Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘अजित’दादांवर संधान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराची पाठराखण करीत असल्याचा आरोप करीत त्यांच्याविरोधात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने टिकेचे अस्त्र उपसले आहे. ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असणाऱ्या अजितदादांना पालिकेतील भ्रष्टाचार किरकोळ वाटत आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे. तर, पालिकेतील भ्रष्टाचाराला अजितदादांची संमती असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. आनंद जगदाळे यांच्यावरील कारवाई सौम्य करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. तसेच याबाबतचा अधिकार महापालिका सर्वसाधारण सभेचा असल्याचेही स्पष्ट केले. त्यासंदर्भात शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पवार यांच्या भूमिकेचा शहर शिवसेना निषेध करीत आहे. वास्तविक, 'एचबीओटी'चे ७० लाख रुपयांचे मशीन दोन कोटी ७८ लाख रुपयांना खरेदी केल्याप्रकरणी राज्य सरकार आणि महापालिकेने डॉ. जगदाळे यांच्यावर दोषारोप पत्र दाखल केले. त्यामुळे डॉ. जगदाळे यांची सेवानिवृत्तीचे शंभर टक्के रक्कम राखून ठेवली आहे. तरीही नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत डॉ. जगदाळे यांच्या सेवानिवृत्ती वेतनातून पाच वर्षांसाठी २० ऐवजी दहा टक्केच रक्कम राखून ठेवावी, अशी उपसूचना राष्ट्रवादी काँग्रेसने मंजूर केली. त्याला विरोध असताना आणि मतदानाची मागणी केली असता ती धुडकावून लावली. तसेच तीन नगरसेविकांना निलंबित केले. त्याचे समर्थन पवार करीत असल्याचा धक्का बसला. त्यांना हा भ्रष्टाचार किरकोळ वाटत असावा.'

अजित पवार यांच्या भूमिकेविषयी तीव्र नाराजी व्यक्त करीत भाजपचे सारंग कामतेकर म्हणाले, 'गेल्या दहा वर्षांत झालेल्या भ्रष्टाचाराला पवार यांची संमती असावी. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेतेच भ्रष्टाचाराचे उघडपणे समर्थन करू लागल्याने जनतेने काय बोध घ्यायचा? असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे पवारच भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचे दिसून येते. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन, बीआरटीएस, पूररेषेचे नकाशे, ताथवडे विकास आराखडा, वायसीएम रुग्णालयासाठी खरेदी ही उदाहरणे देता येतील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हिपेटायटिसविरोधी औषधे फेब्रुवारीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'हिपेटायटिस सी' विषाणूंचा संसर्ग झालेल्या पेशंटसाठी गुड न्यूज आहे. विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता प्रतिबंधक, परिणामकारक आणि विशेष म्हणजे दुष्परिणाम नसलेली दोन ते तीन औषधे आगामी फेब्रुवारी महिन्यात बाजारात उपलब्ध होणार आहेत. या औषधांमुळे उपचाराचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार असून, पेशंट बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढण्यास मदत होणार आहे.

शहरातील गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट तज्ज्ञांनी पेशंटसाठी असलेली 'गुड न्यूज' 'मटा'ला सांगितली. 'हिपेटायटिस सी विषाणू नियंत्रित करण्यासाठी वर्षभर उपचार घ्यावे लागत होते. मात्र, अमेरिकेतील एका संशोधकाने शोधलेली काही महागडी औषधे देशात उपलब्ध झाली. परिणामी, उपचारपद्धती सोपी झाली. तोंडावाटे १२ ते २४ आठवड्यांपर्यंतच ही औषधे घ्यावी लागत आहेत. अमेरिकेत ६४ हजारांना मिळणारे 'सोफोस ब्युव्हीर' हे औषध अवघ्या ८०० रुपयांत मिळणे शक्य झाले. परंतु, याहीपेक्षा आणखी परिणामकारक आणि कोणतेही दुष्परिणाम नसणारी दोन ते तीन औषधे फेब्रुवारी २०१६मध्ये उपलब्ध होणार आहेत.

'या नव्या औषधांमुळे हिपेटायटिसच्या उपचारांवरील खर्च पेशंटच्या आवाक्यात येईल. तसेच उपचारानंतर पेशंट बरे होण्याचे प्रमाण ८० ते ८५ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे, ' अशी माहिती गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. परिमल लवाटे यांनी दिली. हिपेटायटिसवरील औषधांसाठी पूर्वी काही लाखांपर्यंत खर्च येत होता. ही औषधे घेतली नाही, तर यकृत निकामी होण्याची भीती आहे. औषधोपचारांचा खर्च वेळीच केल्यास तो परवडणारा आह, असा सल्लाही डॉ. लवाटे यांनी दिला.

