Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा प्रकार आंबेगाव येथील गणेश व्हिला सोसायटीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्या नरेश कांबळे (वय २९) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी विद्या यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पती नरेश अशोक कांबळे व इतर चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश व विद्या यांचा २००६ मध्ये विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना दिलेल्या भिशीच्या पैशाबाबत विचारणा करून त्यांना मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. पोलिस उपनिरीक्षक येवले अधिक तपास करीत आहेत.

तीन लाखांचे दागिने चोरले

एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करीत असताना सूटकेसमध्ये ठेवलेले तीन लाख १५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव ते शिवाजीनगर प्रवासादरम्यान हा प्रकार घडला.

याबाबत देविदास बाविस्कर (वय ६६, रा. कोथरूड) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावीस्कर चाळीसगाव येथून पुण्याला एसटी महामंडळाच्या बसने येत होते. शिवाजीनगर येथे आल्यानंतर त्यांना त्यांच्या सूटकेसमधील तीन लाख १५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी शिवाजीनगरचे पोलिस उपनिरीक्षक सोनकांबळे अधिक तपास करीत आहेत.

हल्ला प्रकरणी पाच अटकेत

केरळमधून प्लायवूड घेऊन आलेल्या ट्रकचालकावर तलवारीने हल्ला केल्याची घटना बुधवारी पहाटे टिंबर मार्केट येथे घडली. या प्रकरणी हल्ला करणाऱ्या पाच जणांस खडक पोलिसांच्या गस्तीवरील पोलिसांनी अटक केली आहे.

सागर महादेव गाकयवाड (वय २२), विशाल खंडू अवघडे (वय १९), शंभो बाबू मदारी (वय २४), सचिन ऊर्फ मामा कचरू कांबळे (वय २०) आणि सचिन काका पवळे (वय २२, सर्व रा. कासेवाडी, भवानी पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत सुनील बबन खराडे (वय ३५, रा. कोनेगाव, ता. कराड) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी माहितीनुसार, खराडे ट्रकचालक असून, केरळमधूनन बुधवारी पहाटे पुण्यात आले होते. टिंबर मार्केट येथे त्यांना पाहिजे असलेला पत्ता शोधत असताना आरोपींनी त्यांना आडविले. त्यांच्याजवळ असलेले साहित्य काढून देण्यास सांगितले. बोलत असताना आरोपींनी त्यांच्यावर तलवारीने वार केला. ट्रकच्या काचा फोडल्या. खराडे ट्रक घेऊन पुढे निघाले असता, आरोपींनी त्यांचा पाठलाग केला. रामोशी गेट चौकात त्यांनी घटनेची माहिती गस्तीवरील पोलिसांना दिल्यानंतर या पाच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना शुक्रवारपर्यंत (२८ ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ललितगेट’ प्रकरणी मोदींवर थेट हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'नरेंद्र मोदी हे माझ्या अत्यंत जवळचे आहेत...!' आयपीएलचे वादग्रस्त माजी कमिशनर ललित मोदी यांचे अशा आशयाचे ई-मेल उपलब्ध झाल्याचा दावा करीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या संबंधांचा खुलासा करा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बुधवारी केली. पंतप्रधान मोदी यांच्या जवळचे असल्यामुळेच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ललित मोदी यांना पाठीशी घातले काय, असा सवाल चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत विचारला.

सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २००९ मध्ये गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आणि अमित शहा हे उपाध्यक्षपदी निवडून आले. दुसऱ्याच दिवशी ललित मोदी आणि गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा ई-मेलद्वारे संपर्क झाला. त्यामध्ये 'नरेंद्र मोदी हे माझ्या अत्यंत जवळचे आहेत,' असा उल्लेख ललित मोदी यांनी केल्याचे चव्हाण यांनी सांगितले. त्याच वेळी आयपीएलच्या संघांसाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये ललित मोदी यांनी बीसीसीआयला न विचारता टेंडरच्या अटी शिथिल केल्याचे प्रकरण उघडकीस आले. व्हिडिओकॉन आणि अदानी समूहास मदत करण्यासाठीच हे घडविण्यात आले होते, आणि नरेंद्र मोदी गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी अदानींना असोसिएशनचे कमर्शियल पार्टनर नियुक्त करण्यात आले होते, असे चव्हाण म्हणाले. त्यामुळे ललित मोदी यांच्या प्रकरणात कोणी कोणास मदत केली, हे समोर येणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय पक्षांना आरटीआय नकोच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

माहितीचा अधिकार हा कायदा चांगला असला, तरी राजकीय पक्ष हे माहिती अधिकार कायद्याच्या अधिकाराखाली आणू नयेत, असे मत व्यक्त करून राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेची बुधवारी री ओढली. या कायद्याच्या आधारे घेतलेल्या माहितीचा वापर दुसऱ्या पक्षांविरुद्ध सूड उगविण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे या कायद्यातील कमतरता दूर केल्यास राजकीय पक्षांना हा कायदा लागू करता येऊ शकतो, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

'थिंक इंडिया' या संस्थेच्या वतीने आयएलएस लॉ कॉलेज येथे आयोजित केलेल्या 'पॉलिटिक्स' या चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. चर्चासत्राला माजी मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी, कॉलेजच्या प्राचार्या वैजयंती जोशी, कामिनी गिरासे आदी उपस्थित होते.

