Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

केमिस्टवरील हल्लेखोरावर कारवाई करू

$
0
0

मंत्री गिरीश बापट यांचे आश्वासन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नाना पेठेतील न्यू सेव्ह मेडिकल स्टोअरचे गणेश दरेकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी संबंधित हल्लेखोरास अद्याप अटक झाली नाही. त्या हल्लेखोरास तातडीने पकडून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिले.

कारवाईचे आश्वासन दिल्यामुळे केमिस्टांच्या केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्टच्या वतीने (सीएपीडी) नियोजित औषध दुकाने बंद ठेवण्याचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

विनाप्रिस्क्रिप्शन झोपेच्या गोळीची मागणी करणाऱ्या हल्लेखोराकडे दरेकर यांनी प्रिस्क्रिप्शनची मागणी केली होती. त्या वेळी हल्लेखोराने त्यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले. त्या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावेळी सीएपीडीच्या पदाधिकाऱ्यांनी समर्थ पोलिसांकडे आरोपीला अटक करण्याची मागणी केली होती. तरीही अद्याप पोलिसांकडून कारवाई झाली नाही.

या पार्श्वभूमीवर केमिस्टांवर हल्ले होत असल्याने त्यांना संरक्षण मिळावे या मागणीसाठी शहरातील सहा हजार केमिस्टांचा बंद पुकारण्यात येणार होता. दरम्यान, सीएपीडीच्या पदाधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांची भेट घेतली. त्या वेळी 'समाजाच्या आरोग्य हिताच्या दृष्टी अन्न वऔषध प्रशासनाचे कायदे पाळून व्यवसाय करणाऱ्या केमिस्ट व फार्मसिस्टांवर होणारे हल्ले खपवून घेणार नाही. अशा हल्लेखोर अपप्रवृत्ती व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल', असे आश्वासन बापट यांनी दिले. हल्लेखोरावर कारवाई तसेच संरक्षण देण्याचे आश्वासन दिल्याने संघटनेचा नियोजित बंद स्थगित करण्यात येत आहे, अशी माहिती सीएपीडीचे सचिव विजय चंगेडिया यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कँटोन्मेंटमध्ये शुकशुकाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्थानिक संस्था कराविरोधात (एलबीटी) कँटोन्मेंट परिसरासाठी व्यापाऱ्यांनी पुकारलेले 'दुकान बंद' आंदोलन मंगळवारी यशस्वी ठरले. व्यापाऱ्यांनी ​दुकाने बंद ठेवल्याने नेहमी गजबजलेल्या या परिसरात शुकशुकाट होता.

'एलबीटी' रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन व्यापाऱ्यांनी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कुमार यांना दिले. मात्र, केंद्र सरकारचा आदेश असल्याने 'एलबीटी' वसुलीची अंमलबजावणी करावी लागणार असल्याचे त्यांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासमोर स्पष्ट केले. कॅम्प ​परिसरातील महात्मा गांधी रस्ता, शिवाजी मार्केट, बाबाजान चौक, न्यू मोदी खाना, चार बावडी चौक आदी परिसर नेहमी गजबजलेला असतो. बंदमध्ये सर्व दुकानदार सहभागी झाल्याने या परिसरात शुकशुकाट होता. 'एलबीटी'च्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी अरोरा टॉवर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून कँटोन्मेंट बोर्डाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला. पाऊस असतानाही मोर्चात सुमारे ६०० व्यापारी सहभागी झाले होते. या वेळी 'द फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशन ऑफ पुणे'चे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, सचिव महेंद्र पितळीया, पुणे कॅम्प मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष आनंद कोच्चर, अतिरिक्त अध्यक्ष पराग शहा, विजय ओसवाल, संजीव फडतरे, अजित सांगळे, राहुल काळ, किशोर सिंघवी अरिफ कुरेशी, सुनील मुथा आदी उपस्थित होते.

बोर्डाच्या हद्दीतील व्यापाऱ्यांना पुणे महापालिका आणि बोर्ड या दोन्ही ठिकाणी 'एलबीटी' भरावा लागणार आहे. त्यामुळे दुप्पट कर भरण्यास व्यापाऱ्यांचा विरोध आहे. ही बाब संजीव कुमार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यांनी व्यापाऱ्यांची ही अडचण असल्याचे मान्य केले. मात्र, केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन करावेच लागणार असल्याचेही नमूद केले. बोर्डातील अनेक व्यापाऱ्यांची दुकाने ही पुणे महापालिका आणि बोर्ड या दोन्ही ठिकाणी आहेत. त्यांनी महापालिकेच्या हद्दीतून बोर्डाच्या परिसरात माल आणल्यानंतर दोन्ही ठिकाणी 'एलबीटी' भरण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे बोर्डाच्या हद्दीत वस्तू महाग मिळणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इंदिरा आवास’चे वाजले ‘तीन तेरा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गरीब आणि गरजू कुटुंबीयांना इंदिरा आवास योजनेतील घरांसाठी जमीन उपलब्ध होत नसल्याने तीन वर्षांपासून सुमारे अठरा हजार लाभार्थी घरांच्या प्रतीक्षेत आहेत. या कुटुंबांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जमिनीचा वैयक्तिक लाभ देता येत नसल्याने त्यातून मार्ग काढण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांकडे बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील गरीब तसेच अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील कुटुंबांना इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून घरे दिली जातात. या घरांसाठी जमीन आणि त्यावर दोन लाख रुपयांपर्यंत खर्च करण्यास मंजुरी देण्यात येते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून एकाही लाभार्थ्याला इंदिरा आवास योजनेतील घर मिळालेले नाही.

इंदिरा आवास योजनेतील घरासाठी ७६ हजार ४४ कुटुंबांनी अर्ज केले होते. त्यातील ५७ हजार ३८१ लाभार्थ्यांना घरे देण्यात आली. मात्र, अजूनही १८ हजार ७३३ कुटुंबे घरांच्या प्रतीक्षेत आहेत.

