्यामुळे विभागाकडे ३४ टक्के अतिरिक्त यंत्रसामुग्री विनावापर पडून आहे.

राज्य सरकारच्या व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण विभागात गेल्या दहा वर्षांच्या काळात झालेल्या या कोट्यवधींच्या अनियमिततेची चौकशी लाचलुचपत विभागातर्फे सुरू आहे. राज्याच्या महालेखापालांनी या अनियमिततेविषयी ताशेरे ओढल्यानंतर लोकलेखा समितीसमोरही याची सुनावणी सुरू आहे. या चौकशीवर परिणाम होऊ नये, यासाठी ज्यांच्या कार्यकालात ही अनियमितता घडली, त्या संचालकांकडून लेखा व सेवा विषयक अधिकार काढून त्यांची बदली प्रशिक्षण विभागात करण्यात आली. दरम्यान, गेल्या वर्षी विभागाचे तत्कालीन आयुक्त व संचालक राज्याचे प्रधान सचिव व उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडे याबाबतचा वस्तुस्थिती अहवाल सादर केला होता. त्यानंतर त्यांच्याकडून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचा लेखा व सेवा विषयक कार्यभार कमी करण्यात आला. त्यानंतर वर्षभराच्या काळात हा कार्यभार तीन वेळा विविध संचालकांकडे सोपविण्यात आला. १४ ऑगस्ट २०१५ रोजी पुन्हा हा अतिरिक्त कार्यभार या अनियमिततेवेळी कार्यरत असलेल्या संचालकांकडे देण्यात आला. 'मटा'ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्यांच्याकडील कार्यभार काढून स्वयंरोजगार विभागाचे आयुक्त विजय वाघमारे यांच्याकडे देण्यात आला आहे.

दरम्यान, चार डिसेंबर २०१४ रोजी राज्य सरकारने अध्यादेश काढून विभागाकडील असंलग्न, तसेच बंद होणाऱ्या तुकड्यांसाठीची अतिरिक्त यंत्रसामग्री वर्ग करण्यासाठी, तसेच या प्रकरणाच्या अर्थसंकल्पीय, लेखा व तांत्रिक बाबींची पडताळणी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती नियुक्त केली होती. राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाच्या संचालकांच्या नेतृत्वाखालील या समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात असून तो केव्हाही शासनाला सादर केला जाऊ शकतो. या अहवालातील काही माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी 'मटा'ला दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयटीआयची एक तुकडी सुरू करताना आवश्यक यंत्रसामुग्री व सुविधांसाठी सुमारे ३० लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. परंतु, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी अस्तित्वात नसलेल्या किंवा बंद होणाऱ्या तब्बल तीन हजार तुकड्यांसाठी यंत्रसामुग्री खरेदी केली. ही यंत्रसामुग्री विनावापर पडून असल्याचे समितीने अहवालात म्हटले आहे.

अशी झाली अनियमिततता

विभागाशी संलग्न असलेल्या परंतु शिक्षक नसलेल्या सुमारे १०० तुकड्यांसाठी खरेदी करण्यात आली. विभागाशी संलग्न नसलेल्या व २०१५-१६ या वर्षात बंद होणाऱ्या तब्बल १८०० तुकड्यांसाठी, कोणत्याही प्रकारचा शासननिर्णय न काढता सहा तुकड्यांसाठी, तर पनवेल येथील शिक्षक प्रशिक्षक संस्थेसाठी नियुक्तीही झालेली नसताना संस्था उभारून यंत्रसामुग्री खरेदी करण्यात आली. राज्यात आयटीआयच्या तब्बल दीड हजार नव्या तुकड्यांसाठी २६ जून २००९ रोजी जीआर काढण्यात आला. व बरोबर वर्षभराने म्हणजेच एक जून २०१० रोजी नवा जीआर काढून या तुकड्या रद्द करण्यात आल्या. परंतु, या तुकड्यांसाठी संपूर्ण यंत्रसामुग्री खरेदी करण्यात आली आहे. आता ही सर्व यंत्रसामुग्री कालबाह्य ठरण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतमालाला रास्त भाव हवाः पवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'लोकसंख्येच्या साठ टक्के प्रमाण असलेल्या शेतकरी वर्गाची क्रयशक्ती सुधारणार नाही, तोपर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेला लागलेले मंदीचे ग्रहण सुटणार नाही. त्यामुळेच शेतीमालाला रास्त भाव न देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक आहे,' असे परखड मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वार्षिक अधिवेशनामध्ये ते बोलत होते. ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर, वनाधिपती विनायकराव पाटील, तसेच संघटनेचे अशोक गायकवाड, सोपान कांचन, सुनील पवार आदी या वेळी उपस्थित होते. देशभरातील मंदीची परिस्थिती आणि अर्थव्यवस्थेचा पवार यांनी या वेळी आढावा घेतला.

'शेतीमालाच्या दरांच्या संदर्भात पाहिले, तर देशातील शेतीची स्थिती चांगली नाही. आपण कृषिमंत्री असताना गहू, तांदूळ, डाळी आणि साखर अशा अनेक वस्तूंची आयात सुरू होती, हे बंद करण्यासाठी शेतीमालाचे दर वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे आज भारत तांदूळ, गहू आणि साखरेचा मोठा निर्यातदार देश झाला आहे. त्यातून पावणेदोन लाख कोटी रुपयांचे परकीय चलन देशाला मिळाले आहे. मात्र, सध्याचे सरकार वेगळा विचार करीत आहे. महागाई कमी करण्याचा सरकारचा उद्देश चांगला आहे. मात्र, त्यामुळे शेतीमालाच्या किंमती कमी करण्यात येत आहेत. महागाई जरूर कमी करा, पण एकट्या शेतकऱ्यांना त्याचा फटका देऊ नका. शेतीला मिळणारी वीज, खते-औषधे, तसेच शेतकऱ्यांच्या गरजांच्या किंमती वाढतच आहेत, अशा पद्धतीने शेती चालविता येणार नाही आणि आम्ही ते चालू देणार नाही,' असे पवार म्हणाले.

