Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अनेक भागांत उद्या पाणी नाही

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या वडगाव, पाषाण आणि रावेत जलकेंद्रावर महावितरणतर्फे वीज दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने येत्या गुरुवारी (२३ एप्रिल) डेक्कन जिमखाना, कोथरूड, पाषाण, बाणेरसह विमाननगर, विश्रांतवाडी, लोहगाव परिसराचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे. शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

पाणी बंद राहणारा भाग ः भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, बावधन, भूगाव रोड परिसर, सूस रोड परिसर, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वारजे हायवे परिसर, रामनगर, कर्वे रोड परिसर, कोथरूड, एरंडवणा, डेक्कन जिमखाना, जयभवानीनगर, सुतारदरा, डहाणूकर कॉलनी, परमहंसनगर, कर्वेनगर, गांधीभवन, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड, वारजे जकातनाका, कळस, धानोरी, लोहगाव विमानतळ परिसर, विमाननगर, संजय पार्क, आपले घर, खांदवेनगर (नगररोड), विद्यानगर, विद्यानगर सर्व्हे क्र. ११२, विश्रांतवाडी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरगुती वीजदरही स्थिर राहतीलः मुख्यमंत्री

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'विजेचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी राज्य सरकारने काही पावले उचलली असून आमच्या प्रयत्नांना यश आले; तर उद्योगांचे वीजदर दीड रुपयांनी कमी होतील आणि घरगुती वीजदरही स्थिर राहतील,' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 'शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा महाराष्ट्रावरील कलंक आहे,' असे ते म्हणाले.

वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या १४१ व्या सत्राचे उद‍्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. सभेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक अध्यक्षस्थानी होते. पू्र्वीच्या सरकारने मतांच्या राजकारणासाठी वीज कंपन्यांना वीस टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, त्यामुळे तूट वाढून राज्य अडचणीत आले असते. त्यामुळे आम्ही ते अनुदान बंद केले, त्यावरून आमच्यावर टीकाही झाली. राज्यातील वीजदर अधिक आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, राज्य सरकारने याबाबत काही पावले उचलली आहेत. आमचा प्रयत्न यशस्वी झाला, तर इतरांवर भार न पडता उद्योगांच्या वीजदरात दीड रुपयांनी घट होऊ शकते. तसेच घरगुती ग्राहकांचे वीजदरही स्थिर राहू शकतील, असे फडणवीस म्हणाले.

'आत्महत्या हा कलंक'

'शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा महाराष्ट्रावरील कलंक आहे. आम्ही उद्योगांच्या बाजूने असून शेतकऱ्यांच्या विरोधात आहोत,' अशी टीका करण्यात येते. परंतु, शेतीमध्ये सध्या पन्नास टक्के रोजगार असून त्यातील उत्पन्न फक्त दहा टक्के आहे. त्यामुळे शेतीवरील हा अतिरिक्त रोजगारांचा भार कमी करण्यासाठी इतर क्षेत्रांमध्ये रोजगारांच्या संधी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाचा नारा दिला असून आम्ही मेक इन महाराष्ट्रची घोषणा केली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. त्यासाठी नव्या टेक्नॉसॅव्ही पिढीला कौशल्यविकासाचे शिक्षण देण्याच्याही विविध योजना आखण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. मंदार बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा प्रकल्पासही दिरंगाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रभागातील कचरा प्रभागातच जिरविण्यासाठी महापालिका प्रशासनाने हाती घेतलेल्या मोहिमेला स्थायी समितीकडूनच दिरंगाई होत असल्याचे समोर आले आहे. शहरातील कचरा प्रत्येक प्रभागात जिरविण्यासाठी प्रभागात असलेल्या मोकळ्या जागांवर २ ते ५ टनापर्यंतचे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, गेल्या दोन बैठकांपासून पाहणीच्या नावाखाली; तर मंगळवारी सदस्य गैरहजर असल्याचे कारण पुढे करत स्थायी समितीने या प्रकल्पांना मान्यता देण्याचा प्रस्त‌ाव पुढे ढकलला.

शहराचा मध्यवर्ती आणि दाट लोकवस्तीचा भाग अशी ओळख असलेल्या कसबा विश्रामबागवाडा तसेच भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील प्रभागांमध्ये अशा लहान प्रकारचे सुमारे ११ प्रकल्प उभारले जाणार आहेत. शहरातील कचरा शहरातच जिरविण्याची ग्वाही महापालिका प्रशासनाने उरळी, फुरसुंगी येथे कचराडेपो असलेल्या भागातील ग्रामस्थांना दिलेली आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू असून लवकरच प्रभागातील कचरा प्रभागात जिरविण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे. हे प्रकल्प उभारण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी जाणार असल्याने ग्रामस्थांनी कचरा टाकण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी भूमिका काही महिन्यांपूर्वी पालिका प्रशासनाने घेतली होती. महापालिकेने शहरात निर्माण होणारा जास्तीत जास्त कचरा शहरातच जिरवावा यासाठी सहा महिन्यांचा कृती आराखडा प्रशासनाने ग्रामस्थांना सादर केला आहे. त्यानुसार, ही मुदत सप्टेंबर २०१६ मध्ये संपत आहे. पहिल्या तीन महिन्यांच्या कालावधीत शहरात प्रत्येक प्रभागात दोन ते दहा टनांपर्यंत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे लहान प्रकल्प उभारणार असल्याची घोषणा महापालिकेने होती.

