Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

राडारोडा टाकला शाळेच्या मैदानावर

0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

बांधकामातून निघणारा राडारोडा मोकळ्या जागेत टाकण्याऐवजी आता थेट परिसरातील शाळेच्या मैदानात टाकण्याची ठेकेदारांची मजल गेली आहे. विश्रांतवाडीतील एका शाळेत राडारोडा टाकण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. स्थानिक ठेकेदारांकडून रात्रीच्या वेळेस शाळेच्या आवारात आणि मैदानावर बांधकामाचा राडारोडा टाकला जात असल्याने मैदाने नामशेष होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली.

गेल्या अनेक दिवसांपासून ठेकेदाराकडून शाळा परिसरात राडारोडा टाकला जात असताना कुठलीही माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांना नाही. त्यामुळे पालिका अधिकारी प्रामाणिकपणे कामे करतात का, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.

विश्रांतवाडी येथील नानासाहेब परुळेकर शाळेच्या आवारात स्थानिक ठेकेदारांनी मोठ्याप्रमाणात राडा रोडा टाकला आहे. सध्या शाळेला सुट्ट्या असल्याने शाळेचे प्रवेशद्वार बंद असते; पण शाळेच्या आवारात प्रवेश करण्याच्या ठिकाणचे गेट उघडेच असल्याने परिसरातील अनेक स्थानिक बांधकाम ठेकेदार रात्रीच्या वेळेस राडारोडा टाकला जातो. अनेक दिवसांपासून शेकडो ट्रक राडारोडा शाळेच्या आवारात टाकला जात, असूनही याची कुठलीही माहिती येरवडा क्षेत्रीय कार्यालयाला नाही.

आतापर्यंत शेकडो ट्रक राडारोडा टाकल्याने शाळेच्या आवारातील अनके झाडे नष्ट होण्याची शक्यता आहे. फुलेनगर येथील आरटीओ कार्यालयाच्या समोर स्थानिक नगरसेवकांच्या निधीतून लाखो लिटर पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. टाकीसाठी खोदकाम करताना निघणारा शेकडो ट्रक राडारोडा नानासाहेब परुळेकर शाळेच्या आवारात टाकला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

याबाबत येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त संध्या गागरे म्हणाल्या, 'स्थानिक ठेकेदारांकडून शाळेच्या आवारात राडारोडा टाकला जात असेल, तर गंभीर बाब आहे. राडारोडा टाकणाऱ्यांवर पकडण्यासाठी बहुउद्देशीय पथकांची (एनडी) स्थापना केली आहे. बहुउद्देशीय पथकांना शाळेत राडारोडा टाकणाऱ्या ठेकेदार आणि वाहनांवर तातडीने कारवाई करण्यास सांगितले आहे. शाळेत जाऊन जागेची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर राडारोडा उचलण्यात येईल.'

आरटीओ कार्यालयाच्या समोर पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. टाकीचे खोदकाम करताना निघणारा राडारोडा शाळेच्या आवारात टाकण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने शिक्षण मंडळाकडे परवानगी घेतली आहे. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांना देखील पत्र व्यवहार केला असून, त्यांनी राडारोडा टाकण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे राडारोडा शाळेच्या आवारात टाकला जात आहे.

- सुनील गोगले, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वडार संघटनेचा मोर्चा

0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

विश्रांतवाडी येथील येरवडा गाडी वडार को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी संस्थेच्या मालकी जागेत बिल्डरकडून बांधण्यात येणाऱ्या पुनर्विकास योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. कोट्यवधीची मालमत्ता कवडी मोल भावात विकल्याने सभासदांची फसवणूक झाली आहे, असा आरोप करत वडार समाजाच्या नागरिकांनी सहकार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता.

वडार समाजातील गरीब, अशिक्षित सभासदांना फसवून आर्थिक व्यवहार केला आहे. संस्थेत झालेल्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी आणि सभासदांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रशासकावर फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच फसवणूक करून तयार करण्यात आलेले संस्थेचे खरेदीखत तातडीने रद्द करावे. या मागणीसाठी वडार समाजाच्या वतीने गुरुवारी सहकार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

येरवडा गाडी वडार को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीचा विश्रांतवाडी (कळस) येथे साडे दहा एकराचा भूखंड आहे. आर्थिक दुर्बल, भूमिहीन, बेघर असणाऱ्या वडार समाजातील लोकांची भटकंती थांबावी या हेतूने संबंधित जागा विकत घेतली. समाजातील सर्वांनी एकत्र येऊन १९५२ मध्ये ही संस्था स्थापन केली होती. साडे दहा एकर जागेची बाजार भावाप्रमाणे किंमत सातशे ते आठशे कोटी असताना ही जागा केवळ ११ कोटी रुपयांना विकली गेली आहे. असा दावा समाजातील सभासद करीत आहे.

संस्थेत झालेला भ्रष्ट व्यवहाराची चौकशी करून, प्रशासाकावर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी वडार समाजाकडून मोर्चा काढण्यात आला होत. स्थानिक नगरसेवक किशोर विटकर, सुनील धोत्रे, प्रभू देवकर, रघुनाथ लष्करे, भारत विटकर यांच्या शिष्टमंडळाने सहकार आयुक्त कार्यालयात याबाबतचे निवेदन दिले. या वेळी संजय देवकर, शंकर विटकर, अशोक धोत्रे, संजय लष्करे, विनोद विटकर, राजू लष्करे, सुनील विटकर आदी उपस्थित होते.

'जागा मातीमोल किमतीत विकली'

गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे संस्थेची आर्थिक परिस्थती नाजूक बनून कारभारात अनियमितता दिसून आल्याने सहकार खात्याने १९९७ मध्ये संस्थेवर प्रशासकाची नेमणूक करावी लागली. अरुण आरेकर यांनी कधीही संस्थेच्या जागेवर येऊन प्रत्यक्ष पाहणी केली नाही. सभासदांची सर्वसाधारण साभ झाली नसतानाही सभा झाली नसतानाही संस्थाची जागा एका बड्या बिल्डरला मातीमोल किमतीत विकण्यात आली असा आरोप कुंदन लष्करे याने केला.

