Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘हरामखोर’च्या निर्मात्याविरुद्ध गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'हरामखोर' या हिंदी सिनेमाच्या जाहिरातीसाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) बोधचिन्हाचा वापर केल्याप्रकरणी सिनेमाचे निर्माता अजय यादव, दिग्दर्शक श्लोक शर्मा, डिझायनर तारिणी डी. यांच्यावर पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक, 'कॉपी राइट' कायद्याचा भंग तसेच 'आयटी अॅक्ट'खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'हरामखोर' या चित्रपटाच्या पोस्टरसाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) बोधचिन्हाचीच उचलेगिरी केल्याचे उघडकीस आल्यावर टीका झाली होती. बालभारतीचे विधी सल्लागार मोहन वीर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.

दिग्दर्शक श्लोक शर्मा यांनी 'हरामखोर' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले असून, सध्या ट्रेलर दाखविले जात आहेत. प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी या चित्रपटात शिक्षकाची भूमिका बजावत आहे. अभिनेत्री श्वेता त्रिपाठीने विद्यार्थिनीची भूमिका साकारली आहे. बोधचिन्हावर असलेल्या विद्यार्थ्याच्या ठिकाणी नवाजउद्दीनचे, तर विद्यार्थिनीच्या जागेवर श्वेताचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.

'हरामखोर' सिनेमाच्या जाहिरातींमध्ये हे बोधचिन्ह झळकू लागल्यानंतर सहा एप्रिल रोजी 'बालभारती'मध्ये तक्रारींचे फोन खणखणू लागले. त्यानंतर 'बालभारती'ने कायदेशीर बाजू तपासल्यानंतर कारवाईची भूमिका घेण्याचे धोरण स्वीकारले. 'बालभारती'चे विधी सल्लागार वीर यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात सिनेमाच्या संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. चित्रपटासाठी बोधचिन्हाचा वापर करणाऱ्या डिझायनर तारिणी डी. यांच्यासह तंत्रज्ञांनाही या गुन्ह्यांत सहआरोपी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सासवडमध्ये गारपीट

$
0
0

सासवडः पुरंदर तालुक्यातील सासवड आणि पवारवाडी -दिवेघाट परिसरात शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जोरदार गारपीट झाली. गारपिटीमुळे अंजीर, डाळींब, पेरू आणि सिताफळाच्या बागांना फटका बसला.

सासवड परिसरात दुपारी ढग दाटून आले. त्यातच जोराचा वारा सुरू झाला आणि एकच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या जोरदार पावसाने बाजारपेठेतील नागरिकांची तारांबळ उडाली. या गारपिटीचा मोठा फटका सासवड, दिवेघाट परिसर, सोनोरी, आंबोडी भागातील फळबागांना बसला आहे. विशेषतः अंजीर, डाळींब, पेरू, सिताफळाच्या बागांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान सासवड परिसरात शुक्रवारी सायंकाळीही पाऊस झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूळगावकरांना अखेरचा निरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

माजी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल हृषीकेश मूळगावकर यांच्या पार्थिवावर शनिवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तिन्ही संरक्षण दलांतर्फे मानवंदना दिल्यानंतर सजविलेल्या तोफेवरून तिरंग्यात लपेटलेले त्यांचे पार्थिव मुक्तिधाम स्मशानभूमीत आणण्यात आले. त्यानंतर बंदुकीच्या फैरींची सलामी देत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

मूळगावकर (वय ९५) यांचे गुरुवारी रात्री दहा वाजता पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये निधन झाले होते. शनिवारी दुपारी लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या (एएफएमसी) आवारात हवाईदल आणि लष्कराच्या बँडपथकातर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यांचे पार्थिव असलेल्या शवपेटीवर तिरंगा लपेटण्यात आला होता. त्यावर मूळगावकर यांची हवाई दलाची कॅपही ठेवण्यात आली होती.

हवाई दलातर्फे दक्षिण पश्चिम मुख्यालयाचे वरिष्ठ एअर स्टाफ ऑफिसर सी. हरी कुमार यांनी मूळगावकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. लोहगाव येथील हवाई दलाच्या तळाचे प्रमुख एअर कमोडोर ए. के. भारती, हवाई दलाचे विविध अधिकारी, नौदल आणि लष्कराच्या प्रतिनिधींनीही मूळगावकर यांच्या पार्थिवावर पुष्पच्रक अर्पण केले. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल पी.व्ही नाईक (निवृत्त), उपप्रमुख एअर मार्शल पी. एस.पिंगळे (नि), एअर मार्शल भूषण गोखले (नि), एअर मार्शल प्रताप राव (नि) यांनी आदरांजली वाहिली. मूळगावकर यांचे पुत्र डॉ. प्रकाश, मुलगी ज्योती राय आणि अन्य नातेवाइक, मूळगावकर यांचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तींनी अंत्यदर्शन घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५ हजार एकर जमीन एसईझेडमुक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राजगुरूनगर परिसरातील तेरा गावांमधील शेतकऱ्यांच्या सुमारे २५ हजार एकर जमिनींवरील एसईझेडचे शिक्के काढण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच दिले. या संदर्भातील आदेश त्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.

