Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘एक्स्प्रेस वे’वर कार उलटली

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, लोणावळा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर दोन नंबरच्या कामशेत बोगद्याजवळ कारच्या अपघातात वरळीच्या पोलिस निरिक्षकासह पोलिस हवालदाराचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यामध्ये एका वकिलाचा समावेश आहे. हा अपघात शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास झाला.

वरळी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अर्जुन शंकर केंगार (वय ४७) आणि मुंबई पोलिस मुख्यालयातील हवालदार सतीश किसन शिंदे (वय ५१) अशी मृत्युमखी पडलेल्या पोलिसांची नावे आहेत. जखमींमध्ये अॅड. शिवाजी हराळ (वय ३१, रा. ताडदेव, मुंबई) आणि कार चालक जेरल्ड रिचर्ड रोझ (वय ४९, रा. वरळी) यांचा समावेश आहे.

वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केंगार आणि त्यांचे वकील सहकारी कामानिमित्त वाई येथे त्यांच्या रेनॉल्ट डस्टर कारने (एमएच ४६ टी ७२२७) निघाले होते. शुक्रवारी दिवसभर मावळमध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता. दरम्यान मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील कामशेत येथील दोन नंबरचा बोगदा सोडल्यानंतर बाजूने जाणाऱ्या वाहनामुळे रस्त्यावर साचलेले पाणी त्यांच्या कारच्या काचेवर उडाले. त्यामुळे चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि ती मार्गालगत डाव्या बाजूला असलेल्या खड्ड्यात कोसळली. त्यात केंगार आणि शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला, तर वकील आणि कारचालक गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर निगडीच्या लोकमान्य हॉस्पिटलात उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वे झाली फुल्ल

$
0
0

पुणे : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेच्या दुरुस्तीच्या कामामुळे दुपारच्या वेळेत रस्ता बंद ठेवण्यात येत असल्याने मुंबईला जाणाऱ्यांसाठी प्रवाशांनी रेल्वेला पसंती दिल्याचे निदर्शनास आले. मुंबईला जाणाऱ्या डेक्कन, प्रगती आणि सिंहगड एक्स्प्रेसला दररोजच्या तुलनेत शुक्रवारी मोठ्या संख्येने गर्दी होती. एसटीच्या दुपारच्या बसेसला नियोजित वेळेपेक्षा अधिक वेळ लागल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. एक्स्प्रेस वेच्या दुरुस्तीच्या कामास गुरुवारी सुरुवात करण्यात आली आहे. दररोज दुपारी १२ ते सायंकाळी चार या दरम्यान दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे या वेळेत टप्याटप्याने वाहतूक सुरू ठेवण्यात येत आहे.

पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी दररोज २३ गाड्या आहेत. एका दिवसात तब्बल तीन लाख प्रवासी पुणे-मुंबई दरम्यान रेल्वेने ये-जा करतात. शुक्रवारी नेहमीच्या प्रवाशांव्यतिरिक्त अनेकांनी मुंबईला जाण्यासाठी रेल्वेला पसंती दिली. त्यामुळे सकाळपासून रेल्वेला गर्दी होती. सकाळी सहा ते आठ यावेळेत पुण्यावरून जाणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्स्प्रेस या गाड्यांना प्रवाशांची गर्दी होती. एक्स्प्रेस वेवरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय गेल्या दोन दिवसात झाला. त्यामुळे रेल्वेचे तिकीट रिझर्व्ह न करता प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक होती. परिणामी, जनरल डबे तुडुंब भरले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊस, मनस्ताप आणि रांग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोणावळा-खंडाळा घाट परिसरात एरवी वर्षासहलीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची रीघ लागते. शुक्रवारी मात्र दरडमोहिमेच्या कामांमुळे एक्स्प्रेस वेची वाहतूक मंदावली आणि प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागला. वीकेंडमध्ये त्यात आणखी भरच पडण्याची शक्यता आहे.

अवजड वाहने, व्हॉल्वो आडोशी बोगद्याजवळील एका लेनमधील आलटून पालटून मुंबई-पुण्याकडे सोडण्यात येत आहेत. मात्र, त्यामुळे घाटाच्या लोणावळ्याकडील बाजूस मोठी रांग लागत आहे. तसेच, जुन्या घाटमधील कारची वाहतूक वळविण्यात आली असली, तरी त्या ठिकाणी दुहेरी वाहतूक असल्याने कोंडी होत आहे. सायंकाळी पाच वाजता काम संपल्यानंतर एक्स्प्रेस वेवरील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी महामार्ग पोलिस व संबंधित यंत्रणांकडून शर्थ करण्यात आली. पण, त्याचा उपयोग झाला नाही. सुमारे दोन तास या आठ किलोमीटरच्या मार्गावर खोळंबा झाला होता. एक्स्प्रेस वेवर चार-चार तास रांगेत तिष्ठत थांबावे लागले, असे ऋषिकेश कोंढाळकर यांच्यासह इतर प्रवाशांनी 'मटा'ला सांगितले. वाहतुकीच्या नियोजनासाठी पोलिसांनी सर्व तयारी केली आहे. जोरदार पाऊस-धुके, दरडीचे काम आणि वाहनांची प्रचंड रांग, यामुळे ते कोलमडून पडल्याचे चित्र होते.

टोल आकारू नये...

