Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शिक्षकेतरांना फटका?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्याचे शिक्षण आयुक्त आणि शिक्षण संचालकांमध्ये समन्वय नसल्याचा फटका राज्यातील ८० हजारांवर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. शिक्षकेतरांशी निगडीत नव्या 'स्टाफिंग पॅटर्न'साठी नेमलेल्या समितीचा अहवाल अद्याप राज्य सरकारकडे न पोहोचल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. नव्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांसोबतच कर्मचाऱ्यांच्या पदांना मान्यता मिळण्याचा मुद्दाही त्यामुळे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

राज्यात शिक्षणहक्क कायद्याच्या अंमलबजावणीनंतरच्या टप्प्यात कायद्याला अनुसरून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांचा विचार पुढे आला. मात्र, त्यामुळे शिक्षकेतरांची हजारो पदे एकदम कमी होण्याची भीती निर्माण झाली होती. त्याला विरोध करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन या प्रश्नी तोडग्यासाठी प्रयत्न केला. त्यातूनच शिक्षकेतरांची संख्या आणि त्यांच्या पदांशी संबंधित विविध मुद्द्यांवर विचार करण्यासाठी राज्य सरकारने १२ फेब्रुवारी २०१५ रोजी समिती नेमली. मात्र, या समितीच्या अहवालाबाबतही हेळसांड सुरू झाल्याने, शिक्षकेतरांना कधी न्याय मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या समितीला सुरुवातीला दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र आयुक्तांना आपल्याला या समितीचेही अध्यक्षपद भूषवायचे आहे, याची कल्पनाच नव्हती. समितीचे सदस्य सचिव असलेल्या राज्याच्या तत्कालीन माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण संचालकांनीही त्याकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे समितीची एकही बैठक न झाल्याने, अखेर समितीला एक महिन्याची मुदतवाढ मिळाली. त्यानंतर समितीच्या तीन बैठकांमध्ये अहवालाचे काम पूर्ण झाले. हा अहवाल अंतिम करून, सदस्यांच्या सह्या घेऊन तो आता राज्य सरकारकडे सादर करणे गरजेचे आहे. मात्र, या टप्प्यावर हे काम थांबल्याने राज्यभरातील शिक्षकेतर कर्मचारी अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती या समितीच्या सदस्य सूत्रांनी 'मटा'ला दिली.

या समितीमध्ये दोन शिक्षक आमदारांसह मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. शिक्षकेतरांच्या प्रश्नावर उपाय शोधण्यासाठी यापूर्वी सहा वेळा सरकारी आदेश निघाले आणि ते रद्द झाले होते. यंदा पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने त्या विषयी काम झाले. मात्र, आता त्यासाठी नेमलेल्या समितीच्या अहवालावर अंतिम टप्प्यातील कार्यवाहीच न झाल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्ही अद्याप सरकारकडून न्याय मिळण्याची वाट पाहात आहोत.

- शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘MIM कडून दंगलींना धार्मिक रंग’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आपला राजकीय प्रभाव निर्माण करण्यासाठीच 'एमआयएम'ने धार्मिक तेढ निर्माण करण्याचा कट केला आहे. पर्वती दर्शन भागातील कायदा-सुव्यवस्था बिघडविण्यात आली असून, स्थानिक दंगलींना धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी केला.

'पर्वती दर्शन येथे विविध धर्मांचे लोक अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहातात. सर्व समाजात सलोख्याचे वातावरण आहे. एमआयएमने मोजक्या युवकांना हाताशी धरून येथे शाखा स्थापन करण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने बाहेरून जमाव आणून येथे दहशत निर्माण केली,' असा आरोप मिसाळ यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात तलवारीसारख्या शस्त्रांची जमवाजमव करण्यात येत आहे. तलवारींचा वापर करून अत्याचार करण्यात आला आहे. महिलांचा विनयभंग केला. येथील महिला तक्रारी देण्यास तयार आहेत. पोलिसांनी त्या नोंदवून घ्याव्यात. दोन्ही समाजाच्या नागरिकांनी वेठीस न धरता 'एमआयएम'च्या समाजकंटकांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्र बँकेविरोधात आरबीआयकडे तक्रार

$
0
0

पुणेः वार्षिक लेखापरीक्षण अहवालाबरोबरच ग्राहकांच्या तक्रारींची माहिती न दिल्याबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी बँक ऑफ महाराष्ट्र विरोधात रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांकडे तक्रार केली आहे. सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी आपल्या लेखापरीक्षण अहवालाबरोबरच ग्राहकांच्या तक्रारींबाबतचाही वार्षिक अहवाल प्रसिद्ध करावा, असे निर्देश रिझर्व्ह बँकेने सर्व राष्ट्रीयीकृत बँकांना दिले आहेत. मात्र, बँकेच्या वेबसाइटवर अजूनही २०१३-१४ या आर्थिक वर्षातील ग्राहकांच्या तक्रारींचीच माहिती दिसून येत आहे.

प्रत्यक्षात बँकेने आपले २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. त्याचबरोबर बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभाही २९ जून रोजी पार पडली. ही बाब रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांच्या आणि ग्राहक हिताच्याही विरोधात आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने याची गंभीर दखल घ्यावी, आणि बँकेला २०१४-१५ मधील ग्राहकांच्या तक्रारींची माहिती बँकेच्या वेबसाइटवर टाकण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी वेलणकर यांनी या पत्रात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनसाखळीचोरांचा शहरात उच्छाद सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील साखळीचोरांचा उच्छाद सुरूच आहे. सोमवारी शहराच्या विविध भागांत साखळीचोरीच्या सहा गुन्ह्यांची नोंद झाली. त्यामुळे शहरातील महिलावर्ग धास्तावला असून, विविध उपाययोजना केल्यानंतरही साखळीचोर सापडत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहरात सोमवारी बंडगार्डन, विश्रांतवाडी, कोरेगाव पार्क, कोथरूड, आंबिल ओढा आणि सहकारनगर या ठिकाणी साखळीचोरीचे गुन्हे घडले. यातील सर्वच प्रकरणांत मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात दुचाकीस्वारांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अथवा सोनसाखळी चोरून नेली आहे. रास्ता पेठेतील एक

