Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नगर रोडला ५२ मिमी पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा/पुणे

पुण्याला मान्सूनचे वेध लागले असतानाच नगररोड परिसराला सोमवारी दुपारनंतर मुसळधार पावसाने झोडपले. अवघ्या काही तासांत तब्बल ५२ मिलिमीटर पावसाची नोंद. स्थानिक पातळीवरील हवामान आणि वाढलेल्या बाष्पामुळे झालेल्या या पावसाने संपूर्ण नगररोड परिसरातील उपनगरांमध्ये वाहतुकीची मोठी कोंडी झाली. अनेक सोसायट्या-वस्त्यांमध्ये पाणीदेखील घुसले. शहरात इतरत्र मात्र किरकोळ शिडकावाच झाला.

पुण्यात गेल्या अनेक दिवसांपासून हवामान ढगाळ असले, तरी तापमानात वाढ झालेली आहे. येरवडा, लोहगाव, नगररोड परिसरातही तापमान ३५ अंशांच्या आसपास होते. त्यामुळे स्थानिक पातळीवर झालेली तापमानवाढ तसेच अरबी समुद्रातील 'आशोबा' चक्रीवादळामुळे हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढून स्थानिक पातळीवर हा जोरदार पाऊस झाल्याचे हवामानतज्ज्ञांनी सांगितले. शहरात अन्यत्र कमी अधिक प्रमाणात पावसाचा शिडकावा झाला. मात्र, शहरातील तापमानात काहीशी घट झाल्याने हवेतील गारवा वाढला होता. शहरात सोमवारी ३४.६ अंश सेल्सियस इतके कमाल तर २०.३ अंश सेल्सियस इतके किमान तापमान नोंदले गेले.

नगररोड, वडगांव शेरी भागात ठिकठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने अनेक वाहने बंद पडली. सायंकाळी सर्वत्र वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिस गैरहजर असल्याने कोंडीत आणखी भर पडली. स्थानिक तरूणांनी रस्त्यावर उतरून ही कोंडी फोडण्यास मदत केली. सोमवारी दुपारी चारनंतर येरवडा उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच नगररोड ,वडगाव शेरी, लोहगांव, विश्रांतवाडी, येरवडा, कळस या भागात ठिकठिकाणी पाणी साचले होते. नगररोडवरील फिनिक्स मॉलसमोर पावसामुळे गुडघाभर पाणी साचले होते. नगररोड पूर्णतः वाहतूक कोंडी झाल्याने येरवडा, विश्रांतवाडी, विमाननगर, खराडी परिसरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवरही कोंडी झाली होती.

सोसायट्यांत घुसले पाणी

दर वर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही वडगाव शेरीतील सैनिक वाडी, उज्ज्वल गार्डन सोसायटी, गणराज सोसायटी, आनंदा हाईट्स, राजश्री कॉलनी, मुनुरवार सोसायटी, राजेंद्रनगर, शुभम सोसायटी या भागात पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात घुसले. सोसायट्यांच्या आवारातही पाणी साचले होते. या पाण्यात मैलापाणी एकत्र होऊन हे पाणी सोसायटीच्या पार्किंगमध्ये तसेच तळ मजल्यावरील घरात पाणी घुसल्याने नागरिकांचे हाल झाले. पहिल्या पावसातच पाणी घरात शिरल्याने मान्सूनचे पुढील चार महिने कसे जाणार या विचारानेच स्थानिक नागरिक धास्तावले आहेत.

पाऊस कायम राहणार

मान्सून तळकोकणात दाखल झाला आहे. कोकणच्या उर्वरित भागात मान्सूनची आगेकूच होण्यासाठी हवामान अनुकूल आहे. तसेच अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे राज्याकडे बाष्पयुक्त वारेही वाहात आहेत. त्यामुळे पुढील चार दिवसांत शहराच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बोपखेलला दीड वर्षांत कायमस्वरूपी रस्ता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बोपखेलच्या रहिवाशांसाठी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंगने (सीएमई) उभारलेल्या तरंगत्या पुलाला 'अॅप्रोच रोड' देऊन तात्पुरता रस्ता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच जागेवरून बोपखेलच्या रहिवाशांना येत्या दीड वर्षांत कायमस्वरूपी रस्ता देण्यासही तत्त्वतः मान्यता देण्यात आली. याबाबत तातडीने 'ना हरकत' प्रमाणपत्रे देण्याचे आदेश संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी दिले आहेत.

बोपखेलकरांच्या वहिवाटीचा रस्ता 'सीएमई'ने बंद केल्यामुळे नागरिकांमध्ये उद्रेक होऊन दगडफेक व लाठीमाराचा प्रकार घडला होता. त्यामुळे हा विषय पुन्हा ऐरणीवर आला. त्यानंतर बोपखेलकरांना पर्यायी रस्ता देण्याबाबत जिल्हा प्रशासन, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि संरक्षण विभागाकडून प्रयत्न सुरू होते. सध्या 'सीएमई'च्या वतीने वाहतुकीसाठी एक तरंगता पूल तयार करून देण्यात आला आहे. त्यानंतर संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी आज याबाबत पुन्हा बैठक घेतली. जिल्हाधिकारी सौरव राव, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव, तसेच सीएमई व संरक्षण विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि काही रहिवासी या वेळी उपस्थित होते. बोपखेलकरांना कायमस्वरूपी रस्ता देण्याबाबत तीन पर्याय सादर करण्यात आले. हे काम होण्यासाठी किमान दीड वर्षाचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे तोपर्यंत तात्पुरता रस्ता उपलब्ध करून देण्याचा निर्णय बैठकीत

घेण्यात आला.

त्यामध्ये सध्या असलेल्या तरंगत्या पुलाला चारशे मीटर लांबीचा अॅप्रोच रोड देण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक ती 'ना हरकत' प्रमाणपत्रे तातडीने देण्याच्या सूचना पर्रीकर यांनी दिल्या. या परवानगी मिळाल्यावर हे काम तातडीने सुरू होणार आहे. कायमस्वरूपी मार्गासाठी काही पर्याय मांडण्यात आले आहे. त्यापैकी या तरंगत्या पुलाच्या जागेवरच पूल उभारण्याच्या प्रस्तावाबाबत सहमती झाली आहे. त्यासाठी वीस कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, येत्या दीड वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच अन्य दोन पर्यायही मांडण्यात आले आहेत, मात्र त्यामध्ये काही अडचणी असल्याची माहिती देण्यात आली. 'सीएमई'च्या आवारातून जाणाऱ्या पूर्वीच्या रस्त्याने हे अंतर दोन किलोमीटर आहे. मात्र 'सीएमई'ने हा रस्ता बंद केल्यामुळे नागरिकांना तब्बल साडेअकरा किलोमीटरचा वळसा पडतो आहे. या बैठकीत सुचविण्यात आलेला मार्ग तयार झाल्यानंतर नागरिकांना साडेचार किलोमीटरचा रस्ता उपलब्ध होईल.

