Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आर्थिक निर्णयांचे विकेंद्रीकरण हवे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'आर्थिक क्षेत्रात मोठे निर्णय घेताना सरकारने त्या क्षेत्राला हातभार लावणाऱ्या सर्व स्तरांतील नागरिकांना विचारात घेतले पाहिजे. औद्योगिक विकासाला पाठबळ देणारे निर्णय कमी वेळेत प्रभावी आणि पारदर्शकपणे घेणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने सर्वच निर्णयांचे अधिकार स्वतःकडेच न ठेवता त्याचे राज्य सरकार, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत स्तरावर विकेंद्रीकरण केले पाहिजे,' असे मत फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया यांनी नुकतेच व्यक्त केले.

'ओन्ली एचआर' (ओएचआर) या संस्थेतर्फे 'औद्योगिक क्षेत्रातील सुधारणा व त्याविषयीच्या उद्योजकांच्या अपेक्षा' या विषयावर आयोजित कार्यक्रमात डॉ. फिरोदिया बोलत होते. अॅड. राजीव जोशी, सुधीर फाटक, प्रदीप तुपे, जितेंद्र पेंडसे, प्रशांत इथापे आदी या वेळी उपस्थित होते. 'देशात कामगार कायदे बदलून औद्योगिक क्रांती होणार नाही, त्यासाठी आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनी आपले विचार आणि वागणुकीत बदल करण्याची गरज आहे. देशात डाव्या आणि सोशॅलिस्ट विचारसरणीमुळे औद्योगिक क्रांती झाली नाही. त्यामुळे देश विकासाच्या बाबतीत मागे राहिला. मात्र, आता नरेंद्र मोदींच्या उपाययोजनांमुळे नव्याने औद्योगिक क्रांतीची सुरवात झाली आहे. याचे परिणाम लवकरच दिसतील. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी औद्योगिक क्षेत्रात उत्तम योगदान देण्याची गरज आहे,' असेही डॉ. फिरोदिया म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जकातनाके कायमस्वरूपी द्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेने जकात नाक्यांच्या काही जागा अकरा महिन्यांच्या कराराने पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) दिल्या आहेत. या जागा कायमस्वरुपी मिळाल्यास त्याचा डेपो/बस स्थानक म्हणून विकास करता येऊ शकेल, असा पवित्रा पीएमपीने घेतला आहे. शेवाळेवाडी आणि भेकराईनगर अशा दोन ठिकाणी जकात नाक्यांच्या जागांवर पीएमपीने सर्व यंत्रणा विकसित केल्याने प्रवाशांचाही फायदा होत असल्याकडे पालिकेचे लक्ष वेधण्यात आले आहे.

महापालिकेने पीएमपीला जकातनाक्यांच्या काही जागा तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून दिल्या आहेत. पीएमपीचे अस्तित्वातील डेपो आणि स्टेशनवरील वाढता ताण कमी करण्यासाठी; तसेच, उपनगरांमध्ये सक्षम सेवा देण्यासाठी या जागांचा पीएमपीला उपयोग होणार आहे. त्यामुळे, पालिकेच्या ताब्यातील इतर जागाही लवकरात लवकर मिळाव्यात, असा प्रयत्न पीएमपीतर्फे सुरू आहे. त्याचवेळी पालिकेने तात्पुरत्या स्वरूपात पीएमपीला जागा दिल्या असल्या, तरी त्या कायमस्वरूपी उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी केली जात आहे. या जागांवर पीएमपीला बस स्थानक / डेपो विकसित करायचा असेल, तर संबंधित जागा मिळण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्यातून, पीएमपी प्रवाशांची गैरसोय दूर होईल.

पीएमपीच्या बस पार्किंगसह त्या-त्या भागांतील नागरिकांसाठी पीएमपीने या जागांची मागणी केली होती. त्याला, पुणे पालिकेने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने शेवाळेवाडी आणि भेकराईनगर या दोन ठिकाणांहून नुकत्याच पीएमपीच्या बसची ये-जा सुरू झाली. परिणामी, गाडीतळावर होणारी गर्दी विभागली गेली. याच धर्तीवर इतर जागा पीएमपीला मिळाव्यात, अशी मागणी पालिकेकडे करण्यात येणार आहे.

पीएमपीच्या मुख्य स्थानकांवर होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी जकात नाक्यांच्या जागांवरील उपस्थानके फायदेशीर ठरू शकतील. पुलगेटप्रमाणे या स्थानकांचा विकास करता येणे शक्य आहे. त्यासाठी, पीएमपीला पालिकेची साथ आवश्यक आहे. - विजय देशमुख, संचालक, पीएमपी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुकाराम महाराजांच्या पालखीचे उत्स्फूर्त स्वागत

0
0

मटा प्रतिनिधी, बारामती

अखंड हरीनामाचा गजर आणि विठूरायाचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात जगत्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामतीत सायंकाळी सात वाजता आगमन झाले. या वेळी तुकोबांच्या पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले.

पालखीच्या स्वागतासाठी बारामती नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, मुख्याधिकारी दीपक झिझाड, सुनेत्रा पवार, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, उपविभागीय अधिकारी संतोष जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मोरे उपस्थित होते. स्वागतादरम्यान प्रत्येक दिंडीच्या वीणेकऱ्याला नारळ, हार, शाल, फेटा देऊन सत्कार करण्यात आला.

शारदा प्रांगणात पालखी रथ येताच 'पुंडलिक वरदा..हरी विठ्ठल|| श्री ज्ञानदेव तुकाराम||' असा जयघोष करून खांदेकऱ्यांनी पालखी शामियान्यात स्थानापन्न केली. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते समाज आरती झाल्यावर दर्शनरांगा खुल्या करण्यात आल्या.

