Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शिक्षणाधिकारीच वादात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यभरातील ४९ शिक्षणाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आता वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. नियमबाह्य कागदपत्रे सादर करून या पदावर वर्णी लावून घेण्यात आली असल्याचा आरोप काही उमेदवारांनी रविवारी पुण्यात केला. माहितीअधिकारांतर्गत प्राप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांमुळे या आरोपांना पुष्टी मिळत असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.

'एमपीएससी'ने राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांच्या ७४ पदांसाठी २०१० मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. बी. एड. अभ्यासक्रमानंतर सात वर्षे वा त्यापेक्षा अधिक काळ शैक्षणिक कार्याचा अनुभव असलेले उमेदवार या परीक्षेसाठी पात्र ठरले होते. लेखी परीक्षेनंतर मुलाखतीसाठी २८० उमेदवार पात्र ठरले होते. मुलाखतीनंतर 'एमपीएससी'ने त्यापैकी ७१ उमेदवारांची शिफारस राज्य सरकारकडे केली होती. शिफारसपात्र उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी सादर केलेल्या प्रमाणपत्रांविषयी बी. के. गुंजाळ या उमेदवाराने माहिती अधिकाराद्वारे माहिती मागविली होती. त्यांना मिळालेल्या माहितीतून ७१ पैकी केवळ ३२ उमेदवारांनीच नियुक्तीसाठी आवश्यक कागदपत्रे सादर केल्याचे स्पष्ट झाले आहे.

'एमपीएससी'च्या उमेदवार निवडीसाठीच्या पद्धतीचा विचार करता, उमेदवारांच्या मुलाखतींच्या वेळी उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच त्यांचा नियुक्तीसाठी विचार होणे अपेक्षित आहे. मात्र, इतक्या मोठ्या संख्येने उमेदवारांच्या कागदपत्रांमध्ये आक्षेपार्ह बाबी आढळून येत असतील, तर 'एमपीएससी'च्या कागदपत्र पडताळणीच्या टप्प्यावरही त्रुटी आहेत की काय, असा प्रश्न या निमित्तानेच उमेदवारांनी उपस्थित केला. कागदपत्रे पडताळून पाहण्यासाठी कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही का, की त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे, असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कानावर हात’ आणखी किती दिवस?

$
0
0

चैत्राली चांदोरकर, पुणे

कोणतेही समारंभ आणि उत्सव हे सार्वजनिक सण असून ते साजरे करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी काहीही करण्यास परवानागी असते, अशा गैरसमजात वावरणाऱ्या मंडळांना उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वीच जमिनीवर आणले आहे. सार्वजनिक रस्ते नागरिकांसाठी असले तरी रस्त्यांचा मांडव उभारण्यासाठी वापर करू नये, असे सांगून हायकोर्टाने मंडप उभारणीलाच धोरणाच्या चौकटीत बसविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपलेला गणेशोत्सव यंदा कसा साजरा होतो, याबद्दल नागरिकांना उत्सुकता आहे.

उत्सव काळामध्ये दर वर्षी रस्त्यांवरच मंडप उभारले जातात. रहदारीचे रस्ते, बस स्टँड, रिक्षा स्टँड अगदी शाळा आणि हॉस्पिटलचाही विचार न करता चौकाचौकात मांडव उभारतात. या मांडवांमुळे वाहतुकीच्या कोंडीबरोबरच तिथे लावल्यात येणाऱ्या लाउडस्पीकरमुळे तेथील रहिवाशांना वेठीस धरले जाते. उत्सवाच्या दिवसात घरी राहायला नको, अशी प्रतिक्रिया या परिसरातील नागरिकांकडून ऐकायला मिळते.

प्रत्यक्षात कायद्यानुसार लाउडस्पीकरच्या आवाजांच्या मर्यादा यापूर्वीच आखून दिलेल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारण्याला काही वर्षांपूर्वीच मनाई करण्यात आली आहे. मात्र आजपर्यंत जिल्हाधिकारी आणि महापालिकेचे अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने पाहिलेच नव्हते. उत्सवापूर्वी गणेशोत्सव मंडळाच्या बैठका घेण्याचे सोपस्कार पूर्ण करून अलिखित स्वरूपात सगळ्यांना सर्व प्रकारच्या परवानग्या दिल्या जात होत्या. मात्र, ठाण्यातील डॉ. महेश बेडेकर यांनी केलेल्या जनहित याचिकेमुळे हायकोर्टाने प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

कठोर कारवाई होणार का?

मंडप उभारणी आणि लाउडस्पीकरच्या कर्कश्श आवाजाला लगाम लावण्यासाठी अनेक बंधने घालण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. चालण्यासाठी पदपथ आणि सुरळीत वाहतुकीसाठी रस्ते हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे रहदारीचे रस्ते, हॉस्पिटल परिसर, शिक्षण संस्था, टॅक्सी अथाव रिक्षा स्टॅँड अशा ठिकाणी उत्सव काळात मंडपे उभारण्यास परवानगी दिली जाऊ नये. विशेष म्हणजे या संदर्भात नागरिकांना बिनधास्तपणे तक्रार नोंदवता येईल, अशी यंत्रणा उभी करावी. गरज पडल्यास तक्रादाराला पोलीस संरक्षण पुरवावे, असेही आदेशात म्हटले आहे. या धर्तीवर पुण्यातील महापालिकेचे, पोलिस विभागातील अधिकारी कोणती भूमिका घेतात, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का, हितसंबंध जपण्याऐवजी कायद्याचे पालन होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भीती… देखाव्यांची परंपरा संपुष्टात येण्याची

$
0
0

चिन्मय पाटणकर, पुणे

महापालिकेने मंडपाचा आकार ठरवताना मंडळांकडून उभारल्या जाणाऱ्या देखाव्यांचा विचार करावा. अन्यथा, इतक्या वर्षांची पौराणिक, सामाजिक, प्रबोधनपर देखाव्यांची परंपरा संपुष्टात येण्याची भीती गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सार्वजनिक पद्धत‌ीने गणेशोत्सव उत्सव साजरा करताना मंडळांच्या कार्यकर्त्यांवर काही बंधने यावीत, यासाठी हायकोर्टाने काही मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व महापालिकांना दिलेल्या आहेत. त्यात रस्त्यावर उभारल्या जाणाऱ्या मंडपाचा आकारही ठरवला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या काही मंडळांच्या कार्यकर्त्यांशी व सजावटकारांची भूमिका 'मटा'ने जाणून घेतली. शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या हे मोठे प्रश्न आहेत. त्याप्रमाणात रस्त्यांचे रुंदीकरण होत नाही. मात्र, गणेशोत्सवाव्यतिरिक्त वर्षभरात होणाऱ्या प्रदूषण, वाहतूक कोंडीचे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गेल्या काही वर्षांत देखाव्यांची संख्या कमी झाली असून, मंडपाचा आकार कमी केल्यास मंडळांना देखावे करताच येणार नाही. त्यामुळे उत्सवातील सामाजिक प्रबोधानाचे चांगले साधन गमवावे लागेल, असेही कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.

