Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

लाखांचे बनावट लोणी जप्त

0
0

पुणेः भोर तालुक्यातील केळवडे येथील देशी बनावट लोणी जप्त करण्याची कारवाई केल्यानंतर तेथून बुधवार पेठेतील एका विक्रेत्याला पाठविलेला साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. तेथील विक्रेत्याकडून एक लाख २९ हजार ४९० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

भोर तालुक्यातील गोकुळ ब्रॅन्डचा देशी लोण्याचा बनावट साठा डेक्कन शीतगृहात साठवून ठेवल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) मिळाली होती. त्या वेळी त्या शीतगृहातून शहरातील एका विक्रेत्याकडे काही प्रमाणात साठा असल्याची माहिती देण्यात आली होती. त्या माहितीच्या आधारे बुधवार पेठेतील डी. एन. अग्रवाल मावावाला यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे गोकुळ ब्रॅन्डचा चारशे किलो वजनाचे देशी लोण्याचा साठा आढळला. एफडीएचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या व्यापाऱ्याकडील देशी लोण्याचा साठा बनावट व भेसळीच्या संशयावरून जप्त केल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी धनश्री निकम-ढाणे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उदंड झाले प्रवासी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) मार्गावरील बससंख्येत वाढ झाल्याने एका बाजूला उत्पन्नाचा आलेख उंचावला असतानाच, प्रवाशांच्या संख्येतही गेल्या दोन महिन्यांत दोन लाखांची वाढ झाली आहे. काही महिन्यांपूर्वी दहा लाखांच्या खाली घसरलेली दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या पुन्हा १२ लाखांच्या घरात पोहोचली आहे.

मार्गावरच बंद पडणाऱ्या बस, प्रवाशांची घटलेली संख्या आणि त्यातून उत्पन्नावर होणारा परिणाम अशा चक्रव्यूहात सापडलेल्या 'पीएमपी'मध्ये सुधारणा घडवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, सलग दोन सोमवारी पीएमपीने भरघोस उत्पन्न प्राप्त केले आहे. त्याचवेळी, मार्गावर धावणाऱ्या बसच्या संख्येतही वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळच्या सत्रात पीएमपीच्या सर्वाधिक बस रस्त्यावर होत्या. बसच्या फेऱ्या वाढल्याने पीएमपीपासून दूर जात असलेला प्रवासी पुन्हा पीएमपीचा पर्याय स्वीकारत असल्यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. अवघ्या दोनच महिन्यांपूर्वी पीएमपीची सरासरी प्रवासी संख्या ९ लाख ६५ हजारांपर्यंत घसरली होती. बससंख्या वाढल्याने प्रवासी संख्येतही वाढ झाल्याचे दिसून येत असून, जुलैची सरासरी प्रवासीसंख्या ११ लाख ८४ हजारांवर पोहोचली आहे. दोन महिन्यांत पीएमपीच्या प्रवासी संख्येत दोन लाखांहून अधिक प्रवाशांची भर पडली आहे. ऑगस्टमध्ये पीएमपीची सरासरी प्रवासी संख्या १२ लाखांपर्यंत पोहोचण्याची चिन्हे आहेत.

पीएमपीने सर्व डेपोअंतर्गत सर्वाधिक गर्दीच्या मार्गांची निवड केली असून, या मार्गांवरील बस वेळापत्रकानुसार धावतील, याची विशेष दक्षता घेण्यात येत आहे. प्रत्येक डेपोतील दोन मार्गांची त्यासाठी निवड करण्यात आली असून, अशा मार्गांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पीएमपीच्या ताफ्यातील मालकीच्या बाराशे बसपैकी दररोज नऊशे बस मार्गावर धावतील, याचे उद्दिष्ट कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे.

पीएमपी बसेस वाढल्या; प्रवासी वाढले

बस प्रवाशांची संख्या वाढल्याने तसेच गर्दीच्या मार्गांवरील बस वेळापत्रकानुसार धावतील, याची विशेष दक्षता घेण्यात आल्यामुळे दोन महिन्यांत पीएमपीच्या प्रवासी संख्येत दोन लाखांहून अधिक प्रवाशांची भर पडली आहे. दोन महिन्यांपूर्वी बस प्रवाशांची संख्या ९ लाख ६५ हजारांवर पोहोचली होती. तर, जुलैमध्ये प्रवासीसंख्या ११ लाख ८४ हजारांवर गेली होती. मात्र, आता प्रवासी संख्या १२ लाखांच्या घरात पोहोचली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बकोरियांकडे अतिरिक्त कार्यभार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिकेतील अतिरिक्त आयुक्त (इस्टेट) राजेंद्र जगताप यांच्याकडील काही अधिकार कमी करून ते अतिरिक्त आयुक्त (विशेष) ओमप्रकाश बकोरिया यांना देण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. दोन्ही अतिरिक्त आयुक्तांमध्ये कामाची समान विभागणी व्हावी, यासाठी फेरबदल करण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी गेल्या काही दिवसांत जगताप यांच्याविरोधात वारंवार तक्रारी येत असल्याने त्यांचे अधिकार काढण्यात आल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून जगताप पालिकेमध्ये आहेत. पालिकेतील अतिरिक्त आयुक्त (जनरल) हे पद रिक्तच असल्याने त्यांच्याकडील सर्व कार्यभारही जगताप यांच्याकडेच देण्यात आला होता. मात्र, आता पालिका आयुक्तांनी जगताप यांच्याकडील सहा खाती कमी केली असून, त्याची जबाबदारी बकोरिया यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

जगताप यांच्याकडे इस्टेटसह जनरल अंतर्गत येणाऱ्या अनेक खात्यांचा कारभार असल्याने त्यात बदल केला गेला आहे. दोन्ही अतिरिक्त आयुक्तांकडे कामाची समान विभागणी व्हावी, या उद्देशाने हा बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून जगताप यांच्याविरोधात अनेक नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांकडून तक्रारी केल्या जात होत्या. त्यामुळे, त्यांच्याकडील अधिकार कमी करण्यात आल्याची चर्चा आहे.

