Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

फुले मंडईला रंगरूपी झळाळी

$
0
0

सव्वाशे वर्षात प्रथमच संपूर्ण कायापालट

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तब्बल सव्वाशे वर्षे जुन्या महात्मा फुले मंडईचा प्रथमच संपूर्ण कायापालट करण्यात आला असून, रंगीबेरंगी दिव्यांच्या झगमगाटाने मंडईची वास्तू उजळून निघणार आहे. सायंकाळच्या वेळेत एखाद्या वास्तूचे सौंदर्य खुलविण्यासाठी बहुरंगी विद्युतदिव्यांचा प्रयोग मंडईच्या वैशिष्ट्यपूर्ण इमारतीवर महापालिकेतर्फे करण्यात आला आहे. येत्या रविवारपासून पुणेकरांना मंडईची झळाळी नव्याने अनुभवता येणार आहे.

पालिकेच्या हेरिटेज सेल विभागातर्फे मंडईच्या नूतनीकरणाचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरू होते. नुकतेच हे काम पूर्ण झाले असून, मंडईच्या इमारतीत नव्याने बसविण्यात आलेल्या प्रकाशयोजनेचे उद्घाटन येत्या रविवारी (२३ ऑगस्ट) सायंकाळी सात वाजता होणार आहे, अशी माहिती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिली.

मंडईच्या इमारतीची किरकोळ डागडुजी आणि दुरुस्ती आत्तापर्यंत केली गेली होती; पण सव्वाशे वर्ष जुन्या इमारतीतील सर्व व्यवस्थेची तपासणी आणि त्याचे नूतनीकरण पहिल्यांदाच करण्यात आले आहे. या सर्व प्रक्रियेत सर्वप्रथम इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. कालानुरूप इमारतीचे बांधकाम, लाकडी काम यांची झिज भरून काढणे आवश्यक होते. काही ठिकाणी गळतीमुळे खराब झालेल्या भागाची दुरुस्ती करावी लागणार होती. तसेच, सव्वाशे वर्षांत एकदाही अष्टकोनाकृती इमारतीवरील कौले बदलण्यात आली नसल्याने हे कामही केले गेले.

इमारतीची दुरुस्ती करताना पुन्हा पावसा-पाण्यामुळे आतमधील बांधकामाला इजा होऊ नये, यासाठी जीआयएस शीटचा वापर करण्यात आला आहे. तसेच, इमारतीसाठी वापरण्यात आलेला दगड कालौघात काळा पडला होता. त्यालाही यानिमित्त ऊर्जितावस्था देण्यात आली, अशी माहिती हेरिटेज सेलचे प्रमुख शाम ढवळे यांनी दिली.
मंडईच्या इमारतीचे जतन, संवर्धनाचे सर्व काम पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण इमारतीवर मल्टिकलर लायटिंग करण्यात आले आहे. त्याला विविध इफेक्ट देण्यात आले असून, सायंकाळच्या वेळी मंडईची इमारत आणखी उठावदार दिसणार आहे.

मंडईची कौले स्पेनधून

मंडईच्या १२० फूट उंच अष्टकोनाकृती शिखरावर आणि त्याला जोडून असलेल्या इमारतींवरील कौले फ्रान्समधील मार्सिली शहरातील एका कंपनीची असल्याचा शिक्का त्यावर होता. इमारतीवरील सुमारे २० टक्के म्हणजेच साडेचार हजार कौले बदलणे गरजेचे होते. त्याच जाडीची कौले भारतात मिळत नसल्याने महापालिकेने तशाच स्वरूपाची कौले मागविण्याचा निर्णय घेतला. फ्रान्सचे शेजारी राष्ट्र असलेल्या स्पेनमधील हर्मनोस डियाज रेडोन्डो ग्रुप या कंपनीतून मूळ दर्जाशी साधर्म्य साधणारी कौले मिळाल्याने मंडईच्या इमारतीची शोभा आणखी वाढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिलेचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द

$
0
0

दोन जागांवर निवडून येणे पडले महागात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'देव देते आणि कर्म नेते' या म्हणीचा अनुभव जुन्नर तालुक्यातील कुसूर गावच्या एका महिलेला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आला आहे. ग्रामपंचायतीच्या दोन प्रभागांमध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या या महिलेला आपले सदस्यत्व किरकोळ चुकीमुळे गमवावे लागले आहे.

नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या कल्पना विनोद मोदे यांना हा अनुभव आला आहे. कुसूर गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कल्पना मोदे यांनी दोन प्रभागांमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत मोदे यांचा दोन्ही प्रभागांमधून विजय झाला. मात्र, विजयाचा जल्लोष फक्त काही दिवस टिकला. कायद्यातील एका तरतुदीमुळे मोदे यांना आपले पद गमवावे लागले आहे.

ग्रामपंचायतीच्या दोन प्रभागांमधून निवडून आल्यानंतर त्यातील एका ठिकाणचा राजीनामा संबंधितांनी देणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीवर निवड होऊन त्याची नोटीस डकवली गेल्यानंतर सात दिवसांत हा राजीनामा दिल्याचे पत्र संबंधित नवनिर्वाचित उमेदवाराने निवडणूक आयोग वा प्राधिकृत निवडणूक अधिकाऱ्यांकडे देणे आवश्यक आहे. अन्यथा त्या उमेदवाराचे दोन्ही जागांवरील सदस्यत्व रद्द होते. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १३ (अ) मध्ये तशी तरतूद आहे.

कुसूरमधील दोन जागांवर निवडून आलेल्या मोदे यांनी निवडीची नोटीस ग्रामपंचायतीत चिकटविल्यानंतर सात दिवसांच्या आता राजीनामा दिला नाही. त्यासंबंधी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली. या तक्रारीवर झालेल्या सुनावणीत ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १३ (अ) अन्वये मोदे यांची दोन्ही जागांवरील निवड रद्द ठरविण्याचा निकाल पाटील यांनी दिला आहे. कायद्याबद्दल अनभिज्ञ असल्याचा मोठा फटका मोदे यांना बसला असून कुसूरमधील ही केस वेगळी ठरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुभवा दुर्बिणींचे अंतरंग...