देखावा करण्यासाठी किमान २५x२५ फुटाचा मंडप असावा लागतो. गणेशोत्सवातील देखाव्यांतील चांगल्या प्रकारे सामाजिक प्रबोधन होत असताना मंडपाच्या आकारावर निर्बंध आणणे मंडळांसाठी अडचणीचे होणार आहे. मंडपाचा आकार कमी केल्याने आता त्यात केवळ गणपतीची मूर्तीच बसवावी लागेल. अडचणी टाळण्यासाठी नियम करण्याला विरोध नाही. मात्र, चांगल्या कामात नियम त्रासदायक असतात. मंडपाचा आकार लहान केल्यास देखाव्यांची संख्या कमी होईल, असे सजावटकार विलास उत्तेकर यांनी सांगितले.

हत्ती गणपती मंडळाचे अध्यक्ष श्याम मानकर म्हणाले, मंडपाच्या आकारावर बंधने आल्यास अडचणच होणार आहे. मंडळांना देखावाच करता येणार नाही. आमच्या मंडळाचा ४०x२५ फुटांचा देखावा असतो. यंदाचा देखावाही तयार झाला होता. मात्र, मंडपाचा आकार कमी झाल्यास त्याचे काय करायचे याचा विचार करावा लागेल. वैशिष्ट्यपूर्ण देखावे हे पुण्याच्या गणेशोत्सवाचे आकर्षण आहे. गणेशोत्सवाच्या काळात त्यासाठी गर्दी होते. मात्र, मंडपाच्या आकारावर बंधन आणून ते वैशिष्ट्य संपुष्टात येईल. मंडपाचा आकार कमी करून प्रश्न सुटणार आहेत का, असा सवालही त्यांनी उपरस्थित केला.

मंडपाचा आकार कमी करून देखावे करणे शक्य नसल्याचे हिराबाग मंडळाचे अध्यक्ष दिलीप राऊत यांनी सांगितले. 'आमच्या मंडळाचा मंडप रस्त्यावर नसतो. मात्र, देखावा करण्यासाठी थोडी मोठीच जागा लागते. अलीकडे मंडप उभारण्याची परवानगी आठ दिवस आधी दिली जात असल्याने देखाव्यांची संख्या कमी झाली आहे. आता मंडपाचा आकार कमी केल्यास मंडळे देखावे करणेच बंद करतील. त्यामुळे पुण्याच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य जपण्यासाठी महापालिकेने मंडपाचा आकार अगदीच लहान करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्सवांना नियमांची चौकट

$
0
0

चैतन्य मचाले, पुणे

सार्वजनिक उत्सव साजरे करताना केल्या जाणाऱ्या आनंदोत्सवाचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यांवर बंधने असावीत यासाठी मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश हायकोर्टाने राज्यातील महापालिकांना दिले आहेत.

गणेशोत्सव काळात काही मंडळांकडून मनमानी पद्धतीने मंडप घातले जातात. अनेकदा हे मंडप टाकताना महापालिकेकडून परवानगी घेतली जात नाही. परिणामी उत्सवाच्या काळात मंडप घातलेल्या रस्त्यांवरून ये-जा करताना पादचाऱ्यांबरोबरच वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

उत्सव साजरा करताना नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा, यासाठी महापालिकेने विशिष्ट नियमावली तयार करावी आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे बंधन पालिका प्रशासनावर हायकोर्टाने घातले आहे. त्यानुसार नियमावली तयार करून त्यानुसार गणेशोत्सव आणि इतर सार्वजनिक उत्सव साजरे करण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढत असलेली लोकसंख्या आणि खासगी वाहनांची वाढती संख्या यामुळे उपलब्ध रस्ते वाहतुकीसाठी अपुरे पडतात. त्यातच सार्वजनिक उत्सवाच्या निमित्ताने रस्त्यांवर टाकलेल्या मंडपांमुळे हे रस्ते अधिकच अरुंद होतात आणि वाहतुकीची कोंडी होते. ही गोष्ट टाळण्यासाठी रस्त्याच्या एकूण रुंदीच्या केवळ एक तृतीयांश भागातच मंडप टाकण्यासाठी गणेश मंडळांना परवानगी देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. महापालिकेने दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक आकाराचा मंडप घालणाऱ्या मंडळांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. त्याशिवाय उत्सव संपल्यावर दोन दिवसांत मंडप काढून टाकण्याची अट घालण्यात आली आहे.

शहरातील रस्त्यांवर मंडप उभारण्यासाठी परवानगी मिळावी, असा अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह एक महिना अगोदर पालिकेकडे करावा लागणार आहे. नियमाप्रमाणे रस्त्याच्या एक तृतीयांश भागातच मंडप घातला जाईल, तसेच सर्व नियमांचे पालन करणार असल्याचे हमीपत्र भरून पालिकेला द्यावे लागणार आहे. परवानगीचा अर्ज देताना मागील वर्षी मंडप टाकण्यासाठी परवानगी घेताना देण्यात आलेल्या कागदपत्रांची फोटो कॉपी, वाहतूक पोलिसांनी दिलेली एनओसी, जागेचा मोजणी केलेला कच्चा नकाशा, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नाव, पत्ता तसेच फोन क्रमांक याची माहिती वैयक्तिक फोटोसह अर्जाबरोबर जोडावी लागणार आहे.

गणेशोत्सवात बहुतांश रस्त्यांवर सकाळ आणि संध्याकाळी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते. काही वेळा अत्यावश्यक सेवा असलेल्या अॅम्ब्युलन्स, अग्निशामक दलाचा बंब यांच्या रहदारीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे मंडपाला परवानगी देतानाचे निकष निश्चित करण्याची जबाबदारी पालिकांवर सोपविण्यात आली पालिका प्रशासनाने यावर सविस्तर चर्चा करून हे अद्यावत धोरण तयार केले आहे. रस्त्यावर मंडप उभारण्यासाठी मान्यता देताना जी रक्कम पालिकेच्या सर्वसाधारण सभेने निश्चित केली आहे, ती रक्कम भरावी लागेल. ठरवून दिलेल्या जागेपेक्षा अधिक जागा वापरून मंडप घातल्यास त्यावर कारवाई करून नियमाप्रमाणे दंड वसूल केला जावा. मंडप, स्टेज उभारताना सिमेंट क्राँक्रिटचा रस्ता, तसेच पॅसेज असलेल्या ठिकाणी रस्ता खोदण्याची परवानगी दिली जाणार नाही. उत्सवाच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मंडपाजवळ वाळूने भरलेले ड्रम ठेऊन मंडपासाठी आवश्यक असलेले बांबू लावावेत, बेकायदा पद्धतीने रस्ता खोदून मंडप उभारल्यास पालिकेच्या मुख्य सभेने ठरवून दिलेला दंड वसूल केला जाईल. उत्सव साजरा करताना मंडळाला राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाकडील प्रदूषण नियंत्रण विषयक कायद्याची तसेच मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. महापालिकेची नियमाप्रमाणे परवानगी घेऊन उभारण्यात आलेल्या मंडपाच्या झालरींवर जाहिरात करण्यासाठी पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी घेऊन त्यानंतरच जाहिराती केल्या जाव्यात, याकडे दुर्लक्ष करून परस्पर जाहिरात करण्याची परवानगी दिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार पालिकेला असणार आहे.