राजकीय पक्ष हे माहिती अधिकार कायद्याच्या अधिकाराखाली येत नाहीत, अशी भूमिका नुकतीच केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात मांडली आहे. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनीही या भूमिकेचे समर्थन केले. 'राजकीय पक्ष हे माहितीचा अधिकार कक्षेत आणल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो. विविध पक्ष या अधिकाराद्वारे माहिती मिळवून त्याचा वापर राजकीय सूड उगविण्यासाठी करू शकतात. त्यामुळे विकासाचे मुद्दे दूर राहून एकमेकांची उणीदुणी काढली जातील,' असेही ते म्हणाले. सध्या माहिती अधिकार चळवळीचे कार्यकर्ते व्यावसायिक झालेले आहेत. ते व्हिजिटिंग कार्डवर व्यवसाय म्हणून 'आरटीआय अॅक्टिव्हिस्ट' असे छापतात, अशी टीका त्यांनी केली.

पक्षांच्या संख्येवर नियंत्रण हवे

देशात विविध राजकीय पक्षांची संख्या वाढली आहे. सध्या ५६ राष्ट्रीय पक्ष असून, प्रादेशिक पक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या संख्येवर नियंत्रण असले पाहिजे, अशी सूचना चव्हाण यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएफ ‘यूएएन’ नाही? क्लेमही घेणार नाही...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनच्या (ईपीएफओ) सदस्यांकडे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) नसल्यास त्यांचे कोणतेही क्लेम स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे आता 'ईपीएफओ'च्या प्रत्येक सदस्याला 'यूएएन' काढावे लागणार आहे.

वेतनातून प्रॉव्हिडंट फंड (पीएफ) कपात होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे 'ईपीएफओ'मध्ये खाते असते. त्या कर्मचाऱ्यांनी 'यूएएन' अॅक्टिव्हेट करून घेणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी 'ईपीएफओ'तर्फे मोहीम सुरू आहे. मात्र, त्यास अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता 'यूएएन'शिवाय क्लेम स्वीकारले जाणार नसल्याचे 'ईपीएफओ'च्या पुणे विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

नागरिकांकडून 'पीएफ' ट्रान्स्फर करणे, 'पीएफ'ची रक्कम काढणे यासाठी ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष कार्यालयात अर्ज स्वीकारले जातात. यापुढे हे अर्ज 'यूएएन' नसल्यास स्वीकारले जाणार नाहीत, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सध्या 'यूएएन' अॅक्टिव्हेट करण्यासाठी मोहीम सुरू आहे. या मोहिमेत औद्योगिक वसाहतींमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांना 'यूएएन' अॅक्टिव्हेट करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे; तसेच 'ईपीएफओ'च्या मुख्यालयात हेल्प डेस्क सुरू असून, 'यूएएन' सेंटरही सुरू केले जाणार आहे.

यापूर्वी 'ईपीएफओ'ने मे महिन्यात 'पीएफ आपल्या दारी' ही मोहीम राबविली होती. या मोहिमेचा सुमारे सहा लाख कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. उर्वरित कर्मचाऱ्यांचे 'यूएएन' अॅक्टिव्हेट करण्याचे काम सुरू आहे. माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कंपनी किंवा संस्थांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोहयो सर्वाधिक भ्रष्ट

$
0
0

श्रीकृष्ण कोल्हे, पुणे

राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या विकासाठी सरकारने सुरू केलेल्या ४० योजनांपैकी तीन योजनांमध्ये लाचखोरी सर्वाधिक होत असल्याचे आढळून आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गेल्या दीड वर्षात रोजगार हमी योजनेमध्ये सर्वाधिक लाचखोरांना अटक केली आहे. त्यानंतर इंदिरा आवास योजना आणि घरकुल योजनांचा क्रमांक लागतो. सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजना भ्रष्ट अधिकारी प्रभावीपणे राबवीत नसल्यामुळे आवश्यक घटकाला त्याचा लाभ मिळत नाही.

राज्यातील ग्रामीण जनतेचा विकास होऊन त्यांचे राहणीमान उंचविण्यासाठी सरकारकडून ४० योजना राबविल्या जातात. त्यामधून ग्रामीण भागातील जनतेला रोजगार, घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच, ग्रामीण भागांचा विकास करण्यासाठी सरकारकडून या योजना राबवून त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. मात्र, या योजना राबविणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे त्याची अंमलबजावणी तळागाळापर्यत होत नसल्याचे दिसून आले आहे.

गेल्या वर्षी एसीबीने राज्यात या ४० योजना राबविताना लाच घेणाऱ्या ८५ अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले आहे, तर या वर्षी ऑगस्टपर्यंत ५१ जणांना अटक केली आहे. २०१४ मध्ये रोजगार हमी योजनामधील १४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाच घेताना पकडले; तर या वर्षी ऑगस्टपर्यंत लाच घेणाऱ्या १३ अधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. त्यानंतर इंदिरा आवास योजनामध्ये गेल्या वर्षी तेरा व या वर्षी सहा जणांना पकडले आहे. घरकुल योजनेमध्ये गेल्या दीड वर्षात चौदा जणांना अटक केली आहे. यानंतर निर्मल भारत अभियान, पाणीपुरवठा नळ योजना, ठिबक सिंचन, एकात्मिक बाल विकास, पाणलोट विकास कार्यक्रम, पंतप्रधान ग्राम सडक या योजनांमध्ये बील काढण्यासाठी लाच घेताना अधिकारी व कर्माचाऱ्यांना एसीबीने पकडले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुलै फेरपरीक्षा बारावीसाठीही?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दहावीच्या विद्यार्थ्यांपाठोपाठ राज्यभरातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही जुलै- ऑगस्टमध्येच फेरपरीक्षा घेण्याचा प्रस्ताव राज्य बोर्डाने राज्य सरकारकडे पाठवला आहे. त्या बाबत निर्णय झाल्यास कदाचित, पुढील वर्षीपासून बारावीच्या नापास विद्यार्थ्यांनाही फेरपरीक्षा देण्याची संधी मिळेल.

