Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘PMP’ पास केंद्रात ४ लाखांचा अपहार?

0
0

पुणेः पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पास केंद्रात पावणेचार लाख रुपयांच्या अपहाराचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी येथील एका कर्मचारी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सीमा विजय भवर (वय ३५, रा. जनवाडी) हिच्यावर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीएमपीतील तिकीट तपासणीस भास्कर मकासरे यांनी तक्रार नोंदविली आहे. भवर सिंहगड रोड येथील पीएमपी पास केंद्रात कर्मचारी होती. ३० मे २०१४ ते २८ जून २०१५ या काळात सिंहगड रोडसह अन्य पास केंद्रांवर तीन लाख ६८ हजार रुपयांचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्यावरणमंत्र्यांची दांडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पश्चिम घाटातील 'इको सेन्सिटिव्ह झोन' (पर्यावरणीय संवेदनशील प्रदेश) निश्चित करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातर्फे मंगळवारी आयोजित बैठकीला राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम अनुपस्थित राहिले. पश्चिम घाटातील राज्यांना पर्यावरण मंत्रालयाने वर्षभरापूर्वी झोन निश्चित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. महाराष्ट्राने अद्याप अहवाल पूर्ण केलेला नसल्याने बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली.

पश्चिम घाटातील जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या कस्तुरीरंगन समितीचा अहवाल मान्य करण्यापूर्वी संबंधित राज्यांच्या मंत्र्यांनी त्यांच्या पातळीवर 'इको सेन्सिटिव्ह झोन' निश्चित करावेत, अशा सूचना केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावेडकर यांनी वर्षभरापूर्वी दिल्या होत्या. मात्र, प्रत्येक गावात फिरून लोकांची मत जाणून घेण्यास वेळ लागत आहे, अशी कारणे पुढे करून सर्वच राज्यांनी वारंवार मुदत वाढवून घेतली. यावर मंत्रालयाने २९ जून ही अखेरची मुदत सर्व राज्यांनी दिली होती. केरळ या एकमेव राज्याने वेळेत अहवाल पूर्ण करून मंत्रालयाकडे सुपूर्द केला. गुजरात, कर्नाटक आणि गोवा यांचेही काम अंतिम टप्प्यात आले आहे.

या धर्तीवर जावडेकर यांनी मंगळवारी दिल्लीमध्ये पश्चिम घाटाच्या रांगेत येणाऱ्या गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि गुजरातमधील पर्यावरण मंत्र्यांची बैठक आयोजित केली होती. मात्र, गुजरात, कर्नाटक आणि गोव्यातील मंत्रीच या बैठकीला उपस्थित राहिले. महाराष्ट्र, केरळ आणि तमिळनाडूच्या मंत्र्यांनी स्वतःऐवजी सरकारी अधिकाऱ्यांना बैठकीला धाडले. वारंवार सूचना देऊनही अहवाल न देणाऱ्या महाराष्ट्रासह अन्य राज्यांच्या कामावर यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सैन्यभरती ऑनलाइन नोंदणीने

0
0

पुणे : सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना आता ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. डिजिटल इंडिया योजनेच्या धर्तीवर लष्कराने ही नोंदणी सुरू करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेच्या ठिकाणी होणारी गर्दी, गोंधळ टळण्यास मदत होणार आहे. लष्कराच्या भरती विभागाच्या महाराष्ट्र, गुजरात, गोवा विभागाचे उपमहासंचालक ब्रिगेडिअर एन. के. खजुरिया यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. अधिक माहितीसाठी www.joinindianarmy.nic.in

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टपाल आर्टिस्ट

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

टपाल खाते कालानुरूप बदलू लागले असून, टपाल तिकिटांबरोबर अन्य उत्पादनांचा लूक बदलण्यासाठी आता खासगी आर्टिस्टची​ मदत घेतली जाणार आहे. त्यानुसार चित्रकार, डिझायनर यांच्या मानधन पद्धतीने नेमणुका करण्यात येणार आहेत.

फाइन आर्टस या विषयातील पदविका किंवा पदवीधारकांना ही संधी देण्यात येणार आहे. या क्षेत्रातील कामाच्या अनुभवानुसार या नेमणुका होणार असल्याचे टपाल खात्याकडून सांगण्यात आले. टपाल खात्याकडून नियमितपणे टपाल तिकिटे काढण्यात येत असतात. टपाल खात्याच्या​ फिलेटेली विभागाकडून हे काम करण्यात येते. त्यासाठी चित्रकार, डिझायनर यांची गरज असते. हे काम करताना येणारी अडचण लक्षात घेऊन आता मानधन तत्त्वावर आर्टिस्टच्या नेमणुका करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे टपाल खात्याकडून स्पष्ट करण्यात आले.