इंदिरा आवास योजनेतील घरांसाठी जमिनीचा वैयक्तिक लाभ देता येत नसल्याने हा प्रश्न निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार वैयक्तिक लाभार्थ्याला जमीन देता नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु, ही पळवाट असल्याची टीका केली जात आहे. लाभार्थ्यांची सोसायटी करून गायरान आणि शासकीय जमीन देता येऊ शकते. मात्र, त्याबाबत कोणीही पुढाकार घेत नसल्याने योजना कागदोपत्री उरली आहे. गरीब कुटुंबांना शासकीय जमीन देणे शक्य आहे. त्यासाठी कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून मार्ग काढता येऊ शकतो. त्यामुळे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महावितरण’ने दिला पुणेकरांना सुखद धक्का

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नेहमीच करण्यात येणाऱ्या वाढीव वीजबिलांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर यंदा अनेक पुणेकरांना अपेक्षेपेक्षा कमी वीजबिले आल्याने आश्चर्याचा धक्का बसला आहे. ग्राहकांनी भरलेल्या सुरक्षा ठेवीवरील (सिक्युरिटी डिपॉझिट) व्याजाची रक्कम वीजबिलांमधून वळती करण्यात आल्याने हा दिलासा मिळाल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

गेल्या काही काळात वाढीव वीजबिले येणे हा नित्याचा प्रकार बनला होता. चुकीची वीजबिले वगळता बहुतांश घटनांमध्ये वेळोवेळी वाढणारे दर आणि वीजवापर यामुळे बिलांमध्ये वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकतीच अनेक पुणेकरांना वीजबिले आली. त्यामध्ये नेहेमीच्या बिलापेक्षा कमी रकमेचे बिल आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेक ग्राहकांना शून्य रकमेचे बिल, तर काहीजणांना वजा (मायनस) बिले आली आहेत.

या बाबत ग्राहकांनी चौकशी केली असता 'सिक्युरिटी डिपॉझिट'वरील व्याजाची रक्कम या बिलांमधून वळती करण्यात आल्याने बिले कमी झाल्याची माहिती देण्यात आली.

विजेचे दर वाढल्याने ग्राहकांच्या बिलांच्या रकमेत वाढ झाली. पर्यायाने डिपॉझिटच्या रकमेतही वाढ झाली. वीज कायदा आणि नियामक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांनुसार या डिपॉझिटच्या रकमेवर ग्राहकांना साडे नऊ टक्के दराने व्याज देण्यात येते. ही रक्कम थेट परत न करता दरवर्षी ग्राहकांच्या बिलातून वळती करण्यात येते. तसा उल्लेखही यंदाच्या वीजबिलांवर करण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तारीख काढून घेणार नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'राजकीय पक्षांचे किंवा खासगी संस्थांच्या कार्यक्रमांसाठी नाटक किंवा कलात्मक कार्यक्रमासाठी दिलेल्या नाट्यगृहाची तारीख काढून घेण्याचे प्रकार पुढील काळात होणार नाहीत,' असे आश्वासन महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी मंगळवारी दिले. खासगी संस्थांनी त्यांच्या कार्यक्रमांसाठी महापालिकेची इतर सभागृहे दिली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बालगंधर्व परिवाराच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराच्या ४७व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी धनकवडे बोलत होते. उपमहापौर आबा बागूल, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, महापालिकेचे मुख्य नाट्यगृह व्यवस्थापक भारत कुमावत, लक्ष्मीकांत खाबिया, आयोजक मेघराज राजेभोसले आदी या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेता मधु गायकवाड यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

'सुमारे साठ वर्षांच्या कारकीर्दीत कायमच नायकाची भूमिका साकारली. सहकलाकार व प्रेक्षकांमुळे रंगभूमीची सेवा करता आली. या पुरस्काराने आनंद झाला,' अशी भावना गायकवाड यांनी व्यक्त केली.

खासगी कार्यक्रमांसाठी बालगंधर्व रंगमंदिर व यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील तारखा काढून घेतल्या जात असल्याचे प्रकार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर म्हणाले, ' बालगंधर्व रंगमंदिर म्हणजे पुण्याचा मानबिंदू आहे. याच रंगमंचावरून अनेक कलाकार घडले. कला संवर्धनासाठीच महापालिकेने शहराच्या विविध भागात नाट्यगृहे, सभागृहे उभारली आहेत. नाट्यगृहांतून कलात्मक कार्यक्रमांना प्राधान्य दिले जाईल.'

नाटक व मराठी माणसाचे नाते अतुट आहे. कितीही टीव्ही मालिका असल्या तरी नाटकांविषयीचे प्रेम टिकून आहे. अपार कष्ट करून प्रेक्षकांना निखळ आनंद देणाऱ्या कलाकारांचा सन्मान करणे ही महत्त्वाची घटना आहे. तसेच कोणत्याही गोष्टींची जाणीव न ठेवण्याच्या काळात नाट्यगृहाचा वर्धापन दिन साजरा होणे कौतुकाची बाब असल्याचे पवार यांनी सांगितले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माणूसपणासाठी प्रवास करा : कोत्तापल्ले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रवास हा माणसातले माणूसपण समजून घेण्यासाठी करावा, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी मंगळवारी केले.

पुरंदरे प्रकाशनतर्फे डॉ. श्रीनिवास केळकर लिखित 'अनवट वाटा ः प्रवासाच्या, इतिहासाच्या आणि लोकजीवनाच्या' या पुस्तकाचे प्रकाशन कोत्तापल्ले यांच्या हस्ते झाले. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात हा कार्यक्रम झाला. गिरिकंद ट्रॅव्हलल्सच्या संचालिका शुभदा जोशी, पुरंदरे प्रकाशनचे अमृत पुरंदरे, डॉ. यशवंत पाठक, उज्ज्वला केळकर आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कोत्तापल्ले यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

'प्रवास म्हणजे जगणे समजून घेणे. प्रवासात देश, माणूस, संस्कृती समजावून घेणे गरजेचे आहे. लोकजीवन समजून घेतल्याशिवाय देश कळत नाही. लिहिणारा जेवढा समृद्ध तितके त्याचे लेखन सकस होते,' असे कोत्तापल्ले म्हणाले. हल्ली पालक मुलांना रेसचे घोडे बनवण्यातच धन्यता मानत आहेत, त्याचे सांस्कृतिक जीवनावर परिणाम होणार आहेत. प्रत्येकजण झापडे लाऊन जगण्याच्या पद्धतीमुळे आपल्याकडचा वैज्ञानिक दृष्टीकोनही कमी होत चालला आहे. दुसऱ्याची संस्कृती समजावून घेण्याची उदारता दाखवायला हवी, असेही ते म्हणाले.

