Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

राम नदीची पूररेषा निश्चित करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अतिक्रमणांमुळे आक्रसलेल्या राम नदीची पूररेषा निश्चित करण्यात येणार असून, पूररेषा आखणीसाठी जिल्हा नियोजन समितीने निधीला मंजुरी दिली आहे. या आखणीत नदीची रेड व ब्ल्यू लाइन निश्चित झाल्यावर नदीपात्रातील अतिक्रमणांवर कारवाई करणे शक्य होणार आहे.

राम नदीबरोबर मुठा नदीपात्रातील अतिक्रमणे दूर करण्याचे आदेश जिल्हा नियोजन समितीत देण्यात आले. नदीपात्रात पार्किंगला अधिकृत परवानगी दिली असेल, तर ती तातडीने रद्द करा, अशी सूचनाही समितीचे अध्यक्ष व पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली आहे.

महापालिकेने राम नदीचा 'नाला' करून अनेक बांधकामांना परवानगी दिली आहे. या नदीच्या पात्रात शिरकाव करून अनेक सोसायट्यांनी संरक्षक भिंती बांधल्या आहेत. काही इमारती तर चक्क नदीपात्रातच असल्याची तक्रार आहे. या बांधकामांमुळे पावसाळ्यात नदीतील पुराचे पाणी पात्र सोडून बाहेर येते आणि लगतच्या सोसायट्या, घरांमध्ये शिरते. त्यामुळे राम नदीची पूररेषा निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुररेषेची आखणी व त्यासाठी येणाऱ्या खर्चाला जिल्हा नियोजन समितीत मंजुरी देण्यात आली.

मुठा नदीच्या पात्रात सर्कस, अॅम्युझमेंट पार्क, पार्किंगला परवानगी दिली जाते. नदीत अतिक्रमण करू नये, नदी पात्रात पार्किंगला परवानगी देणे चुकीचे आहे, असा मुद्दा खासदार वंदना चव्हाण यांनी मांडला. नदीपात्रात जॉगिंग ट्रॅक करण्यात येत आहे; तसेच राडारोडाही टाकला जात असल्याकडे आमदार अजित पवार यांनी लक्ष वेधले. त्यावर नदीपात्रात राडारोडा टाकण्यास परवानगी नाही. पार्किंगला परवानगी दिली असेल तर ती तातडीने रद्द करा, अशी सूचनाही त्यांनी जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोळीबारप्रकरणी चार जणांना अटक

$
0
0

पुणे : कोथरूड येथे टोळी युद्धातून गोळीबार करणाऱ्या नीलेश घायवळ टोळीतील चौघा गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनीट वनने अटक केली. या आरोपींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पौड रोडवर घायवळ टोळीतील पंकज फाटक याच्या खुनाच्या घटनेनंतर लगेचच या आरोपींनी दोघांवर गोळीबार केला होता.

गणेश बबन धनवे (२३, रा. दारवली), नागेश उर्फ सोन्या ऊर्फ ठाकूर विठ्ठल धनवे (२२, रा. मुळशी), रोह‌ित विठ्ठल आखाडे (२१, रा. कोथरूड), जितेंद्र बलकवडे ऊर्फ बडे ठाकूर (रा. दारवली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे युन‌िट वनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रघुनाथ फुगे यांनी दिली. तीन आठवड्यांपूर्वी घायवळ टोळीचा फाटक याचा खून करण्यात आला होता. खुनानंतर अवघ्या काही तासांतच कोथरूडमध्ये सागर ढमालेवर आरोपींनी गोळीबार केला होता. ढमाले हा मारणे टोळीशी संबंधित असल्याच्या संशयावरून त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. संशयित आरोपी धनवे व आखाडे हे पौड टोल नाक्याजवळ चांदणी चौकात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून कसून चौकशी केली असता त्यांनी नागेश आणि जितेंद्रचा या गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या दोघानांही अटक केली आहे, असे फुगे यांनी सांगितले. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, मोबाइल, रोख रक्कम असा एकूण एक लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी रमेश भोसले, रिजवान जेनेडी, संभाजी भोईटे, प्रकाश लोखंडे, रवींद्र कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळ कठीण होता तरीही…

$
0
0

सुरेश इंगळे, पुणे

उस्मानाबादमधील मलकापूर येथे सालगडी म्हणून काम करणारे सुरेश हिवरे पत्नी आशासह दहा वर्षांपूर्वी पुण्यात आले; परंतु अशिक्षित असल्यामुळे इथेही पुन्हा मजुरीच त्यांच्या वाट्याला आली होती. सालगडी आणि खोदाईकाम या दोन्हीत त्यांच्यासाठी चार पैशांचा फरक सोडता काही फरक नव्हता. आशा हिवरे यांनीही चार घरची धुणीभांडीची कामे करण्यास सुरुवात केली. परंतु, अंजली ही आजोळी मामाकडे राहूनच जुनी पुस्तके आणि शाळेतून मिळणाऱ्या गणवेशाच्या आधारे शिक्षण घेत होती. गेल्या वर्षी पुण्यात आल्यानंतर तिच्यासाठी येथील वातावरण नवीन होते. औंधमधील शिवाजी विद्यामंदिरमध्ये तिने दहावीसाठी प्रवेश घेतला. शाळेतील शिक्षिका मंगल पालवे यांना अंजलीची परिस्थिती माहिती झाल्यानंतर त्यांनी सर्वतोपरी मदत केली. अशा प्रकारे तिचे दहावीचे शिक्षण आणि अभ्यास सुरू होता.