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दरड कोसळून नागरिकांचे प्राण जात असून, रस्त्याच्या देखभालीकडेही दुर्लक्ष केले जात असल्याने रस्ता पूर्ववत होईपर्यंत टोल आकारू नये, अशी मागणी आमदार अनंत गाडगीळ यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत केली. रस्त्याच्या देखभालीसाठी टोल गोळा केला जात असून, त्याची देखभालच व्यवस्थित होत नसल्याचे वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्पष्ट होत आहे. शुक्रवारपासून हायवेची दुरुस्ती सुरू करण्यात आल्याने नागरिकांना तीन ते चार तास अडकून पडावे लागत आहे. अशा परिस्थितीत वाहनचालकांना दिलासा देण्यासाठी टोल रद्द केला जावा, अशी मागणी आमदार गाडगीळ यांनी केली. एक्स्प्रेस हायवे सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात घाट परिसरातील दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे, सर्व लहान वाहने जुन्या रस्त्याने वळविण्यात आली असून, केवळ जड वाहनांनाना एक्स्प्रेस-वेचा वापर करण्याची मुभा देण्यात आली आहे. परंतु, दुरुस्ती दरम्यान रस्ता बंद ठेवण्यात येत असल्याने वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागत असल्याचे चित्र पहिल्याच दिवशी पाहायला मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसवणूक जीवावर बेतली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

स्वस्तात सोने विकण्याच्या व्यवहारात फसवल्याचा राग धरून चिंचवडमधील पाच सराईत गुन्हेगारांनी औरंगाबाद येथील तरुणाचे रांजणगावातून अपहरण केले. त्यानंतर त्याचा गळा दाबून त्याचा खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह भीमा-पाटस नदीपात्रात टाकला. याप्रकरणी पिंपरी ठाण्यातील तपास पथकाने शुक्रवारी (२४ जुलै) चार जणांना अटक केली असून, त्यांच्यावर औरंगाबादमध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

बापू बनसोडे (वय ३२, रा. औरंगाबाद) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. मंगेश कदम, सुशील गायकवाड, आनंद दणाणे, सुनील लकडे (सर्व रा. चिंचवड) यांना अटक करण्यात आली आहे. तर मुत्या याला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापू बनसोडे याचा मंगेश कदम व त्याच्या साथीदारांसोबत सोने विक्रीचा व्यवहार ठरला होता. त्यानुसार बापू हा २७ लाखांचे सोने त्यांना १२ लाख रुपयांना देणार होता. मंगेश व त्याच्या साथीदारांनी बापूला १० लाख रुपये दिले होते. परंतु, नंतर बापू हा सोने देण्यास टाळाटाळ करू लागला. पैसे वसूल करण्यासाठी त्यांनी बापूचे रांजणगावमधून अपहरण केले. दरम्यान, मंगेश कदम व त्याच्या साथीदारांनी बापूचे अपहरण करून त्याला टाटा इंडिगो मोटारीतून चिंचवडमध्ये आणले. चार ते पाच दिवस त्या ठिकाणी ठेवल्यानंतर त्याचा गळा आवळून खून केला.

सहाय्यक निरीक्षक क्षीरसागर, कर्मचारी मोमीन व पथक पिंपरीत दाखल झाले. त्यानंतर फौजदार हरिश माने यांना संशयित आरोपींचे फोटो दाखविले. त्यावरून माने व हवालदार गंगाधर नाईकरे, बाबा इनामदार, दगडू सोनावणे यांनी आरोपींना ओळखले.

व्हॉट्‌स अॅप मुळे छडा

आरोपींबाबत रांजणगाव पोलिसांना कुणकुण लागली होती. मात्र, ठोस माहिती मिळत नव्हती. त्यामुळे ते पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झाले. त्यानंतर सहाय्यक निरीक्षक क्षीरसागर व फौजदार माने यांनी 'व्हॉट्‌स अॅप' च्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक्स्प्रेस वे’वर चालकांची ‘कसरत’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

एक्स्प्रेस वेवर बोरघाटातील खंडाळा एक्झिट ते खोपोली एक्झिटदरम्यानच्या अंत्यत धोकादायक दरडी हटविण्याच्या मोहिमेच्या कामाला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. परिणामी, मुंबई-पुण्यादरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली असून घाट परिसरामध्ये गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वीकेंडनिमित्त लोणावळा परिसरात येणाऱ्या अतिउत्साही पर्यटकांमुळे त्यामध्ये पुढील दोन दिवसांत भरच पडण्याची भीती आहे.

एक्स्प्रेस वेवर खंडाळा व आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळण्याचे जीवघेणे प्रकार घडले आहेत. इतर आठ ठिकाणी धोकादायक दरडप्रवण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच 'दरडमोहीम' हाती घेण्यात आली. शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून त्याला प्रारंभ झाला. पुढील किमान दोन आठवडे सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत या कामामुळे वाहतुकीचे फेरनियोजन करण्यात आले आहे.

ट्रकसारखी अवजड वाहने आणि व्हॉल्व्हो बसेस आडोशी बोगद्याजवळील मार्गावरील मुंबई-पुण्याच्या दिशेने आलटून पालटून सोडली जात आहेत. त्यामुळेच, या आठ किलोमीटरच्या परिसरात या वाहनांना किमान तीन तास खोळंबून राहावे लागत आहे. हलकी वाहने आणि एशियाडसह सर्वसाधारण एसटी बसेसची वाहतूक जुन्या घाटामधून खोपोलीमार्गे केली जात आहे.आपले गाडे पुढे दामटविणारे बेशिस्त वाहनचालक आणि एकूणातच गाड्यांच्या मोठ्या संख्येमुळे हा मार्ग अपुरा पडत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेपुढे आर्थिक संकट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्मार्ट सिटीतील सहभागाची स्वप्ने पाहणाऱ्या पालिकेला शुक्रवारी मोठा झटका बसला आहे. मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) आकारणीची मर्यादा वाढविणारी अधिसूचना राज्य सरकारने जारी केली असून, त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नामध्ये तब्बल ७५ टक्क्यांची घट होण्याची भीती आहे.

