Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कचरा वर्गीकरणाला गृहनिर्माण संस्थांचा विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'गृहनिर्माण सोसायट्यांना कचऱ्याचे ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करण्याची सक्ती करण्याच्या पालिकेच्या आदेशाला पुणे शहर सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या विभागीय संघाने (सिंहगड रोड हाउसिंग फेडरेशन) विरोध केला आहे. हॉटेल, मंडया, दुकाने व सरकारी कार्यालयांना सक्ती न करता पालिका आणि स्वयंसेवी संस्था फक्त गृहनिर्माण सोसायट्यांना वेठीस धरत आहेत', असा आरोप फेडरेशनतर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आला.

फेडरेशनचे अध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी, कार्याध्यक्ष विलास वाळुंजकर यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप केला. फेडरेशनचे उपाध्यक्ष सुरेश कट्टे, सचिव शिवदास साळुंके, अॅड. सचिन हिंगणेकर आदी या वेळी उपस्थित होते.

'पालिकेतर्फे झोपडपट्ट्या, मंडया, हॉटेल, दुकाने, सरकारी व निमसरकारी कार्यालयांना कचऱ्याबाबत कोणतीही सक्ती केली जात नाही. जुन्या सोसायट्यांमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी जागा नाही. स्वयंसेवी संस्था कचरा व्यवस्थापनात शिरल्यानंतर त्यांनी सोसायट्यांना वेठीस धरले आहे. त्यांचे अनेक प्रकल्प बंद आहेत. अशा कचऱ्यावर कीड, चिलटे, डास झाल्याने रोगराई वाढत आहे. कचरा उचलण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे कर्मचारी ५० ते १५० रूपये असे वेगवेगळे दर आकारतात. याबाबत पालिकेने त्वरित कार्यवाही न केल्यास मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले जाईल,' असे वाळुंजकर यांनी सांगितले.

दरम्यान, फेडरेशनला नुकतीच सहकार विभागाची मान्यता मिळाली आहे. सिंहगड रोडवरील सोसायट्यांच्या विविध समस्यांसाठी फेडरेशनतर्फे काम केले जात आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले. फेडरेशनतर्फे सहा सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता परिणय मंगल कार्यालयात कचरा समस्या व उपाय या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डेंगी झाल्याने वृद्धाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डेंगीची लागण होऊन कर्वेनगर येथील वृद्धाचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. जानेवारी ते ​ऑगस्टपर्यंत डेंगीने एकच पेशंट दगावल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. शहरात आतापर्यंत डेंगीचे १९५ संशयित पेशंट असल्याचे समोर आले आहे.

कर्वेनगर येथील ८८ वर्षाच्या वृद्धाला डेंगीची लक्षणे आढळल्याने शाश्वत हॉस्पिटलमध्ये दाखल कऱण्यात आले होते. उपचार सुरु असताना दहा दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या मृत्यूच्या सत्यशोधन समितीपुढे मृत्यूचा अहवाल ठेवण्यात आला. डेंगीच्या अहवालावर चर्चा झाली. त्या पेशंटची 'आयजीएम' चाचणी करण्यात आली असता ती 'पॉझिटिव्ह' आल्याचे आढळून आले. त्यावरून या व्यक्तीला डेंगी झाल्याचे निदान होऊन त्याद्वारेच मृत्यू झाल्याचे सत्यशोधन समितीने जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याचा समावेश स्वतंत्रच हवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समावेश स्वतंत्र केला जावा; तसेच या योजनेसाठी दोन्ही शहरांसाठी मार्गदर्शक म्हणून स्वतंत्र अधिकारी नेमण्यात यावा, असा ठराव पालिकेच्या सर्वसाधारण सभेने सोमवारी केला. स्मार्ट सिटीबाबत आज, मंगळवारी महत्त्वाची बैठक होणार असल्याने तातडीने पालिकेचा निर्णय केंद्र व राज्य सरकारला कळविण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारने स्मार्ट सिटी निवडलेल्या शहरांमध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड यांचा संयुक्त समावेश केला आहे. 'दोन्ही महापालिकांचे स्वतंत्र अस्तित्व असून, प्रश्न आणि समस्या वेगवेगळ्या आहेत. संपूर्ण देशातून केवळ पुणे-पिंपरीचाच संयुक्त समावेश केला गेला आहे. यामुळे, दोन्ही शहरांवर अन्याय होणार असल्याची भावना व्यक्त करून स्वतंत्रच समावेश केला जावा,' असा आग्रह भारतीय जनता पक्ष वगळता इतर सर्व पक्षांकडून धरला जात होता.

माजी उपमहापौर दिलीप बराटे यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत दोन्ही पालिकांचा स्वतंत्र समावेश केला जावा, अशी शिफारस करण्याचा प्रस्ताव मांडला होता. सुभाष जगताप व अश्विनी कदम यांनी हा प्रस्ताव केंद्र सरकारलाही तातडीने पाठविला जावा, अशी उपसूचना मांडली, तर विशाल तांबे व अप्पा रेणुसे यांनी पुणे व पिंपरीसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली जावी, अशी उपसूचना मांडली. या दोन्ही उपसूचनांसह हा प्रस्ताव एकमताने मान्य करण्यात आला.

आज निर्णय?

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेसंदर्भात आज, मंगळवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या संयुक्त प्रकल्पावर चर्चा होऊन निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. स्मार्ट सिटीच्या नियमावलीमध्ये संयुक्त शहरांचा प्रस्तावाची तरतूदच नाही. त्यामुळे राज्य सरकारने पाठविलेला हा प्रस्ताव मान्य होणार, की पुणे-पिंपरीपैकी एकाच शहराची निवड होणार, याचा निर्णय केंद्रीय नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू यांच्यावर अवलंबून असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५० लाखांचे कांदे खरेदी करून पोबारा

$
0
0

पुणेः वडिलांच्या नावाचा उपयोग करत कर्नाटकातील दोन व्यापाऱ्यांनी मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांकडून ५० लाख रुपयांचा कांदा खरेदी करून त्यानंतर त्यांना ठगविल्याने व्यापाऱ्यांवर रडण्याची वेळ आली. महागाईच्या काळात विश्वासाने दिलेल्या कांद्याचे पैसे न मिळाल्याने मार्केट यार्डमधील व्यापारी हवालदील झाले आहेत.