$
0
0

'ज्योतिर्विद्या परिसंस्थे'तर्फे अनोखे प्रदर्शन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आकाश जितके रम्य भासते, तितकेच ते गूढतेने व्यापलेले असते. असे हे गूढ आकाशदर्शन दुर्बिणीच्या मदतीने आणखी रंजक होण्यास मदत होते. दुर्बिणीच्या मदतीने आपण आकाशाचे निरीक्षण तर करतोच, पण अंतराळ दुर्बिणींमुळे अथांग विश्वाच्या पसाऱ्यातील विस्मयकारी दृश्ये आपल्याला टिपता येतात. विज्ञानाच्या प्रगतीमध्ये मोलाचा हातभार लावणाऱ्या या दुर्बिणी असतात तरी कशा, त्यांची रचना आदी अनुभवण्याची संधी खगोलप्रेमींना चालून आली आहे. निमित्त आहे आंतरराष्ट्रीय प्रकाश वर्षाचे!

ज्योतिर्विद्या परिसंस्थेने 'हबल आणि पुढे' ही संकल्पना घेऊन अंतराळ दुर्बिणींचे प्रदर्शन घोले रस्त्यावरील पं.नेहरू सांस्कृतिक भवनाच्या कला दालनात भरवले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून दुर्बिणींचा खजिना उलगडण्यात आला आहे. या प्रदर्शनात हबल, जेम्स वेब, अॅस्ट्रोसॅट, थर्टी मीटर टेलिस्कोप आणि न्यू होरायझन्स या दुर्बिणींचा इतिहास, प्रवास आणि माहिती जाणून घेता येणार आहे. 'हबल' या अंतराळ दुर्बिणीने नुकताच रौप्यमहोत्सव पूर्ण केला. मात्र, या दुर्बिणीचे आयुष्य आता संपणार असून या दुर्बिणीची जागा 'जेम्स वेब' ही दुर्बीण घेणार आहे. नेमका हाच धागा पकडून 'ज्योतिर्विद्या'ने खगोलप्रेमींसाठी कुतुहलाचे अवकाश खुले केले आहे.

या प्रदर्शनाविषयी संस्थेचे उपाध्यक्ष दीपक जोशी यांनी 'मटा'ला माहिती दिली. ' या प्रदर्शनात विविध दुर्बिणी खगोलप्रेमींना पाहता येतील. चांद्रयान १ आणि मंगळयान या यशस्वी मोहिमांनंतर भारत आणखी एक विक्रम करणार आहे. विविध तरंगलांबीमध्ये निरीक्षणे घेऊ शकणारा ‍भारताचा खास खगोल शास्त्रीय उपग्रह अॅस्ट्रोसॅट चालू वर्षाच्या अखेरीस प्रक्षेपित होणार आहे. ताऱ्यांचे महास्फोट, दीर्घिकांची केंद्रके आदी रहस्ये अधिक तपशीलावार कळण्यास मदत होणार आहे. या प्रदर्शनात अॅस्ट्रोसॅटची प्रतिकृती पाहण्यास उपलब्ध आहे. तसेच, दुर्बिणींचा इतिहास आणि प्रवासाविषयी भित्तीपत्रकांतून माहिती जाणून घेता येईल. हे प्रदर्शन रविवारी ९ ते ८ या वेळेत अनुभवता येईल,' असे जोशी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस वकिलांना चाप

$
0
0

वकिलांच्या पडताळणीचा 'बार कौन्सिल ऑफ इंडिया'चा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बोगस वकिलांना चाप बसविण्यासाठी वकिलांची पडताळणी करण्याचा निर्णय 'बार कौन्सिल ऑफ इंडिया'ने घेतला आहे. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा बार असोसिएशनच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या पडताळणीनंतर तयार होणारी वकिलांची अंतिम यादी राज्यातील सर्व न्यायाधीशांना पाठवली जाणार आहे.

'सुप्रीम कोर्टामध्ये बोगस वकील प्रॅक्टिस करत असल्यासे समोर आले होते. त्यानंतर कोर्टाने ही बाब बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या निदर्शनास आणून दिली. या पार्श्वभूमीवर बार कौन्सिलने वकिलांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. मार्च २०१५ मध्येच ही पडताळणीची प्रक्रिया करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. मात्र, त्याविरोधात केरळ आणि कर्नाटक हायकोर्टात याचिका दाखल झाल्याने या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. आता बार कौन्सिल ऑफ इंडियाने देशातील सर्व बार कौन्सिलना ही प्रक्रिया राबविण्यास सांगितली आहे,' अशी माहिती महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड. हर्षद निंबाळकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

'बार कौन्सिल ऑफ इंडिया'ने निश्चित केलेला पडताळणीचा फॉर्म आणि नियमावली राज्यातील सर्व जिल्हा बार असोसिएशनकडे पाठविण्यात आली आहे. सर्व वकिलांनी ते अर्ज भरून असोसिएशनकडे द्यायचे आहेत. त्यासोबत वकिलीच्या सनदीची प्रतही सादर करायची आहे. असोसिएशनचे अध्यक्ष वकिलांच्या अर्जांची पडताळणी करून ते अर्ज कौन्सिलकडे पाठवतील. कौन्सिलकडूनही पुन्हा एकदा त्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतरच संबंधित वकिलांची कौन्सिलच्या रोलमध्ये नोंद केली जाणार आहे, असेही अॅड. निंबाळकर म्हणाले.

अर्जासोबत शंभर रुपये शुल्क

वकिलांना अर्जासोबत 'बार कौन्सिल ऑफ इंडिया'च्या नावे १०० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट काढावा लागणार आहे. या शंभर रुपयातील ५० रुपये बार कौन्सिल ऑफ महाराष्ट आणि गोवा यांना दिले जाणार आहेत. तर, ३० रुपये 'बार कौन्सिल ऑफ इंडिया' आणि २० रुपये जिल्हा बार असोसिएशनला दिले जाणार आहेत, असेही अॅड. निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

आकडे बोलतात
राज्यातील एकूण वकील १, ५०, ०००
पुणे जिल्ह्यातील वकील १५, ०००
पुण्यात बोगस वकिलांची उघड झालेली प्रकरणे १७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीआरटी उद्घाटनासाठी ‘तारीख पे तारीख’ सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संगमवाडी-विश्रांतवाडी रस्त्यावरील (आळंदी रोड) जलद बस वाहतूक मार्गावरून (बीआरटी) 'ट्रायल रन'अंतर्गत १० बस सलग तीन आठवडे सातत्याने फेऱ्या मारत असल्या, तरी त्याचा लाभ प्रवाशांना करून देण्यासाठी पालिकेतर्फे 'तारीख पे तारीख'चा खेळ सुरू आहे. 'रेन्बो बीआरटी'साठी आवश्यक सर्व तयारी, चाचण्या पूर्ण होऊनही औपचारिक उद्घाटनाअभावी बस बीआरटी मार्गातून प्रवाशांविनाच धावत आहेत.

