Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अपघातांत इंजिनीअरसह तरुणी ठार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कात्रज-कोंढवा रोड तसेच मगरपट्टा रोडवर दुचाकींच्या दोन स्वतंत्र अपघातांत एका इंजिनीअरसह तरुणी ठार झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या दोन्हीही घटनांमध्ये टँकरचालकांविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मगरपट्टा रोडवर झालेल्या अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव दीपक सर्जेराव पोमण (वय २८, रा. सासवड) आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास घडला. पोमण एका खासगी कंपनीत इंजिनीअर होता. दिघी येथे कंपनीत नोकरीस जात असताना पेट्रोल टँकरने त्याला मगरपट्टा रोडवर चिरडले. या अपघातात तो जागीच ठार झाला. या प्रकरणी टँकरचालक राजू दयाराम सरोज (वय २८, रा. कदमवाकवस्ती, लोणी) याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती हडपसर ठाण्याचे सहायक निरीक्षक एस. बी. नाळे यांनी दिली.

दुसऱ्या घटनेत, कात्रज-कोंढवा रोडवर दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात तरुणी ठार झाली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. आसावरी अनिल पाटील (वय २०, रा. हडपसर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. आसावरी ही मयूर जावळकर (वय २०, रा. हडपसर) याच्यासह कोंढव्याच्या दिशेने जात होती. या वेळी कच्च्या रस्त्यावरून डांबरी रस्त्यावर जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मयूरची दुचाकी घसरली आणि दोघेही रस्त्यावर पडले. या वेळी पाठीमागून आलेल्या दुधाच्या टँकरने आसावरीला चिरडले.

कात्रज-कोंढवा रस्त्यावर आठ वर्षांत २७ बळी

कात्रज-कोंढवा रस्त्यावरून जड वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. नियोजन आराखड्यात हा रस्ता २६० मीटर मंजूर आहे. प्रत्यक्षात मात्र हा रस्ता केवळ ४० फूट आहे. गेल्या आठ वर्षांत या रस्त्यावर २७ बळी गेले आहेत. प्रगती फाउंडेशनचे प्रकाश कदम आणि त्यांचे सहकारी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. त्यांना कुठलीही दाद मिळत नसल्याने त्यांनी 'रास्ता रोको' आंदोलनही केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रपती ते प्रिय आजोबा...

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रॉकेट सायंटिस्ट ते महामहीम राष्ट्रपती... देशसेवेचा ध्यास घेतलेली एक व्यक्ती ते आपल्या मित्राच्या नातवासोबत गोल्फ खेळण्यासाठी त्याला थेट राष्ट्रपती भवनात बोलावणारे तितकेच प्रिय आजोबा... 'इस्रो'च्या मोहिमांमधून अंतराळ गाठतानाच 'जयपूर फूट'सारख्या सर्वसामान्यांसाठी उपयुक्त उपक्रमातून आपल्या मातीशी नाळ जोडून ठेवणारा एक सच्चा संशोधक...

दिवंगत राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची अशी विविध रूपे त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी पुणेकरांसमोर उलगडून दाखविली. डॉ. कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुक्तांगण विज्ञानशोधिकेने एका श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. या सभेमध्ये त्यांच्यासोबत काम केलेल्या आणि त्यांना अत्यंत जवळून अनुभवलेल्या पुण्यातील ज्येष्ठ वैज्ञानिकांनी त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. डॉ. शंकरराव गोवारीकर, डॉ. ई. व्ही. चिटणीस, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. गोविंद स्वरूप, डॉ. प्रमोद काळे या ज्येष्ठ शास्त्रज्ञांसह सार्थक चंद्रा या विद्यार्थ्यानेही या वेळी डॉ. कलाम यांच्याविषयी गौरवोद्गार काढले.

सुरुवातीच्या टप्प्यात 'इस्रो'च्या मोहिमांसाठी डॉ. कलाम यांची निवड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉ. चिटणीस म्हणाले, 'सुरुवातीला त्यांच्या बायोडेटामधून आमची ओळख झाली. त्यानंतरच्या टप्प्यात मी अनुभवलेले कलाम हे एक देशभक्त आणि आपले प्रत्येक काम अगदी झोकून देऊन करणारे एक शास्त्रज्ञ ठरले. माझ्या नातीला त्यांच्याविषयी कमालीचे आकर्षण होते. ते त्यांना समजल्यानंतर त्यांनी आम्हाला राष्ट्रपती भवनामध्ये बोलवून घेतले होते. तिच्याशी जवळपास पाऊण तास ते खेळले. सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरू शकणारी वैज्ञानिक संशोधने हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता.'