परीक्षेला तीन महिने राहिले असताना अंजलीला अपघात झाला. कपडे वाळत घालून घरासमोरील लोखंडी जिन्यावरून उतरत असताना अंजलीचा पाय घसरला अन् ती खाली कोसळली. तिची करंगळी जिन्यात अडकली होती. शरीराचा भार न पेलल्याने करंगळी चेपून निघाली. रक्तबंबाळ हात घेऊन ती जवळपास चार तास अनेक हॉस्पिटलमधून फिरत होती; परंतु बोटाची अवस्था पाहून अनेकांनी उपचार करण्यास नकार दिला. अखेर एका हॉस्पिटलने तिला दाखल करून घेतले. मात्र, पैसे भरल्याशिवाय ऑपरेशन न करण्याची हॉस्पिटलची भूमिका आड आली. करंगळी बसविण्यासाठी जवळपास तीन लाख रुपये खर्च येणार असल्याने करंगळी कापून काढण्याचा निर्णय घ्यावा लागला. अखेर आई आशा यांनी धुणीभांडी करीत असलेल्या ठिकाणाहून उसनवारी करून, काही जणांकडून कर्ज म्हणून रक्कम आणल्यानंतर ऑपरेशन झाले. त्यासाठी जवळपास ७० हजार रुपये खर्च आला. 'हे कर्ज आम्ही अजून फेडत आहोत,' असे आई आशा यांनी सांगितले.

'दहावीला चांगले गुण मिळावेत म्हणून सुरुवातीपासूनच रोज चार तासच; पण मनापासून अभ्यास करीत होते. करंगळीच्या ऑपरेशननंतर तितका अभ्यास करता आला नसला, तरी अभ्यासातील सातत्यामुळे परीक्षेचे टेन्शन कधी आलेच नाही,' अशा शब्दांत अंजलीने भावना व्यक्त केली. सक्सेस अॅकॅडमीत क्लास लावल्यानंतर तिथे फीमध्ये खूप सवलत मिळाल्याचेही तिने सांगितले.

जिद्द माय अन् लेकीची...

केवळ जिद्दीच्या बळावर यश संपादन करणारी अंजली ही कुटुंबात आणि नातलगात इतकी शिकणारी पहिलीच मुलगी आहे. 'आपली परिस्थिती गरिबीची असताना मुलीला इतके शिकविण्याची काय गरज आहे? शिकवले तितके बास झाले. आता कुठेतरी चांगले स्थळ बघून लग्न करून टाका, असे सल्ले अनेकजण देत असतात; परंतु मला माझ्या मुलीला खूप शिकवायचे आहे. शिक्षणाशिवाय परिस्थिती सुधारणार नाही. म्हणून आम्हाला कितीही कष्ट करावे लागले, तरी आम्ही करू पण मुलीला शिकवूच,' अशी जिद्द आशा हिवरे यांनी व्यक्त केली.

चांगले गुण मिळवून तिने आम्हाला खूप आनंद दिला आहे. तिचे शिक्षण थांबू नये. तिची जितकी इच्छा आहे, तितके शिकावे असे वाटते. परंतु, परिस्थितीपुढे कुणाचे काही चालले आहे का?

- सुरेश हिवरे, वडील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारमुळे ‘एलबीटी’चे दोनशे कोटी बुडाले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सरकारने व्यापाऱ्यांना सवलत देण्यासाठी जाहीर केलेल्या 'अभय योजने'मुळे स्थानिक संस्था कराचे (एलबीटी) पालिकेचे उत्पन्न बुडत असल्याची टीका करत सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सोमवारी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला. व्यापाऱ्यांचे दोनशे कोटी रुपये माफ करण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेमुळे पुण्याच्या विकासाला खीळ बसत असल्याचा आरोप राष्ट्रवादी-काँग्रेससह मनसेनेही केला.

पालिकेसमोर आर्थिक आणीबाणी निर्माण झाली आहे का, अशी विचारणा काँग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत केली. त्या वेळी, पहिल्या दोन महिन्यांत 'एलबीटी'तून मिळणारे उत्पन्न कमी झाल्याची वस्तुस्थिती 'एलबीटी'प्रमुख विलास कानडे यांनी मांडली. सरकारने एलबीटी चुकविणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी अभय योजना जाहीर केल्याने पालिकेच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होत असल्याची टीका सभागृहनेते बंडू केमसे, माजी सभागृहनेते सुभाष जगताप, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी केली. व्यापाऱ्यांना दिल्या जात असलेल्या सवलतींमुळे पालिकेला सुमारे दोनशे कोटी रुपयांचा फटका बसला असल्याचा आरोप केला गेला. कर चुकविणाऱ्या मूठभर व्यापाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असून, त्याचा फटका शहराच्या विकासाला बसत असल्याची तक्रार केली गेली.

भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांनी आघाडी सरकारच्या काळातच एलबीटी सुरू झाल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; पण राष्ट्रवादी-काँग्रेस आणि मनसेच्या अनेक सदस्यांनी पालिकेचे नुकसान राज्य सरकार भरून देणार आहे का, अशी विचारणा केल्याने ते निरुत्तर झाले. अखेर, कर चुकविणाऱ्या व्यापाऱ्यांकडून एलबीटी वसूल झालाच पाहिजे, अशी भूमिका त्यांनाही घ्यावी लागली.

कँटोन्मेंटमध्येही एलबीटी

केंद्रातील एनडीए सरकारने कँटोन्मेंटमध्येही एलबीटी लागू केला आहे, ही बाब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. व्यापाऱ्यांकडून थकित रकमेची वसुली करण्यासाठी बँड वाजवा, अशी मागणी सुभाष जगताप यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज गायब

$
0
0

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे शहर व पिंपरी-चिंचवडच्या अनेक परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. जोरदार पावसाने वीजवाहिन्यांवर झाडे कोसळल्याने आणि भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये पाणी शिरल्याने वीजपुरवठा खंडित झाला. पहिल्या पावसाच्या फटक्याने शहर व परिसरातील अनेक ओव्हरहेड वीजवाहिन्यांवर झाडे किंवा झाडांच्या फांद्या कोसळल्या, त्यामुळे वीजवाहिन्या तुटल्या आणि वीजपुरवठा खंडित झाला. तसेच भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये पाणी शिरले, त्यामुळेही वीजपुरवठा खंडित झाला. पद्मावती, सातारा रोड, डेक्कन जिमखाना, कोथरूड, सिंहगड रोड, तसेच शहराच्या मध्यभागात विजेचा लपंडाव सुरू झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समस्या सोडविण्यात रेल्वे अपयशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या चार दिवसांपासून विस्कळित असलेली पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वे सेवा सोमवारी पूर्वपदावर आली. मात्र, काही लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द कराव्या लागल्या. दरम्यान, पावसामुळे उद्भवलेल्या या परिस्थितीला तोंड देण्यास रेल्वे प्रशासन अपयशी ठरले. मुंबईला राज्यभरातून जाणाऱ्या गाड्या रद्द आणि उशिराने धावत असताना, प्रवाशांच्या शंका दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला एक विशेष हेल्पलाइन सुरू करता आली नाही. रेल्वेच्या १३९ या चौकशी क्रमांकावर माहिती देण्याची सोय करण्यात आली होती; परंतु प्रवाशांच्या शंका दूर करण्यात असमर्थ ठरत होती.

पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या, तसेच मुंबईहून पुण्यासह देशभरात जाणाऱ्या गाड्या उशिराने धावत होत्या. तर प्रगती, डेक्कन क्वीन आणि सिंहगड या गाड्या रद्द करण्याची वेळ आली. त्यामुळे प्रवाशांना शुक्रवारपासून प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला. गाड्या अचानक गाड्या रद्द करण्यात आल्याने पुणे आणि मुंबई दरम्यान असलेल्या अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. सोमवारी डेक्कन क्वीन, सिंहगड आणि प्रगती एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे. मात्र, पटना-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस, पुणे-जबलपूर सुपरफास्ट, पुणे - लखनौ, निझमुद्दीन एक्सप्रेस या गाड्या सोमवारी रद्द केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिगरबाज अंजलीला हवीय दातृत्वाची साथ

$
0
0

सुरेश इंगळे, पुणे

झोपडवस्तीतील अतिशय छोटी खोली, मोलमजुरी करणारे वडील अन् धुणीभांडी करणारी आई, दोन वेळच्या जेवणाची कशीबशी होणारी सोय, ऐन परीक्षेच्या आधी झालेला अपघात आणि त्यामुळे कापली गेलेली उजव्या हाताची करंगळी.... अशा परिस्थितीवर जिद्दीने मात करून अंजली सुरेश हिवरे हिने दहावीला ९१.२० टक्के गुण मिळविले आहेत. कम्प्युटर इंजिनीअर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या अंजलीला सध्या चिंता भेडसावतेय ते पुढील शिक्षण कसे होईल, याची. ती दूर होण्यासाठी गरज आहे, ती समाजाच्या मदतीची.

औंधमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीतील दहा बाय दहाच्या काकाच्या खोलीत अंजली वडील सुरेश हिवरे, आई आशा आणि आठवीत शिकणारा भाऊ गणेश यांच्यासोबत राहते. सुरेश हिवरे मोलमजुरी करतात. रोज मजुरी मिळेलच, याची शाश्वती नाही. तर, आई आशा धुणीभांडीचे काम करतात. दोघांचे मिळून महिन्याकाठी जेमतेम भागते. त्यातून कुटुंबाचे पोट कसेबसे भरते. तरीही अंजली परिस्थितीचा बाऊ न करता जिद्दीने शिकत राहिली. यापुढील शिक्षणाची लढाई लढण्यासाठीही ती सिद्ध आहे; परंतु तरी तिला गरज आहे मदतीच्या असंख्य हातांची!

अंजलीची संघर्षमय यशोगाथा अतिशय बोलकी आहे. औंधच्या शिवाजी विद्यामंदिरात तिने दहावीचे शिक्षण घेतले. ती म्हणाली, 'आई - वडील पोटाची खळगी भरण्यासाठी पुण्यात काम करीत होते, तर आपल्याला आयुष्यात फार मोठं व्हायचंय ही जिद्द बाळगून मी आजोळी शिक्षण घेत होते. नववीपर्यंतचे शिक्षण तिथे झाल्यानंतर घरगुती कारणांमुळे मलाही पुण्याला यावे लागले. दाटीवाटीने राहात असलेल्या खोलीत माझा नेटाने अभ्यास सुरू होता; पण परीक्षेच्या तीन महिने आधी एक अपघात झाला आणि उजव्या हाताची करंगळीच कापावी लागली. हाताला प्लॅस्टर घेऊन मी तीन महिने अभ्यास करीत होते. बोटाला येणारा प्रत्येक ठणका कम्प्युटर इंजिनीअरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दहावी हा पाया असल्याची जाणीव करून देत होता. तशाच अवस्थेत पेपर दिला. परीक्षेचा निकाल पाहिला, तेव्हा माझ्या आई - वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते आणि माझ्या डोळ्यांत त्यांच्या चेहऱ्यांवरील समाधान...'

गावाकडे आणि पुण्यातील शिक्षकांची मदत माझ्यासाठी मोलाची होती. परिस्थितीवर, ऐन परीक्षेच्या काळात झालेल्या अपघातावर मात करून मी इथवर आली आहे. मला कम्प्युटर इंजिनीअर व्हायचे आहे. त्यासाठी लागणारी रक्कम कोठून आणवी असा प्रश्न आहे. उच्चशिक्षणाची भरारी घेण्यासाठी गरज आहे ती समाजाच्या मदतीची.

