Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

ताम्हिणीत प्रवेशाला आता शुल्क

$
0
0

पर्यटकांना शिस्त लावण्यासाठी १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ताम्हिणी घाटातील निसर्गसौंदर्य आणि धबधब्यांची मजा लुटण्यासाठी पर्यटकांना येत्या १५ ऑगस्टपासून प्रवेशशुल्क मोजावे लागणार आहे. अनियंत्रित पर्यटनाला नियोजनाच्या चौकटीत बसवण्यासाठी ताम्हिणी परिसरातील गावकरी एकत्र येत आहेत. वन विभाग आणि वनसंरक्षक समित्यांनी शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सिंहगड मॉडेलच्या धर्तीवर वनक्षेत्राचे संवर्धन आणि गावकऱ्यांना रोजगार देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

डोंगरदऱ्यांमध्ये फिरण्यासाठी आणि धबधब्यांमध्ये मनसोक्त भिजण्यासाठी पावसाळ्यामध्ये हजारो पर्यटक ताम्हिणी अभयारण्य आणि घाट परिसरात भटकंतीसाठी जातात; मात्र गेल्या काही वर्षांत पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, उपद्रवामुळे तेथील जैवविविधता धोक्यात येते आहे. ताम्हिणीतील बहुतांश धबधबे वनक्षेत्राला लागून असल्याने पर्यटक सगळा कचरा वनक्षेत्रात फेकतात. उपद्रवी पर्यटकांची संख्याही वाढत असून, ते दारूच्या बाटल्या सर्रास झाडांमध्ये फेकतात किंवा रस्त्यावर फोडतात. या पर्यटकांना शिस्त लावण्यासाठी गावकऱ्यांनी वन विभागाला सहकार्य करावे, असा प्रस्ताव वनाधिकाऱ्यांनी संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या बैठकीत मांडला होता.

सिंहगड किल्ल्याच्या पर्यटन मॉडेलनुसार ताम्हिणीतही पर्यटकांना उपद्रव शुल्क आकारून ताम्हिणीचा विकास साधता येईल आणि गावकऱ्यांना रोजगार देता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते; मात्र त्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमुळे या उपक्रमाची अंमलबजावणी झाली नव्हती. येत्या पंधरा ऑगस्टपासून निवे गावाजवळ उपद्रव शुल्क लागू होणार आहे.

'गावकऱ्यांच्या सहभागातूनच पर्यटकांचे नियोजन होणार आहे. सुरुवातीला आम्ही पर्यटकांकडून दहा रुपये शुल्क आकारणार आहोत. या रकमेतून सुरक्षारक्षकांची नेमणूक होणार आहे. गाड्यांची तपासणी करणे, प्लॅस्टिक कचरा फेकणाऱ्या पर्यटकांवर कारवाई, वाहतूक नियोजन अशी सगळी कामे समितीमार्फत विभागण्यात येणार आहेत,' अशी माहिती ताम्हिणी अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एम. खलाटे यांनी दिली.

सोयीसुविधांची उपलब्धता

'ताम्हिणी घाटात कोठेही पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे लोक रस्त्याच्या दुतर्फा कोठेही अथवा थेट धबधब्यांच्या शेजारी गाड्या लावतात. बेशिस्त पर्यटकांमुळे प्रत्येक सुट्टीच्या दिवशी या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते. आता पर्यटकांना धबधब्यांच्या अलीकडे दोन किलोमीटर अंतरावर गाड्या लावाव्या लागणार आहेत. तेथून पुढे त्यांना चालत जावे लागणार आहे. याशिवाय त्यांच्या सोयीसाठी काही खाद्यपदार्थांचे स्टॉल, स्वच्छतागृहेदेखील उभारणार आहोत,' असे खलाटे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गायीच्या शेणापासून उटण्याची निर्मिती

$
0
0

* लातूरचे शेतकरी दिलीप कुलकर्णी यांचा प्रयोग
* पेटंट मिळवण्याचाही प्रयत्न करणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गायीचे शेण व मूत्रापासून उटणे तयार करण्याचा प्रयोग लातूरचे प्रयोगशील शेतकरी दिलीप कुलकर्णी यांनी केला आहे. हे उटणे म्हणजे साबण, शॅम्पूला आरोग्यदायी असा पर्याय असल्याचा त्यांचा दावा असून, या प्रयोगाचे पेटंट मिळवण्याचाही प्रयत्न ते करणार आहेत. या उटण्याची कृती इतर शेतकऱ्यांना विनामूल्य शिकवण्याचीही त्यांची तयारी आहे.

कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मिलिंद एकबोटे या वेळी उपस्थित होते. कुलकर्णी मेकॅनिकल इंजिनीअर असून, त्यांनी औरंगाबाद येथे पंचवीस वर्षे नोकरी केली. त्यानंतर पिढीजात शेतीमध्ये ते प्रयोग करतात. तसेच २८ प्रकारची शेती अवजारे तयार करण्याचा त्यांचा उदगीर येथे कारखानाही आहे. भारतीय गोवंशाचे संवर्धन व वृद्धीसाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. कीर्तनातून शेतीविषयक मार्गदर्शनही ते करतात.

शेतीकामात गोमूत्र व शेणाचा वापर करताना स्वतःच्या शरीरात सकारात्मक बदल होत असल्याचे जा‍णवल्यानंतर त्यांना गोमय उटणे तयार करण्याची कल्पना सुचली. त्यानुसार त्यांनी प्रयोग करून उटणे तयार केले. नागरमोथा, शिकेकाई यांचा वापर त्या उटण्यात करण्यात आला आहे. या उटण्याचा त्यांनी स्वतःवर प्रयोग करून पाहिला. त्याविषयीची सत्यता पडताळून घेण्यासाठी इतरांनाही त्याचा नमुना दिला. चांगला प्रतिसाद आल्याने या उटण्याला समाजापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हे उत्पादन व्यावसायिक रीतीने लोकप्रिय करण्याचा त्यांचा मनोदय नाही.

'पर्यावरणपूरक असे हे गोमय उटणे वापरून शरीराला फायदाच होतो. रासायनिक घटकांचा वापर केलेल्या शॅम्पू, साबणामुळे शरीराची हानी होते. त्याला उटणे हा चांगला पर्याय आहे,' असे कुलकर्णी यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना विनामूल्य प्रशिक्षण

गोमय उटणे हा शेतकऱ्यांना उत्पन्नाचा वेगळा मार्ग ठरू शकतो. त्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत गोमय उटणे पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना या उटण्याची पद्धत विनामू्ल्य शिकवण्याचीही तयारी आहे. हळदीच्या पेटंटच्या बाबतीत झालेला प्रकार गोमय उटण्याच्या बाबतीत होऊ नये, यासाठी या उटण्याचे पेटंट घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. संपर्क : ९४२१७३१०३५, ई-मेल : delipkulkarni@gmail.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ना. गोखलेंचे निवासस्थान होणार वारसा वास्तू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचे निवासस्थान जतन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या ऐतिहासिक वास्तूची डागडुजी करून तेथे त्यांच्याविषयी माहिती देणारे कायमस्वरूपी संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या कामासाठी सुरुवातीच्या टप्प्यात २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांनी बुधवारी दिली.