७० वर्षांची महिला सकाळी सहा वाजता फिरण्यासाठी जात असताना एका दुचाकीस्वाराने त्यांचे ९० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरले. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूडमध्ये सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास मंगळसूत्र चोरीची घटना घडली. माधवी श्रीपाद दुद्दीकर (गणंजय सोसायटी, कोथरूड) या ज्येष्ठ नागरिक महिलेच्या गळ्यातील ७६ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने चोरून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

आंबिल ओढ्याजवळील ना. सी. फडके चौकाजवळून पतीसह पायी जात असलेल्या वसुधा विलास कुलकर्णी (वय ५५) यांचेही मंगळसूत्र चोराने लांबवले. मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी कुलकर्णी यांना धक्का दिला. मागे बसलेल्या व्यक्तीने त्यांचे २५ ग्रॅम वजनाचे ५० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून नेले. विश्रांतवाडी येथील आर. के. पुरममध्ये राहणाऱ्या पूनम श्रीराम यादव (वय ५५) यांच्या गळ्यातील २४ हजार रुपयांचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्याने अनुभवले अघोषित लोडशेडिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विजेची मागणी आणि पुरवठ्यात अचानक मोठी तफावत निर्माण झाल्यामुळे राज्याच्या सर्व भागांत सोमवारी लोडशेडिंगची वेळ आली. पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरातही ४० मिनिटांचे लोडशेडिंग करण्यात आले.

पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यात अनेक भागांत पेरण्या अडचणीत आल्या आहेत. पाऊस नसल्याने शेतीसाठी शेतीपंपांचा वीजवापर वाढला आहे. तसेच, हवामानात उष्णता असल्यामुळे पंखे आणि एसीसाठी विजेचा वापर वाढला आहे. या दोन्ही कारणांमुळे गेल्या पंधरा दिवसांतच विजेच्या मागणीत तीन ते साडेतीन हजार मेगावॉटने वाढ झाली. विजेची मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत निर्माण झाल्यामुळे राज्यातील सर्वच गटांमध्ये अघोषित लोडशेडिंग करावे लागले. त्यामध्ये पुणे शहर व पिंपरी-चिंचवड मधील अ गटातील सव्वाचारशे पैकी १६२ वीजवाहिन्यांवर दुपारी पावणेतीन ते साडेतीन या वेळात, तर ब गटातील दहा वाहिन्यांपैकी चार वाहिन्यांवर दोन ते साडेचार असे अडीच तासांचे लोडशेडिंग करण्यात आले.

तिरोडा येथील अदानी पॉवर्स आणि अमरावती येथील रतन इंडियाच्या प्रकल्पातूनही अपेक्षित वीज उपलब्ध झाली नाही. केंद्रीय वीज प्रकल्पांमधून अतिरिक्त वीज घेण्यात आली, परंतु, फ्रिक्वेन्सीत तफावत असल्याने लोडशेडिंग करण्याची वेळ आली.

दुपारी महावितरणने इंडियन पॉवर एक्स्चेंजमधून एक हजार ते बाराशे मेगावॉट वीज घेतली, तसेच कोयना प्रकल्पातील अडीचशे मेगावॉटचा संच सुरू झाल्याने काही प्रमाणात वीज उपलब्ध झाली आणि सायंकाळनंतर लोडशेडिंग थांबविण्यात आल्याचे 'महावितरण'ने कळविले आहे.

विजेची मागणी १६ हजार मेगावॉटवर

गेल्या काही दिवसांत राज्यातील विजेची मागणी साडेतेरा ते चौदा हजार मेगावॉट इतकी होती. पण, पावसाअभावी शेतीपंपांचा वापर वाढल्यामुळे ही मागणी सोळा ते साडेसोळा हजार मेगावॉटवर पोहोचली आहे. तसेच, परळी येथील महानिर्मितीच्या वीजप्रकल्पातील सर्वच संच पाण्याअभावी बंद आहेत. महानिर्मितीकडून साडेपाच हजार मेगावॉट इतकी वीज अपेक्षित असताना त्यापैकी केवळ पावणेचार हजार मेगावॉट इतकीच वीज उपलब्ध झाली. तसेच, पवनउर्जेद्वारे एक हजार ८०० ते २ हजार २०० मेगावॉट वीज अपेक्षित असताना, केवळ एक हजार मेगावॉट इतकी वीज उपलब्ध झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुप्रीम कोर्टाचाही पालिकेला कौल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंढवा जॅकवेल प्रकरणात हायकोर्टाने पालिकेच्या बाजूने निकाल दिल्यानंतरही सुप्रीम कोर्टात प्रकल्पाला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या संदीप तुपे याची याचिका कोर्टाने सोमवारी फेटाळली. त्यामुळे, मुंढवा जॅकवेल प्रकल्पातील शेवटचा अडसर दूर झाला आहे.

मुठा नदीतील पाणी शुद्ध करून ते ग्रामीण भागांतील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेने मुंढवा जॅकवेलचा प्रकल्प हाती घेतला. त्यासाठी, मुंढव्याहून साडेसतरानळी येथील बेबी कॅनॉलपर्यंत पाइपलाइन टाकण्यात येणार होती. या प्रकल्पाचे अखेरच्या टप्प्यातील काम बाकी असताना, शेतातून पाइपलाइन टाकण्यास विरोध करत संदीप तुपे याने कोर्टात धाव घेतली. कोर्टकचेरीच्या वादात प्रकल्पाचे काम काहीसे रेंगाळले. मात्र, जिल्हा कोर्ट आणि हायकोर्टाने पालिकेच्या बाजूने निकाल देत, प्रकल्पाच्या कामास स्थगिती देण्यास नकार दिला.

मुंबई हायकोर्टाने तर प्रकल्प नागरी हिताचा असल्याचे मान्य केले होते. तरीही, हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात तुपे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. सोमवारी न्या. पी. सी. घोष आणि आदर्शकुमार गोयल यांच्या खंडपीठाने हायकोर्टाने व्यक्त केलेल्या मताशी सहमती दर्शवत, पालिकेच्या बाजूनेच कौल दिला.

'सार्वजनिक हिताचा हा प्रकल्प असल्याने त्याला स्थगिती देता येणार नाही, असे निरीक्षण कोर्टाने नोंदविले आणि तुपे यांची याचिका फेटाळून लावली', अशी माहिती विधी सल्लागार अॅड. मंजूषा इधाटे यांनी दिली. पालिकेच्या वतीने अॅड. अरविंद आव्हाड यांनी बाजू मांडली.

