Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘आधार’ विकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पूर्णपणे मोफत असलेल्या आधार कार्डाच्या नोंदणीसाठी पैसे उकळण्याचे प्रकार शहराच्या काही भागांमध्ये सुरू असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या आहेत. अशा प्रकारे पैसे आकारणाऱ्या केंद्रचालकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपजिल्हा निवडणूक अधिकारी समीक्षा चंद्राकार यांनी दिला आहे.

प्रत्येक व्यक्तीला स्वतःची ओळख म्हणून आधार कार्ड वाटपाची योजना सुरू झाली. विविध सरकारी योजनांचा लाभ, गॅस सिलिंडरचे अनुदान, धान्यवाटप, विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती आदींसाठी आधार कार्डची गरज भासते.

तसेच, निवडणूक आयोगाने मतदारयादीशी आधार क्रमांक जोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. अशा विविध कारणांमुळे सर्वसामान्य नागरिकांना आधार कार्डची गरज भासते. त्यामुळेच आता आधारच्या नोंदणीसाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे.

आधारसाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. मात्र, शहराच्या काही भागांमध्ये या नोंदणीसाठी नागरिकांकडून पैसे उकळण्यात येत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या.

येरवडा, चंदननगर आणि अन्य काही भागांमध्ये नागरिकांनी अशा तक्रारी केल्या. या संदर्भात संबंधित एजन्सींची चौकशी सुरू करण्यात आली असून, पैसे घेतल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यात १७० ठिकाणी आधार नोंदणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मशिन्सची संख्या मर्यादित असल्याने 'महा ई सेवा' केंद्रात आधार नोंदणीसाठी गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे अर्ज दिल्यानंतर दोन दिवसांनंतरची तारीख देण्यात येते. परंतु, दोनशे ते पाचशे रुपये दिल्यास तत्काळ नोंदणी करण्यात येते, अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे चौकशीत तथ्य आढळल्यास संबंधित एजन्सीची मान्यता रद्द करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

आधार-मतदार क्रमांक लिंक कसे करणार !

https://ceo.maharashtra.gov.in या वेबसाइटवर 'अपडेट युवर आधार' या पोर्टलवर टिचकी मारावी. त्यानंतर मतदार यादीतील सर्च नेमवर टिचकी मारून त्यामध्ये जिल्हा, मतदार संघ, नाव याची माहिती भरावी. त्यानंतर आधार क्रमांकाची माहिती भरावी. त्यानंतर आधार कार्डची जेपीईजी किंवा पीडीएफ फाइल अपलोड करावी. त्यानंतर काही वेळातच आधार क्रमांक मतदान ओळखपत्राशी लिंक होईल.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पीएमपीच्या अध्यक्षपदी कृष्णा

$
0
0

मटा प्रतिनिधी । पुणे

सात महिन्यांनंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) पूर्णवेळ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लाभणार असून, अभिषेक कृष्णा यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) २००६ च्या तुकडीचे अधिकारी असलेले अभिषेक कृष्णा सध्या नागपूरच्या जिल्हाधिकापदी कार्यरत होते. पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी; तसेच गोंदियाचे सीईओ म्हणून त्यांनी यापूर्वी काम केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीएमआरडीए’ची सूत्रे महेश झगडे यांच्याकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दीर्घ प्रतीक्षेनंतर स्थापन झालेल्या पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) वाहतूक आयुक्त महेश झगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली स्थापण्यात आलेल्या या प्राधिकरणाच्या सीईओपदाची सूत्रे नगररचना विभागातील सुधाकर नांगनुरे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. ती आता झगडे यांच्याकडे येतील. झगडे यांनी यापूर्वी नाशिक, पुणे महापालिका, अन्न आणि औषध प्रशासनामध्ये आयुक्त म्हणून काम केले आहे . पुणे महापालिकेच्या कामकाजात शिस्त आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. अन्न आणि औषध प्रशासनातील त्यांची कारकीर्द विशेष गाजली. प्रशासनावर वचक असलेला अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहीले जाते. तसेच वाहतूक खात्यातही कारकीर्द चर्चेत राहिली. आरटीओंमधून एजंटांना हद्दपार करण्याचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे कचराग्रस्त शहर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कचरा प्रश्न सोडविण्यासाठी उरळी देवाची आणि फुरसुंगीतील ग्रामस्थांनी आता राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे धाव घेतली आहे. 'महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पर्यावरण मंत्रालयाने पुण्याला 'कचराग्रस्त शहर' असे जाहीर करावे. घनकचरा व्यवस्थापनाबद्दल ठोस निर्णय घेतल्याशिवाय महापालिकेच्या हद्दीत कोणत्याही नवीन बांधकाम प्रकल्पाला मंजुरी देऊ नये,' अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने पुण्यातील कचऱ्याची गंभीर दखल घेतली आहे. न्यायाधिकरणासमोर गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्या. विकास किनगांवकर आणि डॉ. अजय देशपांडे यांनी महापालिका आयुक्त, हंजर बायोटेक एनर्जीज, विभागीय आयुक्त, पर्यावरण मंत्रालय, जिल्हाधिकारी, जिल्हापरिषद, भूजल सर्वेक्षण आणि विकास अधिकारी तसेच जिल्हा भूवैज्ञानिक सर्वेक्षण अशा अकरा जणांना २९ मे रोजी न्यायालयात हजर राहून बाजू मांडण्याच्या सूचना दिल्या आहेत.

उरळी देवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थांच्या वतीने भगवान भाडळे, विजय भाडळे, बाळासाहेब हपाळे, रोहिदास भाडळे, बाजीराव भाडळे, संतोष हरपाळे, जयमाला कवठेकर, उज्ज्वला शेवाळे, अतुल हरपाळे यांनी याचिका दाखल केली आहे.

कचऱ्याचे वर्गीकरण, प्रक्रिया न करता महापालिका आणि हंजर बायोटेक कंपनीने सातत्याने तेथील कचरा पेटवून देण्याचा मार्ग स्वीकारला आहे. ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन उद्ध्वस्त करणारा हा प्रकल्प तातडीने हलविण्यासंदर्भातील वेगवेगळी कारणे याचिकेत नमूद केली आहे.

