Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

ओढ्यात बेकायदा बांधकाम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राजगुरुनगर

राजगुरुनगरजवळील सातकरस्थळ (ता. खेड) येथे एका बांधकाम व्यावसायिकाने ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बेकायदा अडवून पात्रातच भिंतीचे बांधकाम केले आहे. त्यामुळे ओढ्याचे पात्र अरुंद बनले आहे. त्यामुळे भविष्यात ओढ्याला पूर येऊन आजूबाजूच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती बाधित शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, सातकरस्थळ ग्रामपंचायतीने एका ठरावाद्वारे आक्षेप घेऊन अनधिकृत बांधकाम त्वरित काढून टाकण्याची सूचना संबंधित बांधकाम व्यावसायिकाला केली होती. परंतु तरीदेखील त्याने बांधकाम सुरूच ठेवले आहे. बांधकाम व्यावसायिक ग्रामपंचायतीलादेखील जुमानत नसल्यामुळे ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर खेडचे तहसीलदार प्रशांत आवटे यांनी चालू असलेले काम तातडीने बंद करण्याचे आदेश बांधकाम व्यावसायिकाला दिले. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही व बांधकाम चालूच असल्याचे सातकरस्थळ येथील ग्रामस्थ मारुती सातकर, अशोक नवले आदी ग्रामस्थांनी सांगितले.

मौजे सातकरस्थळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत इस्माईल इब्राहीम मोमीन या बांधकाम व्यावसायिकाने जमीन सर्व्हे नं. १८९ व १९०मध्ये सुमारे सोळा हजार चौरस मीटर इतके क्षेत्र बिनशेती करून प्रत्यक्ष बांधकामाला सुरवात केली. संबंधित ठिकाणावरून एक ओढा जात आहे; मात्र व्यावसायिकाने मनमानीपणे या ओढ्याच्या पात्रातच अतिक्रमण करून संरक्षक भिंत बांधली. त्यामुळे ओढ्याचे पात्र अरुंद झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुख्य सूत्रधार मोकाटच?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खेड तालुक्यातील डेहणे शाखेत बनावट सोने तारण ठेवून एक कोटी ९२ लाख रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक झाली आहे. त्या प्रकरणी शाखाधिकारी एन. एस. तळपे, कॅशिअर एम. पी. रणपिसे आणि सोने तपासणी करणारा सराफ सुनील सोनार यांच्यावर खेड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डेहणे शाखेत २५ जूनपर्यंत सोने तारण ठेवून कर्ज घेतल्याची ७४२ प्रकरणे मंजूर करण्यात आली. त्यापैकी १७३ प्रकरणांमध्ये खोटे दागिने तारण ठेवण्यात आल्याचे उघड झाले. या १७३

प्रकरणांमध्ये बँकेने एकूण एक कोटी ९२ लाख ३६ हजार २५२ रुपये कर्ज म्हणून दिले. शाखाधिकारी, कॅशिअर आणि सराफ यांच्या संगनमताने बनावट सोने तारण ठेवून अनेक कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली. शाखाप्रमुखांना केवळ दोन लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्याची परवानगी आहे; मात्र या शाखेतून तीन-तीन लाख रुपयांची प्रकरणे मंजूर केली गेली आहेत. त्यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांनीच संगनमताने हा व्यवहार केला असल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट झाले आहे, अशी माहिती मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात व व्यवस्थापकीय संचालक संजय भोसले यांनी दिली.

या घोटाळ्याबाबत बँकेचे विकास अधिकारी एम. बी. कोळपकर यांना गैरव्यवहारास साह्य केल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे; मात्र त्यांचा या गैरव्यवहारात प्रत्यक्ष सहभाग नसल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे भोसले यांनी सांगितले. दरम्यान, या घोटाळ्यात बँकेचे विकास अधिकारी एम. बी. कोळपकर हे मुख्य सूत्रधार आहेत; मात्र त्यांना जाणीवपूर्वक यापासून दूर ठेवले जात असल्याचा आरोप बँकेच्या एका वरिष्ठ संचालकाने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी मार्केट रात्री ११ पर्यंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

छत्रपती शिवाजी मार्केटमधील बेकायदा स्टॉलधारकांवर कारवाई करण्याबरोबर मार्केटची वेळ सकाळी आठ ते रात्री अकरा अशी करण्यात आली आहे. मार्केटबाहेर चिकनची वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली असून, या वाहनांसाठी प्रायोगिक तत्त्वावर बॉम्बे गॅरेज येथे व्यवस्था करण्याचा निर्णय पुणे कँटोन्मेंट बोर्डाने घेतला आहे. मार्केटमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बोर्डामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला बोर्डाच्या उपाध्यक्षा डॉ. किरण मंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कुमार आणि नगरसेवक उपस्थित होते.

या मार्केटमधील अनेक स्टॉलमध्ये अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. काही स्टॉलधारकांनी दोनपेक्षा अधिक स्टॉल घेऊन स्टॉलचे रुपांतर गोडाउनमध्ये केले आहे. संबंधित गोडाउनवर कारवाई करण्याचेही बैठकीत ठरविण्यात आले. बोर्डाची परवानगी न घेता स्टॉलमध्ये अंतर्गत बदल करणाऱ्या स्टॉलधारकांवरही कारवाई होणार आहे. तसेच परवानगीविना स्टॉलधारकाने दुसऱ्या व्यक्तीला स्टॉल चालविण्यास दिला असल्यास संबंधितांवरही कारवाई करण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.

मार्केटच्या बाहेर बेकायदा चिकन आणि मटणची वाहने उभी करण्यात येतात. त्या वाहनांमुळे या परिसरात दुर्गंधी पसरलेली असते. तसेच वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे मार्केटबाहेर वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रायोगिक तत्वावर या वाहनांसाठी बॉम्बे गॅरेजजवळ जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र, ही व्यवस्था सहा महिन्यांसाठीच आहे. या कालावधीत लहान वाहनांद्वारे मार्केटमध्ये चिकन आणि मटणची वाहतूक करण्याची सक्ती करण्याचेही बैठकीत ठरविण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांच्या घरासमोर चिकनची वाहने लावल्यास संबंधित वाहनांवर कारवाई केली जाणार आहे.

