Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पर्यावरणपूरक कंपन्यांना ‘ग्रीन सिग्नल’

$
0
0

'एनओसी'ची अट पर्यावरण खात्याकडून शिथिल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून 'ग्रीन सिग्नल' मिळविण्यासाठी वर्षानूवर्षे रखडलेल्या पर्यावरणपूरक कामांना तात्काळ होकार देण्यासाठी जाचक नियम शिथील करण्यात आले आहेत. शैक्षणिक संस्थांचे प्रकल्प आणि प्रदूषण न करणाऱ्या कंपन्यांना यापुढे पर्यावरणीयदृष्ट्या ना हरकत प्रमाणपत्राची गरज पडणार नाही, अशी 'गुडन्यूज' केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी दिली.

चाकणमधील मर्सिडीस बेंझ कंपनीच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारित उत्पादन प्रकल्पाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद् घाटन झाले. उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री गिरीष बापट, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार सुरेश गोरे, आमदार संजय भेगडे, मर्सिडीज बेंझ कंपनीचे मुख्यकार्यकारी अधिकारी एबर्ड केर्न, पियुष आरोरा, रघुनंदन पेंडसे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

या वेळी जावडेकर म्हणाले, 'काही वर्षांपूर्वीपर्यंत पर्यावरण मंत्रालय विकास प्रकल्पाला अडथळा आणणारे खाते म्हणून प्रसिद्ध होते; पण या पुढे काळात या खात्याने पर्यावरणाभिमूख विकासाला प्रोत्साहन देण्याची भूमिका स्वीकारली आहे. पंतप्रधानांच्या मेक इन इंडिया अभियानाला गती देण्यासाठी उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या पर्यावरण विषयक परवान्यांचे प्रमाण कमी करण्यात आले आहे.'

'मेक इन इंडिया'ला अधिक गती देण्यासाठी प्रदूषण आणि पर्यावरणावर परिणाम न करणाऱ्या उद्योगांना तसेच शैक्षणिक संस्थांना पर्यावरण विषयक शासनाच्या परवानग्यांची गरज राहणार नाही, असा निर्णय मंत्रालयाने घेतला आहे. मात्र, त्यांना पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या नियमांची पूर्तता करावी लागेल, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.

उद्योगमंत्री देसाई म्हणाले, 'महाराष्ट्राची जगभरात उद्योग फ्रेंडली, अशी नवी ओळख निर्माण होत आहे. त्यामुळे जगभरातील उद्योजक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला प्राधान्य देत आहेत. राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आणून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.'

उत्पादन क्षमता वाढली
मर्सिडीझच्या चाकणमधील फेज टूमध्ये कंपनीची भारतातील उत्पादनाची क्षमता वाढली आहे. यामुळे पुण्यामध्ये एस क्लास, इ क्लास, सी क्लास, एम क्लास, जीलए क्लास आणि आता जीएलए या सहा प्रकारातील गाड्यांची निर्मिती पुण्यामध्येच करणे शक्य झाले आहे. नवीन प्लॉन्टमुळे दर वर्षी २० हजार गाड्या तयार होणार आहेत. विशेष म्हणजे या प्लॅन्टमध्ये सर्व भारतीय लोक कामाला आहे. गाड्यांच्या निर्मितीसाठी आ‍वश्यक असलेली ६० टक्के सामग्री देखील भारतातील औद्योगिक कंपन्यांमधून येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काँग्रेस-भाजप वादात गाडी खरेदी अनिर्णित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांसारखीच गाडी उपमहापौरांना घ्यावी, असा हट्ट काँग्रेसने गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत धरला. तर, दोन्ही पदाधिकाऱ्यांतर्फे सध्या वापरल्या जात असणाऱ्या गाड्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी भाजप-शिवसेनेने केली. त्यामुळे, गुरुवारी नव्या गाड्या खरेदीचा निर्णय अनिर्णितच राहिला.

महापौर आणि उपमहापौरांसाठी नवीन गाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव गुरुवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला. राज्य सरकारने ठरवून दिलेल्या निकषांनुसार महापौर आणि उपमहापौरांसाठी ठराविक किमतीची नवीन गाडी घेतली जाणार असल्याचा स्पष्ट उल्लेख असतानाही काँग्रेसच्या सदस्यांनी महापौरांसारखीच गाडी उपमहापौरांना घेण्यात यावी, अशी उपसूचना दिली. महापौर-उपमहापौर यांच्यासाठी एकाच दर्जाच्या आणि किमतीच्या गाड्या घेता येणार नाहीत असे स्पष्ट करून ही उपसूचना व्यवहार्य नसल्याचा खुलासा प्रशासनाकडून करण्यात आला. तरीही, काँग्रेसचे सदस्य उपमहापौरांना महापौरांसारखीच गाडी मिळाली पाहिजे, या मागणीवर ठाम होते.

शहराच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी नव्या गाड्या घेण्याच्या प्रस्तावालाच भाजप आणि शिवसेनेने विरोध केला. महापौर-उपमहापौरांच्या ताफ्यात सध्या असलेल्या गाड्यांची दुरुस्ती केली जावी आणि त्या सुस्थितीत आणल्या जाव्या, अशी भूमिका भाजपच्या राजेंद्र शिळीमकर आणि श्रीकांत जगताप यांनी मांडली. नव्या गाड्या खरेदीबाबत एकमत होत नसल्याने अखेर हा प्रस्ताव पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांनी दिली.

बजेट वाढणार?

महापौरांसाठी टोयोटा कंपनीची करोला अल्टिस ही गाडी घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या गाडीसाठी सुमारे १५ लाख रुपये खर्च करण्याची पालिकेची तयारी आहे. उपमहापौरांसाठी मारुती सुझुकीच्या सिअॅझ प्लस गाडीच्या खरेदीसाठी ७ लाख ६३ हजार रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. आता, उपमहापौरांनाही महापौरांसारखीच गाडी घ्यायची झाली, तर त्यात वाढ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्राच्या कारभारामुळे भवितव्य धोक्यात

$
0
0

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'देश एकसंध राखण्यात देशातील नोकरशाहीचेही मोठे योगदान आहे. परंतु, केंद्र सरकारतर्फे आपल्याच मर्जीतले आपल्याच विचारसरणीचे अधिकारी मोक्याच्या जागांवर बसवले जात आहेत. त्यामुळे देशाचे भवितव्य धोक्यात येत आहे,' अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

युनिक अॅकॅडमीतर्फे काढण्यात आलेल्या पहिल्या 'भारत वार्षिकी'चे प्रकाशन चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी झाले. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, 'युनिक अॅकॅडमी'चे संचालक तुकाराम जाधव, विजय कुंजीर, मल्हार पाटील, 'परिवर्तनाचा वाटसरू'चे अभय कांता या वेळी उपस्थित होते.

'केंद्रातील नवे सरकार देशाची मूळ गाभाच बदलण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी काही वेडेवाकडे प्रयोग केले जात आहेत. त्यामुळे या देशात सामाजिक सौहार्द राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चांगल्या अधिकाऱ्यांना योग्य जागी बदली, योग्य बढती दिली पाहिजे. मंत्रालयात चालणारा बदलीचा धंदाही थांबला पाहिजे,' असेही त्यांनी सांगितले.

मोदी सेल्सपर्सन नव्हे खरेदीदार

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले 'इतर देशांचे प्रमुख परदेशात जाताना त्या देशाचे सेल्समन म्हणून जातात. आपल्या प्रत्येक दौऱ्यात आपल्या देशातील कंपन्यांना त्या देशातील ऑर्डर कशा मिळतील, हे पाहतात. परंतु, मोदी मात्र खरेदीदार म्हणून परदेशात जातात. परदेशी जाऊन त्यांचीच उत्पादने खरेदी करतात. किंवा मदतीचे धनादेश वाटत सुटतात. मोदी यांच्या परदेश दौऱ्याने मोजके उद्योजक सोडल्यास देशाला काय फायदा झाला, याचे उत्तर शोधावे लागेल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरज स्वतंत्र ‘रिंग रोड’ची

$
0
0

टीम मटा, पुणे

दीर्घ पल्ल्याच्या अवजड वाहनांची पुणे शहरातून वाहतूक होऊ नये, यासाठी कात्रज-देहुरोड बायपास तयार करण्यात आला खरा, पण आता वाढलेल्या उपनगरांमुळे हा हमरस्तादेखील शहरातील गल्लीबोळाप्रमाणेच भासू लागला आहे. स्थानिकांच्या दुचाकी-चार चाकी वाहतुकीबरोबरच सहा आसनी वा जीपमधून होणारी अनिर्बंध बेकायदा प्रवासी वाहतूक, भलेमोठे ट्रक-कंटेनर, खासगी व्हॉल्व्हो-एसटीच्या बसेस अशा वाहतुकीचा या मार्गावर प्रचंड ताण आहे. त्यातच, योग्य सर्व्हिस रोडचा अभाव आणि नियम धुडकावून सर्रासपणे भरधाव रेटल्या जाणाऱ्या गाड्या, अशा परिस्थितीत प्राणघातक अपघातांची मालिका सुरू आहे. पोलिसांकडून केवळ पाहणी पथके, अहवालांचे कागदी घोडे नाचविले जात असून कोणतीही प्रभावी कारवाई केली जात नाही. परिणामी, अपघातांच्या संख्येत वाढच होत आहे.

