Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कलिंगडाला ‘भाव’ मिळेना

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कमी दर मिळत असल्याने उसाच्या ऐवजी कलिंगडाची लागवड करण्याला शेतकऱ्यांनी पसंती दिली. परिणामी कलिंगडाचे अतिरिक्त उत्पादन झाले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत भाव मिळत नाही असे चित्र आहे. परिणामी, मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. बदलते हवामान आणि अस्थिर बाजारभावामुळे कलिंगडासारख्या ९० दिवसांत पैसे मिळवून देणाऱ्या पिकाकडूनही शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.

'उसाऐवजी आम्ही यंदाची कलिगंडची लागवड केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पन्न मिळाले नाही. खर्च आणि उत्पन्नात तफावत आहे. कलिंगडाच्या लागवडीसाठी खर्च अधिक असतो. पण खर्च निघाला असला तरी उत्पादनातून फारसा नफा मिळाला नाही. दररोज ५०० क्रेट कलिंगड पुण्याच्या बाजारात विक्रीसाठी पाठवितो. पण बाजारभाव कमी मिळाल्याने नुकसान झाले,' अशी प्रतिक्रिया कोऱ्हाळे येथील नामदेव माळशिकारे यांनी 'मटा'ला दिली. 'या वर्षी चांगला भाव मिळाला नाही. गेल्या वर्षी १० ते १२ रुपये दर मिळत होता. या वर्षी ३ ते ८ रुपये दर मिळाला आहे. उत्पन्न कमीच मिळाले,' असे बारामती येथील संजय खोमणे या शेतकऱ्याने सांगितले.

'कमी दिवसात चांगले पैसे मिळवून देणारे पीक म्हणून कलिंगडाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. गेल्या वर्षी ८ ते २० रुपये किलो दराने विकलेल्या कलिंगडाच्या उत्पादनातून एकरी सव्वालाख रुपये उत्पन्न मिळत होते. यंदाच्या वर्षी कलिंगडाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. कलिंगडाची लागवड अधिक झाली असून हवामान स्थिर नसल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. यंदा ३ ते ८ रुपये किलो दराने कलिंगडाची विक्री करावी लागत आहे. अतिरिक्त उत्पादनामुळे कलिंगडाचे दर खाली पडले आहेत.

सोलापूर, बारामती, नीरा, कोऱ्हाळे येथील शेतकरी क्रेटमधून तर अन्य ठिकाणचे शेतकरी टेम्पोतून कलिंगड आणतात. क्रेटमधील मालाचे बाजारात येईपर्यंत फिनिशिंग चांगले राहते. योग्य वजन होऊन दरही चांगले मिळतात. टेम्पोतून आलेला माल रस्त्यावर उतरविताना १५० ते २०० किलो कलिंगडे फुटतात. किरकोळ विक्री करताना वजनाचा ताळमेळ न लागल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी क्रेटमध्ये माल आणावा.

- युवराज काची, फळांचे व्यापारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आंब्याची आवक वाढली

0
0

पुणेः रत्नागिरीहून आंब्याची आवक वाढली आहे. तीन ते साडेतीन हजार पेट्यांची आवक झाली आहे. कर्नाटकाहून १० ते १५ हजार पेट्यांची आवक झाली आहे. एक हजार करंड्यांचीही आवक झाली आहे. रत्नागिरीच्या तयार हापूस आंब्याला रविवारी सर्वाधिक मागणी होती. मात्र मागणीच्या तुलनेत तयार आंब्याची उपलब्धता कमी होती. त्यामुळे अनेक ग्राहकांना कच्चे आंबे घेऊन जाण्याचा सल्ला व्यापाऱ्यांनी दिला.

सध्या हलक्या प्रतीचा आंबा अधिक प्रमाणात उपलब्ध आहे. आंब्यावर दव अथवा पावसाचा, गारांचा मार बसल्याने काळे डाग पडले आहेत. काळे डाग पडले असले तरी आंबा आतील बाजूस चांगला आहे. चव उत्तम असून खाण्यास लायक असल्याचे व्यापारी करण जाधव यांनी सांगितले. काळे डाग पडलेल्या चार डझनाच्या पेटीला ७०० ते ११०० रुपये दर मिळाला आहे. तयार माल उपलब्ध नसल्याने आवक वाढूनही दर मात्र घटले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाळी, कडधान्ये महागली

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात पिके खराब झाली. यंदाच्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने उशिरा होणाऱ्या लागवडीमुळे डाळींची आवक घटली आहे. परिणामी, तूर डाळ, हरभरा डाळ, उडीद, मूग डाळीच्या दरात २०० ते ५०० रुपयांनी क्विंटलमागे वाढ झाली आहे. त्याशिवाय कडधान्यांच्या किमतीमध्ये २०० ते ४०० रुपयांची वाढ झाली आहे. डाळींसह कडधान्यांना महागाईची फोडणी मिळाल्याने ग्राहकांच्या खिशाला चटका बसणार आहे.

साबुदाण्याच्या दरात क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांची घट झाली आहे. पुरवठा कमी असल्याने शेंगदाण्याच्या दरातही २०० रुपयांनी वाढ झाली. तांदूळ, साखर, खाद्यतेल, मिरची, गहू, ज्वारी, बाजरी, रवा, आटा, मैदा, नारळ, साबुदाणा, शेंगदाणा, भगराचे दर मात्र स्थिर आहेत.

अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात डाळीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात नव्या वर्षात पावसाचे प्रमाण कमी असल्याने पेरणी आता लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जूनमध्ये होणारी पेरणी ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे. पुरवठा कमी आणि मागणी अधिक होत असल्याने डाळींच्या दरात वाढ होत आहे. तीच परिस्थिती कडधान्यांमध्ये असल्याचे व्यापारी सांगतात. तूर डाळीत २०० रुपये, हरभरा डाळ व मसूर डाळीत प्रत्येकी ३०० ते ४०० रुपये, उडीद डाळीत ५०० रुपयांची दरवाढ झाली आहे. मटकी डाळीत २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे. कडधान्यांमध्ये हरभऱ्याच्या किमतीमध्ये २०० रुपये, मटकीमध्ये ५०० रुपये, मसूर व चवळीत प्रत्येकी ३०० रुपयांची वाढ झाल्याने ग्राहकांचे कंबरडे मोडण्याची चिन्ह निर्माण झाले आहे.