मार्केटमध्ये बेकायदा चिकन आणि मटणाचा कत्तलखाना सुरू करण्यात आला आहे. तो बंद केला जाणार आहे. तसेच मार्केटमधील अनेक व्यापारी वीजचोरी करत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे भूमिगत केबल टाकण्यात येणार आहे.

- डॉ. किरण मंत्री, उपाध्यक्षा, पुणे कँटोन्मेंट बोर्ड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेयसीसाठी घरफोड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

प्रेयसीवर खर्च करण्यासाठी चोरी करत पुणे शहर व पिंपरी-चिंचवड शहरात घरफोड्या करणाऱ्या युवकास गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने अटक केली. १७ जुलैपर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रतिक हिराचंद लिडकर (वय २२, रा. बाळासाहेब कराळे चाळ, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. दरम्यान, हा आरोपी चोरी केलेला माल 'ओएलएक्स'वरून विकत असल्याचेही उघड झाले आहे.

गुन्हे शाखाचे पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहर परिसरात मोठ्या प्रमाणात घरफोडी व लॅपटॉप चोरीच्या घटना वाढल्या आहेत. या गुह्यांचा तपास करीत असता आरोपी लिडकर याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट ४ ला मिळाली. त्यानुसार ७ जुलै रोजी सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करत असताना लिडकर याला रंगेहाथ अटक करण्यात आली.

त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे १८ लॅपटॉप, वेगवेगळ्या कंपनीचे ६ एलइडी, ९ मोबाइल, २ कॅमेरे, ३८ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक हिरो होंडा डिलक्स मोटार सायकल असा एकूण ७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

त्यासोबतच चाकण, तळेगाव, वडगाव शेरी, खराडी, चंदननगर परिसरातही घरफोड्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल मोहननगर येथील गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या कार्यालयात ठेवण्यात आले आहेत. ज्या नागरिकांच्या वस्तू चोरीला गेल्या आहे त्यांनी ओळख पटविण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक नितीन भोयर (९७६७१०९१९०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक लक्ष्मण बोराटे यांनी केले.

गाडी चोर गजाआड

कोथरूड परिसरातील अलिशान कंपनीच्या गाड्या चोरून, त्यांच्या नंबर प्लेट बदलून, वापर करणाऱ्या दोघा आरोपींना गुन्हे शाखेच्या होमिसाइड पथकाने अटक केली. आरोपी हे गँगस्टर गणेश मारणे टोळीशी संबंधित आहेत. त्यांच्याकडून दोन कारसह दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

चेतन राजेंद्र हरसुर (वय २५, रा. जयभवानीनगर कोथरूड), निखील संजय खोमणे (वय २७, रा. कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. होमिसाइड पथकाचे कर्मचारी अब्दुलकरीम सैय्यद यांना मिळालेल्या माहितीनुसार दोघांना अटक करण्यात आली आहे, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरात शौचालय आहे का?

$
0
0

रोहित आठवले, पिंपरी

'तुमच्या घरात शौचालय आहे का', असा प्रश्न जर महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घरी येऊन विचारल्यास दचकू नका. कारण सध्या याबाबत महापालिकेच्या वतीने याबाबत सर्वेक्षण सुरू आहे. मात्र, शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणापाठोपाठ शौचालय सर्वेक्षणाचा घोळ घातला जात आहे. हे अधिकारी-कर्मचारी शहरातील उच्चभ्रू भागांत जाऊन हे सर्वेक्षण करीत आहेत. त्यामुळे शहरात वास्तविक किती घरांमध्ये शौचालय नाही याची नेमकी आकडेवारी समोर येण्यात अडसर निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

देशात २ ऑक्टोबर २०१४ ते २ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत असून त्या अंतर्गत वैयक्तिक शौचालय, सामुदायिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, घनकचरा व्यवस्थापन, माहिती शिक्षणप्रसार व जनजागृती आणि क्षमता बांधणी या घटकांचा समावेश आहे. त्यासाठी शहर स्वच्छता आराखडा तयार करून सवयी बदलाचे धोरण आणि माहिती, शिक्षण व संपर्क, खासगी संस्थाच्या सहभागासाठी सुयोग्य वातावरण निर्मिती करणे यामध्ये अपेक्षित आहे. त्यामागे उघड्यावरील शौचविधी बंद करणे हा महत्त्वपूर्ण उद्देश महापालिकेचे आहे. वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठी २०११ च्या जनगणनेनुसार ११ हजार ६८४ वैयक्तिक शौचालयांची आवश्यकता शहरात आहे.

सामुदायिक शौचालय व सार्वजनिक शौचालय आणि घनकचरा व्यवस्थापन याचाही या प्रकल्पामध्ये समावेश आहे. तसेच स्मार्ट सिटी अभियानासाठी पाणी पुरवठा, वीज पुरवठा, शहर स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन, कार्यक्षम शहरी दळणवळण व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, शहरी गरिबांसाठी परवडणारी घरे, सक्षम इंटरनेट सुविधा, ई-गव्हर्नन्स व नागरिकांचा सहभाग, शाश्वत पर्यावरण, नागरिकांची सुरक्षितता व संरक्षण, शहरी आरोग्य आणि शिक्षण सुविधा हे पायाभूत घटक समाविष्ट आहेत. आयुक्तांनी प्रकल्पांची माहिती दिल्यानंतर नगरसेवकांनी काही सवाल उपस्थित करून काही सूचनाही केल्या. त्यामध्ये शहरातील स्वच्छता व शौचालयांबाबत विविध सूचना नगरसेवकांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत आयुक्तांना केल्या आहेत.

