Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

स्टेशनवर राडा

$
0
0

पायाभूत सुविधांच्या मर्यादा अखेर उघड

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उन्हाळी सुट्या सुरू झाल्यानंतर एसटी-रेल्वे स्टेशनवर झुंबड उडते. आधीच पायाभूत सुविधांची वानवा असताना गर्दीचा भार पेलताना अधिकारी वर्गाची परीक्षा पाहिली जाते. दुसरीकडे, प्रवाशांनादेखील या गैरसोयींचा सामना करताना प्रचंड मनस्ताप सोसावा लागतो. त्याचाच आढावा घेणारी ही मालिका...

'मॉडेल स्टेशन' म्हणून कायापालट करण्याच्या राजकारण्यांकडून केल्या जाणाऱ्या घोषणा प्रत्यक्षात वल्गनाच ठरत असल्याचे पुणे रेल्वे स्टेशनवर गुरुवारी सायंकाळी सिद्ध झाले. लांब पल्ल्यांच्या लागोपाठच्या तीन रेल्वे गाड्या, विलंबामुळे कोलमडलेले वेळापत्रक अशा परिस्थितीत हजारो प्रवाशांच्या गर्दीने स्टेशनवरील पायाभूत सुविधांचा पुरता बोजवारा उडाला. प्रसंगी चेंगराचेंगरीदेखील झाली. अखेर पोलिसांना पाचारण करून परिस्थिती नियंत्रणात आणली गेली. उन्हाळी सुटी सुरू होतानाच पुणे स्टेशनवर असे हाल झाल्याने प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

पुणे-गोरखपूर एक्स्प्रेस या रेल्वेची पुणे स्टेशनहून सुटण्याची वेळ सायंकाळी सव्वाचार आहे. मात्र, गोरखपूरहून पुण्याला येणाऱ्या रेल्वेला दोन तास उशीर झाल्याने ही गाडी सुटण्यास बराच विलंब झाला. त्या पाठोपाठ पाच वाजून २५ मिनिटांनी सुटणारी झेलम एक्स्प्रेस आणि आझाद हिंद एक्स्प्रेस या दोन्ही रेल्वेंचे प्रवासीही प्लॅटफॉर्मवर दाखल झाले. एकाच वेळी तीन रेल्वेंचे प्रवासी स्टेशनवर असल्याने मोठी गर्दी झाली.

स्टेशनवर सुरक्षा यंत्रणेचा अभाव आहे; तसेच सरकत्या जिन्याचे काम अद्यापही मार्गी लागलेले नाही. त्यामुळे गर्दी झाल्यानंतर स्टेशनवरून बाहेर पडणेही मुश्कील होते. त्यातच प्लॅटफॉर्मवर पिण्यासाठी पाणी, बसण्यासाठी पुरेसे बेंचही नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. लहान मुले-स्त्रिया आणि बऱ्याच बॅगा असल्याने प्रवाशांची तारांबळ उडत होती.

'उन्हाळी सुटीत प्लॅटफॉर्मवर नेहमीच मोठी गर्दी होते. काही रेल्वेंच्या वेळा अचानक बदलल्याने गोंधळ होतो. त्या गर्दीत काही अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मोठी गर्दी झाल्यावर प्रवाशांना उन्हात थांबावे लागते. प्रवाशांचे हाल थांबवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्मवर प्रवाशांच्या सोयीसाठी शेड उभारली पाहिजे, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रूपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बायको सुंदर नाही म्हणून...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लग्नानंतर केवळ दोन महिन्यांनी त्यांच्या संसारात वादळ उठले...पत्नी सुंदर नसल्यामुळे तो तिला नांदावायलाच तयार नव्हता...त्यांचा संसार टिकावा म्हणून त्याचे समुपदेशन करूनही फायदा झाला नाही...तिची नांदायची इच्छा असतानाही तो तिचा स्वीकार करायला तयार नव्हता...आणि त्याचे कारण होते, ती सुंदर नाही!

फॅमिली कोर्टात नुकतीच त्यांची केस निकाली काढण्यात आली. आयेशा आणि फैजल (दोघांची नावे बदलली आहेत) आयेशाचे वय २३ वर्षे आहे. तर, फैजल २५ वर्षांचा आहे. तो एका कंपनीत पेंटर म्हणून काम करतो. फैजल आणि आयेशाचे लग्न झाल्यानंतर केवळ दोन महिने त्यांचा संसार टिकला. आयेशा दिसायला सुंदर नाही त्यामुळे तिच्याबरोबर आपल्याला संसार करायला जमणार नाही असे त्याने सांगितले. दोन महिन्यानंतर ती पुन्हा माहेरी गेली. दरम्यानच्या काळात अनेक लोकांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने कोणालाच दाद दिली. त्याने कोर्टात घटस्फोट मिळावा म्हणून दावा दाखल केला. त्यांची केस लोकअदालतमध्ये निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आली होती. पॅनेलमधील न्यायाधीश आणि वकिलांनी त्याची समजूत घालून समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला; पण त्याने कोणाचे ऐकले नाही. आपल्याला घटस्फोट हवा या मागणीवर तो ठाम होते. पती नांदवायलाच तयार नाही हे लक्षात आल्यानंतर आयेशाही घटस्फोट द्यायला तयार झाली. फैजलतर्फे अॅड. प्रीतेश देशपांडे यांनी त्याच्या केसचे कामकाज पाहिले.

पोटगी म्हणून पैसे, सोनेही!

आयेशाला फैजल आपल्याला नांदावायला तयार नसल्याचे लक्षात आल्यानंतर कोर्टकचेरीमध्ये जाणारा वेळ आणि आयुष्यातील वाया जाणारे उमेदीचे दिवस याबाबत समजावून सांगण्यात आले. या दोघांच्या परस्परसंमतीने त्यांची घटस्फोटाची केस निकाली काढण्यात आली. फैजलने तिला पोटगीसाठी एकरकमी ७० हजार रुपये देण्याचे आणि सोन्याच्या सर्व वस्तू, सामान परत करण्याचे मान्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणला ‘स्मृतिभ्रंश’

$
0
0

तीन हजार कोटींची जमा विसरली; दरवाढीचा बोजा

जितेंद्र अष्टेकर, पुणे

जमा बाजूला तब्बल तीन हजार कोटी रुपयांची रक्कम दाखविण्यास 'महावितरण' विसरून गेल्याने राज्यभरातील जनतेच्या खिशाला वीज दरवाढीची चाट बसण्याची शक्यता आहे. हिशेबात एवढी गंभीर त्रुटी राहिल्याने महावितरणची तूट चार हजार कोटी रुपयांपुढे गेली असून, तिचेच भांडवल करून वीज दरवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. विशेष म्हणजे, या चुकीच्या गणितावर दरवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आल्यानंतर राज्य वीज नियामक आयोगाने गेल्याच शुक्रवारी राज्यव्यापी सुनावणीदेखील घेण्याचा 'तत्पर' कारभार महावितरणने केला!