मासिक जमा-खर्चाचा ताळेबंद साधताना पालिकेला तारेवरची कसरत करावी लागणार असून, सरकारी अनुदान वेळेत मिळाले नाही, तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होण्यासारखी परिस्थिती ओढवेल. एलबीटी लागू करण्यासाठी व्यापाऱ्यांच्या उलाढालीची वार्षिक मर्यादा पाच लाख रुपयांवरून ५० कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्या संदर्भातील अधिसूचना राज्य सरकारने शुक्रवारी प्रसिद्ध केली.

पालिकेच्या गेल्या काही वर्षांतील आर्थिक स्थितीचा आढावा घेतला, तर एलबीटीसह महिन्याला सरासरी २२५ ते २५० कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. पालिकेचा मासिक सरासरी खर्च १५० कोटी रुपये आहे. पुढील महिन्यापासून एलबीटीचे उत्पन्न मिळाले नाही, तर पालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक होण्याची शक्यता आहे. एलबीटी वगळून पालिकेला जेमतेम १५० कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, पगार, वीज, औषधे, पेट्रोल, देखभाल-दुरुस्ती हे सगळे आवश्यक खर्च भागवितानाच ओढाताण सहन करावी लागणार असून, त्यातून निधी शिल्लक राहिला तरच विकासकामे करता येणार आहेत.

पालिकेत एक एप्रिल २०१३ पासून एलबीटी लागू झाला. पहिल्या दोन वर्षांत राज्यात सर्वाधिक उत्पन्न मिळविण्यात पालिकेला यश आले. राज्य सरकारने गेल्या मार्चमध्ये बजेट अधिवेशनात एलबीटी रद्द करण्याची घोषणा केली. तसेच, एलबीटी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी व्याज आणि दंडातून सूट देणारी अभय योजना लागू केली गेली. त्याचा एकत्रित परिणाम पालिकेच्या उत्पन्नावर झाला असून, गेल्या तीन महिन्यांत पालिकेला एलबीटीतून जेमतेम तीनशे कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुत्र्यांच्या हत्येविरोधात आज शहरात निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केरळमध्ये भटक्या कुत्र्यांच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या हत्येविषयी जनजागृती करण्यासाठी पुण्यातील प्राणीमित्र आज, रविवारी (२६ जुलै) निदर्शने करणार आहेत. नामदार गोपाळ गोखले रोडवर दुपारी ४.३० ते ६.३० या वेळेत निदर्शने करण्यात येणार आहेत. शहरांमधील भटक्या कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी सुप्रीम कोर्टाने पंधरा वर्षांपूर्वीच प्राणी जन्मदर नियंत्रण नियम जाहीर केले आहेत. सर्व महापालिकांना त्याची अंमलबजावणी बंधनकारक केली आहे. कुत्र्यांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी, त्यांचा उपद्रव टाळण्यासाठी शस्त्रक्रियेद्वारे नसबंदी करणे हा एकमेव पर्याय कायद्याने मान्य करण्यात आला आहे.

श्वानांना आपापल्या मूळ ठिकाणी आपले जीवन जगण्याचा अधिकार दिला आहे. त्यांची हत्या किंवा त्यांना मारहाण करणे अथवा विषारी पदार्थ देणे हा गुन्हा असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. तरी देखील केरळमधील राज्यकर्त्यांनी तेथील भटक्या कुत्र्यांची सर्रास मारहाण करून किंवा विष घालून हत्या करण्यास पाठिंबा दिला आहे. त्या विरोधात देशातील श्वानमित्र संघटनांनी आज निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. या धर्तीवर पुण्यातील नागरिक, प्राणीमित्र आणि प्राणी संघटनांतर्फे जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती उपक्रमाच्या समन्वयक नेहा वाझ यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रायसोनी पतसंस्थेकडून वृद्धाची फसवणूक

$
0
0

पुणेः भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटीच्या हडपसर शाखेमध्ये ठेवण्यात आलेली ३२, ३८,३०४ रुपयांची मुदत ठेवीची रक्कम परत न ​दिल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी सोसायटीचे चेअरमन प्रमोद रायसोनी यांच्यासह १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी क्लेमेंट डिसोझा (वय ६७, रा. हडपसर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी यांनी रायसोनी को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ३२,३८,३०४ रुपयांची मुदत ठेव ठेवली होती. मुदत ठेवीची रक्कम परत मागितली असता त्यांना मूळ रक्कम किंवा मूळ रक्कमेवरील व्याज परत न देता फसवणूक केली, अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एलबीटी पूर्णपणे रद्द झालाच पाहिजे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

सरकारने 'एलबीटी' रद्द केला; मात्र त्यासाठी ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढालीच्या मर्यादेची अट व्यापाऱ्यांमध्ये फूट पाडणारी आहे. त्यामुळे 'एलबीटी' पूर्ण रद्द करण्याचे आश्वासन सरकारने पूर्ण केले नाही, अशी टीका फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी शनिवारी (२५ जुलै) केली.

