Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

जेलमध्ये मोबाइल आला मुंबईतून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,येरवडा

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी मेजर रमेश उपाध्याय यांच्या नावाने येरवडा जेलमध्ये मुंबईतून मोबाइल पाठवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. येरवडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, कुरिअरच्या अनुषंगाने तपासही सुरू करण्यात आला आहे.

उपाध्याय यांना येरवडा जेलमधील अतिसुरक्षा विभागात ठेवण्यात आले आहे. जेलमध्ये त्यांच्या नावाने शुक्रवारी एक पार्सल आले होते. जेलचे अधिकारी हे पार्सल शनिवारी उघडून पाहत असताना एका पुस्तकात मोबाइल लपवल्याचा संशय आला. नागपूर जेलमध्ये मोठ्या प्रमाणात मोबाइल सापडल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर येरवडा जेलमध्ये मोबाइल पाठवण्याचा प्रकार गंभीरपणे घेण्यात आला आहे.

येरवडा पोलिसांनी पार्सलवर असलेला पत्ता आणि नावानुसार गुन्हा दाखल केला आहे; मात्र हे नाव आणि पत्ता बनावट असल्याचा पोलिसांचा संशय आहे. हे पार्सल आलेल्या पोस्ट ऑफिसमधून चौकशीला सुरुवात केली असल्याची माहिती येरवडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांनी दिली. हे पार्सल कोणत्या व्यक्तीने पाठवले, तसेच ते पाठवण्याचा उद्देश काय असावा, याचा शोध घेण्यात येत आहे .

येरवडा जेल प्रशासनाच्या सतर्कतेमुळे पार्सलमधील पुस्तकाचा पोलिसांना संशय आला होता. त्या पुस्तकाची काही पाने फाटलेली असल्याने पुस्तक व्यवस्थित उघडून पाहण्यात आले. त्या वेळी त्यामध्ये एका सिगारेटच्या आकाराच्या केसमध्ये स्मार्टफोन लपवण्यात आल्याचे लक्षात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणी कंपन्यांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आयएसआय मार्क (प्रमाणपत्र), तसेच परवाना नसताना पाण्याच्या पॅकिबंद बाटल्यांचे उत्पादन करून विक्री करणाऱ्या खेड, शिरूरमधील चार कंपन्यांना उत्पादन बंद करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिले आहेत.

'एफडीए'ने विशेष मोहीम राबवून पॅकबंद पाण्याच्या बाटल्यांचे उत्पादन करणाऱ्या खेड व शिरूर तालुक्यातील कंपन्यांची तपासणी केली. त्या कंपन्यांत उत्पादित होणाऱ्या बाटल्यांतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथील वाळुंज इंडस्ट्रीज यांच्याकडून २० लिटरचे २६ जार जप्त करण्यात आल्या. शिरूर तालुक्यातील पाबळ येथील अॅक्वा फ्रेश या कंपनीकडूनही पॅकिंग केलेल्या पाण्याचे नमुने घेण्यात आले. ढोरबांभूळवाडी येथील सुजल अॅक्वा, तसेच सातस्थळ येथील मायक्रो अॅक्वा या दोन ठिकाणी विनापरवाना व आयएसआय प्रमाणपत्राशिवाय पॅकबंद पाण्याच्या बाटल्यांचे उत्पादन व विक्री केल्याचे आढळून आले. यानुसार चारही कंपन्यांना उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती 'एफडीए'चे सहायक आयुक्त संजय नारागुडे यांनी दिली.

सहायक आयुक्त दिलीप संगत, संजय नारागुडे यांच्या नेतृत्वाखाली अन्नसुरक्षितता अधिकारी नीलेश खोसे, राजेंद्र काकडे, रमाकांत कुलकर्णी, सचिन आढाव, अविनाश दाभाडे, श्रीमती सायली पटवर्धन, श्रीमती शुभांगी बारवकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. पॅकिंग केलेल्या पाण्याच्या बाटल्यांसंदर्भात काही तक्रार असल्यास ग्राहकांसह नागरिकांनी 'एफडीए'शी (०२०) २४४३०११३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळीरामाच्या सहप्रवाशावर कारवाई

$
0
0

प्रशांत आहेर, पुणे

मद्यप्राशन केलेल्या चालकाबरोबरच आता त्याच्या सहप्रवाशावरदेखील कारवाई करण्याचे धोरण वाहतूक पोलिसांनी राबविण्यास प्रारंभ केला आहे. गेल्या महिनाभरात 'ड्रंक अँड ड्राइव्ह'बरोबरच अशा सहा सहप्रवाशांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामध्ये एका बड्या व्यावसायिकाच्या पत्नीचादेखील समावेश आहे.

मद्यप्राशन करून गाडी चालवणे हा कायद्याने गुन्हा आहे. पोलिसांकडून अशा तळीराम चालकांविरुद्ध मोहीम हाती घेण्यात येते. आता केवळ थर्टी फर्स्टलाच अशी मोहीम राबविण्याऐवजी वर्षभर कारवाई केली जाणार आहे. गेल्या तीन महिन्यांत आठशे तळीराम चालकांविरुद्ध कारवाई झाली. प्रत्येकाने कोर्टात तीन हजार रुपये दंड भरला आहे. या कारवाईदरम्यान आलेल्या अनुभवांनंतर विचारविनिमय करून पोलिसांनी आता तळीराम चालकाशेजारी बसलेल्या सहप्रवाशांवरही कारवाईचा बडगा उगारला आहे.

चालकाने मद्यप्राशन केले असल्याची माहिती असतानाही त्याला गाडी चालवण्यापासून परावृत्त केले नसल्याची शिक्षा या सहप्रवाशांना देण्यात येत आहे. 'ड्रंक अँड ड्राइव्ह'प्रकरणी केवळ चालकाला दंड करून सोडून दिले जात नाही. आता सहप्रवाशांचीदेखील तपासणी केली जात आहे. कायद्यातील तरतुदींनुसार अशा प्रसंगी वाहनातील सर्वांवर कारवाई करता येते. आतापर्यंत ती करण्यात येत नव्हती. मात्र, आता ती कारवाई सुरू केली आहे. 'ही कारवाई केवळ वाहनचालक आणि इतरांच्या सुरक्षेसाठी करण्यात येत आहे. दारू ​पिऊन वाहन चालवू नका आणि दुसऱ्यालाही चालवू देऊ नका,' अशा स्वरूपातील जनजागृती त्याच्या माध्यमातून केली जात आहे, असे वाहतूक पोलिस उपायुक्त सारंग आवाड यांनी स्पष्ट केले.

