Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘माननीयां’नी स्वतःच केले अतिक्रमण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा आदेश देतानाच, दुसऱ्या बाजूने त्यात हस्तक्षेप करणाऱ्या 'माननीयां'नीच नियम धुडकावून अतिक्रमण केल्याचे उजेडात आले आहे. पालिकेतील पदाधिकाऱ्यांनीच केलेल्या या अतिक्रमणावर कारवाई होणार का, अशी विचारणा आता केली जात आहे.

पालिकेने गेल्या काही दिवसांपासून शहरातील अतिक्रमणांविरोधात कारवाईची तीव्र मोहीम सुरू केली आहे. पालिकेतील लोकप्रतिनिधींनीच आता या कारवाईला विरोध सुरू केला असून, अनधिकृत व्यावसायिकांवरच कारवाई करा, असा आग्रह धरला जात आहे. लोकप्रतिनिधींकडून कारवाईत हस्तक्षेप सुरू असतानाच, दुसऱ्या बाजूला काही समित्यांच्या सदस्यांनीच रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे निदर्शनास येत आहे.

धनकवडी येथे सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू असतानाच, पुण्याईनगरमध्ये वही विक्रीचा स्टॉल लावण्यात आला आहे. स्टॉलवर शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांचे नाव आणि फोटो आहे. वाहनांना अडथळा होईल अशा पद्धतीने हा स्टॉल उभारण्यात आला असूनही त्यावरील कारवाईबाबत मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने स्टॉल उभारला असल्यास तो काढून टाकण्यात येईल, असे अशोक हरणावळ यांनी सांगितले.

याच पद्धतीचे स्टॉल अप्पा बळवंत चौकापासून बुधवार चौकापर्यंत जागोजागी लागले आहेत. सर्वच पक्षांच्या अधिकृत बॅनरखाली हे स्टॉल लावण्यात आले असून, गरजू विद्यार्थ्यांना स्वस्तात वह्या उपलब्ध व्हाव्या, यासाठी स्टॉल लावण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र, शालेय साहित्य खरेदीसाठी आधीच गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या या परिसरात रस्त्यावर उभारण्यात आलेल्या या स्टॉलमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. त्यामुळे, या स्टॉलवरही कारवाई केली जावी, अशी मागणी फेरीवाले आणि पथारी व्यावसायिकांकडून होत आहे.

पुनर्वसन आणि फेरीवाला शुल्कावर सादरीकरण

अतिक्रमण कारवाईवरून राजकारण तापले असतानाच, शहरातील सर्व पथारी व्यावसायिक आणि फेरीवाल्यांकडून शुल्क आकारणीबाबतच्या प्रस्तावावर शुक्रवारी सविस्तर सादरीकरण करण्यात आले. सहा महिन्यांहून अधिक काळ शुल्क आकारणीवर निर्णय होत नसल्याने पालिकेला त्याद्वारे मिळणाऱ्या महसुलावरही पाणी सोडावे लागत आहे. या सादरीकरणादरम्यान सर्व पथारी व्यावसायिकांच्या पुनर्वसनाला गती देण्यात आली असून, त्यासाठी जागा निश्चित करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे स्पष्टीकरण अतिक्रमण विभागाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शैक्षणिक इमारतींसाठी वाढीव एफएसआय

$
0
0

रस्ता रुंदीच्या प्रमाणानुसार जागा मिळणार; सरकारची मंजुरी

म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे

राज्यातील पुण्यासह चौदा मंजूर प्रादेशिक योजनेतील 'शेती व ना विकास' विभागात शैक्षणिक संस्थांच्या इमारतींसाठी रस्ता रूंदीच्या प्रमाणात वाढीव चटईक्षेत्र (एफएसआय) देण्यास राज्य सरकारने अंतिम मंजुरी दिली आहे. वाढीव चटईक्षेत्राच्या वापरासाठी संबंधित संस्थांकडून जमिनीच्या बिगरशेती दराच्या ३० टक्के अधिमूल्य आकारण्यात येणार आहे.

या मंजुरीमुळे शैक्षणिक संस्थांना आता ०.५ ते ०.८ एफएसआय (५० ते ८० टक्के) जादा मिळणार आहे. या निर्णयाचा पुणे, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, चंद्रपूर, तसेच मुंबई महानगर प्रदेश, रायगड, रत्नागिरी, जळगाव व अमरावतीमधील शैक्षणिक व वैद्यकीय संस्थांना फायदा होणार आहे.

मंजूर प्रादेशिक योजनेतील शेती व ना विकास विभागात शैक्षणिक तसेच वैद्यकीय संस्थांच्या इमारतींना मंजुरी देण्यात येते. या विभागातील शैक्षणिक इमारतींसाठी ०.२ चटईक्षेत्र मंजूर करण्यात येते. त्याऐवजी आता १२ ते १८ मीटर रुंदीच्या रस्त्यावर आता जादा ०.५ चटईक्षेत्र मंजूर केले जाणार आहे. याचाच अर्थ शैक्षणिक वा वैद्यकीय इमारतीसाठी ०.७ चटईक्षेत्र मिळणार आहे.

प्रादेशिक आराखड्यातील १८ मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यालगतच्या जागेत जादा ०.८ चटईक्षेत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे या विभागातील इमारतींसाठी आता एक चटईक्षेत्र निर्देशांक म्हणजे संपूर्ण जागेएवढे बांधकाम करता येणार आहे. वाढीव चटईक्षेत्र वापरून इमारतींची उंची १५ मीटरपेक्षा अधिक होणार असल्यास त्यासाठी अग्नीशामक दलाकडून 'ना हरकत' प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे.