- अंजली हिवरे

विद्यार्थ्याचे नाव :

अंजली हिवरे

चेक स्वीकारण्याचा पत्ता :

महाराष्ट्र टाइम्स,

टाइम्स हाउस,

दुसरा मजला,

५७७, शिवाजीनगर,

ना. गोपाळ कृष्ण गोखले रस्ता, (एफसी रोड),

पुणे ४११००४

(विशेष सूचना : चेक विद्यार्थ्यांच्या नावाने द्यावेत. चेक गोळा करण्यासाठी 'मटा'ने कोणाचीही नेमणूक केलेली नाही.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शनिवारवाडा मोदींच्या अल्बममध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्याचा मानबिंदू असलेल्या शनिवारवाड्याला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अल्बममध्ये स्थान मिळाले आहे. 'इनक्रेड‌िबल इंडिया'चे फोटो पाठवण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत असून, पुण्याच्या योगेश कोळपकर यांनी हा फोटो ट्विट केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात संवाद साधताना भारतातील पर्यटनाला चालना देण्यासाठी अनोखा उपक्रम सुरू करत असल्याची घोषणा केली होती. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून भारतभरातील पर्यटनस्थळांचे फोटो हॅशटॅग इनक्रेड‌िबल इंडिया असे करून ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद मिळत असून, मोठ्या प्रमाणात फोटो पोस्ट करण्यात येत आहेत. त्यातील निवडक फोटोंना पंतप्रधानांच्या अल्बममध्ये स्थान देण्यात आले आहे. याच अल्बममध्ये शनिवारवाड्याच्या फोटोचा समावेश झाला आहे. पंतप्रधानांच्या अल्बममध्ये शनिवारवाड्याचा फोटो घेण्यात आला याचा आनंदच वाटतो. यानिमित्ताने पुण्यातील पर्यटन व्यापक स्तरावर जाण्यास मदत होईल, अशी भावना कोळपकर यांनी व्यक्त केली. 'ट्विट केलेला शनिवारवाड्याचा फोटो मी स्वतः काढलेला नाही. तो फोटो इंटरनेटवरचाच आहे,' असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.

महाराष्ट्र मोदींचा फेव्हरेट

पंतप्रधानांच्या अल्बममध्ये महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांनी जागा पटकावली आहे. शनिवारवाड्यासह लालबागचा राजा, पंढरपूर (रणजित) सिंधुदुर्ग किल्ला (कौस्तुभ खरे), मुंबई विद्यापीठातील राजाभाई टॉवर (अनिल नायक), पुण्यातील शिवराज्याभिषेक (मिहिर दीक्षित) यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बदलाची शिक्षा भोगतोय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'केंद्र आणि राज्यात सत्ताबदल करून या सरकारला सत्तेवर आणण्याची शिक्षा आम्ही शेतकरी भोगत आहोत,' अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी भाजप सरकारला सोमवारी घरचा आहेर दिला. पावणेचार हजार कोटी रुपयांची थकबाकी न देणाऱ्या साखर कारखान्यांची संचालक मंडळे बरखास्त करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली.

ऊस उत्पादकांना देय असलेल्या वाजवी मूल्याच्या (एफआरपी) थकीत रकमा तातडीने द्याव्यात, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुण्यातील साखर आयुक्तालयापुढे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले, त्या वेळी शेट्टी बोलत होते. प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, तसेच सतिश काकडे, पृथ्वीराज जाचक, रवी तुपकर आणि विविध जिल्ह्यांमधून आलेले ऊस उत्पादक शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. भर पावसात संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी ठिय्या दिला. त्या वेळी झालेल्या सभेत शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. 'ज्यांना आम्ही सत्तेवर निवडून आणले, त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव नाही आणि ज्यांना निवडणुकीत पाडले, ते आता शेतकऱ्यांवर सूड उगवत आहेत,' असा टोला त्यांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीसीए झाले आता बीबीए

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॉमर्स विद्याशाखेतील बीसीए अभ्यासक्रमाचे नाव आता बीबीए (कम्प्युटर अॅप्लिकेशन) असे करण्यात आले आहे. 'एपीएम'चे एमबीए (ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट), तर 'एमसीएम'चे एमबीए (आयटी) असे नामकरण झाले आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने १३ अभ्यासक्रमांच्या नावात बदल केले आहेत. त्या संदर्भातील परिपत्रक विद्यापीठाने सोमवारी जारी केले असून, वेबसाइटवर प्रसिद्ध केले आहे. नावांतील या बदलांबाबत गेल्या अॅकॅडेमिक कौन्सिलच्या बैठकीत चर्चा झाली होती. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच (२०१५-१६) नावांतील हे बदल लागू होणार असल्याने यंदा पदवी किंवा पदव्युत्तर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विद्यापीठाने परिपत्रकात नमूद केल्यानुसार, कॉमर्स विद्याशाखेतील बीसीए अभ्यासक्रमाचे नाव बीबीए (कम्प्युटर अॅप्लिकेशन) असे करण्यात आले असून, बीबीएम (आयबी) या अभ्यासक्रमाचे नाव आता बीबीए (इंटरनॅशनल बिझनेस) असे झाले आहे. 'बीसीए असा स्वतंत्र कोर्स सायन्स विद्याशाखेत सुरू होईल; पण तो पुढील वर्षीपासून सुरू होईल,' असे विद्यापीठ आणि महाविद्यालय विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी स्पष्ट केले.

पुर्वीच्या नावानेच प्रवेश असल्यास...

शैक्षणिक वर्ष २०१४-१५ पर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वीच्या नावानेच पदवी/पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतले असतील, त्यांना पास झाल्यावर त्यांनी प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाचीच पदवी मिळेल, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रमाणपत्रे तीन दिवसांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी करावी लागणारी महिनो-महिन्यांची प्रतीक्षा लवकरच संपण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारच्या सेवा हमी कायद्यानुसार ही दोन्ही प्रमाणपत्रे तीन दिवसांत उपलब्ध करून देण्याचे बंधन महापालिकेवर घालण्यात आले असून, त्यात टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. जन्म-मृत्यू नोंदणीसह विवाह नोंदणी, नळजोडणी, मालमत्ताकर, भोगवटापत्र, बांधकाम दाखला, जोते तपासणी, अग्निशामक दलाचे प्रमाणपत्र अशा सर्व सेवांसाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र मिळविताना पुणेकरांना आतापर्यंत अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या आहेत. जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयात वारंवार हेलपाटे मारण्यापासून ते कार्यालयातील सेवकांना पैसे देण्यापर्यंत, अनेक तक्रारी सातत्याने केल्या जात होत्या. त्यात सुधारणा करण्याचे आश्वासन पालिकेतर्फे दरवर्षी देण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात नागरिकांची गैरसोय दूर झाली नव्हती. मात्र, आता राज्य सरकारच्या सेवा हमी कायद्यामुळे ही प्रमाणपत्रे मिळविण्यातला मोठा अडसर दूर होण्याची शक्यता आहे. कायद्यातील तरतुदींनुसार पालिकेला ही दोन्ही प्रमाणपत्रे केवळ तीन दिवसांत नागरिकांना उपलब्ध करून द्यावी लागणार आहेत. ही प्रमाणपत्रे मिळण्यास उशीर झाला, तर नागरिकांना त्या विरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागता येणार असून, मुदतीत काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.

राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप-सेना युती सरकारने विविध सेवा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी 'सेवा हमी कायदा' करण्याचे सूतोवाच केले होते. एप्रिलअखेरीस अध्यादेश काढण्यात आला असून, येत्या अधिवेशनात हा कायदा मंजूर होण्याची चिन्हे आहेत. त्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंगी रोखण्यास पालिका सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात पावसाचे जोरदार आगमन झाल्याने डेंगीच्या डासांची उत्पत्तिस्थाने निर्माण होण्याची शक्यता आहे. या कारणास्तव गेल्या वर्षी डासांची निर्मिती झालेल्या सोसायट्यांसह बांधकाम व्यावसायिक अशा २२०० जणांना महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोटिसा पाठविल्या आहेत. डासांची उत्पत्ती झाल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

डासांची उत्पत्ती होऊन शहरात डेंगीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने गेल्या महिन्यापासून उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून सोसायट्यांसह बांधकाम व्यावसायिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नोटिसा पाठवून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

'डेंगीचा प्रादुर्भाव होण्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील ७१ हजार झोपडपट्ट्यांमध्ये औषध फवारणी करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय ज्या सोसायट्यांसह बांधकामाच्या ठिकाणी गेल्या वर्षी डासांची उत्पत्तीस्थाने आढळली त्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याशिवाय अन्य अशा शहरातील बहुतांश सोसायट्यांवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. त्या सोसायट्यांमध्ये जाऊन डासांची उत्पत्तिस्थाने निर्माण होणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी आम्ही नोटिसा दिल्या आहेत. शहरातील १७२२ सोसायट्यांना नोटिसा दिल्या आहेत,' अशी माहिती कीटकजन्य आजार प्रतिबंधक विभागाचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी 'मटा'ला दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरडसंकट कोसळले

$
0
0

टीम मटा

राज्यावर वरुणराजाची कृपा झाल्याने समाधानाचे वातावरण असतानाच सोमवारी विविध ठिकाणी दरडसंकट कोसळले. कोकणात दापोली तालुक्यातील दाभोळजवळ टेमकरवाडी येथे तीन घरांवर मोठी दर कोसळल्याने सहा जण दरडीखाली अडकले. तर पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर खंडाळा बोगद्याजवळ कोसळलेल्या दरडीने प्रवाशांची अडीच तास वाट अडवली. नेरळजवळ भिंत कोसळून पाच जणांना जीव गमवावा लागला.

पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवर खंडाळा बोगद्याजवळ सोमवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास मोठी दरड कोसळली. त्यामुळे मुंबईकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद झाला. वाहनांच्या तीन ते चार किलोमीटर लांबीच्या रांगा लागल्या होत्या. आणखी काही दरडी पडण्याच्या शक्यतेने खबरदारी म्हणून मुंबईकडे जाणारा मार्ग सोमवारी दिवसभर बंद करण्यात आला.

एक्सप्रेस वे आणि लोणावळा परिसरात आतापर्यंत पडलेल्या दरडींपैकी ही सर्वांत मोठी दरड आहे. दरड कोसळल्यानंतर मोठा दगड मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या जीपवर (एमएच०४ पी ३००५) आदळला. या अपघातात जीपचे मोठे नुकसान झाले असून, जीपमधील दोघे जखमी झाले.

अडीच तासानंतर दरड काढण्यासाठी 'आयआरबी'च्या यंत्रणेला जाग आली. सव्वाबारा वाजता एकमेव जेसीबी मशिनच्या मदतीने दरड काढायला सुरुवात झाली. सायंकाळी सहा वाजता दोन लेनवरील मोठया दरडी मार्गालगत बाजूला केल्या.

एकवीरा मंदिरावरही दरड

लोणावळा शहराजवळील कार्ला गडावरील एकवीरा मंदिराजवळ रविवारी मध्यरात्री दरड कोसळली. या घटनेत विश्वस्त मंडळाच्या कार्यालयाचे तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या दर्शनरांगेचे मोठे नुकसान झाले. लोणावळा आणि मावळात रविवारपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे रविवारी मध्यरात्री कार्ला येथील एकवीरा मंदिराजवळ मागील बाजूस असलेल्या डोंगरावरून मोठ्या दरडी कोसळल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारूभट्ट्यांवर कारवाई कधी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'अवैध दारू निर्माण करणाऱ्या हातभट्ट्या फोफावल्या असून त्या थोपविण्याची जबाबदारी संबंधित भागातील पोलिस स्टेशन आणि तेथील अधिकाऱ्यांची आहे. मात्र, सरकार त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई का करीत नाहीत,' असा प्रश्न राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला. येत्या पावसाळी अधिवेशनात या प्रश्नावर सरकारला कोंडीत पकडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आर्यभूषण पुरस्कार प्रदानाच्या कार्यक्रमासाठी पवार पुण्यात आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबई येथे विषारी दारू पिऊन शंभर जण मरण पावल्याच्या घटनेबाबत पवार यांना विचारले असता ते म्हणाले, ' सरकारने यावर अद्याप काहीच ठोस भूमिका घेतलेली नाही. पोलिस अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणा या घटनेला कारणीभूत आहे. राज्यात आमची सत्ता असताना काही घडल्यास राजीनामा द्या, दोषींवर कारवाई करा, अशी मागणी आताचे सत्ताधिकारी करीत होते.' ऊस उत्पादकांच्या वाजवी मूल्याच्या थकीत रकमांच्या (एफआरपी) प्रश्नाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांची मुंबईत भेट घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

'दोषींवर होणार कारवाई'