आगरकर रस्त्यावरील (बीएमसीसी कॉलेज रस्ता) गोखले इन्स्टिट्यूटच्या आवारात असलेल्या या वास्तूचा समावेश शहरातील पर्यटनस्थळांमध्ये करण्यात येणार असल्याचे कदम यांनी जाहीर केले. काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. अभय छाजेड आणि गोखले यांचे पणतू अॅड. सुनील गोखले या वेळी उपस्थित होते.
गोखले यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त वर्षभर विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. महापालिकेतर्फे त्यांच्या वास्तूचे जतन करून कायमस्वरूपी संग्रहालय उभारण्यात येणार असल्याचे महापौरांनी यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार, अस्तित्वातील वास्तूची डागडुजी करण्यासाठी २५ लाख रुपये खर्च करण्यासाठी मंजुरी दिल्याची माहिती कदम यांनी दिली.

नामदार गोखले यांना आतापर्यंत मिळालेले विविध मानसन्मान, त्यांचे जीवनकार्य याची माहिती नव्या पिढीला व्हावी, यासाठी भविष्यात याच वास्तूमध्ये कायमस्वरूपी संग्रहालयाची उभारणी केली जाणार आहे. शहरातील पर्यटनस्थळांमध्ये या वास्तूचा समावेश केला जाणार असून, या निमित्ताने पुण्याबाहेरून येणाऱ्या पर्यटकांना गोखले यांचे कार्य आणि त्यांचे योगदान याची माहिती होऊ शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरिपाच्या पेरण्यांवर ‘सक्रांत’?

$
0
0

पावसाअधाभावी डाळी, तेलबियांच्या उत्पादनाला फटका बसणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातील पेरण्या अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे यंदा खरीप हंगामात धान्ये, डाळी आणि तेलबियांच्या उत्पादनाला फटका बसण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात सुमारे ८४ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या असल्या, तरी त्यानंतर पावसाने सुटी घेतल्याने बहुसंख्य भागात उत्पादनावर परिणाम होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यंदा मान्सूनचे आगमन वेळेत झाले आणि त्या वेळी झालेल्या समाधानकारक पावसाने राज्याच्या विविध भागांमध्ये शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, जूनअखेर आणि संपूर्ण जुलै महिना पावसाअभावी कोरडा गेला, तसेच ऑगस्ट महिना अर्धा लोटला, तरी अनेक भागांमध्ये पावसाचे आगमन झालेले नाही. काही भागांत पुन्हा पावसाला सुरुवात झाली असली, तरी त्यामध्ये फारसा जोर नाही. त्यामुळे तो पिकांना कितपत उपयुक्त ठरेल, याबाबत शंका आहेत. अशा स्थितीत झालेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता आहे. त्याचा सर्वाधिक फटका मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीनला बसेल, असा अंदाज आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. दरम्यान, विलंबाने पाऊस झाल्यास तेथे खरिपाच्या पिकांऐवजी थेट रबीच्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल आहे. अशा वेळी बाजरी, तूर आणि मक्याची पेरणी करावी, अशी शिफारस कृषी विभागाकडून करण्यात आली आहे.

झालेल्या पेरण्यांमध्ये तृणधान्यांच्या पेरण्या ५३ टक्के,डाळींच्या पेरण्या ७२ टक्के आणि तेलबियांच्या पेरण्या १०९ टक्के क्षेत्रावर झाल्या आहेत. मात्र, त्यातील मोठे क्षेत्र पावसाअभावी अडचणीत सापडले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फूड प्लाझा’ भागवणार पुणेकर खवय्यांची भूक

$
0
0

* भेळपुरीपासून चायनीजपर्यंत सर्व पदार्थ एकाच ठिकाणी मिळणार
* शहराच्या विविध भागांतील नागरिकांची सोय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या सर्वच भागांत खाद्यपदार्थांच्या गाड्यांचे पेव फुटले असल्याने काही ठराविक भागांतच 'फूड प्लाझा'ला परवानगी देण्याचा प्रस्ताव येत्या शुक्रवारी (१४ ऑगस्ट) शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. क्षेत्रीय कार्यालयांमार्फत त्याबाबतचे काही प्रस्ताव अतिक्रमण विभागाकडे सादर झाले असून, अटी-शर्तींमध्ये बसणाऱ्या प्रस्तावांसाठी कायमस्वरूपी धोरण निश्चित केले जाणार आहे.

राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार फेरीवाला समितीने यापूर्वीच 'फूड प्लाझा'ला तत्त्वतः मान्यता दिली आहे. शाळा-कॉलेज, हॉस्पिटल, बस व रेल्वेस्थानक यांपासून ठराविक अंतरावरच अशा 'फूड प्लाझा'ला परवानगी देण्यात येणार आहे. 'फूड प्लाझा'च्या ठिकाणी अस्वच्छता राहू नये, यासाठी अशा ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर बंधने घालण्यात आली आहेत. तसेच, पाणी व ड्रेनेजची सुविधा पालिकेतर्फे उपलब्ध करून दिली जाणार आहे. 'फूड प्लाझा'ची वेळ आणि इतरही अनुषंगिक अटी-शर्ती अतिक्रमण विभागाने निश्चित केल्या आहेत. फेरीवाला समितीने 'फूड प्लाझा'ला तत्त्वतः मान्यता दिल्यानंतर क्षेत्रीय कार्यालयांमार्फत त्या संदर्भातील काही प्रस्ताव मुख्य खात्याकडे सादर करण्यात आले आहेत. पालिकेच्या अटी-शर्तींची पूर्ततेबाबत तपासणी केली जाणार असून, त्याला मान्यता देण्याचा निर्णय फेरीवाला समितीच्या बैठकीत घेण्यात येण्याची शक्यता आहे.

आठवडा बाजार

शहराच्या काही भागांमध्ये अन्नधान्य उत्पादक (शेतकरी) ते ग्राहक अशा स्वरूपात आठवडा बाजार भरवण्याबाबतचा प्रस्तावही फेरीवाला समितीच्या मान्यतेसाठी मांडण्यात आला आहे. रहदारीला कोणत्याही स्वरूपाचा अडथळा न होता, शनिवार-रविवार अथवा सुट्टीच्या दिवशी महापालिकेची पटांगणे अथवा शाळांच्या मैदानांवर अशा स्वरूपात आठवडा बाजार घेता येऊ शकतो, अशी कल्पना सुचवण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हार्ट, स्वादुपिंड ट्रान्सप्लान्ट लवकरच शहरातही

$
0
0

सहा महिन्यात रुबी, दीनानाथमध्ये सुरू होणार सुविधा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षण उद्योगाबरोबरच आता आरोग्यरक्षणाच्या मोहिमेत देखील पुण्याने भरारी घेतली आहे. किडनीचे मुंबईपूर्वी पहिले ट्रान्सप्लान्ट पुण्यात झाल्यानंतर मुंबईकरांना 'हार्ट' देण्यात देखील पुण्याने आघाडी घेतली आहे. त्यामुळे पुण्यासारख्या मेट्रोसिटीतील रुबी, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये येत्या सहा महिन्यात हार्ट, पॅनक्रियाज (स्वादुपिंड), फुफ्फुसाच्या ट्रान्सप्लान्टची सुविधा उपलब्ध होणार आहेत.