शेती व ना विकास विभागातील जमिनींवर शैक्षणिक आणि वैद्यकीय इमारतींसाठी जादा चटईक्षेत्र देण्यापोटी तीस टक्के अधिमूल्य (प्रिमियम) भरावा लागणार आहे. हे अधिमूल्य आकारणीसाठी लगतच्या बिगरशेती जमिनीचे दर विचारात घेण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑफलाइन प्रवेशाची ‘खरी’ माहिती जाहीर करणार

$
0
0

>> योगेश बोराटे, पुणे

अकरावीच्या ऑनलाइन केंद्रीय प्रवेश समितीने गेल्या वर्षी कॉलेज पातळीवर झालेल्या ऑफलाइन प्रवेशांची माहिती यंदाच्या प्रक्रियेसाठी विचारातच घेतली नसल्याची बाब शुक्रवारी उघड झाली. समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत समितीच्या सदस्यांनी ही बाब कबूल केली. तसेच, गेल्या वर्षीच्या ऑफलाइन प्रवेशांची माहिती विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा ठरावही मंजूर केला.

यंदाच्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी समितीने उपलब्ध करून दिलेल्या 'कट ऑफ'मध्येच गोलमाल असल्याची बाब 'मटा'ने शुक्रवारी उघड केली. प्रवेश समितीच्या माहितीपुस्तिकेत समितीने छापलेले 'कट ऑफ' खोटे असल्याचे त्यातून सिद्ध झाले. त्या पार्श्वभूमीवर समितीचे अध्यक्ष आणि पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी तातडीची बैठक घेतली. समितीचे सदस्य असलेले विविध कॉलेजांचे प्राचार्य, उपप्राचार्य आणि शिक्षण खात्यातील अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेअंती गेल्या वर्षीच्या ऑफलाइन प्रवेशांचाही लेखाजोखा समाजासमोर मांडण्याचे धोरण निश्चित करण्यात आले.

बैठकीच्या सुरुवातीलाच असा काहीही प्रकार झाल्याचे उपस्थित सदस्यांनी नाकारले. तसेच, यंदाची प्रक्रिया ऑनलाइन असून, गेल्या वर्षीच्या ऑनलाइन प्रवेशांच्या 'कट ऑफ'चाच यंदा विचार होणे रास्त असल्याची भूमिका मांडली; मात्र या वेळी उपस्थित राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष राकेश कामठे यांनी गेल्या वर्षीच्या ऑफलाइन प्रवेशांवर आक्षेप घेऊन, 'ऑफलाइन प्रवेश हे समितीचेच अपयश आहे. त्या प्रवेशांमधून झालेल्या प्रवेशांचाही कट ऑफ ठरवताना विचार व्हायलाच हवा,' अशी मागणी केली. ऑफलाइन प्रवेशांचा 'कट ऑफ'साठी विचार होणार नसल्यास, हे प्रवेश अनधिकृत समजायचे का, समिती ऑफलाइन प्रवेशांची जबाबदारी स्वीकारत नसेल, तर ती राबवलीच कशाला, असे प्रश्न या वेळी उपस्थित करण्यात आले. अखेर ऑफलाइन 'कट ऑफ'ची माहिती विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याबरोबरच, यंदाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्याचा ठराव संमत करून या वादावर पडदा टाकण्यात आला.

उपस्थित झालेले काही प्रश्न

- समिती गेल्या वर्षीच्या ऑफलाइन प्रवेशांची जबाबदारी झटकून टाकण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्या प्रवेशांची जबाबदारी नेमकी कोणाची?
- विद्यार्थ्यांना खरे कटऑफ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी अकरावी केंद्रीय प्रवेश समितीची आहे. समितीच कामात कसूर ठेवत असेल, तर समितीवर कारवाई होणार का?
- शहरातील कॉलेजांच्या प्राचार्यांचे प्रतिनिधी या समितीचे सदस्य आहेत. प्राचार्य असतानाही, समिती खोटी माहिती पुढे रेटत असेल, तर प्राचार्यांच्या नैतिकतेचे काय?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी युवक अध्यक्षांचा राजीनामा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांमध्ये येत्या काही दिवसांत बदल होणे अपेक्षित असताना, विद्यमान अध्यक्षा अॅड. वंदना चव्हाण यांच्या मनमानीला कंटाळून शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित बाबर यांनी शुक्रवारी राजीनामा दिला. बाबर यांच्या जागेवर यापूर्वीही अन्य कार्यकर्त्याला संधी देण्याचा प्रयत्न केला गेला; पण वरिष्ठ नेत्यांनीच त्यावेळी त्यांची पाठराखण केली होती.

गेल्या दोन वर्षांपासून बाबर युवक राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी कार्यरत आहेत. मध्यंतरी त्यांची उचलबांगडी करण्यात आली होती; पण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच त्यात हस्तक्षेप केल्याने बाबर यांचे पद कायम राहिले. मात्र, त्यानंतरही शहराध्यक्षांकडून पाठिंबा मिळत नसल्याने अखेर शुक्रवारी त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा फॅक्सद्वारे पाठवून दिला आहे. पुढील दोन दिवसांत पक्षाच्या नेत्यांना प्रत्यक्ष भेटून राजीनामा देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

पक्षाच्या शहराध्यक्षांकडून मनमानी कारभार सुरू असल्याने संघटनेच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला असल्याची तक्रारही त्यांनी केली; तसेच अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला, तरी पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुट्ट्या पैशांसाठी 'एमसिक्के'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रिक्षा चालक आणि प्रवासी यांच्यामध्ये सुट्ट्या पैशांवरून होणारा वाद आता थांबणार आहे. 'एमसिक्के' या मोबाइल अॅप्लिकेशनच्या साह्याने 'एसएमएस' बँकिंगचा वापर करून प्रवाशांना रिक्षाचे भाडे देणे शक्य झाले आहे. रिक्षा पंचायतीच्या कार्यालयात या अॅप्लिकेशनचे औपचारिक उद्घाटन प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. ही सुविधा आज, शनिवारपासून प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे.