तळीरामांवरील कारवाईसाठी पोलिसांकडून शक्यतो पब, डिस्कोथेक, फाइव्ह स्टार हॉटेल्समधून बाहेर पडणाऱ्या वाहनांना लक्ष्य करण्यात येते. महिलांवर कारवाई करण्यासाठी महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही कारवाई दररोज रात्री आठ ते बारा या वेळेत करण्यात येत आहे.

मद्यप्राशन करून गाडी चालविणे हा केवळ गुन्हाच नसून सुरक्षित वाहतुकीसाठीदेखील धोका आहे. चालकाने मद्यप्राशन केल्याची माहिती खासगी गाडीमधील सहप्रवाशाला असते. वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी त्याला गाडी चालविण्यापासून त्यांनी रोखणे आवश्यक आहे. मात्र, तसे न केल्याने गुन्ह्यात सहभागी झाल्याच्या कलमाखाली सहप्रवाशावरदेखील कारवाई करण्याची तरतूद आहे.

- सारंग आवाड, वाहतूक उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘छत्रपती’ अजित पवारांकडेच!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील जय भवानी माता पॅनेलने माजी चेअरमन पृथ्वीराज जाचक यांच्या भवानीमाता पॅनेलचा दणदणीत पराभव करून कारखान्यावरील सत्ता कायम ठेवली आहे. या विजयाबरोबरच सहकारात आपणच 'दादा' असल्याचे पवारांनी दाखवून दिले आहे.

काही दिवसांपूर्वीच माजी कृषिमंत्री शरद पवार सभासद असलेला आणि पवारांचा घरचा कारखाना म्हणून ओळख असलेल्या माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा दारुण पराभव झाला होता. हा पराभव जिव्हारी लागलेल्या अजित पवारांनी त्यानंतर लगेचच झालेल्या सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा जिंकून विरोधकांना चारीमुंड्या चीत केले होते आणि आता छत्रपती कारखान्यातही सोमेश्वरच्या विजयाची पुनरावृत्ती करत विरोधकांना धोबीपछाड दिली. सोमेश्वरप्रमाणेच छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांनी जातीने लक्ष घातले. सर्वत्र प्रचारसभा घेतल्या. छत्रपती कारखान्यात आधीच निष्प्रभ असलेल्या विरोधकांचा या निवडणुकीत निभाव लागला नाही. निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संदेश शिर्के यांनी निकाल जाहीर केला.

विजयी उमेदवार

अमोल हेमंतराव पाटील, बाळासाहेब महादेव सपकळ, सर्जेराव शिवाजी जामदार, प्रदीप केशवराव निंबाळकर, रणजित बाबूराव निंबाळकर, नंदा भारत वाबळे, अविनाश राजेंद्रकुमार घोलप, दत्तात्रय नामदेव सपकळ, बाळासाहेब राजेंद्रकुमार घोलप, लक्ष्मण पांडुरंग शिंगाडे, बाळासाहेब दत्तात्रय पाटील, नारायण सोपान कोळेकर, प्रशांत तुळशीदास काटे, संतोष महादेव ढवाण, राजेंद्र नामदेव गावडे, तेजश्री कुंदन देवकाते, गोपीचंद कृष्णा शिंदे, निवृत्ती तात्या सोनवणे, सुमन पांडुरंग दराडे, शोभा राजेंद्र झगडे, अनिल बबन बागल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सासवड, जेजुरी भागात बीएसएनएल सेवा खं‌डित

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सासवड

पुरंदर तालुक्यात सासवड, जेजुरी शहरातील बीएसएनएल खात्याने दिलेले दूरध्वनी व ब्रॉडबॅन्ड सेवा वारंवार खंडित होत असल्याने दूरध्वनी ग्राहक त्रस्त झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून बीएसएनएल अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने तक्रारीची दखल घेतली जात नाही. गेल्या दोन वर्षांपासून इंटरनेट सेवा महिन्यातून आठ-दहा दिवस बंद पडत असल्याने या सेवेच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या महिन्यातही गेल्या दहा दिवसांपासून नंदी चौक परिसरातील अनेक दूरध्वनी बंद असून यामध्ये शैक्षणिक संस्था, बँका, पतसंस्था व इतर ग्राहकांचा समावेश आहे. दूरध्वनी कार्यालयात तक्रार करायला ग्राहक गेले असता पालिकेच्या ठेकेदाराने रस्ता खोदताना केबल तोडल्याचे सांगितले जाते. सेवा केव्हा सुरू होईल, याचे उत्तर दिले जात नाही. गेली दोन वर्षे हा त्रास होत असल्याने अनेक ग्राहकांनी कंटाळून ही सेवा बंद करून खासगी सेवेचा आधार घेतला.

दूरध्वनी खात्याच्या बेपर्वाईमुळे आता पंचवीस हजार लोकसंख्या असलेल्या जेजुरीमध्ये दूरध्वनी सेवेचे अवघे १६५ ग्राहक राहिले असून त्यातील शंभर जणांकडे ब्रॉडबॅन्ड सेवा आहे. मात्र, ही सेवा रामभरोसे असल्याचा अनुभव येत आहे. या उलट जेजुरीत ठिकठिकाणी खासगी कंपन्यांचे टॉवर उभे राहिले असून त्यांची सेवा तत्पर व चांगली मिळत असल्याने ग्राहक त्यांचेकडे आकर्षित होत असल्याचे चित्र दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शताब्दी महोत्सव होणार रुग्णालयात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय यंदा शताब्दीत पदार्पण करीत असून हा शताब्दी महोत्सव रुग्णालयातच साजरा करण्यात येणार आहे. येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाची स्थापना ऑक्टोबर १९१५ साली करण्यात आली होती. पूर्वी हे रुग्णालय मुंबई येथील कुलाबामध्ये होते. पण, पहिल्या महायुद्धाच्या काळात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कुलाबामधून खास रेल्वे करून संपूर्ण रुग्णालयाचे स्थलांतर करण्यात आले. ऑक्टोबर १९१५ मध्ये येरवड्यातील मोकळ्या जागेवर रुग्णालयाची स्थापना करण्यात आले असा दाखला पूर्वी कार्यरत असलेले ज्येष्ठ अधिकारी आणि कर्मचारी देतात.