'प्रस्ताव पुढे ढकलला'

कचरा प्रकल्पाला मंजुरी देण्याचे सोडून प्रस्ताव पुढे ढकलण्याचा प्रकार स्थायी समितीने सुरू केल्याचा आरोप केला जात आहे. मंगळवारी सदस्य अनुपस्थित असल्याचे कारण पुढे करत हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आल्याचे स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुकलेल्या पुलास जबाबदार कोण?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हडपसर उड्डाणपुलाच्या चुकलेल्या आराखड्यास जबाबदार कोण आहे, ही चूक नक्की कोणाकडून झाली याची जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश मंगळवारी स्थायी समितीने प्रशासनाला दिले. यामध्ये ठेकेदाराची की सल्लागाराची चूक झाली याची चौकशी करून त्याचा सविस्तर अहवाल समितीसमोर सादर केला जाईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी दिली.

हडपसर भागातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने हडपसर- सासवड रोडवर उड्डाणपूल बांधला जात आहे. या उड्डाणपुलाचे ७० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर हा उड्डाणपुलाचा आराखडा चुकला असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे पुलाच्या सुधारित आराखड्यासह पुलाच्या वाढीव खर्चाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता. उड्डाणपुलाच्या चुकलेल्या आराखड्याचे पडसाद सोमवारी झालेल्या मुख्यसभेतही उमटले होते. त्यानंतर मंगळवारी झालेल्या स्थायीच्या बैठकीतही सदस्यांनी या प्रश्नावरून प्रशासनास धारेवर धरले. तसेच, या प्रकाराची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दस्त नोंदणी’चे कामही ठप्प

0
0

पुणेः दस्त नोंदणीची वेब कनेक्टिव्हिटी तुटल्याने शहरातील आठ दुय्यम निबंधक कार्यालयांमधील दस्त नोंदणीचे काम दिवसभरासाठी बंद पडले. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर फ्लॅट खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.

दस्त नोंदणीसाठी बीएसएनएलने शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयांना बेव कनेक्टिव्हिटी दिली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर फ्लॅट, दुकान, जमीन खरेदीसाठी नागरिकांनी ऑनलाइन आरक्षण केले होते. या दस्त नोंदणीसाठी नेहमीपेक्षा तुलनेने जादा गर्दी असल्याने वेब कनेक्टिव्हिटीवर त्याचा ताण वाढला. त्यामुळे शहरातील आठ दुय्यम निबंधक कार्यालयांतील संगणक यंत्रणा विस्कळीत झाली.

कनेक्टिव्हिटीअभावी दस्त नोंदणी करण्याचे काम थांबल्याने नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना लगतच्या दुय्यम निबंधक कार्यालयात पाठविण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी मोठी धावपळ झाली आणि त्याचा मनस्तापही झाला. दुपारच्या वेळी यातील तीन कार्यालयांचे काम पूर्ववत झाल्यानंतर नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. ३१ डिसेंबर रोजीही अशाच पद्धतीने कामकाज बंद पडले होते. १ जानेवारी रोजी नवीन बाजारमूल्य तक्ता (रेडिरेकनर) जाहीर होत असल्याने नागरिक तत्पूर्वी नोंदणी करण्यासाठी धावपळ करतात. सण-सुद व रेडिरेकनर जाहीर होण्यापूर्वी यंत्रणा बंद पडणार नाही यादृष्टीने नोंदणी व मुद्रांक विभागाने दक्षता घेणे गरजेचे असल्याचे मत काहींनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बीएसएनएल’ कर्मचाऱ्यांचा संप

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे 'बीएसएनएल'च्या सेवांबरोबरच नोंदणी आणि मुद्रांक विभाग तसेच काही बँकांमधील कामकाज मंगळवारी ठप्प झाले. पुण्यातील संप शंभर टक्के यशस्वी झाला असून, आज, बुधवारीही कर्मचारी संपावर असणार आहेत. 'बीएसएनएल'च्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विविध १६ संघटनांनी एकत्र येऊन दोन दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्यातील संप शंभर टक्के यशस्वी झाला. 'बीएसएनएल'ची सर्व ग्राहक सेवा केंद्र आणि कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. बुधवारीही पॉवर प्लँट वगळता सर्व सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचे बीएसएनएल एम्प्लॉइज युनियचे नागेश नलावडे यांनी सांगितले. नोंदणी आणि मुद्रांक विभागाचा कारभार 'बीएसएनएल'च्या सेवेवर आधारित आहे. कर्मचारी संपावर असल्याने या सेवेमध्ये अडथळा निर्माण झाला. त्यामुळे या विभागाच्या काही कार्यालयांत खरेदी आणि विक्रीची नोंदणी होऊ शकली नाही. काही बँकांमध्येही 'बीएसएनएल'ची सेवा आहे. त्यामुळे संबंधित बँकांच्याही कामकाजावर परिणाम झाला.

दरम्यान, बीएसएनएल जॉइन अॅक्शन कमिटीच्या वतीने सातारा रस्त्यावरील कार्यालयासमोर जाहीर सभा घेण्यात आली. ​दिलीप जगदाळे, नागेश नलावडे यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या या सभेत सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे (सीटू) अजित अभ्यंकर आणि भारतीय मजदूर संघाचे जालिंदर कांबळे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी भरत सोनावणे, एस. सी. पाटील, नंदा परदेशी, बेबीनाझ पठाण, वंदना कामठे, एस. व्ही. सोनवणे, सुहास शहा आदींची भाषणे झाली. केंद्र सरकार उद्योग वाचविण्याऐवजी उद्योगपतींच्या पाठिशी असल्याची टीका अभ्यंकर यांनी केली.