पुणे-मुंबईचा प्रवास अवघ्या सव्वातासात पूर्ण करून मुंबईतील तरुणाला हृदय देण्याचा पराक्रम पुण्याने करून दाखविला. अवयवदान प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेत पुणे कुठपर्यंत मजल मारू शकते याची प्रचिती वैद्यकविश्वात सर्वांनाच आली. त्यामुळे 'जागतिक अवयवदान दिन' जगभर आज (गुरुवार) पाळला जात असताना या मोहिमेला वेग देण्यासाठी शहरातील मोठी हॉस्पिटले पुढे सरसावली आहेत. परिणामी, ट्रान्सप्लान्टच्या सुविधा येत्या सहा महिन्यात पुण्यात उपलब्ध होणार असल्याने पुणेकरांसाठी ही 'गुड न्यूज' ठरली आहे.

'लिव्हर व किडनी ट्रान्सप्लान्टची सुविधा आमच्याकडे सध्या उपलब्ध आहे. हार्ट, स्वादुपिंड, फुफ्फुसाच्या ट्रान्सप्लान्टसाठी आम्ही अर्ज केला आहे. त्याला मान्यता मिळाल्यास सहा महिन्यांत आमच्याकडे सर्व प्रकारच्या अवयवांचे ट्रान्सप्लान्ट करणाऱ्या सुविधेचे हॉस्पिटल असा लौकिक मिळेल,' असा विश्वास रुबी हॉस्पिटलच्या ट्रान्सप्लान्ट समन्वयक सुरेखा जोशी यांनी व्यक्त केला.

'आम्हाला लिव्हर ट्रान्सप्लान्ट करण्यासाठी आरोग्य विभागाची मान्यता मिळाली आहे. तर फुफ्फुस, स्वादुपिंडाचे प्रत्यारोपणासाठी एका महिन्यापूर्वी अर्ज केला आहे. आरोग्य विभागाचे पथक हॉस्पिटलची सुविधा तपासण्यासाठी पुण्यात येण्याची आम्ही वाट पाहत आहोत. स्वादुपिंडाचे प्रत्यारोपण करणारे पुण्यात पहिले हॉस्पिटल आमचेच असेल. किडनी ट्रान्सप्लान्टची सुविधा आमच्याकडे असून तिन्ही प्रकारचे ट्रान्सप्लान्ट करणारे डॉक्टर आमच्याकडे आहेत. सुविधेपेक्षा हार्ट ट्रान्साप्लान्ट करणाऱ्या प्रशिक्षित तज्ज्ञांची गरज आहे,' अशी माहिती दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या अवयव प्रत्यारोपण समन्वयक शिल्पा बर्वे यांनी दिली.

जहांगीरमध्ये हार्ट काढण्याची प्रक्रिया करणारे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. हार्ट ट्रान्सप्लान्टसाठी पुढील एका वर्षात आम्ही सुविधा उपलब्ध करून मान्यता घेऊ. सध्या किडनी आणि बुबुळांच्या रोपणाची सुविधा आहे, असे जहांगीर हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मनीषा बोबडे यांनी सांगितले. 'विमाननगर येथील कोलंबिया एशिया हॉस्पिटलमध्ये सध्या किडनी ट्रान्सप्लान्टची सुविधा आहे. त्याशिवाय अन्य ट्रान्सप्लान्टच्या सुविधेचा विचार नाही. पण, बाणेर येथे येत्या दीड वर्षात नवे हॉस्पिटल सुरू होणार आहे. त्यामध्ये लिव्हर, पॅनक्रिया, किडनी, आतड्याचे ट्रान्सप्लान्ट करण्याची सुविधा उपलब्ध करणार आहोत,' असे हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील राव यांनी स्पष्ट केले. तर पूना हॉस्पिटलमध्ये अद्याप किडनीशिवाय कोणतेही ट्रान्सप्लान्ट सुविधा नसल्याचे सांगण्यात आले.
......

पुण्याने मुंबईला हार्ट दिले. त्याप्रमाणे कोणत्याही पेशंटवर पुण्यातील हॉस्पिटलमध्ये हार्ट, स्वादुपिंडाचे ट्रान्स्पलान्ट झाले तर जगाच्या नकाशावर शहराचे नाव पोहोचेल. नागरिकांमध्ये अवयवदानाबाबत जागृती वाढत आहे. त्यामुळे लवकरच या सुविधा उपलब्ध झाल्या तर आरोग्यक्षेत्रात जीवदान देण्याची प्रक्रिया अखंडपणे सुरू राहील, असा विश्वास वाटतो.
- आरती गोखले, समन्वयक,
पुणे प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वयव समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचपुतेंच्या कारखान्यावर कारवाई

$
0
0

'एफआरपी'प्रमाणे रक्कम न दिल्याचा ठपका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शेतकऱ्यांना वाजवी मूल्याप्रमाणे (एफआरपी) उसाच्या रकमा न देणाऱ्या साखर कारखान्यांवर सहकार आयुक्तालयाने कारवाईचा आसूड उगारला असून, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्याशी संबंधित नगरमधील साईकृपा साखर कारखान्याला जप्ती आदेश देण्यात आले आहेत.

साईकृपा कारखान्याने शेतकऱ्यांची 'एफआरपी'चे ३८ कोटी २५ लाख रुपये थकविले आहेत. शेतकऱ्यांना ऊसबिलापोटी देय असलेली ही रक्कम तातडीने देण्याची नोटीस कारखान्याला बजावण्यात आली होती. त्यासाठी कारखान्याला तीन महिने संधी देण्यात आली. तथापि, कारखान्याने शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे उसाचे पैसे न दिल्याने कारखान्याच्या युनिट दोनवर जप्ती आणण्याचे आदेश सहकार आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहेत.

केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाजवी मूल्याप्रमाणे दर देण्याचे आदेश काढले आहेत. परंतु खुल्या बाजारातील साखरेचे दर कमी झाल्याने एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना उसाचा दर देणे कारखान्यांना शक्य जाले नाही. तथापि, बहुतांश कारखान्यांनी एफआरपीनुसार शेतकऱ्यांना उसाची बिले दिली. मात्र, एफआरपीची रक्कम न देणाऱ्या कारखान्यांना सहकार आयुक्तालयाने नोटीस बजावल्या होत्या. त्याची आयुक्तालयात बुधवारी सुनावणी झाली.

या सुनावणीदरम्यान राज्यातील आठ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ३२ कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे त्यांना सुनावणीसाठी पुढील तारीख देण्यात आली आहे. एफआरपीच्या थकीत प्रकरणांमध्ये साखर कारखान्यांना सुनावणीसाठी वारंवार संधी देण्यात आली आहे. तथापि, शेतकऱ्यांना एफआरपीनुसार रक्कम दिली जात नसल्याने कारखान्यांवर महसुली वसुली प्रमाणपत्राधारे जप्तीच्या कारवाईचे आदेश यापूर्वी देण्यात आले आहेत. साईकृपा कारखान्याने शेतकऱ्यांना उसबिलापोटीच्या रकमा दिल्या नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. साईकृपा कारखान्यावर जप्तीची कारवाई करून शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्याची कारवाई नगर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. कारखान्याची साखर व मालमत्ता विकून शेतकऱ्यांची थकीत बिले देण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

पाठपुरावा सुरूच राहणार

साखरेचे खुल्या बाजारातील भाव गेल्या काही दिवसांत वाढले आहेत. या वाढीव दरानुसार साखरेची विक्री झाल्यावर शेतकऱ्यांना एफआरपीनुसार रकमा देणे शक्य होणार आहे. तथापि, शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे रकमा देण्याबाबत साखर आयुक्तालयाचा पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावी ऑनलाइनचा ‘बायफोकल’ला फटका

$
0
0

प्रवेश लांबल्याने कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्सचे फसले नियोजन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या लांबत्या वेळापत्रकाचा 'बायफोकल'च्या विद्यार्थ्यांवर थेट परिणाम दिसू लागला आहे. 'बायफोकल'ला इच्छुक विद्यार्थ्यांसाठी कॉलेज पातळीवरील नियोजन अवघड झाले आहे. त्यामुळे कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्ससारख्या विषयांच्या अभ्यासक्रमांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे.