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सत्तेवर येताच 'एलबीटी' रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. ते त्यांनी अर्धवट पाळले. या विषयीच्या अध्यादेशात ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांना एलबीटी लागू राहणार आहे. त्यामुळे सुमारे ९९ टक्के उद्योग या करातून चुकणार आहेत. मात्र, या अटीमुळे ५० कोटींपेक्षा जास्त आणि ५० कोटींपेक्षा कमी उलाढाल अशी फूट पडणार आहे. तसेच, या अटीमध्ये पेट्रोल आणि डिझेल कंपन्या बसत नाहीत. त्यामुळे त्यांच्या किमतीतील घट आणि पर्यायाने सर्वसामान्यांना आवश्यक वस्तूंच्या किमती कमी होणार नाहीत,' असे बाबर म्हणाले. राज्य सरकारने 'एलबीटी' पूर्णपणे रद्द करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास यापुढेही आंदोलने चालू राहतील, असा इशाराही देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीआरटीचे काउंटडाउन सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे/येरवडा

आजवर सातत्याने 'डेडलाइन' हुकल्याने टीकेचे लक्ष्य ठरलेली संगमवाडी-विश्रांतवाडी रस्त्यावरील (आळंदी रोड) जलद बस वाहतूक सेवा (बीआरटी) एक ऑगस्टपासून कार्यान्वित करण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. विविध कामांचा दैनंदिन स्वरूपातील आढावा घेण्यासाठी पालिकेत सध्या बैठकांचे सत्र सुरू आहे. महापौर आणि पालिका आयुक्तांतर्फे बीआरटीच्या प्रगतीवर लक्ष ठेवले जात असून, आठवड्याभरात 'ट्रायल रन' ही घेतल्या जाण्याची चिन्हे आहेत.

आळंदी आणि नगर रोडवर कोट्यवधी रुपये खर्च करून बीआरटीसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती केली गेली. प्रवाशांना बसची माहिती समजण्यासाठीची 'इंटलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम' (आयटीएमएस) ही यंत्रणा नसल्याने बीआरटी खुली केली जात नव्हती. काही दिवसांपूर्वी बीआरटीच्या आढावा बैठकीत पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली. ही मागणी फेटाळून एक ऑगस्टपासून बीआरटी सुरू करण्याचे आदेश महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिले.

गेल्या आठवड्यात पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनीही पथ विभाग, पीएमपी यांची एकत्रित बैठक घेऊन अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, आळंदी रोडवरील कामांनी वेग घेतला असून, बसथांब्यांच्या दुरुस्तीचे काम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. आयुक्तांतर्फे बीआरटी मार्गावर सुरू असलेल्या कामांचा दैनंदिन आढावा घेण्यात येत असून, शुक्रवारी त्यांच्यासह पालिका आणि पीएमपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बीआरटीची पाहणी केली.

पालिकेतर्फे बसथांब्यांचे काम संपताच, पीएमपीतर्फे 'आयटीएमएस'ची उभारणी केली जाणार आहे. एका बसथांब्यावर 'आयटीएमएस' यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी पीएमपीला तीन ते चार तासांचा अवधी लागणार असल्याने येत्या आठवड्यात ही सर्व कामे पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे, पालिकेच्या नियोजनानुसार जुलैच्या अखेरच्या आठवड्यात बीआरटी मार्गावर 'ट्रायल रन' घेतली जाण्याची शक्यता आहे. एक ऑगस्टला समारंभपूर्वक बीआरटी खुला करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आल्याचे संकेत देण्यात येत आहेत.

तयारी अंतिम टप्प्यात

बीआरटी सुरू करण्यास अवघे काही दिवस उरले असल्याने शुक्रवारी पालिका, पीएमपी आणि वाहतूक पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बीआरटी मार्गाची पाहणी केली. यावेळी, आयुक्तांसह सर्वांनीच बीआरटी मार्गावर बसमधूनही प्रवास केला. बसथांबे, दुभाजक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी उर्वरित उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

महापालिकेकडून बसथांबे पीएमपीला हस्तांतरित केल्यानंतर पुढील चार दिवसांत बस थांब्यांवर आयटीएमएस यंत्रणा बसविण्यात येईल. त्यानंतर, बीआरटी सुरू करण्यात येईल.

- मयुरा शिंदेकर, सीईओ, पीएमपी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळाचा प्रश्न रखडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यासाठी पुरंदर, हवेली, खेड तालुक्यात विविध ठिकाणी जागा पाहिल्या. मात्र, तेथील लोकप्रतिनिधींच्या दुटप्पी भूमिकेमुळे विमानतळाचा प्रश्न निकाली काढू शकलो नाही, अशी खंत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

पुणे महापालिकेच्यावतीने सातारा रस्त्यावर धनकवडी येथील सदगुरु शंकर महाराज उड्डाणपुलाचे उदघाटन शनिवारी अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, आमदार अनिल भोसले, उपमहापौर आबा बागूल, स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम, प्रवक्ते अंकुश काकडे, सभागृह नेते बंडू केमसे, नगरसेवक विशाल तांबे, अप्पा रेणुसे, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, माजी उपमहापौर दीपक मानकर, मनसेचे गटनेते बाबू वागसकर आदी उपस्थित होते.

'पुणे-सातारा रस्त्यवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत होती. मात्र धनकवडी येथे उभारलेल्या उड्डाणपुलामुळे ही वाहतूक कोंडी सुटणार आहे. हा उड्डाणपूल चांगल्या पद्धतीने उभारण्यात आला आहे. या पुलाला शंकर महाराज यांचे नाव दिल्याने स्वच्छता ठेवा. हडपसर आणि पुणे विद्यापीठ चौकातील पूल चुकीचा झाला आहे. त्यामुळे चुकीचे उड्डाणपूल होऊ नये यासाठी महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी यांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे,' असे पवार म्हणाले. देशात आणि राज्यात आलेल्या लाटेमध्ये शहरात भाजपचे आठही आमदार निवडून आले आहेत. मात्र पुढच्या वेळी त्यातील किती जण निवडून येतील, असा टोलाही पवार यांनी लगावला.

पालिकेच्या २००७ च्या निवडणुकीपूर्वी या भागात उड्डाणपूल उभारण्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. ते आज पूर्ण केले. त्यामुळे आजचा दिवस माझ्या आयुष्यातील आनंदाचा दिवस आहे, असे महापौर धनकवडे म्हणाले.