उत्सवाच्या काळात लाउडस्पिकर्स लावताना शासनाच्या पर्यावरण खात्याचे घातलेल्या नियमांकडे दुर्लक्ष न करता, त्याची ठोस अंमलबजावणी करण्याचे आव्हान मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर असणार आहे. प्रदूषण खात्याने शहरात विविध भागात झोन केलेले आहेत. त्यामध्ये ठरवून दिलेल्या डेसिबलपेक्षा अधिक आवाज असता कामा नये, जी मंडळे या नियमांचे उल्लंघन करतील अशा मंडळांच्या तक्रारींची नोंद घेण्यासाठी स्वतंत्र रजिस्टर ठेऊन त्याची माहिती संबधित पोलिस स्टेशन, पोलिस कंट्रोलला दिली जाणार आहे. शहरातील शांतता असलेले भाग घोषित करण्याची जबाबदारी पोलिस आयुक्तांवर देण्यात आली असून, पालिकेच्या मदतीने पोलिस आयुक्त कार्यालय शांततेचे भाग जाहीर करणार आहेत. सार्वजनिक उत्सवाच्या काळात मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून केली जाणारी हुल्लडबाजी याला आळा बसून सार्वजनिक उत्सव खऱ्या अर्थाने सार्वजनिक व्हावा आणि त्याचा आनंद शहरातील प्रत्येक नागरिकांला घेता यावा, या उद्देशाने महापालिकेने तयार केलेल्या उत्सवाचे धोरणाने सर्वसामान्य नागरिक आणि गणेश मंडळाचे पदाधिकारी यांच्यातील दुवा म्हणून काम करत आपली जबाबदारी योग्य पद्धत‌ीने पार पाडावी, हा या मागचा मुख्य उद्देश आहे.

मंडप धोरणातील महत्त्वाचे मुद्दे...

मंडप उभारण्यासाठी ३० दिवस अगोदर परवानगी.

परवानगी घेताता, नियम पाळण्याचे हमीपत्र देणे बंधनकारक.

कमानींवर जाहिरात करण्यासाठी पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी आवश्यक.

उत्सव झाल्यानंतर दोन दिवसात मंडप, देखावे, कच्चे बांधकाम काढण्याचे मंडळांवर बंधन.

ध्वन‌ी प्रदूषण होणार नाही, यासाठी विशेष काळजी

घेण्याचे आव्हान.

बेकायदा मंडप, ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांच्या तक्रारींसाठी आपतकालीन विभाग, टोल फ्री क्रमांक.

नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मंडळांवर कारवाईसाठी

पथके नेमणार.

उत्सवानिमित्त उभारल्या जाणाऱ्या मंडपाची पाहणी करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती.

पदाधिकाऱ्यांची भूमिका काय?

राज्यातील इतर शहरांमध्ये साजरा केला जाणारा गणेशोत्सव आणि पुणे शहराचा गणेशोत्सव यामध्ये मोठा फरक आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुणे शहरात गणेशोत्सव साजरा करताना त्यावर बंधने घालू नयेत, अशी भूमिका शहरातील प्रमुख गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

वर्षानुवर्षे शहरात सुरू असलेल्या गणेशोत्सवात आजपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही, हे वैशिष्ट्य पुणे शहराच्या गणेशोत्सवाचे असल्याने मंडळांना सायंकाळी सहा ते रात्री दहा असे वेळेचे बंधन असू नये, अशी भूमिका पदाधिकारी महापालिकेने बोलाविलेल्या बैठकीत मांडली. शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी यामध्ये विशेष लक्ष घालून गणेश मंडळांचा त्रास कमी कसा होईल, या दृष्टीने प्रयत्नशील राहावे, अशी भूमिका मंडळांनी मांडली.

वाहतुकीला अडथळा होइल, असे मंडप गणेश मंडळे उभारत नाहीत, त्यामुळे ठराविक आकारात मंडप असावेत, असे बंधन नको.

गणेशोत्सवाच्या काळात व्हीआयपी मंडळी आल्यास पोलिस खाते मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना गाड्या लावण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती करतात, त्यापेक्षा या मंडळींच्या पार्किंगची व्यवस्था पोलिसांनीच करावी.

शहराच्या गणेशोत्सव अधिक चांगल्या पद्धत‌ीने व्हावा, यासाठी महापालिकेने कोर्टात बाजू मांडावी.

पोलिस, महापालिका प्रशासनाने एक खिडकी सुरू करून मंडळांना आवश्यक त्या परवानग्या द्याव्यात.

गणेश उत्सवाच्या काळात शिवाजीरोडने लक्ष्मीरोडकडे येण्यास पोलिसांकडून मज्जाव केला जातो. बॅरिकेड उभारून नागरिकांना त्रास देऊ नये.

रस्त्याच्या एक तृतीयांश भागात मंडप असावा, असे बंधन टाकू नये.

'श्री'ची प्रतिष्ठापना ही वास्तूशास्त्राप्रमाणे केली जात असल्याने मंडपाच्या दिशेबाबत बंधने लादू नयेत.

मंडळांकडून मंडप, स्टेज आणि इतर शुल्क घेऊ नये.

पुणेकरांचे हित लक्षात घेऊन त्यानंतरच मंडपाचे धोरण तयार करावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक्स्प्रेस-वे अडलेलाच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील आडोशी बोगद्याजवळील धोकादायक दरडी काढण्याचे काम रविवारीही सुरू राहिल्याने वाहतूक पोलिसांनी मार्ग चार तास बंद ठेवला. आज, सोमवारी दुरुस्ती काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. तोपर्यंत टोलवसूली बंद ठेवण्यात आली आहे.

राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) तेथील धोकादायक दरडी काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, त्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळित झाली. सोमाटणे फाट्याजवळ आणि तळेगाव टोलनाक्याजवळ अवजड वाहनांची वाहतूक पोलिसांनी दुपारी रोखून धरली. तेथून केवळ चारचाकी हलकी वाहने सोडण्यात येत होती; परंतु त्यांचे प्रमाण कमी राहिले.

तळेगाव टोलनाका जवळपास रिकामाच दिसून आला. वाहनचालकांची गैरसोय होऊ नये म्हणून ध्वनिक्षेपकावरून पर्यायी रस्त्याची माहिती दिली जात होती. लोणावळ्याच्या अलीकडील उड्डाणपुलावरून मुंबईकडे जाणारी पुलावरील सर्व वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्याऐवजी लोणावळा-खंडाळ्यातील जुन्या मार्गावरून चारचाकी वाहतूक चालू ठेवण्यात आली; परंतु लोणावळ्याच्या आधी एक किलोमीटरपासून वाहतुकीची कोंडी झाली. वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलिस ठिकठिकाणी वाहतूक नियंत्रण करताना दिसत होते. हलकी वाहने खंडाळा घाटातील जुन्या मार्गाने वळविली होती.