ऊस, द्राक्षे अशी फळे किंवा अन्य पिकांना चांगला दर मिळतो, तेव्हा बाजारात अन्य वस्तूंची खरेदी सुरू होते. काही काळापूर्वी उसाला चांगला दर मिळाला, तेव्हा मोठ्या प्रमाणात मोटारखरेदी झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसा आला, तरच ही स्थिती सुधारेल, असे त्यांनी नमूद केले.

संभाव्य दुष्काळी स्थितीवरही पवार यांनी भाष्य केले. नाशिक ते कोल्हापूरचा पट्टा आणि मराठवाडा या परिसरातील पाण्याची स्थिती गंभीर असून आता सप्टेंबरमध्ये पडणाऱ्या पावसावरच सर्वांच्या आशा आहेत, असे ते म्हणाले. दीर्घ मुदतीच्या कर्जाचे व्याजदरही कमी करावेत, असे त्यांनी सांगितले. गायकवाड यांनी प्रास्तविक केले.

कांद्याचे दर हा एकमेव प्रश्न...?

कांद्याच्या दरवाढीच्या प्रश्नावरही पवार यांनी भाष्य केले. कांदा हे जिरायती पीक असून कधीतरी शेतकऱ्यांना त्यातून पैसे मिळतात. पण सध्या कांद्याची दरवाढ हा देशापुढील एकमेव प्रश्न असल्याप्रमाणे सर्वत्र चर्चा सुरू आहे.

आपल्या दैनंदिन जेवणाचा खर्च काढला, तर त्यात कांद्यासाठी होणाऱ्या खर्चाचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे, असे ते म्हणाले. नुकताच आपल्याला व्हॉट्सअॅपवर एक फोटो आला, त्यामध्ये कांद्याची राखी बांधल्याचा फोटो होता.

पण नंतर तसाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातावरही कांद्याची राखी बांधल्याचा फोटो आला, तेव्हा मी एकटाच नाही, याची जाणीव झाली, अशी टिपण्णी पवार यांनी हसतहसत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संघ ही धर्मांध संघटना’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'देशात धर्मसत्ता आणि धनसत्ता एकत्र सत्तेवर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही एक नंबरची धर्मांध संघटना आहे. आरएसएस आपला प्रमुख शत्रू असला पाहिजे. 'आरएसएस'मुक्त भारत अशी चळवळ केली तरच देशात बहुजन टिकू शकतील,' अशा शब्दांत निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी रविवारी 'आरएसएस'वर हल्लाबोल केला.

शहरातील विविध कामगार संघटना आणि पुरोगामी पक्ष-संघटनांतर्फे कामगार हक्क चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कोळसे-पाटील या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ कामगार नेते संजय सिंघवी, मार्क्सवादी नेते अजित अभ्यंकर, 'लोकायत'चे नीरज जैन, कृती समितीचे कैलास कदम, कामगार नेत्या मुक्ता मनोहर, 'भारिप'चे म. ना. कांबळे, साखर संघाचे तात्यासाहेब काळे, अॅड. म. वि. अकोलकर, अलका जोशी उपस्थित होत्या. कर्नाटक येथील पुरोगामी विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा निषेधही या वेळी करण्यात आला.

'देशातील सर्व मोठ्या संस्थांवर 'आरएसएस'ने ताबा मिळवला आहे. मोठ्या संस्थांचे अधिकारी निवृत्तीआधी किंवा नंतरही संघाचे आशीर्वाद घेत आहेत. 'आरएसएस'शिवाय कुठलेच पद मिळू शकत नाही. सध्या देशाच्या नियोजनात मुस्लिम, दलित आणि आदिवासींचा विचारही केला जात नाही. अशा परिस्थितीत आपण स्वतःला महासत्ता कोणत्या तोंडाने म्हणणार,' असा सवालही कोळसे पाटील यांनी केला. कामगारांच्या प्रश्नासाठी सर्वांनी एकत्रित लढा दिला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

'फॅक्टरी कायद्यामध्ये आघाडी सरकारच्या काळापासूनच बदल करण्यास सुरुवात झाली आहे. सध्या या बदलांना वेग आला आहे. कामगारांना कोणताही अधिकार, हक्क आंदोलनाशिवाय मिळालेला नाही,' असे संजय सिंघवी यांनी सांगितले. सिंघवी यांनी कायद्यातील प्रस्तावित बदलांची माहितीही दिली. 'देशात ७० टक्क्यांपेक्षा अधिक कामगार कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. सरकारी कंपन्यांमध्येही कंत्राटी कामगार काम करत आहेत. नवीन मूल्यनिर्मितीतील केवळ १२ टक्के हिस्सा कामगारांना दिला जात आहे. कामगारांनी केलेल्या संपांपेक्षा उद्योगधंद्यांच्या टाळेबंदीचे प्रमाण अधिक आहे,' असे अभ्यंकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहल आयोजकाला नुकसानभरपाईचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पूर्वसूचना न देता विमानप्रवासाचे तिकीट रद्द करून प्रवाशाला निष्कारण सोसावा लागलेल्या अन्य तिकिटाचा भुर्दंड सहल आयोजकाने परत करावा, असा आदेश ग्राहक न्यायमंचाने दिला आहे. गुडगाव येथील 'मेक माय ट्रीप' या सहल आयोजकाला विमान प्रवासाच्या तिकिटाचे ४४ हजार ४५८ रुपये आणि नुकसानभरपाई म्हणून पाच हजार रुपये देण्याचा आदेश मंचाने दिला आहे.

पुणे जिल्हा तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात, सदस्य मोहन पाटणकर व क्षितिजा कुलकर्णी यांनी हा निकाल दिला. याप्रकरणी वंदना अशोक तेंडोलकर (रा. आचार्य सोसायटी, वारजे नाका) यांनी तक्रार दिली होती. 'मेक माय ट्रीप' ही कंपनी सहल आयोजनाचे काम करते. तेंडोलकर यांनी त्यांच्या पतीसाठी ऑगस्ट २०१४ मध्ये दुबई ते मुंबई आणि सप्टेंबर २०१४ मध्ये परतीचा मुंबई ते दुबई या प्रवासासाठी 'मेक माय ट्रीप'कडे बुकिंग केले होते. यासाठी त्यांनी २२ हजार ४१३ रुपये भरले होते.