कचरा व्यवस्थापनाबद्दल पुणे महापालिका आणि हंजर बायोटेक यांनी पारदर्शकता बाळगली नसल्याचा आरोप करून या दोघांमधील हिशेब न्यायाधिकरणासमोर सादर करण्याबद्दल आम्ही आग्रही आहोत, अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकील असीम सरोदे, अलका बबलादी, विकास शिंदे आणि प्रताप विटणकर यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविध समित्यांवर कार्यकर्त्यांची गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नगरसेवकपदाचे 'तिकीट' नाकारलेल्या, पदाधिकारी म्हणून 'संधी' न मिळालेल्या, नाराज आणि असंतुष्ट कार्यकर्त्यांना 'खूश' करण्यासाठीच पालिकेशी संबंधित विविध समित्यांवर मागील दाराने त्यांची वर्णी लागत असल्याचे नुकत्याच झालेल्या प्रभाग समित्यांवरील निवडीमुळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, केवळ राजकीय 'सोयी'साठी सुरू असलेल्या या समित्याच बरखास्त कराव्या, अशी मागणी जोर धरत आहे.

प्रभाग समित्यांवरील स्वीकृत सदस्यपदाच्या निवडणुकीत सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींना स्थान देणे अपेक्षित असताना, तेथेही राजकीय पक्षांच्याच कार्यकर्त्यांनी घुसखोरी केली आहे. मनसे वगळता सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना त्याद्वारे स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळाल्याने अनेकांचे पुनर्वसन होण्यास मदत झाली आहे, तर स्वयंसेवी संस्थांच्या पलीकडे जात काहींना याद्वारे आगामी निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यास मदत होणार आहे. मुळातच, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींसाठी असलेल्या या पदांवर राजकीय पक्ष कुरघोडी करून कार्यकर्त्यांनाच संधी देतात. व्यवस्थेत बदल करण्याची कोणत्याच पक्षाची भूमिका नाही.

केवळ प्रभाग समितीवरील स्वीकृत सदस्य निवडणूकच नाही, तर वृक्ष प्राधिकरण समिती आणि शिक्षण मंडळावरही पक्षावर नाराज असणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाते. सार्वत्रिक निवडणुकीद्वारे पालिकेमध्ये थेट प्रवेश मिळविण्यात अपयशी ठरणाऱ्या कार्यकर्त्यांना अशा निवड-नियुक्त्यांद्वारे मागील दाराने प्रवेश दिला जातो. अशा समित्यांच्या माध्यमातून 'माननीयां'च्या पंक्तीत बसण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्याही मोठी असते. त्यामुळेच स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून या जागा पटकाविण्यासाठी 'वजन' खर्ची पाडावे लागते. या गोंधळात सर्वसामान्य नागरिकांना, नागरिकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सामाजिक संस्थांना बाजूला केले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वीकृत’बाबत चौकशी करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत निवड झालेल्या स्वीकृत सदस्यांनी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची सखोल चौकशी करावी; तसेच खोटी माहिती देणाऱ्या सदस्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टीने पालिका आयुक्तांकडे केली आहे.

पालिकेच्या १३ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत झालेल्या निवडणुकीत बुधवारी ३९ स्वीकृत सदस्यांची निवड केली गेली. स्वीकृत सदस्य म्हणून राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांऐवजी सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी असावेत, अशी अट असतानाही, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचीच त्यावर वर्णी लागली आहे. सामाजिक संस्थेचे शिफारसपत्र जोडून काही राजकीय पक्षांचे सदस्य निवडून आले असून, संबंधित संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत आहेत का, याची माहितीच घेण्यात आली नसल्याचा आरोप 'आरपीआय'ने केला आहे. पालिकेतील गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे, शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ कांबळे आणि शिक्षण मंडळाचे सदस्य बाळासाहेब जानराव यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात संबंधित संस्थांचे ऑडिट झाले आहे वा नाही, याचाही तपासणी करावी, अशी मागणी केली आहे. प्रतिज्ञापत्राद्वारे चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

आदिवासी महादेव कोळी युवक संघाच्या वतीनेही गुरुवारी पालिकेत धरणे आंदोलन करण्यात आले. सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींऐवजी राजकीय पक्षांनी त्यांच्याच कार्यकर्त्यांना निवडून दिल्याने संबंधित सदस्यांची निवड रद्द करावी, अशी मागणी संघाचे अध्यक्ष नारायण वांभिरे यांनी केली आहे.

लोकशाहीचा घोटला गळा

स्वयंसेवी संस्था व विषयतज्ज्ञांसाठीच्या राखीव जागा प्रस्थापित राजकीय पक्षांशी संबंधित नेते व कार्यकर्त्यांकडून बळकावल्या जात असल्याने लोकशाही आणि कायद्याचा गळा घोटला जात असल्याचा आरोप परिसर आणि सजग नागरिक मंच या स्वयंसेवी संस्थांनी केला आहे. 'राजकीय पक्षांशी संबंधित असलेल्याच कार्यकर्त्यांची निवड प्रभाग समितीवर झाल्याने कायद्याचा मान ठेवण्याची भाषा करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांचा आणि त्यांच्या नगरसेवकांचा पर्दाफाश झाला आहे,' असे टीकास्त्र परिसरच्या सुजित पटवर्धन व सजगच्या विवेक वेलणकर व जुगल राठी यांनी सोडले आहे. स्वयंसेवी संस्थांना कोणत्याही पदाची अभिलाषा नसून यापुढेही आमचे काम सुरूच राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जगताप यांच्या बदलीसाठी थेट मंत्र्यांकडून फि‌ल्डिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्या बदलीसाठी पुणे जिल्ह्यातील एका मंत्र्याने फि‌ल्डिंग लावली आहे. जगताप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी वनमंत्री पतंगराव कदम यांचे जावई, तर पुरंदरचे काँग्रेसचे नेते संजय जगताप यांचे बंधू आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत शिवतारे यांच्यात आणि संजय जगताप यांच्यात लढत झाल्याने शिवतारे यांनी बदलीचा आग्रह धरल्याची चर्चा सुरू झाली आहे.

महापालिकेत गेल्या तीन वर्षांपासून अधिक काळ अतिरिक्त आयुक्तपदावर कार्यरत असलेले राजेंद्र जगताप इंडियन डिफेन्स इस्टेट स‌र्व्हिस या प्रवर्गातील अधिकारी आहेत. माजी वनमंत्री कदम यांचे जावई असल्याने त्यांना थेट पालिकेत अतिरिक्त आयुक्त (इस्टेट) पदावर रुजू करून घेण्यात आले आहे. जगताप यांच्या नियुक्तीवर राज्यमंत्री शिवतारे यांनी आक्षेप घेत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून त्यांची बदली करावी, अशी मागणी केली आहे.