राज्यातील ग्राहकांच्या वीजबिलात इंधन समायोजन आकार (फ्युएल अडजेस्टमेंट कॉस्ट-एएफसी) वसूल करण्यात येते. त्याच्या हिशेबपुस्तिकेतील एंट्रीवरून हा गोंधळ झाला. 'एएफसी'पोटी तीन हजार कोटी रुपयांची रक्कम खर्च बाजूला दाखविण्यात आली. मात्र, ग्राहकांकडून हा आकार वसूल केल्याची एंट्री जमा बाजूला गृहीत धरण्यात आली नाही. परिणामी, महावितरणच्या तुटीत वाढ होऊन ती चार हजार ७१७ कोटी रुपयांपर्यंत पोचली.

तूट भरून काढण्यासाठी महावितरणला वीज दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही, असा प्रस्ताव तयार करण्यात आला. 'महावितरण'ने हिशेबातील ही गंभीर चूक पूर्वीच दुरुस्त करण्याची गरज होती. या चुकीच्या गणितावर आधारित ही दरवाढ अन्यायकारक ठरते आहे, अशी टीका महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी 'मटा'शी बोलताना केली.

तांत्रिक छाननीतूनही संमती?

दरम्यान, वीज नियामक आयोगाकडे दरवाढीचा प्रस्ताव सादर झाल्यावर प्रथम त्याची तांत्रिक छाननी (टेक्निकल व्हॅलिडेशन) करण्यात येते. त्यामध्ये अशा त्रुटी-चुका दुरूस्त करून त्यानंतरच राज्यभरात जाहीर सुनावणी घेण्यात येते. परंतु, या तीन हजार कोटी रुपयांच्या जमा बाजूची त्रुटी निदर्शनास कशी आली नाही? तसेच, आता एवढी मोठी त्रुटी निदर्शनास आल्यानंतर वीजदरवाढीच्या दरवाढीच्या प्रस्तावाचे भवितव्य काय, अशा प्रश्नांची उत्तरे 'महावितरण'ला द्यावी लागणार आहेत.

...असा झाला घोळ

- महावितरणने यंदा एकूण चार हजार ७१७ कोटी रुपयांची तूट दर्शवून त्या प्रमाणात वीज दरवाढ करण्याची मागणी केली आहे.

- खर्चाच्या बाजूला या तीन हजार कोटी रुपयांचा उल्लेख केला आहे. मात्र, वीजबिलांमधून 'एफएसी'पोटी वसूल केलेल्या तीन हजार तीन कोटी रुपयांचा उल्लेख जमेच्या बाजूला करण्यात आलेलाच नाही.

- २०१४-१५ या आर्थिक वर्षातील 'एफएसी'च्या एंट्रीमध्ये हा गोंधळ झाला आहे. जमेच्या बाजूला तीन हजार कोटी रुपयांचा उल्लेख नसल्यामुळे महावितरणची तूट चार हजार कोटींपुढे गेली.

- तीन हजार कोटींची जमा गृहीत धरली, तर वीज दरवाढ तब्बल ६४ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जनशताब्दी’ची होणार जप्ती

$
0
0

भरपाईसाठी रक्कम शेतकऱ्यांना न दिल्यास रेल्वे मालकीची

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हिमाचल प्रदेशातील उना येथे रेल्वेने शेतकऱ्यांकडून घेतलेल्या जमिनीचा योग्य मोबदला १५ एप्रिलपर्यंत न दिल्यास दिल्ली-उना जनशताब्दी एक्स्प्रेस जप्त करून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, असा आदेश उना येथील डिस्ट्रिक्ट कोर्टाने दिला आहे. त्यामुळे रेल्वेने पैसे न दिल्यास जनशताब्दी एक्स्प्रेस शेतकऱ्यांच्या मालकीची होणार आहे.

रेल्वेने १९८८मध्ये उना-अंब या मार्गासाठी उना येथील शेतकऱ्यांची जमीन संपादित केली होती. त्या वेळी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने तेथील मेला राम आणि मदनलाल या शेतकऱ्यांनी कोर्टात दावा दाखल केला होता.

त्याच्या सुनावणीमध्ये उना येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मुकेश बन्सल यांनी नऊ एप्रिल रोजी संबंधितांना १५ एप्रिलपर्यंत मोबदला देण्याचा आदेश दिला आहे. मेला राम यांचे आठ लाख ९१ हजार रुपये आणि मदनलाल यांचे २६ लाख ५३ हजार रुपये येणे बाकी आहे. रेल्वेने दिलेल्या मुदतीत त्यांना पैसे न दिल्यास १६ एप्रिलला पहाटे पाच वाजता दिल्ली-उना शताब्दी एक्स्प्रेस उना स्टेशनवर अडवून जप्त करण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे.

कोर्टाच्या या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यासाठी रेल्वेला तीन महिन्यांचा अवधी देण्यात आला होता. रेल्वेने २०१३मध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या निकालाविरोधात हायकोर्टात दावा दाखल केला. त्या वेळी रेल्वेला शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या दाव्याच्या ५० टक्के रक्कम डिपॉझिट करण्यास सांगितले; पण रेल्वेने आतापर्यंत रक्कम जमा केलेली नाही. कोर्टाने दिलेल्या मुदतीत रेल्वेने हायकोर्टात दावा दाखल न केल्याने याचिकाकर्त्या शेतकऱ्यांनी पुन्हा उना कोर्टात धाव घेतली. त्यावर न्यायालयाने जनशताब्दी गाडी जप्त करण्याचे आदेश दिला.

