Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पालखी सोहळा ‘टेक्नोसॅव्ही’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पंढरीची वारी...'याचि डोळा याचि देही' अनुभवण्याचा महाराष्ट्राचा वैभवसंपन्न सांस्कृतिक ठेवा. या सोहळ्याकडे युवा मनांचा ओढा वाढत असतानाच हा सोहळा आता अधिकाधिक 'टेक्नोसॅव्ही' होतो आहे. यंदा 'फेसबुक दिंडी' या मोबाइल अॅप्लीकेशनसह संत तुकाराम महाराज संस्थानच्या सहकार्याने पालखी रथाला जीपीएस यंत्रणा बसवण्यात येणार आहे. पुण्याच्या 'इंटेलीनेट डाटासिस' या कंपनीने त्यासाठी मोफत जीपीएस यंत्रणा उपलब्ध केली आहे.

या अॅप्लिकेशनमध्ये पालखी सोहळा प्रत्यक्षात कुठे आहे हे गुगल मॅपवर दिसणार आहे. पालखी मार्गातील विसावे, मुक्काम, गोल व उभी रिंगणे, नीरा स्नान, धावा, मेंढ्यांचे रिंगण, शुभ्रवस्त्राच्या पायघड्या यांसारखा परंपरांची विस्तृत माहिती, लोकेशन, थेट वारीतले फोटो व्हिडिओ आणि पालखीपासून त्या ठिकाणाचे अंतर कळणार आहे. याचा फायदा वाहतूक पोलिस, प्रशासकीय सेवा पुरवणाऱ्या यंत्रणा आणि सोहळाप्रमुखांना होणार आहे.

याबाबत बोलताना फेसबुक दिंडीचे स्वप्नील मोरे म्हणाले, 'यंदाही वारी सोहळ्यासाठी नवे काहीतरी करण्याचा विचार होता. फेसबुक दिंडी हा उपक्रम २०११ मध्ये सुरू झाला. यंदा फेसबुक दिंडीचे पाचवे वर्ष आहे. त्यानिमित्ताने माझ्यासह मंगेश मोरे, अक्षय जोशी, अमित कुलकर्णी आणि सूरज दिघे यांनी मिळून 'फेसबुक दिंडी' हे अॅप्लिकेशन तयार केलेले आहे. त्यासाठी संत तुकाराम महाराज संस्थान यांच्या सहकार्याने पालखी रथाला जीपीएस यंत्रणा बसवण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी पुण्याच्या 'इंटेलीनेट डाटासिस' कंपनीने संपूर्ण जीपीएस यंत्रणा मोफत उपलब्ध करून दिली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शालाबाह्य मुलांचा सर्व्हे होणार ४ जुलैला

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका हद्दीतील शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने 'शालाबाह्य मुलांचे सर्वेक्षण' केले जाणार आहे. चार जुलैला महापालिका हद्दीतील विविध भागात सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत हे सर्वेक्षण केले जाणार आहे. महापालिका शाळेतील शिक्षकांसह खासगी शाळेतील शिक्षकांची मदत घेऊन हे सर्वेक्षण केले जाणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी सांगितले.

सहा ते चौदा वयोगटातील एकही मुलगा, मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. याच योजनेचा एक भाग म्हणून चार जुलैला शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशा सूचना राज्य सरकारने महापालिकेला दिल्या असल्याचे जगताप यांनी सांगिलते. या सर्वेक्षणात १७ हजार शिक्षकांची मदत घेण्यात येणार असून, घरोघरी जाऊन शाळेत न जाणाऱ्या मुलांची माहिती गोळा केली जाणार आहे. ज्या घरातील मुले शाळेत जातात त्याची माहिती पालिकेकडे असावी, यासाठी पालिकेने अर्ज तयार केला असून, हा अर्जही या सर्वेक्षणात संबधितांकडून भरुन घेतला जाणार आहे.

शाळेत न जाणाऱ्या मुलांची सविस्तर आकडेवारी या सर्वेक्षणामधून समोर येणार असून, दोन वेळा एकाच मुलांची नोंदणी होऊ नये, यासाठी या मुलांच्या डाव्या हाताच्या तर्जनीला शाई लावली जाणार आहे; तसेच आठ दिवसांत या बालकाच्या आधारकार्डची नोंदणी केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेतर्फे १५० नर्स भरती

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत (एनयूएचएम) केंद्र सरकारकडून प्राप्त झालेल्या निधीतून पालिकेच्या ५३ दवाखान्यांसाठी दीडशे परिचारिकांची भरती करण्यात आली आहे. त्याशिवाय डॉक्टरांच्या मंजूर १८ पदांपैकी नऊ डॉक्टर सेवेत रुजू झाले आहेत. यामुळे पालिकेच्या दवाखान्यांमध्ये पेशंटना चांगली आरोग्यसेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत केंद्र सरकारकडे चौदा कोटी रुपयांची पालिकेच्या आरोग्य विभागाने मागणी केली होती. त्यापैकी नऊ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. शहरातील ५३ दवाखान्यांमध्ये दुरुस्ती, फर्निचर तयार करणे, त्याचे नूतनीकरण करण्यासाठी पाच कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