वारीत सर्वधर्म समभाव दिवसेंदिवस वारीतील महिलांचा सहभागही वाढला आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या वारीत अनेक जाती-धर्माची मंडळी भक्तिभावाने सहभागी होताना दिसतात. अनेक मुस्लीमधर्मीय वारकरीही वारीत सामील होताना दिसत आहेत. गेली अनेक वर्षे ते वारीत सहभागी होत असतात. जातीधर्माच्या पलीकडे गेलेल्या या वारीसोहळ्याने सर्वधर्म समभाव सहज साधलेला दिसून येतो. टाळ-मृदंगाच्या तालावर तल्लीन होऊन अवघड घाट आणि वारीची खडतर वाट हे वारकरी निव्वळ श्रद्धेच्या बळावर उत्साहाने पार करतात. तरुणाईचा वाढता सहभाग महाराष्टाचे आराध्यदैवत विठोबाच्या दर्शनाला खेड्यापाड्यातील सामान्य शेतकरी वारकरी होऊन विठोबाच्या दर्शनासाठी नित्यनियमाने जातात. मात्र, आता याच वारीसोहळ्यात शहरातील सुशिक्षित तरुणाईही उत्साहाने सहभागी होताना दिसून येते. कॉर्पोरेट जगतात उच्चपदांवर काम करणारी अनेक तरुण-तरुणी वारीत सहभागी झाली आहेत. टाळ-मृदंगाच्या साथीला त्यांच्याकडे लॅपटॉपही दिसतो आहे.

विविध पक्ष, संस्था-संघटनांतर्फे स्वागत

बारामतीमध्ये तुकारामांची पालखी दाखल झाल्यानंतर विविध सामाजिक संस्था-संघटनांतर्फे पालखी सोहळ्यात अन्नदान, प्रथमोपचार पेट्यांचे वाटप, आरोग्य शिबिरे, मोफत उपचार, अन्नदान, आदी सेवा देण्यात आल्या. बारामतीतील डॉक्टर संघटना व मेडिकल दुकानदार संघटनांतर्फे मोफत वैद्यकीय आणि औषधवाटप उपचार करण्यात आले. वृत्तपत्र विक्रेता संघटनेने बिस्कीट व चहाचे वाटप केले. बारामती पत्रकार संघटनकडून भंडगवाटप करण्यात आले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुढ्या उभारून स्वागत

0
0

म. टा. वृत्तसेवा, सासवड

महर्षि वाल्मीकींच्या वाल्हे गावात श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे गुढ्या उभारून स्वागत करण्यात आले. पहाटे जेजुरीत माउलींची महापूजा झाल्यानंतर पालखी सोहळा सकाळी साडेसहा वाजता वाल्हे गावाकडे मार्गस्थ झाला. बारा किलोमीटरचा प्रवास असल्याने व दुपारपर्यंत पोहोचण्याचे असल्याने वारकऱ्यांची पावले वाल्हे गावाच्या दिशेने झपझप पडत होती. सकाळी साडेआठ वाजता सोहळा सकाळच्या न्याहरीसाठी दौंडज खिंडीत पोहोचला. सकाळी नऊ वाजता हा सोहळा दौंडजकडे मार्गस्थ झाला.

पालखी मार्गावर सडा, रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. ग्रामस्थांनी माउलींसह वैष्णवांचे मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरण स्वागत केले. माउलींच्या स्वागतासाठी वाल्हे नगरीत घराघरावर गुढ्या उभारण्यात आल्या होत्या.येथे सरपंच, उपसरपंच व असंख्य भाविकांनी सोहळ्याचे स्वागत केले. नंतर पालखी रथातून खाली उतरवण्यात आली व खांद्यावरून गावातून मिरवणूक काढण्यात आली. पठाणवस्ती येथे माया चॅरिटेबल फाउंडेशन व श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पुणे यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. पुण्यातील राजराजेश्वर सेवा भावी ट्रस्टतर्फे अध्यक्ष विजय कोल्हापुरे व रणजित गणराया मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब कोल्हापुरे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या वतीने वारकऱ्यांना मोफत चहावाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माउलींना नीरास्नान

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन झाले आहे. माउलींच्या चांदीच्या पादुकांना दुपारी अडीच वाजता नीरा नदीच्या दत्त घाटावर पालखी सोहळा प्रमुखांनी नीरास्नान घातले. या वेळी वारकरी आणि भाविकांनी माउलीचा जयघोष केला. वारी सोहळा पुढील सात दिवस म्हणजेच २२ जुलैपर्यंत सातारा जिल्ह्यांतून वाटचाल करणार आहे.

नीरा नदीच्या जुन्या पुलावरुन नीरा गावातील दुपारचा विसावा संपवून पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करता झाला. त्या वेळी नीरा नदीच्या पुलावर सातारा जिल्ह्यातील असंख्य भाविक स्वागतासाठी हजर होते. पुण्याचे जिल्हाधिकारी, ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जयकुमार जाधव आदी सरकारी अधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्यास नीरा येथे निरोप दिला.

नीरा नदीत माउलींच्या पादुकांना नीरास्नान घातल्यानंतर माउलींचा चांदीचा रथ पाडेगाव येथील टोलनाक्यावर आला. त्या वेळी सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. पालखीच्या स्वागतासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, आ.मकरंद पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुते उपस्थित होते.

सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर प्रशासनाने भव्य कमानी उभारल्या होत्या. त्याचप्रमाणे आरोग्य विभागामार्फत वारी मार्गावर २४ आरोग्य पथके कार्यरत करण्यात आली आहेत. पाडेगाव फार्म येथे विसावा घेऊन पालखी सोहळा सायंकाळी सहा वाजता लोणंद येथे अडीच दिवसांच्या मुक्कामासाठी विसावला. त्यानंतर समाज आरती झाल्यावर रात्री उशिरापर्यंत वारीतील दिंड्यांमधून भजन, भारूडे आणि कीर्तन रंगले.

