Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

फडणवीस सरकार अस्थिर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडे पूर्ण बहुमत नसून, शिवसेनेने अनेक मुद्द्यांबाबत विरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी वेगळा निर्णय घेतला, तर फडणवीस सरकारचा तो अखेरचा दिवस असेल,' असे नमूद करीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सरकारच्या अस्थितरतेवर शनिवारी बोट ठेवले. भाजप-शिवसेनेतील दरी वाढत चालली असल्याने मुदतपूर्व निवडणुकीसाठी तयार राहण्याचा संदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला असतानाच, अजित पवार यांनीही त्याचीच री ओढत फडणवीस सरकारच्या भवितव्याची दोरी शिवसेनेच्या हाती असल्याची टिपण्णी केली.

पुण्यात एका कार्यक्रमासाठी आलेल्या अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना भाजप-शिवसेनेत सुरू असलेल्या कुरबुरींबाबत थेट भाष्य करताना, 'हे अल्पमतातील सरकार फार काळ टिकणारे नाही,' अशी शक्यता वर्तविली.

पवार म्हणाले, 'राज्यात १५ वर्षे काँग्रेससमवेत सरकार चालवताना, आमच्या दोन्ही पक्षांतील संघर्षाने कधी डोके वर काढले नाही. अखेरच्या, पाच वर्षांत काही मतभेद झाले, तरी राज्याचा विकास आणि नागरिकांचे हित जपण्याचा प्रयत्न केला. राज्यातील नव्या सरकारमधील मतभेद मात्र अवघ्या सात महिन्यांतच चव्हाट्यावर आले असून, शिवसेनेच्या मुखपत्रातूनच सरकारच्या अनेक निर्णयांवर जाहीर टीका केली जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला, तर भाजपच्या अल्पमतातील सरकारचे दिवस भरले.'

'नुसताच लाल दिवा मिळाला; पण अधिकार मिळाले नाहीत, निर्णयप्रक्रियेत सामावून घेतले जात नाही, अशी तक्रार सत्तेत सहभागी असलेल्या भाजपच्या मित्रपक्षाकडूनच केली जात आहे. भारत-पाक संबंधांविषयी देखील शिवसेनेकडून वेगळा विचार व्यक्त केला जात असल्याने हे सरकार किती काळ तग धरेल, याबद्दल शंका आहे,' असेही पवार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालेकर यांचीही चौहान नियुक्तीवर टीका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थे'च्या (एफटीआयआय) नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्याच्या निषेधार्थ संस्थेच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या संपाला एक महिना उलटून गेला असतानाच, आता ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक अमोल पालेकर, राजकुमार राव, सुधीर मिश्रा यांनीही टीका केली आहे. एफटीआयआयला वेळ देण्यासाठी जो कोणी सध्या उपलब्ध आहे आणि 'बेकार' आहे, त्याची नियुक्ती करायची हाच सरकारचा निकष आहे का, असा उपरोधिक सवाल पालेकर यांनी 'टाइम्स नाउ'शी बोलताना उपस्थित केला.

केंद्र सरकारने नेमलेल्या नियामक मंडळाला तात्पुरती स्थगिती द्यावी, त्याचबरोबर तज्ज्ञांच्या समितीमार्फत नियामक मंडळाच्या नियुक्तीसाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात यावीत, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करून ही प्रक्रिया सुरूच ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मंडळाने घेतलेला कोणताही निर्णय मान्य करणार नसल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. तसेच मागण्या पूर्ण होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे.

आठवलेंचा पाठिंबा

'एफटीआयआय'च्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावरून गजेंद्र चौहान यांना हटविण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खासदार रामदास आठवले यांनी केली आहे. या बाबत मंत्र्यांची भेट घेऊ, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच पक्षाच्या चित्रपट विभागातर्फे राखी सावंत, सलमा आगा, हेमंत बिर्जे याबाबत आंदोलन करतील, असेही आठवले यांनी स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मागणी घटल्याने फुले स्वस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अधिक महिन्यामुळे सण समारंभासह उत्सव फारसे साजरे केले जात नसल्याने विविध रंगीबेरंगी प्रकारची आवक होऊनही फुलांना मागणी नाही. फूलबाजारात मागणी नसल्याने रविवारी शुकशुकाट असल्याचे चित्र पाहायला मिळाले. फुलांच्या दरात ३० ते ४० टक्के घट झाली आहे.