शेतकऱ्यांनी सुचवली चार नावे

शेतकऱ्यांच्या वकिलांनी कोर्टाकडे चार गाड्यांची नावे सुचवली होती. त्यामध्ये हिमाचल एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस आणि दोन प्रवासी गाड्यांचा समावेश होता. त्यावर कोर्टाने जनशताब्दी एक्स्प्रेस जप्त करण्याचा आदेश दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा ठार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुण्यातील जुन्नर जवळ खामुंडी गावाच्या परिसरात बिबट्याने एका पाच वर्षाच्या मुलावर हल्ला केला. बिबट्याच्या तावडून या मुलाला आपली सुटका करता आली नाही आणि बिबट्याने त्याला ठार मारून झुडूपात सोडून दिले.

प्रविण दुजवडे असे या पाच वर्षाच्या मुलाचे नाव. त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला आणि त्याला गावापासून दूर नेऊन ठार मारले. त्यांच्या नातेवाईकांना त्याचा मृतदेह झुडुपांमध्ये आढळला.

दरम्यान, या आधी देखील जुन्नर परिसरात बिबट्याने दोन जणांवर हल्ला केला होता. रेणूका वाघमारे नावाची एक मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाली होती. रेणुकाला बिबट्याच्या तावडीतून सोडवण्यात तिच्या कुटुंबियांना यश आले होते. रेणुका जखमी झाली होती, अद्यापही तिच्यावर उपचार सुरू आहे.

या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने सापळे बसवले असून त्याला पकडण्यात वन विभागाला अद्याप यश आलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाकडून पित्याचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

ऑटोमोबाइल इंजिनीअर मुलाने झोपलेल्या वडिलांच्या गळ्यात चाकू खुपसून त्यांचा खून केला. गुरुवारी (१६ एप्रिल) रात्री साडेअकराच्या सुमारास पिंपळे गुरव येथील वृंदावन पार्क येथे ही घटना घडली. प्रदीपकुमार मूरगम (वय २८) असे अटक करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. त्याने वडील सीनंबरी मूरगम (वय ६०, मूळ रा. सिलम, तमिळनाडू) यांचा खून केला. प्रदीपकुमार हा बहुराष्ट्रीय ऑटोमोबाइल कंपनीत काम करतो. घरमालक अनिरय्या स्वामी यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीपकुमारचे वडील चीनंबरी तमिळनाडूमध्ये राहतात. चार दिवसांपूर्वी काही दिवसांसाठी प्रदीपकुमार राहण्यास आले होते. प्रदीपकुमार यांची पत्नी गावाला गेली असल्याने घरात ते दोघेच होते. गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास वडील झोपले असताना प्रदीपकुमारने धारधार चाकू थेट वडिलांच्या गळ्यात खुपसून त्यांची हत्या केली; तसेच त्यानंतर तो घराबाहेर येऊन रडत बसला. घराचे मालक तेथून जात असताना त्याने प्रदीपकुमारला बाहेर बसून रडताना पहिले. त्याच्या रडण्यावरून घरमालकाने घरात डोकावून पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी ताबडतोब पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रदीपकुमारला अटक केली. खून करण्यामागचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. सहाय्यक निरीक्षक एस. व्ही. गाडे तपास करीत आहेत.

डॅममध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू

लोणावळाः लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृतदेह तरंगताना शुक्रवारी दुपारी दोन वाजता आढळला. प्रतीक सुनील व्यवहारे (वय २०, सध्या रा. सिंहगड कॉलेज, वारजे माळवाडी, मूळ नाशिक) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजता काही पर्यटक व स्थानिकांना भुशी डॅमच्या पाण्यावर एक मृतदेह तरंगत असलेल्या अवस्थेत आढळला.

बापाचा मुलीवर बलात्कार

लोणावळा ः लोणावळ्यातील गावठाण परिसरात जन्मदात्या पित्यानेच स्वतःच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडीस आली. पीडित मुलगी साडेपाच महिन्याची गर्भवती आहे. पोटच्या मुलीवर मागील आठ महिन्यांपासून बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला लोणावळा शहर पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. या प्रकरणी पीडित मुलीने बापाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. ही मुलगी १७ वर्षांची असून तिच्या बापाने आईला व भावाला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर ऑगस्ट महिन्यापासून वारंवार बलात्कार केला. ही मुलगी साडेपाच महिन्याची गर्भवती असून तिच्या शरीराच्या हालचालीतून तिच्या आईला हा धक्कादायक प्रकार लक्षात आला.

पिंपरीत अवैध बांधकामे पाडली

पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिकेने शुक्रवारीही अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत १८ हजार ७१३ चौरस फूट बांधकाम पाडले. हायकोर्टाच्या आदेशानुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी महापालिकेची विशेष मोहीम एक एप्रिलपासून सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ज्युनिअर’ शिक्षकांचे पगार रखडणार?

$
0
0

पुणेः पुणे विभागातील ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांच्या संचमान्यतेच्या प्रस्तावांची कामे रखडल्याने यंदा आणि पुढील वर्षीही शिक्षकांच्या पगारांच्या वितरणात अडचणी येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा अर्धवेळ शिक्षकांना बिनपगारीच ठेवण्यापाठोपाठ, शिक्षण खात्याने पूर्णवेळ शिक्षकांच्या पगारांची तरतूद करण्याकडेही दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनेने केला.

पुणे विभागातील ऑनलाइन संचमान्यतेच्या प्रक्रियेत आलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर विभागातील अर्धवेळ शिक्षकांच्या मान्यता गेल्या वर्षीपासूनच रखडलेल्या आहेत. त्यामुळे या शिक्षकांना जून २०१४ पासूनचे पगार मिळालेले नाहीत. त्यातच यंदाच्या संचमान्यतेच्या प्रक्रियेतही अडचणी आल्याने पूर्णवेळ शिक्षकांच्या पगारांसाठी आवश्यक प्रक्रियाही पूर्ण झालेली नाही. त्यातच शिक्षकांच्या पगारांसाठीचे जवळपास १४ कोटी रुपये राज्य सरकारकडे परत गेल्याची माहितीही अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे. त्यामुळेच पुणे विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना सक्रिय झाल्याचे संघटनेचे अध्यक्ष एस. टी. पवार यांनी स्पष्ट केले. या विषयी आम्ही सातत्याने पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पाठपुरावा करत आहोत. त्यानंतरही पगारांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.

तरतूद केली का?