राजगुरूनगर परिसरातील भारत फोर्जच्या एसईझेडसाठी काही जमिनी संपादित करून त्यावर एसईझेडचे शिक्के मारण्यात आले होते. कालांतराने एसईझेडचा प्रकल्प रद्द झाला. मात्र, संपादित केलेल्या जमिनी कंपनीकडेच आहेत. अन्य जमिनींच्या सातबारा उताऱ्यांवर शिक्के असल्याने शेतकरी अडचणीत आले होते. त्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राजगुरूनगर ते पुणे पदयात्रा काढून या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. त्यावेळी या प्रश्नावर बैठक घेण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते. त्यानंतर फडणवीस यांनी मुंबईत स्वाभिमानीचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाबरोबर बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी कल्याणी कंपनीच्या वतीने कोणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हते. त्यामुळे शेट्टी यांनी याबाबत नापसंती व्यक्त केली.

कंपनी सरकार आणि मुख्यमंत्र्यांनाही दाद देणार नसेल, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. 'शेतकऱ्यांकडून स्वस्तात घेतलेली जागा आता वाढीव दराने विमानतळासाठी घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्याला आपला विरोध आहे. एसईझेड रद्द झाल्याने शेतकऱ्यांना जमिनी परत कराव्यात आणि विमानतळासाठी सरकारने शेतकऱ्यांशी थेट चर्चा करून जमिनी खरेदी कराव्यात,' अशी मागणी शेट्टी यांनी केली.

या भागातील २५ हजार एकर क्षेत्रावरील एसईझेडचे शिक्के काढण्याचे आश्वासन फडणवीस यांनी या वेळी दिले. उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार सुरेश गोरे, महेश लांडगे, एमआयडीसीचे अजित रेळेकर, जिल्हाधिकारी सौरव राव आदी यावेळी उपस्थित होते. या व्यतिरिक्त सांगली जिल्ह्यातील दोन हजार एकर जमिनींच्या सातबारा उताऱ्यांवरील असेच शिक्के काढण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा कचराकोंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उरळी आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोला शुक्रवारी पुन्हा आग लागल्याने पालिकेच्या कचरा गाड्या तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्यात आल्या आहेत. परिणामी, शहरात पुन्हा कचऱ्याचे ढीग निर्माण झाल्याने त्यातून मार्ग काढण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे.

पालिकेतर्फे उरळी आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोत सुका कचरा टाकण्यात येणाऱ्या जागीच ही आग लागली. आग वेगाने पसरल्याने ती आटोक्यात आणण्यासाठी पालिकेतर्फे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचा परिणाम कचऱ्यावर झाला असून, पालिकेची एकही गाडी गेल्या दोन दिवसांपासून कचरा डेपोवर पाठविण्यात आलेली नाही. त्यामुळे, शहरात कचऱ्याचे ढीग साठण्यास सुरुवात झाली आहे. घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनीही शहरात कचरा साठल्याची कबुली दिली. डेपोवर लागलेली आग आटोक्यात आल्यानंतरच पुन्हा कचरा गाड्या पाठविण्यात येतील असे जगताप यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच शहरात जागोजागी साठणाऱ्या कचऱ्याच्या निर्मूलनासाठी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबविण्यात आली होती. शहर कचरामुक्त करण्याचा संकल्प अवघ्या आठवड्याभरात धुळीस मिळाला आहे.

जानेवारीपासून कचरा डेपो बंद करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर आणखी नऊ महिने डेपो सुरू ठेवण्यास ग्रामस्थांनी परवानगी दिली होती. फेब्रुवारीपासून पुन्हा कचरा डेपोत टाकण्यात सुरुवात झाली होती. शुक्रवारच्या आगीमुळे त्यांत खंड पडला असून, ग्रामस्थांकडून पुन्हा कचरा गाड्या अडवल्या जाण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुटीच्या दिवशीही भरा मिळकत कर

$
0
0

पुणेः नागरिकांना मिळकत कर वेळेत भरता यावा; तसेच त्यावर मिळणाऱ्या सवलतीचा लाभ घेता यावा, म्हणून शनिवार-रविवारसह सर्व सरकारी सुट्यांच्या दिवशीही मिळकत कर स्वीकारला जाणार आहे. पालिकेची मुख्य इमारत, सर्व क्षेत्रीय कार्यालये आणि संपर्क कार्यालये येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत नागरिकांना कर भरणा करता येईल.

नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये मिळकत कर भरणाऱ्यांना ५ ते १० टक्के सवलत दिली जाते. नोकरी-व्यवसायानिमित्त अनेक नागरिकांना कार्यालयीन वेळेत कर भरणा करणे शक्य होत नसल्याने त्यांच्यासाठी शनिवार-रविवारसह सर्व सुट्यांच्या दिवशी कर संकलन केंद्रे सुरू ठेवण्याचे पालिकेने जाहीर केले आहे. मेअखेरपर्यंत पालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये मिळकत कर भरता येणार आहे. नागरिकांना मिळकत कराबाबत कोणत्याही तक्रारी किंवा अडचणी असल्यास ०२० २५५०११५९ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेकेदारांकडून बस कशाला?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) खासगी ठेकेदारांकडून भाडेतत्वावर घेतलेल्या बसपेक्षा पीएमपीच्या स्वत:च्या बस अधिक उत्पन्न मिळवतात. त्यामुळे ठेकेदारांकडून बस भाडेकराराने घेण्याचा विचार करायला हवा, असे मत पीएमपीचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी शनिवारी व्यक्त केले. डॉ. परदेशी यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अॅन्ड अॅग्रिकल्चरतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. चेंबरचे अध्यक्ष सतीश मगर, महासंचालक डॉ. अनंत सरदेशमुख, माजी अध्यक्ष एस. के. जैन आदी या वेळी उपस्थित होते.