मार्केट यार्ड पोलिसांनी मंगळुरू येथील तसलीम महमंद आणि नवाझ इब्राहीम यांच्याविरुद्ध फसवणूक तसेच धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अतुल राक्षे आणि काळुराम वाघमारे या व्यापाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मंगळुरू येथील व्यापाऱ्यांनी गुलटेकडी मार्केट यार्डमधील आणखी काही व्यापाऱ्यांना अशाच प्रकारे फसवल्याचे सांगण्यात येत आहे.

तसलीमचे वडील हे गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये गेल्या वीस वर्षांपासून व्यवसाय करतात. त्यांच्याबरोबर तसलीम गेल्या वर्षभरापासून व्यवसाय करण्यासाठी पुण्यात येत होता. तसलीमचे वडील हे आजारी पडल्याने त्यांनी पुण्यात येण्याचे बंद केले. मात्र, त्यांच्या नावाचा फायदा घेत तसलीमने अनेक व्यापाऱ्यांकडून कांदा खरेदी केला आणि वेळीच पोबारा काढला.

राक्षे आणि वाघमारे यांची अनुक्रमे २० लाख ४८ हजार आणि २९ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या दोघांशिवाय आणखी काही व्यापाऱ्यांची फसवणूक झाल्याचे सांगण्यात येत आहे. मार्केट यार्ड पोलिसांनी मंगळुरू गाठून तपास केला; मात्र, तसलीम त्यांना सापडला नाही. त्याचे दोन पत्ते आणि सात मोबाइल नंबर मिळवून पोलिस माघारी परतले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट सिटी’साठी काँग्रेस रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्मार्ट सिटीचा प्रस्ताव पाठविताना राज्य सरकारने केलेल्या राजकारणामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडचा एकत्रित प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. पुणे शहराचा स्वतंत्र प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवावा या मागणीसाठी शहर काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी आंदोलन करण्यात आले. दोन्ही शहरांचा एकत्रित प्रस्ताव केंद्राकडे पाठविणाऱ्या राज्य सरकारचा निषेध यावेळी करण्यात आला. शहराला स्वतंत्र स्मार्ट सिटीचा दर्जा न मिळाल्यास शहरासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

पक्षाचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात उपमहापौर आबा बागूल, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, आमदार शरद रणपिसे, महिला प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे, चंद्रकांत छाजेड, बाळासाहेब शिवरकर, मंदा चव्हाण, नगरसेवक अविनाश बागवे, रमेश अय्यर, नुरूद्दीन सोमजी, रमेश धर्मावत यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

'पुणे शहराचा स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत स्वतंत्र प्रस्ताव पाठवावा, यासाठी अनेकदा भूमिका मांडून शासनाकडे पाठपुरावाही करण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकारने राजकारण करत अद्यापही याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. येत्या आठवड्यात केंद्र सरकार दहा स्मार्ट शहरांची नावे जाहीर करून त्यांना प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देणार आहे. स्मार्ट शहरांची नावे जाहीर होण्यास केवळ दोन दिवस उरलेले असतानाही राज्य सरकारने अद्यापही पुणे शहराचा स्वतंत्र प्रस्ताव केंद्राकडे पाठविलेला नाही. राज्य सरकारच्या या वृत्तीचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे,' असे शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी सांगितले. राज्य सरकारने शहराचा स्वतंत्र प्रस्ताव न पाठविल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशारा असलेले निवेदन पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी सौरव राव यांना देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तेराशे इमारतींमध्ये डेंगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डेंगी प्रतिबंधक कीटकनाशक फवारण्यास नकार देणाऱ्या सोसायट्यांमध्येच डेंगीच्या डासांची उत्पत्तीस्थाने आढळून आली आहेत. या प्रकरणी शहरातील २ हजार ७४४ सोसायट्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यापैकी निम्म्या सोसायट्यांच्या टेरेसवर डासांची उत्पत्तीस्थाने आढळली आहेत. डास आढळल्याप्रकरणी सोसायट्यांसह बांधकाम व्यावसायिकांकडून सुमारे ४६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंगीच्या डासाची उत्पत्तीस्थाने आढळून येत असल्याने अनेकांना लागण झाल्याचे दिसून आले. त्यातच डेंगीच्या पेशंटचा मृत्यू झाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर केले.

'शहरात डेंगीची लागण होऊ नये या साठी पालिकेच्या आरोग्य विभागाने काही महिन्यांपासूनच डेंगी प्रतिबंधक उपाय सुरु केले आहेत. शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये करण्यात येणाऱ्या कीटकनाशक फवारणीला चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र, सोसायट्यांमध्ये फवारणीसाठी गेल्यास तेथील पदाधिकारी आणि रखवालदारांकडून प्रवेश देण्यास मज्जाव केला जातो. त्यामुळे अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना फवारणी करता आलेली नाही. त्याच सोसायट्यांमध्ये डेंगीच्या डासांची उत्पत्तीस्थाने आढळली आहे. त्या प्रकरणी शहरातील दोन हजार ७४४ सोसायट्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यापैकी तेराशेहून अधिक सोसायट्यांच्या टेरेसवरच डेंगीच्या डासांची उत्पत्तीस्थाने आढळली आहेत,' अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी दिली.

शहरात १,१७२ बांधकाम व्यावसायिकांनाही डास आढळल्याप्रकरणी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सोसायट्या आणि व्यावसायिकांकडून ४५ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक आरोग्य प्रमुख डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी दिली.