शहरात सर्वच भागांमध्ये सर्वेक्षण सुरू आहे. सर्वेक्षण सर्वसमावेशक असावे हाच यामागील उद्देश आहे. तरी देखील यावर तोडगा काढण्यासाठी यापूर्वी बांधकाम विभागाकडील संकलित माहितीवरून उच्चभ्रू भागातील शौचालयांची आकडेवारी मिळविण्याचा प्रयत्न राहणार आहे.

- राजीव जाधव, महापालिका आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारीनंतरही राहिली गावे स्वच्छ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दौंड

पालखी सोहळ्याला निरोप दिल्यानंतर गावांपुढे स्वच्छतेचे मोठे आव्हान असते. आधुनिक काळात वारीनंतर होणाऱ्या अस्वच्छतेबाबत मार्ग काढताना प्रशासनाच्या नाकीनऊ येतात. सुमारे लाख-दीड लाख वारकऱ्यांच्या वावरानंतर स्वच्छतेचा आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा राहतो. स्वच्छता सगळ्यांसाठी अनिवार्य बाब असल्याने हायकोर्टाने स्वच्छतेच्या तयारीबाबत प्रशासनाकडे वेळोवेळी खुलासा मागितला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या सेवा सहयोग संस्थेने जगत‍््गुरू तुकाराम महराजांच्या पालखीच्या लोणीकाळभोर व यवत मुक्कामी शौचालयाच्या वापराबाबत प्रायोगिक तत्त्वांवर स्वयंसेवकांच्या सहकार्याने प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना सकारात्मक यश मिळाल्याचे दिसून आले आहे.

यवत आणि लोणी काळभोर या दोन्ही गावांत मोठ्या संख्येने वारकरी येऊन गेल्याचा प्रश्न पडावा दुसऱ्या दिवशी गावभर दुर्गंधी व कचऱ्याचे साम्राज्य असायचे. या समस्येवर परंपरा आणि चालीरीती टिकवून मार्ग काढण्याची इच्छा होती. सरकारी पद्धतीने भरमसाठ खर्च करूनही हा प्रश्न सुटलेला नव्हता. या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित 'सेवा सहयोग फाउंडेशन'ने स्वयंसेवकांची मदत घेऊन दोन गावात स्वच्छतेचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. यवत येथे पालखी सोहळ्यातील प्रमुखांनी ९० टक्के वारकऱ्यांनी शौचालयाचा वापर केल्याचे सांगितले. लोणी ग्रामस्थांनी मोठ्या सोहळ्यानंतरही गाव स्वच्छ राहिल्याचे सांगितले.

या प्रयत्नांबद्दल पुण्याचे माजी खासदार प्रदीप रावत यांनी 'मटा'ला माहिती दिली. पुण्याच्या 'सेवा सहयोग फाउंडेशन'ने या वर्षी लोणी काळभोर व यवत गावात हा प्रयोग केला दोन्ही गावात पाण्याची सोय असणारी प्रत्येकी दोनशे तात्पुरती शौचालये उभी केली. प्रत्येक गावात अडीचशे स्वयंसेवक याबाबत जनजागृती करत होते. या स्वयंसेवकांनी पालखी मुक्कामाच्या रात्री व पालखी मार्गस्थ होईपर्यंत वारकऱ्यांना नैसर्गिक विधीसाठी बंदिस्त शौचालयाचा वापर करण्याचा आग्रह धरला. उघड्यावर जाणाऱ्या वारकऱ्यांना परावृत्त करण्यात आले. पालखी सोहळ्यातील प्रमुखांनीही वेळोवेळी शौचालयाचा वापर करण्याचे आव्हान केले, याचा चांगला परिणाम दिसून आला. टाक्यांमध्ये जमा झालेले मलमूत्र बारा हजार लिटरच्या टँकरमध्ये भरून मलनिस्सारण केद्राकडे पाठवण्यात आले. शौचालयांची स्वच्छताहि ठराविक वेळानंतर करण्यात आली. दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावाचीही स्वच्छता स्वयंसेवकांनी केली. शैलेश घाटपांडे, रणजीत खेर, देहू संस्थांचे माजी अध्यक्ष शिवाजीराव मोरे, अतुल लिमये,संदीप जाधव, मारुती तुपे, नंदकिशोर काळभोर,संतोष दाभाडे, माउली कुडले, बाळासाहेब अमराळे, उदय जोशी यांनी 'सेवा फाउंडेशन'च्या कार्यास सक्रिय मदत केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मणिभाई देसाई महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या व कासुर्डी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी यवत गावात स्वच्छता मोहिमेत भाग घेतला.

लोणी काळभोर आणि यवतमध्ये प्रत्येकी चार लाख रुपये खर्च झाला. '३ एस सोल्युशन' या कंपनीने घडीचे शौचालय पुरवले. ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांची नियोजनात मदत झाली. इच्छाशक्ती आणि कल्पनाशक्तीच्या बळावर पुढच्या वर्षी दोन्हीही पालखी मार्गांच्या मिळून तीस मुक्कामांच्या ठिकाणी हा प्रयोग शक्य असल्यास राबविण्यात येईल.

- प्रदीप रावत, माजी खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुकोबांच्या पालखीवरील ‘टेन्शन’ टळले

$
0
0

बारामतीः रोटी घाटातून गेलेल्या अती उच्चदाब विद्युत वाहिनीखालून जाणाऱ्या लोकांना विजेचा धक्का बसत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर खबरदारी म्हणून ही वाहिनी मंगळवारी (१४ जुलै) सकाळी तात्पुरती बंद करण्यात आली आहे. या वाहिनीची उंची वाढविण्याचे काम मंगळवारीच पूर्ण करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून या वाहिनीतून पूर्वीप्रमाणे वीजपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. पॉवर ग्रीड कार्पोरेशन लिमिटेड या केंद्र सरकारअंतर्गत येणाऱ्या महामंडळाची ७६५ केव्ही क्षमतेची सोलापूर ते पुणे ही अतिउच्चदाब विद्युत वाहिनी दौंड तालुक्यातून जाते. रोटी घाटातून या वाहिनीखालून जाणाऱ्या लोकांना विजेचा धक्का बसत असल्याच्या तक्रारी महामंडळाकडे आल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी 'पॉवरग्रीड'च्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. या ठिकाणी वाहिनीच्या तारांची उंची निर्धारित उंचीपेक्षा कमी असल्याचे दिसले. सकाळी आठ वाजता या वाहिनीचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. या तारांची उंची १८ मीटर ते १९.३ मीटरपर्यंत वाढविण्यात आली. त्यामुळे नागरिकांना धोका नसल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे.

वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून बुधवारी (१५ जुलै) ७६५ केव्ही या वाहिनीतून वीजपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय पॉवरग्रीडने घेतला. गुरुवारी सकाळी आठ वाजता या वाहिनीतून ७६५ केव्ही क्षमतेने वीज वाहून नेण्याचे काम पूर्ववत सुरू होईल.

- आर. आर. यादव, मुख्य व्यवस्थापक, पॉवरग्रीड, पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भर उन्हात रोटी घाट पार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा रोटी घाटाची अवघड चढण पार करून बारामती तालुक्यात दाखल झाली. उंडवडीत गावाच्या हद्दीत गुणांजखेडा गावाच्या सीमेवर पालखीचे स्वागत करण्यात आले. या वेळी उपविभागीय अधिकारी संतोष जाधव, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे, उंडवडी गावाचे सरपंच लता गवळी उपस्थित होते. त्यानंतर उंडवडीत दिंड्या विसावल्या आहेत.

दौंडः 'आम्हासी सकळ..तुझ्या नामाचेची बळ,' या तुकोबारायांच्या अभंगातील ओळीची प्रत्यक्ष अनुभूती जगद्गुरू तुकोबारायांची पालखी रोटी घाट पार करताना आली. उन्हाची पर्वा न करता वळणांची चढाई असणारा घार पार करून पालखी सोहळा बारामती तालुक्यातील उंडवडी गावातील मुक्कामाकडे रवाना झाला.

रोटी घाट पार करण्यासाठी तुकोबारायांच्या पालखी रथाला पाच बैल जोड जुंपण्यात आले होते. नेहमीच्या बैलजोडी व्यतिरिक्त स्थानिक बैल जोड्यांनी आपली सेवा पालखी सोहळ्याला दिली. रोटी घाटात येण्यापूर्वी वरवंड मुक्कामावरून सकाळी सहा वाजता विठ्ठल-रखुमाईच्या मंदिरात आरती होऊन पुढील टप्प्याकडे पालखी मार्गस्थ झाली वरवंड ते पाटस पर्यंत दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. काही भाविक वरवंड ते रोटीपर्यंतच्या पायी प्रवासासाठी दिंडीत सामील झाले होते. पाटस येथे पालखीचे मोठ्या मनोभावे स्वागत करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पालखीचे स्वागत केले. पाटसचे ग्रामदैवत नागेश्वराच्या मंदिरात तुकोबारायांच्या पादुकांची पालखी दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. त्यानंतर पालखी सोहळ्याने रोटी घाटाच्या दिशेने प्रस्थान केले. घाट पार करून रोटी गावात दुपारच्या विश्रांतीसाठी व आहारासाठी काही काळ विसावली व पुढे हिंगणी गाडा, वासुंदे, गुंजखिळा मार्गे उंडवडीकडे रवाना झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महासंघाला टोलवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ढोल-ताशा पथकांबाबत नागरिकांकडून नाराजीचा सूर लावला जात असतानाच, शिखर संघटना असलेल्या ढोल-ताशा महासंघाच्या आवाहनालाही पथकांकडून फाटा देण्यात आला आहे. ढोलपथकांनी एक ऑगस्टपासून सराव सुरू करावा, असे आवाहन महासंघाने केले होते; मात्र ते आवाहन न पाळता काही पथकांनी दोन महिने आधीच सराव सुरू केला आहे.

ढोल-ताशा पथके हा गणेशोत्सवातील आकर्षणाचा भाग आहे; मात्र पथकांची वाढती संख्या, ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे गेली दोन वर्षे पथकांबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, नूमवि, शिवगर्जना, प्रबोधन, कलावंत अशा काही पथकांनी दोन महिने आधीच सराव सुरू केले आहेत. नागरिकांची वाढती नाराजी लक्षात घेऊनच एक ऑगस्टपूर्वी सराव सुरू न करण्याबाबत महासंघाने आवाहन केले होते; मात्र त्या आवाहनाकडे थेट दुर्लक्ष करण्यात आले आहे. 'ढोलपथकांनी एक ऑगस्टपासून सराव सुरू करण्याचे आवाहन पथकांना करण्यात आले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्याला चांगला प्रतिसाद आहे. काही अपवाद निश्चित आहेत. सरावाच्या वेळेबाबत तोडगा काढण्यात यावा, असे निवेदन पोलिसांना देण्यात आले आहे. त्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल,' असे महासंघाचे अध्यक्ष पराग गाडगीळ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत न्याहरी केंद्रांवर गंडांतर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वाढत्या पर्यटनाचा फायदा घेण्यासाठी महाबळेश्वरच्या कानाकोपऱ्यात सुरू झालेल्या अनधिकृत निवास आणि न्याहरी केंद्रांना लगाम घालण्याचा निर्णय 'इको सेन्सिटिव्ह झोन मॉनिटरींग कमिटी'ने घेतला आहे. समितीच्या आदेशानुसार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) आत्तापर्यंत ८४ परवाने रद्द केले आहेत. एवढेच नव्हे, तर नगरपालिका आणि महसूल विभागाने या परिसरातील अनधिकृत हॉटेल आणि रिसॉर्टचेही सर्वेक्षण सुरू केले आहे.