तेंडोलकर यांच्या पतीचा दुबई ते मुंबई हा प्रवास ठरल्याप्रमाणे झाला; मात्र परतीच्या प्रवासाच्या आदल्या दिवशी तेंडोलकर यांनी इंटरनेटद्वारे तिकिटाची तपासणी केली तर त्यांना कोणतीही पुर्वसूचना न देता विमानप्रवासाचे तिकीट रद्द झाल्याचे समजले. याबाबत तक्रारदारांनी मुंबईच्या इमेरिटेटस कार्यालयात संपर्क साधला.

त्या वेळी सहल आयोजकांनी तीन दिवस आधीच तिकीट रद्द केल्याचे कळले. याबाबत तक्रारदारांनी आयोजकांकडे चौकशी केल्यावर पुढील दोन तासांत नवीन तिकीट देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्षात तसे केले नाही.

तक्रारदार यांच्या पतीला दुबईला जाणे आवश्यक असल्याने पर्यायी विमानसेवा उपलब्ध नसल्यामुळे तेंडोलकर यांना ५३ हजार भरून बिझनेस क्लासने प्रवास करावा लागला. सहल आयोजकाला त्यांनी कळविलेही. मात्र, त्यांना केवळ ८ हजार २९९ रुपये परत करण्यात आले. दुसऱ्या विमान प्रवासासाठीची रक्कम परत मिळावी यासाठी मंचाकडे तक्रार केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण रस्त्यांसाठी १२ कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे विस्तारण्याबरोबरच त्यात सुधारणा करण्यासाठी तब्बल साडेबारा कोटी रुपयांची कामे लवकरच हाती घेण्यात येणार आहेत. वेल्हे-मढेघाट-महाड मार्गासह खानापूर-पानशेत, डोणजे-सिंहगड-खेडशिवापूर, वाघोली-खराडी या रस्त्यांच्या कामांचा यात समावेश आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी यासंदर्भातील निविदा मागविल्या असून एक वर्षाच्या कालावधीत ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. वेल्हे-मढेघाट-महाड हा प्रस्तावित मार्ग मढेघाटातील डोंगरकड्यामुळे पूर्ण होऊ शकलेला नाही. या रस्त्याचा काही भाग गुंजवणी धरणाच्या बुडित क्षेत्रात गेला आहे. त्यामुळे या भागात नवा रस्ता करण्यासाठी एक कोटी ६२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

खानापूर ते पानशेत या रस्त्याच्या कामासाठी एक कोटी १९ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. डोणजे-सिंहगड ते खेडशिवापूर हा मार्ग दुरुस्त करण्याची गरज असल्याने त्यासाठी ६५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. वाघोली-केशवनगर-साडेसतरानळी या रस्त्यासाठी ६४ लाख रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. सासवड-कापूरहोळ-भोर या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी एक कोटी १२ लाख रुपयांची तरतूद आहे. त्यासाठीही निविदा मागविण्यात आल्या आहेत.

पुरंदर तालुक्यातील जेजुरी-नाझरे ते पिंपरी या रस्त्यासाठी एक कोटी २ लाख रुपये, जेजुरी येथे पेव्हिंग ब्लॉकसाठी एक कोटी २४ लाख रुपये, भोंगवली-परिंचे रस्त्यासाठी साठ लाख रुपये तसेच साकुर्डे-पिंगोरी रस्त्यासाठी ७४ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पेरणे-पाठेथान रस्त्यावर पूल बांधण्यासाठी ९३ लाख रुपये, मांजरी ते भापकरमळा रस्त्यावर एक कोटी २२ लाख रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. कुंजीरवाडी ते शिंदवणे रस्त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी ९९ लाख ५० हजार रुपयांची निविदा मागविण्यात आली आहे.

रस्त्यांचे जाळे विस्तारणार

कामांमध्ये वेल्हे-मढेघाट-महाड, खानापूर-पानशेत, डोणजे-सिंहगड-खेडशिवापूर, सासवड-कापूरहोळ-भोर, वाघोली-खराडी तसेच सासरवड-कापूरहोळ-भोर आदी ग्रामीण भागातील रस्त्यांचा यात समावेश होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टातील खटला मागे घेण्यावरून एकाचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

मुलाला सरकारी नोकरी लावण्यासाठी वडिलांनी जवळच्या मित्राला दिलेले साडे चार लाख रुपये परत मिळत नाहीत, म्हणून कोर्टात दाखल केलेली केस माघारी घेण्यावरून सहा जणांनी केलेल्या मारहाणी एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून मारहाणीची ही घटना रविवारी संध्याकाळी येरवड्यातील जयजवान नगर भागात घडली.

लाल महंमद शेख (वय ५२, रा. रामनगर,येरवडा) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी लाल महंमदचा मुलगा अकिल शेख (२२) याने पोलिसांत तक्रार दिली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रज्जाक शेख (५०), अब्दुल शेख (४५), आरिफ शेख (३०, रा. जयजवान नगर), किरण ठाकूर (२८, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) आणि बॉँड (पूर्ण नाव आणि पत्ता माहिती नाही ) या पाच जणांना रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली. आनंदसिंग उर्फ काके हा आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत दोन्ही पक्षाकडून परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहेत.

लाल महंमद यांनी आपला मोठा मुलगा फारुख याला सरकारी नोकरी लावण्यासाठी चार वर्षांपूर्वी शेजारील रज्जाक शेख यांना साडे चार लाख रुपये दिले होते. अनेक वर्षे उलटल्यानंतरही मुलाला नोकरी लावली नव्हती, त्यामुळे लाल महंमद रज्जाककडे पैसे परत मिळावे म्हणून मागणी करीत होते. पण, रज्जाक पैसे देत नसल्याने दोन वर्षांपूर्वी लाल महंमद यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली होती. या भांडणातून मारहाणीत लाल महंमद शेख यांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

$
0
0

जुन्नरः मोटार आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील दोघेजण ठार झाले. नगर-कल्याण महामार्गावर कोळमाथा शिवार येथे हा अपघात झाला.

ओतूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश मनोहर वारे (वय १८) आणि मयूर हिरामण वारे (१८, दोघेही रा. विजयविहिरा, ओतूर) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. हे दोघेही दुचाकीवरून ओतूरकडे जात होते. त्यावेळी बोलेरो गाडी आळेफाट्याकडे निघाली होती. याच वेळी समोरून समोरून वेगात आलेल्या दुचाकीचा मोटारीशी अपघात होऊन दुचाकीवरील दोघे जण दूरवर फेकले गेले. या अपघातात गणेश जागीच ठार झाला; तर मयूर गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेतील मयूरला हॉस्पिटलमध्ये नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना रात्री नऊच्या सुमारास घडली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारामतीत अवैध कत्तलखान्यांवर छापा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

बारामती पोलिसांनी शहरातील अवैध कत्तरखान्यांविरोधातील मोहीम रविवारी तीव्र केली. स्थानिक राजकीय दबाव झुगारून देत पोलिसांनी रविवारी रात्री एक बैल तसेच दहा गायींची कत्तल रोखली. तसेच, मुक्त केलेल्या गायी बारामतीतील जीवदया गोशाळेत पाठवण्यात आल्या.

पोलिसांनी धाडसी कारवाई करत अकरा गोवंशाची मुक्तता केली आहे. चार गायींची कत्तल केलेली आढळून आली असून तीन टन मास पोलिसांनी जप्त केले आहे. याचे बाजारमूल्य अंदाजे तीन लाख ६० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच, दोन टेम्पोही हस्तगत करण्यात आले. मात्र, काही नगरसेवक लोकप्रतिनिधींकडून ही कारवाई करताना दबाव आणण्याचा प्रयत्न झाला होता. रविवारी रात्री अकरा वाजता बेकायदा चालणाऱ्या कत्तलखान्यांवर धाड टाकण्यात आली. यामध्ये नऊ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये हुसेन हजी देसाई, समीर सईफ शेख, रमजान अमीन शेख, अजीज दावण शेख, सलीम कुरेशी, कासम हुसेन कुरेसी, असीर सय्यद, पप्पू वसीर मुल्ला, (सर्व रा. बारामती परिसर) समाधान प्रल्हाद चव्हाण (रा. कालठण ता. इंदापूर) या सर्वांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, कत्तलखाना मालक मैनउद्दीन अकबर कुरेशी अद्याप फरार आहे.

कऱ्हा नदीच्या पुलाजवळ म्हाडा कॉलनी परिसरात चालणाऱ्या अवैध कत्तलखान्यांवर धाडी टाकून दहा गायींची कत्तल रोखण्यात आली. शहरातील अवैध कत्तलखान्यांवर वारंवार धाडी टाकण्यात येणार असल्याचे सांगूनही याच परिसरात जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बारामती शहरातील अशा बेकायदेशीर असणाऱ्या कत्तलखान्याची माहिती कळाल्यास नागरिकांनी तक्रार करावी. यावर कारवाई करण्यात येईल.

- नीलेश देशमुख, मुख्याधिकारी, बारामती

बेकायदेशीर कत्तलखाने निर्माण न होऊ देण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे. मात्र, शहरातील बेकायदा कत्तलखान्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून त्यामुळे बेकायदेशीर कत्तलखाने बंद करावे; अन्यथा कारवाईस सामोरे जा.

- तानाजी चिखले, ग्रामीण अप्पर पोलिस अधीक्षक, बारामती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्काय वॉकची लिफ्ट बंदच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

संगमवाडी-विश्रांतवाडी (आळंदी रोड) बीआरटी मार्गावर रविवारपासून बस धावू लागल्यानंतर रस्त्यावरील विविध चौकातील वाहतूक नियंत्रक दिवे कार्यान्वित झाल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. परंतु, विश्रांतवाडी चौकात कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली स्काय वॉकची लिफ्ट मात्र बंद असल्याने पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे.

संगमवाडी- विश्रांतवाडी (आळंदी रोड)बीआरटीचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. बीआरटीच्या प्रसारासाठी पुढील महिनाभर विश्रांतवाडी ते मनपा आणि पुणे स्टेशनपर्यंत मोफत प्रवासाची सुविधा पालिकेने उपलब्ध करून दिल्याने परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करू लागले आहेत. विश्रांतवाडी टर्मिनलमधून दररोज बीआरटीच्या ५८; तर ७१ साध्या बसेस धावू लागल्याने रस्त्यावर वाहतूक वाढली आहे.

आळंदी रोड मार्ग रविवारपासून खुला झाल्यानंतर या मार्गावरील विविध चौकात असणारे वाहतूक नियंत्रक दिवे सुरू करण्यात आले. परिणामी, रस्त्यावर नेहमीप्रमाणे होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली आहे. बीआरटी मार्गातील प्रमुख चौकातील सर्व दुभाजक बंद केल्याने परिसरातील नागरिकांना वळसा घालून जावे लागत आहे. पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा, म्हणून विश्रांतवाडीतील मुकुंदराव आंबडेकर चौकात साडे सहा कोटी रुपये खर्चून स्काय वॉक उभारण्यात आला. पण, स्काय वॉकवर जाण्यासाठी असणाऱ्या तीन लिफ्ट मागील वर्षभरापासून बंद असल्याने परिसरातील पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे. सकाळच्या वेळेस धानोरी, दिघी आणि विमानतळ रस्त्याहून शहराकडे जाण्याची वेळ असल्याने दूर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुस्तकातील आक्षेपार्ह मजकुरावरून गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित एका इतिहासाच्या पुस्तकातील आक्षेपार्ह मजकूराबाबत संभाजी ब्रिगेडने या पुस्तकांच्या लेखकांसह प्रकाशकांवरही सोमवारी गुन्हा दाखल केला. तर, याच प्रकरणी विद्यापीठही संबंधितांवर कारवाई करणार असून, हे पुस्तक यापूर्वीच अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले.