टपाल खात्याकडून विशिष्ट व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी किंवा ऐतिहासिक वास्तूंवर विशेष टपाल तिकिटे बनविण्यात येतात. त्या वेळी आर्टिस्टची आवश्यकता भासते. तसेच मिनिएचर शीट (कव्हर) आणि शीटलेट म्हणजे लहान कागदावर १६ स्टॅम्पचे शीट बनविण्यात येतात. त्यासाठीही आर्टिस्टची मदत घेण्यात येते. मानधन तत्त्वावर आर्टिस्टला हे काम देताना टपाल खात्याने प्रत्येक कामासाठी मानधन निश्चित केले आहे. संबंधितांनी directorphilately@indiapost.gov.in यावर ई मेल करण्याचे आवाहन टपाल खात्याने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॅरिस ब्रिज भागातील रुंदीकरण मार्गी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हॅरिस ब्रिज, खडकी बाजार, खडकी या परिसरातील वाहतूक कोंडी केवळ रस्ता रुंदीकरणाने सोडवण्यासाठी संपूर्ण परिसराचा 'प्रकल्प' म्हणून विकास करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी मंगळवारी दिले. तसेच, येत्या आठ महिन्यांत हे काम प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी पथ विभागांतर्गत स्वतंत्र टीम नेमण्याच्या सूचना केल्या. तरीही 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'तर्फे (आरपीआय) रस्त्याचे काम वेळेत मार्गी लागावे, यासाठी संत तुकाराम महाराजांना साकडे घालण्यात येणार आहे.

पुणे-मुंबई रस्त्यावरील हॅरिस ब्रिज परिसरातील रस्ता रुंदीकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याने तुकाराम महाराजांची पालखी अडवण्याचा इशारा 'आरपीआय'ने सोमवारी दिला होता. त्यामुळे या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आयुक्त कुणाल कुमार यांनी मंगळवारी तातडीने बैठक घेतली. पथ विभागप्रमुख विवेक खरवडकर यांच्यासह डीपी सेल आणि भू-संपादन खात्याचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

हॅरिस ब्रिज ते अंडी उबवणी केंद्रापर्यंतचा रस्ता ४२ मीटरचा करण्यात यावा, अशी मागणी केली गेली. या रस्त्यावरील २६पैकी चारच मिळकती पालिकेच्या ताब्यात असल्याने सुरुवातीच्या टप्प्यात हॅरिस ब्रिज ते खडकी बाजार येथील सिग्नलपर्यंतचा रस्ता ४२ मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला. उर्वरित रस्त्यासाठी भू-संपादन करून 'डिफर्ड पेमेंट' पद्धतीने आठ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. तसेच, या रस्त्याचा आढावा घेण्यासाठी दर १५ दिवसांनी बैठक घेण्याच्या सूचनाही केल्या गेल्या असून, रस्ता रुंदीकरणासह पुनर्वसन आणि इतर आनुषंगिक बाबींसाठी स्वतंत्र टीम कार्यान्वित करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.

वारकऱ्यांची कोणत्याही स्वरूपाची अडवणूक करण्याचा हेतू नाही. तरीही रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आम्ही तुकाराम महाराजांची पालखी अडवण्याऐवजी त्यांना साकडे घालण्याचा निर्णय घेतला आहे.

- डॉ. सिद्धार्थ धेंडे, 'आरपीआय'चे गटनेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत पाससाठी सेनेचे आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना दिली जाणारी मोफत पासची सुविधा महापालिकेने बंद केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी शहर शिवसेनेच्या वतीने पालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांसह अनेक शाळांचे विद्यार्थी, तसेच पालकवर्ग यामध्ये सहभागी झाल्याने या आंदोलनाकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले. पालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना बसचा मोफत पास देण्याचा निर्णय न घेतल्यास पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर जाऊन बँड वाजवण्याचा इशारा शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी दिला आहे.

महापालिकेच्या हद्दीत असलेल्या शाळांमधील मुलांना महापालिकेच्या वतीने पीएमपीएमएलचा मोफत पास दिला जात होता; मात्र यंदाच्या वर्षीपासून खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पास न देता त्यांच्याकडून २५ टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला आहे. पालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना मात्र मोफत पास देण्याचा यापूर्वीचा निर्णय कायम ठेवण्या‌त आला आहे. पालिकेत सत्ताधारी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अनेक खासगी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असून, सर्वांना पास मोफत द्यावेत, या मागणीसाठी शिवसेनेने पालिकेबाहेर आंदोलन केले.

'सावित्रीच्या लेकींना पालिकेचा त्रास', 'पालिकेचे करायचे काय', 'मोफत पास मिळालाच पाहिजे,' अशा घोषणा देत हातात मागणीचे बोर्ड घेऊन मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे पोलिसांना पालिकेसमोरचा रस्ता काही काळ वाहतुकीसाठी बंद करावा लागला. पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात शहरप्रमुख विनायक निम्हण, शहर संघटक महादेव बाबर, श्याम देशपांडे, सचिन तावरे, पक्षाचे पालिकेतील गटनेते अशोक हरणावळ, सोनम झेंडे, बाळा ओसवाल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मोफत पास हा विद्यार्थ्यांचा अधिकार असून, हा अधिकार न मिळाल्यास पालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर जाऊन बँड वाजवून आंदोलन करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारवाईला ‘सीसीटीव्ही’चा आधार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वारंवार सिग्नल तोडणाऱ्यांसाठी एक इशारा आहे. चौकात पोलिस नाही, म्हणजे आपण सुटलो, असा विचार करू नका! पोलिस नसला, तरी चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे तुमच्यावर बारीक लक्ष आहे. 'सीसीटीव्ही'ने दिलेल्या पुराव्यांच्या आधारे बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यास पुणे वाहतूक पोलिस शाखेने सुरुवात केली आहे. आतापर्यंत अशा ४२० बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर 'सीसीटीव्ही'च्या मदतीने कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी करणे, सिग्नल तोडणे, ट्रिपल सीट जाणे, 'नो पार्किंग'मध्ये वाहने उभी करणे अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर 'सीसीटीव्ही'द्वारे नजर ठेवली जात आहे.