सहायक आयुक्तांच्याही बदल्या

पालिकेतील टिळक रोड, कोथरूड, ढोले पाटील रोड, हडपसर, औंध आणि बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांच्या सहायक आयुक्तांच्याही बदल करण्यात आल्या आहेत. जयंत भोसेकर (कोथरूड), संदीप ढोले (औंध), संजय गावडे (ढोले पाटील रोड), सुनील गायकवाड (हडपसर), अविनाश सकपाळ (बिबवेवाडी) आणि रवी पवार (टिळक रोड) अशा नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. तर औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त नितीन उदास यांची बदली मालमत्ता व व्यवस्थापन विभागात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संगीता तिवारींची पतीविरोधी तक्रार

0
0

येरवडा : पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा आणि काँग्रेस कार्यकर्त्या संगीता रवी तिवारी (वय. ४८ रा. कुमार कृती, कल्याणी नगर) यांनी पतीच्या विरोधात मारहाण आणि शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी रवी तिवारी यांच्या विरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेत शिक्षण मंडळ अध्यक्ष असताना तू कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला असून, इतकी मोठी रक्कम कोणाकडे ठेवली आहे, तुझ्याकडील सोन्याचे दागिने आणि पंचवीस लाख मला आणून दे, अशी मागणी रवी यांनी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच, चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ आणि मारहाणही होत असल्याचे श्रीमती तिवारींनी म्हटले आहे. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याने आपण पोलिसांत धाव घेतल्याचेही तक्रारी म्हटले आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राजेंद्रनगर परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या उच्चशिक्षित तरुणीवर एकतर्फी प्रेमातून शुक्रवारी सकाळी हल्ला करण्यात आला. मात्र, तरुणीने प्रसंगावधान दाखवल्यामुळे ती हल्ल्यातून बचावली. फरासखाना पोलिसांनी या प्रकरणी चौघा हल्लेखोरांना अटक केली अहो. प्रेमाला दाद देत नसल्यामुळे एक लाख रुपयांची सुपारी देऊन तरुणीवर हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

संतोष मारुती जाधव (वय २८, रा. तोरणा अपार्टमेंट, बालाजीनगर), प्रभू प्रकाश पालकर (वय २३, तळजाई पठार, पद्मावती), सोमनाथ दिनकर जाधव (वय २९, रा. मणेरवाजी, खानापूर ता. हवेली) आणि सनी उर्फ लक्ष्मीकांत मनोहर क्षीरसागर (वय २९, रा. जनता वसाहत, पर्वती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या बाबत धनकवडी परिसरात राहणाऱ्या तेवीस वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी सेनापती बापट रस्त्यावरील कंपनीत उच्च पदावर नोकरीला आहे. ती शुक्रवारी सकाळी दुचाकीवरून कामावर निघाली होती. राजेंद्रनगर येथील सचिन तेंडुलकर उद्यानाजवळ आल्यानंतर एक तरूण कुऱ्हाड घेऊन धावत आला. त्याने तरुणीवर वार केला. पण, तरूणीने वार चुकवल्याने तो वार दुचाकीच्या आरशावर बसला. तरुणी दुचाकी सोडून पळू लागल्यानंतर आरोपींनी तिचा पाठलाग केला. परंतु, सकाळची वेळ असल्यामुळे तिचा आरडाओरडा ऐकून नागरिक जमा झाले. त्यामुळे आरोपी साथीदारासोबत दुचाकीवरून पळून गेला. नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्यात वापरलेली अॅक्टिव्हा जनता वसाहत येथील असल्याची माहिती फरासखाना पोलिस ठाण्याचे कर्मचारी रमेश चौधरी यांना मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक विलास सोनवणे यांच्या पथकाने दुचाकीमालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर हा सर्व प्रकार उजेडात आला. त्यानुसार फरासखाना पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर हल्ल्याचे कारण स्पष्ट झाले. आरोपी क्षीरसागर याचा इलेक्ट्रिकलचा व्यवसाय असून, त्याचे पीडितेवर एकतर्फी प्रेम होते. त्यासाठी तो तिच्या मागे लागला होता. पण, तरुणीने दाद देण्यास नकार दिला. त्यामुळे क्षीरसागरने तिला जीवे मारण्यासाठी जाधवला एक लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यापैकी वीस हजार रुपये आधीच देण्यात आले. उर्वरित रक्कम काम झाल्यानंतर दिली जाणार होती. या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आरोपींनी मित्रांकडून आणली.