पुण्यात हिपॅटायटिसचे दरमहा चार ते सहा पेशंट आढळतात. पेशंट बरे होण्याचे सध्याचे प्रमाण ३० टक्के आहे. फेब्रुवारीत येणाऱ्या औषधांमुळे पेशंट बरे होण्याचे प्रमाण ८० ते ८५ टक्क्यांपर्यंत पोहोचेल.

- डॉ. परिमल लवाटे, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणाधिकारी नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील ४९ शिक्षणाधिकाऱ्यांच्या वादग्रस्त नियुक्त्यांचा घोळ समोर येत आहे. त्या विरोधात खात्यातील अधिकाऱ्यांची दोन वर्षांपासून साधी चौकशीही झाली नसल्याची बाब उघड झाली आहे. शिक्षण आयुक्तालयासारख्या महत्त्वाच्या कार्यालयामधूनही आयुक्तांच्या परस्पर काही व्यवहार होत असल्याने आयुक्तालयाचा कारभारही वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

'एमपीएससी'ने राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांच्या ७४ पदांसाठी २०१० ध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. बी.एड. अभ्यासक्रमानंतर सात वर्षे वा त्यापेक्षा अधिक काळ शैक्षणिक कार्याचा अनुभव असलेले उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले होते. लेखी परीक्षेनंतर मुलाखतीसाठी २८० उमेदवार पात्र ठरले होते.

मुलाखतीनंतर 'एमपीएससी'ने ७१ उमेदवारांची शिफारस राज्य सरकारकडे केली होती. मात्र, त्यापैकी ४९ उमेदवारांच्या प्रमाणपत्रांवर आक्षेप घेऊन बी. के. गुंजाळ यांनी गुणवंत उमेदवारांना न्याय मिळवून देण्याची मागणी शिक्षण खात्याकडे केली होती.

त्यासाठी गुंजाळ यांनी गेल्या दोन वर्षांपासून राज्याचे तत्कालीन माध्यमिक शिक्षण संचालक, राज्यात शिक्षण आयुक्तांचे पद अस्तित्त्वात आल्यानंतर आयुक्त कार्यालय, शिक्षण खात्याचे अवर सचिव, राज्याचे मुख्यसचिव, उपमुख्यमंत्री आणि शेवटी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडेही वेळोवेळी पुराव्यांनिशी पत्रव्यवहार केला. त्यानंतरही या वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या कागदपत्रांची साधी पुनर्पडताळणीही झाली नसल्याची तक्रार गुंजाळ यांनी केली.

आदेशाला केराची टोपली

शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव र. प्र. आटे यांनी ९ जानेवारी, २०१४ आणि १५ नोव्हेंबर, २०१४रोजी अनुक्रमे राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक आणि आयुक्त कार्यालयाला अतितत्काळ म्हणून या प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. प्रत्यक्षात अशी कोणतीही कारवाई झाली नाही. या बाबत चौकशी करण्यासाठी राज्याचे सध्याचे आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांची भेट घेतली असता, या संदर्भात कोणतीही कागदपत्रे आपल्याकडे आली नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, यापूर्वीच्या काळात आयुक्तांच्या याच कार्यालयाकडून दोन वर्षांपासूनच्या काळात संबंधित अधिकाऱ्यांकडून खुलासे मागविण्यात आल्याचे सांगण्यात येत होते, असा दावाही गुंजाळ यांनी केला. या प्रकारामुळे शिक्षण आयुक्त कार्यालयातील कारभाराविषयीही शंका उपस्थित होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पसंख्याक शाळा ‘सीएम’च्या रडारवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील अल्पसंख्याक दर्जाच्या शाळांमधील गैरप्रकार थांबविण्यासाठी आता थेट मुख्यमंत्री कार्यालयानेच हालचाली केल्याचे स्पष्ट झाले आहे. अल्पसंख्याक दर्जाच्या शाळांमधील आक्षेपार्ह बाबींविषयी राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागाने अहवाल मागविला आहे. त्यामुळे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात धावाधाव सुरू झाली आहे.

अल्पसंख्याक दर्जा मिळालेल्या संस्थांमधून नियमबाह्य पद्धतीने कामकाज चालत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. विविध पालक संघटनांनीही त्या विरोधात आवाज उठवून अशा संस्थांच्या माध्यमातून चालणारे नफेखोरीचे व्यवहार बंद करण्याची मागणी केली होती. अल्पसंख्याक दर्जाच्या संस्थांमधून अल्पसंख्याक दर्जासाठी आवश्यक कायदेशीर बाबींची पूर्तता होणार नसेल, तर या संस्थांचा दर्जा काढून घेण्याचा इशाराही राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी नुकताच पुण्यात दिला होता. त्यानंतरही या शाळांमधील आक्षेपार्ह व्यवहार सुरूच राहिल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.