कर्मचारी, डॉक्टरांसह परिचारिकांची कंत्राटी तत्त्वावर नेमणूक करण्याची गरज होती. पालिकेने ५३ दवाखान्यांसाठी या पदावरील कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यामुळे आतापर्यंत दीडशे परिचारिकांच्या जागा भरण्यात आल्या आहेत. त्याशिवाय मंजूर १८ पैकी नऊ डॉक्टरांची भरती करण्यात आली असून, ते डॉक्टर पालिकेच्या दवाखान्यात रुजू झाले आहेत, अशी माहिती सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘साथरोग’ कंट्रोल रूमचे ‘तीन तेरा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात डेंगी, मलेरिया, स्वाइन फ्लूसारख्या साथींचा ऐन पावसाळ्यात उद्रेक झाल्यास प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करणारा आणि पुण्याच्या मध्यवर्ती इमारतीत अनेक वर्षांपासून कार्यान्वित असलेला राज्याचा साथरोग नियंत्रण कक्षाचे (कंट्रोल रूम) 'तीन तेरा' वाजले आहेत. या इमारतीतील आरोग्य विभागाचे विश्रांतवाडीला हलविण्याच्या तयारी सुरू असल्याने सर्व कागदपत्रांसह साहित्य बांधून ठेण्यात आल्याने त्या ठिकाणी कंट्रोल रूम सुरू आहे की नाही याची खात्रीच देता येत नाही.

राज्याचे आरोग्य सेवा संचालनालय असलेले आणि जलजन्य, स्वाइन फ्लू नियंत्रण मध्यवर्ती इमारतीतून विश्रांतवाडीला हलविण्याचा घाट घालण्यात आला आहे. मध्यवर्ती इमारतीतील आरोग्य विभागाच्या कार्यालयात साथरोगाची असलेल्या महत्त्वाच्या फाइल्स, कागदपत्रांचे गाठोडे गेल्या कित्येक दिवसांपासून बांधून ठेवण्यात आले आहे. त्याशिवाय अन्य साहित्यांची जुळवाजुळव करण्यात आली आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात साथरोग नियंत्रण कक्ष कार्यान्वित आहे. राज्यातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबरच तेथील परिस्थितीबाबत कोणत्या उपाययोजना कराव्यात यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचा स्वतंत्र साथरोग नियंत्रण कक्ष पुण्याच्या आरोग्य सेवा संचालनालयात यापूर्वीच स्थापन करण्यात आला आहे. कोणत्याही भागात डेंगी, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, चंडीपुरा, स्वाइन फ्लूसारख्या साथीच्या आजारांची साथ पावसाळ्यात उद्भवण्याची भीती असते. साथीचा उद्रेक झाल्यास अधिकाऱ्यांना नेमक्या कोणत्या उपाययोजना कराव्यात, त्या भागातील आजाराची नेमकी काय माहिती आहे हे साथरोग नियंत्रण कक्षातून सांगितले जाते. त्याशिवाय राज्यातील कोणत्या भागात पूरस्थिती आहे याची माहिती देखील साथरोग नियंत्रण कक्षाला मिळणे आवश्यक असते. त्यामुळे साथरोग नियंत्रण कक्षाला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. या करिता आरोग्य विभागात स्वतंत्र कर्मचारी, अधिकाऱ्याची नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात येते.

माहितांच्या दस्ताऐवजाचे गाठोडेच बांधून ठेवण्यात आल्याने पुण्याबाहेरील अधिकाऱ्यांशी संपर्क देखील कसा साधला जाईल, हा देखील मोठा प्रश्न आहे. कार्यालय हलविण्याच्या घाईत या गोष्टींचा आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या गोष्टीचा विसर पडल्याचे दिसते. साथ रोग नियंत्रण कक्षातून जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांना साथीच्या रोगांबाबत आणि उपायांबाबत नेमकी माहिती मिळालीच नाही तर प्रतिबंधात्मक उपाय करता येणार नाहीत. परिणामी, साथीचा उद्रेक वाढू शकतो. केवळ कार्यालय स्थलांतर करण्याच्या चुकीच्या निर्णयामुळे 'कंट्रोल रूम'चे तीन तेरा वाजले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरित लवादाकडे दाद मागणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नदीची वहन क्षमता कमी होईल, असे कोणतेही बांधकाम करण्यास राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) बंदी घातलेली आहे, असे असतानाही महापालिकेने भिडे पुलाजवळील नदीपात्रात जॉगिंग ट्रॅकचे काम सुरू केले आहे. हे काम तातडीने थांबवावे अन्यथा हरित लवादाकडे दाद मागण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी दिला आहे. भिडे पुलाजवळील नदीपात्रात जॉगिंग ट्रॅकचे काम पालिकेने सुरू केले आहे. लवादाने नदीपात्रात कोणत्याही प्रकारचे पक्के बांधकाम करण्यास मनाई केलेली असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून पालिकेने हे काम कसे सुरू केले, याचा खुलासा करावा, असे पत्र चव्हाण यांनी महापौर दत्तात्रय धनकवडे, पालिका आयुक्त कुणाल कुमार यांना दिले आहे. लवादाने बांधकाम करण्यास मज्जाव केलेला असतानाही या भागात सुरू असलेले काम बेकायदा आहे. हे काम तातडीने थांबवावे अन्यथा पालिकेच्या विरोधात लवादाकडे दाद मागण्यास मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा खासदार चव्हाण यांनी दिला आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या आमदार फंडातून हे जॉगिंग ट्रॅकचे काम सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन बँकिंगद्वारे फसवणूक

