Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

उपचारासाठी वशिल्याचा आधार

$
0
0

निधी असूनही पेशंट नाकारण्याकडे कल

>> मुस्तफा आतार, पुणे

उत्पन्नाच्या निकषानुसार मोफत उपचारास पात्र असूनही प्रत्यक्षात निधी अथवा अन्य कारणे सांगून पेशंटना नाकारण्याचे प्रकार खासगी हॉस्पिटलकडून होत आहेत. अखेर एखाद्याच्या ओळखीने धर्मादाय आयुक्तालयांकडे 'धाव' घेऊन सहायक आयुक्तांकडे 'वशिला' लावावा लागतो. त्यानंतर उपचाराची सुविधा पदरात पाडून घेण्याचा अनेकांना प्रयत्न करावा लागत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

धर्मादाय हॉस्पिटलमधून अनेक पेशंटना मोफत तसेच सवलतीचे उपचार देण्यासंदर्भात टाळाटाळ केली जात आहे. तसेच निधी संपल्याचे कारण पुढे केले जात आहे. त्यामुळे गरजू, गरीब पेशंटना उपचार नाकारले जात असल्याच्या तक्रारी धर्मादाय आयुक्तालयाकडे आल्या आहेत. त्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही प्रातिनिधीक स्वरुपातील हॉस्पिटलच्या मोफत योजनेतील लाभार्थींचा 'मटा'ने आढावा घेतला.

धर्मादाय आयुक्तालयाच्या योजनेनुसार वार्षिक उत्पन्न ५० हजार अथवा एक लाख रुपये असणे अपेक्षित आहे. या निकषानुसार काहींना मोफत तर, काहींना सवलतीच्या दरात उपचार मिळतात. त्यासाठी राज्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगर आदी जिल्ह्यांतून अनेक गरीब पेशंट पुण्यातील खासगी हॉस्पिटलकडे धाव घेतात. दूरवरून येणारे अनेक पेशंट गरिबी अथवा दारिद्रय रेषेखाली असल्याचे पुरावे सादर करतात. एखाद्याचा आजार दुर्धर असेल तर त्यासाठी अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. त्यामुळे अशा पेशंटना काही तरी कारण अथवा निधी संपल्याचे कारण दाखवून परत पाठविले जाते. पेशंटना नाकारण्यामागे प्रत्यक्षात त्यांच्या आजाराचा वाढणारा खर्च हे कारण असल्याचे खासगीत काही जण सांगतात. अशा वेळी पेशंटना थेट धर्मादाय आयुक्तालयाकडे धाव घ्यावी लागत आहे. तेथे तक्रार करताच सहायक धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप यांना उपचार देण्याचे आदेश संबंधित हॉस्पिटललला द्यावे लागतात. अखेर पेशंटना 'वशिलेबाजी' केल्याशिवाय खासगी हॉस्पिटल जुमानत नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मान्सूनसाठी धोक्याची घंटा!

$
0
0

अमेरिकेच्या 'नोआ' संस्थेचा अंदाज; 'एल निनो'चा प्रभाव

मयुरेश प्रभुणे, पुणे

यंदाच्या मोसमी पावसासाठी धोक्याचा इशारा देणारा अंदाज गुरुवारी अमेरिकेच्या नैशनल ओशनिक अँड एटमोस्फेरिक एडमिनिस्ट्रेशन (नोआ) या संस्थेने जाहीर केला. सध्या पॅसिफिक महासागरामध्ये 'एल निनो' सक्रिय असून, ही स्थिती संपूर्ण मान्सूनच्या हंगामात कायम राहणार असल्याचे 'नोआ'ने म्हटले आहे. या अंदाजामुळे यंदाचा मान्सून सरासरी गाठणे अवघड असल्याचे हवामानशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

गारपीट आणि अवकाळी पावसाने आधीच पिचलेल्या शेतकऱ्यासाठी येणारा हंगामही खडतर राहण्याचे संकेत या अंदाजाने दिले आहेत. 'नोआ' या संस्थेने जारी केलेल्या अंदाजानुसार, 'पॅसिफिक महासागराच्या पश्चिम, मध्य आणि पूर्व भागांत समुद्रपृष्ठाचे तापमान सरासरीच्यावर नोंदले जात असून, ही स्थिती एल निनोचीच असल्याचे स्पष्ट आहे. जगभरातील बहुतेक मॉडेलने दाखवल्याप्रमाणे उत्तर गोलार्धात सबंध उन्हाळ्यात (सप्टेंबरपर्यंत) एल निनोची स्थिती कायम राहण्याची शक्यता ७० टक्के असून, ही स्थिती त्याही पुढे नोव्हेंबरपर्यंत कायम राहण्याची शक्यता ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.'

यंदाच्या सबंध मान्सून हंगामावर एल निनोची छाया राहणार असल्याचे या अंदाजातून स्पष्ट होत आहे. ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार, 'मान्सूनवर प्रभाव टाकणारा एक महत्त्वाचा घटक यंदा प्रतिकूल असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. 'इंडियन ओशन डायपोल' (आयओडी) हा घटक आता कसा राहतो यावर मान्सूनचे भवितव्य अवलंबून असेल. मात्र, एल निनो सक्रिय असताना मान्सूनच्या आगमनात अनेकदा अडथळे निर्माण होणे, जून कोरडा जाणे असे अनुभव गेल्या काही 'एल निनो'च्या वर्षी आले आहेत. त्यामुळे बहुतेक वेळा एल निनो हा मान्सूनसाठी धोक्याची घंटाच ठरला आहे.''