डॉ. कलामांच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्काराने झालेला सन्मान हा आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट क्षणांपैकी एक असल्याची भावना डॉ. नारळीकर यांनी व्यक्त केली. त्या वेळी डॉ. कलामांशी अनौपचारिक संवाद साधताना अवघडल्यासारखे झाले होते. मात्र, ही बाब जाणवल्यानंतर डॉ. कलाम यांनी दोघांनाही आवडत्या अशा विज्ञानप्रसाराचा विषय काढून आपल्याला बोलते केल्याची आठवण डॉ. नारळीकरांनी सांगितली. डॉ. कलाम राष्ट्रपती असताना 'आयुका'च्या त्यांच्या भेटीसाठी त्यांच्या कार्यालयाने केवळ १५ मिनिटांची वेळ दिली होती. प्रत्यक्ष भेटीदरम्यान 'आयुका'चे शालेय विद्यार्थ्यांसाठीचे कार्य पाहिल्यानंतर डॉ. कलाम यांनी या विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारताना जवळपास दोन तास घालविल्याची आठवणही त्यांनी नमूद केली. डॉ. गोवारीकर, डॉ. स्वरूप यांनीही या वेळी डॉ. कलामांसोबतच्या आठवणी सांगितल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कला जोपासण्यासाठी कलासंकुल उभारणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील प्रायोगिक नाट्य चळवळ आणि एकूणच कलाविषयक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी थिएटर अॅकॅडमी आणि महाराष्ट्रीय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कलासंकुल उभारण्यात येत आहे. नाटक, संगीत, नृत्य, चित्रकला, शिल्पकला या सर्व कला प्रकारांना हे संकुल पूरक ठरणार असून, येत्या दोन वर्षांत ते खुले होणार आहे.

गेल्या काही वर्षांत पुण्यातील नाट्यचळवळीकडून आश्वासक काम होत आहे. तसेच गायन, वादन, नृत्य आणि चित्रकला, शिल्पकलेतही सातत्याने वेगळे काम होत आहे. मात्र, या सर्वांना पूरक असे व्यासपीठ उपलब्ध नाही. नाट्यगृहांचे दर नाट्यसंस्थांना परवडत नाही. कलादालने पुरेशी नाहीत. तालमींसाठी जागा मिळत नाही. त्यामुळे कलावंतांना अडचणींना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर, सर्व कलांना पूरक असणारे कलासंकुल उभारण्यासाठी थिएटर अॅकॅडमीसारख्या मान्यवर संस्थेने पुढाकार घेतला आहे. ज्येष्ठ कलावंत माधुरी पुरंदरे यांच्या हस्ते नुकतेच या कलासंकुलाचे भूमिपूजन करण्यात आले. स्वारगेटजवळील गुलटेकडी येथे महाराष्ट्रीय मंडळाच्या जागेत सुमारे दोन एकरात हे संकुल आकाराला येत आहे. अविनाश नवाथे यांनी कलासंकुलाचा आराखडा तयार केला आहे.

थिएटर अॅकॅडमीचे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे यांनी या कलासंकुलाविषयी 'मटा'ला माहिती दिली. 'पुण्यातील कलाविषयक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने कलासंकुल उभारण्याची कल्पना पुढे आली. त्यासाठी मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए), पृथ्वी थिएटर, छबिलदास चळवळ अशा अनेक नाट्यगृहांचा अभ्यास करण्यात आला. सर्व कलाप्रकारांना पूरक ठरणाऱ्या या संकुलाचा आराखडा तयार झाला. राज्यभरात आदर्श ठरावे असे संकुल करण्याचा प्रयत्न असून हा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प आहे' असे त्यांनी सांगितले.

कलासंकुलमध्ये प्रायोगिक व व्यावसायिक नाटकांना उपयुक्त असा रंगमंच, गायन, वादन, नृत्य, अभिवाचन अशा कार्यक्रमांसाठी खुला रंगमंच, तालमींसाठी जागा करण्यात येईल. संकुलात २०१६च्या डिसेंबरपर्यंत सर्वप्रथम नाट्यगृहाचे काम पूर्ण होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बाकी काम करण्यात येईल. सुरुवातीच्या काळात नाममात्र शुल्कात प्रायोगिक नाट्यसंस्थांना नाट्यगृह दिले जाणार आहे. प्रायोगिक नाट्यसंस्थांना नवनिर्मितीसाठी बळ मिळावे, त्यांच्याकडून वेगळे काम घडावे असा हेतू त्यामागे आहे, असेही पुरंदरे यांनी स्पष्ट केले.

'थिएटर अॅकॅडमीचे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे यांनी या कलासंकुलाची कल्पना मांडली. ती कौतुकास्पद असल्याने आम्ही त्यासाठी जागा देण्याचा निर्णय घेतला. या संकुलाचा फायदा आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनाही होणार आहे,' असे मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आगामी संमेलन पिंपरीला होणार?

0
0

पुणेः आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान पिंपरी-चिंचवडला मिळण्याची शक्यता आहे. संमेलन आयोजित करण्यासाठी पिंपरी-चिंचवडहून दोन निमंत्रणे आली असून, नजीकता आणि खर्च विचार करता महामंडळाकडून पिंपरी- चिंचवडलाच पसंती दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

संमेलनासाठी महामंडळाला सर्वाधिक अकरा ठिकाणची निमंत्रणे आली होती. पिंपरी- चिंचवडहून आलेल्या दोन निमंत्रणांपैकी एक निमंत्रण डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानकडून, दुसरे निमंत्रण पिंपरी- चिंचवड कलारंग प्रतिष्ठान व महाराष्ट्र साहित्य परिषदेची पिंपरी चिंचवड यांनी संयुक्तरित्या दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त आगामी संमेलन बारामतीमध्ये होणार असल्याची चर्चा साहित्य विश्वात होती. बारामतीला संमेलन घेतल्यास महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची पवार यांच्याशी जवळीक असल्याची टीका होण्याची शक्यता लक्षात घेऊन बारामतीला संमेलन न घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भांड यांची अध्यक्षपदी निवड असंस्कृत, दुर्दैवी’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सरकारच्या फसवणुकीचा गुन्हा नावावर असलेल्या बाबा भांड यांची साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी झालेली निवड असंस्कृत आणि दुर्दैवी आहे. राज्य सरकारने ही नियुक्ती बरखास्त न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पुणेकर नागरी कृती समितीने पत्रकान्वये दिला आहे.