डेंगळे पुलाखाली आढळला मुलाचा मृतदेह

पुणे : डेंगळे पुलाखाली एका मुलाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी आढळून आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अक्षय उर्फ भय्या सखाराम गडकर (वय १६, रा. पुलसांगवी, बीड) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तो दोन दिवसांपूर्वी घरातून रुसून आला होता. शुक्रवारी डेंगळे पुलाखाली नदीपात्रात मुलाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह बाहेर काढला. त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालात आढळून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडणी मागणारा गुंड अटकेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सिंहगड रस्त्यावरील भंडारी हॉटेलच्या मालकाला २५ हजारांची खंडणीची मागणाऱ्यास पोलिसांनी अटक केली. अजय उर्फ नाना जालिंदर लोंढे (वय ३४, रा. सिंहगड रस्ता) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या बाबत सतीश भुजंग भंडारी (वय ५४) यांनी तक्रार दिली आहे. जून महिन्यात ही घटना घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारी यांचे सिंहगड रस्त्यावर हॉटेल भंडारी हॉलिडे रिसॉर्ट नावाचे परमिट रूम आणि लॉज आहे. लोंढे ४ जूनला हॉटेलमध्ये आला. या भागातील मी गुंड असल्याची बतावणी करून त्याने तेथे जेवण घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो पुन्हा हॉटेलमध्ये आला. हॉटेल चालवायचे असल्यास आपल्याला दरमहा २५ हजार रूपये खंडणी देण्याची मागणी त्याने केली. खंडणी न दिल्यास हॉटेलची तोडफोड करून जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली. या प्रकरणी अजय लोंढेला अटक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात लवकरच मेट्रो प्रकल्प सुरू

0
0

नितीन गडकरी यांचे आश्वासन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'नागपूरला मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, पुणे मेट्रोचेही काम लवकरच सुरू हेईल,' असे आश्वासन केंद्रीय रस्ते, महामार्ग आणि जहाज वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी पुण्यात दिले. तसेच, देशात स्मार्ट सिटीची योजना राबवली जात आहे. मात्र, शहरांचा विकास करून शहरे मोठी करण्यापेक्षा स्मार्ट व्हिलेज निर्माण करण्याचाही विचार झाले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या रविवारी पुण्यातील एका कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाला पुण्याविषयी आकस आहे का, असा प्रश्न उपस्थित केला होता. नागपूरच्या आधी मंजुरी देऊनही तांत्रिक अडथळ्यांमध्ये पुणे मेट्रो अडकवून मेट्रोसाठी नागपूरला प्राधान्य देण्यात आले, असेही चव्हाण म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी नागपूर मेट्रोचे काम सुरू झाले, आता पुणे मेट्रोचे कामही सुरू होईल, असे स्पष्ट करून आपण पुण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सरसावल्याचे संकेत दिले.

'सिम्बायोसिस सेंटर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट'तर्फे आयोजित 'इन्फ्राब्लेझ - १५' या व्याख्यानमालेत गडकरींनी 'स्मार्ट सिटी' या विषयावर आपली मते मांडली. सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, गडकरी यांचे विशेष सल्लागार आर. सी. सिन्हा, संस्थेच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, डॉ. रजनी गुप्ते आणि डॉ. प्रतिमा शिवरे आदी या वेळी उपस्थित होते. 'स्वातंत्र्यानंतरच्या ६८ वर्षांत ग्रामीण भागातील २८ टक्के लोकसंख्या शहरात आली. स्मार्ट सिटीमध्ये केवळ शहरांचा विकास होत गेला, तर शहरांवरील ताण मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे शहरांबरोबरच ग्रामीण भागाचा विकास करण्याचीही आवश्यकता आहे. केवळ शहरांच्या विकासामुळे इंडिया पुढे जाईल, मात्र ग्रामीण भारत मागेच राहील,' असेही गडकरी यांनी नमूद केले. स्मार्ट सिटीची निर्मिती करताना पर्यावरणाचा विचार करावा लागणार आहे. कमी खर्चात अधिकाधिक विकास करण्यासाठी ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार आहे, असेही गडकरी म्हणाले.

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे झाल्यानंतर पुण्याचा विकास वेगाने होत गेला. आता मुंबई-नागपूर एक्स्प्रेस-वेचे काम सुरू होत आहे. विकासाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वे पुणे-मुंबई रस्त्याला जोडण्याचा प्रयत्न करू.

- नितीन गडकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासात हवा सहभाग

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या विकासासाठी केवळ पालिका, केंद्र आणि राज्याच्या मदतीवर विसंबून राहता येणार नाही; तर लोकप्रतिनिधी आणि उद्योगांनीही सहभाग घेण्याची गरज आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून शहराच्या प्रश्नांची सोडवणूक होऊ शकेल, असा विश्वास माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केला. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून शहरातील सर्व खासदारांनी केंद्राकडून मिळणाऱ्या पाच कोटींच्या निधीपैकी प्रत्येकी एक कोटी रुपये पाच वर्षे शहरासाठी द्यावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.

पुणे शहराच्या ब्रँडिंगसाठी विशेषत्त्वाने तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचे अनावरण, कॉफी टेबल बुकचे प्रकाशन आणि वेबसाइटचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. तसेच, महापालिकेने पुणे दर्शनसाठी घेतलेल्या वातानुकूलित बसचे हस्तांतर पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागूल, खासदार वंदना चव्हाण, आमदार शरद रणपिसे, अनिल भोसले, जयदेव गायकवाड, पालिका आयुक्त कुणाल कुमार, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यावेळी उपस्थित होते.