गेल्या वर्षीच्या संचमान्यतेसाठीचा निधी जर परत गेला असेल, तर यंदाच्या निधीची तरतूद केली आहे का, त्यासाठीचा अहवाल मागविला आहे का, हे आमचे प्रश्न आहेत. कार्यालयाने या प्रश्नांची उत्तरे द्यायलाच हवीत, अशी मागणी फाजगे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणहक्क वाऱ्यावरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'२५ टक्क्यांच्या' ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईना... मदत केंद्रांवर गेले तर मदत मिळेना... त्यानंतरही प्रक्रियेतून पुढे गेले तर कागदपत्रांचा घोळ सुटेना... आणि सगळी दिव्ये पार करून पुढे गेले, लॉटरीमधून शाळा निश्चितीही झाली, तरी शेवटी आता शाळा प्रवेश देईना.... शिक्षण खात्याने मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या शिक्षणहक्क कायद्यातील (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ही वस्तुस्थिती आहे.

प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या पालकांचा हा अनुभव बालकांचा शिक्षणहक्क वाऱ्यावर असल्याचेच दाखवून देणारा ठरला आहे. खासगी शाळा प्रवेश नाकारत असल्याचे वारंवार समोर आल्यानंतरही शिक्षण खात्याने आजपर्यंत एकाही शाळेवर कारवाई केलेली नाही. त्यामुळेच आता खात्यातील अधिकारी केवळ फोटोसेशनपुरतेच या प्रक्रियेशी बांधील आहेत का, असा खडा सवाल पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

'आरटीई'अंतर्गत २५ टक्क्यांचा आरक्षित जागांसाठी शहर आणि पिंपरी- चिंचवडमध्ये ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेतील पहिल्या टप्प्याची लॉटरीही नुकतीच काढण्यात आली. मात्र, त्यानंतरच्या टप्प्यातील प्रवेश निश्चिती होऊ शकलेली नाही. 'शिक्षण खात्याने फी परतावा न दिल्याने प्रवेश देत नसल्याचे शाळा सांगत आहेत. त्या विरोधात खात्यातील अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतरही आश्वासनांव्यतिरिक्त हाती काहीच लागत नाही. असेच करायचे होते, तर आम्हाला या प्रक्रियेच्या आशेला का लावले,' असा हताश सवाल पालक सध्या उपस्थित करीत आहेत.

सिटी, परांजपे, मिलेनियमला नोटीस

शिक्षणहक्काच्या प्रवेशावरून टीकेची झोड उठत असतानाच अखेर पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाने शुक्रवारी तीन शाळांना नोटीस बजावली. सातारा रोडवरील सिटी इंटरनॅशनल स्कूल, कोथरुडमधील भारती विद्याभवनची परांजपे शाळा आणि कर्वेनगरमधील मिलेनियम स्कूलला नोटीस बजाविण्यात आली. पहिलीसाठीचे २५ टक्क्यांचे प्रवेश न दिल्यास, या शाळांची मान्यता काढण्याचा इशाराही मंडळाने दिला आहे.

किती शाळांना जाब विचारला?

पालकांनी शिक्षण खात्यातील संबंधित अधिकाऱ्यांना २५ टक्क्यांचे प्रवेश नाकारणाऱ्या शाळांची माहिती वेळोवेळी दिली आहे. त्यानंतरही या शाळांबाबतच्या परिस्थितीत सुधारणा नाही. शाळा खात्यातील अधिकाऱ्यांना घाबरण्याऐवजी अधिकारीच शाळांना घाबरतात अशीच परिस्थिती अनुभवायला मिळत आहे. शाळांविरोधात तक्रारी केल्यानंतरही खात्याने किती शाळांना जाब विचारला, किती शाळांना नोटिसा पाठविल्या असा सवाल पिंपरी- चिंचवडमधील गणेश लंगोटे यांनी शुक्रवारी उपस्थित केला. पालकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची हे अधिकारी वाट पाहात आहेत का, असा सवालही पालकांनी शुक्रवारी विचारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरदार बुडूनही पुनर्वसन अद्याप अर्धवटच

$
0
0

धनंजय जाधव, पुणे

धरणाच्या लाभक्षेत्रातील पर्यायी जमीन वाटपात दिसणारी अनास्था धरणग्रस्तांना पुनर्वसित गावठाणांमध्ये भूखंड देण्यातही दिसते आहे. धरणाच्या जलाशयात बुडालेल्या घरांच्या मोबदल्यात पुनर्वसित गावठाणांमध्ये सर्वसुविधायुक्त घराचे स्वप्न दाखविणाऱ्या सरकारने तेथेही धरणग्रस्तांना वाऱ्यावर सोडले आहे. पुणे जिल्ह्यातील तब्बल ५,६२५ धरणग्रस्त कुटुंबे पुनर्वसनातील भूखंड मिळण्यासाठी गेली सुमारे पंधरा-वीस वर्षे झगडत आहेत.

जुन्नर तालुक्यातील येडगाव धरणापासून वेल्ह्यातील गुंजवणी धरणापर्यंतच्या वीस धरणांच्या प्रकल्पग्रस्त कुटुंबांचीची अवस्था विंचवाच्या बिऱ्हाडासारखी झाली आहे. धरणाच्या बुडित क्षेत्रात सर्वस्व गमावल्यानंतर डोक्यावर किमान छप्पर असेल, आपला कुटुंबकबिला सुसज्ज पुनर्वसित गावठाणात राहील, अशी स्वप्ने धरणग्रस्तांनी पाहिली. पण त्यातील अनेकांचा स्वप्नभंग झाला, तर अनेकांचे घराचे स्वप्न अधर्वटच राहिले आहे.