आळंदी रोडवरील बीआरटी मार्गावर एक ऑगस्टपासून 'ट्रायल रन' सुरू झाली. सुरुवातीच्या टप्प्यात १० ते १५ दिवसांसाठी 'ट्रायल रन' घेऊन त्यानंतर हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते; मात्र आता तीन आठवडे पूर्ण होऊनही आळंदी रोडवरील बीआरटी अद्याप 'ट्रायल रन'मध्येच अडकली आहे. सुरुवातीला १५ ऑगस्टच्या दरम्यान 'बीआरटी'च्या उद्घाटनाचा मुहूर्त काढण्यात आला होता. त्यानंतर, २२ ऑगस्टपर्यंत त्याचे उद्घाटन होईल, असे सांगण्यात आले. आता ही तारीखही पुढे ढकलण्यात आली असून, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात बीआरटी धावेल, असे सांगितले जात आहे.

बीआरटी मार्गावरील काही तांत्रिक बाबींची पूर्तता येत्या चार ते पाच दिवसांत पूर्ण होईल आणि ऑगस्टअखेरीस हा मार्ग प्रवाशांसाठी खुला केला जाईल, असा दावा महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी केला. या मार्गावरील पायाभूत सुविधांची सर्व कामे पूर्ण झाली असून, बसथांबे आणि बसमध्येही इंटेलिजंट ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) कार्यान्वित करण्यात आली आहे; मात्र या मार्गावरून दर तीन ते पाच मिनिटांनी बस धावण्यास सुरुवात झाली, तर काही चौकांमध्ये वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, याबाबत वाहतूक पोलिसांचे मत घेऊन सुधारणा करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरपीआय’चे पुण्यात ‌‘चिंतन’

$
0
0

भाजपकडून सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याची तक्रार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भाजपकडून सन्मानाची वागणूक देण्यात येत नसल्याने आगामी काळात कोणती भूमिका घ्यायची आणि २०१७ मध्ये होणाऱ्या राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांची तयारी करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) आठवले गटाचे पुण्यात सात सप्टेंबर रोजी चिंतन शिबिर होणार आहे. या शिबिराच्या निमित्ताने पक्षाचे राज्यस्तरीय पदाधिकारी एकत्र येणार असून, त्यामध्ये पक्षाची पुढील रणनीती ठरविण्यात येणार आहे. पुण्यात अल्पबचत भवन येथे सकाळी ११ ते दुपारी चार या कालावधीत हे चिंतन शिबिर होणार आहे. त्यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले हे पदाधिकाऱ्यांची चर्चा करून पुढील नीती ठरविणार आहेत.

'आरपीआय'ने ११ ऑगस्ट रोजी दिल्लीत तालकटोरा स्टेडियम येथे राष्ट्रीय समता संमेलन आयोजित केले होते. या संमेलनासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, त्यांनी संमेलनाकडे पाठ फिरवली. त्यामुळे 'आरपीआय'च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे; तसेच महायुतीत सहभागी होताना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. विधानसभा निवडणुकांच्यावेळी सत्तेत वाटा देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. मात्र, 'आरपीआय'ला संधी देण्यात आली नाही. त्यामुळे भाजपकडून सन्मानाची वागणूक देण्यात येत नसल्याची कार्यकर्त्यांची भावना झाली आहे. या चिंतन शिबिरामध्ये या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. चिंतन शिबिराला खासदार आठवले यांच्यासह प्रदेशाध्यक्ष भुपेश थुलकर, कोषाध्यक्ष एम. डी. शेवाळे, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्याचे सरचिटणीस राजाभाऊ सरोदे, प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ कांबळे तसेच सर्व शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

महापालिकेतील भूमिकेची चर्चा

राज्यात २०१७ मध्ये महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यामध्ये पुणे महापालिकेचा समावेश आहे. या निवडणुकांसाठी कोणती भूमिका घ्यायची, याबाबत शिबिरामध्ये दिशा ठरविली जाणार असल्याचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांनी सांगितले. शिबिरामध्ये खासदार आठवले हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच पक्षबांधणीसाठी आखलेल्या योजनांची माहिती देणार आहेत. हे शिबिर राज्यस्तरावरील पदाधिकाऱ्यांसाठीच असल्याचे कांबळे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय वादामुळे समित्या अधांतरी

$
0
0

सरकारला वर्षपूर्ती होऊनही ५२ समित्यांवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती नाही

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भाजप व शिवसेनेतील अंतर्गत कलह आणि महायुतीमधील घटक पक्षांची अपेक्षापूर्ती करण्यात आलेल्या अपयशामुळे पुणे जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीसह विविध ५२ समित्यांवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती होऊ शकलेली नाही. राज्यातील सत्तास्थापनेची वर्षपूर्ती जवळ आली, तरी या समित्यांवर कोणाचीही वर्णी लागली नसल्याने भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.

शिवसेनेकडून समित्यांसाठी कार्यकर्त्यांची यादी मागवण्यात आली आहे. ही यादी देण्यात शिवसेनेकडूनच दिरंगाई होत असल्याचा आरोप भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून करण्यात आला आहे; मात्र या समित्यांमध्ये सन्मानपूर्वक स्थान मिळत नसल्याने शिवसेनेने त्यात फारसा रस दाखवला नसल्याचे समजते. जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या समित्यांमध्ये अधिक जागा मिळाव्यात यासाठी शिवसेना आग्रही आहे. परंतु भाजपही त्याबाबत हटून बसल्याने या समित्यांवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती होऊ शकलेली नाही.

