Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

ढोल पथकांसाठीचे धोरण ठरणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आगामी गणेशोत्सवासाठी शहरातील ढोल पथकांसाठी पोलिसांकडून धोरण ठरवण्यात येणार आहे. पोलिस आणि ढोल पथके यांची आज (२३ जुलै) बैठक होणार असून, पोलिसांकडून ढोल पथकांबाबत कडक भूमिका घेतली जाण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिस आयुक्त के. के. पाठक, सहआयुक्त सुनील रामानंद यांच्यासह अतिरिक्त आयुक्त, सहायक आयुक्त या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. गणेशोत्सवाला अद्याप दोन महिने असतानाच ढोल पथकांनी सराव सुरू केले आहेत. सराव करण्यासाठी पथकांनी पोलिस परवानाही घेतलेला नाही. पथकांच्या वादनाचा त्रास होत असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी कारवाईही सुरू केली होती. मात्र, आता पथकांसाठी धोरण ठरवताना पोलिस काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ढोल पथकांसाठी या बैठकीत धोरण ठरवण्यात येणार आहे. तसेच, वादनामुळे होणारे ध्वनीप्रदूषण, सरावासाठीची वेळ, ठिकाण, ढोलांची संख्या आदी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माळीणच्या स्मृतीही अडकल्या लालफितीत

$
0
0

कुलदीप जाधव, पुणे

माळीण दुर्घटनेतून बचावलेल्यांचे संसार उभारण्यात अपयशी ठरलेल्या प्रशासनाने दुर्घटनेतील मृतांच्या स्मृती जपण्याची तसदीही घेतलेली नाही. राज्य सरकारने दुर्घटनास्थळी स्मृतिवन उभारण्यासाठी निधी मंजूर केला खरा; पण गेल्या वर्षभरात कामाला मुहूर्तही मिळालेला नाही.

गेल्या वर्षी ३० जुलैला डोंगर कोसळल्याने संपूर्ण माळीण गाव उद्‍धवस्त झाले होते. या दुर्घटनेत १५१ जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना आणि भूगर्भशास्त्रज्ञांनी केलेल्या पाहणीनंतर हा भाग धोकादायक ठरविण्यात आला होता. त्यामुळे बचावलेल्या पाच-सहा घरांचेही स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे माळीण गावाचे अस्तित्त्व कायमचे पुसले गेले. या पार्श्वभूमीवर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मृती जपण्यासाठी दुर्घटनास्थळी स्मृतिवन उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने २७ ऑगस्ट २०१४ रोजी घेतला.

मुख्य वनसंरक्षकांनी (प्रादेशिक) महसूल विभागाकडे त्याविषयीचा अहवाल पाठविला होता. या प्रस्तावाला राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता देताना स्मृतिवनासाठी २, ४९, ६५,३७३ कोटी रुपयांच्या निधीला मान्यताही दिली होती. त्यापैकी एक कोटी रुपयांचा निधी २०१४-१५ या वर्षात कामाकरीता मंजूर करण्यात आला.

स्मृतिवन उभारण्यासाठी गावठाणाची संपूर्ण जागा हवी आहे. त्यासाठी बचावलेली घरेही हटविण्याची मागणी केली जात आहे. त्याशिवाय काम सुरू केले जाणार नाही, असे प्रशासनाने कळविल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.

'उर्वरित जागेत स्मारक उभारा'

स्मृतिवन उभारण्यासाठी गावठाणातील बचावलेली घरे स्थलांतरित करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, मोठ्या कष्टाने उभारलेली घरे सुस्थितीत असताना पाडण्यास संबंधित अनुकूल नाहीत. त्यामुळे ती घरे सोडून उर्वरित जागेत स्मृतिवन उभारावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखळीचोरांची माहिती ‘व्हॉट्सअॅप’वर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिस दलांतील अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन सोनसाखळी चोरांविरुद्ध मोहीम उघडली आहे. या अधिकाऱ्यांनी 'व्हॉट्सअॅप' ग्रुप तयार करून सोनसाखळी संदर्भातील माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. यातून मिळालेली सोनसाखळी चोरीची घटना, आरोपी, 'सीसीटीव्ही' फुटेज आदी प्राथमिक माहिती तत्काळ शेअर करण्यात येत आहे.

सोनसाखळीचोरांना रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी पुढाकार घेऊन बुधवारी विविध पोलिस दलांची आंतरराज्य बैठक आयोजित केली होती. कर्नाटक, पुणे शहर, पुणे ग्रामीण, नगर, रायगड, बीड, नागपूर ग्रामीण, कोल्हापूर, जळगाव आदी ठिकाणचे पोलिस अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते. या पोलिस दलांच्या हद्दीत इराणी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. या वस्त्यांमधील संशयितांकडून देशभरातील विविध शहरांत सोनसाखळी चोरीचे गुन्हे करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांना रोखण्यासाठी पोलिस दलांमध्ये समन्वय असावा, या साठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती सहायक आयुक्त राजेंद्र जोशी यांनी सांगितले.

बैठकीसाठी आलेले बहुतांश अधिकारी गुन्हे शाखेतील होते. सोनसाखळी चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी ते आपापल्या भागात प्रयत्न करत आहेत. त्यांना त्यांच्याकडील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेऊन बैठकीसाठी बोलवण्यात आले होते. सर्वांनी आपापल्या हद्दीतील गुन्हेगारांची माहिती आणल्याने सोनसाखळी चोरट्यांचा मोठ्या प्रमाणात डाटा तयार झाला आहे. फरार आरोपींचे नाव, पत्ते तसेच फोटोही शेअर करण्यात आले आहेत.