सर्वसामान्य माणूस हा संस्कृतीचा नायक असतो. त्यामुळे भटकंती करताना हा माणूस अनुभवायला शिकले पाहिजे, असे पाठक म्हणाले. जोशी यांनी पर्यटनाच्या बदलत्या संकल्पनांबाबत संवाद साधला. प्रा. अरुण नूलकर यांनी निवेदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्य चळवळ व्यापक व्हावी

$
0
0

चिन्मय पाटणकर, पुणे पुणे शहराचे चहुबाजूंनी विस्तारीकरण होत असताना साहित्य चळवळही व्यापक होण्याची गरज आहे. शहरातील साहित्य चळवळीच्या केंद्रस्थानी असलेली महाराष्ट्र साहित्य परिषद त्यात महत्त्वाची भूमिका निभावू शकते. उपनगरांमध्ये शाखा सुरू करून साहित्य चळवळीचाही विस्तार केल्यास साहित्य-सांस्कृतिक दृष्टी निर्माण होण्यात मदत होईल.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या हडपसर शाखेचे नुकतेच पुनरुज्जीवन करण्यात आले. संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन झाले. या पार्श्वभूमीवर, उपनगरातील साहित्य चळवळीचाही महाराष्ट्र साहित्य परिषदेने विचार करण्याची गरज आहे. सद्यस्थितीत पुणे आणि परिसराचा विचार करता, मसापच्या कोथरूड (डहाणूकर कॉलनी), हडपसर, विमाननगर, पिंपरी चिंचवड, भोसरी व तळेगाव येथे शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून साहित्यविषयक उपक्रम करण्यात येतात. मात्र, औंध-बाणेर, सिंहगड रोड, बिबवेवाडी, वानवडी अशा उपनगरांमध्ये मसापच्या शाखा नाहीत हेही लक्षात घेतले पाहिजे. प्रत्येक उपनगरात वेगळी शाखा सुरू करण्यापेक्षा जवळच्या दोन-तीन उपनगरांमध्ये मिळून एक शाखा झाली, तरी त्याची उपयुक्तता दिसून येईल. पुण्यात झालेल्या साहित्य संमेलनातून शिल्लक राहिलेला निधी परिषदेकडे आहे. तसेच परिषदेला सरकारकडून दरवर्षी अनुदान मिळते. शाखांच्या माध्यमातून जोडलेल्या सभासदांच्या शुल्कातील काही रक्कमही परिषदेलाच मिळते. त्यामुळे मसाप आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. त्याचा विनियोग शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीसाठी केल्यास ते कौतुकाचे काम ठरेल.

शहरातील साहित्य-सांस्कृतिक चळवळ आजही ठराविक भागातच एकवटलेली आहे. शहराचा विस्तार होत असताना, पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात असताना सांस्कृतिक चळवळीच्या विकेंद्रीकरणाचाही विचार व्हायला हवा. त्यासाठी साहित्य-सांस्कृतिक संस्थांनीच पुढाकार घेतला पाहिजे. उपगनगरांमध्ये काही संस्था कार्यरत आहेत. मात्र, त्यांचे उपक्रम पुरेशा प्रमाणात रसिकांपर्यंत पोहोचत नाही. उपनगरांतील संस्थांच्या मदतीने मसापला उपक्रम करणेही शक्य आहे. तसेच तेथील संस्थांनाही बळ मिळेल.

उपगनरीय शाखांमुळे नवोदित कलावंत, साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध होईल. छोट्या स्तरावरील संमेलने, चर्चासत्रे, कार्यशाळा, साहित्यिक-कलावंताशी संवाद, वाचक मेळावे अशा उपक्रमांनी या शाखांमध्ये वातावरण निर्मिती होऊ शकते. आजही उपनगरांमध्ये असे वातावरण नाही. उपनगरांतील साहित्यप्रेमींना असे कार्यक्रम हवे आहेत. मात्र, ते करणाऱ्या संस्था तेथे नाहीत. ती उणीव भरून काढणे मसापला शक्य आहे. साहित्याच्या भविष्याचा विचार करून तरूण साहित्यांना प्रोत्साहन देणे, त्यांची पुस्तके प्रकाशित करणे याचाही विचार करण्यास हरकत नाही. अशा उपक्रमांतून साहित्यालाच बरकत येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौहान यांच्याशी एकदा तरी बोला!

$
0
0

टॉम ऑल्टर ज्येष्ठ अभिनेते टॉम ऑल्टर यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळ अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती होणे अयोग्यच आहे. तुमच्या मागण्यांबाबत माहिती व प्रसारण मंत्रालय, मंत्री अरुण जेटली, अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यायला काहीच हरकत नाही. मात्र, किमान एकदा चौहान यांच्याशी समक्ष बोला,' असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते व एफटीआयआयचे माजी विद्यार्थी टॉम ऑल्टर यांनी मंगळवारी विद्यार्थ्यांना दिला.

एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचा संप अकराव्या दिवशीही सुरूच होता. ज्येष्ठ अभितेने टॉम ऑल्टर यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. तसेच मार्गदर्शनही केले. अभिनेता जयदीप अहलावत या वेळी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असून, आता त्याबाबत देशभरात चर्चा सुरू झाल्याचेही ऑल्टर यांनी सांगितले. 'चौहान यांची नियुक्ती ज्या प्रकारे झाली, ती प्रक्रिया अयोग्य आहे यात काहीच वाद नाही. चौहान हे चित्रपट प्रशिक्षणातील तज्ज्ञ नाहीत. त्यांच्या नियुक्तीमागे काही राजकीय विचार आहे, हा वेगळा मुद्दा झाला. मात्र, मी चौहान यांना व्यक्तिशः ओळखतो. त्यामुळे संप, आंदोलन करतानाच किमान एकदा त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. त्यांची नेमकी भूमिका काय आहे हे समजून घेतले पाहिजे,' असे ऑल्टर म्हणाले. विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास त्यांच्याशी संवाद साधून देण्यास आपण तयार असल्याचेही ऑल्टर यांनी स्पष्ट केले. चौहान यांची नियुक्ती करून सरकार चुकले आहे, तर त्याची कबुली द्यायला काय हरकत आहे! मात्र, हा प्रश्न चर्चेतूनच सुटू शकतो, असेही मत ऑल्टर यांनी मांडले.

'प्रत्येक संस्थेची एक परंपरा असते. त्याला अनुसरून नियुक्ती व्हायला हवी. कलाकारांवर बंधने येतील अशी नियुक्ती असू नये. चौहान यांची अध्यक्षपदी झालेली नियुक्ती चुकीची आहे,' असे अहलावत यांनी सांगितले.


चित्रपटात भेदभाव कशाला?

विद्यार्थ्यांनीही समांतर आणि व्यावसायिक चित्रपट असा भेद करणे अयोग्य आहे. चित्रपट हा चित्रपट असतो. एफटीआयआयचेच कित्येक माजी विद्यार्थी आज पूर्ण व्यावसायिक चित्रपट करतात. प्रत्येकाने वेगवेगळ्या धाटणीचे काम करणे महत्त्वाचे आहे. सर्वांनीच एकाच प्रकारचे चित्रपट करण्यात अर्थ नाही,' असेही अहलावत यांनी विद्यार्थ्यांना सुनावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तात्पुरता प्रवेश घेणे गरजेचेच

$
0
0

करावी प्रवेशाची गुणवत्तायादी वेबसाइटवर (संग्रहित छायाचित्र)

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अकरावी प्रवेशासाठीच्या http://pune.fyjc.org.in या लिंकवरून ही यादी उपलब्ध करून दिली जाणार आहे. गुणवत्ता यादीमध्ये नाव आल्यावर विद्यार्थ्याने आपल्याला मिळालेल्या ज्युनिअर कॉलेजमध्ये मूळ प्रमाणपत्रे आणि त्याच्या फोटोकॉपी कॉलेजच्या प्रवेशअर्जाला जोडून तात्पुरता प्रवेश निश्चित करणे गरजेचे आहे.