'मटा'च्या प्रतिनिधींनी या 'बायपास'ची पाहणी करून धोकादायक परिस्थितीची पाहणी केली. बाणेर रस्ता, चांदणी चौक, सिंहगड रोड, धनकवडी, कात्रज, खडकवासला, पिरंगुट परिसरातील वाहतुकीचा मोठा ताण बायपासवर पडतो आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये येरवडा भागातील कुटुंब लग्न समारंभावरून परत येत असताना कुटुंबातील काही सदस्यांना आपला जीव गमवावा लागला होता. शिंदेवाडी दुर्घटना आणि बाणेर परिसरात राहणाऱ्या दोन तरुण व एका तरुणीचा कोल्हापूरला जाताना गाडी नदीत पडून गंभीर अपघात झाला यात तिघांनाही आपला जीव गमवावा लागला. वारंवार होणारे ट्रॅफिक जॅम, हायवेच्या बाजूने वाढणारी बांधकामे आणि अवजड वाहनांची संख्या यामुळे पुणे-बेंगळुरू महामार्ग अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे. 'हायवे' रुंदीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. याकडेही दुर्लक्ष केले जात आहे.

कोणतीही मोठी घटना घडल्यावर प्रशासनाकडून पाहणी केली जाते; तसेच त्यावर त्वरित उपाय योजना करण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही. 'नॅशनल हायवे अॅथॉरिटी'कडून 'हायवे'वरील कामांच्या वेळेचा फलक लावण्याव्यतरिक्त कोणतीच खबरदारी घेतली जात नाही. अपघातस्थळी तातडीने पाहोचण्यासाठी अॅम्ब्युलन्स सेवा सुरू होणार होती. तसचे अपघातग्रस्तांना वाचविण्यासाठी हेलिकॉप्टरची सुविधाही होणार होती. मात्र, याबाबत कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. संपूर्ण हायवेवर पुणे जिल्ह्याच्या हद्दीत कोणत्याच ठिकाणी ट्रक टर्मिनल नसल्याने ट्रक; तसेच अवजड वाहने थांबवण्यासाठी हायवेच्या बाजूलाच थांबवली जातात. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर कोणतेच नियंत्रण नसल्याने वाहतुकीचे नियम तोडले जातात. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीच व्यवस्था नसल्याने या भागामध्ये सुविधांची वानवा आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

काय आहेत अपघातांची कारणे?

- अनेक ठिकाणी दुभाजक पंक्चर
- पादचारी व वाहन चालकांसाठी भुयारी मार्गांची मर्यादित संख्या
- स्ट्रिट लाइट व वाहतूक चिन्हांचा अभाव
- दुभाजकांवरील झाडांची उंची वेगवेगळी
- सर्व्हिस रोड आणि हायवे यांचे एकत्रिकरण
- तीव्र उतार आणि वळणाचा रस्ता

काय करता येईल?

- नागरी वस्ती असलेल्या हायवेच्या डिव्हायडवर रेलिंग बसविणे.
- पादचारी भुयारी मार्ग तयार करणे.
- अनावश्यक डिव्हायडर पंक्चर बंद करणे.
- अपघातग्रस्त २० ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्र असे बोर्ड लावावेत.
- उड्डाणपुलांवरून सर्व्हिस रोडवर येणारे यू टर्न बंद करावेत.
- सर्व्हिस रोड हायवेला जोडतात अशा ठिकाणी ब्लिंकर्स, रिफ्लेक्टर लावावेत.
- हायवेवरील कामे ठरलेल्या वेळेतच पूर्ण होणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

…पुन्हा तोच जीवघेणा अपघाती स्पॉट

$
0
0

सहा आसनींचा स्टॉप; वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महामार्गावरून वेगाने येणारी अवजड वाहने आणि स्थानिक वाहनांचा ओघ अशा कात्रीत असलेल्या कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील वडगाव धायरी पुलाचा 'तोच' जीवघेणा स्पॉट गुरुवारी पुन्हा सहा जणांचा बळी घेऊन गेला. यापूर्वी दोन वेळा याच ठिकाणी मोठे अपघात झाले, पण त्यानंतर वाहतूक पोलिस जागे झाले ना सरकारी यंत्रणा. या अपघाती स्पॉटवर उपाययोजना करण्यासाठी आणखी किती बळी जाण्याची वाट पाहणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वडगाव धायरीच्या पुलावरील वाहतुकीची कोंडी गेल्या काही महिन्यांत वाढली आहे. कात्रज आणि खेडशिवापूरहून मुंबईला जाणारी अवजड वाहने तसेच वडगाव परिसरातील स्थानिक वाहनांची गर्दी या पुलाजवळ होते. त्याचे मुख्य कारण म्हणजे या पुलाच्या चढावरच सहा आसनी रिक्षा आणि प्रवासी जीपचा बेकायदा स्टॉप. महामार्गावर अगदी रस्त्याच्या मधोमध वाहने उभी करून त्यांचा व्यवसाय सुरू असतो. मग महामार्गावर वाहतूक कोंडी झाली तरी त्याची पर्वा कोणालाही नसते. या व्यवसायाकडे वाहतूक पोलिसांचाही काणाडोळा असतो.

या सहा आसनी व प्रवासी जीपमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या पुलाच्या जवळच्या बाजूस मोठी गर्दी असते. पुलाच्या लगत सर्व्हीस रस्ता आहे. तो किमान पंधरा फूट खालच्या बाजूस आहे. या पुलाच्या सुरुवातीला रस्त्याला कठडे नसल्याने वाहने थेट सर्व्हिस रस्त्यावर घसरल्याचे अपघात झाले आहेत. पण या 'किरकोळ' अपघातांकडे लक्ष दिले गेले नाही. गतवर्षी एका भरधाव कंटेनरने याच ठिकाणावर आठ वाहनांना उडविले. त्यातील चार जण मृत्युमुखी पडले. त्या वेळी या प्रवासी वाहनांवर जुजबी कारवाई झाली. पण त्यानंतर 'ये रे माझ्या मागल्या'प्रमाणे कारभार सुरू झाला.
या पुलाच्या अलीकडील ब्रीजवरून एका कंटनेरमधील लोखंडी प्लेट वाहनचालकांच्या अंगावर पडल्या. त्यातही दोघांचा मृत्यू ओढवला. ही अपघातांची मालिका गेले वर्ष-दीड वर्षे सुरू असताना वाहतूक पोलिस मात्र सुस्तच राहिले आहे. त्यातच या महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे या अपघाती स्पॉटजवळील कोंडीत भर पडत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीचा कारभार अपघातांना निमंत्रण देणारा ठरला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासही कोणी धजावत नाही.

राष्ट्रीय महामार्गावर वर्षभरात तीन व पाच वर्षांत नऊ अपघात झाल्यावर तो 'ब्लॅक स्पॉट' ठरविला जातो. वडगाव धायरी पुलाजवळ एवढे अपघात होऊनही त्यावर उपाययोजना करण्यासाठी कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. हा 'ब्लॅक स्पॉट' काढण्यासाठी आणखी बळींची वाट पाहिली जात आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता अपघातांचा...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील वाहतूक व्यवस्था कशी नसावी, याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे सिंहगड रोड ते नवले पुलादरम्यानच्या रस्त्यांवरून अनुभवायला मिळणारी वाहतूक. कधी वाहतूक पोलिसांच्या साक्षीने, तर कधी त्यांच्या गैरहजेरीमध्ये या रस्त्यावरून सर्वसामान्य नागरिकांना अगदी चक्रावून टाकणारी वाहतुकीची दुरवस्था अनुभवायला मिळतो आहे. त्यामुळेच कात्रज - देहूरोड बायपास रस्त्यावरील सिंहगड रोड परिसरातील दोन पुलांचा परिसर गेल्या वर्षभराच्या काळापासून केवळ अपघातांमुळेच गाजतो आहे. पुलांच्या परिसरामधील बेशिस्त वाहतूक आणि पूलांच्या परिसरामध्ये होणारी गर्दी अपघातांना वारंवार आमंत्रण देत असल्याचे या परिसरातील नागरिक सातत्याने अनुभवत आहेत.

पुण्याकडून सिंहगडाकडे जाताना वडगाव पुलाच्या डाव्या बाजूने कात्रज रस्त्याकडे जाण्यासाठी सध्या एकेरी वाहतूक लागू करण्यात आली आहे. वडगाव पुलाच्या उजवीकडील सर्व्हिस रोड हा सिंहगड रोडकडे येण्यासाठीच्या एकेरी वाहतुकीसाठी वापरला जातो आहे. या दोन्ही एकेरी रस्त्यांवरील वाहतुकीला शिस्त लावण्यात वाहतूक पोलिस सातत्याने अपयशीच ठरले आहेत. नवले हॉस्पिटल लगतच्या पुलाचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले. या पुलाखालच्या परिसरातून कात्रजकडून सिंहगड रोडमार्गे देहूरोडकडे जाणारी वाहतूक, सिंहगड रोडकडून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक, साताऱ्यावरून सिंहगड रोडकडे येणारी वाहतूक, साताऱ्याकडून कात्रजकडे जाणारी वाहतूक आणि कात्रजकडून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक सरमिसळ पद्धतीने सध्या सुरू आहे. वाहतुकीच्या परिस्थितीचे हे वर्णन वाचताना जितकी गोंधळलेली परिस्थिती निर्माण होणार आहे, त्याहीपेक्षा कित्येक पट अधिक गोंधळ आपल्याला या पुलाखाली अनुभवता येतो. त्यामुळेच या पुलाखालून कोणत्याही दिशेने वळण्याचा विचार करणाऱ्या वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो.