महापालिकेचे बजेट साडेचार हजार कोटी रुपयांचे आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून काही प्रकल्पांसाठी पालिकेला निधी प्राप्त होतो; पण जागतिक शहराकडे वाटचाल करणाऱ्या पुण्याच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी आणि उद्योजकांनीही हातभार लागणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने, पालिकेने एखादा प्रकल्प सुचवावा, त्यासाठी खासदार निधीतून मदत देण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पवार यांनी केले. शहराच्या विकासासाठी पालिकेतील नगरसेवक एकत्र येऊन विचार का करत नाहीत, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात उपस्थित झाल्याचा उल्लेख करून पुण्याच्या विकासात अडथळा न आणता माझा हातभार कसा लागेल, असा विचार सर्वांनी करणे आवश्यक असल्याचे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. भाजप-सेनेचे पालिकेतील पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित नसल्याबद्दल आणि काँग्रेसचे विरोधी पक्षनेते सभागृहात असूनही व्यासपीठावर उपस्थित नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.

सत्ताधारी काँग्रेसमधील दुफळी उघड

पुणे ब्रँडिंगच्या कार्यक्रमात सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील दुफळी पुन्हा समोर आली. काँग्रेसचे उपमहापौर आणि आमदार व्यासपीठावर उपस्थित होते. पण पालिकेतील गटनेते आणि विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे सभागृहात उपस्थित असूनही त्यांनी व्यासपीठावर जाण्याचे टाळले. या बाबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरच निशाणा साधला असून, पक्षनेत्यांच्या बैठकीत ठरल्यानुसार काँग्रेसच्या नेत्यांना या कार्यक्रमाला बोलावण्यात आले नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचाच निषेध म्हणून आपण व्यासपीठावर गेलो नसल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

खास कॉफीटेबल बुकची निर्मिती

देश-विदेशातून पुण्याला भेट देण्यासाठी येणारे प्रमुख पदाधिकारी, व्यक्तींना भेट देण्यासाठी पालिकेतर्फे 'पुणे - द सिटी ऑफ लाइफ' या खास पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. 'इमेज मीडिया' या संस्थेच्या नवनीत देशपांडे, मिलिंद वाडेकर आणि दीनदयाळ वैद्य यांनी निर्मिलेल्या या पुस्तकात ३३० छायाचित्रांचा समावेश आहे. 'इमेज मीडिया'च्या वाडेकर यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच, पुण्यासाठी विशेष बोधचिन्ह तयार करणाऱ्या फाल्गुनी गोखले यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अडवणूक करणाऱ्या शाळांवर कारवाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हायकोर्टाच्या आदेशानंतरही आरटीईअंतर्गत राखीव जागांवर प्रवेश न देणाऱ्या शाळांवर सोमवारपासून कारवाई करण्यात येणार आहे. शाळांना या प्रवेशासाठी २७ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अशा सूचना शनिवारी शिक्षण विभागातर्फे मुख्याध्यापकांना देण्यात आल्या.

हायकोर्टाच्या आदेशानंतरही शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीच्या राखीव जागांवरील प्रवेशप्रक्रिया थंडच आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शनिवारी मुख्याध्यापकांची बैठक घेतली. विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, सहाय्यक उपसंचालक मीनाक्षी राऊत, शिक्षण मंडळाचे प्रमुख बी. के. दहिफळे उपस्थित होते. दरम्यान, राखीव जागांसाठी पात्र शाळांपैकी निम्म्याच शाळांचे प्रतिनिधी या बैठकीला हजर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीकपातीचा निर्णय लांबणीवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाची आगामी पंधरा दिवसांतील परिस्थिती पाहून पुणे शहरात पाणीकपात करण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला. धरणांतील अपुरा पाणीसाठा आणि पुढील काळात पुरेशा पावसाची शाश्वती नसल्याने शहर व ग्रामीण भागात काटकसरीने पाणीवापर करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. खरीपाचे सध्याचे आवर्तन संपल्यानंतर शेतीसाठी थेंबभरही पाणी सोडणे शक्य नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे.

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली खडकवासला कालवा सल्लागार समितीची बैठक विधानभवनात झाली. या बैठकीच्या सुरुवातीला जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील पाणीसाठ्याची माहिती दिली; तसेच नियोजन पातळीवर काय करावे लागेल याची वस्तुस्थिती मांडली.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये निम्माच पाणीसाठा असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भाग असा भेदभाव न करता पाण्याची काटकसर करण्याचे धोरण अवलंबण्यावर बैठकीत एकमत झाले. त्यासाठी शहरातील उद्याने, वॉशिंग सेंटर तसेच जलतरण तलावांच्या पाणीवापरावर बंधने घालण्यात येणार आहेत.

-ठळक निर्णय

शहरात पाणीकपातीचा निर्णय पंधरा दिवसांनंतर

बेकायदा नळ कनेक्शनवर १ सप्टेंबरपासून कारवाई

पेठांमधील विहिरींचे पुनरूज्ज्वीवन

सध्याचे खरीप आवर्तन संपल्यावर शेतीचे पाणी बंद

दौंड व इंदापूर नगरपालिकेचेही पाणी बंद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलक विद्यार्थ्यांना शिंदे यांचा पाठिंबा

0
0

पुणे : 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'च्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी पाठिंबा दिली. 'ही संस्था विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यामुळे ती विद्यार्थ्यांच्या भूमिकेप्रमाणे चालवली गेली पाहिजे. तेथील नेमणुकाही लोकशाही पद्धतीने झाल्या पाहिजेत,' असे शिंदे म्हणाले.