सोसायट्यांमध्येच डेंगी अधिक

शहरात झोपडपट्टीसह सोसायट्यांमध्ये डेंगी प्रतिबंधक कीटकनाशक फवारणी करण्यात येते. मात्र अनेकदा सोसायट्या त्या करू देत नाहीत. त्यामुळे झोपडपट्ट्यांमध्ये डास आढळून येत नाहीत. उलट सोसायट्यांमध्येच सर्वाधिक डास आढळून येत आहेत. जानेवारी ते ऑगस्टपर्यंत शहरात डेंगीचे १९५ संशयित पेशंट आहेत, अशी माहिती डॉ. ठाकूर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदली होऊनही कर्मचारी तेथेच

$
0
0

नवीन ठिकाणी हजर होण्याचा आदेश पायदळी

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

आपल्या मर्जीतल्या चालकाच्या बदलीवरून पुणे आणि नागपूर पोलिस आयुक्तांमध्ये जुंपलेली जुगलबंदी सर्वश्रुत असतानाच आता पुणे शहरातदेखील हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. बदली झाल्यानंतर देखील अनेक कर्मचारी जुन्याच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत.

पुणे शहर पोलिस दलात काही महिन्यांपूर्वी अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सर्वच पोलिसांनी लवकर आपल्या नव्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश आत्तापर्यंत किमान दोन वेळा देण्यात आले आहेत. मात्र, तसे झालेले नाही. त्यामुळे मध्यंतरी पोलिसांच्या नियंत्रण कक्षावरूनदेखील तसा आदेश सहआयुक्तांनी दिला होता. पण त्याला पोलिस निरीक्षक केराची टोपली दाखवताना दिसत आहेत.

पोलिस ठाणे तसेच गुन्हे, वाहतूक, विशेष शाखेंतर्गत अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतरही केवळ मर्जीतील कर्मचारी असल्याने अनेकांना प्रभारी पोलिस निरीक्षकांनी 'काही खास' नव्या नियुक्तीच्या ठिकाणी जाण्यासाठी सोडलेले नाही. एकाच पोलिस ठाण्यात जास्त काळ काम करून त्याचा गैरवापर होऊ नये, या साठी ठरावीक कालावधीनंतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येतात. पण या बदलीच्या धोरणालाच पोलिस निरीक्षकांकडून हरताळ फासला जात आहे.

..तर कारवाई करू : उपायुक्त डॉ. तेली

परिमंडळ तीनमधील अनेकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. त्यातील बहुतांश कर्मचाऱ्यांना नव्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी मुक्त करण्यात आले आहे. मात्र, बाहेरील परिमंडळातून बदली होऊन अनेकजण अद्याप आलेले नाहीत. जर एखाद्या निरीक्षकाने कर्मचाऱ्याला वैयक्तिक कामांसाठी अडवून ठेवण्याची भूमिका घेतली, असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लेट डोक्यात पडून बांधकाम मजुराचा मृत्यू

$
0
0

पिंपरीः गहुंजे येथे सुरू असलेल्या बांधकाम साइटवर क्रेनच्या मदतीने कॉलमची प्लेट काढताना प्लेट डोक्यात पडून एका मजुराचा मृत्यू झाला. सोमवारी (२४ ऑगस्ट) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. लालू राय यादव (वय ३०, रा. गहुंजे, मूळ रा. बिहार) असे या घटनेत मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. या प्रकरणी क्रेनचालक बाबासाहेब वामन आरगडे (वय २५, रा. सध्या- गहुंजे, मूळ- उस्मानाबाद) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गहुंजे येथे लोढा प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर असलेल्या कॉलमला बसविण्यात आलेली लोखंडी प्लेट काढण्याचे काम क्रेनच्या मदतीने करण्यात येत होते. यावेळी त्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुराच्या डोक्यात लोखंडी प्लेट पडल्याने तो मजूर गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जवळच्याच खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. हलगर्जीपणाने काम केल्याप्रकरणी क्रेनचालक बाबासाहेब आरगडे याच्या विरोधात तळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

युवकावर चॉपरने हल्ला

पिंपरीः नेहरुनगर परिसरात राहणाऱ्या युवकावर किरकोळ कारणावरून चॉपरने हल्ला करण्यात आला. सोमवारी (२४ ऑगस्ट) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. शैलेश रामचंद्र कांबळे (वय २५, रा. विठ्ठलनगर) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी परवेज यासिम खान (वय ३६, रा. वाळके चाळ, विठ्ठलनगर, पिंपरी) याच्या विरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माळीणग्रस्त जाणार पुढील वर्षी स्वगृही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डोंगरकडा कोसळून त्याखाली दबलेल्या माळीण गावचे संपूर्ण पुनर्वसन नव्या वर्षात एप्रिल महिन्यात केले जाणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये आमडे गावात माळीणग्रस्तांसाठी ८० घरकुले बांधण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार असून त्यानंतर चा महिन्यांत माळीणग्रस्त नव्या घरांत पदार्पण करू शकणार आहेत.

माळीणच्या दुर्घटनेला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. संपूर्ण गाव डोंगर दबल्यामुळे त्यात १५१ गावकऱ्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने माळीण गावचे संपूर्ण पुनर्वसन अन्यत्र करण्याचा निर्णय घेतला. या पुनर्वसनाच्या निर्णयाबरोबरच दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून प्रत्येकी २ लाख व राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख अशी सात लाख रुपयांची मदत करण्यात आली.

माळीणचे पुनर्वसन नेमके कोठे करायचे यावरून बराच खल करण्यात आला. अनेक जागांना माळीणग्रस्तांनी नकारार्थी प्रतिसाद दिला. अखेर आमडे गावात पुनर्वसनासाठी माळीणग्रस्त तयार झाले. मात्र, त्यानंतरही घरे बांधण्यासाठी सोसायटी करण्यापासून घरे कशी असावीत यावर बरीच चर्चा झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी सौरव राव यांनी पुढाकार घेऊन गावकऱ्यांची सोसायटीतयार केली आणि प्रत्येक कुटुंबाला ४५० चौरस फुटांच्या घरास राजी करण्यात आले. या घरांसाठी राज्य सरकारकडून दोन लाख रुपयांप्रमाणे १ कोटी ६० लाख रुपये देण्यात येणार आहेत. या घरांसाठी साधारणतः साडेपाच लाख रुपये खर्च येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण मंडळ नापासच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिने झाले तरी, विद्यार्थ्यांना अद्याप बसपासचे वाटप झालेले नाही.. शालेय साहित्याचाही पत्ता नाही.. पावसाळा संपत आला तरी रेनकोट देण्यात आलेले नाहीत. याच पद्धतीने शिक्षण मंडळाचा कारभार होणार असल्यास पालिकेच्या सर्व शाळा खासगी कंपन्यांना चालविण्यास द्या, अशी संतप्त मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी (२५ ऑगस्ट) करण्यात आली.

