Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आंबेडकर विचारांसाठी ग्रंथालय

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष सुरू होत असतानाच पुण्यातील सिम्बायोसिस संस्थेने उभारलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक संग्रहालय रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी सुसज्ज ग्रंथालय आकाराला येत असून, येत्या महिन्याभरात ते सुरू होणार आहे.

डॉ. आंबेडकरांच्या स्मृती जपण्यासाठी सिम्बायोयिस संस्थेने सेनापती बापट रोडवर डॉ. आंबेडकर यांच्या वस्तूंचे संग्रहालय करण्यासाठी पुढाकार घेतला. १४ एप्रिल १९९० मध्ये त्याची पायाभरणी झाली. यंदा हे स्मारक संग्रहालय रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या संग्रहालयात आंबेडकरांच्या आयुष्यातील विविध प्रसंगांचे फोटो, ग्रंथालय, त्यांनी वापरलेल्या वस्तूंचा समावेश आहे. पुणे दर्शनची बसही आवर्जून पर्यटकांना या स्मारकाची भेट घडवते. डॉ. आंबेडकरांच्या स्मृती जपतानाच त्यांचे विचारही समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी सुसज्ज ग्रंथालयही साकारत आहे. सोळा हजार स्क्वेअर फूट इतके क्षेत्रफळ असलेल्या या ग्रंथालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती संग्रहालयाच्या मानद संचालिका संजिवनी मुजुमदार यांनी 'मटा'ला दिली.

'संग्रहालयात डॉ. आंबेडकरांच्या वस्तू आहेत. मात्र, डॉ. आंबेडकर वाचन व पुस्तकप्रेमी होते. त्यांचे स्वतःचे तीस हजार पुस्तकांचे ग्रंथालय होते. हीच गोष्ट लक्षात घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात उत्तम ग्रंथालय करण्याच्या दृष्टीने काम सुरू झाले. या ग्रंथालयात विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध करण्यात येतील. डॉ. आंबेडकरांची काही पुस्तके माई आंबेडकर यांनी संस्थेला दिली होती. तीही या ग्रंथालयात ठेवली जातील. या ग्रंथालयामुळे अभ्यासकांना डॉ. आंबेडकरांचा समग्र अभ्यास करणे शक्य होईल,' असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या या ग्रंथालयाच्या इमारतीच्या अंतर्गत सजावटीचे काम सुरू आहे. येत्या महिन्याभरात हे ग्रंथालय खुले करण्यात येणार आहे.

डॉ. आंबेडकर वाचन व पुस्तकप्रेमी होते. त्यांचे स्वतःचे तीस हजार पुस्तकांचे ग्रंथालय होते. हीच गोष्ट लक्षात घेऊन ग्रंथालय करण्याच्या दृष्टीने काम सुरू झाले. या ग्रंथालयामुळे अभ्यासकांना डॉ. आंबेडकरांचा समग्र अभ्यास करणे शक्य होईल.

- संजिवनी मुजुमदार, संग्रहालयाच्या मानद संचालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाचशेच्या बनावट नोटा

0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

कोंढवा पोलिसांनी पश्चिम बंगाल येथील एका तरुणाला कोंढव्यात अटक केली असून, त्याच्याकडून ५०० रुपयांच्या एक लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. कोर्टाने त्याला आठ दिवसांची कोठडी सुनावली.

इब्राहीम गोस महम्मद शेख (वय २०, रा. पश्चिम बंगाल ) याला अटक केली आहे. सहायक फौजदार राहुल कारभारी यांनी तक्रार दाखल केली आहे. कोंढवा बुद्रुक तालाब कंपनी बस थांबा येथे हिरवा निळा रंगाचा टी शर्ट व निळी पेंट घातलेला २० ते २५ वयाचा मुलगा, बनावट नोटा घेऊन येणार असल्याची खबर कोंढवा पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी ,गुन्हे पोलिस निरीक्षक बागवान ,सहायक उपनिरीक्षक राहुल कारभारी, नितीन आतकर यांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याच्या ताब्यातून एक लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कामाची सनद हवी’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कॉलेजांच्या विविध कामांसंदर्भात विद्यापीठाकडून विलंब होत आहे. हा विलंब टळण्यासाठी विद्यापीठाला कामाची सनद लागू करावी, तसेच कॉलेजांसाठी शिक्षण शुल्क समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणी विनाअनुदानित संस्थाचालकांनी सोमवारी विद्यापीठाकडे केली. कॉलेजांचे संलग्नीकरण आणि शिक्षकांना मान्यता देण्याची प्रक्रिया पुढील वर्षापासून ऑनलाइन करण्यात येईल, असे आश्वासन कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी दिले.

आपल्या विविध मागण्यांविषयी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित संस्थाचालक संघटनेच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. गाडे यांची भेट घेतली. संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुधाकर जाधवर आणि सरचिटणीस शैलेश पगारिया यांच्यासह अन्य काहींचा या शिष्टमंडळात समावेश होता. शैक्षणिक संस्था व शिक्षकांची मान्यता देताना येणाऱ्या अडचणी, कागदपत्रांची पूर्तता करताना विद्यापीठाकडून होणारा विलंब यासारख्या अडचणी या शिष्टमंडळाने कुलगुरूंपुढे मांडल्या.

'संस्थाचालकांना महाविद्यालयांचे संलग्नीकरण व इतर शैक्षणिक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अर्ज केल्यानंतर विद्यापीठाकडून या प्रक्रियेत दिरंगाई होते. ही दिरंगाई टाळण्यासाठी शासनाने विद्यापीठांनाही कामाची सनद लागू करावी, अशी मागणी आम्ही केली,' असे डॉ. जाधवर यांनी सांगितले.

'आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि लॉ कॉलेजांसाठी आकारण्यात येणारे शुल्क, तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार द्यावे लागणारे वेतन यात मोठी तफावत आहे. त्यामुळे विनाअनुदानित संस्थाचालक अडचणीत येत आहेत. त्यासाठी विद्यापीठ स्तरावर शिक्षण शुल्क समिती स्थापन करावी, अशी मागणीही आम्ही केली आहे,' असे डॉ. जाधवर यांनी सांगितले.

कॉलेजांचे संलग्नीकरण आणि शिक्षकांना मान्यता देण्याची प्रक्रिया पुढील वर्षापासून ऑनलाइन करण्यात येईल, असे आश्वासन कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी दिले.