दरम्यान, गेल्या महिन्यात हायकोर्टाने स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर पालिकेने तातडीने या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी उर्वरित कामांना वेग दिला होता. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्याने या प्रकल्पाचे काय होणार, अशी भीती निर्माण झाली होती; पण सुप्रीम कोर्टाने पालिकेच्या बाजूनेच निकाल दिल्याने आता प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण करण्यात कोणताही अडसर राहणार नाही.

नुकसान भरपाई वसूल करणार

जिल्हा कोर्टाने पालिकेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर हायकोर्टात अपील करण्यापूर्वी प्रकल्पाला विलंब झाल्यास त्याचा सर्व खर्च भरून देण्याची हमी तुपे यांनी कोर्टाला दिली होती. त्यामुळे, आता जिल्हा कोर्टाचा निकाल लागल्यापासून ते सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळण्यापर्यंतची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी कोर्टात अर्ज करण्यात येणार आहे, असे विधी विभागप्रमुख अॅड. रवींद्र थोरात यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वॉर्डांची संख्या वाढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या दोन वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुका 'एक वॉर्ड एक सदस्य' अशा पद्धतीने होणार असून यासाठी महापालिकेने निवडणुकीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. मतदार याद्या, दुबार मतदारांची यादी, वॉर्डाची रचना अशी कामे या कक्षाकडून केली जाणार आहेत. वॉर्ड पद्धतीने निवडणूक होणार असल्याने शहरातील सध्याची लोकसंख्या आणि शहरात नव्याने समाविष्ट होणाऱ्या ३४ गावांमुळे वॉर्डाची संख्या वाढणार आहे. यामुळे सभासदांची संख्येतही वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यातील प्रमुख महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यांच्या निवडणुका डिसेंबर २०१६ ते मार्च २०१७ या दरम्यान होणार आहे. पुण्यासह मुंबई, नाशिक, ठाणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड या प्रमुख पालिकांसह एकूण दहा महानगरपालिकांचा यामध्ये समावेश आहे. या निवडणुकांबाबत माहिती देण्यासाठी राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी‌ नुकतीच महापालिका आयुक्तांची बैठक घेतली. या बैठकीला महापालिका आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते. या बैठकीत 'एक वॉर्ड, एक सदस्य' या पद्धतीने आगामी निवडणूक होणार असल्याचे संकेत निवडणूक आयुक्तांनी दिले.

दोन वर्षांनी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेला स्वतंत्र निवडणूक कक्ष तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अतिरिक्त महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली या कक्षाचे कामकाज चालणार असून पाच ते सहा कर्मचाऱ्यांचा यात समावेश असणार आहे. वॉर्ड रचनेनुसार मतदारयादी तयार करणे, वॉर्डाची रचना, दुबार मतदार मोहीम, वॉर्डाची आरक्षणे अश‌ी कामे या कक्षाकडून केली जाणार आहेत. निवडणुकीच्या आधी सहा महिने ही सर्व कामे पूर्ण करावीत, अशा सूचना आयोगाने पालिकेला दिल्या असल्याचे आयुक्त कुमार यांनी सांगितले.

पंचवीस लोकसंख्येमागे एक वॉर्ड

दोन वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीसाठी नक्की कोणत्या मतदार याद्या ग्राह्य धरायच्या याबाबत प्रश्न निर्माण झाला असून त्याबाबत राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागविले जाणार आहे. पालिका हद्दीत नव्याने ३४ गावांचा समावेश होण्याची शक्यता असल्याने वॉर्डाची तसेच नगरसेवकांची संख्याही वाढणार आहे. पंचवीस हजार लोकसंख्येमागे एक वॉर्ड अशी रचना असणार आहे. यामुळे आरक्षणांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बुलेटराजां’च्या ‘फटाक्यां’ना चाप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दुचाकीच्या मूळ सायलेन्सरमध्ये बदल करून 'इंदोरी फटाक्या'चा धडकी भरविणारा आवाज काढणाऱ्या 'बुलेटराजां'ची मुजोरी आता रोखण्यात येणार आहे. आवाजी प्रदूषणाच्या निकषांचे उल्लंघन करणाऱ्या या 'बुलेटराजां'वर आजपासून कारवाईची 'बुलेट' सोडण्यात येणार आहे.

तरुणाईमध्ये बुलेटची क्रेझ वाढल्याचे चित्र असून, फटफट आवाज करीत एकमेकांच्या वेगाशी स्पर्धा करणारे अनेक बुलेटचालक शहरभर धुमाकूळ घालत आहेत. बुलेटमधून अचानक 'फट्ट' असा फटाक्यासारखा मोठा आवाज होतो. सायलेन्सरमध्ये बदल करत हा आवाज काढण्यात येतो. सायलेन्सरमधील हा बदल 'इंदोरी फटाका' या नावाने प्रसिद्ध आहे. बुलेटची दुरुस्ती करणारे फिटर हा बदल करून देतात. मात्र, त्यामुळे इतर वाहनचालकांची भीतीने त्रेधा उडते.

बुलेटच्या सायलेन्सरमध्ये करण्यात येणारा हा बदल पूर्णतः बेकायदा आहे. त्यापेक्षाही रस्त्यावर वाहतूक सुरू असताना अचानक सायलेन्सरमधून 'फट्ट' असा मोठा आवाज होत असल्याने रस्त्यावरील इतर वाहनचालक दचकतात. अशा वेळेस अपघात होण्याची शक्यता आहे. या आवाजाने इतरांना त्रास होतो, याची कुठलीही तमा न बाळगता हे बुलेटराजा आपल्या 'शान'मध्ये मिरवत आहेत.

बुलेटच्या एका विशिष्ट मॉडेलच्या सायलेन्सरमध्ये हा बदल करणे सहज शक्य आहे. दिवसेंदिवस इंदोरी फटाक्यांचा आवाज काढण्याची क्रेझ वाढत आहे. रस्त्यांवर वेडीवाकडी दुचाकी चालवत इतरांना त्रास देत असतानाच आता या 'इंदोरी फटाक्या'च्या प्रदूषणाचीही भर पडत आहे. बटन स्टार्ट दुचाकींमध्येही अशा प्रकारचा आवाज काढण्याचे प्रकार घडतात. मात्र, बुलेट वगळता इतर दुचाकींच्या इंजिनची क्षमती कमी असल्याने या आवाजाची तीव्रता जाणवत नाही.