'विकसित देशांची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम असल्याने त्यांना वाहतुकीची समस्या भेडसावत नाही. पुण्यालाही सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गरज आहे. मेट्रो प्रकल्पाच्या खर्चापैकी दहा टक्के रक्कम पीएमपीला दिल्यास पीएमपी सक्षम होऊ शकेल,' असे डॉ. परदेशी यांनी स्पष्ट केले.

'पुणे शहरासाठी ३,४०० बसची गरज आहे. सध्या रस्त्यावर फक्त २,१०० बस धावत आहेत. या बस खरेदीसाठी आणि डेपो सुधारणेसाठी टक्के निधी मिळाल्यास पीएमपी सक्षम होईल. पुणे महानगर परिवहन महामंडळाने खासगी ठेकेदारांकडून भाडेतत्वावर घेतलेल्या बसपेक्षा पीएमपीच्या स्वत:च्या बस अधिक उत्पन्न मिळवतात. खासगी ठेकेदारांकडून घेतलेल्या बसचे रोजचे प्रति किलोमीटर उत्पन्न ४० व ४१ रुपये एवढे आहे. तर पीएमपीच्या स्वत:च्या बसेसचे उत्पन्न मात्र ४५ रुपये आहे. त्यांना प्रति किलोमीटर ५२ रुपये देऊनही अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे ठेकेदारांकडून बस घेण्याबाबत विचार करायला हवा. पीएमपी आगारांप्रमाणे सर्व ठेकेदारांचे रँकिंगही नागरिकांसाठी प्रसिद्ध करायला हवे,' असेही मत डॉ. परदेशी यांनी मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. यशवंत सुमंत यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. यशवंत सुमंत (वय ६०) यांचे शनिवारी पहाटे पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्यावर दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रा. डॉ. सुमंत गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. गुरुवारी रात्री प्रकृती खालावल्याने त्यांना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन ते 'ब्रेन डेड' अवस्थेत गेले. त्यातच शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी सामाजिक कार्यकर्त्या माधुरी सुमंत; तसेच युवा नाट्यकर्मी, लेखक धर्मकीर्ती व हर्षवर्धन ही दोन मुले असा परिवार आहे. कोणतेही धार्मिक विधी न करता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मूळचे अक्कलकोटचे असलेल्या डॉ. सुमंत यांनी १९७५ साली तत्कालिन पुणे विद्यापीठातून बीएची आणि १९७७ साली एमए ची पदवी घेतली. त्यानंतर १९८८ मध्ये एम फिल आणि १९९२ मध्ये पीएचडी पदवी संपादन केली. १९७७ ते १९८९ दरम्यान मॉडर्न कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर १९८९ साली ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात रूजू झाले. त्यानंतर त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेडिरेकनरचे मायक्रो प्लॅनिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जमीन व सदनिकांचे बाजारमूल्य अधिक वास्तववादी करण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले असून, रेडिरेकनरच्या मायक्रो प्लॅनिंगसाठी पुणे महापालिकेसह बृहन्मुंबई आणि ठाणे महापालिकेतील प्रत्येकी एका गावाची पथदर्शी प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे. त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपातील पदांची निर्मिती करण्यात आली आहे.

रेडिरेकनरचा दर आणि व बाजारभाव यावरून सध्या गोंधळ निर्माण होत असल्याचे चित्र आहे. बाजारभावापेक्षा रेडिरेकनरचे दर काही भागांत अधिक असल्याच्या तक्रारी करण्यात येतात. त्यामुळे विनाकारण जादा मुद्रांक शुल्काचा भूर्दंड नागरिकांना सहन करावा लागतो. रेडिरेकनर ठरविण्याच्या सध्याच्या पद्धतीवर त्यामुळे आक्षेप घेण्यात येत आहेत. रेडिरेकनर ठरविताना महापालिका हद्दीतील एका ठिकाणी झालेला व्यवहार हा सार्वत्रिक लागू केला जातो. (उदा. कर्वेनगर येथील स्टेट बँक कॉलनीजवळ एखाद्या बिल्डरने जादा दराने विक्री केलेल्या सदनिकेचा दर प्रमाणभूत धरून त्यावर आधारित रेडिरेकनर ठरविला जातो.) प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती अनेकदा वेगळीच असते. विशिष्ट भागात झालेले खरेदी-विक्री व्यवहार हे लगतच्या सर्वच परिसराला लागू होत नाही. त्यामुळे रेडिरेकनरबद्दल मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत.

रेडिरेकनर ठरविताना मायक्रो प्लॅनिंग करण्याचा विचार गेल्या काही वर्षांपासून सुरू होता. सध्या मिळकत कर, प्राप्तिकर आकारणी, विकास शुल्क, शासकीय जमीनमूल्य निश्चिती अशा अनेक कारणांसाठी रेडिरेकनरचा आधार घेतला जातो. त्यासाठी रेडिरेकनर हा अधिक अचूक, वास्तववादी असावा अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार पुणे महापालिका, बृहन्मुंबई व ठाणे महापालिकेतील एका गावात पथदर्शी मायक्रो प्लॅनिंग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील दस्तनोंदणीमध्ये गेल्या काही वर्षांत झालेली मोठी वाढ, वेगाने होणारे नागरीकरण, झपाट्याने वाढणारी शहरे आणि त्याबरोबर येणारे प्रकल्प लक्षात घेता मायक्रो प्लॅनिंगसाठी कर्मचारी संख्या वाढविणे गरजेचे ठरले आहे. रेडिरेकनर हा मायक्रो पातळीवर करण्यासाठी राज्यस्तरीय कार्यालयात २२ पदे निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच या तिनही पालिकांमध्ये दोन वर्षांसाठी तात्पुरत्या स्वरूपात पंधरा पदे निर्माण केली जाणार आहेत.