मराठी भाषेचा विकास, दर्जेदार साहित्य निर्मिती होण्याच्या उदात्त विचाराने तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली होती. मधु मंगेश कर्णिक यांच्यासारख्या मोठ्या साहित्यिकाने मंडळाचे अध्यक्षपद भुषविल्यानंतर भांड यांची त्या पदासाठी केलेली निवड लाजिरवाणी आहे. भांड यांची या पदासाठी निवड न करण्याचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांना पाठवण्यात आले होते, असेही समितीचे सचिव मिहिर थत्ते यांनी सांगितले.

विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्याबाबत दुमत नाही. मात्र, किमान लायक आणि सुसंस्कृत व्यक्तीची निवड अपेक्षित होती. सरकारच्या खडू, फळा योजनेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी भांड यांच्यावर गुन्हा दाखल आहे. त्याप्रकरणी त्यांना अटकही झाली होती. या पार्श्वभूमीवर, त्यांच्या चारित्र्याची पडताळणी न करता साहित्य संस्कृती मंडळासारख्या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करणे असंस्कृतपणा असल्याची टीकाही त्यांनी केली.

गजेंद्र चौहान बरे...

एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची निवड झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा संप सुरू आहे. देशभरात त्या संपाला पाठिंबाही मिळत आहे. मात्र, भांड यांच्या निवडीपेक्षा गजेंद्र चौहान यांची निवड बरी म्हणावी लागेल, असा उपरोधिक टोलाही थत्ते यांनी हाणला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मल्टिप्लेक्सवर ‘नजर’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील मल्टिप्लेक्स थिएटर्स, मल्टिस्क्रीन व एक पडदा चित्रपट चित्रपटगृहांमधील तिकीट विक्री, तिकिटांचे दर, त्यावरील टॅक्स व प्रेक्षकांची संख्या यावर आता करमणूक कर विभागाचा थेट वॉच राहणार आहे. ही माहिती आता करमणूक कर विभागाला ऑनलाइन मिळणार असल्याने करमणूक कर चुकवेगिरीच्या प्रकारांना आळा बसू शकणार आहे.

यासंदर्भातील एक सॉफ्टवेअर करमणूक कर विभागाने तयार केले असून जिल्हाधिकारी सौरव राव यांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर ते प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यात येणार आहे. शहरातील मल्टिप्लेक्स, मल्टिस्क्रीन व एक पडदा चित्रपटगृहांमध्ये नेमके किती प्रेक्षक येतात व किती तिकीट विक्री होते याची अचूक माहिती सध्या मिळत नाही. तसेच, तिकिटांचे दर व त्यावरील करमणूक कर याचाही अनेकदा मेळ लागत नाही. या उणिवांचा गैरफायदा घेऊन शहरातील सहा मल्टिप्लेक्सने मध्यंतरी करमाफी असताना प्रेक्षकांकडून बेकायदा करमणूक कर आकारणी केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित मल्टिप्लेक्स थिएटर्सला प्रेक्षकांकडून बेकायदा आकारणी केलेले ६८ कोटी ६५ लाख रुपये सरकारी तिजोरीत जमा करण्याची नोटीस करमणूक कर विभागाने बजावली आहे. अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये दररोज होणाऱ्या आर्थिक उलाढालीवर या नव्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून वॉच ठेवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंग्रजी शाळाचालकांचे राज्यभर आंदोलन

0
0

पुणेः शिक्षणहक्क कायद्यातील थकित फी परताव्यासाठी राज्यभरातील इंग्रजी शाळांच्या संस्थाचालकांनी शुक्रवारी पुण्यात आंदोलन केले. शिक्षण आयुक्तांनी फी परतावा मिळवून देण्यासाठी पावले उचलण्याचे आश्वासन दिल्यानंतरच 'महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन'ने (मेस्टा) छेडलेले हे आंदोलन मागे घेतले.