नदीवर तात्पुरता पूल बांधून देण्याचे काम सीएमईच्या जवानांनी फक्त तीन दिवसांमध्ये पूर्ण केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांची अडचण तात्पुरत्या स्वरूपात सुटली आहे. पर्रीकर यांच्या बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आलेला रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

तात्पुरता पूल लष्कराच्या वापरासाठी बांधण्यात येतो. हा पूल तरंगता असल्याने त्याबाबत ग्रामस्थांच्या मनात भीती होती. त्याचप्रमाणे नदी संपते तिथे चिखल आणि गाळ असून, लाइटचीही सोय नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी जाणे धोकादायक होऊ शकते, पावसाळ्यात पाणी वाढल्यानंतर सुरक्षिततेचे काय असा प्रश्न ग्रामस्थांना होता. मात्र, हा पूल तरंगता असल्याने पाणी वाढल्यानंतर पुलाची उंची वाढेल, असे लष्करातर्फे सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अॅप्रोच रोडही लवकरच तयार करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१ दिवसात २५ लाखांची ‘मॅगी’ परत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दोन मिनिटात होणाऱ्या आणि सर्वांना हव्याशा वाटणाऱ्या 'मॅगी' नूडल्सवर लाल फुली मारल्यानंतर पुणे शहरातील पाच वितरकांनी एका दिवसात २५ लाख ३३ हजार रुपयांचा 'मॅगी'चा साठा कंपनीकडे परत पाठविला.

'मॅगी' नूडल्समध्ये शिसाचे प्रमाण अधिक आढळल्याने मॅगीच्या विक्रीसह उत्पादनावर बंदी घालण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून पुणे शहरासह राज्यातील सर्व विक्रेत्यांकडून 'मॅगी'चा साठा परत मागविण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्याशिवाय केंद्र सरकारच्या अखत्यारीतील 'फूड सेफ्टी स्टँडर्ड अॅथॉरिटी ऑफ इंडिया'ने (एफएसएसएआय) देखील कंपनीला उत्पादन मागे घेण्याचे आदेश बजावले आहेत.

नेस्ले कंपनीने देखील आपल्या वितरकांना त्यांसदर्भातील सूचना दिल्याने अंमलबजावणी सुरू झाली आहे. 'पुणे शहरात 'मॅगी' नूडल्सचे १९ वितरक आहेत. वितरकांकडे असलेल्या 'मॅगी'च्या साठ्याची विक्री न करता कंपनीकडे पाठविण्याबाबत नोटिसा देऊन सूचना दिल्या आहेत. त्यानुसार वितरकांनी मॅगीचा साठा कंपनीकडे पाठविण्यास सुरुवात केली आहे. कंपनीनेही मॅगीची विक्री करू नये, असे आदेश वितरकांना बजावले आहेत. त्यामुळे खरेदी विक्रीचे व्यवहार बंद झाले आहेत.

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी शहरातील सर्व शॉपिंग मॉलसह छोट्या मोठ्या दुकानांची तपासणी केली. त्या तपासणीत २५ लाख ३३ हजार १६४ रुपयांच्या मॅगीचा साठा कंपनीकडे परत करण्यात आला आहे.

- शशिकांत केकरे, सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

कोंढव्यातील जालन मार्केटिंग, टीम फोर लॉजेस्टिक, तसेच मार्केट यार्डातील गजराज सेल्स, पिपंरीतील राज मार्केटिंग, शिरूर येथील महेश एजन्सी या पाच वितरकांनी त्यांच्याकडील सुमारे पंधरा हजार किलोचे 'मॅगी'चे पॅकेट्स कंपनीकडे परत पाठविले आहेत. २५ लाख ३३ हजार १६४ रुपयांचा हा साठा होता.

- दिलीप संगत, सहायक आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेचार कोटींची मॅगी पोटात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'बस्स दो मिनिट' असे म्हणत माधुरी दीक्षितच्या अदाकारीवर भाळलेले पुणेकर ग्राहक दररोज १२ ते १५ लाख रुपयांची 'मॅगी' फस्त करीत होते. महिन्याकाठी पुणेकर मॅगीची चव चाखण्यासाठी साडेचार कोटी रुपये मोजत होते, अशी माहिती पुढे आली आहे.

घराघरापासून ते रस्त्यावर, गल्लोगल्लीच्या लहान मोठ्या स्टॉल, हॉटेलमध्ये सहज मिळणारी 'मॅगी' विविध फ्लेवरमध्ये चाखायला मिळू लागली. अवघ्या दोन मिनिटांत 'मॅगी' पोटाची भूक शमवली जात होती. यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनीच 'मॅगी'ला पसंती दिली होती. चोखंदळ पुणेकरांच्या पसंतीला देखील 'मॅगी' उतरल्याने आणि त्यात टीव्हीवरून माधुरी दीक्षितची 'बस्स दोन मिनट' या 'मॅगी'च्या जाहिरातीमुळे आणखीच दाद मिळाली. त्यामुळे आयटी, सांस्कृतिक, विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीच्या प्रत्येक घरात 'मॅगी'चा घमघमाट येऊ लागला. त्यामुळे 'मॅगी'ची विक्रीही झपाट्याने वाढू लागली.