महसूल वाढणार

रेडिरेकनर हा मायक्रो प्लॅनिंगद्वारे करण्याच्या प्रकल्पामुळे सॅटेलाइट इमॅजरी आणि भौगोलिक माहिती प्रणालीआधारे प्रत्येक मिळकतीचे गुणदोषावर अचूक दर प्रस्तावित करणे शक्य होणार आहे. मालमत्तेचे वास्तववादी मूल्यांकन झाल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी कमी होतील आणि पर्यायाने सरकारच्या महसुलातही वाढ होण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळी पाठ सोडेना

$
0
0

टीम मटा, पुणे

कोकण वगळता राज्याच्या बहुतांश भागाला शनिवारी पावसाने तडाखा दिला. काही भागत गारपीटही झाली. या पावसाच्या तडाख्याने मराठवाड्यासह नाशिक, कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुढील दोन दिवसात मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुण्यात हडपसरसह सासवडमध्येही पावसाने हजेरी लावली.

शनिवारी राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाने दमदार हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीटही झाली. सायंकाळी साडेपाचपर्यंत सांगली येथे २८ मिलिमीटर, सातारा येथे ०.९ मिमी, औरंगाबाद येथे ६ मिमी, परभणी येथे ०.२ मिमी तर बीड येथे २३ मिमी पावसाची नोंद झाली. अकोला येथे ४ मिमी पाऊस नोंदला गेला. सायंकाळनंतर अकोल्यासह विदर्भात काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस झाला.

राज्यात सध्या पश्चिमेकडून वाहणारे वारे वाहत आहेत. वायव्येकडे हवामानाच्या वरच्या थरात हवेची चक्राकार स्थिती आहे. दक्षिण गुजरात आणि लगतच्या भागातही हवेची चक्राकार स्थिती आहे. दक्षिण गुजरातपासून लक्षद्वीपपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्थानिक पातळीवर झालेल्या तापमानवाढीमुळे हवेतील बाष्प वाढून राज्यात गारांसह पाऊस होत आहे.

पुढील दोन ते तीन दिवस राज्यात अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पुढील दोन दिवसात राज्यात कोकण वगळता सर्वत्र पावसाची शक्यता आहे. विदर्भात पुढील चार दिवस गारांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

साताऱ्यातही पाऊस

कोल्हापूर, सांगली, सातारा, कराडसह पाटण तालुक्याला शनिवारी दुपारी वादळी वारा, वीजेच्या कडकडाटासह गारपीट व अवकाळी पावसाने झोडपून काढले. या दमदार वादळी पावसाने शहरासह तालुक्यात उसाची तोडणी बंद पडली आहे. विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सायंकाळनंतर अकोल्यासह अनेक भागात जोरदार पाऊस झाला.

नगर जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या

नगरः शेतीमध्ये डाळिंबांची छाटणी करतानाच आज शनिवारी दुपारी आलेल्या अवकाळी पावसाने होत असलेले डाळिंबाचे नुकसान पाहून शिवाजी आण्णा सूळ (वय ३२, वडगाव तनुरे, ता. कर्जत) या शेतकऱ्याने त्याच ठिकाणी विष घेऊन आत्महत्या केली.

बीडमध्ये एकाचा मृत्यू

शनिवारी औरंगाबाद, नांदेड, जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी पावसाने लावली. बीड जिल्ह्यात वीज पडल्याने एकाचा मृत्यू झाला, तर झाड पडल्याने १२ जण जखमी झाले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा कल्चर ‌क्लब’चा गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अभिरुची उंचावणारे भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम, विविध कार्यक्रमांत खास राखीव जागा, सेलिब्रेटींशी गप्पा मारण्याची, सिनेमाचा प्रीमिअर कलाकारांसोबत पाहण्याची संधी आणि बालसंगोपनापासून काँटिनेंटल फूडपर्यंत विविध विषयांवरील कार्यक्रम हे वैशिष्ट्य असलेल्या महाराष्ट्र टाइम्स पुणे आवृत्तीच्या 'कल्चर क्लब'चा गौरव करण्यात आला आहे.

माध्यम आणि जाहिरात क्षेत्रातील भारतीय ऑस्कर समजल्या जाणाऱ्या 'अॅबीज' पुरस्कार सोहळ्यात नुकताच या उपक्रमाला ब्राँझ पुरस्कार मिळाला. गोव्यात झालेल्या या सोहळ्यात टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपने प्रकाशक गटात चारपैकी तीन सुवर्ण पुरस्कारांसह एकूण सात पुरस्कारांवर मोहर उमटवली.

पुण्यात होणाऱ्या विविघ सांस्कृतिक घडामोडींचा आढावा घेत, सांस्कृतिक क्षितिजावर भरारी घेत अल्पावधीतच लोकप्रियता मिळविलेल्या 'मटा कल्चर क्लब'ला वाचकांनी आपलेसे केले आहे. मराठी माणसाची सांस्कृतिक भूक भागविण्याचे काम या उपक्रमाच्या माध्यमातून सातत्याने होते. या पुरस्कार सोहळ्यामध्ये माध्यमांच्या क्षेत्रासाठी ७४ पुरस्कार देण्यात आले. तर, प्रकाशन विभागात १७ पुरस्कार देण्यात आले.

