Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नागरिकाला मारहाण करून लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लघुशंकेसाठी थांबलेल्या व्यक्तीला मारहाण करून लुटल्याची घटना डहाणूकर कॉलनी बस स्टॉपवर शनिवारी पहाटे घडली. रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला पाठलाग करून पकडले. त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय लालासाहेब गोगावले (१९, रा. उत्तमनगर, वारजे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचे साथीदार संदीप सावंत, अमन खान (रा. वारजे) आणि आणखी एकाचा शोध सुरू आहे. उमाकांत राठोड (३३, रा. रांजणगाव, शिरूर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोड शनिवारी पहाटे डहाणूकर कॉलनीतून टेम्पो-ट्रॅव्हल्समधून जात होते. पहाटे चारच्या सुमारास डहाणूकर कॉलनी बस स्टॉपजवळ ते लघुशंकेसाठी थांबले होते. त्या वेळी दोन मोटारसायकलवरून आलेल्या चौघांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्या जवळील रोख दोन हजार आणि एक मोबाइल असा माल चोरून नेला. आरोपी पळून गेल्यानंतर राठोड यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे रात्रीच्या गस्तीवर असलेले डेक्कन पोलिस ठाण्याचे कर्माचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी राठोड यांच्याकडे चौकशी केल्यानंतर आरोपींचा पाठलाग केला. त्या वेळी त्यांना गोगावले सापडला. त्याचे इतर साथीदार फरारी आहेत. या प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्याचे फौजदार धनवे अधिक तपास करत आहेत.

चोरट्यांना प्रतिकार; डॉक्टरवर हल्ला

कारमध्ये बसलेल्या डॉक्टरच्या हातातील मोबाइल हिसकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांनी त्याच्यावरच जीवघेणा हल्ला केल्याची घटना संगमवाडी येथे नुकतीच घडली. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्रतीक सोपकर (२६, रा. शिवाजीनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. प्रतीक संगमवाडी येथील लक्झरी ट्रॅव्हल्सच्या स्टॉपजवळ कार थांबवून मोबाइलमध्ये आलेले मेसेज पाहत होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या हातातील मोबाइल हिसकवण्याचा प्रयत्न केला. प्रतीक यांनी त्यांना प्रतिकार केला. त्यानंतर आरोपींनी प्रतीक यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परिचारिकांच्या गणवेशाला मंजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील परिचारिकांना आता पांढऱ्या रंगाऐवजी बदामी रंगाचा गणवेश मिळणार असून, त्यासोबत पांढऱ्या रंगाचा अॅप्रनही परिधान केलेल्या परिचारिका सरकारी हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळणार आहेत. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण खात्याने या निर्णयाला मान्यता दिली असून, त्याबाबतचा अध्यादेश मात्र जारी केलेला नाही.

राज्यातील परिचारिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 'महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस फेडरेशन'च्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी तीन सप्टेंबरपासून संप पुकारण्यात आला आहे. त्याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत दरम्यान गणवेशाबाबत चर्चा झाली. गेल्या १९ वर्षांपासून गणवेशाच्या मागणीचा मुद्दा प्रलंबित होता. गणवेशाचे भारतीयीकरण आणि पांढऱ्याऐवजी बदामी रंगात त्याचे रूपांतर करण्याबाबतचे आदेश ऑगस्ट २००४मध्ये निघाले. परंतु, या आदेशाला नंतर स्थगिती मिळाली.

'महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस फेडरेशन'च्या अध्यक्षा अनुराधा आठवले म्हणाल्या, 'तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी बदामी रंगाचा गणवेश देण्यास नकार दिला होता. त्या निर्णयाविरोधात आम्ही कोर्टात याचिका दाखल केली होती. तावडे यांच्यासोबतच्या चर्चेत हा मुद्दा चर्चिला गेला. त्या वेळी याचिका मागे घेण्याची विनंती करण्यात आली.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरी करणारा चालक गजाआड

$
0
0

पुणेः एका बड्या उद्योगपतीच्या वाहनचालकाने प्रभात रोड, डेक्कन जिमखाना परिसरातील वाहनांमध्ये चोरी करून अनेक मौल्यवान वस्तूंवर हात साफ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 'पीवायसी' येथील 'सीसीटीव्ही' फुटेजमध्ये या चालकाची छबी टिपली गेल्याने तो गजाआड झाला. पोलिसांनी त्याच्या घरातून लॅपटॉप, मोबाइल हँडसेट, आयपॅड अशा विविध वस्तू जप्त केल्या आहेत.

लोकेश रामे गौडा (३६, रा. नेहरूनगर, साई मंदिराजवळ, पिंपरी पुणे) असे कोठडी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी डॉ. सुचेता गजानन साठे (४३, रा. श्रीकृपा अपार्टमेंट, भरत कुंज, गणेशनगर पुणे) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गौडा उद्योगपतीच्या गाडीवर चालक म्हणून नोकरी करतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिनाभर मोफत प्रवास परवडणार नाहीः पवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

'आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवासाचा अनुभव घेता यावा, म्हणून मुंबईकरांना केवळ दोन दिवस मोफत प्रवासाची सुविधा दिली होती. मग पुण्यात आळंदी रोडवर 'बीआरटी'साठी महिनाभर मोफत प्रवास सुविधा कशासाठी? आधी 'ट्रायल रन' आणि आता महिनाभर मोफत प्रवासामुळे प्रशासनाला कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागेल. त्यामुळे प्रवाशांना पुढील आठ-दहा दिवसच मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून द्यावी,' अशी सूचना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालिका प्रशासनाला केली. त्यामुळे आळंदी रोड बीआरटी मार्गावर महिनाभर मोफत प्रवासाचा निर्णय पालिकेला मागे घ्यावा लागणार आहे.

