Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

काळभोर टोळीतील एक अटकेत

$
0
0

पुणे : गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पिंपरी-चिंचवडमधील गुंड सोमनाथ उर्फ सोम्या काळभोर टोळीतील एकाला अटक केली. या आरोपीच्या ताब्यातून तसेच त्याने विक्री केलेले सहा पिस्तूल आणि बारा काडतुसे जप्त करण्यात आली आहेत तर पिस्तूल खरेदी करणाऱ्या दोघांनाही गजाआड करण्यात आले आहे.

हैदर जावेद सय्यद (रा. नेहरूनगर) असे अटक करण्यात आलेल्या काळभोर टोळीच्या सदस्याचे नाव आहे. हैदर या शस्त्र विक्री करत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे कर्मचारी सचिन अहिवळे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक अनिल पाटील, सहायक निरीक्षक विठ्ठल शेलार यांच्या पथकाने हिंजवडी येथे सापळा रचून हैदरला ताब्यात घेतले. या वेळी त्याच्या अंगझडतीमध्ये पोलिसांना दोन पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे मिळाली होती, अशी माहिती अप्पर पोलिस आयुक्त शहाजी सोळुंके, उपायुक्त पी. आर. पाटील यांनी सांगितले.

हैदरने दीपक उर्फ बाब काशिनाथ कांबळे (रा. पिंपरी) आणि आलम युसूफ शेख (रा. कासारवाडी) या दोघांना पिस्तुलांची विक्री केली होती. दोघांनाही अटक करत त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले. दरम्यान, हैदरकडे तपास सुरू असताना त्याने आणखी दोन पिस्तूल आणि चार काडतुसे असल्याची कबुली दिली होती, असे सोळुंके म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


येरवडा जेलचा बायोगॅस प्रकल्प पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

येरवडा जेलमध्ये दररोज निर्माण होणारी कचरा समस्या दूर करण्यासाठी जेलच्या परिसरात उभारण्यात आलेल्या बायोगॅस प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून लवकरच तो कार्यान्वित होणार आहे. पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती जेल सूत्रांनी दिली. त्यानंतर हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविला जाईल.

पुणे महानगर पालिका आणि येरवडा जेल यांच्या संयुक्त विद्यमाने जेलच्या मागील बाजूस बायोगॅस प्रकल्प बांधण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर अप्पर पोलिस महासंचालक तथा कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर, पालिका आयुक्त कुणाल कुमार, घनकचरा उपायुक्त सुरेश जगताप आणि पालिकेचे अधिकारी यांनी शुक्रवारी बायोगॅस प्रकल्पाची पाहणी केली.

जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या हजारो कैद्यांना दररोज नाश्ता, जेवण बनविण्यासाठी पंधरा सिलेंडर लागतात,तसेच स्वयंपाक गृहातून रोज दोन ते अडीच टन कचरा निर्माण होतो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कचऱ्याची विल्हेवाट लावणे अडचणीचे ठरत होते. या पार्श्वभूमीवर कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी पुढाकार घेऊन जेलची कचरा समस्या सोडविण्यासाठी बायोगॅस प्रकल्प उभारण्याची योजना आखली. शहरात देखील कचऱ्याची समस्या गंभीर बनली असल्याने ठिकठिकाणी बायोगॅस प्रकल्प उभारणे फायद्याचे आहे. त्या अनुशंगाने पालिका आणि जेल प्रशासनाने एकत्र येऊन हा प्रकल्प तयार केला आहे.

बायोगॅस उभारणीसाठी जेल प्रशासनाने परिसरातील आठ गुंठे जागा उपलब्ध करून दिली आहे. पालिकेने म्हणून नव्वद लाख रुपये खर्च करून पाच मेट्रिक टनाचा बायोगॅस प्रकल्प उभारले आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास जेल आणि आजूबाजूच्या परिसरातील कचऱ्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. यातून सुमारे १४० किलो गॅस म्हणजेच १४ घरगुती सिलेंडरचा गॅस निर्माण होणार आहे . बायोगॅसमधून निर्माण होणारा गॅसची पाइप लाइन थेट जेलच्या स्वयंपाक गृहाला जोडण्यात आली आहे . त्यामुळे जेलला कैद्यांसाठी स्वयंपाक बनविण्यासाठी लागणाऱ्या सिलेंडर संख्येत घाट होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आसपासच्या परिसरातील कचराकोंडी सुटणार

जेलमधून रोज साधारण पावणे दोन ते अडीच टन कचरा निर्माण होतो. पण बायोगॅस प्रकल्पाची क्षमता पाच मेट्रिक टन असल्याने तो पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी अजून अडीच टन कचरा लागणार आहे. त्यामुळे परिसरातील कचरा एकत्र करून येथे आणला जाईल. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील कचरा समस्या कायमची सुटेल, असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

जेल परिसरात आठ गुंठे जागेत उभारणी

बायोगॅस उभारणीकरिता पालिकेकडून नव्वद लाख रुपये खर्च

पाच मेट्रिक टन कचरा जिरविण्याची क्षमता

प्रकल्पातून १४० किलो गॅस तयार होणार

हा गॅस जेलमध्ये स्वयंपाक बनविण्यासाठी वापरणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकृत व्यावसायिकांवर बंधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तुळशीबाग परिसरातील सर्व प्रमाणपत्रधारक अधिकृत व्यावसायिकांना आता व्यवसाय करण्यापूर्वी पालिकेला 'प्रतिज्ञापत्र' सादर करावे लागणार आहे. या प्रतिज्ञापत्रातील माहितीशी विसंगती आढळल्यास संबंधित व्यावसायिक कारवाईस पात्र राहील, असे पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले.

गेल्या रविवारी तुळशीबागेत भर दुपारी झालेल्या हाणामारीनंतर पालिकेने सलग चार दिवस या परिसरात रस्त्यावर भरणारा बाजार बंद केला आहे. तसेच, येथील अधिकृत परवानाधारकांवर विविध बंधने घालण्यात आली आहेत.

तुळशीबाग परिसरात अनेकदा प्रमाणपत्र एखाद्याच्या नावावर असले, तरी व्यवसाय करणारी व्यक्ती दुसरीच असते. त्यातूनच अनेक वाद-विवाद उद्भवत असल्याने संबंधित प्रमाणपत्र धारकाकडून 'पालिकेकडून नेमून दिलेल्या जागेवर केवळ मीच व्यवसाय करीन. माझ्याकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास, पालिकेकडून केल्या जाणाऱ्या कारवाईस मी पात्र असीन,' अशा स्वरूपाचे प्रतिज्ञापत्र तुळशीबागेतील सर्व अधिकृत व्यावसायिकांकडून घेण्यात येणार आहे. हे प्रमाणपत्र दिल्यानंतरच व्यवसायाला परवानगी देण्यात येईल, असे अतिक्रमण विभागप्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.