'पोरकटपणा सोडा'

धनकवडी येथील शंकरमहाराज उड्डाणपुलाचे उद््घाटन अजित पवार यांच्या हस्ते होणार होते. त्यापूर्वीच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घाईघाईने त्याचे उदघाटन केले. 'काहींनी पोरकटपणा सोडला पाहिजे. आम्ही सत्तेत होतो; पण असे कधी वागलो नाही. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीसाठी मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी प्रयत्न करून निधी आणला. कार्यालयाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे त्यांच्या आधी आम्ही कार्यालयाचे उद‍्घाटन करायचे का, असा सवाल पवार यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हितसंबंधांमुळे डीपीला उशीर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'शहराच्या विकास आराखड्यावर (डीपी) चर्चाच अधिक रंगल्याने त्यात अनेकांचे वैयक्तिक हितसंबंध आड येऊ लागले. त्यातच, डीपी सरकारकडे सादर करण्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही', याची जाहीर कबुली देऊन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पालिकेतील पदाधिकाऱ्यांना घरचा आहेर दिला. 'शहराच्या भवितव्याचा विचार करून सरकारने डीपी अंतिम करताना, सर्व घटकांना त्यात योग्य स्थान द्यावे,' अशी मागणी त्यांनी केली.

शहराच्या जुन्या हद्दीचा डीपी राज्य सरकारने पालिकेकडून काढून घेतला. त्यावरून, पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने कोर्टात धाव घेतली असताना, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारच्या भूमिकेचे समर्थनच केले. तसेच, डीपी वेळेत सादर करण्यात अपयश आल्याचा उल्लेख करत पालिकेतील पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.

'शहरातील जमिनीला सध्या सोने आणि प्लॅटिनमपेक्षा अधिक भाव आला आहे. अनेक बांधकाम व्यावसायिकांनी जमिनी घेऊन ठेवल्या असल्याने त्यावर आरक्षण पडू नये, अशी त्यांची इच्छा होती. वैयक्तिक हितसंबंधांमुळे डीपीवर चर्चा खूप झाली, हरकतीही मोठ्या प्रमाणावर आल्या. वेळेत सादर न केल्याने सरकारने आता त्यावर अंतिम निर्णय घेताना, शहराच्या भवितव्याचा विचार करावा', अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. डीपीतील सर्व त्रुटी दूर करून सरकारने पुणेकरांच्या हिताचा विचार करावा, असेही त्यांनी सुचविले.

नव्या पालिकेच्या बाजूने कौल

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हडपसर आणि परिसरासाठी स्वतंत्र पालिका स्थापन करावी, असा आग्रह तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे धरला होता. मात्र, हडपसर परिसरातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून त्याला विरोध होत असल्याकडे लक्ष वेधले असता, 'माझ्या प्रत्येक मताशी सर्वच नगरसेवक सहमत असतील असे नाही. सरकारने नव्या पालिकेच्या प्रस्तावाची संपूर्ण शहानिशा करावी आणि पुढील ५० वर्षांचा विचार करून काय फायद्याचे ठरेल, हे लक्षात घ्यावे', अशी सूचना त्यांनी फडणवीस सरकारला केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रोसाठी पावले उचला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'भविष्याचा विचार करून शहरात मेट्रो प्रकल्प होणे अत्यंत गरजेचे असून, या संदर्भात केंद्र-राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत', अशी अपेक्षा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी व्यक्त केली. केंद्र-राज्यात सत्तेत असताना, मेट्रो प्रकल्प आणि रिंगरोड मार्गी लावता आला नाही, याची खंत व्यक्त करतानाच, 'नव्या सत्ताधाऱ्यांनी शहराच्या हितासाठी त्याकरिता पुढाकार घेतल्यास, त्याला निश्चित पाठिंबा दिला जाईल,' असे पवार यांनी स्पष्ट केले.

महापालिकेत राष्ट्रवादीने गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत केलेल्या विकासकामांचा आढावा घेणाऱ्या अहवालाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील मेट्रोला गती देण्याची गरज त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याबाबत अनुकूल असल्याचे संकेत देतानाच, गेल्या वर्षभरात खासदारांचा त्यावरील अभ्यास पूर्ण झाला असेल, असा टोमणा त्यांनी लगावला. व्यापाऱ्यांच्या हितासाठी स्थानिक संस्था करातील बदलांमुळे महापालिकांमध्ये सुरू असलेल्या विकासकामांना फटका बसणार असल्याची भीती पवार यांनी व्यक्त केली. कर्जमाफीसाठी निधीची कमतरता असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत असताना, पालिकांना निधी उपलब्ध कसा करून देणार, याचेही स्पष्टीकरण द्यावे, अशी सूचना त्यांनी केली.

वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी रिंगरोडचे काम प्राधान्याने मार्गी लागणे अपेक्षित आहे. त्यामुळे, बाहेरून शहरात येणाऱ्या अनेक वाहनांचा फेरा वाचू शकेल. सरकारने या प्रकल्पासाठी लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

स्मार्ट सिटीत पुणे नक्की

केंद्र सरकारने जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेऐवजी स्मार्ट सिटी प्रकल्पाची घोषणा केली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही पालिका त्यासाठीचे निकष पूर्ण करण्यात आणि सर्वाधिक गुणांकन मिळविण्यात अग्रभागी असतील. त्यामुळे, स्मार्ट सिटीत दोन्ही शहरांचा निश्चित समावेश होईल, असा दावा पवार यांनी केला.