अॅप्लिकेशनचे प्रवर्तक विभव केळकर, रिक्षा पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार या वेळी उपस्थित होते. हे अॅप्लिकेशन वापरण्यासाठी रिक्षाचालकांना बारकोड कार्ड देण्यात येणार आहे. स्मार्टफोन बाळगणाऱ्या प्रवाशांनी हे अॅप डाउनलोड करावे. रिक्षाचालकांना मात्र हे अॅप असण्याची सक्ती नाही. रिक्षाचालकांकडे त्यांच्या बँक खात्याची माहिती असणारे 'बारकोड कार्ड' असणे आवश्यक आहे. प्रवास झाल्यानंतर प्रवासी आपल्या फोनमध्ये या बारकोडचे छायाचित्र काढेल.

सोबतच फोनमध्ये रिक्षा भाड्याची रक्कम लिहून क्लिक करताच एका एसएमएसनंतर रिक्षाभाडे प्रवाशाच्या खात्यातून रिक्षाचालकाच्या खात्यात काही सेकंदात जमा होईल. रिक्षाचालकाला याची माहिती एसएमएसद्वारे मिळेल. पाटील व पवार यांनी उपस्थित रिक्षा चालकांना मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य दुष्काळमुक्त करू

$
0
0

मुख्यमंत्री फडणवीस यांचा सकल्प

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या काही वर्षांत राज्यात खूप पैसा खर्च केल्यावरही सिंचनाच्या सोयी होऊ शकलेल्या नाहीत. सध्या जलयुक्त शिवार अभियानाद्वारे विकेंद्रीत पाणीसाठे निर्माण करून सिंचनासाठी उपाय काढण्यात आला आहे. राज्यात दर वर्षी पाच हजार गावे या अभियानात घेऊन २०१९ पर्यंत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील दोनशे गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानातून कामे सुरू आहेत. या गावांत आता टँकर द्यावा लागणार नाही. तसेच पुढील वर्षी एकही टँकर द्यावा लागणार नाही, यादृष्टीने नियोजन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केली. पुणे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानातील कामांचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. त्या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख, कृषी आयुक्त विकास देशमुख, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, खासदार शिवाजीराव आढळराव, संजय काकडे, अमर साबळे तसेच शहर व ग्रामीण भागातील आमदार या वेळी उपस्थित होते.

जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. या कामांत लोकसहभाग वाढत असून या अभियानाने लोकचळवळचे रूप घेतले आहे. पुणे जिल्ह्यातील या अभियानांतर्गत होणारी कामे मॉडेल स्वरूपाची आहेत. या कामांबरोबरच विहिरींचे पुनर्भरण, बांधबंदिस्ती व नदी-नाल्यांचे पुनरूज्जीवन व्हायला हवे. पाण्याचे स्रोत बळकट करण्याचे काम करताना नवी पाणी योजना हाती न घेता अस्तित्वातील योजना सुरू ठेवण्याची सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. राज्य सरकारच्या सर्व विभागांनी जलस्रोत व स्ट्रक्चर मॅपिंग करावे. पाणी साठविण्यासाठी उभ्या केलेल्या योजनांच्या दुरूस्तीसाठी दहा टक्के ऐवजी २५ टक्के निधी खर्च करण्याची परवानगी देऊ असेही त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील आमदारांना गावे दत्तक

शहरातील आमदारांचा जलयुक्त शिवार अभियानात सहभागा वाढवावा. शहरातील लोकप्रतिनिधींनी जलयुक्त शिवारच्या कामांसाठी किमान दोन गावे दत्तक घ्यावीत. तसेच या कामांसाठी निधीही द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा बैठकीत सांगितले. खासदार संजय काकडे यांनी या वेळी दहा गावे दत्तक घेणार असल्याचे जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आला रे आला...मान्सून आला!

$
0
0

पुण्यासह सातारा, कोल्हापूर आणि मुंबईत अधिकृत 'एंट्री'

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोकणात मुक्कामाला असलेला नैर्ऋत्य मान्सून शुक्रवारी मुंबईपर्यंत पुढे सरकला. पुणे, सातारा आणि कोल्हापूरमध्येही मान्सून दाखल झाला आहे. पुण्यात दिवसभर आकाश ढगाळ होते. शहराच्या काही भागांत तुरळक पाऊस झाला; मात्र शहरभर मान्सूनधारा बरसल्या नाहीत. येत्या ४८ तासांत पुण्यातील हवामान ढगाळ राहणार असून, हलक्या सरी पडतील, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

पुणेकरांबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रच मान्सूच्या प्रतीक्षेत असताना अरबी समुद्रावर आलेल्या अशोबा या चक्रीवादाळाने नागरिकांची निराशा केली होती. त्यामुळे पावसाचे आगमान लांबणार का, अशी चर्चाही सुरू झाली होती; मात्र गुरुवारी रात्री त्याची तीव्रता कमी होऊन त्याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले. त्यामुळे मान्सूनचा अडथळा सध्या तरी दूर झाला असून, तो उत्तरकडे सरकला आहे.

शुक्रवारी सकाळी मुंबई, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या काही भागांत मान्सून दाखल झाला. मुंबईमध्ये पावसाने पहिल्याच दिवशी सकाळी जोरदार हजेरी लावली. मुंबई शहरात २४ तासांत २४.४ मिमी, तर उपनगरांत ८२.२ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद हवामान विभागाकडे झाली आहे. कोकण-गोवा आणि विदर्भातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

मराठवाड्यालाही दिलासा

मराठवाड्यातील नांदेड, बीड, उस्मानाबाद व लातूर या जिल्ह्यांत सर्वदूर पावसाने हजेरी लावली. विजांच्या गडगडाटासह पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. उस्मानाबाद जिल्ह्यात वीज अंगावर पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बायपासच्या दोषीं’वर गुन्हा कधी?