टाइम्स ग्रुपचे अन्य पुरस्कार

टाइम्स ऑफ इंडियाच्या 'हॅपी स्ट्रीट' तसेच 'इंडिया सॅल्युट्स' या मोहिमांसाठी सुवर्ण, फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेसाठी केलेल्या 'सुपर स्पेशल पॅनोरमा'साठी 'बेस्ट ब्रँड इनोव्हेशन' रौप्य, तसेच 'राइज अप' या मोहिमेसाठी रौप्य.

मुंबई मिररला 'आय अॅम मुंबई' या मोहिमेसाठी सुवर्ण.

नवगुजरात समय या गुजराती वृत्तपत्राच्या 'व्हॉट्सअप रिपोर्टर'ला तंत्रज्ञानाच्या वृत्तपत्रासाठी वापरासाठीचे रौप्य.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रीन रेटिंगची नवीन पद्धत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बांधकाम प्रस्तावांमध्ये असलेली इको हाउसिंग पद्धत रद्द करून ग्रीन रेटिंगची नवीन पद्धत सुरू करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ग्रीन रेटिंगनुसार मुल्यांकन करणे बंधनकारक असून, त्यानुसार प्रिमियममध्ये सवलत देण्यात येणार आहे. गृह आणि स्वगृह संस्थेकडून हे मुल्यांकन केले जाणार आहे.

शहरात इको हाउसिंग संकल्पना राबविण्यासाठी विकास नियंत्रण नियमावलीत (डीसी रूल्स) रेन वॉटर हार्वेस्टिंग, गांडूळ खत प्रकल्प उभारणी करणे अशा एकूण ८८ बाबींचा समावेश होता. त्यातील २७ बाबींची पूर्तता करणे अनिवार्य होते; मात्र, या बाबींची पूर्तता केल्यास बांधकाम व्यवसायिकास वाढीव खर्च होतो असे कारण देत, इको हाउसिंग कार्यप्रणाली रद्द करून पर्यावरणपूरक बांधकामांना (ग्रीन बिल्डींग) हरित गुणांकन (ग्रीन रेटींग) देण्याची कार्यप्रणाली सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

गृह संस्थेकडून पर्यावरण पूरक बांधकामांना (ग्रीन बिल्डींग) एक ते पाच ग्रीन रेटींग देण्यात येणार आहे. स्टारच्या वर्गवारीनुसार प्रीमियममध्ये सवलत देण्यात येणार आहे. भारत सरकारच्या आदर्श, एमएनआरई आणि टेरी या संस्थांनी ग्रीन रेटींग पद्धत निश्‍चित केली आहे. त्यानुसार निवासी, औद्योगिक, शैक्षणिक, हॉस्पिटल्ससाठी ग्रीन रेटींगचे मूल्यांकन देण्यात येणार आहे. जाचक असलेल्या निकषांची संख्या कमी करण्यात आली आहे. मुल्यांकनानंतरच बांधकामांचे काम पूर्ण झाल्याचा दाखला (कम्प्लिशन सर्टीफिकेट) देण्यात येणार आहे.

दोन हजार ५०० चौरस मीटर आणि ५० हेक्टरपेक्षा कमी बांधकाम क्षेत्रांसाठींचे मूल्यांकन स्वगृह आणि गृह संस्थेकडून करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे, तर ५० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रांसाठी गृह एलडी या संस्थांकडून मूल्यांकन करता येणार आहे. ३ ते ५ स्टारनुसार महापालिकेने बांधकाम क्षेत्रातील जिना, बाल्कनी, लिफ्ट यामध्ये प्रीमियम सवलत देऊ केली आहे. स्थायी समितीने याला मान्यता दिल्याने अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव पालिकेच्या मुख्य सभेसमोर ठेवला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएचआर ठेवीदार हायकोर्टात जाणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बीएचआर संस्थेवर अवसायक नियुक्त करावा, या मागणीसाठी हायकोर्टात याचिका करण्याचा निर्णय बीएचआर ठेवीदार संयुक्त समन्वय समितीच्या बैठकीत रविवारी घेण्यात आला. राज्यभरातील शंभर प्रातिनिधीक ठेवीदारांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात येणार आहे.

संघटनेची बैठक रविवारी पुण्यात घेण्यात आली. राज्य अध्यक्ष विवेक ठाकरे, जिल्हा समन्वयक रवींद्र पावटेकर, राज्य संघटक दामोदर दाभाडे आदी या वेळी उपस्थित होते.

संस्थेच्या सीबीआय चौकशीसाठी वस्तुनिष्ठ अहवाल न पाठविल्यास दिल्लीत जंतरमंतर येथे पुन्हा उपोषण करण्याचा इशारा संघटनेमार्फत देण्यात आला आहे; तसेच घोले रोड शाखेतील सोळाशे कोटी रुपयांच्या बेनामी ठेवींच्या व्यवहाराप्रकरणी दोषींवर फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटकडे तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला. अकोला व पाचोरा येथील दाखल गुन्ह्यांमधील संशयित आरोपींच्या अटकपूर्व जामिनावर हरकत घेण्यासाठी कोर्टात अर्ज करण्यात येणार आहे. संस्थेला लेखापरीक्षणाचा सतत अ वर्ग दिल्याबद्दल लेखापरीक्षकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी आणि त्यांना काळ्या यादीत टाकण्यासाठी समितीच्या वतीने पाठपुरावा करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएमपी बस स्टॅण्डचा होणार शास्त्रीय अभ्यास