अकरावीच्या ऑनलाइन प्रक्रियेनंतरच्या टप्प्यावर कॉलेजांमध्ये कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स या महत्त्वाच्या बायफोकलच्या विषयांची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. कॉलेज पातळीवर होणारी ही प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेच्या बळावरच व्हावी, असे स्पष्ट निर्देश अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने यापूर्वीच दिलेले आहेत. त्यानुसार कॉलेजमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांमधून गुणवत्तेनुसार 'बायफोकल'ला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. त्यानंतरच या विद्यार्थ्यांचे तास आणि प्रॅक्टिकल्सचे नियोजन आखले जाते. यंदा मात्र, अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रियाच रखडल्याने, 'बायफोकल'चे प्रवेश अंतिम होणार कधी आणि त्यांचे वर्ग भरणार कधी असा सवाल विद्यार्थी आणि पालकांकडूनच विचारला जात आहे.

कॉलेज पातळीवर आत्तापर्यंत झालेल्या प्रक्रियेतून प्रवेशित विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी पाहून, त्यांचे बायफोकलसाठीचे अर्ज विचारात घेतले जात आहेत. गुणवत्ता यादीनुसार अर्ज सादर केलेले विद्यार्थी बायफोकलच्या वर्गांसाठी वाट पाहत असल्याने, हे विद्यार्थी इतर पर्यायी विषयांच्या वर्गांचा कोणताही विचार करत नाहीत. त्यासोबतच हे विद्यार्थी इतर पर्यायी विषयांच्या प्रॅक्टिकल्सनाही हजर राहत नाहीत. त्यामुळे 'बायफोकल'ची वाट पाहणाऱ्या या विद्यार्थ्यांची सद्यस्थिती ही 'ना घर का, ना घाट का' अशीच झाली आहे. यातून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी खात्याने लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

पर्याय काय ?

'बायफोकल'ला प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी असते. त्या तुलनेत कॉलेज पातळीवर उपलब्ध असलेल्या जागांची संख्या मात्र मोजकीच आहे. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत या प्रवेशांचा विचार होत नसल्याने, त्या विषयीची कोणतीही माहिती विद्यार्थी- पालकांना मिळत नाही. कॉलेज पातळीवरील 'बायफोकल'साठी उपलब्ध तुकड्यांची संख्या, विद्यार्थी संख्या या बाबींची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच मिळाल्यास, 'बायफोकल'साठी आरंभापासून वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. तसेच, 'बायफोकल'चे 'कटऑफ' जाहीर झाल्यास, कॉलेज निवडीसोबतच, 'बायफोकल' निवडण्यासाठीही विचारपूर्वक अर्ज भरणे विद्यार्थी - पालकांना शक्य होईल. एकाच ऑनलाइन प्रक्रियेतून या प्रवेशांची प्रक्रियाही पूर्ण होऊ शकेल.

शिक्षणमंत्र्यांना भेटणार

'बायफोकल'च्या प्रवेशांसाठी वेगळा कॉलेज कोड उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य द्विलक्षी व्यवसाय शिक्षक संघटनेने केली आहे. संघटनेचे अध्यक्ष आर. डी. सुपेकर, उपाध्यक्ष व्ही. बी. शाळू, सहचिटणीस आकाश चौधरी यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन, मागणी मांडणार असल्याचे बुधवारी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बारावीच्या परीक्षेसाठी ‘आधार’चा आग्रह

$
0
0

सक्ती केली नसल्याचे शिक्षण खात्याकडून स्पष्टीकरण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सरकारी योजनांसाठी आधारची सक्ती करता येणार नाही, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतरही राज्याच्या शिक्षण खात्याने मात्र विद्यार्थी आणि पालकांच्या आधार क्रमांकांची नोंद करण्याचा अट्टहास कायम ठेवला आहे. इतकेच नव्हे, तर आता बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र भरताना विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदवून घेतले जाणार आहेत. त्यामुळे अभ्यासाऐवजी आधारकार्ड काढण्यासाठी विद्यार्थी-पालकांची गडबड सुरू आहे. मात्र, 'आधार'ची सक्ती करण्यात आलेली नसल्याचे नंतर स्पष्ट करण्यात आले.

यंदा खात्याने आपल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या आधार क्रमांकांची माहिती गोळा करण्याची सुरुवात केली आहे. शालाबाह्य मुलांपासून ते 'सरल' या ऑनलाइन यंत्रणेमधील माहिती गोळा करेपर्यंतच्या सर्वच टप्प्यांवर आधार क्रमांकांची ही माहिती जवळपास मागविली जात आहे. खात्यातील अधिकाऱ्यांनीही आधार क्रमांकांची माहिती गोळा करण्याचे हे काम प्राधान्याने सुरू ठेवले आहे. त्यातूनच बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेसाठीही आधार क्रमांकांची नोंदणी ऐच्छिक करण्याचा निर्णय पुढे आला आहे.

फेब्रुवारी २०१६ मध्ये आयोजित बारावीच्या परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येत्या सोमवारपासून (१७ ऑगस्ट) सुरुवात होणार आहे. www.mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवरून शाळा- ज्युनिअर कॉलेज मार्फत हे अर्ज भरता येतील. विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत नियमित शुल्कासह, तर ८ सप्टेंबरपर्यंत विलंब शुल्कासह आपले अर्ज सादर करता येतील. ज्युनिअर कॉलेजांना नियमित शुल्कासह चलन भरण्यासाठी ५ सप्टेंबरपर्यंत, तर विलंब शुल्कासह चलन भरण्यासाठी मंडळाने १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. हे अर्ज भरतानाच विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी आधारकार्ड क्रमांक नोंदविणे अपेक्षित असले, तरी ते बंधनकारक नसल्याचेही बोर्डाने स्पष्ट केले आहे. आधार कार्डांची माहिती देण्याची ही बाब पूर्णपणे ऐच्छिक असून, बोर्डाने विद्यार्थ्यांवर त्यासाठी कोणतीही सक्ती केली नसल्याचे बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी बुधवारी स्पष्ट केले.
...