संस्थेचा प्रशासक शासनाचा प्रतिनिधी असूनही त्याने बिल्डरच्या हिताचे बेकायदेशीर निर्णय घेऊन बनावट कागदपत्रे बनविली आहेत. शासकीय कार्यालये, महापालिका यांच्याकडे तक्रार करूनही काही ठोस कारवाई झालेली नाही. गेल्या दहा वर्षांपासून एकाच प्रशासक संस्थेवर टिकून असल्याने बिल्डर, प्रशासक आणि शासकीय अधिकारी यांच्यात हातमिळवणी झाली आहे.

- सुनील धोत्रे, संस्थेचे सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाकण परिसरात गोळीबारात १ ठार

0
0

म. टा. वृत्तसेवा, राजगुरुनगर

चाकणजवळील मुटकेवाडी येथे आज सकाळी अकराच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रोहन राजेंद्र भुरूक (वय २८, रा. पोलाईट हेरीटेज, मुटकेवाडी, चाकण) असे त्या तरुणाचे नाव आहे. हल्लेखोरांनी त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या.

एक गोळी त्याच्या नाकाजवळून थेट मेंदूत घुसल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. चाकण येथील खासगी रुग्णालयात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी रोहनची पत्नी प्रियांका रोहन भुरूक (वय २७) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात हल्लेखोरांविरोधात चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण उपविभागीय पोलिस अधिकारी संजयकुमार पाटील, पोलिस निरीक्षक डी. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील सहायक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, उपनिरीक्षक महेश मुंढे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉमन मॅन पुस्तकरूपात

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कुंचला आणि शब्दांचा अलौकिक मिलाफ साधून वेगळे विश्व निर्माण करणारे दिवंगत व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचा 'कॉमन मॅन' आता पुस्तकरूपाने मराठी वाचकांच्या भेटीला येत आहे. लक्ष्मण यांचा 'यू सेड इट' हा इंग्रजी व्यंगचित्रांचा संग्रह अनुवादाच्या माध्यमातून सात पुस्तकांच्या संचात लवकरच प्रकाशित होणार असून, यानिमित्ताने लक्ष्मण यांची व्यंगचित्रे मराठीमध्ये प्रथमच पुस्तकरूपाने प्रकाशित होत आहेत.

मेहता पब्लिशिंग हाउसच्या वतीने हा संच प्रकाशित करण्यात येत आहे. अविनाश भोमे यांनी हा अनुवाद केला आहे. आरकेंची 'यू सेड इट' ही व्यंगचित्रमालिका बरीच गाजली होती. नंतर ती पुस्तक रुपाने इंग्रजीतही प्रकाशित झाली. आता 'कसं बोललात' या नावाने हा सात पुस्तकांचा संच मराठीमध्ये येत आहे. यात लक्ष्मण यांनी १९८०च्या दशकातील चितारलेली व्यंगचित्रे, लेख यांचा समावेश आहे.

प्रकाशक सुनील मेहता यांनी याविषयी माहिती दिली. 'आरकेंची व्यंगचित्रे व लेखन हे ८० च्या दशकातील असले, तरी आजही समकालीन वाटते. त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी अनुवाद रूपाने पुस्तक करण्याचे ठरवले. वाचकांना आरकेंनी चितारलेला 'कॉमन मॅन' परिचयाचा आहे. मात्र, त्यांनी सामाजिक परिस्थितीवर केलेले भाष्यही तितकेच महत्त्वाचे आहे. यापूर्वी हे लेखन इंग्रजीत प्रकाशित झाले होते. त्यानंतर इतर कोणत्याही भाषेत ते प्रकाशित न होता मराठीत होत आहे,' असे मेहता यांनी सांगितले.

'आरकें'चा वेगळा पैलू...

आरकेंचे बहुतांश साहित्य हे इंग्रजी भाषेत आहे. त्यापैकी आतापर्यंत मराठीमध्ये आरकेंचे 'लक्ष्मणरेषा' हे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. त्यानंतर 'कसं बोललात' हा चित्रमालिकेचा संच लवकरच मराठीत येत आहे. आरकेंच्या निधनानंतर पाच महिन्यांनी हा संच प्रकाशित होणार आहे. या मालिकेतून आरकेंचा वेगळा पैलू वाचकांपुढे खुला होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा ‘प्रभात’ कधी?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मराठी चित्रपटांचे माहेरघर असलेल्या 'प्रभात' चित्रपटगृहाचा दुसरा डाव 'ना हरकत प्रमाणपत्रां' अभावी लांबणीवर पडला आहे. अद्याप सर्व ना हरकत प्रमाणपत्रे न मिळाल्याने चित्रपटगृह सुरू करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना चांगला व्यवसाय मिळवून देणाऱ्या चित्रपटगृहाला मुकावे लागत असून, चित्रपटगृह पुन्हा कधी सुरू होणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

दामले कुटुंबीय व चित्रपटगृहाचे मूळ मालक इंदूरचे संस्थानिक किबे यांच्यातील करार संपुष्टात आल्याने जानेवारीपासून प्रभात चित्रपटगृह बंद आहे. चित्रपटगृहाच्या मालकी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. चित्रपटगृह पुन्हा सुरू करण्यासाठी किबे यांना सरकारच्या व महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. त्यासाठी अजय किबे जानेवारीपासून प्रयत्नशील करत आहेत. मात्र, आवश्यक सर्व ना हरकत प्रमाणपत्रे त्यांना मिळालेली नसल्याने चित्रपटगृह पुन्हा सुरू करण्यात वेळ जात आहे. दरम्यानच्या काळात, चित्रपटगृहातील पडदा, बाल्कनी आणि अप्पर स्टॉलमधील खुर्च्या बदलण्यात आल्या आहेत. नवीन कार्पेटही टाकण्यात आला आहे. स्वच्छतागृहामध्ये सुधारणा करून घेतल्या आहेत.