पुण्याच्या शिक्षण मंडळाच्या शाळेत बदली करण्यासाठी अध्यक्ष प्रदीप धुमाळ व माजी अध्यक्ष रवी चौधरी यांच्या सांगण्यावरून दोन लाख रुपयांची लाच स्वीकारण्याच्या घटनेबाबत अजित पवार यांना पत्रकारांनी विचारले. 'दोषींवर कारवाई झाली पाहिजे,' असे पवार यांनी सांगितले. 'या प्रकरणात कोणाला विनाकारण गोवण्याचा प्रयत्न होत नाही ना, याचीही खात्री केली पाहिजे,' असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ईपीएफओ लाभार्थींची माहिती द्या’

$
0
0

म. टा . प्रतिनिधी, पुणे

प्रॉव्हिडंट फंड (पीएफ) कपात होणाऱ्या नवीन कर्मचाऱ्यांना एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनच्या (ईपीएफओ) सेवांचा लाभ देण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांची सविस्तर माहिती देणारा फॉर्म ११ आणि 'केवायसी' भरण्याचे, तर जुन्या कर्मचाऱ्यांचे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) अॅक्टिव्हेट करण्याचे आदेश 'ईपीएफओ'च्या मुख्यालयाने दिले आहेत. फार्म ११ हा प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेपर्यंत, तर 'यूएएन' अॅक्टिव्हेट करून घेण्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदत देण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आल्यानंतर 'ईपीएफओ'च्या सेवा मिळण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याची माहिती 'ईपीएफओ'च्या युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) पोर्टलवर द्यावी लागते. कर्मचाऱ्याची नेमणूक करतानाच कंपनी किंवा संस्थेने कर्मचाऱ्याकडून फॉर्म ११ भरून घेण्याचे सुचविण्यात आले आहे. त्यामध्ये संबंधित कर्मचाऱ्याची माहिती असणार आहे. कर्मचारी कामावर रुजू झाल्यानंतर त्याच महिन्याच्या २५ तारखेपर्यंत ही माहिती देण्याच्या सूचना मुख्यालयाने दिल्याचे 'ईपीएफओ' पुणे विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. फॉर्म ११ बरोबरच 'केवायसी' भरावा लागणार आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्याचा पॅन कार्ड नंबर, आधारकार्ड नंबर आणि बँकेतील खात्याबाबतची माहिती देणे आवश्यक असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

'पीएफ' कपात होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा 'यूएएन' अॅक्टिव्हेट करावा लागणार आहे. त्यासाठी 'ईपीएफओ'ने गेल्या महिन्यात 'पीएफ आपल्या दारी' ही मोहीम राबविली होती. मात्र, अद्याप सर्व कर्मचाऱ्यांचे 'यूएएन' अॅक्टिव्हेट झालेले नाहीत. त्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदत देण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. मुदतीत ही माहिती दिली न गेल्यास कारवाईचा इशारा 'ईपीएफओ'च्या मुख्यालयाकडून देण्यात आला आहे.

'यूएएन'साठी मदतकेंद्र सुरू

'यूएएन' अॅक्टिव्हेट करण्यासाठी 'ईपीएफओ'चे गोळीबार मैदान येथील विभागीय कार्यालय आणि आकुर्डी येथील कार्यालयामध्ये कायमस्वरूपी मदतकेंद्र सुरू करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी जाऊन कर्मचाऱ्यांनी माहिती दिल्यास त्यांचा 'यूएएन' अॅक्टिव्हेट करून दिला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुलांना लायसन्स; प्रस्ताव फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'सोळा वर्षापर्यंतच्या बालगुन्हेगारांवर प्रौढ गुन्हेगारांप्रमाणे खटला भरण्याचा आणि त्यांना शिक्षा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. लहान मुलांना उत्तम प्रकारे टू व्हिलर आणि फोर व्हिलर चालविता येत असेल, तर त्यांना वाहन चालविण्याचे लायसन्स देण्यात केंद्र आणि राज्य सरकारने पुढाकार घ्यावा,' असा ठराव पालिकेत सत्ताधारी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मांडला होता. मात्र हा ठराव भाजप, सेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी फेटाळून लावला. २४ विरुद्ध २२ मतांनी सत्ताधाऱ्यांचा हा प्रस्ताव फेटाळण्यात आला.

'केंद्र सरकारने बालगुन्हेगारांवर इतर गुन्हेगारांप्रमाणे खटला भरून त्यांना कडक शिक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध करून कर्तबगार बालकाने लहान वयातच एखादी कला अवगत केली, तर त्या कलेला मान्यता द्यावी; तसेच १६ वर्षापर्यंच्या बालकांना उत्तम पद्धतीने टू व्हिलर आणि फोर व्हिलर चालविता येत असेल तर त्याला वाहन चालविण्याचे लायसन्स द्यावे,' असा प्रस्ताव सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक रवींद्र माळवदकर, प्रदीप गायकवाड, दीपक बोडके, सुनील गोगले, यांनी सर्वसाधारण सभेत मांडला होता. बालकांना लहानपणीपासूनच कुशल बनविण्याच्या योजना केंद्र आणि राज्य सरकारने सुरू कराव्यात, अशी सर्वसाधारण सभा केंद्र आणि राज्य सरकारला विनंती करत असल्याचे या प्रस्तावात म्हटले होते.

प्रस्तावावर मतदान

पालिकेतील सत्ताधारी पक्षाने मांडलेल्या या प्रस्तावाला शिवसेना, भाजप, मनसेच्या नगरसेवकांनी विरोध केला. त्यामुळे यावर मतदान घेण्यात आले. काँग्रेस, राष्ट्रवादीने ठरावाच्या बाजूने तर इतर पक्षांनी विरोधात मतदान केले. २४ विरुद्ध २२ मतांनी हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याने पालिकेतील सत्ताधारी पक्षाला पराभव पत्कारावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डॉग पार्क’ला पालिकेची मान्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

माजी महापौर चंचला कोद्रे यांनी केलेला विरोध डावलून मुंढवा येथे डॉग पार्क उभारण्याचा प्रस्ताव नुकताच पालिकेच्या मुख्य सभेत मान्य करण्यात आला. मतदान घेऊन हा प्रस्ताव मान्य करण्यात आला.