फूल उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फुलांचा माल बाजारात विक्रीसाठी आणला आहे. गुलटेकडीच्या फूल बाजारात झेंडू, गुलछडी, तेरडा, बिजली, कापरी, शेवंती, मोगरा, ऑस्टर, ग्लॅडिअटर, जर्बेरा आदी फुलांची मोठी आक झाली. दिवसभर ग्राहकांअभावी फुलांचा माल मोठ्या प्रमाणात बाजारात शिल्लक राहिला होता. त्यामुळे शेतकरी, व्यापारी ग्राहकांची वाट पाहत होते. फुलांना फारशी मागणी नसल्याने तसेच पावसामुळे फुले खराब होण्याची शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना भीती आहे. त्यामुळे कमी दराने फुलांची विक्री करण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. त्याचा तोटा फूल उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

अधिक महिन्यात सण, उत्सव, समारंभाची संख्या कमी असते. त्यामुळे फुलांकडे ग्राहकांची पाठच असते. श्रावण महिना सुरू झाल्यानंतर फुलांना दिवाळीपर्यंत मागणी वाढेल. त्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होतो. सध्या अनेक भागात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फुलांचे उत्पादन घेताना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्पादन घटल्याने डाळी महागल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात सर्वच भागांत पावसाने ओढ दिल्याने अन्य राज्यांतही तशीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा फटका डाळींच्या उत्पादनावर होत असल्याने तूर डाळ, मूग डाळ, हरभरा डळा, मसूर डाळ उडीद डाळीच्या दरात सुमारे १०० ते २०० रुपयांनी वाढ झाली आहे. सोयाबीन, खोबरेल तेल, साखरेच्या दरातील घसरण अद्यापही सुरूच आहे.

राज्यासह अन्य राज्यात विविध डाळींची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. पीक देखील चांगले आहे. पण पावसाने गेल्या महिनाभर ओढ दिल्याने त्याचा परिणाम डाळींच्या उत्पादनावर होत आहे. त्यामुळे तूर डाळीत २०० ते ३०० रुपयांनी तर मूगमध्ये ५० रुपयांनी क्विंटलमागे वाढ झाली आहे. हरभरा, उडीद डाळीमध्ये प्रत्येकी १०० रुपये, तर मसूर डाळीमध्ये २०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे डाळींना महागाईची फोडणी मिळाल्याने ग्राहकांना त्याचा फटका बसणार आहे. कडधान्यांमध्ये हरभरा डाळीत वाढ झाल्याने हरभऱ्यात १०० रुपये, मसूरामध्ये २०० रुपये तर काबुली चण्यामध्ये १०० रुपयांची वाढ झाली आहे.

आषाढ एकादशीमुळे साबुदाण्याच्या दरात क्विंटलमागे ५० रुपये, तर भगरीच्या दरात १०० रुपयांची वाढ झाली आहे. चणा डाळीची किंमत वाढल्याने बेसनाच्या दरातही २०० रुपयांनी वाढ झाली. सोयाबीनच्या दरात १५ किलोमागे १० रुपये, तर खोबरेल तेलाच्या दरात ५० रुपयांनी घट झाली आहे. साखरेला ग्राहक कमी झाल्या त्याच्या दरात क्विंटलमागे ५० रुपयांनी घट झाली आहे. रवा, आटा, मैदा, नारळ, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, पोहा, गूळ, भाजकी डाळ, मिरची, धने यांच्या दरात मात्र कोणताही बदल झाला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालख्यांमुळे आवक घटली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

श्री संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांची पालखी पुण्यनगरीत येणार असल्याने राज्यातील अनेक विविध भागातील शेतकऱ्यांनी शेतमाल आणलाच नाही. त्यामुळे फळभाज्यांची आवक घटल्याने कांदा, बटाटा, वाटाणा तसेच टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे.

गुलटेकडीच्या मार्केट यार्डात १५० ते १६० ट्रक फळभाज्यांची रविवारी आवक झाली. पुण्यात दोन्ही पालख्या येणार असल्याने बाजार बंद असेल, अशी शंका शेतकऱ्यांना होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बाजारात माल आणलाच नाही. परिणामी बाजारात आवक कमी झाली आणि फळभाज्यांच्या दरावर त्याचा परिणाम झाला. पालेभाज्यांना मागणी कायम असून, दर स्थिर आहेत.

कर्नाटकातून ५ ट्रक कोबी, हिमाचल प्रदेशातून एक ट्रक मटार, कर्नाटक, मध्य प्रदेशातून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरचीची आवक झाली. तमिळनाडू, आंध्र प्रदेशातून ३ ते ४ टेम्पो शेवग्याची आवक झाली. इंदूरहून ५ ते ६ टेम्पो गाजराची आवक झाली.

सातारी आल्याची ५०० पोती, तर बेंगळुरूहून आल्याच्या १०० पोत्यांची आवक झाली. गेल्या आठवड्यातील तुलनेत या आठवड्यात टोमॅटोची आवक कमी झाली आहे. सुमारे साडेचार हजार पेट्या टोमॅटो बाजारात दाखल झाला आहे. नाशिकहून ७ ते ८ टेम्पो कार्ल्याची, तर वाशीहून दोन टेम्पो गाजर, तोंडल्यांची आवक झाली.