मान्यतेची प्रक्रिया ऑनलाइन : डॉ. गाडे

संस्थाचालकांच्या मागण्या रास्त असून, त्यावर लवकरच पावले उचलण्यात येतील. कॉलेजांच्या मान्यतेची सर्व प्रक्रिया झटपट होण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येईल व इतर मागण्यांसाठी धोरणात्मक निर्णय घेतले जातील, असेही आश्वासन डॉ. गाडे यांनी विनाअनुदानित संस्थाचालकांच्या शिष्टमंडळाला दिल्याचे डॉ. सुधाकर जाधवर यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समाजकल्याण’ची ‘लूट’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'शिक्षणमहर्षींच्या मोठ्या शैक्षणिक विनाअनुदानित संस्था धोरण राबवण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्या असून, त्या सामाजिक न्याय विभागाच्या अनुदानाशिवाय चालू शकत नाहीत. त्या संस्थांमधून दर वर्षी चार ते पाच हजार कोटी रुपयांची लूट केली जात आहे,' असा आरोप सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सोमवारी केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाअंतर्गत माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी आयोजित कार्याशाळेचा समारोप कांबळे यांच्या हस्ते झाला. या वेळी ते बोलत होते. 'बार्टी'चे महासंचालक डी. आर. परिहार उपस्थित होते. 'सामाजिक न्याय विभागाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते. तरीही शैक्षणिक संस्था त्यांच्याकडून जादा फी घेतात. एखाद्या अभ्यासक्रमाची फी वास्तविक ५० हजार रुपये असताना, विद्यार्थ्यांकडून अडीच लाखांपर्यंत फी घेतली जाते. त्यांच्या संस्थेचा कोटा पूर्ण झाल्यानंतर ते विद्यार्थ्यांना दुसऱ्या संस्थेत अॅडमिशन घेण्यास सांगतात. विद्यार्थ्यांकडून फी उकळण्यासाठी संस्थाचालकांनी साखळीच निर्माण केली आहे,' असे कांबळे यांनी सांगितले.

'दलित वस्ती सुधार योजनेही भ्रष्टाचार होत असल्याचे समोर आले आहे. हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी कडक उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. त्यासाठी गाव पातळीवर समिती नेमण्यात येणार आहे. एखाद्या ठिकाणी या योजनेतील काम अपूर्ण राहिल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे,' असे कांबळे यांनी सांगितले.

तत्पूर्वी, कार्यशाळेचे उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. 'शिक्षण आणि विज्ञानाच्या माध्यमातून जग एकिकडे खूप पुढे चालले आहे. दुसरीकडे आपल्या देशातील समाज विविध जाती, पोटजाती, धर्म, राज्याराज्याच्या भौगोलिक भिंती यामध्ये अडकून पडला आहे. देशातील बहुतांश चळवळी या जात आणि धर्माच्या पलीकडे विकासाच्या मार्गाकडेही वळल्या पाहिजेत,' असे मत बापट यांनी व्यक्त केले.

'योग्य लाभार्थ्यांना लाभ नाही'

'मागासवर्गीय विद्यार्थ्यांची दोन वर्षांपूर्वीची १८०० कोटी रुपयांची स्कॉलरशिप देणे बाकी आहे. बोगस शाळा, आश्रमशाळांद्वारे भ्रष्टाचार होत आहे. मागासवर्गीय तरुणांना उद्योगनिर्मितीसाठी अर्थसाह्य देणाऱ्या योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांना मिळत नाही, आदी प्रकारांना प्रतिबंध घालणे गरजेचे आहे,' असे बापट म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मायमराठीचा आता ‘दक्षिण दिग्विजय’

0
0

तीन लाख मराठी जनांच्या बेंगळुरूत प्रथमच रंगणार 'टाइम्स मराठी कार्निव्हल'

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पंजाबमधील घुमान शहरात मायमराठीचा गजर घुमल्याला अवघे पंधरा दिवस होत असतानाच आता दक्षिणेतील सर्वांत चैतन्यशील अशा बेंगळुरू महानगरातही मराठी संस्कृतीचे झंकार उमटणार आहेत. सुमारे तीन लाख मराठी जनांची वस्ती असलेल्या या शहरात प्रथमच 'टाइम्स मराठी कार्निव्हल' आयोजित करण्यात आला आहे. येत्या १७, १८ व १९ एप्रिलला एमएलआर कन्व्हेन्शन सेंटर, व्हाइटफिल्ड येथे हा कार्निव्हल रंगणार आहे.

या कार्निव्हलमधून नाटक, संगीताचे कार्यक्रम, मराठी पुस्तके आणि मराठी खाद्यपदार्थांची मेजवानी बेंगळुरूकरांना मिळणार आहे. महाराष्ट्राबाहेर वस्तीला असणाऱ्या मराठी जनांसाठी अशा प्रकारच हा पहिलाच सांस्कृतिक महोत्सव 'टाइम्स'तर्फे आयोजित करण्यात आला आहे. 'महाराष्ट्र टाइम्स' आणि टाइम्स समूहाचे कन्नड दैनिक 'विजय कर्नाटक' याचे सहआयोजक आहेत.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात बेंगळुरू आणि पुणे ही दोन्ही शहरे देशात अव्वल आहेत. यानिमित्ताने दोन्ही शहरांतील नागरिकांचे येणे-जाणेही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. बेंगळुरूमध्ये पूर्वीपासूनच मराठी जनांची मोठी वस्ती आहे. त्यात आता आयटी क्षेत्रामुळे जाणाऱ्या तरुणाईचीही भर पडली आहे. या सर्वांना एकाच छत्राखाली मराठी संस्कृतीचा पुनःप्रत्यय देण्यासाठी 'टाइम्स मराठी कार्निव्हल' सज्ज झाला आहे. यात सांस्कृतिक कार्यक्रमांप्रमाणेच पुणे प्रॉपर्टी शो होणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद् घाटन प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमांत लावणी, नाटके आणि राहुल देशपांडे यांची मैफल बेंगळुरूवासीयांना ऐकायला मिळणार आहे.





गजर 'नम्म मराठी'चा!