पुढील मुक्काम तरडगावात

आज (१७ जुलै) पालखीचा मुक्काम लोणंद येथेच आहे. शनिवारी (१८ जुलै) दुपारी दीड वाजता महाआरती आणि नैवेद्य झाल्यावर माउलींची पालखी अडीच दिवसांचा मुक्काम संपवून तरडगावाकडे प्रस्थान ठेवेल. दुपारच्या विसाव्यानंतर चार वाजता चांदोबाचा लिंब येथे वारीतील पहिले उभे रिंगण संपन्न होणार आहे. त्यानंतर पालखीचा मुक्काम तरडगाव येथे होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुद्धीचे वैभव

0
0

विचारवंतांनी, तत्त्ववेत्त्यांनी, ज्ञानयोग्यांनी आणि साधुसंतांनीही परमेश्वराजवळ 'मला मोक्ष दे,' असे म्हटले नाही, तर परमेश्वराजवळ सद्‍बुद्धी मागितली आहे. कारण प्रत्येक युगात आणि प्रत्येक काळात मानवी जीवनाच्या उत्कर्षासाठी बुद्धीचे मार्गदर्शन महत्त्वाचे मानले गेले आहे. भगवंताने अर्जुनाला गीतेच्या दुसऱ्या अध्यायात प्रथम ज्ञानयोग सांगितला, पण त्या ज्ञानयोगाचे प्रयोजन असणारा बुद्धियोग सांगताना भगवान म्हणाले,

हे सांख्यस्थिती मुकुळित।

सांगितली तुज येथ।

आता बुद्धियोगु निश्चित।

अवधारीं पां।।

ज्ञाने. २/२३०।।

आता वर्गबंधाची बाधा न येणारा बुद्धियोग मी तुला सांगतो. ज्याला सद्‍बुद्धी प्राप्त झाली आहे त्याने संसारभयाचा नाश करून विश्वात विजय मिळवला आहे. 'तैसी दुर्लभ हे सद्‍बुद्धी' असे प्रतिपादन करून ज्ञानदेव सांगतात, की ज्ञानी लोक जिची इच्छा करतात, जी सद्‍बुद्धी जगात फार दुर्लभ आहे. बुद्धियोग सांगताना भगवद्गीतेने बुद्धीची विविध रूपे ठायी ठायी उभी केली आहेत. आस्तिक बुद्धी, आस्था बुद्धी, ईश्वरबुद्धी, जीवबुद्धी, दुर्बुद्धी, देहबुद्धी, नियमबुद्धी, निश्चयबुद्धी, निष्टंकबुद्धी, परबुद्धी, सत्त्वबुद्धी, समबुद्धी, साम्यबुद्धी, स्तव्यबुद्धी असे बुद्धीचे विविध प्रकार सांगून, बुद्धीला मानवी जीवनाच्या विविध तत्त्वांशी आणि अवस्थांशी जोडले आहे.

'बुद्धी जालया कैसेनि विसकुले' असे म्हणत आत्मानुभव स्थिर झाल्यावर बुद्धी कशी डळमळेल? 'बुद्धी धुरे करूनी' म्हणजे अग्रस्थानी ठेवून, विचारबुद्धीत भरून, बुद्धीद्वारे चराचराची लागवड केली आणि 'बुद्धीसी अभंग बल होआवे' असे म्हणत मानवी जीवनातील स्थिर बुद्धीचे स्थान बळकट केले.

सर्वंच्य परिपाठातल्या गायत्री मंत्रात 'धियो यो नः प्रचोदयात्।' अशी प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेतून परमेश्वराने आमच्या बुद्धीला प्रेरणा द्यावी, असे वरदान मागितले. कठोपनिषदात म्हटले आहे, की 'बुद्धिं तु सारथिं विद्धि।'

मानवी मनाचा आणि जीवाचा बुद्धी हा सारथी आहे. तर रथ कोठे घेऊन जायचा, यासाटी साधनही बुद्धीच आहे. गीतेत जरी भगवान स्वतः सारथी आहेत, तर उपनिषदांत मात्र जीवात्म्याला 'रथि' आणि बुद्धीला 'सारथि' म्हटले आहे. एकीकडे बुद्धी 'सारथि' आहे, तर दुसरीकडे भगवान सारथी आहेत. भगवान जेव्हा सारथी बनतात तेव्हा मनुष्याच्या बुद्धीला प्रेरणा देऊनच त्याला पुढे नेतात. 'बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजें' असे ज्ञानदेव हरिपाठात आत्मविश्वासपूर्वक सांगतात ते यासाठीच.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यातील दुर्गप्रेमींचा रविवारी मेळावा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फेसबुकसारख्या सोशल मीडियातून एकत्र आलेल्या दुर्गप्रेमींनी 'गडवाट : प्रवास सह्याद्रीचा' हा उपक्रम सुरू केला आणि राज्यभरातील दुर्गप्रेमी या वाटेवर एकत्र जमले. अशा राज्यभरातील दुर्गप्रेमींचा मेळावा पुण्यात भरणार आहे. गडवाट संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त येत्या रविवारी (१९ जुलै) औंध येथील पं. भीमसेन जोशी नाट्यगृहात हा मेळावा होणार आहे.

यंदा वर्धापनदिनाचे औचित्य साधून इतिहास, सह्याद्री, गडकोट यांसाठी कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन साताऱ्याचे छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, ज्येष्ठ इतिहास संशोधक अप्पा परब, दुर्गमहर्षी प्रमोद मांडे आदी या वेळी मार्गदर्शन करणार आहेत.

शिवरायांच्या विचारांचा वारसा तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी गडवाट संस्थेतर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत. गडकोटांवर स्वच्छता मोहिमा, वृक्षारोपण, निसर्गसंवर्धन मोहिमाही राबवल्या जातात. पाचशे दुर्गप्रेमी मेळाव्यात सहभागी होणार असल्याचे संस्थेचे राहुल बुलबुले म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन लाख पुणेकर ‘डीबीटीएल’च्या बाहेर

0
0

मटा प्रतिनिधी, पुणे

स्वयंपाकाच्या गॅसचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेमध्ये (डीबीटीएल) सहभागी होण्याची मुदत समाप्त होऊन पंधरा दिवस झाले, तरी अद्यापही पुणे शहरातील सव्वादोन लाख ग्राहकांनी यासाठी आवश्यक जोडणी (लिंकिंग) केलेली नाही. त्यामुळे बाजारभावाने गॅस सिलिंडर खरेदी करण्याची वेळ आली आहे.

