Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कचराकोंडी सुटणार कधी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी स्वतः हातात झाडू घेऊन आणि कचरा गोळा करण्याची मोहिम सुरू करून वर्ष झाले असले तरी शहरातील कचराकोंडी सुटण्याचे चिन्ह नाही. रविवारी 'ब' क्षेत्रीय कार्यालय, आरोग्य विभागाच्या वतीने थेरगांव येथील डांगे चौक ते १६ नंबर बसथांबा, काळेवाडीफाटा, डांगे चौक ते भूमकर चौक व भूमकरचौक ते वाकड जकात नाका पुणे-मुंबई बायपास रस्त्याच्या दोन्ही बाजूने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मात्र, शहरातील कचरा कोंडी काही सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे.

रविवारी झालेल्या स्वच्छता मोहिमेत विविध स्वयंसेवी संस्था व कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. या वेळी नागरिकांनी कॅरिबॅगचा वापर करू नये व इतरत्र कचरा टाकू नये, परिसर स्वच्छ व सुंदर ठेवावा याबाबत जनजागृती करण्यात आली. नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, सहायक आयुक्त दीनानाथ दंडवते, सुभाष माछरे, पिंपरी-चिंचवड तसेच पिंपरी-चिंचवड सिटिझन फोरम या संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नालेसफाई कागदावरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड शहरातील ६० ते ७० टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. शहरात निम्याहून अधिक नाल्यांमधील राडारोडा तसाच असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी नाल्यांच्या साफसफाईला अद्याप सुरुवातच झाली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाचा नालेसफाईचा दावा केवळ कागदोपत्री असल्याचे स्पष्ट होत आहे.

महापालिकेतर्फे सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी अ, ब, क, ड, इ आणि फ या सहा क्षेत्रीय कार्यालयामार्फत स्वतंत्र नालेसफाईचे कामकाज सुरू आहे. मात्र, नाल्याची सफाई न झाल्यामुळे या नाल्यातील पाणी नागरिकांच्या घरात शिरते. त्याची प्रचितीही दर वर्षी शहरात अनेक ठिकाणी येते. ही परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने वेळीच नालेसफाई पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केल्या होत्या. तसेच महापौर व आयुक्तांनीही संबधित विभागाला ३१ मेअखेर नालेसफाईसाठी तंबी दिली होती.

शहरात सहा प्रभागांमध्ये एकूण २०२ नाले असून १ मेपासून त्यांचे सफाईचे काम आरोग्य विभागामार्फत हाती घेण्यात आले आहे. त्यातील १२७ नाल्यांची सफाई महापालिका आरोग्य विभाग, तर उर्वरित ६६ नाल्यांची ठेकेदारांमार्फत सफाई सुरू आहे. शहरातील जवळपास ६० ते ७० टक्के नालेसफाई पूर्ण झाली असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेला आहे. मात्र, शहरातील विविध भागातील नाल्यांची पाहणी करता अजूनही काही नाल्यांची सफाई सुरूच झाली नसल्याचे आढळले.

नालेसफाईच्या कामासाठी ठेकेदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्यांच्याकडील नालेसफाईचे काम धीम्या गतीने सुरू आहे. जून महिना आला असून, शहरात कधीही पाऊस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाही काही ठिकाणी नागरिकांच्या घरात दूषित पाणी शिरणार हे नक्की आहे. त्यामुळे लवकरात लवकर नालेसफाई पूर्ण करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली ?

महापौर शकुंतला धराडे आणि आयुक्त राजीव जाधव यांनी नालेसफाई वेळेत पूर्ण करा असे स्पष्ट आदेश संबंधित विभागाल दिले होते. तसेच त्याबाबत मोठागाजा करून ३१ मे पूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. वास्तविक शहरातील नाल्यांची स्थिती पाहता आयुक्तांचा प्रशासनावरील पकड ढिली झाली की त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली अशी चर्चा रंगू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुर्यात सदा रक्तदानम्

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कन्यादान आणि भोजनदान हे विवाह सोहळ्यातले श्रेष्ठ दान मानले जाते. या जोडीला रक्तदान या सर्वश्रेष्ठ दानाची जोड देत पुण्यातील नांदेड येथील ढगे कुटुंबीयांनी एक वेगळा आदर्श घालून दिला. बुधवारी संध्याकाळी छत्रपती राजाराम पुलाजवळील सूर्यनंदा लॉन्स इथे रंगलेल्या या विवाहसोहळ्यात 'आहेर नको पण रक्तदान करा' या वधूपक्षाच्या आवाहनाला वरपक्षासह वऱ्हाडी मंडळींनी प्रतिसाद देत रक्तदानाचे कर्तव्य बजावले.

महागडे पोशाख, दागदागिने, जेवणावळी, डोळ्यांत भरणारा रूखवत आणि भपकेबाजपणा ही आजच्या लग्नसमारंभाची वैशिष्ट्ये, पण लग्नात श्रीमंतीच्या प्रदर्शनाला फाटा देत कन्यादान आणि भोजनदानासह सर्वश्रेष्ठ असे रक्तदान शिबिर ठेवत एक वेगळा आदर्श ढगे आणि जिरंगे कुटुंबियांनी घालून दिला. या सामाजिक जाणिवेला वऱ्हाडी मंडळींचा भरभरून प्रतिसाद मिळाला. वधू अनुराधा ढगे आणि वर स्वप्नील जिरंगे यांच्यावर शुभेच्छांसह कौतुकाचाही वर्षाव झाला. लेकीच्या लग्नात एक सामाजिक कर्तव्य बजावल्याचे समाधान ढगे कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

विवाहसोहळ्यातील विविध कार्यांची लगबग सुरू असतानाच एकीकडे रक्तदानाची तयारीही सुरू होती. मंडपातच एका बाजूला त्यासाठीची व्यवस्था परिवर्तन मित्र परिवार आणि मोरे वेल्फेअर ट्रस्ट यांच्यातर्फे करण्यात आली होती. वधूचे बंधू किशोर ढगे यांच्यासह सहकारी विठ्ठल ताम्हण, कालिदास मोरे आणि आनंद रोडे यांनी त्याची व्यवस्था पाहिली.