सरकार किंवा महापालिकेच्या कोणत्या विभागांकडून ना हरकत प्रमाणपत्र प्रलंबित आहेत, नेमके कधी चित्रपटगृह सुरू होईल, या प्रश्नांची उत्तरे देण्यास किबे यांनी नकार दिला. 'अद्याप सर्व ना हरकत प्रमाणपत्रे मिळालेली नाही. त्यामुळे चित्रपटगृह सुरू करता येत नाही. त्याची पूर्तता करून तातडीने चित्रपटगृह सुरू व्हावे, यासाठी आम्हीही प्रयत्न करत आहोत. चित्रपटगृह कधी सुरू होणार हे ठरवल्यावर त्याची अधिकृत घोषणा केली जाईल,' असे त्यांनी सांगितले.

आता किबे लक्ष्मी थिएटर

चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाने प्रभात चित्रपटगृह हे नाव बदलून मूळचे 'किबे लक्ष्मी थिएटर' हे नाव कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या वास्तूवर 'किबे लक्ष्मी थिएटर'ची पाटीही लावण्यात आली आहे. किबे यांच्या पणजीच्या नावे चित्रपटगृह होते. त्यामुळे तेच नाव पुन्हा ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रोजगार हमी’चे मजूर वाढले

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याची सुवार्ता हवामान खात्याने दिली असली, तरी सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे रोजगार हमी योजनेच्या कामांवर मजुरांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुणे विभागात दर आठवड्याला एक ते दीड हजारांपर्यंत मजुरांची संख्या वाढत असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले.

उन्हाळ्यामध्ये शेतीची कामे बंद असतात. त्यामुळे मजूर रोजगार हमीच्या कामांवर काम करतात. यंदा उन्हाळ्याबरोबरच दुष्काळीस्थितीमुळे मजुरांची संख्या वाढत आहे. विशेषतः बाहेरील जिल्ह्यातील मजूरही पश्चिम महाराष्ट्रात येत असल्याचे सांगितले जात आहे. पुणे विभागात दोन आठवड्यांपूर्वी रोजगार हमीच्या कामांवर ६ हजार ५२८ मजुरांनी उपस्थिती लावली होती. गेल्या आठवड्यात ही संख्या ८ हजार ४३६पर्यंत पोहचली आहे. या आठवड्यात दहा हजार ९०६ मजूर कामांवर आले आहेत.

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावांत रोजगार निर्मिती करण्यात येते. रोजगारासाठी अंतर्गत रस्ते तयार करणे, पाणंद रस्ते, मातीनाला बांध, वनराई बंधारे, शेततळी, गाव तलाव, साठवण तलाव, खार जमीन विकास बंधारा, पाझर तलावातील गाळ काढणे, रोपवाटिका, कालव्याची दुरूस्ती, अस्तरीकरण व नुतनीकरण, सिंचन विहिर अशी कामे करण्यात येतात. रोजगार हमी अंतर्गत पुणे जिल्ह्यातील १३३ कामांवर १,०६८, सातारा जिल्ह्यात १९९ कामांवर १,७७५, सांगलीत ४१६ कामांवर ६,१०८, कोल्हापूरमधील २१ कामांवर ७३९, सोलापूर जिल्ह्यातील ४३६ कामांवर १,२१६ मजूर काम करीत आहेत.

दरम्यान, रोजगार हमी योजनेंतर्गत हाती घेण्यात येणाऱ्या कामांमध्ये वैयक्तिक कामांऐवजी सार्वजनिक कामे करावीत, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे वैयक्तिक विहिरींच्या योजनांऐवजी जलसंधारणाची कामे करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँक भरणार खातेदारांचा विमा हप्ता

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या साडेआठ लाख खातेदारांच्या अपघात विम्याचा हप्ता जिल्हा बँकेमार्फत भरण्यात येणार आहे. या योजनेसह पंतप्रधान जीवनज्योती विमा योजनेसाठीही खातेदारांना जिल्हा बँकेमार्फत विमा उतरविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात आणि सरव्यवस्थापक अरूण काळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या वतीने १८ ते ७० वयोगटातील बचत ठेव खातेदारांसाठी पंतप्रधान सुरक्षा विमा योजना लागू करण्यात आली आहे. तसेच १८ ते ५० वयोगटातील खातेदारांसाठी पंतप्रधान जीवनज्योती विमा योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आल्यास दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार असून त्यासाठी बारा रुपयांचा वार्षिक हप्ता बँकेच्या वतीने भरण्यात येणार आहे. बँकेचे आठ लाख ६४ हजार बचत ठेव खातेदार असून त्यांच्यासाठी ८६ लाख रुपयांची तरतूद बँकेने केल्याची माहिती थोरात यांनी दिली.

आठशे कोटींचे पीककर्ज

दरम्यान, यंदाच्या खरीप हंगामात सुमारे सव्वा लाख शेतकऱ्यांना एक हजार २२३ कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा बँकेसमोर आहे. त्यापैकी आठशे कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण पूर्ण झाल्याचे थोरात यांनी सांगितले. तसेच यंदा पीक कर्जाचे वाटप किसान क्रेडिट कार्डांद्वारे करण्यात येणार आहे. रुपे कार्डाद्वारे ही रक्कम शेतकऱ्यांना एटीएममधून काढता येईल किंवा डेबिट कार्डाप्रमाणे त्याचा वापर करता येईल.

संमतीपत्रे भरून द्यावीत

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेत विमा उतरविण्यासाठी बचत बँक खातेदारांनी आपली संमतीपत्रे बँकेत भरून द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान जीवनज्योती विमा योजनेत सहभागी होण्याचीही सुविधा बँकेने उपलब्ध करून दिली असून त्यासाठी शाखेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोथरूडमध्ये ९ लाखांची घरफोडी

0
0

पुणेः शिवतीर्थनगर येथील माधवबागेतील बंगला फोडून घरातील नऊ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरल्याचा प्रकार शनिवारी घडला. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरीष चाफेकर (वय ४९, रा. कोथरूड) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांनी बंगल्यातील तळमजल्यावरील खोलीचे ग्रील उचकटून घरातील मौल्यवान वस्तू चोरून नेल्या आहेत.