बीआरटी मार्गाच्या उद्‍घाटनानंतर विमानतळ ते कोथरूड आणि विमानतळ ते हिंजवडी या मार्गावर धावणाऱ्या वातानुकुलित गाड्यांना पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून बससेवेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पवार यांनी पालिका आणि 'पीएमपी'च्या अधिकाऱ्यांसोबत डेक्कन कॉलेज ते फुलेनगरपर्यंत बसने प्रवास केला. त्या वेळी अजित पवार बोलत होते.

पवार म्हणाले, 'पीएमपीची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने विश्रांतवाडी ते पुणे महापालिका आणि पुणे स्टेशन मार्गावर महिनाभर मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून देणे परवडणारे नाही. आर्थिक राजधानी मुंबईत मेट्रो सुरू झाल्यानंतर केवळ दोनच दिवस मुंबईकरांना मोफत प्रवास सुविधा दिली होती. एक ऑगस्टपासून दहा बस दिवसभर 'ट्रायल रन'करिता धावत होत्या. त्यात आणखी महिनाभर मोफत प्रवास दिल्यास प्रशासनाला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल. त्यामुळे मोफत प्रवासाची सुविधा जास्तीत जास्त आठ दिवस द्यावी,' अशी भूमिका पवार यांनी मांडली.

'उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या सूचनांचा नक्कीच गांभीर्याने विचार केला जाणार आहे. याबाबत येत्या एक-दोन दिवसांत संबंधित पालिका आणि 'पीएमपी'च्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. मोफत प्रवासाची मर्यादा आठ दिवसांवर आणण्याचा निर्णय त्या बैठकीत घेतला जाईल

- दत्तात्रय धनकवडे, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा रोड ‘बीआरटी’त अजूनही अडथळेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्वारगेट येथील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याशिवाय स्वारगेट-कात्रज या मार्गावरील बीआरटी पूर्ण क्षमतेने सुरू होणार नसल्याचे 'पीएमपी'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मयुरा शिंदेकर यांनी रविवारी स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून खंडित झालेली या मार्गावरील बीआरटी सेवा सुरू होण्यासाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

धनकवडी येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू झाल्यापासून किमान पंचमी हॉटेल चौक ते कात्रज दरम्यानचा बीआरटी मार्ग सुरू करण्याची मागणी केली जात होती. संगमवाडी-विश्रांतवाडी या मार्गावरील बीआरटी प्रकल्पाचे रविवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अखेर उद्घाटन झाले. त्या पार्श्वभूमीवर, स्वारगेट-कात्रज बीआरटी कधी होणार, याबाबत शिंदेकर यांच्याकडे विचारणा केली असता 'संपूर्ण बीआरटी आता लगेच शक्य नाही. परंतु 'बीआरटी'च्या उपलब्ध लेनवर ती चालवली जात आहे,' असे त्यांनी सांगितले.

देशात सर्वप्रथम 'बीआरटी'चा पथदर्शी प्रकल्प पुण्यात स्वारगेट-कात्रज मार्गावर राबवण्यात आला. गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर करण्यात आलेल्या विविध कामांमुळे हा बीआरटी मार्ग आता एकसंध राहिलेला नाही. काही ठिकाणी पीएमपी बस बीआरटी लेनमधून जातात, तर काही ठिकाणी मुख्य रस्त्यावरून धावतात. धनकवडी उड्डाणपुलाखालील बीआरटी लेनचे काम झाले आहे; मात्र अद्याप तेथून बससेवा सुरू झालेली नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे.

पद्मावती चौक परिसरात बीआरटी मार्गासाठी दुभाजक टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच, येथील उड्डाणपुलाच्या कामाच्या वेळेस हटवलेला बस स्टॉप अद्याप पूर्ववत करणे बाकी आहे. ही कामे झाल्यानंतर बहुतांश रस्त्यावर बीआरटी लेन उपलब्ध होईल.

अंदाजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पिंपरी-चिंचवड येथील बीआरटी व त्यानंतर नगर रोडचा बीआरटी मार्ग सुरू करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्ग सुरू करण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर तो मार्गही सुरू केला जाईल.

- मयुरा शिंदेकर, सीईओ, पीएमपी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोडे ‘इंद्रायणी’त न्हाले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

संगमवाडी-विश्रांतवाडी या मार्गावरील अर्थात आळंदी रोडवरील बहुप्रतीक्षित इंद्रधनुष्य बीआरटी मार्गाचे अखेर रविवारी उद‍्घाटन झाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात आला.

कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला आळंदी रोडवरील बीआरटी मार्ग बंद असल्याने बाजूच्या रस्त्यावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. विविध पक्षांचे नगरसेवक आणि नागरिकांनी सतत आंदोलने केली होती. अखेरीस महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी एक ऑगस्टपासून बीआरटी सुरू करण्याचे आदेश दिले; पण बीआरटी मार्गावरील काही तांत्रिक कामांची पूर्तता झाली नसल्याने 'ट्रायल रन' सुरू करण्यात आली होती.