खंडाळ्यातील मॅजिक पॉइंट येथे वाहतूक पोलिसांनी पुणे-मुंबईकडे जाणारी आणि येणारी हलकी वाहने आलटून-पालटून सोडली जात होती. त्याने महामार्गावरील वाहतुकीचा ताण बराचसा कमी झाला; परंतु सायंकाळपर्यंत द्रुतगती महामार्गावरील जड वाहनांची रांग पाच किलोमीटरपेक्षा जास्त पसरली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तिच्या’साठी आहेत वाटेवरती काटे

$
0
0

चैत्राली चांदोरकर, पुणे

एकल पालकत्वाची भूमिका घेऊन मुलांना वाढविणाऱ्या मातांची कथा संघर्षाची, परिस्थितीच्या विरोधात झगडण्याची, जिद्दीची आणि म्हणूनच कौतुकाची असली, तरी त्यांच्यासाठी बिकट वाट हीच वहिवाट असल्याचे चित्र कायम आहे. एकटेपणाने मुलांचे लालन-पोषण करणाऱ्या या माता शारीरिक आणि मानसिक आजारांना सामोरे जात असल्याचे एका पाहणीत आढळले आहे.

सिंगल पेरेंट असलेल्या मातांबाबतची ही स्थिती भारतापुरता मर्यादित नाही. अमेरिका, ब्रिटन, डेन्मार्क, स्वीडन या देशांतील एकट्या महिला पालकांच्या आरोग आणि समस्यांबाबत झालेल्या पाहणीचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. अन्य महिला पालकांच्या तुलनेत एकट्या महिला पालक अकाली प्रौढ बनतात, जबाबदाऱ्यांमुळे, आर्थिक विवंचनांमुळे, समाजाच्या प्रश्नार्थक नजरांमुळे, मुलांच्या अपेक्षांमुळे त्यांच्यावरील ताण वाढतो आणि त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो, असे या अहवालात नमूद आहे.

'मुलांना वाढवताना एकट्या पालक महिला मनातून खचलेल्या असतात. सर्वच अशा महिला पालकांना त्यांना प्रोत्साहन कुटुंबीयांकडून प्रोत्साहन मिळण्यासारखी स्थिती नाही. समाजाची त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टीही वेगळी असते. पतीची साथ सुटल्यामुळे आपण माहेरच्यांसाठी ओझे बनल्याची भावना अनेकींत असते,' असे निरीक्षण स्त्री अभ्यासकांनी नोंदविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्मी ट्रान्सपोर्ट वाहने पासिंगशिवाय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील निम्मी ट्रान्सपोर्ट वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पासिंग (वाहन योग्यता प्रमाणपत्र) न करताच वाहतुकीसाठी वापरली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जून महिनाअखेर एक लाख तीन हजार १३० वाहनांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे वाहनांचे पासिंग केलेले नाही.

पुणे शहरात ट्रान्सपोर्ट प्रकारातील दोन लाख १४ हजार ५७० वाहने आहेत. त्यामध्ये रिक्षा, अॅम्ब्युलन्स, स्कूल बस, कॉन्ट्रॅक्ट कॅरेज, डी व्हॅन, ट्रक, टँकर, ट्रेलर, टुरिस्ट टॅक्सी व अन्य काही वाहनांचा समावेश आहे. यातील ७९ हजार ३९१ वाहनांचे जूनअखेर पासिंग करण्यात आले आहे. तर, ३१ हजार ८७० वाहनांची नोंदणी एप्रिल २०१३ ते जून २०१५ या कालावधीत झाली आहे. या वाहनांच्या नोंदणीच्यावेळी त्यांना दोन वर्षांचे पासिंग प्रमाणपत्र देण्यात आले आहे. अशी एकूण एक लाख ११ हजार २६१ वाहनांचे पासिंग झालेले आहे. उर्वरित एक लाख तीन हजार १३० वाहने पासिंग होणे बाकी आहे. लोकहित फाउंडेशनचे अध्यक्ष अजहर खान यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मागितली होती.

रिक्षा हा शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा एक महत्त्वाचा भाग असून शहरात नोंदणीकृत रिक्षाची संख्या ४५ हजार ७१८ आहे. त्यापैकी १७ हजार ८८७ रिक्षांचे गेल्या काही वर्षात पासिंग करण्यात आलेले नाही. मध्यवस्तीत व उपनगरांमध्ये स्क्रॅप झालेल्या रिक्षा वाहतुकीसाठी वापरण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरटीओकडून अशा रिक्षांवर कारवाईही करण्यात येत आहे. त्यामुळे पासिंग न करण्यात आलेल्या रिक्षा वाहतुकीसाठी योग्य आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.



३८५६ अॅम्ब्युलन्सचेही नाही पासिंग

शहरातील स्कूल बसची संख्या एक हजार ९३५ आहे. त्यापैकी एक हजार ८२२ बसचे पासिंग जूनअखेर करण्यात आले आहे; तर ११३ बसपासिंग विना विद्यार्थ्यांची वाहतूक करीत आहेत. शालेय वाहतूक धोरणानुसार शाळांमध्ये परिवहन समित्या स्थापण्यात आल्या आहेत. मात्र, शंभरहून अधिक बस पासिंगविना विद्यार्थी वाहतूक करीत असल्याचे स्पष्ट झाल्याने या समित्यांकडून आवश्यक काळजी घेतली जात नसल्याचे उघड होते. तसेच, अॅम्ब्युलन्सची संख्या एक हजार १६७ आहे. त्यापैकी केवळ ३८६ अॅम्ब्युलन्सचे पासिंग करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम व्यावसायिकाला तीन महिन्यांची कैद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तक्रारदाराला कागदपत्रे आणि फ्लॅटचा ताबा देण्यात यावा असा ग्राहक मंचाने आदेश दिल्यानंतरही सहा वर्षे त्याचे पालन न केल्याने एका बांधकाम व्यावसायिकाला तीन महिने कैद आणि पाच हजार दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ग्राहक न्याय मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात व सदस्य मोहन पाटणकर यांनी हा निकाल दिला.

भरत आनंदराव बरकडे या बांधकाम व्यावसायिकाला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध या प्रकरणी संभाजी व्यंकट पाटील (रा. माणिकबाग, सिंहगड रस्ता) यांनी ग्राहक मंचाकडे दावा दाखल केला होता.

बरकडे यांची सदाशिव पेठ येथे प्रेमदास कन्स्ट्रक्शन्स नावाची कंपनी आहे. पाटील यांनी बरकडे यांच्या एका गृहप्रकल्पात फ्लॅट घेतला होता. मात्र, रक्कम घेऊनही त्यांना कागदपत्रे मिळाली नव्हती. तसेच त्या फ्लॅटचा ताबाही मिळाला नव्हता. त्यामुळे कागदपत्रे आणि फ्लॅटचा ताबा मिळावा यासाठी त्यांनी मार्च २००९ मध्ये ग्राहक न्याय मंचाकडे दावा दाखल केला होता

ग्राहक मंचाने पाटील यांना कागदपत्रे आणि फ्लॅटचा ताबा दोन महिन्यांत देण्यात यावा, असा आदेश दिला होता. ऑक्टोबर २००९ हा आदेश देण्यात आला होता. मात्र, त्याची पूर्तता करण्यात आली नाही. पाटील यांनी वेळोवेळी बरकडे यांच्याकडे प्रयत्न केले. मात्र, बरकडे यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे पाटील यांनी अॅड. नितीन मुनोत यांच्यामार्फत न्याय मंचाकडे दाद मागितली होती. ग्राहक न्याय मंचाने आदेश दिल्यानंतरही त्यांना ती दिली नाही. बांधकाम व्यावसायिकाने कागदपत्रांची पूर्तता केली नाही, असे मंचाने निकाल देताना नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मतदारयादी जोडणीला मुदतवाढ

$
0
0

डिसेंबरपर्यंत चालणार जोडणीचे काम

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मतदारयादीतील नावाशी संबंधित मतदारांचे निवडणूक ओळखपत्र व आधार क्रमांक जोडण्याच्या मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने या जोडणीच्या कामाला पाच महिने म्हणजे डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या वाढीव मुदतीत ही जोडणी करण्याचे आव्हान आता निवडणूक प्रशासनासमोर आहे. बोगस मतदारांना फुगलेली मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धिकरण कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत आधार जोडणीबरोबरच दुबार मतदार कमी करणे, यादीत दुरुस्ती करणे, मतदाराचा मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी मतदार यादीत समाविष्ठ करण्यात येत आहे.