हरभरा डाळीचे दर वाढल्याने बेसनाच्या दरावर परिणाम झाला आहे. त्याच्या दरात १०० ते १५० रुपयांची वाढ झाली आहे. उन्हाळ्यात घरगुती तसेच पावडर तयार करणाऱ्या कंपन्यांकडून मिरचीला अधिक मागणी होते. त्यामुळे ब्याडगी आणि गुंटूर मिरचीला मागणी वाढली असली, तरी त्याचे दर मात्र स्थिर आहेत. उन्हाळ्यात गुऱ्हाळे बंद झाल्याने आवक घटली आहे. त्यामुळे गुळाच्या दरात क्विंटलमागे १०० रुपयांची वाढ झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्थसंकल्पाआधी हवामान अंदाज

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अतिवृष्टी किंवा दुष्काळाचा धोका वेळीच ओळखून वेळीच नियोजन करता यावे यासाठी सरकारने अर्थसंकल्पाआधीच मान्सूनचा अंदाज वर्तविण्याची सूचना केली आहे. असून, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्र संस्था (आयआयटीएम) चे संचालक डॉ. एम. राजीवन यांनी नुकतीच दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ व आयआयटीएमचे सल्लागार डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी उपस्थित होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष महेंद्र बडदे व सरचिटणीस सुनीत भावे उपस्थित होते. राजीवन म्हणाले, 'मान्सून' हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. हवामान विभागातर्फे दर वर्षी एप्रिल ते जूनदरम्यान मॉन्सूनचा अंदाज वर्तविण्यात येतो. सरकारच्या आगामी योजना व निधी तरतुदींसाठी हा अंदाज महत्त्वाचा ठरतो, त्यामुळे हा अंदाज फेब्रुवारीमध्येच वर्तविण्याची मागणी केंद्र सरकारने केली आहे, त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.'

'ग्लोबल वॉर्मिंगमुळे 'एल निनो' अर्थात प्रशांत महासागरावरील उष्ण वाऱ्यांच्या प्रवाहावरही परिणाम होत आहे. एल निनोचा प्रभाव मान्सूनवर होत असल्याने मान्सूनचा अंदाज वर्तविणे आव्हानात्मक बनत आहे. सुरुवातीला पश्चिम प्रशांत महासागरात तयार होणारा 'एल निनो' यंदा मध्य प्रशांत महासागरात तयार होत असल्याचे आढळले आहे,' असेही राजीवन यांनी सांगितले.

'पूर्वी मार्च आणि एप्रिल महिन्यात गारांसह पाऊस अथवा गारपीट होत होती. आता मात्र, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातही गारपीट होत आहे. पश्चिमेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहात निर्माण झालेले वेस्टर्न डिस्टर्बन्सेस आणि पूर्वेकडून वाहणारे बाष्पयुक्त वारे यांच्या संयोगाने हा पाऊस व गारपीट होत आहे,' असे कुलकर्णी यांनी सांगितले. 'कृत्रिम पावसासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व स्थानिक हवामानाच्या परिस्थितीचा अभ्यास या घटकांची सांगड घालावी लागते. पाऊस पडण्याची शक्यता असलेल्या ढगांवरच फवारणी करणे आवश्यक ठरते. असे प्रयोग अनेकदा झाले आहेत, मात्र, त्याच्या यशस्विततेबद्दल फार बोलले जात नाही. आयआयटीएमतर्फे कृत्रिम पावसाबाबत सल्लासेवाही देण्यात येते,' असे कुलकर्णी यांनी सांगितले.

डायनॅमिकल मॉडेल दोन वर्षात

हवामान खात्यातर्फे सध्या मॉन्सूनचा अंदाज सांख्यिकी (स्टॅटॅस्टिकल) पद्धतीने वर्तविला जातो. मात्र, हा अंदाज डायनॅमिकल पद्धतीने वर्तविण्याच्या दृष्टीने सध्या काम सुरू आहे. २०१७ पर्यंत हे काम पूर्ण होईल. हे मॉडेल कार्यान्वित झाल्यानंतर अर्थसंकल्पापूर्वीच मान्सूनचा अंदाज वर्तविणे साध्य होणार आहे. या पद्धतीमध्ये हवामानातील अंदाज सध्यापेक्षा अधिक अचूक, जलद मिळू शकेल, अशी माहिती राजीवन यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंतवणुकीसाठी भारत उत्तम

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशात स्वीडिश कंपन्यांसाठी गुंतवणुकीला पूरक वातावरण निर्माण झाले असल्याने आगामी तीन वर्षांत स्वीडिश कंपन्या महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे देशात रोजगार निर्मिती होऊ शकणार आहे.

'स्वीडिश चेंबर ऑफ कॉमर्स इंडिया'ने सातवा 'बिझनेस क्लायमेंट सर्व्हे' केला आहे. त्यामध्ये हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मुंबईतील कौन्सिलेट जनरल, दिल्लीतील स्वीडिश दूतावास आणि बिझनेस स्वीडन संघटना यांच्या सहयोगाने हा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यामध्ये स्वीडिश उद्योजकांना देशात व्यवसाय करताना आलेले अनुभव, त्यांचा दृष्टिकोन आणि देशातील व्यवसायाचे वातावरण या गोष्टी विचारात घेण्यात आल्या आहेत. सर्व्हेमध्ये दूरसंचार, वाहन, सेवा, अभियांत्रिकी उत्पादने, थेट विक्री आदी क्षेत्रांत स्थापन झालेल्या ११० स्वीडिश कंपन्यांचा समावेश आहे.

स्वीडिश कंपन्यांकडून आगामी तीन वर्षांत महाराष्ट्रासह प्रमुख सहा राज्यांमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. त्यामध्ये गुजरात, ओरिसा, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा यांचा समावेश असल्याचे 'स्वीडिश चेंबर ऑफ कॉमर्स इंडिया'चे संचालक पराग सातपुते आणि स्वीडनच्या मुंबई येथील कौन्सिल जनरल फ्रेड्रिका आर्नब्रँट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

स्वीडिश कंपन्यांनी केलेल्या गुंतवणुकीमुळे सुमारे दीड लाख लोकांना प्रत्यक्ष, तर सुमारे सहा लाख जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. २०१३ हे वर्ष देशातील व्यवसाय गुंतवणुकीसाठी नकारात्मक होते. तरीही गेल्या वर्षी तीन स्वीडिश कंपन्यांनी गुंतवणूक केल्याचे सातपुते यांनी स्पष्ट केले. स्वीडिश कंपन्यांचा देशात गुंतवणूक आणि कामकाजाचा विस्तार करण्याच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल झाला असल्याचे सर्व्हेमधून आढळून आले आहे. सर्व्हेमध्ये सुमारे ९० टक्के कंपन्यांनी देशात गुंतवणुकीसाठी वातावरण हितावह असल्याचा विश्वास व्यक्त केल्याचे ओर्नब्रँड म्हणाल्या.

अनेक कंपन्या निर्मिती, उत्पादन विकास, संशोधन आणि विकास या क्षेत्रांत गुंतवणूक करत आहेत. प्रत्येक दहापैकी आठ कंपन्यांनी पुढील तीन वर्षांत गुंतवणुकीचे संकेत दिले असल्याचे त्यांनी नमूद केले.

