Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मिळकत कर पाचशे कोटींवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मिळकतकराच्या माध्यमातून पहिल्या दोन महिन्यांतच तब्बल पाचशे कोटींहून अधिक उत्पन्न प्राप्त करून महापालिकेने विक्रमी मजल मारली आहे. करात सवलत मिळविण्यासाठी आज, रविवारी अखेरचा दिवस असून, नागरिकांनी सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

स्थानिक संस्था कराबाबत (एलबीटी) अनिश्चितता असल्याने स्थायी समितीने यंदा मिळकतकरात वाढ करण्यास मान्यता दिली होती. त्यामुळे, मिळकतकरातून वर्षभरात तब्बल साडेअकराशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे गृहीत धरण्यात आले होते. पहिल्या दोन महिन्यांत कर भरणाऱ्यांना पालिकेतर्फे ५ ते १० टक्के सवलत दिली जाते. या सवलतीचा लाभ उठवत, बहुसंख्य नागरिकांनी पालिकेकडे कर भरणा केल्याने शनिवारी सायंकाळपर्यंत पालिकेला त्याद्वारे ५१२ कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न प्राप्त झाले. त्यामुळे, स्थायी समितीने ठरवून दिलेल्या वार्षिक उद्दिष्टापैकी निम्मे उत्पन्न मिळकतकर विभागाने दोन महिन्यांतच प्राप्त केले आहे.

गेल्या वर्षी पहिल्या दोन महिन्यात पालिकेला मिळकतकरातून सुमारे चारशे कोटी रुपये प्राप्त झाले होते. यंदा, सुरुवातीच्या दोन महिन्यांतच त्यात शंभर कोटी रुपयांची वाढ करण्यात पालिकेला यश आले आहे. तसेच, कर भरण्याचा उद्या (रविवारी) अखेरचा दिवस असल्याने त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मिळकतकराचे उत्पन्न वाढविण्यासाठी पालिकेने यंदा सुरुवातीपासून प्रयत्न केले होते.

आज सकाळपासूनच कर स्वीकारणार

पालिकेच्या मुख्य इमारतीसह सर्व क्षेत्रीय कार्यालये आणि किऑस्क सेंटर सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत सर्व नागरिकांसाठी खुली असतील. तसेच, नागरिक ऑनलाइन स्वरूपातही करभरणा करू शकतात. पालिकेच्या www.punecorporation.org या वेबसाइटवरून नागरिकांना ऑनलाइन कर भरण्याची सुविधा उपलब्ध असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रशिक्षणासाठी बकोरिया जाणार मसुरीला

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना राज्य सरकारतर्फे दीड महिन्याच्या प्रशिक्षणासाठी मसुरीला पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेला पदांचा कार्यभार पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे, कुमार यांना पुढील आठवडाभर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारीही सांभाळावी लागणार आहे.

पालिकेत अतिरिक्त आयुक्तांची तीन पदे असून, त्यातील एक पद सध्या रिक्त आहे. तसेच, अतिरिक्त आयुक्त (इस्टेट) राजेंद्र जगतापही सुटीवर असून, आता बकोरिया यांनाही प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने त्यांचा कार्यभारही कुणाल कुमार यांच्याकडेच देण्यात आला आहे. पीएमपीला सध्या पूर्ण वेळ संचालक नसल्याने बकोरिया यांच्याकडे पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. सरकारने नुकतीच नागपूरचे जिल्हाधिकारी असलेल्या अभिषेक कृष्णा यांची या पदावर नियुक्ती केली असून, ते आठ जून रोजी पदभार स्वीकारणार आहेत. तोपर्यंत, पीएमपीचा कार्यभारही पालिका आयुक्त कुमार यांच्याकडेच सोपविण्यात आला आहे. त्यामुळे, पुढील आठवड्यात कुमार यांना पालिका आयुक्तपदासह अतिरिक्त आयुक्त आणि पीएमपीची जबाबदारीही सांभाळावी लागणार आहे.

बदलीसाठी मसुरीचे प्रशिक्षण?

काही वर्षांपूर्वी पालिकेचे तत्कालीन आयुक्त महेश झगडे यांना राज्य सरकारने दोन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी मसुरीला पाठविले होते. त्यानंतर, झगडे यांची परस्पर बदली करण्यात आली. राज्य सरकारने चारच महिन्यांपूर्वी बकोरिया यांचीही बदली करण्याचा प्रयत्न करून पाहिला; पण त्याला सर्व स्तरांतून विरोध झाल्याने ही बदली रद्द केली गेली. त्यामुळे, बकोरिया यांच्या बदलीसाठी तर त्यांना प्रशिक्षणाला पाठविण्यात आले नाही ना, अशी भीती वर्तविली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीचे नदीपात्रात आंदोलन

0
0

म. टा. पुणे, प्रतिनिधी

'शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नदीपात्रात राडारोडा टाकणे तसेच, कचरा पेटवून देण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. ही बाब पुणे पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. परंतु, त्यावर कुठलीही कारवाई न झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा अॅड. वंदना चव्हाण यांनी नदीपात्रात शनिवारी आंदोलन केले. त्यानंतर आयुक्त कुणाल कुमार यांनी पुन्हा नदीपात्राची पाहणी केली. खुद्द महापालिकेने नदीपात्राला डम्पिंग ग्राउंड बनविल्याचा आरोपही अॅड. चव्हाण यांनी यावेळी केला.