यासाठी केवळ ५० रुपये प्रवेश शुल्क भरून विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. विद्यार्थ्याने विहित मुदतीत प्रवेश न घेतल्यास, तो प्रक्रियेबाहेर फेकला जाईल. जे विद्यार्थी तात्पुरते प्रवेश निश्चित करतील, त्यांनाच पुढील टप्प्यामध्ये बेटरमेंटच्या संधीचा लाभ घेता येणार असल्याचेही जाधव यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर कम्प्युटराइज्ड पावती घ्यावी, तसेच 'बेटरमेंट' मिळाल्यास, आधीच्या कॉलेजमधील प्रवेश रद्द करावेत, आणि पुढील पुढील प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे, अशी माहिती अकरावी केंद्रीय प्रवेश समितीचे अध्यक्ष आणि पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयटी इंजिनीअर व्हायचं माझं स्वप्न आहे’

$
0
0

अनिकेत कोनकर, पुणे

'मी आयटी इंजिनीअर व्हायचं आधीच ठरवलं होतं. त्यासाठी मी 'नूमवि'तच कम्प्युटर सायन्सला प्रवेश घेतलाय' ....'पुढे काय करायचं ठरवलं आहेस,' हा प्रश्न पूर्ण व्हायच्या आधीच चैतन्य तापसेचे हे आत्मविश्वासपूर्ण उत्तर आले. घरची परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही आपले इंजिनीअर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने त्याने दहावीत ९४.४० टक्के गुण मिळवले.

'तुमच्या घरात कम्प्युटरची काही पार्श्वभूमी नसताना तुला त्यात आवड कशी निर्माण झाली,' असे विचारल्यावर तो म्हणाला, 'आम्हाला पहिलीपासूनच शाळेत कम्प्युटर शिकवत होते. अगदी चांगल्या पद्धतीने शिकवलं जात असल्यानं मला आवड निर्माण झाली आणि मी त्यातच पुढचं शिक्षण घ्यायचं ठरवलं. शिवाय गणित आणि विज्ञान हे विषयही मला आवडतात. बावडेकर मॅडम, जगदाळे मॅडम, तसंच गणिताच्या जंगम मॅडम आणि संस्कृतच्या देशपांडे मॅडम यांचाही माझ्या यशात महत्त्वाचा वाटा आहे.' चैतन्यला संस्कृतात ९७, गणित आणि समाजशास्त्रात ९८, तर विज्ञानात ९० मार्क मिळाले आहेत.

'परीक्षेत मनासारखं यश मिळालं नाही तर आत्महत्या करणाऱ्या मुलांबद्दल ऐकलं असल्यानं मी चैतन्यला 'किती मार्क मिळायचेत ते मिळू देत, अजिबात टेन्शन घेऊ नको,' असं सांगितलं होतं; पण कठीण परिस्थिती असतानाही त्यानं स्वतः सांगितल्याप्रमाणे ९० टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळवून दाखवले. आमच्या घरात एवढं यश आतापर्यंत कोणीच मिळवलं नव्हतं,' असं सांगताना त्याच्या आईच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते. आजी-आजोबांनीही चैतन्यच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला.

'अभ्यास करताना मी एकेक विषय घेऊन तो पूर्ण करायचो आणि नंतर दुसऱ्या विषयाला हात घालायचो. मी वेळापत्रक अशा पद्धतीनं बसवलं होतं, की परीक्षेच्या आधीचे दोन महिने मी केवळ उजळणी करत होतो. प्रत्येक विषय केवळ पाठांतर न करता समजून घेण्यावर भर दिल्यामुळे मी एवढं यश मिळवू शकलो,' असे चैतन्य नमूद करतो.

चैतन्यच्या शिक्षणासाठी आतापर्यंत नातेवाइक, तसेच अनेक हिंतचिंतकांनी मदत केली आहे. वडील गेल्यामुळे क्लासचालकांकडून फीमध्ये २५ टक्के सवलत देण्यात आली. तसेच नातेवाइकांनीही मदत केली. फक्त हजारभर रुपये त्याला भरावे लागले. आपल्या घराच्या मालकांनीही गेली पाच वर्षे घरभाडे घेतलेले नाही, असे चैतन्यने सांगितले. त्याची इच्छाशक्ती आणि कष्ट घेण्याची तयारी दांडगी असली, तरी पुढची वाटचाल त्याच्यासाठी आर्थिकदृष्ट्या बिकट आहे. त्याच्या जिद्दीच्या पंखांना लक्ष्मीचे बळ लाभले, तर भविष्यात तो आणखी उंच भरारी घेऊ शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माळशेज घाटात दरड कोसळली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जुन्नर



माळशेज घाटात मंगळवारी बोगदा ते पॅगोडा पॉइंटच्या दरम्यानच्या रस्त्यावर दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक कोंडी विस्कळित झाली आहे.

दरड कोसळल्यानंतर हा मार्ग तातडीने सुरू व्हावा यासाठी आपत्कालीन यंत्रणा कामाला लागली आहे. घाटात कोसळलेली दरड हटवून रस्ता मोकळा करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विकास मंडळाचे उपकार्यकारी अभियंता सरोदे, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक एस. के. चौधरी यांच्या पथकाकडून प्रयत्न सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळासाठी पर्याय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्याच्या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे चाक केवळ चर्चा आणि शेतकऱ्यांच्या विरोधात अडकले असल्याने खेडमधील प्रस्तावित जागेसह आणखी दोन ठिकाणी हे विमानतळ उभारण्याचा पर्याय समोर आला आहे. खेडमध्ये आणखी विरोध झाल्यास हे नियोजित विमानतळ या नव्या ठिकाणांवर उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर ते चौफुला आणि हवेलीसह मावळच्या परिसराची नव्या विमानतळाच्या दृष्टीने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तानाजी सत्रे, सचिव पी. एस. मीना, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी नुकतीच हेलिकॉप्टरने पाहणी केली. या पाहणीअंती विमानतळासाठी सुयोग्य अशा दोन नव्या ठिकाणांचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे.