'पुणे शहर जिल्ह्यात 'मॅगी'चे १९ वितरक आहेत. त्यापैकी पुण्यात पाच वितरक आहेत. 'मॅगी'च्या विक्रीला २००४ वर्षापासून सुरुवात झाली. गेल्या दहा वर्षात 'मॅगी'चा व्यवसाय चार ते पाच पटीने वाढला. अर्थात २००४ ते २०१० या सहा वर्षांत 'मॅगी'ची ग्राहकांकडून फारशी दखल घेतली गेली नाही. मात्र ते चार वर्षांत 'मॅगी'ला चांगली पसंती मिळाली. त्यामुळे व्यवसाय झपाट्याने वाढला. तीन वर्षात 'मॅगी'ला सर्वाधिक पसंती मिळाली. त्यामुळे पुण्यातील सर्व वितरकांकडून एका दिवसात १२ ते १५ लाख रुपयांच्या 'मॅगी'ची विक्री होत होती. त्यावरून महिन्याकाठी सुमारे साडेचार कोटी रुपयांची 'मॅगी' पुणेकर फस्त करीत होते', असे निरीक्षण 'मॅगी'च्याच पुण्यातील एका वितरकाने नोंदविले.

३५ ग्रॅम वजनाची 'मॅगी' अवघ्या पाच रुपयांनी उपलब्ध होत होती. तर १२ रुपयांमध्ये ७० ग्रॅम 'मॅगी' मिळत होती. त्याशिवाय १४० ग्रॅम, २८० ग्रॅम वजनात 'मॅगी' उपलब्ध होत असल्याने पुणेकरांना खरेदी करणे शक्य होती, असेही निरीक्षण नोंदविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन कॉलेजांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेपूर्वीच प्रवेश सुरू करणारे अरिहंत कॉलेज आणि विद्यार्थ्यांना चुकीच्या गुणपत्रिका देणाऱ्या मिकीज ज्युनिअर कॉलेजवर पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. कारभारामधील अनियमिततेबाबत या कॉलेजांना 'कारणे दाखवा' नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. गैरप्रकार करणाऱ्या कॉलेजांना ताळ्यावर आणण्यासाठी या पुढील काळात धडक मोहिम राबविण्यात येणार असून, कॉलेजांची अचानक तपासणीही सुरू होणार आहे.

शहरातील अनेक कॉलेजांनी अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेपूर्वीच कॉलेज पातळीवरील प्रवेश सुरू केले होते. 'मटा'ने या प्रकारावर प्रकाश टाकत त्यातून विद्यार्थ्यांची होणारी लूट थांबविण्याचे आवाहन केले होते. त्या विषयी सातत्याने होणारे गैरप्रकार समोर येत असतानाही, शिक्षण खात्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याची बाबही प्रकाशात आणली होती. मिकीज ज्युनिअर कॉलेजने अकरावीच्या विद्यार्थ्यांना खाडाखोड केलेल्या गुणपत्रिका वाटल्याची बाबही 'मटा'ने उघड केली होती. या सर्व बाबींचा विचार करत ही कारवाई करण्यात आल्याचे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

पूलगेट परिसरातील अरिहंत कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी कॉलेज विद्यार्थ्यांकडून चुकीच्या पद्धतीने शुल्क आकारत असल्याची तक्रार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष राकेश कामठे यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत कॉलेजला 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आल्याची माहिती जाधव यांनी दिली. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना सायन्सच्या मार्कशीटवर खाडोखोड करून मार्कशीट तयार करून देणे, मराठी- हिंदीसारख्या विषयांना शिक्षक उपलब्ध न करून देणे आदी प्रकारांविरोधात बिबवेवाडीतील मिकीज ज्युनिअर कॉलेजलाही कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.

या पुढील काळात कोणत्याही कॉलेजने गैरप्रकार केल्याचे आढळून आल्यास, अशा कॉलेजांवर कडक कारवाई केली जाईल. वेळप्रसंगी अशा कॉलेजांची मान्यता रद्द करण्याची शिफारस करण्यासही मागेपुढे पाहणार नाही.

- रामचंद्र जाधव, पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘८०-२०’मुळे वाढतोय निकाल

$
0
0

पुणे ः बोर्डाच्या परीक्षांसाठी लागू असलेल्या '८०-२०' पॅटर्नमुळेच बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल सातत्याने वाढत चालल्याचे आता सिद्धच झाले आहे. यंदा निकालात दिसणारा फुगवटाही याचेच प्रतिबिंब असल्याचे मत व्यक्त होत आहे.

निकालाच्या या फुगवट्याच्या पार्श्वभूमीवर, आता लेखी परीक्षेसाठी स्वतंत्रपणे उत्तीर्ण होण्याची अट लागू करण्याचा निर्णय राज्य बोर्डाने घेतला आहे. पुढील वर्षीपासून लेखी परीक्षेसाठी किमान २० टक्के गुण मिळविण्याची अट लागू करण्यात येत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सोमवारी सांगितले. 'शाळा- कॉलेजांमधून तोंडी आणि प्रात्यक्षिकांच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना अधिक गुण दिले जातात. त्यामुळे एकूण निकाल सातत्याने वाढत चालला आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लेखी परीक्षेत किमान गुणांची अट लागू केली आहे. पुढची परीक्षा या अटीनुसारच होणार आहे,' असे म्हमाणे यांनी स्पष्ट केले.

इयत्ता नववी ते बारावीच्या परीक्षांमध्ये प्रथम भाषा विषयांसाठी अॅक्टिव्हिटी-बेस्ड प्रश्नपत्रिका वापरण्याचा निर्णय झाला आहे. २०१७ पासून दहावीच्या परीक्षेत सर्व प्रथम भाषेचे पेपर याच पद्धतीने होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीच्या निकालाचाही विक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बारावीप्रमाणेच यंदा दहावीच्या परीक्षेतील उत्तीर्णांच्या टक्केवारीने नव्वदी पार केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नियमित विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णांचे प्रमाण ३.१४ टक्क्यांनी असून, विक्रमी ९१.४६ टक्के निकालाची नोंद झाली आहे. नियमित आणि पुनर्परीक्षार्थी यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८७.७३ टक्के आहे. राज्यात उत्तीर्णांचे सर्वाधिक प्रमाण (९६.५४ टक्के) कोकण विभागात आहे. पुणे विभागात ९५.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लातूर विभागाचा निकाल (८६.३८ टक्के) सर्वांत कमी लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा ऑनलाइन निकाल सोमवारी जाहीर केला. राज्यातील नऊ विभागीय मंडळांतून एकूण १५,७७,३०३ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यांपैकी १५,७२, २६८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १४,३७,९२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, असे मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले. नेहमीप्रमाणेच यंदाही मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण (९२.९४ टक्के) मुलांच्या उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणापेक्षा (९०.१८ टक्के) अधिक आहे.