जगताप यांच्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी असून, त्यांची कार्यपद्धती वादग्रस्त असल्याने त्यांना पुन्हा जुन्या विभागात पाठवावे, असे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. या पत्राची दखल घेऊन नगरविकास विभागाने पालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे अभिप्राय मागविला होता. त्यावरचा अ‌भिप्राय आयुक्तांनी नगरविकास खात्याला दिल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्त चिडले, अधिकारी धारेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाळा तोंडावर आलेला असतानाही शहरातील पावसाळापूर्व कामे अर्धवट असल्याने चिडलेल्या महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पाऊस कितीही होवो, रस्त्यावर पाणी साठता कामा नये, ही पालिकेची जबाबदारी असून यापुढील काळात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, अशा शब्दांत आयुक्तांनी पालिकेतील अधिकाऱ्यांना सुनावले.

पावसाळापूर्व कामे मुदतीत पूर्ण करा, अशा सूचना वारंवार देऊनही अनेक कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना आणि वाहनचालकांना होणाऱ्या त्रासाचे वृत्त 'मटा' ने वारंवार प्रसिद्ध करून याला वाचा फोडली होती.

बुधवारी शहरात झालेल्या पावसामुळे पालिकेची कामे अद्यापही अर्धवट असल्याच्या माहितीवर शिक्कामोर्तब झाले. शहरातील अनेक रस्त्यांवर पावसाचे पाणी साठले होते. याची गंभीर दखल घेत पालिका आयुक्तांनी कडक शब्दांत प्रशासनातील अधिकाऱ्यांची कानउघडणी करत यापुढील काळात असे प्रकार घडणार नाहीत, यासाठी विशेष काळजी घेण्याच्या सूचना संबधितांना दिल्या.

अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली पाणीपुरवठा आणि ड्रेनेजलाइनची कामे शहरातील विविध भागांत सुरू असल्याचा खुलासा गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाच्या वतीने केला जात‌ आहे. मात्र, बुधवारी झालेल्या पावसामुळे प्रशासनाचा हा दावा फोल ठरला. शहरातील खोदलेले रस्ते योग्य पद्धतीने बुजविले गेले नसल्याने नागरिकांची कशी तारांबळ उडाली, यावर आयुक्तांच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली. शहरात पडलेला पाऊस जोरात असल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचा खुलासा करून अनेक अधिकाऱ्यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

पावसामुळे रस्त्यावर पाणी साठून वाहने बंद पडण्याच्या अनेक घटना गुरुवारी घडल्या. त्याशिवाय खोदलेल्या रस्त्यावरील राडारोडा रस्त्यावर आल्यामुळे नागरिकांना चालणे आणि वाहन चालवणे मुश्किल झाले होते.

यंदा कामच करणार नाही का...

'या पूर्वीही पहिल्याच पावसात शहरात अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली होती. म्हणून या वर्षी कामच करणार नाही का, पाऊस कोणताही आणि कितीही असो पाणी तुंबणार नाही, याची खबरदारी घेणे आपली जबाबदारी आहे. त्यामुळे या पुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत; तसेच कामे पूर्ण न झाल्याने पावसाळ्यात त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागल्यास त्याची जबाबदारी तुमच्यावर निश्चित करून कारवाई केली जाईल, अशा शब्दांत आयुक्तांनी सुनावले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयुक्तालयात डीपीला आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पोलिस आयुक्तालयाच्या 'इलेक्ट्रिक डीपी'ला आग लागल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. ही आग किरकोळ होती. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद यांनी आयुक्तालयातील सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांना तत्काळ बाहेर पडण्यास सांगितले.

पोलिस आयुक्तालयातील 'ग्राउंड फ्लोअर'वर वीजपुरवठा करण्यासाठी 'डीपी' बसवलेला आहे. या ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली होती. यापूर्वीही पोलिस आयुक्तालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. त्यानंतर आयुक्तालयाचे फायर ऑडिट करण्यात आले होते. आग लागल्याने धूर मोठ्या प्रमाणात पसरला. वायर जळाल्या, त्यात धूर मोठ्या प्रमाणात झाल्याने उपस्थितांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. ही परिस्थिती लक्षात आल्यावर पोलिस सहआयुक्त रामानंद यांनी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना तत्काळ बाहेर पडण्याचे आदेश दिले होते. आयुक्तालयातच डीपीला आग लागल्यामुळे शहरातील उघड्या डीपींबाबत महावितरण काय पावले उचलणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

FBवर सुसाइड नोट टाकून तो बेपत्ता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

फेसबुकवर 'सुसाइड नोट' पोस्ट करून शहरातील एका महाविद्यालयातील इंजिनिअरिंगचा विद्यार्थी बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. २४ तास होऊनही त्याचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही. 'मित्र त्रास देतात, म्हणून आत्महत्या करीत आहे,' अशी पोस्ट त्याने केली.

अभिजित भगवान व्यवहारे (वय २३, रा. मातृछाया अपार्टमेंट, गुरुद्वारा रोड, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात मॅकेनिकल इंजिनिअरिंगच्या तिस-या वर्षाचा विद्यार्थी आहे. जेवण करून अभ्यासिकेत जाणार असून पहाटे येतो, असे वसतिगृहातील आपल्या अन्य विद्यार्थ्यांना सांगून बुधवारी (१३ मे) रात्री नऊ वाजता तो बाहेर पडला. त्यानंतर त्याचा कोणताही ठावठिकाणा समजू शकलेला नाही. अभिजितने रात्री साडेदहाला फेसबुक अकाउंटवर 'मी हे जग सोडून जाण्याचा निर्णय घेत आहे... बाय बाय!' अशा आशयाची पोस्ट टाकल्याने त्यांच्या मित्रांची धावपळ उडाली.