सुमारे ८५ एकर परिसरात हे रुग्णालय विस्तारले असून यामध्ये पुरुषांसाठी १० आणि महिलांकरिता ७ वार्ड स्थापन केले आहेत. मनोरुग्णालयाची रुग्णक्षमता २,४०० इतकी असून सध्या येथे ९६० पुरुष; तर ६८० महिला असे एकूण १,६४० रुग्ण उपचार घेत आहेत. नगर, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, सातारा,नांदेड, परभणी,जालना, औरंगाबाद, सोलापूर, लातूर आणि पुणे या बारा जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. रुग्णांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय अधीक्षकाच्या मार्गदर्शनाखाली १३ मनोविकार तज्ज्ञ, २४ वैद्यकीय अधिकारी, १२ मनोविकृती सामाजिक कार्यकर्ते, व्यवसाय उपचार तज्ज्ञ, दोन अधिसेविका आणि परिचारिका कार्यरत आहे

येरवडा मनोरुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचा आजार लवकर सुधारण्यासाठी औषध उपचारांबरोबर व्यवसाय उपचार, समुपदेशन तसेच मनोरंजनासाठी संगीत उपचारदेखील केले जातात तसेच, रुग्णांची कमी झालेली शारीरिक एकाग्रता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी शिवणकाम, सुतारकाम, विणकाम, कागदी पिशव्या आदी प्रकारची व्यवसायभिमुख कामे करण्यास शिकविले जाते. रुग्णालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त यंदाच्या वर्षी विशेष समित्यांची स्थापना करण्यात येणार असून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी शिबिर आणि स्पर्धा घेतली जाणार असल्याची माहिती अधीक्षक डॉ. भालचंद्र डोंगळीकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनोरुग्णालय सुविधांपासून वंचित

$
0
0

संदीप भातकर, येरवडा

आशिया खंडातील सर्वात मोठे येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय यंदा शताब्दीत पदार्पण करीत आहे; परंतु शंभर वर्षे पूर्ण होत असले तरी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सोळाशेहून अधिक रुग्णाच्या सुरक्षितेसाठी अजूनही सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाही. शताब्दीचे निमित साधून प्रशासनाने आतातरी सुरक्षिततेसाठीच्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दोन वर्षांपूर्वी रात्री झोपताना अंगावरील चादर ओढल्याने झालेल्या मारामारीत दोघा रुग्णांचा मृत्यू झाला होता; तर उस्मानाबाद जिल्ह्यातील एका मनोरुग्ण तरुणीवर लैंगिक अत्याचाराची खळबळजनक घटना समोर आली होती. त्यावेळेस मनोरुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे बनविण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. दोन अडीच वर्षे उलटले तरी अजूनही रुग्णालयाच्या परिसरात कॅमेरे बसविण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.

सुमारे ८५ एकर एवढ्या मोठ्या परिसरात येरवडा मनोरुग्णालय विस्तारले आहे. यामध्ये पुरुषांसाठी १० आणि महिलांकरिता ७ वार्ड स्थापन केले आहेत. नगर, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, सातारा, नांदेड, परभणी, जालना, ओरंगाबाद, सोलापूर, लातूर आणि पुणे या बारा जिल्ह्यातून मनोरुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याने मोठा ताण येतो. रुग्णालयाचे आवार मोठे असल्याने प्रत्येक वार्डासाठी स्वतंत्र डांबरी रस्ते आहेत. मात्र, रुग्णालयातील अंतर्गत असणाऱ्या सर्वच रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था बनली असून रस्ते उखडले आहेत. त्यामुळे दररोज स्वयंपाकघरात तयार होणारे जेवण ट्रॉलीतून घेऊन जात असताना मोठ्या प्रमाणवर भाजी रस्त्यावर सांडली जाते. तसेच, अचानकपणे काही आजार उद्भववल्यास रुग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नाही.

मनोरुग्णालयात सीसीटीव्ही नसल्याने रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरही देखरेख ठेवता येत नसल्याने रुग्णाची सेवा किती प्रामाणिकपणे केली जाते, का प्रश्न निर्माण होतो. शासनाकडून निधी प्राप्त होत नसल्याने सीसीटीव्ही बसविण्यात अडचण येत असल्याचे तत्कालीन अधीक्षक डॉ. विलास भैलुमे यांनी सांगितले होते. अनेकवेळा वरिष्ठ अधिकारी हजर नसल्यास कर्मचारी अर्धवट कामे सोडून घरी निघून जात असल्याचे काहींनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.़

पंचधातूच्या घंटेचा अद्याप शोध नाही

प्रवेशद्वारावर रुग्णांना जागे करण्यासाठी स्वातंत्रपूर्व काळात ब्रिटीशकालीन पंचधातूची सुमारे पन्नास किलो वजनाची घंटा बसवलेली होती. पण, मागील वर्षी प्रवेश द्वाराहून ही ऐतिहासिक घंटा चोरीला गेली. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर चोवीस तास सुरक्षारक्षक असूनही एवढ्या मोठ्या वजनाची पंच धातूची घंटा चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त झाले होते. विशेष म्हणजे ही ऐतिहासिक घंटा कधी आणि केव्हा चोरीला गेली हेच रुग्णालयाला माहिती नाही. घंटा दिसेनाशी झाल्यावर पोलिसांत तक्रार देण्यात आली; पण आजतागायत ही घंटा सापडलेली नाही. सीसीटीव्ही असले असते तर कदाचित ही ऐतिहासिक घंटा चोरीला गेली नसती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रत्येकाचे बँक खाते उघडण्याचे उद्दिष्ट’

$
0
0

पुणेः 'पंतप्रधान जनधन योजनेच्या खात्यांमध्ये आता नागरिक बचतीची रक्कम जमा करत आहेत. या योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यांपैकी ४० टक्के खात्यांवर नियमित व्यवहार होत आहेत. या खात्यांमध्ये तब्बल १५ हजार ८०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे. प्रत्येक कुटुंबात एक खाते उघडल्यानंतर आता बँक खाते नसलेल्या प्रत्येक व्यक्तीचे खाते उघडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे,' अशी माहिती युनियन बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक किशोर खरात यांनी 'मटा' ला दिली.