'एफटीआयआय'चे माजी विद्यार्थी आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक जानू बरुआ यांनीही आंदोलक विद्यार्थ्यांचे समर्थन केले. 'एफटीआयआयमध्ये होणाऱ्या आंदोलनांबाबत कामयच विद्यार्थ्यांना दोषी धरले जाते, याचे मला खूप दुःख आहे. हे विद्यार्थी काही आंदोलन करण्याचा हेतूने संस्थेत येत नाहीत. काही चुकीचे घडत असल्यास त्या विरोधात बोलण्याचा किंवा प्रश्न विचारण्याचा त्यांना अधिकार आहे,' असे त्यांनी सांगितले. बरुआ म्हणाले, 'एफटीआयआयमधील प्रश्न संचालक आणि प्रशासनानेच सोडवायला हवे होते. एफटीआयआयच्या समित्यांवर तज्ज्ञ आणि त्या क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केलेल्या नामवंतांचीच नेमणूक व्हायला हवी. ही निवडपद्धती पारदर्शी आणि योग्य नसल्यानेच मी नियामक मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या आंदोलनामुळे संस्थेचे मोठे नुकसान झाले आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरंदरेच्या भेटीला राज ठाकरे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन अभिनंदन केले. पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर उठलेल्या वादंगावेळी राज ठाकरे यांनी कणखर भूमिका घेत पुरंदरे यांचे समर्थन केले होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी शनिवारी पुरंदरे यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले.

शनिवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास राज ठाकरे अभिनेता पुष्कर श्रोत्री आणि विनय येडेकर यांच्यासह पर्वतीजवळील पुरंदरे वाड्यात पोहोचले. मनसेचे शहर पदाधिकारी आणि कार्यकर्तेही या वेळी मोठ्या संख्येने पुरंदरे वाड्याबाहेर जमले होते. बाबासाहेबांची भेट घेतल्यानंतर ठाकरे यांनी खास सोनचाफ्याच्या फुलांचा हार घालून त्यांचा सत्कार केला. त्यानंतर बराच वेळ त्यांच्यामध्ये चर्चा रंगली होती. काही वेळाने तेथून बाहेर पडलेल्या राज यांनी माध्यमांना ही भेट कौटुंब‌िक स्वरूपाची असल्याचे सांगत त्या विषयी बोलण्यास नकार दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नकाशाद्वारे उलगडणार गडांची रचना

0
0

गड-कोटांच्या संवर्धनासाठी त्यांचे जिओग्राफीक इन्फर्मेशन सिस्टिमद्वारे (जीआयएस) मॅपिंग करण्यात येणार आहे.

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार असलेल्या अन् छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या गड-कोटांच्या संवर्धनासाठी त्यांचे जिओग्राफीक इन्फर्मेशन सिस्टिमद्वारे (जीआयएस) मॅपिंग करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राज्याच्या दुर्ग संवर्धन समितीने हाती घेतला आहे. इतिहासातील कथानकांद्वारे उलगडलेल्या शिवचरित्रातील किल्ल्यांचा पहिल्यांदाच तांत्रिकदृष्टिकोनातून अभ्यास होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीत किल्ल्यांचा झालेला वापर, तेथील घटनाक्रम, ऐतिहासिक वास्तू, किल्ल्यांचे वास्तूशास्त्र, इंजिनीअरिंग याबद्दल आतापर्यंत विपुल लेखन आणि संशोधन झाले आहे. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने त्यांचे अचूक नकाशे अद्याप तयार झाले नव्हते. याची दखल घेऊन किल्ल्यांचे अभ्यासक सचिन जोशी यांनी पीएचडीच्या संशोधनादरम्यान राज्यातील ११८ किल्ल्यांचे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस) आणि गुगल मॅपद्वारे नकाशे तयार केले आहेत. किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ, समुद्रसपाटीपासून उंची, दिशातंत्र, अक्षांश आणि रेखांश अशी सविस्तर माहिती यामुळे उपलब्ध झाली आहे. किल्ल्यांच्या डॉक्युमेंटेशनचे पुढचे पाऊल म्हणून आता राज्यातील पंचवीस किल्ल्यांचे जीआयएस मॅपिंग सुरू होणार आहे.

प्रत्येक किल्ल्याची भौगोलिक रचना उलगडणारा सविस्तर नकाशा तयार केल्यास पुढच्या पिढीला किल्ले शास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेणे सोपे होणार आहे. एवढेच नव्हे तर किल्ल्यांच्या संवर्धनाच्या कामातही या डॉक्युमेंटेशनचा खूप उपयोग होईल, या उद्देशाने आम्ही जीआयएस मॅपिंग करणार आहोत, अशी माहिती राज्याच्या दुर्गसंवर्धन समितीचे सदस्य सचिन जोशी यांनी दिली.

डॉक्युमेंटेशनमध्ये आपण मागे

ब्रिटिशांनी १९२५ मध्ये संपूर्ण भारताचे भूभागांचे मॅपिंग केले होते. यामध्ये उंचसखल प्रदेश, नद्या, डोंगर-दऱ्या या सगळ्याचा सविस्तर अभ्यास केला होता. आज नव्वद वर्षांनंतरही आपण कोणतेही नवीन रस्ते, बोगदे बनवताना याच नकाशांचा आधार घेत आहोत. त्या वेळी कारण माहिती नाही; पण ब्रिटिशांनी किल्ल्यांचे नकाशे बनवले नाहीत. आपणही इतकी वर्षे किल्ल्यांच्या भूभागांचे सविस्तर डॉक्युमेंटेशन केलेले नाही.