नदीपात्राची दोनच दिवसांपूर्वी महापौर दत्तात्रय धनकवडे आणि आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी पाहणी केली होती. त्यावेळी नदीपात्रात पालिका प्रशासनाकडून कचऱ्याचे चार कंटेनर, मुरूम, दगड आणि फरश्या टाकलेल्या दिसून आल्या. नदीपात्रात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर चारचाकी गाड्यांचे पार्किंगही केल्याचे दिसून आले होते. आयुक्तांनी याची दखल घेॡ्न त्वरित कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, चव्हाण यांनी शनिवारी पुन्हा नदीपात्राची पाहणी केली असता, पूर्वीच्या चार कचरा कंटेनरच्या जागी आता दहा कंटेनर ठेवल्याचे निदर्शनास आले. नदीपात्रात तयार करण्यात येत असलेल्या जॉगिंग ट्रॅकसाठी अनेक गाड्या भरून मुरूम, दगड आणि फरश्या टाकण्यात आल्याचेही निदर्शनास आले. काही दिवसांपूर्वी महापौर आणि आयुक्तांनी पाहणी करूनदेखील काहीही कारवाई न करता पालिकेने आणखी त्यात भर घातल्याने चव्हाण आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नदीपात्रातच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर आयुक्त कुणाल कुमार आणि उपायुक्त सुरेश जगताप यांनी पुन्हा नदीपात्राची पाहणी केली आणि तेथील निकामी कंटेनर, कचरा, मुरूम, दगड आणि फरश्या तेथून काढून टाकण्याचे आदेश प्रशासनाला दिले. 'नदीपात्राला पालिकेने डम्पिंग ग्राउंड बनविले आहे. बांधकामाचा राडारोडा नदीत टाकला जाऊ नये याबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या गेलेल्या नाहीत,' असे चव्हाण म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तंबाखूबंदीला चुना

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मोठा गाजावाजा करून राज्यातील सर्व सरकारी हॉस्पिटलच्या आवारापुरत्याच लागू केलेल्या तंबाखूबंदीच्या निर्णयाची गेल्या वर्षभरात अंमलबजावणीच न झाल्याने सरकारच्याच आदेशाला कर्मचाऱ्यांनी चुना लावल्याचे उघड झाले आहे.

आज, रविवारी जागतिक तंबाखूविरोधी दिन देशभर पाळण्यात येणार आहे. तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामाबाबत राज्यातील जनतेमध्ये जनजागृती करणाऱ्या आरोग्य खात्याने तंबाखूबंदीच्या आदेशाचे परिपत्रक काढले होते. त्या परिपत्रकाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला असता, आरोग्य खात्याचा आदेश कागदावरच राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्मचारी, तसेच आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उदासीनतेपोटी आदेशाची गांभीर्याने अंमलबजावणी होऊ शकली नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच सरकारी हॉस्पिटलमधील लिफ्ट तसेच जिना गुटखा, पान, तंबाखू खाऊन थुंकल्याने खराब झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे.

केंद्र सरकारने देखील यापूर्वीच तंबाखूबंदीचा आदेश जारी केला. त्यापाठोपाठ राज्याच्या आरोग्य खात्याने गेल्या वर्षी परिपत्रक जारी करून तंबाखूबंदीची घोषणा केली होती. मात्र, त्या परिपत्रकानुसार तंबाखूबंदीची घोषणा केवळ सरकारी हॉस्पिटलपुरतीच मर्यादित होती. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा हॉस्पिटलसारख्या तसेच वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित ससूनसारख्या सरकारी हॉस्पिटलचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या तंबाखूबंदीच्या आदेशाची देखील फारशी गांभीर्याने अंमलबजावणी झालेली नाही.

आरोग्यखात्याच्या आदेशानुसार सरकारी हॉस्पिटलमध्ये तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थ खाण्यास तसेच थुंकण्यास मनाई करण्यात आली आहे. या संदर्भातील फलक लावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र सरकारी हॉस्पिटलमध्ये हे फलक लावल्याचे दिसत नाही. बंदी असूनही सरकारी हॉस्पिटलमधील कर्मचारी, अधिकारी, डॉक्टरांकडून नियम मोडण्याचे धाडस दाखविले जात आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई असल्याचे शहाणपण शिकविणाऱ्या आरोग्य खात्यातच तंबाखूबंदीबाबत अनास्था असल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, गुटखा खाऊन थुंकण्यामुळे न्यूमोनिया तसेच टीबी, स्वाइन फ्लूसारख्या आजाराचा फैलाव होण्याची भीती अधिक असते. याकडेही आरोग्य खात्याचे दुर्लक्ष झाले आहे.

व्यसन फोफावतेय..

महाराष्ट्रातील ३१ टक्के प्रौढ व्यक्ती तंबाखूचे सेवन करतात.

तंबाखू खाण्यामुळे रक्तदाब, हृदयविकार, कॅन्सर, श्वनसनाचे विकार

तंबाखू सेवन करणाऱ्या पंधरा वर्षांखालील तिघांपैकी एक व्यसनी

शालेय विद्यार्थ्यांमध्ये सहावी-सातवीपासूनच तंबाखूची सवय

आरोग्य खात्याने सरकारी हॉस्पिटलमध्ये तंबाखूबंदीबाबत परिपत्रक काढले होते. त्यानुसार वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांना हॉस्पिटल तसेच कार्यालयीन आवारात तंबाखू खाण्यास मनाई करण्यात आली. प्रत्येक संस्थेच्या प्रमुखावर आदेशाच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. अंमलबजावणी किती झाली याचा आढावा घ्यावा लागेल.