लसणाची मध्य प्रदेशातून साडेतीन हजार गोणींची, तर बटाट्याची गुजरात, आग्रा तसेच इंदूरहून ७० ट्रक एवढी आवक झाली. कोथिंबिरीची आवक वाढली असून, ३०० ते ७०० रुपये शेकडा असा दर

आहे. सुमारे दोन लाख जुड्यांची आवक झाली आहे. मेथीच्या दीड लाख जुड्यांची आवक झाली असून, ५०० ते ८०० रुपये शेकडा असे दर मिळाले आहेत.

मासळीची आवक घटली

पालखी पुण्यात येणार असल्याने मासळीची आवक घटली आहे. अवघे तीन ते चार टन एवढीच मासळीची आवक झाली आहे. मासळीला मागणीही कमी आहे. त्यामुळे दर स्थिर आहे. इंग्लिश अंडी ३२० रुपये शेकडा असून, ४८ रुपये डझन आहे. किरकोळ बाजारात एका अंड्याला पाच रुपये मोजावे लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजगुरुनगरला दूषित पाणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राजगुरुनगर

गेल्या काही वर्षांत खेड तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ मानल्या गेलेल्या राजगुरुनगरामध्ये सातत्याने दूषित पाणीपुरवठा होत आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला असूनही राजकारणामुळे हा प्रश्न सुटलेला नाही.

पाणी प्रश्न सोडवल्यानंतर श्रेय मिळवण्यासाठी होत असणारे राजकारण आणि काही जणांकडून जाणूनबुजून आणण्यात येत असलेले अडथळे, यामुळेच पाणी प्रश्न अद्यापही सुटू शकलेला नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन महानगरांपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या राजगुरुनगर शहराच्या विकासावर मर्यादा येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पूर्वीची ग्रामपंचायत बरखास्त होऊन राजगुरुनगर नगरपरिषद स्थापन झाली. या नगरपरिषदेची सूत्रे तरुणांच्या हाती गेल्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा देखील वाढलेल्या आहेत. परंतु प्राधान्याने 'पिण्यासाठी शुद्ध पाणी द्या, बाकी विकासाचे नंतर काय ते बघा,' अशीच नागरिकांची नगरपरिषदेकडे एकमुखी मागणी आहे. दुसरीकडे नगराध्यक्ष बापूसाहेब थिगळे, उपनगराध्यक्षा सारिका घुमटकर आणि सर्व नगरसेवकांनी शहरवासियांना लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने व सुरळीतपणे पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले असल्याचे सांगितले आहे.

शहराची लोकसंख्या वाढल्याने सध्याचा पाणीपुरवठा अपुरा पडतो आहे. शहराला पाणीपुरवठा होत असणारी पाइपलाइन तीस वर्षे जुनी असून, अनेक ठिकाणी गळतही आहे. ही योजना जवळपास कालबाह्य झाली आहे. या पाइपलाइनची दुरुस्ती अथवा नूतनीकरण तातडीने व्हावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दूषित पाण्याचा पुरवठा?

भीमा नदीवरून ज्या केदारेश्वर बंधाऱ्यातून नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविले जाते, त्या बंधाऱ्यातील पाणी अतिशय अशुद्ध व दूषित झालेले आहे. वरच्या बाजूला असलेल्या नाल्यातून या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात सांडपाणी मिसळले जाते. त्यामुळे या बंधाऱ्यातील पाणी पिण्यालायक राहिलेले नाही. नगरपरिषदेकडे पाणी शुद्धीकरण यंत्रणा उपलब्ध असली तरी तिची क्षमता कमी आहे. त्यामुळे आवश्यक तेवढे पाणी शुद्ध होत नाही. या विरोधातही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

सुधारित पाणी आराखडा लवकरच

राजगुरुनगर शहराचा पिण्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून सुमारे २७ कोटी रुपयांचा नवीन सुधारित पाणी पुरवठा आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून महिनाभरात तो मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविला जाईल. हा प्रस्ताव लवकर मंजूर व्हावा, यासाठी अधिक गतीने पाठपुरावा करणार असल्याचे नगराध्यक्ष बापूसाहेब थिगळे व उपनगराध्यक्षा व पाणी पुरवठा सभापती सारिका घुमटकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लैंगिकतेवर आता मराठीतून संवाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लैंगिकता, लिंगभेद आदी अडचणीच्या विषयांवर मोकळेपणाने चर्चा करण्याबरोबरच त्यासंदर्भात लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना सहजपणे मराठीतून माहिती मिळावी यासाठी तथापि संस्थेने 'लेट्स टॉक सेक्शुअॅलिटी' ही वेबसाइट कार्यन्वित केली. या वेबसाइटच्या माध्यमातून शारीरिक बदलांच्या काळात मनात प्रश्नांचे माजणारे काहूर, विविध समस्यांची उत्तरे शोधण्यासाठी ही वेबसाइट मदतनीस ठरणार आहे.

तथापि संस्थेने मराठीत सरू केलेल्या या वेबसाइटचे उद्‍घाटन अभिनेत्री नेहा महाजन हिच्या हस्ते झाले. त्या वेळी तथापि संस्थेच्या मेधा काळे, तसेच सामाजिक कार्यकर्त्या नंदिता अंबिके उपस्थित होत्या. या वेळी काही विद्यार्थ्यांनी लैंगिकतेबाबत मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमानंतर नाट्यवाचनाचा कार्यक्रम झाला.