'आधार क्रमांकांची माहिती गोळा करणे आणि त्याची सक्ती करणे या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. शिक्षण खात्याने आधारची सक्ती केलेली नाही. आधार क्रमांक नसेल, तर शिक्षण मिळणार नाही, अशी खात्याची भूमिका नाही. विद्यार्थ्यांसाठीच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आम्ही त्यांचे आधार क्रमांक घेत आहोत; तसेच बोगस विद्यार्थिसंख्या दाखवून खात्याकडून आर्थिक लाभ लाटणाऱ्या संस्थांवरही या माध्यमातून वचक बसणार आहे. संचमान्यतांसारख्या प्रक्रियांसाठी आधार क्रमांकांची नोंदणी फायद्याची ठरणार आहे.'

- डॉ. नंद कुमार, प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणखी महिनाभर दुरुस्ती

$
0
0

एक्स्प्रेस-वेवर काम पूर्ण होईपर्यंत खंडा‍ळा बोगद्याजवळ एक लेन बंद

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर खंडाळा बोगद्याजवळ सुरू असलेले दुरुस्तीचे काम आणखी एक महिना सुरू राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली. हे काम पूर्ण होईपर्यंत खंडाळा बोगद्याजवळ एक लेन बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे. परिणाणी, पुणे-मुंबई दरम्यानच्या प्रवाशांना आणखी काही दिवस वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

लोणावळ्याजवळ आडोशी बोगद्याच्या सुरुवातीला कोसळलेली दरड हटविण्यात आली असून तेथील काम बंद करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतर खंडाळा बोगद्याजवळ दरड कोसळलेल्या ठिकाणी अद्याप दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामामुळे संपूर्ण एक्स्प्रेस-वे बंद ठेवण्याची गरज नाही. केवळ काम सुरू असलेल्या ठिकाण एक लेन बंद ठेवली जात आहे. त्यामुळे लोणावळ्यापासून खंडाळा बोगद्यापर्यंतच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. हा बदल काम पूर्ण होईपर्यंत कायम ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

एक्स्प्रेस-वेवर २२ जून रोजी खंडाळ्याच्या बोगद्याजवळ दरड कोसळली. आडोशी बोगद्याजवळ १९ जुलैला दरड कोसळली, त्यामध्ये काही जणांचा प्राण गेला. त्यानंतर पुन्हा खंडाळा बोगद्याजवळ दरड कोसळली. खंडाळा घाट परिसरात तज्ज्ञांनी पाहणी करून हा भाग धोकादायक असल्याचे सांगून येथील काम तातडीने करून घेण्यास सांगितले. एक्स्प्रेस-वेवर वाहतुकीचा ओघ इतर रस्त्यांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी जास्त वेळ बंद ठेवणे शक्य नसल्याने काम करण्यावर काही मर्यादा आहेत. त्यामुळे कामाचे प्रमाण व वेग पाहता आणखी एक महिना या काम पूर्ण होण्यासाठी लागेल, असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिकच झाले ‘ट्रॅफिक पोलिस’

$
0
0

वाहतूक कोंडी हटविण्यासाठी सिंहगड रस्त्यावर अनोखी चळवळ

>> जयदीप पाठकजी, पुणे

ऐन ऑफिसच्या वेळेत रोजच होणारी वाहतूक कोंडी...वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करणारे चालक...गर्दीतून गाडी चालवण्यासाठी करावी लागणारी कसरत...अशा दैनंदिन त्रासातून सुटका करून घेण्यासाठी आता पुणेकरांनीच पुढाकार घेतला असून, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी 'सिंहगड रस्ता वाहतूक समस्या निवारण मंच'ची स्थापना करण्यात आली आहे.

सिंहगड रस्त्यावरील संतोष हॉलच्या चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी स्वयंसेवक पुढे आले आहेत. डॉक्टर, इंजिनीअर, वकील, व्यावसायिक, कॉलेजचे विद्यार्थी आपल्या रोजच्या व्यग्रतेतून एक तास वेळ काढून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. सिंहगड रस्त्यावर प्रायोगिक तत्वावर सुरू झालेला हा उपक्रम शहराच्या अन्य भागांतही सुरू झाल्यास फायदा होण्याची शक्यता आहे. अश्विन शिंदे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाला सुरुवात झाली असून, सिंहगड रोडवर राहणाऱ्या नागरिकांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अंदाजे २५ स्वयंसेवक सकाळी साडेनऊ ते साडेदहा आणि संध्याकाळी साडेसात ते साडेआठ या वेळात प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक नियमन करतात. वाहतुकीचे नियम, सिग्नलची माहिती देणे, लेनची शिस्त पाळण्यास सांगणे आदी कामे स्वयंसेवक करीत आहेत. या उपक्रमाला वाहतूक पोलिसांनीही पाठिंबा दिला असून, वाहतूक पोलिस निरीक्षक एम. जी. काळे यांनी नागरिकांना रोप, शिट्टी उपलब्ध करून दिली आहे.

अॅम्ब्युलन्सला वाट करून देणे, ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत करणे आदी लहान लहान कामेही स्वयंसेवक करीत आहेत. एका कंपनीत सकाळी नऊ ते सहा या वेळेत नोकरी करणारे आणि संध्याकाळी घरी आल्यावर या उपक्रमात सहभागी होणारे इंजिनीअर शंतनु कुलकर्णी यांनी आपला अनुभव 'मटा'शी शेअर केला. 'कोणतीही सामाजिक, राजकीय पार्श्वभूमी नसलेले विविध क्षेत्रातील नागरिक या माध्यमातून एकत्र आले आहेत. संतोष हॉल चौकातील रोजची वाहतूक कोंडी पाहताना आपल्यालाही नक्कीच काही करता येऊ शकते असे वाटत होते. मात्र, वाहतूक प्रश्नावर काम करण्यासाठी सिंहगड रस्ता वाहतूक समस्या निवारण मंचाच्या माध्यमांतून आम्हाला व्यासपीठ मिळाले आहे. प्रायोगिक तत्त्वावर रोज सकाळी एक तास आणि रात्री एक तास असे कामाचे स्वरूप आहे. तरीही प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक वेळ आम्ही काम करीत आहोत.'
..

संतोष हॉल चौकात होणारी रोजची वाहतूक कोंडी आणि त्याचा नागरिकांना होणारा त्रास दिसत होता. त्यावर उपाय म्हणून या भागातील नागरिकांनाच एकत्र येण्याचे आवाहन केले. विविध क्षेत्रातील नागरिकांना एकत्र आणून वाहतुकीची चळवळ सुरू केली आहे. चळवळ फोफावी या साठी आणखी स्वयंसेवकांची आम्हाला गरज आहे.

- अश्विन शिंदे, समन्वयक, सिंहगड रस्ता वाहतूक समस्या निवारण मंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारने पुणेकरांना फसवलं!

$
0
0

स्मार्ट सिटीबाबत महापौरांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेसाठीच्या स्पर्धेत पुणे आणि पिंपरी-चिंचवड अग्रभागी असल्याने त्यांचा समावेश स्वतंत्रच हवा, असा ठाम आग्रह धरण्यात येत आहे. तसेच, केंद्र सरकारचे निकष डावलून राज्य सरकार पुणेकरांची फसवणूक करत असल्याचा आरोप महापौरांनीच बुधवारी केला.

देशभरातून केवळ पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन शहरांचा संयुक्त प्रस्ताव दाखल करण्यात आल्याने त्याविरोधात तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे. भाजप वगळता इतर सर्व पक्षांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच, वेळप्रसंगी स्मार्ट सिटीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.