एकहाती सत्तेची सल कायम

महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत एकहाती सत्ता द्या, असे आवाहन वारंवार करूनही राष्ट्रवादीला पूर्ण बहुमत मिळाले नाही. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनात अजूनही ही सल कायम असल्याचे शनिवारी जाणवले. 'एकहाती सत्ता असती, तर पिंपरी-चिंचवडसारखा पुण्यातही वेगाने विकास करता आला असता; पण इतरांची मदत घ्यावी लागल्याने काही ठराव करताना मर्यादा पडल्या', अशी कबुली त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे- मुंबई एक्सप्रेस-वेवरील दुपारच्या वाहतूक बंदमुळे शनिवारी वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला. लोणावळा परिसरातील जुन्या हायवेवर वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्याने एसटी वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. एसटीच्या पुणे-मुंबई-पुणे दरम्यानच्या बस तीन ते पाच तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले.

गुरुवारपासून दुरुस्तीच्या कामामुळे एक्स्प्रेस-वे सकाळी १० ते सायंकाळी चार या वेळेत टप्प्याटप्प्याने बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवार आणि शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी त्याचा मोठ्या प्रमाणावर फटका वाहतुकीला बसला. पुणे-मुंबई दरम्यान दररोज हजारोंच्या संख्येने वाहने ये-जा करतात. त्यात शनिवार सुटीचा दिवस असल्याने लोणावळ्यात पर्यटनासाठी येणाऱ्यांचीही त्यात भर पडली होती. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली.

एक्स्प्रेस-वे आणि जुन्या हायवेवरील वाहतूक दोन्ही बाजूंनी ठप्प झाली होती. परिणामी, प्रवाशांना काही तास बसमध्येच बसावे लागले. पुण्याहून मुंबईसाठी शिवनेरी, एशियाड आणि साध्या बसच्या मिळून रोज सुमारे साडेतीनशे फेऱ्या होतात. पुण्याहून सुटणाऱ्या बोरिवली, ठाणे, दादर आणि मुंबई सेंट्रल या बस स्वारगेट स्थानकातून तब्बल अडीच ते तीन तास उशिराने सोडल्या. तसेच मुंबईहून पुण्याला येणाऱ्या बसही उशिराने आल्या. स्वारगेट स्थानकातून सकाळी आठ वाजता सोडण्यात आलेल्या गाड्या दुपारी चार वाजेपर्यंत परतल्या नव्हत्या.

एसटीचे आर्थिक नुकसान

पुणे-मुंबई-पुणे या दरम्यान एसटीच्या अनेक गाड्या दिवसभरात तीनपेक्षा अधिक फेऱ्या करतात. शनिवारी वाहतूक कोंडी शक्यता असतानाही प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बस रद्द करण्यात आल्या नव्हत्या. मात्र, दिवसभरात तीन फेऱ्या करणाऱ्या गाड्यांची सायंकाळपर्यंत एक फेरी सुध्दा पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे एसटीला आर्थिक नुकसान झाले. सध्या प्रवाशांच्या मागणीवरून सर्व गाड्या सोडण्यात येत होत्या. कोणती गाडी कोणत्या ठिकाणी पोहचली याची माहितीही प्रशासनाकडून घेण्यात येत होती, अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली.

रेल्वेप्रवासाला प्राधान्य

खाजगी प्रवासी वाहनांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. एस्क्प्रेस-वेवर झालेल्या कोंडीमुळे सर्वच वाहतुकीवर परिणाम झाला होता. रस्तेवाहतुकीची ही दशा असल्याने अनेकांनी रेल्वेने प्रवास करण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे रेल्वे तुडूंब भरून जात होत्या. त्यामुळेही काहींना रस्ते वाहतुकीचा पर्याय स्वीकारावा लागला.

लोणावळा परिसरात सुमारे दोन तास गाडी उभी होती. लोणावळ्याला पर्यटकांची संख्याही जास्त होती. त्यामुळे कोंडीत भर पडली होती. आमच्या गाडीतील अनेक प्रवाशांनी लोणावळ्यापुर्वीच उतरून परत मुंबईला जाणे पसंत केले. चार तासांएेवजी सात ते आठ तासांचा प्रवास करावा लागला.

- राजेश माने, एक प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीचोर गजाआड

$
0
0

पुणेः दुचाकीचोरीप्रकरणी दरोडा प्रतिबंधक विभागाने एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून दुचाकीचोरीचे सात गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. सिद्धेश्वर उर्फ सिद्धू दगडू घोलप (वय २९ रा. सुपर इंदिरानगर) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे केलेल्या तपासात दीड वर्षांपूर्वी त्याने अभिनव कॉलेज, आंबेगाव येथून प्लेजर दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पुणे शहर परिसरात अॅक्टिव्हा, पल्सर, करिझ्मा, स्प्लेंडर, बुलेट, सुझुकी अॅक्सेस आदी गाड्या चोरल्याची त्याने कबुली दिली. त्याच्याकडून तीन लाख रुपयांची सात वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.

दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस फौजदार संजय दळवी, देविदास भंडारी, पोलिस कर्मचारी नासीर पटेल, प्रदीप शितोळे, शरद कणसे, हरिभाऊ रणपिसे, एजाज शिलेदार, संतोष पागार, नीलेश पाटील, दत्ता काटम, किरण लांडगे, महेश कदम, राजेंद्र शिंदे, विनोद साळुंखे, प्रमोद गायकवाड, प्रवीण जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कैदी पळाल्याप्रकरणी पोलिस कर्मचारी निलंबित