आवाजाची माहिती मागविणार

'वाहतूक पोलिसांना गेल्या काही दिवसांमध्ये बुलेटराजाच्या आवाजाबद्दल तक्रारी येत आहेत. बुलेट; तसेच इतर दुचाकी बनवणाऱ्या कंपन्यांकडून या आवाजाबाबतची माहिती मागवणार आहोत. त्याचबरोबर या प्रकाराचा आवाज करणाऱ्या दुचाकी आढळल्यास त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करणार आहोत,' अशी माहिती वाहतूक उपायुक्त सारंग आवाड यांनी 'मटा'ला दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुबार पेरणीचे संकट गहिरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

खरिपाचा हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटून गेल्यानंतरही फक्त ६८ टक्के क्षेत्रावरच पेरण्या होऊ शकल्या आहेत. राज्यात सरासरीच्या ७१ टक्केच पाऊस झाल्याने आणि अजूनही पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

उसाचे क्षेत्र वगळता राज्यातील खरिप हंगामातील पिकांचे क्षेत्र १३५ लाख हेक्टर आहे. त्यामध्ये ज्वारी, बाजरी, मका, तूर, उडीद, मूग, सोयाबीन आणि कापूस ही खरिपातील मुख्य पिके आहेत. 'सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसामुळे उत्साहात पेरण्या झाल्या. मात्र, आता पावसाअभावी पिके सुकू लागली असून, वाऱ्यामुळे जमिनीतली ओलही नाहीशी होत आहे. सुमारे ३२ टक्के क्षेत्रावर पेरण्या आणि भाताची फेरलागवड खोळंबली आहे,' अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

तुरळक अपवाद वगळता राज्यात तीन आठवड्यांपासून पाऊस नाही. एक जूनपासून राज्यात २४२ मिलिमीटर पाऊस झाला. या काळातील सरासरी ३४० मिलिमीटर आहे. त्यामुळे सरासरीच्या ७१ टक्के इतकाच पाऊस राज्यात झाला आहे.

मराठवाडा, विदर्भ चिंताजनक

मराठवाडा, पश्चिम विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये स्थिती फारच चिंताजनक आहे. पावसाने ओढ दिल्यास नगदी पिके पाणी देऊन जगविली जातात. मात्र, धरणांच्या पाणीसाठ्याने तळ गाठला असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. त्यामुळे पेरलेल्या पिकांना सिंचन करणे अशक्य गोष्ट ठरत आहे.

पावसाची जिल्हानिहाय सरासरी

२५ ते ५० टक्केः नाशिक, सोलापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी

५० ते ७५ ः ठाणे, सिंधुदुर्ग, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, जालना, नांदेड, हिंगोली, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, गोंदिया

७५ ते १०० ः पुणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, धुळे, औरंगाबाद, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, चंद्रपूर.

१०० टक्क्यांपेक्षा अधिक ः सातारा, सांगली, नागपूर, गडचिरोली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुकोबांची पालखी आज उंडवडी मुक्कामी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दौंड

पंढरपूरच्या दिशेने निघालेली संत तुकाराम महाराजांची पालखी वरवंडच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात विसावली. गावकऱ्यांनी तुकोबारायांची पालखी घेऊन रिवाजाप्रमाणे यवत गावाला प्रदक्षिणा घातली आणि सकाळी आठ वाजता पालखी वरवंडच्या दिशेने निघाली.

साडेदहाच्या सुमारास पालखी भांडगाव येथे आली. ग्रामस्थांच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात. तेथील विठ्ठल-रखुमाईच्या मंदिरात पादुकांचे पूजन करण्यात आले. येथील ग्रामस्थांनी वारकऱ्यांच्या दुपारच्या भोजनासाठी लापशी व पिठले-भाकरीची सोय केली. भांडगाव, केडगाव, वाखारी, बोरीपार्धी गावांच्या हद्दीतून पालखी साडेतीनच्या सुमारास आली. वाटेतील गावांचे पदाधिकारी व मानकऱ्यांनी पालखीचे स्वागत केले. चौफुला येथे पंचक्रोशीतील भाविकांच्या दर्शनासाठी पालखी अर्धा तास थांबली. त्यानंतर पालखी वरवंडच्या दिशेने रवाना झाली. तुकोबांची पालखी आज, बुधवारी दिवसभर प्रवास करून उंडवडी (गवळ्याची) येथे मुक्काम करील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडोबाच्या भेटीसी आले माउली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सासवड

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीनगरीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीने सायंकाळी पाच वाजता प्रवेश केला. लाडक्या खंडेरायाचा किल्ला पाहून वारकऱ्यांच्या आनंदाला उधाण आले.

टाळ-मृदंगाच्या तालावर वारकरी आनंदाने नाचू लागले. संत एकनाथांची भारूडे, पदे अभंग गाऊ लागले. तसेच खंडोबाची पारंपरिक गीतेही म्हणत होते. जेजुरीच्या नगराध्यक्षा ज्ञानेश्वरी बारभाई, उपनगराध्यक्ष संपत जगताप, मुख्याधिकारी समीर भूमकर, माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, खंडोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे, विश्वस्त अॅड. किशोर म्हस्के, सुधीर गोडसे, अॅड.वसंत नाझिरकर, अॅड. दशरथ घोरपडे, संदीप घोणे आदींनी पालखीचे स्वागत केले.

ज्ञानेश्वर माउलींचे धाकटे बंधू सोपानकाकांच्या सासवड नगरीतून सकाळी पालखीने जेजुरीकडे प्रस्थान ठेवले. वाटेत बोरावके मळ्यात सकाळची न्याहरी व यमाईशिवरी येथे भोजन उरकून पालखीने सायंकाळी जेजुरीनगरीत प्रवेश केला.