मिर्झा गालिब रस्त्यावरही कारवाई

तुळशीबागेसह गुरुवारी पालिकेने गोटीराम भैय्या काची चौकापासून ते गोविंद हलवाई चौकापर्यंतच्या रस्त्यावरही अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई केली. चाळीसहून अधिक व्यावसायिकांवर झालेल्या कारवाईतून हातगाडी आणि इतर मालही जप्त करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आपला भारत’ येणार नव्या रूपात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विविधतेने नटलेला भारतीय समाज 'आपला भारत' या पुस्तक खंडातून मराठी वाचकांना सखोल पद्धतीने समजून घेता येणार आहे. 'आउट ऑफ प्रिंट' असलेली ही पुस्तके सोळा वर्षांनंतर पंचवीस भागांमध्ये नव्या स्वरूपात नव्या संदर्भांसह जूनच्या पहिल्या आठवड्यात वाचकांपुढे येत आहे.

दिलीपराज प्रकाशनच्या राजीव बर्वे यांनी या विषयी 'मटा'ला माहिती दिली. लेखक राजा मंगळवेढेकर यांनी भारतभर फिरून 'आपला भारत' हा पुस्तकांचा खंड लिहिला होता. भारतातील पर्यटन, समाज, इतिहास, संस्कृती, लोकाचार, कला, भाषा-साहित्य, विकास या सर्व अंगांनी सविस्तर विचार करण्यात आला आहे. नवी आवृत्ती प्रकाशित करताना सुभाष फडके यांनी भारतभर फिरून नवीन संदर्भ त्यात दिले आहेत. मंगळवेढेकर यांनी लिहिलेल्या मूळ पुस्तकात सुमारे चाळीस टक्के बदल करण्यात आले आहेत. भारतातील सर्व राज्यांचा आढावा या खंडात घेण्यात आला आहे.

'देश समजावून घेण्याच्या दृष्टीने 'आपला भारत' हा उपयुक्त खंड आहे. ठराविक काळाने पिढी बदलते. नवीन जिल्हे, राज्यांची निर्मिती होते. लोकसंख्या वाढल्याचा परिणाम संस्कृतीवर होतो. हे बदल टिपणे महत्त्वाचे असते. त्यामुळे नव्या आवृत्तीत सुभाष फडके यांनी सविस्तरपणे हे सर्व तपशील दिले आहेत. उत्तम आशयासह त्याला सुमारे शंभरहून अधिक फोटोंची जोड देण्यात आली आहे. हे खंड विद्यार्थी, अभ्यासकांसाठी उपयुक्त आहेत. या पूर्वीच्या दोन्ही खंडांना वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता,' असे बर्वे यांनी सांगितले.

नव्या संदर्भांचा समावेश

आपला भारत १९८०मध्ये सर्वप्रथम पंधरा भागांसह तो वाचकांपुढे आला होता. त्यानंतर १९९९मध्ये त्याचे वीस भाग करण्यात आले. आता सोळा वर्षांनी तो पंचवीस भागांमध्ये पुन्हा प्रकाशित करण्यात येत आहे. नव्याने प्रकाशित करताना त्यात बरेच बदल आणि नवीन संदर्भ देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जाणता राजा’ निघाले लंडनला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द उलगडणारे 'जाणता राजा' हे महानाट्य आता लंडनमध्ये प्रयोग करणार आहे. भारतातील आदर्श राजा या संकल्पनेतून शिवाजी महाराजांचे जीवनपट लंडनवासीयांसमोर जिवंत होणार आहे. अमेरिकेत यशस्वी प्रयोग केल्यानंतर पंधरा वर्षांनी हे नाट्य परदेश वारी करणार आहे.

लंडनमधील वेम्ब्ली एरिना या प्रसिद्ध सभागृहामध्ये येत्या २०आणि २१ जूनला महानाट्याचे हिंदीतील दोन प्रयोग होणार आहेत. 'बँक ऑफ बडोदा'ने यासाठी अर्थसाह्य केले असून, गुजरात पर्यटन विकास महामंडळाने प्रायोजकत्व दिले आहे. गुजरातमधील शंतनू सुखदेवकर आणि धैर्यशील पाटील हे या नाटकाचे संयोजक असून, चेतन हरपळे लंडनमध्ये संयोजन करीत आहेत.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिहिलेल्या जाणता राजा या महानाट्याने इतिहास घडविला आहे. हत्ती, घोडे, पालख्या आणि शेकडो कलाकारांच्या संचासह सादर होणाऱ्या या नाटकातून शिवकाळाची अनुभूती मिळते. आत्तापर्यंत मराठी, हिंदी, तामीळ अनेक भाषांमध्ये या नाटकाचे शेकड्याने प्रयोग झाले आहेत. 'देशभरातील अकरा राज्यात प्रयोग केल्यानंतर हे महानाटक आता लंडनला निघाले आहे.

'जाणता राजा'चा एक प्रयोग अमेरिकेमध्ये पंधरा वर्षांपूर्वी झाला होता. त्या वेळी २२ कलाकार तिकडे गेलो होते. लंडनमधील प्रयोगाला पुण्यातून ५० कलाकार सहभागी होणार आहेत. याशिवाय तेथील मराठी, हिंदी, तमीळ आणि पंजाबी मुले नाटकात काम करणार आहेत. सध्या प्रतिष्ठानचे काही कार्यकर्ते लंडनला गेले असून, त्यांच्याबरोबर मुलांची रंगीत तालीम सुरू आहे. नाट्य सादरीकरणामध्ये रंगमंचावर साधारणतः दीडशे कलाकारांचा सहभाग असेल,' अशी माहिती महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे महासचिव डॉ. अजित आपटे यांनी दिली.

'लंडनच्या प्रयोगासाठी आम्ही नवीन सेट बनवला असून, तो चार दिवसांपूर्वीच जहाजाने रवाना झाला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात तो पोहोचेल. वेम्ब्ली एरिना हे सभागृह भव्य आहे, साधारणतः दीड हजारांपर्यंत प्रेक्षकांची त्याची क्षमता आहे. त्यामुळे अनेक लोकांना हे महानाट्य अनुभवण्याची संधी मिळणार आहे. नाटक हिंदीतून सादर होणार असल्याने लंडनस्थित सर्व भारतीयांना त्याचा आनंद घेतला येईल. भारताचा सर्वात मोठा राजा या संकल्पनेतून हे नाटक सादर होणार आहे,' असे आपटे यांनी सांगितले.

वेम्ब्ली एरिना या भव्य सभागृहात साधारणतः दीड हजार प्रेक्षक उपस्थित राहू शकतात. त्यामुळे अनेक लोकांना हे महानाट्य अनुभवण्याची संधी मिळणार आहे. नाटक हिंदीतून सादर होणार असल्याने लंडनस्थित सर्व भारतीयांना त्याचा आनंद घेतला येईल. भारताचा सर्वांत मोठा राजा या संकल्पनेतून हे नाटक सादर होणार आहे.