$
0
0

पुणेः नगर बस स्थानकातून पोलिसांच्या ताब्यातून कैदी पळून गेल्याप्रकरणी पुणे पोलिस मुख्यालयातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिस नाईक रंगराव बाबू कांबळे, शिपाई मनोज पांडुरंग बडदे, अभिजित विजय कांबळे (सर्व नेमणूक पोलिस मुख्यालय) अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत. येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला कैदी सोपान भगवान गाडे याची नेवासा येथील एका खुनाच्या गुन्ह्यात कोर्टात तारीख होती. त्याला नेवासा कोर्टात घेऊन जाण्यासाठी तीन पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक नेमण्यात आले होते. २१ जुलै रोजी सकाळी तिघेजण गाडेला घेऊन एसटी बसने नेवासा कोर्टात गेले. तेथील कामकाज संपल्यावर परत घेऊन येण्यासाठी त्याला नगर बस स्थानकात घेऊन आले. रात्री साडेआठच्या सुमारास गाडेने लघुशंकेला जायचे असल्याचे सांगितले. त्याला अंधारात मोकळ्या जागेत घेऊन गेल्यानंतर पोलिसाच्या हाताला हिसका देऊन पळून गेला. कैद्याला जेलमध्ये घेऊन येण्याची जबाबदारी असताना निष्काळजीपणा करण्यात आल्याचे आढळून आल्याने मुख्यालयाचे पोलिस उपायुक्त मकरंद रानडे यांनी निलंबनाचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात पावसाचा जोर वाढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने पुढील चार दिवसांत पुण्यासह राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार तर, उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मध्य प्रदेशचा वायव्य भाग आणि लगतच्या राजस्थानच्या पूर्व भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचबरोबर तेथे वातावरणाच्या वरच्या थरात हवेची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. रविवारपर्यंत या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कर्नाटक ते केरळ दरम्यान समुद्रसपाटीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागराच्या ईशान्यभागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्याचीही तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याकडे वाहणारे मान्सूनचे वारे सक्रिय असून, राज्यातील बाष्पाचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी, पुढील चार दिवस राज्यातील पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, शनिवारी मराठवाडा, विदर्भ वगळता राज्यात अन्यत्र पावसाने हजेरी लावली. पुण्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. रात्री साडेआठपर्यंत शहरात एक मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरने गाजवली युद्धभूमी

$
0
0

प्रसाद पानसे, पुणे

सतरा हजार फुटांवरील कारगिलची युद्धभूमी...पाकिस्तानकडून सातत्याने सुरू असलेला बॉम्बवर्षाव....अशा खडतर परिस्थितीतही...'अगदी मेंदूला गोळी लागली, तरी मी तुम्हाला वाचवेन..फक्त मी पोहोचेपर्यंत श्वास रोखून धरा,' हा जवानांना दिलेला शब्द त्यांनी खरा करून दाखवला. इतकेच नव्हे, तर तब्बल १०८ जवानांना त्यांनी मृत्यूच्या दाढेतून बाहेरही काढले. त्यासाठी त्यांना 'सेना मेडल'ने गौरविण्यात आले.

लेफ्टनंट कर्नल डॉ. राजेश वामनराव अढाऊ हे या लढवय्या डॉक्टरचे नाव. मूळचे वर्ध्यातील तळेगाव (शामजीपंत) गावचे डॉ. राजेश १९९७ मध्ये लष्करात दाखल झाले. १९९६ साली झालेल्या कारगिल युद्धावेळी लष्कराच्या वैद्यकीय सेवेत कॅप्टन पदावर ते कार्यरत होते. त्यावेळी २६ वर्षांच्या डॉ. राजेश यांनी युद्धाच्या पूर्ण ५६ दिवसात युद्धभूमीवर केलेल्या अतुलनीय कामगिरीची शौर्यगाथा त्यांनी 'मटा'सोबत उलगडली. सध्या ते रूडकी येथे लष्कराच्या स्पोर्टस मेडिसिन विभागात कमांडिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत.

'कारगिल युद्धाला १६ वर्ष झाली, तरी मला अजूनही ते युद्ध डोळ्यांसमोर दिसते. कारगिल युद्धातील ५६ दिवसांपैकी २३ दिवस मी शिखरावरच काढले. जखमी जवानांना मानसिक आधार देऊन त्यांचा रक्तस्त्राव थांबवणे अत्यंत आव्हानात्मक होते. कणखर मनोभूमिकेमुळेच अत्यंत खडतर परिस्थितीतही १३ गोळ्या लागलेल्या जवानावरही मी यशस्वी उपचार करू शकलो,' असे डॉ. राजेश सांगतात.

डॉ. राजेश यांची शौर्यगाथा

कारगिल युद्ध सुरू झाल्यानंतर डॉ. राजेश १३ जॅकरिफ तुकडीसोबत द्रासला रवाना झाले. यात शहीद कॅप्टन विक्रम बात्रांचाही समावेश होता. त्यानंतर पुढचे ५६ दिवस चाललेल्या युद्धात कॅप्टन डॉ. राजेश सतत जवानांवर उपचार करत होते. त्यामुळेच या तुकडीत सर्वात कमी जवान शहीद झाले. डॉ. राजेश तोलोलिंग शिखरावर चढत असताना वरून सतत गोळ्यांचा, बॉम्बचा वर्षाव सुरू होता. त्यातली गोळी आणि छर्रे लागून ते जखमीही झाले. परंतु, रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या जवानांच्या दुखण्यापेक्षा स्वतःच्या वेदना शुल्लक मानत त्यांनी जवानांवरील उपचार सुरूच ठेवले. तीन दिवस अन्नपाण्याविना त्यांनी कोणाच्या शरीरातल्या गोळ्या काढणे, ड्रेसिंग करणे, तुटलेले हात-पाय-बोटे शिवून देणे अशा प्रकारचे अथक उपचार केले. २३ दिवसांनी युद्ध संपल्यानंतरच त्यांना शिखरावरून खाली येता आले. या २३ दिवसांनंतरच त्यांना दात घासण्याची, गरम पाण्याने आंघोळ करण्याची किंवा गरम जेवणाची संधी मिळाली.