$
0
0

अपघातप्रवण वीस जागी मूलभूत सुविधा नाहीत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्याचे रस्ते विकास महामंडळ, महापालिका, वाहतूक पोलिस आणि संबंधित ठेकेदार यांमधील समन्वयाच्या अभावामुळे कात्रज-देहूरोड बायपासवर जीवघेण्या अपघातांची मालिका सुरू आहे. वाकडला १६ मार्चला अपघाती दोन विद्यार्थिनींच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी महामार्ग प्राधिकरण, मेसर्स पी. एस. टोल रोड प्रायव्हेट लिमिटेड (रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड) यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असा अहवाल वाहतूक पोलिसांनी हिंजवडी पोलिसांना पाठवला होता. त्याच न्यायाने आंबेगाव येथील गुरुवारच्या अपघाताप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कधी दाखल होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

धायरी पुलावर डंपरचालकाचा ताबा सुटल्यामुळे गुरुवारी झालेल्या या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि चौघे जण जखमी झाले होते. या प्रकरणी ​सिंहगड रोड पोलिसांनी डंपरचालक संतोष अमुजा केवाट (२५, रा. गोंड, ठाणे, मध्य प्रदेश) याला अटक केली आहे. अपघातानंतर डंपरचालक फरारी झाला होता. पोलिसांनी डंपरच्या मालकाचा शोध घेतला. त्याच्याकडे चौकशी करून चालक संतोषची माहिती घेण्यात आली. त्यानंतर त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली; परंतु बायपासवरील जीवघेण्या अपघातामागील खरे दोषी वेगळेच आहेत.

हा बायपास होऊन दोन दशके लोटली, तरी त्यावर अजूनही 'सर्व्हिस लेन' नाही. काही ठिकाणी रोड डिव्हायडरसारखी मूलभूत सुविधा नाही. पादचाऱ्यांसाठी ओव्हरब्रिज वा भुयारी मार्ग हेदेखील योग्य तऱ्हेने विकसित करण्यात आलेले नाहीत. बांधलेल्या भुयारी मार्गांचा वापर होत नाही. महामार्गावर जागोजागी सहा आसनी रिक्षांपासून खासगी प्रवासी बसेस आणि एसटीचे अनधिकृत थांबे आहेत. त्यातच, शहराचा विस्तार झाल्याने स्थानिक नागरिकांच्या गाड्यांची भर या महामार्गावर पडली आहे. अशा परिस्थितीत, संबंधित यंत्रणांकडून होणारी सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबतची हेळसांडच जीवघेण्या अपघातांसाठीचे प्रमुख कारण ठरते आहे.

वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

ट्रकने धडक दिल्याने, तसेच महाकाय कंटेनरमधील साहित्य उलटल्याने नऱ्हे-आंबेगाव परिसरात गेल्या सहा महिन्यांत प्राणांतिक अपघात झाले होते. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम काढून या परिसरातील रस्त्यांवर देखरेख ठेवण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी स्वतंत्र टीमही कार्यान्वित केली होती. कालांतराने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. गुरुवारच्या जीवघेण्या अपघातानंतर दुसऱ्याच दिवशी या महामार्गावरील वाहतुकीचा नेहमीप्रमाणेच बोजवारा उडाला होता. त्याचप्रमाणे महामार्ग प्राधिकरण वा राज्य महामंडळाचा एकही अधिकारी, पथक या अपघाताची चौकशी करून कार्यवाहीसाठी पुढे आले नव्हते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहावी फेरपरीक्षा अर्ज १५ जूनपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दहावीच्या नापास विद्यार्थ्यांसाठी जुलै- ऑगस्ट २०१५ मध्ये होणाऱ्या परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्यास येत्या सोमवारपासून (१५ जून) सुरुवात होणार आहे. यंदा पहिल्यांदाच या परीक्षेचे आयोजन होणार असून, ऑक्टोबरची परीक्षा होणार नसल्याचे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य बोर्ड) शुक्रवारी जाहीर केले.

मंडळाच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना आपल्या शाळांमार्फतच हे ऑनलाइन अर्ज सादर करता येतील. www.mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर हे अर्ज उपलब्ध असतील. दहावीच्या नापास विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह येत्या २३ जूनपर्यंत हे अर्ज भरता येतील. माध्यमिक शाळांनी चलनाच्या माध्यमातून त्यासाठीची फी बँकेमध्ये भरण्यासाठी २४ ते २७ जूनची मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना २४ जून ते २७ जून या काळात लेट फीसह ऑनलाइन अर्ज भरता येतील. लेट फीच्या अर्जांचे चलन बँकेत भरण्यासाठी २९ आणि ३० जूनची मुदत देण्यात आली आहे. शाळांनी १ जुलैला परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या याद्या त्यांच्या चलनासह संबंधित विभागीय बोर्डाकडे सादर करणे गरजेचे असल्याचे या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

ऑक्टोबरची परीक्षा नाही

पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सप्टेंबर- ऑक्टोबर २०१५ ऐवजी जुलै- ऑगस्ट २०१५ मध्येच ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै- ऑगस्ट २०१५ आणि मार्च २०१६ ची परीक्षा या दोन संधी दिल्या जाणार आहेत. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये दहावीची परीक्षा होणार नसल्याचेही या पत्रकात स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन बँकिंगद्वारे फसवणूक