स्वीडिश कंपन्यांचा देशात गुंतवणूक आणि कामकाजाचा विस्तार करण्याच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल झाला असल्याचे सर्व्हेमधून आढळून आले आहे. सर्व्हेमध्ये सुमारे ९० टक्के कंपन्यांनी देशात गुंतवणुकीसाठी वातावरण हितावह असल्याचे म्हटले आहे.

- फ्रेड्रिका आर्नब्रँट, कौन्सिल जनरल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी डॉक्टरांना नकोत जेनेरिक औषधे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'जेनेरिक औषधे खरी तर चांगली असून प्रभावी ठरतात. सरकारी हॉस्पिटलमध्ये या औषधांचा वापर करण्यास बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, खासगी क्षेत्रातील डॉक्टर ही औषधे लिहून देण्यात मागे पडत आहेत,' असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) माजी अध्यक्षा डॉ. माया तुळपुळे यांनी व्यक्त केले.

विज्ञान भारती संस्थेच्या वतीने 'जेनेरिक औषधे - आजची गरज व त्याची परिणामकारकता' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. चर्चासत्रात डॉ. तुळपुळे, डॉ. महेश तुळपुळे, डॉ. सतीश शिरोळकर, वैद्य मंदार अक्कलकोटकर, डॉ. आत्माराम पवार, डॉ. अरुंधती दिवाण यांनी सहभाग घेतला.

त्या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. रमेश कुलकर्णी उपस्थित होते. 'जेनेरिक औषधे वापरण्यासंदर्भात सरकारी हॉस्पिटमध्ये बंधनकारक करण्यात आले. जेनेरिक औषधांसंदर्भात खासगी डॉक्टरांमध्ये फारशी जागृती नाही. डॉक्टरांनी जेनेरिक औषधांची चिठ्ठी लिहून द्यावी,' असे आवाहनही डॉ. माया तुळपुळे यांनी केले. आवश्यक औषधे परवडणाऱ्या दरात मिळण्यासाठी सुवर्णमध्य साधला जावा, जेनेरिक औषधांचे मार्केटिंग होत नाही. प्रतिजैविकांचा सध्या देशात मोठा गैरवापर होतो आहे. या जैविकांचा कधी, कोणत्या आजारासाठी, केव्हा व्हावा याचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळेच त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात, याकडे डॉ. दिवाण यांनी लक्ष वेधले.

'केमिस्टांना पर्यायी औषधे देता येतील'

'देशातील औषधांपैकी ९५ टक्के औषधांची देशात 'बायो इक्विव्हॅलन्स' चाचणी (रक्तात औषध मिसळण्याची क्षमता) होत नाही. त्यामुळे त्यांना जेनेरिक औषधे म्हणू नये. त्याला स्वस्त दरातील औषधे असे म्हणावे. औषधांवर संशोधन होऊन औषध निर्मिती केली जाते. त्यांना ब्रॅन्डेड औषध म्हणतात. औषधांतील बायोइक्विव्हॅलन्स चाचणीसाठी कायद्याची गरज आहे. ही चाचणी झाल्यास केमिस्टांना पर्यायी औषधे देण्याची मुभा मिळेल', अशी अपेक्षा डॉ. आत्माराम पवार यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संशोधने अडकली सरकारी कारभारात’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशामध्ये विविध विषयांमध्ये सुरू असलेली संशोधने 'सरकारी' कारभारामध्ये अडकून पडल्याची टीका केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी केली. ही परिस्थिती सुधारण्याची जबाबदारी चांगल्या शिक्षकांचीच असून, डॉ. सतीश ठिगळेंसारखे शिक्षक त्यासाठीचे एक उत्तम उदाहरण असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. डॉ. सतीश ठिगळे सत्कार समितीतर्फे डॉ. ठिगळे यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभामध्ये जावडेकर बोलत होते. 'सिम्बायोसिस'च्या विश्वभवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमावेळी संस्थेचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, संस्थेच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, प्रकाश तुळपुळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. ठिगळे यांचा या वेळी स्मृतिचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला. डॉ. ठिगळे यांच्यावर लिहिलेल्या लेखांच्या 'डॉ. सतीश श्रीपाद ठिगळे- नॉनगव्हर्न्मेंटल इंडिव्हिज्युअल' या पुस्तकाचेही या वेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.

जावडेकर म्हणाले, 'संशोधनाच्या माध्यमातून प्रस्थापितांना आव्हान देण्याची क्षमता विद्यार्थ्यांना प्रदान केली जाते. मात्र आपल्याकडे सरकारी संशोधनांमुळे ते अनुभवायला मिळत नाही. अशा परिस्थितीत डॉ. ठिगळेंसारख्या शिक्षकांची समाज घडविण्याची जिद्दच देशाला प्रगतीपथावर नेऊ शकते.' डॉ. मुजुमदार, डॉ. पवार, डॉ. मंदिरा बसाक यांनीही या वेळी डॉ. ठिगळेंविषयीच्या आपल्या आठवणींना उजाळा देत, त्यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. ठिगळेंविषयीचा एक व्हिडीओही या वेळी प्रदर्शित करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगार कायदा बदलास‘सीटू’चा विरोध

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नरेंद्र मोदी सरकारची धोरणे व विकासाची दिशा यूपीए सरकारप्रमाणेच सर्वसामान्यांच्या विरोधी असल्याचा आरोप करीत बांधकाम कामगारांच्या राज्यस्तरीय अधिवेशनात कामगार कायद्यातील कामगार विरोधी बदलास विरोध करण्याचा ठराव करण्यात आला. तसेच जातीय अत्याचार विरोधी ठरावही या वेळी करण्यात आला.

सेंटर ऑफ इंडियन्स ट्रेड युनियन्सच्या (सीटू) पुढाकाराने पुण्यातील आयोजित दोन दिवसीय अधिनेशनाचा रविवारी समारोप झाला. या वेळी कन्स्ट्रक्शन वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव देबांजन चक्रवर्ती, माजी आमदार व सीटूचे प्रदेशाध्यक्ष नरसय्या आडम, डी. एल. कराड, एम. एच. शेख, अजित अभ्यंकर व शुभा शमिम आदी उपस्थित होते. राजस्थानच्या विधानसभेत एक ऑगस्ट २०१४ रोजी फॅक्टरी अॅक्ट, औद्योगिक विवाद कायदा, शिकाऊ कामगार (अॅप्रेटीस) कायदा, कंत्राटी कामगार नियमन व निर्मूलन कायदा यामध्ये दुरुस्ती केली. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश सरकारने आठ कायद्यांमध्ये दुरुस्त्या केल्या. त्यामध्ये ५० पेक्षा कमी कामगार असणाऱ्या कंपन्यांना कामगारांना विनाचौकशी व कुठलेही कारण न देता कामावरून काढण्याचा अधिकार देण्यात आला. हरियाणा सरकारने आणि महाराष्ट्रानेही कायद्यात बदल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे कामगारांनी एकजुटीने या प्रकाराला विरोध करण्याचा निर्णय या वेळी झाला.