जिल्ह्यातील विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीवर अशासकीय सदस्य नेमले जातात. भाजप तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्षाच्या सदस्यांची नावे या समितीसाठी निश्चित झाली आहेत; पण शिवसेनेकडून नावे न आल्याने ही यादी अद्याप मंजूर झालेली नाही. या ५२ समित्यांमध्ये 'महायुती'मधील तब्बल ४४१ राजकीय कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळू शकते. या समित्यांमध्ये प्रामुख्याने पुणे जिल्हा विद्युत मंडळ समन्वय समिती, जिल्हास्तरीय रोजगार हमी योजना समिती, सार्वजनिक वितरण व्यवस्था दक्षता समिती, प्राथमिक शाळा गुणवत्तावाढ समिती, जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती, दारू-अवैध उत्पादन समन्वय समिती, जिल्हा भाववाढ नियंत्रण समिती, जिल्हा सैनिक बोर्ड, अपंग कल्याण समिती, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, असंघटित कामगार समिती, पर्यावरण समिती, जिल्हा व्यसनमुक्ती समिती, बालकामगार सल्लागार समिती, अल्पसंख्याक विकास संनियंत्रण समिती, होमगार्ड सल्लागार समिती, जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती आदींचा समावेश आहे.

नाराजी टाळण्यासाठी...

जिल्हास्तरीय अँटी रॅगिंग समिती, येरवडा मध्यवर्ती कारागृह समिती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा समिती, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील परिमंडळनिहाय समिती, अंगणवाडी सेविका निवड समिती, तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीवर अशासकीय सदस्य म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागू शकते. परंतु समित्यांच्या वाटपात होणारी पक्षांतर्गत नाराजी टाळण्यासाठी भाजप-सेनेकडून अधिक जागा पदरी पाडून घेण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांत कलह सुरू आहे. या वादामुळे कोणत्याही समित्यांवर नियुक्ती होत नसल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते नाराज आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजनिर्मिती पेचात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाने पाठ फिरवल्यामुळे राज्यातील वीजनिर्मितीवर परिणाम झाला आहे. पाणी उपलब्ध नसल्याने परळी वीजकेंद्रातील सर्व वीजनिर्मिती संच गेला महिनाभर बंद असून, त्यामुळे सुमारे सव्वाअकराशे मेगावॉट वीजनिर्मिती थंडावली आहे. दरम्यान, कोयना आणि चंद्रपूर वीजनिर्मिती केंद्रात अद्याप अडचणी आलेल्या नाहीत; मात्र येत्या काही काळात पावसाचे आगमन झाले नाही, तर वीजनिर्मितीचे आव्हान उभे ठाकणार आहे.

जूनमध्ये मान्सूनला वेळेत आणि समाधानकारक सुरुवात झाल्याने राज्यात यंदा अडचणी येणार नाहीत, अशी परिस्थिती होती. परंतु, त्यानंतर जून, जुलै आणि ऑगस्टमध्येही पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे राज्यातील धरणांमधील पाणीसाठे आटू लागले आहेत. त्यामुळे वीजनिर्मितीवरही परिणाम होत आहे. येत्या काही काळात पावसाचे आगमन झाले नाही, तर वीजनिर्मितीचा प्रश्न उभा राहण्याची भीती आहे. पर‍ळी वीजकेंद्रातून एक हजार १३० मेगावॉट इतकी वीजनिर्मिती होते. या वीजनिर्मितीच्या प्रक्रियेत दर वर्षी सुमारे ४५ दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचा वापर केला जातो; मात्र येथे पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी आणि माजलगावमध्ये पाणीसाठे नसल्यामुळे येथील वीजनिर्मिती थंडावली आहे. तसेच खडका बॅरेजमध्ये ४० दिवस पुरेल, इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे पाऊस न झाल्यास चिंतेची परिस्थिती उभी राहण्याची भीती आहे.

दरम्यान, कोयना वीजनिर्मिती केंद्रात मात्र अद्याप अडचण निर्माण झालेली नाही. कोयनेतून दर वर्षी ६७.५ टीएमसी इतके पाणी वीजनिर्मितीसाठी वापरण्याची मुभा आहे. गेल्या जूनपासून आतापर्यंत त्यापैकी फक्त १० ते ११ टीएमसी पाण्याचा वीजनिर्मितीसाठी वापर झाला आहे. तसेच पावसाळ्याचे आणखी दोन महिने शिल्लक असून त्या काळात पाऊस झाला, तर अडचणी येणार नाहीत, अशी माहिती 'महानिर्मिती'च्या वतीने देण्यात आली. चंद्रपूर येथून दोन हजार ३४० मेगावॉट इतकी वीजनिर्मती होते. येथे इरई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. तेथे काही काळापूर्वी पावसाची प्रतीक्षा होती. परंतु काही दिवसांपूर्वी विदर्भात झालेल्या पावसाने तेथील वीजनिर्मितीचा प्रश्न मिटला आहे, असे सांगण्यात आले.

...तर बिकट परिस्थिती

येत्या काही काळात पावसाचे आगमन झाले नाही आणि धरणांमधील पाणीसाठ्यांची परिस्थिती सुधारली नाही, तर बहुसंख्य धरणांमधील पाणीसाठे पिण्यासाठी राखून ठेवण्याची वेळ येऊ शकते. अशी परिस्थिती निर्माण झाली, तर वीजनिर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चार महिन्यांचं पाणी गेलं वाहून

$
0
0

जुन्या पाइपलाइनमु‍ळे दिवसाला ३० कोटी लिटर पाणी वाया

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सतत नादुरुस्त‌ होणाऱ्या पाइपलाइनमुळे होणाऱ्या पाण्याच्या गळतीमुळे दिवसाला ३०० एमएलडी (३० कोटी लिटर), तर वर्षाला तब्बल चार टीएमसी (सुमारे ११३ अब्ज लिटर) पाणी वाया जात असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिका प्रशासनाने ही गळती थांबवल्यास शहराला चार महिने अधिक पाणीपुरवठा करणे सहज शक्य होणार आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली ही गळती थांबवण्यासाठी शहरातील जुनी पाइपलाइन बदलण्याचा विचार प्रशासनाच्या वतीने केला जात असल्याचे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