$
0
0

पुणे : ऑनलाइन बँकिंगद्वारे फसवणूक करून एका ६३ वर्षीय महिलेच्या बँक खात्यातून १९ हजार रुपये काढून तिची फसवणूक करण्यात आली. दहा जून रोजी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी एका ६३ वर्षीय महिलेने कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी ओम प्रकाश वर्मा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीला फोन करून आपण एटीएम सर्व्हिस सेंटरच्या मुंबईतील हेड ऑफिसमधून बोलत असल्याचे आरोपीने सांगितले. तुमच्या एटीएम कार्डचा पिन सांगितला नाही तर कार्ड ब्लॉक होईल, असे आरोपीने सांगितले. त्यामुळे संबंधित महिलेने ती माहिती दिली आणि तिची फसवणूक झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संवाद साधेपर्यंत बहिष्कार कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी निवड झालेल्या राजकीय पार्श्वभूमीच्या गजेंद्र चौहान यांनी अभिनयक्षेत्रात कोणतीही भरीव कामगिरी केलेली नाही. केंद्र सरकारने या नियुक्तीचा व नियुक्तीप्रक्रियेचा फेरविचार करावा. केंद्र सरकार आमच्याशी संवाद साधत नाही, तोपर्यंत कामकाजावरील बहिष्कार कायम राहील,' असा इशारा 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट'च्या विद्यार्थ्यांनी शनिवारी दिला. आमचा लढा व्यक्तीच्या विरोधात नव्हे, तर प्रक्रियेविरोधात आहे,' असेही या विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले.

चौहान यांच्या नियुक्तीच्या निषेधार्थ 'एफटीआयआय'च्या विद्यार्थ्यांनी शनिवारी संस्थेत जोरदार निदर्शने केली. सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत 'एफटीआयआय'च्या स्टुडंट्स असोसिएशनचे अध्यक्ष हरिशंकर नचिमुथू यांनी विद्यार्थ्यांची भूमिका स्पष्ट केली.

''एफटीआयआय'ला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था असा दर्जा दिल्यानंतर संस्थेच्या दर्जावाढीसाठी अनेक महत्त्वाची पावले उचलण्यात येतील, अशी आम्हाला आशा होती. परंतु, संस्थेच्या अध्यक्षाचीच निवड करताना शैक्षणिक आणि अन्य पात्रतेचा कोणताही निकष न लावता सरकारने गजेंद्र चौहान यांची निवड केली आहे. चौहान यांच्याकडे सिनेमा क्षेत्राशी संबंधित शैक्षणिक, प्रशासकीय तसेच कलात्मक अशा प्रकारचा काहीही अनुभव नाही. या क्षेत्रात त्यांनी दखल घेण्याजोगी कोणतीही कामगिरी केलेली नाही, त्यामुळे त्यांच्या निवडीला आमचा पूर्णतः विरोध आहे,' असे नचिमुथू यांनी स्पष्ट केले.

'यापूर्वी मृणाल सेन, श्याम बेनेगल, अदूर गोपालकृष्णन, यू. आर. अनंतमूर्ती यांसारख्या दिग्गजांनी संस्थेचे अध्यक्षपद सांभाळले आहे. या सर्वांनी या क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना झाला आहे. चौहान यांच्याकडे कोणताही अनुभव नसल्याने निवडप्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे,' असे विद्यार्थ्यांनी सांगितले. 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याला सर्वोच्च महत्त्व देणाऱ्या 'एफटीआयआय'मध्ये अशा प्रकारे नियुक्ती लादणे आम्हाला मान्य नाही,' असे अमेय गोरे या विद्यार्थ्याने सांगितले.

एफटीआयआय ही प्रयोगशाळा नव्हे

सरकार आवश्यक पात्रता नसलेल्या व्यक्तीची नेमणूक आयआयटी, 'आयआयएम'सारख्या संस्थेच्या अध्यक्षपदी करू शकते का, असा सवाल करत 'एफटीआयआय'लाच वेगळा न्याय का, असाही सवाल उपस्थित करण्यात आला. चौहान यांना कामाची संधी देण्याबाबत विचारले असता, 'एफटीआयआय ही प्रयोगशाळा नाही. चौहान यांना आमचा विरोधच असून, देशात अनेक पात्र व्यक्ती आहेत. त्यापैकी कोणाचीही निवड करता येईल,' असे या विद्यार्थ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गुंजवणी’ला निधी देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

धरणग्रस्तांच्या विरोधामुळे रेंगाळलेल्या गुंजवणी धरणाच्या कामाला निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. हा निधी देण्यासाठी राज्यपालांच्या सिंचन अनुपालन आदेशाची अडचण येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पर्यायी जमिनीच्या वाटपावरून गुंजवणी धरणग्रस्तांनी धरणाचे काम गेल्या दहा वर्षांपासून रोखून धरले होते; मात्र हा विरोध डावलून धरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात धरणाचे मातीकाम जवळपास पूर्ण करण्यात आले असून, धरणाच्या सांडव्याचे काम मात्र पावसाळा संपल्यानंतर सुरू केले जाणार आहे.

गुंजवणी धरणाच्या कामाला १९९३मध्ये मंजुरी मिळाल्यानंतर हे काम सुरू होण्यास १९९८ हे साल उजाडले. धरणाचे काम वेगाने सुरू झाल्यानंतर मातीकाम ऐंशी टक्के पूर्ण करण्यात आले. या दरम्यान पर्यायी जमीन, पुनर्वसन, खातेदारांची संख्या यावरून संघर्ष सुरू झाला. या संघर्षामध्ये धरणाचे काम २००५पासून बंद पाडण्यात आले.

गुंजवणी धरणाचे पाणी दुष्काळग्रस्त पुरंदर तालुक्याला देण्यात येणार आहे. त्यावर तेथील आठ हजार एकर जमीन ओलिताखाली येणार असल्याने जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी या कामाला प्राधान्य दिले आहे. धरणग्रस्तांचा विरोध डावलून गेल्या महिन्यापासून धरणाचे मातीकाम सुरू करण्यात आले आहे. धरणाच्या एक लाख ४५ हजार क्युबिक मीटरपैकी नव्वद टक्के काम झाले आहे. उर्वरित कामासाठी निधीची गरज आहे.