अखेरीस ३० दिवसांनंतर या मार्गाच्या उद‍्घाटनाला मुहूर्त मिळाला. या वेळी अजित पवार यांच्यासह पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, काँग्रेस नेते अरविंद शिंदे, नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे, संजय भोसले, माजी आमदार बापू पठारे, 'पीएमपी'चे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा, सीईओ मयूरा शिंदेकर यांच्यासह पालिका आणि 'पीएमपी'चे अनेक अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेवाकरामुळे मंडप साहित्याची दरवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

येत्या गणेशोत्सवाचा मंडप उभारताना मंडळाच्या खिशाला थोडी चाट बसणार आहे. वाढलेल्या सेवाकरामुळे मंडप साहित्याचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे डिझेलचे दर कमी झाल्यानंतरही मंडळाचा खर्च कमी होणार नसल्याचे चित्र आहे.

श्रावण महिना सुरू झाल्यामुळे आता गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे. मूर्तिकारांकडे मूर्ती तयार करण्याची लगबग सुरू आहे. तर, मंडळाच्या कार्यकर्तेही नियोजन करण्यात व्यग्र आहेत. मात्र, हायकोर्टाने राज्य सरकार व महापालिकेच्या माध्यमातून गणेशोत्सवासाठी रस्त्यावर मंडप उभारण्यात घातलेल्या काही बंधनांमुळे कार्यकर्त्यांमध्ये काहीसे नाराजीचे वातावरण आहे. काही मंडळांनी मंडप उभारणीचे काम हाती घेतले आहे. गेल्या काही काळात पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात झाल्याने खर्च कमी होण्याची अपेक्षा होती. मात्र, 'प्रशासनाने ठरवून दिलेल्या मापातच मंडप उभारण्याची भूमिका आहे. उत्सवावर बंधने येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. मात्र, त्याचा उत्सवावर परिणाम होणार नाही. यंदा सेवाकरात वाढ झाल्याने मंडप साहित्याचेही दर काही प्रमाणात वाढले आहेत. साधारणपणे १० ते १५ टक्क्यांची ही वाढ आहे,' असे मंडप व्यावसायिक दीपक दाते यांनी सांगितले.

कोर्टाच्या नियमांचा व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता व्यावसायिक इशाक जाफव यांनी व्यक्त केली. पेट्रोल-डिझेलचे दरांमध्ये सातत्याने चढउतार होत असल्याने झाल्याने दरवाढ न करण्याचा विचार होता. मात्र, सेवा करामुळे दरवाढ अपरिहार्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

अद्याप मंडप उभारणीला तितकासा वेग आलेला नाही. मात्र, मंडळांकडून साहित्याची विचारणा सुरू झाली आहे. गेल्या काही काळात खड्डेरहित मंडपाच्या साहित्याची विचारणा जास्त होते. या साहित्याचे भाडे तुलनेने जास्त असूनही मंडळांकडून त्यालाच प्राधान्य दिले जाते.

- मंडप व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलाठ्यांना प्रमाण भाषेचे धडे

$
0
0

chinmay.patankar@timesgroup.com

सरकारी कागदपत्रांमधील क्लिष्टता दूर करण्यासाठी ग्रामसेवक आणि तलाठ्यांना प्रमाण मराठीचे धडे दिले जाणार आहेत. भाषा संचालनालयाच्या वतीने या अनोख्या योजनेचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही भाष‌िक भान निर्माण करण्याचा उद्देश या योजनेमागे आहे.

दर बारा कोसांवर भाषा बदलते असे म्हटले जाते. त्यामुळेच राज्यात भाष‌िक वैविध्य विपुल आहे. गावपातळीवर सरकारी कामांत आजही काही प्रमाणात स्थानिक भाषेचा वापर केला जातो; तसेच मराठी भाषा वापरताना त्यात क्लिष्ट सरकारी शब्द असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना सातबारासारखी कागदपत्रे वाचण्यात अडचणी येतात. ही उणीव दूर करण्यासाठी भाषा संचालनालयाने पुढाकार घेतला आहे. प्राथमिक स्वरूपात तयार केलेल्या योजनेत ग्रामसेवक व तलाठ्यांना प्रमाण व सोप्या मराठीचे धडे देण्यात येणार आहेत, अशी माहिती संचालनालयाच्या संचालक डॉ. मंजूषा कुलकर्णी यांनी 'मटा'ला दिली.

सातबारा उतारा, गाव नकाशा, उत्पन्नाचा दाखला आदी विविध कागदपत्रांमध्ये सरकारी मराठीचा वापर केला जातो. शेतकऱ्यांना ही भाषा समजावून घेण्यात अडचणी येतात. सोप्या मराठीचा वापर सरकारी कागदपत्रांमध्ये वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी ग्रामसेवक, तलाठ्यांच्या माध्यमातून व्यापक स्तरावर भाष‌िक यंत्रणा तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या माध्यमातून ग्रामीण व प्रमाणभाषेची देवाणघेवाण करणेही शक्य आहे. ग्रामीण भागातील काही चांगले व दुर्लक्षित शब्द यामुळे प्रमाण भाषेचा भाग होऊ शकतील, असेही डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

भाषा संचालनालयाच्या वतीने म्हणींचा बृहद् कोश तयार करण्यात येणार आहे. ग्रामसेवक व तलाठ्यांना प्रमाण मराठीचे धडे देतानाच स्थानिक पातळीवर वापरल्या जाणाऱ्या म्हणी, वेगळे शब्द त्यांच्याकडून उपलब्ध होऊ शकतील. त्यांचा समावेश या कोशामध्ये केला जाईल. सर्वसमावेशक कोश तयार करण्याच्या दृष्टीने व्यापक स्तरावर ही योजना राबवली जाणार आहे.