अलीकडील काही वर्षांत काही किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम सुरू झाले आहे, मात्र ते नकाशाच्या आधाराशिवाय सुरू आहे. प्रत्यक्षात कोणत्याही किल्ल्याच्या संवर्धनापूर्वी त्याचे ड्रॉइंग करणे आवश्यक असते आणि त्यासाठी नकाशे आवश्यक असतात. भविष्यात किल्ल्यांच्या नकाशांची गरज भासणार असल्याने आम्ही आताच हा उपक्रम हाती घेतला आहे. सरकारनेही यास मान्यता दिली असून सध्या टेंडर प्रक्रिया सुरू आहे. यासाठी सुरुवातीला प्रत्येक जिल्ह्यातील निवडक दोन अशा पंचवीस किल्ल्यांची निवड केली आहे, असे जोशी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साळिंदर पाळणारा अटकेत

0
0

साळिंदर पाळल्याप्रकरणी चाकणमधील शेतकऱ्याला ताब्यात घेतले.

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वन्यजीव संवर्धन कायद्याअंतर्गत वन्यप्राणी पाळण्यास बंदी असतानाही साळिंदर पाळल्याप्रकरणी चाकणमधील रोहकल गावातील शेतकऱ्याला वन विभागाने ताब्यात घेतले आहे. त्याच्या घरातून साळिंदर जप्त करण्यात आले आहे. वसुंधरा बहुउद्देशीय संस्था, वाइल्ड लाइफ वेलफेअर असोसिएशन आणि वन विभागाने ही कारवाई केली.

विलास बाबुराव शिंदे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. 'साळिंदर हा वन्यप्राणी असून, तो पाळीव नाही, हेच मला माहिती नव्हते. चुकीमुळे मी त्याला घरात ठेवले,' अशी कबुली शिंदे यांनी दिली.

'रोहकल गावातील ठाकूर वस्तीत एका शेतकऱ्याने घरात प्राणी पाळल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. वनाधिकारी एस. के. साळवे यांना हा प्रकार सांगितल्यावर त्यांनी दोन वन कर्मचाऱ्यांना आमच्या बरोबर धडक मोहिमेसाठी जाण्याच्या सूचना दिल्या. शिंदे यांनी घरात साळिंदराला ठेवले होते. ताब्यात घेतलेले साळिंदर अंदाजे सहा महिन्यांचे असून, वैद्यकीय तपासात ते सुदृढ असल्याचे लक्षात आले आहे. वन विभागाच्या परवानगीने त्याला पुन्हा निसर्गात सोडण्यात येणार आहे,' अशी माहिती वाइल्ड लाइफ वेल्फेअऱ असोसिएशऩचे पुण्याचे प्रतिनिधी यांनी दिली. या कारवाईत रवी लोहिरे, मनोहर शेवकरी, स्वप्नील घाघ, दीपक चौधरी, सुरेश लोहिरे सहभागी झाले होते. दरम्यान, वाइल्ड लाइफ वेल्फेअऱ असोसिएशऩने वनाधिकाऱ्यांच्या मदतीने नागपंचमीच्या दिवशी कर्वे नगरमध्ये शोभा शंकर माने यांच्याकडून माकड आणि पोपट जप्त केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कृत्रिम पाऊस पाडणार’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील अपुरा पाणीसाठा, पर्यायाने करावी लागणारी काटकसर, शेतीच्या पाण्यावर आलेली गदा आणि यापुढे पावसाची शाश्वती नसल्याने पुण्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी सांगितले.

धरणांतील पाण्याचे नियोजन करण्यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक विधान भवनात झाली. त्यावेळी पालकमंत्री बापट यांनी धरणांतील पाणीसाठ्याबाबत चिंता व्यक्त करताना शहर व ग्रामीण भागात पाण्याची काटकसर करण्याचे आवाहन केले. या बैठकीला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे, महापौर दत्ता धनकवडे तसेच शहर व जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते.

खडकवासला प्रकल्पातील धरणांत फक्त १५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आगामी काही दिवसांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे पुण्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही बापट यांनी सांगितले. बैठकीच्या सुयुवातीला महापौरांनी पुणे शहराला पिण्याचे पाणी कमी पडू नये असे नियोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. शहरात पाण्याची काटकसर करण्याची उपाययोजना करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी, पाण्याची गळती रोखण्याबरोबरच अवैध पाणीवापरावर कारवाई करणार असल्याचे सांगितले. तसेच, शहराचे पाण्याचे ऑडिट करण्यात येत असून, तीन महिन्यांमध्ये त्याविषयी शिफारशी आल्यावर धोरण राबविण्यात येईल असे स्पष्ट केले. खडकवासला ते पर्वती या जलवाहिनीचे काम लवकर करण्याची मागणी आमदार माधुरी मिसाळ यांनी केली. पर्वती जलकेंद्रातून पाण्याची मोठी गळती होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

शिवतारे-रणपिसे यांच्यात जुंपली

पुण्यात दररोज माणशी ३८० लिटर पाणी वापरले जाते. हा वापर कमी करण्याबाबत वारंवार सांगण्यात आले आहे. तुम्ही संवेदनशीलपणे काम करा, तुम्ही जबाबदारीने वागणार नसाल, तर निर्बंध आणावे लागतील, असा दमही जलसंपदा राज्यमंत्र्यांनी भरला. त्यावर काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांनी येथे कोणी शहरी, ग्रामीण असा वाद करू नये. पालिकेचे मंजूर पाणी आणि लोकसंख्या यात तफावत असल्याचे प्रत्युत्तर त्यांनी दिले.

टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना

पावसाळ्याचे दोन महिने कोरडे गेल्याने ग्रामीण भागात ४० टँकर सुरू करावे लागले आहेत. टँकर मंजुरीच्या प्रक्रियेत वेळ जाऊ नये यासाठी ते मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना देणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरव राव यांनी बैठकीत सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिवसाआड पाणी?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत झालेल्या अपुऱ्या पावसामुळे पुणेकरांना यंदा केवळ ११.३७ अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्यातच आपली गरज भागवावी लागणार आहे. पाण्याच्या या अपुऱ्या साठ्यामुळे शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्याची वेळ आता महापालिकेवर येणार आहे.

कालवा समितीच्या बैठकीत जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांनी शनिवारी धरणसाठ्यांची वस्तुस्थिती सादर केली. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या धरणांत सध्या १५.०१ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. हा साठा अपेक्षापेक्षा दहा टीएमसीने कमी आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील काळात फारसा पाऊस पडणार नाही. त्यामुळे धरणांचे साठे फारसे वाढतील अशी आशा वाटत नाही. त्यामुळे या साठ्यावरच आता पाणी नियोजन करावे लागणार असल्याचे कपोले यांनी स्पष्ट केले.

पुणे शहराची पाण्याची वर्षिक गरज साधारणतः १५.५० टीएमसी इतकी आहे. परंतु, धरणात सद्यस्थितीत फक्त १५.०१ टीएमसी पाणीसाठा आहे. यामधील २.६४ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन, तर एक टीएमसी पाणी खरिपातील पिके जगविण्यासाठी जाणार आहे. त्यामुळे फक्त ११.३७ टीएमसी पाणी शहरासाठी उपलब्ध होऊ शकेल. शहरासाठी खडकवासल्यातून दररोज १२५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी घेण्यात येते. याच पद्धतीने महापालिकेने वर्षभर पाणी घेतल्यास १४.५६ टीएमसी पाणी लागेल. मात्र, तेवढे पाणी धरणांत उपलब्ध नाही.

महापालिकेने ११२५ एमएलडी पाणी दररोज घेतल्यास वर्षभरासाठी १३.११ टीएमसी पाण्याची गरज भासेल. मात्र, सद्यस्थितीला धरणांत त्याहीपेक्षा कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे महापालिकेने ८५० एमएलडी पाणी धरणांतून उचलून ते शहराला दिवसाआड दिल्यास ९.९० टीएमसी पाणी लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतिमंद मुलींसाठी विशेष योजना

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे विभागातील मतिमंद मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स देण्याची योजना विभागीय प्रशासनातर्फे राबविण्यात येणार आहे. महसूल प्रशासन, जिल्हा परिषदा, अंगणवाड्या आणि स्वयंसेवी संस्था-संघटनांच्या सहकार्यातून ही रोजना राबविण्यात येणार आहे. पुणे विभागाचे अतिरिक्त आयुक्त शाम देशपांडे यांनी गुरुवारी ही माहिती दिली.

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. लोकसहभागातून निधी उभारून ही योजना राबविण्यात येणार आहे. यापूर्वी देशपांडे यांच्या पुढाकाराने सातारा आणि जालना जिल्ह्यात ही योजना सुरू करण्यात आली. त्याप्रमाणे आता पुणे विभागातील पाचही जिल्ह्यात योजना राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील मतिमंद मुलींची संख्या निश्चित करण्याच्या सूचना जिल्हा परिषदांच्या समाजकल्याण विभागास देण्यात आल्या आहेत. उर्वरित मुलींची माहिती गोळा करण्याचे काम अंगणवाडी सेविकांमार्फत करण्यात येणार आहे. ही संख्या निश्चित करून स्वयंसेवी संस्था आणि मेडिकल स्टोअर्स यांच्यामार्फत निधी उभारण्यात येईल.

वेबसाइटवर फोटो द्या

दरमहा दहा तारखेला हे सॅनिटरी नॅपकिन्स मुलींना घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात यावी आणि त्यांचे वितरण झाल्यानंतर मोबाइलवर फोटो काढून वेबसाइटवर उपलब्ध करावा, अशाही सूचना देशपांडे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी सौरव राव आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतीलाल उमाप यांना देशपांडे यांनी पत्र पाठविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमुक्तीची संधी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भूविकास बँकेकडून कर्ज घेतलेल्या थकबाकीदारांना आता कर्जमुक्तीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या थकबाकीदारांसाठी एकरकमी कर्जफेड योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये २३३ कोटी रुपयांची रक्कम भरल्यास तब्बल ७१३ कोटी रुपयांच्या व्याजातूनही माफी देण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ घेऊन राज्यभरातील शेतकऱ्यांनी कर्जाची फेड करावी, असे आवाहन सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी सोमवारी केले आहे. राज्यातील भूविकास बँका अवसायनात (लिक्विडेशन) काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, त्याद्वारे शिखर बँक आणि २७ जिल्हा बँका बंद करण्यात आल्या आहेत. गेल्या १९ वर्षांपूर्वी भूविकास बँकांमधून कर्जवितरण बंद करण्यात आले होते. त्यानंतर कर्जांची वसुलीही रखडली आहे. नुकतीच राज्य सरकारने या कर्जांसाठी एकरकमी फेड योजना (ओटीएस) जाहीर केली आहे. राज्यातील ३५ हजार शेतकऱ्यांकडे या बँकांची एकूण ९४६ कोटी रुपयांची येणे बाकी आहे. त्यापैकी २३३ कोटी रुपयांच्या रकमा भरल्या, तर उर्वरीत ७१३ कोटी रुपयांचे व्याजही या योजनेत माफ होणार आहे. पुढील ३१ मार्चपर्यंत या योजनेची मुदत असून, तोपर्यंत या योजनेचा लाभ घेण्याची संधी आहे, अन्यथा त्यानंतर सक्तीने वसूली करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या योजनेनुसार २००४ नंतर सहा टक्के दराने सरळव्याज भरणे अपेक्षित आहे. गेली अनेक वर्षे या सर्व कर्जदार शेतकऱ्यांच्या जमिनींवर भूविकास बँकेच्या कर्जाचा शिक्का मारण्यात आल्याने त्यांना जमिनी विकणेही शक्य नाही. गेल्या काही वर्षांत जमिनींचे दर वाढल्यामुळे या कर्जातून सुटका करून घेतल्यास जमिनी विकणेही सुलभ होणार आहे. या योजनेसंदर्भात सर्व बँकांचे अधिकारी आणि जिल्हा उपनिबंधकांची बैठक घेण्यात आली. येत्या काही काळात या सर्व शेतकऱ्यांना वैयक्तिक, तसेच संबंधित गावांमध्येही कर्जफेड योजनेचे लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