अखेर त्याचा वसतिगृहातील सहनिवासी योगीराज चव्हाण याने चिंचवड पोलिस ठाण्यात रात्री उशिरा अभिजित बेपत्ता असल्याची तक्रार दिली. अभिजितने फेसबुकवर तीन पोस्ट टाकल्या आहेत. पहिली पोस्ट आई-वडिलांसाठी आहे. 'तुमचा अभि तुमची स्वप्नं पूर्ण करू शकला नाही... आय अॅम सो सॉरी', असे म्हटले आहे. दुसरी पोस्ट मित्रांच्या नावाने आहे. 'तुमच्या सारखे मित्र भेटले नसते, तर बरे झाले असते, असे वाटते. पण आता खूप उशीर झाला आहे आणि मला पण खूप त्रास व्हायला लागला आहे. म्हणून मी आज हे जग सोडून जात आहे', असे त्यात म्हटले आहे.

रात्री वडिलांना फोन

अभिजितने काल रात्री नऊच्या सुमारास त्याच्या वडिलांना फोन केला होता, अशी माहिती पुढे आली आहे. त्यात त्याने याबाबत काहीही उल्लेख केला नाही. क्लाससाठी सात हजार रुपये पाठवा, असे त्याने वडिलांना सांगितले होते. अभिजितची मॅकेनिकल इंजिनिअरिंगची परीक्षा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेचा खेळखंडोबा; नागरिकांचे हाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुसळधार पावसामुळे शहराच्या विविध भागांमध्ये वीजपुरवठ्याच्या यंत्रणेची दाणादाण उडवून दिली. अनेक परिसरात खंडित झालेला वीजपुरवठा बुधवारी मध्यरात्री सुरळीत झाला, तर काही भागांमध्ये गुरुवारी दुपारपर्यंत वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले.

बुधवारी सायंकाळी वादळी व मुसळधार पावसामुळे शहर व पिंपरी चिंचवडमध्ये विविध भागांत वीजपुरवठा खंडित झाला. वादळामुळे झाडे, फांद्या पडल्याने तसेच पाणी तुंबल्याने वीजपुरवठा यंत्रणेत बिघाड झाले. एकाच वेळी अनेक ठिकाणांहून बिघाडाच्या तक्रारी आल्यामुळे 'महावितरणच्या कर्मचाऱ्यांची दुरुस्तीची कामे करताना त्रेधा उडाली. त्यामुळे अनेक पथकांकडून दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली, मात्र, मुसळधार पावसामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे आले. झालेल्या बिघाडांपैकी ८० टक्के परिसरातील वीजपुरवठा दोन तासांत सुरळीत झाला, तर काही भागांतील वीजपुरवठा पहाटे दीड वाजेपर्यंत पूर्ववत करण्यात आला. रात्री काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठ्याची सोय केल्यानंतर गुरुवारी तेथे दुरुस्तीचे काम करण्यात आले. अनेक ठिकाणी पडलेली झाडे व फांद्या हटविण्याच्या कामामुळे यंत्रणेच्या दुरुस्तीला वेळ लागला. रेंजहिल्स परिसर वगळता सर्व वाहिन्यांचा वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरु झाला. त्यानंतर अनेक ग्राहकांच्या वैयक्तिक तक्रारी निवारणाचे काम सुरू करण्यात आले.

कोथरूडमधील रामबाग कॉलनी, डावी भुसारी, पौड रोड, पटवर्धन बाग, डेक्कन, नवी पेठ आदी परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री नऊ वाजेपर्यंत ८० टक्के भागात वीजपुरवठा सुरू झाला, तर पहाटे सव्वापर्यंत सर्व भागात वीजपुरवठा सुरळीत झाला. नगररोड परिसरातील विश्रांतवाडी, हरिगंगा, फुलेनगर, टिंगरेनगर, संभाजीनगर, शास्त्रीनगर या भागात दोन तास वीजपुरवठा खंडित झाला होता. बीटी कवडे, नानापेठ, रास्तापेठ, एम्प्रेस गार्डन या भागात दीड तास वीज खंडित झाली होती. शिवाजीनगर परिसरात झाडे पडल्याने खडकी परिसरात पाच तास वीज खंडित होती. याशिवाय बावधनचा काही परिसर, रामनगर, सकाळनगर, म्हाळुंगे परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. रेंजहिल्समध्ये मोठे झाड कोसळल्याने त्या परिसरात रात्री वीजयंत्रणेची दुरुस्ती होऊ शकली नाही. गुरुवारी सकाळी झाडे हटवून यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले. पर्वतीमध्ये लक्ष्मीनगर, स्वारगेट आदी परिसरातील वीज खंडित झाली होती. याशिवाय मांजरी, केशवनगर, बोट क्लब परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर या भागात गंभीर बिघाड झाल्याने वीज खंडित होती. पद्मावतीमध्ये अरण्येश्वर, सहकारनगर, मार्केट यार्ड, बिबवेवाडी, गंगाधाम परिसरात वीज खंडित झाली. टप्प्याटप्प्याने पहाटेपर्यंत सुरळीत करण्यात आली. सहकारनगर आणि वाळवेकर नगर भागात गुरुवारी दुपारपर्यंत वीजपुरवठा खंडित होता, त्यामुळे नागरिकांचे हाल झाले.

पिंपरीमध्ये केशवनगर, श्रीधरनगर, सुखवानी परिसर, वाकड, कस्पटेवस्तीमधील वीजपुरवठा दोन तासांत पूर्ववत झाला. तर एम्पायर इस्टेट परिसरात रात्री दहाच्या सुमारास वीजपुरवठा सुरू झाला. भोसरी एमआयडीसी परिसरात पाच ठिकाणी झाडे पडल्याने रात्री दहा वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित होता. भोसरी गाव, चऱ्होली, आळंदी, प्राधिकरणाच्या काही भागात रात्री नऊ वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातशे इमारती धोकादायक

$
0
0

सुनीत भावे, पुणे

शहरातील ३० वर्षांपेक्षा जुन्या तब्बल सातशेहून अधिक इमारतींची तातडीची डागडुजी करावी लागणार असून, त्यातील दोनशेपेक्षा अधिक धोकादायक इमारती पाडाव्या लागणार आहेत. त्यामुळे शहरातील जुन्या धोकादायक वाड्यांसह ३० वर्षांपेक्षा जुन्या बऱ्याच इमारतीही किरकोळ दुरुस्तीने टिकाव धरू शकणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

पालिकेच्या हद्दीतील ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींच्या 'स्ट्रक्चरल ऑडिट'मधून ही बाब समोर आली असून, तातडीने दुरुस्ती आवश्यक असणाऱ्या इमारतींना नोटीस बजाविण्यात येणार आहे.