येत्या आठवड्यात स्मार्ट सिटीची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये, स्पर्धेत अग्रभागी राहिलेल्या पुण्याचा समावेश निश्चित होईल, असा विश्वास महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी व्यक्त केला. देशभरात केवळ पुण्याबाबतच वेगळा न्याय लावण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केल्याची टीका महापौरांनी केली.

नवी गाडी घेण्यास उपमहापौरांचा नकार

महापालिकेच्यावतीने दिली जाणारी नवीन कार घेण्यास उपमहापौर आबा बागूल यांनी नकार दिला आहे. महापौरांना नवीन कार देण्यात आल्यानंतर सध्या ते वापरत असलेली कार आपल्याला द्यावी, असे पत्र बागूल यांनी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांना दिले आहे. दोन आठवड्यांपूर्वी महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर बागूल यांना नवीन गाड्या घेण्यासाठी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. यावरून जोरदार टीकाही झाली होती. महापौर यांना नवीन गाडी आल्यानंतर सध्या ते वापरत असलेली गाडी पालिकेने मला द्यावी, मला नवीन कार नको असे पत्र बागूल यांनी आयुक्तांना दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरड संकट बनले आर्थिक संकट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवरील खंडाळा (बोर) घाटातील खंडाळा आणि आडोशी बोगद्याजवळ धोकादायक दरडी हटविण्याच्या कामाचा परिणाम लोणावळ्यातील पर्यटनावर झाला असून, पर्यटकांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे.

धोकादायक दरडी हटविण्याच्या मोहिमेदरम्यान एक्स्प्रेस-वे आणि जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे गेले काही दिवस या दोन्ही मार्गांवर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे लोणावळ्यात ऐन पावसाळ्यातच पर्यटकांची संख्या रोडावली आहे. त्याचा परिणाम लोणावळ्यातील व्यापार-उद्योगांवरही झाला आहे. त्यामु‍ळे दरड संकट हे आर्थिक संकट झाले आहे.

धोकादायक दरडी हटविण्याच्या कामाला २४ जुलैला सुरुवात झाली. त्यानंतर शुक्रवारी (७ ऑगस्ट)आडोशी बोगदा परिसरातील दरडी हटविण्याची मोहीम संपली. खंडाळा बोगद्याजवळील काम अद्यापही सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल, याबाबत प्रशासनाने मौन बाळगले आहे.

या कामामुळे एक्स्प्रेस-वे आणि लोणावळ्यातील जुन्या मार्गावर रोज होणारी वाहतूक कोंडी यामुळे पर्यटकांनी लोणावळ्याकडे पाठ फिरवली आहे. परिणामी वडापाव विक्रेते, चहा विक्रेते, चिक्की विक्रेते, हॉटेल्स यांचा व्यवसाय किमान साठ टक्क्यांनी घटला आहे.

लाँग वीकेंडला गर्दी?

शुक्रवारी आखाड पार्टी (दर्श अमावस्या), त्यानंतर शनिवारी स्वातंत्र्य दिन व दुसऱ्या दिवशी रविवार, मंगळवारी पतेती अशा सुट्ट्या असल्याने लोणावळ्यात गर्दी होण्याची अपेक्षा व्यावसायिकांना आहे. मात्र, एक्स्प्रेस-वेवरील खंडाळा बोगदा ते एक्झिटपर्यंत करण्यात आलेला बदल पर्यटकांच्या वाहनांच्या संख्येपुढे तग धरेल का? असा प्रश्न आहे. वाहतूक नियमन आणि नियमांचे पालन केल्यास पर्यटन सुकर होईल अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद पवारांची ‘दुहेरी सक्रियता’

$
0
0

दिल्लीत तिसऱ्या आघाडीची चाचपणी; राज्यात दुष्काळी मोर्चा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राजकारणाच्या आखाड्यातील अव्वल मल्ल मानले जाणारे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा आपल्या राजकीय अस्तित्वाची चुणूक दाखवण्यास सक्रिय झाले असून, दिल्लीत तिसऱ्या आघाडीची चाचपणी, तर राज्यात दुष्काळी परिस्थितीची जाणीव राज्य सरकारला करून देण्यासाठी उस्मानाबादेत येत्या शुक्रवारी मोर्चा अशा दोन घटनांनी ही सक्रियता अधोरेखित केली आहे.

दिल्लीत पवार यांच्या निवासस्थानी बुधवारी सायंकाळी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव, संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अन्य नेत्यांचे 'चहापान' आयोजित करण्यात आले होते. या बैठकीत देशातील समविचारी नेते एकत्र आले असून, यातून तिसऱ्या आघाडीचा अर्थ कोणी काढू नये, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दुपारीच दिले होते. मात्र, पवार यांच्या कार्यशैलीनुसार याचा खरा अर्थ 'उलट असाच अर्थ काढावा,' असा होत असल्याचे राजकीय निरीक्षकांना ठाऊक आहे. काँग्रेस पक्ष सध्या संसदेत भारतीय जनता पक्षाची कोंडी करण्यात संपूर्ण जोर लावतो आहे. मात्र, मुलायमसिंह यांच्यासह काही नेत्यांना काँग्रेसचे हे धोरण मान्य नाही. ममता बॅनर्जी मंगळवारीच दिल्लीत दाखल झाल्या असून, त्यांनी आधी स्वतंत्रपणे पवार यांची भेट घेतली. किंबहुना देशातील ज्येष्ठ नेते या नात्याने पवारांनी देशातील सर्व समविचारी नेत्यांना एकत्र बोलवावे, असे त्यांनीच पवार यांना सुचवले.

तब्बल ३५ वर्षांनंतर...

दुसरीकडे, राज्यातील असंवेदनशील सरकारला दुष्काळाची तीव्रता व दाहकता याची जाणीव करून देण्यसासाठी शुक्रवारी (१४ ऑगस्ट) उस्मानाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व खुद्द शरद पवार करणार आहेत. पवारांच्या नेतृत्वाखाली निघणारा हा उस्मानाबादेतील पहिलाच मोर्चा ठरणार आहे. बेळगावात १९८० मध्ये पवार यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते आणि पोलिसांच्या लाठ्याही झेलल्या होत्या. पवारांचे ज्येष्ठत्व लक्षात घेता, उस्मानाबादेत असे काही घडण्याची सूतराम शक्यता नसली, तरी पवार तब्बल ३५ वर्षांनी रस्त्यावर उतरत आहेत, हीच मोठी चर्चेची गोष्ट ठरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑगस्टअखेरीस होणार परीक्षा

$
0
0

आठ भाषांमधील प्रश्नपत्रिकांची निर्मिती सुरू

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षणहक्क कायद्यामुळे 'परीक्षाच नाही' अशा वातावरणात भरत असलेल्या शाळांमधील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ऑगस्टअखेरीस मूल्यमापन व गुणवत्तावृद्धी चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. या परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या आठ भाषांमधील प्रश्नपत्रिकांची निर्मिती सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. या चाचण्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांबरोबरच संपूर्ण शालेय व्यवस्थेची पुन्हा 'परीक्षा' पाहिली जाणार आहे.