या अवघड परिस्थितीमध्ये अचानक रस्त्याच्या कडेने थांबणारी प्रवासी वाहतुकीची वाहने आणखीच भर घालतात. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांच्या साक्षीनेच हे वाहतूकदार आपला व्यवसाय करत आहेत. नवले पुलाखालच्या परिसरामध्ये, सातारकडून वारज्याकडे जातानाच्या वडगाव पुलाजवळच्या भागात, पुण्याकडून साताऱ्याकडे जाताना नवले पुलाच्या सुरुवातीला अत्यंत धोकादायक पद्धतीने हे वाहतूकदार आपली वाहने उभी करतात. हायवेच्या परिसरात तर एसटी आणि ट्रकही प्रवासी घेण्यासाठी थांबतात. या परिसरात गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक छोटे- मोठे अपघात झाल्यानंतरही या परिसरामध्ये सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याचा विचार झालेला दिसत नाही. रस्त्यांच्या कामांमुळे आणि विस्कळीत वाहतुकीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या अडचणीत त्यामुळे दिवसेंदिवस भरच पडत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वेंकिज’ची उत्पादने परत मागवणार

$
0
0

काळ्या यादीतील उत्पादनांची 'एफडीए'कडून होणार तपासणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नेस्ले कंपनीच्या मॅगी नूडल्सवर बंदी घालण्यात आल्यावर आता पुण्यातील 'वेंकिज'च्या उत्पादनाला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. त्यामुळे 'वेंकिज'च्या 'क्रिस्पी चिकन बर्गर'ची उत्पादने रिकॉल (परत मागविणे) करण्यासाठी कंपनीला अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) नोटीस बजावण्यात येणार आहे.

या शिवाय टाटा स्टारबक्ससह अन्य काळ्या यादीतील कंपन्यांच्या उत्पादनांची एफडीएकडून तपासणी करण्यात येणार आहे. अन्न सुरक्षितता व मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) नाकारलेल्या पाचशे उत्पादनांची यादी अन्न सुरक्षितता आयोगाकडे दिली आहे. प्राधिकरणाच्या वैज्ञानिक समितीच्या दिल्लीत नुकत्याच झालेल्या बैठकीत ही यादी आयोगाकडे देण्यात आली. त्या यादीतील बहुतेक पदार्थांमध्ये साखर, मीठ, जड धातू, कॅरॅमल, कॅफेन, लोह हे घटक प्रमाणाबाहेर आढळले आहे. याशिवाय पुण्याच्या 'वेंकिज' कंपनीच्या पोल्ट्री उत्पादित 'क्रिस्पी चिकन बर्गर पॅटी' या खाद्यपदार्थालाही काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. त्याशिवाय विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांच्या दुधाचे पदार्थ, ज्यूस, व्हिटॅमिन, पूरक अन्नपदार्थ, सेंद्रिय तांदूळ, सेंद्रिय भाजी, प्रोटिन टेस्टी चॉकलेट यासारख्या खाद्यपदार्थांना देखील काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

'पुण्यातील 'वेंकिज'चे पोल्ट्री उत्पादन असलेल्या क्रिस्पी चिकन बर्गर या पदार्थाला 'एफएसएसएआय'ने काळ्या यादीत टाकले आहे. त्यामुळे या कंपनीचे शहरातील विविध ठिकाणी विक्रीसाठी असलेले उत्पादन पुन्हा परत मागविण्यासाठी आम्ही कंपनीला नोटीस पाठविणार आहोत. त्याशिवाय टाटा स्टारबक्ससह अन्य काळ्या यादीतील कंपन्यांची उत्पादने बाजारात विकली जात आहेत की नाही याची तपासणी करणार आहोत,' अशी माहिती एफडीएचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी 'मटा'ला दिली.

वेंकिंजचे उत्पादन काळ्या यादीत टाकले आहे. काळ्या यादीत टाकलेल्या सर्वच कंपन्यांना 'एफएसएसएआय'कडून देखील नोटिसा पाठविण्यात येतात. यापूर्वी 'मॉन्स्टर एनर्जी ड्रिंक'; तसेच 'क्लाउड नाइन' ही दोन्ही शीतपेये बाजारात परत मागविण्यासंदर्भात आदेश देण्यात आले होते. ही शीतपेये सध्या बाजारात दिसत नाहीत. अन्य उत्पादनांची देखील चौकशी करण्यात येईल, असे सहायक आयुक्त दिलीप संगत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कट-ऑफ’मध्ये गोलमाल

$
0
0

* अकरावीसाठी आघाडीच्या कॉलेजांकडून खोटे कट-ऑफ
* प्रवेश समिती बजावणार नोटीस

>> योगेश बोराटे, पुणे

अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेशाच्या अधिकृत माहिती पुस्तिकेमधूनच शहरातील आघाडीच्या कॉलेजांनी खोटे 'कट-ऑफ मार्क' प्रसिद्ध केल्याची माहिती गुरुवारी उजेडात आली आहे. या कॉलेजना नोटीस बजावून खरे 'कट-ऑफ मार्क' नव्याने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचा निर्णय केंद्रीय प्रवेश समितीने घेतला आहे.

अकरावी केंद्रीय प्रवेशप्रक्रियेतील गैरकारभाराविषयी 'मटा'ने सातत्याने आवाज उठवला आहे. ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या कक्षेबाहेरील ऑफलाइन प्रवेशादरम्यान शिक्षणसंस्थांकडून बेकायदा कृत्ये केली जात असल्याची माहिती प्राप्त झाली होती. 'सिस्टीम फॉर करेक्टिंग मूव्हमेंट'च्या (सिस्कॉम) वैशाली बाफना यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाला पत्र लिहून, या प्रकाराबाबत गुरुवारी विचारणा केली. या पत्रामध्ये शहरातील काही कॉलेजांमधील गेल्या वर्षीच्या अकरावीच्या प्रवेशांबाबतची माहिती आणि कॉलेजांनी अकरावीच्या केंद्रीय प्रवेश समितीकडे यंदाच्या प्रक्रियेसाठी सादर केलेली माहिती यांची तुलना केली आहे. गेल्या वर्षी त्या त्या कॉलेजमध्ये सर्वांत कमी टक्केवारीचा झालेला प्रवेश आणि कॉलेजने 'कट-ऑफ' म्हणून यंदाच्या माहितीपुस्तिकेत नोंदवलेली टक्केवारी यांच्यामध्ये असणारी तफावत यातून उघड झाली आहे.

तातडीने कार्यवाही : जाधव

पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक आणि अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश समितीचे अध्यक्ष रामचंद्र जाधव यांच्याशी 'मटा'ने संपर्क साधला. ऑफलाइन प्रवेशांची टक्केवारी विचारात घेतली नसल्याने 'कट-ऑफ'चा हा घोळ झाल्याचे त्यांनी कबूल केले. झालेली ही चूक दुरुस्त करण्यासाठी कॉलेजांकडून सुधारित कट-ऑफ मागवून, ते लवकरात लवकर विद्यार्थ्यांना पोहोचवण्यासाठी समिती युद्धपातळीवर काम करणार असल्याचेही त्यांनी 'मटा'ला सांगितले.

यापूर्वीच्या प्रवेशअर्जांचे काय?

अकरावी प्रवेशाच्या अर्जामध्ये प्राधान्यक्रम भरणे महत्त्वाचे असते. कॉलेजच्या गेल्या वर्षीच्या 'कट-ऑफ'नुसार यंदाचा प्रवेशअर्ज भरला जातो; मात्र आता हे 'कट-ऑफ'च खोटे असल्याने त्याच्या आधारे विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जांना ग्राह्य कसे धरणार, विद्यार्थ्यांना नव्याने प्राधान्यक्रम भरण्याची संधी देणे आवश्यक नाही काय, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘बायपास’वर पुन्हा मृत्यू भरधाव

$
0
0

वडगाव-धायरी पुलावर डंपरचा अपघात, सहा ठार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर धायरी पूल येथे डंपरचालकाचा ताबा सुटल्यामुळे रस्त्यातील अकरा वाहनांना धडक बसून गुरुवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जण मृत्युमुखी पडले आणि चौघे जखमी झाले. नादुरुस्त झालेला डंपर ओम्नी आणि सँट्रो कारला धडक दिल्यानंतर इतर गाड्यांवर कोसळला. त्यामुळे या गाड्यांचा चेंदामेंदा झाला. पायाभूत सुविधांचा अभाव, वाहतूक पोलिसांच्या अभयाने अनिर्बंध सुरू असलेली बेकायदा वाहतूक आणि नियम धुडकावणारे वाहनचालक अशा वातावरणात बायपास हा मृत्यूचा सापळाच ठरतो आहे.