बृहन्महाराष्ट्रात मराठी जनांपर्यंत अशा कार्निव्हलच्या माध्यमातून पोचण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. बेंगळुरूमध्ये राहूनही 'नम्म मराठी'चा (माझी मराठी - मायमराठी) गजर करण्याची संधी तेथील मराठी रसिकांना मिळणार आहे. त्यामुळे बेंगळुरूतही येत्या आठवड्याच्या अखेरीस घुमानसारखेच वातावरण दिसल्यास आश्चर्य नको!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेपत्ता सागरचा मृतदेह सापडला

0
0

लोणावळाः चिंचवड येथून बेपत्ता झालेल्या सागर जाधव (वय २६) याचा मृतदेह तब्बल १७ दिवसांनी लोणावळ्याजवळील लायन्स पॉइंटच्या दरीत रविवारी शिवदुर्गच्या शोध पथकाला सापडला. सागर जाधव २६ मार्च रोजी बेपत्ता झाला होता. २८ मार्च रोजी त्याची मोटारसायकल, मोबाइल व बॅग लायन्स पॉइंटच्या दरीजवळील विक्रेत्यांच्या स्टॉलजवळ आढळली होती. याची माहिती लोणावळा पोलिसांनी चिंचवड पोलिसांना दिली. त्यानंतर सागरला शोधण्यासाठी शिवदुर्ग मित्र ट्रेकिंग अॅडव्हेंचर क्लबच्या शोध पथकाने लायन्स पॉइंटच्या दरीत उतरून त्याचा शोध घेत होते. सागरचा शोध घेताना शिवदुर्गच्या शोध पथकाला सोनाली आगळे या तळेगाव येथून बेपत्ता झालेल्या युवतीचा मृतदेह सुमारे ७०० फूट खोल अंतरावर मिळाला. मागील १५ दिवसांपासून रोज शिवदुर्गचे पथक सागरचा शोध घेत होते. रविवारी लायन्स पॉइंटजवळ दरीत आढळला. शिवदुर्गचे सुनील गायकवाड, अमोल परचंड, प्रवीण देशमुख, अजय राऊत, अशोक मते, राजेंद्र कडू यांनी मदत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खराळवाडीत फोडली सात कार्यालये

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त हाकेच्या अंतरावर पोलिस बंदोबस्त असतानाही खराळवाडीमध्ये तीन चोरट्यांनी बुधवारी (१४ एप्रिल) पहाटे धुमाकूळ घातला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या स्वीय्य सहाय्यक व त्याच्या मित्राला बांधून ठेवत बेदम मारहाण केली. राष्ट्रवादीचे कार्यालय असलेल्या साईकृपा भवन इमारतीतील सात कार्यालये फोडली. राष्ट्रवादीच्या कार्यालयातून ३५ हजार; तर अन्य कार्यालयातून लाखोंची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराळवाडी येथील साईकृपा भवन ही चार मजली इमारत आहे. या इमारतीच्या सुरक्षेसाठी सोसायटीने नेपाळचा असलेल्या कांचा (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) नावाच्या सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली होती. इमारतीच्या तळमजल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय आहे. तसेच इमारतीत अनेक बड्या कंपन्यांची कार्यालये आहेत. त्यामुळे या इमारतीत दररोज लाखोंचा व्यवहार होतो.

या इमारतीपासून हाकेच्या अंतरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची धामधूम सुरू आहे. तरीही या इमारतीच्या सुरक्षारक्षकाने आपल्या दोन साथीदारांसह बुधवारी पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान एकूण सात कार्यालये फोडली. या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात स्वीय सहाय्यक रामदास मोरे (वय ५६) आणि त्यांचा मित्र दत्ता साळुंखे (वय ५०) हे दोघे झोपले होते. चोरट्यांनी आधी या दोघांचे हातपाय बांधून स्वच्छतागृहात कोंडले. या दोघांनीही आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या तोंडात बोळे कोंबून बेदम मारहाण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हायप्रोफाइल चोरट्याला अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

वाहनांच्या काचा फोडून त्यातील मौल्यवान वस्तू व बॅगांची चोरी करणारा एक हायप्रोफाइल व बीएमडब्लू सारखी अलिशान कार वापरणाऱ्या सराईत चोरट्याला लोणावळा पोलिसांनी २४ तासांच्या आत गजाआड केले . त्याच्या विरोधात मुंबई परिसरात विविध ठिकाणी अनेक गुन्हे दाखल आहेत.

इरफान फारूख मेनन (वय ३३, रा. वांद्रा, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या या हायप्रोफाइल चोरट्याचे नाव आहे. फिर्यादी अकिब सॅमसन किल्लेदार (२९, रा. ठाणे) हे सोमवारी सकाळी चाकण येथील एका कंपनीच्या मीटिंगसाठी चाकणला त्यांच्या स्विफ्ट कारने गेले होते. मीटिंग संपल्यानंतर ते घरी परत निघाले. दुपारी दीड वाजता ते लोणावळ्यात जेवणासाठी थांबले. त्यांनी त्यांची कार जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कुमार रिसॉर्ट जवळील डायमंड हॉटेलच्या समोर रस्त्याच्या कडेला उभी करून जेवणासाठी एका हॉटेलमध्ये गेले होते. जेवण करून झाल्यानंतर ते कारकडे गेले असता त्यांना त्यांच्या कारच्या डाव्या बाजूची काच फोडलेली दिसली. त्यांनी गाडीमध्ये पाहिले असता गाडीतील लॅपटॉप, एक लेडिज बॅग व एक कागदपत्र असलेली बॅग गायब झाली असल्याची दिसली. त्यांनी आजूबाजूला विचारले असता त्याठिकाणच्या लोकांनी याठिकाणी एक सफेद रंगाची बीएमडब्लू कार व एक काळा शर्ट व लाल रंगाची पँट घातलेला युवक आला होता अशी माहिती दिली. त्यांनी तातडीने या घटनेची फिर्याद लोणावळा शहर पोलिस ठाण्यात दाखल केली होती. या घटनेची दखल घेत या हायप्रोफाइल चोरट्याला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ARAI’कडून झाडांची कत्तल

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्याचे वैभव असलेल्या वेताळ टेकडीवर नवीन इमारत, पार्किंग आणि वाहनांसाठी क्रॅश टेस्ट ट्रॅक असे विविध उपक्रम राबविण्यासाठी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) तब्बल ४६ एकर जागेत विकासकामांना सुरूवात केली आहे. यासाठी टेकडीवर शेकडो वृक्षांची कत्तल करण्यात आली असून पुढील टप्प्यात यापेक्षाही अधिक वृक्ष तोडण्यात येणार आहेत. गेल्या महिनाभरात केवळ पार्किंगसाठी संस्थेने सुमारे वीस एकर जागेतील झाडे तोडून पठार सपाट करण्यात आले आहे.