चापेकर यांचा कोथरूड परिसरातील शिवतीर्थनगर भागात श्रीराम बंगला आहे. हा बंगला शनिवारी रिकामा असल्याचे लक्षात आल्यावर चोरट्यांनी तळमजल्यावरील खिडकीचे ग्रील उचकटून आतील जाळी काढत घरामध्ये प्रवेश केला. बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेल्या विदेशी नोटा, डिजिटल कॅमेरा, व्हिडीओ कॅमेरा व सोन्याचांदीच्या वस्तू, असा एकूण ९ लाख ८० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अतिधोक्याची गावे साडेतीन हजार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विविध आजारांचा सलग तीन वर्षांपासून होत असलेला उद्रेक, नदीच्या काठावरील तसेच लाल कार्ड मिळालेली गावे आणि पाणी टंचाईमुळे राज्यातील साडेतीन हजार गावे 'अतिधोक्या'ची जाहीर करण्यात आली आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने या गावांवर लक्ष केंद्रीत केले असून, आरोग्याच्या सोयी सुविधांसंदर्भात उपाययोजना सुरू केल्या आहेत.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दर वर्षी राज्यातील अतिधोक्याच्या गावांवर लक्ष ठेवण्याचा आराखडा तयार करण्यात येतो. गावांमध्ये आरोग्याच्या कोणत्या उपाययोजना करण्यात याव्यात यासंदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी संबंधित जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

'पावसाळ्यात साथीच्या विविध आजारांचा प्रचंड उद्रेक होतो. सलग तीन वर्षांपासून गावांमध्ये आजारांचा झालेला उद्रेक, नदी काठावरील गाव, तसेच पाण्याच्या शुद्धीकरणाच्या अभावामुळे मिळालेले लाल कार्ड आणि पाणी टंचाई या सारख्या कारणास्तव अशा गावांना 'अतिधोक्या'ची गावे म्हणून म्हटले जाते. दर वर्षी अशी अतिधोक्याची गावे जाहीर केली जातात. त्या गावांवर आरोग्य खाते लक्ष केंद्रीत करून उपाययोजना करते. राज्यात २९ हजार ६०१ गावे आहेत. त्यापैकी या वर्षी तीन हजार ४८७ गावे अतिधोक्याची गावे म्हणून जाहीर केली आहेत. राज्यातील एकूण १८ टक्के गावे अतिधोक्याची गावे समजली जात आहेत,' अशी माहिती सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी 'मटा'ला दिली.

राज्यातील नंदुरबार, अकोला, सांगली, भंडारा, जालना, लातूर, गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक अतिधोक्याची गावे आहेत. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत अशा गावांची संख्या घटली आहे. गेल्या पाच वर्षात राज्यात साडेपाच हजार अतिधोक्याच्या गावांची संख्या घटली आहे. तेथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. आजमितीला पुणे जिल्ह्यात सुमारे शंभर गावे अतिधोक्याची आहेत, अशी माहिती डॉ. जगताप यांनी दिली.

वर्षे अतिधोक्याची गावे

२०१० ९ हजार

२०११ ७,७७३

२०१२ ७,३०२

२०१३ ५,४३८

२०१४ ३,३९५

२०१५ ३,४८७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेक्कन क्वीनचा थाट भारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रेल्वेच्या डब्यात विविधरंगी फुगे, झुरमुळ्या लावून केलेली आकर्षक सजावट आणि एकमेकाला मिठाई भरवत आनंदोत्सव साजरा करणारे प्रवासी, असे वातावरण सोमवारी सकाळी पुणे रेल्वे स्टेशनवर पाहायलाय मिळाले. पुण्या-मुंबईला जोडणाऱ्या दख्खनच्या राणीचा ८६ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. एरवी गाडी सुटण्याच्या भितीने घाई करणाऱ्या प्रवाशांची आज वाढदिवस साजरा करण्यासाठी लगबग सुरू होती.

जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुणे रेल्वे स्टेशनचे व्यवस्थापक सुनील कमठान यांच्या उपस्थितीत डेक्कन रेल्वेचा वाढदिवस साजरा करण्यात आला. रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'एक्स्प्रेस वे होण्यापूर्वी अनेकवेळा डेक्कन क्वीनने प्रवास केला आहे. त्यामुळे खूप ऋणानुबंध जोडले गेले आहेत. प्रवासादरम्यान आपल्याला अनेक गोष्टी शेअर करण्यासाठी माध्यम उपलब्ध होते,' असे बापट म्हणाले. रेल्वे संबंधी काही तक्रारी असून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याकरीता रेल्वे बोर्ड आणि प्रवासी संघटनांशी बोलणी करू. सरकारकडून शक्य ती मदत केली जाईल, असे आश्वासन बापट यांनी दिले. तर, पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या पास होल्डर धारकांच्या जीवनाचा एक भाग बनलेली आहे. मी देखील या गाडीने प्रवास केला आहे. रेल्वेच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व मदत केली जाईल, असे कांबळे यांनी सांगितले. 'डेक्कन क्वीनचा संपूर्ण ट्रॅक बदलावा. आता वापरात असलेल्या ट्रॅक ऐेवजी अतिवेगवान ट्रॅकवरून गाडी सोडणे शक्य आहे. त्यासाठी निर्णय घेण्याची गरज असून पाठपुरावा करावा,' असे आवाहन शहा यांनी केले.

डेक्कनच्या 'डायनिंग'वर सारेच खूष!