यंदा १,५२,५५२ पुनर्परीक्षार्थी होते. त्यांपैकी ७५,२६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षार्थींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ४९.३४ टक्के आहे. इतका राहिला. राज्यातून ५९,३५५ विद्यार्थ्यांनी १७ नंबरच्या अर्जाच्या माध्यमातून ही परीक्षा दिली. या विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ४८.८२ टक्के आहे.

पुढच्या वर्षी जूनमध्येच फेरपरीक्षा

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून पुढील वर्षापासून जूनमध्ये फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी पुढील वर्षी दहावीचा निकाल मेमध्येच जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी जाहीर केले. मे महिन्याच्या मध्यापर्यंत निकाल जाहीर करून अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फेरपरीक्षा घेतली जाईल. या परीक्षेचा निकाल लगेचच जून महिन्यामध्ये लावणार असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक बिबट्या जेरबंद; दुसऱ्याचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जुन्नर

गेल्या चोवीस तासांत जुन्नर वनक्षेत्रात जणू बिबट्या संबंधित घटनांचा दिवस ठरावा अशा घटना घडल्या, डिंगोरे येथे पुष्पावती नदीच्या पात्रात एक मृत बिबट्या आढळून आला. साधारण पाच वर्षे वयाचा हा नर बिबट्या असल्याची माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली. दुसऱ्या घटनेत दत्तवाडी येथे पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला. ही मादी असून ती चार वर्षे वयाची आहे. जेरबंद बिबट्याच्या मादीला माणिकडोहच्या बिबट्या निवारा केंद्रात ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, गोळेगाव येथे एका मेंढपाळाच्या वस्तीवर हल्ला करून पाच मेंढ्या बिबट्याने फस्त केल्या आहेत.या तीन घटना घडत असतानाच वळती येथे एक बिबट्या विहिरीत पडल्याची घटना वनविभागाला समजली. बिबट्या निवारा केंद्राच्या पथक आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले. या मादीची देखील रवानगी माणिकडोहच्या बिबट्या निवारा केंद्रात करण्यात आली असल्याचे उपवनसंरक्षक विठ्ठल धोकटे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गारपिटीने पिकांचे नुकसान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जुन्नर

जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी तसेच खोडद परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यामुळे काही ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेले; तर काही ठिकाणी झाडे कोसळली असून शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोबी, फ्लॉवर, मका, ऊस आदी पिकांचे गारपिटीने नुकसान झाल्याचे जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे यांनी माहिती देताना सांगितले. दरम्यान, गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी तहसीलदार प्रल्हाद हिरामणी यांनी केली असून झालेल्या नुकसानीची आकडेवारी लवकरच उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले. या गारपिटीने टॉमेटो पीकांबरोबरच धने, मेथी आदी पालेभाज्यांचेही मोठे नुकसान झाले. झाडे पडल्याने आंब्यांचे तसेच फळांचेही नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दृष्टिदानासाठी ‘त्यांची’ निःस्वार्थ सेवा

$
0
0

नरेंद्र जगताप, दौंड

नेत्रदानाच्या चळवळीचा हिस्साबनून अनेक कार्यकर्ते देवदूत बनत आहेत. दौंड शहरात असेच दोन कार्यकर्ते दृष्टिदानाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका विनामोबदला बजावतात. दौंड शहरातील सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रेमकुमार भट्टड हे नेत्रदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी गोदावरी ट्रस्टच्या माध्यमातून प्रबोधन करतात व दृष्टिदान घडवून आणतात.

अनेक सेवाभावी संस्था व व्यक्तींच्या मदतीने त्यांनी सहा हजारांपेक्षा जास्त व्यक्तींचे संकल्पपत्र भरून घेऊन दृष्टिदानासाठी प्रवृत्त केले आहे. डॉ. भट्टड यांच्या प्रबोधनामुळे दौंड, केडगाव, श्रीगोंदा, काष्टी, भिगवण परिसरातील ६० व्यक्तींचे आजपर्यंत मरणोत्तर नेत्रदान होऊन अनेकांच्या जीवनाच्या प्रकाशवाटा नव्याने उजळावलेल्या आहेत. नेत्रदानात मिळालेले डोळे शीतपेटीतून सुखरूपपणे तीन तासांत पुण्याला पोहचविण्याचे काम दौंड शहरातील संतोष कोपर्डे व गणेश गायकवाड गेली चार वर्षे करीत आहेत. कुठल्याही वेळेला मिळेल त्या वाहनाने दुचाकी ते रेल्वेने दौंड, पाटस, केडगाव, श्रीगोंदा, काष्टी, भिगवण येथून संकलित केलेले नेत्र पुण्यातील नेत्रपेढीत संतोष व गणेश यांनी पोहचवले आहेत. रक्तदान क्षेत्रात काम करणारे दौंडचे माजी नगरसेवक प्रवीण परदेशी यांनी सुरुवातीला प्रेरणा दिल्यानंतर सुरुवातीला डॉ. भट्टड यांना मदत म्हणून काम केले. नंतर या कामाचे महत्त्व पटल्याने दृष्टिदान चळवळीचा भाग म्हणून काम करण्याचे पक्के करून आजही या कामात सक्रीय आहेत.

नेत्रदानासाठी...

'अ' जीवनसत्वाअभावी रातआंधळेपणाचे प्रमाण वाढत आहे. आजही डोळ्यांच्या आजारावर अशास्त्रीय उपाय केला जातो. त्यामुळे डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते.

मधुमेही, चष्मा असलेले, मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तीदेखील नेत्रदान करू शकतात.

कावीळ, एड्स, गुप्तरोग, श्वानदंश आणि विषाणुजन्य आजाराने मृत पावलेल्यांचे नेत्रदान स्वीकारता येत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्या पावसात ड्रेनेजचा ‘फज्जा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

नगर रोड परिसरात सोमवारी दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक झोपडपट्ट्या आणि सोसायट्यातील तळ मजल्यावर घरात सांडपाणी शिरल्याने अनेकांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली. पहिल्या पावसातच स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागल्याने पुढचे दिवस कसे काढायचे, या चिंतेने अनेकांची झोप उडाली आहे .