गुंजवणी धरणाच्या भिंतीचे मातीकाम जवळपास पूर्ण होत आहे. हे काम पूर्ण झाले, तरी धरणग्रस्तांचे इतर प्रश्न मार्गी लावल्याशिवाय धरणात यंदाच्या वर्षी एकही थेंब जादा पाणी अडवले जाणार नाही.

भरत वायसे, उपअभियंता, जलसंपदा विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कंपनी कायद्यातील बदलांचे स्वागत’

$
0
0

पुणे : 'इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया'ने (आयसीएआय) कंपनी कायदा २०१३मध्ये करण्यात आलेल्या बदलांचे स्वागत केले आहे. संस्थेतर्फे या बदलांसाठी काही सूचना करण्यात आल्या होत्या. त्यापैकी बहुतांश सूचना मान्य करण्यात आल्या आहेत. या बदलांमुळे 'सीए'चा व्यवसाय करणे अधिक सोपे झाले आहे,' अशी माहिती 'आयसीएआय'च्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष सुनील पाटोदिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. संस्थेतर्फे 'कंपनी कायदा २०१३'मधील बदलांबाबत आपल्या सभासदांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित दोन दिवसांच्या मार्गदर्शन शिबिराचे उद्‍‍घाटन पाटोदिया यांच्या हस्ते झाले. 'आयसीएआय'च्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य शिवाजीराव झावरे, पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष दिलीप आपटे, सचिव सुश्रुत चितळे, सर्वेश जोशी, पुणे शाखेचे अध्यक्ष यशवंत कासार, राजेशकुमार पाटील, जगदीश धोंगडे आदी उपस्थित होते. 'आम्ही ऑडिटिंग करताना येणाऱ्या अडचणी मांडल्या होत्या. त्याबाबत सरकारने सकारात्मक विचार केला आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो,' असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक बेटांसाठी ‘पीपीपी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील प्रमुख रस्त्यांवरील दुभाजक, वाहतूक बेटे आणि काही ठराविक उद्यानांवर आता सार्वजनिक-खासगी सहभागाची (पीपीपी) मोहोर उमटणार आहे. पालिकेने विकसित केलेली सुमारे दीडशेहून अधिक उद्याने आणि असंख्य वाहतूक बेटे व दुभाजक यांच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च परवडत नसल्याने त्याची निगा राखण्यासाठी आता कॉर्पोरेट क्षेत्राची मदत घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात अशा ५७ प्रकल्पांना स्थायी समितीने मान्यता दिली असून, त्यातून पालिकेची दर वर्षी एक कोटी रुपयांची बचत होणार आहे.

पालिकेच्या उद्यान विभागातर्फे दुभाजक, वाहतूक बेटे आणि उद्याने 'पीपीपी' तत्त्वावर देण्यासाठीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. दुभाजक-उद्यानांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी निधी खर्च करण्याची तयारी दर्शवणाऱ्या 'कॉर्पोरेट्स'ना त्यांची जाहिरात करता येणार असल्याने पालिकेच्या या योजनेअंतर्गत शंभरहून अधिक प्रस्ताव दाखल झाले होते. त्यातून ३२ प्रायोजकांचे ९९ प्रस्ताव मान्य करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.

स्थायी समितीने मान्य केलेल्या विविध प्रस्तावांमध्ये बांधकाम व्यावसायिकांची संख्या सर्वाधिक असून, काही शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांनीही आपापल्या परिसरातील वाहतूक बेटे आणि दुभाजक देखभाल-दुरुस्तीसाठी 'दत्तक' घेतले आहेत. वाहतूक बेटे, दुभाजक आणि उद्यानांमध्ये संबंधित कंपनीला नामफलक लावता येणार असून, त्याचा आकारही पालिकेने निश्चित करून दिला आहे. दुभाजकांवर प्रत्येकी तीन नामफलकांनंतर पालिकेच्या नावाचा आणि पर्यावरणाचा संदेश देणारा फलक लावण्याचे बंधन घालण्यात आले आहे. तसेच, उद्यानांमध्येही नामफलकाच्या आकाराच्या दोन तृतीयांश जागेत पालिकेचे नाव असेल, तर उर्वरित जागेत संबंधित कंपनीचे नाव असेल.

'पीपीपी'वरूनही राजकारण

पालिकेच्या या प्रकल्पाअंतर्गत वर्दळीचे रस्ते आणि त्यावरील दुभाजक, वाहतूक बेटे निवडण्यात आली होती; मात्र पुष्पमंगल चौक ते अप्पर इंदिरानगर, लुल्लानगर चौक ते बिबवेवाडी चौक आणि राजभवन ते ब्रेमेन चौक हे तीन रस्ते या प्रस्तावातून वगळण्याची उपसूचना देण्यात आली. त्यासाठी, पुढे आलेल्या उद्योजकांऐवजी इतरांना प्राधान्य देण्याचा आग्रह धरण्यात आला होता. तसेच, सत्ताधारी पक्षाशी संबंधित असलेल्या एका स्वयंसेवी संस्थेनेही वाहतूक बेटे, दुभाजक दत्तक घेण्याची तयारी दर्शवली होती; पण त्यांना डावलून संबंधित परिसराची निगा राखण्याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांनी जवळच्या बिल्डरकडे सोपवल्याची चर्चा रंगली आहे.

देखभाल-दुरुस्तीसाठी पालिकेला मिळणारा निधी

वाहतूक बेट : ₨ ५० हजार (प्रति ५० स्क्वे. मी.)

दुभाजक : ₨ २५ हजार (प्रति ५०० मी.)

उद्याने : ₨ एक लाख (प्रति १००० स्क्वे. मी.)