कर्मचाऱ्यांच्या मागण्या

'बीएसएनएल'च्या कर्मचाऱ्यांच्या प्रमुख २० मागण्या आहेत त्यामध्ये 'बीएसएनल'चा तोटा करणाऱ्या ग्रामीण भागातील सेवांची तूट भरून काढणे, अत्यावश्यक उपकरणांची खरेदी करणे, 'बीएसएनएल'च्या सेवांमध्ये विस्तार करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे, 'बीएसएनएल'- 'एमटीएनएल' यांचे विलिनीकरण करू नये, 'बीबीएनएल' आणि 'बीएसएनएल' यांचे विलिनीकरण करणे, सहाय्यक टॉवर कंपनीचा प्रस्ताव रद्द करणे, 'बीएसएनएल'ची मालमत्ता 'बीएसएनएल'च्या नावावर करणे, स्पेक्ट्रम चार्जेस म्हणून सहा हजार ७०० कोटी रुपये परत करणे, डिलॉइट कमिटीच्या कामगार विरोधी शिफारशी रद्द करणे, 'बीएसएनएल'ला मोफत स्पेक्ट्रम उपलब्ध करून देणे, नवीन कर्मचारी भरती करणे, 'बीएसएनएल'ची फोरजी सेवा सुरू करणे आणि सेवानिवृत्तांना नियमित पेन्शन मिळावी आदींचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मल्टिप्लेक्स’च्या ‘प्राइम टाइम’कडे रसिकांची पाठ!

0
0

चिन्मय पाटणकर, पुणे

मराठी चित्रपटांच्या मल्टिप्लेक्समधील 'प्राइम टाइम'कडे मायबाप रसिकांनी पाठ फिरवली असल्याचे स्पष्ट झाले आहे. वीक-एंडलादेखील चित्रपटांना प्रतिसाद थंडच होता. इतकेच नव्हे, तर प्रेक्षकांअभावी काही खेळ रद्द करण्याची वेळ आली.

राज्य सरकारने मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी मल्टिप्लेसमध्ये प्राइम टाइम देणे बंधनकारक करण्याचा निर्णय नुकताच घेतला. या पार्श्वभूमीवर, प्राइम टाइम मराठी चित्रपटांसाठी पुण्यात किती लाभदायक ठरतो, याचा 'मटा'ने आढावा घेतला. पुण्यातील पाच मल्टिप्लेक्समधील शुक्रवार ते सोमवार या कालावधीतील मराठी चित्रपटांसाठीची प्रेक्षक उपस्थिती, टक्केवारी आणि कमाई यांची सर्वंकष माहिती प्राप्त करण्यात आली. त्यानुसार, प्राइम टाइमचा उडालेला बोजवारा प्रकाशात आला.

सध्या मल्टिप्लेक्समध्ये पाच मराठी चित्रपट दाखवले जात आहेत. त्यात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'कोर्ट'चाही समावेश आहे. मात्र, तिसरा आठवडा सुरू असलेल्या 'कॉफी आणि बरंच काही'चा अपवाद वगळता इतर सर्वच चित्रपटांना प्रतिसाद थंडच आहे.

'प्रतिसादात फारसा फरक नाही'

मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना प्राइम टाइम मिळू लागल्यानंतर चित्रपटांना मिळणाऱ्या प्रतिसादात फार फरक पडला नसल्याचे निरीक्षण 'सिटीप्राइट मल्टिप्लेक्स'चे पुष्कराज चाफळकर यांनी नोंदवले. 'मराठी चित्रपटांची गर्दी झाल्यावर मल्टिप्लेक्समध्ये स्क्रीन देण्यातही मर्यादा येतात. त्यामुळे निर्मात्यांनी आपसात चर्चा करून चित्रपट प्रदर्शित केले पाहिजेत. 'प्राइम टाइम'चे खास महत्त्व नाही. चांगल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोच,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

खेळच रद्द!

मराठी चित्रपटांना प्राइम टाइम देऊनही चित्रपटांचे खेळ रद्द करावे लागले. सोमवारी (२० एप्रिल) ते सिटीप्राइड सातारा रोड येथे सायंकाळी सव्वासहाच्या खेळाला एकही प्रेक्षक नसल्याने 'ते दोन दिवस' चित्रपटाचा खेळ रद्द करावा लागला. 'अभिरुची' येथे शनिवारी सायंकाळी सव्वापाचचा 'काकण' चित्रपटाचा खेळ प्रेक्षक नसल्याने रद्द झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेना जिल्हाप्रमुखांवर हल्ला

0
0

राजगुरुनगर : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे यांना मंगळवारी आळंदी मरकळ रस्त्यावर चार ते पाच हल्लेखोरांनी मारहाण केली. त्यात त्यांच्या डाव्या डोळ्यावर गंभीर जखम झाली आहे. गावडे यांच्या घरासमोरच घटना घडली. हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. राजकीय द्वेषातून किंवा व्यावसायिक कारणावरून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. रात्री उशिरापर्यंत आळंदी पोलिस ठाण्यात संबंधित घटनेची नोंद करण्यात आलेली नव्हती. 'सकाळी गावडे आणि एका ठेकेदारात शेतातील माती आणि मुरूम काढण्यावरून जोरदार बाचाबाची झाली होती. त्याचाच राग मनात धरून संबंधित ठेकेदाराने दुपारी हा हल्ला केला असावा,' असा आरोप आमदार सुरेश गोरे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘DP’च्या जेवणावळींसाठी ४ लाख