विद्यापीठाच्या एफवाय बीएच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमावर निराली प्रकाशनाने 'छत्रपती शिवाजी व शिवकाळ' हे पुस्तक छापले होते. त्यासाठी डॉ. एस. एन. तांबोळी आणि प्रा. स्वाती राजन यांनी लेखन केले होते. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते संतोष शिंदे यांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून तांबोळी, राजन आणि निराली प्रकाशनावर धार्मिक तेढ निर्माण केल्याबाबत गुन्हा दाखल केला.

विद्यापीठानेही याबाबत आपली भूमिका सोमवारी स्पष्ट केली. या विषयी बोलताना कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे म्हणाले, 'कोणतीही अधिकृत परवानगी नसताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याने विद्यापीठ निराली प्रकाशनाविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार आहे. विद्यापीठाला कोणतीही कल्पना न देता, या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये विद्यापीठाच्या नावाचा वापर करण्यात आला होता. या प्राध्यापकांनाही त्याविषयीची समज देण्यात आली आहे.' तसेच, विद्यापीठाच्या नावाचा चुकीचा उपयोग करणे, त्याआधारे फायदा घेण्याचा प्रयत्न करण्याबाबत निराली प्रकाशनावर कारवाई केली जाणार आहे, असे डॉ. गाडे यांनी सांगितले. यापुढील काळात विद्यापीठाच्या नावाचा असा गैरवापर खपवून घेतले जाणार नसल्याचेही विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीवर अत्याचारप्रकरणी संस्था चालकास शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तेरा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या थेरगाव येथील बालग्राम संघर्ष संस्थेच्या चालकास दहा वर्षे सक्तमजुरी व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा कोर्टाने सुनावली. यातील चाळीस हजार रुपये पीडीत मुलीला देण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एस. जे. काळे यांनी दिले.

सचिन हरिश्चंद्र कांबळे (वय ३०, रा. संघर्ष बालग्राम, थेरगाव) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पीडीत मुलीच्या चुलतीने तक्रार दिली होती. या खटल्यात अतिरक्त सरकारी वकील हिरा बारी यांनी आठ साक्षीदार तपासले.

पीडीत मुलीची आई मयत झाल्यानंतर वडिल तिचा सांभाळ करीत नव्हते. त्यामुळे मुलीला तिची चुलती सांभाळत होती. पण, चुलतीची आर्थीक परिस्थिती चांगली नसल्यामुळे शिक्षणासाठी मुलीला थेरगाव येथील बालग्राम संघर्ष संस्थेत पाठविले होते. या संस्थेच्या ठिकाणीच कांबळे व त्याची पत्नी राहत होते. कांबळे याचे ५ जून २०१४ रोजी पत्नीसोबत भांडण झाले. त्यामुळे त्याची पत्नी घरातून निघून गेली. पत्नी निघून गेल्यानंतर कांबळे याने पीडित मुलीस त्याच्या खोलीत बोलविले. मात्र, ती मुलगी गेली नाही. त्यामुळे कांबळे याने मुलीच्या खोलीत जाऊन तिच्यावर दोन दिवस बलात्कार केला.

या घटनेनंतर शाळेला सुट्टी लागल्यामुळे मुलगी तिच्या चुलतीकडे राहण्यास गेली. सुट्टी संपली तरी मुलगी परत जाण्यास तयार नव्हती. कांबळे याने फोन करून मुलीला पाठविण्यास सांगितले. पण, घाबरलेल्या मुलीने शेवटी हा सर्व प्रकार तिच्या चुलतीला सांगितला. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने मुलीच्या चुलतीने हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर्ववैमनस्यातून खून; आणखी एक अटकेत

$
0
0

पुणेः पूर्ववैमनस्यातून तरुणावर वार करून खून केल्याप्रकरणी आणखी एकाला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला तीन सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

फैजल मेहबूब सय्यद (वय २०, रा. इंदिरानगर, गुलटेकडी) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. २३ जुलै २०१५ रोजी हैदर राजेश शेख (वय २२. रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी) या तरुणाचा खून झाला होता. या बाबत तौफिक सलीम शेख (वय २०, रा. इंदिरानगर) याने फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद आणि मयत शेख यांच्यात पूर्वी भांडणे झाली होती. याचा राग मनात धरून आरोपींनी गुलटेकडी येथील नर्सिंग होम रस्त्यावर कोयता आ​णि कुकरीने वार करून शेखचा खून केला होता. या प्रकरणी पोलिसांनी सय्यद याला अटक करून कोर्टात हजर केले.

दोघांच्या कोठडीत वाढ

विक्रीसाठी मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोघांच्या पोलिस कोठडीत चार सप्टेंबरपर्यंत वाढ करण्याचा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. जी. बिलोलीकर यांनी शनिवारी दिले. अब्दुलहमीद अयुब काझी (वय ३७), अब्दुलआहद फरीद अब्बासी (वय २४, दोघेही, रा. बांद्रा पश्चिम, मुंबई) अशी पोलिस कोठडीत वाढ केलेल्या दोघांची नावे आहेत. २६ ऑगस्टला सायंकाळी वाडिया रुग्णालयाच्या समोरील सार्वजनिक रस्त्यावर कारवाई करून खडक पोलिसांनी दोघांकडून पाच लाख ४७ हजार रुपये किंमतीचे १७६ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोडाप्रकरणी दोघांना अटक

$
0
0

पुणेः एटीएमची कॅश वाहून नेणाऱ्या व्हॅनला जेजुरी भागात दरोडा टाकून लुटणाऱ्या दोघांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. यातील सहा आरोपींना ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. त्यांनी ४३ लाखांची रोकड लुटली होती.