- डॉ. मंजूषा कुलकर्णी, संचालक, माहिती संचालनालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऑनलाइन’ औषध खरेदीत धोका

$
0
0

mustafa.attar@timesgroup.com

पुणे : गर्भपात, लैंगिक, गुंगी, नशा आणणारी औषधे, तसेच बॉडी बिल्डिंगसाठी आवश्यक प्रोटीन पावडर, स्टिरॉइड, व्हिटामिन १२ यासारखी शेड्युल प्रकारातील औषधे इंटरनेट, सोशल मीडियाद्वारे ऑनलाइन खरेदीतून तरुणाईचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती डॉक्टर व्यक्त करीत आहेत. तसेच औषधांच्या आहारी जाण्याची सवय तरुणांना लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ऑनलाइन औषध खरेदीतून गुंगी, नशा आणणारी, तसेच गर्भपातासह लैंगिक औषधांच्या खरेदीचे प्रमाण चोरी छुपे वाढत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात येत आहे. यामुळे तरुण पिढीला धोका पोहोचण्याची शक्यता व्यक्त करीत औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्यातच दुरुस्ती करण्याची मागणी करीत अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने या विषयाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. 'देशात सात लाख औषध विक्रेते उपलब्ध असताना बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वेबसाइटवरून ऑनलाइन औषध विक्री होत आहे. देशात तरुणांचे प्रमाण सर्वाधिक असून त्यांना इंटरनेट, सोशल मीडियाचे माध्यम सहज उपलब्ध होत आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय अथवा सल्ल्याने नशा, गुंगी, गर्भपात, लैंगिकसारख्या विविध प्रकारच्या आरोग्यास घातक ठरणाऱ्या औषधांची विक्री केली जात आहे. दिल्ली, मेरठ, जयपूर येथून येत असल्याने ही औषधे खरी की खोटी, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे तरुणांच्या हाती अंमली पदार्थ लागण्याची भीती आहे,' अशी माहिती अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यानी 'मटा'ला दिली.

'तरुण पिढी डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवरील औषधांची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून मिळविते. त्याचे किती डोसेस घ्यायचे हे देखील स्वतःच ठरविते. त्याच प्रकारे गर्भपात, लैंगिकता, हार्मोनल सप्लिमेंट्स, व्हिटॅमिन १२, प्रोटीन पावडर, बॉडी बिल्डिंगसाठीचे स्टिरॉइड, न्यूट्रीशनल सप्लिमेंट्ससारखी औषधे ऑनलाइन वेबसाइटच्या माध्यमातून मागविण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे. ही औषधे प्रत्यक्षात उत्तर प्रदेश, कर्नाटक, झारखंड, मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येतात. त्यामुळे औषधांच्या गुणवत्तेबाबत शंका येते,' असे काही डॉक्टरांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. ऑनलाइन औषध विक्रीवर अन्न व औषध प्रशासनाने चाप लावला आहे. पण काही नव्या कंपन्यांच्या वेबसाइट सध्या कार्यरत आहेत. पुण्यात अशा स्वरूपाची विक्री होत नसावी. पण राज्यात मुंबईसह अन्य भागात ही विक्री होत असल्याची माहिती एफडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

ऑनलाइन औषध खरेदी विक्रीमुळे देशातील केमिस्ट, फार्मासिस्ट बेरोजगार होतील. त्याशिवाय गर्भपातासह अन्य औषधांचा दुरुपयोग होऊ शकतो. यासंदर्भात केंद्रीय रसायनमंत्री हंसराज अहीर यांच्या माध्यमातून केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची लवकरच भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधणार आहोत.

- जगन्नाथ शिंदे, अध्यक्ष, अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आदिवासी वसतिगृहासाठी उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

शेवाळवाडी येथील आदिवासी वसतिगृहातील १५० विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांतील चार विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली आहे. हडपसर पोलिसांनी त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना उद्देशून अपशब्द उच्चारल्याची तक्रार येथील पोलिस स्टेशनमध्ये अनोळखी व्यक्तीविरुद्ध दाखल करण्यात आली आहे.

शेवाळवाडी भंडलकरनगर येथे भाडे तत्त्वावर १०५ विद्यार्थी क्षमता असलेले आदिवासी वसतिगृह आहे. या वसतिगृहामध्ये हडपसर परिसरातील महाविद्यालयात शिकत असलेले ९० टक्के विद्यार्थी राहतात. १ हे वसतिगृह १ सप्टेंबरपासून भोसरीला हलवल्याची सूचना इमारतीमध्ये लावली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. वसतिगृहाचे स्थलांतर करू नये, वाचनालय, संगणक, टी. व्ही. उपलब्ध करून द्यावे, वसतिगृहाचे कर्मचारी शिवीगाळ करतात त्यामुळे त्यांची बदली करावी, गृहपालची मनमानी बंद करावी, वेळेवर भत्ता मिळावा अशा विविध मागण्यांसाठी इमारतीच्या खाली तीन दिवसांपासून अमरण उपोषण सुरू केले आहे. याचे निवेदन देण्यासाठी विद्यार्थी हडपसर पोलिस स्टेशनला गेले असता तिथे वसतिगृह प्रकल्प अधिकारी, सहायक अधिकारी, गृहपाल; तसेच एक अनोळखी व्यक्ती तेथे आली. 'मी राज्यमंत्री आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य यांचा 'पीए' आहे. तुमच्या सोयी-सुविधा सरकारने बंद केल्या तर तुम्ही शिकणार कसे? तुमची लायकी आहे का पुण्यात शिकायची,' अशा पद्धतीने प्रकल्प अधिकारी मोरे यांच्यासमोर आदिवासी समाजाला उल्लेखून शिवीगाळ केली असल्याचे हडपसर पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारी अर्जात नमूद केले आहे. विद्यार्थ्यांनी तीन दिवसांपासून वसतिगृहात जेवण केले नाही. त्यामुळे रविवारी दुपारी चार विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने हडपसर पोलिसांनी स्थानिक डॉक्टरला बोलावून तपासणी केल्यानंतर त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे.