रक्तदान शिबिरामुळे खऱ्या अर्थाने या विवाहसोहळ्याला शोभा आली. लग्नात श्रीमंतीचे प्रदर्शन मांडण्यापेक्षा सामाजिक जाणीवेला मोलाचे स्थान द्यावे ही संकल्पना होती. वरपक्षाकडूनही त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. शंभरहून अधिक व्यक्तींना या सोहळ्यात रक्तदान केले, अशी माहिती परिवर्तनचे अध्यक्ष अभिजित घुले-पाटील यांनी दिली. संकलित झालेले रक्त जनकल्याण रक्तपेढीकडे सुपूर्द करण्यात आले.

बँड आणि फटाके वाजलेच नाही...

विवाहसोहळ्यात बँड आणि फटाके याचा खर्चही टाळण्यात आला. मुलाकडची मंडळी कराड (जि. सातारा) येथील आहेत. त्यांनीही विवाहसोहळ्यात सामाजिक जाणीवेला अधिक महत्त्व दिल्याने हा सोहळा आमच्यासाठी समाधानाचा ठरला. विवाहसोहळ्याचे निमंत्रण व्हॉट्सअॅपवरून पाठवताना रक्तदानाची माहिती दिली होती. 'आहेर नको पण रक्तदान करा' या आवाहनाला वऱ्हाडी मंडळींचा प्रतिसाद मिळाला, असे किशोर ढगे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारळे-घायवळ टोळीत चकमक

$
0
0

पुणेः मारणे आणि घायवळ टोळीमधील संघर्ष पुन्हा एकदा शिगेला पेटला आहे. घायवळ टोळीचा पंकज फाटकचा खून झाल्याच्या घटनेला शनिवारी रात्री दोन तास होत नाही तेच उजवी भुसारी कॉलनीच्या सिद्धार्थ अपार्टमेंटसमोरील कट्ट्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेत एक जण गंभीर जखमी आहे.

कर्वेनगर येथे शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास पंकज फाटक याला बेदम मारहाण करत त्याचा खून करण्यात आला होता. या घटनेची वार्ता पसरताच घायवळ टोळीतील सदस्यांनी मारणे टोळीशी संबंधितांना शोधण्यास सुरुवात केली. त्याचवेळी सागर संजय ढमाले (वय २२, रा. पौड) हा मित्र सुनील दाभाडे (वय ३६, रा. कोथरूड) याच्याबरोबर उजवी भुसारी कॉलनीतील एका कट्ट्यावर बसला होता. या वेळी आलेल्या चौघा आरोपींपैकी एकाने सागरच्या दिशेने गोळीबार केला. सागरच्या छातीच्या डाव्या बाजुला गोळी लागल्याने तो जखमी झाला.

दरम्यान, घायवळ टोळीचा पंकज फाटक याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली तर चौघांना ताब्यात घेतले आहे. निलेश विष्णू पळसकर (वय २१, रा. कोथरूड) आणि विजय नामदेव मेहतर (वय २१, रा. उत्तमनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ई-सिगारेटच्या विक्रेत्यांना नोटिसा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात निकोटिनयुक्त असलेल्या ई-सिगारेट्सची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून ते आरोग्यास घातक आहे. त्यामुळेच राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ई-सिगारेटच्या २३ आयातदार तसेच विक्रेत्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.

पारंपरिक सिगारटेला पर्याय म्हणून ई-सिगारेटचा वापर करण्यात येतो. ई-सिगारेटच्या वापरामुळे तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात येऊन त्यांची पिढी वाया जाण्याची भीती आहे. यामुळेच एफडीएने ई-सिगारेट्सचा व्यवसाय करणाऱ्या राज्यातील आयातदार, विक्रेत्यांवर औषधे व सौंदर्य प्रसाधने नियम १९४० अन्वये कारवाई का करण्यात येऊ नये, अशा नोटिसा बजावल्या आहेत, अशी माहिती 'एफडीए'चे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली.

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्याच्या नियम १२२ (ई) नुसार प्रत्येक औषधाचे देशात उत्पादन व विक्री करण्यासाठी औषध नियंत्रकांच्या मान्यतेची गरज असते. निकोटिनयुक्त ई - सिगारेटसच्या निर्मितीला केंद्र सरकारच्या औषध नियंत्रकांनी मान्यता दिली नाही. औषध नियंत्रकांची मान्यता न घेता ई - सिगारेट भारतात आयात करून त्याची विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळेच कायद्याचे नियम १२२ (ई) व कलम १८ (ब), १८ (क) या नियमांचे उल्लंघन होत असल्याने राज्यातील ई-सिगारेट्सच्या विक्री व वितरणावर सामाजिक आरोग्याचा विचार करून प्रतिबंध करण्यात आली आहे, असेही डॉ. कांबळे यांनी सांगितले.

कॉलेजच्या तरुण तरुणींमध्ये सिगारेट ओढण्याचे प्रमाण वाढले आहे. सिगारेटला पर्याय असलेल्या निकोटिनयुक्त ई-सिगारेटच्या विक्रीवर कारवाईची अनेक संघटनांनी कारवाई करण्याची मागणी केली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर 'एफडीए'ने राज्यातील निकोटिनयुक्त आयातदार व विक्रेत्यांवर कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या आहेत.

- डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त एफडीए

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाळीस पानटपऱ्यांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एकाच दिवसात शहरातील विविध ठिकाणच्या गुटखा विक्री करणाऱ्या ७६ पानटपऱ्यांसह दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यात ४० ठिकाणच्या पान टपऱ्यांवर गुटखा आढळल्याने दीड लाख रुपयांचा साठा जप्त करण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केली.

अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्यासह एफडीएचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरीत गुटख्याची चोरी छुपे विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार पुणे विभागाच्या अन्न विभागाने विविध जिल्ह्यातील अन्न सुरक्षा अधिकारी, औषध निरीक्षक, ग्राहक सरंक्षण संस्थेचे सदस्य आणि पोलिस अशा चौघांच्या पथकांच्या सहाय्याने पुणे व पिंपरीत तपासणी मोहीम हाती घेतली.

'पुणे, पिंपरी शहरात चोरी छुपे पद्धतीने गुटखा विक्री सुरु असल्याची वारंवार माहिती मिळत होती. त्या माहितीच्या आधारे सुमारे १०० अधिकाऱ्यांच्या मदतीने ७६ ठिकाणच्या पान टपरी, दुकानांची तपासणी करण्यात आली. विश्रांतवाडी, खडकीबाजार, फर्ग्युसन रस्ता, शिवाजीनगर, स्वारगेट, पुणे स्टेशन, ससून हॉस्पिटल परिसर, कर्वेनगर, हडपसर, औंध, कात्रज भागातील दुकाने पान स्टॉलची तपासणी करण्यात आली. तपासणी केलेल्या ७६ पैकी ४० ठिकाणच्या पानटपरी, दुकानांमध्ये गुटख्याचा साठा आढळून आला. दिवसभरातील कारवाईत एक लाख ५१ हजार ९३० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला,' अशी माहिती 'एफडीए'चे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्या वेळी सहायक आय़ुक्त दिलीप संगत, शिवराम कोडगिरे आदी उपस्थित होते.

वर्षभरात चार कोटींचा गुटखा जप्त

गेल्या वर्षी २० जुलैपासून गुटखा विक्री प्रतिबंधित करण्यात आला होता. तेव्हापासून पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्या छाप्यामधून सुमारे तीन कोटी ९७ लाख ७२ हजार ३४० रुपयांचा गुटख्याचा साठा जप्तीची कारवाई करण्यात आली. प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची विक्रीची माहिती असल्यास त्याची माहिती ०२० - २४४३०११३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहआयुक्त केकरे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘केवायसी’च्या बहाण्याने दीड लाखांची फसवणूक

$
0
0

पुणे : 'केवायसी'च्या बहाण्याने फोन करत 'एटीएम' कार्डची गोपनीय माहिती विचारून दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फोनवर अथवा प्रत्यक्षात कोणत्याही व्यक्तीला बँक खात्याची गोपनीय माहिती देऊ नका, असे आवाहन वारंवार पोलिसांकडून करण्यात येत आहे. अनुपमा शेट्टी (वय ३९, रा. कोंढवा) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध फसवणूक तसेच आयटी अॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे. शेट्टी यांना १९ मे रोजी एक फोन आला होता. फोन करणाऱ्याने आपण खासगी कंपनीतून बोलत असल्याचा बहाणा केला. बँक अकाउंट आणि एटीएम कार्ड ब्लॉक केले आहे. 'केवायसी'साठी गोपनीय माहितीची आवश्यकता असल्याचे सांगत कार्ड क्रमांक, सीव्हीसी क्रमांक विचारण्यात आला. त्यानंतर त्यांच्या खात्यातून एक लाख ४२ हजार रुपयांचा ऑनलाइन व्यवहार झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुथाळणे घाटात पिकअप उलटून ३२ जण जखमी

$
0
0

जुन्नर : अवघड वळणे असलेल्या मुथाळणे घाटात, मजुरांना घेऊन जाणारी पिकअप उलटून ३२ जण जखमी झाले. त्यातील सहा जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर आळेफाटा येथे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ओतूर पोलिसांनी याबाबत माहिती दिली. सर्व जखमी मजुर मांडवी, मुथाळणे, कोपरे, जांभुळशी या भागातील आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीकअप जीप मजुरांना घेऊन जात होती. ती एस आकाराच्या वळणावर उलटल्याने ३२ जण जखमी झाले. सर्व जखमींना ओतूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉ. श्रीहरी सारक्ते, राहुल तांबे यांनी जखमींवर उपचार केले. त्यातील १२ जण अजूनही प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहेत. गंभीर जखमी असलेल्यांवर आळेफाटा येथे उपचार सुरू आहेत. पोलिसांनी पीकअप चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘व्हिडिओ अॅनॅलिसिस’च्या माध्यमातून उमेदवार निवड

$
0
0

सिद्धार्थ केळकर, पुणे

'कॅम्पस प्लेसमेंट' आता केवळ गटचर्चा, वैयक्तिक मुलाखतींपुरते मर्यादित राहिले नसून 'व्हिडिओ अॅनॅलिसिस'च्या माध्यमातून विद्यार्थ्यांची ग्रहणक्षमता, ज्ञान-कौशल्य जोखण्यात येत आहे.

कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून आवश्यक कौशल्ये असलेले उमेदवार भरती केले जातात. ही कौशल्ये तपासण्यासाठी कंपन्या वेगवेगळे प्रयोग करतात. त्यामध्ये सॉफ्टवेअर कंपन्यांनी या 'व्हिडिओ अॅनॅलिसिस'च्या मार्गाचा अवलंब केला आहे. त्या अंतर्गत विद्यार्थ्याला एक व्हिडिओ दाखवून त्यावरील त्याची निरीक्षणे, मते यांच्या जोरावर त्याचे मूल्यांकन केले जाते. एखाद्या गोष्ट, घटनेचे निरीक्षण करून त्याचे योग्य पद्धतीने विश्लेषण करण्याची क्षमता त्याद्वारे तपासली जाते. एरवी कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये ही पद्धत वापरली जाते. तीच आता कॅम्पसवरही प्रभावी ठरत आहे.