शहरातील जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याची मागणी वारंवार केली जात होती. पालिकेच्या बांधकाम विभागाने त्यासाठी आवाहनही केले होते; पण स्वतःहून पुढे येणाऱ्या इमारतींची संख्या अत्यल्प असल्याने अखेर पालिकेनेच ही मोहीम हाती घेतली. शहरातील ३० वर्षांपेक्षा जुन्या सर्व इमारतींचे ऑडिट करण्यासाठी पालिकेने टेंडरच काढले होते. गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ ही सर्व प्रक्रिया सुरू होती.

शहराच्या सात विविध विभागांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर उपलब्ध झालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सातशेहून अधिक इमारतींची तातडीची दुरुस्ती गरजेची असल्याचे समोर आले आहे. त्यातही, पालिकेने तीन प्रकारांत या इमारतींची विभागणी केली आहे. किरकोळ दुरुस्ती, मोठ्या स्वरूपाची डागडुजी व काही धोकादायक भागाची पाडापाडी आणि धोकादायक झालेली संपूर्ण इमारतच पाडून टाकण्याची शिफारसही करण्यात आली आहे. झोन ४ मध्ये अशा सर्वाधिक २३५ धोकादायक इमारती आहेत. तर, सर्वांत कमी म्हणजे अवघ्या १० इमारती झोन ७ मध्ये आहेत.

ऑडिटचा खर्च इमारतींकडून

पालिका हद्दीतील ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींनी स्वतःहून स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे, असे आवाहन पालिकेने केले होते; परंतु त्याला अत्यल्प प्रतिसाद लाभला. त्यामुळे, पालिकेनेच सर्वेक्षणाद्वारे हे ऑडिट केले असून, त्यासाठी आलेला खर्च संबंधित इमारतींकडूनच वसूल केला जाणार आहे. दुरुस्ती आवश्यक असलेल्या इमारतींनी पालिकेकडे अर्ज करणे आवश्यक असून, पालिकेच्या मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल इंजिनीअरकडून त्याचा अहवाल पालिकेला सादर करणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधार नोंदणी मोहीम रविवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आधार क्रमांक मतदार ओळखपत्राशी लिंक करण्यासाठी येत्या रविवारी (१७ मे) जिल्ह्यातील सात हजार मतदान केंद्रांवर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. मतदार यादीतील नाव वगळणे, पत्ता बदलणे, चुकांची दुरुस्ती आदी कामे करण्यात येणार आहेत. छायाचित्रासह मतदार यादीमध्ये सुधारणा करण्यासंबंधी मार्च ते जुलै या तीन महिन्याच्या कालावधी आयोगाने दिला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने प्रमाणीकरण कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यात सुमारे चार लाख ६२ हजार मतदारांची नावे दुबार असून, ती वगळली जाणार आहेत. त्याबरोबरच मतदार यादीला आधार क्रमांक जोडणी केली जाणार आहे. येत्या रविवार मतदारांनी अर्जासोबत आधार कार्ड व मतदान ओळखपत्राची झेरॉक्स मतदान केंद्रात सोबत आणावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टाइम्स प्रॉपर्टी एक्स्पो’ आजपासून चिंचवडमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे आणि पिंपरी- चिंचवड परिसरात आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी 'द टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप' ने शनिवारी (१६ मे) आणि रविवारी (१७ मे) 'टाइम्स प्रॉपर्टी एक्स्पो, पीसीएमसी'चे आयोजन केले आहे. या माध्यमातून नागरिकांना एकाच ठिकाणी शेकडो गृहप्रकल्पांची माहिती उपलब्ध होणार आहे.

चिंचवडमधील एम्पायर इस्टेटजवळच्या ऑटो क्लस्टरमध्ये आज (१६ मे) या उपक्रमाचे उदघाटन होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या उपक्रमामध्ये पुणे, पिंपरी- चिंचवड, तळेगाव, चाकण आदी ठिकाणच्या गृहप्रकल्पांची माहिती दिली जाणार आहे. सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेसात या काळात आयोजित या उपक्रमात ६० हून अधिक डेव्हलपर्सच्या तीनशेहून अधिक गृहप्रकल्पांची माहिती मांडली जाणार आहे. पुणे, पिंपरी- चिंचवडसह पुण्याभोवती अगदी वेगाने विकसित होणाऱ्या भागांमधील प्रकल्पांची ओळख या निमित्तानेच नागरिकांना करून घेता येईल. गुंतवणुकीचा योग्य मोबदला देणाऱ्या या प्रकल्पांच्या माध्यमातून १५ लाख रुपयांपासून पुढील किमतींचे फ्लॅट्स आणि १९९ रुपये प्रति चौरस फूट दरापासून पुढे उपलब्ध असलेल्या प्लॉट्सचीही या वेळी माहिती मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य विभाग राज्यात अव्वल

$
0
0

उपचारात्मक सेवांमध्ये पुणे जिल्हा परिषदेची कामगिरी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग राज्यात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. नागरिकांना दर्जेदार उपचारात्मक व प्रतिबंधात्मक सेवा पुरविण्याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने तयार केलेल्या 'रिपोर्ट कार्ड'मध्ये अन्य आरोग्य विभागांच्या तुलनेत पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सर्वाधिक गुण मिळवून राज्यात अग्रस्थान पटकावले.

राज्याच्या आरोग्य विभागाकडून दरवर्षी नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याबाबत सर्वच जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागांचे एक १५० गुणांचे 'रिपोर्ट कार्ड' तयार केले जाते. त्यामध्ये संबंधित विभागाने त्या वर्षी केलेल्या कामगिरीच्या आधारे त्यांचे मुल्यांकन केले जाते. वर्ष २०१४-१५ च्या 'रिपोर्ट कार्ड'मध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या विभागाला सर्वाधिक ७८ टक्के गुण प्राप्त झाले. पुण्याने राज्याच्या ३५ जिल्हा परिषदांतील (पालघर वगळता) आरोग्य विभागांना मागे टाकले.