या अपघातामध्ये सुभाष विनायक चौधरी (२५, रा. सुदाम पाटील चाळ, मनपा रोड, डोंबिवली), बालाजी रामसिंह राठोड (२५), रवींद्र तुकाराम सावंत (३५), सारिका रवींद्र सावंत (३०), रेवती रवींद्र सावंत (१०) (सर्व रा. सांगवी, जि. सातारा), महाबर यादव गायकवाड (२३) या सहा जणांचा मृत्यू झाला. भालचंद्र विठ्ठल कालूरकर (४२, रा. धनकवडी), रूपेश राजेंद्र पळसदेवकर (३४, रा. धनकवडी), बाळासाहेब विठ्ठलराव घाडगे (५६, रा. कोंढवा), शरद सर्जेराव मोरे (५४, रा. सातारा) हे चौघे जखमी झाले आहेत. जखमी झालेले भालचंद्र कालूरकर यांना जगताप हॉस्पिटल येथे, रूपेश पळसदेवकर यांना सिद्धी हॉस्पिटल येथे, बाळासाहेब घाडगे आणि शरद मोरे यांना माई मंगेशकर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा डंपर दरी पुलाकडून वारज्याच्या दिशेने निघाला होता. डंपरमध्ये डांबर आणि खडी होती. भरधाव वेगाने येत असलेला हा डंपर वडगाव-धायरी पुलावर नादुरुस्त झाल्याने चालकाचा ताबा सुटला. त्याने आधी एका खासगी प्रवासी व्होल्व्हो बसला धडक दिली. त्यानंतर एका जीपला धडक देऊन व्होल्व्हो झाडाला धडकली.

त्यानंतरही डंपरचालकाला ताबा मिळवता आला नाही. त्याने पुढे जाऊन तवेरा आणि सहा सीटर पॅगो या गाड्यांना उजव्या बाजूने धडक दिली. त्याच दरम्यान डाव्या बाजूने जात असलेल्या स्कूटी, यामाहा, प्लेजर या दुचाकींना धडक दिली; तसेच समोर असलेल्या स्विफ्ट कारलाही धडक दिली. त्यानंतर सँट्रो आणि ओम्नी व्हॅनला धडक दिली. तरीही वेगावर नियंत्रण न आलेला हा डंपर पुलाचा संरक्षक कठडा तोडून खाली कोसळला. डंपरखाली ओम्नी आणि सँट्रो गाडी सापडल्यामुळे त्याचा चेंदामेंदा झाला. यात सहा जणांचा मृत्यू झाला.

मटा भूमिका

आणखी किती मृत्यू?

कात्रज-देहूरोड मार्गावरील आणखी एका भीषण अपघातानंतर आणि त्यात सहा जणांचा बळी गेल्यानंतर तरी प्रशासनाला जाग येणार काय, हा प्रश्न आहे. या संपूर्ण मार्गावर दुतर्फा सर्व्हिस रोड नाही. अनेक ठिकाणी रस्ता दुभाजक सोयीने फोडण्यात आला आहे. प्रमुख चौकांत बसस्टॉप, रिक्षा थांबा यांची सोय नाही. सहा आसनी रिक्षा तर कोठेही थांबत असतात. साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्याही वडगावच्या पुलाजवळ थांबलेल्या असतात. तात्पुरत्या सोयीसाठी अनेक वाहनाचालक उलट्या दिशेने येत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच आहे. या रस्त्यावरील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पुरेसे पोलिसही नसतात. त्यामुळे हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा झाला आहे. तो दूर करण्यासाठी आणखी किती अपघातांची वाट प्रशासन पाहत आहे? गुरुवारच्या अपघातापासून धडा घेऊन तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील मेट्रो मिक्सच!

$
0
0

मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण; शिवाजीनगर - हिंजवडी मार्गही व्यवहार्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'पुणे मेट्रोबाबत भूमिगत की एलिव्हेटेड, अशी एकच भूमिका घेण्याचे कारण नाही. ज्या ठिकाणी जे व्यवहार्य आहे, ते स्वीकारले पाहिजे. त्यामुळे पुण्यात मिक्स मेट्रोचे मॉडेल राहील,' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी स्पष्ट शब्दांत सांगितले; तसेच शिवाजीनगर ते हिंजवडी हा नवा मेट्रोमार्गही व्यवहार्य असून, त्याचे कामही वेगाने मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

'दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला भेट देऊन मी पुणे मेट्रोबाबत चर्चा केली आहे. मेट्रोसंदर्भात पालकमंत्री बापट यांच्या समितीने दिलेला अहवाल मान्य करून केंद्र सरकारकडे पाठवला आहे. पुणे मेट्रोला थोडा उशीर झाला; पण यापुढे हे काम वेगाने मार्गी लावण्यात येईल,' असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या हिंजवडीमध्ये येण्या-जाण्याचा त्रास दूर करण्यासाठी शिवाजीनगर ते हिंजवडी असा मेट्रोमार्ग व्यवहार्य असल्याचे आढळून आल्याचेही त्यांनी सांगितले.

'पुणे हे मुंबईनंतर देशातील महत्त्वाचे शहर आहे. त्यामुळे विकासाच्या शर्यतीत पुण्याला मागे राहू देणार नाही आणि भविष्यात पुणे हे आंतरराष्ट्रीय शहर होईल,' अशी हमी त्यांनी दिली. मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशनच्या 'संवाद विकासाचा' या कार्यक्रमात ते बोलत होते.

पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे,विजय शिवतारे, संघटनेचे अध्यक्ष सुधीर दरोडे, तसेच एस. आर. कुलकर्णी, गजेंद्र पवार, जितेंद्र सावंत, ज्ञानेश्वर घाटे आणि संदीप कोल्हटकर आदी या वेळी उपस्थित होते.

डीपी पारदर्शक हवा

'शहराचा विकास आराखडा (डीपी) ताब्यात घेताना राज्य सरकारला आनंद झाला अशी स्थिती नाही; मात्र दुर्दैवाने सर्व मुदती पार झाल्यानंतरही तो मान्य न झाल्याने तो ताब्यात घ्यावा लागला. आता सरकारने नेमलेली समिती सहा महिन्यांत आराखडा सरकारला सादर करील आणि त्यानंतर वेगाने आराखड्यास मान्यता देऊ,' असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. 'आम्हाला कोणी येऊन भेटावे, अशी आमची अपेक्षा नाही. त्यामुळे आम्ही त्यासाठी विलंब लावणार नाही,' असा टोला त्यांनी लगावला.

चर्चावीरांना कानपिचक्या

'पुणे मेट्रोला थोडा उशीर झाला. मुंबई आणि नागपूरच्या मेट्रोचे काम सुरू झाले,' असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील चर्चावीरांचे कान टोचले. 'पुणे हे बुद्धिवंतांचे शहर आहे. नागपूरमध्ये काही फार वाद होत नाहीत, त्यामुळेच तेथे लवकर काम सुरू झाले,' अशी टिप्पणी त्यांनी केली. 'एलिव्हेटेड मेट्रोला जे विरोध करतात, ते कधीही मेट्रोत बसत नाहीत,' असे आढळून आल्याचे त्यांनी 'डीएमआरसी'च्या अधिकाऱ्यांचा हवाला देऊन सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे-नाशिक फक्त ५० मिनिटांत!

$
0
0

'सी प्लेन' सेवा १५ जूनपासून सुरू

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे आणि नाशिकदरम्यानचा कंटाळवाणा रस्ते प्रवास आता मजेदार आणि वेगवान होणार आहे. या दोन शहरांना जोडणारी 'सी प्लेन' ही विमानसेवा १५ जूनपासून सुरू होत असून, केवळ पन्नास मिनिटांत नाशिक गाठणे शक्य होणार आहे.

मेरिटाइम एनर्जी हेलि एअर सर्व्हिसेसचे (मेहेर) संचालक सिद्धार्थ वर्मा यांनी ही घोषणा केली. नाशिकच्या गंगापूर धरणातून सी प्लेन उड्डाण करण्याची मूळ कल्पना होती. मात्र, पर्यावरणप्रेमींनी त्याला विरोध केल्याने या विमानसेवेचे तूर्तास जमिनीवरून म्हणजे ओझर विमानतळावरून उड्डाण होणार आहे, तर पुण्यात लोहगाव विमानतळ वापरले जाणार आहे. सुरुवातीला नऊ आसनी विमाने या सेवेत असतील. मात्र, ऑगस्टपासून १८ आसनी आणि अधिक प्रतिसाद असल्यास ४५ आसनी विमानसेवेत आणण्याची तयारी असल्याचे सांगण्यात आले. या सेवेत सोमवार ते शुक्रवार दरम्यान रोज दोन फेऱ्या होणार आहेत. त्यात पहिले विमान सकाळी पावणेदहा वाजता नाशिकहून, सकाळी अकरा वाजता पुण्यातून, सायंकाळी साडेचार वाजता पुण्यातून, सायंकाळी सहा वाजता नाशिकहून सुटणार आहे. पन्नास मिनिटांचा हा प्रवास आहे.
'पुणे व नाशिक या औद्योगिक शहरांदरम्यान नियमित प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. रस्ते मार्गाने हा प्रवास करणे जिकिरीचे होते. त्यात वाहतूक कोंडी व इतर अडचणीही येतात. या पार्श्वभूमीवर, ही विमानसेवा उपयुक्त ठरणार आहे. येत्या काळात तिकीटदर अजून कमी करण्याचा प्रयत्न आहे,' असे वर्मा यांनी सांगितले.

खडकवासला धरणाचा सी प्लेनसाठी वापर करण्याची कल्पना मांडण्यात आली होती. मात्र, एनडीए धरणाचा वापर करत असल्याने त्याला परवानगी मिळू शकली नाही, असेही त्यांनी सांगितले.

नाशिक-पुणे हवाई सेवेची वैशिष्ट्ये

* अवघ्या ४५ मिनिटांचा प्रवास* तिकीट दर ६,९९९ रुपये (१५ ते ३० जून दरम्यान ५,९९९ रुपये)* नियमित दोन फेऱ्या
* वीस मिनिटे आधी 'चेक इन'
* पाच किलोपर्यंत सामान नेण्यास मान्यता

यानंतर कुठे...