डेक्कन क्वीनचा वाढदिवस अखेर डायनिंग कारविनाच साजरा करण्यात आला. गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली डेक्कन क्वीनमधील डायनिंग कार आज, सोमवारी सायंकाळी मुंबईला जोडण्यात आली. भलामोठा केक, कॅमेऱ्यांचा किलकिलाट, प्रचंड गर्दी... अशा वातावरणात 'डेक्कन क्वीन' मधील नव्या डाय​निंग कारचे उद््घाटन सीएसटी येथे झाले. मुंबई-पुणे यांना गेली ८६ वर्षे जोडण्याचे काम करणाऱ्या 'डेक्कन क्वीन'मध्ये पुन्हा डायनिंग कार अवतरल्याने प्रवासी भलतेच खूष झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीच्या बहाण्याने तरुणांची फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने उच्चशिक्षित तरुण-तरुणींना गंडा घातल्याप्रकरणी एका प्लेसमेंट एजन्सीच्या चालकाविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी या चालकाविरुद्ध दोन गुन्हे दाखल आहेत. संजय पंडित चव्हाण असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सोनाली सारोळकर या तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सोनालीला सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने तिच्याकडून ७० हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहेे. पंडित याच्यावर यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्कूलबस भाडे वाढ; आज होणार बैठक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हुजुरपागा शाळेच्या विद्यार्थिनींसाठी स्कूलबसच्या भाड्यामध्ये मोठी वाढ केल्याबाबत सोमवारी पालकांनी शाळा प्रशासनाला धारेवर धरले. त्यावर मार्ग काढण्यासाठी मंगळवारी शाळा प्रशासन, पालक आणि पीएमपीएमएल प्रशासनाची बैठक बोलविण्यात आली आहे.

पीएमपीएमएल स्कूल बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सोमवारी सकाळपासूनच हुजूरपागा शाळेसमोर स्कूलबसचे शुल्क भरण्यासाठी गर्दी केली होती. गेल्या वर्षी स्कूलबसचे शुल्क पाच हजार पाचशे रुपये होते. मात्र यंदा हे भाडे यंदा थेट १४ हजार पाचशे रुपये झाल्याचे समजताच, पालकांना धक्का बसला. त्यामुळेच पालकांनी त्या विषयी शाळा प्रशासनाला जाब विचारला. त्यावर पालिकेने सवलत बंद केल्यामुळे शुल्कवाढ करण्यात आल्याचे शाळा प्रशासनाने पालकांना सांगितले.

शहरातील १७ खासगी शाळा पीएमपीएमएलच्या बस वापरतात. तर महानगरपालिकेच्या १६ शाळांमधील विद्यार्थी पीएमपीएमएलच्या बसने प्रवास करतात. गेल्या वर्षी पीएमपीएमएलच्या स्कूलबसचा दर ५६ रुपये प्रति किलोमीटर होता. परंतु, शाळांकडून निम्म्यादराने खर्च आकारला जात होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ईपीएफओ’वर सीबीआयचा छापा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गेनायझेशनच्या (ईपीएफओ) गोळीबार मैदान येथील विभागीय कार्यालयात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी छापा टाकला. त्यामध्ये एका महिला निरीक्षकाला रंगेहाथ पकडण्यात आले.

संबंधित महिला निरीक्षकाकडे चाकणचा परिसर आहे. चाकणमधील एका संस्थेकडे त्यांनी लाच मागितली होती. त्यांच्याविरुद्ध 'सीबीआय'कडे तक्रार करण्यात आली होती. 'सीबीआय'च्या पथकाने 'ईपीएफओ'च्या कार्यालयात सापळा रचला होता. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास लाच स्वीकारताना 'सीबीआय'ने महिला निरीक्षकाला पकडल्याचे 'ईपीएफओ'च्या गोटातून सांगण्यात आले.

ही कारवाई सुरू असताना काही काळ 'ईपीएफओ'चे कार्यालय बंद ठेवण्यात आले होते. दुपारनंतर कार्यालय नेहमीप्रमाणे सुरू करण्यात आले. 'ईपीएफओ'च्या कार्यालयात 'सीबीआय'कडून छापे टाकण्यात आल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 'सीबीआय'च्या पथकाने छापे टाकून लिपिकांना पकडले होते. महिला अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आल्याची ही पहिलीच वेळ असल्याचे 'ईपीएफओ'कडून नमूद करण्यात आले.

'ऑनलाइन तक्रार करता येते'

कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास कार्यालयाकडे किंवा ऑनलाइन तक्रार करता येते. तसेच प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला 'पीएफ' अदालत घेतली जाते. त्यामध्ये नागरिकांना तक्रारी मांडता येतात, असे 'ईपीएफओ'च्या विभागीय कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा डेपोचा प्रस्ताव पर्यावरण मंत्रालयाकडे

0
0

पुणे : उरळी आणि फुरसुंगी येथील कचरा डेपो बंद करून त्याऐवजी पिंपरी सांडस येथील जागेचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर ही जागा राज्य सरकारकडून पालिकेकडे हस्तांतरित केली जाईल, असे सोमवारी स्पष्ट झाले.

शहरातील कचरा समस्येचा आढावा घेण्यासाठी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यानंतर, पालिकेतर्फे घेण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. पिंपरी सांडस येथील जागेला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असला, तरी राज्य सरकारने त्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविला आहे. पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिल्यास, ही जागा पालिकेच्या ताब्यात येऊ शकेल, असा विश्वास महापौर धनकवडे यांनी व्यक्त केला.

गेल्या जानेवारीमध्ये उरळी व फुरसुंगीच्या ग्रामस्थांनी कचरा डेपो बंद करण्यासाठी आंदोलन केले होते. त्या वेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पालिकेला कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नऊ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता.

राडारोडा जिरणार वाघोलीतील खाणीत

शहरात निर्माण होणारा राडारोड्याचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेतर्फे सुरू असलेल्या प्रयत्नांना अंशतः यश लाभले आहे. वाघोली परिसरातील बंद पडलेली खाण राडारोडा टाकण्यासाठी देण्याचा पालिकेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला असून, सोमवारीच सौरव राव यांनी त्याबाबतचे पत्र पाठविले असल्याचे महापौर धनकवडे यांनी सांगितले. नदीपात्रात; तसेच मोकळ्या जागांवर राडारोडा टाकण्याचे प्रमाण यामुळे कमी होऊ शकेल, असा दावा त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीएनजी पुरवठा थांबवणार?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेला काही काळ आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळासमोर (पीएमपी) आता सीएनजीच्या पुरवठ्याचा प्रश्न उभा राहिला आहे. सीएनजीची थकलेली बिले न भरल्यास येत्या गुरुवारपासून (४ जून) सीएनजीचा पुरवठा बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) दिला आहे. ही बिले न भरल्यास पीएमपीच्या ताफ्यातील तब्बल अकराशे बसेस सीएनजीअभावी उभ्या राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