शिक्षणहक्क कायद्यातील २५ टक्क्यांच्या तरतुदीच्या आधारे शाळांमध्ये प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून शाळांना फी परतावा दिला जातो. गेल्या तीन वर्षांमध्ये 'मेस्टा'शी संलग्न असलेल्या शाळांमधून जवळपास एक लाख २६ हजार प्रवेश झाले. या प्रवेशांसाठी फी परतावा म्हणून जवळपास ११७ कोटी रुपये शाळांना मिळणे अपेक्षित आहे. मात्र, राज्य सरकारकडून त्यासाठी कोणतीही पावले उचलली जात नसल्याने 'मेस्टा'ने आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार राज्यभरातील जवळपास एक हजार संस्थाचालक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. आंदोलकांनी सेनापती बापट रोडवर काढलेल्या या मोर्चामुळे सायंकाळी चार वाजल्यानंतरच्या काळात वाहतूक कोंडी झाली होती. अखेर पोलिसांनी धावाधाव करत ही कोंडी दूर केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन दिवसांत २४ रेल्वे रद्द

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातून मध्य प्रदेशात जाणाऱ्या आणि तेथून पुण्यामार्गे अन्य ठिकाणी जाणाऱ्या येत्या तीन दिवसांतील २४ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेशातील खिरकिया व भिरंगी स्टेशनमध्ये कामयानी व जनता एक्स्प्रेसला मंगळवारी झालेल्या अपघातामुळे हा बदल करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातील हरदापासून ३२ किलोमीटर अंतरावर असलेल्या खिरकिया-भिरंगी स्टेशनमध्ये रेल्वे रुळाखालील माती वाहून गेल्याने या दोन्ही गाड्यांचे प्रवासी डबे रुळावरून खाली घसरून अपघात झाला होता. त्यामध्ये अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला. आता तेथे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, त्याचा अन्य मार्गांवरदेखील परिणाम झाला आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कामादरम्यान येत्या तीन दिवसांत काही रेल्वे रद्द करण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

शनिवारी रद्द केलेल्या गाड्या : गोरखपूर-पुणे एक्स्प्रेस, चंडीगड-यशवंतपूर एक्स्प्रेस, यशवंतपूर-चंडीगड एक्स्प्रेस, पुणे-गोरखपूर एक्स्प्रेस, नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेस.

रविवारी रद्द केलेल्या गाड्या : लखनौ-पुणे एक्स्प्रेस, पुणे-पाटणा एक्स्प्रेस, पुणे-अमरावती एक्स्प्रेस.

सोमवारी रद्द केलेल्या गाड्या : निजामुद्दीन-म्हैसूर एक्स्प्रेस, पुणे-मंडुआडीह एक्स्प्रेस, कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेस, अमरावती-पुणे एक्स्प्रेस.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हक्काच्या शिक्षणात एजंट

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालकांचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असल्याचे भासवून, त्यांच्या पाल्याची 'आरटीई'अंतर्गत शिक्षणाची मोफत सोय करून देणाऱ्या एजंटांचा राज्यभरात सुळसुळाट झाला आहे. एजंटांना हजारो रुपयांचा मलिदाही मिळतो आहे. आपल्या पाल्याला चांगल्या शाळेत पुढील आठ ते दहा वर्षे मोफत शिक्षणाची सोय होत असल्याने पालकही या एजंटांच्या तुंबड्या भरत आहेत.

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) एक लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांमधील बालकांना पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षणाची सुविधा राज्यात उपलब्ध झाली आहे. त्यासाठी अशा बालकांना शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश दिले जात आहेत. हे प्रवेश घेताना उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे पालकांसाठी 'आरटीई'नुसार बंधनकारक आहे. याच अटीचा दुरुपयोग करत हे एजंट काम करत असल्याची माहिती 'महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन'चे संस्थापक अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी 'मटा'ला दिली.

हे एजंट पालकांना 'आरटीई'च्या नियमांमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन करत आहेत. आपल्या पाल्याच्या शिक्षणाचा जवळपास आठ वर्षांच्या शिक्षणाचा खर्च वाचणार असल्याने पालकही या आवाहनाचा विचार करून, या एजंटांनी सांगितलेल्या मार्गाने प्रवेश घेत आहेत.

हे एजंट पालकांना उत्पन्नाचे खोटे दाखले मिळवून देत आहेत. या दाखल्यांवर नोंदविलेल्या उत्पन्नाचा विचार करून शाळांमधूनही या पालकांच्या पाल्यांचा २५ टक्क्यांच्या प्रवेशांसाठी विचार होत असल्याचे तायडे पाटील यांनी सांगितले.

पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्येही...

राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधून कमी-अधिक प्रमाणात हे प्रकार होत आहेत. मात्र, उत्पन्नाच्या प्रमाणपत्रांची सत्यता पडताळण्यासाठी वा त्या विषयी शंका घेण्यासाठी संस्थाचालकांकडे तशी कोणतीही यंत्रणा हाताशी नसल्याने संस्थाचालकही या प्रवेशांना अटकाव करू शकलेले नाहीत. वेळप्रसंगी शालेय कामकाजाचा जवळून अनुभव घेतलेले लोकच अशा प्रकारचे एजंट बनले आहेत. अनेक चांगल्या घरातील आणि तुलनेने उच्च राहणीमान असणाऱ्या घरातील मुलेही या मोफत प्रवेशांचा लाभ घेत असून, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्येही हे प्रकार अनुभवायला मिळत असल्याचे असोसिएशनचे पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र सिंग यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डझनभर गुन्ह्यांतील साखळीचोर अटकेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुन्हे शाखेने सोनसाखळी चोरी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. या चोरट्यांनी शहरात साखळीचोरीचे १२ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या असा साडेसहा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या कारवाईमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुन्ह्यांची संख्या शंभरने घटली आहे. साफीर उर्फ शब्बीर फिरोज खान उर्फ इराणी (वय २६, रा. सिंहगड कॉलेज रोड, दत्तवाडी, लोणावळा), हसन सादीक शेखूअली बेग

उर्फ इराणी (वय १९, रा. शिवाजीनगर, परळी वैजनाथ) अशी अटकेतील चोरांची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलिस निरीक्षक सुनील पवार यांच्या पथकातील कर्मचारी जावेद पठाण यांना चोरट्यांबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पिंपळेगुरवमधून त्यांना अटक करण्यात आली. साफीर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून साखळीचोरीच्या २२ गुन्ह्यांत तो पोलिसांना हवा होता. अशी माहिती पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील आणि सहायक आयुक्त राजेंद्र जोशी यांनी दिली.