शिक्षणहक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीच्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना नापास करण्यास मनाई आहे. परिणामी, या इयत्तांमधील शिक्षणाचा स्तर खालावत चालल्याची टीका केली जात होती; तसेच वर्गातील मोठ्या विद्यार्थिसंख्येमुळे सर्वंकष-सातत्यपूर्ण मूल्यमापनदेखील प्रभावी ठरत नव्हते. अशा परिस्थितीत राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या मूल्यमापन व गुणवत्तावृद्धी चाचण्यांची घोषणा केली होती. विद्यार्थ्यांसमवेत शिक्षकांचीदेखील 'परीक्षा' पाहणारी ही चाचणी प्रत्यक्षात पूर्वीप्रमाणेच सत्रांतर्गत घटक परीक्षेसारखी घेतली जाणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमध्ये (एससीईआरटी) या चाचणी परीक्षांची तयारी युद्ध पातळीवर सुरू आहे. ऑगस्ट अखेरीस त्या घेतल्या जातील, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी 'मटा'ला दिली.

सर्वेक्षणनिकाल चिंताजनक

'प्रथम'च्या 'असर' या शैक्षणिक सर्वेक्षण अहवालातून गेल्या पाच वर्षात इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेमध्ये ९४ टक्क्यांवरून ७४ टक्क्यांपर्यंत घसरण झाल्याचे समोर आले आहे. 'एससीईआरटी'ने घेतलेल्या राज्यस्तरीय अध्ययन सर्वेक्षणात पाचवीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयात सरासरी ५३ टक्के व गणित विषयात ५१ टक्के गुण मिळविल्याचेही आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर या चाचणीच्या माध्यमातून अध्यापन-अध्ययन प्रक्रियेचे घसरलेले गाडे पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ही चाचणी परीक्षा दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा आणि गणित विषयांसाठी तीन टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे. या चाचण्यांच्या मूल्यमापनातून जाहीर होणारा निकाल संकलित करण्यासाठी ऑनलाइन यंत्रणाही विकसित करण्यात आली आहे. या निकालाच्या आधारे पुढील सत्रामधील शिक्षक-विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीचे विविध उपक्रम जाहीर केले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रामीण भागासाठी पाणीआवर्तन बंद

$
0
0

पुढील आठवड्यापासून अंमलबजावणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

खडकवासला धरणातून मुठा उजव्या कालव्याद्वारे ग्रामीण भागासाठी सोडण्यात येणारे पाणी आगामी आठवड्यात बंद करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात पिण्यासाठी आणि शेतीला आतापर्यंत धरणांतून दोन ते अडीच अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडण्यात आले आहे.

पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे निम्मीच भरली आहेत. खडकवासला प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला या चार धरणांत सद्यस्थितीत १५.०८ टीएमसी (५१.७४ टक्के) पाणीसाठा आहे. गतवर्षीपेक्षा हा साठा खूपच कमी आहे. गतवर्षी याच काळात धरणांत २५.८१ टीएमसी पाणीसाठा झाला होता.

धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसतानाही मुठा कालव्यातून १,४४६ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्याबद्दल पाटबंधारे खात्याकडे पालकमंत्र्यांनी विचारणा केली होती. परंतु, दरवर्षी खरिपामध्ये कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन असते. दौंड शहर, इंदापूरसह अनेक ग्रामपंचायतींना पिण्यासाठी कालव्यातून पाणी द्यावे लागते. तेच नियोजन यंदा असल्याचे पाटबंधारे खात्याकडून सांगण्यात आले. मात्र, धरणांत पुरेसा पाणीसाठा झाला नसल्याने खरीपाचे आवर्तन काही दिवसांनी कमी करण्यात आले आहे. येत्या आठवड्यात कालव्यातून सोडले जाणारे पाणी बंद केले जाणार असल्याचे पाटबंधारे खात्यातील अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले.

खरीपामध्ये कालव्यातून साधारणतः साडेतीन ते चार टीएमसी पाणी ग्रामीण भागात सोडण्यात येते. यंदा दोन ते अडीच टीएमसीच पाणी देण्यात येत आहे. तसेच खडकवासला धरणाची साठवण क्षमता अन्य धरणांच्या तुलनेत कमी आहे. हे धरण पाऊस पडल्यावर लगेचच भरते आणि त्यामुळे नदीपात्रात पाणी सोडावे लागते. हे पाणी नदीत सोडावे लागू नये म्हणून खडकवासला धरण रिते करून ठेवण्यात आल्याचेही स्पष्टीकरण या सूत्रांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरावेचकांना प्रति घर ५० रुपये

$
0
0

'स्थायी'समोर प्रस्ताव; वार्षिक ६०० रुपयांचा खर्च येणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

घरोघरी जाऊन कचरा गोळा करणाऱ्या 'स्वच्छ' संस्थेच्या कर्मचाऱ्यांना प्रति घर तीस रुपयांऐवजी पन्नास रुपये देण्याबाबतच्या कराराचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास नागरिकांना वर्षाला कचरावेचकांसाठी ६०० रुपये मोजावे लागणार आहेत. दर वर्षी या शुल्कामध्ये पाच रुपये वाढ करण्याचे प्रस्तावात म्हटले आहे. पुढील पाच वर्षासाठी हा करार केला जाणार आहे.

शहरात 'स्वच्छ'च्या माध्यमातून घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचे काम केले जाते. दारोदारी जाऊन कचरा गोळा करण्याच्या बदल्यात प्रत्येक घरामागे तीस रुपये घेण्याचा करार या पूर्वी पालिकेने 'स्वच्छ'बरोबर केला होता. २०१३मध्ये करार संपल्यानंतर गेले दोन वर्षे मुदतवाढ देण्याबाबत चर्चा सुरू होती. नागरिकांकडून कचरावेचक ठरवून दिलेल्या पैशापेक्षा अधिक पैसे मागत असल्याच्या अनेक तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. त्यामुळे या संस्थेबरोबर करार करताना घालण्यात आलेल्या अटींमध्ये बदल करून त्यानंतरच हा करार करावा, अशी चर्चा पालिकेच्या मुख्य सभेतही झाली होती. घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना शक्य होत नसल्याने 'स्वच्छ'ची मदत घेतली जाते. 'स्वच्छ'बरोबरचा करार संपुष्टात आल्यानंतर पुन्हा या संस्थेबरोबर पाच वर्षाचा करार करण्याचा प्रस्ताव स्थायी समि‌तीसमोर ठेवला आहे. येत्या सोमवारी (१७ ऑगस्टला) होणाऱ्या स्थायी समि‌‌तीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

शहरातील घनकचरा व्यवस्थापनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कचरावेचक घरोघरी जाऊन कचरा गोळा करतात. त्यामुळे त्यांना प्रत्येक घरामागे तीस रुपयांऐवजी पन्नास रुपये नव्याने घेण्याचे करारामध्ये प्रस्तावित करण्यात आले आहे. प्रति झोपडीमागेही दरमहा ३० रुपये वसुलण्यात येणार आहेत. तसेच, प्रत्येक झोपडीमागे कचरावेचकाला १० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, असेही प्रस्तावात म्हटले आहे.

अधिक पैसे मागितल्यास कारवाई

पालिकेने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त पैसे कचरावेचकाने नागरिकांकडून घेतल्यास त्याची चौकशी करून त्याला कामावरून काढून टाकण्याचे अधिकार पालिका आयुक्तांना असणार आहे. या नवीन करारनाम्यामुळे नागरिकांना वर्षाला ३६० रुपयांऐवजी ६०० रूपये द्यावे लागणार आहेत.