महाबळेश्वर व गणपतीपुळे

'विमानसेवा उपलब्ध नसलेल्या ठिकाणी सी प्लेन उपयुक्त ठरतात. महाराष्ट्रात सी प्लेन सेवा वाढल्यास विकासाला, पर्यटनाला अधिक चालना मिळेल. आतापर्यंत जुहू ते लोणावळा, अॅम्बी व्हॅली या सेवांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. येत्या काळात गणपतीपुळे व महाबळेश्वर सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीची कायदेशीर पूर्तता केली जात आहे. त्याशिवाय गोवा राज्यातही अंतर्गत सेवा सुरू होत आहे, अशी माहिती वर्मा यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्यांच्या माहितीविनाच वेतन

$
0
0

अपंग कल्याण आयुक्तालयाचा गैरकारभार उघड

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अपंगांसाठीच्या अनुदानित शाळा व कर्मशाळांतील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी अपंग कल्याण आयुक्तालयाकडून जिल्हा समाजकल्याण विभागांना अनुदान देण्यात येते. मात्र, अपंग कल्याण आयुक्तालयाकडे या संस्थामध्ये किती कर्मचारी आहेत, याची माहितीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

राज्यातील अपंगांच्या विशेष शाळा व कर्मशाळांना मान्यता देताना अपंग कल्याण आयुक्तालयाने त्या संस्थेची इमारत, विद्यार्थी संख्या, अपंगांसाठी उपलब्ध असलेल्या मुलभूत सोयीसविधा आणि कर्मचारी आदी माहिती घेणे कायद्यान्वये अपेक्षित आहे. तसेच, अनुदानित शाळा व कर्मशाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी जिल्हा समाजकल्याण विभागाला निधी देताना प्रत्येक जिल्ह्यात किती कर्मचारी आहेत, त्यानुसार आयुक्तालयाकडून बिले पास केली जातात. मात्र, या शाळांमध्ये एकूण किती कर्मचारी आहेत. याची माहिती आयुक्तालयाकडेच उपलब्ध नसल्याचे आयुक्तालयानेच माहिती अधिकारात दिलेल्या उत्तरात सांगितले आहे.

'प्रहार' अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सुरेखा ढवळे यांनी माहितीच्या अधिकारात अपंग कल्याण आयुक्तालयाकडे अनुदानित व विनाअनुदानित शाळांची यादी, या शाळांत किती विद्यार्थी व कर्मचारी आहेत, त्यांची तपशीलवार माहिती मागितली होती. त्यावर शाळांमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती संस्था करीत असून त्यास जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रशासकीय मान्यता देतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांची माहिती आयुक्तालयाकडे उपलब्ध नाही, असे उत्तर देण्यात आले आहे. प्रत्यक्षात जिल्हा समाजकल्याण विभागाकडे विचारणा केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर त्याची एक प्रत अपंग कल्याण आयुक्तालयाकडे पाठवली जाते, असे त्यांनी सांगितले.

अपंगाच्या विशेष शाळा व कर्मशाळांमधील कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेसंदर्भात राज्य सरकारने १९ डिसेंबर १९९५ रोजी आदेश काढला आहे. कर्मचारी भरती करताना अपंग प्रवर्गासाठी त्यामध्ये विशेष आरक्षण ठेवण्यात आले आहे. त्यानुसार अपंग कल्याण आयुक्तालयाने विशेष शाळा व कर्मशाळांच्या मान्यतेचा प्रस्ताव पाठवताना कर्मचाऱ्यांची माहिती घेणे अपेक्षित आहे.

'जिल्हास्तरावर माहिती मिळेल...'

कर्मचाऱ्यांच्या वेतनाची बिले जिल्हा समाजकल्याण अधिकारी पाठवितात. त्याआधारावर त्यांना निधी मंजूर केला जातो. तसेच, नवीन कर्मचारी भरती करतानाही त्यांच्याकडूनच प्रशासकीय मान्यता दिली जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांची आयुक्तालयाकडे उपलब्ध नाही, ती जिल्हास्तरावर मिळेल, असे अपंग कल्याण आयुक्त नरेंद्र पोयाम यांनी स्पष्ट केले.

'आरोपात तथ्य नाही...'

राज्यामध्ये १८ ऑगस्ट २००४ रोजी नवीन कर्मचारी पॅटर्न लागू झाला. त्यावेळी राज्यातील अनुदानित विशेष शाळा व कर्मशाळातील कर्मचारी संख्येचा आढावा घेतला होता. त्यामध्ये नवीन कर्मचारी किती, जुने कर्मचारी किती, नवीन नियमांनुसार किती कर्मचारी संख्या आवश्यक आहे, त्यानुसार अतिरिक्त कर्मचारी किती याचा तपशिलवार अहवाल आयुक्तालयाने सरकारला सादर केला आहे. त्यामुळे आयुक्तालयाकडे कर्मचारी संख्या उपलब्ध नाही, ही चुकीची माहिती देण्यात आली आहे, असा आरोप सुरेखा ढवळे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुद्रांक निधीचे ‘वराती मागून घोडे’

$
0
0

उशिरा हस्तांतरण झाल्याने ग्रामपंचातींना फटका

>> कुलदीप जाधव, पुणे

राज्य सरकारकडून जिल्हा परिषदेला सव्वादोन महिन्यांपूर्वी प्राप्त झालेल्या मुद्रांक निधीचे ग्रामपंचायतींना नुकतेच हस्तांतरण करण्यात आले. परिषदेला ३१ मार्च रोजी मिळालेला निधी १५ दिवसांत प्रदान करणे अपेक्षित असताना केवळ प्रशासनाच्या अनास्थेमुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना त्यांच्या हक्काच्या मुद्रांक निधीपासून काहीकाळ वंचित रहावे लागले. आता येत्या आठवड्यात ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन अचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अचारसंहिता लागू झाल्यानंतर ग्रामपंचायतींना आणखी महिना, सव्वामहिना या निधीचा विनियोग करता येणार नाही. त्यामुळे 'सरकारी काम आणि सहा महिने थांब' याचा फटका ग्रामपंचायतींनाच बसल्याचे स्पष्ट झाले.

जिल्ह्यातील रजिस्टार ऑफिसकडून राज्य सरकाकडे मुद्रांक निधीची मागणी केली जाते. रजिस्टार ऑफिसचे शहरी आणि ग्रामीण असे दोन भाग करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील रजिस्टार कार्यालयांमध्ये झालेल्या व्यवहारांच्या संख्येनुसार त्यांनी सरकारकडे ८९ कोटी रुपये मुद्रांक निधीची मागणी केली होती. तर, शहरातील रजिस्टार ऑफिस सरकारकडे मागणी करण्याचेच विसरून गेले होते, असे जिल्हा परिषदेकडून सांगितले जात आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर रजिस्टार ऑफिसने १०० कोटी रुपयांची मागणी सरकारकडे केली. बजेट अधिवेशनामध्ये राज्य सरकारने या मुद्रांक निधीला मान्यता दिल्यानंतर परिषदेला एकूण १८९ कोटी रुपये मुद्रांक निधी प्राप्त झाला.

निधी प्राप्त झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींना तो निधी तातडीने वाटप करणे अपेक्षित होते. रजिस्टार ऑफिसकडून कोणत्या ग्रामपंचायत हद्दित किती व्यवहार झाले, याची तालुकानिहाय यादी जिल्हा परिषदेला पाठवली जाते. जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग त्यातून प्रत्येक ग्रामपंचायतीच्या हद्दित किती व्यवहार झाले, याचा हिशेब करतो आणि या तुलनेत निधी दिला जातो. मात्र, रजिस्टार ऑफिसकडून गावांच्या याद्या लवकर प्राप्त न झाल्याने निधीचे वाटप करता आले नव्हते.

नेमके काय घडले?

रजिस्टार ऑफिसकडून जिल्हा परिषदेला गावांच्या याद्या उशिरा प्राप्त झाल्याने निधी वाटपास विलंब झाल्याचे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत स्पष्टिकरण देण्यात आले; परंतु परिषदेने मागणी केल्यानंतर तीन दिवसांच्या आता गावांच्या याद्या उपलब्ध होऊ शकत होत्या, असे मत काही सदस्यांनी व्यक्त केले. त्यामुळे जिल्हा परिषदेनेही यासाठी खरोखरच पाठपुरावा केला नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो.

अत्याधुनिक यंत्रणेची गरज

रजिस्टार ऑफिसकडून तालुकानिहाय यादी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभागाला कसरत करून गावनिहाय यादी तयार करावी लागते. त्यामध्येही बरेच दिवस जातात. त्याएेवजी रजिस्टार ऑफिसकडूनच गावनिहाय यादी प्राप्त झाल्यास नंतर कसरत करावी लागणार नाही आणि तातडीने पैसे देणे शक्य होईल. ग्रामपंचायत, तलाठी ऑफिसातही आता ई-फेरफार, ई-सातबारा देण्यासाठी अद्ययावत, अशी सॉफ्टवेअर वापरली जात आहे. त्यामुळे रजिस्टार ऑफिसमध्ये एखादे सॉफ्टवेअर वापरून गावनिहाय व्यवहारांची अपडेट करणे फायद्याचे ठरेल.

मुद्रांक निधी म्हणजे काय ?