खेडमधील आर्थिक विकास क्षेत्रासाठी (सेझ) १७०५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यातील ८१२ हेक्टर जमीन आणि लगतच्या निमगाव, दावडी, कनेरसर व केंदूर या गावांतील ४४७ हेक्टर जमिनीवर विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, या विमानतळाला शेतकरी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे. यापूर्वी खेडमधील चाकण, चांदूस व कोये-पाईट या तीन ठिकाणांना स्थानिक पातळीवर विरोध झाला. त्यामुळे खेडची जागा निवडण्यात आली. परंतु, या जागेलाही विरोध होत असल्याने विमानतळासाठी नव्या जागांचा पर्याय ठेवण्यात आला आहे.

विमानतळासाठी जागा निवडताना अक्षांश-रेखांशासह सपाट जमीन, पाण्याची मुबलक उपलब्धता, शहरापासून नजिकचे अंतर, जुन्या विमानतळाच्या रडार क्षेत्राबाहेर असे अनेक निकष पाहिले जातात. या सर्व निकषांत बसणारी जमीन एका ठिकाणी मिळणे अवघड आहे. त्यामुळे शहरापासून ४५ ते ५० किलोमीटर लांब अंतरावर विमानतळासाठी जागा निवडावी लागते. बेंगलोरचे विमानतळही शहरापासून लांब आहे. अशा विमानतळावर जाण्यासाठी स्वतंत्र रस्ते, पूल करता येऊ शकतात आणि चाळीस ते पन्नास मिनिटात या अंतरावर पोहोचता येऊ शकते. त्या दृष्टीने योग्य अशी दोन ठिकाणे मिळाली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवसभर पावसाची जोरदार हजेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात दिवसभर पडलेल्या संततधार पावसाने पुणेकरांनी मंगळवारी 'टिपिकल' पावसाळी वातावरणाचा अनुभव घेतला. सकाळपासूनच शहराच्या विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. दिवसभरातील काही वेळ वगळता सतत हलक्या सरी कोसळत होत्या. पुढील २४ तासात हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचे पुणे वेधशाळेने सांगितले आहे.

पुण्यामध्ये दिवसभरात २५.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शहरात खऱ्या अर्थाने रविवारी पावसाने दमदाजर हजेरी लावली होती. एक दिवसात ६० मिमी पाऊस पडला. सोमवारी (२२ जून) पावसाने ब्रेक घेतला होता. पण मंगळवारी (२३ जून) पुन्हा जोर धरला. पुढील दोन दिवस शहरात आकाश ढगाळ राहणार असून दिवसभर कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

मान्सून संपूर्ण राज्यात सक्रीय झाला असून कोकणासह, मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या चोवीस तासात मध्यमहाराष्ट्रात मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पडला. राज्यात मंगळवारी सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरमध्ये पडला. दरम्यान अरबी समुद्रातील दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीलगतचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. पुढील तीन दिवसात मध्यप्रदेशचा काही भाग, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाना आणि दिल्ली तसेच राजस्थानाच्या काही भागात मान्सून दाखल होण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आहे.

महाबळेश्वरमध्ये

६८१ मिलिमीटर

महाबळेश्वरमध्ये राज्यातील सर्वाधिक म्हणजेच तब्बल १८० मिमी पावसाची नोंद झाली. महाबळेश्वरमध्ये गेल्या तीन दिवसात तब्बल ६८१ मिमी पाऊस पडला आहे. दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तेथील जनजीवन विस्कळित झाले आहे. कर्माळामध्ये १३० मिमी, पोलादपूर येथे ११०, उल्हासनगर, माथेरान, चंदगड येथे ९० मिमी पाऊस पडला.









शनिवार पेठेत रस्ता खचला

शहरातील रस्ते खोदाईनंतर करण्यात आलेली दुरुस्तीची कामे निकृष्ट दर्जाची झाल्यावर मंगळवारी पुन्हा शिक्कामोर्तब झाले. शनिवार पेठेतील ओंकारेश्वर रस्त्यावर केलेल्या तात्पुरत्या मलमपट्टीत पालिकेचा खडीचा ट्रकच फसला.

ओंकारेश्वर मंदिर ते नारायण पेठ पोलिस चौकीदरम्यानच्या रस्त्यावर ड्रेनेज लाइनचे काम करण्यात आले होते. त्यानंतर, रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण करण्यात आले. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले होते. पालिकेने ते तातडीने बुजविले. मंगळवारी सकाळी मात्र खडी घेऊन जाणारा पालिकेचा ट्रकट येथील खड्ड्यामध्ये फसला. ट्रकची चाकेच रुतून बसल्याने अखेर क्रेन बोलावून फसलेला ट्रक बाहेर काढण्यात आला. हे काम करताना पुरेशी काळजी घेण्यात न आल्यानेच वारंवार रस्ता खचण्याचे प्रकार घडत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली. परंतु, एखादा रस्ता खचला तर त्याविषयी लगेच तक्रार करण्याची गरज नाही, अशा शब्दांत संबंधित पालिकेच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा दावा फेटाळून लावला.





धरणसाठ्यात अर्धा टीएमसीने वाढ

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत झालेल्या दमदार पावसामुळे खडकवासला प्रकल्पाचा पाणीसाठा एका दिवसात ०.४२ अब्ज घनफुटांनी (टीएमसी) वाढला. या वाढीमुळे प्रकल्पाचा एकूण पाणीसाठा ३.८३ टीएमसी झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर धरणात ७५ मिलिमीटर, पानशेत व वरसगाव धरणात प्रत्येकी ५८ मिमी व खडकवासला धरणात २७ मिमी पाऊस पडला. खडकवासला साखळी प्रकल्पातील धरणांच्या परिसरात गेल्या तीन दिवसांपासून दमदार पाऊस होत आहे. तीन दिवसांपूर्वी या प्रकल्पात फक्त २.२६ टीएमसी पाणीसाठा होता. या पावसामुळे धरणांचा पाणीसाठा तब्बल दीड टीएमसीने वाढला आहे. टेमघर धरणात उपयुक्त पाणीसाठ्याला सुरुवात झाली असून या धरणात ०.१० टीएमसी म्हणजे २.७४ टक्के साठा झाला आहे. पानशेतमध्ये २.५९ टीएमसी (२४.३१ टक्के), वरसगाव धरणात ०.७४ टीएमसी (५.७८ टक्के) व खडकवासला धरणात ०.४० टीएमसी (२.३० टक्के) पाणीसाठा आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरणसाठा वाढण्यास मदत होणार आहे.