धरणाच्या बुडित क्षेत्रात घरे गेलेल्या प्रकल्पग्रस्तांसाठी १९४ नवीन गावठाणे वसविण्यात आली आहेत. या गावठाणांमध्ये २२,५७१ प्रकल्पग्रस्त कुटुंबांना भूखंड वाटप करण्यासाठी यादी तयार करण्यात आली. त्यांच्यासाठी २३,०२९ भूखंडही तयार करण्यात आले. प्रत्यक्षात १८,३४५ कुटुंबांनाच पुनर्वसित गावठाणांमध्ये भूखंड मिळाले आहेत. यातील ५,६२५ कुटुंबे गेली कित्येक वर्षे पुनर्वसन वसाहतींच्या ठिकाणी भूखंड मिळण्याची प्रतीक्षा करीत आहेत. त्यांच्यासाठी सरकारी यंत्रणेकडून केवळ कागदीघोडे नाचविले जात आहेत. प्रकल्पग्रस्ताचा पुरावा आणण्यापासून जिवंत असल्याच्या दाखल्यापर्यंत असा एकही कागद नाही की जो पुनर्वसन खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून मागितला गेला नाही. हे कागद पुरविताना मेटाकुटीस आलेला प्रकल्पग्रस्त सरकार कधीतरी आपल्यावर दया दाखवेल या आशेने पाहत आहे. पण या सरकारी दगडाला अजून पाझर फुटलेला नाही ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

पानशेत, वरसगाव, उजनी ही धरणे बांधून चाळीस वर्षे उलटली आहेत. या धरणांच्या प्रकल्पग्रस्तांसाठी तब्बल सत्तर गावठाणे वसविण्यात आली. पण या गावठाणांमध्ये साडेपाचशेहून अधिक प्रकल्पग्रस्तांना भूखंड मिळालेले नाहीत. गुंजवणी धरण १९९७ मध्ये बांधण्यास सुरुवात झाली, पण गेल्या सतरा वर्षांमध्ये ७७५ पैकी निम्म्याच प्रकल्पग्रस्तांना भूखंड मिळाला आहे. या प्रत्येक धरणात बुडालेल्या गावांतील प्रकल्पग्रस्तांची अक्षरश: वाताहत झाली; पण सरकारने या प्रकल्पग्रस्तांकडे कधीही गांभीर्याने बघितले नाही. पर्यायी जमीन आणि पुनर्वसित गावठाणात छप्पर मिळण्यासाठी तीन-चार दशके वाट पाहावी लागते, यापेक्षा आणखी परीक्षा कोणती. पुनर्वसनाची दुर्दशा एवढ्यावरच थांबलेली नाही. ज्या प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन गावठाणात भूखंड मिळाला, तेथील सुविधांबाबतही प्रश्नचिन्ह आहे.

१९४ पुनर्वसनासाठी केलेली नवीन गावठाणे

२२,५७१ पुनर्वसित करावयाचे प्रकल्पग्रस्त

२३,०२९ नविन गावठाणात पाडण्यात आलेले भूखंड

१८,३४५ प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेले भूखंड

५,६२५ भूखंड न मिळालेले प्रकल्पग्रस्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपमहापौरांच्या खर्चाचा भूर्दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेची कोणतीही मान्यता न घेता, पक्षनेत्यांनी खर्चाचा विषय दफ्तरी दाखल करण्याचा निर्णय घेऊनही पालिकेच्या सर्व माजी उपमहापौरांच्या सत्काराच्या कार्यक्रमाची बिले अखेर पालिकेच्याच गळ्यात पडली आहेत. सर्वसाधारण सभेत उपमहापौरांच्या आग्रहपूर्वक विनंतीला सर्वांनीच साथ दिल्याने महापौरांच्या अनुपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचा खर्चही पालिकेच्या माथी मारला जाणार आहे.

उपमहापौर आबा बागूल यांनी फेब्रुवारीत शहराच्या सर्व माजी उपमहापौरांचा लोकलेखा पुरस्कार देऊन सन्मान केला होता. या कार्यक्रमात पालिकेचे बोधचिन्ह वापरण्यात आले होते; पण असा कार्यक्रम घेण्यास कोणतीही मंजुरी घेण्यात आली नव्हती. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशिवाय महापौरांसह पालिकेचा एकही पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता. तरीही कार्यक्रम झाल्यानंतर अवघ्या काहीच दिवसांत त्याला मान्यता देऊन त्यासाठी झालेला खर्च पालिकेने करावा, असे पत्र बागूल यांनी दिले होते.

या कार्यक्रमाशी पालिकेचा कोणताही संबंध नसल्याने; तसेच त्याची पूर्वमान्यता घेण्यात आली नसल्याने खर्चाचा विषय दफ्तरी दाखल करण्याचा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला होता. दफ्तरी दाखल करण्यासाठी आलेला प्रस्ताव मागे ठेवून मूळ प्रस्तावानुसार खर्च मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे काडीमात्रही संबंध नसलेल्या कार्यक्रमाचा भार आता पालिकेला उचलावा लागणार आहे.

आधी विरोध...

महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मांडण्यात आला. सुरुवातीला त्याला विरोध करण्याची भूमिका घेण्यात आली. मात्र, त्यानंतर बागूल यांच्या विनंतीचा मान राखण्याचे औदार्य सर्वच प्रमुख पक्षांनी दाखविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भांडवली कामांना कात्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या आर्थिक वर्षातील अपूर्ण कामांना निधी उपलब्ध करून देण्याचा नगरसेवकांचा अट्टहास पूर्ण करण्यासाठी नव्या आर्थिक वर्षातील भांडवली कामांना कात्री लावण्याची वेळ स्थायी समितीवर ओढवली. अत्यावश्यक भांडवली कामे वगळता इतर भांडवली कामांमध्ये ५ टक्के कपात करण्यात येणार असून, त्यातून उपलब्ध होणाऱ्या निधीतून गेल्या आर्थिक वर्षातील अपुरी कामे पूर्ण केली जाणार आहेत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे गेल्यावर्षीची कामे वेळेत पूर्ण होऊ शकली नसल्याचा दावा बहुसंख्य नगरसेवकांनी केला होता. त्यामुळे अपूर्ण कामांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. स्थायी समितीनेही तसा ठराव मंजूर केला होता. शुक्रवारी प्रशासनाकडून सकारात्मक अभिप्राय येताच, स्थायीसह सर्वसाधारण सभेनेही अपुऱ्या कामांना दोन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. या कामांना निधी उपलब्ध करून देता यावा, यासाठी नव्या वर्षातील भांडवली कामांना कात्री लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वाचे प्रकल्प तसेच काही आवश्यक योजनांसाठी केल्या जाणाऱ्या खर्चांचा अपवाद वगळता इतर सर्व भांडवली कामांमध्ये ५ टक्के कपात करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांनी सांगितले.