ग्रामपंचायत हद्दितील जमीन खरेदी-विक्री किंवा अन्य व्यवहारातून राज्य सरकारच्या तिजोरीत मुद्रांक शुल्कांतून भर पडत असते. त्या निधीतील काही वाटा राज्य सरकारकडून जिल्हा परिषदेला विकास कामांसाठी दिला जातो. जिल्हा परिषद मुद्रांक शुल्क अनुदानापोटी मिळणाऱ्या एकूण निधीपैकी पन्नास टक्के रक्कम जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना वितरित करणे अनिवार्य आहे. उर्वरित निधी जिल्हा ग्राम निधीत जमा केला जातो. जिल्हा निधीतील रकमेच्या खर्चाचे नियोजन हे वार्षिक अर्थसंकल्पात केले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक सुरक्षेचे आव्हान!

$
0
0

शाळा परिसरातील कोंडीचा प्रश्न कायम

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शाळा भरताना व सुटताना एकाच वेळेला बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लोंढ्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. शहराच्या मध्यवस्तीतील प्रमुख रस्त्यांवर आणि मुख्य चौकांच्या ठिकाणी असलेल्या शाळांच्या परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. या परिस्थितीवर मात करून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक शाखा सज्ज आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

येत्या सोमवार पासून शहरातील सर्व शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून न उद् भवणारा शाळांच्या परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा निर्माण होणार आहे. मध्यवस्तीत असणाऱ्या रमणबाग, आहिल्यादेवी, नवीन मराठी शाळा, रेणुकास्वरूप, पेरूगेट भावे शाळा, सरस्वती विद्या मंदिर, न्यू इंग्लिश स्कूल या शाळा आहेत. तसेच, टिळक रोड आणि कर्वे रोडवर शाळांबरोबरच शैक्षणिक संस्थांचीही संख्या जास्त आहे. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेला शाळांसमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांची रस्ता ओलांडण्याची घाई सुरू असते, त्यातच भरधाव वेगाने येणारी वाहने येत असतात. त्यामुळे अनेकदा अपघातही झाल्याचे यापूर्वी पाहायला मिळाले आहे. त्यामुळे ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिस शाखेकडून विशेष कृती कार्यक्रम राबविणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस व रिक्षा या देखील वाहतूक कोंडीचे एक कारण आहेत. अनेक शाळांच्या ठिकाणी या रिक्षा व बस उभ्या करण्यासाठी जागा नसते. त्यामुळे ही वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. शाळा सुटल्यानंतर सर्व मुले येईपर्यंत ही वाहने येथेच थांबलेली असतात. स्कूल बसमध्ये बसण्यासाठी गोंधळ होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांची रस्त्यावरच रांग लावली जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. या कोंडीवर उपाय म्हणून शाळांती वर्ग एकाच वेळी न सोडता ठराविक वेळाच्या अंतराने सोडण्याच एक प्रस्ताव मांडण्यात आला होता; पण, स्कूल बस चालकांची गैरसोय होत असल्याने त्यास विरोध झाल्याने प्रस्ताव बारगळला.

काय उपाय योजना करता येऊ शकतात ?

- शाळांच्या परिसरात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ट्राफिक वॉर्डनची नेमणूक करणे.
- स्कूल बस व रिक्षा रस्त्यावर उभ्या करण्याएेवजी शाळेच्या आवारात किंवा उपलब्ध मोकळ्या जागेत उभ्या करणे.
- शाळेच्या परिसरातील अतिक्रमणे हटवावित. फूटपाथ पादचाऱ्यांसाठी रिकामे करावेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेकरूंची संख्या दोन हजारांपर्यंत

$
0
0

गेल्या वर्षीच्या तुलनेत घरट्यांच्या संख्येत वाढ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भीमाशंकर अभयारण्यातील राज्याचे मानचिन्ह असलेल्या शेकरूंच्या संख्येत वाढ झाली आहे. वन विभागाने नुकत्याच केलेल्या गणनेमध्ये शेकरूंची संख्या १९८५ आढळून आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १२९ शेकरू वाढले आहेत.

भीमाशंकर अभयारण्यामध्ये शेकरूंचे प्रमाण सर्वाधिक असल्याने जंगलाला शेकरू अभयारण्य या नावानेही ओळखले जाते. हा प्राणी समृद्ध अभयारण्याचे प्रतिक आहे. त्याची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी वन विभागातर्फे दरवर्षी गणना केली जाते.

शेकरू शाकाहारी प्राणी असून तो फळांच्या बिया, गर, फुले, पाने खातो. भीमाशंकरमध्ये फळझाडांचे प्रमाण विपूल असल्याने शेकरूसाठी उत्तम अधिवास आहे. त्याची गणना करताना मुख्यत्त्वे घरट्यांचे निरीक्षण केले जाते. या वर्षी १५ ते २० मे दरम्यान शेकरूंच्या घरट्यांची संख्या मोजण्यात आली. भीमाशंकर अभयारण्य एकमध्ये १२ विभाग तर भीमाशंकर दोनमध्ये ७ विभागांमध्ये गणना झाली.
०००

यंदा शेकरूंच्या ११ हजार ९१५ घरट्यांची नोंद झाली. प्रत्येक शेकरू किमान ६ ते ८ घरट्यांमध्ये राहते. त्यामुळे जंगलामध्ये १९८५ शेकरू राहत असल्याचे वन विभागाने जाहीर केले आहे. गेल्या वर्षीच्या गणनेत ११ हजार १५६ घरटी नोंदविली गेली होती. जंगलातील साकरमाचीवाडी, भट्टी, घाटघर, गुप्त भीमा ते भोरगिरी तसेच खांडस, रजपा, नांदगाव या बीटमध्ये शेकरूंच्या घरट्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले, अशी माहिती मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘फोटोबायोग्राफी’ उलगडणार गंधर्वभूषणांचा प्रवास

$
0
0

जयराम शिलेदार यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांत स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे 'गंधर्वभूषण' जयराम शिलेदार यांचे जन्मशताब्दी वर्ष वेगळ्या पद्धतीने साजरे करण्यात येणार आहे. यानिमित्ताने शिलेदार कुटुंबीयांच्या वतीने जयराम शिलेदार यांच्या आत्मचरित्राचे पुनर्मुद्रण आणि 'फोटोबायोग्राफी' प्रकाशित करण्यात येणार आहे.

शिलेदार यांच्या कन्या दीप्ती भोगले यांनी ही माहिती दिली. शिलेदार यांचे जन्मशताब्दी वर्ष ६ डिसेंबर रोजी सुरू होत आहे. वयाच्या १६व्या वर्षी शिलेदार यांनी रघुवीर सावकार यांच्या नाटक कंपनीतून रंगभूमीवर पाऊल ठेवले. पुढे, गंधर्व नाटक मंडळींमध्ये नटसम्राट बालगंधर्वांबरोबर नायकाची भूमिका करण्याची संधी मिळाली. हिराबाई बडोदेकर, शांता आपटे, मीनाक्षी, जयमाला शिलेदार यांच्यासह त्यांनी केलेली नाटके गाजली. गणपतराव बोडस, चिंतामणराव कोल्हटकर, केशवराव दाते यांचे मार्गदर्शन लाभले. रंगभूमीवर कार्यरत असतानाच त्यांनी चित्रपटाच्या माध्यमातही लक्ष वेधून घेतले. त्यांनी 'मराठी रंगभूमी' ही स्वतःची नाट्य संस्था स्थापन केली. त्या माध्यमातून पंचेचाळीसहून अधिक संगीत नाटकांचे प्रयोग केले. संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात तिला सावरून धरण्याचे काम याच संस्थेने केले.

गंधर्वभूषणांचा सर्व प्रवास फोटोबायोग्राफीच्या माध्यमातून उलगडणार असल्याची माहिती देताना भोगले म्हणाल्या, 'शिलेदार यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. त्याचे पुनर्मुद्रण करण्यासह फोटोबायोग्राफी करण्यात येणार आहे. त्यांची बरीच दुर्मिळ छायाचित्रे संग्रही आहेत. त्यामुळे त्याचे दस्तावेजीकरण करण्याच्या दृष्टीने फोटोबायोग्राफी उपयुक्त आहे.'

संग्रही छायाचित्रे असल्यास पाठविण्याचे आवाहन

शिलेदार यांनी संगीत नाटकांचे राज्यभरात प्रयोग केले होते. त्यामु‍ळे त्यांच्यासंदर्भातील काही छायाचित्रे नाट्यप्रेमींच्या संग्रही असल्यास ती फोटोबायोग्राफीसाठी bhogaledeepti@gmail.com वर पाठवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

विविध कार्यक्रमाचे आयोजन

शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्यात गाजलेली संगीत नाटके पुन्हा रंगभूमीवर आणणे, छायाचित्र प्रदर्शन, नाट्य संगीताच्या व संगीत नाटकांच्या ध्वनिचित्रफिती करणे, संगीत नाटकांवर आधारित कॅलेंडर करणे, तरुण रंगकर्मींसाठी संगीत नाटकाची कार्यशाळा घेण्याची योजना आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना पैसे न दिल्यास २२ जूनपासून आंदोलनास्त्र

$
0
0

खासदार राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उसाची थकबाकी देण्यासाठी केंद्र सरकारने कर्ज देण्याची तयारी दर्शविली असल्याने साखर कारखान्यांनी येत्या २० जूनपर्यंत शेतकऱ्यांना उसाचे पैसे द्यावेत. या मुदतीत शेतकऱ्यांना पैसे न दिल्यास २२ जूनपासून साखर संकुल येथे बेमुदत उपोषण आंदोलन करण्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

'राज्य सरकारने आपल्याला उपोषणापासून रोखण्याचा प्रयत्न केल्यास ज्या जागेवर पोलिस अडवतील, तेथेच बसून उपोषण आंदोलन सुरू करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आर्थिक कोंडीत सापडलेल्या सहकारी साखर कारखान्यांना शेतकऱ्यांची उसाची थकबाकी देता यावी यासाठी केंद्र सरकारने सहा हजार कोटी रुपयांचे विशेष कर्ज देण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे कारखान्यांनी आता पैशांची जुळवाजुळ करून शेतकऱ्यांना वाजवी दराप्रमाणे (एफआरपी) उसाचे पैसे द्यावेत,' अशी मागणी शेट्टी यांनी केली.

केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळावी, यासाठी कारखान्यांनी आजपर्यंत जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना वाजवी दराची रक्कम दिलेली नाही. केंद्र सरकारने आता कर्जाऊ रक्कम देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे कारखान्यांना शेतकऱ्यांची ही रक्कम देण्यास काहीच अडचण नाही. पैसे कमी पडत असतील, तर ते बाजारातून कसे उभारायचे, हे कारखान्यांना चांगले कळते. त्यामुळे २० जूनपर्यंत शेतकऱ्यांची थकबाकीची रक्कम देण्यास कारखान्यांना अडचण नाही, असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना उसाची रक्कम अद्याप मिळालेली नाही. आतापर्यंत आम्ही संयम दाखविला. परंतु, कारखान्यांनी दिलेल्या मुदतीत ही रक्कम दिली नाही, तर आंदोलन करावे लागणार आहे. थकबाकी न दिलेल्या कारखान्यांवर कारवाई करावी, यासाठी आपण बेमुदत उपोषण करणार आहोत. सरकारने जर अडविण्याचा प्रयत्न केला, तर ज्या ठिकाणी अडविण्यात येईल, त्या ठिकाणी आम्ही उपोषण करू, असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बायपासवर अडथळ्यांची शर्यत

$
0
0

प्रशासनाचे दुर्लक्ष, निष्काळजी वाहनचालक आणि बेफिकीर प्रवाशांमुळे अपघातांचे प्रमाण वाढते

कात्रज-देहूरोड बायपासवर अनेक जीवघेणे अपघात झाल्यानंतरही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य रस्ते वाहतूक विभाग महामंडळ आणि संबंधित खासगी ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे रस्त्याच्या परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. मूलभूत सुविधांअभावी हा रस्ता मृत्यूचा सापळा झाला आहे. गुरुवारच्या ताज्या अपघातानंतर त्याचीच केलेली ही पाहणी...
..............

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वडगाव धायरी पुलावर गुरुवारी झालेल्या अपघाताने वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज प्रकर्षाने समोर आल्यानंतरही, शुक्रवारी या परिसरातील बेशिस्त वाहतूक अनुभवायला मिळाली. वाहनचालकांपाठोपाठ पादचारी नागरिकांनीही वाहतुकींच्या नियमांचे उल्लंघन कायमच ठेवल्याने ही परिस्थिती सुधारण्यासाठी आता प्रशासनाला कडक धोरणे लागू केल्याशिवाय पर्यायच नसल्याचे समोर आले.

वडगाव पुलाचा धोकादायक परिसर...

सिंहगड रोडकडून सातारा रस्त्याला लागण्यासाठी वडगाव पुलाखालून डावीकडे वळाल्यावर तुम्हाला वाहतूक कोंडी अनुभवायला मिळते. या रस्त्याने तुम्ही सातारच्या दिशेने जायला सुरुवात केली, की अचानक उलट्या दिशेने येणारी वाहने या कोंडीचे प्रमुख कारण ठरतात. ही वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वा ती होऊच नये, यासाठी आजपर्यंत कोणतेही विशेष प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे दहावी-बारावी झालेले तरुण-तरुणीही ट्रिपल सीट गाड्या सुसाट चालवत या रस्त्याने शेजारच्या मल्टिप्लेक्सच्या दिशेने जातात. वास्तविक पुण्याकडून साताऱ्याकडे जाण्यासाठीच्या एकेरी वाहतुकीसाठी हा रस्ता राखीव ठेवण्यात आला आहे. त्यासाठी लावलेले बोर्ड विचारात न घेताच सुरू असलेली ही वाहतूक अपघातांना निमंत्रणच देते आहे. त्यातच वडगाव पूल संपल्यानंतर लगेचच सिंहगड रोडकडे वळणारी वाहने, प्रवासी घेण्यासाठी आणि उतरविण्यासाठी हायवेवरून येऊन पुलाच्या तोंडाशी थांबणारी वाहने हायवेवरील वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. हायवेवरून येऊन वेग कमी करून, नो एन्ट्रीमधून डावीकडे वळणारी ही वाहने समोरचा चढ चढून सातारकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनांच्या अंगावरच आल्याचे अनुभवायला मिळते.

ही तर नवले पुलाची सुरुवात...

वडगाव पुलाच्या या धोकादायक परिस्थितीतून तुम्ही सहीसलामत सुटून हुश्श करताय ना करताय, तोच पुढचे आव्हान तुमच्यासमोर आ वासून उभेच असते. वडगाव पुलाजवळून साताऱ्याच्या दिशेने पुढे जाताना तुमची गडबड होणार, हे तुम्ही लक्षात घ्या. कात्रजकडे जाणारा रस्ता आणि नवले पुलावरून साताऱ्याकडे जाणारा रस्ता या दोन पर्यायांपैकी नेमक्या कोणत्या रस्त्याने आपण पुढे जायचे याचा विचार करणारे अनेक वाहनचालक या परिसरातील वाहतूक संथ होण्यास कारणीभूत ठरतात. कात्रजकडे जाणारा आणि सातारकडे जाणारा रस्ता नेमका कोणता याची माहिती हायवेवरून वेगाने येणाऱ्या वाहनचालकांना देण्यासाठीचा कोणताही मोठा फलक या परिसरामध्ये नाही. हायवेच्या मध्यभागी नुकताच उभारण्यात आलेला छोटा दिशादर्शक फलक हायवेवरून येणाऱ्या दिसेलच याची खात्री नाही. तो बघायचाच असेल, तर गाडीचा वेग हायवेला लाजवेल इतक्या प्रमाणात कमी करून, मग पुन्हा समोरचा चढ चढण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. कात्रजकडे वळायचे की पुलावरून साताऱ्याकडे जायचे हे एकदा नक्की झाले की पुढे जाण्यासाठी पुलाच्या सुरुवातीलाच थांबणाऱ्या प्रवासी वाहनांचा अडथळा समोर येतो.

साताऱ्याकडे जाणाऱ्यांसाठी हा परिसर म्हणजे एक अघोषित बस स्टॉपच झाला आहे. पुलाच्या सुरुवातीलाच एकामागोमाग एक थांबणारी प्रवासी वाहने केवळ साताऱ्याकडेच नाही, तर अचानक कात्रजकडे वळण्याचा प्रयत्न करणारी वाहनेही रोखून धरतात. या परिसरातून हायवे ओलांडू नये, यासाठी लावलेल्या फलकांकडे दुर्लक्ष करून आणि दुभाजकांच्या मध्ये असणाऱ्या फटीमधून जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडण्यासाठी धावाधाव करणारे अबालवृद्ध या परिसरात दिसतात. साताऱ्याकडून नवले पुलाचा आढावा घेतला, तर सिंहगड रोडसाठी कसे जावे याची माहिती देणारे कोणतेही दिशादर्शक फलक या भागात नाहीत. त्यामुळेच साताऱ्याकडून वेगाने येणारी वाहने अचानक नऱ्हे परिसरातील सर्व्हिस रोडला वळतात. त्यामुळे सिंहगड रोडकडून नऱ्हेकडे जाणाऱ्या वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो.

नवले पुलाखालची बिकट वाट...

साताऱ्याकडे जाणाऱ्यांसाठी नवले पुलावरून जाण्याचा मार्ग मोकळा झाला की त्यांचा प्रश्न संपतो. कात्रजकडे जाण्यासाठी किंवा नवले पुलाखालून धायरी- नऱ्हेकडे जाणाऱ्यांसाठीची खरी समस्या तेथून पुढे सुरू होते. नवले पुलाजवळ शेजारच्या रस्त्यावरून कात्रजकडे जाताना तुम्हाला रस्त्याच्या बाजूला मध्येच थांबलेल्या वाहनांचा, फेरीवाल्यांचा आणि अचानक उलट्या दिशेने येणाऱ्या वाहनांचाही सामना करावा लागतो. कात्रजकडे जाण्यासाठी मोठ्या रस्त्याने डावीकडे, तर धायरीकडे वळण्यासाठी नवले पुलाखालून उजवीकडे जावे लागते. मात्र याही ठिकाणी कोणतेही दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडतो. त्यातच वडगावकडून येणारा एक रस्ता नवले पुलाच्या परिसरात कात्रज रस्त्याला येऊन मिळतो. या रस्त्याने येऊन कात्रजकडे किंवा पुलाखालून धायरीकडे जाणारी वाहने हायवेच्या वेगवान वाहतुकीला अडथळा ठरतात. तेथून पुढे जाताच रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक्स टाकून दुभागलेला रस्ता तुम्हाला दोन वेगळ्या रस्त्यांची जाणीव करून देतो. त्यातून तुम्ही कात्रजकडे की पुलाखालून धायरी- नऱ्हेकडे वळायचे हे ठरवून त्यानुसार वळण घ्यायचे हे प्रशासनाने अध्याहृत धरले आहे. तुम्ही नवले पुलाखाली आलात की कात्रजकडून उलट्या दिशेने येणारी वेगवान वाहने सरळ तुमच्या अंगावर येतात. त्यातच नऱ्हे परिसरातील सर्व्हिस रोडने साताऱ्याकडून येऊन नवले पुलाखालून कात्रजकडे जाणारी वाहनेही तुमच्या समोर उभी ठाकतात. त्यातूनही तुम्ही तुमचे वाहन पुढे रेटण्याचा प्रयत्न केलाच, तर अपघात झालाच म्हणून समजा.