0
0

म. टा. प्रतिनिध‌ी, पुणे

शहराच्या विकास आराखड्यावर (डीपी) चर्चा करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेच्या जेवणावळीसाठी पालिकेला पावणेचार लाख रुपये मोजावे लागले आहे. चिकन दम बिर्याणी, मटन रस्सा, शाही गुलाबजाम, पनीर माखनवाला, स्ट्रॉबेरी आइस्क्रीम देण्यासाठी हा खर्च झाला आहे.

विकास आराखड्यावर चर्चा करण्यासाठी चार विशेष सर्वसाधारण सभांच्या वेळेस ठेवण्यात आलेल्या भोजनाच्या पावणेचार लाख रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीच्या बैठकीत नुकतीच मंजुरी देण्यात आली. शहराच्या डीपीवर चर्चा करून त्याला मंजुरी देण्याचे काम गेले वर्षेभर सुरू होते. मार्च महिन्यात डीपीवर साधकबाधक चर्चा करून डीपीला मंजुरी देण्यासाठी १०, १६, १७, २३ मार्च या दिवशी विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात आल्या होत्या. सकाळी अकरा ते साडेअकरा वाजल्यापासून या सभा बोलविण्यात आल्याने सभेला उपस्थित असलेल्या सभासदांबरोबरच, अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. डीपीवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या चार सभांच्या वेळेस भोजन ठेवलेल्या संबंधित केटरर्सला पावणेचार लाख रुपयांचे बील देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी आला होता. याला स‌मितीच्या बैठकीत एकमताने मंजुरी देण्यात आली.

चार विशेष सर्वसाधारण सभेपैकी एका सभेच्यावेळी नॉन व्हेज आणि व्हेज अशा दोन्ही प्रकारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या सभेच्या जेवणावळीसाठी प्रशासनाला १ लाख ३० हजार रुपये मोजावे लागले आहे. नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी मटन रस्सा, चिकन दम बिर्याणीपासून व्हेज खाणाऱ्यांसाठी शाही गुलाबजाम, पनीर माखनवाला, मटकी उसळ ते आइस्क्रीमपर्यंतचा बेत ठेवण्यात आला होता. नॉन व्हेजसाठी प्रति प्लेट पावणे पाचशे रुपये; तर व्हेजसाठी पावणे तीनशे रुपये प्रति प्लेट एवढा खर्च पालिकेला आला आहे. हा खर्च मोठ्या प्रमाणात झाल्याने पुढील तीनही सभासदांसाठी प्रशासनाने केवळ व्हेज जेवणाची व्यवस्था केली होती.

डीपीवर सखोल चर्चा होऊन शहराचा चांगला आराखडा तयार व्हावा, यासाठी प्रशासनाने सभासदांसाठी विशेष भोजनाची व्यवस्था केली. मात्र, पालिकेच्या सर्वसाधारण सभेत अंतिम मंजुरीसाठी असलेला डीपी राज्य सरकारने काढून घेतल्याने डीपीही गेला आणि पालिकेचा भोजनावर पावणेचार लाखांचा खर्चही झाला, अशी चर्चा पालिकेत सुरू झाली आहे.

२६० संख्याच प्रत्येक वेळी कशी ?

डीपीची एक विशेष सर्वसाधारण सभा वगळता इतर तीन सभांमध्ये २६० व्यक्तींची भोजन केल्याचे बील संबंधित ठेकेदाराने महापालिकेला दिले आहे. या तीन सभांमध्ये भोजन केलेल्या व्यक्तींची संख्या २६० अशी एकसारखी कशी काय असू शकते, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जानकर मंत्रिमंडळात?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना सुरुवात झाली असून, या मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी भारतीय जनता पक्षातील दिग्गजांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मावळचे आमदार संजय भेगडे यांचे नाव पुन्हा चर्चेत असून, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित मानला जात आहे.

राज्यातील सत्ता हस्तगत केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. त्यानंतर मंत्रिमंडळात आठ कॅबिनेट व दोन राज्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला. नागपूर अधिवेशनापूर्वी भाजपने आणखी काही आमदारांना मंत्रिमंडळात स्थान दिले. मात्र, या विस्तारात भाजपचे शिवसेनेशी मंत्रिपदांवरून सूत जमले नाही. नागपूरच्या अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव मंजूर करताना भाजपला मोठी कसरत करावी लागली. त्यानंतर शिवसेना आणि भाजपने गळ्यात गळे घातले. सत्तेमध्ये शिवसेना सहभागी झाली आणि सहभागी होताना पाच कॅबिनेट व पाच राज्यमंत्रीपदे पदरात पाडून घेतली. भाजपकडे वीस मंत्रिपदे ठेवली. त्यातील १३ कॅबिनेट व सात राज्यमंत्री आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिवेशनापूर्वी केली होती. त्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी संपूर्ण मंत्रिमंडळासह अधिवेशनाला सामोरे जाण्याची तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी येत्या काही दिवासांत मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त निघेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे भाजपमधील काही दिग्गज मंडळींनी मंत्रिमंडळातील समावेशासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे समजते. मंत्रिमंडळ विस्तारात मावळचे आमदार संजय भेगडे यांच्या नावाची चर्चा होत आहे. भाजपने गिरीश बापट आणि दिलीप कांबळे यांनी शहरी भागातून संधी दिली आहे. ग्रामीण भागात पक्षाच्या वाढीसाठी संधी देण्याचा निर्णय झाल्यास भेगडे यांना स्थान मिळू शकते अशी चर्चा आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा रंगली आहे. भाजपचे मित्रपक्ष असणाऱ्या शिवसंग्राम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आणि राष्ट्रीय समाज पक्षाला या विस्तारात सामावून घेण्याचे बोलले जात होते.