कंपन्यांकडील प्रचंड माहितीसाठ्याचे विश्लेषण करण्यासाठीच्या नोकरीकरिता उमेदवार शोधताना ही पद्धत राबवली आहे. 'बिझनेस अॅनलिटिक्सला कंपन्यांचा माहितीसाठा, स्टॅटिस्टिक्स यांचे विश्लेषण करावे लागते. ते नेमकेपणाने करणारे उमेदवार शोधणे ही सध्या कंपन्यांची गरज आहे. त्यासाठी 'व्हिडिओ अॅनॅलिसिस' हे प्रभावी तंत्र म्हणून समोर आले आहे. विशेषतः आयटी, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि एमबीए (आयटी) या शाखांतील विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी काही मोजक्या कंपन्या 'व्हिडिओ अॅनलिसिस'चे तंत्र वापरत आहेत,' अशी माहिती म्योबिओसूत्र कन्सल्टिंग कंपनीचे संचालक आणि सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षक डॉ. भूषण केळकर यांनी दिली.

'व्हिडिओ अॅनॅलिसिसमध्ये एक व्हिडिओ दाखवला जाऊन त्यावर विद्यार्थ्यांना त्यांचे विचार मांडायला सांगितले जाते. त्या व्हिडिओत जे दाखवले आहे, त्याचे अन्वयार्थ शोधता येतात का, जे दिसते आहे, त्या पलीकडे जाऊन त्याचे विश्लेषण करता येते का, आदी कौशल्ये यात तपासली जातात. त्यामुळे व्हिडिओ नीट पाहणे, त्यात काय बोलले किंवा दाखवले जाते, याचे नीट निरीक्षण करणे गरजेचे असते. विद्यार्थ्याची लक्षपूर्वक ऐकण्याची क्षमता आणि ते नेमकेपणाने मांडण्याचे कौशल्यही याद्वारे जोखले जाते,' असे त्यांनी नमूद केले.

'आमच्या कॅम्पसवर येणारी एक कंपनी गेली तीन-चार वर्षे कॅम्पस प्लेसमेंटसाठी 'व्हिडिओ अॅनॅलिसिस'चा वापर करीत आहे. उमेदवारांची चौकटीबाहेर विचार करण्याची क्षमता जोखण्यासाठी याचा उपयोग होतो. कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सध्या हा नवा ट्रेंड पाहायला मिळतो आहे,' असे कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग फॉर विमेनच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा. रोहिणी मुळ्ये यांनी सांगितले.

'सर्जनशीलताही जोखतात'

'कॅम्पस प्लेसमेंटच्या दरम्यान मी एका कंपनीसाठी या 'व्हिडिओ अॅनॅलिसिस' परीक्षेला सामोरी गेले. त्यामध्ये आम्हाला पाच मिनिटांची एक व्हिडिओ क्लिप दाखविण्यात आली. त्यावर आम्हाला आमच्या शब्दांत लिहायला सांगण्यात आले. त्यासाठी पाचच मिनिटे वेळ देण्यात आला होता. या लिखाणाचे परीक्षण होऊन, त्यावर काही विद्यार्थिनी पुढच्या फेरीसाठी पात्र ठरल्या. व्हिडिओमध्ये तुम्हाला जे प्रत्यक्ष दिसते, त्यापेक्षा तुम्ही आणखी वेगळा, व्यापक विचार काय करू शकता, त्याची किती सर्जनशीलपणे मांडणी करू शकता, याची ही तपासणी असते, असे मला वाटते,' असा अनुभव कमिन्स कॉलेजच्या तान्या थोरानी या विद्यार्थिनीने सांगितला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्षनेता बदलणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

राष्ट्रवादी काँग्रेसने नवीन शहराध्यक्षांची निवड केल्यानंतर आता महापालिकेतही पक्षनेता बदलाची चर्चा जोर धरू लागली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत गाववाला आणि बाहेरचा हा पारंपारिक प्रचाराचा मुद्दा पुन्हा एकदा गाजण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. त्यामुळेच माजी महापौर संजोग वाघेरे यांच्या गळ्यात पक्षाध्यक्षाची माळ घालण्यात आल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे माजी महापौर ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांच्या सांगण्यावरूनच वाघेरे यांना पक्षाध्यक्षाची संधी दिल्याचे जाणकारांचे मत आहे.

महापालिकेतील काम मार्गी लावण्यासाठी शहराध्यक्षाच्या मर्जीतली व्यक्तीच पक्षनेतेपदी निवडण्याची गरज असते. त्यामुळे पक्षाचे नवीन शहराध्यक्ष संजोग वाघेरे हे पक्षनेते बदलासाठी आग्रही राहून कोणाचे नाव सुचवितात, याकडे लक्ष लागले आहे. मागील दोन्ही निवडणुकांमध्ये महापालिकेतील सत्ताधारी 'राष्ट्रवादी'ला नागरिकांनी नाकारले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर झालेल्या चिंतन बैठकीत प्रत्येकाने उट्टे काढले. आपल्यातीलच लोकांनी केलेल्या विरोधी कामामुळे ही वेळ आल्याचे सूर आळवण्यात आला. 'राष्ट्रवादी'ने २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. 'राष्ट्रवादी'ने नवीन शहराध्यक्षांची निवड करून निवडणुकीतील सेनापती निश्चित केला आहे.

लक्ष अजित पवारांच्या भूमिकेकडे

चिंतन बैठकीत शहराध्यक्ष आणि पक्षनेत्यांच्या नावाने अनेकांनी खडे फोडले. दादांसमोरच झालेल्या या सर्व प्रकाराआधी पासूनच अनेक नगरसेवकांनी दादांकडे स्थानिक नेतृत्वाची तक्रार केली होती. आता शहराध्यक्ष बदलले पण पक्षनेते बदलण्याची कार्यकर्ते मागणी अजित पवार मान्य करतात की आहे त्यांना कायम ठेवतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१० दिवसांत घटले १५ किलो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आठव्या वर्षात ७८ किलो वजन असलेल्या शालेय विद्यार्थिनीला सातत्याने जंक फूड खाण्याची सवय होती. वाढत्या वजनामुळे हैराण झालेल्या मुलीवर बॅरिअॅट्रिक सर्जरी करण्यात आली. त्यामुळे सर्जरीनंतर अवघ्या दहा दिवसात तिचे १५ किलो वजन घटले.