पालिकेची वर्षाकाठी बचत : ₨ १ कोटी ३ लाख ९८ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहगडवारीचे सहस्रारोहण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भटकंतीसाठी गडांवर अनेक जण जातात, काही जण एकाच गडावर अनेक वेळा जातात; पण एक हजार वेळा एखादा गड कुणी सर केल्याचे ऐकले आहे? पुण्याच्या शुक्रवार पेठेत राहणारे प्रकाश दंडनाईक यांनी ही कामगिरी केली आहे. दंडनाईक यांनी नुकतीच सिंहगडाची एक हजारावी मोहीम फत्ते करून सिंहगडाच्या सहस्रारोहणाचे 'सेलिब्रेशन' गडाच्या पुणे दरवाजात आप्तेष्ट आणि गडावर उपस्थित दुर्गप्रेमींच्या सोबतीने केले.

सिंहगडाचे इतिहासातील स्थान, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानातून मिळणारी प्रेरणा, तसेच 'शरीर ही संपत्ती आहे ती जपण्यासाठी स्वतःला थोडा वेळ द्या, व्यायाम करा, ट्रेकिंग करा,' हा संदेश हजारावी मोहीम फत्ते करून दंडनाईक यांनी दिला आहे. या मोहिमेसाठी त्यांना २२ वर्षे, तीन महिने आणि २३ दिवस एवढा कालावधी लागला. जानेवारी १९९३मध्ये दंडनाईक यांनी सिंहगड चढायला सुरूवात केली. त्यानंतर सिंहगडवारीने त्यांना एक वेगळी प्रेरणा दिली. प्रत्येक आठवड्यात सिंहगड एकदा तरी चढून जायचाच हा संकल्प त्यांनी सोडला आणि त्यानंतर सलग सिंहगड मोहिमा सुरू ठेवल्या. पायथ्यापासून गडमाथ्यावरील देवटाक्यापर्यंत जायचे आणि परतायचे, असे त्यांच्या या मोहिमेचे स्वरूप होते.

त्याविषयी बोलताना दंडनाईक म्हणाले, '१९९३पासून सिंहगडावर जातोय. ऊन, वारा, पावसातही ही मोहीम सुरू ठेवली. सिंहगडाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेमुळे आधी अवघड वाटणारी चढाई नंतर सोपी वाटू लागली. आबा महाजन आणि श्रीराम साठ्ये यांच्या प्रेरणेतून आवड निर्माण झाली आणि प्रोत्साहन मिळाले. माझा व्यावसाय सांभाळून मी ट्रेकिंगची आवड जोपासली आहे. हिमालयातही बारा पदभ्रमण मोहिमा झाल्या. सह्याद्रीतले पदभ्रमण अजूनही सुरू आहे. हजार वेळा सिंहगड सर झाल्यावर मित्रांनी, उपस्थित पर्यटकांनी गडाच्या पुणे दरवाजात माझे स्वागत केले. ते विसरू शकणार नाही.'

तरुणांना संदेश

हजार वेळा सिंहगडाची वारी झाल्यावर आणखी तीन वेळा ती पूर्ण करून प्रकाश दंडनाईक यांनी १००३ हा आकडा गाठला आहे. यापुढेही सिंहगडवारी सुरू राहणार असल्याचे ते सांगतात. या मोहिमेतून त्यांना 'शरीरसंपदा सांभाळा, इतिहासावर आणि वारशावर प्रेम करा,' हा संदेश तरुणांना द्यायचा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कमी कर्मचाऱ्यांमध्ये अधिक काम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) तांत्रिक कामांसाठी आउटसोर्सिंग करणे अपेक्षित असून, 'कमी कर्मचाऱ्यांमध्ये अधिक काम' हे 'पीएमआरडीए'साठी राज्य सरकारचे धोरण असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

महापालिकांमधील कर्मचारी संख्येच्या तुलनेत २५ टक्केच कर्मचाऱ्यांमार्फत 'पीएमआरडीए'चे कामकाज केले जाणार आहे. त्यासाठी लवकरच कर्मचारी आकृतिबंध मंजूर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्य सरकारच्या या धोरणामुळे 'पीएमआरडीए'च्या मास्टर प्लॅनपासून मोठ्या प्रकल्पांच्या उभारणीपर्यंतची तांत्रिक कामे आउटसोर्सिंगद्वारे करावी लागणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानातील कामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी 'पीएमआरडीए'साठी कमी मनुष्यबळात अधिक कामाचे धोरण असल्याचे स्पष्ट केले. 'पीएमआरडीए'ची स्थापना होऊन दोन महिने उलटले, तरी प्राधिकरणाला पुरेसा कर्मचारीवर्ग उपलब्ध झालेला नाही. परिणामी, महानगर क्षेत्राचा मास्टर प्लॅन, त्याअंतर्गत मोठ्या प्रकल्पांची आखणी आणि इमारतींचे बांधकाम आराखडे मंजूर करण्यापर्यंतच्या कामांचा खोळंबा झाला असल्याचे वृत्त 'मटा'ने प्रकाशित केले होते. पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने इमारतींचे बांधकाम आराखडे मंजूर करण्याच्या सुमारे पंधराशे फाइल्स 'पीएमआरडीए'कडे पडून असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले होते. त्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, बृहन्मुंबई महापालिकेपेक्षा मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) क्षेत्र मोठे आहे. असे असताना बृहन्मुंबई महापालिकेच्या कर्मचारी संख्येच्या तुलनेत केवळ पंचवीस टक्के कर्मचारी 'एमएमआरडीए'चे काम करतात. 'पीएमआरडीए'नेही तेवढ्याच कर्मचारी संख्येवर काम करणे अपेक्षित आहे, असे सांगितले. 'पीएमआरडीए'ने कामांसाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा. ही कामे आउटसोर्सिंगद्वारे करायला पाहिजेत. प्राधिकरणाच्या कामासाठी लागणारे कर्मचारीही उपलब्ध करून दिले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनसाखळी चोरली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