आरपीआय वेटिंग लिस्टमध्येच

भाजप व शिवसेनेतील करारानुसार सेनेला आणखी दोनच मंत्रिपदे मिळू शकतात. भाजपला सहा आणि मित्र पक्षांना चार मंत्रिपदे देण्यात येणार असल्याचे समजते. मात्र, खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी संघटना भाजपकडून दुखावली गेली आहे. त्यामुळे 'स्वाभिमानी'ला मंत्रिपदाच्या यादीतून बाहेर काढले जाण्याची शक्यता अधिक आहे. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांना आमदारकी दिली आहे. पण त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याचे वृत्त आहे. रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला मंत्रिपदासाठी आणखी काही काळ वेटिंगमध्ये ठेवले जाण्याची शक्यता आहे. घटक पक्षातील फक्त जानकर यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिकीट विमानाचे; प्रवास टॅक्सीने

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दिल्लीला जाण्यासाठी विमानाचे तिकीट काढून सज्ज झालेल्या नागरिकांना टॅक्सीने प्रवास करण्याची वेळ मंगळवारी आली. पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या सकाळी सात वाजताच्या फ्लाइटसाठी पहाटे पाच वाजल्यापासून प्रवासी लोहगाव विमानतळावर तळ ठोकून बसले होते. मात्र, सकाळी अकरा वाजता त्यांना फ्लाइट रद्द झाल्याचे सांगण्यात आले. तब्बल चार तास ताटकळत बसलेल्या प्रवाशांना मुंबईपर्यंत टॅक्सी किंवा बसने नेण्यात आले तेथून पुढे दिल्लीला विमानाने नेण्याची सोय करण्यात आली.

लोहगाव विमानतळावर एअर इंडियाची पुणे- दिल्ली (ए १-८५२) ही फ्लाइट सकाळी सात वाजता आहे. या फ्लाइटची प्रवासी क्षमता १७२ आहे. याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पहाटे पाच वाजता विमानतळावर हजर व्हावे लागते. त्यानुसार मंगळवारी पहाटे प्रवासी विमानतळावर पोहोचले होते. तेथे त्यांची तपासणी किंवा अन्य प्रक्रिया पार पाडण्यात आली. फ्लाइट नियोजित वेळेत प्रस्थान करेल या विचारात असताना, सातची वेळ ओलांडल्यानंतर प्रवाशांनी व्यवस्थापनाकडे विचारणा करण्यास सुरुवात केली. घड्याळाचा काटा पुढे सरकत राहिला. मात्र, प्रवाशांना कोणतीही माहिती दिली गेली नाही. अखेर अकरा वाजता व्यवस्थापनाकडून फ्लाइट रद्द झाल्याचे सांगण्यात आले.

त्यानंतर काही प्रवाशांनी तिकीट रद्द केले. तर, काही प्रवाशांची मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाने पर्याय व्यवस्था करण्यात आली. मात्र, त्यासाठी प्रवाशांना पुण्यातून टॅक्सी आणि बसने मुंबईला जावे लागले. पुणे-दिल्ली या फ्लाइटला जोडूनच दिल्लीतून परदेशात जाण्यासाठी फ्लाइट आहेत. परंतु, ही फ्लाइट रद्द झाल्याने परदेशी जाण्यासाठी निघालेल्या नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. पुण्यातील वरुणराज ट्रॅव्हल्सचे २० प्रवासी चंदिगडला जाण्यासाठी या फ्लाइटने चालले होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ते चंदिगडला पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, टॅक्सीने मुंबईला जाण्यासाठी चार वाजले. त्यामुळे संपूर्ण नियोजन कोलमडले. दरम्यान, या प्रकाराची माहिती घेण्यासाठी एअर इंडियाच्या पुण्यातील अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.

नियोजनावर पाणी

नागरिक तीन महिने आधीपासून विमानाचे तिकीट बूक करून ठेवतात. त्यांचे काही नियोजित कार्यक्रम असतात. मात्र, अशा पद्धतीने फ्लाइट रद्द झाल्यास त्यांच्या नियोजनावर पाणी फिरते. ही फ्लाइट रद्द झाल्याची घोषणा करण्यासाठी किंवा प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी विमानतळावर एअर इंडियाचा एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता, अशी माहिती वरुणराज ट्रॅव्हल्सच्या सतीश कुलकर्णी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक्स्प्रेस’ टोल कायमच