गेल्या काही वर्षांत वेगाने वाढत असलेल्या पर्यटनामुळे महाबळेश्वरची पर्यटकांना पेलण्याची क्षमता (कॅरिंग कपॅसिटी) संपली आहे. पर्यायाने तेथील नैसर्गिक साधनांवर ताण येत आहे. पश्चिम घाटातील संवेदनशील भाग असलेल्या महाबळेश्वरच्या वनसंपदेचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने संवेदनशील परिसर देखरेख समिती नेमली आहे. ही समिती महाबळेश्वरमधील अनियंत्रित पर्यटनाचे सुसूत्रीकरण करणार आहे. सध्या विनापरवाना बांधलेली घरे, निवास-न्याहारी योजनेतील घरे आणि हॉटेल त्यांच्या रडावर आहेत.

'महाबळेश्वर परिसरातील नागरिकांकडून आम्हाला 'निवास आणि न्याहरी योजना' धारकांविषयी तक्रारी आल्या होत्या. अनेक घरमालकांनी बांधकामाची परवानगी नसताना घराचे मजले वाढवले आहेत, तर काहींनी शेतजमिनीमध्ये अनधिकृतरित्या हॉटेल्स आणि पर्यटकांसाठी घरे बांधल्याच्या तक्रारींचा त्यात समावेश आहे. त्याची दखल घेऊन समितीने नगरपालिका आणि महसूल विभागाला या भागातील हॉटेल्स आणि निवास न्याहारीधारकांच्या घरांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाला आम्ही विनापरवाना बांधकाम केलेल्या योजनाधारकांची मान्यता रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत,' अशी माहिती महाबळेश्वरच्या पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील परिसर देखरेख उच्च समितीचे अध्यक्ष प्रभाकर करंदीकर यांनी दिली.

'एमटीडीसी'ची नवी साइट

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची अद्ययावत वेबसाइट लवकरच पर्यटकांसाठी खुली होणार आहे. त्यामध्ये निवास आणि न्याहारी योजनाधारकांचा स्वतंत्र विभाग असेल. त्यांची माहिती नेमकी आणि पर्यटकांच्या सर्व शंकांचे निरसन करणारी असावी, या उद्देशाने मंडळातर्फे मार्गदर्शन करण्यासाठी २९ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान पुणे विभागातील पर्यटन स्थळांवर स्टॉल लावण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील पर्यटनस्थळी आवश्यक असणाऱ्या विविध सोयी-सुविधा, विविध पर्यटनस्थळांची उत्तम दर्जाची छायाचित्रे, या मार्गावरील खासगी हॉटेल्स, पेट्रोल पंप, एटीएम, ट्रॅव्हल एजंट अशी माहिती नव्या वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कोर्ट देखरेखीखाली हत्येचा तपास करा’

$
0
0

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. मात्र, संबंधित अधिकाऱ्याची सहा महिन्यांपूर्वी बदली करण्यात आली. त्यामुळे या दोन्ही गुन्ह्यांचा तपास करण्याबाबत दाभोलकर कुटुंबीयांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तपासाचे काम कोर्टाच्या देखरेखीखाली करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

डॉ. हमीद दाभोलकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, शहर कार्याध्यक्ष श्रीपाल ललवाणी या वेळी उपस्थित होते. 'डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला दोन वर्षे होत आली, तरी मारेकरी शोधण्यात पोलिसांना यश आलेले नाही. सीबीआयकडूनही समाधानकारक पद्धतीने तपास झाला नाही. त्यामुळे केंद्र व राज्य सरकार पुरेसे गंभीर नाही,' अशी खंतही डॉ. दाभोलकर यांनी व्यक्त केली. डॉ. दाभोलकर, अॅड. पानसरे यांच्या हत्येचा निधेष व्यक्त करण्यासाठी व तपासाचा पाठपुरावा करण्यासाठी २० जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे राज्यव्यापी धरणे आंदोलन व 'सॉक्रेटिस ते दाभोलकर, पानसरे व्हाया तुकाराम' या रिंगणनाट्याचे प्रयोग करण्यात येणार आहेत.

'डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. मात्र, त्यासाठी मराठी न येणारा अधिकारी देण्यात आला. त्यामुळे कागदपत्रांचे भाषांतर करण्यात वेळ गेला. सीबीआयचे पुण्यात कार्यालय असतानाही कामकाज मुंबईतून केले जात होते. तसेच संशयाची सुई असलेल्या संस्थांच्या कार्यकर्त्यांची चौकशीही करण्यात आली नाही,' याकडे डॉ. हमीद दाभोलकर यांनी लक्ष वेधले.

सरकारला जाब विचारणार : डॉ. हमीद दाभोलकर

डॉ. नरेंद्र दाभोलकर, अॅड. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचे काय झाले? असा प्रश्न असलेली एक लाख पोस्टकार्डे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवली जाणार आहेत. 'केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. तसेच पंतप्रधान मोदी यांना भेटीसाठी वेळ देण्याबाबत दोन वेळा पत्र पाठवण्यात आले होते. मात्र, अद्याप त्यांनी काहीच प्रतिसाद दिलेला नाही,' असेही हमीद यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक लुटली सिनेस्टाइल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वाघोली येथील अशोक सहकारी बँकेत एका तरुणाने बुधवारी पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण आणि लूटमार केली. त्याने पिस्तुलाच्या मदतीने बँक मॅनेजरचे अपहरण करून शाखेतील पावणेचार लाखांची रोकड लुटली. मॅनेजरला दुचाकीवर बसवून यवतकडे पळ काढला. पेट्रोल संपल्याने दुचाकी आणि मॅनेजरला तेथेच सोडून त्याने पळ काढला.

अविनाश सातव (वय ३५, रा. डोमखेल वस्ती, वाघोली) असे लूटमार करणाऱ्या तरुणाचे नाव असल्याचे लोणीकंद पोलिसांनी सांगितले. सातव मद्यधुंद अवस्थेत असल्याचा दावा बँकेतील कर्मचाऱ्यांनी केला आहे. ग्रामीण पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात आहे. नगर रोडवर लोणीकंद येथील शिवाजी चौकात अशोक सहकारी बँक आहे. सातव हा दुपारी साडेतीनच्या सुमारास बँकेत आला होता.