विद्यार्थ्याच्या मागण्या मान्य केल्या आहेत. वसतिगृहाचे शेवाळवाडी येथे स्थलांतर होणार नाही. येथील कर्मचारी पिंपरी-चिंचवड येथील वसतिगृहात पाठवणार आहोत. मांजरी येथील वसतिगृहाचे कर्मचारी येथील काम पाहतील. आम्ही यापूर्वीच विद्यार्थ्यांना ६० हजाराची पुस्तकेही दिली आहेत.

- मोरे, सहायक प्रकल्प अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोतराजाच्या वेशात टिळेकरांचे रास्ता रोको

$
0
0

कात्रज कोंढवा रस्ता रुंदीकरणाचा प्रलंबित प्रश्न

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या प्रलंबित प्रश्नाकडे महापालिकेसह राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे अर्थात भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांनी पोतराजाच्या वेशातच आंदोलन केले.

कात्रज कोंढवा रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून चारचाकी, तसेच माल वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र वारंवार पाहायला मिळत आहे. त्यामुळे दुचाकीसह पादचाऱ्यांना, तसेच शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. या परिस्थितीकडे पोलिस, तसेच महापालिकेच्या प्रशासनाचे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबत तक्रार केली. तरीही या तक्रारीची दखल फारशी घेण्यात आली नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच वाहतूक कोंडीतून मार्ग काढणाऱ्या युवतीचा दुचाकीवरून पडल्याने मालवाहतूक गाडीच्या खाली आल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना अनेकदा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. याच रस्त्यावर हडपसरचे आमदार योगेश टिळेकर यांचे संपर्क कार्यालय आहे. ही वाहतूक कोंडी थेट त्यांच्या संपर्क कार्यालयापर्यंत दिसून येते. या पार्श्वभूमीवर, आमदार टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत रविवारी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी आमदार टिळेकर यांनी पोतराजाची वेशभूषा परिधान करून आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांसह उपस्थितांचे लक्ष वेधले. टिळेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी रस्तारुंदी लवकर करण्यासंदर्भात घोषणा देत फटके मारून आंदोलन केले. आंदोलनात रवी भुसारी, माजी नगरसेविका रंजना टिळेकर, सुनील कामठे, मारुती तुपे, आबा शिंगोटे, संकेत झेंडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेसुमार पाणीवापरावर ‘उतारा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उसासाठी होणाऱ्या बेसुमार पाणीवापराची समस्या सोडविण्यासाठी राज्य आणि देशातील ऊस उत्पादकांसमोर नवा पर्याय येत आहे. इंडोनेशियातील एका नव्या जातीच्या उसाचा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) शास्त्रज्ञांकडून अभ्यास सुरू आहे. या जातीची लागवड महाराष्ट्र आणि भारतात यशस्वी झाली, तर उसाच्या पाण्याची गरज निम्म्यावर येईल, अशी माहिती माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी दिली.

यंदा राज्यातील अनेक भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. पाण्याच्या टंचाईचा विषय येतो, तेव्हा उसासाठी बेसुमार पाणीवापर होत असल्याचा आरोप करण्यात येतो. राज्य सरकारने उसासाठी ठिबक सिंचनाचे टार्गेट ठरवून दिले असले, तरी अद्याप ते साध्य झालेले नाही. त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या अधिवेशनात उसाच्या या नव्या जातीची माहिती दिली. इंडोनेशियामध्ये ४० हजार हेक्टर क्षेत्रावर उसाच्या या नव्या जातीची लागवड करण्यात आली असून आपण लवकरच तेथे भेट देण्यास जाणार आहोत, असे त्यांनी सांगितले. या उसाचा उतारा आणि वजन (टनेज) आपल्याकडील उसाएवढेच आहे. मात्र, त्याला पाण्याची पाळी ४० दिवसांनी देता येते, अशी माहिती त्यांनी दिली.