कॅमेऱ्यामध्ये टिपल्या गेलेल्या वाहनांचा क्रमांक घेऊन वाहतूक शाखेतील पोलिसांकडे असणाऱ्या सॉफ्टवेअरमार्फत चालकाचा पत्ता शोधून काढला जातो. कर्मचाऱ्यांमार्फत त्या पत्त्यावर दंडाची पावती पाठवून रक्कम वसूल केली जाते. जून महिन्याच्या १३ तारखेपासून ही कारवाई मोहीम सुरू केली आहे. मध्यंतरी राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे काही दिवस हे काम थांबवण्यात आले होते. 'सीसीटीव्ही'द्वारे आतापर्यंत ४२० बेशिस्त चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना दंडाची पावतीही पाठवण्यात आली असून, त्यापैकी २८० जणांकडून नियमाप्रमाणे दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त सांरग आवाड यांनी दिली.

शिस्त लावण्याचा प्रयत्न

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रामुख्याने गुन्हे व वाहतुकीचे नियमन याबाबत प्रामुख्याने लक्ष ठेवले जात आहे. त्याबरोबर वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. या कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये टिपले जाणारे वाहनचालक दंडाची रक्कम देत आहेत, तर काही चालकांकडून पुरावाही मागितला जात आहे. या कारवाईचे प्रमाण सध्या कमी आहे; मात्र सीसीटीव्ही कॅमेरे पाहून सिग्नल न तोडणे, झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे थांबणे अशा प्रकारचा प्रतिसाद नागरिकांकडून मिळत असल्याचे दिसून आले, असे आवाड यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डांबर खरेदीतही ठेकेदाराला प्राधान्य

0
0

पुणे : पालिकेऐवजी ठेकेदाराचे हित पाहणाऱ्या पालिकेने आता डांबर खरेदीतही उत्पादकांऐवजी ठेकेदाराला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पादक कंपन्यांपेक्षा ठेकेदाराकडून सवलतीने डांबर मिळणार असल्याचे कारण पुढे करून स्थायी समितीनेही या प्रस्तावाला मान्यता दिली असली, तरी डांबराच्या गुणवत्तेबाबतच प्रश्नचिन्ह कायम राहण्याची शक्यता आहे. शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी पालिका डांबर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडूनच डांबर खरेदी करते. यंदा डांबर पुरवण्यासाठी पालिकेने टेंडर प्रक्रिया राबवली. त्यात डांबर पुरवणाऱ्या कंपन्यांपेक्षा १५ टक्के सवलतीने डांबर पुरवण्याची तयारी ठेकेदाराने दर्शवल्याने पालिकेचे लाखो रुपये वाचवण्यासाठी त्यासंबंधीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला गेला. संबंधित ठेकेदाराने एक हजार टन डांबर पुरवण्याची तयारी दर्शवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शालाबाह्य पाहणी फसवी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यभरात शनिवारी झालेल्या शालाबाह्य मुलांच्या नोंदणीमधून समोर आलेली आकडेवारी फसवी असल्याचे आरोप शालाबाह्य मुलांच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून पुढे येत आहेत. शिक्षण खात्याने गोळा केलेल्या आकडेवारीच्या तुलनेत खूप मोठ्या संख्येने शालाबाह्य मुले राज्यात असल्याने, हे सर्वेक्षण म्हणजे अशा सर्वच मुलांची फसवणूक असल्याचा आरोप हे कार्यकर्ते करत आहेत.

राज्याच्या शिक्षण खात्याने शनिवारी राज्यभरात एकाच वेळी शालाबाह्य मुलांची नोंदणी करण्याची मोहीम राबविली. ती राबविण्यामागे शालाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती गोळा करून, या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाकडे वळविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, या मोहिमेतून समोर आलेली आकडेवारीच चुकीची असेल, तर राज्य सरकारच्या या उद्दिष्टालाच हरताळ फासले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील दगडखाणींच्या क्षेत्रातील कामगारांच्या समस्यांवर काम करणाऱ्या अॅड. बस्तू रेगे यांनी सोमवारी राज्य सरकारच्या आकडेवारीवर आक्षेप घेतला. अॅड. रेगे यांच्याकडे असणाऱ्या कामगारांच्या शालाबाह्य मुलांच्या आकडेवारीनुसार, राज्यात या कामगारांची एकूण ३२,६५७ मुले शालाबाह्यच आहेत. त्यात एकट्या पुणे जिल्ह्यातील ५९२७ मुलांचा समावेश आहे. मात्र शालाबाह्य मुलांची पुणे जिल्ह्याच्या सर्वेक्षणातील आकडेवारी ही या संख्येपेक्षाही कमीच आहे. याचा अर्थ जिल्ह्यातील शालाबाह्य मुलांची मोजणी करणारे सरकारी कर्मचारी या मुलांपर्यंतच नव्हे, तर इतर