'देशातील सुमारे ६४ टक्के नागरिकांची बँक खाती नसल्याचे समोर आले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान जनधन योजना राबविण्याचा निर्णय घेतला. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक कुटुंबात किमान एक खाते उघडण्यात आले असून, आता प्रत्येक व्यक्तीचे खाते उघडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

'जनधन योजनेची खाती शून्य शिल्लक रकमेची असली, तरी बँकांच्या प्रयत्नांनंतर आता हळूहळू खातेदार त्यात पैसे जमा करू लागले आहेत. जनधन योजनेअंतर्गत देशभरात उघडण्यात आलेल्या खात्यांपैकी ४० टक्के खात्यांमध्ये आता नियमित व्यवहार होत आहेत. देशभरातील सर्व खाती मिळून या खात्यांमधील बचतीची रक्कम आता जवळपास १५ हजार ८०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे,' असे खरात यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘जेईई-मेन’चा ‘कट ऑफ’ घसरला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अपेक्षेप्रमाणे गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या 'जेईई-मेन'चा 'कट ऑफ' घसरला आहे. खुल्या प्रवर्गासाठी ३६० पैकी १०५ किंवा त्याहून अधिक मार्क मिळवलेले विद्यार्थी 'जेईई-अॅडव्हान्स्ड'साठी पात्र ठरले आहेत. परीक्षेची काठिण्यपातळी वाढल्याने 'कट ऑफ' घसरल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) सोमवारी 'जेईई-मेन'चा निकाल जाहीर केला. त्यानुसार, खुल्या प्रवर्गासाठीचा 'कट ऑफ' १०५ आहे. ओबीसी प्रवर्गासाठीचा 'कट ऑफ' ७० असून, एससीसाठी ५०, तर एसटी प्रवर्गासाठी ४४ असा 'कट ऑफ' आहे. गेल्या वर्षी 'जेईई-मेन'चा खुल्या प्रवर्गासाठीचा 'कट ऑफ' ११५ होता, तर त्याच्या आधीच्या वर्षी तो ११३ होता. त्या तुलनेत यंदाच्या 'कट ऑफ'मध्ये मोठी घसरण दिसते आहे.

'जेईई- मेन'ची यंदाची परीक्षा गेल्या वर्षीच्या तुलनेने अवघड होती. त्यामुळे यंदा या परीक्षेचा 'कट ऑफ' घसरला आहे. 'जेईई'साठी दहावीनंतर सलग दोन वर्षे तयारी करणारे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत असल्याचे यंदाच्या निकालामधूनही पुन्हा समोर आले आहे. राज्यातील विद्यार्थ्यांनी ही बाब विचारात घेणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी योग्य पद्धतीने अभ्यास केला, तर 'जेईई'मध्ये यशस्वी होता येते, हे राज्यातील विद्यार्थ्यांनीच आता दाखवून दिले आहे,' असे आयआयटी प्रशिक्षण केंद्राचे संचालक दुर्गेश मंगेशकर यांनी सांगितले.

'फिजिक्सचा पेपर अवघड असल्याने कट ऑफ घसरल्याचे चित्र आहे. पुण्यातील विद्यार्थ्यांनी मात्र तुलनेने चांगली कामगिरी केली आहे. ज्यांनी आधीपासून तयारी केली, त्यांचा फायदा झाला आहे,' असे निरीक्षण बाकलीवाल ट्युटोरियल्सचे संचालक वैभव बाकलीवाल यांनी नोंदवले.

'जेईई-मेन'ला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० हजारांनी कमी झाली होती. यंदाच्या 'जेईई-मेन'ला सुमारे १३ लाख विद्यार्थी बसले. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांची संख्या १३.५६ लाख होती. त्यामुळेही 'कट ऑफ' कमी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या वर्षी १.७१ लाख विद्यार्थ्यांनी कम्प्युटर-बेस्ड पद्धतीने परीक्षा दिली होती. यंदा ही संख्या १.८६ लाखांवर गेली. राज्यातील सुमारे २.२५ लाख विद्यार्थ्यांनी यंदा 'जेईई-मेन' दिली.

दरम्यान, आयआयटी प्रवेशासाठी 'जेईई-मेन'मध्ये 'कट ऑफ'एवढे गुण मिळालेल्यांना 'जेईई-अॅडव्हान्स्ड' देणे आवश्यक आहे. आयआयटी-मुंबईने आपल्या वेबसाइटवर (http://jeeadv.iitb.ac.in/) यंदाच्या 'जेईई-अॅडव्हान्स्ड'चे वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदा 'जेईई-अॅडव्हान्स्ड' २४ मे रोजी होणार आहे. त्यासाठी अर्जप्रक्रिया २ मे रोजी सुरू होईल.

निकाल खालावला

यंदा -४० ते + ५० या दरम्यान गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी असल्याचे चित्र आहे. एकूणच कामगिरी खालावल्याचे हे चित्र असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. संकल्पना स्पष्ट करून न घेता अभ्यास केल्याने अनेक विद्यार्थ्यांची विकेट गेली आहे, असे काही शिक्षकांनी सांगितले. 'जेईई-मेन'मध्ये ३६० पैकी ३०० पेक्षा अधिक गुण मिळवलेले पुण्यात जेमतेम पाच ते दहा विद्यार्थी असल्याचे समजते. यामध्ये संकल्प गौर (३४५), गिरीधर श्याम (३२१), कार्तिक महेश (३१७), यश वाघ (३१४) आदींचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभ्यासाचाच ‘मेन’ संकल्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या दोन वर्षांत मोबाइल फोनपासून पूर्णपणे दूर होतो. नियमित अभ्यास करत होतो. अनेक आवडीच्या गोष्टींपासून दूर राहिलो. 'जेईई-मेन'च्या निकालाने मात्र या सर्व 'त्यागा'चा फायदा झाला असे वाटते आहे.