- डॉ. अजित आपटे, महासचिव, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मच्छिंद्र खराडेंविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

शिवसेनेचे पुणे जिल्ह्याचे माजी प्रमुख मच्छिंद्र खराडे यांच्या विरोधात येथील शहर पोलिस स्टेशनात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सगळे राजकीय द्वेषातून झाल्याचे खराडे यांचे म्हणणे आहे.

सुनील गवरू दरेकर (रा. सांताक्रूझ, मुंबई) यांनी गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता या प्रकरणी फिर्याद दिली असून, मच्छिंद्र खराडे व नरेश गौर यांच्या विरोधात ३८४, ३२३, ५०४, ५०६, ३४ या कलमांअतर्गत खंडणी मागणे, मारहाण करणे, जिवे मारण्याची धमकी देणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील दरेकर यांचा जाहिरातींचा व्यवसाय असून, ते खंडाळा परिसरात भिंतींवर व फलकांवर जाहिरात करतात. खराडे यांनी या कामासाठी दरेकर यांच्याकडे खंडणी मागण्यास सुरुवात केली. त्यानुसार दरेकर यांनी मागील चार वर्षांपासून महिना २५ हजार रुपये याप्रमाणे पैसे दिले. परंतु मागील काही महिन्यांपासून त्यांचा व्यवसाय तोट्यात असल्याने गेले तीन महिने त्यांनी २० हजार रुपये याप्रमाणे पैसे दिले.

त्याचा राग मनात धरून खराडे व त्यांचा सहकारी नरेश गौर यांनी दरेकर व त्यांचा कामगार विशाल खिलारे यांना हाताने तोंड, डोके, छाती आणि पोटावर मारहाण करून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली, असेही लोणावळा शहर पोलिसांनी सांगितले. फौजदार चंद्रकांत कांबळे तपास करत आहेत.

चार लाखांची घरफोडी

पिंपरीः चिंचवड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या इमारतीमध्ये चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी विश्वास मनोहर आपटे (५५, रा. गोखले पार्क, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपटे यांचे भाचे शैलेश आपटे चिंचवडगावात गोखले पार्क येथे राहतात. आपटे त्यांच्या घराला कुलूप लावून कामानिमित्त गावी भुसावळला गेले होते. चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंतच्या वेळेत दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून घरात शिरकाव केला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा चार लाख रुपयांचा ऐवज घेऊन चोर पळून गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दगडफेकीमागील सूत्रधार वेगळेच’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'बोपखेल रस्त्याच्या वादाला गुरुवारी हिंसक वळण लागले. काही समाजकंटकांनी हायकोर्टाच्या आदेशाबाबत ग्रामस्थांमध्ये गैरसमज पसरवले. दगडफेक करणाऱ्यांपैकी अनेक जण आसपासच्या गावातील होते. त्या दगडफेकीमागील मुख्य सूत्रधार दुसरेच असून, त्यांची चौकशी व्हावी,' अशी मागणी आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पिंपरी (२२ मे) येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली.

लष्कराच्या हद्दीतील रस्त्यावरून बोपखेलमध्ये गुरुवारी झालेला लाठीमार आणि दगडफेकीत जखमी झालेल्या ग्रामस्थांची आणि पोलिसांची भेट घेण्यासाठी डॉ. गोऱ्हे शहरात आल्या होत्या. त्यांच्यासमवेत आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख राहुल कलाटे होते. त्यांनी पिंपरीतील वायसीएम हॉस्पिटलमध्ये जखमी आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. तसेच दगडफेकीत गंभीर जखमी झालेले आणि सध्या अत्यवस्थ असलेले पोलिस हवालदार रामदास बांगर यांची भोसरी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली.

आमदार गोऱ्हे म्हणाल्या, 'हा अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न आहे. आंदोलनाला हिंसक वळण लागल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. यामध्ये २००पेक्षा जास्त ग्रामस्थ आणि शेकडो पोलिस जखमी झाले. कोर्टाच्या आदेशाची अपुरी आणि अयोग्य माहिती काहींनी ग्रामस्थांपर्यंत पोहोचवली. त्यामुळे आंदोलन चिघळले. कोर्टाने प्रवेशद्वार बंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर अनेक बैठका झाल्या. दरम्यान, जिल्हाधिकारी, महापालिका यांनी धोरणात्मक निर्णय घेणे महत्त्वाचे होते. परंतु तसे झाले नाही. ग्रामस्थांमध्ये गैरसमज पसरवणारे छुपे सूत्रधार वेगळेच असून, या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.'

या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. तसेच संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा काढावा, अशी विनंती आपण त्यांना केली आहे. हा प्रश्न मार्गी लागेपर्यंत तात्पुरता तोडगा काढायला हवा. तोपर्यंत ग्रामस्थांना मुख्य रस्त्यापर्यंत एखादी मोफत बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचनाही गोऱ्हे यांनी केली. ग्रामस्थांनी कायदा हातात न घेता संयम राखावा, तसेच याबाबत लष्कराला दोषी ठरवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. 'गुरुवारच्या धुमश्चक्रीत एखाद्या पोलिस अधिकाऱ्याने चुकीची भूमिका घेतली असेल, तर सखोल चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई व्हावी,' अशी मागणीही त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अटकेतील नागरिकांच्या सुटकेसाठी धांदल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

रस्त्याविषयीच्या आंदोलनातून उडालेल्या धुमश्चक्रीनंतर पोलिसांनी एकूण १८९ लोकांविरोधात गुन्हा दाखल करून जवळपास पावणेदोनशे जणांना अटक केली होती. त्यातील १८ जणांना शनिवारपर्यंत (२३ मे) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तर १३ अल्पवयीन आंदोलक मुलांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आंदोलकांपैकी पोलिस कोठडी आणि न्यायालयीन कोठडीत असलेल्यांच्या सुटकेसाठी अन्य गावकऱ्यांची शुक्रवारी चांगलीच धांदल उडाली होती. पुण्यातील पोलिस ठाण्यांमधील तुरुंगात १८ जणांना ठेवण्यात आले असून, ७४ महिला आणि ८० जणांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.

श्रीरंग ज्ञानोबा दोधाडे (५०), गुलाब भीमराव भालेराव (२७), अमित हनुमंत घुले (२७), रोहन शांताराम घुले (३१), विकास दुदाम गोगावले (५७) अमर नरेश वाल्मिकी (२०), रवींद्र गुलाब घुले (३६), दत्तात्रय ज्ञानोबा घुले (४०), प्रभाकर तुकाराम सरवदे, चेतन श्रीकृष्ण देवकर (४५), सुमित विजय कदम (२२), दीपक पाटीलबुवा घुले (३०), इसान मोहम्मद शेख (३४), शाम कालीचर मेवाती (३८), संदीप धोंडिबा चौघुले (३१), राहुल ललनकुमार धुसिया (२४), निखिल सुरेश घुले (२५, सर्व रा. बोपखेल), बाबू शंकर राठोड (३०, रा. इंदिरानगर, चिंचवड) अशी पोलिस कोठडीत ठेवण्यात आलेल्या आंदोलकांची नावे आहेत.