समिती राजकीय नियंत्रणाखाली

'स्वच्छ'चे कामकाज योग्य पद्धतीने चालावे यासाठी सल्लागार समिती स्थापन केली जावी. या समितीच्या बैठका चार महिन्यांतून एकदा, तर वर्षातून तीनवेळा घेण्यात याव्यात, असे प्रस्तावात म्हटले आहे. या समितीमध्ये महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेता, पक्षनेते, महापालिका आयुक्त, सह महापालिका आयुक्त, आरोग्य प्रमुख, स्वच्छ संस्थेचे अध्यक्ष, स्वच्छचे सचिव, नागरी संघटनांचे प्रतिनिध‌ी यांच्यासह प्रकल्प संचालक, क्षेत्रीय आयुक्त, प्रशिक्षण तज्ज्ञ, कागद काच पत्र संघटनांचे सदस्य आदींचा समावेश असावा, असे प्रस्तावात म्हटले आहे. त्यामुळे समितीवर राजकीय व्यक्तींचे नियंत्रण राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

''स्वाइन फ्लू''ने महिलेचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्वाइन फ्लूच्या संसर्गाने पुणे जिल्ह्यातील एका ५४ वर्षांच्या महिलेचा पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. संसर्ग झाल्याने त्यांना काल सकाळी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा संसर्गाने मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्याबाबत पिंपरीच्या आरोग्य विभागाने स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याची नोंद केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिडे पुलावर चक्राकार वाहतूक

$
0
0

डेक्कन जिमखान्यावरील वाहतूक कोंडी रोखणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डेक्कन जिमखान्यावर 'आर-डेक्कन' मॉलसमोर होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी भिडे पूल-हॉटेल सुकांता ते डेक्कन 'पीएमपी' स्थानक, अशी चक्राकार वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. केळकर रोडवरील वाहनांना भिडे पुलावरून डेक्कनकडे जाण्यास मनाई करण्यात येणार आहे. तसेच, भिडे पुलावर चारचाकी वाहनांना बंदी घालण्याचाही प्रस्ताव विचाराधीन आहे. पुढील आठवड्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

भिडे पुलावर चक्राकार वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या वार्तालापप्रसंगी गुरुवारी दिली. 'पुढील काही दिवसांत प्रायोगिक तत्त्वावर ही चक्राकार वाहतूक करण्यात येईल. नागरिकांच्या हरकती आणि सूचनानंतर या प्रस्तावाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल,' अशी माहिती आवाड यांनी दिली.

भिडे पुलावरून डेक्कनकडे येणारे बहुतांश वाहनचालक फर्ग्युसन रोडकडे जाण्यासाठी जंगली महाराज रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे 'आर डेक्कन'समोर कोंडी होते. केळवर रोडवरून भिडे पुलावर येणाऱ्या वाहनचालकांना थेट डेक्कनकडे जाण्यासाठी मनाई करण्यात येणार आहे. या वाहनचालकांनी पुलाखालून डावीकडे वळून हॉटेल सुकांतासमोरून जंगली महाराज रोडवर जावे. जंगली महाराज रोडवरून गरवारे पुलाद्वारे फर्ग्युसन रोडचा वापर करण्यात येणार आहे.

तसेच, झेड ब्रिजकडून भिडे पुलावर जाणाऱ्या वाहनचालकांना नदीकाठच्या रस्त्याचा वापर करता येणार नाही. हॉटेल सुकांता शेजारून डेक्कन जिमखाना पीएमपी बसस्थानकापाठीमागील गल्लीचा वापर करावा लागणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक (नियोजन) आर. पी. शेरे यांनी दिली.

हॉटेल सुकांता परिसरात नो-पार्किंग

बाळासाहेब मोरे पथापासून (हॉटेल सुकांता गल्लीपासून) शेठजी कणीरामजी कासट पथापर्यंत डेक्कन जिमखाना बसस्टॉपच्या भिंतीलगतच्या उत्तरेला पार्किंग करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर, दक्षिण बाजूला सर्व प्रकारच्या वाहनांना नो-पा​र्किंग करण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांकडून चक्राकार वाहतुकीच्यादृष्टीने पहिले पाऊल उचण्यात आले आहे. त्यासाठी या परिसरात नो-पार्किंग करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दर्जेदार शिक्षकांच्या शोधासाठी समिती

$
0
0

'यूजीसी' चे माजी अध्यक्ष ​डॉ. अरुण निगवेकर अध्यक्षस्थानी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दर्जेदार शिक्षकांना उच्च शिक्षण संस्थांमध्ये कसे आकर्षित करता येईल, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एका समितीचीच नेमणूक केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत.

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने गेल्या महिन्यात याबाबतची ऑर्डर जारी केली आहे. 'यूजीसीतर्फे अनुदान मिळणाऱ्या संस्थांतील शिक्षक भरतीच्या आणि पदोन्नतीच्या नियमनाबाबत केंद्र सरकार आणि 'यूजीसी'ने विविध तरतुदी केल्या आहेत. मात्र, केंद्र सरकारचा निधी मिळणारी विद्यापीठे आणि कॉलेजांमध्ये शिक्षकांच्या रिक्त जागा ही मोठी समस्या होऊन बसली आहे,' असे या ऑर्डरमध्ये म्हटले आहे.

'विद्यापीठे आणि कॉलेजांतील शिक्षकांची थेट भरती आणि पदोन्नती नियंत्रित करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक आणि संशोधन योजनांसदर्भात विविध शिफारशी सरकारला प्राप्त झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर, उच्च शिक्षण संस्थांमध्ये दर्जेदार आणि गुणवान मनुष्यबळ टिकवण्यासाठी आणि नवे गुणवान शिक्षक आकर्षित करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येत आहे,' असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

'ही समिती आपला अहवाल दोन महिन्यांत सादर करेल. समितीला आपल्या कामासाठी स्वतःची प्रक्रिया आणि पद्धती तयार करता येईल. तज्ज्ञ व्यक्तींशी सल्लामसलत करण्याचीही समितीला मुभा असेल,' असे ऑर्डरमध्ये म्हटले आहे.

नेट पात्रतेबाबत फेरविचार?

शिक्षक भरतीसाठी असलेल्या पीएचडी-नेट पात्रतेचे मूल्यमापन करून शिक्षक निवडीसाठी एखादे धोरण ही समिती सुचवेल, असे अपेक्षित आहे. शिक्षकांची भरती आणि पदोन्नतीबाबतचे निकष ठरवण्यासाठी असलेल्या अॅकॅडेमिक परफॉर्मन्स इंडिकेटर (एपीआय) योजनेचे - त्यावर होणारी टीका लक्षात घेऊन - मूल्यमापन करून नवे पर्याय समिती मांडेल; तसेच हंगामी आणि कंत्राटी नियुक्त्यांबाबतच्या समस्येवरही समितीने उपाय सुचवणे अभिप्रेत असेल.
.....

'केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या या समितीबाबत मला माहिती मिळाली आहे. त्याच्या कामकाजाबाबत सविस्तर तपशील समजल्यानंतरच समितीचे काम सुरू होईल.'
- डॉ. अरुण निगवेकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images