'कामगारांना पेन्शन द्या'

काही राज्यांमध्ये बांधकाम कामगारांना पेन्शन योजना लागू आहे. कामगाराच्या मृत्युनंतर त्याच्या कुटुंबीयांना सर्व लाभ दिले जातात. आपल्या राज्यातही या योजना राबविण्यासाठी येत्या काळात प्रयत्न केले पाहिजेत, असे कन्स्ट्रक्शन वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव देबांजन चक्रवर्ती यांनी सांगितले.

येत्या १ जून रोजी कामगारांचा देशव्यापी संप

पुणे : अच्छे दिन आनेवाले है, असे सांगणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या राजवटीत शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत असून कामगार देशोधडीला लागले आहेत, अशी टीका सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनिसन्सचे (सीटू) राष्ट्रीय महासचिव खासदार तपन सेन यांनी शनिवारी केली. कष्टकरी कामगारांच्या हक्कांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या एक जून रोजी बांधकाम कामगारांचे देशव्यापी लाक्षणिक संप पुकारणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. असंघटीत क्षेत्रात ३६ कोटी कामगार आहेत. त्यापैकी निम्म्याहून अधिक कामगारांना किमान वेतनापासून वंचित रहावे लागत आहे. 'सीटू'ने सरकारला सामाजिक सुरक्षा कायदा करण्यास भाग पाडले. कायदा अस्तित्वात आला, पण त्याची अंमलबजावणी केली जात नाही. बांधकाम प्रकल्पांमध्ये सेस आकारून ३० हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यासाठी सरकारला एक पैसाही खर्च करावा लागलेल नाही. मात्र, काम करताना अपघाती मृत्यू झालेल्या कामगाराला मदतीसाठी झुंझावे लागते.' असे सेन यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खूनप्रकरणी सासरा, मेव्हणा फरारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अप्पर इंदिरानगर येथे पत्नीला नेण्यासाठी आलेल्या पतीचा सासरे आणि मेव्हण्यानेच भोसकून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी वडील-मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते दोघेही फरारी आहेत.

संजय प्रेमानंद देडे (वय २७, रा. आंबेडकर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी नितेश कांबळे (वय २४, रा. मार्केटयार्ड) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बिबवेवाडी पोलिसांनी सुनील नारायण वाघमारे आणि शुभम सुनील वाघमारे (रा. अप्पर इंदिरानगर) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देडे हा वाघमारे यांचा जावई आहे. देडेचे आपल्या पत्नीशी वाद झाले होते. त्या वादातून ती माहेरी आली होती. देडे हा आपल्या पत्नीला नेण्यासाठी सासरी आला असताना तेथे त्याचे सासरे आणि मेव्हण्याशी वाद झाले. त्या वादातून वाघमारे वडील-मुलाने देडेवर चाकुने हल्ला केला. त्यात त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिस निरीक्षक मनोज खंडाळे यांनी दिली. वाघमारे पिता-पुत्राची माहिती मिळाली असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल. घरगुती कारणावरून खुनाचा हा प्रकार घडला असल्याचे खंडाळे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोसरीत दीड लाखांचा गुटखा पकडला

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

गुटखा घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीवर भोसरी वाहतूक विभागाने नाकाबंदी दरम्यान शनिवारी रात्री साडे बाराच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईमध्ये दीड लाख रुपयांचा १८ पोत्यांमध्ये असलेला २०३ किलो गुटखा जप्त करण्यात आला.

पूर्णाराम चौधरी (वय ३२) आणि ओमप्रकाश चौधरी (वय ३० दोघेही रा. रांका बिल्डींग, इंद्रायणी नगर, भोसरी) अशी गुटखा घेऊन जाणाऱ्या आरोपींची नावे आहेत. तपासणीदरम्यान ओमप्रकाश आरोपी पळून गेला असून दुसरा आरोपी पूर्णाराम चौधरी याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी वाहतूक पोलिसांच्यावतीने पुणे-नाशिक रोडवर सी. आय. आर. टी समोर ड्रंक अँड ड्राइव्हसह संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत होती. त्यावेळी सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. पठाण यांना नाशिककडून पुण्याकडे वेगाने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीचा (एमएच १४ बीसी ४२७७) संशय आल्याने त्यांना थांबविण्यात आले.

वाहनचालकाकडे वाहनपरवाना आणि गाडीचे कागदपत्र मागितले असता त्यांनी ते देण्यास टाळाटाळ केली. गाडीची झडती घेतली असता गाडीत खाकी आणि पांढऱ्या रंगाच्या निरनिराळ्या वजनाची व आकारमानाची १८ पोती आढळून आली. त्यामध्ये २०३ किलो वजनाचे विमल पान मसाला, रजनीगंधा, व्ही-१ तंबाखू, आणि तुलसी हे गुटखाजन्य पदार्थ आढळून आले. ज्याची अंदाजे किंमत एक लाख ५० हजार रुपये एवढी आहे. पुढील कारवाईसाठी वाहतूक विभागाने स्कॉर्पिओ गाडी आणि सर्व माल भोसरी पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

दांडेकर पूल परिसरात सल्लागाराला मारहाण

पुणे : दांडेकर पूल परिसरात असलेल्या 'एसआरए'च्या बांधकाम साइटवरील काम बंद पाडण्यासाठी चौघा आरोपींनी तेथील सुरक्षा सल्लागाराला मारहाण केल्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिबवेवाडी येथील रामचंद्र घुगे (वय ६३) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी सिकंदर फरीद पटेल (रा.पर्वती गांव), कादर फरीद पटेल, अजिज फरीद पटेल आणि शाहरूख फिरोज खान यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दांडेकर पूल परिसरात नाईकनवरे डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे 'एसआरए स्किम'चे साइट ऑफीस आहे. या रोडवर हा प्रकार घडला. या ठिकाणी फाइल फाउंडेशनची मशीन येणार होती. या वेळी आरोपींनी येथील काम बंद पडावे म्हणून घुगे यांना मारहाण करण्यात आली आहे.

मोबाइल चोरी; दोघांविरुद्ध गुन्हा

पुणे : नेहरू रोडवरील सोनवणे हॉस्पिटलसमोरून पायी चाललेल्या तरुणाला अडवून त्याच्याकडील दोन मोबाइल हँडसेट हिसकावल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात घडला. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात शाहरूख शेख (वय २०, रा. गुलटेकडी) या तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी दुचाकीवरील दोघा आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहरूख हा पायी जात असताना आरोपींनी त्याला वेळ विचारण्याच्या बहाण्याने थांबवले. त्याच्याकडील दोन मोबाइल हँडसेट हिसकावण्यात आले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजितदादांसमोरच काढले एकमेकांचे उट्टे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'मला पक्षामुळेच त्रास झाला, मी पक्षामुळे आहे हे आज पदाधिकारी विसरले. प्रत्येकजण स्वतःलाच साहेब-दादा समजायला लागले आहेत, महापालिकेत विरोधी पक्षाच्या लोकांकडून सल्ला घेऊन कारभार चालविला जातो यां सारख्या असंख्य आरोप-प्रत्यारोपात रविवारी (२६ एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार मेळावा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. शहरातील सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर थेट 'दादां' समोरच कोरडे ओढल्याने अखेर आता तरी एक दिलाने काम करा असे सांगण्याची वेळ अजित पवार यांच्यावर आली.