एआरएआयला जागा दिल्यास पुढील काही वर्षांत टेकडीवलील वृक्षसंपदा नष्ट होणार असे अनेक पर्यावरणवादी, अभ्यासक चार वर्षापूर्वी सातत्याने सांगत होते. ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगीळ, ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनीही वन जमीन एआरएआयला देण्यास विरोध केला होता. मात्र केंद्र सरकारने सर्व नियम धाब्यावर बसवून वन विभागाची तब्बल ५५ एकर जागा एरआएआयच्या स्वाधीन केली. त्याचे परिणाम म्हणजे या जागांवर आता विकासकामांना सुरूवात झाली असून यामध्ये येणारी सगळी झाडे तोडण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात संस्थेने वीस एकर जागेत वृक्षतोड करून संपूर्ण पठार सपाट केले आहे. या जागेत पार्किंग आणि क्रॅश टेस्ट ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. यामुळे नैसर्गिक अधिवास नष्ट होण्याबरोबरच ध्वनी आणि वायूप्रदूषणात वाढ होणार आहे. या उपक्रमाला विरोध करण्यासाठी टेकडीवर नियमित फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी वन विभागाला पत्र लिहून काम थांबविण्याची मागणी केली आहे.

'एआरएआयने झाडे तोडून पार्किंग आणि नवीन इमारत बांधण्यासाठी वनक्षेत्राचे प्रचंड नुकसान केले आहे. या जागेमध्ये तीन महिन्यांपूर्वी झालेल्या सिम्पोझियम ऑन इंटरनॅशलन ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी या प्रदर्शनासाठी जागा सपाट केली असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितले,' अशी माहिती टेकडीवर नियमित फिरायला जाणाऱ्या सुषमा दाते यांनी सांगितले. 'संस्थेच्या यापुढील कामांसाठीही अनेक झाडे तोडली जाणार असून वनक्षेत्र धोक्यात येणार आहे, त्यामुळे वन विभागाने यात लक्ष घालावे, अशी मागणीचे पत्र आम्ही वन विभागाला दिले आहे,' असे दाते यांनी सांगितले.

वृक्षलागवड करणार

वन विभागाने या विषयात आम्ही काही करू शकणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. एरआएआयला जमीन देतानाच त्यांनी केंद्र सरकारकडून नवीन इमारत, क्रॅश टेस्ट ट्रॅक बांधण्यासाठी परवानगी मिळविली होती. यासाठी जेवढी झाडे तोडावी लागतील त्याच्या दुप्पट झाडे लावण्यासाठी त्यांनी वन विभागाला निधी दिली आहे. त्यानुसार आम्ही याच टेकडीवर दुसऱ्या बाजूला वृक्षलागवड सुरू केली आहे, असे वन विभागाचे उपवनसंरक्षक सत्यजित गुजर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधी वर्ग न केल्याने सुप्रिया सुळेंचे आंदोलन

0
0

म. टा. वृत्तसेवा, दौंड

दौंड नगर परिषदेने कुरकुंभ मोरीच्या कामाचा निधी वर्ग न केल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलन केले. दौंड शहराचा कळीचा मुद्दा असलेला कुरकुंभ मोरीचा प्रश्न वर्षानुवर्षे भिजत घोंगड्या सारखा आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हे काम रेंगाळले आहे. या लोकहिताच्या कामात राजकारण न आणता जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवले पाहिजे असा आमचा सतत आग्रह असल्याचे सुळे यांनी सांगितले. परंतु नगरपालिका प्रशासन दाद देत नसल्याने आज मला आंदोलन करावे लागले. इथून पुढेही या प्रश्नाची दखल घेतली गेली नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या. या वेळी माजी आमदार रमेश थोरात जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, वैशाली नागवडे यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोरगाव योजना ‘कोरडी’

0
0

संतराम घुमटकर, बारामती

बारामती तालुक्यातील जिरायत भागातील अठरा गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेली मोरगाव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना सततच्या बिघाडामुळे कुचकामी ठरत आहे. त्यामुळे या योजनेवर अवलंबून असणाऱ्या जिरायत भागातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी कोसो दूर भटकंती करावी लगत आहे. योजनेचे पुरेसे पाणी गावाला व वाड्या - वस्त्यांना मिळत नसल्यामुळे ग्रामपंचायत लाखो रुपये पाणी पट्टी भरत नाही.

लाभार्थींमधील जवळपास सर्वच ग्रामपंचायतीकडून एक कोटी साठ लाख रुपये थकीत येणे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. याच गावासाठी नवीन मोरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसाठी २०.५३ कोटी मंजूर होऊनही त्याचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वाट पहावी लागणार आहे. सहा ते सात महिन्यांत काम संपेल, असे खासदार सुप्रिया सुळे यांना अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र आठ महिने झाले तरी काम पूर्ण झाले नसल्याने अधिकाऱ्यांनीच सुळे यांची दिशाभूल केली, अशी चर्चा होत आहे.

पुरंदर तालुक्यातील नाझरे जलाशयातून बारामती तालुक्यातील आठरा गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटूनही गावे टँकर मुक्त व्हावी, या उद्देशाने युती सरकारच्या काळात सरकारने लाखो रुपये खर्चूनही योजना केली. दहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे या परिसरातील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न काही प्रमाणावर सुटला आहे. ४० ते ४५ किमी पाणी आणण्यात आले आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या योजनेची जलवाहिनी जीर्ण झाल्यामुळे अनेक वेळा फुटत असल्यामुळे ती दुरुस्ती करण्यामध्ये बराच वेळ जात असल्यामुळे गावांना दोन ते तीन दिवसाआड पाणी मिळते.

या योजनेसाठी सिमेंटच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या होत्या एअर व्होल्व्ह खराब झाल्यामुळे कमी जास्त दाब येऊन पाइप फुटत असल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते. मात्र या योजनेच्या प्रत्येक लाभार्थी गावात २५ टक्केच लोक राहतात. व ७५ टक्के लोक वाड्या-वस्तीवर राहतात, पाणी वाड्या -वस्त्यावर पोहचत नसल्यामुळे पाणी पट्टी भरत नाही. त्यामुळे फक्त गावातील लोक पाणी पट्टी भरतात सदर योजनेची पाणी पट्टी दिवसेंदिवस थकीत असल्यामुळे प्रती वर्षी रक्कमेत वाढ होत आहे, ती भरण्यास ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्नही तेवढे नाही असे अनेक ग्रामस्थांनी सांगितले.

पाणी पट्टी वसुली करताना मात्र अधिकाऱ्यांची तारेवरची कसरत होत आहे हा दुष्काळी भाग असल्यामुळे पाणीही बंद करता येत नाही व पाणी पट्टी वसुली झाली नाही तर कार्यालयाकडून विचारणा होत असल्याचे अधिकारी सांगतात.