यासंदर्भात व्हीएसआयमधील तज्ज्ञांना तेथे भेट देऊन अभ्यास करण्याची सूचना आपण केली आहे. इतक्या कमी पाण्यावर येथील दर्जाचाच ऊस उपलब्ध होणार असेल, तर उसासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटेल, असे पवार यांनी सांगितले. उसासंदर्भात चर्चा सुरू होते, तेव्हा हे सर्वाधिक पाणी वापरत असल्याची टीका होते. मात्र, ही नवी जात महाराष्ट्र आणि भारतात यशस्वी झाली, तर उपलब्ध पाण्यातच उसाचे क्षेत्र दुप्पट होऊ शकेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. दरम्यान, वारंवार निर्माण होणाऱ्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर सध्या विविध ठिकाणी दुष्काळाला तोंड देण्याची अधिक क्षमता (ड्रॉट रेझिस्टंट कॅपेसिटी) असलेल्या पिकांच्या जाती विकसित करण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये फळबागांचाही समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरिबांच्या हिताच्या योजनांना काँग्रेसचा विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जनतेला गरीब, अशिक्षित आणि असुरक्षित ठेवण्यात काँग्रेसचा स्वार्थ होता, मात्र भाजपने सत्तेत आल्यावर गरिबांना घर, रोजगार आणि सुरक्षितता देण्याच्या योजना सुरू केल्या. या योजना गरिबांच्या हिताच्या असल्यामुळेच काँग्रेस त्याला विरोध करीत आहे, अशी टीका केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली.

पर्वती परिसरातील लक्ष्मीनगर येथे रक्षाबंधनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने झोपडपट्टीतील गरजू महिलांना पंतप्रधान विमा सुरक्षा योजनेच्या प्रमाणपत्रांचे वाटप करण्याच्या कार्यक्रमात जावडेकर बोलत होते. एक हजार महिलांना विमा प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. भाजपचे शहर चिटणीस विनोद वस्ते यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, नगरसेविका स्मिता वस्ते, मानसी देशपांडे, माधुरी सहस्त्रबुध्दे, मनीषा घाटे, राजू शिळीमकर, धनंजय जाधव, रघुनाथ गौडा, युवा मोर्चा अध्यक्ष गणेश घोष, शहर उपाध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, पर्वतीचे अध्यक्ष विश्वास ननावरे, गोपाळ चिंतल, सरस्वती शेंडगे आदी उपस्थित होते. 'अटल पेन्शन योजना आणि केंद्राच्या विमा योजनांना देशभरात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अकरा कोटी नागरिकांनी रांगा लावून स्वतःचा विमा उतरविला. या योजनांमुळे गरीब, शेतकरी आणि मजूर अशा सर्वसामान्यांना सुरक्षिततेची हमी मिळाली. काँग्रेसने पन्नास वर्षांत गरिबांसाठी अशा योजना का राबविल्या नाहीत,' असा प्रश्नही जावडेकर यांनी उपस्थित केला.प्रदूषणाचा धोका लक्षात घेऊन प्रत्येकाने किमान एका झाडाची जबाबदारी घेणे गरजेचे असल्याचे मत कांबळे यांनी व्यक्त केले. पर्वती टेकडीवर संयुक्त वनव्यवस्थापनाच्या माध्यमातून वनीकरण करणार असल्याची माहिती मिसाळ यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्जन्ययागाने पावसाला आवाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने अखेरचा उपाय म्हणून पावसाला आवाहन करण्यासाठी पर्जन्ययाग करण्याचा विचार सध्या शहरामध्ये सुरू आहे. देशभरात येत्या काळात असे याग होणार आहेत.

ऑगस्ट महिना संपत आला, तरी देशभरात समाधानकारक पाऊस झालेला नाही. कृत्रिम पावसाचा प्रयोगही अयशस्वी ठरला. अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकही चिंतातूर झाला आहे. अशा वेळी शेवटचा उपाय म्हणून पर्ज्यन्ययागाकडे पाहिले जात आहे; तसेच ही परिस्थिती पुढच्या वर्षी उद्भवू नये व चांगला पाऊस व्हावा म्हणून ऑक्टोबरपासून देशभरात १६ ठिकाणी सोमयाग केले जाणार आहेत आणि तत्काळ पर्ज्यन्यवृष्टी व्हावी यासाठी पर्ज्यन्ययाग होणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील वेदविज्ञान आश्रमात याबाबत प्रयोग सुरू असून, आश्रमाचे प्रमुख नाना काळे यांनी याविषयी 'मटा'ला सांगितले, की 'पर्ज्यन्ययागासाठी देशभरातून विचारणा होऊ लागली आहे. यास सरकारी साह्य नसल्याने मर्यादा येत आहेत. मात्र काही जण स्वतः यासाठी पुढे येत असून, येत्या काही दिवसांत असे याग केले जातील. निर्सगाचे बिघडलेले कालचक्र व पावसाचा लहरीपणा पाहता पुढच्या वर्षी समाधानकारक पाऊस व्हावा म्हणून आतापासूनच तयारी केली जात आहे. ऑक्टोबरपासून मेपर्यंत देशभरात १६ ठिकाणी सोमयाग होणार आहेत. त्यासाठी १२ ज्योतिर्लिंग आणि बार्शी येथील आश्रम ही ठिकाणे निश्चित केली आहेत. या यागातून निर्माण होणाऱ्या लहरींमुळे पर्ज्यन्यगर्भ धारणा होते व त्यातून अपेक्षित पाऊस होऊ शकतो. २००५ मध्ये असे याग केल्यामुळे त्याच्या पुढील वर्षी म्हणजे २००६ मध्ये दमदार पाऊस झाला होता,' याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पर्जन्ययागासारख्या प्रयोगांवर विश्वास दाखवला जात नाही; पण यागामुळे पाऊस होतो हे सिद्ध झाले आहे. ऋग्वेदात याबाबत सर्व नोंद आहे. दुष्काळाची भीषणता पाहता या प्रयोगांकडे वळण्याची वेळ आली आहे.