दहावीच्या जुलै- ऑगस्टमध्ये झालेल्या फेरपरीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेमुळे ५७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना नव्याने अकरावीला प्रवेश घेण्याची संधी मिळाल्याचे राज्य बोर्डाने स्पष्ट केले. त्या पाठोपाठ बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही अशी परीक्षा घेण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले. हा प्रस्ताव मान्य झाल्यास, फेब्रुवारी- मार्च २०१६ ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षेची संधी उपलब्ध होण्याची शक्यता राज्य बोर्डाचे सचिव के. बी. पाटील यांनी वर्तविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इजिप्तचा कांदा पुण्यात दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कांद्याची आवक घटली असताना इजिप्तचा आयात केलेला दहा टन कांदा अखेर मुंबईमार्गे पुण्याच्या बाजारपेठेत दाखल झाला. रंगाने लालसर, तसेच आकाराने मोठा असूनही ओलसर असल्याने या कांद्याला गृहिणींऐवजी हॉटेलचालकांनीच पसंती दिली आहे.

'गुलटेकडी मार्केट यार्डात या कांद्याला दहा किलोसाठी ४५० रुपये दर मिळाला. ४५ रुपये किलो दराने त्याची किरकोळ विक्री करण्यात आली. इजिप्तच्या कांद्याला स्थानिक ग्राहकांची फारशी मागणी नाही. स्थानिक कांद्याच्या तुलनेत इजिप्तच्या कांद्याचे दर १० ते १२ रुपयांनी कमी आहेत. पहिल्या दिवशी मोठी खरेदी होऊ न शकल्यामुळे बराचसा कांदा शिल्लक राहिला आहे,' अशी माहिती कांद्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी दिली.

कर्नाटकच्या कांद्याचीही आवक

इजिप्तच्या कांद्याबरोबर कर्नाटकहून सहा ते सात ट्रक नव्या कांद्याची आवक झाली. त्याशिवाय लोणंद येथून पाच ट्रक तर जुन्नर, खेड, आंबेगाव भागातून नवीन कांद्याची २० ते २५ ट्रक आवक झाली आहे. नवीन कांद्याला दहा किलोमागे ३५० ते ४०० रुपये दर मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोलम तांदळाचे भाव वाढले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कांदा, डाळी, कडधान्यांपाठोपाठ आता सामान्यांच्या आवाक्यातील तांदळाचा घासदेखील पावसाने हिसकावण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातील तांदळाची आवक घटल्याने निर्माण झालेला तुटवडा आणि सामान्य ग्राहकांकडून वाढती मागणी या पार्श्वभूमीवर दोन दिवसांत कोलम, सोनामसुरी, लचकारी कोलम तांदळा प्रतिकिलो दरात ३ ते ५ रुपयांची वाढ झाली आहे.

'मध्य प्रदेशातील तांदूळ मोठ्या प्रमाणावर कर्नाटकमध्ये जात आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. जूनमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी ५० टक्के भाताच्या पेरण्या केल्या आहेत. नागपूर, भंडारा, गोंदिया या मध्य प्रदेशाच्या

सीमेलगतच्या भागात दरवर्षी ऑगस्ट महिन्यात पेरण्या होतात. मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्याने मोठ्या प्रमाणात पेरण्या होऊ शकल्या नाहीत. ५० टक्के पेरण्या झाल्या असल्या तरी शेतकऱ्यांच्या हातात किती तांदळाचे उत्पादन येते याबाबत शंका आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी तांदळाचे उत्पादन घटेल,' अशी भीती तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी व्यक्त केली.

पावसाची राज्यासारखीच कर्नाटकात परिस्थिती आहे. त्यामुळे तेथील उत्पादन घटण्याची शक्यता आहे. कर्नाटकातून सोनामसुरी तर, मध्य प्रदेश, नागपूर, भंडारा या भागात कोलम, लचकारी कोलम जातीच्या तांदळाचे उत्पादन होते. पाऊस नसल्याने भाताची मिलमध्ये होणारी आवक थांबली आहे. मिलमधील तांदळाची आवक थांबल्यामुळे बाजारातदेखील तांदूळ येत नसल्याचे शहा यांनी स्पष्ट केले.

'पावसाअभावी बाजारात तांदळाचा फारसा साठा उपलब्ध होत नाही. त्या तुलनेत स्थानिक ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. त्यामुळे पुरवठा आणि मागणी यांचे गणित जुळत नसल्याने कोलम स्टीम, सोनामसुरी, वाडा कोलम या बारीक तांदळाच्या प्रकारात किलोमागे २ ते ५ रुपयांनी वाढ झाली आहे,' असे तांदळाचे व्यापारी अभय संचेती यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरोपी संचालकांची नियुक्ती मागे

$
0
0

प्रसाद पानसे, पुणे

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागातील भ्रष्टाचाराबाबत ठपका ठेवलेल्या संचालकांची पुन्हा त्याच विभागात संचालक म्हणून केलेली नियुक्ती अवघ्या १३ दिवसांत राज्य सरकारला मागे घ्यावी लागली आहे. 'मटा'च्या वृत्ताची दखल घेत मंत्रालयातील वरिष्ठ पातळीवरून सूत्र हलल्याने या संचालकांकडील पदभार तातडीने काढून घेण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मंगळवारी (२५ ऑगस्ट) शासननिर्णय (जीआर) काढत या संचालकांकडून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचा आस्थापना, सेवा व लेखा (वित्त) कारभार कमी करत त्यांच्याकडे केवळ प्रशिक्षणाचे अधिकार कायम ठेवले तर त्यांच्या जागी कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार आयुक्त विजय वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या जीआरची प्रत 'मटा'कडे उपलब्ध आहे.

राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागात २००९ ते २०११ या काळात कोट्यवधीचा गैरव्यवहार केल्याचा ठपका या संचालकांवर ठेवण्यात आला आहे. विभागीय चौकशीअंती संबंधित संचालकांची उघड चौकशी करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देण्यात आले आहेत. त्यानुसार या अधिकाऱ्यांसह पाच जणांची गेल्या दोन वर्षांपासून चौकशी सुरू आहे. लोकलेखा समितीकडेही या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

या चौकशीवर संचालकांच्या नेमणुकीचा परिणाम होऊ नये, म्हणून तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी या संचालकांची बदली प्रशिक्षण विभागात केली. मात्र, चौकशीचा हा ससेमिरा सुरू असतानाच या संचालकांना पुन्हा त्याच पदावर बसविण्याचा पराक्रम राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने केला होता. त्यासाठी १४ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा जीआर काढण्यात आला होता.

सरकारने आरोपी संचालकांना घातलेल्या या पायघड्यांचे वृत्त 'मटा'ने प्रसिद्ध करताच विभागात खळबळ उडाली होती. या वृत्ताची दखल थेट मंत्रालयाच्या वरिष्ठ स्तरावर घेण्यात येऊन ही नियुक्ती तसेच या प्रकरणाची माहिती सादर करण्याचे आदेश विभागाला देण्यात आले. हा अहवाल सादर झाल्यानंतर सुधारित 'जीआर' काढून संबंधित संचालकांकडून पदभार कमी करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुणे दर्शन’चे बुकिंग आता ऑनलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशातील इतर महानगरांमधील 'सिटी टूर'प्रमाणेच पुण्यातील प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक स्थळांची सफर घडवून आणणाऱ्या 'पुणे दर्शन' बससेवेने आता कात टाकली आहे. नवीन वातानुकूलित बससह या सेवेसाठी पर्यटकांना आता ऑनलाइन बुकिंगही करता येणार आहे. त्यामुळे, पुण्याबाहेरून येणाऱ्या पर्यटकांनाही त्यांच्या शहरातूनच पुणे दर्शनची सफर बुक करता येईल.

पुणे महापालिकेने पुणे दर्शनसाठी नव्या अत्याधुनिक आणि वातानुकूलित बसचे हस्तांतरण पीएमपीकडे केले. माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते नुकताच हा कार्यक्रम झाला. त्यानंतर, या बस तातडीने सेवेत दाखल करण्यात आल्या असून, पालिकेने सुरू केलेल्या www.explorepune.in या वेबसाइटद्वारे त्याचे ऑनलाइन बुकिंग करता येणेही शक्य झाले आहे. पीएमपीने पुणे दर्शन बससेवेचे आउटसोर्सिंग केले असून, सर्व सुविधा खासगी कंपनीमार्फत पुरविण्यात येणार आहेत.

पुण्याबाहेरील पर्यटकांना पुणे दर्शनद्वारे शहरातील ऐतिहासिक, प्रेक्षणीय स्थळांची सफर करायची असेल, तर पूर्वी डेक्कन जिमखाना किंवा पुणे स्टेशन येथे तिकीट काढण्यासाठी जावे लागत असे. आता, ही समस्या दूर होणार असून, जगाच्या कोणत्याही काना-कोपऱ्यातून पुणे दर्शनसाठी तुमची जागा आरक्षित ठेवण्याची सुविधा निर्माण झाली आहे. अवघ्या पाचशे रुपयांत शहरातील १९ स्थळांची सफर याद्वारे घडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॅथवे यंत्रणा कोलमडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हॅथवे केबलवर वीस दिवसांपासून सोनी व सोनीच्या इतर वाहिन्या बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे केबल चालकांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता चॅनल्स बंद केल्याचा आरोप शहरातील केबल चालकांनी केला आहे. आम्हाला ग्राहकांना उत्तम सेवा द्यायची आहे; पण कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे यंत्रणा कोलमडून पडल्याचे केबल चालकांचे म्हणणे आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवडमधील मिळून ३०० केबल चालक हॅथवे केबलची सेवा देतात. कंपनीच्या त्रासाला कंटाळून यातील काही चालकांनी पुणे केबल असोसिएशन ही संघटना स्थापन केली असून यातील काहींनी बुधवारी पत्रकार परिषदेत या विषयाला वाचा फोडली.

अजय पुंडले म्हणाले, 'सोनी व सोनीच्या इतर वाहिन्या ७ ऑगस्टपासून अचानक बंद करण्यात आल्या आहेत. कंपनीने याबाबत १५ दिवस आधी नोटीस देणे बंधनकारक आहे. सोनी कंपनी व हॅथवेमधील वार्षिक करारासाठी चॅनल्स बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे; पण सोनी वाहिनीला पैसे वाढवून हवे असून दोन कंपन्यांच्या वादात केबल चालक व ग्राहकांची पिळवणूक होत आहे.

पूर्वी स्टार व झी टीव्हीबाबतही असेच झाले होते. कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे केबल चालकांची आर्थिक कोंडी झाली आहे. सेवा नियमित नसल्यामुळे ग्राहक पैसे देण्यास टाळाटाळ करत असून दर महिन्याचा करमणूक व सेवा कर केबल चालकांना भरावाच लागत असल्याकडे, प्राची शहा यांनी लक्ष वेधले. पल्लवी इनामदार, ज्ञानेश्वर जगताप व शिवाजी शेडगे या वेळी उपस्थित होते.