बारामती तालुक्यातील योजनेतील समाविष्ट गावे

बाबुर्डी, जळगाव-सुपे, जळगाव कं. प., कऱ्हाटी, लोणी भापकर, मासाळवाडी-लोणी, आंबी खुर्द, तरडोली , अंजनगाव, कऱ्हावागज, आंबी बुद्रुक, जोगवडी, मासाळवाडी, मोरगाव, भोंडवेवाडी, बऱ्हाणपूर, नेपतवळण, सुपे - दडवडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खून करून मृतदेह स्वारगेटच्या कॅनॉलमध्ये टाकला

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्वारगेट येथे कॅनॉलमध्ये एका व्यक्तीचा खून करून त्याला पाण्यात टाकून दिल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांना या व्यक्तीचा मृतदेह मिळाला आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजी दादाराव ओव्हाळ (वय ४३, रा. महादेवनगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संभाजी यांचा भाऊ शिवाजी यांनी मृतदेह ओळखला. संभाजी यांच्या मानेवर, गळ्यावर, पाठीवर, हातावर शस्रांनी वार केले आहेत. त्यांचा मृतदेह स्वारगेट येथे एका लाकडी ओंडक्याला अडकला असताना पाण्याबाहेर काढण्यात आला. पोलिसांना मृतदेह मिळाल्यानंतर त्याचे फोटो काढले. ते फोटो कॅनॉल परिसरात दाखविल्यानंतर संभाजी यांची ओळख पटली.

टिळक रोडवर पर्स हिसकावली

​टिळक रोडवर रविवारी पहाटे साडेपाच ते सहाच्या सुमारास रिक्षातून चाललेल्या महिलेची पर्स हिसकावून सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज पळवण्यात आला. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संतोष बेडेकर (वय ५५, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकरणी दुचाकीवरील दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बेडेकर डॉक्टर आहेत.

पूर्ववैमनस्यातून दत्तवाडीत खून

पूर्ववैमनस्यातून तरुणावर वार करत त्याचा खून केल्याची घटना आंबिल ओढा वसाहतीमध्ये शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाथ पाटोळे (वय २३, रा. दत्तवाडी) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी किशोल भालशंकर, विनायक थिटे, गणेश शिंदे (सर्व रा. आंबिल ओढा वसाहत, दत्तवाडी) यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पाटोळे यांचा मित्र चेतन रणदिवे याचे आरोपींशी वाद आहेत. पाटोळे रणदिवे याच्याबरोबर ​​फिरतात, याचा राग आरोपींना होता. रणदिवे हे शुक्रवारी रात्री आंबिल ओढा वसाहतीत असताना आरोपींनी त्यांच्यावर हल्ला करत त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी महिला फौजदार एस. एम. क्षीरसागर अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्किंग ठेकेदारांकडून पुणेकरांची लूट

0
0

चैतन्य मचाले, पुणे

पार्किंगचा ठेका घेताना करण्यात आलेल्या करारनाम्याकडे सर्रास दुर्लक्ष करत पार्किंग चालविणारी मंडळी सर्वसामान्य पुणेकरांची लूट करत असल्याच्या अनेक तक्रारी केल्या जात आहेत. विशेष म्हणजे पार्किंग शुल्काच्या नावाखाली दुप्पट नव्हे तर काही ठिकाणी पाचपटीने जादा शुल्क वसूल केले जात असल्याचे अनेक पुरावे देऊनही चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची 'हिंमत' प्रशासनातील अधिकाऱ्यांची होत नाही. चुकीचे काम करणाऱ्यांची चौकशी केली जाईल, असे स्पष्टीकरण देत ठेकदारांच्या मनमानी कारभाराला पाठीशी घालण्याचे काम प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

गेल्या काही वर्षांत शहराचा चारही भागांना होणारा विस्तार, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे वाजलेले तीनतेरा, यामुळे वाढलेला खासगी वाहनांचा वापर, शहरातील मध्यवर्ती भागात असलेले अरूंद रस्त‌े यामुळे वाहने उभी करण्यास वाहनचालकांना जागा मिळत नाही. शहराच्या मध्यवर्ती भागासह अन्य भागात कामानिमित्त गेलेल्या नागरिकांना त्यांची गाडी पार्क करण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिका प्रशासनाने पालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागांवर पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तर वाहनांची वाढती संख्या डोळ्यासमोर ठेऊन शहराच्या विकास आराखड्यात (डीपी) काही प्लॉट पार्किंगसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. नागरिकांना त्यांची वाहने कमी दरात पार्किंग करता यावी, या हेतूने महापालिका प्रशासनाने त्यांच्या मालकीच्या मोकळ्या जागा टेंडर काढून पार्किंगसाठी उपलब्ध करून देते. या जागेमध्ये दररोज किती गाड्या पार्किंगसाठी येतील, महिन्याला किती येतील, संबधित पार्किंगचा वापर वर्षाला किती वाहनांचा होईल, याचा सर्व अभ्यास करून हे टेंडर काढले जाते. पार्किंगचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने दुचाकी वाहनांसाठी आणि चारचाकी तसेच इतर वाहनांसाठी किती शुल्क आकारावे याचा स्पष्ट करार करून त्यानंतरच पार्किंगचे ठेके ठेकेदारांना चालविण्यासाठी दिले जातात. पालिकेने पार्किंगसाठी ठरवून दिलेल्या शुल्का इतकेच शुल्क आकारावे, असे बंधनकारक असताना पालिकेने ठेकेदाराची पद्धतीने चालविण्यासाठी दिलेल्या शहरातील विविध भागातील पार्किंगचालक याकडे दुर्लक्ष करून आपल्या मनाप्रमाणे पार्किंगचे पैसे वसूल करून सर्वसामान्य नागरिकांची लूट करत आहेत.

पेशवे पार्क, बालगंधर्व, देशपांडे उद्यानातही लूट

कुटुंबासह फिरायला येणाऱ्या वाहनचालकांची पेशवे पार्क, बालगंधर्व रंगमंदिर तसेच सिंहगडरोडवरील पु. ल. देशपांडे उद्यानातील पार्किंग चालकांकडून लूट केली जात आहे. या पार्किंगचा ठेका देताना दुचाकी वाहनचालकांकडून दोन रुपये तर चारचाकी वाहनाचालकांकडून पार्किंगसाठी पाच रुपये घ्यावे, असा करार करण्यात आला आहे. परंतू याकडे दुर्लक्ष करत दुचाकीसाठी पाच तर कधी दहा रुपये घेतले जातात. तर अनेकवेळा पार्किंगसाठी आकारलेल्या रकमेची पावतीही नागरिकांना दिली जात नाही.