सायंकाळी साडेसहा वाजता पालखी कोळविहिरे रस्त्यावरील नवीन पालखीतळावर पोहोचली. सासवड ते जेजुरी हा १७ किलोमीटरचा टप्पा पार करून वारकरी बांधव जेजुरीत आले. खंडोबाच्या दर्शनाने त्यांचा थकवा कुठल्याकुठे निघून गेला. भगव्या पताकांनी गडाचा सारा परिसर फुलून गेला. सासवड-जेजुरी रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे बराचसा रस्ता मोठा झाला आहे. त्यामुळे वारकऱ्यांना चालणे सोपे झाले. गावामध्ये विविध संस्था, मंडळांच्या वतीने वारकरी बांधवांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीबरोबर आलेल्या हजारो वारकरी बांधवांनी खंडोबा गडावर देवाचे दर्शन घेतले. पाय दुखत असले, तरी त्याची पर्वा न करता वारकरी चारशे पायऱ्यांचा गड चढून आले. वारकरी बांधवांना झटपट दर्शन मिळावे, यासाठी खंडोबा देवस्थानाने विशेष व्यवस्था केली होती. साडेसहा वाजता समाज आरती होऊन पालखी सोहळा विसावला. ज्ञानोबांची पालखी आज, बुधवारी दिवसभर प्रवास करून वाल्हे येथे मुक्काम करील.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पिपरी पालिकेवर भगवाच’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

मोदी लाट असतानाही शिवसेना महाराष्ट्रात सर्वाधिक मते मिळवणारा दुसरा पक्ष आहे. स्वतंत्र मंत्रिमंडळ आणण्याची शिवसेनेची धमक आहे. मात्र, महाराष्ट्राची गरज म्हणून आम्ही नाइलाजाने सत्तेत आहोत, तसेच आगामी २०१७ च्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भगवा फडकवणार, असे मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.

चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सोमवारी (१३ जुलै) शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शहरातील ५१ ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे चिंतामणी मनोहर, जयंत जाधव, भानुदास हिवराळे व कैलास पुरी यांना 'शिवगौरव माध्यम' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्या वेळी सुधीर गाडगीळ यांनी 'शिवसेना काल, आज आणि उद्या' या विषयावर घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

या वेळी शिवसेना संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे, खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना शहरप्रमुख राहुल कलाटे, महापालिका गटनेत्या सुलभा उबाळे, सल्लागार भगवान वाल्हेकर, मधुकर बाबर, जिल्हाप्रमुख बाबा धुमाळ आदी उपस्थित होते.

'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला जागे केले. त्यामुळेच आजही गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवसेनेचा दरारा आणि दहशत कायम आहे. मराठी माणसांकडे बघण्याची 'दिल्लीश्वरां'ची नजर बदलण्याचे काम बाळासाहेबांनी केले. महाराष्ट्रात पंढरपूरचा विठोबा आणि मातोश्रीवरील बाळासाहेब ही दोनच शक्तिपीठे आहेत,' असेही ते म्हणाले.

'सामना'तील अग्रलेखाच्या माध्यमातून बाळासाहेबांनी शिवसैनिकांशी, मराठी माणसांशी संवाद साधला. सामनातील अग्रलेखातील कोणताही शब्द बाळासाहेबांनी नाकारला नाही. आजही ती परंपरा कायम आहे. 'सामना' जगातील एकमेव भाषिक वृत्तपत्र आहे की ज्याची दखल महाराष्ट्र नव्हे तर देश आणि जगाला घ्यावी लागते. बीबीसी, सीएनएन या वृत्तवाहिन्यांनाही याची दखल घ्यावीच लागते. शिवसेना सत्तेत असली तरी शिवसेनेची तलवारबाजी थांबलेली नाही, असेही खासदार राऊत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घनकचरा व्यवस्थापन पिंपरीत रेंगाळले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

वाढत्या शहरीकरणाचा विचार करून घनकचरा व्यवस्थापनासाठी पुनावळे येथील वनविभागाची ६१ एकर जागा मिळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. जागेपोटी गेल्या पाच वर्षांत टप्प्या टप्प्याने जवळपास सगळीच रक्कम म्हणजे ८५ लाख रुपये महापालिकेने वनविभागाला दिले आहेत. मात्र, राज्य सरकारकडून या जागेचा ताबा महापालिकेकडे देण्याबाबत कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे हा प्रश्न अद्यापही प्रलंबितच आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेला शहरात निर्माण होणाऱ्या घन कचऱ्यावर प्रक्रिया व त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी फक्त मोशी कचरा डेपो आहे. मात्र, झपाट्याने वाढत असणाऱ्या शहरीकरणामुळे महापालिकेला आणखी जागेची गरज आहे. त्याकरिता महापालिका हद्दीत पुनावळे येथे राज्य सरकारच्या वन विभागाची ६१ एकर जागा आहे. ही जागा महापालिकेला मिळण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने राज्य सरकारच्या वनविभागाच्या उप- वनसरंक्षक कार्यालयाकडे या जागेसाठी वेळोवेळी रक्कम देऊ केली आहे. त्यामध्ये २०१० मध्ये प्रथम २ लाख ६३ हजार रुपये दिले होते. तेव्हापासून आतापर्यंत ८५ लाख ५ हजार ४०३ रुपये महापालिकेने राज्य सरकारला या जागेपोटी दिलेले आहेत. नुकतेच मार्च महिन्यात ६७ लाख २५ हजार ११९ महापालिकेने दिले आहेत. पुनावळेच्या जागेसाठीचे फक्त ८ लाख रुपये भरणे आणखी बाकी असून इतर सर्व रक्कम देण्यात आली आहे.

पुनावळेतील जागा मिळणार, या अपेक्षेने महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनाची बरीच तयारी चालविली आहे. एवढेच नाही, तर पर्यावरण विभागाने येथील कचरा डेपोचा बफरझोन कमी करण्याचाही प्रयत्न केल्याचे समोर आले होते. मात्र, प्रत्यक्षात ही जागा काही महापालिकेच्या ताब्यात येताना दिसत नाही. जागेपोटी महापालिकेने जवळपास सर्व रक्कम सरकाच्या वनविभागाला अदा केली आहे, परंतु तरी देखील जागेचा ताबा देण्याची कोणतीच कार्यवाही पुढे सरकलेली नसून 'जैसे थे'परस्थिती आहे.