अल्पसंख्याक विकास विभागाच्या अवर सचिवांनी या विषयी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांना एक पत्र पाठविले आहे. त्याद्वारे अल्पसंख्याक शाळांच्या कारभाराचा अहवाल तातडीने मागितला आहे. या पत्रामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाकडून या विषयी विचारणा झाल्याची बाब स्पष्टपणे नोंदविण्यात आली आहे. अल्पसंख्याक दर्जाच्या संस्थांकडे असणाऱ्या शाळा-कॉलेजांची संख्या, त्यांची माध्यमे, विद्यार्थी संख्या, अनुदानित आणि विनाअनुदानित तुकड्यांची आकडेवारी आदी तपशील या पत्राद्वारे तातडीने सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संस्थेमधील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची संख्या किती, त्यामध्ये भाषिक, धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे प्रमाण किती, संस्थेचे प्रवेश नियमांना धरून होतात का, नसल्यास त्याची कारणे काय, प्रक्रियेमधील नेमक्या त्रुटी कोणत्या, विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारणी होत असताना नियम पाळले जातात का, नफा कमविण्याच्या उद्देशाने संस्था चालविली जाते का, आदी बाबींची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुळा-मुठेच्या मेकओव्हरचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नदीपात्रातील अस्वच्छता, तेथे टाकला जाणारा राडारोडा-कचरा, दुर्गंधी... अशा समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढून शहरातील मुळा-मुठा नद्यांचा कायापालट करण्यात येणार आहे. नदीशी संबंधित सर्व घटकांशी विचार-विनिमय करून अहमदाबादमधील साबरमती आणि नाशिकमधील गोदावरी या नद्यांच्या धर्तीवर नदीसुधारणा प्रकल्प (रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट) राबविण्याचा विचार केला जात आहे.

मुळा-मुठेत सोडल्या जाणाऱ्या संपूर्ण मैलापाण्यावर प्रक्रिया करण्याचा पालिकेच्या प्रकल्पाला केंद्र सरकारने नुकतीच मान्यता दिली. नदीत सोडल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्याचा फायदा होणार असल्याने आता संपूर्ण नदीपात्राचा एकात्मिक विकास साधण्यासाठी पावले टाकण्यात येणार आहेत. मुळा-मुठा या नद्यांचे सुमारे ४० किमीचे पात्र शहरात येत असल्याने पाटबंधारे विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका यांचेही सहकार्य घेण्यात येणार आहे. तसेच, सर्व लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सूचनांचा अंतर्भाव करून 'रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट'साठी आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. नदीची पूररेषा, हाय कोर्ट सुप्रीम कोर्ट; तसेच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (एनजीटी) यांनी नदीसंदर्भात वेळोवेळी दिलेल्या निकालांच्या संदर्भान्वये कायदेशीर बाजू तपासून घेण्यात येणार आहेत.

शहराच्या नदीसुधारणेसाठी नुकतीच महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यातच, नदीच्या सर्वांगीण विकासाकरिता एकत्रित प्रयत्न करण्याचे आदेश देण्यात आले होते. स्वतंत्र कंपनी स्थापन (एसपीव्ही) करण्याबाबत चाचपणी करण्याचा विचार मांडण्यात आला होता. त्याचदृष्टीने, पहिल्या टप्प्यात प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त केला जाणार आहे. या सल्लागारामार्फत नदीशी संबंधित सर्व घटकांशी चर्चा केली जाणार आहे. त्यानुसार, आराखडा सादर केल्यानंतर केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत निधी मिळविण्यासाठी प्रकल्प सादर करता येऊ शकेल.

सल्लागार नेमण्याचे विचाराधीन

नदीपात्रामध्ये टाकला जाणारा राडारोडा-कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी पर्यावरणाला बाधा न आणता काही विकासकामे करण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये, नदीचे सुशोभीकरण, पार्क, पार्किंगसाठी जागा अशा काही प्रकल्पांचा समावेश होऊ शकतो. अल्प प्रमाणात शुल्क आकारून या प्रकल्पांच्या देखभाल-दुरुस्तीसाठीचा खर्च केला जाऊ शकतो, असेही सुचविण्यात आले आहे. पाटबंधारे विभाग, पालिका, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका अशा वेगवेगळ्या सरकारी संस्थांकडे नदीपात्राची जबाबदारी येत असल्याने स्वतंत्र कंपनीकडे एकत्रित स्वरूपात ती जबाबदारी देण्याचे विचाराधीन आहे. अहमदाबादमध्ये साबरमतीचा विकास याच माध्यमातून करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक्स्प्रेस कोंडीचा एसटीला पुन्हा फटका

$
0
0

पुणे : पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेच्या दुरुस्ती कामामुळे गुरुवारपासून सुरू असलेल्या वाहतूक कोंडी सत्राचा सोमवारीही एसटी सेवेला फटका बसला. एसटीच्या बसेस सुमारे दोन तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

एक्स्प्रेस-वेच्या दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी सकाळी १० नंतर टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद करण्यात येत आहे. तेव्हापासून दररोज पुणे- मुंबई मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. मंगळवारी दुपारी १२ ते सायंकाळी चार या दरम्यान एक्स्प्रेस-वे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे दुपारपर्यंत सुरळित असलेली वाहतूक त्यानंतर विस्कळित झाली. एसटीच्या बस वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने प्रवाशांना बसमध्ये ताटकळत बसून राहण्याशिवाय पर्याय नव्हता.