महापालिकेची उद्याने, नाट्यगृहे, मुख्य इमारत अशा ठिकाणी भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने वाहनांच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध होत नाही. पार्किंगसाठी जादा पैसे देण्यास अनेकदा नागरिकांनी नकार दिल्यास बाहेर गाडी लावा, येथे लावू नका, असे स्पष्ट करत ठेकेदारांचे कर्मचारी मनमानी कारभार करतात. अनेकदा तर पार्किंगचा ठेका घेतलेले कामगार अरेरावीची भाषा करत अनेकदा अर्वाच्य शिवीगाळ करत असल्याची तक्रार काही ज्येष्ठ नागरिकांनी केली.

माहितीचे बोर्ड, मोबाईल क्रमांक द्यावेत

पालिकेने पार्किंगचा ठेका देताना संबधित ठेकेदाराने किती शुल्क घेतले पाहिजे, याची सविस्तर माहिती असणारे बोर्ड पार्किंगच्या ठिकाणी लावणे बंधनकारक असते. मात्र अनेकदा अशा पद्धत‌ीचे बोर्ड लावले जात नाहीत. शहरातील काही पार्किंगच्या ठिकाणी अशा पद्धतीचे बोर्ड लावलेले आहेत. परंतू यावरील शुल्काची रक्कम अस्पष्ट अशी असते. पार्किंगसाठी जादा पैसे वसूल केले जात असतील तर तक्रार करण्यासाठी क्रमांकही येथे लिहिलेला नसतो. त्यामुळे तक्रार करायची झाल्यास नक्की कुठे करायची यामध्ये तक्रार करायची राहून जाते. पालिकेने पार्किंगचा ठेका देताना या संबधित अधिकाऱ्यांचे फोन क्रमांक बोर्डावर लिहण्याचे बंधन घातले पाहिजे.

पालिकेला लाखो; ठेकेदाराला कोट्यवधींचा फायदा

पार्किंगच्या माध्यमातून पालिकेला दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. पार्किंगचा ठेका घेतलेल्या ठेकेदारालाही त्यामधून काही प्रमाणात उत्पन्न मिळाले पाहिजे, ही गोष्ट खरी असली तरी संबधित ठेकेदार यातून किती उत्पन्न कमावितो. याकडे प्रशासनातील अधिकारी कधीही लक्ष देत नाही. त्यामुळे पार्किंगच्या टेंडरमधून पालिकेला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असले तरी संबधित ठेकेदार मात्र त्यातून कोट्यवधी रुपयांची कमाई करत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. स्वारगेट येथील नेहरू स्टेडियमच्या बाजूला असलेल्या गणेश कला क्रीडा मंच येथे पार्किंगचा ठेका देताना दुचाकी पार्किंगसाठी दोन रुपये शुल्क घ्यावे, असा करार करण्यात आला आहे. मा‌त्र येथे दुचाकी पार्किंगसाठी दहा रुपये घेत असल्याची तक्रार केली जाते. वारंवार याची तक्रार पालिकेकडे करूनही काहीही उपयोग होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

गाड्यांची जबाबदारी ठेकेदाराचीच

महापालिकेच्या पार्किंगमध्ये वाहन लावण्यासाठी शुल्क आकारले जात असतानाही वाहनाच्या सुरक्षेची जबाबदारी ठेकेदार झटकतात. एका अर्थाने, सर्वसामान्यांची ही लूटच असून, महापालिकेने ठेकेदारांसाठी गाडीच्या सुरक्षितेचा नियम करणे अत्यावश्यक आहे. पार्किंगच्या ठिकाणी 'स्वतःच्या जबाबदारीवर गाडी लावावी. काही नुकसान झाल्यास आमची जबाबदारी नाही', असा बोर्ड ठेकेदारांकडून लावण्यात आला आहे. नागरिकांची वाहने सुरक्षित राहण्यासाठीच पार्किंगची व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आली आहे. त्या ठिकाणी वाहन लावण्यासाठी जर सर्वसामान्यांकडून शुल्क आकारले जाणार असेल, तर स्वाभाविकपणे वाहन लावलेल्या काळात गाडीच्या सुरक्षेची जबाबदारीही ठेकेदाराचीच आहे. नैसर्गिक अपघात वगळता गाडी चोरीला गेली, टवाळक्यांनी गाडीचे काही नुकसान केल्यास ते भरून देणे हे ठेकेदाराचेच काम आहे. मात्र, ही जबाबदारी ठेकेदार झटकून टाकतात, ही बाब चुकीची आहे. वाहन लावलेल्या काळात तिच्या सुरक्षेची जबाबदारी ठेकेदाराने न घेणे ही लूटच ठरते. महापालिकेने ठेकेदारांसाठीच्या नियमावलीतच हा मुद्दा स्पष्ट करण्याची गरज आहे. अन्यथा, शहरात सर्व ठिकाणी पार्किंग व्यवस्था मोफत करण्यात यावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कँटोन्मेंट हद्दीत रस्ते खोदण्यास मनाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिका आणि पुणे कँटोन्मेंट बोर्ड यांच्यात पाणीपट्टीच्या बिलावरून वाद निर्माण झाला असताना, बोर्डाने महापालिकेला कोणत्याही विकासकामांसाठी 'ना हरकत प्रमाणपत्र' मिळण्यापूर्वीच खोदाई करण्यास मनाई करण्याचा निर्णय घेतला आहे. परवानगीविना खोदाई केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.

मुंढवा, कोंढवा, वानवडी, घोरपडी आदी भागातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी आणि ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी महापालिकेला बोर्डाच्या हद्दीत खोदाई करावी लागते. त्यासाठी महापालिकेला बोर्डाकडून 'ना हरकत प्रमाणपत्र' घ्यावे लागते. बोर्डाने प्रमाणपत्र दिल्यावर खोदाई करणे अपेक्षित असताना, परवानगी मिळणार हे गृहीत धरून अनेकदा महापालिकेकडून खोदाईचे काम सुरू करण्यात येते. मात्र, आता परवानगीपूर्वीच खोदाई करण्यास मनाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोर्डाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. परवानगी न घेता महापालिकेने खोदाई केल्याचे आढळून आल्यास संबंधित काम थांबविण्यात येणार आहे; तसेच कारवाई केली जाणार असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम शुल्क बंधनकारक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आणि राज्य सरकारचा कोणताही संबंध नाही. बांधकाम करताना त्यांनी महापालिकेची परवानगी घेणे आणि बांधकाम शुल्क भरणे बंधनकारक आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून बांधकाम शुल्क वसूल केला जाऊ शकतो, अ‌सा अभिप्राय महापालिकेच्या विधी विभागाने दिला आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून बांधकाम शुल्क वसूल करण्याचा पालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

विद्यापीठाने आपल्या हद्दीत इमारती बांधताना पालिकेच्या बांधकाम खात्याचे विकसन शुल्क भरले नसल्याचे समोर आले होते. विद्यापीठाने २७ इमारतींचे विकसन शुल्क भरलेले नसताना आणि बेकायदा पद्धतीने बांधकाम केलेले असतानाही महापालिका प्रशासन त्यांच्यावर कारवाई करून दंड वसूल करण्यास टाळाटाळ करत होते. विद्यापीठ हे राज्य सरकारचे असल्याने त्याला विकसन शुल्क माफ असल्याचा दावा विद्यापीठ प्रशासन आणि महापालिकेच्या बांधकाम विभागातर्फे करण्यात येत होता. याला सजग नागरिक मंचाने आक्षेप घेऊन पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे तक्रार केली होती. विद्यापीठाने इमारतींचा पूर्णत्वाचा दाखला न घेताच परस्पर इमारती वारण्यास सुरुवात केल्याचे वृत्त सर्वप्रथम 'महाराष्ट्र टाइम्स' ने प्रकाशित करून यावर प्रकाश टाकला होता.