खासगी शाळेतील विद्यार्थी बसपास योजनेअंतर्गत २५ टक्के जमा होणाऱ्या रकमेसाठी नव्याने लेखाशिर्ष निर्माण करावे लागणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेपुढे होता. त्यावरील चर्चेत सदस्यांनी शिक्षण मंडळातील गैरव्यवहार, साहित्य वाटपास होणारा विलंब, शैक्षणिक दर्जा, शिक्षकांची कमतरता यावरून प्रशासनावर टीकेची झोड उठविली.

शाळा सुरू होऊन अडीच महिने झाले तरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप झालेले नाही, याकडे आर. एस. कुमार यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. प्रशासन टेंडर प्रक्रियेमध्येच अडकले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यावर अनंत कोऱ्हाळे, दत्ता साने, गोरक्ष लोखंडे यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिकेला शाळा योग्य पद्धतीने चालविता येत नसल्यास त्या खासगी कंपन्यांना चालविण्यास द्याव्यात, अशी संतप्त मागणीही त्यांनी केली.

विद्यार्थी आणि विशेष मुलांना अद्याप बसपास दिले नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी असल्याचा मुद्दा सुलभा उबाळे यांनी उपस्थित केला. शैक्षणिक दर्जा सुधारण्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही, अधिकारी चुकीची माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप मंगला कदम यांनी केला. शमीम पठाण, नितीन काळजे, रमा ओव्हाळ, आशा शेंडगे, साधना जाधव, अनिता तापकीर, तानाजी खाडे यांनी चर्चेत भाग घेऊन शिक्षण मंडळाच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

या चर्चेनंतर आयुक्त राजीव जाधव यांनी खुलासा केला. तसेच, शिक्षण मंडळाच्या संदर्भात येत्या १५ दिवसांत महापौर शकुंतला धराडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करून आढावा घेतला जाईल, असे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वर्गीकरणा’वरून खडाजंगी

$
0
0

विरोधी भूमिका घेतल्याने शिवसेना एकाकी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिवसेनेच्या सभासदांवर पालिकेच्या बजेटमध्ये अन्याय झाल्याने त्यांना जादा निधी मिळावा, या मागणीसाठी शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत वर्गीकरणाचे प्रस्ताव अडविण्याचा प्रयत्न केला. पक्षाची भूमिका मांडताना आक्रमक झालेल्या हरणावळ यांनी सभेचे अध्यक्ष असलेल्या उपमहापौर आबा बागूल यांच्या दिशेने कुंडी उगारली; पण इतर सदस्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. परंतु, वर्गीकरणासह पीएमपीचे मोफत पास देण्याच्या भूमिकेवरही इतर पक्षांनी विरुद्ध भूमिका घेतल्याने शिवसेना एकाकी पडल्याचे चित्र सभागृहात पाहायला मिळाले.

पालिकेच्या २०१५-१५ च्या बजेटमध्ये पक्षाच्या अनेक नगरसेवकांना तुटपुंजा निधी मिळाला असून, सत्ताधाऱ्यांनी वारंवारे आश्वासने देऊनही त्याची पूर्तता केलेली नाही, असा आरोप शिवसेनेचे गटनेते हरणावळ यांनी केला. तसेच, जोपर्यंत पुरेसा निधी मिळणार नाही, तोपर्यंत पालिकेत एकही वर्गीकरण मंजूर करून दिले जाणार नाही, असा पवित्रा घेत त्यांच्यासह शिवसेेनेच्या सर्व सदस्यांनी सभागृहातच बसकण मारली. तरीही, सत्ताधाऱ्यांनी इतर विरोधी पक्षांना सोबत घेत वर्गीकरणाचे दोन प्रस्ताव मंजूर करून घेतले. तसेच, शिवसेनेचा एकही प्रस्ताव मंजूर केला जाणार नाही, अशी तंबी दिली. त्यामुळे अशोक हरणावळ यांनी अखेर नमते घेण्याचा प्रयत्न केला.

शहरातील सर्व विद्यार्थ्यांना पीएमपीचा मोफत पास देण्यात यावा, असा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी पुकारण्यात आला. परंतु, अनुमोदनाअभावी हा प्रस्तावच वगळण्यात आल्याने पक्षाची भूमिका मांडताना आक्रमक झालेल्या हरणावळ यांनी थेट सभेचे अध्यक्ष असलेल्या उपमहापौरांच्या आसनासमोर धाव घेतली. आणि महापौरांच्या समोर असलेला राजदंड उचलला; तसेच समोरील कुंडीही त्यांच्यावर उगारली.

परंतु, या दरम्यान, सभागृहनेते बंडू केमसे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांच्यासह इतर सदस्यांनी हस्तक्षेप करून हरणावळ यांना अडवले. त्यामुळे, पुढील अनर्थ टळला. वर्गीकरणासह पीएमपीचे मोफत पास देण्याच्या भूमिकेवरही इतर पक्षांनी विरुद्ध भूमिका घेतल्याने शिवसेना एकाकी पडल्याचे चित्र सभागृहात पाहायला मिळाले.