भारतीय हवामानशास्त्र विभागाचा (आयएमडी) मान्सूनचा पहिला दीर्घकालीन अंदाज पुढील आठवड्यात अपेक्षित असून, 'नोआ'च्या अंदाजामुळे आता सर्वांच्या नजरा 'आयएमडी'च्या अंदाजावर खिळलेल्या आहेत.

गारपीट हा इशारा?

जानेवारीपासून महाराष्ट्रासह मध्य आणि उत्तर भारतात येणारे लहरी हवामानाचे अनुभव हे 'एल निनो'च्या स्थितीचे दर्शकच आहेत की काय, असा अभ्यास हवामानशास्त्रज्ञ करीत आहेत. गेल्या वर्षीही मान्सूनपूर्व हंगामात गारपीट, अवकाळी पावसाच्या सत्रांनी हजेरी लावली होती. त्या वेळीही प्रशांत महासागराचे तापमान सरासरीच्या वर नोंदले जात होते. एक प्रकारे फेब्रुवारी ते एप्रिल काळात येणारी गारपीट मान्सूनसाठी धोक्याची घंटा ठरते असे प्राथमिक निरीक्षण हवामानशास्त्रज्ञ नोंदवत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात आजही पावसाची शक्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी गुरुवारी तापमानात वाढ झाली. स्थानिक पातळीवर वाढलेल्या तापमानामुळे शहरात काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला, तर राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी संपूर्ण राज्यात हलक्या पावसाची, तर शहरात दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे, तर कोकणचा उत्तर भाग ते गुजरातदरम्यान वातावरणाच्या वरच्या थरात हवेची चक्राकार स्थिती आहे. तसेच स्थानिक पातळीवर वाढलेल्या तापमानामुळे हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढून हा पाऊस होत आहे.

शहरात गुरुवारी ३८.१ अंश सेल्सिअस इतके कमाल, तर २० अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. कमाल तापमानात वाढ झाल्याने दुपारी शहरात मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत होता. किमान तापमानाने विशी गाठल्याने सायंकाळनंतरही हवेतील उकाडा कायम होता. दुपारनंतर शहराच्या काही भागात अंधारून आले, तर काही ठिकाणी अत्यंत हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला.

पुढील दोन दिवस संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज दरवाढीविरोधात ४००० पुणेकर

$
0
0

वीजदर प्रस्तावावर आज पुण्यात सुनावणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विविध स्तरांतील चार हजार पुणेकरांनी प्रस्तावित वीज दरवाढीला विरोध दर्शविला आहे. महावितरणने सादर केलेल्या वीज दरवाढीच्या प्रस्तावावर आज (शुक्रवारी) पुण्यात जाहीर सुनावणी होणार आहे.

सर्वसामान्य ग्राहक, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांवर सुमारे बारा टक्के दरवाढ लादणारा वीजदरवाढीचा प्रस्ताव महावितरणने राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. आयोगाच्यावतीने शुक्रवारी​ सकाळी अकरा वाजता विभागीय आयुक्तांच्या कार्यालयातील सभागृहात जाहीर सुनावणी घेण्यात येणार आहे. दरम्यान, या दरवाढीला विरोध करण्यासाठी सजग नागरिक मंचाने शहरात सह्यांची मोहीम घेतली होती. त्यामध्ये चार हजार पुणेकरांनी सह्या करून निषेध नोंदवला आहे, अशी माहिती 'मंचा'च्या विवेक वेलणकर यांनी कळविली आहे.

प्रामुख्याने वीजदरांमधील स्थिर आकारामध्ये वाढ करण्यास ग्राहक प्रतिनिधींनी आक्षेप घेतला आहे. या आकारातील वाढ अन्यायकारक असून, त्यामुळे ग्राहकांना मोठा फटका बसेल असेही यामध्ये म्हटले आहे. तसेच सार्वजनिक पाणीपुरवठा योजना आणि रस्त्यांवरील दिव्यांच्या वीजदरांमध्येही मोठी वाढ सुचविण्यात आली आहे. त्याचा भार महापालिकांचे करदाते, म्हणजे पुन्हा ग्राहकांवरच पडेल आणि त्यांना दुहेरी दरवाढ लागू होईल, असा आक्षेप घेण्यात आला आहे.

दरम्यान, वीजपुरवठ्यातील गळती आणि चोरी कमी करण्यासाठी महावितरणने पुरेशी पावले उचललेली नाहीत, असा आक्षेपही घेण्यात आला आहे. त्यामुळे महावितरणच्या अकार्यक्षमतेचा भार दरवाढीच्या रुपाने नागरिकांवर पडत आहे. त्यामुळे या दरवाढीला मान्यता देऊ नये, अशी मागणी आयोगाकडे करण्यात आली आहे. तसेच, अनेक शेतीपंपांना विनामीटर वीजपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे त्यापोटी होणारा नेमका तोटा समोर येण्यासाठी त्याचे स्वतंत्र यंत्रणेमार्फत ऑडिट करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. या सुनावणीमध्ये सहभागी होऊन वीजदरांच्या प्रस्तावावर आपले मत मांडण्यासाठी नागरिक, स्वयंसेवी संस्था, उद्योग, राजकीय पक्ष-संघटनांना संधी देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपचारासाठी वशिल्याचा आधार