पुण्याच्या संकल्प गौरने 'जेईई-मेन'मध्ये ३६० पैकी ३४५ गुण मिळवले असून, तो 'जेईई-अॅडव्हान्स्ड'ला पात्र ठरला आहे. संकल्प पुण्यातील डीएव्ही स्कूलचा विद्यार्थी. त्याने 'आयआयटी- पी'मधून 'जेईई'ची तयारी केली. 'जेईई'मध्ये केवळ शहरातच नाही, तर राज्यातही उल्लेखनीय कामगिरी नोंदविणाऱ्या संकल्पने किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेमध्येही (केव्हीपीवाय) राष्ट्रीय पातळीवर यश मिळवले आहे. त्यामुळेच 'जेईई'मध्ये चांगले यश मिळाले असले, तरी यापुढे बेंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून मूलभूत विज्ञानाच्या क्षेत्रातील शिक्षण घेण्याची तयारी त्याने सुरू केली आहे.

गेल्या दोन वर्षांमध्ये आपल्या सर्व आवडी-निवडी आणि छंदांपासून दूर राहिल्याचे संकल्पने सांगितले. तो म्हणाला, 'मला क्रिकेट आणि काही टीव्ही शो खूप आवडतात. मात्र 'जेईई'ची तयारी करायची असे ठरविल्यापासून मीच या सर्व गोष्टींपासून लांब राहिलो. अमुकच वेळी अभ्यास करायचा, असे कोणतेही वेळापत्रक मी पाळले नव्हते. मात्र, शक्य होईल तेवढा जास्तीत जास्त वेळ अभ्यास करण्यावर माझा भर होता. कंटाळा आल्यास सायकलिंग करणे किंवा थोडा वेळ चालणे असे व्यायामप्रकार करायचो. काही काळ शांत संगीत ऐकायचो.' एखादी गोष्ट करायची ठरल्यास कोणत्याही परिस्थितीत आपल्या निश्चयापासून हटायचे नाही, हा एकच मंत्र या दरम्यानच्या काळात पूर्ण पाळल्याने, यश मिळाल्याचे त्याने स्पष्ट केले.

जेईईला मला गणितामध्ये १२० पैकी १२० गुण मिळाले आहेत. कोणतीही सक्ती करून अशी कामगिरी करणे शक्य होत नसते. मला माझ्या पालकांनी अभ्यास करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. अभ्यास करच, अशी कोणतीही सक्ती त्यांनी केली नव्हती. मीही स्वतः त्यासाठी प्रयत्न केले. अकरावीच्या सुरुवातीपासूनच मी 'जेईई'ची तयारी सुरू केली. 'जेईई- मेन'चा एक टप्पा आता पूर्ण झाला आहे. मला 'जेईई-अॅडव्हान्स्ड'मध्येही अशीच कामगिरी करायची आहे.'

- संकल्प गौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी वणवण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील पाणीपुरवठा विस्कळित झाला असल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. बोर्डाच्या बहुतांश भागामध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामध्ये महात्मा गांधी रस्ता परिसर, न्यू मोदी खाना, शिवाजी मार्केट, बंगलो परिसर आदींचा समावेश आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये पाणीपुरवठा विस्कळित झाल्यामुळे त्रास होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

दरम्यान, पाणीपट्टीवरून एक महिन्यापूर्वी पुणे महापालिका आणि बोर्ड यांच्यात वाद निर्माण झाला होता. महापालिकेचे पथक बोर्डाच्या मुख्यालयाचा पाणीपुरवठा बंद करण्यासाठी आले होते. त्यावरून वादाला तोंड फुटले होते. पाण्याचे बील देण्याची महापालिकेची मागणी आहे. मात्र, महापालिकेने दिलेले बील चुकीचे असल्याचा दावा बोर्डाने करून जकातीची थकबाकी देण्याचा आग्रह धरला आहे. बोर्ड आणि महापालिका प्रशासनाने चर्चा करून तोडगा काढावा. दोन्ही प्रशासनांच्या भूमिकांमुळे सामान्य नागरिकांना समस्येला तोंड द्यावे लागत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक घेण्याची मागणी भाजपचे विनायक काटकर यांनी केली आहे.

पेशंटचे हाल

सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलमधील पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे पेशंट आणि त्यांच्या नातेवाइकांचे हाल होत आहेत. टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येरवडा जेलमध्ये आता नवी बरॅक

$
0
0

पुणे : येरवडा कारागृहात कैद्यांची गर्दी होऊ लागल्याने आता सव्वाकोटी रुपये खर्चून नवीन बरॅक बांधण्यात येणार आहे. या नव्या बरॅकीत किमान पन्नास कैद्यांना ठेवण्याची व्यवस्था असणार आहे. ही बरॅक बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा काढली आहे.

शहरातील गुन्हेगारी वाढत चालल्यामुळे येरवडा कारागृहावर त्याचा ताण पडू लागला आहे. येरवडा कारागृहात सद्यस्थितीत सुमारे साडेतीन हजार कैदी आहेत. कारागृहाच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात कैदी तेथे शिक्षा भोगत आहेत. त्यामुळे कारागृहात आणखी काही नव्या बरॅक बांधण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी कारागृहच्या प्रमुख मीरा बोरवणकर यांनी प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव मान्य करण्यात आला असून कारागृह प्रशासनाने त्यासाठी पैसे भरले आहेत.

येरवडा हे राज्यातील सर्वात मोठा कारागृह आहे. येरवडा कारागृहातील कैद्यांची संख्या वाढत चालली असल्याने पन्नास कैद्यांची व्यवस्था होईल, अशी बरॅक बांधण्यात येत आहे. त्यासाठी सव्वाकोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. येत्या ५ मेपर्यंत या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन दस्त फेरफारात अडथळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दुय्यम निबंधकांकडे नोंदणी झालेले दस्त तांत्रिक अडचणींमुळे तलाठ्यांच्या कार्यालयात पोहोचत नसल्यामुळे ऑनलाइन फेरफार करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे ऑनलाइन फेरफार देण्याच्या योजनेत अनेक अडथळे येत आहेत.