दुचाकींना तावीज

साखळीचोरी करणारे इराणी आरोपी दुचाकीला तावीज बांधत असल्याचे निरीक्षण कर्नाटक पोलिसांनी आंतरराज्य परिषदेत नोंदवले होते. पुणे पोलिसांनी पकडलेल्या आरोपींच्या दुचाकीला तावीज असल्याचे आढळून आले आहे. अंधश्रद्धेतून हा तावीज बांधण्यात येत असल्याचेही पाटील म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकार खात्यातील तीन अधिकारी निलंबित

0
0

पुणे ः बदली झालेल्या पदावर रूजू न झाल्यामुळे सहकार खात्यातील तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा आदेश राज्य सरकारने काढला आहे. सहकारी संस्थांचे विशेष लेखापरीक्षक आर. जे. देशमुख, प्रादेशिक उपसंचालक एम. सी. पाडवी आणि पणन उपसंचालक साधना देशमुख अशी निलंबित अधिकाऱ्यांची नावे आहेत. देशमुख यांची नाशिक येथे द्वितीय लेखापरीक्षक म्हणून मार्च २०१५मध्ये बदली करण्यात आली. मात्र, बदलीनंतर ते नव्या पदावर रूजू झालेच नाहीत. साधना देशमुख यांची विभागीय उपनिबंधक कोकण विभाग येथे बदली करण्यात आली. मात्र, बदलीआदेशानंतरही त्या हजर झाल्या नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सोशल’ महापौरांची पाऊण लाखांची हौस

0
0

पुणेः शहराचे प्रथम नागरिक महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी घेतलेले निर्णय, दैनंदिन घडामोडी पुणेकरांपर्यंत पोहचविण्यासाठी होत असलेला उशीर टाळण्यासाठी 'सोशल मीडिया'द्वारे प्रसिद्धी केली जाणार आहे. हे काम करण्यासाठी खासगी संस्था नेमण्यात येणार असून, महापौरांच्या हौसेसाठी पालिकेला पाऊण लाखांचा खर्च करावा लागणार आहे.

पुणे महापालिकेकडून शहराच्या हि‌तासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले जातात. महापौरांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी, यासाठी फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन आदी सोशल माध्यमांचा उपयोग केला जातो. धनकवडे यांनी घेलेले निर्णय नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचत नसल्याने खासगी संस्था नेमून त्यांना पैसे देण्याचा घाट घातला जात आहे. महापौरांच्या निर्णयाची प्रसिद्धी करण्याचे काम या पूर्वी नागरवस्ती विभागाच्यावतीने केले जात होते. त्यासाठी स्मार्ट संस्थेकडून अण्णासाहेब यादव यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना दरमहा १२ हजार रुपये वेतनही दिले जात होते. यादव यांनी २७ दिवस महापौरांचे सोशल अकाउंट सांभाळल्यानंतर महापौरांच्या सूचनेनुसार या कामासाठी संस्था नेमण्यासाठीचा पत्रव्यवहार सुरू केला.

या कामासाठी टेंडर प्रक्रिया न राबविता सोशल मीडियाचे काम पाहणाऱ्या ठराविक संस्थांकडून कोटेशन मागविण्यात आले. त्यामध्ये तीन संस्थांनी महापौर धनकवडे यांच्याशी चर्चा करून आपले कोटेशन सादर केले. त्यामध्ये ‌व्हि. व्हि. ब्रास इंटरनॅशनल या कंपनीने वार्षिक दीड लाख रुपयांचा प्रस्ताव ​दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याच्या प्रस्तावामुळे एक शहर वगळणार?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतून पुणे-पिंपरी चिंचवडला वेगळे करायचे झाल्यास या पूर्वी जाहीर केलेल्या एका शहराचा पत्ता 'कट' होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याकडून त्याबाबत चालढकल करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, शनिवारी पुण्यात असून, पुणेकरांची स्वतंत्र प्रस्तावाची मागणी मान्य करून पुण्याला न्याय देणार का, अशी विचारणा होत आहे.

राज्य सरकारने स्मार्ट सिटीसाठी १० शहरांची शिफारस करताना पुणे-पिंपरीचा संयुक्त प्रस्ताव सादर केला. त्यावरून, पुण्यावर अन्याय झाल्याची सार्वत्रिक भावना पसरली आहे. राज्याने अंतिम १० शहरांची यादी पाठवावी, अशा सूचना केंद्राने दिल्या आहेत. शुक्रवारी त्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु, यापूर्वीच दहा शहरांची निवड जाहीर केल्याने पुणे-पिंपरी स्वतंत्र केल्यास कोणत्या शहराला वगळायचे, असा पेच राज्य सरकारसमोर निर्माण झाला आहे.