शनिवारी महाकोडींमुळे एसटीच्या बसेस पाच तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे तीन फेऱ्या करणाऱ्या बसच्या एकच फेऱ्या झाल्या होत्या. तसेच, रविवारी पुणे-मुंबई दरम्यानच्या शिवनेरी व एशियाड गाड्यांच्या बुकिंगला मोठ्या प्रमाणावर फटका बसला. तसेच, सामान्य गाड्यांमध्येही नेहमीपेक्षा कमी प्रवासी संख्या होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुस्लिमांना द्या ५ टक्के आरक्षण’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण तातडीने लागू करण्याच्या मागणीकरिता शिक्षण हक्क मंचाच्यावतीने येत्या बुधवारी (दि. २९) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. सर्व अल्पसंख्याक शाळांमध्ये अल्पसंख्याक समाजासाठी शिक्षणहक्क कायद्याच्या तरतुदीनुसार २५ टक्के आरक्षण लागू करावे. तसेच, देशात हिंदी भाषेनंतर उर्दू भाषेला अधिक प्राधान्य दिले जाते. तसेच उर्दू भाषेचा शिक्षणचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असून उर्दू भाषेला द्वितीय राष्ट्रीय भाषा म्हणून जाहीर करण्यात यावे, अशी मागणी मंचाचे अध्यक्ष मतीन मुजावर, फिरोज मुल्ला आदींनी पत्रकार परिषदेत केली. या वेळी प्रशांत मोघम, चांद बलबट्टी आदी उपस्थित होते. मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यात आले होते. मात्र ते तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात आले. त्यामुळे मुस्लिम समाजाला अच्छे दिन येणार कधी असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीएमआरडीए’च्या कार्यालयाचे स्थलांतर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाच्या इमारतीत सुरू करण्यात आलेले पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) कार्यालय अवघ्या अडीच महिन्यांतच औंधमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे पूर्वीच्या कार्यालयावर करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जाणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे; तसेच कार्यालयाचे हे स्थलांतर कोणाच्या फायद्यासाठी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गेल्या एक मे रोजी पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आणि त्याच दिवशी हे कार्यालय पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाच्या इमारतीत सुरू करण्यात आले होते. मात्र, हे कार्यालय सुरू करून तीन महिनेही झालेले नसतानाच हे कार्यालय तेथून हलविण्यात आले आणि औंध येथील महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवनात सोमवारपासून पीएमआरडीएचे कार्यालय सुरू करण्यात आले.

हे कार्यालय शहरापासून दूर होते आणि नागरिकांची गैरसोय होत होती, त्यामुळे शहराजवळ आसपासच्या परिसरात हे कार्यालय सुरू व्हावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत असल्याने हे कार्यालय स्थलांतरित करण्यात आल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात येत आहे. मात्र, पीएमआरडीएचे कामकाज अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही, तसेच येथे सर्वसामान्य नागरिकांचे किती येणेजाणे असते, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. प्रामुख्याने येथे बांधकाम परवानगी घेणे आणि विकसन शुल्क भरण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांना तेथे जावे लागते. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक आणि येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी कार्यालयाच्या स्थलांतराचा घाट घालण्यात आल्याची चर्चा आहे.

खर्चाचे काय?

'पीएमआरडीए' सुरू होण्यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाच्या परिसरात यासाठीच संबंधित इमारतीचे नियोजन केले होते. त्यानुसार हे कार्यालय सुरू करण्यात आले. तसेच हे कार्यालय सुरू करण्यासाठी मोठा खर्चही करण्यात आला होता. आता तो खर्च वाया जाणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बीआरटी मार्गावर अजूनही त्रुटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संगमवाडी-विश्रांतवाडी दरम्यान जलद बस वाहतूक सेवा (बीआरटी) सुरू करण्यासाठी पालिकेतर्फे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असले, तरी या मार्गावर अद्याप त्रुटी असल्याची टीका स्वयंसेवी संस्थांकडून केली जात आहे. ट्रान्सफर टर्मिनल, आयटीएमएस अद्याप अस्तित्वात नसताना बीआरटी सुरू कशी होणार, अशी विचारणा केली जात आहे.

बीआरटीच्या बसथांब्यावर ये-जा करण्यासाठी पादचाऱ्यांची सुरक्षितता सर्वांत महत्त्वाची असूनही, पालिकेने अनेक ठिकाणी त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. सादलबाबा चौक, आंबेडकर चौक, बॉम्बे सॅपर्स अशा अनेक ठिकाणी पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे जिकिरीचे ठरणार आहे. या ठिकाणी लावण्यात आलेली रेलिंग, पादचाऱ्यांना ओलांडण्यासाठीच्या सुविधा सदोष असल्याचा आरोप नागरिक चेतना मंचाच्या कनीझ सुखराणी यांनी केला आहे.