$
0
0

डॉ. श्रीकर परदेशींची माहिती; तज्ज्ञांच्या समितीची स्थापना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील पीएमपीच्या सर्व बस स्टॅण्डच्या भौगोलिक परिस्थितीचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला जाणार आहे. यामध्ये स्टॅण्डची भौगोलिक रचना, तेथील चढ-उतार यांची पाहणी केली जाणार आहे. त्यासाठी तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली असून, त्यामध्ये सीआयआरटी, एसटी महामंडळ आणि बेस्टमधील तज्ज्ञांचा समावेश आहे, अशी माहिती 'पीएमपी'चे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी कात्रज येथे पीएमपी बसचे ब्रेक डाऊन होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. कात्रज बस स्टॉपजवळ तीव्र उतार आहे; तसेच पीएमपी बसच्या ब्रेक डाऊनचे वाढते प्रमाण लक्षता घेत, हे प्रकार टाळण्यासाठी ते कशामुळे होतात, कोणत्या मार्गावर प्रमाण जास्त आहे, आदी गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला जाणार आहे, असे डॉ. परदेशी म्हणाले. सजग नागरिक मंचप्रणित पीएमपी प्रवासी मंचातर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी मंचाचे विवेक वेलणकर, जुगल राठी या वेळी उपस्थित होते.

पीएमपीच्या बस पार्किंगसाठी डेपो, सर्व्हिस स्टेशन यासाठी आवश्यक प्रमाणात जागा उपलब्ध नाही. रात्री रस्त्यावर बस उभ्या कराव्या लागतात. गाडीची ब्रेक तपासणी रस्त्यावरच करावी लागते. यामध्ये बसचे स्पेअर पार्टस्, डिझेल चोरीला जाते; तसेच गाड्यांची सर्व्हिसिंग वेळेत करण्यावर बंधने येतात. त्यामुळे बसच्या तुलनेत जागा उपलब्ध होण्याची गरज आहे. देशातील अन्य शहरांच्या तुलनेत पुण्यात या गोष्टींसाठी खूप कमी जागा उपलब्ध आहे, अशी खंत डॉ. परदेशी यांनी व्यक्त केली.

पुणे शहराला मेट्रो आवश्यक आहेच; मात्र मेट्रोसाठी लागणाऱ्या निधीच्या १० टक्के निधी पीएमपीसाठी मिळाल्यास ती सुस्थितीत येऊ शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दिवस गारपिटीची शक्यता

$
0
0

पुणे : शनिवारी कोकण वगळता राज्याच्या बहुतांश भागाला गारपिटीसह तडाखा दिलेल्या पावसाचा जोर रविवारी ओसरला. रविवारी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पुढील दोन दिवसात मराठवाड्यात काही तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राज्यात सध्या पश्चिमेकडून वाहणारे वारे वाहत आहेत. वायव्येकडे हवामानाच्या वरच्या थरात हवेची चक्राकार स्थिती आहे. दक्षिण गुजरात आणि लगतच्या भागातही हवेची चक्राकार स्थिती आहे. दक्षिण गुजरातपासून तामिळनाडूतील कॉमोरिनपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. मध्य महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमधून जात असलेल्या या क्षेत्राबरोबरच कॉमोरिन परिसरात हवेची चक्राकार स्थिती आहे. त्यामुळे हवेतील बाष्प वाढून राज्यात सध्या गारांसह पाऊस होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहनचालक बेशिस्तीच्या ट्रॅकवर

$
0
0

वाहतूक पोलिसांकडून यंदा तब्बल २० कोटींच्या दंडवसुलीचा अंदाज

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहर व परिसरातील वाहतुकीचा बोजवारा उडत असतानाच पुणेकर वाहनचालक बेशिस्तीच्या ट्रॅकवर भरधाव आहेत. गेल्या वर्षी १३ कोटी रुपयांचा दंड भरलेल्या पुणेकरांकडून यंदा वाहतूक पोलिस तब्बल २० कोटी रुपयांची वसुली करतील, असा अंदाज आहे. विशेष म्हणजे, घोळक्याने 'सावज' टिपून एवढी 'अर्थ'पूर्ण कारवाई करूनही अपघात रोखण्याच्या आणि वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आघाडीवर मात्र पोलिसांना अपयशच येत आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात परिवहन विभागामार्फत नोंदवल्या गेलेल्या वाहनांची संख्या ४० लाखांहून अधिक आहे. त्यामध्ये २८ लाख दुचाकींचा समावेश आहे. सक्षम सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेअभावी पुण्यातील रस्त्यांवर हजारोंच्या संख्येने नवीन वाहनांची भर पडत आहे. अशा परिस्थितीत कारवाईसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या तिजोरीत भर पडते आहे. पोलिसांकडून सर्वाधिक कारवाई दुचाकीस्वारांवरच केली जात आहे. सिग्नल तोडणे, नो-पार्किंगमधील कारवाई, हेल्मेट न वापरणे, ट्रिपल सीट जाणे, नो-एंट्रीमधून वाहने चालवणे, हे नियम मोडण्यात दुचाकीस्वारच अग्रेसर असल्याचे वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

यंदा २० कोटींचा टप्पा ओलांडणार

वाहतूक पोलिसांकडून गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दर दिवशी तिप्पट केसेस दाखल करण्यात येत आहे. त्यामुळे दंडाची रक्कमही मोठ्या प्रमाणात जमा होत आहे. वाहतूक पोलिसांकडून कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने मध्य पेठांमधील प्राणांतिक आणि गंभीर अपघातांची संख्या कमी झाली आहे; परंतु उपनगरांमधून जाणाऱ्या महामार्गावरील अपघातांची तीव्रता मात्र कायम आहे. त्या ठिकाणी कठोर कारवाईची गरज व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरज दंडात्मक कारवाईची

$
0
0

गरीब पेशंटना सवलतीबाबत धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाचे स्वागत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील धर्मादाय हॉस्पिटलकडून उत्पन्नाच्या दोन टक्के रक्कम गरिबांवर खर्च केली जात असली तरी मात्र पेशंटवर 'उपकार' करीत असल्याची अनेक हॉस्पिटलची भावना आहे. अन्य पेशंटना दिली जाणारी भेदभावाची वागणूक, त्यांच्याकडून होणारी नफेखोरी याबाबत कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळेच, धर्मादाय आयुक्तांच्या तपासणीच्या आदेशानंतर आता परिस्थितीत सुधारणा होईल, अशी आशा आहे.