लष्करातील जवानांसाठी प्रत्येक दिवस खडतरच असतो. प्रत्येक संकटावेळी लष्कर धावून येते. लष्करी जवानांच्या या योगदानाचे प्रत्येकाने स्मरण ठेवून त्यांना सन्मान दिला पाहिजे. प्रत्येकाने कधीतरी प्रत्यक्ष युद्धभूमीजवळ जाऊन तिथल्या परिस्थितीची पाहणी केली पाहिजे. तेव्हाच त्यांना या खडतर परिस्थितीची जाणीव होईल. अर्थात, प्रत्येकाला लष्करात जाणे शक्य नसले, तरी छोट्या-छोट्या कृतीतून देशसेवा करणे शक्य आहे.

- डॉ. राजेश अढाऊ, लेफ्टनंट कर्नल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रत्येक कुटुंबाला रोजगाराची हमी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजप कटिबध्द आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील एकाला रोजगार मिळावा या साठी शिक्षण आणि कौशल्य विकासाला केंद्र सरकार प्राधान्य देणार आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

भारतीय जनता पार्टीच्या महासंपर्क अभियानाअंतर्गत भाजपचे स्वेच्छेने सभासदत्व घेतलेल्या कोथरूडच्या जय भवानीनगर झोपडपट्टीतील नागरिकांची जावडेकर यांनी भेट घेतली.या वेळी आमदार मेधा कुलकर्णी, शहर सरचिटणीस संदीप खर्डेकर, उपाध्यक्ष डॉ. संदीप बुटाला आदी पदाधिकारी उपस्थित होते. 'अकरा कोटी सदस्य असणारा भाजप हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. या पक्षात प्रत्येक जण कार्यकर्त्याच्या भूमिकेतच काम करतो. त्याच भावनेतून मी कार्यकर्त्यांना भेटायला आलो आहे. कार्यकर्त्यांचे प्रश्न हे आमचे प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी महासंपर्क अभियानाअंतर्गत भाजपचे पदाधिकारी प्रत्येक सदस्यांपर्यंत पोहोचणार आहेत,' असे जावडेकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तब्बल १० तास वाहतूक ठप्प

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, लोणावळा

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवरील बोरघाटातील दरडी हटविण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेत रस्तेविकास महामंडळ, आयआरबीसह संबंधित यंत्रणेमधील नियोजनाच्या अभावामुळे शनिवारी एक्स्प्रेस-वेसह जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर सुमारे दहा तासांपेक्षा जास्त काळ वाहतूक ठप्प झाली होती. एक्स्प्रेस-वेवर सुमारे २० ते २५ किलोमीटर लांबीच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या प्रकारामुळे नाहक वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागल्याने, प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरली.

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवरील बोरघाटातील आडोशी बोगदा परिसरात धोकादायक दरडी हटविण्याची मोहीम शुक्रवारी सुरू झाली. मोहीम राबविणाऱ्या रस्तेविकास महामंडळ आणि आयआरबी यांच्यातील नियोजनाच्या अभावाचा फटका प्रवाशांना बसला. या पूर्वी वीकेंड आणि सुटीच्या दिवसांत दरडी काढण्याचे काम बंद ठेवण्यात येणार असल्याचे संबंधित यंत्रणेने जाहीर केले होते. त्यानुसार एक्स्प्रेस-वेवरील आडोशी बोगद्यानजीक कामादरम्यान वाहतुकीचे केलेले बदल पूर्ववत करणे गरजेचे होते. परंतु, ते न केल्याने पुणे-मुंबई दरम्यान, ये-जा करणारी वाहने आडोशी बोगद्याजवळ थंडावली. येथे पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या वाहनांसाठी एक तर, मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या वाहनांसाठी दोन लेन ठेवण्यात आल्या आहेत. पहाटेच्यावेळी एक्स्प्रेस-वेवरून मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड असते. तसेच, शनिवारी वीकेंड असल्याने वर्षाविहार आणि पर्यटनासाठी मुंबई, पुणे तसेच राज्यातील पर्यटकांच्या वाहनांचीही त्यात भर पडली.

त्यामुळे शनिवारी पहाटे चारपासून वाहतूक कोंडीला सुरुवात झाली. त्यामुळे मुंबई-पुणे लेनवर खालापूर ते आडोशी बोगदा तसेच, पुणे-मुंबई लेनवर लोणावळ्यातील सिंहगड कॉलेज ते आडोशी बोगद्यापर्यंत वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. एक्स्प्रेस-वे प्रमाणे जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर खोपोली ते लोणावळ्याजवळील वाकसई फाट्यापर्यंत वाहतूक कोंडी ठप्प झाली होती. खंडाळा ते खोपोली परिसरात जुना रोड पूर्णपणे ठप्प झाला होता. या वाहतूक कोंडीत प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अनेकांनी याबाबत संताप व्यक्त केला.

सातारा, सोलापूर, पुणे परिसरातून मोठ्या प्रमाणात दूध, भाजीपाला ठाणे, मुंबईला पाठविण्यात येतो. दूध, भाजीपाल्याचे टँकर मुंबईत पोहचण्यात उशीर झाला. लोणावळा खंडाळा येथे पर्यटनासाठी मुंबई व पुण्याहून निघालेल्या पर्यटकांचे पर्यटन आणि वर्षाविहार वाहतूक कोंडीतच झाला. या सर्वांचा लोणावळा येथील व्यवसायावरही मोठा परिणाम झाला. दुपारी अडीच वाजता एक्सप्रेस व जुन्या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले होते. शनिवारी दुपारी अचानक दरडी काढण्याच्या कामाला सुरुवात झाल्याने पुन्हा अवजड वाहतूक रोखण्यात आली. याचा परिणाम लोणावळ्यात दिवसभर जाणवला. दिवसभर लोणावळ्यातील वाहतूक कोंडी सोडविताना पोलिसांची दमछाक झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images