0
0

पुणे : ऑनलाइन बँकिंगद्वारे फसवणूक करून एका महिलेची सात हजार ९९३ रुपयांची फसवणूक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या भांडारकर रोड येथील एचडीएफसी बँकेच्या खात्यातून अज्ञात व्यक्तीने ऑनलाइन बँकिंगद्वारे सात हजार ९९३ रुपये काढून फसवणूक केली आहे.

दोघांवर गुन्हा

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी धनंजय पोकळे, प्रशांत पोकळे (रा. गोपीकृपा बिल्डिंग, धायरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर सोनारघरे (३१) यांनी फिर्याद दाखल केली. फिर्यादी महावितरण कंपनी, वडगाव धायरी उपविभाग सिंहगड रोड येथे सहायक अभियंता पदावर कार्यरत आहेत. मंगळवारी पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास पोकळे यांनी त्यांच्या भागात लाइट गेल्याच्या कारणावरून आरडाओरडा करून अपशब्द वापरले, तसेच सरकारी कामात अडथळा आणला, अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्कॉलरशिप प्रक्रिया सोपी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्कॉलरशिपचा अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत दर वर्षी निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडथळ्यांपासून विद्यार्थी आणि कॉलेजांची आता मुक्तता होणार आहे. या शैक्षणिक वर्षापासून अकरावी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळविण्यासाठी केवळ दोन वेळा अर्ज करावा लागणारा आहे. राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने हा निर्णय घेतला आहे. अकरावीला अर्ज केल्यानंतर बारावीला अर्ज करावा लागणार नाही, तर डिग्रीच्या पहिल्या वर्षी अर्ज केल्यानंतर डिग्रीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. अकरावीला स्कॉलरशिपच्या अर्जासोबत सर्व कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. तेव्हा त्या वर्षाची स्कॉलरशिप त्यांना मिळेल. संबंधित कॉलेजांनी अकरावी उत्तीर्ण झालेल्या त्यांच्या विद्यार्थ्यांची नावे स्कॉलरशिपच्या वेबसाइटवर अपडेट करायची आहेत. याचप्रमाणे डिग्रीच्या विद्यार्थ्यांची प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी स्कॉलरशिपच्या वेबसाइट व सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहे, अशी माहिती सामाजिक न्याय संचालनालयाचे आयुक्त रणजितसिंह देओल यांनी 'मटा'ला दिली.

हा निर्णय अंमलात आणण्यापूर्वी विभागाने २०१४-१५ या वर्षात मान्यताप्राप्त कॉलेजांची व त्या कॉलेजातील मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांची यादी संबंधित विद्यापीठांकडून मागवून वेबसाइटवर अपलोड केली आहे. त्यानुसार गेल्या वर्षी अर्ज स्वीकारण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांना अनेक त्रुटींचा सामना करावा लागला होता. परिणामी, दिलेल्या मुदतीत अर्ज सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे तीन वेळा अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली होती. त्यामुळे यंदा सर्व त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत, असे देओल यांनी सांगितले.

सर्व प्रवर्गांतील मिळून १५ ते १६ लाख विद्यार्थी स्कॉलरशिपसाठी अर्ज करतात. अर्जातील त्रुटींमुळे किंवा अन्य कारणांमुळे काही विद्यार्थी स्कॉलरशिपासून वंचित राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. विद्यार्थ्यांना होणारा त्रास आणि विभागावर दर वर्षी पडणारा ताण कमी होण्यास या निर्णयामुळे मदत होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रायसोनी’विरुद्ध आणखी गुन्हा

0
0

पुणे : लक्ष्मी मासिक प्राप्ती योजनेर्तंगत गुंतवलेल्या २५ लाख २७ हजार रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी संचालक, पदाधिकाऱ्यांविरुद्ध सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेखा निकम (वय ५२, रा. दत्तवाडी) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.या प्रकरणी भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी संचालक, पदाधिकारी तसेच धायरी फाटा येथील शाखेतील पदाधिकारी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदार हित संरक्षण कायद्यानुसार सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निकम यांनी तसेच इतर ठेवीदारांनी 'रायसोनी'च्या लक्ष्मी मासिक प्राप्ती योजनेर्तंगत २५ लाख २७ हजार रुपये गुंतवलेले होते. बेहिशेबी व्यवहारांद्वारे कोट्यवधींचा काळा पैसा चलनात आणल्याच्या संशयावरून यंत्रणांनी 'रायसोनी'ला लक्ष्य केले आहे. त्यामुळे रायसोनीच्या राज्यभरातील शाखा बंद आहेत. ठेवीदारांचे पैसे अडकले असल्याने त्यांनीही रायसोनीच्या संचालक, पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात सिंहगड पोलिस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन दिवस ‘अलर्ट’!