गटांमधील मुलांपर्यंतही पोहोचले नसल्याचा संशय अॅड. रेगे यांनी व्यक्त केला. सरकारी आकडेवारी ही शालाबाह्य मुलांच्या वस्तुस्थितीशी विसंगत असल्याने, या सर्वेक्षणाविषयी संशय निर्माण होत असल्याचे रेगे यांनी स्पष्ट केले.

'शोध सुरूच राहणार'

शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण हे एका दिवसापुरते मर्यादित नसून, अशा मुलांना शोधण्याचे काम हे यापुढेही वर्षभर सुरूच राहणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी जाहीर केले. दरम्यान, ज्या तालुक्यांमध्ये शंभरहून कमी शालाबाह्य मुले आढळून आली आहेत, त्या ठिकाणी पुन्हा सर्वेक्षण होण्याची गरज असल्याचे मत शिक्षण कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी मांडले होते.

सरकारी आकडेवारी

विभाग शालाबाह्य मुले

मुंबई १८,६२५

पुणे ६१२३

नाशिक १०,१२२

कोल्हापूर १५३४

औरंगाबाद ६०८३

लातूर ९२६

अमरावती १६०१

नागपूर १६९९

एकूण ४६,७१३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘RTO’ची वेबसाइट होणार सुरक्षित

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे बोगस अपॉइंटमेंट घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) वेबसाइटची सुरक्षा धोक्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. 'आरटीओ'ने वेबसाइटमधील वाहन परवान्याच्या सॉफ्टवेअरमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटरला (एनआयसी) 'आरटीओ'कडून फेरबदलाची विनंती करण्यात आली आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयात लायसन्स काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे बोगस अपॉइंटमेंट घेतल्याचा प्रकार 'मटा'ने उघडकीस आणला. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्येही अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शहरासह आरटीओ कार्यालयातही खळबळ उडाली.

सध्या पक्क्या लायसन्सकरिता अपॉइंटमेंट घेताना लर्निंग लायसन्सचा क्रमांक अर्जामध्ये नमूद केला जातो; मात्र त्या नंबरची पडताळणी करण्याची सोय नाही. हा बोगस अपॉइंटमेंटचा प्रकार उघडकीस आल्याने या वेबसाइटच्या सॉफ्टवेअरमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी लर्निंग लायसन्सच्या नंबरची पडताळणी केली जात नव्हती. त्यामुळे बोगस अपॉइंटमेंट घेतल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. आता सॉफ्टवेअरमधील बदल केला जाणार असून, लर्निंग लायसन्सच्या नंबरची पडताळणी केली जाणार आहे. लर्निंग लायसन्सधारकाचे नाव, पक्क्या लायसन्ससाठी अर्ज करणाऱ्याचे नाव एकच आहे का, त्यांचा पत्ता आदी गोष्टी तपासल्या जातील. लवकरच हा बदल कार्यान्वित होईल. त्यामुळे खोटा क्रमांक नमूद करून अपॉइंटमेंट घेणे शक्य होणार नाही, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर 'आरटीओ'ने या वेबसाइटमधील त्रुटी दूर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी 'एनआयसी'च्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहेय

- जितेंद्र पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक्स्प्रेस वेवर ब्रायफेनचे कुंपण

0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर वाढलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण एक्स्प्रेस वेच्या ९५ किलोमीटर अंतराच्या मार्गावर ब्रायफेन वायर लावण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच मार्गावर कोसळणाऱ्या दरडींवर उपाय योजना राबविण्याच्या सूचना आयआरबी कंपनीला दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एक्स्प्रेस वेवर सातत्याने होत असलेले अपघात आणि नैसर्गिक दुर्घटनांवर नियंत्रण आणण्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी मंगळवारी या मार्गाची पाहणी केली. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

या वेळी शिंदे यांच्यासोबत परिवहन मंत्री दिवाकर रावते, युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. त्यांनी कळंबोली ते लोणावळा येथील आयआरबीच्या कुसगाव येथील कार्यालयापर्यंत अपघात व दरड प्रवण क्षेत्रांसह नव्याने बांधण्यात येणाऱ्या बोगद्याच्या मार्गाची पाहाणी केली. या वेळी रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता एस. जी. मुंगीनवाल, सहायक अभियंता अनिल डिग्गीकर, आयआरबीचे देखभाल दुरुस्ती विभागाचे प्रमुख एस. व्ही़. पत्की, मुख्य जनसंपर्क अधिकारी जयंत डांगरे यांच्यासह आयआरबीचे इतर अधिकारी उपस्थित होते.