शहराच्या सर्व भागांतील नागरिकांना सुरळीत आणि पुरेसा पाणीपुरवठा केला जावा, यासाठी खडकवासला धरणातून महापालिका दररोज १२०० ते १२५० एमएलडी पाणी उचलते; मात्र प्रत्यक्षात हे पाणी नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचण्यामध्ये निर्माण होत असलेल्या अडथळ्यांमुळे दररोज ३०० ते ३५० एमएलडी पाणी वाया जात असल्याचे पुढे आले आहे. महापालिकेने एका खासगी कंपनीकडून केलेल्या सर्वेक्षणात, शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करताना त्यामध्ये तब्बल ३० ते ३५ टक्के पाण्याची गळती होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेल्या बहुतांश पाइपलाइन ५० ते ६० वर्षे जुन्या असल्याने त्या सतत नादुरुस्त होतात. परिणामी मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असल्याचे समोर आले आहे. शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या सदाशिव, नारायण, शनिवार पेठांसह अनेक ठिकाणी पाण्यासाठी पाच ते सहा पाइपलाइन टाकण्यात आलेल्या आहेत. या पाइपलाइन वेगवेगळ्या प्रकारे टाकण्यात आल्याने त्यामध्ये नक्की किती आणि कुठे पाण्याची गळती आहे, याचा कोणताही अंदाज प्रशासनाला येत नाही. परिणामी मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते.

पाइपलाइन बदलणे हाच उपाय

काही ठिकाणी पाइपलाइन दुरुस्तीसाठी रस्ता खोदणे अशक्य असल्याने होणारी पाणीगळती थांबवत‌ा येत नाही. शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेली पाइपलाइन ही बिडाची असल्याने यामध्ये पाण्याची होणारी गळती सहजासहजी दिसून येत नाही. हे सर्व पाणी जमिनीमध्ये जिरत असल्याने दुरुस्त‌ी करण्यात अडचणी येतात. ही गळती थांबवण्यासाठी जुनी झालेली संपूर्ण पाइपलाइन बदलणे हा एकमेव उपाय असून, यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
............

>> एमएलडी म्हणजे मिलियन लिटर्स पर डे (दशलक्ष लिटर प्रति दिन)
>> टीएमसी म्हणजे थाउजंड मिलियन क्युबिक फीट (२८,३१,६८,४६,५९२ लिटर)
>> दररोज ३०० ते ३५० एमएलडी पाण्याची गळती
>> शहरातील पाइपलाइन ५० वर्षे जुनी
>> एकूण २६०० किलोमीटरपैकी १६०० किलोमीटर पाइपलाइन बदलण्याची गरज
>> जुन्या पाइपलाइनमधील गळती शोधण्याचे मोठे आव्हान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरगुती गॅसधारकांचे रॉकेलवाटप बंद होणार

$
0
0

हायकोर्टाच्या आदेशानंतर राज्य सरकारचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

घरगुती गॅसधारकांना प्रतिवर्षी बारा सिलिंडर सवलतीच्या दराने दिले जात असल्याने त्यांना रेशनकार्डवर मिळणारे रॉकेल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील रॉकेलचे असमान परिमाण रद्द करून दोन्ही भागांतील रेशनकार्डधारकांना समान रॉकेल वाटप करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे.

सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत ग्रामीण, शहरी भागासाठी रॉकेलचे परिमाण १९९७ मध्ये निश्चित करण्यात आले होते. या परिमाणानुसार शहरी भागात जादा रॉकेल वितरण होत असल्याने ग्रामीण भागात अन्यायाची भावना होती. राज्य सरकारने निश्चित केलेल्या परिमाणानुसार रॉकेल मिळत नसल्याने हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडे कडूजी देवबा पुंड यांनी २०१४ मध्ये जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये हायकोर्टाने रॉकेल वाटपाचे शासनाने ठरविलेले धोरण सुधारित करावे, असे जुलै २०१५ मध्ये दिले. तसेच शहरी व ग्रामीण भागातील जनतेसाठी त्वरेने समान परिमाण निश्चित करावे असेही स्पष्ट केले.

या आदेशानुसार शहरी व ग्रामीण भागासाठी वेगवेगळे असलेले रॉकेल वाटपाचे परिमाण रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शहरी व ग्रामीण भागांतील बिगर गॅसधारक रेशनकार्डांसाठी प्रती व्यक्ती २ लिटर, दोन व्यक्तींसाठी ३ लिटर आणि तीन वा त्याहून अधिक व्यक्तींसाठी ४ लिटर रॉकेलचे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. एक गॅसची जोडणी असलेल्या रेशनकार्डधारकांना देण्यात येणारे रॉकेल यापुढे दिले जाणार नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आशेच्या किरणासह संप सुरूच राहणार

$
0
0

मंत्रालयाच्या त्रिसदस्यीस समितीची संस्थेला भेट; विद्यार्थ्यांशी केली चर्चा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'तील (एफटीआयआय) संपाची दखल घेऊन केंद्राच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या त्रिसदस्यीय समितीने शुक्रवारी संस्थेला भेट दिली. या भेटीमुळे मागण्यांचा विचार होण्याबाबत विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. मात्र, सरकारचा निर्णय जाहीर होईपर्यंत संप सुरूच राहणार आहे.

केंद्रीय समितीमध्ये 'न्यूज पेपर्स ऑफ इंडिया'चे महासंचालक एस. एम. खान, फिल्म विभागाच्या संचालक अंशू सिन्हा, फिल्म विभागाचे उपसचिव एस. नागनाथन यांचा समावेश होता. या समितीने संचालक प्रशांत पाठराबे, संपकरी विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी सविस्तर चर्चा केली. शुक्रवारी दिवसभर ही प्रक्रिया सुरू होती.
बैठकीनंतर समितीचे अध्यक्ष एस. एम. खान यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'विद्यार्थी, संचालक, प्राध्यापक आणि माजी विद्यार्थ्यांशी सकारात्मक चर्चा झाली. त्याबाबतचा सविस्तर तपशील सांगता येणार नाही. मात्र, संस्थेची पार्श्वभूमी, पायाभूत सुविधा, प्रशासकीय समस्या, अपेक्षित बदल अशा विविध मुद्द्यांचा चर्चेत समावेश होता. या चर्चेचा सविस्तर अहवाल सोमवारी मंत्रालयाकडे सादर करण्यात येणार आहे,'' असे त्यांनी स्पष्ट केले.
..