आळंदी रोडवर बीआरटी सुरू करण्याचा दावा पालिका आणि पीएमपीतर्फे केला जात असला, तरी बसथांब्यांवरच तिकिटे देण्याची सुविधाही कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे, ही बीआरटी नसून, केवळ एकसलग रस्त्याने जाणारी बस सेवा आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

सुविधा आहेत का?

बीआरटी सुरू करण्यापूर्वी त्यासाठीच्या मूलभूत सुविधांची पूर्तता पालिका आणि पीएमपीने केली आहे का, असा सवाल 'पादचारी प्रथम'च्या प्रशांत इनामदार यांनी उपस्थित केला आहे. टर्मिनल आणि पार्किंग सुविधा, बसथांब्यांवर पॉवर बॅकअप यासारख्या बीआरटीसाठी अत्यावश्यक असणाऱ्या गोष्टी अजून अपूर्ण असून, त्या पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरड हटविण्याचे काम कूर्मगतीनेच सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवरील बोरघाटातील धोकादायक दरडी हटविण्याची मोहीम अद्याप कूर्मगतीने सुरू असून, सोमवारी दुसऱ्या पथकाच्या मदतीने खंडाळा बोगद्याजवळील दरडी काढण्याच्या कामाला सुरुवात झाली. एक्स्प्रेसवरील कामकाजाचा सर्वाधिक फटका एसटी बसला बसला. एसटी बस सुमारे दोन तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

कामादरम्यान वाहतूक जुन्या मार्गावर वळविण्यात आली आहे. मात्र, हा मार्ग घाटमाथा परिसरात अरुंद असून, अनेक ठिकाणी नागमोडी वळणे, तीव्र उतार आणि चढण असल्याने प्रवाशांना वाहतूक कोंडीशी सामना करावा लागत आहे. सोमवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि जलसंपदा राज्य मंत्री विजय शिवतारे यांनी बोरघाटात सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवरील खंडाळा आणि आडोशी बोगद्याजवळ अनुक्रमे २२ जून आणि १९ जुलैला मोठ्या दरडी कोसळल्या होत्या. या घटनेनंतर राज्य रस्तेविकास महामंडळाने धोकादायक दरडी हटविण्याच्या कामाला २४ जुलैला सुरुवात केली. खंडाळा घाटातील (बोरघाट) खंडाळा एक्झिट ते खोपोली एक्झिट या परिसरातील आठ ठिकाणी अत्यंत धोकादायक दरडी आहेत. त्या ठिकाणच्या दरडी हटविण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा संबंधित यंत्रणेचा प्रयत्न आहे. परंतु, काम अतिशय संथपणे सुरू असल्याने ते पूर्ण होण्यास किमान दोन आठवड्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

हे काम आंध्र प्रदेशातील मेटाफेरी या कंपनीला देण्यात आले असून, त्यांचे १४ जणांचे विशेष पथक धोकादायक दरडी, सैल झालेले दगड काढण्याचे काम युद्धपातळीवर करीत आहे. त्यांना स्पेन येथील चार तज्ज्ञ मार्गदर्शन करीत आहेत. राज्य रस्तेविकास महामंडळ आणि आयआरबीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्झरी बसलाही आता करमणूक कर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लक्झरी व व्हॉल्व्हो बसमध्ये दाखविल्या जाणाऱ्या सिनेमांवर दर वर्षी एक हजार रुपये करमणूक कर आकारण्यात येणार असल्याची माहिती करमणूक कर अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिली. या कराद्वारे ३० लाख रुपये सरकारी तिजोरीत जमा होतील, असा अंदाज आहे.

लक्झरी व व्हॉल्व्हो बसेसमध्ये प्रवाशांना सिनेमे दाखविले जातात. त्यापोटी हे बसमालक प्रवाशांकडून जादा तिकीट आकारणी करतात. त्यामुळे या बसेसही करमणूक कराच्या जाळ्यात आणण्यात येणार असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारने पुणे जिल्ह्याला करमणूक कराचे उद्दिष्ट वाढवून दिले आहे. गत वर्षी करमणूक कराच्या माध्यमातून १३८ कोटी रुपयांचा महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला होता. सरकारने त्यात यंदा तब्बल १५ कोटी रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे येत्या वर्षात १५३ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी प्रशासनाला प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून करमणूक कर वसुलीचे नवनवे स्रोत शोधण्यात येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेकडे पकडताना दोघे बुडाले

$
0
0

पिंपरीः मित्रांसोबत कामशेतला फिरायला गेल्यानंतर इंद्रायणी नदीपात्रात खेकडे पकडताना पिंपरीतील दोन बुडाले. दोन दिवसानंतरही दोघांचा नदीपात्रात शोध लागलेला नाही. रविवारी (२६ जुलै) घडलेला हा प्रकार सोमवारी उघडकीस आल्यानंतर मंगळवारी दोघांचा शोध घेण्यात येत होता.