घरासमोर झोपलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेण्याचा प्रकार शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडी येथे घडला. या प्रकरणी एका ४० वर्षीय महिलेने फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी महिला राहत्या घरासमोर झोपलेली असताना एका चोरट्याने तिच्या गळयातील ३५ हजार रुपयांचे मंगळसूत्र तोडून चोरून नेले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विदर्भ, मराठवाड्यात मान्सून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आधी रेंगाळलेला मान्सून आता जोरदार वाटचाल करत शनिवारी राज्याच्या अन्य काही भागात दाखल झाला. शनिवारी मान्सून कोकणाचा उर्वरित भाग, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बहुतांश भागात तसेच विदर्भाच्या काही भागात दाखल झाला आहे. त्यामुळे पुणे वगळता राज्यात अनेक ठिकाणी शनिवारी पावसाने हजेरी लावली. दरवर्षी सर्वसाधारणपणे १० जूनला मान्सून मराठवाडा आणि विदर्भात दाखल होतो. परंतु, यंदा तीन दिवस उशीरा मान्सून या भागात दाखल झाला. पुढील तीन ते चार दिवसात मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल, असा अंदाज आहे.

शनिवारी राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. विदर्भात नागपूर येथे ८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वाशीम येथे २०, अकोला येथे १३, परभणी येथे ६, औरंगाबाद येथे ३, अहमदनगर येथे २९, महाबळेश्वर येथे १५ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवसात राज्यात कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुण्यात नुसतेच ढगाळ

शहर आणि परिसरात मान्सूनचे आगमन झाले असले, तरी पावसाने मात्र विश्रांतीच घेतली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण होते. परंतु, शहराच्या मध्यवर्ती भागात पावसाने हजेरी लावली नाही. तर काही उपनगरांमध्ये हलकासा शिडकावा झाला. शहरातील तापमानात घट झाल्यामुळे हवेत काहीसा गारवा होता. पुढील दोन दिवसात शहरात पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भटके कुत्रे ‘डॉग पार्क’मध्ये?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील भटक्या आणि मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना होणारा उपद्रव कमी करण्यासाठी पालिकेने काही पावले उचलली असून, स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने मुंढवा-केशवनगर भागात 'डॉग पार्क' उभारण्यात येणार आहे. त्यासाठी, सुमारे चार एकर जागा उपलब्ध करून देण्यास येणार असून, स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.

महापालिकेच्या हद्दीत सुमारे चाळीस हजारांहून अधिक भटकी कुत्री असून, रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ला केला जात आहे. त्यातून, अपघात आणि जीवितहानीचे प्रसंग उद्भवत असल्याने भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी त्यांच्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करणे आणि औषधोपचार करणे आवश्यक झाले आहे. 'मिशन पॉसिबल' या स्वयंसेवी संस्थेने शहरातील भटकी व मोकाट कुत्री आणि इतर प्राण्यांचे पुनर्वसन आणि उपचारांची तयारी दर्शवली असून, त्यासाठी किमान चार एकर जागेची मागणी केली होती. त्यानुसार, सभागृहनेते बंडू केमसे यांनीच संबंधित संस्थेला मुंढवा-केशवनगर येथील चार एकर जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला होता. डॉग पार्क आणि हॉस्पिटलसाठी मुंढव्यातील चार एकर जागा उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीने एकमताने मान्यता दिली असून, जागा उपलब्ध झाल्यानंतर या ठिकाणच्या सीमाभिंतीचे काम भवन रचना विभागाकडून करून घेण्यासही मान्यता देण्यात आली आहे. या जागेवर डॉग पार्क, कुत्रा निर्बीजीकरण, प्राण्यांची निगा, देखभाल आणि त्यांच्यावर औषधोपचार केले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक पोलिस वाढवणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर धायरी पूल येथे डंपरचालकाचा ताबा सुटल्यामुळे झालेल्या अपघातानंतर पुणे वाहतूक पोलिसांनी या परिसरातील अपघातप्रवण भागामध्ये वाहतूक पोलिस नेमण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी गर्दीच्या वेळी या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढलेली असते; तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जात नाही. यासाठी या परिसरात वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली.

गुरुवारी धायरी पूल येथे डंपरचालकाचा ताबा सुटल्यामुळे झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, तर चौघे जण जखमी झाले. कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत, या संदर्भात पोलिस उपायुक्त सारंग आवाड यांना विचारणा केली असता, या परिसरात वाहतूक पोलिसांची संख्या वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा रस्ता महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे या रस्त्यावरील अपघातप्रवण जागा, डिव्हायडर, रेलिंग याबाबत महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला असल्याचे आवाड यांनी सांगितले.

या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, तसेच या परिसरातील नागरिकांसाठी सर्व्हिस रोड व्यवस्थित सुरू केल्यास वाहतुकीचा प्रश्न कमी होईल; मात्र या संदर्भात तातडीने कारवाई केली जाणे आवश्यक आहे, असे आवाड यांनी सांगितले. या परिसरात वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भातील बोर्ड वाहतूक पोलिसांनी काही दिवसांपूर्वी लावले आहेत. आवश्यक असलेल्या ठिकाणी हे बोर्ड पुन्हा लावण्यात येणार आहेत..

'एनएचएआय'च्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

धायरी पूल येथे झालेल्या अपघाताची दखल घेऊन शनिवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांनी अपघातस्थळाची पाहणी केली. शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास या अधिकाऱ्यांनी येथे भेट दिली. या वेळी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी या अधिकाऱ्यांना रस्त्यावर आवश्यक असलेल्या उपाययोजनांसंदर्भात लेखी निवेदन दिले. या मार्गावरील रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावेत. दुभाजकाला असलेले अनावश्यक पंक्चर काढून टाकण्यात यावेत. रस्त्यावरील दिवे लावण्यात यावेत, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images