माजी मंत्री भास्करराव जाधव यांनी कार्यकर्त्यांमध्ये आता तरी शिस्त आली पाहिजे असे मत व्यक्त केले. तसेच शहरात एका बँकेच्या उद्घाटनाला आलो होतो. तेव्हा मेळाव्याचे समजले म्हणून एक कार्यकर्ता म्हणून आलो. प्रदेशाध्यक्ष असताना सर्व शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. तेव्हा पिंपरी-चिंचवडमधील उपस्थिती पाहून त्यावेळेस नाराजी व्यक्त केल्याची आठवण करून दिली होती. तसेच आघाडी सरकारमुळे प्रत्येकाच्या हातात आलेल्या मोबाइलचा पुरेपूर वापर भाजपने प्रचारात केला असे सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. तसेच आपल्या कामाची माहिती नागरिकांपर्यंत पोचवा असे सांगितले. मात्र, या वेळी एकदिलाने काम केल्यास महपालिकांवर आपलीच सत्ता येईल असे सांगताना त्यांनी अनवधाने 'भगवा' फडकेलच असा उल्लेख केला. पण नंतर त्यांनी सावरून घेत मार्गदर्शन केले.

योगेश बहल म्हणाले, पक्षाला पक्षातील लोकांमुळेच पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे आता तरी सर्वांनी एकत्रित काम केले पाहिजे. तसेच बहल यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून आरोप होत आहेत. त्याला उत्तर देताना त्यांनी महापौरांवर नाव न घेता टीका केली. तसेच पदावर असताना सर्वांना बरोबर घेऊन काम केले. आम्ही मनमानी केले असे बोलले गेले पण अजित दादांना विचारूनच सर्व केल्याचे सांगितले. तसेच वॉर्ड स्तरावर आता निवडणुका होणार असल्याने सर्वांनी चांगले काम केले पाहिजे असे सांगितले.

माजी आमदार विलास लांडे म्हणाले,'मी व लक्ष्मण जगताप तिकीट वाटपावेळेस दादांकडे गेलो होतो. त्यावेळेस महेश लांडगे यांना तिकिट देत असाल तर मी यावेळेस निवडणूक लढवत नाही असा शब्द दिला होता. पण पक्ष नाही सोडला तेव्हा बरेच जण बोलवत होते असे सांगत नाराजी व्यक्त केली. तसेच आमदार असताना ज्यांच्यासाठी काम केले त्यांनीच माझे काम केले नाही असे बोलून दाखविले. तर शहराध्यक्ष योगेश बहल व सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम यांच्यावर जाहीर थेट आरोप केले. बहल एकटेच निवडून येतात तर कदम यांनी सर्वांना घेऊन चालले पाहिजे अशी आशा व्यक्त केली.

'अनधिकृत बांधकामांचा मुद्दा मारक'

या सर्व आरोप-प्रत्यारोपांवर कार्यक्रमाचे अध्यक्ष आझम पानसरे यांनी आता तरी एक दिलाने काम करा असे आपल्या भाषणात सांगितले. तसेच आपल्या भांडणातूनच निवडणुका हातातून गेल्या, पुन्हा तेच करायचे असा सवाल सर्वांना केला. तसेच ज्यांना आत्तापर्यंत पद दिली त्यांनी पक्ष सोडला. त्यामुळे यापुढील काळात तरी योग्य लोकांना पद द्यावी अशी मागणी पानसरे यांनी पवार यांच्याकडे केली. तसेच अनधिकृत बांधकामांचा मुद्दा निवडणुकीला मारक ठरला. पण त्यावेळेस प्रसिद्ध माध्यम तेव्हा जेवढी प्रसिद्ध देत होते. ते प्रश्न कायम असताना देखील मात्र, माध्यमांकडून आता दुर्लक्ष होत असल्याचे नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांची गच्छंती?

0
0

पुणे : 'शिवसेनेतील अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांना इशारा देत, लवकरच नव्याने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जातील,' असे स्पष्ट संकेत पुण्याचे संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले. शिवसेनेच्या1 कसबा, कँटोन्मेंट, शिवाजीनगर आणि वडगावशेरी या विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका नुकत्याच झाल्या. शहरप्रमुख विनायक निम्हण यांच्यासह चारही मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत, महापालिकेच्या २०१३ मध्ये झालेल्या; तसेच गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला झालेल्या मतदानाचा आढावा घेण्यात आला. त्यामध्येच, काही ठिकाणी पक्षाची ताकद कमकुवत झाली असल्याचे लक्षात आल्याने नव्याने पदाधिकाऱ्यांच्या फेरनियुक्त्या केल्या जातील, असे स्पष्ट संकेत डॉ. कोल्हे यांनी दिले. अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांना हटवून त्यांच्या जागेवर कार्यक्षम पदाधिकारी नियुक्त केले जातील, असा सूचक इशारा त्यांनी दिला. पुणे महानगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी आगामी काळात पक्ष संघटना मजबूत करून गटप्रमुखांची फळी निर्माण केली जाणार असल्याचे निम्हण यांनी जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंड शरद मोहोळला खंडणीबाबत अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील गुंड शरद मोहोळला खडक पोलिसांनी तळोजा जेलमधून खंडणी प्रकरणी अटक केली. गुरुवार पेठेतील एका व्यापाऱ्याकडे तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. शिवाजीनगर कोर्टात तारखेला आला असताना त्याने हस्तकांकरवी व्यापाऱ्याला धमकावले होते.

इंडियन मुजाहिदीनचा संशयित दहशतवादी कातिल सिद्दीकी याचा येरवडा जेलमध्ये खून केल्यानंतर मोहोळची रवानगी तळोजा जेलमध्ये करण्यात आली आहे. पुण्यात त्याच्यावर कोथरूड, डेक्कन, दत्तवाडी, वानवडी, येरवडा आणि खडकी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर खुनाचे तीन, दरोड्याचा एक आणि दुखापतीचे दोन, त्याशिवाय शस्त्र बाळगल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत.