तक्रार दाखल झाल्याने कुणाल कुमार यांनी पालिकेच्या विधी खात्याकडून अभिप्राय घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. पालिकेच्या पॅनेलवर असलेले माजी न्यायाधीश जे. एस. पाटील यांचा अभिप्राय घेण्यात आला. पुणे विद्यापीठ आणि राज्य सरकार यांचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्याकडून बांधकाम शुल्क आकारण्यास हरकत नाही, असे पाटील यांनी अभिप्रायात म्हटले आहे. त्यामुळे विद्यापीठाने आजपर्यंत बुडविलेले कोट्यवधी रुपयांचे बांधकाम शुल्क आणि त्यावरील दंड वसूल करण्याचा पालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

विद्यापीठ ही राज्य सरकारची संस्था असल्याचे कारण पुढे करून पालिका प्रशासन त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत होते. मात्र, विद्यापीठ ही स्वतंत्र संस्था असल्याचा अभिप्राय पालिकेच्या विधी खात्याने दिल्याने आजवर बुडवलेला कोट्यवधींचा दंड आणि मालमत्ता कर पालिकेने वसूल करावा. हा दंड वसूल केल्यास पालिकेच्या तिजोरीत १५ ते २० कोटी रुपयांची भर पडेल.

- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नियंत्रकाची मदतीस टाळाटाळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बस स्टॉपवर उभ्या असलेल्या एका व्यक्तीला पीएमपी बसची जोरदार धडक बसून, ती जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास स्वारगेट येथे घडली. नागरिकांनी घटनास्थळापासून चार ते पाच फुटांवर असलेल्या वाहतूक नियंत्रकाकडे मदतीची याचना करूनही त्याने हात झटकले. त्यामुळे एका व्यक्तीने थेट 'पीएमपी'च्या महाव्यवस्थापकांना फोनवरून माहिती दिली आणि त्यांनी नियंत्रकाला सुनावल्यानंतर अखेर तो मदतीसाठी तयार झाला; मात्र तोपर्यंत सुमारे तासभर जखमी व्यक्ती त्याच अवस्थेत बस स्टॉपवर तळमळत पडली होती.

सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडी येथे राहणारे विजय उत्तेकर रात्री सायकलने कामावरून घरी चालले होते. नटराज हॉटेलसमोरील धायरी बस स्टॉपवर एकाची वाट पाहण्यासाठी ते उभे राहिले. या वेळी वडगावची बस तेथे वेगात आली आणि त्या बसची उत्तेकर यांना धडक बसली. त्यामुळे त्यांच्या पायाचे हाड मोडले, तसेच सायकलची दोन्ही चाके वाकडी झाली. आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्याकडे धाव घेत त्यांना उचलून बाजूला ठेवले. त्यांना पाणी पाजले. त्यांची ओळख पटवून घेण्याचा प्रयत्न केला.

ही घटना घडली तेव्हा पीएमपीचे नियंत्रक (स्टार्टर) तेथे जवळच उभे होते; मात्र नागरिकांनी त्यांच्याकडे मदत मागितल्यानंतर त्यांनी बस कोणती होती, कधी धडक बसली, बसचा नंबर काय होता, असे उलट प्रश्न नागरिकांनाच विचारले. तसेच, धडक दिल्याचे मला कळलेच नाही, असे सांगून जखमीकडे येण्याचे टाळले. तसेच, 'पीएमपी'च्या महाव्यवस्थापकांनी फोनवरून चौकशी केल्यानंतरही त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. जखमी व्यक्ती सव्वानऊ वाजल्यापासून रात्री सव्वा दहापर्यंत तळमळत पडली होती. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पायाचे हाड मोडल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची वेळ आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका आयुक्तांची कोर्टासमोर हजेरी

0
0

पुणेः सुप्रीम कोर्टाच्या आदेशांनंतरही बिबवेवाडीतील टिंबर मार्केटच्या जागेवर बांधकामाला परवानगी न दिल्याने पालिका आयुक्तांनाच सोमवारी कोर्टासमोर हजेरी लावावी लागली. संबंधित जागामालकाने कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल केल्याने पालिकेला आता पुन्हा त्या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे.

पालिकेच्या १९८७च्या विकास आराखड्यात बिबवेवाडीतील सर्व्हे क्र. ५७८वर टिंबर मार्केटचे आरक्षण दर्शवण्यात आले होते. परंतु, हे आरक्षण वेळेत ताब्यात घेण्यात पालिकेला अपयश आल्याने जागामालकांनी मूळ जागेची मागणी केली होती. त्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून दाखल असलेल्या दाव्यात अखेर सुप्रीम कोर्टाने जमीन मालकांच्या बाजूने निकाल देत टिंबर मार्केटचे आरक्षण रद्द करण्याची सूचना पालिकेला केली होती. टिंबर मार्केटचे आरक्षण रद्द झाल्याने या ठिकाणी बांधकामाला परवानगी देण्याचा अर्ज जागामालकांनी पालिकेकडे केला होता. त्यानुसार, काही परवानग्या देण्यात आल्या होत्या; पण सर्वसाधारण सभेत या विषयावर जोरदार चर्चा झाल्यानंतर संबंधित बांधकाम परवानग्यांना स्थगिती दिली जावी, असा निर्णय घेण्यात आला.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशांविरोधात पालिका भूमिका घेत असल्याने जागामालकांनी पुन्हा कोर्टाकडे दाद मागत, अवमान याचिका दाखल केली. या प्रकरणी पालिका आयुक्तांनीच खुलासा करावा, असे फर्मान कोर्टाने काढले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोणावळ्यात पर्जन्यवृष्टी

0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने मंगळवारी दुपारी दोन वाजता मावळात, तसेच लोणावळा शहर व परिसरात जोरदार हजेरी लावली. मंगळवारी सकाळपासूनच मावळात पावसाळी वातावरण होते.