राज्याच्या आरोग्य सचिवांनी पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (पीएसी) धर्तीवर राज्यभर 'पीएसी' उभारण्याचा निर्णय घेऊन पुणे आरोग्य विभागाचा गौरव केला होता. तसेच, विभागाने पेशंटला दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा, नावीन्यपूर्ण योजना, साथीच्या रोगांवरील नियंत्रण, गर्भवती महिला व नवजात अर्भकांसाठी योजना, डोळे तपासणीसाठी स्वतंत्र विभाग, गाव तेथे डॉक्टर, 'पीएसी'च्या ठिकाणी प्रयोगशाळा, विविध राष्ट्रीय कामकाजाच्या उद्दिष्टांची ध्येयपूर्ती आदी आदी योजना आरोग्य विभागाने प्रभावीपणे राबविल्या आहेत.

अध्यक्षांनी केले अभिनंदन

पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ही कामगिरी केल्याने परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे यांनी आरोग्य अधिकारी डॉ. एन. डी. देशमुख यांचे अभिनंदन केले. तर, जिल्हा परिषदेच्या सीईओ, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी केलेल्या सहकार्यांमुळे चांगली कामगिरी बजावता आल्याची भावना डॉ. देशमुख यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘परिचय’ची नव्याने एंट्री

$
0
0

नव्वदच्या दशकातील नाट्यसंस्थेचे पुनरुज्जीवन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उपेंद्र लिमये, मंजूषा गोडसे यांच्यासारखे गुणवान अभिनेते, संजय पवार यांच्यासारखा दमदार लेखक देणारी 'परिचय' ही नव्वदच्या दशकात राज्यभरात नावाजलेली नाट्य संस्था आता रंगभूमीवर नव्याने एंट्री घेत आहे. नव्या रंगकर्मींना व्यासपीठ देतानाच नव्या जाणिवांची नाटके करण्यासाठी 'परिचय एंटरटेन्मेंट' या नावाने ही संस्था पुनरुज्जीवित होत आहे.

संजय पवार यांनी लिहिलेल्या 'कोण म्हणतं टक्का दिला' या गाजलेल्या नाटकाचे मूळ दिग्दर्शक सुबोध पंडे यांच्या पुढाकारातून 'परिचय'चे पुनरागमन होत आहे. त्यांनीच या विषयी 'मटा'ला माहिती दिली. संस्थेचा पहिला उपक्रम म्हणून १७ ते ३० मे या कालावधीत नाट्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. त्यात अनिरुद्ध खुटवड, आनंद मासूर, अश्विनी गिरी मार्गदर्शन करणार आहेत. १७ मे रोजी ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे 'रंगभूषा' या विषयावर बोलणार असून, काही प्रात्यक्षिकेही दाखवणार आहेत.

'सुमारे पंधरा वर्षे 'परिचय'ने राज्यभरातील नाट्यविश्व दणाणून सोडले होते. एकांकिका स्पर्धांपासून राज्य नाट्य स्पर्धेपर्यंत या संस्थेचा दबदबा होता. पुढे व्यवसाय-नोकरीच्या निमित्ताने सर्व जण वेगळे झाल्यानंतर संस्था बंद झाली; मात्र आता पुन्हा नव्या जोमाने नाटक करण्यासाठी 'परिचय' पुन्हा सुरू करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांत नाट्य क्षेत्र खूप बदलले आहे. त्यामुळे नव्या पिढीच्या रंगकर्मींना घेऊन नवीन नाटके करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे,' असे पंडे यांनी सांगितले.

'नव्या रंगकर्मींसह नाटक करणे महत्त्वाचे'

'परिचय या संस्थेच्या माध्यमातून सुबोध पंडे, संजय पवार, अभय गोडसे आणि मी नाटकाच्या सर्व शक्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंतच्या माझ्या प्रवासात या संस्थेचा वाटा फार मोठा आहे. त्या काळात थिएटर अॅकॅडमी हीच एकमेव संस्था प्रायोगिक नाटक व्यावसायिक पद्धतीने करत होती; मात्र त्यानंतर तो मान 'परिचय'च्या 'कोण म्हणतं टक्का दिला'ने पटकावला. तो काळच रोमँटिक होता. या संस्थेशी असलेली भावनिक गुंतवणूक मोठी आहे. आता सुबोध पंडे पुढाकार घेऊन संस्था पुन्हा उभी करत आहेत, ही आनंदाचीच गोष्ट आहे. माझ्या कामातून मिळेल तसा वेळ 'परिचय'ला देणार आहे. संस्थेने नवीन नाटक नव्या रंगकर्मींसह केले, तर ते महत्त्वाचे ठरेल,' अशी प्रतिक्रिया अभिनेते उपेंद्र लिमये यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यात पडलेले बस्त्याचे गाठोडे घरी येते तेव्हा...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

दिवसभर रिक्षा चालवून जमविलेल्या पै-पैशातून मुलीचा विवाह करण्याचे त्यांनी योजले होते. बस्ता आणि मंगळसूत्र खरेदी केले. मात्र, हे सर्व घेऊन रिक्षाचालक घरी जात असतानाच मागे सीटवर ठेवलेले बस्त्याचे गाठोडे आणि मंगळसूत्र रस्त्यात पडते. त्यानंतर रिक्षाचालक सुन्न होतो... पण काही वेळातच बस्त्याचे गाठोडे एक तरुण घरी आणून देतो अन् या कुटुंबाचा जीव भांड्यात पडतो. त्यानंतर सराफाकडे गेल्यावर हरवलेले मंगळसूत्रही तिथे आणून दिलेले असते.

एखाद्या कथेप्रमाणे वाटणारा हा सर्व प्रकार नुकताच चिंचवड गावात घडला. रिक्षाचालक मुकुंद नाईक यांच्या मुलीचे लग्न ठरले आहे. त्यामुळे त्यांनी बस्ता व मंगळसूत्र खरेदी केले. पण घरी जाताना ते रस्त्यात पडले. बस्त्याच्या गाठोड्यात मुलीसाठी घेतलेला शालू व अन्य कपडे होते, तर त्यातच एका डबीत मंगळसूत्र होते. पण आता हे दोन्ही हरविले होते.

नाईक यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या इंजिनीअर मुलाचे काही दिवसांपूर्वीच अपघातात निधन झाले. त्यामुळे आधीच खचलेले नाईक बस्ता पडल्याने अजूनच चिंतेत होते. पण नरेंद्र पटेल व पवन चंदनशीवे यांना रस्त्यात पडलेला बस्ता सापडला. त्यामध्ये नाईक यांचे आधारकार्ड होते. त्यामुळे त्यांनी त्या पत्यावरून थेट नाईक यांचे घर गाठले आणि त्यांना बस्ता परत केला.