या वेळी शिंदे म्हणाले, 'एक्स्प्रेस वेवरील अपघातग्रस्तांना तात्काळ सेवा मिळावी यासाठी शीघ्रसेवा पुरविणारी चार वाहने मार्गावर तैनात करण्यात येणार आहेत. एक्स्प्रेस वेवरील बोगद्यांमध्ये लाइट चालू का बंद, याच्यासह धोकादायक ठिकाणे, अपघात प्रवण क्षेत्र व खंडाळा घाट परिसरातील दरड प्रवण क्षेत्राची आम्ही पहाणी केली. मार्गावरील क्रॉस अपघातांना रोखण्यासाठी दोन्ही लेनच्या मध्यभागी संपूर्ण एक्स्प्रेस वेवर ९५ किलोमीटर अंतरावर ब्रायफेन वायर बसविण्यात येणार आहे. खंडाळा घाटात होणारी नित्याची वाहतूक कोंडी व अपघातांची समस्या सोडविण्यासाठी दस्तुरी ते सिंहगड कॉलेज या १२ किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गाची पहाणी केली असून, हा मार्ग लोणावळा डॅमच्या खालून भुयारी पद्धतीने जाणार असल्याने यासाठी टाटा कंपनीकडून मान्यता मिळाली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौंडमध्ये सुनेला वाणासाठी जाळले

0
0

बारामती : अधिक महिन्याचे वाण म्हणून सोन्याची अंगठी, ब्रेसलेट घेण्याची मागणी पूर्ण न झाल्याच्या रागातून प्राध्यापक विवाहितेवर रॉकेल ओतून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार वरवंड येथे घडला. ती ८५ टक्के भाजली असून, तिच्यावर पुण्यात एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, यवत पोलिसांनी तिच्या पतीला आणि सासूला अटक केली आहे. दोघांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

धनश्री रोहन दिवेकर (२५) असे पीडित प्राध्यापिकेचे नाव आहे. या प्रकरणी तिचा पती रोहन आ​णि सासू अरुणा यांना अटक करण्यात आली आहे. रोहन आणि धनश्री यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. त्यांना चार महिन्याचे अपत्य आहे, अशी माहिती यवत पोलिस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली.

धनश्रीचे वडील बलभीम टाकळे शेतकरी आहेत, तर ती बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान संस्थेत संगणक विभागात प्राध्यापिका म्हणून नोकरीस आहे. लग्नानंतर काही महिन्यांतच सासरच्या मंडळीनी धनश्रीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली होती. त्यात अधिक महिना सुरू असल्याने तिचा पती, तसेच सासू-सासऱ्यांनी सोन्याची अंगठी, ब्रेसलेट, तसेच व्याह्यांसाठी पोशाख, अशी मागणी तिच्याकडे केली होती. मानपानावरून शनिवारी रात्री त्यांच्यात भांडणे झाली. त्यानंतर पहाटे साडेचारच्या सुमारास तिला पेटवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परवडणाऱ्या घरांसाठी सरकारी जमिनी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आर्थिक दुर्बल घटक (इडब्लूएस) किंवा अल्प उत्पन्न गटातील (एलआयजी) नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक संस्थांना नाममात्र दराने सरकारी जमिनी उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. तसेच मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी घरांच्या प्रकल्पासाठी रेडी रेकनरनुसार सरकारी जमिनी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

राज्य सरकारच्या नव्या गृहनिर्माण धोरणामध्ये ही तरतूद करण्यात आली आहे. येत्या २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. त्यापाठोपाठ राज्य सरकारनेही गृहनिर्माण धोरणाचा मसुदा जाहीर केला आहे. विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात त्यावर चर्चा होऊन अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. आर्थिक दुर्बल, अल्प व मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांना सध्या घरे घेणे आवाक्याबाहेर गेले आहे. त्या पार्श्वभूमीवर या धोरणामध्ये परवडणाऱ्या घरांचा पुरवठा वाढविण्यासाठी विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सरकारी जमिनी, तसेच म्हाडा-सिडकोसारखी सरकारची विविध महामंडळे व एमएमआरडीए, पीएमआरडीएसारखी प्राधिकरणे यांच्याकडील जमिनींचा कोष (बँक) तयार करण्यात येणार आहे. तसेच, एमआयडीसीचे न वापरलेले किंवा बंद पडलेल्या कंपन्यांच्या जमिनींचाही यासाठी वापर करण्याचा सरकारचा विचार आहे.

अशा जागांवर सार्वजनिक संस्थांनी आर्थिक दुर्बल घटक किंवा अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरांचा प्रकल्प बांधायचे ठरविल्यास त्यांना या जमिनी नाममात्र दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या जमिनी जिल्हाधिकाऱ्यांकडे असल्यास सरकारकडे न जाता विभागीय आयुक्तांना या जमिनींचे वाटप करता येईल, असे या धोरणात म्हटले आहे. तसेच संबंधित जमिनींवर मध्यम किंवा उच्च उत्पन्न गटासाठी घरांचा प्रकल्प राबविण्यात येणार असेल, तर त्या रेडी रेकनरच्या दराने उपलब्ध करून देण्यात येतील, असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे. येत्या तीन महिन्यांत महसूल विभागाकडून याबाबतच्या मार्गदर्शक सूचना तयार करणयात येणार आहेत. त्याबरोबरच परवडणाऱ्या घरांचा तुटवडा दूर करण्यासाठी म्हाडा, सिडको,एमएमआरडीए किंवा पीएमआरडीए सारख्या संस्था खासगी जमिनी संपादित करून त्यांचा परवडणारी घरे बांधण्यासाठी वापर करण्यात येईल, असेही या धोरणात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकामाचा स्लॅब कोसळला