चोरीमध्ये ८० टक्के बलुची इराणी

पुण्यात सोनसाखळी चोरीचे गुन्हे करणाऱ्यांमध्ये ८० टक्के बलुची इराणी आहेत, तर २० टक्के स्थानिक गुन्हेगार आहेत. गेल्या दीड महिन्यांत स्थानिक गुन्हेगारांनी केलेल्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवर इराणी चोरटे वगळता ३३४ सोनसाखळी चोर आहेत. त्यापैकी ९१ गुन्हेगार पुण्याबाहेरील आहेत. या ९१ गुन्हेगारांच्या हालचाली तपासण्यासाठी प्रयत्न करण्याचे बैठकीत ठरले. राज्यातील तसेच बाहेरील इराणी वस्त्यांमध्ये छापा घालताना स्थानिक पोलिसांची मदत तत्काळ मिळवण्यासाठी बैठकीचा उपयोग होईल , अशी माहिती पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिन्यानंतरही विद्यार्थी दप्तरांविना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळा सुरू होऊन महिना उलटल्यानंतरही विद्यार्थ्यांना गणवेश आणि दप्तरे मिळाली नसल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांना गणवेश देण्यामध्ये प्रशासन अपयशी ठरले असून, वेळेवर वस्तूंचे वाटप न करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी सभासदांनी सर्वसाधारण सभेत बुधवारी केली. ३१ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना वस्तूचे वाटप केले जाईल, त्यानंतर साहित्य न मिळाल्यास ठेकेदारांना काळ्यायादीत टाकण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.

शाळा सुरु होऊन महिना उलटल्यानंतरही पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्याप साहित्य मिळाले नसल्याची तक्रार सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना रेनकोट देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र सत्ताधारी पक्षाने दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप पृथ्वीराज सुतार यांनी केला. शिक्षण मंडळाला आर्थिक अधिकार देण्यापूर्वी स्थायी समितीने विविध शालेय साहित्याची खरेदी केली होती. त्यात गणवेश, दप्तर, वह्या, बूट, चित्रकला साहित्य खरेदीचे टेंडर काढण्यात आले होते. त्यानुसार ८४ हजार बुटांची, ३ लाख २७ हजार वह्यांची, चार हजार बनियनची खरेदी पूर्ण करून त्याचे वाटपही करण्यात आले असल्याचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी सांगितले. पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठीच्या ६७ हजार दप्तरांपैकी १२ हजार दप्तरे पालिकेला मिळाली आहेत. तर १ लाख ६७ हजार गणवेशांपैकी १० हजार गणवेश प्राप्त झाले आहेत. ३१ जुलैपर्यंत संबंधित ठेकेदाराने या वस्तूंचा पुरवठा करावा, असा करार करण्यात आला असल्याने महिनाअखेरपर्यंत या वस्तूंचे वाटप केले जाईल, असे जगताप यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यानाच्या जागेवर एसआरएचे बांधकाम

$
0
0

पुणेः पालिकेच्या विकास आराखड्यात (डीपी) उद्यानासाठी आरक्षित असलेल्या जागेवर बेकायदा झोपडपट्टी पुनर्विकास योजना (एसआरए) उभी राहिल्याची धक्कादायक बाब बुधवारी समोर आली. उद्यानांसाठी आरक्षित जागेवर एसआरएची निर्मिती करता येत नसूनही २००६मध्येच पालिकेने ही योजना मंजूर केल्याचेही उघड झाले. त्यामुळे, उद्यानासाठी आरक्षित जागेचा भूसंपादनाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने दफ्तरी दाखल केला.

नाना पेठेतील घरक्रमांक ४०५, ४०६ येथील जागा १९८७च्या डीपीनुसार उद्यानासाठी आरक्षित होती. या लगतच्या ३९५ ए आणि ३९५ बी या ठिकाणीही उद्यानाचे आरक्षण होते. या जागेबाबत सध्या सुप्रीम कोर्टात दावा दाखल असून, ४०५,४०६ ही जागा भूसंपादन कायद्यानुसार ताब्यात घेण्यासाठीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता.कोर्टात दावा दाखल असलेल्या जागेवरच एसआरए उभी राहिल्याची माहिती पुढे येताच, माजी सभागृहनेते सुभाष जगताप यांनी त्याला आक्षेप घेतला.

उद्यानासाठी आरक्षित जागेवर एसआरए होऊ शकते का, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावेळी, २००६ मध्येच एसआरएला बांधकाम परवानगी देण्यात आल्याचा खुलासा उपायुक्त अनिल पवार यांनी केला. त्यामुळे, परस्पर आरक्षणाच्या जागेवर नियमांचे उल्लंघन करून एसआरए झालीच कशी, यावरून काँग्रेसचे अविनाश बागवे, मनसेचे अॅड. किशोर शिंदे यांच्यासह अनेक सदस्यांनी आक्षेप नोंदविले. अखेर, भूसंपादनाचा प्रस्तावच दफ्तरी दाखल करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकारी-ठेकेदारांचे साटेलोटे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ठेकेदाराने तीन महिने पगार न दिल्याने पालिकेतील कंत्राटी कामगाराचा दोन महिन्यापूर्वी मृत्यू झाला होता. या घटनेचे पडसाद बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. पालिकेतील अधिकारी, ठेकेदारांमध्ये साटेलोटे असल्याने कंत्राटी कामगारांना शुल्लक रक्कम देऊन त्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप करून सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला.