मंगळवार पेठेतील कपडे धुण्याचा कारखाना चालवणारे व्यावसायिक योगेश सहदेव पारडे (वय ३२, रा. ७१५, गुरुवार पेठ) यांच्याकडे तीन लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. या प्रकरणी अक्षय भालेराव (वय २३, रा. तुपे कॉलनी), सुशील मंडल (वय २३, रा. भवानी पेठ) यांना अटक करण्यात आली होती.

पारडे यांना मोहोळ टोळीतील दोन गुंडांनी शरद मोहोळला कोर्टात जाऊन भेटण्यास सांगितले होते. त्यानुसार पारडे त्याला भेटण्यासाठी गेले. मोहोळने त्यांना धमकावले होते. या प्रकरानंतर आरोपी अक्षय आणि सुशील हे पारडे यांच्या कारखान्यावर गेले होते. तेथे त्यांनी पारडेंकडे तीन लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर खडक पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. फौजदार संजय गायकवाड, सर्फराज शेख, एकनाथ कंधारे, महेंद्र पवार, सुरेश गेंगजे, सुरेश सोनवणे, विशाल शिंदे, प्रदीप शिंदे यांनी आरोपींना अटक केली. अक्षय आलोक भालेरावचा भाऊ आहे. आलोक आणि मोहोळ सिद्दिकीच्या खुनातील आरोपी आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण आणि सुनील दोरगे यांनी दिली.

सोनसाखळी चोरीच्या आणखी दोन घटना

पुणे : सोनसाखळी हिसकावण्याच्या दोन घटनांमध्ये सुमारे पाऊण लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसकावण्यात आले आहेत. या प्रकरणी स्वारगेट आणि विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

क्रिसेंट शाळेसमोरून पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडला. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नाना पेठ येथील ६४ वर्षांच्या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी दुचाकीवरील दोघा आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. क्रिसेंट शाळेसमोरून पायी जात असताना महिलेच्या गळ्यातील २५ हजार रुपयांची सोन्याची साखळी हिसकावण्यात आली होती. विश्रांतवाडी येथील ६५ वर्षांच्या महिलेने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी दुचाकीवरील दोघा आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीपी रद्द’ ही फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराचा विकास आराखडा (डीपी) तयार करताना नागरिकांनी त्यावर दिलेल्या ८७ हजार हरकती सूचनांवर सुनावणी घेऊन हा आराखडा तयार करण्यात आला आहे. शहरातील डीपी हा पुणेकरांनीच केला असल्याचे सिद्ध झाले आहे. प्रशासनाने ७ ते ८ वर्षे काम करून डीपी तयार केला आहे. त्यामुळे आता हा डीपी रद्द करावा, अशी मागणी करणे म्हणजे पुणेकर नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रकार असल्याचे पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सचिव रमेश धर्मावत यांनी सांगितले.

शहराचा डीपी चुकला असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत राज्य सरकारने मुंबईप्रमाणेच पुण्याचा डीपी देखील रद्द करावा, अशी मागणी पुणे बचाव समितीच्या वतीने करण्यात आली होती. पुणे बचाव समितीने केलेली मागणी म्हणजे डीपीवर हरकती आणि सूचना नोंदविणाऱ्या नागरिकांवर अन्याय करण्याचा प्रकार असल्याचे धर्मावत यांनी म्हटले आहे.

पुणेकरांनी दिलेल्या ८७ हजार हरकतींवर जनसुनावणी घेऊन नियोजन समितीने ९ हजार पानांचा अहवाल केला होता. हा अहवाल पालिकेच्या मुख्य सभेसमोर अंतिम मंजुरीसाठी असतानाच मुदत संपल्याचे कारण पुढे करत शासनाने पालिकेचा डीपी ताब्यात घेऊन तो पुढील कार्यवाहीसाठी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्याकडे पाठविला आहे. डीपीवरील सुनावणीच्या वेळेत अनेक पुणेकरांनी पालिकेत आवर्जुन उपस्थित राहून यावर हरकती सूचना नोंदविल्या.

पुणेकरांच्या सूचनांनुसारच 'डीपी' व्हावा

हजारो पुणेकरांनी नोंदविलेल्या सूचनांनुसार डीपी तयार केला पाहिजे. जेणेकरून पुणेकर नागरिकांना त्या‌चा फायदा होईल. डीपी तयार करण्याच्या प्रक्रियेवर आजपर्यंत मोठ्या प्रमाणात निध‌ी आणि अधिकाऱ्यांचे श्रम खर्ची पडले असून आता पुन्हा नव्याने डीपी तयार करायचा झाल्यास त्यावर पुन्हा खर्च करावा लागणार आहे. पुणेकरांनी हरकती आणि सूचना देऊन तयार केलेला डीप रद्द करावा, अशी मागणी करणे म्हणचे पुणेकरांची फसवणूक करण्याचा प्रकार असल्याचे धर्मावत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ई-शिक्षणाच्या विकासावर भारताचे भवितव्य ठरणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ई-शिक्षणाच्या विकासावरच भारताचे भवितव्य अवलंबून असल्याचे मत ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी रविवारी व्यक्त केले. यापुढील काळात केवळ विद्यार्थीच नव्हे, तर शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांनाही अशा प्रकारच्या शिक्षण प्रसारासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भारती विद्यापीठाच्या २० व्या स्थापना दिन समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पटेल बोलत होते. समारंभामध्ये ज्येष्ठ कम्प्युटरतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, अभिनेता विक्रम गोखले, युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. उत्तमराव भोईटे यांना विद्यापीठातर्फे भारती विद्यापीठ विश्वविद्यालय जीवनसाधना गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. ५१ हजार रुपये रोख, शाल आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर, विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आनंदराव पाटील आणि कुलसचिव डॉ. जी. जयकुमार या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. विद्यापीठांमधून भारतीय संस्कृतीविषयक संशोधन होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. भटकर यांनी मांडले.

'सैनिकी प्रशिक्षण द्या'

पाकिस्तानला चीनने दिलेल्या कर्जामुळे आपण व्यथित झाल्याचे विक्रम गोखले यांनी सांगितले. त्यामुळे आपण धास्तावून गेलो असून, या पुढील काळात अशा प्रकारांविरोधात केवळ शांत बसून चालणार नसल्याचेही ते म्हणाले. तरुणांना सैनिकी प्रशिक्षण देणे गरजेचे असून, त्यासाठी भारती विद्यापीठासारख्या संस्थांनी सैनिकी शाळा-कॉलेजे उभारणे गरजेचे असल्याचे गोखले यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पतीची चार वर्षांची सक्तमजुरी कायम

0
0

पुणे : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला सत्र न्यायालयाने सुनावलेली चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा द्रुतगती न्यायालयानेही कायम ठेवली. द्रुतगती न्यायालयाचे न्यायाधीश दिक्कतवार यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