$
0
0

निधी असूनही पेशंट नाकारण्याकडे कल

>> मुस्तफा आतार, पुणे

उत्पन्नाच्या निकषानुसार मोफत उपचारास पात्र असूनही प्रत्यक्षात निधी अथवा अन्य कारणे सांगून पेशंटना नाकारण्याचे प्रकार खासगी हॉस्पिटलकडून होत आहेत. अखेर एखाद्याच्या ओळखीने धर्मादाय आयुक्तालयांकडे 'धाव' घेऊन सहायक आयुक्तांकडे 'वशिला' लावावा लागतो. त्यानंतर उपचाराची सुविधा पदरात पाडून घेण्याचा अनेकांना प्रयत्न करावा लागत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

धर्मादाय हॉस्पिटलमधून अनेक पेशंटना मोफत तसेच सवलतीचे उपचार देण्यासंदर्भात टाळाटाळ केली जात आहे. तसेच निधी संपल्याचे कारण पुढे केले जात आहे. त्यामुळे गरजू, गरीब पेशंटना उपचार नाकारले जात असल्याच्या तक्रारी धर्मादाय आयुक्तालयाकडे आल्या आहेत. त्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही प्रातिनिधीक स्वरुपातील हॉस्पिटलच्या मोफत योजनेतील लाभार्थींचा 'मटा'ने आढावा घेतला.

धर्मादाय आयुक्तालयाच्या योजनेनुसार वार्षिक उत्पन्न ५० हजार अथवा एक लाख रुपये असणे अपेक्षित आहे. या निकषानुसार काहींना मोफत तर, काहींना सवलतीच्या दरात उपचार मिळतात. त्यासाठी राज्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगर आदी जिल्ह्यांतून अनेक गरीब पेशंट पुण्यातील खासगी हॉस्पिटलकडे धाव घेतात. दूरवरून येणारे अनेक पेशंट गरिबी अथवा दारिद्रय रेषेखाली असल्याचे पुरावे सादर करतात. एखाद्याचा आजार दुर्धर असेल तर त्यासाठी अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. त्यामुळे अशा पेशंटना काही तरी कारण अथवा निधी संपल्याचे कारण दाखवून परत पाठविले जाते. पेशंटना नाकारण्यामागे प्रत्यक्षात त्यांच्या आजाराचा वाढणारा खर्च हे कारण असल्याचे खासगीत काही जण सांगतात. अशा वेळी पेशंटना थेट धर्मादाय आयुक्तालयाकडे धाव घ्यावी लागत आहे. तेथे तक्रार करताच सहायक धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप यांना उपचार देण्याचे आदेश संबंधित हॉस्पिटललला द्यावे लागतात. अखेर पेशंटना 'वशिलेबाजी' केल्याशिवाय खासगी हॉस्पिटल जुमानत नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सूनसाठी धोक्याची घंटा!

$
0
0

अमेरिकेच्या 'नोआ' संस्थेचा अंदाज; 'एल निनो'चा प्रभाव

मयुरेश प्रभुणे, पुणे

यंदाच्या मोसमी पावसासाठी धोक्याचा इशारा देणारा अंदाज गुरुवारी अमेरिकेच्या नैशनल ओशनिक अँड एटमोस्फेरिक एडमिनिस्ट्रेशन (नोआ) या संस्थेने जाहीर केला. सध्या पॅसिफिक महासागरामध्ये 'एल निनो' सक्रिय असून, ही स्थिती संपूर्ण मान्सूनच्या हंगामात कायम राहणार असल्याचे 'नोआ'ने म्हटले आहे. या अंदाजामुळे यंदाचा मान्सून सरासरी गाठणे अवघड असल्याचे हवामानशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

गारपीट आणि अवकाळी पावसाने आधीच पिचलेल्या शेतकऱ्यासाठी येणारा हंगामही खडतर राहण्याचे संकेत या अंदाजाने दिले आहेत. 'नोआ' या संस्थेने जारी केलेल्या अंदाजानुसार, 'पॅसिफिक महासागराच्या पश्चिम, मध्य आणि पूर्व भागांत समुद्रपृष्ठाचे तापमान सरासरीच्यावर नोंदले जात असून, ही स्थिती एल निनोचीच असल्याचे स्पष्ट आहे. जगभरातील बहुतेक मॉडेलने दाखवल्याप्रमाणे उत्तर गोलार्धात सबंध उन्हाळ्यात (सप्टेंबरपर्यंत) एल निनोची स्थिती कायम राहण्याची शक्यता ७० टक्के असून, ही स्थिती त्याही पुढे नोव्हेंबरपर्यंत कायम राहण्याची शक्यता ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.'

यंदाच्या सबंध मान्सून हंगामावर एल निनोची छाया राहणार असल्याचे या अंदाजातून स्पष्ट होत आहे. ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार, 'मान्सूनवर प्रभाव टाकणारा एक महत्त्वाचा घटक यंदा प्रतिकूल असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. 'इंडियन ओशन डायपोल' (आयओडी) हा घटक आता कसा राहतो यावर मान्सूनचे भवितव्य अवलंबून असेल. मात्र, एल निनो सक्रिय असताना मान्सूनच्या आगमनात अनेकदा अडथळे निर्माण होणे, जून कोरडा जाणे असे अनुभव गेल्या काही 'एल निनो'च्या वर्षी आले आहेत. त्यामुळे बहुतेक वेळा एल निनो हा मान्सूनसाठी धोक्याची घंटाच ठरला आहे.''