ठेकेदारांकडे काम करणाऱ्या कामगारांना ईएसआय, पीएफ आदी सुविधा दिल्या जात नाहीत. क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या घरातील लोकांकडेच कं‌त्राटी कामगारांचा ठेका असल्यानेच त्यांच्यावर कोणचेही नियंत्रण नसल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला. पालिकेत विविध खात्यात ठेकेदारांमार्फत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांची अधिकारी, ठेकेदारांकडून पिळवणूक होत असल्याचा मुद्दा नगरसेवक वसंत मोरे यांनी सर्वसाधारण सभेत उपस्थित केला. शहरातील नामवंत मंडळींकडे कंत्राटी कामगार पुरविण्याचा ठेका आहे. 'पालिकेत काम करणाऱ्या चतुर्थश्रेणी कामगारांना कोणत्याही सुविधा मिळत नसताना, कंत्राटी कामगारांना सर्व सुविधा पुरविल्या जातात, अशी खोटी उत्तरे पालिका प्रशासन विधानसभेत देत आहे,' असा आरोप नगरसेवक अविनाश बागवे यांनी केला. 'कंत्राटी कामगारांना देण्यासाठी पालिकेकडून नियमाप्रमाणे रक्कम घेतली जाते; प्रत्यक्षात मात्र त्यांना अवघे चार ते पाच हजार रुपये दिले जातात. कंत्राटी कामगाराला नक्की किती रक्कम दिली जाते, यावर पालिकेचे कोणतेही नियंत्रण नाही. तीन ते चार महिने त्यांना पगारच मिळत नाही. ठेकेदारांच्या फायद्यासाठी क्षेत्रीय अधिकारी एकच टेंडर न काढता दहा-दहा लाख रुपयांची अनेक टेंडर काढून ठरलेल्या ठेकेदारालाच कामगार पुरविण्याचे ठेके देतात,' असा आरोप बाबू वागस्कर यांनी केला.

कामगारांचे पैसे खाण्यामध्येही प्रशासनातील अधिकारी मागे हटत नाहीत, किती खाणार, या शब्दात सभागृह नेते बंडू केमसे यांनी भावना व्यक्त केल्या. पालिकेने ठेकेदारी पद्धत बंद करून अकरा महिन्यांच्या कराराने कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून त्यांना नियमाप्रमाणे वेतन द्यावे, अशी मागणी सभासदांनी केली. डॉ. सिद्धार्थ धेंडे, गणेश बीडकर, सुभाष जगताप, अशोक येनपुरे, सुन‌ील गोगले यांनीही जोरदार टीका केली.

'सरकारी सूचनेनुसारच भरती'

पालिकेने कमी पडणारे कामगार कंत्राटी पद्धतीने घ्यावेत, अशा सूचना सरकारने दिल्याने ठेकेदाराकडूनच कामगार घेतले जात असल्याचा खुलासा अतिरिक्त पालिका आयुक्त राजेंद्र जगताप यांनी केला. सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला स्पष्ट उत्तर न देता उडवाउडवीची उत्तरे देऊन जगताप यांनी गेल्या महिन्यातील पाढा पुन्हा वाचला. कंत्राटी कामगारांबाबतचे धोरण तयार होण्यास अजून वेळ असल्याने पुढील महिन्यात उत्तर देण्याचे सूतोवाच जगताप यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटीवाले म्हणतात… नो प्रॉब्लेम!

$
0
0

पुणे : एक्स्प्रेस हायवे काही वेळ बंद राहणार असल्याचा फारसा फटका आयटी क्षेत्राला बसणार नाही, असे आयटी क्षेत्रातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पुण्यातील कंपन्यांसाठी येणाऱ्या व्यक्तींचे विमान रात्री उशिरा अथवा भल्या पहाटे उतरत असल्याने ते सकाळीच पुण्यात दाखल होतात. त्यामुळे एक्स्प्रेस हायवे बंद राहणार असल्याचा फारसा फटका आयटी क्षेत्राला बसणार नाही, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

'एक्स्प्रेस हायवे बंद राहण्याबाबतच्या स्पष्ट सूचना अजूनपर्यंत आम्हाला मिळालेल्या नाहीत. सध्या याबाबत वेगवेगळ्या चर्चा कानावर येत आहेत. आयटी कंपन्यांसाठी परदेशातून विशेषतः अमेरिकेहून येणाऱ्या व्यक्तींची विमाने रात्री उशिरा अथवा भल्या पहाटे मुंबईत उतरतात. त्यानंतर लगेचच या व्यक्ती कारद्वारे एक्स्प्रेस हायवेवरून पुण्यात येतात. साधारणतः नऊ वाजेपर्यंत या व्यक्ती पुण्यात दाखल झालेल्या असतात. त्यामुळे थोडा वेळ एक्स्प्रेस हायवे बंद राहिल्यास त्याचा फारसा परिणाम जाणवणार नाही. परंतु, या बंदीमुळे वाहतूक कोंडी झाल्यास प्रश्न येऊ शकतो,' असे एका बड्या आयटी कंपनीच्या फॅसिलिटी मॅनेजरने सांगितले.

'आमच्या कंपनीसाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची प्रवासव्यवस्था आम्ही कंत्राटदाराकडे सोपविली आहे. त्यांच्याकडून याबाबत योग्य व्यवस्था केली जाईल. परंतु, परदेशातून आलेल्या व्यक्तींकडे वेळ कमी असल्यास प्रसंगी विमान अथवा हेलिकॉप्टरचा पर्यायही निवडला जाऊ शकतो. भारतीय अधिकाऱ्यांसाठी रेल्वेचाही पर्याय उपलब्ध आहे,' असे एका आयटी कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालवाहतुकीला पर्यायी मार्ग काय?

$
0
0

पुणे : दुरुस्तीच्या कामासाठी पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील वाहतूक दिवसातील ठराविक वेळ बंद ठेवल्यास मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची पर्यायी व्यवस्था काय करणार, अशी विचारणा महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूकदार संघटनेने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बुधवारी केली. रस्ता बंद ठेवल्यास माल वाहतुकीवर परिणाम झाल्यास विविध वस्तूंच्या पुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

एक्स्प्रेस वे बंद ठेवण्याबाबतचे वृत्त मंगळवारी चर्चेत होते. त्या पार्श्वभूमीवर, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी मंत्रालयात जाऊन मागणीचे निवेदन दिले. एक्स्प्रेस वेवरून एका दिवसात १० ते १२ हजार मालवाहू वाहने धावतात. त्याद्वारे देशाच्या विविध भागात माल पोचविण्याचे काम केले जाते. या वाहनांना वेळेचे बंधन पाळावे लागते. परिणामी, एक्स्प्रेस वे बंद ठेवल्यास माल वाहतूकदारांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने आमची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी संघटनेने केली.

'पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी एक्स्प्रेस वे आणि जुन्या पुणे-मुंबई हायवे व्यतिरिक्त कसारा घाट हा एकमेव पर्याय आहे. मात्र, कसारा घाटातून जाण्यासाठी वाहनांना मोठा वळसा पडेल. त्या घाटातही दरड कोसळण्याच्या घटना यापूर्वी घडल्या असून रस्त्याचीही दुर्दशा झालेली आहे,' असे संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुरुस्तीदरम्यान मंदावणार वेग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर धोकादायक दगड काढण्याचे काम हाती घेण्यात आल्याने वाहनांचा वेग काही काळ मंदावणार आहे. आवश्यकतेनुसार काम सुरू असताना दोन्ही बाजूची वाहतूक थांबविण्यात येणार आहे. द्रुतगती मार्गावर पुणे-मुंबई लेनवर आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळल्याने बोगद्याच्या चारशे मीटर अलीकडे हा रस्ता बंद असेल. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहने बोगद्याच्या चारशे मीटर अलीकडूनच मुंबई-पुणे रस्त्यावरील तीन लेनपैकी एका लेनवरून बोगदा

संपेपर्यंत पुण्याच्या दिशेने सोडण्यात येतील. त्यामुळे या पट्ट्यात मुंबईकडून पुण्याकडे जाण्यासाठी दोनच लेन उपलब्ध राहणार आहेत. मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक खालापूर, खोपोलीमार्गे द्रुतगती मार्ग ते खोपोली गावातून जुन्या मार्गाकडे जाईल. पुण्याकडून मुंबईकडे जाण्यासाठी द्रुतगती मार्गावरील अंडा पॉइंटकडून जुन्या महामार्गावरील खोपोल ते खालापूरमार्गे वाहने पुढे सोडण्यात येणार आहेत. हा रस्ता केवळ लहान आणि हलक्या वाहनांसाठी असणार आहे. जड वाहने ही द्रुतगती मार्गावरूनच सोडण्यात येणार आहे.

अमृतांजन पुलाकडून जुन्या महामार्गावरील वाहतूक कॉमन रोड असलेल्या घाटात वाहने येते. पण तेथूनच खोपोली मार्गे जुन्या महामार्गावर जाण्यासाठी अंडाकृती पुलाखालील रस्त्यावरून खोपोलीमार्गे लहान वाहने जुन्या महामार्गावर वळविण्यात येणार आहेत. भूगर्भ शास्त्रज्ञांच्या सूचनांनुसार काम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी नव्याने मागविण्यात आलेल्या मशिनची क्रेन ही ७० फूट उंचीवर जाऊन दगड फोडणार आहेत. या क्रेनचा बेस द्रुतगती मार्गावरील सुमारे दीड लेन व्यापणारा आहे. त्यामुळे धोकादायक दगड पाडताना किमान तासभर पुणे-मुंबई-पुणे या दोन्ही बाजूची वाहतूक बंदच करावी लागणार आहे. पाडण्यात आलेले दगड आणि राडारोडा साफसफाई करताना पुढील तासभर वाहतूक संथ गतीने सोडण्यात येणार आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जुन्या हायवेचा उपयोग

वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी मार्ग म्हणून जुन्या पुणे-मुंबई मार्गाची निवड केली आहे. जुन्या मार्गाने पुणे व लोणावळ्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक अमृतांजन पुलावरून पुढे दस्तुरी महामार्गाच्या पोलिस ठाण्याजवळ जुना महामार्ग एक्स्प्रेस वेला जोडण्यात आला आहे. तेथून अवजड वाहने एक्स्प्रेस वेवरून मुंबईकडे जातील. हलकी वाहने येथून जुन्या मुंबईकडे जाणाऱ्या जुन्या रोडने पुढे एक्स्प्रेस वेच्या पुलाच्या खालून गेलेल्या जुन्या मार्गाने सरळ खोपोलीकडे पुढे जातील.

काम सुरू असतानाचा मार्ग

पुण्याहून मुंबईला जाणारी अवजड वाहने एक्सप्रेस वेवरूच जातील.

आडोशी बोगद्यानजीक चारशे मीटर अंतरावर थांबतील. या ठिकाणी असलेल्या मुंबई-पुणे लेनवर उलट्या दिशेने डाव्या बाजूने आडोशी बोगद्या जवळून जाईल.

पुढे ही वाहने आडोशी बोगदा संपताच दीडशे मीटर अंतरावरून सेवा मार्गाद्वारे पुन्हा पुणे-मुंबई मार्गावर प्रवेश करून पुढे ती एक्स्प्रेस वेने मार्गस्थ होतील.

मुंबईहून पुण्याला जाणारी वाहतूक आडोशी बोगदा संपतो, तिथपासून दीडशे मीटर अंतर अलीकडे सेवा मार्गापर्यंत येतील.

तेथून पुढे महामार्ग पोलिस ही वाहने दोन लेनवरून सरळ पुण्याकडे सोडतील.

जेव्हा मोठी दरड किंवा दगड फोडताना धोका निर्माण होण्याची शक्यता वाटल्यास वाहतूक बंद केली जाईल. तासा-तासाच्या अंतराने टप्प्याटप्याने वाहतूक आवश्यकतेनुसार सुरू अथवा केली जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कात्रज घाटातील रस्त्याचीही पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कात्रज घाट आणि शिंदेवाडी दरम्यानच्या डोंगरांची पाहणी करण्यात येणार असल्याचे हवेलीच्या प्रांत अधिकारी स्नेहल बर्गे यांनी बुधवारी सांगितले.

बेकायदा डोंगरफोडीमुळे पावसाच्या पाण्याचा लोंढा रस्त्यावरून मायलेकींचा मृत्यू झाल्याची घटना शिंदेवाडी येथे घडली होती. या घटनेनंतर कात्रज ते शिंदेवाडी दरम्यानच्या रस्त्यावर सुरक्षिततेच्या विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. डोंगरांवरून येणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला चर खणण्यात आले आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास मदत होत आहे.