'लैंगिकता संकल्पनेची दैनंदिन जीवनात आपण रोज दखल घेतो असे नाही. लैंगिकता ही जगण्याची मूलभूत अशी गोष्ट आहे. स्त्री-पुरुष एकत्र येणे म्हणजे लैंगिक संबंध नव्हे तर माणूस म्हणून एकत्र येणे हा विचार देखील महत्त्वाचा आहे,' असे मत नेहा महाजन हिने व्यक्त केले.

'लहानांपासून ते मोठ्यापर्यंत लैंगिकतेची माहिती पोहोचविण्यासाठी वेबसाइट तयार करण्याचा निर्णय घेतला. याबाबतची माहिती मराटीत मिळणे महत्त्वाचे आहेे,' असे नंदिता अंबिके यांनी सांगितले. वेबसाइटवर पंधरा वर्षापासून तथापि संस्थेच्या कामाची माहिती देण्यात आली आहे. लैंगिकतेबाबत इंग्रजीतून अनेक ठिकाणी माहिती उपलब्ध झाली आहे. पण मराठीत माहिती मिळत नाही. शारीरिक बदलांपासून ते लैंगिकतेपर्यंत माहितीचा समावेश आहे. लैंगिकतेला सामाजिक, भावनिक, आर्थिक पैलू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आधार’ जोडणी ठप्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रेशनचे धान्य बायोमेट्रिक पद्धतीने वाटपासाठी रेशनकार्डधारकांकडून अर्ज भरून घेण्याचे काम गतीने सुरू असताना 'डाटा एंट्री'चे काम मात्र थंडावले आहे. राज्यभरात आतापर्यंत फक्त एक ते दोन टक्केच अर्जांची डाटा एंट्री होऊ शकली आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी जुलैअखेरची दिलेली मुदत आणखी वाढवावी लागणार आहे.

अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत गरीब कुटुंबांना रेशनवर सवलतीच्या दरात धान्य देण्यात येत आहे. यासंदर्भात सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या एका याचिकेवरील सुनावणीत रेशनिंगचे कम्प्युटरायझेशन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार रेशनवरील धान्य वाटपाचे संपूर्ण कम्प्युटरायझेशन करण्यासाठी राज्य सरकारने पावले टाकली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रेशनधान्य वितरणसाठी बायोमॅट्रिक्स पद्धत अवलंबण्यात येणार आहे.

बायोमेट्रिक धान्य वाटपामुळे धान्याची वीस टक्के गळती कमी होण्यास मदत होणार आहे. रेशनकार्डधारक लाभार्थ्यांना बायोमेट्रिक ओळख पटविल्यानंतरच धान्य वितरित देण्यात येणार आहे. राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ तसेच रहिवास पुरावा म्हणूनही रेशन कार्डाचा वापर करण्यात येतो. गेल्या काही वर्षांत बोगस रेशनकार्ड काढण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आता रेशन कार्डाला आधार कार्ड जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात १६ लाख ४० हजार ७०२ रेशन कार्डधारक असून, त्यातील ८ लाख १५ हजार रेशन कार्डधारक शहरात आहेत. ही सर्व रेशन कार्ड कम्प्युटराइज्ड करण्यात आली असून, सध्या त्याच्या डाटा एंट्रीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर टप्प्या-टप्प्याने सर्व रेशन कार्ड ही आधारशी जोडली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भुशी डॅममध्ये तरुणाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

लोणावळा येथील भुशी डॅममध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या पुण्यातील एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. सलग दोन वीकेंडमध्ये भुशी डॅममध्ये बुडून पाच युवा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.

हृषीकेश नारायण गावडे (वय २२,रा. पुणे) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून, तो टाटा मोटर्स कंपनीत कामाला होता. तो आणि त्याचे आठ मित्र वर्षाविहार आणि पर्यटनासाठी लोणावळ्यात दुपारी आले होते. पर्यटकांचे आकर्षण स्थळ असलेल्या भुशी डॅम येथे ते सर्व पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गेले होते. या वेळी हृषीकेश आणि त्याच्या मित्रांनी डॅमच्या भिंतीवरून पोहण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या. पोहताना त्याची दमछाक झाल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी येथील जीवरक्षक साहेबराव चव्हाण व राजू पवार यांच्या मदतीने सायंकाळी पावणेसात वाजता हृषीकेशचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारंपरिक गोष्टींना परवानगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चंद्रभागेच्या वाळवंटात कोणतेही स्ट्रक्चर उभे करण्यास कोर्टाने मनाई केली आहे, मात्र कोणत्याही पारंपरिक गोष्टीस मनाई केलेली नाही, असे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी रविवारी सांगितले.
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या स्वच्छता दिंडीला चोक्कलिंगम यांनी झेंडा दाखविला. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. चंद्रभागेच्या वाळवंटात राहुट्या उभारण्यास हायकोर्टाने मनाई केली आहे. या आदेशावरून वारकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, त्याचे पडसाद पालखी सोहळ्यात उमटले आहेत. त्यासंदर्भात विचारले असता, या विषयासंदर्भात एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. वारकरी, सरकार आणि विश्वस्तांचा त्यामध्ये समावेश आहे. या समितीने केलेला अहवाल कोर्टात सादर करण्यात आला आहे. त्याबाबत कोर्टाने समाधान व्यक्त केले आहे. याठिकाणी प्रशासनाने कायमस्वरूपी नियोजन करण्याचा आराखडा तयार केला आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनाने येथे ६५ एकर जागा देऊ केली आहे. तेथे पाणीपुरवठा, निवासव्यवस्था आणि स्वच्छतागृहे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. या वेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव कुदळे, प्रमोद शिंदे, ए. के. तिवारी, राजाराम झेंडे, राहुल साकोरे, सचिन अडसूळ, दीपाली पाटील आदी उपस्थित होते.