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने सुरू केलेल्या योजनेत काही त्रुटी असल्याने डीबीटीएल स्थगित करण्यात आली होती. त्यामध्ये काही सुधारणा करून केंद्र सरकारने एक जानेवारीपासून ती नव्या स्वरूपात (मॉडिफाइड डीबीटीएल) पुन्हा सुरू केली. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी एक जानेवारीनंतर दोन टप्पे करण्यात आले होते. त्यामध्ये आधार कार्डांसह किंवा आधार कार्डांशिवाय गॅस ग्राहक क्रमांक आणि बँकेचा खातेक्रमांक यांची जोडणी करण्याची आवश्यकता होती. मात्र, मार्चअखेरपर्यंत सहभागी न झालेल्या ग्राहकांना पुन्हा मुदत (ग्रेस पीरिएड) देण्यात आली होती. त्या मुदतीत लिंकिंग न करणाऱ्या ग्राहकांना जून अखेरपर्यंत अखेरची मुदत (पार्किंग पीरिएड) देण्यात आली होती. ती मुदत समाप्त झाल्यानंतर सर्वांना बाजारभावाने सिलिंडर घेणे बंधनकारक ठरविण्यात आले आहे. मात्र, ही मुदत उलटून पंधरा दिवस लोटले, तरी अजूनही दोन लाख वीस हजार पुणेकरांनी लिंकिंगचे काम पूर्ण केलेले नाही.

शहरात तिन्ही गॅस कंपन्यांचे मिळून १७ लाख ६७ हजार १७७ ग्राहक आहेत. त्यापैकी १५ लाख ४६ हजार ३२४ ग्राहक डीबीटीएल योजनेचे सभासद झालेले असून अद्याप दोन लाख २० हजार ८५३ ग्राहक योजनेचे सभासद झालेले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लाचप्रकरणी लिपिकाला सक्तमजुरी

0
0

मटा प्रतिनिधी, पुणे

ट्रान्सफर सर्टिफिकेट देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी पालिकेच्या कर संकलन विभागातील कनिष्ठ लिपिकाला एक वर्षे सक्तमजुरी आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष न्या. एन. जी. गिमेकर यांच्या कोर्टाने हा निकाल​ दिला.

खंडू श्रीरंग शेलार (वय ४३, रा. पीएमसी कॉलनी, महात्मा फुले पेठ) याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी काशीफ मुश्ताक अरब (२७, रा. काझी मंझील, रास्तापेठ) यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

तक्रारदार काशीफ अरब यांनी त्यांची सदनिका सात जून २००७ रोजी रिलीज डीडद्वारे स्वतःच्या आणि त्यांचा लहान भाऊ कामरान याच्या नावे केली. त्यानंतर १९ ऑक्टोबर २०१३ रोजी तक्रारदारांनी सदनिकेचा मालमत्ता कर त्याच्या नावावर करण्यासासाठी भवानी पेठ येथील क्षेत्रीय कार्यालयात गेला. एनओसीसाठी शासकीय फी २५ रुपये आणि ट्रान्सफर सर्टिफिकेट फी ४५० रुपये भरली. तक्रारदाराने रिलीज डीड आणि सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज क्षेत्रीय कार्यालयात दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सबसिडी’चा नकार वाढला

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारने केलेल्या आवाहनानुसार शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील सुमारे ४० हजार ग्राहकांनी सिलिंडर सबसिडीचा त्याग केला आहे. येत्या काही दिवसांत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरपोटी गेली वर्षानुवर्षे सरकार हजारो कोटी रुपयांची सबसिडी देत आहे. गेल्या काही काळात या सबसिडीचा भार वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्या ग्राहकांची आर्थिक क्षमता चांगली आहे, त्यांनी गॅस सिलिंडरवरील सबसिडीचा स्वतःहून त्याग करावा (गिव्ह इट अप), असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यानंतर अनेक मान्यवरांनी या सबसिडीचा त्याग केला होता.

त्यानंतर गेल्या काही दिवसांत टीव्ही, रेडिओसह विविध माध्यमांमधून या योजनेच्या प्रसारासाठी जाहिराती दाखविण्यात येत असून गोरगरिबांसाठी सिलिंडरवरील सबसिडीचा त्याग करावा, असे आवाहन त्यातून करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील ४० हजारांहून अधिक ग्राहकांनी सिलिंडरवरील सबसिडीचा त्याग केला आहे.

दरम्यान, भारतगॅसच्या ३२ हजार ग्राहकांनी सिलिंडरच्या सबसिडीचा त्याग केल्याची माहिती कंपनीचे विभागीय व्यवस्थापक पवनकुमार यांनी दिली. तसेच, अन्य कंपन्यांच्या ग्राहकांनीही सबसिडीचा त्याग केला आहे. या योजनेच्या प्रसारासाठी शहरातील प्रमुख क्लब्जच्या सदस्यांना पत्रे पाठविण्यात आली आहेत. तसेच, ज्याठिकाणी धनिक मंडळी मोठ्या संख्येने एकत्र येतात, अशा ठिकाणी

सबसिडीचा त्याग करण्याचे आवाहन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. ही सबसिडी स्वतःहून नाकारण्याचे आवाहन पेट्रोलियम मंत्रालयाने केले आहे.

शंभर कोटींहून अधिक बचत

देशभरातील काही लाख ग्राहकांनी ही सबसिडी नाकारली असून बाजारभावाने सिलिंडर खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. त्यातून शंभर कोटी रुपयांहून अधिक बचत होत असल्याचा अंदाज आहे. त्यातून गोरगरीब वर्गाला घरगुती गॅस सिलिंडर पुरविण्यासाठी अनुदान देण्याची योजना आहे.

















मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शांतता राखण्याचे आयुक्तांचे आवाहन

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच, धार्मिक तेढ निर्माण होऊ नये या साठी पोलिस आयुक्त के. के. पाठक यांनी आयुक्तालयात गुरुवारी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. हिंदू-मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक, विविध पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

पोलिस आयुक्त के. के. पाठक, सहआयुक्त सुनील रामानंद, उपायुक्त श्रीकांत पाठक यांच्यासह रशीद खान, रशीद शेख, इसहाक जाफर, अलीभाई, रिजाय सय्यद, अफसर शेख, जहांगिर मुल्ला, ईसाकभाई चावीवाले तसेच धीरज घाटे, रघुनाथ गौडा, गणेश घोष, अशोक हरणावळ, बाळासाहेब भामरे, ​डॉ. मिलिंद भोई, रवींद्र माळवदकर, किशोर चव्हाण, धनंजय गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते.

'समाजात धार्मिक तेढ वाढू नये, या साठी सर्वांनी प्रयत्न करावेत. तसेच जातीय सलोखा अबाधित ठेवण्यासाठी तरुणाईकडून सोशल नेटवर्किंग साइट, व्हॉटस्अॅपवरून आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत होणार नाही, याची खबरदारी घ्या,' असे आवाहन आयुक्तांनी केले. अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच, सणांच्या काळात शांतता बिघडणार नाही, या बाबत काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

नागरिकांनाकडून काही सूचना आयुक्तांना करण्यात आल्या. वैयक्तिक कारणांवरून कुठलीही अनुचित घटना घडू नये, या साठी काळजी घेण्याचे आश्वासनही नागरिकांनी पोलिसांना दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी केले. या वेळी सहायक आयुक्त राजेंद्र जोशी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्युनिअर कॉलेज शिक्षकांचा इशारा

0
0

मटा प्रतिनिधी, पुणे

राज्यातील ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांच्या मागण्यांसाठी शिक्षक संघटनेने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. संघटनेतर्फे येत्या २२ जुलैपासून राज्यभरात टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडण्यात येणार आहे. त्यानंतरही सरकारी पातळीवरून हालचाल न झाल्यास ऑगस्ट महिन्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक संघटनेने गुरुवारी दिला.

ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांच्या विविध मागण्या आणि त्या विषयीच्या सरकारच्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाची मुंबईमध्ये बैठक झाली. त्या बैठकीत आंदोलनाचा निर्णय झाल्याची माहिती पुणे विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष एस. टी. पवार आणि कार्याध्यक्ष संतोष फाजगे यांनी सांगितले. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात येत्या २२ जुलैला राज्यभरात सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर २४ जुलैपासून शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अष्टभाषीय ‘शाकुंतल’ आता इंग्रजीतून

0
0

योगेश बोराटे, पुणे

महाकवी कालिदासाच्या 'अभिज्ञान शाकुंतल' अर्थातच 'शाकुंतल' या नाटकाविषयी आठ प्राचीन भाषांमध्ये झालेला अभ्यास आता एकाच ग्रंथातून समोर येणार आहे. इंग्रजीमध्ये लिहिलेल्या या ग्रंथाद्वारे 'शाकुंतल'चे भाषाशास्त्रीय सौंदर्य, वेगवेगळ्या अभ्यासकांनी 'शाकुंतल'चे लावलेले अर्थ, त्यातून उलगडलेली नाट्यशास्त्राची विविध अंगे एकाच ठिकाणी जाणून घेता येणार आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत प्रगत अध्ययन केंद्रातील प्रा. डॉ. जयंती त्रिपाठी यांनी केलेल्या संशोधनाद्वारे हे साध्य झाले आहे. या अभ्यासाद्वारे नाट्यशास्त्राच्य निर्मितीची प्रक्रियाही चिकित्सक पद्धतीने उलगडून घेता येणार आहे. डॉ. त्रिपाठी यांनी 'मटा'ला आपल्या संशोधनाविषयीची माहिती दिली. 'कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलम् (शाकुंतल) या नाटकावर भाष्य करणारी जवळपास दोनशे सत्तर हस्तलिखिते सध्या देशभरात अधिकृतरीत्या उपलब्ध आहेत. विविध प्राचीन भाषांमधून त्या विषयीचे लेखन झाले असले, तरी ते अद्याप अंधारातच आहे. अशाच प्राचीन भाष्यकारांपैकी आठ भाष्यकारांचे लेखन या प्रकल्पासाठी विचारात घेतले. देवनागरी, ग्रंथी, शारदा, मैथली, प्राचीन बंगाली, प्राचीन तेलगू, प्राचीन मल्याळी अशा लिपींमधून शाकुंतलवरील भाष्य आणि टीका उपलब्ध आहेत. त्यातील दाक्षिणात्य ग्रंथलिपी, प्राचीन मैथली, देवनागरी, मल्याळम लिपींमधील टीका या संशोधनासाठी अभ्यासण्यात आल्या,' असे डॉ. त्रिपाठी यांनी स्पष्ट केले.

पोएटिक जस्टिस...

डॉ. त्रिपाठी यांनी २०००मध्ये पहिल्यांदा या कामाचा पहिला मसुदा लिहून तयार केला. त्यानंतर गेली पंधरा वर्षे सातत्याने त्या या विषयीचे संशोधन करून ते लिहून ठेवीत आहेत. त्यातूनच हा ग्रंथ तयार झाला. कालिदासाच्या हस्तलिखितांचा अभ्यास करताना आपले संशोधनही हस्तलिखितांच्या स्वरूपातच पुढे येण्याचा अनुभव त्या सध्या घेत आहेत. मात्र, चांगला प्रकाशक मिळाल्यास, हे संशोधन ग्रंथरूपाने जगासमोर आणण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.