नगर रोडवरील नोवेटेल हॉटेल, वासकोन, डब्ल्यू एन. एस. आणि विकफिल्ड या तीन आय. टी. इमारतीतून निघणारे ड्रेनेजचे सांडपाण्याचे कनेक्शन शेजारील विकफिल्ड झोपडपट्टीतील ड्रेनेजला जोडले आहे. सोमवारी झालेल्या जोरदार पावसामुळे हॉटेल आणि आयटी इमारतीतील ड्रेनेजचे सांडपाणी 'ओव्हर फ्लो'झाल्याने हे सांडपाणी शेजारील झोपडपट्ट्यात शिरले. दुपारी चारपासून ते रात्री उशिरापर्यंत सांडपाणी अनेक घरात शिरले होते. रात्री उशिरापर्यंत घरात शिरलेले सांडपाणी उपसणे सुरू होते. आय. टी. कंपनीच्या मागील बाजूस सीमा भिंत बांधण्याचे काम चालू असताना ड्रेनेजच्या पाइपला धक्का लागल्याने पाइप फुटला आहे. त्यातून सांडपाणी शेजारील झोपडपट्टीत जात आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

'सोमवारी दुपारी पावसाला सुरुवात झाल्यापासून रात्री उशिरापर्यंत हॉटेल आणि आय. टी. कंपनीमधील ड्रेनेजचे सांडपाणी घरात शिरू लागले. पावसाचा जोर जास्त असल्याने सांडपाणी मोठ्या प्रमाणत घरात जमा झाले होते. पाऊस थांबल्यानंतर रात्री उशिरापर्यंत घरातील घाण पाणी काढणे सुरू होते. सांडपाण्याच्या वासाने रात्री घरातील कोणीही जेवण केले नाही. घरात लहान मुले असल्याने रोगराई पसरण्याची भीती वाटते,' असे स्थानिक नागरिक शोभा गायकवाड यांनी सांगितले.

पावसाला सुरुवात झाल्याने आय. टी. कंपनीने तातडीने ड्रेनेजचे काम पूर्ण करून घ्यावे, या मागणीसाठी झोपडपट्टीतील अनेक नागरिकांनी आय. टी. कंपनीच्या आवारात पालिका अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. या वेळी शाहूराव यादव, अभिजित रोडके, विशाल खंडागळे, हमीद शेख आणि अनेक नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुडघा प्रत्यारोपणाला पर्यायी शस्त्रक्रिया

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुडघ्याच्या वेदना सुरू झाल्या अथवा इजा झाल्यानंतर त्यावर आता प्रत्यारोपणाद्वारे संपूर्ण गुडघाच बदलण्याची गरज राहणार नाही. प्रत्यक्षात खराब झालेल्या गुडघ्याचाच काही भाग रोपणाद्वारे बदलून दुखणे दूर करणे शक्य झाले आहे.

यामुळे आता वेदनेने त्रस्त पन्नाशीच्या पुढच्या पेशंटना गुडघा बदलण्याच्या मोठ्या ऑपरेशनला सामोरे जाण्याची गरज नाही. अर्धवट स्वरूपाच्या ऑक्सफर्ड गुडघा प्रत्यारोपणाची ही नवी पद्धत गोखले हॉस्पिटलमध्ये वापरली जात आहे. नव्या तंत्रामुळे पेशंटना कमी खर्चात ऑपरेशन शक्य असल्याने दिलासा मिळणार आहे. हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. संजीव गोखले यांनी नव्या तंत्राचे प्रशिक्षण घेतले असून त्याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.

'गुडघ्याच्या वेदना होत असल्याने संपूर्णच गुडघा काढण्यापेक्षा खराब झालेलाच भाग काढता येईल. त्यामुळे अधिकाधिक गुडघ्याचा भाग वाचविता येईल. गुडघ्याचा खराब झालेला भाग कापून त्या जागी कृत्रिम अवयवाचे रोपण करणे हा अर्धवट स्वरूपाच्या ऑक्सफर्ड गुडघे प्रत्यारोपणाच्या पद्धतीचा फायदा आहे. त्यासाठी छोटासा छेद घेऊन प्रत्यारोपण करता येणे शक्य आहे,' अशी माहिती डॉ. गोखले यांनी दिली.

रक्तस्त्राव कमी, हॉस्पिटलमधील कालावधी कमी आणि पर्यायाने खर्चातही बचत असे नव्या तंत्राचे फायदे आहेत. नव्या पद्धतीच्या रोपणामुळे पूर्वीप्रमाणे गुडघ्याची नैसर्गिकरित्या हालचाली करणे शक्य आहे. यासाठी ३० ते ४० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. पन्नाशीच्या पुढे गुडघे दुखणाऱ्या पेशंटपैकी ४० टक्के पेशंटना संपूर्ण गुडघ्याचे प्रत्यारोपण करण्याची गरज नाही. नव्या पद्धतीने रोपण केले तर त्यांचा आजार दूर होऊ शकतो, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आधार’ दलालांवर कारवाई होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आधार कार्डांच्या नोंदणीसाठी पैशांची मागणी झाल्यास नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरव राव यांनी सोमवारी केले आहे. अशा तक्रारी आल्यास तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

आधार कार्डांच्या नोंदणीसाठी पैसे उकळण्यात येत असल्याच्या तक्रारी शहराच्या विविध भागांमधून करण्यात येत आहेत. येरवडा-चंदननगर, धनकवडी, आंबेगाव पठार अशा भागांमध्ये नोंदणीसाठी नागरिकांकडून पैशांची मागणी करण्यात येते, अशा तक्रारी आल्या होत्या. जिल्हा प्रशासनाने त्याकाळात कर्मचाऱ्यांना नोंदणीच्या निमित्ताने पाठवून पैसे उकळणाऱ्यांवर कारवाईही सुरू केली. संबंधित एजन्सींचे परवाने रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, तरीही अनेक भागांमधून आधार नोंदणीसाठी पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी सुरू आहेत. सध्या पंतप्रधान विमा योजना, डीबीटीएल, विविध स्कॉलरशिप्स सह सरकारी योजनांचे लाभ मिळविण्यासाठी आधार कार्ड उपयुक्त ठरते. तसेच मतदारयादीची आधार कार्डांची जोडणी करण्याचे कामही सध्या सुरू आहे. त्याबरोबरच आधार कार्ड हा ओळखीचा भक्कम पुरावा असल्यामुळेही आधार कार्डांची नोंदणी करण्यासाठी ठिकठिकाणी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. गर्दी झाल्यामुळे नागरिकांना टोकन देऊन पुढील तारीख दिली जाते. मात्र, दोनशे रुपये दिल्यास तातडीने नोंदणी केली जाते, अशा तक्रारी अनेक नागरिकांनी केल्या.