पंढरपुरामध्ये सहा हजार शौचालयांची गरज आहे. सध्या प्रारंभी तात्पुरती आणि नंतर कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात येईल. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण होणार आहे. कोर्टाने कोणत्याही पारंपरिक बाबींना मनाई केलेली नसल्याने येथे पारंपरिक खेळ होऊ शकतात.

- एस. चोक्कलिंगम, विभागीय आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषधपेट्यांचे वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संत तुकाराम महाराज यांच्या पालखीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी विभा ज्ञानपीठ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने औषध पेट्यांचे वाटप करण्यात आले. दररोज काही किलोमीटचा प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना त्रास झाल्यास तातडीने प्राथमिक स्वरूपाची औषधे मिळावीत, यासाठी या औषधपेट्यांचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.

थंडी, ताप, अंग दुखणे, खोकला, सर्दी यावरील औषधांबरोबरच पायांच्या भेगांसाठी मलम, डोळ्यांचे ड्रॉप, गुडघेदुखीचा मलम अशा औषधांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. नारायण पेठेतील निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीनेही पालखी सोहळ्यातील दिंडीप्रमुखांना ३०० प्रथोमपचार पेट्यांचे वाटप करण्यात आले. यातील औषधे कशी वापरायची याचे माहितीही या वेळी वारकऱ्यांना देण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्ते या पेट्यांचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष जयेश कासट, सुनील शिंगवी, जगदीश मुंदडा यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

'राष्ट्रवादी'तर्फे भोजन

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शिवाजीनगर विधानसभा शाखेतर्फे संत रामदास विद्यालयात अकराशे वारकऱ्यांसाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गणेश महाराज पुणेकर दिंडीतील वारकरी या वेळी उपस्थित होते. माजी नगरसेविका पद्मजा गोळे यांनी संयोजन केले. श्री संताजी ब्रिगेड, शिव-राणा प्रतिष्ठान, न्यू युनियन क्रिकेट क्लब, राष्ट्रवादी काँग्रेस ताडीवाला रोड प्रभाग २२चे नगरसेवक प्रदीप गायकवाड, फुले-साठे आंबेडकर विचार फाउंडेशन, शिवाजीनगर ब्लॉक काँग्रेस कमिटी, द ग्रेट मराठा प्रतिष्ठानतर्फे वारकऱ्यांसाठी महाप्रसाद, नाश्ता, वैद्यकीय तपासणी असे विविध उपक्रम राबविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणोबा पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,जुन्नर

आषाढी वारीसाठी राज्यातून संतांच्या पालख्या पंढरपूरकडे रवाना होतात.मात्र, जुन्नर तालुक्यातील संतवाडीतून मुक्या जनावराच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होत असते. संत ज्ञानेश्वरांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदवले, त्या गणोबा रेड्याची समाधी संतवाडीत आहे. तेथून दर वर्षी गणोबाच्या पालखीचे प्रस्थान होत असते. यंदा पालखीचे नववे वर्ष आहे. आळेतील मुक्कामानंतर पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.पालखीत विराजमान झालेला रेड्याचा चांदीचा मुखवटा हे दिडींचे वैशिष्ट्य होय. पालखी शोभिवंत रथात ठेवण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक मुक्तीसाठी वारीत अभियान

$
0
0

पुणेः लाखो भाविकांचा सहभाग असलेली पंढरीच्या वारी प्लास्टिक कचरा मुक्त असावी, यासाठी थं क्रिएटिव्ह सेंटर, पर्यावरण दक्षता कृती मंचातर्फे अभियान हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे प्रशांत अवचट यांनी पत्रकार परिषदेत दिली. सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर या वेळी उपस्थित होते.