पीएमपीच्या ताफ्यातील अठराशे बसेसपैकी अकराशे बसेस सीएनजीवर चालतात. त्यामध्ये तीनशे बसेस पीएमपीच्या असून दोनशे बसेस कंत्राटदारांना चालविण्यास दिल्या आहेत. तसेच साडेसहाशे भाडेतत्वावरील बसेसही सीएनजीवर चालतात. गेल्या काही काळात सीएनजीचा पुरवठा करण्यात आल्यानंतर एमएनजीएलची बिले थकलेली आहेत. सध्या ही थकबाकी ३५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. एमएनजीएलने यापूर्वी पीएमपीला वारंवार स्मरणपत्रे पाठविली. त्यानंतर पीएमपीने काही रक्कम एमएनजीएलकडे भरली आहे. मात्र, आता थकबाकी सोसणे आवाक्याबाहेर जाऊ लागल्यामुळे बिले भरेपर्यंत सीएनजीचा पुरवठा थांबविण्याचे एमएनजीएलने ठरविले आहे. थकबाकी न भरल्यास गुरुवारपासून पुरवठा बंद करण्यात येईल, असे पत्र एमएनजीएलने पीएमपीला पाठविल्याची माहिती एमएनजीएलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

पीएमपीच्या ताफ्यातील बसेसपैकी अनेक बस रस्त्यावर येत नसल्याने प्रवासीसंख्येच्या तुलनेत बसेसचे प्रमाण कमी आहे. त्यातच सीएनजीअभावी अकराशे बसेस उभ्या राहिल्या, तर प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत.

तातडीने व्यवस्था करू

सीएनजीच्या पुरवठ्यापोटी पीएमपीने काही रक्कम यापूर्वी एमएनजीएलकडे भरली. आताही पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे निधीची मागणी करण्यात आली आहे आणि हा निधी उपलब्ध झाल्यावर तातडीने सीएनजीची बिले भरण्यात येतील, आणि प्रवाशांची अडचण होणार नाही, अशी व्यवस्था करण्यात येईल, असे पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रविण आष्टीकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेनेकडून भाजपला ठेंगा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या प्रभाग समित्यांवरील निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी भूमिका बदलून शिवसेनेला साथ दिली. त्यामुळे, वारजे-कर्वेनगरच्या प्रभाग समिती सदस्यपदी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली असून, घोले रोडच्या समितीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने बाजी मारली आहे.

महापालिकेच्या १५ पैकी १३ क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रभाग समितीच्या निवडणुका गेल्या महिन्यातच झाल्या. त्या वेळी, कायद्यानुसार स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना संधी देण्याऐवजी राजकीय कार्यकर्त्यांची वर्णी लावली जात असल्याने मनसेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता. सोमवारी वारजे-कर्वेनगरच्या निवडणुकीत मात्र मनसेने 'यू टर्न' घेत थेट शिवसेनेच्या उमेदवारांच्या पारड्यात दान टाकले. त्यामुळे, शिवसेनेचे सचिन दांगट, संजय भोर आणि दत्तात्रय चौधरी या तीन कार्यकर्त्यांची स्वीकृत सदस्यपदी निवड होऊ शकली. प्रभाग समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी कॉँग्रेसची साथ घेतल्याने आपला खरा चेहरा दाखवून दिला आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी भाजपवर निशाणा साधला.

तसेच, शिवसेनाा-मनसेच्या या नव्या युतीमुळे धक्का बसल्याची भावना भारतीय जनता पक्षाच्या आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली. महापालिकेच्या १५ पैकी १३ क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रभाग समितीच्या निवडणुका गेल्या महिन्यातच झाल्या. दरम्यान, घोले रोड प्रभाग समिती निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीमुळे अमित अग्रवाल, अजय दुधाणे आणि रणजित गाडगीळ यांची स्वीकृत सदस्यपदी निवड होऊ शकली.

मनसेच्या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस

मनसेने घेतलेल्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेणाऱ्या दोन्ही नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली असल्याची माहिती पालिकेतील गटनेते बाबू वागसकर यांनी सांगितले. त्यांच्याकडून लेखी खुलाला प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रेशन’ची ३५०० कोटींची गळती

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रेशनच्या धान्य वितरणामध्ये दोन ते साडेतीन हजार कोटी रुपयांची 'गळती' होत असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी दिली. ही 'गळती' रोखण्यासाठी काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यापासून बायोमेट्रिक वितरण व्यवस्थेपर्यंत राज्य सरकार पावले उचलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नाशिकमधील रेशनधान्य अपहारप्रकरणी प्रथमच 'मोक्का' कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर नागरी पुरवठा मंत्री बापट यांनी रेशन व्यवस्थेतील त्रुटींवर भाष्य केले. राज्यात दर वर्षी सुमारे ११ हजार कोटी रुपयांचे धान्य गोरगरीब व गरजूंना वितरीत करण्यात येते. त्यातील दोन ते साडेतीन हजार कोटी रुपयांची धान्य गळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

केंद्र सरकारच्या अन्नधान्य महामंडळातून जिल्हास्तरावर आणि त्यानंतर तालुका स्तरावरील गोदामांत धान्य पाठविले जाते. या वितरणामध्येच गळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. धान्य गोदामांतून वाहतूकदार, ठेकेदार, व्यापारी या वितरण साखळीत नेमकी किती गळती होते याचा अभ्यास करण्यात येत आहे, तसेच राज्यातील ५२ हजार रेशन दुकानांमध्ये लवकरच बायोमॅट्रिक्स लावण्यात येणार असून या कामांसाठी राज्य सरकारकडून १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे, असे पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केले.