तीन वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने मुख्यमंत्री शनिवारी पुण्यात येत आहेत. या वेळी, पुणे-पिंपरीच्या हितासाठी दोन्ही शहरांचे स्वतंत्र प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. दोनच दिवसांपूर्वी पुण्याच्या महापौरांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असता, केंद्र सरकारच त्यावर निर्णय घेईल, असे संकेत फडणवीस यांनी दिले होते. मात्र, केंद्राने हात झटकले असून, सरकारनेच दहा शहरांची यादी अंतिम करून पाठवावी, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे, आता सरकारच्या भूमिकेकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

अन्य राज्यांकडून मागणीची शक्यता

राज्याने निवडलेल्या सर्व शहरांचा समावेश करायचा झाल्यास, ११ शहरांचा प्रस्ताव केंद्राला मान्य करावा लागेल. दोन शहरांचा एकत्रित प्रस्ताव सादर करण्याचा 'प्रयोग' करणाऱ्या राज्यातील ११ शहरांना केंद्राने मंजुरी दिल्यास, देशातील इतर राज्यांकडूनही अधिक शहरांना मान्यता देण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. एका 'स्मार्ट' खेळीमुळे निर्माण झालेला तिढा सुटणार कसा, अशी परिस्थिती आता उद्भवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक प्रभाग पद्धतीने

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकांच्या निवडणुका स्वतंत्र वॉर्ड पद्धतीने घेण्याचे विधेयक मंजूर केल्यानंतर अवघ्या चार महिन्यांतच पुन्हा या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याच्या हालचाली राज्य सरकारमध्ये सुरू झाल्या आहेत.

बहुसदस्यीय पद्धतीने निवडणुका घेतल्यास महापालिकांमध्ये राजकीय फायदा होईल, असा मतप्रवाह सत्ताधारी भारतीय जनता पक्षात असल्यामुळे पुन्हा संबंधित बदलांची तयारी सुरू झाल्याचे समजते. राज्यात गेल्या काही काळात महापालिकांच्या निवडणुकांमध्ये कधी बहुसदस्यीस प्रभाग पद्धत, तर कधी स्वतंत्र वॉर्ड पद्धत लागू करण्यात येत आहे. या पूर्वी २००२ मध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यात आली होती. त्यानंतर २००७ मध्ये पुन्हा एकल वॉर्ड करण्यात आले.

गेल्या निवडणुकीत पन्नास टक्के महिला आरक्षण लागू झाल्यानंतर पुन्हा द्विसदस्यीय प्रभाग पद्धत लागू झाली. त्यानंतर या पद्धतीच्या विरोधात कोर्टात धाव घेण्यात आली. कोर्टानेही बहुसदस्यीय पद्धतीच्या विरोधात निकाल दिला. या पार्श्वभूमीवर गेल्या मार्च महिन्यातच पुन्हा सिंगल वॉर्ड पद्धतीने निवडणुका घेण्याचे विधेयक विधिमंडळात मंजूर करण्यात आले. त्यानुसार आता वॉर्डरचना करण्याची वेळ आलेली असतानाच पुन्हा बहुसदस्यीय पद्धतीसाठी हालचाली सुरू झाल्याचे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

गेल्या काही काळात एकल वॉर्ड डोळ्यासमोर ठेवून तयारीला लागलेले नगरसेवक आणि अन्य हजारो इच्छुकांमध्येही नव्या चर्चेमुळे खळबळ उडाली आहे. या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये वेगळा मतप्रवाह आहे. या पूर्वी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या मतदानाचा पॅटर्न लक्षात घेतल्यास बहुसंख्य मते ही तेथील उमेदवारांकडे पाहून मिळालेली नसून, पक्षाच्या चिन्हाचा त्यात मोठा वाटा आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. प्रभाग पद्धतीने महापालिकांच्या निवडणुका घेतल्या, तर एका प्रभागातील उमेदवारांमध्ये एखाद-दुसरा उमेदवार कच्चा असला, तरी या पद्धतीत त्याला इतर भागातील पक्षचिन्हावरील मते मिळतात आणि विजयाची शक्यता वाढते, असे आढळून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग करावा, अशा प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आळंदी रोडवरील बीआरटी महिनाभर मोफत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संगमवाडी-विश्रांतवाडी रस्त्यावरील (आळंदी रोड) जलद बस वाहतूक योजनेच्या (बीआरटी) औपचारिक उद्घाटनानंतर प्रवाशांना महिनाभर मोफत प्रवास करता येणार आहे. पुणे स्टेशन आणि महापालिका भवन येथून विश्रांतवाडीला जाणाऱ्या प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) संचालक मंडळाच्या बैठकीत शुक्रवारी मोफत बससेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. 'बीआरटी'च्या उद्घाटनाची तारीख येत्या दोन दिवसांत अंतिम करण्यात येणार असून, त्यानंतर महिनाभर आळंदी रोडवरील बसप्रवास प्रवाशांना मोफत करता येणार आहे. 'बीआरटी सेवेचा अनुभव लोकांना घेता यावा, तसेच सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढावा, या हेतूने बससेवा महिनाभर मोफत असेल,' असे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सांगितले. आळंदी रोडवरील 'बीआरटी'चे औपचारिक उद्घाटन १५ ऑगस्टनंतर करण्यात येणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.