- मोरेश्वर घैसास, वेदपाठशाळा

सोमयागात सोमवल्ली या वृक्षाच्या रसाची आहुती दिली जाते. त्यामधून ४० फुटाच्या ज्वाला निर्माण होऊन बीजे विखुरली जातात. त्याआधारे पर्ज्यन्यवृष्टी होते.

- नाना काळे, वेदविज्ञान आश्रम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात ३३ टक्के कमी पावसाची नोंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात पावसाने दडी मारल्याने दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस आणखी गंभीर होत आहे. राज्यात रविवारपर्यंतच्या (३० ऑगस्ट) हंगामी सरासरीपेक्षा ३३.५ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. केवळ विदर्भात सर्वसाधारण पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण-गोव्यात अपुऱ्या पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात सरासरीच्या निम्माच पाऊस झाला आहे. पुण्यात हंगामी सरासरीपेक्षा ३१.७८ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

हवामान विभागाने राज्याचे मध्य महाराष्ट्र, कोकण-गोवा, मराठवाडा आणि विदर्भ असे चार उपविभाग केले आहेत. या चारही उपविभागांत मिळून राज्यात रविवारपर्यंत ३३.५ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात सर्वाधिक म्हणजे ५० टक्के, मध्य महाराष्ट्रात ३९ टक्के, कोकण-गोव्यात ३२ टक्के, तर विदर्भात सरासरीपेक्षा १३ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

पर्जन्यछायेचा प्रदेश असलेल्या मराठवाड्यातच पावसाचे प्रमाण सर्वांत कमी राहिले आहे. या भागात आतापर्यंत सरासरीच्या निम्माच पाऊस झाला आहे. परिणामी या भागातील दुष्काळी परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. दुष्काळावरून राजकीय पक्षांनीही आता रान पेटवायला सुरुवात केली आहे.

पावसाच्या चार महिन्यातील आता अवघा एकच महिना शिल्लक राहिला आहे. त्यातही सप्टेंबर महिना मान्सूनच्या माघारीचा महिना असल्याने यात पावसाला फारसा जोर नसतो. त्यामुळे ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विनापरवाना स्टॉल्सवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील विविध रस्त्यांवर गणेश मूर्तीचे स्टॉल्स उभारताना पोलिसांनी परवानगी न घेणाऱ्या स्टॉल्सवर सोमवारपासून कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. याबाबतच्या सूचना अतिक्रमण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या असून, त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, असे आदेश अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिले आहेत. अनेक ठिकाणी उभारण्यात आलेल्या गणेश मूर्ती स्टॉल्समुळे त्रास होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून आल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सवाला अवघे १८ दिवस उरले आहेत. गेल्या आठवड्यापासूनच शहरातील अनेक भागात गणेश मूर्तीचे स्टॉल्स उभारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मध्यवर्ती पेठांमधील भागांसह शहराची उपनगरे अशी ओळख असलेल्या कात्रज, बिबवेवाडी, धनकवड‌ी, अप्पर इंदिरानगर, वडगाव, धायरी, आनंदनगर या भागात अनेकांनी गणेश मूर्तीची विक्री करण्याचे स्टॉल्स उभारले आहेत. स्टॉल्स उभारण्यासाठी पोलिसांच्या वाह‌तूक शाखेची परवानगी घेणे गरजेचे असते. मात्र, अनेकांनी याकडे दुर्लक्ष करत मनमानी पद्धतीने स्टॉल्स उभारले असल्याच्या अनेक तक्रारी स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे केल्या आहेत. वाहतूक पोलिसांची मान्यता न घेता उभारण्यात आलेल्या स्टॉलचालकांवर सोमवारपासून कारवाई सुरू केली जाणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुरुषोत्तम’च्या अंतिम फेरीत नऊ एकांकिका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, फर्ग्युसन कॉलेज, 'बीएमसीसी'सह नऊ कॉलेजच्या एकांकिकांची पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल बुधवारी रात्री जाहीर झाला.

महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेच्या वतीने १६ ते ३१ ऑगस्टदरम्यान भरत नाट्य मंदिर येथे पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी नेहमीच्याच उत्साहात झाली. प्राथमिक फेरीत ५१

कॉलेजच्या संघांनी वैविध्यपूर्ण एकांकिकांचे सादरीकरण केले. रंगकर्मी अंजली धारू, डॉ. राहुल देशपांडे व मिलिंद जोगळेकर यांनी परीक्षण केले. पाच व सहा सप्टेंबर रोजी भरत नाट्य मंदिर येथेच स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार आहे.

अंतिम फेरीसाठी पेनकिलर (सीओईपी), दिन है छोटासा (व्हीआयआयटी), गवत (फर्ग्युसन कॉलेज), जार ऑफ एल्पिस (गरवारे कॉलेज ऑफ

कॉमर्स), सरहद (पुणे इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी), नातं (व्हीआयटी), ईश्वरसाक्ष (इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स), व्हाय शुड बॉयज हॅव ऑल द फन (बीएमसीसी) आणि रोहिणी (सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय) या एकांकिकांची निवड झाली.