'या अभियानाअंतर्गत आळंदी ते पंढरपूर दरम्यानच्या विविध गावातील सुमारे ५० हजार शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण प्रबोधन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली जाणार आहे. प्रत्यक्ष वारीमध्ये दिंडीप्रमुख, कीर्तनकारांच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येणार असून, त्याचे चित्रीकरण करण्यात येत आहे. वारी संपल्यानंतर हे चित्रीकरण फिल्मच्या माध्यमातून सर्वत्र दाखविण्यात येणार आहे. त्याचबरोबर यंदाच्या वारीमध्ये वारी एका ठिकाणाहून पुढे गेल्यानंतर किती कचरा जमा होतो, याची माहितीही जमविण्यात येणार आहे,' असे अवचट यांनी सांगितले. 'प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. पर्यावरणीय समस्यांवर उपायोजना करणे आवश्यक आहे,' असे वेलणकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हडपसरमध्ये जल्लोषात स्वागत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

हडपसरमध्ये दोन्ही पालख्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. महापौर दत्तात्रय धनकवडे व स्थायी समितीचे अध्यक्ष अश्विनी कदम यांनी माउली आणि तुकोबारायांच्या पालखीचे दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर जगद‍्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर रोड मार्गे, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. पालखीच्या स्वागतासाठी पहाटेपासूनच पालखी मार्गावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

सासवड रस्त्यावरील विश्रांतीस्थळी नऊ वाजण्याच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे, तर सोलापूर रस्त्यावर दुपारी पावणेबारा वाजता संत तुकाराम महाराजांची पालखीचे आगमन झाले. महापौर दत्तात्रय धनकवडे, आमदार योगेश टिळेकर, स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम, नगरसेवक वैशाली बनकर, विजय देशमुख, चेतन तुपे, रंजना पवार, विजया वाडकर, विजया कापरे, आनंद अलकुंटे, फारूख इनामदार, सहायक आयुक्त संजय गावडे, पोलिस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी पालख्यांचे स्वागत केले.

पालखीचे दर्शन घेण्यासाठी तसेच वारकऱ्यांना विविध वस्तूंचे वाटप करण्यासाठी आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विविध संस्था व संघटनांच्या वतीने जागोजागी चहा, बिस्किटे, लाडू, राजगिरा गुडदाणी, पाणी यांचे वाटप केले जात होते. आज एकदशी असल्याने अनेक ठिकाणी वारकऱ्यांना केळी, खिचडी, शेंगदाण्याचे लाडू वाटले जात होते.

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सकाळी दहा वाजता सासवडकडे, तर संत तुकाराम महाराजांची पालखी दुपारी दोन वाजता लोणीकाळभोर येथे मुक्कामासाठी रवाना झाली. या दोन्ही पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैष्णवांचा मेळा मार्गस्थ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यात मुक्कामी असलेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या रविवारी सकाळी पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. टाळ-मृदंगांच्या तालावर विठूनामाचा जयघोष करण्यात वैष्णवांचा मेळा दंग झाला होता.

पालखी विठोबा मंदिरातून सकाळी सहा वाजता संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि निवडुंग्या विठ्ठल मंदिर येथून संत तुकाराम महाराजांची पालखी सकाळी सात वाजता मार्गस्थ झाली. शहरात विविध ठिकाणी मुक्काम केलेले वारकरी टाळमृदंगाचा गजर करीत पहाटे पालखी स्थळी दाखल झाले होते. ज्ञानेश्वर माउली, तुकोबा आणि विठूनामाचा गजर करत वारकरी, टाळकरी, विणेकरी, झेंडेकरी, तुळस, हांडेकरी, पखवाजी अशा सुमारे लाखो वैष्णवांचा मेळा पालखीसोबत पुण्यातून पंढरीला मार्गस्थ झाला. पालख्यांसाठी वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला होता. हडपसरपर्यंत एकत्र असलेल्या या दोन्ही पालख्या नंतर वेगळ्या झाल्या. तुकोबांची पालखी सोलापूर रस्त्याने, तर ज्ञानदेवांची पालखी दिवे घाटाकडे मार्गस्थ झाली. पालखी मार्गावर विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने वारकऱ्यांसाठी पाणी, फळे, खिचडी वाटप करण्यात आले. मुख्य मार्गावरील दिंड्यांसह काही दिंड्या बोपदेव घाटमार्गे सासवडला पोहोचल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आधुनिकता व्यक्तीच्या विचारांत : उमराणीकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'आधुनिकता ही व्यक्तीच्या संस्कृती, पेहरावातून व्यक्त होत नाही. तर, ती विचारांतून व्यक्त होते,' असे मत माजी पोलिस अधिकारी जयंत उमराणीकर यांनी मांडले. मेहता पब्लिशिंग हाउसच्या वतीने 'मी मलाला' या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन उमराणीकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर, अनुवादक सुप्रिया वकील, सुनील मेहता आदी या वेळी उपस्थित होते.