'सरकारच्या धोरणामुळे स्वस्त सेवा नाही'

हॅथवेचे पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये मिळून सुमारे चार लाख ग्राहक आहेत. चॅनल्स अचानक बंद होण्याच्या तक्रारींमुळे ग्राहक संख्या कमी होत असून डीशपेक्षा केबल स्वस्त असतानाही ग्राहक डीशला पसंती देत असल्याचे निरीक्षण केबल चालकांनी नोंदवले. तीनशे रुपयांमधील साधारण ७० ते १०० रुपये केबल चालकाच्या हाती उरत असून सरकारच्या धोरणामुळे ग्राहकाला स्वस्त दरात केबल सेवा उपलब्ध झालेली नाही, अशी टीका केबल चालकांनी केली. या संदर्भात सोनी वाहिनीशी संपर्क साधण्यात आला असता त्यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजय दत्तला पुन्हा ‘पॅरोल’

$
0
0

पुणे : बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त याला विभागीय आयुक्तांनी ३० दिवसांचा 'पॅरोल' मंजूर केला असून, तो बुधवारी येरवडा तुरुंगातून बाहेर पडला. यापूर्वीची 'फर्लो' रजा भोगल्यानंतर नऊ जानेवारी रोजी तो जेलमध्ये परतला होता.

संजय दत्तला चौथ्यांदा रजा मिळाली आहे. सहा ​महिने पूर्ण झाल्यानंतर त्याने पुन्हा रजेसाठी अर्ज केला. कोणतीही रजा घेताना सहा महिन्यांचे अंतर असावे लागते. पत्नीच्या आजारपणाच्या कारणास्तव तो यापूर्वी 'पॅरोल'वर सुटला होता. या वेळी मुलीच्या नाकाच्या ऑपरेशनसाठी त्याला 'पॅरोल' मिळाला आहे.

संजयला 'पॅरोल' मिळावी यासाठी विभागीय आयुक्त चोकलिंगम यांच्याकडे अर्ज केला होता. चोकलिंगम यांनी या अर्जावर ​निर्णय घेताना त्याला ३० दिवसांचा 'पॅरोल' मंजूर केला आहे. कुठल्याही कैद्याला 'पॅरोल' मिळाल्यानंतर आणखी दोन महिने मुदतवाढ मागता येवू शकते. ती देण्याचा निर्णयही विभागीय आयुक्तच घेतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुढील आठवड्यापासून एक वेळ पाणी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असतानाही, पाणी वापरावर निर्बंध घालण्यात चालढकल केली जात असल्याने अखेर, पालिकेनेच यासाठी पावले उचलण्याचे ठरविले आहे. शहरात सध्या सुरू असलेला दोन वेळचा पाणीपुरवठा बंद करून पाणी बचतीसाठी एक वेळ पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन केले जात आहे. पुढील आठवड्यापासून याबाबत अंमलबजावणी केली जाण्याची चिन्हे आहेत.

खडकवासला धरण साखळीत सध्या जेमतेम १५ टीएमसी पाणीसाठा आहे. शहराची वर्षाची गरजच सुमारे १५ ते १६ टीएमसी असल्याने आत्तापासूनच पाणी बचतीसाठी उपाययोजना केल्या जाव्या, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गेल्या आठवड्यात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत त्याबाबतचा निर्णय १५ दिवस पुढे ढकलण्यात आला. मात्र, भविष्यकाळात गंभीर परिस्थिती उद्भवू नये, यादृष्टीने पालिकेनेच खबरदारी घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार, संपूर्ण शहरात केवळ एकवेळच पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले जात आहे. पाणीवापरात १० टक्के कपात करून सध्याच्या १२५० एमएलडीऐवजी दैनंदिन स्वरूपात ११२५ एमएलडी पाण्याचा वापर करण्याची तयारी पालिकेने केली आहे. त्यानुसार, सध्या शहराच्या काही भागांत दोन वेळा केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात केली जाणार आहे. कालवा समितीमध्ये अंतिम निर्णय होईपर्यंत पालिकेनेच पाणीबचतीसाठी स्वतःहून पुढाकार घेतला आहे. येत्या एक-दोन दिवसांत पालिकेतील सर्व पक्षांना विश्वासात घेऊन त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल, अशी शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करा शेअर आठवणी सेल्फीबरोबर!

$
0
0

पुणे टाइम्स टीम

राखी पौर्णिमेच्या निमित्तानं भाऊ आणि बहीण या सुंदर नात्यातील काही आठवणी, काही गमतीजमती आणि काही किस्से यांना नक्कीच उजाळा मिळत असतो. तुमच्याही अशा काही आठवणी, किस्से, गमती असतील, तर तुम्हा भावा-बहिणीच्या सेल्फीसह ट्विटरवर अपलोड करा. त्यातील निवडक फोटो आणि किस्से आम्ही प्रसिद्ध करू.

ट्विटरसाठीचा हॅशटॅक भाऊबहीण (#bhaubahin) असा ठेवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाडक्या बहिणीसाठी...

$
0
0

गंधाली देशपांडे

स. प. महाविद्यालय

राखी पौर्णिमा उद्यावर येऊन ठेपली आहे. सगळ्या बहिणी राखी घेण्यासाठी बाजारात गर्दी करत आहेत. आपल्या भावाला कोणती राखी आवडेल, राखीमधला नवा ट्रेंड काय आहे हे सगळं ध्यानात ठेवून राख्यांची खरेदी सुरू आहे. मात्र, बहिणीला राखी पौर्णिमेला ओवाळणी म्हणून काय द्यायचं हा मोठा प्रश्न तमाम भावांसमोर असतो. ते गिफ्ट बहिणीला आवडलं पाहिजे आणि बजेटमध्येही बसलं पाहिजे, असा भावांचा विचार असतो. त्यासाठी काही जुने आणि काही नवे पर्याय बाजारात सध्या उपलब्ध आहेत.