भारतीय हवामानशास्त्र विभागाचा (आयएमडी) मान्सूनचा पहिला दीर्घकालीन अंदाज पुढील आठवड्यात अपेक्षित असून, 'नोआ'च्या अंदाजामुळे आता सर्वांच्या नजरा 'आयएमडी'च्या अंदाजावर खिळलेल्या आहेत.

गारपीट हा इशारा?

जानेवारीपासून महाराष्ट्रासह मध्य आणि उत्तर भारतात येणारे लहरी हवामानाचे अनुभव हे 'एल निनो'च्या स्थितीचे दर्शकच आहेत की काय, असा अभ्यास हवामानशास्त्रज्ञ करीत आहेत. गेल्या वर्षीही मान्सूनपूर्व हंगामात गारपीट, अवकाळी पावसाच्या सत्रांनी हजेरी लावली होती. त्या वेळीही प्रशांत महासागराचे तापमान सरासरीच्या वर नोंदले जात होते. एक प्रकारे फेब्रुवारी ते एप्रिल काळात येणारी गारपीट मान्सूनसाठी धोक्याची घंटा ठरते असे प्राथमिक निरीक्षण हवामानशास्त्रज्ञ नोंदवत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. आंबेडकरांचे मूळगाव दत्तक घेणार

$
0
0

खासदार अमर साबळे यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंबावडे हे गाव दत्तक घेणार असल्याची माहिती राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच नागपूरजवळील बाबासाहेबांच्या वस्तू संग्रहालयासाठी ५० लाखांचा निधी देणार असल्याची माहितीही या वेळी त्यांनी दिली.

बाबासाहेबांचे मूळगाव दत्तक घेऊन विकसित करण्याचा निर्धार त्यांनी या वेळी व्यक्त केला. तसेच नागपूरजवळील बाबासाहेबांच्या वस्तू संग्रहालयासाठी खासदार निधीतून ५० लाख रुपये उपलब्ध करून देणार असल्याची माहिती साबळे यांनी दिली. त्याचबरोबर हिंदुस्थान अँन्टिबायोटिक्स कंपनीच्या कामगारांचा प्रश्नाचा पाठपुरावा सुरू आहे. रेडझोनचा प्रश्न सोडविला जाणार आहे. तसेच स्वच्छ भारत अभियानाअंतर्गंत पिंपरी-चिंचवड शहरातील २२ झोपडपट्ट्यांमध्ये २५ हजार स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहेत. शहरात भाजपचा महापौर व्हावा, यासाठी सर्वजण एकत्रित काम करणार असल्याचा त्यांनी पुर्नउच्चार केला. अमर साबळे यांच्याबरोबरच भाजपचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांनी आमदार जगताप यांच्या नेतृत्वाला पक्षात कोणाचाही विरोध नाही. त्यांचे नेतृत्व शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांना मान्य असल्याचे खाडे यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घायवळ टोळीतील तेरा गुंड तडीपार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मारणे आणि घायवळ टोळीत सुरू असलेल्या टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर घायवळ टोळीतील तेरा गुंडांना पुणे शहर आणि जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त एम. बी. तांबडे यांनी ही कारवाई केली.

तडीपार करण्यात आलेल्या गुंडांवर खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, खंडणी, दरोडा, बेकायदा हत्यारे बाळगणे, धमकी देणे, जबरी चोरी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती तांबडे यांनी दिली. ज्ञानेश्वर दगडू तोंडे (वय २६, रा. मु.पो. खेचरे, ता. मुळशी), विजय उर्फ उज्ज्वल मारुती चौधरी (वय ३५, रा. हनुमान नगर, केळेवाडी, कोथरूड), पंकज राम फाटक (वय १९, रा. शास्त्रीनगर), मंगेश भगवान कोंढाळकर (वय २५, रा. शास्त्रीनगर), योगेश तुकाराम सांबरे (वय ३०, रा. गुजरात कॉलनी, कोथरूड), विक्रांत चंद्रकांत कोकाटे (वय २९, रा. शास्त्रीनगर), संजय बबन सकट (वय २९, रा. गुजरात कॉलनी, कोथरूड), रमेश भास्कर राऊत (वय ३२, रा. शास्त्रीनगर, कोथरूड), सचिन बन्सीलाल घायवळ (वय ३३, रा. शास्त्रीनगर, कोथरूड), उमेश उर्फ दादा मोहन किरवे (वय ३१, रा. शास्त्रीनगर, कोथरूड), नीलेश हरिशंकर शर्मा (वय २५, रा. कोथरूड), रूपेश किसन अमराळे (वय २५, रा. शास्त्रीनगर, कोथरूड), दीपक रमेश आमले (वय २५, रा. कोथरूड) अशी गुंडांची नावे आहेत.

या पूर्वी मारणे टोळीतील गुंडांविरुद्ध तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. तत्कालीन राज्य सरकारने कारवाईला स्थगिती दिल्यानंतर त्यावर कडाडून टीका झाली. दोन्ही टोळ्यांतील टोळीयुद्ध भडकल्यानंतर पौड आणि नवी पेठेत खुनाचे दोन गुन्हे घडले. सरकारकडून ही गुन्हेगारी चिरडण्याचे आदेश दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई सुरू झाली होती. मारणे टोळीने केलेल्या दोन खुनाच्या गुन्ह्यांना 'मोका' लावण्यात आला आहे, तर घायवळ टोळीतील सदस्यांना तडीपार करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहा सोनसाखळी चोरट्यांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांना तसेच घरात जाऊन विविध कारणांनी महिलांचे लक्ष विचलित करून सोनसाखळी-मंगळसूत्र हिसकावणाऱ्या सहा चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून साडे आठ लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तसेच, या चोरट्यांना मदत करणारा आणि सोने विकत घेणाऱ्या सराफांना देखील अटक करण्यात आली आहे.