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपळे सौदागर परिसरात सुरू असलेल्या बांधकामाचा स्लॅब कोसळल्याची घटना बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही. अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर परिसरातील पी. के. शाळेजवळ जी. के. असोशिएशनचे बांधकाम सुरू आहे. बुधवारी दुपारी बांधकामाच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅबचे काम करण्यात आले होते.

मात्र, या बांधकामात वापरण्यात आलेल्या मालाचा दर्जा निकृष्ट असल्याने अवघ्या पाऊण तासात या स्लॅबला तडे गेले. हा प्रकार कामगारांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने सुरक्षितस्थळी धाव घेतली. त्यानंतर काही वेळातच संपूर्ण स्लॅब कोसळला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. घटनास्थळी संत तुकारामनगर व रहाटणी अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले होते. त्यांनी तातडीने धोकादायक पद्धतीने बाहेर आलेल्या सळया व इतर लोखंडी सामान काढून टाकले. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मच्छिंद्र खराडे यांना अटक करण्याची मागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी लोणावळा

'लोणावळा परिसरात जाहिरातीचा व्यवसाय करणारे सु‌नील दरेकर यांच्याकडे खंडणीची मागणी करून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल होऊनही त्यांना अटक करण्यात चालढकल केली जात आहे,' असा आरोप सुनील व स्नेहल दरेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. दीड महिना झाल्यानंतरही खराडे यांना अटक का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. याबाबत दरेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री एकनाथ खडसे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.

'दरेकर यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे व बिनबुडाचे आहेत. मी त्यांच्याकडेव कोणत्याही खंडणीची मागणी केली नाही. स्थानिक राजकारणामधून आपल्यावर हे आरोप करण्यात आले आहेत,' अशी प्रतिक्रिया मच्छिंद्र खराडे यांनी दिली आहे. 'खराडे व दरेकर यांच्यात फोनवरून झालेले संभाषण व मेसेज याबाबतची सर्व माहिती व पुरावे गोळा करण्यात आले असून लवकरच खराडे यांना अटक करण्यात येईल,' असे पोलिस निरीक्षक आय. एस. पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लूटमार करणारी टोळी गजाआड

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

हिंजवडी-माण रस्त्यावरील लक्ष्मी पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून साडे पाच लाख रुपये लुटणाऱ्या चार जणांच्या मुसक्या हिंजवडी पोलिसांनी आवळल्या. चौकशीनंतर त्यांच्याकडून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. राजेंद्र काशिनाथ वाडघरे (वय २८, रा. म्हातोबा नगर वाकड पुणे), आशिष मधुकर घोड (वय २८, रा रास्तापेठ पुणे), रमेश श्याम भोसले (वय २१ रा माण पुणे), मंदार तानाजी चोरगे (वय २८ भारती विहार सोसायटी कात्रज पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व रेकॉर्डवरचे गुन्हेगार असून त्यांचा एक सहकारी अद्याप फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार महिन्यांपूर्वी हिंजवडी-माण रस्त्यावरील लक्ष्मी पेट्रोल पंपचे व्यवस्थापक उत्तम काळे जमा झालेली रक्कम बँकेत भरण्यासाठी जात होते. दरम्यान, माण हिंजवडी रस्त्यावरील एका कच्च्या रस्त्यावर आले असता दोन दुचाकीस्वारांनी त्याला थांबवले. त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्यांना लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण केली.

या प्रकरणाचा तपास करत असता यामागे एक रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला. आरोपींवर वाकड, चतुश्रृंगी व भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ निरीक्षक सुरेश भोसले, निरीक्षक आप्पासाहेब वाघमळे, विश्वजित खुळे, सहायक निरीक्षक हेमंत पाटील, सहायक फौजदार तुकाराम टोणपे, शिपाई आशिष बोटके, हवालदार पुनाजी किरवे, राजू केदारी, ज्ञानेश्वर मुळे, तुषार मोरे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

हँडसेट हिसकावला

पुणे : सिंहगड रोडवर महापरीक्षण ऑफिससमोर दुचाकीस्वाराला अडवून त्याच्या खिशातील पैसे आणि मोबाइल हँडसेट हिसकावल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांत कल्याणी (वय २३, रा. हिंगणे खुर्द) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी दुचाकीवरील दोघांविरुद्ध आणि कारमधील एका व्यक्तीविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैष्णवांचा मेळा निघाला पंढरीसी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'अनंत भक्तांची ये मेळी, अनंत वैष्णव भू मंडळी' भावनेने जमलेल्या असंख्य वारकऱ्यांच्या उपस्थितीत आणि रिमझिम पावसात संत तुकाराम महाराजांच्या पालखीने देहूतून पंढरपूरकडे बुधवारी दुपारी पावणेचार वाजता प्रस्थान ठेवले.