गळती रोखण्यासाठीच्या योजना

धान्य वितरणातील या 'गळती'ला आळा घालण्यासाठी कायद्यातील तरतुदी अधिक कडक करणार

अधिक कडक तपासण्या, भरारी पथकांची स्थापना आणि धान्य वाहतुकीच्या ट्रकवरील नियमनासाठी जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

धान्य वाटपासाठी ग्रुप 'एसएमएस' यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

याशिवाय, घरपोच धान्य योजना, लाभार्थ्यांच्या यादीचे चावडी वाचन, शिधापत्रिकांचे संगणकीकरण, गोदामांमध्ये सीसीटीव्ही व बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वाटप करण्यात येणार आहे.

राज्यातील ५२ हजार रेशन दुकानांमध्ये लवकरच बायोमॅट्रिक्स लावण्यात येणार असून या कामांसाठी राज्य सरकारकडून १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

रेशन धान्य वितरणातील गळती रोखण्यासाठी विविध उपायांद्वारे त्यावर कडक नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. जीपीएस यंत्रणा, तपासण्या, एसएमएस यंत्रणा, बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वाटप असे विविध उपाय गळती रोखण्यासाठी आखले जाणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून शंभर कोटींची तरतूद केली जाणार आहे.

- गिरीश बापट, नागरी पुरवठा मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आईनेच फेकले पोटच्या चिमुरडीला

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

मूल नको असतानाही झालेली दोन महिन्यांची मुलगी पती घेऊन जात नसल्याच्या रागातून प्रत्यक्ष जन्मदात्या आईनेच पोटच्या मुलीला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकल्याचा धक्कादायक प्रकार निगडीत सोमवारी घडला. उपचारादरम्यान या चिमुरडीचा मृत्यू झाला असून, या प्रकरणी निगडी पोलिसांनी आईवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मैत्री विजय पाटेकर असे या दोन महिन्यांच्या चिमुरडीचे नाव आहे. तिच्या आईचे नाव सुषमा विजय पाटेकर (वय २३, रा. ओटा स्कीम) असे आहे. या प्रकरणी मुलीचे वडील विजय पाटेकर यांनी फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटेकर दाम्पत्याचे २०१३ साली लग्न झाले. त्यानंतर सुषमा आणि विजय यांच्यमध्ये मूल होण्यावरून वाद होऊ लागले होते. सुषमाला मूल नको होते. त्यामुळे तिने दिवस गेल्यावर गर्भपाताचाही प्रयत्न केला होता. मात्र, विजय यांनी तिला गर्भपात करू देण्यास विरोध केला होता. मुलगी झाल्यावरही सुषमाला तिचा सांभाळ करायचा नव्हता. त्यामुळे ती विजय यांना 'मुलगी घेऊन जा, नाही तर मी तिला मारून टाकेन,' अशी धमकी देत होती. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ओटा स्कीमच्या इमारतीखाली मुलगी पडल्याचे परिसरातील लोकांना आढळून आले होते. ही मुलगी पाटेकर दाम्पत्याची असल्याचे लक्षात आल्यानंतर उपचारांसाठी तिला त्वरित यशवंतराव चव्हाण स्मृती हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी घातपात झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता.

मात्र, मुलीच्या नातेवाइकांनी विजय आणि सुषमा यांच्यातील वादांमुळे आणि सुरुवातीपासूनच सुषमाला मूल नको असल्याच्या हट्टातून सुषमानेच मुलीला फेकले असावे, अशी शक्यता पोलिसांना बोलून दाखविली. पोलिस निरीक्षक (गुन्हे) आर. बी. उंडे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशनमाफियांवर मोक्का

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रेशनधान्याचा काळाबाजार करणाऱ्या नाशिकमधील पाच व्यापाऱ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेशनच्या धान्याचा अपहार करणाऱ्यांवर प्रथमच या कायद्यान्वये कारवाई करण्याचे धाडस दाखविण्यात आले असून, या रेशनमाफियांना 'सहकार्य' करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही अशी कडक कारवाई करण्याचा सरकारचा विचार आहे.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. धान्याचा संघटितपणे काळाबाजार केल्याप्रकरणी संपत घोरपडे, विश्वास घोरपडे, अरुण घोरपडे, मगन पवार व रमेश पाटणकर यांच्यावर नाशिकच्या इगतपुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धान्याच्या अपहाराचा तपास जिल्हा पोलिस उपअधीक्षकांमार्फत केला जाणार आहे; तसेच सहा महिन्यांत हा तपास पूर्ण करण्यात येणार असल्याचेही बापट यांनी स्पष्ट केले.

नाशिकमधील धान्य गैरव्यवहारप्रकरणी १७ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची घोषणा विधानसभेत करण्यात आली होती. त्यानंतर तीन आठवड्यांत निलंबन करण्यात आले. अन्नधान्य महामंडळाच्या गोदामातून धान्य वितरीत केल्यानंतर तालुका पातळीवरील गोदामांत पोहोचेपर्यंत धान्याची मोठी गळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. धान्याच्या अपहाराबद्दल जीवनावश्यक वस्तू कायद्याप्रमाणे कारवाई केली जाते. अन्न व औषध प्रशासनामार्फतही कारवाई होते. अशा गैरप्रकारांना घालण्यासाठी कायद्यात अनेक कलमे आहेत; पण प्रत्यक्षात कारवाई होत नाही. महाराष्ट्र झोपडपट्टी कायद्यान्वयेही अशा प्रकारांमध्ये कारवाई करता येऊ शकते. 'त्याचा अभ्यास करून तसेच पोलिस व विधी विभागाच्या चर्चेअंती कायदा करण्याचा विचार सुरू आहे,' असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.

सुमारे आठ कोटींचा गैरव्यवहार

नाशिकमधील सुरगाणा येथील धान्य गोदामात ३१ हजार क्विंटल धान्याचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. हा अपहार तब्बल ७ कोटी ८४ लाख रुपयांचा आहे. याशिवाय, सिन्नर तालुक्यातील शासकीय गोदामातून पन्नास किलो धान्याच्या २८० गोण्या एका राइस मिलमध्ये नेल्याचेही आढळले आहे. नाशिकमध्ये रेशनमाफियांनी केलेला काळाबाजार व सुरगाणा आणि सिन्नरमधील धान्य अपहारामध्ये समान धागा आढळला आहे. त्यामुळे संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून धान्य अपहार होत असल्याने या पाच व्यापारी, वाहतूकदारांवर 'मोक्का' कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आल्याचे गिरीश बापट यांनी सांगितले.