'कोणीही कोणत्याही प्रकारचे दुष्कृत्य, कुणावरही अन्याय होताना गप्प बसू नये. आपल्यावरही अन्याय होण्याची शक्यता विचारात घेऊन प्रतिकार करायला शिकले पाहिजे. मलालाने प्रतिकार केल्यानेच ती खंबीरपणे उभी राहू शकली,' असेही उमराणीकर यांनी सांगितले. 'आधुनिकता ही व्यक्तीच्या संस्कृती, पेहरावातून व्यक्त होत नाही. तर, ती विचारांतून व्यक्त होते,' असे मतही उमराणीकर यांनी मांडले. 'मलाला ही जगातील स्त्रीत्वाचे प्रतिक आहे. संघर्षावर मात करून उभ्या राहणाऱ्या प्रत्येक मुलीचे ती प्रतिक आहे. प्रयत्नांना यश आले नाही, तरीही लढत राहणे महत्त्वाचे असते.मलालाने प्रतिकार केल्यानेच ती खंबीरपणे उभी राहू शकली. तिच्यापासून प्रेरणा घेण्याची गरज आहे,' असे गावस्कर म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३० लाखांचा गुटखा पुणे विभागात जप्त

$
0
0

पुणेः गुटखा विक्रीवर राज्यात बंदी असली तरी सध्या 'चोरी छुपे' मार्गाने गुटखा विक्री सर्रासपणे सुरू आहे. मात्र जून महिन्यात पुण्यासह पाच जिल्ह्यांमध्ये गुटख्याच्या विक्रीच्या ठिकाणी छापे टाकून सुमारे तीस लाखांचा गुटखा जप्त करण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाने केली.

जून महिन्यात पुणे विभागात ८१ ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्या कारवाईतून २९ लाख ६२ हजार ३०२ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यात २२ ठिकाणी कारवाई करून ४ लाख २३ हजार ८७२ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. सोलापूर व सांगली जिल्ह्यात अनुक्रमे १० व ९ ठिकाणी कारवाई करण्यात आली. सातारा जिल्ह्यात ६ ठिकाणी कारवाई करून त्याद्वारे १ लाख २८ हजार ५३८ रुपयांचा साठा जप्त करण्यात आली.

'चोरी छुपे' गुटखा विक्री सुरुच

राज्यात सर्वत्र गुटखा विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही चोरी छुपे मार्गाने गुटखा विक्री सुरू असल्याचे आढळून येत आहे. पूर्वी उघड्यावर सर्रासपणे गुटख्याची विक्री केली जात असे. मात्र गुटख्याच्या विक्रीवर बंधने आल्यानंतर पान ठेल्यापासून छोट्या छोट्या टपऱ्यांमधून चोरी छुपे गुटखा विक्री सुरू झाली. गुटख्याची सवय असलेल्यांना गुटखा विक्रीची ठिकाणे माहिती आहेत. गुटख्याची विक्री सर्रासपणे होत असल्याने पुणे विभागात गुटखा विक्रेत्यांवर छापा टाकून कारवाई करण्यात येत आहे. तरीही गुटख्याची विक्री सुरूच असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी मान्य करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्फोटकांद्वारे संभाजी ब्रिगेडला धमकी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संभाजी ब्रिगेडच्या जिजाई प्रकाशन या कार्यालयात टपालाद्वारे स्फोटके आणि बातम्यांची कात्रणे पाठवून धमकावण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. स्फोटकांमध्ये वापरली जाणारी पावडर, वायर लावलेले डिटोनेटर आणि एका वृत्तपत्रांची कात्रणे असे साहित्य टपालाद्वारे पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी बॉम्बशोधक पथकाच्या अहवालानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नारायण पेठेत कन्याशाळेजवळ जिजाई प्रकाशनचे कार्यालय आहे. या कार्यालयात दोन दिवसांपूर्वी एक टपाल आले होते. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अजय भोसले यांनी ते टपाल न फोडता आपल्या घरी नेले. त्यांनी रविवारी सकाळी ते फोडले असता त्यात स्फोटकांसाठी वापरण्यात येणारी पावडर, डिटोनेटर आणि काही आक्षेपार्ह बातम्यांची कात्रणे मिळाली. या कात्रणात आमदार जितेंद्र आव्हाड आणि संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांच्या नावांवर फुली मारण्यात आली होती. या वस्तू घेवून त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाणे गाठले होते.

विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत भट यांनी तत्काळ बॉम्बशोधक पथकाला याची माहिती दिली. बॉम्बशोधक पथकाने या सर्व वस्तुंची तपासणी करत आपला अहवाल सादर केला. या वस्तुंचा वापर स्फोटकांमध्ये करण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता तसेच स्फोटकांच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरक्षेची मागणी

संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते कोकाटे आणि मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांना सुरक्षा पुरवावी, याबाबत पोलिस आयुक्तांकडे मागणी केली आहे. कोकाटे आणि खेडेकर यांच्या सुरक्षा पुरवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेवू आणि याबाबत तत्काळ बैठक घेतली जाईल, असे आश्वासन सहआयुक्तांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एका रात्रीत पाच चोऱ्या