जिल्हाधिकारी राव यांना यासंदर्भात विचारले असता, आधार नोंदणी ही पूर्णपणे मोफत आहे. त्यामुळे त्याच्यासाठी एका पैशाचीही मागणी करणे बेकायदा आहे, असे त्यांनी सांगितले. याबाबत तक्रारी आल्यानंतर संबंधित एजन्सींवर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनीही पैशांची मागणी झाली, तर पैसे न देता प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरीत प्रशासन कोरडेच

$
0
0

सुनील लांडगे, पिंपरी

शहराची जीवनरेखा असलेल्या रस्त्यांचे जाळे पिंपरी-चिंचवडमध्ये मुबलक आहे. यामध्ये पुणे-मुंबई महामार्ग (लांबी १२.५ किलोमीटर), औंध महामार्ग (लांबी ७.२० किलोमीटर), पुणे-नाशिक महामार्ग (११.५ किलोमीटर) यांचा समावेश आहे. याशिवाय ५०हून अधिक लहान-मोठे पूल आहेत. यामध्ये नदीवरील, रस्त्यावरील, सब-वे, दुमजली, ग्रेड सेपरेटर, रेल्वेवरील अशा पुलांचा समावेश आहे. अंतर्गत रस्त्यांचे जाळेही मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी प्रामुख्याने महापालिकेची आहे. परंतु, काही प्रमाणात नवनगर विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्याकडेही आहे.

पुणे-मुंबई आणि काही अपवाद वगळता सर्व रस्ते डांबरी आहेत. या रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे होत असल्याच्या तक्रारी नेहमीच होतात. त्याबाबत सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा होते. खड्डेविरहीत रस्ता दाखवा आणि पारितोषिक मिळवा, अशी उपरोधिक टीका विरोधी पक्षाच्या सदस्यांकडून होते. मात्र, रस्ते विकासाचे किंवा दुरुस्तीचे टेंडरच निघाले नाही, बजेटमध्ये तरतूद नाही, वाढीव खर्चाला मंजुरी मिळाली नाही, ठेकेदाराने वर्कऑर्डर घेतली नाही, भूसंपादन रखडले अशी कारणे प्रशासनाकडून दिली जातात. परंतु, यापैकी सुमारे ९० टक्के कारणे तकलादू असल्याचा अनुभव लोकप्रतिनीधींना येतो. टक्केवारीच्या नावाखाली सावळागोंधळ सुरू असतो, हे आता जनतेलाही समजले आहे.

पावसाळा तोंडावर आला की अनेक ठिकाणी रस्ते खोदले जातात. ही कामे व्यवस्थित पूर्ण होत नाहीत. ड्रेनेज लाइन चोकअप होतात. रस्त्यांवरून सांडपाणी वाहते. याबाबत प्रशासनाकडे लेखी तक्रारी होतात. एखाद्या नगरसेवकाने खूपच पाठपुरावा केली की पाइपलाइन अपुऱ्या आहेत. बदलाव्या लागतील, असे उत्तर प्रशासनाकडून मिळते. पाचसहा वर्षांत नियोजन कसे चुकते? याचे आत्मचिंतन करायला कोणीच तयार नाही. कामाच्या गुणवत्तेबाबत तर बोलायलाच नको. टेंडरच्या ३० ते ४० टक्के कमी दराने ठेकेदारांना कामे कशी दिली जातात? आणि या कामांचा दर्जा काय असतो? याविषयी सातत्याने चर्चा होते. उपायांबाबत क्वचितच बोलले जाते. अंमलबजावणी ही खूप दूरची बाब झाली.

यासंदर्भात प्रातिनिधिक उदाहरण द्यावयाचे झाल्यास महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष ज्योती भारती यांनी प्रशासनाला पत्र पाठवून रहाटणी, काळेवाडी भागातील कामाच्या दर्जाचे वाभाडे काढले आहे. निकृष्ट दर्जामुळे वारंवार दुरुस्ती करावी लागते. नागरिकांची गैरसोय होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदतात. ते व्यवस्थित बुजविले जात नाहीत. त्यावरून वाहने घसरून अपघात होतात. त्यामुळे महापालिका प्रशासनाने वेळीच लक्ष घालून योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. परंतु, या मागणीपत्राला प्रशासन नेहमीप्रमाणे केराची टोपली दाखवते, असा आजवरचा अनुभव आहे. चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघात अंतर्गत रस्त्यांबाबत नागरिक समाधानी नसल्याचे दिसून येते.

नालेसफाई अन् वरकमाई

शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीला जोडणाऱ्या प्रमुख नाल्यांची संख्या जवळपास ३० ते ४० आहे. यामध्ये वाल्हेकरवाडी, चिंचवड स्मशानभूमीजवळ, पद्मजी पेपर मिल, कुकी, भाटनगर, टिटुल, डिलक्स, हेडगेवार पुलाजवळील, नाशिक फाटाजवळील, सांगवी, दापोडी, दापोजी-पिंपळे गुरव, पवना नदी संगम, वाकड, पिंपळे निलख, गुलाबनगर, रामदरा, मोशी आणि चऱ्होली येथील नाल्यांचा समावेश होतो. या नाल्यांची पावसाळ्यापूर्वी सफाई केल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात येतो. मात्र, या कामात गोलमाल करून अधिकारी आणि ठेकेदार करदात्या नागरिकांचे पैसे खिशात घालतात, असा आरोप नगरसेविका आशा शेंडगे यांनी केला होता. त्यामुळे शहरातील सर्व नाल्यांच्या साफसफाईच्या कामाचे व्हिडिओ शूटिंग करावे, अशी मागणी त्यांनी आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे केली होती.

शेंडगे यांच्या म्हणण्यानुसार, 'पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये याची दखल घेऊन शहरातील छोट्या मोठ्या नाल्यांची साफसफाई होते. मात्र मे महिन्याच्या अखेर शहरातील एकाही नाल्याच्या साफसफाईचे काम पूर्ण केलेले नाही.'