२८ पोलिस अधिकारी-कर्मचारी जखमी झाले असून, यामध्ये दोन सहायक पोलिस आयुक्त, वरिष्ठ निरीक्षक, सहायक निरीक्षक, फौजदार आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नागरिकदेखील मोठ्या संख्येने जखमी झाले आहेत.

गावातील चौकांमध्ये, रस्त्यांवर दगड, बाटल्या, चपलांचा पडलेला खच शुक्रवारीही कायम होता. दंगल, सरकारी कर्मचारी-अधिकारी यांना जिवे मारण्याचा प्रयत्न यासह विविध गंभीर गुन्हे आंदोलकांवर दाखल करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संताप पसरला आहे; मात्र या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने लष्कर या आंदोलनापासून काही पावले लांबच होते. सैन्य आणि आंदोलक जर समोरासमोर आले असते, तर गंभीर परिणामांना सामोरे जाऊ लागले असते, असे मत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नद्यांची जलगुणवत्ता सुधारण्यासाठी संशोधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील प्रमुख नद्यांची जलीय गुणवत्ता सुधारण्यासाठी जागतिक दर्जाचे संशोधन केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन असून त्यांतर्गत 'रिव्हर वॉटर क्वालिटी मिशन' हाती घेण्यात येणार आहे. नद्यांमधील प्रदूषण कमी करून त्यांचे जैविक मूल्यमापन, स्थानिक पातळीवर नद्याजोड, रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी धोरण अशा विविध पातळ्यांवर हे संशोधन केंद्र काम करणार आहे.

राज्यात प्रथमच अशा प्रकारचे संशोधन केंद्र स्थापन करण्याचा विचार होत आहे. या संशोधन केंद्रासाठी प्रमुख संचालक नेमण्यात येणार आहे. त्याचबरोबरच मुख्य संशोधक व मुख्य अभियंत्यांची नेमणूक करण्याचे प्रस्तावित आहे. या केंद्राच्या रचनेमध्ये प्रधान संशोधक (हायड्रॉलॉजी), प्रधान संशोधक (केमिस्ट्री), प्रधान संशोधक (मायक्रोबायोलॉजी) व प्रधान संशोधक (इन्स्ट्रुमेंटेशन) यांचा तसेच अधीक्षक अभियंता (सिव्हील) व तांत्रिक अधिकारी (पर्यावरण) यांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे.

राज्यातील प्रमुख नद्या प्रदूषित होत आहेत. वाढत्या शहरांतील सांडपाणी व उद्योगांमधील घातक रसायने थेट नद्यांमध्ये सोडली जात आहेत. त्यामुळे नद्यांमधील जैवविविधता धोक्यात आली आहे. 'वॉटर क्वालिटी हॉट स्पॉटस इन इंडिया' या अहवालात देशातील ३८३ नद्यांवरील १,०८५ स्थळे प्रदूषित झाल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्रातील गोदावरसह अन्य काही नद्यांचा समावेश आहे. प्रदूषणामुळे नद्यांचा श्वास कोंडला आहे.

नद्यांचा जलशास्त्रीय अभ्यास व प्रदूषणमुक्त प्रवाही नद्या करण्यासाठी रिव्हर वॉटर क्वालिटी मिशन हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी संशोधन केंद्र स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. या केंद्राद्वारे प्रादेशिक व जिल्हा पातळीवर नद्यांची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा स्थापन करणे, त्या माध्यमातून नद्यांच्या प्रदूषण पातळीचा डेटाबेस तयार करण्याचे काम केले जाणार आहे. नद्यांचे जैवशास्त्रीय मूल्यमापन तसेच पूर व अन्य काळातील नद्यांमधील पाण्याच्या प्रवाहाची माहिती आणि पुराच्या पाण्याचा भविष्यातील वापर यावरही हे केंद्र काम करणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी धोरण तसेच गावांमधील शाश्वत पाणी व्यवस्थापनाचे कार्यही या केंद्राद्वारे करण्याचे प्रस्तावित आहे.

धार्मिक कार्यक्रमांसाठी जलगुणवत्ता माहिती शक्य

जलीय गुणवत्तेसाठी स्थापन करण्यात येणारे हे संशोधन केंद्र कुंभमेळा व नदीकाठावर होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांपूर्वी नद्यांमधील गुणवत्तेची माहिती देण्यासही मदत करू शकणार आहे. गोदावरी, कृष्णा, वैनगंगा, नर्मदा, तापी व अन्य काही नद्यांच्या काठांवर धार्मिकस्थळे आहेत. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी नद्यांमधील पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी व त्याचा डेटाबेस या केंद्रामार्फत ठेवता येणे शक्य असल्याचे या संबंधी तयार झालेल्या प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोळशाच्या ट्रकला आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

शेवाळेवाडी येथील जकात नाक्यावर कोळशाने भरलेल्या ट्रकने शुक्रवारी रात्री अचानक पेट घेतला. अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याने संभाव्य अनर्थ टळला. कर्नाटकहून मुंबईला चाललेला ट्रक (एमएच १२ एवाय ४२३३) कोळशाच्या पोत्यांनी भरला होता. रात्री साडेनऊच्या सुमारास हा ट्रक शेवाळेवाटी जकात नाक्यावर थांबला असताना, ट्रकच्या मागील बाजूने धूर येत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने चालकाच्या ही बाब लक्षात आणून देताच, ट्रकमधील कोळशाने पेट घेतला. त्यानंतर संबंधितांनी तातडीने अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी सुमारे पाऊण तासात ही आग आटोक्यात आणली. आग लागल्याचे नेमके कारण मात्र, रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुरुषांनी पुरुषी अहंकार त्यागावा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुरुषी मानसिकतेमुळे शहराबरोबरच आज ग्रामीण भागातील महिलाही सुरक्षित नाहीत. महिलांवर होणाऱ्या या अत्याचारांच्या विरोधात पुरुषांनी पुरुषी अहंकार बाजूला ठेवून महिलांबरोबर एकत्र येऊन लढा द्यावा, असे आवाहन स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्ष, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

शहरातील विविध सामाजिक संघटनांतर्फे आयोजित सभेत अरुणा शानबाग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अंगणवाडी कर्मचारी सभेचे नितीन पवार, महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या सुमन टिळेकर, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक, मिळून साऱ्याजणी मासिकाच्या संपादिका गीताली वि. म., विद्या बाळ, मिनी बेदी आदी या वेळी उपस्थित होते.