संशोधनातून तयार झालेल्या या हस्तलिखित ग्रंथाच्या पहिल्या भागामध्ये टीकाकारांची माहिती, त्यांची टीका करण्याची पद्धत, व्याख्यापद्धती, शैली, भाषा आदी बाबींचा आढावा घेण्यात आला आहे. हस्तलिखिताच्या दुसऱ्या भागामध्ये मूळ 'शाकुंतल' आणि त्या विषयीचे भाष्य कालानुक्रमे मांडण्यात आले आहे. 'शाकुंतल'मधील काव्य आणि त्या खालोखाल त्या विषयीचे भाष्य अशी रचना अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास डॉ. त्रिपाठी यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य सहकारी बँकेच्या तोट्याची हायकोर्टात सुनावणी

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या तोट्याच्या चौकशीला आक्षेप घेणारी याचिका हायकोर्टाने फेटाळल्यामुळे तत्कालीन संचालकांवरील तोट्याची वैयक्तिक जबाबदारी निश्चित करणारी सुनावणी आज, शुक्रवारी घेण्यात येणार आहे. अशी माहिती चौकशी अधिकारी शिवाजी पहिनकर यांनी स्पष्ट केले.

कलम ८८ नुसार बँकेला संचालकांच्या निर्णयामुळे झालेला तोटा हा संबंधित संचालकांवर निश्चित करण्यात येतो आणि त्याची वसुलीही करण्यात येते. चौकशीला हायकोर्टात आव्हान दिल्यामुळे ती थांबली होती. मात्र, हायकोर्टाने याचिका फेटाळल्यामुळे चौकशीला पुन्हा गती येणार आहे. बँकेच्या तोट्याला जबाबदार तत्कालीन संचालकांनी कलम ८८ च्या चौकशीसाठी चार आठवड्यांची मुदत मागितली होती. पण, मुदत न देता हायकोर्टाने सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश संचालकांना दिले आहेत. या चौकशीसाठी संचालकांना आज, शुक्रवारी येण्याची नोटीस देण्यात आली आहे, असेही पहिनकर म्हणाले.

संचालकांचे चुकीचे निर्णय आणि झालेला तोटा

बँकेच्या संचालक मंडळाने २००७ ते २०११ मध्ये नाबार्डच्या क्रेडिट मॉनिटरींग अरेंजमेंट (सीएमए) च्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करून उणे नक्तमूल्य आणि संचित तोटा असलेल्या ९ सहकारी साखर कारखान्यांना कर्जपुरवठा केला. त्यात ३३१ कोटी ९८ लाख रुपयांचा बँकेला तोटा झाला.

बँकेने गिरणा सहकारी साखर कारखाना (नाशिक), सिंदखेडा कारखाना (नंदूरबार) व नाशिक जिल्हा सूतगिरणी व संत गाडगेबाबा सूत गिरणीला विनातारण कर्ज दिले. त्यात ६० कोटींचा तोटा झाला.

केन अॅग्रो इंडियाची (डोंगराई कारखाना, सांगली) थकहमी सरकारने रद्द केली. वसुलीची प्रभावी कार्यवाही न झाल्याने ११९.९९ कोटींचा तोटा झाला.

२४ सहकारी साखर कारखान्यांना कर्जपुरवठा करताना तारण व हमी घेतली नाही. त्यामुळे २२५ कोटी ६६ लाख रुपये थकले.

कर्जाच्या वसुलीसाठी मालमत्ता विक्री केलेल्या २२ कारखान्यांकडील १९५ कोटी रुपयांचे कर्ज असुरक्षित.

कर्जाच्या वसुलीसाठी सिक्युरीटायझेशन कायद्यांतर्गत ४१ संस्थांच्या मालमत्तांची ५७४ कोटी २३ लाखांना विक्री. या विक्रीनंतर संबंधित संस्थांकडील मुद्द व व्याजाची ४७८ कोटी १४ लाखांची बाकी राहिली. त्यामुळे बँकेला मोठा तोटा.

आठ थकबाकीदारांच्या मालमत्ता विकताना बाजारमूल्य न पाहता राखीव किमती निश्चित केल्या. त्यात ६ कोटी १२ लाखांचा तोटा.

नऊ संस्थांची मालमत्ता जप्त करून जाहीर निविदेने विक्री न करता ती खासगी पद्धतीने विकली. यात बँकेला ३६ कोटी ९४ लाखांचे नुकसान झाले.

लघुउद्योग व्यवसायासाठी चार संस्थांना योजनेचा दुरूपयोग करून कर्जे. ३ कोटी २० लाखांचे नुकसान.

विक्रीतील तोटा

राज्य बँकेने तोट्यातील १६ सहकारी साखर कारखान्यांचे लिलाव केले. हे लिलाव करताना विक्रीची निविदा तीन वेळा प्रसिद्ध करणे गरजेचे होते. तथापि, हे लिलाव खासगी पद्धतीने झाले. विक्रीत झालेला तोटा पुढील प्रमाणे...

शंकर सहकारी कारखाना (यवतमाळ) : ३.२ कोटी

राम गणेश गडकरी कारखाना (नागपूर) : १३.३६ कोटी

अकोला सहकारी कारखाना (अकोला) : ८.०६ कोटी

अंबादेवी सहकारी कारखाना (अमरावती) : ७.९० कोटी

कोंडेश्वर सहकारी कारखाना (अमरावती) : ३.१८ कोटी

शेतकरी सहकारी जिनिंग प्रेस (यवतमाळ) : १.३७ कोटी तोटा

महाराष्ट्र को-ऑप इंजिनीअरिंग सोसायटी (कोल्हापूर)- १.२५ कोटी तोटा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीए’चा निकाल ८.२६ टक्के

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडिया'तर्फे घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट अभ्यासक्रमाच्या फायनल परीक्षेचा निकाल ८.२६ टक्के लागला आहे; तर सीपीटी परीक्षेत २५.३० टक्के विद्यार्थी यशस्वी ठरले. यंदा फायनलचा निकाल काहीसा सुधारला असला, तरी सीपीटीच्या निकालात मात्र, गतवर्षीच्या तुलनेत तीन टक्के घसरण झाली आहे.