मालमत्तेच्या खरेदी विक्री व्यवहाराचे दस्त नोंदविल्यानंतर प्रत्यक्षात या नोंदी सातबारा उताऱ्यावर येण्यात प्रचंड विलंब होतो. हे टाळण्यासाठी महसूल खात्याने ऑनलाइन सातबारा व फेरफार उपलब्ध करून देण्याची योजना हाती घेतली आहे. प्रारंभी भोर आणि मुळशी या तालुक्यांमध्ये हे कामकाज सुरू झाले व नंतर टप्प्याटप्प्याने अन्य तालुक्यांमध्येही ही योजना सुरू झाली आहे. यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रणालीत अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याची तक्रार तलाठ्यांकडून करण्यात आली आहे. भोर तालुक्यात सव्वाचारशे दस्तांची नोंदणी झाली असली, तरी त्यापैकी फक्त पन्नास दस्त तलाठ्यांकडे ऑनलाइन पोहोचू शकले आहेत. तर मुळशीमध्ये नोंदविण्यात आलेल्या एक हजारपैकी फक्त ३१ दस्त तलाठी कार्यालयात ऑनलाइन पोहोचले आहत. त्यामुळे त्या दस्तांवरून सातबारा उताऱ्यांवर फेरफार करण्यास विलंब लागत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

यासंदर्भात जमाबंदी आयुक्त संभाजी कडूपाटील यांच्याकडे बैठक झाली. या अडचणी दूर न झाल्यास आंदोलन पुकारण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे अध्यक्ष हेमंत नाईकवाडी यांनी दिला आहे. ही कामे होत नसल्याने नागरिक तलाठ्यांकडे हेलपाटे मारत असून त्यांच्या संतापाला तोंड देण्याची वेळ तलाठ्यांवर आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

इंटरनेट कनेक्शन स्लो असल्याने फटका

ग्रामीण भागात इंटरनेटचे कनेक्शन प्रचंड स्लो असून त्यामुळे नोंदी करताना अडचणी येत आहेत, तसेच या सिस्टिममध्ये काम करताना आपोआप लॉगआउट होऊन केलेले काम पुन्हापुन्हा करावे लागत आहे, तसेच काही गावांतील सातबारा उतारे कम्प्युटराइज्ड नाही आणि चुकांच्या दुरुस्तीचा तपशील दिसत नाही,अशा अनेक अडचणी येत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा प्रकल्पाची आखणी कशाला?

$
0
0

पुणेः ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या छोट्या प्रकल्पांना मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायीच्या आडकाठीमुळे मागे राहिला; तर आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात तो मंजूर करावा, अशी सूचनावजा आदेशच शहरातील एका बड्या राजकीय नेत्याने दिला आहे. त्यामुळे, कचरा समस्या सोडविण्यासाठी प्रकल्पाची आखणी केली जाते, की काही हितसंबंध जोपासण्यासाठी, अशी विचारणा केली जात आहे.

शहराच्या वेगवेगळ्या भागांत तीन ते पाच टनांवर कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न पालिकेतर्फे केला जात आहे. भवानी पेठ आणि कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत असे दोन प्रकल्प उभारण्यासाठी तब्बल १५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दोन आठवड्यांपासून स्थायी समितीतर्फे हा विषय पुढे ढकलला जात असल्याने आता एका राजकीय नेत्यानेच त्याचे 'पालक'त्त्व घेतले आहे. कचरा समस्या सोडविण्यासाठी छोटे प्रकल्प आवश्यक असूनही स्थायीतर्फे आडकाठी आणली जात आहे. त्यामुळे, मंगळवारी पुन्हा हा विषय पुढे ढकलण्यात आला; तर पालिका आयुक्तांनी स्वतःच्या अधिकारात मंजूर करून सरकारकडे पाठवावा, असा दमच भरण्यात आल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपची नाराजांवर भिस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) निवडणुकीसाठी भाजपने शड्डू ठोकला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजांवरच भाजपच्या पॅनेलची भिस्त राहणार आहे. मात्र, भाजपला उमेदवार मिळू नयेत यासाठी ऐनवेळी पॅनेल जाहीर करण्याची खेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडून केली जाण्याची शक्यता आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पॅनेल उभा करण्याची तयारी भाजपने केली आहे. साखर कारखान्यांच्या निवडणुकीत फारसा रस न घेतलेल्या भाजपने जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या राजकारणात शिरकाव करण्याचा प्रयत्न चालविला आहे. परंतु, भाजपला बँकेच्या निवडणुकीविषयी फारच उशिरा जाग आल्याचे दिसते.

जिल्हा बँकेच्या २१ जागांच्या निवडणुकीसाठी तब्बल ३६८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीतून माघार घेण्याची आज, मंगळवारी अंतिम मुदत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने साखर कारखान्याचा अनुभव लक्षात घेता पॅनेल न करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, भाजपने ऐनवेळी पॅनेल उभा करण्याच्या हालचाली सुरू केल्याने राष्ट्रवादीने सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. भाजपला पॅनेल उभे करण्यास उमेदवारच मिळू नयेत, यादृष्टीने खेळी केली जात आहे.

जिल्हा बँकेच्या तालुका गटातील १३ जागांसाठी फारच चुरस आहे. त्यामुळे या गटात राष्ट्रवादीकडून पॅनेल होण्याची शक्यता नाही. परंतु, उर्वरित आठ जागांवर पॅनेल करण्यात येणार असल्याचे समजते. त्यासाठी या गटातील पक्षाच्या इच्छूक उमेदवारांचे माघारी अर्ज घेण्यात येत आहे. हे माघारी अर्ज घेतल्यानंतर ऐनवेळी राष्ट्रवादीचे पॅनेल जाहीर होईल. त्यामुळे भाजपला या गटात राष्ट्रवादीच्या नाराजांशी संपर्क करता येणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे.