सातव दुपारी साडेतीनच्या सुमारास बँकेत आला होता. पाच ​मिनिटे बसून बाहेर पडला. पुन्हा पंधरा मिनिटांनंतर बँकेत आला. पिस्तुल बाहेर काढून मॅनेजर युवराज रोकडेंच्या केबिनमध्ये घुसला. रोकडे यांना धमकावून, मारहाण करून कॅशियरच्या केबिनपर्यंत आणले. या प्रकाराने बँकेत एकच गोंधळ उडाला. ते पाहून ग्राहकांनी बँकेतून पळ काढला, तर अन्य कर्मचारीही हैराण झाले. सातवने सिनेस्टाइलने कर्मचाऱ्यांना एका बॅगेत पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार कॅशिअर दीपक वाळके आणि इतरांनी पैसे भरले आणि सातवच्या हातात दिले. सातवने रोकडेंना बँकेच्या बाहेर आणले. त्यानंतर दुचाकी काढण्यास सांगितले. त्यांच्या पाठीला पिस्तुल लावून सातव दुचाकीच्या मागे बसला. हा प्रकार भरवस्तीत सुरू होता. कोणी समोर आले तर, सातव त्यांना पिस्तुलीचा धाक दाखवत होता. त्यांना यवत येथे सोडून सातवने पळ काढला. त्यानंतर तासभराने रोकडे यांनी यवतमधून बँकेत संपर्क साधला. सोलापूर रोडवरून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनात बसून सातव पळाल्याचे रोकडे यांनी सांगितले.

पूर्वीही बँक लुटण्याचा प्रयत्न

याच शाखेत पाच वर्षांपूर्वी एका तरुणाने तलवारीच्या धाकाने बँक लुटण्याचा प्रयत्न केला होता. या वेळी कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केला, तसेच सायरन वाजवल्यान लूटमार टळली होती. त्यानंतर बँकेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. मात्र, सुरक्षारक्षकाची नेमणूक अद्याप झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बँक लॉकरमधील चोरी झाल्यास भरपाई द्यावी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये ठेवलेला ऐवज चोरीला गेल्यापोटी बँकेने ग्राहकास भरपाई द्यावी, असा आदेश राष्ट्रीय ग्राहक न्यायमंचाने नुकताच दिला आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील एका प्रकरणाबाबत हा निकाल देण्यात आला. अशा स्वरूपाचा हा पहिलाच निकाल आहे, त्यामुळे फक्त जिल्हा बँकच नव्हे, तर देशभरात लॉकर्सची सेवा पुरविणाऱ्या बँकांपुढे हा पेच उभा राहिला आहे.

या निर्णयास जिल्हा बँकेने सुप्रीम कोर्टात आव्हान दिल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, उपाध्यक्ष अर्चना घारे आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजयकुमार भोसले यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले. अशोक गरूड या ग्राहकाने याप्रकरणी राष्ट्रीय ग्राहक मंचात धाव घेतली होती. जिल्हा बँकेच्या लोणी देवकर शाखेतील लॉकर्सवर २०१३ मध्ये दरोडा पडला. त्यामध्ये गरूड यांच्या लॉकरमधील ५२ तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार नोंदविण्यात आली. दरम्यान, बँकेच्या ताब्यातील हा ऐवज चोरीला गेल्यामुळे बँकेने त्याची १५ लाख रुपये इतकी भरपाई द्यावी, अशी मागणी गरूड यांनी केली. त्याबाबत त्यांनी दागिन्यांच्या पावत्याही सादर केल्या. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रीय ग्राहक न्यायमंचाकडे दाद मागितली, तेव्हा जिल्हा बँकेने ही भरपाई द्यावी, असा आदेश मंचाने दिला. अशा प्रकारे प्रथमच भरपाईचा आदेश देण्यात आला आहे.

दरम्यान, या निकालाविरोधात बँकेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. लॉकर ही बँकेकडून पुरविण्यात येणारी सुविधा आहे, त्याचे भाडे ग्राहकांकडून घेण्यात येते. मात्र, त्या लॉकरमध्ये काय ऐवज ठेवण्यात आला आहे, याची खातरजमा करण्याची पद्धत नाही आणि त्यासंदर्भात अद्याप कोणत्याही मार्गदर्शक सूचनाही लागू करण्यात आलेल्या नाहीत. त्याउलट लॉकरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या वस्तू किंवा ऐवजाबाबत गोपनियता पाळली जाते, असे बँकेचे म्हणणे आहे. मूल्यांकन न केलेल्या ऐवजाबाबत मागणी होईल, तेवढी नुकसानभरपाई द्यावी लागणार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेळेत ‘सेवा’द्या अन्यथा दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सरकारच्या सेवा हमी कायद्यानुसार महापालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध सेवासुविधा नागरिकांना उपलब्ध होण्याचा 'वेटिंग पीरिएड' बुधवारपासून निश्चित झाला आहे. निश्चित कालावधीत सेवा पुरविण्यास असमर्थ ठरणाऱ्या अधिकाऱ्यांना पाचशे ते पाच हजार रुपयांचा दंड होऊ शकणार आहे.

राज्य सरकारने सेवा हमी कायद्यानुसार नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांसाठीचा कालावधी ठरवून दिला आहे. त्यानुसार, महापालिकेने बुधवारी संबंधित सेवा अधिसूचित केल्या. त्यामुळे, जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, नळजोड, मालमत्ता कराचा उतारा, मालमत्ता कराची थकबाकी नसल्याचा दाखला, अग्निशामक ना हरकत प्रमाणपत्र, झोन दाखला, भाग नकाशा, भोगवटा प्रमाणपत्र अशा अनेक सेवासुविधा नेमक्या किती कालावधीत नागरिकांना उपलब्ध होतील, याचे निकष ठरवून देण्यात आले आहेत. या निकषांची पूर्तता करण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात नागरिकांना तक्रार दाखल करता येणार आहे. संबंधित अधिकाऱ्याने सेवा देण्यास जाणीवपूर्वक विलंब लावला असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांकडून पाचशे ते पाच हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येणार आहे. हा दंड संबंधित अधिकाऱ्यांच्या वेतनातून वसूल केला जाणार आहे.

'नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर विहित मुदतीमध्ये त्यांना सेवा उपलब्ध करून देण्याचे बंधन अधिकाऱ्यांवर आहे. त्यात, अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात दाद मागण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चिती केली गेली आहे', अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी दिली. 'ठरावीक मुदतीत सेवा न मिळाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नागरिकांना ३० दिवसांत तक्रार दाखल करता येणार आहे. तसेच, संबंधित तक्रारीवर निर्णय घेण्यासाठी अधिकाऱ्यांनाही ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. आवश्यक मुदतीमध्ये सेवा देण्यात वारंवार टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर पालिकेच्या सेवा नियमावलीनुसार वेतनवाढ रोखणे, निलंबन अशा स्वरूपाची कारवाई होऊ शकते', असा इशारा उपायुक्त मंगेश जोशी यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात धरणांत २६ टक्के साठा

$
0
0

पुणेः पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे राज्यातील धरणांचा पाणीसाठाही खालावत चालला असून ही स्थिती कायम राहिल्यास पाण्याचे संकट आणखी गहिरे होणार आहे. राज्यातील प्रमुख धरणांमध्ये सद्यस्थितीत २७९ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे २६ टक्के पाणीसाठा आहे.

गतवर्षी याच काळात राज्यातील धरणांमध्ये २३८ टीएमसी म्हणजे केवळ १८ पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाण्याच्या साठ्याची स्थिती चांगली असली तरी पावसाने आणखी ओढ दिल्यास धरणांच्या पाणीसाठ्यावर परिणाम होणार आहे. यंदा जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात मानसूनचे आगमन झाले. या काळात झालेल्या पावसाने धरणांचे पाणीसाठे वाढले. पण, त्यानंतर पावसाने दडी मारली आहे. गतवर्षीही पावसाची अशीच स्थिती होती. परंतु १५ जुलैनंतर पावसाने पुनरागमन झाल्यावर धरणसाठे वाढले होते. यंदा अजूनही पाऊस नसल्याने चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.

राज्यातील अडीच हजार मोठ्या, मध्यम व लघु धरण प्रकल्पांची प्रकल्पीय साठवण क्षमता १,३२६ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढी आहे. या धरणांमध्ये सद्यस्थितीत २७९ टीएमसी पाणी साठले आहे. मराठवाड्यांतील धरणांत फक्त सहा टक्के (१६ टीएमसी) पाणी आहे. पुणे विभागातील धरणांत ३० टक्के म्हणजे १०९ टीएमसी पाणीसाठा आहे. अमरावती विभागात ३२ टक्के (३२ टीएमसी), नाशिक विभागातील धरणांत २० टक्के (३४ टीएमसी), नागपूर विभागात २८ टक्के (४० टीएमसी) व कोकण प्रदेशातील धरणांत ५० टक्के म्हणजे २९ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुण्यातील धरणांत सात टीएमसी पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत सद्यस्थितीत ७.०५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. गतवर्षी याच काळात खडकवासला प्रकल्पात फक्त १.२९ टीएमसी पाणीसाठा झाला होता. त्या तुलनेत यंदा पाणीसाठ्याची स्थिती चांगली आहे.

पावसाच्या लहरीपणाचा फटका गतवर्षी पुणे शहराला बसला होता. पावसाने दडी मारल्यामुळे धरणांत अत्यल्प पाणीसाठा होता. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर पाणीकपात करण्यात आली होती. शहरातील काही भागांत तर दिवसाआड पाणी देण्याची वेळ आली होती. मात्र, १५ जुलैनंतर पावसाचे आगमन झाले. धरणांतील पाणीसाठा वाढला आणि शहराची पाणीकपात रद्द झाली.

यंदा मात्र काहीशी निराळी परिस्थिती आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे पाणीसाठा वाढला. हा साठा ७.३० टीएमसीवर पोहोचला होता. त्यानंतर मात्र पावसाने दीर्घ सुट्टी घेतली आहे. जूनमध्ये पडलेल्या पावसामुळे ओढे व नाल्यांमधून धरणाचे पाणी वाहत होते. या पावसामुळे शहराला दररोज लागणारे (१,२५० एमएलडी) पाणी धरणांत वाहून येत होते. परंतु आता हा ओघही आटला आहे. त्यामुळे धरणात साठलेले पाणी पुणे शहराला देण्यात येत आहे. हा पाणीवापर वाढल्याने धरणांत सद्यस्थितीत ७.०५ टीएमसी एवढा पाणीसाठा राहिला आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास हा साठा वापरण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. पावसाची ही ओढ कायम राहिल्यास धरणांतील पाणीसाठा काटकसरीने वापराला लागणार आहे. शहर व ग्रामीण भागाची पाण्याची गरज भागविण्यासाठी शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. पाटबंधारे खाते व महापालिकेदरम्यान याविषयावर सध्या चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराला पाण्याची सध्या अडचण नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाने सध्या दडी मारली असली तरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सात टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याने सध्या तरी शहराला पिण्याच्या पाण्याची कोणतीही अडचण नसल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी जुलैअखेरपर्यंत पावसाची वाट पाहून त्यानंतर महापौर, महापालिका आयुक्त आणि जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