वनविभागाच्या पुनावळे जागेपोटी वनविभागाला वेळोवेळी रक्कम अदा केलेली आहे. मात्र, अजून जागेचा ताबा मिळण्यासाठी कार्यवाही पूर्ण झालेली नाही. त्यासाठी राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा सुरू आहे.

- प्रकाश ठाकूर, उपसंचालक, महापालिका नगररचना व विकास

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅन्सर संशोधनाची दखल जागतिक पातळीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्थे'मधील (एनसीसीएस) संशोधकांनी कॅन्सरच्या उपायांसाठी वनस्पतीच्या आधारे तयार होणारी आणि तसेच केमोथेरपीचे दुष्परिणाम टाळू शकणारी दोन वेगवेगळी रसायने विकसित केली आहेत. संशोधकांच्या दोन वेगवेगळ्या गटांनी त्यासाठी केलेल्या संशोधनाची दखल जागतिक पातळीवर नावाजलेल्या 'द प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सेस' (पीएनएएस) या अमेरिकेतील संशोधनपत्रिकेनेही घेतली आहे.

डॉ. समित चटोपाध्याय आणि डॉ. मानस संत्रा या शास्त्रज्ञांच्या गटांनी हे संशोधन केले आहे. डॉ. चटोपाध्याय यांनी 'स्मार- वन' (एसएमएआर - वन) प्रकारातील, तर डॉ. संत्रा यांनी 'एफबीएसओ-३१' प्रकारातील पेशींच्या गाठी होण्याची प्रक्रिया रोखू शकणाऱ्या प्रथिनांवर केलेल्या संशोधनातून ही रसायने तयार झाली आहेत. डॉ. चटोपाध्याय आणि डॉ. संत्रा यांनी मंगळवारी आपल्या संशोधनांविषयी पत्रकारांना माहिती दिली.

वनस्पतीच्या आधारे 'स्मार- वन'ची निर्मिती

कॅन्सरच्या रुग्णांमध्ये 'सीडी-४४' प्रकारातील प्रथिनांच्या गुणधर्मामध्ये बदल होतात. हे गुणधर्म बदलल्याने, रुग्णांसाठी घातक ठरू शकणाऱ्या पेशी विभाजनाच्या प्रक्रियेचा वेग वाढण्याची शक्यता असते. 'स्मार- वन' (एसएमएआर - वन) प्रकारातील प्रथिने 'सीडी-४४' मधील गुणधर्मामध्ये होणारे बदल रोखू शकतात. त्यामुळे रुग्णांना घातक पेशी विभाजनाच्या आणि पर्यायाने पेशींच्या गाठी निर्माण होण्याच्या प्रक्रियेवरही मर्यादा येऊ शकतात. कॅन्सरच्या रुग्णांमध्ये या प्रकारातील प्रथिनांचे प्रमाण सातत्याने कमी होत गेल्याचे अभ्यासातून पुढे आले आहे. हीच बाब लक्षात घेत डॉ. चटोपाध्याय यांच्या गटाने 'स्मार- वन'चे प्रमाण कमी न होऊ देता, ते वाढवू शकेल असे रसायन शोधून काढले आहे. विशिष्ट वनस्पतींच्या आधारे हे रसायन तयार होत असून, त्या आधारे कॅन्सरवर उपयुक्त औषध तयार करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे डॉ. चटोपाध्याय यांनी नमूद केले. संशोधनाच्या या पुढील टप्प्यात 'स्मार- वन'चे प्रमाण नेमके का कमी होते, याचा अभ्यास सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दुष्परिणामावर औषधही लवकरच

डॉ. संत्रा यांच्या गटाने 'पी-५३' प्रकारातील प्रथिनांवरील संशोधनाच्या आधारे केमोथेरपीचे दुष्परिणाम रोखू शकणारे रसायन विकसित केले आहे. या संशोधनातून कॅन्सरचे उपचार सुरू झाल्यानंतर 'पी-५३' प्रकारातील प्रथिने नेमकी कॅन्सरच्या पेशी मारण्यासाठी कसे कार्य करतात हे पहिल्यांदाच समोर आले आहे. पेशींच्या गाठी तयार होण्याची प्रक्रिया रोखण्यासाठी 'एफबीएक्सओ ३१' प्रकारच्या प्रथिनाचे कार्यही त्यातून अधोरेखित झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खडकीतही आता पणजी मॉडेल?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खडकी

पुणे कँटोन्मेंट बोर्डाने कचरामुक्त कँटोन्मेंट करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर पणजी मॉडेल राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर खडकी कँटोन्मेंट मध्येही पणजी मॉडेल वापरावे, त्यामुळे खडकी कचरामुक्त होईल अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दक्षिण मुख्यालयातील १९ कँटोन्मेंटमध्ये हे मॉडेल वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गोव्याला भेट देऊन या मॉडेलची पाहणी केली होती. सध्या खडकी कँटोन्मेंट बोर्डाला सीईओ नसल्याने खडकीचा अतिरिक्त चार्ज पुणे सीईओंच्याकडेच आहे.

खडकी कँटोन्मेंट बोर्ड कचरामुक्त करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. कँटोन्मेंटचे २०० कायमस्वरूपी कामगार आहेत. ठेकेदारामार्फेत नागरीवस्तीत सफाई कामासाठी ५० कामगार, स्टेशन हेड क्वार्टरसाठी ५० कामगार, रेंजहिल्ससाठी १० कामगार आहेत. तसेच नागरीवस्तीत रात्रपाळीमध्ये सफाई करण्यासाठी २० कामगार नेमण्यात आले आहेत. त्याच बरोबर बोर्डाच्या हद्दीत घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासाठी ८ मिलेटरी एरियासाठी २२ आणि फॅक्टरी एरियासाठी ११ घंटागाड्याही काम करत आहेत. एवढे कामगार आणि ठेकेदार असूनही खडकीतील कचरा काही कमी होत नाही. त्यामुळे ही पद्धत बंद करण्यात यावी, बोर्डात सफाई कर्मचाऱ्यांच्या रिक्त असलेल्या जागा त्वरित भरण्यात याव्यात आणि त्यांच्या द्वारे पणजी मॉडेल राबवावे अशी मागणी होत आहे.

संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे मॉडेल तयार केले होते. ते यशस्वी झाल्यामुळे सध्या अनेक कँटोन्मेंटमध्ये हे मॉडेल वापरले जात आहे. या मॉडेलची पाहणी पुणे सीईओ संजीव कुमार यांनी केली असून, त्यांनी पुण्यामध्ये या मॉडेलला मंजुरी दिली आहे. खडकी कँटोन्मेंट बोर्डाचे आरोग्य अधीक्षक विलास खांदोडे यांनी या मॉडेलचा पूर्ण अभ्यास केला असून, हे मॉडेल खडकीमध्ये राबवावे अशी शिफारस त्यांनी संजीव कुमार यांना काही दिवसांपूर्वी केली होती.

काय आहे पणजी मॉडेल?

पणजी मॉडेलमध्ये कचऱ्याचे पाच प्रकाराच वर्गीकरण केले जाते. त्यापासून खत निर्मिती आणि कचऱ्याचा पुनर्वापर करता येणे शक्य होते. या प्रकारामध्ये पाच वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या किंवा बकेट नागरिकांना दिल्या जातात. दिलेल्या सूचनांप्रमाणे हा कचरा वेगळा करून नागरिकांनी बोर्डाच्या सफाई कर्मचाऱ्यांना द्यायचा आहे. यामध्ये नुसता ओला आणि सुका कचरा वेगळा न करता, काच, धातू, बांधकाम साहित्य हे एका पिशवीमध्ये, पालापाचोळा, अन्न हे दुसऱ्या पिशवीमध्ये, पुरर्वापर करता येणाऱ्या वस्तू तिसऱ्या पिशवीत आणि ज्याचा पूनर्वापर होत नाही तो कचरा चौथ्या पिशवीत, जैव वैद्यकीय कचरा पाचव्या पिशवीत जमा करायचा आहे. प्रत्येक पिशवीला क्रमांक किंवा रंग दिला जातो. त्यानुसार त्याची विल्हेवाट लावणे किंवा पुनर्वापर करणे शक्य होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संचालकांच्या चौकशीवर आज निर्णय?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील चौदाशे कोटी रुपयांच्या तोट्याला तत्कालिन संचालकांना जबाबदार धरण्याच्या चौकशी अहवालावर हायकोर्टात मंगळवारी दोन तास सुनावणी झाल्यानंतर त्यावर आता आज, बुधवारी निर्णय होणार आहे. या निर्णयावर संचालकांवरील वैयक्तिक तोट्याची जबाबदारी निश्चित करणाऱ्या सुनावणीची कार्यवाही अवलंबून असल्याने त्याकडे संचालकांचे लक्ष लागले आहे.

राज्य सहकारी बँकेला झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या तोट्याची सहकार कायद्याच्या कलम ८३ अन्वये चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत कर्जाची अनियमितता, साखर कारखान्यांवर कर्जासाठी मेहेरनजर, विनातारण कर्ज यामुळे बँकेला चौदाशे कोटी रुपयांचा तोटा झाल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या तोट्यासाठी राज्याचे तत्कालिन उपमुख्यमंत्री व बँकेचे संचालक अजित पवार, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, बँकेचे तत्कालीन अध्यक्ष माणिकराव पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, पांडुरंग फुंडकर, ईश्वरचंद जैन, आनंदराव आडसूळ, यशवंतराव गडाख यांच्यासह ६५ संचालकांना दोषी धरण्यात आले आहे. या संचालकांना आपले म्हणणे सादर करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली होती. याचदरम्यान, बँकेच्या एका माजी संचालकांनी कलम ८३ व कलम ८८ च्या चौकशीवर आक्षेप घेत त्यावर हायकोर्टात धाव घेतली. या याचिकेवर आता मंगळवारी सुमारे दोन तास सुनावणी झाली.

हायकोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

हायकोर्टाने ही याचिका फेटाळल्यास संचालकांवरील वैयक्तिक तोट्याची जबाबदारी निश्चित करणारी कलम ८८ ची चौकशी पुन्हा सुरू होणार आहे. मात्र, याचिकेवर हायकोर्टाने अन्य काही निर्देश दिल्यास ही चौकशी थांबणार आहे. त्यामुळे हायकोर्टाच्या निर्णयाकडे संचालकांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे महापालिका सूचना मागविणार

$
0
0

पुणेः केंद्र सरकारच्या 'स्मार्ट सिटी' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शहरातील नागरिकांकडून स्मार्ट सिटीची मते आणि सूचना मागविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी स्पर्धा घेण्यात येणार असून नागरिकांना घरबसल्या या स्पर्धेत सहभागी होता यावे, यासाठी स्वतंत्र वेबपोर्टल पालिकेने सुरू केले आहे. नागरिकांकडून मिळणाऱ्या सूचनांचे चार स्तरावर मूल्यमापन केले जाणार असून या स्पर्धेत प्रथक क्रमांक मिळविणाऱ्या व्यक्तीला २५, द्वितीय क्रमांकाला १५; तर तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे.

सूचना पाठविण्याचे आवाहन

स्मार्ट सिटीबाबत पालिकेने लावलेल्या निकषांवर नागरिकांना अडीचशे शब्दात आपल्या सूचना पाठविता येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने सूचना पाठविण्यासाठी प्रशासनाने smaratcity.punecorporation.org किंवा punesmartcity.in वेबसाइट सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट सिटी’बाबत नगरसेवक निरुत्साही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत सहभागी होण्यासाठी जोरदार तयारी करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेसह स्वच्छ भारत अभियान, अमृत योजना आणि सर्वांसाठी गृहनिर्माण या चार योजनांची नगरसेवकांना मंगळवारी (१४ जुलै) कम्प्युटरवरून सादरीकरणाद्वारे माहिती दिली. दरम्यान शहराच्या स्मार्ट सिटी योजनेतील समावेशाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली असताना नगरसेवकांमध्ये मात्र त्याबाबत निरूत्साही असल्याचे पाहायला मिळाले. या बैठकीला १३३ पैकी सुमारे ५० नगरसेवक उपस्थित होते.

केंद्र सरकारने देशातील १०० शहरे स्मार्ट सिटी म्हणून नावारुपाला आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्मार्ट सिटी ही योजना जाहीर केली आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचाही समावेश होऊ शकेल, अशी परिस्थिती आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या शहरांसाठी १०० गुणांचे निकष ठरविण्यात आले आहेत. हे निकष शंभर टक्के पूर्ण करणाऱ्या शहरांचा स्मार्ट सिटी योजनेत सहभाग निश्चित करण्यात आला आहे.