- डॉ. सतीश पवार, आरोग्य संचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नालेसफाईचा उडाला फज्जा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापौर, पालिका आयुक्त आणि सभागृहनेते आदींनी वारंवार सूचना करूनही शहरातील नालेसफाईची कामे अपूर्णच राहिल्याचे स्पष्ट होत आहे. शहरातील केवळ प्रमुख नाल्यांचीच सफाई पूर्ण करण्यात पालिकेला यश आले असून, आणखी ४० टक्के कामांची पूर्तता होणे बाकी आहे. त्यामुळे, मान्सूनचे लवकर आगमन झाल्यास पुणेकरांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

शहरातील सर्व नाल्यांची स्वच्छता आणि रस्तेसफाईची कामे मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापौर दत्तात्रय धनकवडे; तसेच पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी वेळोवेळी घेतलेल्या बैठकांमध्ये दिले होते. त्यासाठी, पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले. तरीही, नालेसफाईची कामे अजूनही सुरूच असून, त्यांना आणखी मुदतवाढ देण्यात येईल, असे स्पष्टीकरण आयुक्तांनी शनिवारी दिले.

शहरातील प्रमुख आणि मोठ्या नाल्यांची सफाई करण्यात पालिकेला काही प्रमाणात यश मिळाले असले, तरी उपनगरांतील आणि या मोठ्या नाल्यांना मिळणाऱ्या छोट्या-छोट्या नाल्यांच्या सफाईची कामे अद्याप अपूर्ण आहेत. ही कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश पालिकाआयुक्तांनी यांनी दिले आहेत. नाल्यांची स्वच्छता वेळेत झाल्यास पाणी तुंबणे, साठून राहणे, या तक्रारी कमी होतात. मात्र, यंदा हे काम अपूर्ण राहिल्याने पहिल्या पावसातच पुणेकरांना त्याचा फटका बसण्याची भीती आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसातच नालेसफाई अपूर्ण असल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यातून वाट काढत पुणेकरांना जावे लागले होते. तेव्हाच, पालिकेतर्फे केली जाणारी स्वच्छता अपुरी असल्याचे समोर आले होते. त्यानंतरही, पालिकेने नालेसफाईच्या कामांना वेग दिला नसल्याचे स्पष्ट होत असून, मान्सून लवकर दाखल झाल्यास पालिकेच्या कामांचा फज्जा उडणार आहे.



रस्त्यांची दुरुस्तीही अपूर्णच

नाल्यांच्या साफसफाईसह शहरात विविध कामांसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठीही मे अखेरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. दुर्देवाने, ही खोदाईची कामे अपूर्णच असून, शहराच्या अनेक भागांत खोदाई झालेले रस्ते अद्याप पूर्ववत करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे, नागरिकांना त्याचाही मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामार्गावर लुटणारी टोळी अटकेत

0
0

पुणेः कात्रज- देहू बाह्यवळण महामार्गावर टेम्पोचालकाला रस्त्यात अडवून १९ लाख ४५ हजार रुपयांचा माल चोरणाऱ्या टोळीला सिंहगड पोलिसांनी अटक केली. अहमदनगर, शिक्रापूर येथे पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून आठ लाख रुपयाचा माल जप्त केला.

सचिन विलास शिंदे (वय २४, रा. निंबवी, ता. श्रीगोंदा, अहमदनगर) विशाल एकनाथ बोर्डेकर (वय २०, रा. सणसवाडी, ता. शिरूर), दीपक बाळासाहेब ढेरंगे (वय २३, रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर) बाळू दशरथ केदारे (वय ३१, रा. वडणेर हवेली, ता. पारनेर) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. मुख्य सूत्रधार समीर उर्फ पप्पू उर्फ रामदास यशवंत ढगे, सचिन भाऊसाहेब इथापे (दोघे रा. श्रीगोंदा, जि. नगर) हे अद्याप फरारी आहेत. त्या दोघांविरोधात नगर आणि अन्य पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी, पोलिस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड, पोलिस कर्मचारी कैलास मोहोळ, पांडुरंग वांजळे, दिलीप जगदाळे, संदीप पवार, गजानन सोनुने, किरण देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली. कात्रज-देहू बाह्यवळण महामार्गावरील आंबेगाव येथे कारमधून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी टेम्पोचालक, क्लिनरला मारहाण केली होती. टेम्पोतील १९ लाख ४५ हजार रुपयाचा माल चोरून नेला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घायवळ-मारणे टोळीत गँगवॉर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नीलेश घायवळ आणि गजा मारणे टोळीतील गँगवॉरचा शनिवारी रात्री भडका उडाला. घायवळ टोळीतील तडीपार गुंड पंकज राम फाटक याच्यावर मारणे टोळीतील सात ते आठ जणांनी शनिवारी रात्री धारदार शस्त्रांनी वार करून आणि डोक्यात दगड घालून खून केला. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

पंकज राम फाटक (वय २०, रा. ज्ञानेश्वर कॉलनी, कोथरूड ) असे खून झालेल्याचे नाव आहे. पंकज हा कुख्यात गुंड नीलेश घायवळ टोळीतील सराईत गुंड आहे. पंकज शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कर्वेनगरमधील पोतनीस परिसरातील नवदुर्गा कॅफेजवळ थांबला होता. त्यावेळी त्याची काही जणांसोबत भांडणे झाली. त्यांनी पंकजला बेदम मारहाण करून त्याच्या डोक्यात दगड घातला. त्यामध्ये तो जागीच ठार झाला. दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन भोसले पाटील आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळापासून काही अंतरावर दोन हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, पंकज याच्या खुनात गजा मारणे टोळीचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त तुषार दोषी यांनीही घटनास्थळी भेट दिली.

आठ मे २०१० रोजी दत्तवाडी पोलिस ठाण्यातून बाहेर पडलेल्या गजा मारणे टोळीतील सचिन कुडलेचा नीलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांनी पाठलाग करून खून केला होता. नीलायम टॉकिज पुलापासून दांडेकर पुलापर्यंत बेछूट गोळीबार करून घायवळ टोळीने कुडलेला टिपले होते. या खून प्रकरणात पंकज याला ताब्यात घेण्यात आले होते. त्यावेळी पंकज अल्पवयीन होता. घायवळ आणि मारणे या टोळ्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून घमासान सुरू आहे. मारणे टोळीने घायवळ टोळीतील पप्पू गावडे आणि अमोल बधे यांचा खून केला. त्यानंतर पोलिसांकडे हजर झालेल्या मारणे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. नीलेश घायवळ टोळीतील सराईतांना शहरातून तडीपार केले. पंकज यालाही तडीपार करण्यात आले होते.