स्त्रियांची सुरक्षितता हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे. महिलांवर होणारा अत्याचार रोखण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघांनी एकत्र येऊन कार्य केले पाहिजे. पुरुषांमध्ये असणाऱ्या पुरुषी अहंकाराला बाजूला ठेवून समाजात होणाऱ्या महिलांवरील अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी सर्व पुरुषांनी एकत्र यावे, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले. नर्सेससाठी हॉस्पिटलमध्ये दक्षता समिती स्थापन करावी. त्यात डॉक्टर, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पॅरामेडिकल पॅनेल अशा एकूण सात सदस्यांची समिती असावी, असेही त्या म्हणाल्या. या पुढील काळात बलात्कार होणार नाहीत, या उद्देशाने कार्य केले पाहिजे. बलात्कार झालेल्या महिलेला समाजात मानाचे स्थान दिले गेले पाहिजे. पुरुषांनी अशा महिलांबरोबर विवाह करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन गीताली वि. म. यांनी केले. तर, या घटना टाळण्यासाठी स्त्री-पुरूष समतेच्या दिशेने पाऊल टाकणे गरजेचे असल्याचे पवार यांनी सांगितले.

कामावर असताना महिलांना संरक्षण मिळणार का, या प्रश्नावर आजही आम्हाला लढा द्यावा लागत आहे. आतादेखील हॉस्पिटलमधील नर्सेसला कोणत्याही प्रकारचे संरक्षण दिले जात नाही. समाजात महिलांना संरक्षण नसेल, तर अशा अनेक शानभाग निर्माण होतील.

- गीताली वि. म.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीच्या ऑनलाइन ऑफर्सपासून सावधान!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'भारतातील विख्यात उद्योगसमूहात विविध पदे तातडीने भरायची आहेत. त्यासाठी ऑनलाइन पाहणीतून तुम्ही शॉर्टलिस्ट झाला आहात. तुमची मुलाखत बेंगळुरू येथे होणार असून, त्यासाठी येण्या-जाण्याचे विमानभाडे कंपनी तुम्हाला देणार आहे. यासाठी अनामत रक्कम म्हणून ८७०० रुपये विशिष्ट खात्यात तातडीने भरा....'

...अशा आशयाचे 'ई मेल' आल्यास हुरळून जाऊ नका. सावधान! तुमची फसवणूक होत आहे.

शेकडो उच्चशिक्षित उमेदवारांची याद्वारे फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. काही उमेदवारांना कोणत्याही कंपनीत अर्ज न करताच बड्या समूहाच्या नावाने बनावट 'ई मेल' पाठविण्यात येत आहे. यामध्ये या समूहासह त्यातील विविध कंपन्यांच्या माहितीचा; तसेच त्यामध्ये भरण्यात येणाऱ्या पदांच्या माहितीचा समावेश असतो. या पदांमध्ये वरिष्ठ कार्यकारी अधिकारी, इंजिनीअर, दंतवैद्यकीय; तसेच वैद्यकीय अधिकारी, पायलट, फॅशन डिझायनर, मेडिकल रिप्रेझेंटिटिव्ह आदी पदांचा समावेश आहे.

'समूहातर्फे वार्षिक ऑनलाइन पाहणीतून तुमच्या अर्जाची निवड झाली आहे. तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी, विशिष्ट प्रकल्पांसाठी तुम्ही केलेले काम या आधारे तुमची थेट मुलाखतीसाठी निवड झाली आहे. कंपनीच्या रिक्रूटमेंट मॅनेजरने कंपनीच्या निवड समितीला तुमच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे तुमची निवड जवळपास नक्की आहे. तुम्हाला सुमारे ३४ हजार रुपयांपासून पुढे वेतन दिले जाईल,' अशा माहितीचा या 'ई-मेल'मध्ये समावेश आहे.

'या सर्व पदांसाठीच्या मुलाखती समूहाच्या नियम आणि निकषांनुसारच होतील. निवड झालेल्या उमेदवारांना संयुक्त अरब अमिरातीमध्ये एक महिन्याचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक असते. तुमची मुलाखत कंपनीच्या बेंगळुरूमधील ईपीआयपी इंडस्ट्रियल एरियामधील ऑफिसमध्ये घेण्यात येईल. त्यासाठीची तारीख आणि वेळ, मुलाखतीची प्रक्रिया याचाही यात उल्लेख या 'ई-मेल' मध्ये असतो. उमेदवारांना मुलाखतीसाठी विमानाने येण्या-जाण्याचा खर्च कंपनीतर्फे देण्यात येईल,' असाही उल्लेख या 'ई मेल'मध्ये आहे.

मात्र, मुलाखतीसाठी ८७५० रुपये अनामत रक्कम फक्त राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत कंपनीच्या अकाउंट्स मॅनेजरच्या खात्यात भरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 'बोगस उमेदवार टाळण्यासाठी कंपनीच्या धोरणानुसार हे पैसे घेण्यात येतील; तसेच मुलाखत झाल्यानंतर बँकेत पैसे भरल्याची प्रत (चलन) दाखविल्यानंतर उमेदवारांना हे पैसे परत देण्यात येतील. उमेदवाराची नोकरीसाठी निवड न झाल्यासही हे पैसे परत मिळतील. त्यामुळे कंपनीचे रिक्रूटमेंट मॅनेजर वगळता कोणीही याविषयी माहिती देऊ शकणार नाहीत,' अशी मखलाशीही करण्यात आली आहे. मात्र, मुलाखतीसाठी अशा प्रकारे पैसे आकारण्यात येत नसल्याने हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे स्पष्ट होत आहे.

बड्या कंपन्यांच्या नावे फसवणूक

बड्या कंपन्यांच्या नावाने फसव्या 'ई-मेल' येत आहे. यासाठी सोशल नेटवर्किंग साइटवरील माहितीचा वापर होत असल्याची शक्यता आहे. बड्या कंपनीतर्फे स्वतःहून 'ई मेल' आल्याने हुरळून जाऊन अनेक उमेदवार फसवणुकीला बळी पडत आहेत.

महत्त्वाच्या गोष्टी

कोणतीही कंपनी अर्ज केल्याशिवाय मुलाखतीसाठी स्वतःहून निवड करत नाही.

कोणतीही कंपनी मुलाखतीसाठी अनामत रक्कम मागत नाही.

अशी 'ई-मेल' आल्यास सायबर क्राइम विभागाशी संपर्क साधा.

संबंधित कंपनीलाही याबाबत माहिती द्या.

कोणत्याही परिस्थितीत मुलाखतीसाठी पैसे भरू नका.

ई-मेलवरील मजकूर गुगलवर टाकून येणारे परिणाम पाहा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीमेवर सैन्य; आत पोलिस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'सीएमई'मधून जाणारा रस्ता नागरिकांसाठी खुला करावा या मागणीवरून गुरुवारी बोपखेलमध्ये उडालेल्या धुमश्चक्रीमुळे शुक्रवारीही गावकरी तणावात होते. सायंकाळी उशिरापर्यंत एकही व्यक्ती घरातून बाहेर पडली नव्हती. गावाच्या सीमेवर सैन्य, तर आत पोलिस अशी स्थिती निर्माण झाल्याने सर्वत्र शांतता पसरली होती. गावात जमावबंदी लागू करून कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे; मात्र, नागरिकांनी आपले दैनंदिन व्यवहार सुरू करावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आंदोलक-पोलिस यांच्यात झालेल्या संभ्रमातून आणि लाठीमार-दगडफेक यामुळे २८ पोलिस आणि १० नागरिक गंभीर जखमी झाले. या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी मोठी धरपकड करून शेकडो लोकांना अटक केली. त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशीदेखील जाणवत होता. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते.