या मोहिमेंतर्गत प्रशासनाने गेल्या तीन महिन्यांत सहावेळा विशेष मोहीम राबवली. या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील साडेसात हजार मतदान केंद्रांवर आधार क्रमांक व निवडणूक ओळखपत्र जोडणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. त्यात जवळपास दहा लाख मतदारांनी आधार जोडणी केली. मात्र, हे प्रमाण फारच कमी आहे. जिल्ह्यात सुमारे ७० लाख मतदार आहेत. त्यातील फक्त दहा लाख म्हणजे पंधरा टक्केच मतदारांनी मतदार यादीशी आधार जोडणी केली. मतदाराच्या नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी जुलैअखेर मुदत होती. मतदारांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन ही मुदत डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

मतदारयादीतील 'बोगस' मतदारांची नावे कमी करण्यासाठीही निवडणूक प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. मतदार यादीत सुमारे ८२ हजार दुबार, मृत व स्थलांतरीत मतदारांची नावे आढळली आहेत. त्यातील फक्त दहा हजार नावे वगळण्यात आली आहेत. बोगस मतदान टाळण्यासाठी छायाचित्र असलेली मतदार यादी तयार करण्यात येत आहे. या यादीत सात लाख मतदारांची छायाचित्रे नाहीत. त्यासंबंधीही जनजागृती करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरव राव यांनी सांगितले.

दुबार मतदारांचे नाव वगळण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा विचार आहे. यादीतील मृत, दुबार आणि स्थलांतरीत मतदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. या नागरिकांना कोणत्या मतदारसंघात आपले नाव हवे आहे, यासंबंधी त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना कळविणे बंधनकारक आहे.

- सौरव राव, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुभवा जगभरातले व्याघ्र अस्तित्व

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सायबेरियन, रॉयल बेंगॉल, साउथ चायना, मलायन, इंडोचायनीज, सुमात्रन, बाली, जावन, कॅस्पियन ही नावे आहेत, त्या-त्या भागांत आढळणाऱ्या वाघ या अद्वितीय प्राण्याची. जागतिक व्याघ्रदिनानिमित्त वाघाच्या या जमाती आणि त्याचे पर्यावरणातले महत्त्व समजून घेण्याची संधी मिळणार आहे. 'द टेरिटरी' संस्थेतर्फे जागतिक व्याघ्र-संवर्धन दिनानिमित्त 'अस्तित्वासाठी संघर्ष' या विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

घोले रोडवरील जवाहरलाल नेहरू कल्चरल सेंटर इथल्या राजा रविवर्मा आर्ट गॅलरीमध्ये २९ जुलैला या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल. छायाचित्रकारांच्या नजरेतून टिपलेल्या व्याघ्रप्रजाती या प्रदर्शनातून पाहता येणार आहेत.

आदित्यराज गुजर, करणराज गुजर, नचिकेत उत्पत, शैलेश गायकवाड, श्वेता गोपालकृष्णन, रितू भट आणि अमेय जोशी यांनी ही छायाचित्रे काढली आहेत. प्रदर्शनाची संकल्पना संदेश गुजर यांची आहे. २०१० मध्ये सेंट पीटर्सबर्ग व्याघ्र समिट इथं या दिवसाची घोषणा झाली. वाघांच्या सतत शिकार करण्याच्या प्रवृत्तीमुळे भारतावर बहुसंख्येने अधिराज्य गाजवणारा रॉयल बेंगॉल टायगर तसेच जगातील अन्य वाघाच्या प्रजाती नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याबाबत जनजागृती करण्यासाठी या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त जनजागृतीसाठी सह्यांची मोहीमही घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला सबलीकरणासाठी मानसिकता बदल गरजेचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'समाजात लिंगभेद असूच नये. प्रत्येकाला आपल्या गुणवत्तेनुसार जिथे हवी तिथे संधी मिळाली पाहिजे. महिलाही समाजाचे शक्तिस्थान आहे. महिलांचे सबलीकरण झाल्याशिवाय भारत महासत्ता होऊ शकणार नाही. परंतु, समाजाच्या मानसिकतेत बदल होणेही आवश्यक आहे,' असे मत राज्याचे जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी नुकतेच व्यक्त केले.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या प्रा. म. ना. अदवंत प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद‍्घाटन शिवतारे यांच्या हस्ते झाले. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. स्नेहलता सहस्रबुद्धे, कार्याध्यक्ष रवींद्र देशपांडे, उपकार्याध्यक्ष भालचंद्र भेडसगावकर, शिवाजीराव फेंगसे, दिलीप यादव, मुख्याध्यापिका मंदा बोराणे आदी या वेळी उपस्थित होते.

'आपल्या समाजाच्या आणि महिलांच्याही मानसिकतेत अजून बदल झालेला नाही. महिला सरपंच असली, तरी तिच्या नवऱ्यालाच मान दिला जातो. निर्णयप्रक्रियेतील महिलांचा सहभाग वाढला पाहिजे. माझ्या कर्तृत्वामुळेही कुटुंबाला नवी ओळख मिळू शकते, ही मानसिकता स्त्रियांमध्ये वाढीला लागेल, तेव्हा इतर गोष्टी आपोआप घडून येतील. मला मुलगाच हवा, ही मानसिकता स्त्रियांमध्येही दिसून येते, हे चित्र बदलले पाहिजे,' असेही त्यांनी सांगितले.

'महर्षी कर्वेंचे योगदान मोलाचे'

'एखाद्या गोष्टीची चळवळ होत नाही, तोपर्यंत त्या विषयाला गती मिळत नाही. स्त्री शिक्षणाचा पाया महात्मा जोतिबा व सावित्रीबाईंनी रचल्यावर महर्षी कर्वे व त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी त्याचे चळवळीत रूपांतर केले. अवहेलना सहन करत त्यांनी स्त्री शिक्षणासाठी आयुष्यभर कष्ट सोसले,' असे विजय शिवतारे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयना वन विभागातर्फे निसर्ग पर्यटन सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोयना परिसरात जावळी आणि कांदाटी खोरे राखीव वनाच्या बफर झोनमध्ये निसर्ग पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सह्याद्री टायगर रिझर्व्ह फाउंडेशन, व्हिलेज इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कमिटी आणि बसॉल्ट कॅम्पर्स यांच्यातर्फे निसर्ग पर्यटन सुरू करण्यात आले आहे.