स्थायी समितीने कामाला मंजुरी दिल्यानंतर कामाचा आदेश मिळेपर्यंत बराच कालावधी जातो. तोपर्यंत पावसाळा येतो. पावसाच्या पाण्यात नालेसफाई झाल्याचे दाखवून अधिकारी आणि ठेकेदार स्वतःचे खिसे भरण्याची शक्यता शेंडगे यांनी व्यक्त केली. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे आगमन होते, हे जग जाहीर असताना नालेसफाईचे काम कासवगतीने का होते? याला ठेकेदाराला दोषी धरावे की महापालिकेला? यंदा पावसात पाणी भरल्यास जबाबदार कोण? अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.

याशिवाय पावसाळी सांडपाणी वाहिन्यांची साफसफाई आणि गाळाची वाहतूक करण्याच्या नावाखाली अधिकारी आणि ठेकेदार संगनमत करून करदात्या नागरिकांच्या पैशांची लूट करत असल्याचे समोर आल्याचा आरोपही शेंडगे आणि नगरसेविका सीमा सावळे यांनी केला आहे. निविदाधारकांकडे गाळाच्या वाहतुकीसाठी किमान दोन ट्रक असावे किंवा दोन ट्रक भाडे तत्त्वावर घेतल्याचे मूळ मालकांसोबत करारनामा केलेला असावा. तसेच ट्रकमध्ये किमान पाच टन गाळ बसण्याची क्षमता असावी, अशी अट घालण्यात आली आहे, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण पोलिसांनी केली १५ पिस्तूल जप्त

$
0
0

पुणे : कुख्यात गुंड अप्पा लोंढे आणि चाकण येथील इस्टेट एजंटच्या खूनप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी १५ पिस्तूल जप्त केली आहेत. लोंढे याचा खून त्याचे विरोधक आणि असंतुष्ट असलेल्या लोकांनी एकत्र येऊन केल्याचे समोर आले आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त राजकुमार शिंदे, पोलिस निरीक्षक राम जाधव उपस्थित होते. अप्पा लोंढे २८ मे रोजी पहाटे व्यायाम करण्यासाठी बाहेर पडल्यानंतर गोळ्या घालून त्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर सातजण फरार आहेत. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी विष्णू यशवंत जाधव आणि नागेश झाडकर यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांच्याकडे या गुन्ह्यातील अकरा पिस्तूल, पाच रिकाम्या पुंगळया, ३१ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. लोंढेवर आठ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यापैकी पाच गोळया त्याला लागल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोनसाखळी चोरीचे सत्र शहरात कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात सोमवारी सोनसाखळी चोरीच्या तीन घडना घडल्या. कोथरूड, वारजे, चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. कोथरूड येथे पटवर्धन बाग कॉर्नर येथून पायी जात असलेल्या एका महिलेच्या गळयातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून तोडून चोरून नेली. याप्रकरणी एका २२ वर्षीय महिलेने कोथरूड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. वारजे येथे कर्वेनगर रोडने जात असलेल्या एका महिलेच्या गळयातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी चोरून नेली.

सोमवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी एका २३ वर्षीय महिलेने वारजे पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी महिला पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी तिच्या गळयातील दहा हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून चोरून नेली, अशी माहिती पोलिसांनी दिली. स्वारगेट येथे मुकूंदनगर येथील डॉ. पंडित दवाखान्यासमोरून पायी जात असलेल्या एका महिलेच्या गळयातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी तोडून चोरून नेली. सोमवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी एका ४० वर्षीय महिलेने फिर्याद दाखल केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीची हमी कंपनीला पडली महाग

$
0
0

पुणे : इंजिनिअर महिलेकडून पैसे घेऊन नोकरीसाठी विविध कंपन्यांच्या मुलाखती मिळवून देण्याचे आश्वासन देऊन नंतर त्याची पूर्ती न करणाऱ्या एडज इंडिया लिमिटेडला (नोकरी डॉट कॉमला) ग्राहक मंचाने फटकारले आहे. तसेच संबंधित महिलेला भरलेली रक्कम आणि २५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश कंपनीला देण्यात आला आहे. ग्राहक मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात, सदस्य मोहन पाटणकर, क्षितीजा कुलकर्णी यांनी हा निकाल दिला.

या प्रकरणी समिधा पाटील (रा. मगरपट्टा सिटी, हडपसर) यांनी इन्फो एडज इंडिया लिमिटेडचे (नोकरी डॉट कॉम) कायदा विभागाचे व्यवस्थापक आदित्य गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दिली होती. तक्रारदार पाटील या इंजिनिअर आहेत. त्यांना पहिली नोकरी सोडून त्या राहत असलेल्या भागात नोकरी हवी होती. त्यामुळे त्यांनी एडज इंडिया लिमिटेड यांच्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधला. त्यावेळी त्यांना भेटण्यास बो​लविण्यात आले. त्यांची तिथे सर्व माहिती घेऊन नोकरी मिळण्याची हमी देण्यात आली. मात्र मुलाखतीत उत्तीर्ण होण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील, असे सांगण्यात आले. त्यांनी संबंधित कंपनीकडे २८२५ रुपयांचेशुल्क भरले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सातबारा’ला अखेर मुहूर्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील सर्व तालुक्यांत सातबारा व फेरफार उतारे ऑनलाइन देण्यासाठी एक ऑगस्टचा मुहूर्त काढण्यात आला आहे. सातबारा उताऱ्यांवरील कब्जेदार, खाते रजिस्टरमधील नावे, फेरफार नसलेल्या कब्जेदारांची नावे यात फरक आढळल्याने या त्रुटी दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत.