बजेटमधील ४० कोटींना फुटणार पाय

पालिकेच्या सोमवारच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सदस्यांचे सुमारे शंभरहून अधिक वर्गीकरणाचे प्रस्ताव एकापाठोपाठ मान्य करण्यात आले. यामुळे, प्रशासन आणि स्थायी समिती अध्यक्षांनी मांडलेल्या ४० कोटी रुपयांना पाय फूटणार असून, प्रभागातील विविध कामांसाठी वर्गीकरणाचे हे प्रस्ताव अवघ्या तासाभराच्या अवधीत मान्य केले गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालवाहतूकदारांचा संप पुढे ढकलला

$
0
0

पुणेः मालवाहतूकदारांकडून आकारल्या जाणाऱ्या टीडीएस व टोलच्या विरोधात ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसने पुकारलेला देशव्यापी वाहतूक बंद काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. या संघटनेच्या व्यवस्थापकीय समितीची दिल्लीत परिवहन खात्याच्या प्रधान सचिवांशी आज, मंगळवारी बैठक होणार असून त्या बैठकित घेतल्या जाणाऱ्या निर्णयावर पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

संघटनेने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमंत्री पी. राधाकृष्णन यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर केले होते. २५ ऑगस्टपर्यंत त्यावर योग्य निर्णय न घेतल्यास बंदचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर प्रधान सचिवांनी ही बैठक आयोजित केली आहे. मंगळवारी होणाऱ्या बैठकीनंतर, २८ ऑगस्टला संघटनेच्या व्यवस्थापकीय समितीच्या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाईल, समितीचे सदस्य बाबा शिंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेबसाइट अजूनही ‘जुनीच’

$
0
0

पुणेः पालिकेच्या वेबसाइटवरील माहिती चार वर्षांपेक्षा जुनी असून, स्मार्ट सिटीसाठी तयारी करणाऱ्या पालिकेने माहिती अद्ययावत ठेवण्याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. घनकचरा, बांधकाम, अग्निशामक, सेवकवर्ग अशा पालिकेच्या महत्त्वाच्या विभागांची माहिती तीन वर्षांहून अधिक काळ अपडेट करण्यात आली नसल्याकडे आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

पालिकेतील महत्त्वाच्या खात्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असून, ही माहिती अपडेट केली जावी, असे पत्र सजग नागरिक मंचाच्या विवेक वेलणकर यांनी आयुक्त कुणाल कुमार यांना पाठविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परदेशवारीला लावला ‘ब्रेक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनच्या (इपीएफओ) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना परदेशवारी करायची असल्यास या विभागाची परवानगी अत्यावश्यक आहे. मात्र, अनेक अधिकारी परवानगीची वाट न पाहता परदेशात जात असल्याचे निदर्शनास आल्याने अधिकाऱ्यांच्या परदेशवारीचा मार्ग खडतर करण्यात आला आहे. यापुढे कोणत्याही अधिकाऱ्याला परदेशात जाण्यापूर्वी तीन महिने अगोदरच परवानगी घ्यावी लागणार आहे.

कोणत्याही सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला परदेशात जायचे असल्यास संबंधित विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. 'इपीएफओ'मधील अधिकाऱ्यांना परदेशात जायचे असल्यास त्याची पद्धत ठरलेली​ आहे. अधिकारी ​किंवा कर्मचाऱ्यांना आपापल्या विभागीय कार्यालयाकडे प्रस्ताव द्यावा लागतो. विभागीय कार्यालयाकडून प्रस्ताव मुख्यालयात पाठविण्यात येतो. मुख्यालयाकडून प्रस्ताव खात्याच्या मनुष्यबळ विभागाकडे दिला जातो. त्यानंतर दक्षता विभागाकडून प्रस्तावाची छाननी केली जाते. दक्षता विभागाकडून प्रमाणपत्र मिळाल्यानंतर परदेशात जाण्याची परवानगी मिळते. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब लागतो; तसेच विभागीय कार्यालयांकडून ऐन वेळी प्रस्ताव पाठविण्यात येत असल्याने वेळेत प्रमाणपत्र मिळणे अवघड होते. अशा परिस्थितीत परवानगी मिळाली नसतानाही अनेकजण परदेशात जाऊन येत असल्याची बाब 'इपीएफओ'च्या निदर्शनास आली.

कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावाची वेळेत छाननी व्हावी, यासाठी याबाबतचे प्रस्ताव तीन महिने अगोदरच पाठविण्याचे आदेश मुख्यालयाकडून देण्यात आले असल्याचे पुणे विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मलनिस्सारण प्रकल्प वादात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या बुटी स्ट्रिट येथील मलनिस्सारण प्रकल्पाला भाजपच्याच एका गटाने विरोध करून 'घरचा आहेर' दिला असताना, आता शिवसेना आणि स्थानिक नागरिकांनीही विरोधाचा झेंडा फडकावल्याने हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नियोजित प्रकल्प नागरी वस्तीत असल्याने स्थानिक नागरिकांनी विरोधाची भूमिका घेतली असून, खेळाच्या मैदानावर प्रकल्प बांधल्यास आणि शाळा स्थलांतरित केल्यास आंदोलन करण्याचा पवित्रा शिवसेनेने घेतला आहे.

या प्रकल्पाचे भूमिपूजन कोणताही गाजावाजा न करता सोमवारी उरकण्यात आले. या प्रकल्पाला भाजपचे कँटोन्मेंट विभागाचे माजी सरचिटणीस विनायक काटकर आणि भाजपच्या कामगार आघाडीचे माजी शहराध्यक्ष शशिधर पूरम यांनी विरोध केल्याने सत्ताधारी भाजपची अडचण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेनेही विरोधाची भूमिका घेतली आहे.

नागरी वस्तीत हा प्रकल्प असल्याने स्थानिक नागरिकांना त्रास होणार आहे. या प्रकल्पासाठी रवींद्रनाथ टागोर शाळेचे स्थलांतर बाबाजान चौकात करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी कायम गर्दी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे; तसेच या परिसरात एकमेव खेळाचे मैदान आहे. त्यावर हा प्रकल्प उभारण्यास विरोध आहे. बोर्डाने हा प्रकल्प बांधण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेनेकडून आंदोलन केले जाईल, असे शिवसेनेचे कँटोन्मेंट विभागप्रमुख अतुल गोंदकर यांनी सांगितले.