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाळ्याच्या पहिल्याच सत्रामध्ये पुण्यात वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. सिग्नल बंद, बेशिस्त वाहतुकीमुळे होणारी कोंडी, साचलेले पाणी आणि खचलेले रोड, अशा परिस्थितीत आजपासून दोन दिवस राष्ट्रपती प्रणव मुखर्जी दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. सातारा रोड, जंगली महाराज रोड आणि पिंपरी परिसरात त्यांचे नियोजित कार्यक्रम असल्याने गुरुवार-शुक्रवारी पुण्यातील वाहतूक 'अलर्ट' असेल.

राष्ट्रपती मुखर्जी यांचे गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास लोहगाव विमानतळावर आगमन होणार आहे. विमानतळावर दोन तास थांबल्यानंतर ते धनकवडी येथील भारती विद्यापीठात नियोजित कार्यक्रमासाठी जाणार आहेत. मुखर्जी यांच्या वाहनांचा ताफा लष्करी परिसरातून सेव्हन लव्ह् ज चौकात पोहोचणार आहे. तेथून हा ताफा गंगाधाम मार्गे सातारा रोडवर येईल. राजीव गांधी प्राणी संग्रहालयासमोर यू-टर्न घेऊन हा ताफा भारती विद्यापीठात पोहोचेल. मुखर्जी हे सायंकाळी सहाच्या सुमारास कार्यक्रम आटोपून पाषाण येथील राजभवनात येणार आहेत. त्यापूर्वी पाषाण रोडवरील माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या निवासस्थानी ते भेट देणार आहेत. राष्ट्रपती मुखर्जी यांचा शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास जंगली महाराज रोडवरील बालगंधर्व येथे नियोजित कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम आटोपून ते पुन्हा राजभवन येथे विश्रांतीसाठी जाणार आहेत. त्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास ते पिंपरी येथील डी. वाय. पाटील कॉलेज येथे कार्यक्रमासाठी जाणार आहेत. पिंपरीतील कार्यक्रम आटोपल्यानंतर ते लोहगाव विमानतळावर जातील.

ऐन गर्दीच्या वेळात कार्यक्रम

राष्ट्रपतींचे नियोजित दोन्ही कार्यक्रम हे सायंकाळी पाचच्या सुमारास आहेत. त्यामुळे चार ते सात या गर्दीच्या वेळी विविध भागांत वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होण्याची शक्यता आहे. ही कोंडी टाळण्यासाठी तसेच वाहन चालकांची गैरसोय होऊ नये म्हणून या सातारा रोड, व्होल्गा चौक, मित्रमंडळ चौक, शास्त्री रोड, खंडूजीबाबा चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड या परिसरात गुरुवारी सायंकाळी येण्याचे टाळावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भ्रष्टाचार निर्मूलन’ संस्थांची मग्रुरी कायम

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

आपल्या संस्थेच्या नावात 'भ्रष्टाचार निर्मूलन'चा समावेश करून प्रत्यक्षात खंडणी उकळण्याचा उद्योग करणाऱ्या संस्थांना नाव बदलण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिल्याने खळबळ उडाली आहे. याविषयीचे वृत्त सर्वप्रथम 'मटा'ने प्रसिद्ध केले होते.

सरसकट सर्वच संस्थांना हा नियम लागू झाल्याने भ्रष्टाचारविरोधी चळवळीचे अग्रणी असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या 'भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास' या संस्थेलाही त्याचा फटका बसला आहे. 'आपल्याला याबाबत अद्याप कोणतीही नोटीस प्राप्त झालेली नाही. अशी कोणतीही नोटीस आल्यास त्याला कायदेशीर उत्तर दिले जाईल,' असे अण्णांच्या कार्यालयीन प्रमुखांनी कळविले आहे. धर्मादाय सहआयुक्तालयाने ज्या सोळा संस्थांना नोटीस पाठविली आहे, त्या यादीमध्ये अण्णांच्या संस्थेचा देखील समावेश आहे.

ज्या सोळा संस्थांना नोटीस पाठवून पंधरा दिवसांच्या आत संस्थांच्या नावातून 'भ्रष्टाचार निर्मूलन' हा शब्द वगळण्याचे आदेश दिले होते, त्यापैकी एकाही संस्थेने नावात बदल करण्याबाबत प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. शासकीय-निमशासकीय तसेच खासगी संस्थांमध्ये जाऊन अनुचित प्रवाव टाकण्याचे उद्योग काही जणांकडून होत आहेत. या पार्श्वभूमीवर तक्रारी प्राप्त झाल्याने धर्मादाय आयुक्तांनी वरीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत. आयुक्तांनी कारवाईचा आसूड ओढल्यानंतरही अशा संस्थांचा निगरगट्टपणा अजून कायमच आहे. यापूर्वीही या संस्थांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, संस्थांनी त्याकडे दूर्लक्ष करण्यातच धन्यता मानली. मात्र, नव्याने काढलेल्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी न झाल्यास संबंधित संस्थांवर कडक कारवाई करण्याचे संकेत सूत्रांनी 'मटा'शी बोलताना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकांचे इंग्रजीप्रेम ‘मराठी’च्या मुळावर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढणारा कल पाहता महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या ३८ शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याने पालिका प्रशासनाने या सर्व शाळा बंद करण्याच्या दृष्टीने कार्यवाही‌ सुरू केली आहे.