> मुलींना चॉकलेट आणि सॉफ्टटॉइज नेहमीच आवडतात. हा नेहमीचाच पर्याय ठरू शकतो.

> बॅग, पर्समध्येही सध्या वैविध्य आहे. शाळा आणि कॉलेजसाठी सॅक वेगळ्या रंगात मिळू शकतात. पर्समध्ये शबनम, स्लिंग्ज बॅग, साइड पर्स, क्लच अशा नियमित वापरापासून ते पार्टीवेअरसाठीही बरेच पर्याय आहेत. फर्ग्युसन रोड, तुळशीबागेत याचे परवडणारे पर्याय आहेत.

> मेकअप म्हणजे मुलींचा आवडीचा विषय. बेसिक मेकअप किट अगदी कमी किमतीत मिळू शकतं. मेकअप किट नको असेल, तर नेलपेंटच्या वेगवेगळ्या शेड, लिपस्टिक्स किंवा लिपकलर हेही खूप चांगलं गिफ्ट ठरू शकेल.

> वेस्टर्न टॉप किंवा एथनिक वेअरमध्ये तर सध्या कमालीचं वैविध्य आहे. स्कर्ट, पलाझो, स्ट्रेट कट कुडता असे बरेच प्रकार बहिणींच्या आवडीचे असू शकतात.

> कॉफी मगवर सुंदर मजकूर किंवा फोटो प्रिंट करून देता येईल.

> बहिणीला वाचनाची सवय असेल, तर पुस्तकंही आहेतच.

> मोबाइल अॅक्सेसरीमध्ये हेडफोन, कव्हर्समध्ये खूप प्रकार मिळू शकतात. मोबाइल कव्हरवर तर फोटो प्रिंट करायचीही सोय आहे.

> स्वतः तयार केलेल्या ग्रीटिंगवर एखादा संदेश, जुन्या फोटोंचं कोलाज या कल्पना वापरता येतील.

> स्वतःच्या हातानं बहिणीच्या आवडीचा एखादा पदार्थ तिच्यासाठी खास बनवू शकता.

> सध्या ओवाळणीमध्ये पैसे देण्याऐवजी मोबाइल रिचार्ज करणं, सिनेमांची तिकिटं, लंच किंवा डिनर गिफ्ट व्हाउचर्स हे नवीन पर्याय ओवाळणी म्हणून 'इन' आहेत.

> बहीण लहान असेल, तर कपडे आणि चॉकलेट देण्यापलीकडे दुसरे काही पर्याय नसतात. हे नको असेल, तर सध्या विविध व्हाउचर्स देता येतील. मोठ्या बुक स्टोअर किंवा स्टेशनरी शॉपचे व्हाउचर असतील, तर बहिणीला निवडीला बराच वाव राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आज ठरणार अंतिम फेरीतील ‘क्वीन्स’

$
0
0

पुणे टाइम्स टीम

मुकुट मिळवण्याच्या स्पर्धेत पहिली पायरी असलेल्या 'श्रावणक्वीन' स्पर्धेची प्राथमिक फेरी आज (दि. २८) होत आहे. यावेळी नामवंत परीक्षक मंडळींच्या परीक्षणातून सौंदर्य, प्रतिभा आणि बुद्धिमत्ता यांच्या जोरावर स्पर्धकांना अंतिम फेरीपर्यंत मजल मारता येणार आहे. प्रसिद्ध कलाकार संस्कृती बालगुडे, भार्गवी चिरमुले, सौरभ गोखले, प्राजक्ता, मॉडेल अश्विनी जाधव, श्रद्धा वर्धे, गायिका सावनी रवींद्र आणि दिग्दर्शक अजय नाईक या परीक्षकांसमोर स्पर्धकांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे.

'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित ही स्पर्धा 'वामन हरी पेठे'प्रस्तुत आणि 'ग्रीन लीफ'सहप्रायोजित आहे. स्पर्धेचा फॅशन पार्टनर 'गलानी' असून, हॉस्पिटॅलिटी पार्टनर हॉटेल 'रामी ग्रँड' आहे.

स्पर्धेचं यंदाचं पाचवं वर्ष. दरवर्षी मिळणारा प्रतिसाद पाहता यंदा प्राथमिक फेरीसाठी ऑनलाइन नावनोंदणी घेतली होती. त्यालाही भरघोस प्रतिसाद देत स्पर्धकांनी निवडीसाठी तगडी स्पर्धा निर्माण केली. त्यांना वाचकांनी दिलेली मतं आणि 'महाराष्ट्र टाइम्स'च्या निवड समितीच्या निर्णयावरून १५० स्पर्धकांची प्राथमिक फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्यामध्ये आता अंतिम फेरीसाठी टशन रंगेल.

हे आहेत सेलिब्रेटी परीक्षक

संस्कृती बालगुडे, भार्गवी चिरमुले, सौरभ गोखले, प्राजक्ता, अश्विनी जाधव, सावनी रवींद्र, श्रद्धा वर्धे आणि अजय नाईक.

कशी असेल प्राथमिक फेरी?