दुधाच्या दुकानांपासून दवाखान्यापर्यंत सर्व प्रकारचे व्यवसाय बंद होते. गावातील चावडी ओस पडली होती. गावातील मारुती मंदिरात नेहमी खेळणारी मुले घरांच्या खिडकीच्या फटीतून, ये-जा करणाऱ्या पोलिसांकडे भेदरलेल्या नजरेने पाहत होती. गावातील प्रमुख लोकांना पोलिसांनी गुरुवारच्या आंदोलनामुळे अटक केली आहे. त्यामुळे जवळपास प्रत्येक घरातील एक माणूस तरी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

खासदार अमर साबळे गावात आल्यावर गावातील काही महिला, लहान मुले आणि वृद्धांना मारुती मंदिरात घेऊन आले. त्यांच्याशी काही काळ बोलल्यानंतर सर्व जण पुन्हा घरात निघून गेले. संपूर्ण गाव घाबरलेल्या स्थितीत असून, अजून रस्त्याबाबत कोणताच तोडगा निघू शकलेला नाही. अटक केलेले आंदोलक जोपर्यंत घरी परतत नाहीत, तोपर्यंत बंद कायम ठेवण्याची तयारी गावकऱ्यांनी चालवली आहे.

'नागरिकांनी दैनंदिन व्यवहार चालू करावेत. बंद पाळू नये,' असे आवाहन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केले आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी स्पीकरवरून दैनंदिन व्यवहार सुरू करण्याचे आवाहन करूनदेखील त्याला लोकांनी प्रतिसाद दिला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामनदी नाला नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रामनदी हा नाला नसून, स्वतंत्र नदी असल्याची जाहीर कबुली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अखेर हरित न्यायाधिकरणासमोर दिली. रामनदीचा उगम झाल्यापासून मुळा नदीतील तिच्या संगमापर्यंतचा मार्ग निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमावी, नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी लागणारा पैसा केवळ सरकारी तिजोरीतून नव्हे तर तिचे मूळ पात्र बदलणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांकडून वसूल करावा, असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिले आहेत.

बावधन भागातील रहिवासी इंदू गुप्ता आणि प्रगती कौशल यांनी रामनदीतील अतिक्रमणाच्या विरोधात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणांकडे याचिका दाखल केली आहे. यामध्ये पुणे महापालिका, राज्य सरकार, जिल्हाधिकारी, पुण्याचे विभागीय आयुक्त, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे विभागाचे मुख्य अभियंता आणि राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक आदींना प्रतिवादी करण्यात आले. या संदर्भात न्यायाधिकरणासमोर शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती विकास किनगांवकर आणि डॉ. अजय देशपांडे यांनी महापालिका आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कारभारावर ताशेरे ओढले.

पाटबंधारे विभागाने रामनदीच्या मार्गावर अद्याप पूररेषा का आखलेली नाही, हा प्रश्न उपस्थित करीत न्यायाधिकरणाने महापालिकेला तातडीने उच्चस्तरीय समिती नेमण्याचे आदेश दिले. या उच्चस्तरीय समितीने रामनदीच्या उगमापासून ते मुळा नदीला मिळेपर्यंतचा मार्ग निश्चित करावा, तिची पूररेषा आणि अतिक्रमणे याचा अहवाल सादर करावा, असे न्यायाधिकरणाने स्पष्ट केले. रामनदीच्या पुनरुज्जीवनाचा खर्च केवळ सरकारी तिजोरीतून नव्हे, तर या नदीचे मूळ पात्र बदलणाऱ्या, तिच्या प्रवाहात राडारोडा टाकणाऱ्या प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाकडून वसूल करावा, असे आदेशही न्यायाधिकरणाने दिले असे गुप्ता यांनी सांगितले. दरम्यान पुणे महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पाटबंधारे विभागाने त्यांचे अहवाल न्यायाधिकरणाकडे सादर केले.

'रामनदीच्या पुरामुळे मोठे नुकसान'

वादग्रस्त ठरलेल्या रामनदीला २०१०मध्ये मोठा पूर आला होता. यामुळे रामनगर कॉलनीतील साईकमल सोसायटीत पाणी शिरले. 'माझ्या घरात सहा फूट पाणी होते. त्यामुळे २५ लाख रुपयांचे तर, सोसायटीचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले. यानंतर आम्ही महापालिका, जिल्हाधिकाऱ्यांकडे सातत्याने नदीतील अतिक्रमणाचा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला. रामनदी हा नाला नसून, त्याचे पात्र मोठे करा अशी मागणी वारंवार केली. अखेर उपोषणाला बसल्यावर प्रशासनाने नदीपात्राचा काही प्रमाणात विस्तार केला. मात्र गेल्या वर्षी आमच्या परिसरात नव्याने सुरू झालेल्या बांधकाम प्रकल्पाचा राडारोडा पुन्हा नदीत फेकला गेला. यामुळे पात्रात डोंगर तयार झाले. रामनदीला या विळख्यातून सोडविण्यासाठी अखेर आम्ही हरित न्यायाधिकरणाकडे दाद मागावी लागली, असे इंदू गुप्ता यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांना अजूनही दुय्यम दर्जा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महिला स्वावलंबी झाल्या; त्या पुरुषांच्याबरोबरीने विविध क्षेत्रात कार्यरत आहे, असे गोंडस चित्र सरकारतर्फे भासवले जात आहे. प्रत्यक्षात पुरुष आजही 'बॉस'च्या भूमिकेत असून ६३ टक्के महिलांना कारकुनी कामातच अडकविण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे भारतातील स्त्री पुरुषांच्या वेतनातील असमानता ३५ टक्के एवढी इतकी मोठी आहे.

महिलांना पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकत नाही, ही मानसकिता उद्योजकांबरोबरच पुरुष सहकाऱ्यांमध्ये बदलली नाही. त्यामुळे नोकरी करणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढताना दिसले तरी त्या कारकूनी अथवा सपोर्ट सिस्टिममध्येच काम करीत आहे. अधिकारपदापर्यंत पोहोचलेल्या महिलांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत अवघे ३३ टक्के आहे, असा निष्कर्ष युनायटेड नेशन्सच्या अहवालातून पुढे आला आहे.

जगभरातील महिलांच्या प्रगतीचे वास्तव उलगडणारा 'द प्रोगेस ऑफ ऑफ वर्ल्ड वुमन २०१५-१६' हा अहवाल युनायटेड नेशन्सने नुकताच प्रसिद्ध केला आहे. 'स्त्रीपुरुष समानता' या विषयावर बीजिंगमध्ये वीस वर्षांपूर्वी चौथी जागतिक परिषद झाली होती. नंतर या विषयाला केंद्रस्थानी ठेवून हा जागतिक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. बीजिंगच्या परिषदेनंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक स्त्री-पुरुष समानतेच्या लढ्यासाठी एकत्र आले आहेत. या अहवालामध्ये जगभरातील प्रगत, विकसनशील आणि अविकसित देशांमधील महिलांच्या सद्यस्थितीचे वास्तव उलगडण्यात आले आहेत.