प्रवेशाच्या बहाण्याने लाखांची फसवणूक

पुणेः नामांकित कॉलेजला पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याचे आमिष दाखवून प्रवेश न देता अठरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, संशयितांना अद्याप पोलिसांनी अटक केले नाही. रामगोपाल नाडेला, नल्लारी सुब्बारेड्डी, सुरेश, नरेंद्र अशा चौघांच्याविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंताला रेड्डी (वय ५३, रा. हैदराबाद) यांनी या प्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना कोरेगाव पार्क येथे दोन एप्रिलला घडली. संबंधित संशयित आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादीच्या मुलीस नामांकित कॉलेजला पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश देत असल्याचे आमिष दाखविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागात टँकरची शंभरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उन्हाचा पारा वाढला असल्याने पुणे विभागातील ९९ गावे आणि ४१५ वाड्या-वस्त्या तहानलेल्या असून, सुमारे अडीच लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी शंभर टँकर सुरू करण्यात आले आहेत.

मान्सूनचे आगमन लवकर होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असली, तरी पाण्याचे स्रोत पूर्ववत होण्यासाठी काही अवधी लागणार आहे. या काळात आणखी टँकर वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. पुणे विभागातील विशेषतः सातारा, सांगली व पुणे जिल्ह्यात टँकरग्रस्त गावांची संख्या वाढत आहे. पुणे जिल्ह्यात ३६, साताऱ्यात ४६ व सांगलीत १० टँकरने पाणी देण्यात येत आहे.

पुणे विभागात गत वर्षी याचकाळात २११ गावांना १६८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. गेल्या काही वर्षांत प्रशासनाने भूजल पुनर्भरण, जलयुक्त गाव, नद्या-नाले जोड अशा योजना राबवून जलस्रोत बळकट केले. त्याचा परिणाम यंदा दिसत असून, टँकरची संख्या कमी होत चालली आहे. यंदापासून जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारने हाती घेतली आहे.

त्यामुळे पाणी साठण्यास मदत होणार आहे. याचा परिणाम पुढील वर्षी दिसणार आहे.गत हंगामात झालेला पाऊस आणि जलयुक्त अभियांनाचे कामे यामुळे टंचाईवर मात करण्यास मदत झाली आहे. मात्र, अद्याप काही गावांमधील पाणी समस्या दूर करणे शक्य झालेले नाही. पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, आंबेगाव, भोर, दौंड, शिरूर तसेच साताऱ्यातील माण, खटाव, वाई, कोरेगाव, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, दक्षिण सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात जात, शिराळा या तालुक्यांत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या चार जिल्ह्यांतील २ लाख ४१ हजार लोकसंख्येची टँकरच्या पाण्यावर भिस्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युद्धभूमीवर महिला नाहीच!: पर्रीकर

0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे

'लष्करात प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढणाऱ्या तुकड्या सोडून सर्वत्र महिलांना सामावून घेण्यात आले आहे. परंतु, प्रत्यक्ष युद्ध लढणाऱ्या तुकड्यांमध्ये महिलांचा समावेश करणे शक्य होणार नाही,' असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) दीक्षांत संचलनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 'लष्करात विविध विभागात विविध पदांवर महिला कार्यरत आहेत. त्या आपली जबाबदारी योग्य रितीने पारही पाडत आहेत. परंतु, प्रत्यक्ष लढाईसाठी युद्धभूमीवर जाणाऱ्या तुकड्यांमध्ये (बॅटल युनिट्स) महिलांचा समावेश करता येणार नाही. शत्रूने युद्धामध्ये या महिलांना युद्धकैदी बनवल्यास अनेक समस्या उभा राहू शकतात,' असे पर्रीकर यांनी स्पष्ट केले.

लष्करातील अधिकाऱ्यांच्या कमतरतेबाबत बोलताना पर्रीकर म्हणाले,' अधिकाऱ्यांच्या कमतरतेचे चित्र ज्या पद्धतीने रंगवले जात आहे, ते तितके मोठे नाही. गेल्या काही वर्षात कमतरतेचा आकडा ११ हजारांवरून सात हजारापर्यंत खाली आला आहे. दरवर्षी हा आकडा सातत्याने कमी होत आहे. लष्कराने खास माउंटन कोअर उभारण्याचा निर्णय घेतल्याने हा आकडा ४९ हजारांपर्यंत वाढला आहे. परंतु, लवकरच ही तूट भरून निघेल,'.

गोळीला गोळीनेच उत्तर

दहशतवाद्यांना दहशतवाद्यांच्या माध्यमातूनच संपवले पाहिजे, असे विधान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यावर उलटसुलट चर्चाही झाली होती. त्याबाबत विचारले असता,'गोळीला गोळीनेच उत्तर दिले पाहिजे,' यावर मी ठाम आहे, असे पर्रीकर यांनी स्पष्ट केले. तसेच, दहशतवाद्यांबाबतच्या पर्रीकर यांच्या विधानावर पाकिस्तानच्या मुख्य संरक्षण सल्लागारांनी भारत दहशतवादाला खतपाणी घालत असल्याची टीका केली होती. त्यावर बोलताना 'हा प्रकार 'रेवडीला गंडेरीची साक्ष' या कोंकणी म्हणीसारखा (उंदराला मांजराची साक्ष)' असून त्याला फारसे महत्त्व देऊ नये,' असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलयुक्त शिवार अभियान जोरात