स्थानिक लोकांना अर्थार्जन मिळवून देणे, उत्पन्न स्रोतासाठी त्यांचे जंगलावर अवलंबून राहणे कमी करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे, अशी माहिती विभागीय वनाधिकारी मिलिंद पंडितराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी बसॉल्ट कॅम्पचे सुहृद दात्ये उपस्थित होते.

वन विभागाच्या सहकार्याने आम्ही म्हाळुंगे, अराव, मोरणी, शिंदी आणि चकदेव ही चार गावे निश्चित केली आहेत. यातील प्रत्येक गावात सुमारे दहा घरे असून, ही गावे चरितार्थासाठी बहुतांशी जंगलावरच अलंबून आहे. वन विभागाच्या इकॉनॉमिक डिस्ट्रिब्युशन चॅनेलतर्फे या गावातील घरांचे निसर्ग पर्यटनासाठी सुशोभीकरण करण्यात येते आहे. आम्ही स्थानिकांना आतिथ्य, कौशल्य प्रशिक्षणही पुरविणार आहोत. पुढील काही दिवसांत ५० खोल्या सज्ज होणार आहेत, असे दात्ये यांनी सांगितले.

या उपक्रमाची पहिली मोहीम येत्या १४ ते १६ ऑगस्ट दरम्यान जाणार आहे. यामध्ये जंगलवाटांवरून मुशाफिरी, धबधब्यांना भेटी, वन्यप्राणी निरीक्षणाच्या संभाव्य जागा, पवनऊर्जा वाटिकेला भेट असे नियोजन आहे. या संदर्भातील अधिक माहितीसाठी ९८२३१२४१८८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन दात्ये यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द. आफ्रिकेच्या पर्यटनाला भारतीयांकडून चालना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दक्षिण आफ्रिकेच्या पर्यटनाला चालना देण्यामध्ये भारतातील पर्यटकांचा महत्वाचा वाटा आहे. दर वर्षी एक लाखांहून अधिक भारतीय पर्यटक आमच्याकडे येतात. त्यात सर्वाधिक म्हणजेच ४७ टक्के पर्यटक महाराष्ट्रातून येतात. त्यामुळे भारतीय पर्यटकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक राज्याच्या आवडीनिवडीनुसार आम्ही सहलीची पॅकेज तयार करीत आहोत, अशी माहिती दक्षिण आफ्रिका पर्यटन मंडळाच्या भारतातील व्यवस्थापक हान्नेली स्लॅबर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दक्षिण आफ्रिकेत वेगवेगळ्या राज्यांतून येणाऱ्या पर्यटकांच्या आवडीनिवडी, सहलींच्या कालावधींमध्ये फरक असतो. भारतीय पर्यटक प्रचंड उत्साही असतात. मात्र, त्यांच्याकडे अवघा १५ ते २० दिवसांचा कालावधी असतो. दोन वर्षांपूर्वी एक लाख २७ हजार भारतीय पर्यटकांनी दक्षिण आफ्रिकेला भेट दिली होती. अल्पावधीत अधिकाधिक ठिकाणे बघायची असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी 'इंडियन एक्स्प्रेस' प्लॅनचा पर्याय उपलब्ध केला आहे. यामध्ये आम्ही १३० उपक्रमांचे नियोजन केले आहे. त्यामध्ये बंजी जंपिंगसह साहसी पर्यटनाचा देखील समावेश आहे, असे स्लॅबर म्हणाल्या.

दक्षिण आफ्रिकेच्या आर्थिक विकास दरामध्ये पर्यटनाचा वाटा १० टक्के आहे. त्यामुळे पर्यटन हा दक्षिण आफ्रिकेसाठी उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. यापुढील काळातही पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आम्ही वेगवेगळ्या शहरांतील व वयोगटांतील पर्यटकांच्या आवडीनिवडीनुसार योजनांचे नियोजन केले आहे. यात भारतीय पर्यटकांवर आम्ही विशेष लक्ष केंद्रित करणार आहोत, असे स्लॅबर यांनी सांगितले.

शाकाहारी मस्ट

भारतीय पर्यटकांमध्ये शाकाहारी नागरिकांची संख्या अधिक आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत या पर्यटकांना जेवण्याच्या बाबतीत मर्यादा येत होत्या. भारतीय पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन दक्षिण आफ्रिकेतील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांजवळ तीनशेहून अधिक रेस्टाँरंटमध्ये आता भारतीय खाद्यपदार्थ आणि जैन पाककृती उपलब्ध करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर या पदार्थांची उपलब्धता वाढविण्यासाठी पाच हजारांहून शेफला या पदार्थांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, हे पदार्थ बनविण्यासाठी पुस्तकेही प्रकाशित करण्यात आली आहेत, अशी माहिती हान्नेली स्लॅबर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्मीत जाण्यासाठी युवक रस्त्यावरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , हडपसर

आर्मीमधील विविध पदाची अंतिम लेखी परीक्षेसाठी रामटेकडी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंग सेंटरमध्ये पाच जिल्ह्यांमधील सुमारे १६०० युवक आले आहे. रविवारी पहाटे तीन वाजता परीक्षा असल्याने पाऊस असतानाही हे सर्व तरुण परिसरातील पेट्रोल पंप, फुटपाथ किंवा दुकानांची शटर्स आदी ठिकाणी रात्र घालवण्यासाठी राहिले होते.

उस्मानाबाद येथे १२ एप्रिलला आर्मी मेळावा आयोजित केला होता. त्या ठिकाणी फिजिकल टेस्ट आणि मेडिकल टेस्ट झाली होती. त्यानंतर अंतिम परीक्षा रामटेकडी येथील आर्मी ट्रेनिंग सेंटरमध्ये घेण्यात येत आहे. पहाटे तीन वाजता या परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. ट्रेडमन, जीडी सोल्जर, टेक्निकल क्लार्क, एज्युकेशन हवालदार आदी पदांसाठी पुणे, उस्मानाबाद, लातूर, बीड, अहमदनगर आदी ठिकाणहून भरतीसाठी युवक आले आहेत. यातील बहुसंख्य मुलांना राहण्यासाठी जागा नसल्याने त्यांनी रस्त्यावरच रात्र काढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा आणणार डोळ्यात पाणी

$
0
0

मुस्तफा आतार, पुणे

दैनंदिन जीवनात विविध खाद्यपदार्थांमध्ये चव आणण्यासाठी वापरला जाणारा कांदा आता गृहिणींपासून सामान्यांना रडवणारा ठरण्याची चिन्हे आहेत. जुलैमध्ये किरकोळ बाजारात कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. पुढच्या महिन्यात तुटवडा भासण्याची भीती व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत असल्याने घरापासून ते हॉटेलच्या किचनमधून कांदा गायब होण्याची भीती आहे.

मिसळ, कोशिंबीर, भजी असो कांद्याच्या चटणीपासून ते घरातील किंवा हॉटेलमधील प्रत्येक भाजीत कांद्याचा समावेश केला जातो. त्यामुळे कांद्याचे सामान्य जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु, हाच कांदा आता सामान्यांचे वांदे करणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कांद्याचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रासह राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक या राज्यात घेतले जाते. महाराष्ट्रासह या राज्यांत देखील पावसाने मध्येच दिलेली ओढ आणि ऐन वेळी झालेल्या गारपिटीमुळे कांद्याच्या पिकांचे झालेले नुकसान यामुळे शेतकऱ्यांपासून ते ग्राहकांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. नेमकी ही परिस्थिती कशी ओढवली याचा देखील विचार करण्याची वेळ आली आहे.

फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये अवकाळी पाऊस तसेच गारपिट झाली. त्या दरम्यान उन्हाळी कांद्याची लागवड करण्यात आली होती. परंतु, पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले. त्यावेळी हातात आलेल्या कांद्याचे उत्पादन शेतकऱ्यांनी बाजारात आणले. मिळेल तो भाव पदरात पाडून कांदा विकला. पुन्हा जूनमध्ये कांद्याची लागवड करण्यात आली. जून ते जुलै महिन्याच्या अखेरीसपर्यंत पावसाने चांगली ओढ दिली. त्यामुळे कांद्याच्या पिकांचे नेमके काय होणार याकडे शेतकरी वर्ग डोळे लावून बसला होता. परिणामी, कांद्याचे पीक लांबण्याची शक्यता आहे. या कांद्याची सप्टेंबर अखेरपर्यंत वाट पाहावी लागेल. राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये पाऊस, गारपिटीमुळे कांदा खराब झाला होता. हा कांदा जुलैअखेर संपेल. कर्नाटकातील नवीन कांद्याचे पीक येईल. बेंगळुरू, हुबळी येथील भागातून ऑक्टोबरमध्ये नवीन आवक होईल.

सध्या उपलब्ध कांदाच बाजारात विक्रीसाठी आणला जात आहे. त्यामुळे दर वाढले आहेत. दर आणखी कमी होण्याची शक्यता नाही. यापूर्वी कांदा निर्यात केली जात होती. मात्र कांद्याचे उत्पादन घटल्याने दर वाढले आहेत. त्यामुळे केद्र सरकारने कांदा निर्यात बंद केली असून कांदा देशात आयात करण्यात येईल असे जाहीर केले आहे. कांदा आयात कधी होणार आहे? आणि त्याचा दर सर्वसामान्यांना परवडणारा आहे का हे देखील तपासण्याची गरज आहे.

सध्या पुण्याच्या गुलटेकडी बाजारात संगमनेर, कोपरगाव, खेड, जुन्नर, आंबेगाव भागातून आवक होते. पुणे जिल्ह्यातील कांदा सप्टेंबर अखेरीस बाजारात येईल अशी शक्यता व्यापारी वर्ग वर्तवित आहेत. जूनचा कांदा सप्टेंबर अखेरीस येणार असल्याने आणि जुलैमध्ये लागवड केलेला कांदा हा सप्टेंबर अथवा ऑक्टोबरमध्ये बाजारात उपलब्ध होईल. अशा परिस्थितीत ऑगस्ट महिन्यात बाजारात कांदा उपलब्ध होण्याची शक्यता कमीच आहे. कांद्याला सध्या प्रती क्विंटल २,७०० ते ३,००० रुपये असा दर मिळत असला तरी हा दर पुढील महिन्यात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या उलट किरकोळ बाजारात सध्या ३५ ते ४० रुपये किलो दराने विकला जाणारा कांदा ऑगस्टमध्ये टंचाई भासल्यास ५० रुपये किलो दराने विकला गेला तर आश्चर्याचे कारण नाही. किरकोळ बाजारातील विक्रेत्यांची चंगळ होणार असल्याचे सध्याच्या स्थितीवरून स्पष्ट होत आहे. काजळी आलेला कांदा देखील ४० रुपये किलो दराने विकताना कांद्याची प्रत पाहिली जात नाही. पण ग्राहकांना तो नाईलाजास्तव खरेदी करावा लागतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विवाहितेची फुरसुंगीत आत्महत्या

$
0
0

हडपसर : पती, सासू आणि सासरे यांच्या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना फुरसुंगीतील तुकाई नगर येथे झाली. आत्महत्या केलेल्या विवाहितेचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर पती, सासू-सासरे फरारी आहेत.

मोनिका सागर अवचिते (वय २२, रा. चिंतामणी निवास, तुकाई दर्शन, फुरसुंगी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पती सागर राजेंद्र अवचिते (२५) सासू शारदा राजेंद्र अवचिते (५०) सासरे राजेंद्र अवचिते (५५) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मोनिकाचे वडील ज्ञानेश्वर विठ्ठल कनघरे (रा. पवार नगर, जुनी सांगावी) यांनी फिर्याद दिली आहे. मोनिका व सागर यांच्या लग्नामध्ये ठरलेले मानपान व रोख रक्कम व सोन्याचे दागिने दिले नाही म्हणून मागील दीड वर्षांपासून मोनिकाला तिच्या सासरची मंडळी तिला मारहाण आणि मानसिक त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कोर्टाच्या निर्णयात हस्तक्षेप नको’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याच्या फाशीबाबत कोर्टाच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करू नये, अशीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, असे पक्षाचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी सोमवारी स्पष्ट केले. मात्र, याकूब मेमनच्या फाशीबाबत बोलतानाच मालेगाव आणि समझोता एक्स्प्रेसमधील स्फोटाच्या प्रकरणांतील आरोपींबाबत बोटचेपे धोरण का, असा सवाल त्यांनी भारतीय जनता पक्षाला विचारला.

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात आलेल्या दिग्विजयसिंह यांनी पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना राजकीय सद्यस्थितीबाबत मार्गदर्शन केले. शहराध्यक्ष अभय छाजेड, प्रदेश सरचिटणीस यशवंत हापे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे, उपमहापौर आबा बागूल, उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, रमेश बागवे, मोहन जोशी, रोहित टिळक, मुख्तार शेख, बाळासाहेब दाभेकर, गोपाळ तिवारी, वीरेंद्र किराड आदी या वेळी उपस्थित होते. दहशतवादापासून ते महागाईच्या मुद्द्यांवरून दिग्विजयसिंह यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढविला. याकूब मेमनच्या फाशीच्या मुद्द्यावरून सध्या गदारोळ सुरू आहे. दहशतवादाला कोणतीही जात किंवा धर्म नसतो, मात्र एकीकडे भाजप आणि संघपरिवार या मुद्द्यावरून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे, पण दुसरीकडे मालेगाव आणि समझोता एक्स्प्रेसमधील स्फोटांप्रकरणातील आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका त्यांनी केली.

दहशतवादाला धर्म नसतो. त्यामुळेच काँग्रेसने अशा कट्टरतावादाला कायमच विरोध केला, त्यासाठी काँग्रेसच्या दोघा नेत्यांनी बलिदान दिले. मात्र, आता कट्टरपंथीयांना प्रोत्साहन देण्याचा भाजपचा अजेंडा आहे, असा आरोप त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे सर्वांत स्वच्छ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

युनायटेड नेशन चिल्ड्रन फंडने (युनिसेफ) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार स्वच्छ भारत कार्यक्रमाअंतर्गत वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम आणि त्याचा नियमित वापर करण्यात पुणे जिल्हा अग्रेसर ठरला आहे. जिल्ह्यातील १७८ ग्रामपंचायती निर्मल झाल्या आहेत. २२१ ग्रामपंचायतीतील ९० टक्क्यांपेक्षा अधिक लोक शौचालयाचा वापर करतात, तर ७५१ ग्रामपंचायतींमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक कुटुंबांनी शौचालयांचे बांधकाम केले आहे.