शहरातील भटक्या कुत्र्यांची गंभीर समस्या लक्षात घेऊन मुंढवा भागात भटक्या कुत्र्यांसाठी डॉग पार्क उभारण्याचा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी स्थायी समितीने मंजूर केला होता. मुंढवा भागात हा प्रकल्प उभारण्यासाठी स्थानिक नगरसेविका आणि माजी महापौर चंचला कोद्रे यांनी त्याला जोरदार विरोध केला होता. पालिका प्रशासनाने या भागात डॉग पार्क उभारल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी आला असता कोद्रे यांनी त्याला विरोध करून हा प्रस्ताव मागे घ्यावा, अशी भूमिका घेतली. त्याला नकार देण्यात‌ आल्याने मतदान घेऊन हा प्रस्ताव २६ विरुद्ध १ अशा मताने मंजूर करण्यात आला. शहरात शहरात सर्वसाधारण ४० ते ४५ हजार भटकी कुत्री आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा उपद्रव अधिकच वाढला आहे. दररोज शहरात ३५ ते ४० नागरिकांना भटकी कुत्री चावल्याच्या घटना घडतात. शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या सोडविण्यासाठी अशी कुत्री पकडून त्यांची नसबंदी करण्यासाठी मुंढवा भागात डॉग पार्क उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

पशुचिकित्सालय, प्राण्यांची निगा राखणे, औषध उपचार करणे या सुविधा देण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिली आहे. माजी महापौर चंचला कोद्रे यांनी प्रकल्पाला विरोध केला होता. माजी महापौरांचा विरोध मोडून काढून सत्ताधारी पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सभासदांनी मतदान घेऊन हा विषय मान्य केला.

प्रत्येक वेळी मुंढवा भागावर अन्याय करणारे प्रस्ताव पालिकेने मान्य करून मुंढवा भागातील नागरिकांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली आहे. हा अन्याय सहन केला जाणार नाही. याविरोधात आंदोलन केले जाणार आहे.

- चंचला कोद्रे, माजी महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुदतीत परवाना देणे बंधनकारक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सरकारच्या सेवा हमी कायद्यामुळे महापालिका प्रशासनाला ठराविक मुदतीत नागरिकांना आवश्यक त्या सेवा उपलब्ध करून देण्याचे आव्हान स्वीकारावे लागणार आहे. सर्वसामान्य नागरिकांचा जिव्हाळ्याचा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला बांधकाम परवाना; तसेच भोगवटा प्रमाणपत्र (ऑक्युपन्सी सर्टिफिकेट) या सेवा हमी कायद्यामुळे अनुक्रमे ६० आणि ३० दिवसांत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, असे असले तरी याचा फारसा ताण बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर येणार नसल्याचा दावा प्रशासनाच्यावतीने केला जात आहे. शहरातील नागरिकांना कमीत कमी वेळेत ही प्रमाणपत्रे मिळावीत यासाठी पालिकेने यापूर्वीच बांधकाम परवानगी देण्यासाठी 'फास्ट ट्रॅक सिस्टीम'; तसेच 'ऑटो स्क्रुटिनी' कार्यपद्धती सुरू केल्याने आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर अत्यंत कमी वेळेत नागरिकांना परवानगी दिली जात आहे.

नागरिकांनी महापालिकेकडे अर्ज केल्यानंतर त्याची आवश्यक ती पूर्तता करून ६० दिवसांच्या आत ही परवानगी द्यावी; तसेच भोगवटा प्रमाणपत्र अर्ज केल्यापासून ३० दिवसात देण्याचे बंधन राज्य सरकारने तयार केलेल्या सेवा हमी कायद्यात घालण्यात आले आहे. नागरिकांना परवानगी घेण्यासाठी पालिकेत उंबरे झिजवावे लागू नये, हा त्या मागच्या मुख्य उद्देश आहे.

विशेष प्रणाली

पालिकेने ऑनलाइन प्रस्ताव दाखल करून घेऊन त्याची ऑनलाइन पद्धतीने 'ऑटो स्क्रूटिनी' करत बांधकाम परवानगी देण्याची विशेष प्रणाली विकसित केली आहे. गतिमान कारभाराबाबत नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असल्याने पालिकेने ही यंत्रणा सुरू केली आहे. पालिकेकडे ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर त्याला मान्यता मिळेल की त्यामध्ये काही त्रुटी आहेत, याची सर्व माहिती ताबडतोप नागरिकांना समजते. त्यामुळे बांधकाम परवाना मिळण्याचा मार्ग सुकर झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

फास्ट्र ट्रॅक सेल सुरू

नागरिकांना बांधकाम करण्यासाठी आवश्यक तो परवाना मिळावा, यासाठी पालिकेने पुढाकार घेऊन आठ महिन्यांपूर्वीच 'फास्ट ट्रॅक सेल' सुरू केला आहे. या सेलच्या माध्यमातून अर्ज केलेल्या नागरिकाला २४ तासांमध्ये परवानगी दिली जाते. महापालिका हद्दीत दहा हजार चौरस फुटांपेक्षा कमी बांधकामाच्या आराखड्याला २४ तासांत मंजुरी देण्यासाठी हा विशेष सेल सुरू केला आहे. गेल्या काही वर्षात शहरात होत असलेल्या बेकायदा बांधकामाला आळा बसून पालिकेच्या महसुलामध्ये वाढ व्हावी, या उद्देशाने हा विशेष सेल सुरू करण्यात आला आहे. पालिकेकडे बांधकामाचा आराखडा सादर करताना संबधित आर्किटेक्ट सर्व कागदपत्रांची छाननी करून तो अर्ज पालिकेकडे सादर केल्यास २४ तासांत आराखडा मंजूर करण्याची तयारी पालिकेने दाखविली आहे. याबाबतची माहिती पालिकेच्या www.punecorportion.org यावर लिंक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेत ‘सेवा हमी’ खुंटीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सरकारच्या सेवा हमी कायद्यामुळे जन्म-मृत्यू प्रमाणपत्र किंवा विवाह नोंदणी आणि इतर सेवा नागरिकांना वेळेत उपलब्ध करून देण्याची पालिकेवरीच जबाबदारी वाढणार आहे. सध्या काही दाखल्यांसाठी कित्येक महिने नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत असताना, सेवा हमी कायद्यामुळे पालिकेच्या संथ कारभाराला खरेच गती येईल का, याबाबत अजून तरी साशंकताच व्यक्त केली जात आहे.