... अन् मंगळसूत्र असे मिळाले

सोन्याचे मंगळसूत्रही चिंचवड येथील अन्य एका ठिकाणी धनश्री कुलकर्णी या युवतीला सापडले. तिने त्याच्या डबीवरील सराफाचे नाव पाहून ते दुकानात जाऊन चौकशी करून त्यांच्याकडे सुपूर्त केले. दुस-या दिवशी नाईक सराफाकडे नवीन मंगळसूत्र उधारीवर मिळेल का, हे विचारण्यासाठी गेले. तेव्हा त्यांना पहिलेच मंगळसूत्र धनश्रीने आणून दिल्याचे सराफाने सांगितले. पोलिसांमार्फत हे सर्व नाईक यांना परत देण्यात आले.

दरम्यान, रक्त संजीवनी व श्री शंकरमहाराज सेवा मंडळाच्या वतीने डॉ. अविनाश वैद्य, डॉ. मनाली वैद्य यांनी धनश्री, पवन आणि नरेंद्र यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी पर्यटन केंद्रे बनली ओल्या पार्ट्यांचे अड्डे

$
0
0

मूळ संकल्पनेलाच हरताळ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ग्रामीण भागाची नाळ तुटलेल्या पर्यटकांना गावाकडे जाऊन निवांत राहण्याची संधी आणि शेतकऱ्यांनाही जोडधंदा मिळावा, या उद्देशाने काही वर्षांपूर्वी कृषी पर्यटन केंद्रे सुरू झाली. महाराष्ट्राच्या संस्कृतीची ती ओळखही बनली; मात्र सध्या मावळ, मुळशीसह पश्चिम महाराष्ट्रातील कृषी पर्यटन केंद्रांमध्ये 'ओल्या' पार्ट्याच रंगत असून, स्विमिंग पूल, रेनडान्स अशा सुविधांमुळे केंद्रांचा मूळचा बाज हरवला आहे.

नैसर्गिक संकटांमुळे निराश झालेल्या शेतकऱ्यांना शेतीला पूरक अर्थार्जनाचे साधन मिळावे, या उद्देशाने दहा वर्षांपूर्वी कृषी पर्यटन ही संकल्पना अस्तित्वात आली. पर्यटकांना ग्रामीण जीवनशैली अनुभवायला मिळावी, गावरान जेवण, शेतात काम करण्याची संधी मिळावी, हा या केंद्रांचा उद्देश होता; मात्र आता अनेक पर्यटन केंद्रांना बाजारू स्वरूप आले असून, ओल्या पार्ट्यांना सर्रास परवानगी मिळते आहे.

एखाद्या रिसॉर्टमध्ये गेल्यावर त्यांच्या नियमानुसार वागावे लागते; पण कृषी पर्यटन केंद्रातील नियम शिथिल करणे सोपे जाते, या मानसिकतेतून पर्यटक ओल्या पार्ट्यांसाठी या केंद्रांची निवड करत असल्याचे चित्र आहे. मुख्यतः मावळ, मुळशी, साताऱ्यातील काही केंद्रे ओल्या पार्ट्यांसाठी प्रसिद्ध आहेत. काही केंद्रांनी येथे मद्यपानाची जाहिरात करून पर्यटकांना आकर्षित करण्याचा फंडा सुरू केला आहे.

शासकीय सवलती मिळवण्यासाठी कृषी पर्यटन केंद्राचे लेबल लावून अनेकांनी रिसॉर्टच्या सोयी सुरू केल्या आहेत. या केंद्रांमध्ये स्विमिंग पूल, रेनडान्स, परदेशी खेळ आदी सुविधा असून, पंजाबी जेवणही मिळते. परदेशातून, तसेच इतर राज्यांतून महाराष्ट्राची संस्कृती अनुभवायला येणाऱ्या पर्यटकांना वेगळीच संस्कृती बघायला मिळते आहे.

कृषी पर्यटन धोरण धूळ खात पडून

कृषी पर्यटनाचा राज्यभरात वेगाने विस्तार होत असताना महाराष्ट्र सरकारला कृषी पर्यटन धोरण जाहीर करण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून वेळ मिळालेला नाही. सरकारने तयार केलेल्या या धोरणाच्या मसुद्यामध्ये कृषी पर्यटन केंद्र म्हणजे काय, त्यातील सोयी-सुविधा यांसह सविस्तर नियमावली करण्यात आली आहे; पण धोरणाची फाइल धूळ खात पडून असल्याने कोणीही उठून कृषी पर्यटन केंद्राच्या नावाने व्यवसाय सुरू करते आहे.
...

- राज्यात १८ शेतकऱ्यांनी घेतला कृषी पर्यटन योजनेचा फायदा
- गेल्या वर्षभरात चार लाख पर्यटकांची केंद्रांना भेट
- आतापर्यंत १५ कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न कृषी पर्यटनातून
- राज्यात सध्या तीनशेहून अधिक कृषी पर्यटन केंद्रे कार्यरत
- सर्वाधिक केंद्रे कोकणात, तर दुसऱ्या क्रमांकावर पश्चिम महाराष्ट्र
- बारामती कृषी आणि ग्रामीण पर्यटन प्रशिक्षण केंद्राने केलेल्या सर्वेक्षणानुसार, कृषी पर्यटन करणाऱ्या शेतकरी कुटुंबांच्या उत्पन्नात ३३ टक्क्यांनी वाढ

'मार्ट'च्या केंद्रांमध्ये ओल्या पार्ट्या नाहीत

कृषी पर्यटन केंद्रांच्या आराखड्याविषयी राज्याची अधिकृत नियमावली नसली, तरी आम्ही सभासदांना एक कच्चा आराखडा दिला आहे. त्याची पूर्तता झाल्याशिवाय सभासदत्व मिळत नाही. आमच्या सभासदांच्या केंद्रांत गैरप्रकार घडत नाहीत. मावळ-मुळशी भागातील काही केंद्रामध्ये दारूपार्ट्या घडत आहेत; पण ती केंद्रे 'मार्ट'ची सदस्य नाहीत. छोटेसे हॉटेल उभारून कृषी पर्यटन केंद्राची पाटी लावणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे.