नवले पुलाखालच्या या परिसरात वाहतूक पोलिसांची गस्त असते. मात्र हे पोलिस अनेकदा डेक्कन पेव्हेलिअन हॉटेलच्या परिसरात खासगी वाहनचालकांशी घासाघीस करताना दिसून येतात. त्यामुळेच पुलाखाली वाहतुकीची कोंडी सुटतच नाही.

पुन्हा अपघातक्षेत्राकडे...

नवले पुलाखालून तुम्ही पुन्हा सिंहगड रोडकडे वळाल्यावर कात्रजकडून येणाऱ्या वेगवान वाहतुकीमध्ये तुम्ही सामील होता. सातारकडून सिंहगड रोडकडे नऱ्हे सर्व्हिस रोडमार्गे येणारी वाहतुकही त्यात सहभागी असतेच. या वाहतुकीसोबत तुम्ही सिंहगड रोडकडे निघालात की पुन्हा नव्या चालकांसमोर एक प्रश्न उभा राहतो. मुंबईकडे जायचे असेल, तर काय करायचे? कारण वडगावच्या पुलावर जाण्यासाठी याच ठिकाणी एक रस्ता थेट हायवेकडे वळतो. विशेष म्हणजे नवले पुलावरून पुढे आलेले आणि सिंहगड रोडकडे जाण्याची इच्छा असणारी वाहनेही याच रस्त्याच्या आधारे पुन्हा वडगाव पुलाखालच्या रस्त्याकडे वळतात. ही वेगवान वाहतूक अपघातांना आमंत्रण देणारीच ठरते. सिंहगड रोडकडे जायचे असल्यास कसे आणि मुंबईकडे जायचे असल्यास कसे जायचे, याची माहिती देणारे दिशादर्शक फलक या परिसरात कोठेही नजरेस पडत नाहीत. त्यामुळे अर्थातच गोंधळ वाढतो.

या गोंधळातूनही तुम्ही सहीसलामत सुटून पुढे मुंबईकडे जाण्यासाठी हायवेवर आलात की पहिला प्रश्न समोर असतो तो खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांच्या अनधिकृत थांब्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा. या परिसरातून मुंबईकडे जाण्यासाठी प्रवासी वडगाव पुलाच्या सुरुवातीलाच थांबतात. सातारकडून येणाऱ्या वाहनांसोबतच खासगी वाहनांमधून हे प्रवासी मुंबईकडे निघतात. मात्र प्रवासी चढण्यासाठी- उतरण्यासाठी थांबणारी ही वाहनेही पुलावरच्या वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्किटेक्चरचे प्रवेश ‘डीटीई’द्वारे

$
0
0

'एमएसएमए'ला प्रवेशाची मान्यता नाही; 'नाटा'च्या स्कोअरवर होणार प्रवेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आर्किटेक्चर विद्याशाखेचे सर्व प्रवेश यंदा तंत्रशिक्षण संचालनालयामार्फतच (डीटीई) होणार आहेत. परिणामी, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ स्कूल्स ऑफ आर्किटेक्चर अर्थात 'एमएएसए' या संस्थेला आर्किटेक्चरची प्रवेशप्रक्रिया राबवता येणार नाही, असे 'डीटीई'ने स्पष्ट केले आहे. आर्किटेक्चरचे प्रवेश नॅशनल अॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (नाटा) या परीक्षेच्या स्कोअरवर होणार असल्याचेही 'डीटीई'ने म्हटले आहे.

आर्किटेक्चर विद्याशाखेच्या पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश 'डीटीई'बरोबरच 'एमएएसए' ही संस्थेच्या स्वतंत्र प्रक्रियेद्वारेही होत असत. मात्र, यंदा राज्य सरकारने जारी केलेल्या अध्यादेशातील तरतुदींनुसार व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी एकाच यंत्रणेकडून प्रवेशप्रक्रिया राबवण्याचे सरकारचे धोरण आहे. ते विचारात घेता, एमएसए, मुबंई यांना आर्किटेक्चर पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेशप्रक्रिया राबवता येणार नाही, असे 'डीटीई'ने याबाबत जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

'अध्यादेशातील तरतुदींचे अवलोकन करता, शैक्षणिक वर्ष २०१५-१६ मधील आर्किटेक्चर पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत केंद्रीय प्रवेशप्रक्रिया (कॅप) राबवून करण्यात येईल,' असे या अधिसूचनेत म्हटले आहे.

'सर्व खासगी विनाअनुदानित आर्किटेक्चर पदवी अभ्यासक्रमांच्या संस्थांनी संस्था स्तरावरील मंजूर प्रवेश क्षमतेच्या २० टक्के कोट्यातील जागा वगळता आर्किटेक्चर पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश राज्य शासनाचे सक्षम प्राधिकारी म्हणून 'डीटीई'च्या वतीने 'नाटा' या परीक्षेच्या स्कोअरवर होणार असून, इतर कोणत्याही माध्यमातून प्रवेश करता येणार नाहीत,' असेही 'डीटीई'ने अधिसूचनेत नमूद केले आहे.
............

'राज्य सरकारने गेल्या महिन्यात जारी केलेल्या अध्यादेशानुसार आर्किटेक्चरचे प्रवेश केवळ 'डीटीई'द्वारेच होतील, अशी अधिसूचना काढण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आता दोन स्वतंत्र प्रवेशप्रक्रियांसाठी अर्ज करावे लागणार नाहीत. परिणामी, विद्यार्थ्यांचे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होणार आहे. 'नाटा'च्या स्कोअरवरच गुणवत्ता यादी तयार करून हे प्रवेश होतील.'
- डॉ. एस. के. महाजन
तंत्रशिक्षण संचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफटीआयआय विद्यार्थ्यांची ‘पॅक अप’ची आरोळी

$
0
0

गजेंद्र चौहान यांना अध्यक्ष करण्यावर विद्यार्थ्यांचा आक्षेप

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ज्येष्ठ अभिनेते गजेंद्र चौहान यांची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी झालेली नियुक्ती म्हणजे राजकीय पुनर्वसन असल्याचा आरोप करून संस्थेच्या विद्यार्थ्यांनी 'पॅक अप'ची करण्याची भूमिका घेतली आहे. या नियुक्तीला विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी बेमुदत संप सुरू केला असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याबाबत चळवळ उभी करण्यात येत आहे.

केंद्र सरकारने नुकतीच 'एफटीआयआय'च्या नियामक मंडळाची पुनर्रचना केली. त्यात महाभारतात युधिष्ठिराच्या भूमिकेमुळे सर्वपरिचित असलेले ज्येष्ठ अभिनेते गजेंद्र चौहान यांच्याकडे मंडळाचे अध्यक्षपद सोपवण्यात आले. आतापर्यंत ज्येष्ठ दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन, श्याम बेनेगल, गिरीश कार्नाड, यू. आर. अनंतमूर्ती, सईद अख्तर मिर्झा यांच्यासारख्या मातब्बरांनी संस्थेचे अध्यक्षपद भूषवले आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी चौहान यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे.

महाभारतात युधिष्ठिराची केलेली भूमिका वगळता चौहान यांनी चित्रपटामध्ये काहीही योगदान दिलेले नाही. चौहान गेल्या वीस वर्षांपासून ते भारतीय जनता पक्षाशी निगडित असून, त्यांनी २००४मध्ये पक्षाचे अधिकृत सदस्यत्त्व स्वीकारले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या प्रचारासाठी त्यांनी हरयाणामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. चौहान यांच्यासह अनघा घैसास व शैलेश गुप्ता यांची नियुक्तीही संशयास्पद आहे. सरकारला चौहान यांच्यापेक्षा जास्त चांगला कलावंत अध्यक्ष म्हणून सहज मिळू शकतो, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

एकूणच, नियामक मंडळाच्या पुनर्रचनेविरोधात विद्यार्थ्यांनी 'पॅक अप'ची आरोळी दिली आहे. विद्यार्थ्यांनी आपली चित्रिकरणे, प्रॅक्टिकल्स थांबवली आहेत. तसेच, वर्गातही उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनाही या संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या या आवाहनाला सोशल मीडियातून सकारात्मक पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.
.....

चौहान यांना अध्यक्षपदी निवडताना सरकारने काही एक प्रक्रिया राबवली आहे. मात्र, चौहान यांची निवड विद्यार्थ्यांना मान्य नसल्याने त्यांनी संप पुकारला आहे. याबाबत विद्यार्थ्यांशी बोलून मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
- डी. जे. नारायण, संचालक, एफटीआयआय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images