शहरातील विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे वाढता कल आणि शाळांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या ३८ शाळा बंद कराव्या लागणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी सांगितले. काही मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याने या शाळांचे एकत्रिकरण करावे लागणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. शहरात महापालिकेच्या शिक्षणमंडळाच्या शहरात ३१० शाळा आहेत. यामध्ये अनेक शाळांमधील पटसंख्या अत्यंत कमी होत आहे. त्यामुळे पंधरा, वीस अशा पटसंख्येवरसुध्दा वर्ग खोल्या सुरू ठेवण्याची वेळ आली आहे.

पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे ओढा वाढला आहे. महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये गर्दी होत आहे. शिक्षण मंडळाकडून चालवण्यात येत असलेल्या ई-लर्गिंग शाळांकडे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. पटसंख्येपेक्षा जास्त अर्ज येत आहेत. हडपसर येथील बनकर शाळा, तसेच राजीव गांधी ई-लर्निंग शाळेला नागरिकांकडून जास्त पसंती देण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरीतही वकिलांचा बंद

0
0

पिंपरी : मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुणे आणि औरंगाबाद येथे व्हावे, या मागणीसाठी शिवाजीनगर कोर्टातील आंदोलक वकिलांना पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनने पाठिंबा दर्शवला आहे. संघटनेतर्फे बुधवारी (२४ जून) मोरवाडी कोर्टासमोर गेट बंद आंदोलन करून वकिलांनी कामकाजावर बहिष्कार टाकला.

मुंबई हायकोर्टामध्ये सुरू असणाऱ्या एकूण खटल्यांपैकी ४० टक्के खटले पुणे,पिंपरी-चिंचवड शहरातील आहेत. न्यायालयीन कामकाजासाठी वकिलांना दरवेळी मुंबईला जावे लागते. त्यामुळे वकीलच नाही, तर न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सामान्य नागरिकांनादेखील अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पुणे, औरंगाबादमध्ये हायकोर्टाचे खंडपीठ सुरू करण्याबाबत मार्च १९७८मध्ये ठराव करण्यात आला होता. पुणे खंडपीठाचा प्रश्न प्रशासनाने गेल्या अनेक वर्षांपासून तसाच ताटकळत ठेवला आहे. पुण्यामध्ये फिरते खंडपीठ सुरू करण्याबाबत सरकारने तयारी दर्शवली होती. पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनशी संबंधित १०० ते १५० वकिलांनी सहभाग नोंदवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएमपीचे भविष्य अंधारात

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पीएमपीला आर्थिक मदत देण्याच्या मुद्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सदस्यांमध्ये उदासीनता दिसून येऊ लागली आहे. पालिकेची खालावलेली आर्थिक परिस्थिती लक्षात घेता भविष्यात पीएमपीने राज्य सरकारकडून आर्थिक मदत मागण्याचा सल्ला सदस्यांनी दिला आहे.

पीएमपीने मोफत विद्यार्थी पास योजनेंतर्गत मागणी केलेले आठ कोटी ६० लाख रुपये खात्री केल्याशिवाय देऊ नयेत, याबाबत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नुकतेच एकमत झाले. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव तहकूब करण्यात आला. तसेच, महापालिकेच्या हद्दीतील जकात नाक्यांच्या जागा ताब्यात देण्याच्या विनंतीलाही ब्रेक लावण्यात आला आहे. त्यामुळे पीएमपीविषयी सदस्य दिवसेंदिवस उदासीन होऊ लागले आहेत. त्यांना जाब विचारण्याची तयारी काही नगरसेवकांनी केली आहे.

महापालिकेच्या हद्दीतील खासगी मान्यताप्राप्त आणि पालिकेच्या शाळांमधील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत बसपास योजना २००९-१०पासून लागू करण्यात आली आहे. त्यामागे राजकीय स्वार्थ असल्याची कबुली महापालिकेचे स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी सर्वसाधारण सभेत नुकतीच दिली. २०१४-१५ मध्ये पिंपरी-चिंचवडमधील २० हजार ९३३ विद्यार्थ्यांना मोफत बसपास देण्यात आले. त्यासाठीच्या आठ कोटी ६० लाख ४९ हजार ९९६ रुपये खर्चाची मागणी पीएमपीने केली आहे.