प्राथमिक फेरीत इंट्रोडक्शन, टॅलेंट आणि प्रश्नोत्तरं अशा तीन फेऱ्या होणार आहेत. रॅम्प वॉक करून स्पर्धकांना स्वतःची ओळख करून द्यायची आहे. त्यानंतर होणाऱ्या टॅलेंट राउंडमध्ये पारंगत असलेल्या कलेचं सादरीकरण स्पर्धकांना करायचंय. हे सादरीकरण दोनच मिनिटांचं असावं. त्यासाठी लागणारं गाणं किंवा म्युझिक ट्रॅक घरूनच एमपीथ्रीवर सेट करून आणावं. नंतर परीक्षक स्पर्धकांना प्रश्न विचारतील. टॅलेंट राउंडसाठी मेकअप आणि कॉश्च्युमची तयारी घरूनच करून यायची आहे. स्पर्धेच्या ठिकाणी वेळ आणि जागा देण्यात येणार नाही. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांसाठी एक आठवड्याचं ग्रुमिंग सेशन होणार आहे. निवड झालेल्या स्पर्धकांनी या सेशनला हजेरी लावणं बंधनकारक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पीड पोस्ट राख्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रक्षाबंधनाच्या सणानिमित्त लाडक्या भाऊरायाला वेळेत राखी पोहोचावी म्हणून यंदा टपाल खात्याच्या स्पीड पोस्ट सेवेचा वापर करण्याकडे कल वाढला आहे. भावा-बहिणीच्या या रेशीमबंधासाठी देशातच नव्हे; तर परदेशातही राखी पाठविण्यासाठी स्पीड पोस्टचा वापर वाढला आहे.

भाऊ-बहिणीच्या नात्याची वीण घट्ट करणारी राखी वेळेमध्ये पोहोचविण्यासाठी टपाल खात्याच्या मुख्यालयाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे राख्या वेळेत मिळू शकणार आहेत. राख्या पाठविण्यासाठी स्पीड पोस्टचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे मुख्य टपाल कार्यालयाचे वरिष्ठ पोस्टमास्तर एच. जे. काकडे यांनी सांगितले. देशात कोठेही राख्या पाठविण्यासाठी २० ग्रॅम वजनासाठी किमान ३९ रुपये आकारण्यात येत आहेत. परदेशामध्ये प्रत्येक देशानुसार हे दर वेगवेगळे असल्याचे काकडे यांनी स्पष्ट केले.

परदेशामध्ये जास्तीत जास्त २० किलोपर्यंतचे पार्सल पाठविण्याची व्यवस्था टपाल खात्यातर्फे करण्यात आली आहे. अमेरिकेत या वजनाचे पार्सल पाठविण्यासाठी १० हजार ३२, जपानसाठी ५ हजार १५९, जर्मनीतील पार्सलसाठी ५ हजार ६२६, चीनसाठी ४ हजार ५९४ तर, पाकिस्तानसाठी २ हजार ७२७ रुपये दर असल्याचे काकडे म्हणाले.

परदेशी राखी पाठविण्याचे दर (वजन किमान २० ग्रॅम) - अमेरिका ६६७ रु., जर्मनी ९८६ रु., ऑस्ट्रेलिया ७११ रु., ब्रिटन १०८९ रु., चीन ४५६ रु., स्वित्झर्लंड १३३९ रु.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टँपड्युटीचा दणका?

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या हद्दीत (पीएमआरडीए) नागरिकांना खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवरील स्टँपड्युटीत एक टक्क्यांनी वाढीचा दणका बसण्याची शक्यता आहे. या हद्दीत तीन टक्क्यांऐवजी चार टक्के दराने स्टँपड्युटी आकारण्यात यावी, असा प्रस्ताव नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने राज्य सरकारकडे सादर केला आहे.

मालमत्तांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर सरकारकडून स्टँपड्युटी आकारण्यात येते. महापालिकांची हद्द, नगरपालिका आणि ग्रामीण हद्दीत त्यासाठी वेगवेगळ्या दराने आकारणी करण्यात येते. महापालिकांच्या हद्दीतील व्यवहारांचे दस्त नोंदविण्यासाठी व्यवहाराच्या रकमेच्या पाच टक्के दराने स्टँपड्युटी आकारण्यात येते. राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य कर लागू केल्यानंतर यामध्ये आणखी एका टक्क्याची (एलबीटी सेस) वाढ करण्यात आली. ग्रामीण भागात तीन टक्के दराने स्टँपड्युटी आणि एक टक्का जिल्हा परिषद उपकर आकारण्यात येतो. राज्य सरकारने नुकतीच पीएमआरडीएची स्थापना केली. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरातील नागरीकरणाचा वेग पाहून येथे विकास करण्यासाठी या स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. नव्याने विकसित होत असलेल्या या हद्दीतील खरेदीविक्री व्यवहारांवर आकारण्यात येणाऱ्या तीन टक्के स्टँपड्युटीत आणखी एका टक्क्याने वाढ करावी, असा प्रस्ताव मुद्रांक शुल्क विभागाने सरकारकडे सादर केला आहे.

या प्रस्तावास अद्याप मान्यता मिळालेली नाही, अशी माहिती मुद्रांक महानिरीक्षक एन. रामास्वामी यांनी दिली. पीएमआरडीएच्या हद्दीत सध्या चारशे गावांचा समावेश आहे, यामध्ये हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्याला मान्यता मिळाल्यानंतर सुमारे आठशे गावे पीएमआरडीएच्या हद्दीत येणार आहेत. आता हा वाढीव स्टँपड्युटीचा प्रस्ताव मान्य झाल्यावर या आठशे गावांतील रहिवाश्यांना वाढीव स्टँपड्यूटीचा फटका बसणार आहे.

मुंबईत महापालिका हद्दीत पाच टक्के, तर एमएमआरडीएच्या हद्दीत चार टक्के दराने स्टँपड्युटी आकारली जाते. त्या पार्श्वभूमीवर पीएमआरडीएच्या हद्दीतही हेच दर लागू करावेत, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढले डेंगीचे पेशंट

$
0
0

पुणे ः सोसायट्यांमध्ये डेंगीच्या डासांची उत्पत्तीस्थाने आढळून आल्याने सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून कोथरूड, वारजे, नगर रस्ता, विश्रामबागवाडा या भागात सर्वाधिक डेंगीचे पेशंट आढळल्याची नोंद पालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे. जानेवारी ते आतापर्यंत झोपडपट्टी भागात अवघे ५५; तर शहराच्या अन्य भागात १२५ असे डेंगीचे १८० पेशंट आढळले आहेत.