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत पुणे विभागातील ९०३ गावांमध्ये ११ हजार २८४ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरीत पाच हजार ४८७ कामे येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

राज्य सरकारने पाणी-टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात पुण्यातील १९८, साताऱ्यातील २१५, सांगलीतील १४१, सोलापुरातील २८० आणि कोल्हापूरच्या ६९ गावांची निवड झाली होती. पाच जिल्ह्यांत १६ हजार ७७१ कामे प्रस्तावित होती. त्यापैकी अपूर्ण असलेली पाच हजार ४८७ कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहेत. पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे त्यापूर्वी जलयुक्त शिवाराची कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे विभागात आत्तापर्यंत जलयुक्त शिवार अभियासानासाठी १५५ कोटी पेक्षा जास्त निधीचा खर्च करण्यात आला, तर ५७१ गावांमध्ये लोकसहभागातून २२ कोटींची कामे सुरू आहेत.

अभियानांतर्गत गावांमध्ये पावसाचे पाणी गावाच्या शिवारात अडविणे, भूजल पातळीत वाढ करणे, शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, सिंचन क्षेत्रात वाढ करणे, बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन करणे, विकेंद्रीत पाणी साठे निर्माण करणे, पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे, निकामी जलस्रोताची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित करणे, अशी कामे सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तंबाखूचा उल्लेख अंमली पदार्थ करा’

0
0

पुणेः जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्ताने तंबाखूसारख्या पदार्थाला अंमली पदार्थात समावेश करावा तसेच तंबाखूच्या शेतीवर कायमस्वरूपी टप्प्याटप्प्याने बंदी घालावी, अशी मागणी सर्व जीव मंगल प्रतिष्ठान संस्थेने केली आहे.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी केंद्र सरकारकडे ही मागणी केली आहे. ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखूविरोधी दिन म्हणून जगभर पाळण्यात येतो. त्यानिमित्ताने संस्थेच्या वतीने या दिवशी तंबाखूमुक्त भारत मोहीम राबिवण्यात येते. केंद्र व राज्यातील लोकप्रतिनिधींनी तंबाखूवर बंदी घालण्या संदर्भात विचार करून कृती करावी, तसेच तंबाखूविरोधी अभियानाला समाजाने प्रतिसाद देऊन या व्यसनांचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही डॉ. गंगवाल यांनी केले. तंबाखूच्या सेवनामुळे मोठ्या प्रमणात कॅन्सर होऊन अनेकांचा मृत्यू होते. त्यामुळे त्यांचे प्राण वाचविण्याची जबाबदारी समाजाची असून, तंबाखूविरोधी अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे, असेही आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एटीएम’ लुटणारे जेरबंद

0
0

म. टा. प्रतिनिधी ,पुणे

पिस्तूल आणि कोयत्याचा धाक दाखवून एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी जाणारी जीप लुटणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने चांदणी चौकात सापळा रचून अटक केली. नीरा मोरगाव रस्त्यावर २४ मे रोजी ही घटना घडली. चोरट्यांनी ४३ लाख ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली होती.

सचिन दत्तात्रय दर्गे (रा. आंबेगाव पठार), पिंट्या स्वप्नील रतन पवार (रा. आंबेगाव पठार), विकास रघुनाथ जाधव उर्फ बाल्या (रा. हांडेवाडी), आकाश बाळासाहेब खोमणे, सुरज शंकर पवळे (रा. धायरी), मन्सूर इकबाल फुटाणकर उर्फ लालू (रा. मूळ उस्मानाबाद, सध्या आंबेगाव पठार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कोर्टाने या सर्व आरोपींना चार जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम जाधव यांनी दिली.

नीरा-मोरगाव रस्त्यावरील बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी जीप जात होती. यादरम्यान, ईस्टम कारमधून आलेल्या ८ ते ९ जणांनी जीप रस्त्यात अडविली. जीपमधील चेकमेट कंपनीचे सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्याना पिस्तुल व कोयत्याचा धाक दाखवून जीप पळविली. त्यानंतर काही अंतरावर जीपमधील रोख ४३ लाख ५० हजार रुपये घेऊन चोरटे पसार झाले. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला.

या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिस निरीक्षक जाधव यांना यासंदर्भात रोकड चोरणाऱ्या टोळीबाबत माहिती मिळाली होती. ही टोळी चांदणी चौकातील पेट्रोल पंपाच्या मागे येणार असल्याची माहिती मिळताच त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. पोलिस उपनिरीक्षक अंकुश माने, लक्ष्मण खाडे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांना परिसरात सापळा रचून सहा जणांना अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खडकवासला धरणात बुडून मुलाचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी ,पुणे

मित्रासोबत फिरायला गेलेल्या मुलाचा खडकवासला धरणात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. आरशान अब्दुल रहिम नवालूर (वय १६, रा. केईएम हॉस्पिटलशेजारी, रास्ता पेठ) असे मृताचे नाव आहे.

आरशान हा शनिवारी सकाळीच मित्रासोबत फिरण्यासाठी खडकवासला धरणावर गेला होता. धरणावर पोहचल्यावर सर्व धरणाच्या कडेला खेळत होते. त्यानंतर ते पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, आरशान याला पोहता येत नसतानाही तो पाण्यात उतरला. खोल पाण्यात गेल्यावर तो पाण्यात बुडत असताना त्याच्या इतर दोन मित्रांनी त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला. तसेच उपस्थितांपैकी काहींनी पाण्यात उतरून आरशानला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला आरशानला वाचविण्यत सगळेच अपयशी ठरले.

घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. मात्र, तोपर्यंत धरणावर उपस्थित नागरिकांनी आरशान याचा मृतदेह बाहेर काढला होता, अशी माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पणन कायद्यात बदल हवा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील बाजार समित्यांमध्ये अनेक चुकिच्या प्रथांचा शिरकाव झालेला आहे. आस्तिस्ताव असलेल्या पणन कायद्याद्वारे त्या नियंत्रणात आणण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे पणन कायद्यात व्यापक प्रमाणात काळसुसंगत बदल करण्याची आवश्यक्ता असल्याचे मत राज्याचे सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संचालक मंडळाची बैठक शनिवारी झाली. त्या वेळी पाटील बोलत होते. ते म्हणाले, 'राज्यातील शेतमाल विक्रीच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अडचणी उभ्या राहिल्या आहेत. सद्यस्थितीतील बाजार पद्धतीत शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात अवमुल्यन होत आहे, हे टाळण्यासाठी राज्य सरकार कटिबध्द असून, शेतमालाचे मुल्यवर्धन करण्यासाठी पणन कायद्यात अमुलाग्र बदल केले जातील. तसेच, शेतमाल तारण योजनेसाठी पणन मंडळाकडून २५ कोटींची तरतूद दरवर्षी करण्यात येत होती. त्यात वाढ करून ह्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आता दरवर्षी दीडशे कोटी रुपये देण्यात येणार आहेत.' राज्याचे पणन संचालक दिनेश ओऊळकर सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांचा विशेष सत्कार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी पणन मंडळाचे उपाध्यक्ष राम शिंदे, महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे अध्यक्ष दिलीप मोहिते, राज्याचे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, राज्याचे पणन संचालक दिनेश ओऊळकर, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक मिलिंद आकरे आदी उपस्थित होते.

'शेतमाल तारण' पुन्हा सुरू करणार

राज्यातील शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर असलेली शेतमाल तारण योजना कृषी पणन मंडळ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या माध्यमातून पुन्हा सुरू करण्याची सूचनाही चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाळींसह शेंगदाणा अद्याप तेजीतच

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या काही आठवड्यांप्रमाणे या आठवड्यातही डाळींचे भाव तेजीत राहिले. तूरडाळीचे दर क्विंटलमागे ४०० रुपयांनी, तर मटकी डाळीचे ३०० रुपयांनी दर वाढले आहेत. निर्यात वाढल्याने शेंगदाण्याचे भावही तेजीत आहेत.

देशात डाळींचे उत्पादन कमी होत असल्याने बाहेरील देशांमधून डाळी आयात करण्यात येत आहेत. विदेशातही डाळींचे उत्पादन घटल्याने तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने देशात सर्वत्रच डाळींचे भाव वाढले आहेत. या आठवड्यात तूरडाळीच्या दरात क्विंटलमागे ४०० रुपये, तर मटकी डाळीच्या दरात क्विंटलमागे ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. अन्य डाळींचे दर मात्र स्थिर राहिले.

बेसनाचे भाव ५० किलोमागे १०० रुपयांनी वाढले आहेत. तसेच शेंगदाण्याची निर्यात वाढल्याने त्याचेही दर तेजीत आहेत. त्याशिवाय गेल्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यात तांदळाचे घटलेले दर कायम राहिले आंबेमोहोर तांदळात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपये तर कोलममध्ये २०० आणि सोनामसुरी तांदळातही २०० रुपयांनी दर घटलेले कायम आहेत.

बाजारातील रविवारचे दर

तांदळाचे भाव (क्विंटलमध्ये)

सोनामसुरी २६०० ते २८००

कोलम ३२०० ते ३५००

लचकारी कोलम ४००० ते ४५००

आंबेमोहोर ४००० ते ४५००

तूरडाळ १०,००० ते ११, ०००

मटकी डाळ १०,००० ते १०, ५००

बेसन (५० किलो) ३१०० ते ३४००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उन्हामुळे भाज्या कडाडल्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उन्हाळ्यामुळे फळभाज्यांसह पालेभाज्यांची आवक रविवारी घटली. परिणामी कांदा, कोबी, फ्लॉवर, दोडका, पापडी, सिमला मिरचीसह शेवगा, कैरी महाग झाली, तर पालेभाज्यांची आवकच कमी होत असल्याने त्या देखील मागील आठवड्याप्रमाणे तेजीत आहेत.

मार्केट यार्डात रविवारी १६० ते १७० ट्रक गाड्यांची आवक झाली आहे. हिमाचल प्रदेशातून दोन ट्रक मटार, कर्नाटकातून ४ ते ५ ट्रक तोतापुरी कैरी, मध्यप्रदेश, कर्नाटकातून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश, तामिळनाडूतून ३ ते ४ टेम्पो शेवग्याची तर, इंदौरमधून ४ टेम्पो गाजराची आवक झाली.

स्थानिक भागातून सातारी आल्याची ५५० पोती, फ्लॉवरची १८ ते २० टेम्पोची आवक झाली. कोबीची आवक या आठवड्यात घटल्याचे दिसून आले. टोमॅटोची नेहमीप्रमाणे साडेपाच हजार पेटींची आवक झाली. भुईमूग शेंगाची २२० ते २२५ पोती तर स्थानिक भागातून कैरीची १० ते १२ टेम्पोची आवक झाली.

कांद्याची उन्हाळ्यामुळे आवक घटली असून, अवघे १०० ट्रक आवक झाली. बटाट्याची आग्रा, नाशिक, इंदौर, येथून ५५ ट्रक एवढी आवक झाली. लसणाची मध्य प्रदेशातून साडेतीन हजार गोणींची आवक झाली. मेथीची चाळीस हजार जुडी, तर कोथिंबीरची एक लाख जुडीची आवक झाली आहे.