कात्रज तसेच शिंदेवाडी भागातील डोंगरावर जाण्यासाठी काही बिल्डर्ससह स्थानिक मंडळींनी बेकायदा डोंगरफोड करून रस्ते तयार केले होते. हे रस्ते बंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे. आडोशी येथे झालेल्या दरड कोसळल्याच्या घटनेनंतर जिल्ह्यातील धोकादायक डोंगर भागांची पाहणी करण्याची सूचना जिल्हाधिकारी सौरव राव यांनी केली आहे. त्यानुसार कात्रज परिसरातील डोंगरांची पाहणी करणार असल्याचे बर्गे यांनी स्पष्ट केले. डोंगरांचा भाग धोकादायक आढळल्यास त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहे. केवळ कात्रजच नव्हे तर हवेली तालुक्यातील अशा धोका उत्पन्न होऊ शकणाऱ्या ठिकाणांची पाहणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी बस धावणार वेळापत्रकानुसारच

$
0
0

पुणे : पुणे-मुंबई 'एक्स्प्रेस वे'वर दरड दुरुस्तीचे काम सुरू असले तरी मोठ्या वाहनांना रस्ता खुला राहणार आहे, त्यामुळे या मार्गावर दररोज धावणाऱ्या लहान मोठ्या प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार नाही, अशी माहिती कंपनी चालकांनी दिली आहे. रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाल्यास प्रवासाचा वेळ लांबण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन कंपन्यांनी केले आहे.

पुण्याहून मुंबईला द्रुतगती महामार्गावरून दररोज वेगवेगळ्या कंपन्यांच्या लहान मोठ्या दोनशे बस फेऱ्या करतात. मुख्यतः सकाळी आणि संध्याकाळी त्यांची वर्दळ जास्त असते. पुढील आठ दिवस 'एक्स्प्रेस वे'वर दुरुस्तीचे काम सुरू राहणार असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आगाऊ बुकिंग केलेल्या प्रवाशांचे सातत्याने चौकशीसाठी फोन येत आहेत. मात्र नियोजनात कोणताही बदल केला नसल्याचे कंपन्यांनी जाहीर केले आहे.

'पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे, त्यामुळे गाड्या बंद करून चालणार नाही. प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार मोठ्या गाड्यांना महामार्गावरून जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आमच्या गाड्या ठरलेल्या वेळेतच धावतील. आम्ही पुढील तीन दिवसांची बुकिंग देखील स्वीकारत आहोत. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये,' अशी माहिती प्रसन्न ट्रॅव्हल्सचे रवींद्र मोरे यांनी दिली.

'आमच्या वेळापत्रकात बदल नाहीत, गाड्या ठरलेल्या वेळेतच सुटतील. आजही आमच्या गाड्या वेळेवर धावल्या आणि नियोजित वेळत पोहोचल्या आहेत,' असे नीता ट्रॅव्हल्सचे आनंद राव यांनी सांगितले. खासगी कॅबचे बुकिंग सुरळीत सुरू असून ग्राहकांच्या मागणीनुसार सर्व गाड्या धावत आहेत. रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाल्यास अथवा पोलिसांनी काही वेळासाठी ट्रॅफिक बंद करण्याच्या सूचना दिल्यास मुंबईला पोहोचण्यास काही वेळासाठी विलंब होऊ शकतो, अशी पूर्वसूनचा कॅबकंपन्या ग्राहकांना देत आहेत.

पिक-अप दहा तास आधी

पुणे-मुंबई महामार्गावर पडलेल्या दरडीचे काम सुरू असल्याने या मार्गावरील प्रवासाचा वेळ वाढला आहे. आमच्याकडे बहुतांश प्रवासी हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणारे असतात. त्यांना वेळेत पोहोचवणे महत्त्वाचे असते. त्यामुळे आमच्या सर्व गाड्या जुन्या महामार्गावरूनच धावत आहेत. इतरवेळी आम्ही प्रवाशांना आठ तास आधी पिक अप करतो. विमानाच्या नियोजित वेळेच्या तीन तास आधी ते पोहोचतात. पाऊस आणि वाहतुकीच्या कोंडीची शक्यता लक्षात घेऊन सध्या प्रत्येक प्रवाशाला किमान दहा ते बारा तास आधी प्रवासाला सुरुवात करत आहोत, अशी माहिती केके ट्रॅव्हल्सचे टीम लीडर आनंद यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेळापत्रक सांभाळताना एसटीची परीक्षा

$
0
0

पुणे : पुणे- मुंबई 'एक्स्प्रेस वे'वरील वाहतुकीत केल्या जाणाऱ्या बदलामुळे एसटीच्या बस व पर्यायाने प्रवाशांना अडकून रहावे लागणार नाही, अशा पद्धतीने एसटी बसचे नियोजन केले जाणार आहे. दुरुस्तीसाठी कोणत्या वेळेला रस्ता बंद असेल, त्यानुसार एसटी बस जुन्या हायवेवरून जातील. वाहतूक कोंडीमुळे बसला पोहोचण्यास उशीर झाल्यास पर्यायी बसची व्यवस्था केली जाणार आहे.

'एक्स्प्रेस वे'वरील एक लेन जड वाहनांसाठी सुरू ठेवली जाणार आहे. तेथून शिवनेरी बस आणि एशियाडच्या वाहतुकीसाठी प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार नाहीत, अशी अपेक्षा एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. एक्स्प्रेस वे'च्या दुरुस्तीचे काम केव्हा आणि कोणत्या वेळेत होणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. काम सुरू झाल्यानंतर वाहनांना अडथळा निर्माण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दुरुस्तीच्या कामाची माहिती घेऊन गाड्यांचे वेळापत्रक निश्चित केले जाईल, असे एसटी महामंडळाचे पुणे विभागाचे नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी स्पष्ट केले.

एक्स्प्रेस वे बंद करण्याच्या वेळी एसटीच्या कोणत्या बस त्या ठिकाणी पोहोचतील याचा अंदाज लावून त्यांना अगोदरच जुन्या हायवेने जाण्याची सूचना केली जाईल. बसच्या वेळापत्रकातील बदलाची सूचना प्रवाशांना प्रवासापूर्वीच दिली जाईल, असे महामंडळाने स्पष्ट केले.