पालिकेचे २०१४-१५ चे बजेट चार हजार १५० कोटी रुपयांचे होते; पण प्रत्यक्षात पालिकेच्या तिजोरीत केवळ बत्तीसशे कोटी रुपयेच जमा झाले. येत्या एक ऑगस्टपासून स्थानिक संस्था कर (एलबीटी) बंद होणार असल्याने पालिकेचा आर्थिक डोलारा अधिक कमकुवत होण्याची भीती असतानाही, स्थायी समितीने पहिल्याच महिन्यात बजेटला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांत पहिल्या सहामाहीतील जमा-खर्चाचा आढावा घेतल्यानंतर कामांना कात्री लावण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला होता; पण यंदा स्थायी समितीनेच बजेटमधील कामांना आत्तापासूनच कात्री लावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टेशनवर समस्यांची जंत्रीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्लॅटफॉर्मवरील तुटलेल्या फरशा, त्यात अडकून पडणारे, बॅगा घेऊन गाडी पकडण्यासाठी धावपळ करणारे प्रवासी, रेल्वे ट्रॅकवरील दुर्गंधी, प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या बाकड्यांवर झोपलेले बेघर, माशा व डासांचे साम्राज्य आणि भिकाऱ्यांचा ससेमिरा... ... पुणे रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी केलेल्या पाहणीत हे चित्र पाहायला मिळाले. तेही ऐन उन्हाळी सुटीची गर्दी सुरू होताना.

उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी नेहमीपेक्षा दुपटीने वाढली आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांवरील भार वाढला असून, प्रवाशांच्या गैरसोयीतही वाढ होत आहे. पुणे रेल्वे स्टेशनमध्ये सहा प्लॅटफॉर्म आहेत. त्यापैकी क्रमांक एकचा प्लॅटफॉर्म तुलनेने स्वच्छ असल्याचे आढळले. उर्वरित प्लॅटफॉर्मवर कचरा अस्ताव्यस्त पडलेला होता. रेल्वे गाडीतून ट्रॅकवर सोडले जाणारे प्रवाशांचे मलमूत्र तसेच पडून होते. रेल्वेच्या डब्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीखाली अक्षरशः गटार निर्माण झाले होते. त्यामुळे मच्छरांचे प्रमाण जास्त होते. सहा क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरील फरशा अनेक ठिकाणी निखळल्या आहेत. याच प्लॅटफॉर्मवर एका बाजूला छत दुरूस्ती सुरू असल्याने प्रवाशांना उन्हातच बसण्याची वेळ आली.

रेल्वे स्टेशनमध्ये भिकाऱ्यांचा एक मोठा प्रश्न भेडसावत असून, रेल्वे प्रशासनाचे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे जाणवले.

सध्याची गर्दी पाहता स्टेशनमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी खूप कमी बाकडे किंवा खुर्च्या आहेत. मात्र, या बाकड्यांवर अनेक ठिकाणी भिकारी ठाण मांडून बसले होते, तर काही ठिकाणी चक्क झोपले होते. त्यामुळे प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर मिळेल तिथे खाली बसावे लागले. फ्लॅटफॉर्मप्रमाणेच स्टेशनच्या परिसरात बाहेरील बाजूस मोठ्या प्रमाणावर प्रवासी गाडीच्या वेळेआधी येऊन बसले होते. या प्रवाशांना एकसारखे पैसे मागून भिकाऱ्यांनी हैराण करून सोडले होते.

सुरक्षा... रामभरोसेच

रेल्वे स्टेशन येथील सुरक्षा यंत्रणा अद्याप सुस्तावलेलीच आहे. काही दिवसांपासून स्टेशनवरील गर्दी वाढत असताना, सुरक्षेच्या दृष्टीने काहीच लक्ष दिले जात नसल्याचे निदर्शनास आले. स्टेशनच्या मुख्य गेटजवळ 'मेटल डिटेक्टर' बसविण्यात आले आहे, तर दुसऱ्या एका गेटवर स्कॅनिंग मशिन आहे. स्टेशनमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची बॅग किंवा सामान या स्कॅनिंग मशिनमध्ये स्कॅन करणे अपेक्षित आहे. मात्र, त्यासाठी सुरक्षा कर्मचारी आग्रह करीत नाहीत. स्वेच्छेने सामान स्कॅन करून घेणाऱ्या नागरिकांचे सामानच येथे स्कॅन केले जात आहे.

रेल्वे स्टेशनवरील स्वच्छतेपासून गाडीमध्ये प्रवास करताना तृतीयपंथीयांकडून केली जाणारी लूट, असे विविध प्रश्न प्रवाशांना भेडसावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना सोयीसुविधा पुरविण्यात रेल्वे प्रशासन कमी पडणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज आहे.

- रमाकांत कापसे (विद्यार्थी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शनिवारवाड्याची नवी ‘भाषा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शनिवारवाड्याच्या प्रांगणात 'लाइट अँड साउंड शो'च्या माध्यमातून गेल्या १५ वर्षांपासून घुमणारा मराठ्यांचा इतिहास लवकरच कात टाकणार आहे. अत्याधुनिक ध्वनी योजना, आकर्षक 'लेझर शो', अशा नव्या वैशिष्ट्यांसह आगामी तीन महिन्यांत 'लाइट अँड साउंड शो'चा संपूर्ण कायापालट करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे.

ऐतिहासिक शनिवारवाड्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना पुण्याचा, मराठी साम्राज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यासोबत अटकेपार झेंडे रोवणाऱ्या मराठ्यांच्या दुर्दम्य इतिहासाची माहिती व्हावी, यासाठी महापालिकेच्या पुढाकाराने 'लाइट अँड साउंड शो'ची संकल्पना १५ वर्षांपूर्वी सर्वप्रथम मांडण्यात आली. कालानुरूप ध्वनी-प्रकाश यंत्रणांच्या तंत्रज्ञानात मोठे बदल झाले. तसेच, सुमारे एक तास प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात आजमितीस उपलब्ध असणारी यंत्रणा सक्षम नसल्याने 'लाइट अँड साउंड' शोचा संपूर्ण कायापालट करण्याचे पालिकेने निश्चित केले आहे. त्यासाठी, तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी बजेटमध्ये तरतूदही करून ठेवली होती. त्यातूनच, अत्याधुनिक ध्वनी यंत्रणा आणि प्रकाश योजनेसह लेझर तंत्राचाही अवलंब केला जाणार आहे.