'युनिसेफ'ने राज्यातील शौचालयांच्या वापराबाबत पाहणी करून त्यासंबंधीचा अहवाल सादर केला. त्यामध्ये सर्वाधिक निर्मल ग्राम पंचायतींच्या यादीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पहिला क्रमांक आहे. या जिल्ह्यातील २०५ ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार पाप्त झाला आहे. त्यापाठोपाठ पुण्याच्या १७० ग्रामपंचायती निर्मल झाल्या आहेत. त्यानंतर लातूर ७७, ठाणे (पालघरसह) ६० आणि नाशिक जिल्ह्यातील ५९ ग्रामपंचायती निर्मल झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निर्मल ग्रामपंचायतींची संख्या जास्त आहे, मात्र, शौचालयांच्या वापराचे प्रमाण पुण्यात अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे.

पूर्णपणे निर्मल ग्राम न झालेल्या ; परंतु शौचालयाचा वापर करण्याचे प्रमाणे ९० टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये पुणे जिल्ह्याचा क्रमांक पहिला आहे. पुण्यातील २२१ ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. पुण्यानंतर सातारा १५५, कोल्हापूर १४७, सिंधुदुर्ग १२३ आणि रायगड व सांगली जिल्ह्यात प्रत्येकी ११५ गावांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या शौचालयाचा वापर करत आहे. स्वच्छ भारत कार्यक्रमामध्ये परभणी आणि धुळे जिल्हा तळाला आहे. या जिल्ह्यातील अवघ्या दोन ग्रामपंचायती निर्मल आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाला लुटणारा रिक्षाचालक गजाआड

$
0
0

पिंपरीः तरुणाला मारहाण करून लुटणाऱ्या रिक्षाचालकाला भोसरी पोलिसांनी अटक केली. ही घटना शनिवारी (२५ जुलै) लांडेवाडी परिसरात रात्री नऊच्या सुमारास घडली. राजू व्यंकट चांदणे (वय २३, रा. लांडेवाडी वसाहत, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. या प्रकरणी भरत बुरुडे (२५, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरतची रिक्षाचालक राजू सोबत तोंडओळख आहे. शनिवारी रात्री ते भोसरीतील भाजी मंडई समोरील रिक्षाथांब्यावर मित्रांसोबत गप्पा मारत उभे होते. दरम्यान बोलत असताना राजूने भरत सोबत वाद घालण्यास सुरवात केली. राजू व त्याच्याइतर दोन साथीदारांनी भरतला जबरदस्तीने रिक्षात बसवले. त्यांना लांडेवाडी वसाहतीजवळ असणाऱ्या फिलिप्स कंपनीसमोरील रस्त्यावर घेऊन गेले. त्या ठिकाणी भरतला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या खिशातील साडे पाच हजार रुपये हिसकावून पोबारा केला. या प्रकरणी भरतने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असता राजूला अटक करण्यात आली. फौजदार एस. वाय. पाटील तपास करत आहेत.

दुचाकीची धडक बसून तरुण ठार

दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवारी (२४ जुलै) रात्री साडे आठच्या सुमारास निगडी येथे हा अपघात झाला. निरज राजेंद्र प्रतापसिंग असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा आतेभाऊ कांचन सिंग (२६, रा. निगडी) यांनी फिर्याद नोंदविली आहे. या प्रकरणी विठ्ठल रंजीत मोरे (रा. पर्वती) या दुचाकीस्वाराविरोधात निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास निगडीतील त्रिवेणीनगर चौकात मोरे हे भरधाव वेगात आपल्या दुचाकीवरून जात होते. त्या वेळी त्यांच्या दुचाकीची निरज यास जबर धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मोरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक आर. पी. बोबडे तपास करीत आहेत.

मृतदेह सापडला

चिंचवड येथील पवना नदीपात्रात एका वाहनचालकाचा सोमवारी (२७ जुलै) मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृतदेहावर मारहाणीच्या खुणा असल्याने घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. भागवत दादाराव धांडे (वय ३३) असे मृत वाहनचालकाचे नाव आहे.

वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक एन. जे. शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, धांडे शनिवारपासून (२५ जुलै) घरातून निघून गेले. तेव्हापासून ते बेपत्ता होते. या प्रकरणी मुंबई पोलिस दलात असलेल्या त्याच्या भावाने वाकड पोलिस ठाण्यात बेपत्ता झाली असल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, सकाळी चिंचवड येथील पवना नदी पात्रात त्याचा मृतदेह आढळून आला. तो कुजलेल्या अवस्थेत असून चेहऱ्यावर मोठ्या जखमा होत्या. याबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला जात असून, मृत्यूचे कारण समजू न शकल्याने त्याचा व्हिसेरा राखून ठेवला आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रमुख शहरांत हाय अॅलर्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पंजाबमधील गुरुदासपूर पोलिस ठाण्यावर झालेल्या दहशतवादी हल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख राज्यांसह महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नाशिक व नागपूर शहराला हाय अॅलर्ट देण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे शहर पोलिसांच्या विविध पथकांकडून सोमवारी (२७ जुलै) दिवसभर तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती.

शहरात दाखल होणाऱ्या सर्व प्रवासी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. सर्व इन-आउट पॉइंट (रस्ते) सील करण्यात आले आहेत. तसेच रात्री आठ ते अकरा या काळात संपूर्ण शहरात एकाच वेळेस नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. शहरात पुणे पोलिसांच्या शीघ्रकृतीदलाच्या (क्युआरटी) आठ पथकाकडून तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी-कर्मचारी, पोलिस ठाण्यातील तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी विशेष तपासणी मोहिम राबविली.

पोलिस ठाण्यातील सर्व गस्ती वाहनांमध्ये नेहमीपेक्षा अतिरिक्त शस्त्रास्त्रे ठेवण्याचे आदेश दुपारी मुंबई नियंत्रणकक्षावरून सर्वांना देण्यात आले. सर्व लॉज, हॉटेल, मोठे गोडाउन यांची तपासणी मोहीम रात्री उशिरा राबविण्यात आली. मिश्र लोकवस्तीमध्ये साध्या वेशातील पोलिस देखील तैनात करण्यात आले आहेत. शहरातील भाडेकरू, नोकरादार कर्मचाऱ्यांची माहिती तत्काळ सर्व पोलिस ठाण्यांमध्ये जाऊन देण्यात यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

शहरातील खासगी आणि महापालिकेच्या वाहनतळांवर देखील पोलिसांनी रात्री उशिरा तपासणी केली. बॉम्ब शोधक-नाशक पथक, श्वान पथक देखील तैनात ठेवण्यात आले आहे. लोकांनी आफवांवर विश्वास ठेवू नये, संशयास्पद वाहनांची-व्यक्तींची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला द्यावे असे देखील आवाहन करण्यात आले आहे.पोलिस ठाण्यांमध्ये देखील शस्त्रधारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. पुणे शहरात लष्कराशी संबंधित परिसरात देखील पोलिस आणि सैन्य पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images