संत तुकाराम महाराजांच्या ३३० व्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची गर्दी जमली होती. इंद्रायणी काठी नामसंकीर्तनाचा गजर चालू होता. पालखी प्रस्थान कार्यक्रमाला परंपरेप्रमाणे पहाटे मुख्य मंदिरात प्रारंभ झाला. श्री विठ्ठल-रुक्मिणी, शिळा मंदिर, वैकुंठस्थान आणि तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात महापूजा करण्यात आल्या. संस्थानचे अध्यक्ष शांताराम मोरे आणि विश्वस्त या वेळी उपस्थित होते.

महापूजेनंतर संभाजी महाराज देहूकर यांचे 'पाहती गवळणी' अभंगावर काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर संत तुकोबारायांच्या पादुका सुनील घोडेकर सराफांकडून वाजतगाजत इनामदार वाड्यात आणण्यात आल्या. येथे दिलीप आणि प्रिया मोरे दाम्पत्याने महापूजा केली. त्यानंतर म्हसलेकर यांच्याकडे पादुका सोपविण्यात आल्या. त्यांनी पादुका डोक्यावर घेत मुख्य मंदिरातील सभामंडपात आणल्या. त्या पालखीत ठेवण्यापूर्वी परंपरेप्रमाणे विधीवत पूजा झाली. पालकमंत्री गिरीष बापट यांच्या पत्नी गिरीजा बापट, खासदार श्रीरंग बारणे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार बाळा भेगडे, लक्ष्मण जगताप, हर्षवर्धन पाटील या वेळी उपस्थित होते. त्यांच्यासमवेत देहूकर फडावरील वारकरी सूर्यभान कोंबले (पंढरपूर) हेही सहभागी होते. कोथरूडचे ग्रामपुजारी सुभाष टंकसाळे यांनी पौराेहित्य केले.

महापूजा चालू असतानाच महाद्वारातून दिंड्यांना प्रवेश दिला जात होता. टाळमृदंगाच्या गजरात वारकर्यांनी फेर धरले. फुगड्या घातल्या. पूजा संपताच पावणेचारच्या सुमारास रिमझिम पावसाला प्रारंभ झाला. त्यामुळे वारकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. 'तुकोबा-तुकोबा' जयघोष करीत ते उड्या मारू लागले. विविधरंगी फुलांनी सजविलेली पालखी सभामंडपातून बाहेर येताच उपस्थितांनी मनोभावे नमस्कार केला. त्यानंतर मंदिर प्रदक्षिणा झाली आणि पालखी पहिल्या मुक्कामासाठी इनामदार वाड्यात पोचली. गुरुवारी पालखी पिंपरी-चिंचवडमध्ये प्रवेश करणार असून, आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामाला थांबणार आहे.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे....

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात यंदा मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचा संकल्प देहू संस्थानने सोडला आहे. त्यासाठी स्वतंत्र दिंडी कार्यरत राहणार असून, पालखी मार्गावर ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेल्हे पोलिसांकडून दोघांना अटक

0
0

म. टा. वृत्तसेवा, भोर

वेल्हे तालुक्यातील पासली येथे संतोष पवार (वय २७, रा.नऱ्हे- आंबेगाव) यांना बारा ते पंधरा जणांनी पळवून नेऊन त्यांच्याकडील सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे दागिने लंपास करून पलायन केले. त्या वेळी पवार यांना आठ लाख रुपयांची खंडणीची मागणी सुद्धा आरोपींनी केली होती.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तानाजी उर्फ टिल्लू दिनकर वालगुडे (रा.मार्गासनी) व लक्ष्मण गणपत लेकावळे (रा.पाबे) यांना वेल्हे पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडील वाहन जप्त केले आहे. रोहिदास चोरघे, सोपान चोरघे, करण चोरघे, सुनील जाधव व इतर दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार यांची वेल्हे तालुक्यातील पासली येथे जमीन असून तेथे त्यांचे फार्म हाउस आहे. तेथे ते आले आले असताना वरील आरोपींनी त्यांना चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच, बळजबरीने त्यांना चारचाकी वाहनात बसवून त्यांना केळद खिंडीच्या मार्गाने नेण्यात आले. वाटेत आरोपींनी पवार यांना मारहाण करत त्यांच्या जवळ असलेले सोन्याचे ब्रेसलेट, हातातील कडे, तीन अंगठ्या असा अडीच लाख रुपयांचा ऐवज बळजबरीने काढून घेतला. दुसऱ्या दिवसापर्यंत आठ लाख रुपये दिले नाहीत तर जिवे मारून दरीत टाकू अशी धमकी दिली व त्यांना पुन्हा त्यांच्या फार्म हाउसवर आणून सोडले. पवार यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन दोघांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सहायक पोलिस निरीक्षक एन. एम. राठोड व इतर पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालखी मार्गावरील जुना वृक्ष कोसळला

0
0

सासवड : आळंदी-पंढरपूर या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील सासवडहद्दीत बांधकाम, महसूल व पोलिस प्रशासनाच्या वतीने संयुक्तपणे राबविलेल्या अतिक्रमणे हटविण्याची मोहीम पूर्ण केली अन् दोन दिवसांतच सासवड एसटी बस स्थानकाच्या प्रवेशद्वारानजीक असलेले १०० वर्षांपूर्वीचे जुने वडाचे झाड सोमवारी सायंकाळी स्थानकाच्या संरक्षक भिंतीवर कोसळून पडले. अतिक्रमणांमुळे अनेक दुकाने या पूर्वीच हलविली गेल्याने जीवितहानी टळली.