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चुकीच्या पद्धतीने करार केल्यामुळे पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे आणि मुंबई प्रवेशाच्या ठिकाणी छोट्या वाहनांना टोलमुक्ती करण्यात अडचणी आहेत, अशी कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पुण्यात दिली. टोलसंदर्भातील करार करताना राज्यकर्ते स्वहिताचा विचार करतात आणि राज्याचे हित विसरून जातात, अशी टिप्पणीदेखील त्यांनी केली. युती सरकारनेच उभारलेल्या 'एक्स्प्रेस वे'बाबत फडणवीस यांनी केलेल्या या हल्ल्याचा रोख नेमका कोणाच्या दिशेने आहे, याबाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

वसंत व्याख्यानमालेच्या उदघाटनाच्या सत्रात फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पायाभूत सुविधा अशा विविध विषयांवर आपली मते मांडली. राज्य सरकारने विधिमंडळाच्या अधिवेशनात टोलमुक्तीचे धोरण जाहीर केले. त्यावर 'अव्यवहार्य' म्हणून टीकाही झाली. या धोरणानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) ३८ टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना (लाइट मोटार व्हेइकल्स) टोलमुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकार निधी उपलब्ध करून देईल. मात्र, एक्स्प्रेस वे आणि मुंबई प्रवेशाच्या टोलच्या कराराची माहिती घेतली असता,

त्यामध्ये 'बायबॅक'ची तरतूदच नाही, असे आढळून आले आहे. त्यामुळे येथील टोल बंद करायचा असेल, तर राज्यावर त्याचा मोठा भार पडेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्यकर्ते असे करार करताना स्वहिताचा विचार करून राज्याचे हित विसरून जातात आणि त्याचे परिणाम राज्याला भोगावे लागतात, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

'कॅश फ्लो' चुकीच्या पद्धतीनेः फडणवीस

दरम्यान, पीडब्ल्यूडीच्या टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना टोलमुक्ती करण्यासाठी राज्य सरकार १६९ कोटी रुपये देणार आहे. इतकी कमी रक्कम कशी, याची माहिती घेतली असता या टोलनाक्यांवरील दैनंदिन उत्पन्न (कॅश फ्लो) चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात येत असल्याचेही फडणवीस यांनी मान्य केले. हा आकडा ३०० कोटी रुपयांवर जाईल; ही मंडळी मोठ्या प्रमाणात पैसे वसूल करीत होती, परंतु ते कागदावर दिसत नव्हते, असे ते म्हणाले.

सेवा हक्क आणि शुल्क नियमनही!

नागरिकांना निश्चित कालमर्यादेत शासनाच्या सेवा मिळण्यासाठी 'महाराष्ट्र लोक सेवा हक्क वटहुकूम २०१५' काढण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच शिक्षणसंस्थांची नफेखोरी रोखण्यासाठी शुल्क नियमन प्राधिकरण (फीज रेग्युलेटरी अॅथॉरिटी) स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाषा धोरणात दुरुस्ती होणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मराठी भाषेच्या पुढील पंचवीस वर्षांसाठीच्या धोरणावरील आलेल्या हरकती सुचनांमुळे भाषा सल्लागार समितीला धोरणाच्या मसुद्यात बदल करावा लागणार आहे. मे अखेरपर्यंत दुरुस्त केलेला मसुदा पुन्हा राज्य सरकारला सादर करण्यात येणार असून, त्यानंतर राज्य सरकारकडून या धोरणाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला जाणार आहे.

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मराठी भाषेचे पुढील पंचवीस वर्षांसाठीचे भाषा धोरण तयार करून त्याचा मसुदा राज्य सरकारच्या मान्यतेसाठी पाठवला होता. राज्य सरकारने तो मसुदा वेबसाइटवर उपलब्ध करून त्यावर भाषातज्ज्ञ, भाषा अभ्यासक, विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांकडून हरकती सूचना मागवल्या होत्या. २५ फेब्रुवारी ही त्यासाठीची अंतिम मुदत होती. भाषा धोरणाविषयी जागृती करण्यासाठी राज्य सरकारने विविध ठिकाणी चर्चासत्रेही घेतली होती. त्यामुळे या धोरणाच्या मसुद्यावर सुमारे ४०० हरकती-सूचना आल्या. सुरुवातीला हरकती सूचनांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, अखेरच्या टप्प्यात वाढ झाली.

या हरकती सूचना विचारात घेऊन आता समितीने धोरणात काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी या विषयी 'मटा'ला माहिती दिली.

काही दखलपात्र सूचना

बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषेसाठी राज्य सरकारने काहीतरी उपक्रम राबवावेत.

नव्या तंत्रज्ञानाचा वापर मराठी भाषेच्या प्रचार, प्रसारासाठी करावा.

मराठी शाळांचा चेहरामोहरा बदलून टाकावा.

मसुद्यावर आलेल्या हरकती सूचना आम्ही वाचल्या. त्यातील काही सूचना महत्त्वाच्या होत्या. मात्र, हरकती सूचनांच्या माध्यमातून मते मांडणाऱ्यांमध्ये पन्नास ते साठ टक्के लोकांनी मूळ मसुदाच नीट वाचला नसल्याचे जाणवले. त्याचे महत्त्व लक्षात घेऊन सरकारला सादर केलेल्या मूळ मसुद्यात थोडा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मे अखेरपर्यंत या मसुद्यात आवश्यक ते बदल करून सरकारला सादर केले जाणार आहे.

- डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, अध्यक्ष,भाषा सल्लागार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार्ली चॅप्लिनच्या सिनेमांचा महोत्सव

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आपल्या विनोदाने पोट धरून हसायला लावणारा अवलिया कलाकार म्हणजे चार्ली चॅप्लिन. त्याचे जगभर गाजलेले निवडक सिनेमे 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वाचकांना पाहता येणार आहेत. 'कल्चर क्लब'च्या वतीने २४ ते २६ एप्रिलदरम्यान 'चार्ली चॅप्लिन फिल्म फेस्टिव्हल'चे आयोजन करण्यात आले आहेत.

यामध्ये 'द सर्कस', 'द गोल्ड रश', 'सिटीलाइट्स', 'द मॉर्डन टाइम्स', 'द ग्रेट डिक्टेटर', 'द किड' असे सहा तुफान गाजलेले सिनेमे मोठ्या पडद्यावर दाखवण्यात येणार आहेत. फेस्टिव्हलला प्रवेशमूल्य असून, 'कल्चर क्लब'च्या सदस्यांना विशेष सवलत देण्यात येणार आहेत.

फर्ग्युसन रोडवरील 'महाराष्ट्र टाइम्स'च्या ऑफिसमध्ये फेस्टिव्हलची तिकिटविक्री सुरू झाली आहे. तसेच, 'ट्विडल डिझायनोग्राफी', कोथरूड येथे ही तिकिटे उपलब्ध आहेत. संपर्क : ९७६२११५८१४, ९८२३९८२५६९. ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी वेबसाइट : www.mtcultureclub.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडळांसाठी ‘पुस्तक भिशी’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी पुस्तक भिशी योजना राबवण्यात येणार आहे. गणेशोत्सव मंडळाची विधायक पुणे ही संस्था आणि त्वष्टा कासार वाचन मंदिर यांच्या पुढाकाराने ही अनोखी योजना अंमलात आणली जाणार आहे.

त्वष्टा कांसार वाचन मंदिराचे अध्यक्ष अजित पिंपळे यांनी ही माहिती दिली. जागतिक पुस्तक दिनानिमित्त या योजनेचे उद््घाटन रविवारी (२६ एप्रिल) रोजी संध्याकाळी सात वाजता बाजीराव रोडवरील अक्षरधारा बुक गॅलरी येथे होणार आहे. प्रा. हरी नरके या वेळी उपस्थित राहणार आहेत. वाचनसंस्कृती आणि घुमान साहित्य संमेलनाचे अनुभव ते सांगणार आहेत.

पुस्तक भिशी योजनेमध्ये सुमारे पन्नास गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी योजनेतील सभासद एकत्र जमून वाचलेल्या पुस्तकाविषयी चर्चा करणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये साहित्य संवाद निर्माण होण्यास मदत होईल, असे पिंपळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देवकी पंडित यांना ‘किराणा गौरव’ पुरस्कार

0
0

पुणेः रइस बालेखाँ, अल्पना रॉय, देवकी पंडित, वृषाली देशमुख, यादवराज फड आदी कलाकारांचे गायन-वादन 'विरासत संगीत महोत्सव'निमित्त रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. 'संगीतोन्मष'च्या अठ्ठाविसाव्या वर्धापनदिनानिमित्त २४ ते २६ एप्रिलदरम्यान होणाऱ्या या महोत्सवात देवकी पंडित यांना पं. सदाशिवराव जाधव किराणा गौरव पुरस्कारही देण्यात येणार आहे.

गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात संध्याकाळी ६ वाजता हे तिन्ही दिवसांचे कार्यक्रम होणार आहेत. २४ तारखेला शाम सिरूर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदानाचा सोहळा होतोय. याच दिवशी संजय गरूड आणि पंडित यांचे गायन होणार आहे. २५ तारखेला रइस बालेखाँ यांचे सतारवादन; तर अल्पना रॉय यांचे गायन होईल. शेवटच्या दिवशी (दि. २६) वृषाली देशमुख आणि पं. यादवराज फड यांच्या गायनाने महोत्सवाची सांगता होईल. याच दिवशी पं. शिवदास देगलुरकर, शेखर कानेटकर, कृ. दो. धर्माधिकारी यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तम वाचकः पुणे नंबर ५

0
0

पुणेः भारतातील उत्तम वाचक शहरांमध्ये राजधानी दिल्लीने पहिल्या क्रमांक पटकावला आहे; तर सांस्कृतिक शहर म्हणून ख्यात असलेले पुणे पाचव्या स्थानी आहे. चेतन भगत यांचे 'हाफ गर्लफ्रेंड', मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे 'प्लेइंग इट माय वे' ही पुस्तक सर्वाधिक खपाची ठरली.

अॅमेझॉन डॉट इन या वेबसाइटने केलेल्या पाहणीतून हे निष्कर्ष समोर आले आहेत. भारतीय भाषांतील वाचकांच्या पुस्तक खरेदीचा कल लक्षात घेऊन ही पाहणी करण्यात आली. उत्तम वाचक शहरांमध्ये दिल्ली पाठोपाठ दुसऱ्या स्थानी बेंगळुरू, तिसऱ्या स्थानी आर्थिक राजधानी मुंबई, चौथ्या स्थानी हैद्राबाद शहर आहे.