पुणे-मुंबई-पुणे दरम्यान दररोज धावणाऱ्या गाड्या

एकूण फेऱ्या ३५०

शिवनेरी बसच्या फेऱ्या

७२ (शनिवार-रविवार १००)

एशियाड बसच्या फेऱ्या १२५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक्स्प्रेस वे’ करार गुलदस्त्यात का?

$
0
0

पुणे : पुणे -मुंबई एक्स्प्रेस वेवर झालेल्या अपघातानंतर या रस्त्यावर सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची जबाबदार नक्की कोणाची, या प्रश्नावर सरकार आणि टोल वसूल करणारी आयआरबी कंपनी असे सर्वजण मूग गिळून आहेत. हा रस्ता बांधून पंधरा वर्षे लोटल्यावरसुद्धा यासंदर्भात सरकारने केलेले करार अद्याप गुलदस्त्यातच का आहेत, असा सवाल माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते करीत आहेत.

खासगी सहभागातून उभारलेल्या (पीपीपी) सर्व प्रकारच्या प्रकल्पांचे तपशील संबंधित यंत्रणेने वेबसाइटवर जाहीर करावेत, असे निर्देश केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाकडून (पर्सोनेल) दोन वर्षांपूर्वीच दिले आहेत. मात्र, राज्य सरकार किंवा राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या निर्देशांचे अद्याप पालन केलेले नाही, अशी तक्रार सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या करारातील तपशील जाहीर न झाल्यामुळे अपघातांची किंवा रस्त्याच्या सुरक्षिततेच्या उपायांची जबाबदारी नक्की कोणावर, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.

एक्स्प्रेस-वे बांधून पंधरा वर्षे लोटली, तरी या करारातील तरतुदी समोर आलेल्या नाहीत, असे वेलणकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. ही सर्व माहिती तातडीने जाहीर करावी आणि रस्त्याच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची जबाबदारी कोणावर, हे जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेकडून प्रवासी पुन्हा वाऱ्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दरडदुरुस्तीच्या कामासाठी एक्स्प्रेस वेवरील वाहतूक विस्कळित झाली असताना प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने कोणतीही व्यवस्था केलेली नाही. आडोशी येथे दरड कोसळली त्या दिवशी पुणे-मुंबई वाहतूक विस्कळित झाली होती. तेव्हा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या सूचनेवरून चार विशेष रेल्वे गाड्या सोडल्या होत्या. मात्र, आता काही दिवसांसाठी वाहतूक विस्कळित होत असतानाही रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी कोणतीच पावले उचललेली नाहीत. रेल्वेमंत्री प्रभू यांची पाठ फिरताच रेल्वे प्रशासनाकडून पुन्हा प्रवाशांना वाऱ्यावर सोडण्याचाच कारभार अवलंबिला आहे. आडोशी येथे 'एक्स्प्रेस वे'वर दरड कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर

'दरड'प्रश्न सोडविण्यासाठी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतुकीत बदल केला जाणार आहे. दररोज हजारोंच्या संख्येने वाहने या मार्गावरून ये-जा करतात. गेल्या काही घटनांदरम्यानचा अनुभव पाहता या बदलांमुळे खासगी वाहनांना व एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडणे अपेक्षित होते. मात्र, त्यांच्याकडून या घटनेची दखल घेण्यात आलेली नाही.

सद्य परिस्थितीत पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवरून ३९ गाड्या धावतात. त्यातील २३ गाड्या या दररोज धावणाऱ्या आहेत. उर्वरित गाड्यांमध्ये आठ गाड्या आठवड्यातील एक दिवस धावतात. दोन दिवस धावणाऱ्या दोन गाड्या आहेत. तीन गाड्या तीन दिवस, दोन गाड्या चार दिवस आणि एक गाडी सहा दिवस या प्रमाणे धावतात.

रेल्वे वेळापत्रकासाठी वेबसाइट

मुंबई-पुणे रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक indiarailinfo.com/search/pune-pune-to-mumbai-cst-cstm या वेबसाइटवर उपलब्ध आहे. या गाड्यांची पुण्यातून सुटण्याची वेळ, प्रवासादरम्यान कोणत्या स्टेशनवर थांबणार याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

जादा गाड्या सोडणार का?

एक दिवस एक्स्प्रेस वे बंद करण्याची वेळ आली होती, तेव्हा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पुणे-मुंबईकरांच्या सेवेसाठी चार विशेष गाड्या सोडण्याची सूचना केली होती. आता काही दिवसांसाठी वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे प्रभू पुन्हा प्रवाशांवर 'कृपा'दृष्टी दाखवून जादा गाड्या सोडण्यास सांगणार का, असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जखमी मदतीला मुकणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांवरील उपचाराची कागदपत्रे सादर न केल्याने त्यांना सरकारी मदतीला मुकावे लागणार असल्याची चिन्हे आहेत. याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहे.

जर्मन बेकरीमध्ये १० फेब्रुवारी २०१० रोजी दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडविला होता. त्यात १७ लोक मृत्यूमुखी पडले आणि ३९ जण जखमी झाले. बॉम्बस्फोटात मरण पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना सरकारने तीन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. स्फोटात मरण पावलेल्या ११ नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी तीन लाख रुपयांप्रमाणे मदत देण्यात आली; तसेच चार मृत नागरिकांच्या कुटुंबीयांना मदत देण्याचे प्रस्ताव सरकार दरबारी पाठविण्यात आले. दोन मृत नागरिकांच्या कुटुंबीयांनी मदतीसाठी अर्ज केले नाहीत, त्यामुळे त्यांचे प्रस्ताव सरकारकडे गेले नाहीत.

या बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या ३९ पैकी फक्त तीनच नागरिकांचे मदतीचे प्रस्ताव सरकारला पाठविण्यात आले आहेत. एका नागरिकाने ही मदत नाकारली, तर ३२ जखमींनी त्यांच्यावर झालेले उपचार व त्यांना आलेले अधुत्व याची कोणतीही माहिती आजतागायत जिल्हा प्रशासनाकडे दिली नाही.

स्फोट झाल्यानंतर तीन वर्षांमध्ये मदतीसाठी प्रस्ताव सरकारकडे जाणे अपेक्षित होते. तथापि, जर्मन बॉम्बस्फोटाला अपवाद म्हणून प्रस्ताव पाठविण्यास पाच वर्षांची मुदत देण्यात आली. स्फोटात जखमी झालेल्या काही नागरिकांचे निवासी पत्ते प्रशासनाकडे होते. त्यावर पत्र पाठवून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे अखेर या मृत व जखमींना सरकारी मदत देता येणार नसल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने केला आहे.

दयानंद पाटीलचा शोध सुरू

जंगली महाराज रस्त्यावरील साखळी बॉम्बस्फोटातील जखमी आणि साक्षीदार दयानंद पाटील याचा ठावठिकाणी नसल्याने त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. पाटील याच्यावर पोलिस बंदोबस्तामध्ये हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. उपचारानंतरही तो कित्येक दिवस पोलिसांच्या ताब्यात होता. त्यानंतर तो 'भूमिगत' झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एक्स्प्रेस वे’ होणार संथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

दरड कोसळण्याच्या संकटाची पुनरावृत्ती रोखण्यासाठी आजपासून 'एक्स्प्रेस वे'वरील वाहतूक अंशतः सुरू ठेवण्यात येणार आहे. कारसारख्या छोट्या वाहनांना घाटमध्यावरून जुन्या घाटातून खोपोली मार्गे वाहतूक करावी लागणार आहे. सकाळी १० ते दुपारी पाच या कालावधीत आडोशी बोगद्याजवळील एक लेन पुणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना आलटून-पालटून खुली केली जाणार आहे. दरडप्रवण क्षेत्रातील सैल झालेले खडक फोडून काढणे, धोकादायक ठिकाणी जाळ्या बसविणे, महामार्गावर पडणारी दरड साफ करणे, आदी कामे या दहा दिवसांच्या मोहिमेत हाती घेतली जाणार आहेत.

गेल्या महिनाभराच्या काळात एक्स्प्रेस वेवर बोरघाटामध्ये दरडी कोसळून जीवघेणे अपघात झाले आहेत. भरमसाठ टोल भरून किमान सुविधा व सुरक्षा पुरवली जात नसल्याबद्दल नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सायबर सेपियन’चा वास्तववादी प्रवास

$
0
0

पुणे टाइम्स टीम

संजीव खांडेकर हे मराठीतील एक महत्त्वाचे कवी आणि चित्रकार. त्यांच्या दीर्घकवितेवर आधारित व अविनाश सपकाळ दिग्दर्शित 'ऑल आय वाँट टू डू' या नाटकाचा प्रयोग आज (दि. २४) संध्याकाळी ७.३० वाजता सुदर्शन रंगमंच इथं होतो आहे.

गेल्या दोन दशकात नव्यानं निर्माण झालेल्या नवमध्यमवर्गातील माणूस हा या नाटकाचा नायक आहे. या वर्गाच्या हातात खेळणारा अमाप पैसा, तंत्रज्ञानानं आलेल्या भरपूर सुख-सोयी, भांडवलशाही आणि तिच्याबरोबर येणारी बाजारू व्यवस्था, ग्राहकवाद, एक सोयीस्कर दृष्टिकोन, भौतिक सुखप्राप्तीची वखवख या आणि अशा अनेक बाबींची त्याला पार्श्वभूमी आहे. या नाटकाच्याही मुळाशी ती दिसते. या माणसाला अतिजलद गतीनं, कम्प्युटर गेमच्या मिशनप्रमाणे पुढे पुढे पळत सगळं काही मिळवत जायचं आहे. अध्यात्म, निर्वाणही त्याला अपवाद नाही. त्यामुळेच त्याच्या या प्रवासाला एखाद्या 'राइड'च स्वरूप देण्याचा, दोन वास्तवांमधील फरक आणि संदिग्धता जाणवून देण्याचा यात प्रयत्न केला आहे. या माणसाच्या आयुष्यातील व्यामिश्रता, विरोधाभास आपल्या नाटकामध्येही यायला हवेत, असं वाटत असल्यामुळे या नाटकात नाट्य आणि पथनाट्य यांचं सुंदर मिलाफ पाहायला मिळणार आहे. 'सायबर सेपियन' असं वर्णन करता येईल, अशा आजच्या माणसाची निर्वाणाबद्दलची धारणा, त्याचा तिथपर्यंतचा प्रवास कसा असेल, हे या नाटकातून काव्यात्म आणि अतिवास्तववादी पद्धतीनं अनुभवता येईल. कार्यक्रमास देणगी मूल्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नृत्यरंग’ आविष्कार

$
0
0

पुणे टाइम्स टीम

प्रदर्शन, नृत्य आणि व्याख्यानामधून कालिदास या महान कवीच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणाऱ्या 'महाकवी कालिदास ः काव्य रंग प्रतिभा विलास' महोत्सवाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. या महोत्सवातील शेवटचा कार्यक्रम आज (दि.२४) होत असून, तो वेगळी अनुभूती देणारा ठरेल. याचं नाव 'नृत्यरंग' असं असून, यामध्ये मेघदूत, कुमारसंभव आणि ऋतुसंहार यातील प्रसंगांवर नृत्यरचना सादर होणार आहेत.