'शहराच्या कोणत्याही भागांतून प्रवास करणाऱ्या नागरिकांना स्टेशन आणि मनपा येथून विश्रांतवाडीपर्यंतचे तिकीट काढावे लागणार नाही,' असे 'पीएमपी'ने स्पष्ट केले आहे. प्रवाशांना 'बीआरटी'ची सवय व्हावी, यासाठी सुरुवातीच्या काळात सेवा मोफत देण्याचा प्रयोग अहमदाबाद येथे राबवण्यात आला होता. त्याच धर्तीवर 'पीएमपी'ने हा निर्णय घेतला आहे. मोफत सेवेला प्रवाशांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

'आळंदी रोड मार्गावर 'पीएमपी'ला दररोज सरासरी १० ते १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. महिनाभर मोफत सेवा दिल्यास सुमारे चार ते साडेचार कोटींचा भार 'पीएमपी'वर पडणार आहे. पुणे महापालिकेमार्फत हा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे,' अशी माहिती 'पीएमपी'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी दिली. पिंपरी-चिंचवडमधील औंध ते रावेत या मार्गावरील बीआरटीचे कामही अंतिम टप्प्यात असून, तेथेही पुढील आठवड्यापासून ट्रायल रन घेण्याचे संकेत कृष्णा यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चरित्रकोश मंडळाची जमीन सरकारजमा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय चरित्रकोश मंडळाची शिवाजीनगरमधील एक एकर जमीन सरकारजमा करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात करण्यात आलेले अपील अतिरिक्त आयुक्त श्याम देशपांडे यांनी फेटाळले आहे. ही जमीन ग्राहक न्यायालय आणि पुणे उपविभागीय अधिकारी कार्यालयासाठी वितरित करण्यात आली आहे.

भांबुर्डा (शिवाजीनगर) येथील सर्व्हे क्रमांक १३२वरील चाळीस हजार चौरस फूट (एक एकर) सरकारी जमीन भारतीय चरित्रकोश मंडळाला १९६२ मध्ये विविध उपक्रमांसाठी वितरित करण्यात आली होती. या वाटपानंतर जमिनीचा निर्धारित कालावधीत वापर करण्याची अटही सरकारने घातली होती. परंतु, चरित्रकोश मंडळाने जमिनीचा वापर केला नाही.

भारतीय चरित्रकोश मंडळाला दिलेल्या जमिनीचा वेळेत वापर न केल्याने २००३मध्ये ती सरकारजमा करण्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी काढले होते. तसेच, या जमिनीचा ताबाही घेण्यात आला होता. दरम्यान, चरित्रकोश मंडळाने जमीन वापरासाठी मुदतवाढीची मागणी विभागीय आयुक्तांकडे केली. ही मागणी मान्य करताना आगामी दोन वर्षांत मंडळाने जमिनीचा वापर करण्याच्या अटीवर मुदतवाढ देण्यात आली. परंतु, त्यानंतरही चरित्रकोश मंडळ जमिनीचा वापर करण्यात असमर्थ ठरले. भारतीय चरित्रकोश मंडळाकडून सरकारी जमीन वापराचा शर्तभंग झाल्याने जिल्हाधिकारी सौरव राव यांनी जमीन सरकारजमा करण्याचे आदेश काढले आणि लगेचच जमिनीचा ताबाही घेतला. या जमिनीच्या प्रॉपर्टी कार्डवर सरकारची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ ही जमीन ग्राहक न्यायालय आणि पुणे उपविभागीय अधिकारी कार्यालयासाठी देण्यात आली.

ग्राहक न्यायालयाचा मार्ग मोकळा

शर्तभंगामुळे जमीन सरकारजमा करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात चरित्रकोश मंडळाने अतिरिक्त आयुक्त श्याम देशपांडे यांच्याकडे अपील केले. या अपिलावर सुनावणी घेण्यात आली. त्यात देशपांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला. चरित्रकोश मंडळाचे अपील फेटाळल्यामुळे या जमिनीवर ग्राहक न्यायालय आणि पुणे उपविभागीय अधिकारी कार्यालय सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक्स्प्रेस-वे’वर पुन्हा दरड

0
0

लोणावळाः 'एक्स्प्रेस वे'वरील दरडसंकट अजूनही कायम असून, डागडुजीच्या मोहिमांमध्ये शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आडोशी बोगद्याजवळ पुन्हा दरड कोसळली. त्यामुळे मुंबईकडून पुण्याला येणारी जड वाहनांची वाहतूक काही तास ठप्प झाली होती.