या प्रकल्पाच्या शेजारी राहणारे विराफ सुरपी यांनीही विरोध केला आहे. 'या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी २०११ मध्येच हरकत घेतली होती. मात्र, बोर्डाने त्याची दखल घेतली नाही. दाट लोकवस्ती असलेला हा परिसर आहे. तसेच चर्च, मंदिर, शाळा आहेत. त्या ठिकाणी प्रकल्प उभारणे योग्य नाही. बोर्ड आणि पुणे महापालिका यांच्यात २००७ मध्ये करार झाला होता. त्यावेळी बोर्डाचा प्रकल्प पुणे महापालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्पाला जोडण्याचे सुचविले होते. त्या कराराची अंमलबजावणी करण्याऐवजी कोट्यवधी रुपये खर्च करून नागरी वस्तीत प्रकल्प उभारण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यास विरोध आहे,' असे सुरपी म्हणाले.

पर्यावरणाच्या प्रश्नामुळे विरोध

'या प्रकल्पाला विरोध असल्यामुळे सत्ताधारी आणि बोर्डाने भूमिपूजनाचा कार्यक्रम गुपचूप केला आहे. नियोजित प्रकल्पामुळे आमच्या परिसरात पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे विरोध आहे. हा प्रकल्प नदीकाठी करणे आवश्यक होते. माणिकनाल्याच्या परिसरात तो करता येऊ शकतो. नागरी वस्तीत प्रकल्प उभारणे हिताचे आहे का?' असा सवाल महेंद्र सत्तूर यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हस्तांतर शुल्क भरा; व्हा मालक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या वतीने शहरातील रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्या स्टॉलधारकांना देण्यात आलेली लायसन्स दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरीत केल्यानंतर आता त्याचे शुल्क वसुल केले जाणार आहे. यामुळे या पुढील काळात ठरावीक शुल्क भरून शहरात व्यवसाय करण्यासाठी पालिकेने दिलेले लायसन्स आपल्या नावावर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिका प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचा मोठा फायदा उपनगरांमधील पथारी व्यावसा‌यिकांना होणार आहे. १९९० पूर्वी महापालिकेच्या वतीने व्यवसाय करण्यासाठी देण्यात आलेल्या लायसन्सधारकांना याचा फायदा होणार असून, पालिकेने ठरवून दिलेले हस्तांतर शुल्क भरल्यानंतर अधिकृत लायसन्स संबंधित व्यक्तीच्या नावावर होणार आहे.

सुप्रीम कोर्टाने रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय फेरीवाला धोरण तयार केले असून, त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्य सरकारमार्फत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी करून शहरातील पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या धोरणाची अंमलबजावणी करताना सर्व पथारी व्यावसायिकांचे सर्वेक्षण करून त्यांची बायोमेट्रिक नोंदणी केली जात आहे. या धोरणाच्या माध्यमातून पालिकेने शहरातील २० हजार व्यावसायिकांची नोंदणी पूर्ण केली असून, त्यांना प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्यासाठी पालिकेने विविध प्रकारच्या श्रेणी तयार केल्या असून, यामध्ये अ, ब, क, ड अशा श्रेणी प्रामुख्याने तयार करण्यात आल्या आहेत. सात वर्षांपेक्षा अधिक काळ व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचा समावेश अ मध्ये, पाच वर्षांपेक्षा जुन्या व्यावसायिकांचा समावेश ब मध्ये, एक वर्षापेक्षा जुन्या व्यावसायिकांचा समावेश क गटामध्ये, तर गेल्या काही महिन्यांपासून व्यवसाय करणाऱ्यांसाठी पालिकेने ड गट तयार केला आहे. या गटानुसार व्यावसायिकांना प्राधान्यक्रम देऊन त्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे.

शहरातील विविध रस्त्यांवर व्यवसाय करण्यासाठी महापालिकेने १९९० पूर्वी सुमारे सात हजार ७९२ लायसन्स दिले आहेत. यामध्ये स्टॉलधारक, हातगाडीवाले, पथारीवाले यांचा समावेश आहे. यातील अनेक लायसन्सधारकांनी आपली लायसन्स परस्पर दुसऱ्या व्यक्तीला दिली आहेत. पालिकेने दिलेले लायसन्स यापूर्वी केवळ वारसा हक्काने हस्तांतरीत करण्याची परवानगी असल्याने इतर लायसन्स हस्तांतरीत करण्यात आली असली, तरी त्याची कोणतीही नोंद पालिकेकडे सापडत नाही. त्यामुळे अनेकदा शहरातील व्यावसायिकांना अडचणी निर्माण होत होत्या. लायसन्स घेऊनही महापालिकेच्या अतिक्रमण, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी अनेकदा समोर आल्या होत्या. १९९० नंतर महापालिकेने कोणत्याही प्रकारचे लायसन्स व्यावसायिकांना दिले नसतानाही रस्त्यांवर अनेक व्यावसायिक गेली अनेक वर्षे व्यवसाय करत आहेत. फेरीवाला धोरणाच्या माध्यमातून या व्यावसायिकांची नोंद नव्याने करायची झाल्यास त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो. त्यामुळे जुनी लायसन्स हस्तांतरीत करण्यासाठी ठरावीक शुल्क आकारण्याची चर्चा महापालिकेने स्थापन केलेल्या फेरीवाला धोरण समितीत‌ करण्यात आली होती. ही लायसन्स दुसऱ्याच्या नावावर हस्तांतरीत करताना त्यांच्याकडून शुल्क घ्यावे, असा प्रस्ताव पालिका प्रशासनाने समित‌ीसमोर ठेवला होता. मात्र, ही रक्कम अधिक असल्याने ही वाढ फेटाळून जुनेच दर घ्यावेत, अशी शिफारस समितीने केली होती.

गेल्या काही महिन्यांपासून हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर चर्चेसाठी होता. त्याला नुकतीच मंजु‌री मिळाल्याने हे हस्तांतर शुल्क भरून व्यावसायिकांना ही लायसन्स स्वत:च्या नावावर करता येणार आहेत. यामधून पालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्नही मिळणार असल्याने सर्वसाधारण सभेत याला मंजुरी देण्यात आली.