बँकेसाठी पॅनेल तयार करण्यासंदर्भात भाजपने सोमवारी रात्री उशिरा बैठकचे आयोजन केले आहे. सर्कीट हाउसमध्ये होणाऱ्या या बैठकीला सर्व आमदार व जिल्ह्यातील नेत्यांना बोलाविण्यात आले आहे. भोरमध्ये संग्राम थोपटे व दौंडमध्ये राहुल कुल यांची मत भाजप घेऊ इच्छित आहे. पण थोपटे यांना बिनविरोध निवडून देण्याचा राष्ट्रवादीचाच प्रयत्न आहे. कुल हे निवडणूक लढणार नाहीत. त्यांच्याकडून दुसरा उमेदवार दिला जाणार आहे. शिरूरमध्ये निवृत्तीअण्णा गवारी हे भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. मावळमध्ये भाजपकडे उमेदवार नाही. इंदापूर, बारामतीमध्येही तशीच अवस्था आहे. खेडमध्ये शरद बुट्ट-पाटील यांनी निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तालुका गट वगळता नागरी पतसंस्था गटात भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप लढणार आहेत. अन्य उमेदवारांबाबत भाजपला शोधाशोध करावी लागणार आहे. या निवडणुकीत भाजपचे पॅनेल होईल, पण तो केवळ फार्स ठरण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ज्येष्ठ सनईवादक खळदकर कालवश

$
0
0

पुणे : गेली दोन दशके सवाई गंधर्व संगीत महोत्सवाची सुरेल सुरुवात करणारे ज्येष्ठ सनईवादक बाबुराव खळदकर (वय ९८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. श्रेष्ठ सनईवादक भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांनीही खळदकर यांच्या वादन कौशल्याची प्रशंसा केली होती.

खळदकर यांनी वयाच्या आठव्या वर्षी सनईवादनाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. किराणा घराण्याचे गायक सुरेश माने, दशरथबुवा मुळे, हिराबाई बडोदेकर यांच्याकडून त्यांनी गायनाचे शिक्षण घेतले. गायकी अंगाचे सनईवादन हे खळदकर यांच्या वादनाचे वैशिष्ट्य होते. बेस्ट ऑफ एशिया या पुस्तकातही खळदकर यांच्या वादनाची विशेष दखल घेण्यात आली होती. महाराष्ट्राचे बिस्मिल्ला खाँ म्हणून खळदकर यांची ओळख होती. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हाडा उभारणार ४० हजार घरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'पुणे विभागात गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या वतीने (म्हाडा) येत्या चार वर्षांत ४० हजार घरांची उभारणी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे,' अशी माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. पुणे शहराच्या विकास आराखड्यात म्हाडाच्या वसाहतींना जागा राखून ठेवण्यासाठी प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.

वायकर यांनी म्हाडाच्या पुणे विभागाच्या कार्यालयास भेट देऊन कामांचा आढावा घेतला. येत्या चार वर्षांत पुणे विभागात ४१ हजार ७६६ घरे बांधण्याचे म्हाडाचे नियोजन आहे. त्यामध्ये १२ हजार सदनिका, भागीदारी तत्वावरील दहा हजार, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या हद्दीत सरकारी नियमानुसार ताब्यात येणाऱ्या १८ हजार सदनिका आणि पुनर्विकासाच्या दोन हजार सदनिकांचा समावेश आहे.

दरम्यान, पुणे शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा राज्य सरकारने ताब्यात घेतला आहे. त्यामध्ये म्हाडाच्या घरांसाठी आरक्षण ठेवण्यात आले नव्हते, आता डीपी सरकारकडे आला असून अशा पद्धतीचे आरक्षण ठेवण्याबाबत नगरविकास खात्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे वायकर यांनी सांगितले. म्हाडाच्या प्रकल्पांमधील सदनिकांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहाव्यात आणि त्याचा दर्जाही चांगला हवा, असे त्यांनी बैठकीत सांगितले.

वाढीव एफएसआयचा निर्णय लवकरच

म्हाडाच्या वसाहतींचा पुनर्विकास करताना अडीच एफएसआय देण्याचा निर्णय पूर्वीच्या सरकारने घेतला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. आता या वसाहतींना तीन एफएसआय देण्याबाबत सरकारकडे चर्चा सुरू आहे. याबाबत विचारले असता, राज्याचे गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर होणार असून, त्यामध्ये या संदर्भातील निर्णय घेण्यात येईल, असेही वायकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘..तर आयुक्त जबाबदार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षणमंत्री आणि आयुक्तांनी शिक्षण मंडळाला पूर्ण अधिकार देण्याच्या सूचना देऊनही टक्केवारीच्या भांडणामुळे स्थायी समिती त्यावरील अधिकार सोडायला तयार नाही, असा थेट आरोप विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी सोमवारी केला. तसेच, या वादात पालिकेच्या शाळांमधील मुलांना वेळेवर साहित्य मिळू शकले नाही, तर पालिका आयुक्त आणि स्थायी समितीला जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

शिक्षण मंडळाच्या अधिकारांवरून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाद सुरू आहेत. मंडळाला पूर्वीप्रमाणेच सर्व अधिकार देण्यात यावे, असे पत्र आयुक्तांनी दिले असले, तरी स्थायी समितीमार्फतच खर्चाची मान्यता घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले होते. तरीही, पालिकेप्रमाणेच शिक्षण मंडळानेही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी टेंडर प्रसिद्ध केली आहेत. या टेंडरला मान्यता कोणी द्यायची, याबाबत संभ्रम असल्याने खरेदीला विलंब झाल्यास विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वेळेवर उपलब्ध होऊ शकणार नसल्याची भीती आहे.

शिक्षण मंडळ आणि स्थायी समितीच्या वादामध्ये पालिकेच्या शाळांमधील गोर-गरीब विद्यार्थी साहित्यापासून वंचित राहू नयेत, अशी भूमिका काँग्रेसने मांडली आहे. 'मंडळाला पूर्ण अधिकार देण्याचे आदेश असतानाही, स्थायी समिती अडीचशे कोटींच्या बजेटवरील हक्क सोडायला तयार नाही.

दोन्ही बाजूंनी खरेदी प्रक्रिया सुरू केली असली, तरी त्यांच्या भांडणात विद्यार्थ्यांना वेळेवर साहित्य मिळणार का?, हा प्रश्न तातडीने सोडविला गेला पाहिजे', अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. पालिकेच्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू होताना, साहित्य मिळाले नाही, तर पालिका आयुक्त आणि स्थायी समितीला जाब विचारण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस निरीक्षकांनाच दणका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आपल्याच पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांची खडान् खडा माहिती नसेल तर पोलिस आयुक्त के. के. पाठक यांनी पोलिस निरीक्षकांवरच कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. कोथरूड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनकर कदम यांना सोनसाखळी चोरट्याची माहिती नसल्याने त्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. इतर पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांनाही गुन्हेगारींची माहिती अपडेट ठेवण्याची तंबी दिली आहे.