- बाळासाहेब बराटे
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषी आणि ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नऊ दिवस बत्ती गुल

$
0
0

महापालिका-महावितरणचा अजब कारभार

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे तीन तेरा वाजले असताना महानगरपालिका आणि महावितरणच्या कारभारामुळे वेताळनगर पुनर्वसन प्रकल्पाच्या ट्रान्झिट कॅम्पमधील नागरिकांच्या झोपड्यांची बत्ती गेल्या नऊ दिवसांपासून गुल झाली आहे. एक दोन नव्हे, तर तब्बल १८६ कुटुंब सध्या पत्राशेडमध्ये विना वीज राहत आहेत. येथील ११ लाखांची विजबील थकबाकी असल्याने ही वीज कापण्यात आली आहे.

गेल्या नऊ दिवसांपासून येथील कुटुंबीय महापालिका आणि महावितरणच्या कार्यालयांचे खेटे मारत आहेत. त्यानंतर आता महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी वीज बिल भरण्याची तयारी दाखविली असून, त्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे या बैठका तहकूब करण्याचा नवा विक्रम सध्याच्या कारभाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे अजून किती दिवस येथील नागरिकांना अंधारातच दिवस काढावे लागणार, हे अस्पष्टच आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत वेताळनगरातील रहिवाशांचे उद्योगनगर येथील पत्राशेडमध्ये तीन वर्षांपूर्वी स्थलांतर करण्यात आले. या ठिकाणी अगोदर राहण्यास असलेल्या नागरिकांना महापालिकेने विजेचे मीटर दिले होते; परंतु त्यांचे वेताळनगर येथील इमारतीत स्थलांतर करण्यात आले. त्या वेळी या नागरिकांनी त्यांचे विजेचे मीटर काढून नेले. सध्या राहत असलेल्या नागरिकांनी अनधिकृतरित्या वीज वापरण्यास सुरुवात केली होती. पण त्यांना तेव्हा वीज थेट डीपी बॉक्समधून कोणी जोडून दिली, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

नऊ दिवसांपूर्वी महावितरणने या ठिकाणी कारवाई करून या संपूर्ण वसाहतीचा विद्युत पुरवठा खंडीत केला. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयाचा विद्युत पुरवठा बंद करून संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आयुक्त आणि सहशहर अभियंता राजन पाटील यांच्या, तसेच महावितरणच्या कार्यालयात नागरिक हेलपाटे मारत आहेत.
.................

नागरिकांचे महापालिकेने स्थलांतर केले आहे. त्यामुळे या नागरिकांना मूलभूत गरजा पुरवण्याचे काम पालिकेचे आहे. महावितरणने येथे कारवाई करण्याअगोदर पालिकेला पत्र पाठवून याची कल्पना दिली होती. थकबाकी भरण्यास सांगितले होते; परंतु पालिकेने याचा आमचा काही संबंध नसल्याचे सांगून हात झटकले. थकबाकी भरल्यावर विद्युत पुरवठा सुरळीत करू.
अनिल बडवे, अतिरिक्त कार्यकारी
अभियंता महावितरण.
..................
झोपडपट्टीतील नागरिकांना चांगली घरे मिळावीत, यासाठी पुनर्वसन करण्यात आले आहे; परंतु येथील नागरिकांनी पालिका वीज मीटर देऊन बिल भरेल अशी अशी अपेक्षा ठेऊ नये. स्वत: वीज मीटर बसवून घ्यावेत आणि बिल भरावे. थकबाकीबाबत प्रस्ताव तयार करून, येत्या स्थायी समितीच्या सभेमध्ये मांडण्यात येणार आहे. तोपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात मदत करणार आहोत. यापुढे मीटर अथवा बिलाचे पैसे महापालिका देणार नाही.
राजीव जाधव, महापालिका आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका पथकाला पुन्हा पिटाळले

$
0
0

नदीपात्रातील रस्ता काढून टाकण्यावरून नागरिक आणि अधिकाऱ्यांत वादावादी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सिंहगड रोडला पर्यायी रोड म्हणून तयार केलेला वारजे ते विठ्ठलवाडी दरम्यानचा नदीपात्रातील रस्ता काढून टाकण्यासाठी आलेल्या पालिकेच्या पथकाला शुक्रवारी पुन्हा स्थानिक नागरिकांनी परत पाठविले. स्थानिक नागरिक आणि पालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये वादावादी होऊन काही नागरिकांकडून अधिकाऱ्यांना धक्काबुक्की झाल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे.

सिंहगड रोडवर होणारी वाहतुकीची वाढती कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने गेल्या काही वर्षांपासून नदीपात्रातून जाणारा रस्ता तयार केला आहे. सिंहगड रोडला पर्यायी रोड म्हणून हा रस्ता तयार करण्यात आला आहे. पालिकेने तयार केलेला रस्ता पूररेषेच्या (ब्ल्यू लाइन) आत असल्याचे कारण पुढे करत शहरातील काही स्वयंसेवी संस्थांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार दाखल केली होती. लवादाने हा रोड काढून टाकण्याचे आदेश दिल्यानंतर पालिकेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, कोर्टानेही लवादाच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब करून सहा महिन्याच्या आत पालिकेने तयार केलेला रस्ता उखडून टाकण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले आहेत.

कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी यापूर्वी दोन वेळा पालिकेचे पथक रस्ता उखडून टाकण्यासाठी या भागात गेले होते. त्यावेळी स्थानिक नागरिकांसह राजकीय पक्षांच्या मंडळींनी याला कडाडून विरोध करून पालिकेच्या पथकांना परत पाठविले होते. नागरिकांच्या हितासाठी बांधण्यात आलेला हा रस्ता तसेच नदीच्या कडेला असलेल्या सोसायटीमध्ये पावसाचे पाणी जाऊ नये, यासाठी पालिकेने बांधलेली सीमाभिंत काढून देणार नाही, अशी भूमिका घेत आंदोलनही केले होते. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास पालिकेचे पथक रस्ता उखडून काढण्यासाठी गेले होते. याची माहिती समजताच स्थानिक नागरिकांसह, राजकीय पक्षांच्या मंडळींनी तेथे धाव घेऊन कामाला विरोध केला. कोर्टाचे आदेश असल्याने रस्ता काढून टाकण्याची कारवाई केली जाणार असल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट करतात, कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. तर काही कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की करत तेथून हाकलून दिले. नागरिकांच्या हितासाठी महत्त्वाची भूमिका बजाविणारा हा रस्ता कोणत्याही स्थितीत उखडून दिला जाणार नाही, असा निश्चय या वेळी करण्यात आला. भाजपचे दीपक नागपुरे यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images