नितीन भास्कर कानवडे (वय २३, रा. नाशिक), राजू वसंत गिरी (३०, रा. पेरणेफाटा, पुणे), विशाल विनोद हेगनेश्वर (३२, रा. थेरगाव), सुरेश मारुती आचनेटी (२५, रा. थेरगाव) असे अटक करण्यात आलेल्या चोरांचे नाव आहे. त्यांना मदत केल्याप्रकरणी सराफ ज्ञानेश्वर श्रीराम शहाणे (३६, रा. शिक्रापूर) व कारागीर मनोज गोपाळ शिंदे (३२, रा. थेरगाव) यांना अटक करण्यात आली आहे.

सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ होऊ लागल्याने या प्रकरणात कारागृहातून सुटलेल्या चोरट्यांच्या हालचालींवर लक्ष केंद्रीत केले होते. त्यावेळेस एकजण पेरणेफाटा येथे असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून शनिवारी (५ एप्रिल) राजू गिरी याला अटक करण्यात आली. त्याला पोलिसीखाक्या दाखवताच त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या इतर तीन साथीदारांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात आली. तसेच, चोरीचे दागिने विकत घेणारा सराफ ज्ञानेश्वर शहाणे व त्यांना मदत करणारा कारागीर मनोज शिंदे याला अटक करण्यात आली आहे. शिंदे हा सोने वितळवून देण्याचे काम करीत असे. आरोपींकडून १२ गुन्हे उघडकीस आले असून, २५० ग्रॅम सोने व दोन दुचाकी असा ८ लाख ९ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

वरिष्ठ निरीक्षक लक्ष्मण बोराटे, सहायक निरीक्षक नितीन भोयर, फौजदार धनंजय चव्हाण यांनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मॅट्रिमोनी साइटच्या ओळखीतून महिलेची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मॅट्रीमोनी साइटच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. यामध्ये महिलांची फसवणूक सर्वाधिक होत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड होत आहे. महिनाभरात अशा प्रकारे शहरातील दोन महिलांची फसवणूक झाल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

मॅट्रीमोनी साइटच्या माध्यमातून संपर्क साधत एका महिलेची तीन लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार गेल्या महिन्यांत घडला आहे. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार काबूल येथील तथाकथित दोघा डॉक्टरांविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

धायरी येथील एका ३५ वर्षांच्या महिलेने यांनी पोलिसांत तक्रार दाखल केलीआहे. या प्रकरणी डॉ राहुल यादव, अमित शर्मा यांच्याविरुद्ध फसवणूक तसेच आयटी अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेने भारत मॅट्रीमोनी साइटवर आपला फोटो आणि माहिती अपलोड केली होती. या माहितीनुसार आरोपी यादवने त्यांच्याशी संपर्क साधला. आपण डॉक्टर असून सध्या काबूल येथे असल्याचेही त्याने सांगितले.

यादव याने तक्रारदार महिलेचा विश्वास संपादन करत लग्नाची मागणी घातली होती. दरम्यान, आरोपी यादव याने काही मेडिकल उपकरणे हे काबूल येथून कुरिअरने भारतात पाठवत असल्याचे सांगितले होते. ही उपकरणे ताब्यात घेण्यासाठी शर्मा याने तक्रारदार महिलेशी संपर्क साधला. कस्टम, एक्साइज ड्युटी भरण्यासाठी तीन लाख ९५ हजार रुपयांची गरज असल्याचे सांगितले. तक्रारदार महिलेने विश्वासाने ही रक्कम दिल्यावर आरोपींनी तिच्याशी संपर्क साधण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे विभागात ४४ ‘ऑटोमॅटिक तिकीट मशिन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रेल्वे स्टेशनवरून लोकल सुटण्यासाठी अवघे काही मिनिट शिल्लक असतात आणि एखाद्या व्यक्तीला लोकलचे तिकीट काढायचे असते, मात्र तिकीटासाठी मोठी रांग असल्याने, तिकीट मिळेपर्यंत लोकल सुटते. प्रवाशांवर यापुढे अशी वेळ येणार नाही. कारण, प्रवाशांची वाढती संख्या आणि तिकिटासाठी लागणाऱ्या रांगा लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने पुणे विभागातील रेल्वे स्टेशनवर ४४ ' ऑटोमॅटिक तिकीट मशिन' बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे स्टेशनवर सात, तर शिवाजीनगर स्टेशनला तीन आणि खडकी, दापोडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगाव, मिरज, सातारा, बारामती, उरळी, लोणी, सांगली, कराड आणि कोल्हापूर या स्टेशनवरही हे मशीन बसविण्यात येणार आहेत. या मशिनवर कोणत्याही रेल्वेची विना आरक्षित (जनरल) तिकिटे आणि प्लॅटफॉर्म तिकीट काढणे शक्य होणार आहे. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असून नागरिकांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