केंद्र सरकारने या समितीच्या माध्यमातून चर्चेची दारे खुली केल्याचा आनंद आहे. बराच काळ आम्ही या चर्चेसाठी वाट पाहिली. आमची लढाई केवळ गजेंद्र चौहान यांच्याविरोधात नाही. संपूर्ण निवड प्रक्रियेवरच आमचा आक्षेप आहे. ही प्रक्रिया पारदर्शी होण्याची गरज आहे. पाच विद्यार्थ्यांना झालेल्या अटकेनंतर संस्थेतील वातावरण काहीसे गढूळ झाले आहे. मात्र, समितीने संस्थेत येऊन चर्चा केल्यानंतर ते पूर्ववत होईल. समितीसह चर्चेने आम्हाला आशेचा किरण दिसू लागला आहे. आमचे म्हणणे या समितीच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. मात्र, आमच्या उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा योग्य पद्धतीने विचार होत नाही, आंदोलन सुरुच राहणार आहे.
- संपकरी विद्यार्थी
..

एफटीआयआयला केंद्रीय विद्यापीठ करण्याच्या दृष्टीने विचार होण्याची गरज आहे. संस्थेच्या स्वायत्ततेचा पुरेपूर उपयोग करता आला पाहिजे. संस्थेतील पायाभूत सुविधा, प्रशासकीय अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने कार्यवाही व्हायला हवी. आंदोलन आणि अटकसत्रामुळे बिघडलेले वातावरण निवळण्यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात याव्यात. विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत.
- प्राध्यापक
..

सरकारने विद्यार्थ्यांचे म्हणणे समजून घेतले पाहिजे. संपामुळे परिस्थिती बिघडलेली असताना त्यात मूल्यमापनासारखे विषय मध्येच आणून मुख्य मुद्दा बाजूला नेला जात आहे. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेला मुद्दा महत्त्वाचाच आहे. त्यासह संस्थेतही काही बदल गरजेचे आहेत. या सर्वांचा सरकारने सकारात्मक विचार केल्यास एफटीआयआय नक्कीच पुढे जाईल.
- माजी विद्यार्थी
..

'मटा'च्या वृत्ताची कँपसमध्ये चर्चा
२००८ बॅचच्या विद्यार्थ्यांच्या डिप्लोमा फिल्म अपूर्ण राहण्यास विद्यार्थीच जबाबदार असल्याचा अहवाल प्रॉडक्शन विभागाने दिला होता. त्याची बातमी 'मटा'ने सर्वप्रथम समोर आणली होती. या बातमीची शुक्रवारी कँपसमध्ये चर्चा होती. 'एफटीआयआय'च्या प्रशासनाने केंद्रीय समितीला हा अहवाल सादर केला असून, समितीही आपल्या अहवालात त्याचा विचार करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीकपातीचा निर्णय आज?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाळ्याचे अडीच महिने उलटून गेल्यानंतरही खडकवासला धरण साखळीत पुरेसा पाणीसाठा नसल्याने वर्षभराच्या नियोजनाच्या दृष्टीने शहराच्या पाण्यात कपात होणार का, याचा निर्णय आज, शनिवारी होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पूर्वीप्रमाणे एकवेळ पाणीपुरवठा करण्याची तयारी पालिकेला ठेवावी लागेल, अशी चिन्हे आहेत.

पाटबंधारे विभागातर्फे १५ ऑक्टोबरपर्यंत धरणांतील पाणीसाठा लक्षात घेऊन पुढील नियोजन दर वर्षी केले जाते. मात्र, यंदा ऑगस्टअखेरपर्यंत पावसाची शक्यता नाही, असा अंदाज नुकताच हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे, धरणांतील पाणी शहरासह ग्रामीण भागांत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कालवा समितीची बैठक घेण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. त्यानुसार, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक शनिवारी दुपारी तीन वाजता घेण्यात येणार आहे.

खडकवासला धरण प्रकल्पाची एकूण क्षमता २९ टीएमसी असली, तरी सध्या जेमतेम १५ टीएमसी पाणीसाठा आहे. शहराची पाण्याची वार्षिक गरज सुमारे १४ टीएमसी आहे. खडकवासला प्रकल्पातून ग्रामीण भागातही कालव्याद्वारे सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी सोडण्यात येते; तसेच बाष्पीभवनामुळे धरण साठ्यातील दीड ते दोन टीएमसी पाणी कमी होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन पुढील वर्षी १५ जुलैपर्यंतचे नियोजन कालवा समितीला आत्ताच करावे लागणार आहे.

पावसाळ्याचा अजून एक महिना बाकी असल्याने सुरुवातीच्या टप्प्यात शहराला देण्यात येणाऱ्या पाण्यात कपात करून एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यानंतर, १५ सप्टेंबरच्या दरम्यान पुन्हा धरणातील पाण्याचा अंदाज घेऊन पुढील नियोजन करण्याचे संकेत देण्यात येत आहेत.

उधळपट्टीवर नियंत्रण

पाणीकपात होण्याची शक्यता गृहित धरून पालिकेने त्यानुसार वॉशिंग सेंटर्स, बांधकामासाठी केला जाणारा पिण्याच्या पाण्याचा वापर, अनधिकृत नळजोडांवर कारवाई अशा माध्यमातून पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याचे निश्चित केले आहे. कालवा समितीच्या बैठकीनंतर तातडीने त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सन्मान्य’ तोडगा आता दृष्टिपथात?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) नियामक मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती झालेले अभिनेता गजेंद्र चौहान यांची गच्छंती करून सन्माननीय तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे; तसेच उपाध्यक्ष हे नवीन पद निर्माण करून त्यावर विद्यार्थ्यांच्या मान्यतेने नियुक्तीचा पर्याय विचारात घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या त्रिसदस्यीय समितीने संस्थेला भेट देऊन संपकरी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. त्याचा अहवाल समिती सोमवारी मंत्रालयाला सादर करणार आहे.