हनुमंत सोमाजी खेगरे (वय २५, रा. खेगरेवाडी, ता. मुळशी) असे शिक्षा झालेल्याचे पतीचे नाव आहे. या घटनेत छळाला कंटाळून अनिता खेगरे हिने स्वत:ला पेटवून घेतले होते. हनुमंत व अनिता यांचे २२ एप्रिल २००७ मध्ये लग्न झाले होते. काही दिवस त्यांचा संसार सुरळीत चालला. त्यानंतर मात्र त्याने दारू पिवून पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच हनुमंतच्या मनात सतत आपल्या पत्नीचे आपले वडील, भावाबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय येत असे. यामुळेही तो तिला त्रास द्यायचा. या छळाला कंटाळून २४ फेब्रुवारी २००८ रोजी अनिताने स्वत:ला पेटवून घेतले. या घटनेनंतर वडील तिला भेटण्यास हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिने ही सर्व हकीकत सांगितली. त्यानुसार फिर्याद दाखल करण्यात आली होती. घटनेनंतर पाच दिवसांनी तिचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनसाखळी चोरीचे ४८ तासांत सहा गुन्हे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नाकाबंदी, स्वतंत्र स्कॉड, पेट्रोलिंग या कशालाही भीक न घालता सोनसाखळी चोरांनी शहरात उच्छाद मांडला आहे. गेल्या ४८ तासांत सहा ठिकाणी सोनसाखळी हिसकावल्याचे गुन्हे करत सहा लाख रुपयांचा ऐवज हिसकावण्यात आला आहे.

नवआयुक्त के. के. पाठक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सोनसाखळी चोरट्यांना आवर घालण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या 'वीक एंड'लाच चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. पिंपरी, भोसरी, चतुश्रृंगी, स्वारगेट, सहकारनगर आणि भारती विद्यापीठ भागात या सोनसाखळी चोरी झाल्या आहेत. या घटनांमध्ये शक्यतो वृद्ध महिलांना लक्ष्य करण्यात आले आहे.

सॅलिसबरी पार्क येथे ७२ वर्षांच्या आजींच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीची साखळी हिसकावण्यात आली. दुसऱ्या घटनेत, कात्रज येथील समर्थनगर येथे पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील २५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले. तिसऱ्या घटनेत, चव्हाणनगर येथे ६० वर्षांच्या महिलेच्या गळ्यातील एका लाख १० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले आहे. पिंपरी, भोसरी, हिंजवडी आणि चतुश्रृंगी परिसरात झालेल्या सोनसाखळी हिसकावण्याच्या घटनांमध्ये सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज हिसकावण्यात आला आहे.

प्रतिबंध की गुन्हेगारांना पकडणे

गेल्या वर्षी गुन्हे शाखेने सोनसाखळी चोरांच्या टोळ्या गजाआड केल्यानंतर गुन्हे घडण्याचे प्रमाण कमी झाले होते. यावर्षीही तुलनेने प्रमाण कमी होते. या महिन्यात चोरट्यांनी एकदम उच्छाद मांडला आहे. सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळ्या शहरात सक्रिय झाल्या असून त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. पोलिसांकडून या टोळ्या ट्रॅक करणे गरजेचे आहे. प्रतिबंध करण्याच्या प्रयत्नात गुन्हेगारांना पकडण्यात पोलिस अपयशी ठरत आहेत. ज्यांनी गुन्हेगारांना पकडणे गरजेचे आहे ते नाकाबंदीत गुंतले आहेत. त्यामुळे गुन्हेगार मोकाट सुटले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तक्रारदाराचा पोलिसावर हल्ला

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आपल्या मुलाच्या अपहरणाची तक्रार देण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराने दारूच्या नशेत पोलिसांनाच मारहाण केल्याची घटना आंबेगाव पठार येथील पोलिस चौकीत घडली. या प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा तक्रारदाराविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. अपहरणाचा प्रकार ज्या गुन्हेगारामुळे झाला, त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.

आंबेगाव पठार येथील पोलिस चौकीत शनिवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. महेश मनोहर औंधकर (४१, रा. शिवकृपा अपार्टमेंट, आशा हाइट्ससमोर, आंबेगाव पठार) असे पोलिसाला मारहाण करणाऱ्या तक्रारदाराचे नाव आहे. औंधकर याच्यावर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

औंधकर याच्या मुलाची आंबेगाव पठार येथे भांडणे झाली होती. पप्पू घोलप या गुंडाच्या मुलांनी त्याच्या मुलाचे अपहरण केल्याची तक्रार देण्यासाठी तो पोलिस चौकीत गेला होता. या वेळी तक्रार घेण्यावरून पोलिस आणि औंधकर यांच्यात बाचाबाची झाली. त्यातून त्याने पोलिसांवर हल्ला केला. त्याने वरवंट्याने पोलिसांना मारहाण केली. हा प्रकार कळल्यानंतर सहआयुक्त सुनील रामानंद यांच्यासह सर्वच वरिष्ठ पोलिस अधिकारी आंबेगाव, भारती विद्यापीठ परिसरात आले होते. त्यांनी औंधकरवर खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणणे असे दोन गुन्हे दाखल केले आहेत.

औंधकरचा 'प्रताप'

औंधकर याच्या तक्रारीनुसार, पोलिस आरोपींना बोलावण्यासाठी गेले होते. त्या वेळी औंधकरने 'आरोपींना लगेचच अटक करा,' असे म्हणत हुज्जत घातली. काही कळायच्या आतच त्याच्या हातात असलेला वरवंटा त्याने कर्मचारी नितीन शिंदे यांच्या डोक्यात दोन वेळा मारला. शिंदे यांच्या डोक्याला त्यामुळे मोठी इजा झाली. त्यांच्यावर हल्ला करून औंधकर पसार झाला. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. तो आंबेगाव पठारावरील निलगिरीच्या झाडांमागे लपला होता. पोलिस नाईक कुंदन शिंदे त्याला पकडण्यासाठी गेले, तेव्हा त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.

घोलपवर कारवाई

औंधकरच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, मुलाचे अपहरण आणि मारहाणीप्रकरणी सचिन ऊर्फ पप्पू घोलप, उत्तम ऊर्फ भावड्या घोलप, विजय क्षीरसागर, विशाल तांबे, श्रीकांत पारख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पप्पू घोलपला रात्री ताब्यात घेतले. औंधकरच्या प्रकारानंतर सर्वच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी धावले. त्यामुळे आरोपींना लगेचच गजाआड करून त्यांना चांगलाच पोलिसी खाक्या दाखवण्यात आला आहे.