जगभरात महिला वेगेवगळ्या क्षेत्रात प्रगती करीत असल्याचे दिसते आहे. पण तळागाळातील महिलांचा सारासार विचार केल्यास महिला आजही असमानातच्या लढ्यात पुरुषांपेक्षा मागेच आहेत. जगभरात महिला आणि पुरुषांच्या उत्पन्नात आजही २४ टक्के तफावत असून भारतात हे प्रमाण ३५ टक्के आहे, मुले असूनही नोकरी करणाऱ्या महिलांचे उत्पन्नाची तफावत ४० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

'मुलांनाही सांभाळण्याची जबाबदारी आईची, हे मान्य असले तरी हा प्रवास तिच्यासाठी शिक्षेसमान झाला आहे. सरकारी यंत्रणा अथवा कंपन्या महिलांना प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देत नसल्याने जगभरातील लाखो महिलांची प्रगती खुंटते आहे. सरकारने आईला मुलाचे संगोपन करताना नोकरीत अडथळे येणार नाही, अशा योजना राबविल्या पाहिजेत,' असे मत 'युएन वुमन'च्या कार्यकारी संचालक फुमझिल मलाम्बो-नॅग्युका यांनी व्यक्त केले.

अहवालातील प्रमुख बाबी

विनामोबदला आणि घरगुती कामांमध्ये

महिलांपुरुषांपेक्षा सात पटीने जास्त काम करतात

घरातील मौल्यवान संपत्तीवर ६० टक्के महिलांचे नाव नाही

जगभर स्त्री-पुरुष उत्पन्नातील तफावत सरासरी २४ टक्के

अग्नेय आशियायी देशांमध्ये ही तफावत ३३ टक्के

अधिकार पदावर काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण अवघे ३३ टक्के

जगभरात ५३ कोटी घरगुती काम करणाऱ्यांमध्ये ८३ टक्के प्रमाण महिलांचे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तुळशीबाग ‘नो हॉकर्स झोन’?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तुळशीबागेत रस्त्यावर भरणारा बाजार पालिकेने सक्तीने बंद केल्यापासून रस्ता मोकळा होण्यासह पथारी आणि फेरीवाल्यांमध्ये होणाऱ्या वादांनाही पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे, तुळशीबागेचा संपूर्ण परिसरच 'नो हॉकर्स झोन' अंतर्गत समाविष्ट करण्याच्या दृष्टीने चाचपणी केली जाणार आहे.

तुळशीबाग परिसरात गेल्या रविवारी रस्त्यावर व्यवसाय करण्यातून हाणामारी झाली. काही वर्षांपूर्वी पथारी मांडण्यावरून विश्रामबागवाड्यासमोर खूनही झाला होता. या परिसरातील अतिक्रमण सातत्याने वाढत असल्याने त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने हा संपूर्ण परिसरच 'नो हॉकर्स झोन' म्हणून जाहीर करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या विचाराधीन आहे. 'नो हॉकर्स झोन' म्हणून जाहीर केलेल्या रस्त्यांवर कोणताही व्यवसाय करण्यास अनुमती नसल्याने तुळशीबाग परिसरात जागेवरून उद्भवणारे वाद कायमस्वरूपी बंद होतील, अशी अपेक्षा केली जात आहे.

गेल्या रविवारी झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर पालिकेने दैनंदिन स्वरूपात कारवाई करून एकाही पथारी व्यावसायिकाला व्यवसाय करण्यास अनुमती दिलेली नाही. या परिसरात त्याचा चांगला परिणाम दिसून येत असून, नेहमीच गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या तुळशीबागेत फिरणाऱ्या नागरिकांना सध्या मोकळा श्वास घेता येत आहे. पालिकेने सलग चार दिवस तुळशीबाग बंद ठेवली असली, तरी कारवाईतील सातत्य कायम राहणार का, अशी विचारणा केली जात आहे.

तुळशीबागेतील ३२५ व्यावसायिकांचे काय होणार?

तुळशीबाग परिसरात पालिकेने अधिकृतरित्या सर्वेक्षण करून नोंदणी प्रमाणपत्र दिलेल्या व्यावसायिकांची संख्या सव्वातीनशेच्या आसपास आहे. पालिकेने तुळशीबागेचा परिसर 'नो हॉकर्स झोन' म्हणून जाहीर केला, तर या सर्व व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी पालिकेवर असेल. त्यादृष्टीने, कोणत्या जागा व्यवहार्य ठरू शकतात, याची चाचपणी केली जावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मीटरद्वारे समान पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील विषम पाणीपुरवठ्यावरून सातत्याने होणारी चर्चा थांबविण्यासाठी पालिका हद्दीत अहोरात्र २४x७ समान पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावाला पालिकेच्या सर्वसाधारण सभेने एकमताने मंजुरी दिली. त्यासाठी सुमारे २८०० कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येणार असून, तो पाच वर्षांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर शहरातील सर्व नागरिकांना मीटरद्वारेच पाणीपुरवठा केला जाईल.

केंद्र सरकारकडून भविष्यात जाहीर होणाऱ्या योजनेंतर्गत या प्रकल्पाचा समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानावरच ही योजना पूर्णत्वास नेण्याचा संकल्प आहे.

शहराच्या काही भागांत दोन वेळा, तर काही भागांत दोन तासही पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करताना अडचणी निर्माण होतात. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही केले जातात. शहराला २४ तास पाणीपुरवठा केला जावा, या दृष्टीने चार वर्षांपूर्वीच समान पाणीपुरवठ्याची संकल्पना मांडण्यात आली होती; परंतु त्यासाठीच्या निविदा वाढीव दराने येत असल्याने पालिकेला त्याची अंमलबाजवणी करता आली नाही. दरम्यानच्या काळात 'स्टुडिओ गली इंजेग्नेरिआ' या सल्लागार कंपनीने सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर केला. त्याचा संपूर्ण अभ्यास करून पाणीपुरवठा विभागाने समान पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी सादर केला होता.

केंद्र सरकारच्या योजनेतून या प्रकल्पाला अर्थसाह्य मिळविण्यासाठी त्याला तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षाने केली. काँग्रेसने सुरुवातीला त्याला विरोध केला. सर्वसाधारण सभेसमोर सविस्तर सादरीकरण केल्यानंतरच मान्यता देण्यात येईल, असा पवित्रा घेण्यात आला. मात्र, शहराच्या हितासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याने केंद्र व राज्य सरकारच्या अटी-शर्तींना सर्वसाधारण सभेची मान्यता घ्यावी; तसेच प्रकल्पासाठीचा संपूर्ण आर्थिक आराखडा सादर केला जावा, अशी उपसूचना काँग्रेसतर्फे देण्यात आली. त्यानंतर सर्वसाधारण सभेने एकमताने या प्रस्तावाला मंजुरी दिली.