शनिवारवाड्यातील 'लाइट अँड साउंड' शोसाठी १५ वर्षांपूर्वी पालिकेने सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च केले होते. हा शो सुरू झाला तेव्हा त्याचा कालावधी अंदाजे ५५ मिनिटांचा होता. परंतु, आता त्यातही सुधारणा केल्या जाणार असून, हा कालावधी ३० मिनिटांपर्यंत कमी केला जाणार आहे. पूर्वीप्रमाणेच मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांतून हा शो सादर केला जाणार असून, सध्या त्याच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे, अशी माहिती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिली. लाइट अँड साउंड शोच्या माध्यमातून प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यासह अनेक कलावंतांच्या आवाजात मराठ्यांच्या इतिहासातील सोनेरी पाने पुन्हा शनिवारवाड्याच्या प्रांगणात प्रेक्षकांच्या भेटीस येत असत. आता या शोची नव्याने रचना केली जात असून, जुन्या संचातील कलावंतांचा आवाज कायम ठेवून, काही नव्या कलावंतांच्या आवाजाचा वापर करण्याचे संकेत दिले जात आहेत.

विशेष प्रकाशयोजना

शहरात येणाऱ्या पर्यटकांना सायंकाळच्या वेळेत प्रेक्षणीय स्थळे आणि तेथील कार्यक्रमांचा आस्वाद घेता यावा, रात्रीच्या वेळी या प्रेक्षणीय स्थळांवर आकर्षक प्रकाशयोजना करून त्याला उठाव देता यावा, यासाठी पालिकेतर्फे विशेष प्रयत्न केले जात आहेत. मंडई, विश्रामबागवाडा, शनिवारवाडा, नानावाडा आणि लालमहाल अशा पाच वास्तूंमध्ये नेत्रदीपक रोषणाईसह, तेथील सांस्कृतिक कार्यक्रमांची वेळ 'कनेक्ट' करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजित पवारांना ‘सोमेश्वर’ पावले!

$
0
0

पुणेः माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीतील पराभवानंतर अजित पवार यांनी अखेर विजयी पुनरागमन केले आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सोमेश्वर विकास पॅनेलचे सर्वच्या सर्व २१ उमेदवार निवडून आले. दरम्यान, भोरमधील राजगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे अनंतराव थोपटे यांनी संचालकांच्या सर्वच्या सर्व जागा जिंकून वर्चस्व कायम राखले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

PMP ला दरमहा ५.२५ कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिध‌ी, पुणे

शहरातील वाहतूक सुधारण्याबरोबरच नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रत्येक महिन्याला पीएमपीएमएलला संचालनातील तुटीपोटी पाच कोटी २५ लाख रुपयांचा निधी देण्यास शुक्रवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. राज्य सरकारच्या आदेशानुसार दोन्ही पालिकांनी पीएमपीला संचालनातील तुटीपोटी ठराविक रक्कम दरवर्षी देण्याचे ठरले.

पीएमपीला संचालनातील तुटीची रक्कम यापूर्वी वर्षाच्या अखेरीस दिली‌ जात होती. पीएमपीच्या प्रभारी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तत्कालीन अध्यक्ष डॉ. श्रीकर परदेशी यांनी दोन्ही महापालिकांना तुटीतील रक्कम एकदम न देता प्रत्येक महिन्याला त्यातील वाटा द्यावा, अशी मागणी केली होती. त्याला एकमताने मंजुरीही देण्यात आली होती. त्यानुसार गेल्या आठवड्यात पालिकेने पीएमपीला तुटीपोटी पाच कोटी २५ लाख रुपये देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी ठेवला होता. तो पुढे ढकलण्यात आला.

डॉ. परदेशी यांची बदली झाल्याने त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार संभाळणारे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडून माहिती घेतल्यानंतरच हे पैसे दिले जातील, अशी भूमिका स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आली होती. समितीने घेतलेल्या या निर्णयावर टीका झाल्यानंतर शुक्रवारी झालेल्या समितीच्या बैठकीत हा विषय तातडीने मंजूर करून पीएमपीला निधी देण्यास मान्यता देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बलात्काऱ्याचे छायाचित्र प्रसिद्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

लोणावळ्यातील कुमार रिसॉर्टमध्ये १७ फेब्रुवारी रोजी सात वर्षीय बालिकेवर बलात्कार करून हत्या केल्याच्या प्रकरणाला शुक्रवारी दोन महिने पूर्ण झाले आहेत. अद्याप घटनेतील मुख्य आरोपी संतोष रॉयला पकडण्यात पोलिस यंत्रणा अपयशी ठरली असून अखेर पोलिसांनी या आरोपीची छायाचित्रे प्रसिद्ध केली केली आहेत.

लोणावळ्यातील कुमार रिसॉर्टमध्ये १५ फेब्रुवारीला रायगड जिल्ह्यातील एका लग्न सोहळ्यासाठी कुटुंबीयांच्या समवेत आलेल्या सात वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून तिचा निर्घून खून केला होता. हा प्रकार हॉटेलचा कर्मचारी संतोष रॉय व त्याचा सहकारी अजय धोदाड यांनी केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात त्याला सहकार्य करणारा त्याचा सहकारी अजय धोदाड (रा. वर्धा) याला पोलिसांनी महिन्यापूर्वी अटक केली आहे. रॉयला शोधण्यासाठी दोन महिने चार पथके सातत्याने फिरत होती; मात्र त्याचा शोध लागला नाही. अखेर त्याचा तपास लागावा यासाठी पोलिसांनी रॉयची फरार होण्यापूर्वीची व नंतरची दोन छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२ - २.५ हजारांत जेलमध्ये मोबाइल!

$
0
0

प्रशांत आहेर, पुणे

येरवडा जेलच्या अंडासेलमधील कैद्यापर्यंत मोबाइल पोहोचवण्याचा प्रवास येरवडा पोलिसांनी उलगडला आहे. अवघ्या दोन-अडीच हजार रुपयांसाठी काही जेलरक्षकांनी आपला इमान वेशीला टांगल्याचे तपासादरम्यान उघड झाले आहे. अंडा सेलमधील मोबाइल जेल प्रशासनाचे जप्त केल्याने घरभेदीही लगेचच निष्पन्न झाले.

घटनेची वस्तुस्थिती दर्शवणारा अहवाल पोलिस उपायुक्त मनोज पाटील यांच्या कार्यालयाने जेल प्रशासनाला पाठवला आहे. जेल विभागाच्या प्रमुख आणि अतिरिक्त पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर यांना हा अहवाल नुकताच मिळाला असल्याचे सांगण्यात येतेे.