पाठक यांनी शहरात सर्वाधिक सोनसाखळी चोरीचे गुन्हे झालेल्या बारा पोलिस ठाण्यांच्या पो​लिस निरीक्षकांची (गुन्हे) बैठक सोमवारी बोलावली होती. शहरात गेल्या २५ दिवसांत सोनसाखळी हिसकावण्याचे ५० गुन्हे झाले आहेत. त्यातील सर्वाधिक गुन्हे हे कोथरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाले आहेत. या बैठकीसाठी कोथरूड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनकर कदम आले होते.

पाठक यांनी कोथरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या सोनसाखळी चोराची माहिती विचारली. त्याने नाव, त्याची किती वेळा तपासणी करण्यात आली, त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहेत आदी प्रश्नांची सरबत्ती पाठक यांनी कदम यांच्यावर केली होती. कदम यांना या प्रश्नांची उत्तरे देता आली नाही.

'तु​मच्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक सोनसाखळी चोरी होते आणि तुम्हाला हद्दीतील गुन्हेगारांची सखोल माहिती नाही. त्यामुळे तुम्ही आता पोलिस ठाण्यात जाऊ नका. तुमची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे,' असा आदेशच पाठक यांनी सर्वांसमोर कदम यांना दिला. इतर पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या हद्दीतील गुन्हेगारांची माहिती अपडेट करण्यास सांगितले आहे. पुन्हा दोन दिवसांनी बैठक घेणार आहे. जर गुन्हेगारांची माहिती सांगण्यास असमर्थ ठरलात तर, पुन्हा त्या अधिकाऱ्याची रवानगी पोलिस नियंत्रण कक्षात करण्यात येईल, अशी तंबीही पाठक यांनी इतर पोलिस अधिकाऱ्यांना दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूकंप संशोधन केंद्राचे काम ऑक्टोबरपासून

$
0
0

मयुरेश प्रभुणे, पुणे

जमिनीखाली घडणाऱ्या घडामोडी आणि भूकंपाचे विज्ञान उलगडण्यासाठी कोयना - वारणा परिसरात उभारण्यात येणाऱ्या भूकंप संशोधन केंद्राचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. 'यंदाच्या मान्सूननंतर कोयना परिसरात साडेचार किलोमीटर खोलीचे बोअर घेण्यास सुरुवात होईल,' अशी माहिती भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. शैलेश नायक यांनी महाराष्ट्र टाइम्सला दिली.

नेपाळमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर भूकंपाचे पूर्वानुमान वर्तवणे शक्य आहे का याची चर्चा सध्या विविध माध्यमांतून होते आहे. मात्र, पूर्वानुमान वर्तवण्याआधी भूकंपाचे नेमके विज्ञान उलगडणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करतात. कोयना धरणाच्या परिसरात सातत्याने बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमागे जलाशय कारणीभूत आहे की, भूअंतर्गत घडामोडी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी 'डीप बोअर होल इन्व्हेस्टिगेशन' हा प्रकल्प भूविज्ञान मंत्रालयाच्या पुढाकाराने २०१२ मध्ये कार्यान्वित झाला. मात्र, जमिनीखाली भूकंप केंद्राजवळ घडणाऱ्या घडामोडींची शास्त्रीय माहिती या प्रकल्पातून मिळणार असल्यामुळे भूकंपाचे विज्ञानही या प्रकल्पातून उलगडण्यास मदत होईल, असा विश्वास डॉ नायक यांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केला.

ते म्हणाले, 'या संशोधन प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर असून, बोअर घेण्याच्या जागा, प्रकल्पासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा, जमिनीखाली सोडण्यात येणारी उपकरणे या सर्वांची निश्चिती झाली आहे.

येत्या ऑक्टोबरमध्ये साडेचार किलोमीटर खोलीच्या बोअरच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. पुढील टप्प्यात ही खोली सात किलोमीटरपर्यंत नेण्याचा प्रयत्न असून, त्यातून प्रत्यक्ष भूकंप केंद्राजवळ पोचणे शक्य होणार आहे. भूकंपाच्या आधी आणि नंतर भूकंपाच्या केंद्रापासून जमिनीपर्यंत कशा घटना घडतात याची नेमकी स्थिती प्रथमच या अभ्यासातून समोर येणार आहे. दख्खनच्या भूरचनेत होणाऱ्या भूकंपांची कारणमीमांसा करणेही या संशोधनातून शक्य होऊ शकेल.'

'या सर्व अभ्यासातून भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जमिनीखाली घडणाऱ्या घडामोडींची शृंखला आपल्या समोर आल्यामुळे भविष्यात भूकंपाचे पूर्वानुमान वर्तवणे काही अंशी शक्य होऊ शकेल,' असा विश्वास डॉ. नायक यांनी व्यक्त केला.

असे असेल 'डीप बोअरहोल इन्व्हेस्टिगेशन'

सहभागी संस्था : नॅशनल सेंटर फॉर सिज्मोलॉजी, नॅशनल जिओ फिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि इंटरनॅशनल कॉन्टिनेन्टल सायंटिफिक ड्रिलिंग प्रोग्रॅम

खर्च : चारशे कोटी रुपये (केंद्र सरकारकडून मंजूर) कालावधी - १५ ते २० वर्षे

कोयना- वारणा क्षेत्रातील वीस बाय तीस किलोमीटर क्षेत्रातील

भूकंपांच्या नोंदी

बोअरहोलमध्ये पाठवण्यात येणाऱ्या उपकरणांच्या साह्याने भू कवचावरील ताण, खोल जमिनीखाली असणाऱ्या मिश्र द्रवांचा दाब, उष्णतेचे वहन आणि त्यातील बदल, लाव्हाचे रासायनिक गुणधर्म आदी घटकांच्या भूकंपाच्या आधी आणि नंतर नोंदी घेण्यात येतील.

शास्त्रीय नोंदींच्या आधारे मॉडेल बनवण्याचा प्रयत्न करून भूकंपाचे पूर्वानुमान वर्तवणे शक्य आहे का, याची चाचपणी करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images