वेगवेगळ्या श्रेणींसाठी वेगवेगळे शुल्क

लायसन्स हस्तांतर करण्यासाठी महापालिकेने विशेष दर प्रस्तावित केले आहेत. यामध्ये विशेष श्रेणीतील (सारसबाग, हाँगकाँग लेन, तुळशीबाग आदी) स्टॉल लायसन्स शुल्क हस्तांतरासाठी दोन लाख, अ श्रेणीतील स्टॉलसाठी दीड लाख, ब श्रेणीतील स्टॉलसाठी एक लाख, क श्रेणीसाठी पन्नास हजार रुपये आणि हातगाडी, बैठे व्यावसायिक तसेच गटईसाठी २५ हजार शुल्क घेतले जाणार आहे. पथारी, हातगाडी आणि स्टॉल व्यावसायिकांकडून हे शुल्क आकारण्यात येणार आहे. सर्वसाधारण सभेने याला मंजुरी दिल्याने लवकरच याची कार्यवाही सुरू होणार असल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.‌

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीई’ झुगारणाऱ्या शाळांविरोधात मोर्चा

$
0
0

पुणेः शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) दिलेले २५ टक्क्यांचे प्रवेश नाकारणाऱ्या शाळांविरोधात मंगळवारी संतप्त पालकांनी महापालिका शिक्षण मंडळावर मोर्चा काढला. अशा शाळांची चौकशी करून, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतरच पालकांनी माघार घेतली.

आरटीईअंतर्गत प्रवेश देण्याबाबतचे हायकोर्टाचे आदेश न पाळल्याने शिक्षण मंडळाने कोथरुडमधील मिलेनियम नॅशनल स्कूलवर सोमवारी गुन्हा दाखल केला. त्यापाठोपाठ हायकोर्टाचे आदेश झुगारून आरटीईमधील २५ टक्क्यांचे प्रवेश न देणाऱ्या शहरातील इतर शाळांवरही कडक कारवाई करण्याचा इशारा मंडळाने सोमवारी दिला होता. प्रवेश नाकारणाऱ्या विविध शाळांची एक बैठक मंडळाने मंगळवारी बोलविली होती. मात्र, मंडळाच्या आदेशांना केराची टोपली दाखवित, बहुतांश शाळांनी दांडी मारली. त्यामुळे पालकांनी या शाळांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरली.

चौकशी समिती नेमणार

अशा शाळांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती नेमण्यात येईल. ही समिती शाळांना भेटी देऊन आपला अहवाल शुक्रवारपर्यंत मंडळाकडे सादर करेल. या दरम्यानच्या काळात ज्या शाळा प्रवेश देणारच नाहीत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असे मंडळाचे शिक्षण प्रमुख बी. के. दहिफळे यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५७ हजार विद्यार्थ्यांना दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

यंदा पहिल्यांदाच जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या दहावीच्या फेरपरीक्षेमुळे राज्यातील ५७ हजारांवर विद्यार्थ्यांचे वाया जाणारे एक वर्ष वाचले आहे. दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ३५ हजार ३४६ विद्यार्थ्यांसोबतच एटीकेटीची सवलत मिळालेले हे विद्यार्थी आता नव्याने अकरावीला प्रवेश घेण्यास पात्र ठरले आहेत.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या सूचनेनुसार, यंदा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य बोर्ड) पहिल्यांदाच ऑक्टोबरऐवजी जुलै- ऑगस्टमध्ये दहावीची फेरपरीक्षा घेतली. या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. त्यानुसार राज्यभरातून ही परीक्षा दिलेल्या एकूण १ लाख ३९ हजार ३२९ विद्यार्थ्यांपैकी ३५ हजार ३४६ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होण्यात यश मिळविले. परीक्षेचा एकत्रित निकाल २५.३७ टक्के इतका लागल्याचे राज्य बोर्डाने स्पष्ट केले.

मार्च २०१५ च्या परीक्षेत एका विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १८ हजार २३० होती. तर दोन विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३१ हजार २७९ इतकी होती. जुलै- ऑगस्टच्या परीक्षेतूनही एका विषयात नापास असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४० हजार ३३४, तर दोन विषयात नापास झालेल्यांची संख्या ३१ हजार ३४६ इतकी नोंदविण्यात आली. एटीकेटीला पात्र असणाऱ्या या विद्यार्थ्यांपैकी ४९ हजार ५०९ विद्यार्थी या पूर्वीच अकरावी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. जुलैच्या परीक्षेमुळे आणखी ५७ हजार ५१७ विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र ठरल्याचेही मंडळाने स्पष्ट केले.

घरगुती अडचणींमुळे मार्चची परीक्षा देता न आलेल्या पुण्यातील समर्थ महेंद्रकर या विद्यार्थ्याने या निकालानंतर आपली प्रतिक्रिया 'मटा'कडे नोंदविली. तो म्हणाला, मला मार्चची परीक्षा देता आली नव्हती. मित्र- मैत्रिणींचा निकाल पाहिल्यानंतर थोडे वाईट वाटले होते. पण, नंतर जुलैच्या परीक्षेत पुन्हा दहावीची परीक्षा देण्याची संधी मिळाली. परीक्षेचा निकाल आज लागला. मला ६४ टक्के मिळाले आहेत. मला अकरावी सायन्सला अॅडमिशन घ्यायचे आहे. ही परीक्षा म्हणजे माझ्यासाठी एक नवी संधीच ठरली. माझ्यासारख्या अनेकांना या परीक्षेमुळे वाया जाणारे वर्ष वाचवता आले. राज्य बोर्डानेही अशा सर्वच विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जुलैच्या परीक्षेमध्येही ९५.६० टक्के

मंगळवारी जाहीर झालेल्या निकालामध्ये नगर जिल्ह्यातील अकोले येथील अगस्ती विद्यालयाच्या अगस्ती चासकर याने ९५.६० टक्के मिळवून आपली चमक दाखवून दिली. अगस्तीला मार्चच्या परीक्षेवेळी आजारपणामुळे परीक्षा देता आली नव्हती. त्यानंतर जुलैमध्ये झालेल्या फेरपरीक्षेत मिळालेल्या संधीचे सोने करत त्याने ही कामगिरी करून दाखविली. आता आपल्या इतर सवंगड्यांसोबत तोही पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामिल होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ऑफलाइन’वरून तीन कॉलेजांना दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात अकरावीचे ऑफलाइन प्रवेश देणाऱ्या तीन कॉलेजांना पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी मंगळवारी प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू असतानाही बेकायदा पद्धतीने ऑफलाइन प्रवेश दिल्याप्रकरणी कॉलेजांवर ही कारवाई करण्यात आली.