गणेश डोंगरे उर्फ गणेश मारुती काठेवाडी (वय २९, रा चाकण) व ऋषीकेश उर्फ हुक्का श्रीकांत गाडे (वय २० रा. जांभुळवाडी रोड, आंबेगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यातील सर्व आरोपींवर पुणे ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई केली आहे. खंडणी विरोधी पथकाचे हवालदार पांडुरंग वांजळे यांना या आरोपींबाबत मिळालेल्या माहिती मिळाली. त्यानुसार पथकाचे पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांनी या दोघांना अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीच्या धडकेत बालकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दुकानातून बिस्कीटे घेऊन जात असताना भरधाव मोटारीच्या धडक बसून सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. वडाचीवाडी येथे शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात मोटार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

संतोष महादेव चिन्नर (वय सहा वर्षे, रा. आरोनेस्ट सोसायटीसमोर, वडाची वाडी, उंड्रीगाव) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी सुधीर कामेश्वर पांडे (वय ३६, रा. सिद्धीविनायक सोसायटी, वडाचीवाडी) याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील कार जप्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडे हा त्याच्या अल्टो कारमधून उंड्रीकडून वडाचीवाडीकडे निघाला होता. आरोनेस्ट सोसायटीसमोर संतोष हा दुकानातून बिस्कीटे घेऊन रस्ता ओलांडत असताना पांडे याने त्याला जोराची धडक दिली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. संतोष याचे आई-वडील या ठिकाणच्या बांधकाम साइटवर कामगार आहेत, तर पांडे हा खासगी कंपनीत कामाला आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक जगदीश राऊत हे तपास करीत आहेत.

जीवे मारण्याचा प्रयत्न

स्थानिक वर्चस्वातून एका तरुणाला फायटरने माराहण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दांडेकर पूल परिसरात शनिवारी घडली. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकी रणदिवे (वय २४, रा. दांडेकर पूल) याने या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरूनव आवसीम सलीम पटेल (रा. दांडेकर पूल) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी व वसीम हे दांडेकर पुजावळ एकाच वस्तीमध्ये राहतात. दोघेही एकमेकांना ओळखतात. समाज सुधारक मंडळाच्या बाहेर शनिवारी विकी हा रिक्षात बसलेला असताना त्या ठिकाणी वसीम आला. त्याने विकीला 'तू मंडळाचा अध्यक्ष बनून भाईगिरी करतो काय? या भागात कोणाचे काही नाही चालत. इथला भाई फक्त वासीम आहे.' असे म्हणत विकीच्या डोक्यात फायटरने मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या मध्ये विकी गंभीर जखमी आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्याचे फौजदार डी. आर. मोहिते अधिक तपास करीत आहेत.

तीन लाखांची चोरी

कल्याणीनगर येथील बिग मोबाइल कम्युनिकेशन हे दुकान फोडून तीन लाख नऊ हजार रुपये किंमतीचे मोबाइल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओंकार राठी (वय ३९, रा. हडपसर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर येथे बिग मोबाइल कम्युनिकेशन हे मोबाइल विक्रीचे दुकान आहे. शनिवारी रात्री हे दुकान बंद करून गेल्यानंतर चोरट्यांनी दरवाजाच्या लोखंडी पट्ट्या कापून दुकानात प्रवेश केला. दुकानातील तीन लाख नऊ हजार रुपये किंमतीचे मोबाइल चोरून नेले. सकाळी दुकान उघडण्यात आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.

दुचाकीस्वाराचा मृत्यू

भरधाव वाहनाने दुचाकीला ठोकरल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. येरवडा येथील मुळा-मुठा नदीवरील नवीन पुलावर २२ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता हा अपघात झाला. शरद बळीराम साठवणे (वय- ४६, रा. कलवडवस्ती, लोहगांव) असे मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. अपघात झाल्यानंतर वाहनचालक पळून गेला. या प्रकरणी अज्ञात चालकाविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिस उपनिरीक्षक शेख या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अश्लील चाळे; भोंदू अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

करणी उतरविण्याच्या बहाण्याने भस्माचा उपचार करण्यासाठी महिलेला कपडे काढण्यास सांगून तिच्याशी चाळे करणाऱ्या भोंदूबाबाला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने अशा पद्धतीने आणखी काही महिलांना फसविल्याची शक्यता असून न्यायालयाने त्याला चार सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

नागनाथ बाबा उर्फ पांडुरंग लक्ष्मण साळवे (वय ६५, रा. शिवदर्शन, सहकारनगर पुणे) असे अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. त्याच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका वीस वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगर येथे राहणाऱ्या एका कुटुंबाने नागनाथबाबा याला आपले गुरू केले होते. गेल्या दोन वर्षांपासून ते त्याची मनोभावे सेवा करीत होते. या कुटुंबात सून म्हणून आलेली तरुणीही बाबाला गुरू मानत होती. त्यामुळे त्याच्याकडून कानमंत्र घेण्यासाठी गुरूपौर्णिमेनिमित्त या बाबाकडे गेली होती. त्या वेळी त्याने तिला 'तुझ्यावर आज सासूने करणी केली आहे, तुझे त्रास दूर करायचे असतील तर विवस्त्र होऊन भस्माचे उपचार घ्यावे लागतील,' असे सांगितले. त्यानुसार तिला एकटीला बोलावून घेऊन, कपडे काढण्यास सांगून तिच्या शरीराला भस्म लावले.