सातबारा व फेरफार ऑनलाइन देण्यासाठी सर्व्हरमध्ये येणाऱ्या अडचणी, ब्रॉडबॅण्ड कनेक्टिव्हिटी, चुका दुरुस्तीसाठी लागणारा विलंब आणि मनुष्यबळाची कमतरता यामुळे राज्यातील फक्त ७० तालुक्यांतच ही योजना आतापर्यंत सुरू होऊ शकली आहे. पुणे जिल्ह्यातील फक्त मुळशी व भोर तालुक्यातच ऑनलाइन सातबारा व फेरफार देण्यात येत आहेत. पुणे शहरासह १३ तालुक्यांमध्ये ही योजना १ मे रोजी सुरू होणार होती. त्यासाठी जवळपास ४ कोटी २१ लाख त्रुटींची दुरुस्ती करण्याचे आव्हान महसूल प्रशासनासमोर होते. त्यापैकी सुमारे ४ कोटी १९ लाख त्रुटींचे निराकरण करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात सातबारावरील एकूण कब्जेदार व गाव नमूना १ ते ७ मधील कब्जेदारांच्या नावांत फरक असलेली १ लाख ११ हजार ९६८ प्रकरणे तपासणीवर आहेत. या त्रुटींचे निराकरण केल्याशिवाय सातबारा ऑनलाइन देणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या त्रुटींचे युद्धपातळीवर निराकरण करण्यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी एक या प्रमाणे १४ उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा यासंबंधीचा अहवाल १५ जूनपर्यंत देण्याची सूचना देण्यात आली आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर ऑनलाइनच्या कामाला सुरूवात केली जाणार आहे, अशी माहिती कुळकायदा शाखेचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.

जमिनीचा खरेदी दस्त झाल्यानंतर तत्काळ फेरफार उतारा आणि त्यानंतर पंधरा दिवसांत सातबारा उतारे देण्यासाठी इ-फेरफार ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे. राज्यात एक मेपासून ही योजना सुरू करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते; परंतु हे काम अपूर्ण राहिल्याने आता १ ऑगस्टपासून ही योजना सर्वत्र सुरू करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या कामाला गती देण्यासंदर्भात जमाबंदी आयुक्तांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक झाली. त्यात त्रुटी असलेले सातबारा उतारे वगळता अन्य उतारे देण्यासंबंधीचा विचार करण्यात आला आहे. मात्र, त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालगुंड होणार ‘पुस्तकांचे गाव’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांनी पर्यटकांना कोकण आकर्षित करत असताना कोकणात आता साहित्यप्रेमींचाही वावर वाढणार आहे. राज्य सरकारच्या वतीने आद्यकवी केशवसुत यांचे मालगुंड हे जन्मगाव 'पुस्तकांचे गाव' म्हणून विकसित करण्यात येणार आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेकडे (कोमसाप) हे गाव वसवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

मराठी भाषा संवर्धनाचा अनोखा प्रयोग म्हणून पाच लाख पुस्तके असलेले पुस्तकांचे एक गाव महाबळेश्वर किंवा गणपतीपुळेनजीक लवकरच उभारण्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. मात्र, ही केवळ कल्पनाच मांडून न थांबता तावडे यांनी ती मूर्त स्वरुपात आणण्याचीही कार्यवाही केली आहे. हे पुस्तकांचे गाव उभारण्यासाठी आद्यकवी केशवसूत यांच्या जन्मगावाची निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे जवळ असलेल्या मालगुंड येथे हे गाव साकारणार आहे. ही कल्पना प्रत्यक्षात आल्यावर कोकणातील निसर्गपर्यटनाला आता साहित्य पर्यटनाचीही जोड मिळणार आहे.

कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी या पुस्तकाच्या गावाविषयीची माहिती दिली. 'मालगुंड या गावाला केशवुतांमुळे आधीच वलय आहे. आता पुस्तकांचे गाव करण्याच्या कल्पनेमुळे या गावाचे महत्त्व अजून वाढणार आहे. पुस्तकांचे गाव वसवण्याचे काम तावडे यांनी कोमसापला दिले आहे. पुस्तकांचे गावात ग्रंथ ठेवण्यासाठीची रचना, देखभाल कोमसाप करेल. गावात असलेल्या केशवसूत यांच्या स्मारकात सुमारे वीस जणांचा स्टाफ आहे. तसेच, रंगमंच, काही हजार पुस्तकांचे सुसज्ज ग्रंथालय, काव्यदालन अशी पायाभूत व्यवस्थाही या गावी असल्याने पुस्तकांचे गाव साकारण्यास त्याची मदतच होईल,' असे कर्णिक यांनी सांगितले.

पावसाळी अधिवेशनापूर्वी बैठक

'पुस्तकांचे गाव वसवण्याबाबतचे टप्पे, त्यासाठी लागणारा निधी याबाबतची बोलणी पावसाळी अधिवेशनापूर्वी होणाऱ्या बैठकीत होणार आहेत. या बैठकीत पुस्तकाचे गावाबाबतची कल्पना अधिक स्पष्ट होईल,' असेही कर्णिक यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंजाब फिल्म स्कूलला एफटीआयआयची मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या (एफटीआयआय) धर्तीवर पंजाबमध्येही फिल्म स्कूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पंजाब सरकारला एफटीआयआय सहकार्य करणार आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल एका कार्यक्रमासाठी मंगळवारी पुण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी फिल्म इन्स्टिट्यूट व राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय या दोन्ही संस्थांना भेट दिली. बादल यांनी सर्वप्रथम चित्रपट संग्रहालयाला भेट देऊन या संस्थेविषयी आणि येथील चित्रपट संग्रहाविषयी सविस्तर माहिती घेतली. संचालक प्रकाश मगदूम यांनी संग्रहालयाच्या कार्यपद्धतीविषयी सांगितले. तसेच, बादल यांना दादासाहेब फाळके यांच्या मूकपटांची डीव्हीडी आणि 'ट्रेजर्स ऑफ एनए' हे पुस्तक भेट दिले. 'राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात होणाऱ्या चांगल्या कामाविषयी बरीच वर्षे ऐकून आहे. त्यामुळे ही संस्था पाहण्याची इच्छा होती. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास योजनेंतर्गत पंजाबच्या टीव्ही क्षेत्रात तरुणांसाठी रोजगारनिर्मिती करण्याच्या दृष्टीने काही करता येईल का, याचा विचार सुरू आहे,' असे बादल यांनी सांगितले. त्यानंतर बादल यांनी फिल्म इन्स्टिट्यूटही पाहिली. एफटीआयआयचे अभिनय विभाग प्रमुख आर. एन. पाठक, रजिस्ट्रार यू. सी. बोडके यांनी बादल यांना माहिती दिली.

पंजाबमध्ये फिल्म इन्स्टिट्यूट सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूट महत्त्वाची संस्था असल्याने पंजाबमधील इन्स्टिट्यूटच्या उभारणीत सहकार्याची गरज आहे.

- प्रकाशसिंह बादल, मुख्यमंत्री, पंजाब

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images