काही दिवसांपूर्वी प्रख्यात हिंदी चित्रपट निर्माता व दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा व विद्यमान नियामक मंडळातील माजी विद्यार्थ्यांच्या समितीचे सदस्य राजकुमार हिरानी यांनी दोन विद्यार्थ्यांसह माहिती व प्रसारण मंत्रालय राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांची भेट घेतली होती. त्या वेळी विविध पर्यायांचा विचार करण्यात आला. चौहान यांनाच अध्यक्षपदी ठेवून उपाध्यक्षपदी विद्यार्थ्यांना मान्य असलेल्या व्यक्तीची नेमणूक करण्याचा प्रस्ताव मंत्रालयाच्या वतीने ठेवण्यात आला; तसेच विद्यार्थ्यांचा आक्षेप असलेल्या इतर चारही सदस्यांची नियुक्ती रद्द करण्यासही मंत्रालय राजी झाले होते. या पर्यायाला विद्यार्थ्यांचीही मान्यता होती. मात्र, मंत्रालयाकडून ही आश्वासने लेखी स्वरूपात मिळत नसल्याने संप सुरूच राहिला.

अध्यक्षपदी चौहान आणि सदस्यपदी राहुल सोलापूरकर, अनघा घैसास, नरेंद्र पाठक, शैलेश गुप्ता यांची नियुक्ती करण्याच्या केंद्राच्या निर्णयाला विद्यार्थ्यांचा विरोध आहे. त्यासाठी ७१ दिवसांपासून विद्यार्थ्यांचा संप सुरू आहे. एफटीआयआयचे संचालक पाठराबे यांना घेराव घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री पाच विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती.

काय असतील तोडगे?

- गजेंद्र चौहान यांची गच्छंती करून संप मागे
- उपाध्यक्षपद निर्माण करून विद्यार्थ्यांना मान्य असलेल्या व्यक्तीची त्यावर नियुक्ती होणार
- चौहान यांना कायम ठेवून नियामक मंडळातील आक्षेप असलेल्या चारही सदस्यांना डच्चू. त्या जागी विद्यार्थ्यांच्या संमतीने नवीन नियुक्ती
- पूर्णपणे माघार घेत चौहान यांच्यासह सर्व वादग्रस्त सदस्यांची नियुक्ती रद्द.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोरमध्ये आमदारांच्या भावाकडून मारहाण

$
0
0

भोर : भोरमध्ये राजकीय दहशतीचे प्रकार सुरूच असून आमदार संग्राम थोपटे यांचे चुलत बंधू अशोक थोपटे व अन्य चार जणांनी आपल्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केल्याची तक्रार हातनोशी गावातील संजय भिलारे यांनी केली आहे. या मारहाणीची तक्रार नोंदविण्यास भोर पोलिसांकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

शेतजमिनीमध्ये पाणी येत असल्याच्या वादातून अशोक थोपटे, मुकुंद थोपटे, महेश थोपटे व प्रमोद थोपटे यांच्याकडून आपल्या कुटुंबातील महिला व मुलांना मारहाण झाल्याचे भिलारे यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदविला असल्याचे भिलारे यांनी सांगितले. या चारही जणांना अटक न केल्यास भोर पोलिस स्थानकासमोर आंदोलन करण्याचा इशारा भिलारे यांनी दिला आहे. आपल्या कुटुंबाला संरक्षण पुरविण्याची मागणीही त्यांनी केली आहे. भोर तालक्यातील धांगवडी येथे जमिनीच्या वादातून शेतकरी कुटुंबाला मारहाण केल्याबद्दल माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यापाठोपाठ आता ही दुसरी घटना हातनोशी या गावात घडली आहे. मारहाण करणारे अशोक थोपटे हे माजी सभापती व जिल्हा दूध संघाचे माजी संचालक आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हेगार काळभोर ताब्यात

$
0
0

पिंपरी : खंडणीविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत पिंपरी-चिंचवड शहरातील एका सराईत गुन्हेगारास पिस्तुलासह ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. विवेक उर्फ सोन्या सोपान काळभोर (वय २२, रा. अनुबाई काळभोर चाळ, आकुर्डी गावठाण) असे ताब्यात घेतलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्या विरोधात खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणीविरोधी पथकाचे पोलिस हवालदार सचिन आहिवळे यांना बोपोडी पुलाखालील गांधीनगर झोपडपट्टी येथे एक युवक पिस्तूल घेऊन उभा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार खंडणीविरोधी पथकातील कर्मचाऱ्यांनी परिसरात सापळा रचून सोन्या काळभोरला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे मिळून आले. त्याने हे शस्त्र कोठून आणले, किती शस्त्र कोणाकोणाला विकले आहे याचा शोध घेण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षकाला सक्तमजुरी

$
0
0

पुणे : कर्वेनगर येथील एका शिक्षण संस्थेतील दोन विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करणाऱ्या क्रीडा शिक्षकाला कोर्टाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि चाळीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी हा आदेश दिला.

सायबू हिरू राठोड (वय ४१, रा. नवी सांगवी) असे शिक्षा झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. याबाबत संस्थेच्या वसतीगृह प्रमुखांनी तक्रार दिली होती. या शिक्षकाने शाळेतील १४ वर्षीय दोन विद्यार्थिनींशी विनयभंग केल्याची तक्रार करण्या आली होती. ही घटना १३ आणि १४ जुलै २०१३ रोजी घडली होती. या केसमध्ये सरकारी पक्षातर्फे अॅड. हिरा बारी यांनी सहा साक्षीदार तपासले. संबंधित दोन्ही मुलींची साक्ष या प्रकरणात महत्त्वाची ठरली. वरीष्ठ पोलिस निरीक्षक अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मीनल नाईक यांनी हा तपास केला. त्यांना पोलिस हवलदार सी. एन. जाधव यांनी सहाय्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराईत गुन्हेगाराकडून बोपोडीत पिस्तुल जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बेकायदेशीरपणे पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. विवेक उर्फ सोन्या सोपान काळभोर (वय २२, रा. आकुर्डी गावठाण) असे अटक केलेल्याचे नाव आहे. खंडणीविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक अनिल पाटील हे खडकी पोलिस ठाण्याच्या परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी पोलिस कर्मचारी सचिन अहिवळे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली, की सराईत गुन्हेगार सोन्या काळभोर हा पिस्तुल घेऊन बोपोडीतील गांधीनगर झोपडपट्टीच्या पुलाजवळ उभा आहे. त्यानुसार सापळा रचून त्याला शनिवारी पकडण्यात आले. त्याच्याकडून पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. काळभोर याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, जबर मारहाण, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