आयुक्त राजीव जाधव यांनी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात नगरसेवकांची मंगळवारी बैठक बोलाविली होती. महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, पक्षनेत्या मंगला कदम, स्थायी समिती सभापती अतुल शितोळे यांच्यासह सुमारे ४५ ते ५० नगरसेवक बैठकीला उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी कामे मार्गी लावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

शहरातील मोठे प्रकल्प रखडल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (१४ जुलै) स्थायी समितीचे अध्यक्ष अतुल शितोळे यांनी स्थायीची बैठक तहकूब केली. तत्पूर्वी 'स्मार्ट सिटी'च्या गप्पा झोडण्यापेक्षा रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचा सल्ला देत स्थायी सदस्यांनी प्रशासनाला झापले. मात्र, केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी 'स्मार्ट सिटी' योजनेत सहभागी होण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे.

स्मार्ट सिटी योजनेत समावेशासाठी प्रशासनाकडून विविध प्रयत्न सुरू आहेत. मात्र, स्मार्ट सिटीची स्वप्ने पाहणाऱ्या प्रशासनाने शहरातील अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केलेले नाहीत. त्यावरूनच स्थायीच्या मंगळवारच्या बैठकीत लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन आमने-सामने उभे राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. स्थायी समिती सभा तहकूब करण्यापूर्वी सुमारे तासभर विविध विकास कामे व मोठ्या प्रकल्पांवर सदस्यांनी चर्चा केली.

जेएनएनयूआरएमअंतर्गत केलेल्या विकासकामांच्या लेखाजोख्याला स्मार्ट सिटीत काही गुण राखीव ठेवण्यात आले आहेत. जेएनएनयूआरएमअंतर्गत शहरात काळेवाडी फाटा- देहू आळंदी रस्ता, जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील निगडी ते दापोडी, सांगवी ते किवळे आणि नाशिक फाटा ते वाकड असे चार बीआरटी कॉरिडॉरची कामे हाती घेण्यात आली आहेत. यापैकी सांगवी ते किवळे या मार्गावर येत्या स्वातंत्र्य दिनापर्यंत बससेवा सुरू करण्याचा प्रयत्न असला, तरी इतर मार्ग अर्धवट असल्याचा आरोप सदस्यांनी केला.

प्रसाद शेट्टी यांनी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड स्टेशन येथील एम्पायर इस्टेट येथील उड्डाणपुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले असल्याचे सांगितले. त्याचा या सोसायटीतील आठ ते दहा हजार नगरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. संबधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी त्यांनी केली. या शिवाय शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या तळवडे येथील नियोजित डिअर सफारी पार्कची जागा ताब्यात घेऊन ती विकसित करण्यासाठी प्रशासनाकडून पूर्ण क्षमतेने प्रयत्न होत नसल्याचा आरोप शांताराम भालेकर यांनी केला.

'दुप्पट वेगाने काम करणे अपेक्षित'

स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे यांनी स्मार्ट सिटी व रखडलेल्या विकासकामांवरून प्रशासनावर आगपाखड केली. त्यांनी स्मार्ट सिटीतील समावेशासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत आहेत. मात्र, शहरातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याकरिता प्रशासनाने सध्याच्या दुप्पट वेगाने काम करणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासनाने केवळ स्मार्ट सिटीच्या गप्पा झोडण्यापेक्षा शहरातील रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेण्यावर भर द्यावा, अशा शब्दांत प्रशासनाला झापले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार दशकांचा चित्र ठेवा भक्ष्यस्थानी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ज्येष्ठ चित्रकार शोभा पत्की यांचा चित्रठेवा शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. गेल्या चाळीस वर्षांतील सुमारे तीस चित्रे या आगीत जळून खाक झाली. मात्र, या अपघातात त्यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. भक्ष्यस्थानी पडलेल्या चित्रांतीलच काही चित्रे त्या जहांगीर आर्ट गॅलरीत (मुंबई) ८ ते १४ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या प्रदर्शनात मांडणार होत्या.

रंगभूमी आणि चित्रकला या क्षेत्रात पत्की गेली पन्नास वर्षे कार्यरत आहेत. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयातून (एसएनडीटी) त्यांनी चित्रकलेमध्ये एमए केले. या पूर्वी त्यांची अनेक प्रदर्शने झाली आहेत. त्यातील पंधराहून अधिक प्रदर्शने एकट्या जहांगीर आर्ट गॅलरीत झाली आहेत. १९८४मध्ये त्यांच्या चित्राला 'बॉम्बे आर्ट सोसायटी'चे पारितोषिक मिळाले. पैठण शैली, वारली, टांक यांचा वापर करून आधुनिक चित्रे चितारण्यात त्यांचा हातखंडा आहे.

आगीत त्यांची गेल्या चाळीस वर्षांत चितारलेली वेगवेगळ्या चित्रशैलीची सुमारे तीस चित्रे जळून खाक झाली. 'सकाळी साडेआठ वाजल्यापासून दिवे गेले होते. त्यामुळे वरच्या मजल्यावर चित्रच काढत बसले होते. इतक्यात काहीतरी जळाल्याचा वास येऊ लागला. कोणीतरी कचरा जाळत असेल, असे वाटल्याने लक्ष दिले नाही. स्टुडिओत लाकडी फ्रेम, कागद, लाकडी कपाट असे ज्वलनशील साहित्य होते. जुन्या चित्रांसह सर्व जळून गेले,' असा आगीचा घटनाक्रम श्रीमती पत्की यांनी सांगितला.

'विमा उतरवायला हवा होता'

आगीमध्ये चित्रठेवा जळून खाक झाल्यानंतर चित्रांचा विमा उतरवायला हवा होता, अशी भावना पत्की यांनी व्यक्त केली. 'असा काही अपघात घडेल, हे ध्यानीमनीही नसल्याने विमा वगैरे उतरवण्याचा विचारच केला नाही. मात्र, आता ती गरज आहे. नव्या चित्रकारांनी आपल्या कलेबाबत जागृत झाले पाहिजे. आपल्या कलाकृतींचा विमा उतरवण्याची गरज आहे,' असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images