रेल्वे स्टेशनवरील तिकीट खिडकीसमोर असणाऱ्या मोठ्या रांगांमुळे अनेकवेळा प्रवाशांची रेल्वे हुकते, तर काही प्रवासी नाईलाजास्तव विनातिकीट प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हा उपाय शोधला आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचे रेल्वे प्रवासी संघटनांनी स्वागत केले आहे. 'ऑटोमॅटिक तिकीट मशिन' सुविधा सर्वसामान्य प्रवाशांसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. यापूर्वीही रेल्वे प्रशासनाने पुणे स्टेशनवर दोन, तर पिंपरी स्टेशनवर एक मशिन बसविले आहेत. या यंत्रांमुळे त्यावेळी तिकीट विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती, असे रेल्वे प्रवासी मंचाच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माडगूळकर, फुगेंना महासंचालक सन्मानचिन्ह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे आणि परिसरातील पोलिस दलाच्या विविध विभागांत कार्यरत २८ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. पुणे शहर पोलिस दलातील पोलिस निरीक्षक गणपत माडगूळकर, रघुनाथ फुगे, बळवंत काशीद यांच्यासह राज्य राखीव दल, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, वायरलेस, पुणे ग्रामीण आदी विभागातील अधिकाऱ्यांचा सहभाग आहे.

राज्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी राज्यातील २५० पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर केले आहे. येत्या महाराष्ट्र दिनी पोलिस मुख्यालयाच्या संचलन मैदानावर संचालनावेळी समारंभपूर्वक सन्मानचिन्हांचे वितरण करण्यात येणार आहे. विजेत्यांमध्ये पुणे शहर, ग्रामीण, सीआयडी, एसआरपीएफ, गुप्तवार्ता प्रबोधिनी, फोर्स वन, प्रशिक्षण केंद्र, वायरलेस आदी विभागातील २८ जणांचा समावेश आहे.

विजेते याप्रमाणे :

पोलिस निरीक्षक : गणपत माडगूळकर (सीबीआय), रघुनाथ फुगे (गुन्हे शाखा), बळवंत काशीद (सिंहगड पोलिस ठाणे), गोरख कोकाटे (एसआरपीएफ), महादेव सुरवसे, साहेबराव पाटील (नानविज प्रशिक्षण केंद्र), सिद्धेश्वर कोळी (एसआरपीएफ), सुरेश जाधव (गुप्तवार्ता प्रबोधिनी), भानुदास पवार (फोर्स वन).
सहायक निरीक्षक / फौजदार : जितेंद्र कदम (सीआयडी), आबासाहेब सुंबे (वायरलेस), पुरुषोत्तम मेश्राम (एसआरपीएफ).

सहायक फौजदार, हवालदार, नाईक आणि शिपाई : परवीन मेहबूब पठाण (पुणे शहर), उदय गावकर, नितीन शिंदे, विठ्ठल टिंगरे, सुरेश राऊत, आजिनाथ खेडेकर, वसंत सोनटक्के, अनिल उपरे, दत्तात्रय चव्हाण, भीमराव माळी, अजित सुर्वे (एसआरपीएफ), लक्ष्मण बोटके (गुप्तवार्ता प्रबोधिनी), विश्वास आंदेकर, दत्तात्रय जगताप, रवींद्र देवकर, बाळू भोई (पुणे ग्रामीण).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफाई कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात

$
0
0

पुरेसे प्रशिक्षण, उपकरणांशिवाय करावी लागतायेत कामे

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही स्वरूपाचे प्रशिक्षण देण्यात येत नसून सुरक्षेसाठी आवश्यक असलेली उपकरणेही बहुतांश जणांना उपलब्ध करून दिली जात नाहीत. तसेच, कायद्यातील तरतुदीप्रमाणे त्यांची नियमितपणे आरोग्य तपासणीही केली जात नसल्याचे एका सर्व्हेमध्ये समोर आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) १४ जानेवारी ते ११ फेब्रुवारी २०१५ या कालावधीत महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा एक पायटल सर्व्हे केला. त्यामध्ये महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयातील १२० कर्मऱ्यांच्या वैयक्तिक माहितीसह कामाच्या पद्धतीपासून त्यांना मिळणाऱ्या सुट्या, कामासाठी आवश्यक प्रशिक्षण, वैद्यकीय चाचणी आदींची माहिती प्रश्नावलीद्वारे कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांपासून पुणे महापालिकेचे सफाई कर्मचारी वंचित राहत आहेत. एकूण कर्मचाऱ्यांपैकी ९३ टक्के सफाई कर्मचारी कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसून अनेकांना योजनांची माहिती नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
कर्मचाऱ्यांनी काम करताना सुरक्षेच्या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी, याबाबत कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत नाही. त्याबरोबर सुरक्षेसाठी आवश्यक व कायद्यामध्ये नमूद असलेल्या ४४ उपकरणांपैकी मोजकी उपकरणे कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिली जात आहेत. ऑक्सिजन मास्क, क्लोरिन मास्क, सुट, हेल्मेट, इमर्जिन्सी ऑक्सिजन किट, प्रथमोपचार बॉक्स आदी वस्तू मिळण्याचे प्रमाण नगण्य असल्याचे निदर्शनास आले.

बार्टीने केलेला हा पायलट सर्व्हे होता. त्यांच्याकडून या विषयाचा अभ्यास सुरूच ठेवला जाणार असल्याचे तेथील संशोधन अधिकाऱ्यांनी 'मटा'ला सांगितले. 'बार्टी'तील सहायक प्राध्यापक अनघा इंगोले, संशोधन अधिकारी अमृता देसर्डा, विदुला सोनाग्रा, पौर्णिमा बागवत, सविता भालेराव आणि रोहिणी वाघमारे यांनी हा सर्व्हे केला.

वैद्यकीय तपासणीतही ढिसाळपणा...