कर्नाटक हापूसला मागणीच नाही

कर्नाटक हापूसला यंदाच्या वर्षीचा पावसाचा चांगलाच फटका बसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. रत्नागिरीसोबत या आंब्याला हंगामाच्या शेवटच्या आठवड्यात उठावच नाही. आंब्याची आवक आता बऱ्यापैकी कमी झाली आहे. तरीही सध्या होत असलेल्या आवकेतील आंब्याची प्रत खालावली आहे. कमी दर्जाचा, खराब प्रतीचा आंबा बाजारात उपलब्ध होत आहे. त्यामुळे कर्नाटक आंब्याकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. परिणामी, आंब्याचे दरही कमी झाले आहेत. खराब प्रतीमुळे कर्नाटक आंब्याला मागणी नाही, असे व्यापारी रोहन उरसळ यांनी सांगितले. कर्नाटक हापूसच्या चार डझनासाठी ४०० ते ६०० रुपये दर मिळाला आहे. पायरीला ३०० ते ४५० रुपये दर मिळाला आहे. कर्नाटकच्या आंब्याची १० ते १५ हजार पेटींची बाजारात आवक झाली आहे. रत्नागिरी हापूस आंब्याचा हा शेवटचा हंगाम आहे. या आंब्याची बाजारात ७०० ते ८०० पेट्यांची आवक झाली आहे. ५ ते ९ डझऩाच्या पेटीला १२०० ते १५०० रुपये दर मिळाला आहे.

फुलेही महागली

उन्हाळ्यामुळे तसेच अवकाळी पावसामुळे फुलांची बाजारात होणारी आवक घटली आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या फुलांच्या दरात १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. उन्हाळ्यामुळे फुलांचा मालच कमी असला तरी लगीनसराईमुळे मागणी वाढली आहे. मोगऱ्याच्या एका किलोसाठी १५० ते ३०० रुपये दर आकारला जात आहे. डच गुलाबाच्या २० नगासाठी ६० ते ८० रुपये दर मिळाला आहे.

कलिंगड, खरबूजचा भाव वाढला

उन्हाळा संपण्याच्या मार्गावर असल्याने कलिंगड, खरबूजाची आवक कमी होऊ लागली आहे. तरीही ग्राहकांकडून या फळांना अद्यापही मागणी सुरु झाली आहे. त्यामुळेच कलिंगडाची १० ते १२ टेम्पोची तर खरबूजाची ५ ते ६ टेम्पोची आवक झाली आहे. कलिंगडला एका किलोसाठी ५ ते १५ रुपये तर खरबूजाला १० ते ३२ रुपये किलो असा दर मिळाला आहे. लिंबाची चार हजार गोणींची आवक झाली असली, तरी त्यात हिरव्या लिंबाचे प्रमाण अधिक आहे. डाळिंब, अननस, संत्रा, मोसंबीचे दर स्थिर आहेत. सफरचंदाची देखील आवक घटली असून, त्याला देखील उठाव नाही.

मासळी, अंडी महाग

खोल समुद्रातील मासळीची चार टन, खाडीची १५० किलो, नदीची १४ टन मासळीची आवक झाली. रत्नागिरी, श्रीवर्धन येथून मासळीची आवक झाली नाही. गुजरात, कर्नाटकातील समुद्रातील मासळीची आवक झाली आहे. रहू, कतल्याची आंध्र प्रदेशातून आवक झाली आहे. आवक घटल्याने मासळीच्या दरात पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. अंड्यांची आवक कमी झाली असली तरी मागणी वाढली आहे. परिणामी, इंग्लिश अंड्याच्या दरात शेकड्यामागे २० ते २५ रुपयांनी वाढ झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता आमदारांची गावे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारच्या खासदार आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यात आमदार आदर्श ग्राम योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विधानसभा व विधान परिषदेतील आमदारांनी त्यांच्या मतदार संघातील प्रत्येकी तीन ग्रामपंचायतींची निवड करून २०१९ पर्यंत त्यांचा विकास साधण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या खासदार आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यात आमदार आदर्श ग्राम योजना राबविण्यास राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. या योजनेची अंमलबजावणी केंद्र सरकारच्या योजनच्या धर्तीवरच केली जाणार आहे. विधानसभा मतदार संघ शहरी आणि ग्रामीण भागात विभागला गेला असेल, तर ग्रामीण भागातून ग्रामपंचायतींची निवड करायची आहे. तसेच, संपूर्ण शहरी मतदार संघ असल्यास सबंधितांनी त्यांच्या सोयीनुसार जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीची निवड करावी. मुंबई परिसरातील शहरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांना राज्याचील कोणत्याही ग्रामपंचायतीची निवड करण्याची मुभा आहे. विधान परिषद सदस्य त्यांच्या इच्छेप्रमाणे कोणत्याही जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडू शकतात. या योजनेअंतर्गत निवडलेल्या गावांमध्ये काम करण्यासाठी आमदार निधीबरोबरच राज्य सरकार जोड निधी देणार आहे.

ग्रामपंचायतींची निवड करताना आमदारांना दोन गोष्टींचे बंधन घालण्यात आले आहे. निवडण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या ही किमान एक हजार असावी आणि आमदाराला त्यांचे किंवा त्यांच्या पत्नीचे गाव या योजनेसाठी निवडता येणार नाही. राज्य सरकारने या योजनेला मंजुरी दिली असली, तरीही आमदारांनी ग्रामपंचायतीची निवड करण्याची मुदत निश्चित करण्यात आलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रियकरावर गुन्हा दाखल

0
0

पिंपरीः 'नवऱ्याला घटस्फोट दे, मी तुला सांभाळीन' असे सांगून, एका विवाहित तरुणीला तिच्या नवऱ्यापासून वेगळे केल्यानंतर, स्वतः दुसरीकडे विवाह करण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रियकराविरूद्ध महिलेने फसवणुकीची तक्रार केली आहे.