'शहरातील धर्मादाय हॉस्पिटलकडून विविध प्रकारे नफेखोरी केली जाते. त्यातील दोन टक्के निधी हा गरिबांवर खर्च करताना आम्ही गरीब पेशंटवर 'उपकार' करीत असल्याची हॉस्पिटल भूमिका घेत आहेत. काही बड्या हॉस्पिटलसंदर्भात कारवाई करताना संबंधित यंत्रणांकडून हात आखडता घेतला जातो,' अशा आरोप आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्ते करीत आहेत.

अनेक मध्यम स्वरूपाच्या छोट्या हॉस्पिटलकडून उपलब्ध निधीपेक्षा मोठ्या प्रमाणात गरीब पेशंटवर उपचार केले जातात. अशा काही निवडक हॉस्पिटलकडून 'अतिरिक्त पेशंटची मोजदाद का होत नाही', असा सवाल केला जातो. त्या वेळी 'अतिरिक्त पेशंटवर केलेल्या उपचाराची मोजदाद ही तुमच्या हौसेखातर केलेली आहे', अशा भाषेत उत्तरे दिली जात आहेत. यावरून केवळ बड्या हॉस्पिटलनाच अभय देण्याचा प्रकार असल्याचे दिसते, असा दावा छोट्या-मध्यम हॉस्पिटलकडून केला जात आहे.

मोफत उपचारासाठी खोटे दाखले?

मोफत व सवलतीचे उपचार घेण्यासाठी अनेक पेशंट उत्पन्नाचे खोटे दाखले पुरावे म्हणून सादर करीत आहेत. पेशंटच्या नातेवाइकांकडे पाहता ते गरीब नसल्याचा शंका हॉस्पिटल प्रशासनाला येते. त्यावर पेशंटला उपचार देत असताना प्रशासनाकडून परस्पर पेशंटच्या घरी जाऊन त्यांच्या राहणीमानासह मालमत्तेची चौकशी करण्यात येते. त्या वेळी पेशंटच्या कौटुंबिक परिस्थिती ही अत्यंत सधन असते. वास्तविक, बंगल्यासह चारचाकी वाहने पेशंटकडे असल्याचे हॉस्पिटलच्या निदर्शनास आले आहे. यावरून केवळ ४८ हजार रुपये उत्पन्न कागदावर दाखवून मोफत उपचारासाठी हॉस्पिटलची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार होत असल्याचे हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.
............

गरजू व गरीब पेशंटनाच मोफत उपचाराचा लाभ मिळावा, अशी आमची भूमिका आहे. मात्र, अनेक पेशंट गरीब नसतानाही खोट्या कागदपत्रांच्या आधारे उपचार मिळविण्याचा प्रयत्न करतात. प्रत्यक्षात चौकशी केली असता कौटुंबिक स्थिती चांगली असल्याचे निदर्शनास आले. अशा खोट्या कागदपत्रांच्या पुराव्याबाबत शहानिशा व्हायला हवी. यासाठी धर्मादाय आयुक्तालयाची स्वतंत्र यंत्रणा असावी.
- डॉ. मनीषा बोबडे, वैद्यकीय संचालक जहांगीर हॉस्पिटल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अक्षयतृतीये’ला आंबा खाणार ‘भाव’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अवकाळी पावसाचा रत्नागिरी, देवगड येथील आंब्याला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. मात्र येत्या २० एप्रिलपर्यंत आवक वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत असली तरी 'अक्षयतृतीये'ला कोकणचा राजा मात्र 'भाव' खाणार आहे.

फेब्रुवारी - मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपिटीचा चांगलाच फटका आंब्याला बसला. त्यामुळे आंब्याचे उत्पादन कमी येण्याची शक्यता वर्तविण्यात आली. उपलब्ध आंबा उत्पादकांकडून पुण्याच्या बाजारपेठेत पाठविण्यात येत आहे. मात्र, फटका बसल्याने आवक कमी होते आहे. त्यात आंबा पिकविण्यासाठी पूर्वीची 'कॅल्शिअम कार्बाइड' वापरण्यास अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मनाई केली आहे. तसेच आंबा पिकविण्यासाठी रायपनिंग चेंबरची सुविधा उपलब्ध नाही. परिणामी आंबा पिकविणे व्यापाऱ्यांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत आंब्याचे भाव चांगलेच वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आंब्याची चव चाखण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