रोहित नरीया (वय २०) आणि रोहित कदम (२२, दोघेही रा. एचए कॉलनी, पिंपरी) असे बुडालेल्या मुलांची नावे आहेत. रोहित नारीया याच्या घरी आई, वडील, दोन लहान भाऊ असा परिवार आहे. तर रोहित कदम याच्या वडिलांचे निधन झाले असून, त्याच्या मागे आई आणि भाऊ असा परिवार आहे. तो उत्तम बॉक्सिंग खेळाडू असून, त्याने राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पारितोषिक पटकावले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित नरीया व रोहित कदम हे दोघे रविवारी त्यांच्या इतर तीन मित्रांसोबत कामशेतला फिरायला गेले होते. तेथील इंद्रायणी नदीपात्राजवळ ते थांबले. नदीकिनारी जेवण झाल्यानंतर सर्व मित्र खेळतच नदीपात्राजवळ खेकडे पकडत होते. या वेळी पाऊस आणि पाण्याचा प्रवाह यामुळे रोहित नरीया बुडू लागला. त्याला वाचवण्याचा रोहित कदम याने प्रयत्न केला. परंतु त्यात दोघेही नदीपात्रात बुडाले. या प्रकारामुळे घाबरल्याने त्यांच्या मित्रांनी याबाबत कोणतीही वाच्यता केली नाही. दरम्यान, त्यांच्या मित्रांनी सोमवारी संध्याकाळी याबाबत त्यांच्या घरच्यांना सांगितले. त्यानंतर त्वरित कामशेत पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टिश्यू पेपरच्या गोडाउनला आग

$
0
0

पिंपरीः ताथवडे परिसरात असलेल्या एका टिश्यू पेपर तयार करणाऱ्या कारखान्याच्या गोडाउनला मंगळवारी (२८ जुलै) दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली. या आगीत गोडाउन भस्मसात झाले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे निष्पन्न झाले आहे.

आग्निशामकदलाने दिलेल्या माहितीनुसार, ताथवडे परिसरातील नवले वस्ती भागात असलेल्या पराग पेपर या टिश्यू पेपर तयार करणाऱ्या कारखान्याच्या गोडाउनला दुपारी साडेबाराच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. कारखान्यातील टिश्यू पेपर तयार करणारी १५-१६ मशीन या आगीत जळून खाक झाली आहेत. आग लागली त्या वेळी १८ कामगार कंपनीत होते. सुदैवाने कोणीही या दुर्घटनेत जखमी झाले नाही. आगीत नेमके किती रुपयांचे नुकसान झाले आहे याची माहिती समजू शकली नाही.

घटनास्थळी आग्निशामक दलाच्या प्राधिकरण, संत तुकाराम नगर व रहाटणी विभागाच्या अशा तीन व आणखी दोन गाड्या दाखल झाल्या होत्या. तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आग्निशामक दलाच्या जवानांना यश आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काश्मीरचे दोन गनमॅन हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

हिंजवडी येथील एका इमारतीमध्ये वास्तव्यास असलेल्या जम्मू आणि काश्मीरच्या दोघा बंदुकधारी रहिवाशांना मंगळवारी (२८ जुलै) पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करून, त्यांच्याकडे बंदुकींचा परवाना आहे का, तसेच त्यांनी योग्य ती कायदेशीर बाबींची पूर्तता केली आहे का याची तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे हिंजवडी पोलिसांनी सांगितले.

पंजाबमधील गुरुदासपुरमध्ये सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात हाय अॅलर्ट घोषीत करण्यात आले आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक आदी शहरांत अतिदक्षतेचा आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांनी वाहनांची तपासणी, भाडेकरूंची माहिती, हॉटेल, लॉजवर थांबलेले नागरिक यांची कसून चौकशी सुरू केली. यातच, एका इमारतीच्या सदनिकेमध्ये दोन बंदुकधारी संशयित राहत असल्याची माहिती मंगळवारी दुपारी पुणे पोलिस नियंत्रण कक्षास हिंजवडी परिसरातील एका मालकाने फोन करून दिली.

हिंजवडी पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी जाऊन दोघांना बंदुकींसह ताब्यात घेतले. हे दोघे जम्मू आणि काश्मीर राज्यातील रहिवाशी असून ते सुरक्षा रक्षकाच्या नोकरीसाठी एका सुरक्षा रक्षक एजन्सी मार्फत पुण्यात आले आहेत. या दोघांकडे त्यांच्या राज्यातील शस्त्र परवाना आहे. त्यामुळे हे परवाने आम्ही चौकशी व तपासणीसाठी जम्मू-काश्मीरच्या पोलिसांकडे पाठवणार आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे हिंजवडी पोलिसांनी सांगितले.