संध्या पुरेचा, रश्मी जंगम आणि 'कलाछाये'च्या विद्यार्थिनी या रचना सादर करणात आहेत. नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रस्ता इथं संध्याकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होईल. नृत्यविश्वातील कलावतींना संस्कृत साहित्याची अद्भुतता कळावी आणि अधिक समृद्ध नृत्यकलाकृती व्हावी, हा विचार या कार्यक्रमामागे असल्याचं आयोजकांनी सांगितलं. 'कलाछाया'तर्फे हा महोत्सव होत असून, ज्येष्ठ कथक गुरू प्रभा मराठे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला आहे. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनात प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत, वामन करंजकर, दिनकर थोपटे, जयप्रकाश जगताप, पंकज भांबुरकर, अनिल उपळेकर, जगदीश चाफेकर, रवी देव, महेंद्र मोरे आणि सचिन जोशी यांच्या चित्रांचा समावेश आहे. २९ जुलैपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ यावेळेत दर्पण आर्ट गॅलरी, पत्रकार नगर, सेनापती बापट रस्ता येथे हे प्रदर्शन पाहता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगणार गायकी, स्वरचिंतन

$
0
0

पुणे टाइम्स टीम

भावपूर्ण गायकीची अनुभूती घेतानाच रागसंगीत आणि ख्याल गायकीबाबतचे विचार जाणून घेण्याची संधी संगीत रसिकांना मिळणार आहे. कलापिनी संस्थेतर्फे २९ जुलै रोजी प्रसिद्ध गायिका पद्मा तळवलकर यांचं गायन आणि मुलाखत अशा दुहेरी मैफलीचं आयोजन करण्यात आलं आहे.

अप्पा बळवंत चौकातील गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णूविनायक स्वर मंदिरात संध्याकाळी ६ वाजता ही मैफल होणार आहे. दिग्गज गुरूंकडून मिळालेल्या संगीत विद्येला तळवलकर यांनी दिलेली चिंतनाची जोड या मैफलीतून उलगडेल. त्यांना श्रीकांत भावे (तबला) आणि श्रीराम हसबनीस (हार्मोनिअम) हे साथसंगत करणार आहेत. पं. कमलाकर जोशी यांच्या स्मृति दिनानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

पं गंगाधरबुवा पिंपळखरे, मोगुबाई कुर्डीकर, पं. गजाननबुवा जोशी आणि पं. निवृत्तीबुवा सरनाईक अशा दिग्गज गुरूंकडे तळवलकर यांचं शिक्षण झालं आहे. रसिकांना आणि संगीत विद्यार्थ्यांना पद्माताईंचे विचार ऐकणं ही पर्वणी ठरेल, अशी माहिती अरविंद परांजपे यांनी दिली. ही मुलाखत समीक्षक विनय हर्डीकर घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुणाचा ‘आवाज’ मिळवणार करंडक?

$
0
0

पुणे टाइम्स टीम

केवळ आवाजातून नाट्य उभं करण्याचं आव्हान देणारी 'सिम्बायोसिस करंडक स्पर्धा' नाट्यवर्तुळात मानाचं स्थान मिळवून आहे. ३२ वर्षांची परंपरा या करंडकाला असून, यंदाचा करंडक कोण पटकावतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आठ कॉलेजांमध्ये २५ जुलैला करंडकासाठी अंतिम फेरी रंगणार आहे.

प्राथमिक फेरीमध्ये ३० कॉलेजांनी सहभाग घेतला होता. त्यातून आठ कॉलेजांनी अंतिम फेरीत स्थान मिळवलं. प्राथमिक फेरीसाठी ओम भूतकर, आलोक राजवाडे, चित्रा वाडेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं.

एस.के.एन.सी.ओ.ई (कहाणी अखेरच्या संपाची), फर्ग्युसन कॉलेज (मी अरुणा), फर्ग्युसन (बखर एका जंगलाची), बीएमसीसी (सीमांत), एस.सी.ओ.ई (रजईतला हत्ती), आय.एल.एस (बाजार), स. प. महाविद्यालय (अ लाँग वॉक टू फ्रीडम), एम.आय.टी.सी.ओ.ई (काही सरकारी आवाज), गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स (लहानपण देगा देवा) हे कॉलेज अंतिम फेरीत नाट्यवाचन करणार आहेत.

२५ तारखेला सकाळी ९ वाजल्यापासून नाट्यवाचनाला सुरुवात होणार आहे. सिम्बायोसिस विश्वभवन, सेनापती बापट रोड इथे होणारी ही स्पर्धा सगळ्यांना विनामूल्य पाहाता येणार आहे. अभिनेता आनंद इंगळे आणि प्रसाद पुरंदरे यासाठी परीक्षक म्हणून उपस्थित असतील.

वीस मिनिटांच्या अवधीत केवळ आवाजाच्या कौशल्यपूर्ण वापरातून नाट्य उभं करण्याचं आव्हान स्पर्धकांसमोर असतं. यामध्ये जास्तीत जास्त नवीन लेखनाला वाव दिला जातो. रेकॉर्डेड किंवा लाइव्ह संगीत लावण्याचीही स्पर्धकांना परवानगी नसते. जे काही चित्र साकारचं ते फक्त आवाजातून. या आव्हानात पैकीच्या पैकी मार्क मिळवत आठ कॉलेजांनी अंतिम फेरीत आपलं स्थान नक्की केलंय.

उदाहरण सांगायचं, तर आयएलएसनं 'बाजार' या विषयातून चालू बाजार रंगमंचावर उभा केला होता. स्पर्धकांपैकी दोन जण सातत्यानं कुजबुजत होते, तर दोघं जण कोबड्यांचा आवाज काढत होते. यामुळे वाचनाला बाजाराची पार्श्वभूमी मिळाली. एम.आय.टी.सी.ओ.ईनं पु. ल. देशपांडे यांच्या 'काही सरकारी आवाज' या कथेतून कुटुंबनियोजनाचा विनोदी विषय सादर केला, तर स.प महाविद्यालयानं नेल्सन मंडेला यांचा स्वातंत्र्यलढा 'अ लाँग वे टू फ्रीडम'मधून समोर आणला.

सिम्बायोसिस करंडक

अंतिम फेरी दिनांकः २५ जुलै स्थळः सिम्बायोसिस विश्वभवन वेळः सकाळी ९ वाजल्यापासून

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>