आयसीएआयतर्फे देशभरातील विविध केंद्रांवर मे २०१५ मध्ये फायनल तर जून २०१५ मध्ये सीपीटी परीक्षा घेण्यात आल्या होती. त्याचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. सीए फायनल परीक्षेत दिल्लीच्या शैली चौधरी व सिकंदराबादचा राहुल अगरवाल यांनी संयुक्तरित्या प्रथम क्रमांक मिळवला. मछलीपट्टणमच्या चित्तुरी लक्ष्मी अनुशाने द्वितीय; तर मुंबईच्या देवल मोदी याने तृतीय क्रमांक पटकावला. सीपीटी परीक्षेत हैदराबादच्या मेका नरेशकुमारने प्रथम, विजयवाडाच्या सुरेश कटला याने द्वितीय; तर इंदोरच्या सलोनी जिंदालने तृतीय क्रमांक पटकावला, अशी माहिती आयसीएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज फडणीस यांनी दिली.

मे २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या सीए फायनल परीक्षेत दोन्ही ग्रुपसाठी ४२ हजार ८४७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३ हजार ५३८ विद्यार्थी म्हणजेच ८.२६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर केवळ पहिला ग्रुप घेऊन परीक्षा दिलेल्या ७२ हजार ८७४ विद्यार्थ्यांपैकी ८ हजार ३१७ म्हणजेच ११.४१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर केवळ दुसऱ्या ग्रुपची परीक्षा दिलेल्या ७७ हजार ९४१ विद्यार्थ्यांपैकी १२ हजार ८९४ म्हणजेच १६.५४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

जून २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या सीपीटी परीक्षेसाठी एक लाख २८ हजार ९१६ विद्यार्थी बसले होते. यापैकी ३२ हजार ६१९ म्हणजे २५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेत १९ हजार १८४ मुलगे; तर १३ हजार ४३५ मुली उत्तीर्ण झाल्या.

'सीए फायनल परीक्षेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल सुधारला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धरणक्षेत्रात रिमझिम पाऊस

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या महिनाभरापासून गायब झालेल्या पावसाने धरणांच्या पाणलोटात हलक्या सरींच्या स्वरूपात हजेरी लावली आहे. या पावसाने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. खडकवासला प्रकल्पाचा पाणीसाठा ६.९७ अब्ज घनफुटांवर (टीएमसी) आला आहे.

गुरुवारी सकाळी खडकवासला प्रकल्पातील धरणांच्या पाणलोटात पावसाने किरकोळ हजेरी लावली. त्यानंतर सायंकाळी पाचपर्यंत टेमघरमध्ये ७ मिलिमीटर, पानशेतमध्ये ५ मिमी, वरसगाव धरणाच्या परिसरात ४ मिमी व खडकवासला धरणात १ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात कोणतीही वाढ झालेली नाही. शेतीसाठी मुठा उजवा कालव्याद्वारे १,४२८ क्युसकने पाणी दिले जात आहे.

हे पाणी सोडल्यामुळे खडकवासला प्रकल्पाचा पाणीसाठा ६.९७ टीएमसीवर आला आहे. या पाण्यापैकी सुमारे तीन टीएमसी पाणी शहराला पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. ते शहराला दोन ते सव्वादोन महिने पुरेल. धरणातील हे उरलेले पाणी शेती व पिण्यासाठी सोडण्यात येत आहे.

शहरात भुरभुर

जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणेकरांना भुरभुर पावसावरच समाधान मानावे लागले. पुणे शहर, परिसर तसेच पिंपरी-‌चिंचवड भागांत सकाळी आणि दुपारी हलक्या पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. रात्री साडेआठपर्यंत शहरात ०.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

पुढील दोन दिवसांतही शहरात हलक्या पावसाचीच शक्यता वर्तविण्यात आली आहे. शहरात सकाळपासूनच ढगाळ हवामान होते. दहा-साडेदहाच्या सुमारास अंधारून आल्याने आज तरी शहरात जोरदार पाऊस होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, प्रत्यक्षात केवळ हलक्या स्वरूपाचाच पाऊस झाला. त्यामुळे केवळ रस्ते ओले झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेकरांनी अनुभवला सुरेल संगीताचा ‘सेतू’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिवतांडव नृत्यातील आक्रमकपणा..मियाँ मल्हार रागातील गोडवा, मनाचा ठाव घेणारी भावगीते, नकळत ठेका धरायला लावणारे फ्यूजन.. सायंकालीन आल्हाददायक वातावरणात उत्तरोत्तर रंगत गेलेल्या अनोख्या मैफलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले अन् नकळत प्रत्येकाने संगीताच्या सुरेल विश्वापर्यंत सेतू अनुभवला.

शास्त्रीय, उपशास्त्रीय, नृत्य, वादन, गायन आणि त्याचं फ्यूजनची सुरेल सांगड घालणारा 'सेतू' हा कार्यक्रम हिंदू हेल्पलाइनतर्फे गुरुवारी गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित केला होता. नेपाळमधील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी निधी गोळा करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाची संकल्पना, दिग्दर्शन आणि सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक नितीश भारद्वाज यांनी केले. शिवतांडव स्त्रोतावर आधारित कथन सादर करून शर्वरी जमेनीस यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. पं. शौनक अभिषेकी आणि पं. रघुनंदन पणशीकर यांच्या जुगलबंदीने मैफलीत सुरेल रंग भरले. डॉ. सलील कुलकर्णी यांनी स्वरबद्ध केलेले गाणी, संत मीराबाईंची भजने, रेवा नातू यांनी 'सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा' हे भजन सादर केले. उत्तरार्धात कथक आणि भरतनाट्यम याची जुगलबंदी तसेच, फ्युजन सादर झाले. रसिकांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांना उत्स्फूर्त दाद दिली. या वेळी एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, शरद कुंटे, ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके, सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे आदी उपस्थित होते.