सेवा हमी कायद्यातील तरतुदींनुसार नागरिकांसाठी आवश्यक सेवा-सुविधा स्थानिक स्वराज्य संस्थेने किती दिवसांत उपलब्ध करून द्याव्या, याचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला गेला आहे. त्यानुसार, जन्म-मृत्यू नोंदणीचे प्रमाणपत्र/दाखला पालिकेला अवघ्या तीन दिवसांत नागरिकांना द्यावा लागणार आहे.

सध्याच्या परिस्थितीत पालिकेतर्फे जन्म दाखल्यासाठी किमान आठवडा, तर मृत्यू दाखला देण्यासाठी २१ दिवस ते एक महिन्यापुढे कितीही दिवस घेतले जातात. जन्म दाखला तरी किमान वेळेत उपलब्ध झाला, तरी मृत्यू दाखला मिळविण्यासाठी मात्र नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. अनेकदा तर एक महिन्यानंतरही मृत्यू दाखला मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जाते. जन्म-मृत्यू दाखल्यांबाबत अशी परिस्थिती असताना, पालिकेसमोर सर्व व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करून हे दाखले तीन दिवसांत उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सेवा हमी कायद्यानुसार ठराविक मुदतीत हे दाखले उपलब्ध करून देण्यात आले नाहीत, तर त्याविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागता येणार आहे. तसेच, संबंधित अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक उशीर केल्याचे सिद्ध झाले, तर त्याच्यावर दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून हे दाखले ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देण्याच्या घोषणा पालिकेने अनेकदा केल्या आहेत. परंतु, त्यालाही अद्याप मुहूर्त लागलेला नाही. सेवा हमी कायद्यामुळे या सेवा मर्यादित कालखंडात देण्याचे बंधन पालिकेवर आले, तर त्यानिमित्ताने तरी का होईना, ऑनलाइन प्रक्रियेला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.

जन्म-मृत्यू दाखला प्रत्येक नागरिकासाठी अत्यावश्यक असला, तरी पुणे महापालिकेतर्फे मात्र ही सेवा देतानाही नागरिकांचा अंत पाहिला जात असल्याची तक्रार नगरसेवकांकडूनही सातत्याने केली जाते. त्यामुळे, सेवा हमी कायद्याने त्यावर बंधने आली, तर किमान नागरिकांना हे दाखले वेळेत तरी मिळू शकतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुणे मेट्रो’बाबत टोलवाटोलवीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील मेट्रो प्रकल्पाचा अहवाल राज्य सरकारने केंद्राकडे पाठविला असला, तरी मेट्रो भुयारी हवी की एलिव्हेटेड, याची शिफारसच केली नसल्याचे समोर आले आहे. केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने पुणे मेट्रोचा निर्णय घ्यावा, असे सुचवीत राज्याने ठोस निर्णय घेण्याची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे, पुण्यात 'मिक्स मेट्रो' होणार असे मुख्यमंत्री सांगत असले, तरी त्याचे भवितव्य अद्याप अधांतरीच आहे. शहरातील स्वयंसेवी संस्थांनी मेट्रोच्या वनाज ते रामवाडी मार्गाला तीव्र विरोध केला होता. त्यामुळे, या मार्गाबाबत व्यवहार्य तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीने दोन महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला आहे. त्यात, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) केलेल्या प्रकल्प आराखड्यानुसारच (डीपीआर) मेट्रोचा मार्ग असावा, असे स्पष्ट करण्यात आले असून, वनाज ते रामवाडी मार्गात काहीसा बदल सुचविण्यात आला आहे. या मार्गावरील काही भाग भुयारी असावा, असा आग्रह धरण्यात येत असला, तरी आर्थिकदृष्ट्या भुयारी मेट्रो व्यवहार्य नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे, राज्य सरकारने हा अहवाल केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडे पाठविला असून, वनाज ते रामवाडी मार्गाचा निर्णय घ्यावा, अशी शिफारस केली आहे. यूपीए सरकारच्या काळात मेट्रोचा विषय प्रलंबित राहिल्याने त्यावर विरोधी पक्ष म्हणून भाजपच्या नेत्यांनी जोरदार टीका केली होती. केंद्रातील सरकारला वर्षाहून अधिक काळ, तर राज्यातील सरकारला आठ महिने होत आले, तरीही पुणे मेट्रोचे घोंगडे मात्र अद्याप भिजतच पडले आहे. स्वयंसेवी संस्थांकडून केल्या जात असणाऱ्या तीव्र विरोधामुळे राज्याने अंतिम निर्णय घेण्याचे टाळत ती जबाबदारी केंद्रावरच सोपविली आहे.

मुख्यमंत्र्यांकडूनही दिशाभूल?

गेल्याच आठवड्यात पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात 'मिक्स मेट्रो' होईल, असे संकेत दिले होते. स्वयंसेवी संस्थांच्या विरोधाला न जुमानता व्यवहार्य असेल, अशीच मेट्रो पुण्यात नक्की करू, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. पुणे मेट्रोला उशीर झाल्याची कबुली देऊन, आता या प्रकल्पाला गती देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मेट्रोच्या अंतिम मान्यतेवरून केंद्र आणि राज्यात टोलवाटोलवी सुरू असून, भुयारी की एलिव्हेटेड याची शिफारस राज्यानेच करणे अपेक्षित आहे, अशा सूचना केंद्राने दिल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे, नव्या सरकारमध्येही पुणेकरांच्या नशिबी मेट्रोसाठी प्रतीक्षाच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images