सफाई कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी नियमितपणे करण्याचे बंधनकारक आहे. मात्र, पाहणीमध्ये अभ्यासलेल्या कर्मचाऱ्यांपैकी ५५ ते ५८ टक्के कर्मचाऱ्यांची एकदाही वैद्यकीय तपासणी झालेली नाही. वर्षात एकदा तपासणी झालेले ९ टक्के कर्मचारी आहेत. तर २६ टक्के कर्मचाऱ्यांनी या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले असून उर्वरित कर्मचाऱ्यांची एक महिन्याने व सहा महिन्यांनी तपासणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेसाठी वीस जणांचे अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

माजी आमदार रमेश थोरात, दिलीप मोहिते, संचालक रेवणनाथ दारवटकर यांच्यासह वीस जणांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज दाखल केले.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी येत्या पाच मे रोजी निवडणूक होणार आहे. येत्या सोमवारपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. शुक्रवारी थोरात, मोहिते, दारवटकर यांच्यासह जयश्री पलांडे, राजेश कांडगे, प्रकाश पवार आणि सदाशिव पवार अशा वीस जणांनी अर्ज दाखल केले. या निवडणुकीत अ गटातून १३, पणन प्रक्रिया गट, नागरी बँका-पतसंस्था, गृहनिर्माण-पाणीपुरवठा संस्था या गटांमध्ये प्रत्येकी एक, महिला गटातून दोन व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी या गटांमधून एक संचालकाची जागा आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज (शनिवारी) पुण्यात येत असून त्यानंतर पॅनेलच्या समीकरणांची जुळणी होईल, असे सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट कागदपत्रांद्वारे प्लॉट लाटण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य राखीव दलाच्या गट क्रमांक दोनमधील (एसआरपीएफ) काही प्लॉट बनावट कागदपत्रे तयार करून विकसनासाठी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वानवडी पोलिसांनी बनावट कागदपत्रे तयार करणारे, विकसित करण्यासाठी घेणारे आणि या व्यवहारांतील एजंटांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी 'एसआरपीएफ'चे पोलिस निरीक्षक मधू सकट यांनी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी शरद सोपान शेंडे, राहुल विलास नहाटा, अब्दुल बारी अब्दुल बशीर कुरेशी, अब्रार अहमद मोहमंद हनीफ कुरेशी, सिद्धार्थ प्रकाश परदेशी यांच्याविरुद्ध फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अब्दुल बारी आणि अब्रार कुरेशी यांनी राज्य राखीव दलाच्या गट क्रमांक दोनच्या सर्व्हे नंबर ५४/३/४/१ हा प्लॉट स्वतःच्या मालकीचा असल्याचे भासवून बनावट कागदपत्रे तयार केलीत. कुरेशी यांचा हा कथित प्लॉट विकसित करण्यासाठी आरोपी परदेशी हे मध्यस्थ आहेत. परदेशी यांनी या कागदपत्रांची कुठलीही पडताळणी न करता प्लॉट शेंडे आणि नहाटा यांना विकसित करण्यासाठी दिला. कुरेशी आणि शेंडे, नहाटा यांच्यात प्लॉट विकसित करण्यासाठीचा करारही झाला. त्यापोटी ११ लाख रुपये देण्यात आले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सभागृहनेते पदावरून जगताप पायउतार

$
0
0

म. टा. प्रतिनिध‌ी, पुणे

महापालिकेतील सभागृह नेते सुभाष जगताप यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्याकडे जगताप यांनी राजीनामा सादर केला. जगताप यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सभागृहनेतेपदी नक्की कुणाची वर्णी लागते, याचा निर्णय पुढील दोन दिवसांत होणार आहे.

पुणे महापालिकेत गेले काही दिवसांपासून सभागृह नेते बदलावरून जोरदार धुसफूस सुरू होती. मात्र त्याविषयी निर्णय होत नव्हता. जगताप यांचा सभागृह नेते पदाचा राजीनामा घेऊन पीएमपीएमएलच्या संचालक मंडळावर त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतला होता. मात्र या निवडणुकीत काँग्रेसने शिवसेना, भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याने जगताप यांचा पराभव झाला. त्यामुळे सभागृह नेतेपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. शुक्रवारी जगताप यांनी धनकवडे यांची भेट घेऊन राजीनामा सुपूर्द केला.

पालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीकडून नगरसेवक दिलीप बराटे, बंडू केमसे, विशाल तांबे यांची नावे चर्चेत आहेत. पक्षांतर्गत गटबाजी वाढल्याने सभागृह नेतेपदाच्या स्पर्धेतून तांबे यांनी माघार घेतल्याने केमसे, बराटे यांच्यापैकी एकाची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका शिक्षणमंडळाला सर्वाधिकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षणमंडळाला अधिकार देण्याबाबत राज्य सरकारने पाठविलेले पत्र आणि पालिकेच्या सर्वसाधारण सभेने केलेल्या ठरावाद्वारे पालिकेच्या शिक्षणमंडळाला सर्व अधिकार देण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. मंडळाला अधिकार देण्याबाबतचे पत्र आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समित‌ीला पाठविले आहे.