या प्रकरणी संबंधित तरुणावर लग्नाचे आमिष दाखवून विश्वासघात केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार कांबळे (२७, रा. बौद्धनगर, पिंपरी) असे या तरुणाचे नाव आहे. सदर विवाहितेचे तिच्या लग्नाआधी केदारवर प्रेम होते. लग्नानंतरही त्यांचे प्रेमप्रकरण सुरू राहिले. 'तू नवऱ्याला सोडून दे. मी तुला सांभाळीन,' असे केदार तिला सांगत होता. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ती माहेरी आली आणि त्यानंतर केदार बरोबर पळून गेली.

त्या वेळी झालेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी त्या दोघांना थेरगाव येथून ताब्यात घेतले. त्या वेळी तिने मी केदारसोबतच राहणार असल्याचे सांगितले. पोलिसांनी तिला केदारच्या घरी सोडले. केदारने 'पैसे कमवण्यासाठी वर्षभराचा वेळ दे,' असे सांगून तिला माहेरी आणून सोडले. वर्षभर ती माहेरीच होती. तिने नवऱ्याबरोबर घटस्फोट घेतला आहे.मात्र, रविवारी (३१ मे) केदारचे लग्न दुसऱ्याच मुलीशी होत असल्याची माहिती तिला समजली. त्या वेळी तिने केदार विरोधात गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीर्थक्षेत्र देहूला बनवू सर्वोत्तमः बापट

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'फक्त महाराष्ट्र व भारतापुरते देहू क्षेत्र मर्यादित नसून, अवघ्या जगभरातून पर्यटक व भक्त मंडळी देहू येथे येत असतात. हे लक्षात घेऊन जागतिक स्तरावरील उत्तम तीर्थक्षेत्र या दृष्टीकोनातून देहूचा विकास केला जाईल,' असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले. देहू येथे भुयारी गटार योजना व मलशुद्धीकरण केंद्र तसेच देहू येथील वैकुंठगमन स्थान परिसर विकासांतर्गत महाद्वार, २० खोल्यांचे भक्त निवास, २६ दुकान गाळे, अन्नछत्र, तुकाराम महाराज जीवन संग्रहालय, सभामंडप, आदी विकास कामांचा प्रारंभ गिरीश बापट यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

आमदार बाळासाहेब भेगडे, जिल्हाधिकारी सौरभ राव, मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, उपविभागीय अधिकारी स्नेहल बर्गे, देहू संस्थांनाचे अध्यक्ष शांताराम महाराज मोरे, वारकरी मंडळाचे संपर्क प्रमुख जालिंदर बापू काळोखे, अभिजित महाराज मोरे, सरपंच कांतिलाल काळोखे, उपसरपंच बाळासाहेब भालेकर, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळोखे आदी उपस्थित होते.

देहू तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार आतापर्यंत १४२ कोटी रुपये खर्चाची विविध कामे पूर्ण झाली आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात ३२ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांना प्रारंभ करण्यात आला. ही सर्व कामे कालबद्ध नियोजनानुसार दिलेल्या वेळेत आणि दर्जेदारपणे पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केली. या वेळी वैकुंठगमन परिसरात तसेच इंद्रायणी नदीवरील नवीन बांधलेल्या घाटांची त्यांनी पाहणी केली.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार येथील सर्व कामे डिसेंबर २०१६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. देहू गावची सध्याची पिण्याची पाणीपुरवठा योजना बंद असल्याने या गावासाठी पिण्याच्या पाण्यासाठी नवी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.

- गिरीश बापट, पालकमंत्री, पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हे तर ‘सहकार्य’मंत्री!

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सहकारी बँकेच्या माजी संचालक मंडळातील बड्या नेत्यांवर कारवाई करण्यात चालढकल सुरू असल्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. हे तर राष्ट्रवादी काँग्रेसला 'सहकार्य' करणारे सहकारमंत्री आहेत, अशी टीका संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी नुकतीच केली आहे.

राज्य सहकारी बँकेच्या तोट्याला जबाबदार असल्याच्या आरोपावरून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची सहकार कायद्यातील तरतुदींनुसार चौकशी सुरू करण्यात आली आहे. परंतु, या चौकशीच्या प्रक्रियेत राजकीय दबाव येत असल्याची चर्चा सुरू आहे. राज्यात भाजपचे सरकार असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांना कारवाईपासून वाचविण्याचा हा डाव कसा चालतो, असा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विचारला आहे.

या राज्यातील जनतेने निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात कौल दिला, तो प्रामुख्याने भ्रष्टाचाराच्या विरोधात होता. राज्यातील अनेक सहकारी संस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असून तेथील भ्रष्टाचारामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान आणि अडवणूक झाली आहे. त्याविरोधातील चीड मतपेटीतून व्यक्त झाली. परंतु, आज ज्यांनी त्यांच्या विरोधात बंड केले, ते आज राष्ट्रवादीच्या जवळ गेले आहेत की काय, अशी शंका येते, अशा शब्दांमध्ये राजू शेट्टी यांनी हल्ला चढविला आहे. ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांनाच सहकार्य करणारे सहकारमंत्री आहेत, असे शेट्टी यांनी म्हटले असून शेतकऱ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना ते संरक्षण देत आहेत, अशीही टीकाही खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

राजकीय स्फोटाची तयारी?

गेल्या काही दिवसांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाला वेगळे वळण लागत आहे. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील हे कोल्हापुरातील असून, गेल्या काही काळात स्वाभिमानी संघटनेने सहकार खात्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर आक्रमक आंदोलने सुरू केली आहेत. येत्या काही काळात पाटील यांच्याविरोधात कोल्हापुरातूनच राजकीय स्फोट घडविण्याची तयारी स्वाभिमानीच्या गोटात सुरू असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images