आता या योजनेत बदल करून पुण्याच्या धर्तीवर सुधारीत बसपास योजना लागू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यानुसार या पूर्वीची मोफत बसपास योजना बंद करणे, सुधारीत योजने अंतर्गत महापालिकेच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण कालावधीसाठी मोफत बसपास देणे, खासगी विद्यालयांतील विद्यार्थ्यांकडून एकूण बसपासच्या रकमेपैकी २५ टक्के रक्कम महापालिकेत भरावी आणि त्यानंतरच बसपास दिला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या पुढील काळात पीएमपीला पैसे देणे थांबवा, एलबीटी बंद होणार असल्यामुळे त्यांनी आता राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा ठेवावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे स्टेशन ‘ऑफ ट्रॅक’

0
0

कुलदीप जाधव, पुणे

भारत देशातील पहिली रेल्वेगाडी धावण्याचा मान असलेला मध्य रेल्वे विभाग आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यामध्ये क्षमता असूनही असमर्थ ठरल्याचे नुकतेच पाहायला मिळाले. मुंबई येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेची सेवा चार दिवस पूर्णपणे कोलमडली होती. कोणत्या गाड्या रद्द होणार, कोणत्या गाड्या उशिराने धावणार याची माहिती सामान्य प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर गेल्याशिवाय मिळत नव्हती. या दरम्यान, रेल्वे प्रशासनाने हेल्पलाइन म्हणून '१३९' हा रेल्वेचा चौकशी क्रमांक माध्यमांमध्ये प्रसिद्धीसाठी दिला. मात्र, हा क्रमांकही बहुतांश वेळ बंदच लागत होता. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागला.

मध्य रेल्वेने काही दिवसांपूर्वी 'वेकअप कॉल' उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली. यामध्ये प्रवासी तिकीट आरक्षित करताना त्याच्याकडून त्यांचा मोबाइल क्रमांक घेण्यात येणार आहे. प्रत्यक्ष प्रवासाच्या दिवशी त्याने तिकीट काढलेले स्टेशन येण्यापूर्वी काही मिनिट आधी रेल्वेकडून त्याच्या मोबाइलवर कॉल केला जाणार आहे. त्या कॉलवर तुम्ही उतरू इच्छिणारे स्टेशन लवकरच येणार आहे, अशी माहिती दिली जाणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून रेल्वेने हा एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. एकीकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा चांगला वापर आणि दुसरीकडे आपतकालिन परिस्थिती उदभवली असताना प्रवाशांना अपडेट माहिती देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाऐवजी पारंपरिक पद्धतीचा वापर करण्यात आला.

मुंबईहून पुण्याला येणारी इंद्रायणी एक्स्प्रेस पुण्यातून पुढे सोलापूरला जाते. तर, हुतात्मा एक्स्प्रेसही पुणेमार्गे सोलापूरला जाते. या दोन्ही गाड्या रविवारी (दि. २१) नियोजित वेळेत धावणार आहेत का, याची माहिती घेण्यासाठी एका प्रवाशाने रेल्वेच्या '१३९' या क्रमांकावर संपर्क साधला; परंतु फोन लागला नाही. रेल्वेच्या वेबसाइटवर या गाड्यांसंबंधी काही अपडेट आहेत का, ते पाहिले. मात्र, तेथेही काही माहिती मिळाली नाही. अखेर रेल्वे प्रशासनात नोकरीला असलेल्या त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने त्यांना माहिती दिली. पुण्याहून सोलापूरला जाणाऱ्या गाड्या सुरळीत चालू आहेत. ठरल्याप्रमाणे ती व्यक्ती कुटुंबीयांसोबत पुणे रेल्वे स्टेशनवर पोहोचली, मात्र तेथे गेल्यावर कळाले सोलापूरच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेचे पाच उपविभाग आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर आणि भुसावळ. या प्रत्येक उपविभागांमधून मुंबई मार्गावर धावणाऱ्या गाड्या आहेत. त्यामध्ये पुणे ते मुंबई दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन, मुंबई ते हैदराबादची हुसेनसागर एक्स्प्रेस, मुंबईहून कोलकात्याला जाणारी गीतांजली एक्स्प्रेस, मुंबई ते कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस, पुणे-कोलकाता आझाद हिंद एक्स्प्रेस, मुंबई-बेंगळुरू उद्यान एक्स्प्रेस आणि मनमाडवरून मुंबईला जाणारी गोदावरी एक्स्प्रेस या काही महत्त्वाच्या गाड्या आहेत. राज्यातील प्रत्येक महत्त्वाचे शहर रेल्वे मार्गाने मुंबईला जोडण्याचा हा प्रयत्न करण्यात आला आहे.

त्याबरोबरच ईशान्य कर्नाटकातील काही व दक्षिण मध्य प्रदेशमधील काही रेल्वेमार्ग मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येतात. मात्र, एवढी मोठी व्याप्ती असूनही सर्वसामान्य प्रवाशांना अद्ययावत माहिती-तपशील उपलब्ध करून देण्याच्या आघाडीवर मध्य रेल्वे निदान पुण्यात तरी 'ऑफट्रॅक'च झाली.

काय करता आले असते?