प्रकल्पाची मुख्य उद्दिष्टे

प्रकल्पाचा एकूण खर्च : २८१८ कोटी

पाणीपुरवठा विभाग आणि उपविभागांची पुनर्रचना

पाण्याच्या साठवण टाक्यांची क्षमता वाढविणे

वितरण व्यवस्थेत सुधारणा करणे

सर्व ग्राहकांना मीटर बसविणे

पाण्याची गळती १५ टक्क्यांपर्यंत कमी करणे

समान पाण्यासाठी पुढची पावले...

केंद्र सरकारच्या नव्या योजनेसाठी प्रकल्पाचा 'डीपीआर' तयार ठेवणार

नवी योजना जाहीर होताच केंद्राला अहवाल सादर करणार

केंद्र व राज्य सरकारची मान्यता

दोन्ही सरकारकडून अनुदान प्राप्त होताच, प्रत्यक्षात काम सुरू

शहरात टप्प्याटप्प्याने प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार

संपूर्ण प्रकल्पासाठी पाच वर्षांचा कालावधी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनसेवा पूर्वपरीक्षा येत्या २३ ऑगस्टला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) पूर्वपरीक्षा व भारतीय वनसेवेची पूर्वपरीक्षा २३ ऑगस्ट रोजी होणार आहे. यूपीएससीने परीक्षेचे वेळापत्रक आपल्या वेबसाइटवर जाहीर केले आहे. त्यानुसार यूपीएससीच्या २३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पूर्वपरीक्षेसाठी १९ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. यूपीएससीतर्फे या वर्षी एक हजार १२९ जागा भरण्यात येणार आहेत. भारतीय वनसेवेची पूर्वपरीक्षाही २३ ऑगस्टलाच होणार असल्याने दोन्ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाखोंच्या विदेशी सिगरेट जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विदेशी बनावटीच्या सिगारेटचा अवैध साठा बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली. त्यांच्याकडून एकूण नऊ लाख ३६ लाख ४०० रुपये किमतीच्या विदेशी ब्रँडच्या सिगरेट आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मुंबईतील गोरेगाव येथील रहिवासी भूपेंद्र जगदीश मकवाना यांनी केलेल्या तक्रारीवरून अब्दुल कादर शेख (रा. सिटी सेंटर कॅम्प) यांच्या सिटी सेंटरमधील दुकानावर छापा टाकून विदेशी कंपन्यांच्या विविध ब्रँडच्या ३,६२,४०० रुपये किमतीची सिगारट जप्त करण्यात आली. या प्रकरणातील दुसरा आरोपी किशोर भारत कांबळे (रा. जुना तोफखाना, शिवाजीनगर) याच्या नाना पेठेतील इमारतीच्या तळमजल्यावरील गोडाउनमध्ये बॉक्समध्ये विदेशी सिगारेटचा साठा करून ठेवला होता. त्याच्या गोडाउनवर मारलेल्या छाप्यात ५,७२,००० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट एकचे निरीक्षक रघुनाथ फुगे, उपनिरीक्षक बाबा शेख, हवालदार प्रकाश लोखंडे, रमेश भोसले, संभाजी भोईटे, रिजवान जिनेडी, मेहबूब मोकाशी, रवींद्र कदम, उमेश काटे, दिलीप मोरे, प्रवीण शिंदे, सुभाष पिंगळे, तुषार खडके, इरफान मोमीन, सुधीर माने, श्रीकांत वाघवले यांनी केली.

खडकीत टोलनाके लुटले

खडकी : खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत वाहन प्रवेश कर वसूल करणारे दोन टोल नाके चौघांनी लुटल्याची तक्रार खडकी पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली आहे. या दोन्ही लुटींमध्ये १५,१५० रुपये लुटण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी अजय (पूर्ण नाव समजू शकले नाही.) आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे सव्वापाच ते सहाच्या दरम्यान खडकी डंकन रोड येथील टोल नाका क्रमांक पंधरा आणि पुणे-मुंबई रोड पोस्ट ऑॅफिस येथील नाका क्रमांक सात लुटण्यात आला. अजय आणि त्याचे साथीदार दोन मोटारसायकलवरून नाका क्रमांक १५ येथे आले. त्यांनी तेथे काम करणाऱ्या भीमा हवालदार आणि रामराज यादव यांना मारहाण केली. त्यांच्याकडील ३,८५० रुपये पळवून नेले. त्यानंतर ते नाका क्रमांक सातवर आले. तेथील कर्मचारी प्रशांत गायकवाड आणि किशोर करमरकर यांनाही मारहाण करून त्यांच्याजवळील ९,९७० रुपये आणि १३०० रुपयांचा मोबाइल असा एकूण १५,१२० रुपयांचा ऐवज लांबवला.

पावणेचार लाख लांबवले

पुणे : सोन्याची खरेदी करण्यासाठी पीएमपी बसने चाललेल्या महिलेच्या बॅगेतील दागिने, मोबाइल आणि रोख रक्कम असा एकूण पावणेचार लाख रुपयांचा ऐेवज चोरून नेल्याची घटना बुधवारी (२० मे) घडली. या प्रकरणी शीतल कानडे (वय ४०, रा. बिबवेवाडी) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कानडे या अप्पर ते शिवाजीनगर या बसमध्ये बिबवेवाडी येथे बसल्या. बसमधील गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात इसमाने तीन लाख ७८ हजार रुपये चोरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तापमानात घट; गारवा वाढला

$
0
0

पुणे : अंदमान ओलांडलेला मान्सून अजूनही श्रीलंकेच्या उंबरठ्यावर कायम आहे, त्यामुळे शनिवारी मान्सूनची आगेकूच होऊ शकली नाही. राज्यात काही भागातील उष्णतेची लाट कायम असली, तरी पुण्यात मात्र तापमानात घट झाल्याने काहीसा गारवा जाणवत आहे. शहरात शनिवारी ३६.२ अंश सेल्सियस इतक्या कमाल, तर २३.७ अंश सेल्सियस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. दिवसा काहीशा ढगाळ वातावरणामुळे उकाड्याची तीव्रता कमी झाली होती. सायंकाळनंतर हवेत काहीसा गारवा जाणवत होता. पुढील दोन दिवस शहरात हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राज्यात विदर्भातील उष्णतेची लाट कायम आहे. शनिवारी राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर येथे (४७ अंश सेल्सियस) झाली. वर्धा येथे ४५.२, तर नागपूर येथे ४५.१ अंश सेल्सियस इतके कमाल तापमान नोंदले गेले. औरंगाबाद येथे ४०.४, परभणीत ४३.२ अंश सेल्सियस इतके कमाल तापमान नोंदले गेले. पुढील दोन दिवस राज्यात अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images