फिजा (नाव बदलले आहे) ही मूळची मुंबईची. आठ वर्षांची शाळेत शिकणारी मुलगी. वयाच्या चौथ्या वर्षीच ती ३६ किलो वजनाची होती. तिच्या वडिलांचा कबाब-पाव भुर्जीच्या विक्रीचा व्यवसाय आहे. फिजासह त्यांना दोन मुली आहेत. लहान वयात वाढत्या वजनामुळे फिजाला सातत्याने भूक लागायची. सतत तिला काहीतरी खायला हवे असायचे. खायला मिळाले नाही ती दंगा करायची. पुढच्या तीन- चार वर्षात फिजाचे आणखी वजन वाढले.

दररोज तिच्या खाण्यावर शंभर रुपये खर्च व्हायचा. जंक फूड, आईस्क्रिम, चिप्स, कुरकुरे याच्याशिवाय मटणाचा तिच्या जेवणात समावेश असायचा. फिजाचे वाढते वजन आणि वाढती भूक पाहता तिचे आई वडिल हैराण झाले. मुंबईतील एका एन्डोक्रोनॉलॉजिस्टकडे त्यांनी उपचार सुरू केले. मात्र तिचे वजन वाढण्याच्या कारणाचे त्यांना निदान झाले. त्यामुळे उपचाराचाही फारसा फायदा होऊ शकला नाही. वजन वाढल्याने विविध ठिकाणी घड्या पडून शरीरावर काळे डाग दिसू लागले होते. त्यामुळे पालक चिंताग्रस्त झाले होते. तिचे शालेय जीवन, सामाजिक जीवनावर तिच्या वजन वाढीचा परिणाम होऊ लागला.

मुंबईच्या फिजाचे आठव्या वर्षी ७८ किलो वजन होते. वजन वाढल्याची समस्या घेऊन ती आमच्याकडे आली. तिच्यावर बॅरिअॅट्रीक सर्जरी करण्याचा आम्ही निर्णय घेतला. सर्जरी झाल्यानंतर काही दिवसांत तिचे वजन हळू हळू कमी होण्यास मदत झाली. अखेर पंधरा दिवसांत तिचे दहा किलो वजन सर्जरीमुळे घटले. आता तिची प्रकृती छान आहे. सामान्य व्यक्तीसारखे तिचे जेवण सुरू झाले आहे.

डॉ. शशांक शहा, बॅरिअॅट्रिक सर्जन, लेपेरो ओबेसो सेंटर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधार कार्डसाठी पैसे उकळणे सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कारवाई करण्याचे, परवाने रद्द करण्याचे इशारे दिल्यानंतरही शहर आणि परिसरात आधार कार्डांच्या नोंदणीसाठी पैसे उकळण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन आता काय पावले उचलणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

वेगवेगळ्या सरकारी योजनांचे लाभ मिळविण्यासाठी आणि ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्डाला दिवसेंदिवस अधिकाधिक महत्त्व येत आहे. शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात सुमारे ८० टक्के नागरिकांची आधार कार्डांसाठी नोंदणी झाली आहे. दुसरीकडे पंतप्रधान विमा योजना, गॅस सिलिंडरचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याची योजना (डीबीटीएल), विविध प्रकारच्या स्कॉलरशिप्स, तसेच रेशनकार्ड, मतदारयादीशी जोडणी अशा अनेक कामांसाठी आता नागरिकांसाठी आधार कार्ड आवश्यक ठरत आहे. त्यामुळे आतापर्यंत आधार कार्डांसाठी नोंदणी न केलेल्या नागरिकांची आता नोंदणीसाठी गर्दी होऊ लागली आहे. अनेक आधार नोंदणी केंद्रांमध्ये त्यामुळे नागरिकांच्या रांगा लागत आहेत.

या परिस्थितीत अनेक नागरिकांना नोंदणी केंद्रांवर हेलपाटेही घालावे लागत आहेत. त्याचा गैरफायदा घेऊन अनेक एजन्सींमधून पैसे उकळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. यापूर्वी चंदननगर, येरवडा या भागांत लवकर नोंदणी करण्यासाठी दोनशे रुपये उकळण्यात येत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यानंतर प्रशासनाने कारवाईचे हत्यार उचलले. तसेच, काही नोंदणी केंद्रांवर कर्मचाऱ्यांना नागरिक म्हणून पाठवून पैसे उकळण्याचे प्रकार उघडकीस आणले, त्यांचे परवाने रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, त्यानंतही पैशांची मागणी सुरूच आहे.

धनकवडी-आंबेगावातून तक्रारी

धनकवडी-आंबेगाव पठार व आसपासच्या परिसरात नोंदणीसाठी पैशांची मागणी करण्यात आल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. तसेच आधार कार्डांच्या नोंदणीसाठी भरून देण्यात येणारे फॉर्मही मोफत उपलब्ध असताना त्यासाठीही दहा रुपये आकारण्यात येत असल्याचेही शहराच्या विविध भागांमधून समोर आले आहे. या सर्व प्रकारांचा बंदोबस्त प्रशासन कसा करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘FY’ची प्रवेश संख्या वाढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बारावीच्या विक्रमी निकालाच्या पार्श्वभूमीवर यंदाही शहरातील प्रमुख कॉलेजांमधील प्रवेश संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कॉलेजांनी आपापल्या पातळीवरून त्यासाठीचे प्रयत्न सुरू केले असून, विद्यापीठाकडूनही या प्रस्तावांना सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

बारावीच्या परीक्षांसाठी ८०-२० पॅटर्न लागू झाल्यानंतरच्या काळातील सलग दोन वर्षे राज्याच्या एकूण निकालाने ९० टक्क्यांपलिकडे झेप घेतली. यंदाचा निकाल गेल्या वर्षीपेक्षाही एक टक्क्याने वाढला. एकीकडे विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असताना, कॉलेजांमधील प्रवेश संख्येच्या वाढीवर मात्र मर्याद येत आहेत. यंदाही कॉलेजांकडून त्या साठीचे प्रस्ताव सादर करण्याविषयीचे संकेत दिले जात आहेत.