महामार्गावरील धोका कायम

पुणे : दोन वर्षांपूर्वी कात्रज परिसरातील शिंदेवाडी येथे पाण्याचा प्रचंड लोंढा महामार्गावर येऊन मायलेकी वाहून गेल्या होत्या. डोंगरांवरील खोदकाम, अतिक्रमणांचा अडथळा आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी पुरेशा व्यवस्थेचा अभाव, यामुळे ही दुर्घटना ओढवली. त्यानंतरदेखील या परिसरातील स्थिती कायमच आहे.

'मटा'ने काही दिवसांपूर्वी फोटो प्रसिद्ध करून त्याकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर मंगळवारी कोसळलेल्या दरडीमुळे महामार्गावरील

धोका कायमच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे फक्त आदेश

शिंदेवाडीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी रिस्पॉन्स टाइम कमी करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी सौरव राव यांनी मंगळवारी सर्व तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यांना दिल्या; परंतु असे कागदोपत्री आदेश बजावतानाच डोंगरफोड रोखण्यासाठी कडक कारवाई करण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरले आहे,

हेच मंगळवारच्या दरडकोसळीने स्पष्ट केले आहे.

महामार्गाच्या आजूबाजूची अतिक्रमणे काढण्यात आली आहेत; तसेच आपत्ती निवारण कक्ष सुरू करण्यात आले आहेत, असे राव यांनी सांगितले. दरड कोसळण्याच्या दुर्घटना वाढत असून, असा प्रकार घडल्यास तत्काळ मदतकार्य सुरू करावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या.

राव यांनी मंगळवारी प्रांतधिकारी व तहसिलदारांची बैठक घेतली. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. पावसामुळे खंडाळा आणि वेल्ह्यात रस्त्यावर दरडी कोसळण्याच्या घटनांनंतर अधिकाऱ्यांनी तातडीने जागेवर जाऊन मदतकार्य सुरू केले होते, असे त्यांनी सांगितले.





कोथरूड, वारज्यात वीज खंडित

'महापारेषण'च्या फुरसुंगी ते कोथरूड १३२ केव्ही वाहिनीचा वीजपुरवठा बंद पडल्याने मंगळवारी कोथरूड, वारजे, डेक्कन आदी परिसरातील पन्नास टक्के भागातील वीजपुरवठा सव्वादोन तास खंडित झाला. 'महापारेषण'च्या फुरसुंगी उपकेंद्गातून १३२ केव्ही वाहिनीद्वारे कोथरूड विभागात वीजपुरवठा करण्यात येतो. मंगळवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास न्याती परिसरात मृत पक्षी या वाहिनीच्या संपर्कात ( विद्युत बाधित क्षेत्र) आल्याने वीजपुरवठा बंद पडला. परिणामी कोथरूड विभागात होणारा वीजपुरवठा खंडित झाला. सकाळी साडेनऊपर्यंत डेक्कन व कोथरूड परिसरातील पन्नास टक्के भागात एनसीएल व गणेशखिंड उपकेंद्गातून पर्यायी वीजपुरवठा सुरू करण्यात आला. 'महापारेषण'कडून पावसामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून १३२ केव्ही वाहिनीची पाहणी करण्यात आली व सकाळी अकरा वाजता ही वाहिनी कार्यान्वित झाली. त्यानंतर कोथरूड विभागातील सर्व परिसरात वीजपुरवठा सुरळीत झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका नेमणार तंत्रज्ञान सल्लागार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या सर्व विभागांमधील कम्प्युटर प्रणालीच्या देखभाल दुरुस्तीसाठी माहिती तंत्रज्ञान सल्लागाराची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. वर्षाला या सल्लागाराला १ कोटी ५७ हजार रुपये प‌ालिका मोजणार आहे.

महापालिकेच्या कामामध्ये कम्प्युटरच्या माध्यमातून गतिमानता, अद्यावतपणा तसेच पारदर्शकता यावी यासाठी आवश्यक ती यंत्रणा अद्यावत ठेवावी, असा अध्यादेश राज्यसरकारने एप्रिल महिन्यात काढून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना महापालिकांना दिलेल्या आहेत. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान सल्लागाराची नेमणूक करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. मंगळवारी झालेल्या समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

पालिकेने ई-गर्व्हन्सनचा व्हिजन मसुदा तयार केला आहे. त्याअंतर्गत डाटा सेंटर विकसित करणे, ई-गर्व्हनन्सची अंमलबजावणी, नेटवर्क डिझाइन, महापालिकेची वेबसाइट विकसित करणे, बेव पोर्टल, टेडा रिकव्हरी विकसित करणे, कॉल सेंटर सुरू करणे आणि सॅटेलाइटमार्फत मिळकतींचे सर्वेक्षण असे प्रकल्प करण्यात येणार आहेत. या सल्लागारांचा कालावधी एक वर्षासाठी राहणार असून, त्यांना मानधनापोटी महिन्याला १३ लाख १० हजार रुपये याप्रमाणे एका वर्षाला १ कोटी ५७ लाख रुपये देण्याचे प्रस्तावित करण्यात आले असल्याचे स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांनी सांगितले. पीडब्ल्यूसी या कंपनीमार्फत हे काम करण्यात येणार असून महापालिकेच्या सर्व विभागातील कम्प्युटर प्रणाली तसेच त्याची देखरेख, दुरुस्ती अशी कामे या सल्लागारांकडून करण्यात येणार आहे. ही नेमणूक करताना करारानामा केला जाणार असल्याचे कदम यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत नळजोडांना ‘अभय’

$
0
0

दंड भरून अधिकृत करण्याची सुविधा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील अनधिकृत नळजोडांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने एक इंच व्यासापर्यंतचे सर्व नळजोड अधिकृत करण्यास सर्वसाधारण सभेने मंगळवारी एकमताने मान्यता दिली. ही सुविधा ठराविक कालावधीसाठीच मर्यादित राहणार असून, त्यानंतर अनधिकृत नळजोड आढळून आल्यास फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरातील अधिकृत नळजोडांएवढेच अनधिकृत नळजोड असल्याचा अंदाज वर्तविला जातो. मात्र, त्यावर कोणत्याही स्वरूपाची कारवाई केली जात नसल्याने अनधिकृत नळजोड दंड आकारून नियमित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावात अनेक त्रुटी आहेत, अनधिकृत नळजोड नियमित करून प्रशासन बेकायदेशीर गोष्टी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहे, अशा शंका सर्वपक्षीय सदस्यांनी उपस्थित केल्या. बांधकाम पूर्णत्वाचा दाखला वेळेवर मिळत नाही; कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, त्यामुळे अनधिकृत नळजोड घेण्याचे प्रमाण अधिक आहे. अनधिकृत नळजोडांमुळे शहरात नेमका पाण्याचा वापर किती होतो, हे समजत नाही, असा खुलासा पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी केला.