'भाडेकरू-नोकरदारांची माहिती कळवा'

संभाव्य घातपाताच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी आपल्या सदनिका-घर-खोल्यांमध्ये भाडेतत्त्वावर राहणाऱ्यांची माहिती पोलिसांना कळवावी. तसेच कंपनी-कारखाने यामध्ये बाहेर राज्यातून आलेल्या नोकरदारांची माहिती देखील अद्यायावत ठेवून पोलिसांना द्यावी, बेवारस वाहने, संशयास्पद व्यक्तींची माहिती कळवावी. ज्यांच्याकडून ही माहिती दिली जाणार नाही अशांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाचे अपहरण; तिघेजण गजाआड

$
0
0

पिंपरीः अॅडमिशन देण्याच्या आर्थिक व्यवहारातून बीडमधील धारूर येथून तरुणाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या तीन युवकांना निगडी पोलिसांनी जेरबंद केले. विक्रम कसबे (वय २४,रा. शिवाजीनगर,देहूरोड), शिवराज पुजारी (२४, देहुरोड) व समीर पाडसे (२०, रा.आकुर्डी रेल्वे स्टेशन) अशी अटक करण्यात आलेल्या खंडणीखोरांची नावे आहेत. बाजीराव माने (६५, रा. मानेवाडी, ता. केज, जि. बीड) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माने यांचा मुलगा भोलेनाथ (२४) पुण्यातील एका खासगी बँकेत कर्ज मंजुरी विभागात काम करतो. भोलेनाथ धारूर या गावाकडून पुण्याकडे येत असताना तीनही आरोपींनी त्याचे अपहरण केले.

त्यानंतर त्यांनी बाजीराव माने यांना फोन करून, 'तुमचा मुलगा सुखरुप हवा असेल तर आम्हाला ८० हजार रुपये खंडणी द्या,' अशी मागणी केली. त्यानुसार, माने यांनी विक्रम कसबे याच्या खात्यावर २० हजार रुपये भरले. अॅडमिशनच्या आर्थिक वादातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी धारूर येथे पोलिसांकडे गुन्हा दाखल करून तो निगडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सातारा महामार्गावर इस्टेट एजंटचा खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, भोर

आरामबसने चाललेल्या चंद्रशेखर आचार्य (वय ३०, रा. बेंगळुरू) या इस्टेट एजंटचा खून करण्यात आला आहे. पुणे-सातारा महामार्गावर वरवे गावच्या हद्दीत हॉटेल नटराजसमोर हा खून करण्यात आला. जयभीम म्हातप्पा कांबळे यांनी राजगड पोलिसांत याबाबत फिर्याद दिली आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अधिक तपासासाठी बेंगळुरू येथे पोलिस पथक पाठवण्यात आले आहे. साईबाबांची मूर्ती खरेदी करण्यासाठी आचार्य व त्यांचे इतर पाच मित्र शिर्डी येथे गेले होते. मूर्तीची खरेदी करून ती टेम्पोने बेंगळुरू येथे पाठवून नंतर ते आरामबसने परतीच्या प्रवासाला निघाले. चहापानासाठी बस थांबली असता पाण्याची बाटली आणण्यासाठी आचार्य व त्याचा मित्र दुकानात गेले. त्या वेळी तीन ते चार व्यक्ती तेथे आल्या आणि त्यांनी आचार्य यांच्या तोंडावर तिखट पाण्याचा स्प्रे मारला. त्यानंतर त्यांना गोळ्या मारण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, भोर

तालुक्यातील ७० पैकी ५९ ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका होणार असून, नऊ ग्रामपंचायती बिनबिरोध झाल्या आहेत. ४० ग्रामपंचायतींमध्ये सर्व जागांसाठी तर २१ मध्ये कांही जागांसाठी निवडणूक होत आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या दिग्गज नेत्यांना आपल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूका बिनविरोध करण्यात अपयश आल्याचे वरील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. ४० ग्रामपंचायतींमधील ५०६, तर २१ ग्रामपंचायतीमधील ८८ अशा ५९६ जागांसाठी या निवडणूका ४ आँगस्ट रोजी होणार आहेत. त्यामध्ये ९४१ उमेदवारांनी राजकीय भवितव्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भोलावडे, चिखलगाव, पोम्बर्डी, मोहरी खुर्द, हातवे खुर्द, गवडी, पानव्हळ, बाजारवाडी, महुडे बुद्रुक, म्हाळवडी, नायगाव या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदननगर मंडईत हप्ता वसुली

$
0
0

येरवडा : चंदननगरमधील भाजी मंडईत सर्वसामान्य भाजीविक्रेत्यांकडून आणि शेतकऱ्यांकडून बेकायदा हप्ता वसुली होत असल्याने शेतकरी आणि भाजीविक्रेते त्रस्त झाले आहेत. त्याबाबत शेतकऱ्यांनी आपले गाऱ्हाणे आमदार जगदीश मुळीक यांच्याकडे मांडले आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी करण्याची मागणी वडगांव शेरीचे आमदार जगदीश मुळीक यांनी पणनमंत्री राम शिंदे यांच्याकडे केली होती. त्याला प्रतिसाद देत राम शिंदे यांनी हप्ते वसूल करण्याची चोकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश विभागाला दिले.