चीअरिंगच्या आरोळ्या आणि एकमेकांना दिलेल्या शुभेच्छांच्या वर्षावात भरत नाट्य मंदिराचा परिसर दणाणून गेला होता. पहिल्या नवात येण्याची जादू इतक्या दिवसांच्या मेहनतीनंतर अनुभवल्याचे समाधान मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सोलर सिटी’मध्येही पुण्याबाबत दुजाभाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारच्या सोलर सिटी योजनेअंतर्गत नुकतीच राज्यातील चार शहरांची निवड जाहीर करण्यात आली असली, तरी त्यातही पुणे महापालिकेबाबत दुजाभावच करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. 'सोलर सिटी'साठी महापालिकेने यापूर्वीच केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता; पण नागपूर, ठाणे, औरंगाबाद, शिर्डीची निवड करताना पुण्याला मात्र डावलण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या सोलर सिटी प्रकल्पासाठी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून प्रक्रिया सुरू आहे. ५० हजार ते ५० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांची यात निवड केली जाणार होती. 'सोलर सिटी'साठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यास पालिकेने दोन वर्षांपूर्वीच संमती दिली होती. त्यानुसार, सविस्तर अहवाल केंद्र सरकारला पाठवण्यात आला होता.

अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने 'सोलर सिटी'च्या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचे ठरवले होते. सौर ऊर्जेचा वापर करून शहरातील विजेच्या बिलामध्ये बचत करण्याचे उद्दिष्ट याद्वारे साध्य करण्याचा प्रयत्न केला जाणार होता. त्यासाठी, केंद्र सरकारकडून अनुदान देण्यात येणार होते. महापालिकेतर्फे या संदर्भातील प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला होता. परंतु, सोलर सिटी प्रकल्पासाठी पुण्याची निवड होऊ शकली नाही. या प्रकल्पात पुण्याची निवड झाली असती, तर वीज बचतीसाठी सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्यास प्रोत्साहनपर अनुदान मिळू शकले असते. पालिका इमारतींसह इतर व्यावसायिक इमारतींवरही त्याचा वापर केला गेला असता; मात्र ही सर्व प्रक्रियाच आता ठप्प होण्याची भीती आहे.

'सोलर सिटी' योजनेत समाविष्ट झालेल्या प्राथमिक स्तरावरील शहरांची यादी केंद्र सरकारने जाहीर केली आहे. आणखी एक यादी जाहीर केली जाणार असून, त्यात पुण्याचा समावेश होईल, अशी खात्री आहे.

- विजय दहिभाते, उपायुक्त (तांत्रिक)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा निवडणूक चुरशीची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक नको, अशी मागणी केली जात असतानाच निवडणुकीसाठी साहित्यिक पुढे येऊ लागले असल्याचे चित्र दिसत आहे. आगामी ८९व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद निवडणुकीसाठी गेल्या काही वर्षांतील सर्वाधिक सहा अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी यांच्या वतीने पिंपरी-चिंचवड येथे संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत डॉ. शरणकुमार लिंबाळे, डॉ. श्रीपाल सबनीस, विठ्ठल वाघ व रवींद्र शोभणे यांचे नाव सुचवणारे अर्ज दाखल झाले आहेत. चंद्रकुमार नलगे व अरुण जाखडे यांचेही अर्ज येण्याची शक्यता आहे. हे दोन्ही अर्ज तीन सप्टेंबरपूर्वी दाखल झाल्यास एकूण अर्जांची संख्या सहा होईल. गेल्या काही वर्षांतील ही संख्या सर्वाधिक आहे.

साहित्य महामंडळाचे सदस्य प्रा. कौतिकराव ठाले पाटील यांनी याविषयी माहिती दिली. 'संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तीन-चार अर्ज नियमितपणे दाखल होतात. पाच अर्ज दाखल झाल्याची उदाहरणे थोडीच आहेत; मात्र सहा अर्ज दाखल झाल्याचे उदाहरण सापडत नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीसाठी सहा अर्ज दाखल झाल्यास ती निश्चितपणे वेगळी बाब ठरेल. यापूर्वी २००८मध्ये सांगली येथील संमेलनासाठी पाच अर्ज दाखल झाल्याचे आठवते. त्या निवडणुकीत म. द. हातकणंगलेकर विजयी झाले होते,' असे ठाले-पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हागणदारीमुक्तीत पुणे अग्रेसर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

राज्यात स्वच्छ भारत मिशनअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकाम व त्यांचा नियमित वापर करण्यात पुणे जिल्हा अग्रेसर असून, बारामती तालुका शेवटून तिसऱ्या क्रमांकावर असल्याचा निष्कर्ष 'युनिसेफ'च्या पाहणीत दिसून आले आहे.

महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनापासून महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत साकारण्याकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 'स्वच्छ भारत अभियाना'ची सुरुवात केली. मोठमोठे सेलेब्रिटीज, पुढाऱ्यांपासून ते खेड्यातील सरपंचांनीसुद्धा हातात झाडू घेऊन स्वच्छता करण्यात पुढाकार घेतला आहे; मात्र निर्मलग्राम पुरस्कारप्राप्त गावात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याचे नुकतेच 'युनिसेफ'च्या पाहणीत स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यातील १७० ग्रामपंचायती १०० टक्के हागणदारीमुक्त झालेल्या आहेत व २५१ ग्रामपंचायती ९१ ते ९९ टक्के हागणदारीमुक्त आहेत. पुणे जिल्ह्यातील अनेक दिग्ग्ज राजकीय नेत्यांचे बालेकिल्ले असणारे तालुकेच हागणदारीमुक्तीत मागे असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. युनिसेफ वर्षातून चार वेळा पाहणी करत असते. तालुक्याच्या विकासाबरोबर हागणदारीमुक्तीत राजकीय उदासीनता असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images