'अक्षयतृतीया जवळ आली असली, तरी आंब्याची अद्याप फारशी आवक झाली नाही. रत्नागिरीहून रविवारी अडीच ते तीन हजार पेटींची आवक झाली. हलक्या मालाच्या दरात १०० ते २०० रुपयांची घट झाली आहे. ४ ते ५ डझनाच्या पेटीला २,५०० ते ३,००० रुपये दर मिळाला आहे. तर मोठ्या भरणीच्या ८ ते ९ डझनाच्या पेटीला ४ ते ४५०० रुपये दर मिळाला आहे. कच्च्या आंब्याचे दर घटण्याची शक्यता आहे. तयार मालाचे भाव घटणार नाहीत. आवक कमी असली तरी २० एप्रिलपर्यंत आवक वाढेल. परंतु, अक्षयतृतीयेला आंब्याचे दर वाढलेलेच राहतील', अशी माहिती आंब्याचे व्यापारी करण जाधव यांनी दिली. अक्षयतृतीयेसाठी डझनासाठी सहाशे रुपये मोजावे लागेल. मुंबई, अहमदाबाद येथे रविवारी बाजार बंद असल्याने पुण्यात आवक वाढली, असेही त्यांनी सांगितले.

कॅल्शिअम कार्बाइडचा वापर करून आंबा पिकविला, तर ७ ते ८ दिवसात आंबा तयार होतो. आता मनाई असल्याने आंबा तयार होण्यासठी १२ ते १५ दिवसांचा अवधी लागत आहे. येत्या दोन तीन दिवसांत आवक वाढली तरी आंबा तयार होण्यास ८ ते १० दिवस लागतील. त्यामुळे अक्षयतृतीयेला तयार आंबा कमी प्रमाणात उपलब्ध असेल. त्यामुळे अक्षयतृतीयेला भाव वाढलेलेच असतील, असे युवराज काची यांनी सांगितले.
.......

यंदाच्या हंगामात रत्नागिरीहून आंब्याची फारशी आवक वाढण्याची शक्यता नाही. अक्षयतृतीयेसाठी ग्राहक आंबा खरेदी करतात. मर्यादित प्रमाणात आंबा उपलब्ध असल्याने भाव टिकून राहतील. आवक घटल्यास दर वाढू शकतात. मात्र, आवक वाढण्याची शक्यता नाही.
- शिवलाल भोसले, अध्यक्ष, आडते असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दिवसात पावसाची शक्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहर आणि परिसरात रविवारी अंशतः ढगाळ वातावरण असले, तरी पावसाने हजेरी लावली नाही. पुढील दोन दिवस शहरात हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे, तर शहरात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शहराच्या काही भागात शनिवारी हलका पाऊस झाला. हडपसर, कात्रज परिसरात तुरळक गारांसह पाऊस झाला होता. रविवारी मात्र, शहरात अंशतः ढगाळ वातावरण होते. मात्र, शनिवारच्या तुलनेत तापमानात घट झाल्याने हवेतील गारवा वाढला. रविवारी शहरात ३४.२ अंश सेल्सिअस इतके कमाल, तर १९.१ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले.

पुढील दोन दिवस शहरात हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर तापमानातही किंचित घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अण्णांची ‘किसान की बात’

$
0
0

नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमास प्रत्युत्तर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमास प्रत्युत्तर म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 'किसान की बात' हा कार्यक्रम हाती घेणार आहेत. भूमी अधिग्रहण कायद्यावरून देशव्यापी आंदोलन पुकारण्याची घोषणा हजारे यांनी रविवारी केली. यासाठी लवकरच देशाचा दौरा करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

केंद्र सरकारच्या नव्या भूमी अधिग्रहण कायद्यातील शेतकरीविरोधी तरतुदींच्या विरोधात हजारे यांनी देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याच्या तयारीसाठी हजारे यांनी विविध राज्यांमधील संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक पुण्यात घेतली. या वेळी सुमारे दीडशे प्रतिनिधी उपस्थित होते. विश्वंभर चौधरी, विक्रांत पाटील, स्वामी मृत्युंजय महाराज आदींचा त्यामध्ये समावेश होता. केंद्र सरकारने भूमी अधिग्रहण कायद्याबाबत पुन्हा वटहुकूम काढला असून, पूर्वीच्या तरतुदी यामध्येही कायम आहेत. हा वटहुकूम शेतकऱ्यांच्या हिताविरूद्ध असल्याने याविरोधात तीव्र लढा पुकारण्याचा इशारा हजारे यांनी या वेळी दिला.

'केंद्र सरकारने या कायद्याने खासगी संस्थांनाही जमिनी संपादित करण्याची मोकळीक दिली आहे. कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठीच हे सुरू असून त्यावर देशव्यापी चर्चेची गरज आहे, असे ते म्हणाले. शेतकरी हा देशाचा मालक असून सरकार सेवक आहे, पण हे सरकार मालकालाच विकायला निघाले आहे,' असे टीकास्त्र त्यांनी सोडले.

देशव्यापी आंदोलनाच्या तयारीसाठी आपण लवकरच देशाचा दौरा करणार आहोत. दिल्लीत बैठक घेऊन त्यामध्ये आंदोलनाचे नियोजन करण्यात येईल. उपोषण, मोर्चा, जेलभरो अशा मार्गांनी आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचे हजारे यांनी सांगितले.

'शेतकऱ्यांची जमीन संपादित करताना त्या शेतकऱ्यांची मान्यता आवश्यक असून ग्रामसभेत त्याबाबत निर्णय झाला पाहिजे; तसेच जमिनीचे वर्गीकरण करून सुपीक जमिनी उद्योगांना देण्यास आपला विरोध आहे,' असे ते म्हणाले. या संदर्भात आपण पंतप्रधान मोदी यांना पत्रही लिहिले. मात्र, त्याला मोदींकडून उत्तर आले नाही, असे हजारे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>