या विषयी फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी म्हणाले, 'यंदाचा बारावीचा निकाल विचारात घेता, प्रथम वर्षाच्या प्रवेशांसाठी जागा वाढ मिळणे निश्चितच गरजेचे आहे. कॉलेजची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून मिळाणारा प्रतिसाद लक्षात घेऊन, आम्ही विद्यापीठामार्फत सरकारकडे जागावाढीचा प्रस्ताव सादर करू.'

'बीएमसीसी'चे प्राचार्य डॉ. सी. एन. रावळ यांनीही जागा वाढवून मिळण्याची गरज स्पष्ट करत, विद्यापीठाने विद्यार्थीहित विचारात घेत प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत मांडले. केवळ आर्ट्स-कॉमर्सच नाही, तर गेल्या काही वर्षांमध्ये मूलभूत विज्ञानाचे शिक्षण घेण्यासाठी बी.एस्सीकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही वाढल्याचे एस. पी. कॉलेजचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ यांनी सांगितले.

गेल्या वर्षीचा बारावीचा विक्रमी निकाल विचारात घेत विद्यापीठाने कॉलेजांना प्रवेश संख्येमध्ये वाढ करण्याची परवानगी दिली होती. यंदाही उंचावलेला निकाल लक्षात घेता, शहरातील कॉलेजांकडून असे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. असे प्रस्ताव आल्यास, त्यांचा सकारात्मक विचार करत ते मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवू.

- डॉ. व्ही. बी. गायकवाड, बीसीयूडी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सून… अभी दूर है!

$
0
0

पुणे : मान्सूनची वाटचाल मंदावलेली असतानाच, राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसतो आहे. नागपूर आणि ब्रह्मपुरीमध्ये रविवारी सर्वाधिक ४७.१ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुणे आणि परिसरात रविवारचे कमाल तापमान ३३.३ एवढेच असले, तरी नागरिकांना ढगाळ वातावणाच्या जोडीने उकाड्याने हैराण होण्याची वेळ आली.

येत्या आठवडाभरात पुणे आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची; तसेच काही ठिकाणी पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. शहरात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. विदर्भाच्या काही भागात रविवारी उष्णतेची लाट होती. उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली.

केरळमध्ये येणार ४ जूनला

नैर्ऋत्य मोसमी पावसास अनुकूल वातावरण निर्माण न झाल्याने यंदा मान्सून केरळमध्ये चार जूनला म्हणजे नेहमीपेक्षा उशिरा येणार असल्याचा अंदाज हवामानखात्याकडून वर्तविण्यात आला आहे. मान्सून ३० मे रोजी केरळ किनारपट्टीवर थडकेल, असा अंदाज यापूर्वी व्यक्त करण्यात आला होता. मात्र, अरबी समुद्रात प्रतिचक्रवाताची स्थिती निर्माण झाल्याने मान्सूनला बळ मिळालेले नाही, अशी माहिती भारतीय हवामान खात्याचे डी. एस. पै यांनी दिल्ली येथे 'पीटीआय'ला दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसस्थानकांचे ऑडिट १० पर्यंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कात्रज आणि महापालिका भवन या दोन बसस्थानकांचे सेफ्टी ऑडिट पूर्ण झाले असून, उर्वरित आठ प्रमुख बसस्थानकांचे ऑडिट १० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या ऑडिटमध्ये सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांनुसार तातडीने संबंधित बसस्थानकांवर सुधारणा केल्या जाणार आहेत.

कात्रज बसस्थानकावर पीएमपीला झालेल्या अपघातात दोन जणांचा अंत झाला होता. बसस्थानकाची चुकीची रचना या अपघाताला कारणीभूत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे पीएमपीने सर्व प्रमुख बसस्थानकांचे प्रवाशांच्या दृष्टीने सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता. हे ऑडिट पूर्ण होईपर्यंत कात्रजच्या बसस्थानकात बस उभ्या राहण्याच्या व्यवस्थेत तात्पुरते बदल केले गेले.

गेल्या महिन्याभराच्या काळात कात्रज आणि महापालिका भवन बस स्थानकाचे सेफ्टी ऑडिट पूर्ण केले गेले आहे. महापालिका बसस्थानकाच्या दोन्ही बाजूला उभ्या राहणाऱ्या बसथांब्याचेही स्वतंत्र ऑडिट करण्यात आले असून, प्रवाशांचे हित लक्षात घेऊन त्यानुसार लवकरच त्यामध्ये आवश्यक सुधारणा केल्या जाणार आहेत, अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी दिली.

सुधारणांना प्राधान्य : बकोरिया

पीएमपीच्या अन्य प्रमुख बसस्थानकांचे ऑडिट येत्या दहा दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या ऑडिटमधून समोर आलेल्या त्रुटी आणि कमतरता तातडीने दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल; तसेच प्रवासीहित लक्षात घेऊन सुधारणांना प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन ओमप्रकाश बकोरिया यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सेट’ची परीक्षा ३० ऑगस्टला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र आणि गोवा राज्यामध्ये प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक पात्रता असलेली 'सेट'ची परीक्षा येत्या ३० ऑगस्टला होणार आहे. परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, उमेदवारांना येत्या २७ जूनपर्यंत आपले ऑनलाइन अर्ज भरता येतील. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने या परीक्षेसाठीचा अधिकृत कार्यक्रम आपल्या वेबसाइटवर जाहीर केला आहे. त्या विषयीच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आलेल्या माहितीनुसार, उमेदवारांना http://setexam.unipune.ac.in या लिंकवरून सेटची सर्व माहिती आणि ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्याची अखेरची मुदत २७ जून असून, फी भरण्यासाठी ३० जून, २०१५ पर्यंत सुविधा उपलब्ध असेल. ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ४.३० या वेळेत परीक्षेचे तीन टप्पे पार पडतील.