प्रशासनाच्या प्रस्तावात ही योजना किती कालावधीसाठी असेल, याचा उल्लेख नसल्याबद्दल टीका करून ही योजना अंमलात आणायची झाल्यास त्याला ठराविक कालमर्यादा असली पाहिजे, असा आग्रह विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी धरला. त्यानंतर अनधिकृत नळजोड आढळून आल्यास दहा पट दंड आकारा, अशी सूचना केली. अखेर, आयुक्त कुणाल कुमार अनधिकृत नळजोड अधिकृत करून घेण्यासाठी चार महिन्यांची मुदत देण्यात येईल; अनधिकृत नळजोडांचे सर्वेक्षणही केले जाईल, असे स्पष्ट केले. त्यानंतरही, सरसकट दोन इंचांपर्यंतचे सर्व नळजोड अधिकृत करण्याऐवजी एक इंचापर्यंतचे नळजोड अधिकृत करण्याची उपसूचना उपमहापौर आबा बागूल, अरविंद शिंदे आणि बाबू वागसकर यांनी दिली. जुने नळजोड बदलून नवीन देताना बाराशे रुपये आकारू नयेत, अशी राजू पवार व अशोक येनपुरे यांची उपसूचना मंजूर करण्यात आली.





शहर हद्दीबाहेर बेकायदा नळ

पुणे : शहराच्या हद्दीबाहेर काही बांधकाम व्यावसायिकांना बेकायदेशीरपणे नळ कनेक्शन देण्यात आल्याचा आरोप स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेत केला. त्यावर, तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.

महापालिकेच्या हद्दीबाहेर ग्रामपंचायतींना नळ कनेक्शन देण्याचा अधिकार पालिकेला आहे; पण बेकायदेशीर रीतीने बांधकाम व्यावसायिकांच्या दोन स्कीम्सना कनेक्शन देण्यात आल्याचा आरोप तांबे यांनी केला. तत्कालीन आयुक्तांनी आदेश दिल्यामुळे एकदा परवानगी दिली, तीच ग्राह्य धरून पुढील बांधकामालाही परवानगी देण्यात आल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच, तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यावर, पालिका आयुक्तांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कात्रज घाटात ‘टेकडीफोडीची’ दरड

$
0
0

पुणे ः लँडमाफियांनी केलेल्या अनिर्बंध खोदकामामुळे कात्रज परिसरातील डोंगर धोकादायक होत असल्याबाबतची भीती मंगळवारी खरी ठरली. शिंदेवाडी येथील नवीन बोगद्याच्या सुरूवातीलाच पुण्याकडे येणाऱ्या लेनवर दरड कोसळण्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. दोघे दुचाकीस्वार त्यामध्ये जखमी झाले आहेत. वाहतूक पोलिसांनी राडारोडा हलवल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. सिंहगड, खंडाळा, माळशेजनंतर पुण्याजवळ दरड कोसळण्याची ही तिसरी घटना आहे.

मुशरफ एस. के. आणि प्रवीण भोसले असे जखमी झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत. मुशरफ यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर भोसले किरकोळ जखमी झाले आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर राडारोडा पडल्याने जवळपास अर्धा तास वाहतूक खोळंबली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या ठिकाणचा भाग पुन्हा कोसळण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिसांनी काही काळ केवळ एकच लेन सुरू ठेवली होती. पुन्हा दरड कोसळणार नाही, याची खातरजमा केल्यानंतर सांयकाळच्या सुमारास उर्वरित दोन्हीही लेन सुरू करण्यात आल्या. बांधकाम विभागाकडून या ठिकाणची पाहणी करण्यात येणार होती, अशी माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावीची पहिली यादी आज

$
0
0

प्रवेशाच्या वेबसाइटवरून विद्यार्थ्यांना मिळणार माहिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील अकरावीच्या केंद्रीय प्रवेशांसाठीची पहिली गुणवत्ता यादी आज (२४ जून) सायंकाळी ५ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. या यादीनुसार विद्यार्थ्यांना येत्या शनिवारपर्यंत (२७ जून) आपले प्रवेश अंतिम करावे लागणार आहेत. मिळालेले कॉलेज पसंतीचे नसले, तरी तिथे तात्पुरता प्रवेश घेणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसे न केल्यास विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेतून बाहेर फेकले जातील आणि बेटरमेंटची संधी मिळणार नाही, असे प्रवेश समितीने म्हटले आहे.

अकरावीच्या केंद्रीय प्रवेश समितीने विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ दिली होती. त्यामुळे अकरावीचे कॉलेज पातळीवरील प्रवेश करण्यासाठीच्या प्रक्रियेच्या सर्व टप्पेही एक दिवस पुढे ढकलले जाणार होते. त्यानुसार, अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी २५ जूनला जाहीर करण्याचे धोरण समितीने निश्चित केले होते. मात्र, त्यापूर्वीच त्यासाठीची सर्व कार्यवाही पूर्ण झाल्याने, पूर्वनियोजित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल न करता, समिती बुधवारीच अकरावीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करणार आहे. समितीचे अध्यक्ष आणि पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'भ्रष्टाचार निर्मूलना'चेच ‘निर्मूलन’ होणार

$
0
0

रोहित आठवले, पिंपरी

आपल्या संस्थेच्या नावात भ्रष्टाचार निर्मूलनाचा समावेश करून प्रत्यक्षात मात्र खंडणी उकळण्याचा उद्योग करण्याच्या घटना उघडकीस आल्याच्या पार्श्वभूमीवर धर्मादाय आयुक्तांनी 'भ्रष्टाचार निर्मूलन' या नावाचेच निर्मूलन केले आहे! संस्थेच्या नावातील 'भ्रष्टाचार निर्मूलन' हे शब्द वगळण्यासाठी आयुक्तांनी संबंधित संस्थांना पंधरा दिवसांची मुदत दिली आहे. सर्वच संस्थांसाठी हा नियम असल्याने भ्रष्टाचारविरोधी चळवळीचे अग्रणी अण्णा हजारे यांच्या 'भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास' या संस्थेलाही नाव बदलण्याची नोटीस बजावण्यात आली आहे!