आत्मचरित्रामध्ये अभिनेता नसिरुद्दीन शहा यांचे 'अँड देन वन डे' या पुस्तकाला सर्वाधिक पसंती मिळाली; तर सुरेंद्र मोहन पाठक यांचे 'कोलाबा कॉन्स्पिरसी' हे हिंदी पुस्तक सर्वांत लोकप्रिय ठरले. तर, राजकारणावर आधारित असलेल्या पुस्तकांत संजय बारू यांचे 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर', विनोद राय यांचे 'जस्ट अॅन अकाउंट' या दोन पुस्तकांचा हिंदी, तमीळ आणि कन्नड या भारतीय भाषांमध्ये मोठा वाचक आहे. त्यामुळे प्रादेशिक भाषांतील पुस्तकांनीही सर्वाधिक खपाच्या यादीत स्थान मिळवले.

सर्वाधिक खपाची पुस्तके

हाफ गर्लफ्रेंडः चेतन भगत - कादंबरी

प्लेइंग इट इन माय वेः सचिन तेंडुलकर - आत्मचरित्र

द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टरः संजय बारू - राजकारण

फोर्ज युवर फ्युचरः डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम - उपयुक्तता

डायरी ऑफ अ विम्पी किड : द लाँग हॉल

(९ पुस्तकांचा संच) ः जिफ किन्ने - बालसाहित्य

युवर ड्रीम्स आर माईन नाऊ : शी शोड हिम व्हॉट

लव्ह वॉजः रवींदर सिंग - कादंबरी

द डेलिबरेट सीनरः भावना अरोरा - कादंबरी

अडल्टरीः पाउलो कोएलो - कादंबरी

ब्लड ऑफ ऑलिंपसः रिचर्ड रिओर्डन

सॉरी, यू आर नॉट माय टाइमः सुदीप नगरकर - कादंबरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुस्तकेही झाली मोबाइल

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रवासातील रिकामा वेळ सत्कारणी लावायचा असेल तर तुमच्या स्मार्ट फोनवर मराठी पुस्तकांची अॅप्स डाउनलोड करा आणि हवे ते पुस्तक वाचत बसण्याचा नवा पर्याय वाचकांना मिळाला आहे. मराठी वाचनप्रिय मंडळींसाठी पन्नासहून अधिक अप्लिकेशन्स सुरू झाली असून यामध्ये कथा, कांदबऱ्या, चरित्रात्मक पुस्तकांसह आयुर्वेदिक, धार्मिक, सर्वसामान्यज्ञान अगदी रेसिपींच्या अॅप्सचाही समावेश आहे. त्यामुळे प्रवासामध्ये वजनदार पुस्तकांचे ओझे बाळगण्याऐवजी मोबाइल झालेल्या पुस्तकांचा पर्याय सोयीस्कर ठरणार आहे.

टीव्ही, इंटरनेटवरच्या जमान्यात अलीकडे पुस्तकांच्या वाचकांची संख्या कमी होते आहे, अशी टीका सातत्याने होत असली तरी अत्याधुनिक माध्यमांनी उपलब्ध केलेल्या पुस्तकांच्या खजिन्याचे वाचक वाढत असल्याचे निष्कर्ष अॅप्लिकेशन्सचे निर्माते करीत आहेत. पुस्तकांविषयी ओढ आजच्या तरुणांमध्येही आहे; मात्र त्यासाठी हातात पुस्तकाची 'हार्ड कॉपी' ने घेतात, ऑनलाइन अथवा 'सॉफ्ट कॉपी'च्या माध्यमातून पुस्तके वाचण्यावर ही मंडळी भर देत आहेत. वेबसाइटबरोबर मराठी पुस्तकांची अॅप्लिकेशन्स सुरू झाली आहेत.

हेही वाचता येणे शक्य

अॅप्समध्ये सानेगुरुजी, पु. ल. देशपांडे, स्वातंत्र्यवीर सावरकर, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, गोपाळ गोडसे, महात्मा फुले, कुसुमाग्रज बाबासाहेब पुरंदरे यांची लोकप्रिय झालेली पुस्तके, कादंबऱ्या आणि ग्रंथ वाचायला मिळतात. लहान मुलांचे लाडके पंचतंत्र, चंपक, सिंहासन बत्तीशी, विक्रम वेताळ या गोष्टी देखील उपलब्ध केल्या आहेत. याशिवाय मराठी पाककला, उखाणे, शब्दकोष, सर्वसामान्य ज्ञानाची अॅप्सही लोकप्रिय ठरली आहेत. काही मराठी प्रसिद्ध मासिकांनी देखील अलीकडे अॅप्स सुरू केली असून त्यांना वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्त्याच्या बहाण्याने सोनसाखळी हिसकावली

0
0

पुणेः बाणेर येथील समर्थ कॉलनीतील भूपती बंगल्यासमोर पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आलेल्या आरोपींनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दुचाकीवरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी बाणेर येथील ६१ वर्षांच्या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार महिला रस्त्याने पायी जात असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आलेल्या आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते अपघातांत दोघांचा मृत्यू

0
0

पुणेः ससाणेनगर येथील डीमार्ट मॉलसमोर झालेल्या दुचाकीच्या धडकेत पादचारी ठार झाल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात घडला. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय पांडुरंग मोरे (वय ७५, रा. ससाणेनगर, हडपसर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, शोध सुरू झाला आहे. दुसऱ्या अपघातात, हडपसर येथील हांडेवाडी चौकात दुचाकीस्वार ट्रकखाली सापडून ठार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष मारुती सातव (वय २८, रा. सातवनगर, हांडेवाडी रोड) असे अपघातात मरण पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images