येरवडा जेलचे अधीक्षक योगेश देसाई यांना अंडा सेलमध्ये असलेल्या मुन्ना शेख याच्याकडे मोबाइल हँडसेट असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गेल्या वर्षी जेल प्रशासनाने अंडासेलमध्ये पहाटे छापा टाकला. जेलमधील कैदी मुन्ना शेख याच्याकडे एक मोबाइल हँडसेट आणि सिमकार्ड मिळाले होते. जेल प्रशासनाने दिलेल्या तक्रारीनुसार येरवडा पोलिस ठाण्यात शेख याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

शेख याच्याकडे तपास केल्यानंतर थोड्या पैशांसाठी जेलमधील पाच रक्षक कैद्यांच्या आहारी गेल्याचे उघडकीस आले. जेल प्रशासानाने त्यांनी केलेल्या चौकशीअंती पाच रक्षकांना निलंबित केले आहे. याच रक्षकांवर पोलिसांनी ठपका ठेवला आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे. या गुन्ह्यांत जेलरक्षकांना आरपी करण्यात येणार की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा मान्सून सरासरी गाठणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

यंदाचा मान्सून वेळेआधी दाखल होऊन हंगामात सरासरी गाठेल असा अंदाज स्कायमेट या कंपनीने दिलेला आहे. यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या १०२ टक्के पावसाची शक्यता असून, एल निनोचा मान्सूनवर विशेष प्रभाव राहणार नाही असे स्कायमेटने म्हटले आहे. एन निनोचा मान्सूनवर विपरित परिणाम होईल, अशी भीती अमेरिकेतील अंदाजांमधून व्यक्त करण्यात आली होती.

स्कायमेटच्या अंदाजानुसार यंदाच्या हंगामात देशभरात पाऊस सर्वसाधारण (सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के) राहण्याची शक्यता ४९ टक्के आहे. या अंदाजानुसार यंदा दुष्काळी स्थितीची शक्यता फक्त दोन टक्के आहे. त्याचप्रमाणे मान्सून सर्वसाधारण वेळेच्या आधी म्हणजे २७ मे रोजी केरळात दाखल होण्याची दाट शक्यता असून त्याचे आगमन जोरदार असेल. त्याची त्यापुढील वाटचालही वेगाने होऊन महाराष्ट्रातही मान्सूनचे आगमन वेळेआधीच होईल असे स्कायमेटच्या तज्ञांचे म्हणणे आहे. जूनमध्ये महिन्याच्या सरासरीच्या १०७ टक्के, जुलैमध्ये १०४ टक्के, ऑगस्टमध्ये ९९ टक्के, तर सप्टेंबरमध्ये सरासरीच्या ९६ टक्के पावसाची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२ - २.५ हजारांत जेलमध्ये मोबाइल!

$
0
0

प्रशांत आहेर, पुणे

येरवडा जेलच्या अंडासेलमधील कैद्यापर्यंत मोबाइल पोहोचवण्याचा प्रवास येरवडा पोलिसांनी उलगडला आहे. अवघ्या दोन-अडीच हजार रुपयांसाठी काही जेलरक्षकांनी आपला इमान वेशीला टांगल्याचे तपासादरम्यान उघड झाले आहे. अंडा सेलमधील मोबाइल जेल प्रशासनाचे जप्त केल्याने घरभेदीही लगेचच निष्पन्न झाले.

घटनेची वस्तुस्थिती दर्शवणारा अहवाल पोलिस उपायुक्त मनोज पाटील यांच्या कार्यालयाने जेल प्रशासनाला पाठवला आहे. जेल विभागाच्या प्रमुख आणि अतिरिक्त पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर यांना हा अहवाल नुकताच मिळाला असल्याचे सांगण्यात येतेे.

येरवडा जेलचे अधीक्षक योगेश देसाई यांना अंडा सेलमध्ये असलेल्या मुन्ना शेख याच्याकडे मोबाइल हँडसेट असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गेल्या वर्षी जेल प्रशासनाने अंडासेलमध्ये पहाटे छापा टाकला. जेलमधील कैदी मुन्ना शेख याच्याकडे एक मोबाइल हँडसेट आणि सिमकार्ड मिळाले होते. जेल प्रशासनाने दिलेल्या तक्रारीनुसार येरवडा पोलिस ठाण्यात शेख याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

शेख याच्याकडे तपास केल्यानंतर थोड्या पैशांसाठी जेलमधील पाच रक्षक कैद्यांच्या आहारी गेल्याचे उघडकीस आले. जेल प्रशासानाने त्यांनी केलेल्या चौकशीअंती पाच रक्षकांना निलंबित केले आहे. याच रक्षकांवर पोलिसांनी ठपका ठेवला आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे. या गुन्ह्यांत जेलरक्षकांना आरपी करण्यात येणार की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा मान्सून सरासरी गाठणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

यंदाचा मान्सून वेळेआधी दाखल होऊन हंगामात सरासरी गाठेल असा अंदाज स्कायमेट या कंपनीने दिलेला आहे. यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या १०२ टक्के पावसाची शक्यता असून, एल निनोचा मान्सूनवर विशेष प्रभाव राहणार नाही असे स्कायमेटने म्हटले आहे. एन निनोचा मान्सूनवर विपरित परिणाम होईल, अशी भीती अमेरिकेतील अंदाजांमधून व्यक्त करण्यात आली होती.

स्कायमेटच्या अंदाजानुसार यंदाच्या हंगामात देशभरात पाऊस सर्वसाधारण (सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के) राहण्याची शक्यता ४९ टक्के आहे. या अंदाजानुसार यंदा दुष्काळी स्थितीची शक्यता फक्त दोन टक्के आहे. त्याचप्रमाणे मान्सून सर्वसाधारण वेळेच्या आधी म्हणजे २७ मे रोजी केरळात दाखल होण्याची दाट शक्यता असून त्याचे आगमन जोरदार असेल. त्याची त्यापुढील वाटचालही वेगाने होऊन महाराष्ट्रातही मान्सूनचे आगमन वेळेआधीच होईल असे स्कायमेटच्या तज्ञांचे म्हणणे आहे. जूनमध्ये महिन्याच्या सरासरीच्या १०७ टक्के, जुलैमध्ये १०४ टक्के, ऑगस्टमध्ये ९९ टक्के, तर सप्टेंबरमध्ये सरासरीच्या ९६ टक्के पावसाची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images