शहरनिहाय थकबाकी

शहर थकबाकी (कोटी)

सांगली ३५

नांदेड ३४

नाशिक १०

कोल्हापूर ५

सातारा १४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फोटोथेरपी’चे शुल्क रद्द

0
0

सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलमधील निओनेटल इन्टेन्सिव्ह केअर युनिट (एनआयसीयू) या नवजात अर्भकांच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार करण्यात येणाऱ्या बालकांच्या मातांची आता हॉस्पिटलमध्ये मोफत राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच रेडियंट वॉर्मर आणि फोटोथेरपीसाठी आकारण्यात येणारे शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

'एनआयसीयू'मध्ये नवजात अर्भकावर उपचार सुरू असताना मातांनादेखील हॉस्पिटलमध्ये रहावे लागते. त्यांची व्यवस्था हॉस्पिटलमधील लेबर वॉर्डमध्ये करण्यात येते. हॉस्पिटलकडून त्याचे शुल्क आकारले जाते. ते शुल्क न आकारता त्यांची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्याचा निर्णय बोर्डाच्या आरोग्य समितीने घेतला आहे.

'एनआयसीयू' विभागात रेडियंट वॉर्मर आणि फोटोथेरपीसाठी शुल्क आकारण्यात येते. बोर्डातील रहिवासी असलेल्या कुटुंबातील बालकांसाठी प्रत्येक दिवसाला १८० रुपये, तर हद्दीबाहेरील बालकांसाठी २३५ रुपये आकारण्यात येतात. मात्र, हे शुल्क रद्द करण्यात आले आहे.

बोर्डाच्या हद्दीतील बालकांसाठी दिवसाला ४१० रुपये आणि हद्दीबाहेरील बालकांवर उपचार करण्यासाठी दररोज ५३५ रुपये आकारण्यात येतात. त्यामध्ये रेडियंट वॉर्मर आणि फोटोथेरपीसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काचा समावेश करण्यात आला असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या हॉस्पिटलमध्ये एनआयसीयू विभाग सुरू झाल्यामुळे या परिसरातील बालकांवर वेळीच उपचार होऊ लागले आहेत. या हॉस्पिटलमध्ये वेळेवर आरोग्यसेवा मिळण्यासाठी कँटोन्मेंट बोर्ड आणि आर्म फोर्स मेडिकल कॉलेज (एएफएमसी) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. त्यामुळे 'एएफएमसी'मधील डॉक्टर आणि अन्य सुविधा बोर्डाच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होऊ लागल्या आहेत. 'एएफएमसी'च्या सहकार्याने नर्सेसना प्रशिक्षणही देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कत्तलखाना होणार दहा वाजताच बंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे कँटोन्मेंट बोर्डातील कत्तलखाना खुला ठेवण्यासाठी बोर्डाने निर्बंध घातले आहेत. त्यानुसार पहाटे पाचपासून उघडण्यात येणारा कत्तलखाना रात्री दहानंतर सक्तीने बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. कत्तलखाना पहाटे सुरू झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत खुला ठेवण्यात येत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे कत्तलखाना बंद करण्यासाठी रात्री दहाची वेळ ठरविण्यात आली आहे. या वेळेनंतर कत्तलखाना सुरू ठेवल्यास कारवाई होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. बोर्डाने गेल्या आठवड्यात मार्केटच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मार्केट कमिटीची बैठक घेतली होती. मार्केटमधील चिकनचा कत्तलखाना ताब्यात घेऊन त्याचे नूतनीकरण करण्याचे ठरविण्यात आले. मार्केटबाहेर चिकन, मटणाच्या फक्त तीन चाकी वाहनांना उभे राहण्यास परवानगी देऊन मोठ्या वाहनांसाठी धोबीघाट येथे पर्यायी जागा देण्याचाही निर्णय बैठकीत झाला.

निर्णय का?

सध्या कत्तलखाना उघडल्यानंतर रात्री केव्हाही बंद केला जातो. त्यामुळे वेळेचे निर्बंध घालण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. चिकनच्या व्यापाऱ्यांना कोंबड्यांसाठी पिंजरे तयार करून घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images