यानंतर रविवारी सकाळी त्याने महिलेस फोन करून भस्म लावण्यासाठी घरी एकटी येण्यास सांगितले. भस्म लावण्याचा अनुभव असल्यामुळे तिने हा सर्व प्रकार तिच्या सासरच्या मंडळींना सांगितला. बाबाचा नेमका हेतू काय हे पाहण्यासाठी सुनेला एकटीला पाठवून तिच्या पाठोपाठ सासरची मंडळी गेली. बाबाने बोलविल्याप्रमाने ही महिला त्याच्या घरी पोहचली. त्या वेळी त्याने घरात खूप गर्दी असल्याचे सांगून भस्माचे उपचार करण्यासाठी बाहेर जाऊ, असे तिला सांगितले. तिला दुचाकीवर बसून बाहेर घेऊन जाऊ लागला. सासरच्या मंडळींनी बाबाचा रिक्षातून पाठलाग सुरू केला. बाबाने मंडई येथील एका लॉजजवळ गाडी थांबविली. सुनेला घेऊन तो लॉजमध्ये गेला. तिथे रूम घेत असतानाच सुनेच्या नातेवाइकांनी त्याला पकडले. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून बाबाला अटक करण्यात आली आहे. त्याला चार सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या बाबाने आणखी काही जणांना अशा पद्धतीने फसविले असण्याची शक्यता आहे. त्याबाबत त्याच्याकडे तपास सुरू आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक (गुन्हे) स्मिता जाधव या अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भूखंडाच्या आमिषाने कंपनीकडून फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आर्थिक गुंतवणुकीवर जादा परतावा, बक्षीस आणि भूखंड देण्याच्या आमिषाने फसवणुक केल्याप्रकरणी मेरिट लॅन्डमार्क्स लिमिटेड या कंपनीविरुद्ध पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारे आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पिंपरी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

या प्रकरणी तुषार सुदाम पायगुडे (३३, रा. माळवाडी, हडपसर) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार कंपनीचे अध्यक्ष महेश प्रकाश मुंगसे (रा. चाकण, ता. खेड), महादेव साळुंखे (रा. लातूर), सुरेश जाधव (रा. देहूरोड), किरण आटपाळकर (रा. जनता वसाहत), सुनील महाजन आणि अशोक शिंपी (दोघे रा. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कंपनीचे पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर 'ज्वेल्स ऑफ पिंपरी' या इमारतीमध्ये ऑ​​फिस होते. पायगुडे यांना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर भूखंड देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी कंपनीत ५१ हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. रक्कम स्वीकारल्याच्या पावत्याही त्यांना देण्यात आल्या होत्या. लातूर जिल्ह्यात भूखंड देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यांना कुठलाही भूखंड न देता फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या कंपनीविरुद्ध गुन्हे शाखेकडे तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी या तक्रारीच्या अनुषंगाने तपास करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपनीचे उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार राज्यांसह महाराष्ट्रात मुंबई, कोल्हापूर, सातारा, पुणे, उस्मानाबाद, बीड, सांगोला, जळगाव, लातूर येथे कार्यालये आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मॉलमधील दागिनेचोर अवघ्या सहा तासांत गजांआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

विमाननगर येथील 'फिनिक्स मॉल'मधील पु. ना. गाडगीळ ज्वेलरी शोरूममधून सात लाखांचे दागिने चोरी करणाऱ्या चोरट्याला विमानतळ पोलिसांनी अवघ्या सहा तासांत गजांआड केले. बनावट चावीचा वापर करून चोरट्याने शनिवारी मध्यरात्री दागिन्यांची चोरी केली होती. दागिने चोरी करण्यास शोरूममधील कामगाराने मदत केल्याचा संशय पोलिसांना आहे.

नारायण लक्ष्मण खरात (वय १९, रा. म्हाडा कॉलनी, विमाननगर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. आरोपी नारायण मॉलमधील 'पीव्हीआर' या मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी कामाला असल्याचे समोर आले आहे. शोरूममधील दागिने चोरी झाल्याप्रकरणी तस्लीम मन्सूर सय्यद (वय २७, रा. कोंढवा) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. शोरूममधून लाखो रुपयांचे दागिन्यांची चोरी होऊनदेखील व्यवस्थापनाने केवळ साठ हजार रुपयांची चोरी झाली असल्याचे सांगितले होते.

नारायणने मॉलमध्ये कोणी नसल्याचे पाहून दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बनावट चावीचा वापर करून सात लाख रुपयांचे दागिने चोरले. तो मॉलमध्येच कामाला असल्याने सुरक्षारक्षकांना त्याचा संशय आला नाही. शोरूम रविवारी सकाळी उघडल्यानंतर दागिन्यांची चोरी झाल्याचा प्रकार कामगारांना लक्षात आला. पोलिसांनी शोरूममधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ते बंद दिसले. त्यामुळे पोलिसांना कामगारांवर संशय आला होता. आरोपी नारायणला शोरूममधीलच कामगाराने मदत केल्याचा संशय आहे, अशी माहिती विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय कुरुंदकर यांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक छगन कापसे, कर्मचारी विश्वनाथ गोणे, संजय आढारी, राजेंद्र गायकवाड, संतोष जगताप, संभाजी तांबे, नवनाथ वाळके, रमेश नायकवडी, अविनाश संकपाळ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांच्या संपात ८२ कर्मचाऱ्यांचा बळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'एफटीआयआय'मधील १५३ पैकी ८२ कर्मचाऱ्यांना प्रशासनाने एक सप्टेंबरपासून कामावरून कमी केले असून, नोकरीच गेली तर संपामध्ये सहभागी होऊन काय मिळणार, असा प्रश्न हातावर पोट असणाऱ्या या कर्मचाऱ्यांना भेडसावत आहे. कर्मचाऱ्यांचे संसार यामुळे उघड्यावर पडणार असून, हे कर्मचारी संपाचे नाहक बळी ठरत आहेत.