वडगाव शेरी मतदारसंघातील शेतकरी शेतमालाची विक्रीकरिता चंदननगर भाजी मंडईमध्ये येतात. पण अनेक वर्षांपासून या मंडईतील काही समाजकंटक व्यक्ती शेतकऱ्यांकडून बेकायदा हप्ते वसुली करीत आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवून बेकायदा हप्ते वसुलीची चौकशी करावी, अशी विनंती मुळीक यांनी पणनमंत्र्यांकडे केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौंडला अवैध वाळू उपसा

$
0
0

नरेंद्र जगताप, दौंड

दौंड शहराच्या शेजारून वाहणाऱ्या भीमा नदीत मोठमोठ्या जेसीबीच्या साह्याने प्रचंड प्रमाणात वाळू उपसा होत आहे. शेकडो वाहनांच्या साह्याने काढलेली वाळू वाहून नेण्यात येत असल्याचे निदर्शास आले आहे.

भीमा नदीच्या एका बाजूला नगर जिल्हा आहे. दुसऱ्या बाजूला पुणे जिल्हा आहे. दौंड शहराच्या समोरच्या बाजूला नगर जिल्ह्याच्या हद्दीत वाळू उपसा करण्याची परवानगी आहे. मात्र, असे असूनही पुणे जिल्ह्याच्या हद्दीतूनसुद्धा बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. यासाठी कोणत्या प्रकारची परवानगी आहे का? त्यासाठी लिलाव झाला आहे का? कोणती साधने वाळू उपसा करण्यासाठी वापरायची आहेत? नियम काय आहेत हे प्रश्न अनुत्तरित आहेत. त्याबाबत श्रीगोंदा तालुक्याच्या तहसीलदारांना फोन केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

नदीत काही ठिकाणी प्रचंड वाळू उपसा झाल्याने पन्नास फुटांपेक्षा जास्त खोल खड्डे झाले आहेत. काही ठिकाणी मोठे डोंगर तयार झाले आहेत. अनिर्बंध वाळू उपसा झाल्याने नदीपात्र रुंदावले असून, प्रवाहाची दिशा बदलते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आव्हाड यांचा बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

सहायक पोलिस निरीक्षक निवृत्ती आव्हाड (वय ५४) यांचा मृतदेह फुरसुंगी येथील कॅनॉलमध्ये मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास सापडला. आव्हाड हे हडपसर येथील लक्ष्मी कॉलनीतून सोमवारी सकाळी सातच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. मॉर्निंक वॉक करताना चक्कर आल्याने ते पाण्यात पडले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आव्हाड हे 'महामार्ग पोलिस' दलात सहायक पोलिस निरीक्षकपदी कार्यरत होते. आव्हाड यांचे नातेवाइक निवृत्त पोलिस निरीक्षक सुरेश केकाण यांनी आव्हाड हे हरवले असल्याची तक्रार हडपसर पोलिस ठाण्यात सोमवारी दिली होती. आव्हाड यांनी यापूर्वी गुन्हे शाखा, बॉम्बशोधक पथकात नोकरी केली आहे. बॉम्बशोधक पथकाने सोमवारी श्वानाच्या मदतीने त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी दिली. आव्हाड यांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे बंदोबस्तासाठी नेमण्यात आले होते. त्यानुसार ते बंदोबस्तासाठी पंढरपूर येथे हजरही झाले होते. पंढरपूर येथे गेल्यावर त्यांना मधुमेहाचा जास्त त्रास अधिक होऊ लागला होता. त्यांनी आपल्या मुलांना या त्रासाची कल्पना दिल्यावर त्यांना तत्काळ पुण्यात आणण्यात आले. एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना नुकतेच घरी सोडण्यात आले होते, अशी माहिती केकाण यांनी दिली.

आव्हाड हे नेहमीप्रमाणे कॅनाल रोडला मॉर्निक वॉकसाठी गेले होते. मॉर्निंक वॉक करत असताना त्यांना ओळखणाऱ्या व्यक्तींशी त्यांनी गप्पाही मारल्या. मात्र, ते मॉर्निंक वॉक करून घरी न परतल्याने केकाण यांनी ते हरवले असल्याची तक्रार नोंदवली होती. दरम्यान, केकाण यांनी आपल्या काही नातेवाइकांना मंगळवारी सकाळी कॅनॉल रोडला आव्हाड यांना शोधण्यास पाठवले होते. यावेळी त्यांचा मृतदेह फुरसुंगी येथे आढळला. मॉर्निंक वॉक करताना चक्कर येवून ते पाण्यात पडले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images