प्रवाशांची अडचण लक्षात घेता आज (शनिवार) आणि रविवारी एक्स्प्रेस वे बंद ठेवण्यात येणार नाही, असे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे; मात्र यामुळे वाहतुकीचा वेग मंदावणार आहे. लोणवळा आणि घाट परिसरामध्ये रांगा लागतील. अशा परिस्थितीत प्रवाशांनी लेनची शिस्त पाळून नियमनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दरड कोसळली, तरी ती महामार्गावर येऊ नये, यासाठी आडोशी बोगद्याच्या परिसरामध्ये एक किलोमीटर लांबीची भिंत उभारण्यात येणार आहे. त्याची उंची सुमारे दहा फूट असेल. या भिंतीमुळे काम सुरू असताना रस्तादेखील सुरू ठेवणे शक्य होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

रस्ते विकास महामंडळाची दरड मोहीम आज शनिवारी संपणार होती; पण नव्याने दरडी कोसळल्याने या मोहिमेचा फज्जा उडाला आहे. त्यामुळेच आता पुढील महिनाभर तरी या दरडसंकटाला तोंड द्यावे लागणार आहे, अशी शक्यता वाहतूक पोलिसांनी वर्तवली. संरक्षक उपाययोजनांमुळे दरड कोसळल्यानंतर काही तासांतच वाहतूक पूर्ववत करणे शक्य झाले, असे महामार्गाचे सहायक पोलिस निरीक्षक मोहन चाळके यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांवर कारवाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'च्या (एफटीआयआय) नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी झालेल्या गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला विरोध करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून संपावर असलेल्या तेथील विद्यार्थ्यांवर गुरुवारी कारवाई करण्यात आली. अभ्यासक्रम संपूनही वसतिगृहात राहणाऱ्या ३० विद्यार्थ्यांना आपली खोली रिकामी करण्याची नोटीस बजावण्यात आली. त्याचबरोबर २००८च्या तुकडीतील विद्यार्थ्यांचे अपू्र्ण असलेले 'फायनल प्रोजेक्ट' आहेत त्या स्थितीत तपासण्याचा निर्णय घेण्यात आला.

संस्थेचे संचालक प्रशांत पाठराबे यांनी ही माहिती दिली. 'अधिक काळ वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तीस असल्याचे आढळून आले. तेरा जणांना यापूर्वी नोटीस देण्यात आली. त्यातील काहींनी वसतिगृह सोडले आहे. आता उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना तत्काळ वसतिगृह सोडण्यास सांगण्यात आले आहे. या निर्णयाची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे,' असे पाठराबे यांनी सांगितले.

'संस्थेतील २००८च्या बॅचच्या ५० विद्यार्थ्यांनी त्यांचे 'फायनल प्रोजेक्ट्स (डिप्लोमा फिल्म्स, शोधनिबंध) पूर्ण केलेले नाहीत. आतापर्यंत अनेकदा त्यांना वेळ देऊनही ते पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे संबंधित शिक्षकांशी चर्चा करून आहेत त्या स्थितीत हे प्रोजेक्ट तपासून पुढील कार्यवाही केली जाईल,' असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या संपाचा फटका संस्थेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना बसला आहे. संपामुळे काहीच शैक्षणिक कामकाज होत नसल्याने काम नसलेल्या ८२ कर्मचाऱ्यांना एक सप्टेंबरपासून कमी करण्यात येणार आहे; मात्र ही कारवाई तात्पुरती असेल, असे पाठराबे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई-पुणे बायपासवर टँकर उलटला

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

मुंबई-पुणे बायपासवर आर. एम. डी कॉलेजजवळ डुक्करखिंडीच्या अलिकडे सकाळी ६.३० वाजता साता-याच्या दिशेने जात असलेला एलपीजी गॅसचा टँकर उलटला. अपघात झाल्यामुळे मुंबई-पुणे बायपासवर वाहतूक मंदावली.

अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिस आणि भारत गॅस कंपनीचे पथक घटनास्थळी पोहोचले. उलटलेला टँकर ४ क्रेनच्या मदतीने सरळ करण्यात आला. अपघातामुळे टँकरमधून सुरु झालेली गॅसगळती बंद करण्यात आली. सुरक्षेचे उपाय केल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाची प्रतीक्षा कायमच

0
0

पुणे : शहरात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत असल्या, तरी दमदार पावसाचा रूसवा अजूनही कायम आहे. शहरात शनिवारीही हलक्या पावसानेच हजेरी लावली. आगामी तीन दिवसांतही शहरात तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सध्या छत्तीसगडचा उत्तर भाग व लगतच्या परिसरावर वातावरणाच्या वरच्या थरात हवेची चक्राकार स्थिती आहे. तसेच, बंगालच्या उपसागराच्या पश्चिममध्य भागावरही हवेची चक्राकार स्थिती आहे. त्यामुळे विदर्भासह उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाच्या प्रमाणात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. शनिवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. शनिवारी विदर्भातही मुसळधार पाऊस झाला.

पुण्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. रात्री साडेआठपर्यंत शहरात केवळ ०.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर सायंकाळी साडेपाचपर्यंत राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद चंद्रपूर येथे ( ४९ मिलिमीटर) झाली. अमरावती येथे ४२, महाबळेश्वर येथे १७, तर मुंबई येथे ९ मिमी पावसाची नोंद झाली. शनिवारी रात्रीपर्यंतचा पाऊस (मिमी) : पुणे- ०.२, चंद्रपूर- ४९, अमरावती- ४२, महाबळेश्वर- १७, मुंबई- ९.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images