'एफटीआयआय'मधील विद्यार्थ्यांचे गजेंद्र चौहान यांच्या निवडीविरोधात आंदोलन सुरू असून, त्यामुळे संस्थेतील कामकाज ८१ दिवसांपासून ठप्प आहे. कर्मचाऱ्यांच्या हातात कोणतेच काम नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे करारावर घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर केला जाणारा खर्च संस्थेसाठी काय उपयोगाचा, अशी भूमिका घेऊन सरकारने दबाव तंत्राचा वापर करून हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी कर्मचाऱ्यांनाच लक्ष्य केले आहे. संस्थेत सध्या १६ प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जात असून, काही ठरावीक कर्मचारी वगळता बहुतांश कर्मचारी करारावर सेवेत रुजू आहेत.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे या सर्व कर्मचाऱ्यांवर कामाअभावी बसून राहण्याची वेळ आली आहे. येथील कर्मचारी करारावर असतात; तरीही संबंधित कंपनी बदलत राहते, पण कर्मचारी कायम असतात, अशी येथील यंत्रणा आहे. सध्या सिग्मा ही कंपनी असून, या कंपनीच्या वतीनेही कर्मचाऱ्यांना त्याबाबत पत्र देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. कर्मचारी संस्थेत अनेक वर्षे काम करत असून, या क्षेत्रात प्रावीण्य असलेले कर्मचारी मिळत नाहीत. १५३पैकी फक्त ८२ कर्मचाऱ्यांनाच कमी करण्यात आले आहे. आम्ही कंपनीचे कर्मचारी असल्याने न्यायालयात दाद मागू शकत नाही. त्यामुळे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काढायचे होते तर सगळ्यांनाच काढायचे. हातावर पोट असणाऱ्यांवर अन्याय का, असा सवाल कर्मचाऱ्यांनी केला आहे. याबाबत संस्थेचे संचालक प्रशांत पाठराबे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वजनमापधारक अडचणीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्याचे वैधमापनशास्त्र नियंत्रक संजय पांडे यांच्या त्रासाला कंटाळून मापनशास्त्र परवानाधारक असोसिएशनने आंदोलनाचा इशारा दिला आहे. पांडे यांच्या मनमानी कारभारामुळे राज्यातील ५६०० वजनमाप परवानाधारक अडचणीत आले आहेत. सरकारने याबाबत त्वरित कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा असोसिएशनतर्फे देण्यात आला आहे.

असोसिएशनचे अध्यक्ष राजेश शिंदे, उपाध्यक्ष संदीप इंगवले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सचिव मिलिंद कुलकर्णी, उपसचिव सुप्रिया चितारे या वेळी उपस्थित होते. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

'पांडे यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून ते अत्यंत जाचक परिपत्रके काढून व्यावसायिक, वापरकर्ते, दुरुस्ती करणारे परवानाधारक या सर्वांना त्रास देत आहेत. परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी अर्ज केलेल्या परवानाधारकांचे अर्जही त्यांनी अपमानास्पद वागणूक देऊन रद्द केले किंवा प्रलंबित ठेवले. काहींच्या परवान्याचे नूतनीकरण करताना त्यांना पांडे यांनी व्यवसायाचे असाध्य उद्दिष्ट (टार्गेट) दिले आहे,' असे शिंदे यांनी सांगितले. पांडे यांच्या जाचक कारभाराबद्दल सरकारने त्वरित कार्यवाही न केल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पांडे यांच्या जाचक परिपत्रकांविरुद्ध असोसिएशनने हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. कोर्टाने पांडे यांची परिपत्रके रद्दबातल ठरवत असोसिएशनच्या बाजूने निकाल दिला; परंतु अजूनही वैधमापन नियंत्रकांनी या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही,' असे शिंदे यांनी सांगितले. 'सरकार आम्हाला कोणत्याही प्रकारची सवलत देत नाही. आम्ही नियमितपणे परवान्याचे शुल्क भरतो. अशा परिस्थितीत सरकारने आम्हाला व्यवसायासाठी टार्गेट ठरवून देणे पूर्णतः चुकीचे आहे.

- मि‌लिंद कुलकर्णी, सचिव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमबीए’ प्रवेशांत यंदा मोठी वाढ

$
0
0

गेल्या वर्षीच्या तुलनेत २००० प्रवेश जास्त

Siddharth.Kelkar@timesgroup.com

पुणेः रिक्त जागांचा सिलसिला यंदाही कायम असला, तरी एमबीए प्रवेशांमध्ये यंदा वाढ झाल्याचे आश्वासक चित्र आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दोन हजार प्रवेश जास्त झाले असून, रिक्त जागांची संख्याही निम्म्याहून कमी झाली आहे.

राज्यात यंदा ३८,२५० जागा प्रवेशांसाठी उपलब्ध होत्या. राज्याची एमबीए-सीईटी, एमबीए संस्थांच्या असोसिएशनची (अम्मी) सीईटी आणि संस्थास्तरावर भरलेल्या जागा अशा प्रवेशांचा विचार करता, २९,१९८ जागांवर प्रवेश झाले आहेत. यंदा ९,०५२ जागा रिक्त राहिल्या आहेत. गेल्या काही वर्षांत राज्यातील एमबीएच्या जागा भरमसाट प्रमाणात वाढल्या आहेत. मात्र, त्या तुलनेत विद्यार्थी मिळत नसल्याने गेल्या आठ ते दहा वर्षांत रिक्त जागांची समस्येने डोके वर काढले आहे. गेल्या वर्षीपर्यंत प्रत्येक वर्षी रिक्त जागांची संख्या वाढतच जात होती. यंदा प्रथमच ती कमी झाली आहे.

'गेल्या वर्षी एमबीएच्या ४४ हजार जागा उपलब्ध होत्या. त्यातील सुमारे २७ हजार जागांवरच प्रवेश झाले होते. परिणामी, १७ हजार जागा रिक्त राहिल्या. यंदा अनेक संस्थांनी कोर्स बंद केले. त्यामुळे प्रवेशांसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी जागा उपलब्ध होत्या. मात्र, तरीही २९,१९८ प्रवेश झाले, हे सुचिन्ह आहे,' असे पुणे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ खेडकर यांनी सांगितले.

अनेक संस्थांकडून जागा परत

'एमबीए'च्या रिक्त जागा घटल्याचे चित्र यंदा निर्माण झाले असले, तरी अनेक संस्थांनी आपले कोर्स बंद केल्यामुळे मुळात उपलब्ध जागाही यंदा कमी झाल्या होत्या. 'आघाडीच्या काही संस्थांनीही आपल्या जागा यंदा कमी केल्या, तर काही संस्थांनी कोर्स बंद करण्याची परवानगी मागितली आहे. विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याने हे चित्र आहे. मात्र, आघाडीच्या संस्थांमध्ये गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा प्रवेशाची आकडेवारी निश्चितच चांगली आहे,' असे सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. पराग काळकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images