नेपाळमध्ये २५ एप्रिलला झालेल्या भीषण भूकंपातील पीडितांच्या मदतीसाठी आम्ही सेतूचे आयोजन केले आहे. या भूकंपामध्ये पालक गमावलेल्या मुलांचे शिक्षण आणि त्यांना स्वावलंबी करण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. पुण्याबरोबर वेगवेगळ्या शहरांमध्ये आम्ही हा उपक्रम राबविणार आहोत. ही मुले गुन्हेगारीकडे वळू नये, असा आमचा उद्देश आहे', असे भारद्वाज यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाने वाढणार करांचा बोजा?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारच्या प्रस्तावित 'स्मार्ट सिटी' प्रकल्पात सहभागी होण्यासाठी प्रवेशिका पाठविण्यासाठी महापालिकेने तयारी केली असली, तरी स्थानिक पातळीवर त्याला विरोध होण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पातील सहभागामुळे नागरिकांवर करांचा (यूजर चार्जेस) बोजा वाढण्याची भीती व्यक्त करत पालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून विरोध केला जाण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या 'स्मार्ट सिटी' प्रकल्पासाठी प्रवेशिका पाठविण्याची अंतिम मुदत सोमवारी (२० जुलै) संपणार आहे. तत्पूर्वी, पालिकेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता आवश्यक असल्याने स्मार्ट सिटीचा प्रस्ताव आज, शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. महापालिकेला त्यासाठी दर वर्षी ५० कोटी रुपये उभारावे लागणार असून, २०० कोटी रुपये खर्च करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत निर्माण होणाऱ्या सेवा-सुविधांवरील खर्च नागरिकांकडून 'यूजर चार्जेस'च्या माध्यमातून गोळा केला जाण्याचा पर्याय सुचविला आहे. 'स्मार्ट सिटी'साठी प्रवेशिका पाठविली, तर पालिकेला काही बंधने पाळणे क्रमप्राप्त ठरणार आहे. बोजा वाढविणाऱ्या यूजर चार्जेससारख्या अटींना काँग्रेसचा विरोध आहे. त्याबाबत सविस्तर माहिती दिली जावी', अशी अपेक्षा विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीएमआरडीए’साठी हवी नियोजन समिती

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सरकारने पुणे महानगर विकास क्षेत्राची (पीएमआरडीए) स्थापना केली असून विकास आराखडा (डीपी) तयार करण्याचे अधिकार त्यांनाच दिले आहेत. मात्र, कायद्यानुसार डीपी तयार करण्याचे काम हे पुणे महानगर विकास नियोजन समितीची स्थापना करून केले पाहिजे. यासाठी तातडीने नियोजन समितीची स्थापना करावी, अशी मागणी शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

पुणे शहर, पिंपरी चिंचवड महापालिका तसेच जिल्ह्यातील आठशे गावांसाठी राज्य सरकारने प‌ीएमआरडीएची स्थापना केली आहे. या भागांचा विकास करण्यासाठी पीएमआरडीएला स्वतंत्र डीपीची आवश्यकता आहे. डीपी तयार करण्याचे अधिकार राज्य सरकारने पीएमआरडीएला दिले असून यासाठी पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाची मदत घ्यावी, असे या सरकारने काढलेल्या अध्यादेशात म्हटले आहे. डीपी तयार करण्याचे अधिकार हे नियोजन समितीला असल्याने अशी समिती स्थापन करून त्यानंतरच हा डीपी तयार करावा लागेल, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी सांगितले.

सरकारने राज्य घटनेनुसार २००० साली महाराष्ट्र मेट्रो पॉलिटन प्लॅनिंग कमिटी कायदा मंजूर केला व पुणे महानगर विकास क्षेत्र जाहीर केले. या कायद्यानुसार पीएमआरडीएसाठी महानगर नियोजन समिती स्थापन केली पाहिजे. कायद्यातील तरतुदीनुसार या समितीमध्ये ४५ सदस्यांना निवडून देण्याचा अधिकार आहे. डीपी तयार करण्यासाठी सरकारने समिती स्थापन न केल्याने कायद्याचे उल्लंघन होत असून सरकारने तातडीने ही समिती स्थापन करावी, अशी मागणी छाजेड यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता दुरुस्तीवर खडाजंगी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील रस्त्यांवर पावसाळीपूर्व कामे म्हणून आवश्यक असलेले डांबरीकरण करण्यासाठीचे एक कोटी रुपयांचे टेंडर मान्य करण्यावरून गुरुवारी स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेते यांच्यात खडाजंगी झाली. मार्च महिन्यामध्ये प्रशासनाने मंजूर केलेला हा प्रस्ताव प्रशासनाने तीन महिन्यानंतर स्थायी समितीसमोर का आणला, अशी विचारणा समितीच्या अध्यक्षांनी केली. तर रस्ता दुुरुस्त होणे गरजेचे असल्याने याला मान्यता द्यावी, अशी मागणी सभागृह नेत्यांनी केल्याने या दोघांमध्ये खडाजंगी झाली‌.

'पक्षाची भूमिका म्हणून आम्ही हा प्रस्ताव मतदान घेऊन मान्य करू तुम्ही मतदान घ्या, या सभागृह नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेपुढे नमते घेत स्थायी समिती अध्यक्षांनी हा प्रस्ताव मान्य केला. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असल्याने स्थायी समितीचे अध्यक्षपद राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांच्याकडे आहे. तर सभागृह नेतेपद शंकर केमसे यांच्याकडे आहे. मात्र प्रस्ताव मान्य करण्यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे झालेल्या प्रकाराची जोरदार चर्चा पालिकेत रंगली होती. पालिकेत सभागृह नेत्यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचा कारभार चालतो, सभागृह नेता म्हणून काम करणारी व्यक्ती पक्षाची भूमिका पालिकेत मांडत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसकडेच स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असतानाच सभागृह नेत्यांनाच प्रस्ताव मान्य करून घेण्यासाठी वाद घालावा लागत असेल तर इतर पक्षांच्या सभासदांची त्यांचे प्रस्ताव मान्य करून घेण्यासाठी नक्की काय करायचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रस्त्याची डागडुजी करण्यासाठी एक कोटी रुपयांचे डांबर खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी आला होता. प्रशासनाने तीन महिने हा प्रस्ताव उशिरा का दाखल केला, यावरून समितीच्या अध्यक्षांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images