स्थानकाच्या संरक्षक भिंतीनजीक असलेले वडापाव आणि भेळचे दुकान यानंतर समोरील इमारतीमध्ये स्थलांतरित केल्यामुळे संभाव्य धोका टळला. पालखी रस्ता रुंदीकरण आणि अतिक्रमण हटाव मोहिमेत मालक व चालक विश्वास माहुरकर (गुरव) यांनी ते स्वत:हून मुदतीत दुकान काढून घेतले आणि आजूबाजूला असलेली चार-पाचही हॉटेल व अन्य दुकाने निघाल्याने मोठी जीवितहानी सुदैवाने टळली. रात्री १०.३० वाजेपर्यंत या मार्गावर पुण्याकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्या चहा-पानासाठी उशिरापर्यंत थांबत असतात. परंतु, ही घटना घडण्यापूर्वी या भागातील दुकाने अन्यत्र हलविल्याने कोणतीही विपरित प्रकार घडला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारामतीत पाण्यासाठी मोजा पैसे

0
0

संतराम घुमटकर, बारामती

बारामतीपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावरील कऱ्हावागज ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लष्करेवस्तीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी एक ते दीड किलोमीटरची पायपीट करावी लागते. जिरायत भागासाठी वरदान ठरलेली मोरगाव प्रादेशिक योजना असूनही राजकीय इच्छा शक्ती नसल्यामुळे गेल्या चार ते पाच वर्षांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने येथील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी पाच रुपये मोजावे लागत आहेत.

लष्करवस्तीची लोकसंख्या सुमारे सातशे ते आठशे आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत येथील नागरिकांनी विद्यमान सरपंचाच्या विरोधात मतदान केल्यामुळे निवडणुकीनंतर या वस्तीला दिले जाणारे पाणी वेगवेगळी करणे सांगून बंद करण्यात आल्याचे येथील नागरिक अनिल लष्करे यांनी 'मटा'ला सांगितले. येथील शासकीय टाकीतील मिळणारे पाणी बंद केल्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्यासाठी महिलांना पायपीट करूनही पाणी मिळत नाही. ५०० लिटरची टाकी ६० रुपयांना विकत घ्यावी लागते. एक ते दीड किमी पायपीट करून हंडाभर पाणी आणावे लागत असल्याचे येथील महिला कुसाळकर यांनी सांगितले.

भटकंती करण्याची वेळ

पिण्याच्या पाणी योजना असूनही नागरिकांना नियोजना अभावामुळे पाण्यासाठी पैसे मोजण्याची वेळ लष्कर वस्तीतील रहिवाशांवर आली आहे. या ग्रामीण भागात तर परिस्थिती अधिकच बिकट असून माणसांसह जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागत असून एक हंडा पाच ते दहा रुपयांना विकत घ्यावा लागतो. पाणी योजनेत अनेक अडचणी असल्यामुळे पाणी पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याचे सरपंच मुलमुले यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षापूर्वी ही योजनेच्या दुरुस्तीसाठी १४ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे पाणीपुरवठा विभाग पंचायत समिती प्रशासनाने सांगितले.

पाच वर्षांपासून येथील हातपंप नादुरुस्त आहेत. वेळोवेळी दुरुस्तीची मागणी करूनही हे दोन पंप दुरुस्ती करण्यात आले नाही. फक्त गेल्या दोन मतदानाच्या वेळेस पंधरा दिवस टाकीतून पाणी मिळाले.

- रेखा कुसाळकर, ग्रामपंचायत सदस्य

पाणी विकत घ्यावे लागत आहे हि परिस्थिती सत्य आहे . मात्र चार पाच दिवसांत लष्करवस्तीला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे .

- नितीन मुलमूल, सरपंच कऱ्हावागज

दररोज मोलमजुरी करून श्रमाने पैसे मिळवायचे. परंतु दररोज खासगी टॅंकरवाल्याकडून ६० रुपयांचे पाणी विकत घ्यावे लागते. ग्रामपंचायत आणि पंचायत समिती मूलभूत सुविधाकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे बाराही महिने खासगी टॅंकरवर अवलंबून राहावे लागते.

- रंगुबाई संपत कुसाळकर,

स्थानिक रहिवाशी

गावातील विहिरीतून लष्करवस्ती पर्यत योजनेच्या आठ लाख रुपये खर्चाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे . लवकरच हे काम सुरू करण्यात येणार आहे

- एस . एल. ढवळे,

शाखा अभियंता पाणी पुरवठा विभाग पंचायत समिती, बारामती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images