काम बंद केल्यास कारवाई

नाशिकमधील धान्य घोटाळ्याप्रकरणी सात तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ती मागे घेण्यासाठी तहसीलदार संघटनेने काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. 'तहसीलदारांनी काम बंद केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल,' असे गिरीश बापट यांनी स्पष्ट केले. 'पुरवठा खात्याचे काम बंद झालेले नाही. धान्य वितरणाचे काम शंभर टक्के होणारच आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलनाच्या मार्गाने जाऊ नये, ते त्यांच्या हिताचे नाही,' असाही इशारा त्यांनी दिला आहे.

साडेतीन हजार कोटींची 'गळती'

रेशनच्या धान्य वितरणामध्ये दोन ते साडेतीन हजार कोटी रुपयांची 'गळती' होत असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठी मंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी दिली. ही 'गळती' रोखण्यासाठी काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यापासून बायोमेट्रिक वितरण व्यवस्थेपर्यंत राज्य सरकार पावले उचलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नाशिकमधील रेशनधान्य अपहार प्रकरणी प्रथमच 'मोक्का' कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर पुरवठा मंत्री बापट यांनी रेशन व्यवस्थेतील त्रुटींवर भाष्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तणावांमुळेच वाढतेय धूम्रपान

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

धकाधकीच्या जीवनात वाढता ताणतणाव दूर करण्यासाठी पुण्यातील १५ टक्के पुरुषांनी धूम्रपानाचा 'उपाय' अंगीकारला आहे. तणावामुळेच त्यांना सिगारेट ओढण्याची सवय लागल्याने हृदयविकाराचा धोका वाढल्याचेही निरीक्षण संशोधनातून पुढे आले आहे.

तरुण व मध्यम वयोगटातील १२ ते १५ टक्के पुरुषांच्या दिवसांची सुरुवात सिगारेटच्या सेवनाने होते. १५ टक्क्यांपेक्षा अधिक लोक तणावामुळे तंबाखूचे सेवन करतात. २० ते २२ वयोगटातील कॉलेजला जाणाऱ्या तरुणींनादेखील सिगारेट ओढण्याची सवय लागली आहे. विविध प्रकारे तंबाखूचे सेवन करणाऱ्या ३५ ते ४५ वर्षे वयोगटातील सुमारे २० टक्के पुरुष व १४ टक्के स्त्रियांना हृदयविकार होण्याचा धोका वाढला आहे, असे निरीक्षण इंडस हेल्थ प्लस संस्थेने केलेल्या पेशंटच्या तपासणीत नोंदविण्यात आले आहे.

तंबाखूच्या सेवनामुळे पुण्यातील २७ टक्के नागरिकांना तोंडाचा कॅन्सर होण्याचा धोका आहे. पाच टक्के पुरुष व तीन टक्के स्त्रिया डोके व मानेच्या कॅन्सरपासून पीडित आहेत. १५ ते २० टक्के पुरुष व ८ ते १० टक्के स्त्रियांना तंबाखूच्या सेवनामुळे वयाच्या सुरुवातीच्या टप्प्यात कॅन्सर होण्याचा धोका; तसेच फुफ्फुसाचे कार्य १० वर्षांनी कमी होण्याचा धोका आहे. निकोटिनच्या धूम्रपानाची सवय असलेल्या २५ टक्के स्त्रियांमध्ये वयाच्या ३० वर्षांनंतर हाडांचा ऑस्टिओपोरेसिस विकसित होतो, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

तंबाखूचा बेकायदा व्यापार बंद करा

तंबाखूच्या सेवनापासून दूर राहण्यासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीसह संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. तरुणांना तंबाखू सेवनातील धोके समजावून सांगण्यासाठी समुपदेशन करणे, तंबाखूजन्य उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात कर आकारणे, सार्वजनिक ठिकाणी उत्पादनांचे सेवन करण्याबाबत कडक नियम, व्यसनमुक्ती केंद्रे आणि प्रभावी कायद्याची अंलबजावणी करावी, अशा सूचना कर्करोगतज्ज्ञ डॉ. तुषार पाटील यांनी जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्या निमित्ताने केल्या आहेत. तंबाखूचे सेवन करायला सुरुवात केल्यानंतर आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम दिसायला खूप कालावधी जातो. विसाव्या दशकात १०० दशलक्ष जणांचा मृत्यू तंबाखूमुळे झाला. हाच प्रवाह सुरू राहिला, तर २१ व्या शतकात एक अब्ज मृत्यू यामुळे होतील, अशी भीती डॉ. विनोद गोरे यांनी व्यक्त केली.

तंबाखूमुळे वाढतोय कॅन्सर

शहरातील २७ टक्के नागरिकांना तोंडाच्या कॅन्सरचा धोका.

पाच टक्के पुरुष व तीन टक्के स्त्रियांत डोके व मानेचा कॅन्सर.

तंबाखू सेवनामुळे वयाच्या सुरुवातीच्या टप्प्यात १५ ते २० टक्के पुरुष; तर ८ ते १० टक्के स्त्रियांना कॅन्सर होण्याचा धोका.

२० टक्के पुरुष व १४ टक्के स्त्रियांना हृदयविकार होण्याचा धोका.

तंबाखू व दारूचे सेवन करणाऱ्या व्यक्तींना तोंडाच्या कॅन्सरचा धोका आहे. कोणत्याही स्वरूपात तंबाखूचे सेवन आरोग्यास घातक आहे म्हणून कॅन्सरला रोखण्यासाठी तंबाखूविरोधी जनजागृती मोहीम घेण्याची गरज आहे. ही मोहीम अधिक व्यापक होण्याची गरज निर्माण झाली आहे.

- अमोल नाईकवडी, इंडस हेल्थ प्लस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images