महिलेचे मंगळसूत्र चोरले

'आमची चप्पल का घेतली' असे विचारत पाठलाग करून दोन महिलांनी एका महिलेचे मंगळसूत्र व रोख रक्कम हिसकावून नेल्याची घटना रविवारी कॅम्पमध्ये घडली. या संदर्भात अर्चना गायकवाड (वय २५, रा. साचापार स्ट्रीट) आणि अनिता पवार (वय ३०, रा. शिवाजी मार्केट फूटपाथ) यांच्याविरोधात लष्कर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी महिला सायंकाळी पाचच्या सुमारास उस्मानिया मशिदीजवळून पायी जात असताना गायकवाड व पवार यांनी 'आमची चप्पल का घेतली' असे विचारत त्यांचा पाठलाग केला. त्या महिलेच्या पर्समधील दोनशे सत्तर रुपये रोख व सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. उपनिरीक्षक व्ही. बी. गुजर अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एफआरपी’ सोडून बोला

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'ऊस उत्पादकांना देण्यात येणाऱ्या वाजवी मूल्याच्या कायद्याला (एफआरपी) हात लावण्याचा प्रयत्न केला, तर याद राखा, तसा प्रयत्न करणाऱ्यांना ऊस उत्पादक शेतकरी जन्माची अद्दल घडवतील,' असा संतप्त इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी भाजपच्या नेत्यांना दिला आहे. मित्रपक्षानेच या विषयावर कडक भूमिका घेतल्याने महायुतीतील मतभेद पुन्हा रुंदावले आहेत.

मांजरी येथील ऊस उत्पादक परिषदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच एफआरपीचा विषय उपस्थित केला होता. राज्यातील साखर कारखाने अडचणीत असून अशा काळात एफआरपीच्या कायद्यात बदल करण्याचा विचार त्यांनी बोलून दाखविला होता. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी कडक भूमिका घेतली आहे. एफआरपीच्या कायद्याला हात लावाल तर याद राखा, त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असे शेट्टी यांनी बजाविले आहे. एफआरपी निश्चित करण्याचे सूत्र काय आहे, याची माहिती सर्वांनी घ्यावी. एफआरपी ही उसाच्या उत्पादन खर्चावर आधारीत असते, मग ती कमी करण्याची विधाने करताना उसाचा उत्पादन खर्च कमी झाला आहे काय, असा सवाल त्यांनी केला. ऊस उत्पादक शेतकरी राजकीयदृष्ट्या अत्यंत जागरूक असून एफआरपीला हात लावण्याचा प्रयत्न केला, तर ते जन्माची अद्दल घडवतील, असा इशारा त्यांनी दिला.

मांजरी येथे आयोजित साखर परिषदेत प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहभागी होते आणि त्यांच्यावर साखर कारखान्यांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. मात्र, अशा नेत्यांना बरोबर घेताना साखर उद्योगातील सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या ऊस उत्पादकांना बाजूला ठेवून उद्योगाचा रोड मॅप कसा निश्चित केला जाऊ शकतो, असा प्रश्न शेट्टी यांनी विचारला आहे.

...तेव्हा गडकरींना गुदगुल्या कशा झाल्या ?

शेतकरी संघटनांनी राजकारण करू नये, असे विधान केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केले होते. त्यालाही शेट्टी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. निवडणुकीपूर्वी याच शेतकरी संघटनांना बरोबर घेऊन राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना गडकरी यांना गुदगुल्या झाल्या होत्या. आता राष्ट्रवादीचे नेते शेजारी बसल्यानंतर आम्ही राजकारण करतो, असा साक्षात्कार झाला काय, असा प्रश्न शेट्टी यांनी विचारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका हलवणार स्टाफ

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेतील विभागप्रमुख आणि नागरिकांशी संबंधित अधिकाऱ्यांची कार्यालये वगळता मुख्य इमारतीमधील अनेक कार्यालयांचा कार्यालयीन कर्मचारीवर्ग पालिकेच्या इतर जागांमध्ये स्थलांतरित होणार आहे. त्यामुळे, पालिकेच्या मुख्य इमारतीमधील तब्बल पाचशेहून अधिक छोट्या-मोठ्या कार्यालयांची संख्या येत्या काही दिवसांत घटण्याची चिन्हे आहेत.

पालिकेच्या काही विभागप्रमुखांच्या कार्यालयांना मुख्य इमारतीमध्ये जागा असली, तरी काही विभागप्रमुखांना पालिकेच्या इतर इमारतींमध्ये जागा देण्यात आली आहे. त्यामुळे, पदाधिकारी अथवा आयुक्तांनी बैठक बोलाविल्यास विभागप्रमुखांचा बहुतांश वेळ जाण्या-येण्यातच जातो. त्यामुळे, पालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच, कुणाल कुमार यांनी नागरिकांशी संबंधित सर्व विभागप्रमुखांची कार्यालये एकाच ठिकाणी असावीत, असा मनोदय व्यक्त केला होता. त्यादृष्टीने, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच सर्व विभागप्रमुखांची बैठक घेण्यात आली होती. विभागप्रमुख आणि नागरिकांशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांचा अपवाद वगळता इतर सर्व 'क्लेरिकल स्टाफ' अन्यत्र हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याचा आराखडा आता अंतिम टप्प्यात आला असून, पुढील दोन महिन्यांत संबंधित विभागातील बदल पूर्ण केले जावे, असे स्पष्ट आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

नव्या फेररचनेमध्ये पालिकेतील सर्वच विभागांचे 'शिफ्टिंग' होणार असून, अनेक विभागांना त्यांच्या अखत्यारित असलेल्या जागेवर पाणी सोडावे लागणार आहे. आरोग्य विभागाशी संबंधित काही महत्त्वाची कार्यालये फक्त मुख्य इमारतीमध्ये कायम राहणार असली, तरी आरोग्यप्रमुखांच्या कार्यालयाची जागाही बदलणार आहे. त्यांना दक्षता विभागाच्या कार्यालयाची जागा दिली जाणार आहे. आरोग्य विभागातील बहुतांश कार्यालये कमला नेहरू हॉस्पिटल आणि दळवी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात येणार आहेत, तर अन्न पर्यवेक्षकांचे कार्यालय सांख्यिकी विभागात हलविण्याचे ठरविण्यात आले आहे. पाणीपुरवठा व मलनिस्सारण विभागाच्या कार्यालयांना इंदुमती कॉम्प्लेक्सची जागा दिली जाणार आहे. तर, घनकचरा विभागाची काही कार्यालये एसटीपीच्या जागेत हलविली जाणार आहेत.

सर्व विभागप्रमुख एका छत्राखाली

महापालिकेमध्ये पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने अनेक विभागप्रमुखांची कार्यालयांना सावरकर भवनापासून ते कोरेगाव पार्कपर्यंतच्या पालिकेकडे उपलब्ध असलेल्य जागा देण्यात आल्या होत्या. आता, सर्व विभागप्रमुखांना पालिकेच्या मुख्य इमारतीमध्येच जागा देण्यात येणार आहे. तसेच, जागेतील फेरबदलामुळे सुमारे १५ कार्यालये रिक्त होणार असल्याने त्या जागांवर प्रतिनियुक्तीवर पालिकेत येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी जागा करण्याचा प्रस्ताव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images