'आठवडाभरात डेंगीच्या डासांची लागण झालेल्या पेशंटची माहिती घेण्यात आली. त्यामध्ये शहरातील कोथरूड, वारजे, नगर रस्ता, विश्रामबाग वाडा, तसेच टिळक रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत भागात डेंगीच्या पेशंटची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. औंध, भवानी पेठ, कात्रज-कोंढवा रोड, धनकवडी, बिबवेवाडी, ढोले पाटील रस्ता, संगमवाडी भागात डेंगीचे पेशंटची संख्या अत्यल्प आहे. डेंगीच्या डासांची उत्पत्ती होत आहे. मात्र त्याची लागण घरातील व्यक्तींना अथवा सोसायटीतील नागरिकांना होऊ नये यासाठी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी सातत्याने विविध सोसायट्यांमध्ये जाऊन कीटकनाशक फवारणी करीत आहेत,' अशी माहिती सहायक आरोग्य प्रमुख डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी दिली.

शहराच्या झोपडपट्टी भागात जानेवारी महिन्यापासून ते आतापर्यंत ५५ तर कोथरूड, वारजे, औंध, नगर रस्ता, टिळक रोड, विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत भागात १२५ जणांना डेंगीची लागण झाली आहे. गेल्या आठ महिन्यांत शहरात १८० जणांना लागण झाली आहे. लागण झाल्यानंतर पेशंट उशिरा उपचार घेत असल्याने आजार तीव्र होत आहे. जुलैमध्ये ७५, तर ऑगस्टमध्ये २० तारखेपर्यंत ६७ जणांना लागण झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुटली वाहतूक कोंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डेक्कन येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या चक्राकार वाहतुकीमुळे डेक्कन बसस्टॉप चौकातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात सुटल्याचे मंगळवारी पाहायला मिळाले. वाहतुकीतील या बदलामुळे नागरिकांना वळसा मारावा लागत असल्याने अनेकांनी या बदलाविषयी नाराजी व्यक्त केली.

डेक्कन पीएमपी स्टॉप येथील चौकात वाहतूक कोंडी नित्याची झाली होती. खंडुजीबाबा चौकात सिग्नल लागल्यानंतर गरवारे ब्रिजपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यातच भिडे पुलावरून येणारी व फर्ग्युसन कॉलेजकडे जाणाऱ्या वाहनांमुळे आर-डेक्कन थिएटरच्या येथे वाहतुकीचा बोजवारा उडत होता. या चौकात सिग्नल नसल्याने संपूर्ण वाहतूक विस्कळित स्वरूपात होती. त्यामुळे वाहतूक विभागाने येथील कोंडी सोडविण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर चक्राकार वाहतूक करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी मंगळवारपासून झाली.

डेक्कन बस स्टॉपपासून शिवराज चौकापर्यंत (झेड ब्रीजखाली) एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. भिडे पुलावर चारचाकी वाहनांना सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रवेश बंदी आहे. या बदलाच्या अंमलबजावणीच्या पहिल्या दिवशी पोलिस कर्मचारी नागरिकांना माहिती देत होते.

शिवराज चौकात काहीशी कोंडी

शिवराज चौकात काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. सुकांता हॉटेलच्याजवळ सायंकाळी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे अनेकांनी सुकांता हॉटेलपासून जंगली महाराज रोडकडे न (उजवीकडे) जाता डावीकडे वळून पुन्हा डेक्कन पीएमपी बस स्टॉपशेजारील लेनमधून जात होते. पोलिसांनी या वाहन चालकांना थांबविल्यानंतर त्यांच्यामध्ये वादावादीही झाली.

खंडुजीबाबा चौकात सिग्नल लागल्यानंतर आर-डेक्कन थिएटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे सिग्नल लागल्यानंतर वाहतूक कोंडीसदृश्य परिस्थिती निर्माण होते. तसेच, भिडे पुलावरून येणारे वाहतूक वळविले असले, तरीही डेक्कन स्टॉपवरून सुटणाऱ्या पीएमपी या गोपळकृष्ण गोखले रस्त्याकडे (फर्ग्युसन रोड) जाणाऱ्या बस जून्या पद्धतीनेच रस्ता क्रॉस करून जात आहेत. दरम्यान, वाहतूक बदलानंतर सायंकाळी डेक्कन स्टॉपजवळ दोन दुचाकींचा अपघात झाला. भिडे पुलाकडून नो-एंट्रीतून एका दुचाकीवर ट्रिपल सिट आलेल्या तरुणांनी समोरून येणाऱ्या एका दाम्पत्यांच्या गाडीला धडक दिली. यात एक जण जखमी झाला. जखमीवर जवलळील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.

अशी असेल चक्राकार वाहतूक...

बाबा भिडे पुलावरून चारचाकींना सकाळी सात ते रात्री नऊ या वेळात बंदी करण्यात आली आहे.

दुचाकी वाहनांच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे.

दुचाकीस्वारांनी नारायण पेठेकडून भिडे पुलावर आल्यावर पूल ओलांडल्यानंतर थेट डेक्कन जिमखाना बस स्थानकाकडे जाता येणार नाही.

त्याऐवजी गाडगीळ पुलाखालून हॉटेल सुकांतापर्यंत जावे, त्यानंतर कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटकडून जंगली महाराज रस्त्यावर जाता येईल.

जंगली महाराज रस्त्यावरून आलेल्या दुचाकी वाहनांना डेक्कन जिमखाना बसस्थानकापासून भिडे पुलाकडे जाता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images