जून महिन्यात सुरू झालेल्या पावसामुळे यंदा शहराला पाण्याची टंचाई भासणार नाही, असे चित्र निर्माण झाले होते; मात्र गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने मारलेल्या दडीमुळे धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास पुणेकरांना पुढील काही दिवसांतच पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, टेमघर, वरसगाव, पानशेत या धरणांच्या क्षेत्रांतही पाऊस पडत नसल्याने धरणांतील एकूण पाणीसाठा सात 'टीएमसी'वर आला आहे. धरणात सध्या सात टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यातील ४ टीएमसी पाणी शेतीला सोडले तरी शहरासाठी तीन टीएमसी पाणी शिल्लक आहे. प्रत्येक महिन्याला शहराला दीड टीएमसी पाण्याची आवश्यकता असल्याने पुढील दोन महिने हा उपलब्ध आहे, त्यामुळे सध्या शहराला पिण्याच्या पाण्याची कोणतीही अडचण नसल्याने महापौर दत्तात्रय धनकवडे, आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले. गेल्या वर्षी याच काळात धरणात केवळ १.१ टीएमसी पाणी शिल्लक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही वर्षांमध्ये पडत असलेल्या पावसाचा अंदाज पाहता १५ जुलै ते १५ ऑगस्ट या महिन्याच्या काळात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होऊन पाणीपुरवठा करणारी धरणे शंभर टक्के भरतात. यंदाही चांगला पाऊस पडून धरणे शंभर टक्के भरतील, असा अंदाज जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याने सध्या शहराला केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये कोणतीही कपात केली जाणार नसल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

धरणात सध्या पुरेसा पाणीसाठा असल्याने पाणीकपात केली जाणार नाही. जुलैअखेरपर्यंत पावसाचा अंदाज घेऊन त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.

- दत्तात्रय धनकवडे, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संप मागे न घेतल्यास कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीच्या निषेधार्थ गेल्या ३४ दिवसांपासून संपावर असलेल्या तेथील विद्यार्थ्यांना संचालक डी. जे. नारायण यांनी बुधवारी लेखी नोटीस दिली. संप तत्काळ मागे न घेतल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

एफटीआयआयचे विद्यार्थी गेल्या १२ जूनपासून संपावर असून, त्यामुळे तेथील शैक्षणिक कामकाज ठप्प झाले आहे. चौहान यांची नियुक्ती मागे घेण्याबरोबरच नियामक मंडळाची फेररचना रद्द करण्याचीही विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्याबाबत माहिती व प्रसारण मंत्रालयाशी विद्यार्थ्यांची दिल्लीत चर्चाही झाली होती. मात्र, त्यातून तोडगा न निघाल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवले आहे. संप लांबत असल्याचे पाहून संचालक नारायण यांनी स्वतःच्या अधिकारात विद्यार्थ्यांना संप मागे घेण्याबाबत लेखी नोटीस दिली आहे. 'गेला महिनाभर शैक्षणिक कामकाज होत नसल्याने संस्थेच्या इतर कामकाजावरही परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांनी संप मागे न घेतल्यास होणाऱ्या कारवाईला तेच जबाबदार असतील,' असे नारायण यांनी सांगितले. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सांगण्यावरून ही नोटीस दिलेली नसून, संस्थेचा संचालक म्हणून असलेल्या अधिकारातच ही नोटीस दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संचालकांकडून अशी नोटीस मिळणे अनपेक्षित असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. मात्र, संप मागे घेण्याबाबत चर्चा करूनच निर्णय घेण्यात येणार असल्याचेही नमूद करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्त जागांचा आकडा फुगला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीअखेर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कॉलेजांतील सुमारे ७२ हजार जागांपैकी तब्बल २२ हजार जागा रिक्त राहिल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. ऑफलाइन प्रवेशांच्या माध्यमातून मागील दाराने गेल्या वर्षीपर्यंत किती प्रवेश केले जात होते आणि कट-ऑफ टक्केवारीत कशी घट केली जात होती, हे यातून स्पष्ट होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

अकरावीच्या तिसऱ्या फेरीतील प्रवेशांचा टप्पा नुकताच संपला. त्यानंतरही प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी चौथी ऑनलाइन फेरी राबविण्यात येणार आहे. अशा सर्वच विद्यार्थ्यांसाठी या जागांवर गुणवत्तेनुसार प्रवेश दिले जाणार असल्याचे अकरावीच्या केंद्रीय प्रवेश समितीकडून बुधवारी स्पष्ट करण्यात आले. या विद्यार्थ्यांसाठी गुरुवारी नव्याने कॉलेजांचे पर्याय नोंदविण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे यापूर्वी बेटरमेंट मिळालेल्या; तसेच तिसऱ्या फेरीतून पहिल्यांदाच प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही पुन्हा एकदा बेटरमेंटची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. येत्या २२ जुलै रोजी चौथ्या फेरीचे प्रवेश जाहीर केले जाणार आहेत.

गेल्या वर्षीपर्यंत हे रिक्त जागांवरील प्रवेश ऑफलाइन स्वरूपात कॉलेज स्तरावरून भरले जात होते. त्यामध्ये मागील दाराने कट-ऑफ टक्केवारी डावलून प्रवेश देण्याचे प्रमाण अधिक होते. यंदा संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्याच्या निर्णयामुळे ही दुकानदारी पूर्णपणे थांबली आहे. यंदा शेवटपर्यंत ऑनलाइन प्रवेश देणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले आहे. त्याची अंमलबजावणी केंद्रीय प्रवेश समितीला करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘साठीनंतरचे सहजीवन’; कार्यशाळेचे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे स्त्री अभ्यास केंद्रातर्फे' साठीनंतरचे सहजीवन' या विषयावर आठ ऑगस्ट रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. बाया कर्वे स्त्री अभ्यास केंद्र येथे दुपारी एक ते साडेपाच या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे.

साठीला पोहोचलेल्या प्रौढ पती-पत्नींमध्येही वादविवादाचे प्रमाण वाढल्यामुळे अनेकजण कौन्सिलिंगसाठी येतात. तर काहीजण घटस्फोट मिळावा म्हणून, कोर्टात जावू लागले आहेत. साठीनंतरचे सहजीवन आनंददायी कसे करता येईल हे लक्षात घेऊन ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती बाया कर्वे स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालिका मृणालिनी चितळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यशाळेत मृणालिनी चितळे, समुपदेशक स्मिता जोशी, डॉ. सागर पाठक मार्गदर्शन करणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क - ९३७१६७५४४४/ ९९७५५०८९५२.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images