मावळातील लोणावळा, कामशेत, वडगाव, तळेगाव, नाणे आणि आंदर मावळ परिसरात दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी दोन तास, तर काही ठिकाणी दीड तास जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे पावसाच्या पाण्याने खाचरात पाणी साचले होते. शहर-परिसरातील गटारे तुडुंब भरून वाहत होती. या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या बागायतीचे अतोनात नुकसान केले आहे. पावसानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त लोणावळ्यात मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांची या पावसामुळे मोठी तारांबळ उडाली. सर्वसामान्य नागरिकांनादेखील या अवकाळी पावसाचा फटका बसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हाळा थंडावला

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यासह राज्यात सर्वत्र कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. राज्यातील ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात घट होऊन उकाड्याची तीव्रता चांगलीच कमी झाली आहे. पुढील दोन दिवसांत विदर्भात गारांसह पावसाची शक्यता असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे कोकण वगळता बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामान आहे. परिणामी तापमानात घट झाली आहे. पुढील दोन दिवसांत राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच हवामानही ढगाळ राहण्याची शक्यता असल्याने कमाल तापमान सरासरीपेक्षा कमीच राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पुण्यात मंगळवारी ३०.६ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदवले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा सात अंशांनी कमी होते. किमान तापमानही सरासरीपेक्षा दोन अंशांनी कमी म्हणजे १७.६ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. मराठवाडा, तसेच विदर्भातही कमाल तापमान सरासरीपेक्षा सुमारे दहा अंशांनी कमी होते. विदर्भात सध्या पाऊस व गारपीटही सुरू असल्याने विदर्भातील तापमानात सर्वाधिक घट झाली आहे.

दरम्यान, मंगळवारी पावसाने शहरात हजेरी लावली नसली, तरी राज्यात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, तर विदर्भात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. महाबळेश्वर येथे स्थानिक भौगोलिक कारणांमुळे जोरदार पाऊस झाला. सायंकाळी साडेपाचपर्यंत तेथे ११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल नागपूर येथे सात, तर ब्रह्मपुरी येथे सहा मिमी पावसाची नोंद झाली. लोणावळ्यातही काही जोरदार सरी बरसल्या. अन्यत्र तुरळक स्वरूपाच्या सरींनी हजेरी लावली.

सध्या उत्तर प्रदेश ते कॉमोरीनदरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. दक्षिण मध्य प्रदेशावर हवेची चक्राकार स्थिती आहे. मध्य महाराष्ट्र ते कर्नाटकदरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. त्याचबरोबर गुजरात, तसेच कॉमोरीन परिसरात वातावरणाच्या वरच्या थरात हवेची चक्राकार स्थिती आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची, तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र व कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यात शहराच्या काही भागांत दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाडेकरूंची नोंद बंधनकारक

0
0

येरवडाः शहरातील संभाव्य अतिरेकी घातपात कारवायांवर अंकुश ठेवण्यासाठी परिसरात भाड्याने राहणाऱ्या भाडेकरूंची, तसेच त्यांनी एखादे वाहन खरेदी केल्यास त्याची संपूर्ण माहिती स्थानिक पोलिसांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसा लेखी आदेश आयुक्तांनी सर्व पोलिस स्थानकांना बजावलेला आहे.

सोसायटीमध्ये राहणारे बहुतांश भाडेकरू राहण्यापूर्वी आवश्यक ती सर्व माहिती पोलिसांना कळवितात. पण झोपडपट्टीत भाड्याने राहणाऱ्या अनेक भाडेकरूंची माहिती घरमालक पोलिसांना कळवत नसल्याने समाजविघातक घटकांकडून त्याचा गैरफायदा उठविला जाण्याचा धोका आहे. तर स्थानिक पोलिस झोपडपट्टीतील भाडेकरूंची पाहणी करण्यास निरुत्साही दिसतात.

तीन वर्षांपूर्वी एक ऑगस्ट २०१२ रोजी जंगली महाराज रोडवर कमी तीव्रतेचे साखळी बॉम्ब स्फोट झाले होते. तर १० जुलैला फरासखाना पोलिस स्टेशनच्या आवारात चोरीच्या मोटरसायकलमध्ये स्फोट झाला होता. हा स्फोट पाइप बॉम्बचा होता आणि त्याची क्षमता कमी होती, त्यामुळे या स्फोटात अधिक जीवितहानी झाली नव्हती. देशात गेल्या सात वर्षांतील सर्वाधिक दहशतवादी घटना जुलै-ऑगस्टमध्ये घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणेने अधिक सतर्कता आणि दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत.

येरवडा ,विमाननगर आणि नगर रोड परिसरात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आय टी कंपन्या, हॉटेल, बी.पी ओ, कॉल सेंटर उभारल्याने राज्यातील विविध शहरे, परराज्यातून तरुण तरुणी रोजगाराच्या शोधात पुणे शहरात वास्तव्यास आले आहेत. चांगल्या कंपनीत काम करणाऱ्या नोकरदारांना गलेलठ्ठ पगार असल्याने अनेक जण पुण्यातच स्वतःची सदनिका विकत घेताना दिसतात. तर हॉटेल, आयटी, बीपीओ कंपनीत साफ सफाईची कामे करणारे अनेक तरुण, तरुणी कमी भाडे असलेल्या ठिकाणी अर्थात झोपडपट्टीमध्ये राहण्यास प्राधान्य देतात.

आजही येरवडा, लक्ष्मीनगर, विश्रांतवाडी, धानोरी, लोहगाव, चंदन नगर, वडगाव शेरी भागात भाड्याने राहतात. अशा ठिकाणी राहणाऱ्या अनेक भागातील भाडेकरूं माहितीच पोलिसांकडे उपलब्ध नसल्याचे समजते. त्यामुळे परिसरातील कोणत्या भागात किती भाडेकरू राहतात, याची भाडेकरू अथवा घरमालकाने माहिती पोलिसांना देणे बंधनकारक केले आहे. असे असूनही अनेक जण अशी माहिती पोलिसांना देण्यात टाळाटाळ करताना दिसून येते.

परराज्यातील किंवा इतर शहरांतील व्यक्तीला खोली भाड्याने देण्यापूर्वी संबंधित घरमालकने भाडेकरूची संपूर्ण माहिती स्थानिक पोलिसांना देणे बंधनकारक आहे. भाडेकरूंची माहिती लपविलेली आढळून आल्यास घरमालकावर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल.

- शाम मोहिते , सहायक पोल‌िस आयुक्त, खडकी विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images