तीन वाहनांचा विचित्र अपघात

सिहंगड रस्त्यावरील वडगाव फाटा बसस्थानकाजवळ शनिवारी सकाळी सातच्या सुमारास ट्रक, टेम्पो आणि रिक्षाचा विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. तीन वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील वडगाव फाट्याच्या बस स्थानकाजवळ शनिवारी सकाळी सातच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका टेम्पोला ट्रकची पाठीमागून धडक बसल्यामुळे टेम्पो रस्त्याच्या बाजूला उलटला. या वेळी बाजूने जाणाऱ्या रिक्षाला टेम्पोची धडक बसली. या अपघातात ट्रक व टेम्पोचे चालक किरकोळ जखमी झाले आहेत. कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

खांबावर दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू

भरधाव वेगातील दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या वीजेच्या खांबावर आदळून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. पाटील इस्टेट ते संगमवाडी रस्त्यावर सादलबाबा चौक येथे शुक्रवारी मध्यरात्री हा अपघात झाला. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रॅमीत डेव्हीड (वय २७, रा.कर्वेनगर) असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर, विजय किडवानी (वय १९, रा. रायपूड, छत्तीसगड) हा जखमी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॅमीत व विजय हे शुक्रवारी मध्यरात्री दुचाकीवरून जात असताना विजेच्या खांबावर आदळून अपघात झाला. यात रॅमीतचा मृत्यू झाला; तर विजय जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठातर्फे ‘एकांकिका’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाने आंतरमहाविद्यालयीन विद्यापीठस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रथमच विद्यापीठस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

येत्या ५ आणि ६ सप्टेंबरला विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहामध्ये ही स्पर्धा होणार आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांमधील कॉलेजांचे संघ या स्पर्धेसाठी पात्र असतील. या संघांमधील स्पर्धकांमध्ये कॉलेजमधील नियमित विद्यार्थ्यांचाच सहभाग असावा, ही अट मुद्दामच नियमांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमधील एकांकिका या स्पर्धेसाठी पात्र ठरणार असून, त्या सोबतच विविध तांत्रिक मुद्द्यांचाही स्पर्धेदरम्यान विचार होणार असल्याचे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले.

'विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासोबतच, त्यांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने विद्यापीठाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे,' असे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी नमूद केले. कॉलेज पातळीवरील अशा स्पर्धांमधूनच नव्या कलाकारांना प्रोत्साहन मिळत असते. स्पर्धेच्या निमित्तानेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाही विकास होत असतो. अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणे आणि विविध गटांमधून यशस्वी ठरणाऱ्यांना अधिक व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विद्यापीठ या पुढील काळातही प्रयत्नशील राहणार असल्याचे डॉ. गाडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एटीएम’ फोडताना नोटा जळून खाक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

शिक्रापूर रस्त्यावरील एचडीएफसी बँकचे एटीएम मशिन फोडण्यासाठी गॅस कटरचा वापर करत असताना मशिनमधील फायबरचा ट्रे आणि नोटा जाळून खाक झाल्या. ही घटना शुक्रवारी (२१ आॅगस्ट) पहाटे पावणेतीनच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी शिक्रापूर रस्त्यावरील एचडीएफसी बँकचे एटीएमचा दार उघडून गॅस कटरने मशिन कापले. मात्र, गॅस कटरच्या ठिणग्यांमुळे मशिनमधील फायबरचा ट्रे आणि त्यामधील रोख रक्कम जाळून खाक झाली. मशिनमधील किती नोटा जळाल्या हे समजू शकले नाही. चाकण पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमेलन सेलिब्रेटींविना

$
0
0

स्वा. सावरकरांच्या योगदानावर विश्व साहित्य संमेलनात भर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अंदमान येथे होत असलेले चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन सेलिब्रेटींविना होणार आहे. या संमेलनात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा विस्तृत वेध घेण्यावर भर देण्यात येणार आहे. साहित्य महामंडळाच्या वतीने येत्या दोन दिवसांत संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर केली जाणार आहे.

ऑफबीट डेस्टिनेशन आणि पोर्ट ब्लेअरचे महाराष्ट्र मंडळ यांच्यावतीने येत्या ५, ६ सप्टेंबर रोजी विश्व मराठी साहित्य संमेलन होत आहे. सध्या या संमेलनाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. विविध पातळ्यांवर निधी संकलनही सुरू आहे. संमेलनाला येणाऱ्या साहित्यप्रेमींचे विमान तसेच रेल्वे प्रवासाचे आरक्षणही करण्यात आले आहे. तसेच, संमेलनाचा कार्यक्रमही निश्चित करण्यात आला आहे. मात्र, यंदा संमेलनात सेलिब्रेटींना निमंत्रित करण्यात आलेले नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृती सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त संमेलन सावरकरांना समर्पित करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर, संमेलनात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या वतीने सावरकरांच्या रचनांवर आधारित 'शतजन्म शोधताना' हा संगीतमय कार्यक्रम, रंगकर्मी योगेश सोमण यांचा 'विनायक दामोदर सावरकर' हा एकल नाट्याविष्कार सादर केला जाणार आहे. तसेच, स्वातंत्र्यवीरांचे साहित्य, समाजसुधारणा, भाषा, राजकारण आदी क्षेत्रातील योगदानाचा वेध घेतला जाणार आहे.

स्थानिकांनाचा प्राधान्य

विश्व संमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अंदमानमधील स्थानिक कलावंतांना प्राधान्य देण्याचा निर्णय साहित्य महामंडळ आणि आयोजकांनी घेतला आहे. त्यामुळे संमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रम अंदमानवासीय आणि तेथील मराठीजन सादर करणार आहेत. या संमेलनात पुण्या-मुंबईतील लोकप्रिय कलावंत आणि कार्यक्रमांना बाजूला ठेवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images