परीक्षेचे स्वरूप

पेपर प्रश्नसंख्या एकूण गुण वेळ

१ ६० पैकी ५० १०० स. १० ते ११.१५

२ ५० पैकी ५० १०० स.११.१५ ते १२.३०

३ ७५ पैकी ७५ १५० दु. २ ते ४.३०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रमाणपत्रे नसल्यास आरक्षण नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्ज स्वीकृतीच्या वेळी विद्यार्थी आवश्यक कागदपत्रे सादर करू शकला नाही, तर त्यास संबंधित प्रवर्गाच्या आरक्षणाचा फायदा मिळणार नाही,' असे तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) स्पष्ट केले आहे.

इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया जूनमध्ये पार पडणार आहेत. या अभ्यासक्रमांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून (कॅप) सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी कागदपत्रे जमा करून ठेवावी, असे आवाहन 'डीटीई'ने केले आहे. या संदर्भात 'डीटीई'ने नुकतीच एक अधिसूचनाही जारी केली आहे. 'अर्जस्वीकृतीच्या वेळी आवश्यक कागदपत्रे नसतील, तर संबंधित प्रवर्गाच्या आरक्षणाचा फायदा मिळणार नाही आणि त्याची जबाबदारी सर्वस्वी संबंधित विद्यार्थ्यावर राहील,' असे यात नमूद करण्यात आले आहे. अधिसूचनेत नमूद केलेली आवश्यक कागदपत्रांची यादी पुढीलप्रमाणे आहे.

जात प्रमाणपत्र

मागास प्रवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार हे महाराष्ट्र राज्यातीलच असावेत. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्राधिकृत केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांनी उमेदवाराची जात महाराष्ट्र सरकारच्या मागासवर्गीयांच्या अधिकृत यादीमध्ये मोडत असल्याचे संबंधित विद्यार्थ्याच्या नावाने दिलेले जात प्रमाणपत्र (कास्ट सर्टिफिकेट) आवश्यक आहे.

नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीव्यतिरिक्त उर्वरीत सर्व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना प्रगत व उन्नत गटाचे (नॉन-क्रिमीलेयर) तत्त्व लागू केले आहे. त्यानुसार, महाराष्ट्र सरकारने प्राधिकृत केलेल्या संबंधित प्राधिकाऱ्यांनी दिलेले ३१ मार्च २०१६ पर्यंत वैधता असलेले नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र सर्व अभ्यासक्रमांसाठी लागू राहील.

जातवैधता प्रमाणपत्र

सर्व व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी मागासवर्गीय उमेदवारांना राखीव जागांवर प्रवेश घ्यायचा असल्यास महाराष्ट्र सरकारने प्राधिकृत केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांनी संबंधित विद्यार्थ्याच्या नावे दिलेले जातवैधता प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट) सादर करणे अनिवार्य आहे.

अधिवास प्रमाणपत्र

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 'टाइप ए' विद्यार्थ्यांच्या बाबतीत अधिवास प्रमाणपत्राची (डोमिसाइल सर्टिफिकेट) आवश्यकता असली, तरी ते नसल्यास संबंधित विद्यार्थ्याचा जन्म महाराष्ट्रात झाला असल्याचा दाखला (बर्थ सर्टिफिकेट) किंवा शाळा सोडल्याचा दाखला, ज्यामध्ये विद्यार्थ्याचा जन्म महाराष्ट्रात झाला असल्याची नोंद असणे आवश्यक आहे. पुणे विभागासाठी अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-२५६५६२३४ आणि ०२०-२५६७८९७३.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिकांनी रोखली वृक्षतोड

$
0
0

म. टा. प्रतनिधी, औंध

बाणेर परिसरात नाले सफाईच्या निमित्ताने अनाधिकृत बांधकामाला अभय देण्यासाठी खासगी जागेत नाले सरकवण्याचा तसेच झाडे तोडण्याचा प्रयत्न पर्यावरण प्रेमींच्या सतर्कतेमुळे उघड झाला. या संदर्भात औंध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पालिकेच्या वृक्षसंवर्धन समितीने देखील संबंधित ठेकेदाराविरोधात कारवाई केली आहे.

नाले सफाईच्या निमित्ताने राजरोजपणे 'डीपी'मधील नाले सरकवण्याचे प्रकार बाणेर येथे पाहायला मिळत आहेत. यामुळे वर्षानूवर्षे नाल्यावर बांधण्यात आलेल्या बांधकामांवर कारवाई केली जात नाही. अनेक वर्षे डीपीप्रमाणे नाले तयार करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. नाल्यातील अतिक्रमणे वारंवार प्रशासनाची डोकेदुखी होत असताना प्रशासन कारवाई करत नाही. याउलट राजरोजसपणे नाले मुजवण्याचे काम सुरू आहे. नाले सरकवण्याचा प्रकार हा कायद्याच्या कोणत्या चौकटीत बसतो, असा थेट सवालच पर्यावरण प्रेमी नागरिकांनी आयुक्तांना केला आहे.