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमधील सहाव्या फेरीची प्रवेश प्रक्रिया सध्या राबविण्यात येत आहे. मुंबई हायकोर्टाने अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशांसंदर्भाने दिलेल्या निर्देशांनुसार, ही फेरी सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे यापूर्वी ऑनलाइन प्रवेश मिळालेले मात्र कॉलेज बदलून हवे असणाऱ्या विद्यार्थ्यांच्याच जोडीने, शहरातील विविध कॉलेजांमध्ये ऑफलाइन प्रवेश घेणारे विद्यार्थीही या प्रक्रियेमध्ये सहभागी झाले आहेत. शहरातील अनेक कॉलेजांमधून या पूर्वी झालेले ऑफलाइन प्रवेश हे बेकायदेशीरच ठरविण्याचा इशारा राज्याच्या शिक्षण खात्याचे प्रधान सचिव डॉ. नंद कुमार यांनी यापूर्वी दिला होता. मात्र, सहाव्या फेरीदरम्यान खात्याचे हे सर्व दावे खोटेच ठरल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी दिलेले बेकायदेशीर ऑफलाइन प्रवेश कायदेशीर करून घेण्यासाठी अनेक कॉलेजांनी ऑनलाइन प्रक्रियेचा वेगळ्या प्रकारे वापर करून घेतला आहे. अशा सर्वच कॉलेजांवर कडक कारवाई करण्याचा इशारा खात्याने या निमित्ताने दिला. भोसरीमधील भैरवनाथ विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज, गायत्री ज्युनिअर कॉलेज आणि पिंपरीमधील आर्य विद्यामंदिरने मोठ्या संख्येने अकरावीचे ऑफलाइन प्रवेश दिल्याचे समोर आले. या तिन्ही कॉलेजांनी दिलेले ऑफलाइन प्रवेश रद्द केले आहेत.

ऑफलाइन प्रवेश का दिले, याचा जाब विचारणारे पत्रही तिन्ही कॉलेजांच्या प्राचार्यांना पाठविले असून, त्याचे उत्तर तीन दिवसांच्या आत देण्याचे आदेशही कॉलेजांना दिले आहेत. दंड न भरल्यास कॉलेजची मान्यता काढून घेण्याचा इशाराही या कॉलेजांना देण्यात आल्याचे या पत्रांवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, अकरावीच्या सहाव्या फेरीला एक दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. ही फेरी आज संपणार आहे.

- रामचंद्र जाधव, पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक्स्प्रेस वे’चा करार केराच्या टोपलीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एक्स्प्रेस वेसह खासगी सहभागातून उभारलेल्या (पीपीपी) प्रकल्पांची माहिती आणि टोलचे करार प्रसिद्ध करण्याबाबत माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी दिलेल्या आदेशाला सार्वजनिक बांधकाम विभागाने केराची टोपली दाखविली आहे. तर, राज्य रस्ते विकास महामंडळाने या आदेशानुसार अंशतः माहिती प्रसिद्ध केली असली, तरी कळीचा मुद्दा असलेल्या पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेचा करार मात्र गुलदस्त्यातच ठेवला आहे.

गेल्या महिन्यात सातत्याने दरडी कोसळल्यामुळे एक्स्प्रेस वेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. भरमसाट टोल भरून प्रवास करताना महामार्गाची सुरक्षा आणि जीवघेणे अपघात याबाबत नेमकी जबाबदारी राज्य सरकार, एमएसआरडीसी आणि टोल जमा करणी कंपनी आयआरबी यांच्यापैकी कोणाची, त्यासाठी केलेल्या करारांमधील तरतुदी काय आहे, असे प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, हे करार गुलदस्त्यात ठेवल्यामुळे सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी राज्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार केवळ एक्स्प्रेस वेच नव्हे, तर राज्यातील सर्वच पीपीपी प्रकल्पांची माहिती, टोलविषयक कंत्राटांच्या प्रती एका महिन्यात जाहीर कराव्यात, असा आदेश गायकवाड यांनी दिला. ही मुदत सोमवारी समाप्त झाली. मात्र, सार्वजनिक बांधकाम खात्याचे यापैकी कोणतीही माहिती या मुदतीत जाहीर केलेली नाही. तसेच, एमएसआरडीसीने या आदेशापैकी अंशतः माहिती जाहीर केली आहे. मात्र, ज्या घटनेवरून हा प्रश्न उभा राहिला, त्या पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेबाबतच्या माहितीचाच यामध्ये समावेश नाही. यामध्ये सोलापूर, नागपूर, मूर्तिजापूर तसेच राज्याच्या सीमांवरील चेकपोस्ट याबाबत माहिती देण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि एमएसआरडीसीचे एमडी यांना ही माहिती वेबसाइटवर जाहीर करण्याचा आदेश माहिती आयुक्तांनी दिला होता. मात्र, मुदत उलटून गेल्यावरही ही माहिती जाहीर न झाल्यामुळे आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी वेलणकर यांनी गायकवाड यांच्याकडे केली आहे.

वेबसाइटवर तपशीलही नाही

'पीपीपी'च्या प्रकल्पांचे तपशील संबंधित यंत्रणेने वेबसाइटवर जाहीर करावेत, असा आदेश केंद्र सरकारच्या कार्मिक (पर्सोनेल) विभागाकडून दोन वर्षांपूर्वीच देण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकार व एमएसआरडीसीने त्याचे पालन केलेले नाही, असे सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी यामध्ये म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images