$
0
0

पुणेः कोथरूड, डेक्कन आणि हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाच ठिकाणी जबरदस्तीने सर्वसामन्यांना लुटणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा आणि कोथरूड पोलिसांनी जेरबंद केले. या प्रकरणी एका तडीपार गुन्हेगारासह सात आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. केवळ मौजमजेसाठी चोऱ्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सागर तान्हाजी येनपुरे (वय २२), साहील विनायक जगताप (१९), अतुल शशिकांत कोंढरे (१९), सुरज जाबीर बिगानिया उर्फ बिग्गी (१९), दस्तगिर यासीन मुल्ला (२०, सर्व रा. कोथरूड) असे गुन्हे शाखेच्या युनीट वनने अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, तर कोथरूड पोलिसांनी इक्बाल यासिन मुल्ला ( १८) आणि विष्णू उपगांधले (वय २२, रा. कोथरूड) यांना अटक केली आहे. यातील बहुतांश आरोपी रेकार्डवरचे गुन्हेगार आहेत. सागर येनपुरेवर नऊ गुन्हे दाखल असून, त्याला कोथरूड पोलिसांनी तडीपारही केले आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘१७ नंबर’च्या पात्रता निकषांत बदल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांसाठीच्या १७ नंबरच्या अर्जच्या पात्रता निकषांमध्ये बदल झाले आहेत. '१७ नंबर'च्या नाव नोंदणी अर्जाद्वारे बोर्डाकडे आलेल्या माहितीतून या सुविधेसाठी पात्र ठरणारे विद्यार्थीच या पुढे १७ नंबरच्या सुविधेद्वारे बोर्डाची परीक्षा देऊ शकतील.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य बोर्ड) प्रतिकूल परिस्थितीत तसेच, आर्थिक, सामाजिक किंवा अन्य कारणांनी १० वी पर्यंतचे शिक्षण शाळेमधून नियमितरित्या पूर्ण न करू शकलेल्या; पण इयत्ता चौथी उत्तीर्ण, वय वर्षे १४ पूर्ण असलेल्यांना १० वीची परीक्षा खासगी विद्यार्थी म्हणून बाहेरून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. बारावी परीक्षेसाठीही गरजूंसाठी अशीच सुविधा पुरविली जाते. त्यासाठी या पूर्वी १७ नंबरचा अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात होती. मात्र, इंजिनीअरिंग-मेडिकलची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ हाती मिळावा, केवळ त्यासाठीच्या प्रवेश परीक्षांचीच पूर्णवेळ तयारी करता यावी, कॉलेजमधील हजेरीच्या अटीतून सुटका व्हावी आणि अंतिमतः इंजिनीअरिंग -मेडिकलचे प्रवेश निश्चित व्हावेत, यासाठी शहरातील अनेक कॉलेजांमधून विद्यार्थ्यांना खासगी विद्यार्थी म्हणून बसविले जात असल्याची बाब 'मटा'ने उघड केली होती. त्यातूनच १७ नंबरचा अर्ज भरण्यासाठी निकष अधिक काटेकोरपणे तपासणे आणि त्याची अंमलबजावणी करण्याची गरज स्पष्ट झाली होती. बोर्डानेही याचा विचार करून, योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर बोर्डाने सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून हे निकष बदलले गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य बोर्डाने १७ नंबरचे नोंदणी अर्ज भरण्यासाठीचे वेळापत्रक या प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले. त्यानुसार, विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठीचे अर्ज नियमित शुल्कासह येत्या ३१ जुलैपर्यंत संपर्क केंद्राकडे किंवा विभागीय मंडळाकडे सादर करू शकतील. विलंब शुल्कासह १० ऑगस्टपर्यंत, तर अतिविलंब शुल्कासह १० सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना हे अर्ज भरता येतील. 'हा नाव नोंदणी अर्ज परीक्षेचा अर्ज नसून, तो केवळ खासगी रितीने परीक्षेसाठी बसण्यास पात्र ठरविण्यासाठीचा नाव नोंदणी अर्ज आहे. पात्र विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर परीक्षेसाठी योग्य त्या परीक्षा शुल्कासह स्वतंत्र अर्ज सादर करावा लागेल,' ही बाबही या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आली आहे.

'ऑक्टोबर'साठी अर्ज भरणे सुरू

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ७ जुलैपासून खुली केली आहे. मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवरून विद्यार्थ्यांना हे अर्ज सादर करता येतील. विद्यार्थ्यांना २० जुलैपर्यंत नियमित शुल्कासह, तर त्यानंतर २८ जुलैपर्यंत विलंबित शुल्कासह हे अर्ज भरता येतील. विद्यार्थ्यांना आपल्या ज्युनिअर कॉलेजमार्फत हे अर्ज सादर करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेले अर्ज ज्युनिअर कॉलेजमार्फत संबंधित विभागीय मंडळांकडे योग्य त्या शुल्काच्या चलनासह सादर करण्यासाठी ३१ जुलैपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images