या परिस्थितीत रेल्वेने एक विशेष हेल्पलाइन सेवा सुरू करणे अपेक्षित होते. या हेल्पलाइनवर प्रवाशांना रेल्वे गाड्यांची सद्यस्थितीची माहिती देण्याची सोय केली पाहिजे होती. 'वेकअप कॉल' प्रमाणे प्रवाशाच्या मोबाइल क्रमांकावर संबंधित गाड्यांबाबतची अपडेटेड माहिती देणे शक्य आहे. त्याबरोबरच अगदी साधा उपाय करायचा झाल्यास प्रत्येक रेल्वे स्टेशनवर एक डेस्क सुरू करायचे. त्या डेस्कचा संपर्क क्रमांत माध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोचवायचा आणि तेथून विचारणा करणाऱ्या नागरिकांना माहिती द्यायची, आदी उपाययोजना करता येणे शक्य आहे. मात्र, रेल्वेकडून या प्रकारची कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाचा जोर बुधवारी ओसरला

0
0

पुणे : शहर आणि परिसरात बुधवारी पावसाचा जोर ओसरला. बुधवारी शहरात अधूनमधून पावसाच्या सरींनी हजेरी लावली. सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेआठ या वेळेत शहरात ४.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गुरुवारी शहरात अधूनमधून पावसाच्या काही सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शहरात मंगळवारी पावसाचा जोर अधिक होता. सातत्याने पावसाच्या सरींनी हजेरी लावल्याने मंगळवारी सकाळी साडेआठ ते बुधवारी सकाळी साडेआठ या २४ तासात ४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर मात्र, पावसाचा जोर ओसरला. सकाळी हलक्या सरींनी हजेरी लावल्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यांसहित एक दोन जोरदार सरींनी हजेरी लावली. त्यानंतर रात्रीपर्यंत कधी हलक्या सरी कोसळत होत्या. राज्यात, बुधवार सकाळपर्यंतच्या २४ तासात मध्य महाराष्ट्रासह घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धरणाचा साठा @ ५. ८५ टीएमसी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसामुळे खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत बुधवारी एका दिवसात सुमारे दोन अब्ज घनफूट (टीएमसी) अर्थात शहराला दीड महिना पुरेल एवढा पाणीसाठा जमा झाला. या पाण्यामुळे खडकवासला प्रकल्पाचा पाणीसाठा ५.८५ टीएमसीवर पोहोचला आहे.

धरणांच्या परिसरात पावसाला सुरुवात होण्यापूर्वी खडकवासला प्रकल्पात २.२६ टीएमसी पाणीसाठा होता. गेल्या चार दिवसांत झालेल्या पावसामुळे धरणात ३.५९ टीएमसी पाणी वाहून आले आहे. त्यामुळे एकंदर पाणीसाठा ५.८५ टीएमसीवर पोहोचला आहे. धरणक्षेत्रात पाऊस सुरू असल्याने हा साठा आणखी उंचावण्यास मदत होणार आहे. बुधवारी सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत टेमघर धरणात ३८ मिलिमीटर, पानशेत व वरसगावमध्ये प्रत्येकी ३१ मिमी, खडकवासला धरणात ३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पानशेतमध्ये ३.३३ टीएमसी म्हणजे ३१.२४ टक्के पाणीसाठा आहे. वरसगाव धरणात १.४४ टीएमसी (११.२६ टक्के), टेमघर धरणात ०.३१ टीएमसी (८.४१ टक्के) व खडकवासला धरणात ०.७७ टीएमसी (३८.७६ टक्के) पाणीसाठा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मध्य रेल्वे अजूनही अडथळ्यांतच

0
0

पुणे : मध्य रेल्वेच्या सेवेमागे लागलेले अडथळ्यांचे सत्र अजूनही सुरूच आहे. मुंबईतील मुसळधार पावसानंतर आता इटारसी येथे रेल्वेच्या सिग्नल चॅनेलच्या दुरुस्तीच्या कामामुळे पुण्याहून वसईमार्गे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. गेल्या पाच दिवसांत लांब पल्ल्याच्या एकूण नऊ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. इटारसी येथील सिग्नल चॅनेलला गेल्या आठवड्यात आग लागली होती. त्यामध्ये गाड्यांना सिग्नल देणारी यंत्रणा नादुरूस्त झाली होती. त्यावेळी एक-दोन दिवस वाहतुकीवर परिणाम झाला होता. त्या यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी (ता. २५) हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे आजपापासून काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच, बुधवारी सकाळी घोरपडी ते सासवड स्थानकादरम्यान ट्रकवर झाड पडल्याने पुणे-कोल्हापूर मार्गावरील काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले होते. मात्र, काही वेळाने पुन्हा वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील स्वच्छतेचे मोदींसमोर सादरीकरण

0
0

पुणे : शहरातील सार्वजनिक स्वच्छता आणि घनकचऱ्यावर पालिकेने राबविलेल्या विविध प्रकल्पांचे सादरीकरण आज, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर होणार आहे. संपूर्ण देशातून केवळ दोनच शहरांची निवड करण्यात आली असून, त्यात पुण्याला स्थान मिळाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी 'स्मार्ट सिटी' आणि 'अमृत' या योजनांचे उद्घाटन केले जाणार आहे. याच कार्यक्रमात देशातील प्रमुख महानगरांमध्ये स्वच्छतेसाठी राबविण्यात आलेल्या उल्लेखनीय आणि यशस्वी उपक्रमांची माहिती दिली जाणार आहे. त्यामध्ये सार्वजनिक स्वच्छता आणि घनकचरा प्रकल्पांबद्दल सादरीकरण करण्याचा मान पुणे महापालिकेला मिळाला आहे. महापालिका आयुक्त कुणाल कुमार त्याविषयी पंतप्रधानांसमोर सविस्तर सादरीकरण करणार आहेत. पुण्यासह सुरत पालिकेतर्फेही सादरीकरण केले जाणार आहे.