नाल्यामध्ये असलेली तसेच ग्रीन बेल्टमध्ये असलेली झाडे सर्रासपणे उद्यान विभागाची कोणतीही परवानगी न घेता तोडण्यात आली. तसेच जेसीबीच्या सहाय्याने नाल्यामध्ये होत असलेल्या सफाईमुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नाले सफाईचे काम करणाऱ्या जेसीबी चालकाकडे पालिकेच्या कामाचे कोणतेही पत्र उपलब्ध नव्हते. तसेच पालिकेचा

कोणताही ठेकेदार अथवा अधिकारी कामाच्या ठिकाणी उपस्थित नव्हते. यामुळे नाले सरकवण्याचे प्रकार होत असून, आत्तापर्यंत डीपीपासून सात फुट नाला सरकवण्यात आला आहे, अशी तक्रार प्रकाश तापकीर यांनी केली. उद्यान विभागाने या वृक्षतोडीची दखल घेत तत्काळ पंचनामे केले. यामुळे ठेकेदार व क्षेत्रीय कार्यालयाविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

नाले सफाईच्या नावाखाली अनावश्यक होत असलेली वृक्षतोड गंभीर आहे. ओढ्यालगत ग्रीन बेल्टमधील झाडे तोडण्यापूर्वी सर्वांनाच उद्यान विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. वृक्षतोड करणारे ठेकेदार व अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवेत.

- जयदीप पडवळ, सदस्य, वृक्षसंवर्धन समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हडपसर परिसरात ५ तास कोंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

वाहतूक शाखेला न कळवता गाडीतळ येथील सासवड रोडकडे जाणाऱ्या चौकात क्रेनच्या साह्याने उड्डाणपुलाच्या लोखंडी पिलरचा साचा बसवण्याचे काम सुरू केल्यामुळे परिसरात मोठी वाहतक कोंडी झाली होती. सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनाच्यां रांगा लागल्या होत्या. सकाळ नऊ वाजल्यापासून सुरू झालेली वाहतूक कोंडी दुपारी दोन वाजेपर्यंत होती.

हडपसर पोलिस ठाणे ते सासवड रोडवरील पिलरला जोडण्यासाठी लोखंडी पिलर साचा बांधण्याचे सुरू आहे. मात्र, याबाबत वाहतूक शाखेला न कळवता काम सुरू केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. चौकात वाहतूक पोलिस नसल्याने नागरिकांनी पोलिस कंट्रोल रूमला फोन लावले. त्यानंतर वाहतूक पोलिस आले. वाहतूक शाखेला न कळवताच चौकात काम सुरू केल्याने वाहतूक पोलिस निरीक्षक रेहाना शेख व उड्डाणपूलाच्या कामाचे व्यवस्थापक वसंत पाटील यांच्यामध्ये वाद झाला. वाहतूक पोलिस निरीक्षकांच्या सूचनेनंत लोखंडी पिलरचे साचा काढण्यात आले.

उड्डाणपूल बांधणाऱ्या कंपनीकडून अगोदर कळवले असते, तर वाहतूक कोंडी झाली नसती. आजच्या कामाबाबत सकाळी अकरा वाजता आम्हाला कळवले आहे. त्यामुळे वाहतूक पोलिस पाठवण्यास उशीर झाला.

- रेहाना शेख, वाहतूक पोलिस निरीक्षक

पालखीच्या आगोदर या चौकातील काम पूर्ण करावायचे आहे. याबाबत दोन महिन्यांपूर्वी पत्र वाहतूक शाखेला दिले आहे. तसेच आज सकाळी काम करणार असल्याचा फोन ही केला होता.

- वसंत पाटील, व्यवस्थापक, उड्डाणपूल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस ठाण्यात ‘सीसीटीव्ही’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

बारामती पोलिस ठाण्याच्या इमारतीच्या प्रवेशद्वार व ठाणे अंमलदार, लॉकप, पोलिस निरीक्षक यांच्या दालनातही उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कॅमेऱ्याला थेट पोलिस निरीक्षकांच्या मोबाइलशी जोडण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले. यामुळेे ठाण्याच्या आवारातील सर्व घडामोडींची आवाजासह व्हिडिओ रेकॉर्डिंग या कॅमेराद्वारे पोलिस निरीक्षकांच्या मोबाइलमध्ये पोहोचणार आहे. यामुळे ठाण्याच्या अावारातच गैरवर्तन करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांसह आरोपी, फिर्यादीनाही चाप बसणार आहे.

वर्षभरापूर्वी पुणे जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात येऊन तक्रार देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसोबत पोलिसांचे वर्तन, त्यांना मिळणारी अडवणुकीची वागणूक, ठाण्यातच चालणारा गैरकारभार आदींना आळा घालण्याचा प्रयत्न झाला. तसेच या कॅमेऱ्यांची लिंक थेट पोलिस अधीक्षकांच्या संगणकाशी जोडण्यात आल्याने ठाण्याच्या प्रवेशद्वारामधून प्रवेश करणाऱ्यापासून ठाण्याच्या अावारात समोरच्या बाजूने उभे राहणाऱ्या प्रत्येकाची हालचाल स्पष्टपणे आवाजासह कॅमेऱ्यात कैद होणार आहे.

पोलिस ठाण्याच्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर बसविण्यात आलेला सीसीटीव्ही कॅमेरा पीटीझेड पद्धतीचा आहे. कॅमेऱ्याची शूटिंगची रेंज पाचशे मीटरपर्यंत आहे. विशेष म्हणजे डीवीकडून-उजवीकडे तसेच पुन्हा डावीकडे, संपूर्ण गोलाकार, खालीपासून वरपर्यंत अशा पद्धतीने रेकॉर्डिंग होणार असून, झालेले रेकॉर्डिंग झूम करून पाहण्याचीही सोय असल्याने दूरवरचे चेहरेही स्पष्ट दिसणार आहेत.

पोलिस ठाण्यातील कॅमेऱ्याची कनेक्टिव्हिटी पोलिस निरीक्षकाच्या मोबाइलशी भविष्यात जोडणार आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक कामानिमित्त ठाण्यापासून दूर असले, तरी ठाण्याच्या आवारातील घडामोडींवर त्यांची मोबाइलद्वारे नजर राहणार आहे.

- तानाजी चिखले, अप्पर पोलिस अधीक्षक बारामती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images