ऑल इंडिया अँटीकरप्शन ब्यूरो, भ्रष्टाचार निर्मूलन समिती, भ्रष्टाचार दक्षता अशा नावांखाली विविध संस्थांची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली आहे. पुणे जिल्हा हे कार्यक्षेत्र असलेल्या धर्मादाय सहआयुक्तालयाकडून सोळा संस्थांना याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस प्राप्त होताच संस्थांनी पुढील पंधरा दिवसात आपल्या संस्थेचे नाव बदलून घ्यावे, असे आदेश सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

'धर्मादाय आयुक्तांकडे एखाद्या सामाजिक संस्थेची नोंद करून सामान्यांना वेठीस धरण्याचे प्रकार घडले असून, तशा काही तक्रारी देखील प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. तर दुसरीकडे अशा काही संस्थांनी चांगली कामगिरी करत लोकांमध्ये परिवर्तन आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, कोणती संस्था चांगले काम करीत आहे आणि कोणती संस्था कशा प्रकारे एखाद्याला वेठीस धरत आहे हे तपासणे शक्य नाही. त्यामुळे सरसकट सर्व संस्थांना नोटीस बजावण्यात आली आहे,' असे सूत्रांनी 'मटा'ला सांगितले. काही ठराविक संस्थांच्या खंडणीखोरीचा फटका चांगले काम करणाऱ्या संस्थांनाही यामुळे बसणार आहे.

संस्थेची नोंदणी करून विविध जिल्हा, तालुका, शहर, गाव पातळ्यांवर अनेकांनी समित्या थाटल्या आहेत. त्यानुसार शहर अध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष किंवा प्रेसिडेंट-व्हाईस प्रेसिडेंट अशी पदेही निर्माण केली आहेत. अशांकडून ब्लॅकमेलिंगचा प्रकार होत असल्याचेही सांगण्यात आले. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सरकारच्या यंत्रणा आहेत. हे सामाजिक संस्थांचे काम नाही, त्यामुळे यापुढील काळापासून संस्थांच्या नावात बदल करून घ्यावेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिलांच्या नावाखाली लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या कर्मचाऱ्यांकडून वैद्यकीय बिलांच्या नावाखाली लूट चालली असून, खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्याची बिले सादर करून अनेक कर्मचारी लाखो रुपयांचा बिलांचा परतावा घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे यापुढे बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलने खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याची शिफारस केली, तरच संबंधित कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या वैद्यकीय उपचारासाठी झालेला खर्च दिला जाणार आहे.

बोर्डाचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय उपचारासाठी होणारा खर्च बोर्डाकडून देण्यात येतो. मात्र, खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन अनेक कर्मचारी लाखो रुपयांची बिले बोर्डाकडे सादर करतात. खासगी मेडिकल दुकानातून औषधांची खरेदी करून त्या बिलांचा परतावा देण्याचीही मागणी करतात. बोर्डाकडून आतापर्यंत अनेक कर्मचाऱ्यांची बिले मंजूर करण्यात आली आहेत. हे प्रमाण वाढत असल्याने त्यावर बंधन आणण्यासाठी आता आजारी असलेल्या प्रत्येक कर्मचारी किंवा त्याच्या कुटुंबीयांना उपचारासाठी सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागणार आहे. या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी व्यवस्था नसल्यास बोर्डाशी संलग्न असलेल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याबाबतची शिफारस आवश्यक आहे. बोर्डाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शिफारस केल्यानंतरच संबंधित रुग्णांवर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार करता येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बोर्डाने खासगी हॉस्पिटलची यादी निश्चित केलेली आहे. बोर्डाच्या हॉस्पिटलमध्ये उपचाराची व्यवस्था नसली, तर त्याच यादीतील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करावे लागणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

बोर्डाच्या विभागातून औषध खरेदी बंधनकारक

पेशंटवर तातडीने उपचार करण्याची आवश्यकता असल्यास संबंधित यादीतील खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना दाखल करता येणार आहे. त्या रुग्णांची वैद्यकीय बिले मंजूर केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून नमूद करण्यात आले. वैद्यकीय बिलांबरोबरच खासगी मेडिकल दुकानांतून खरेदी केलेल्या औषधांची बिले बोर्डाकडे सादर करून परतावा घेण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. त्यामुळे आता बोर्डाच्या औषध विभागातून औषधांची खरेदी करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनी परस्पर खासगी मेडिकल दुकानांतून खरेदी केल्यास, त्यांची बिले नामंजूर होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘FTII’च्या विद्यार्थ्यांचे आत्मपरीक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांनी आपल्या आंदोलनाबाबत आत्मपरीक्षण केले आहे. अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या गजेंद्र चौहान यांना यापुढे लक्ष्य न करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला असून, मंडळाच्या नियुक्तीची प्रक्रिया पारदर्शी करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. नियुक्त केलेली समितीच बरखास्त करून पारदर्शी पद्धतीने अधिक चांगल्या जाणकारांचा समावेश असलेल्या नव्या समितीची नियुक्ती करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे.

इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी अमेय गोरे याने या विषयी 'मटा'ला माहिती दिली. 'नव्या नियामक मंडळाच्या नियुक्तीने एफटीआयआयचे भगवीकरण होत असल्याचा आक्षेप घेत एकीकडे विद्यार्थी आंदोलन करत असताना काही विद्यार्थ्यांना भगवीकरण म्हणजे काय हेच माहीत नसल्याचे जाणवले. त्यामुळे स्टुडंट्स कौन्सिलच्या बैठकीत त्यावर चर्चा करण्यात आली. त्यात आंदोलनाला राजकीय रंग येऊ लागल्याचे लक्षात आल्याने आम्हालाच आत्मपरीक्षण करणे आवश्यक वाटले. आमचे आंदोलन राजकीय संघटनांकडून अजून वेगळ्या वाटेवरून जाऊ नये, या विचाराने आम्ही वेगळा विचार केला. आता कोणत्याही राजकीय संघटनेला संस्थेत प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे.'

'आंदोलन करताना अध्यक्षपदी नियुक्ती झालेले गजेंद्र चौहान, त्यांनी केलेल्या चित्रपटांचा दर्जा या मुद्द्यांचा आंदोलनात समावेश न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांनी चित्रपटात काम केलेले असले, तरी त्यांचा चित्रपट प्रशिक्षणाशी काहीही संबंध नाही हेही तितकेच खरे आहे. मात्र, आमचा मूळ आक्षेप सरकारच्या प्रक्रियेवर आहे. नियुक्तीची प्रक्रिया पारदर्शी असली पाहिजे. एफटीआयआयसारख्या मान्यवर आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थेच्या नियामक मंडळाची नियुक्ती गांभीर्यानेच केली पाहिजे. त्यामुळे नवे मंडळच बरखास्त करून पुन्हा प्रक्रिया राबवण्यात यावी अशी आमची मागणी आहे,' असेही त्याने स्पष्ट केले.

चौहान यांना भेटण्याबाबत चर्चा

टॉम ऑल्टर यांनी विद्यार्थ्यांना चौहान यांची भेट घेण्याविषयी सुचवले होते. ऑल्टर यांचा सल्ला विद्यार्थ्यांनी सकारात्मकरित्या घेतला आहे. चौहान यांची भेट घेण्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images