'संपूर्ण देशात स्वच्छतेविषयी राबविण्यात येणाऱ्या यशस्वी प्रकल्पांचे 'मॉडेल' इतर शहरांसमोर मांडण्यात येणार आहे. त्या अंतर्गत पुणे महापालिकेने राबविलेल्या कम्युनिटी टॉयलेट्स आणि घनकचरा प्रकल्पांचे सादरीकरण केले जाणार आहे', अशी माहिती आयुक्त कुमार यांनी 'मटा'ला दिली.

घनकचरा विभागाचे स्वतंत्र दालन

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी आणि अमृत या योजनांची माहिती देण्यासाठी गुरुवारी आणि शुक्रवारी दोन दिवसीय प्रदर्शन नवी दिल्लीत आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात पालिकेच्या घनकचरा विभागातर्फे स्वतंत्र दालन मांडण्यात येणार आहे. पालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांची सविस्तर माहिती पोस्टरच्या माध्यमातून इतर पालिकांच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता दुरवस्थेचा बालभारतीलाही फटका

0
0

पुणे : ऐन मोसमात रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे बुधवारी पाठ्यपुस्तके वाहून नेणारी रिक्षा 'बालभारती'मध्येच उलटली. रस्त्यांच्या डागडुजीबाबत व्यापाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यानेच हा प्रकार घडल्याचा आरोप शहरातील पाठ्यपुस्तक विक्रेता संघाने केला असून, त्या विरोधात गुरुवारपासून पाठ्यपुस्तकांची उचल थांबविण्याचा निर्णयही संघाने घेतला.

सेनापती बापट रस्त्यावरील 'बालभारती'च्या मुख्य कार्यालयातून पुणे विभागातील जिल्ह्यांमध्ये पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. त्यासोबतच स्थानिक विक्रेत्यांसाठीही पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. गेल्या काही दिवसांपासून 'बालभारती'च्या मुख्य प्रवेशद्वाराकडून पुस्तकांच्या डेपोकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. या कामामुळे व्यापाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याची ओरड होत होती. रस्तेदुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण न केल्यास 'बालभारती'मधून पुस्तकांची उचल थांबविण्याचा इशाराही विक्रेत्यांनी नुकताच दिला होता. प्रशासनाने त्याची वेळीच दखल न घेतल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात येत आहे.

'सर्वशिक्षा अभियानांतर्गत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यासाठी बालभारतीने तत्परतेने पावले उचलली. त्याचवेळी व्यापाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून केवळ सरकारी शाळांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध होणार आहेत. उर्वरीत खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांनी व्यापारी आणि पाठ्यपुस्तक विक्रेत्यांकडूनच पुस्तके विकत घ्यावी लागतील. ही संख्या मोठी असल्याने व्यापाऱ्यांनाही योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आम्ही केली होती. त्यामुळेच आम्ही पाठ्यपुस्तकांची उचल थांबविण्याचा निर्णय घेतला,' अशी माहिती पुणे पाठ्यपुस्तक विक्रेता संघाच्या प्रतिनिधींनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

मुळात आम्ही विक्रेत्यांना पर्यायी रस्त्याची सुविधा या पूर्वीच उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतरही व्यापारी आणि विक्रेत्या त्याकडे दुर्लक्ष करतात. पुस्तकांच्या वितरणाचे काम योग्य त्या कालावधीत पूर्ण केल्यानंतरच आम्ही रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. बुधवारी उलटलेल्या रिक्षामध्ये मर्यादेपेक्षा अधिक माल भरला होता. त्यामुळे यात बालभारतीची कोणतीही चूक नाही.

- चंद्रमणी बोरकर, संचालक, बालभारती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजपुरवठ्यासाठी शिवसेनेचा घेराव

0
0

पुणेः गेल्या पंधरा दिवसांमध्ये कोथरूड, कर्वेनगर व आसपासच्या भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. तक्रारी करूनही दुरूस्ती होत नसल्याची टीका करून शिवसेनेच्या वतीने महावितरणच्या कोथरूड कार्यालयात आंदोलन करण्यात आले. कार्यकारी अभियंता रमेश लोकरे यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले. येथील वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी तातडीने कारवाई करावी, अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. नगरसेवस योगेश मोकाटे, नंदकुमार घाटे, नितीन शिंदे, शिवाजी गाढवे आदी यामध्ये सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images