महापालिकेने पूर्वीप्रमाणे शिक्षण मंडळाला सर्व अधिकार द्यावेत, असे आदेश राज्य सरकारने महापालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी विधी व न्याय विभागाचे आदेश लक्षात घेऊन विद्यमान शिक्षणमंडळाच्या सभासदांना कार्यकाल संपेपर्यंत अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबत बोलताना शिक्षणमंडळाचे अध्यक्ष बाबा धुमाळ म्हणाले, 'पालिका आयुक्तांनी अधिकार देत असल्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे मंडळाच्या सभासदांना आता कामकाज करण्याची परवानगी मिळाली आहे. शिक्षण मंडळ सदस्यांची बैठक येत्या १५ तारखेला बोलावण्यात आली आहे. येत्या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य वेळेत मिळावे यासाठी मंडळ प्रयत्न करणार आहे.'

सदस्यांना स्थायीत अधिकार

शिक्षण मंडळाचे अधिकार काढून पालिका आयुक्तांना देण्यात आल्याने २०१५-१६ चे मंडळाचे बजेट महापालिका आयुक्तांकडून स्थायी समितीला सादर करण्यात आले होते. स्थायी समितीने २९५ कोटी रुपयांच्या बजेटला मान्यता दिली होती. प्रशासनाचे बजेट मंडळाकडून खर्च करण्यात येणार आहे. यावर मंडळाचे सदस्य निर्णय घेणार असल्यामुळे स्थायी समितीमध्ये त्यांना अधिकार देण्याचा ठराव प्रशासनाला करावा लागेल, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज दरवाढीवर मागण्यांचा पाऊस

$
0
0

महावितरणकडून शहरात सुनावणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

घरगुती ग्राहकांवर वीज दरवाढ लादू नका..., स्थिर आकारात वाढ करू नका... आणि डेबिट-क्रेडिट कार्डांद्वारे ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्यांना सर्व्हिस चार्ज लावू नका... अशा विविध मागण्या पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील ग्राहक प्रतिनिधी आणि विविध संस्था-संघटनांनी राज्य वीज नियामक आयोगाकडे शुक्रवारी केल्या. महावितरणने सादर केलेल्या वीज दरवाढीच्या प्रस्तावावर आयोगाने पुण्यात सुनावणी घेतली. आयोगाच्या अध्यक्ष चंद्रा अय्यंगार, सदस्य अझिझ खान आणि दीपक लाड हे यावेळी उपस्थित होते. सकृद्दर्शनी हा प्रस्ताव सव्वाचार हजार कोटी रुपयांच्या दरवाढीचा वाटत असला, तरी राज्यातील परिस्थिती त्याहून खूप गंभीर आहे. त्यामुळे हा परिणाम १५ ते १६ हजार कोटी रुपयांपर्यंत जाण्याची भीती आहे, याचा सर्वांनीच गांभीर्याने विचार करावा, असा इशारा प्रयास ऊर्जा गटाच्या अश्विनी चिटणीस यांनी दिला. ओपन अॅक्सेस धोरणामुळे मोठे ग्राहक महावितरणकडून जाण्याची भीती असून त्यामुळे वीज अतिरिक्त ठरण्याची भीती आहे, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे प्रताप होगाडे यांनी ग्राहकसेवेविषयी अनेक तक्रारी मांडल्या. ग्राहकांना वीजबिले वेळेत मिळत नाहीत, त्यामुळे प्रॉम्प्ट पेमेंटची सवलत मिळत नाही, चुकीची बिले येतात, सरासरी बिले देण्यात येतात, अशा तक्रारींवर तातडीने कारवाईची मागणी त्यांनी केली. तसेच, विविध कारणांमुळे राज्यात सव्वातेरा हजार दशलक्ष युनिट्स (एमयू) वीज अतिरिक्त ठरणार आहे, ती तोट्यात विकण्याऐवजी राज्याच्या उर्वरित १५ भागातील लोडशेडिंग बंद करा, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, घरगुती ग्राहक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाणीपुरवठा योजना आणि पथदिवे यांची दरवाढ करू नये, स्थिर आकारात वाढ करू नये आणि डेबिट-क्रेडिट कार्डांद्वारे ऑनलाइन भरण्यात येणाऱ्या बिलांवर सर्व्हिस चार्ज आकारू नये, अशा मागण्या सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी केल्या. तसेच, रात्रीच्या वेळी उद्योगांना वीजदरात देण्यात येणारी सवलत कमी करण्याचा निर्णय आत्मघातकी ठरेल, असा इशारा त्यांनी दिला. सर्वसामान्य ग्राहकांच्या वीजदरांत वाढ केल्यास दरमहा शंभर ते चारशे रुपयांनी वीजबिलांमध्ये वाढ होईल आणि महागाईच्या काळात अनेक कुटुंबाना फटका बसेल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अजय शिंदे यांनी सांगितले. तसेच, आम आदमी पार्टीचे सचिव श्रीकांत आचार्य यांनीही दरवाढीस विरोध नोंदविला.

आयोगाचा 'उरक'

जनसुनावणीमध्ये अनेक संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींनी बाजू मांडली; मात्र प्रत्येक प्रतिनिधीने पंधरा मिनिटांतच बाजू मांडावी, अशी सूचना आयोगाकडून करण्यात आली. त्याचा फटका प्रयास ऊर्जा गटाच्या प्रतिनिधींना बसला. अधिकृत ग्राहक प्रतिनिधी म्हणून बाजू मांडताना त्यांना थांबविण्यात आले. अखेर सायंकाळी उरलेले सादरीकरण पूर्ण करण्याची संधी त्यांना देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज आयोगाचा महावितरणला झटका

$
0
0

ग्राहकसेवांमधील गंभीर त्रुटी सुधारण्याचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'वीजबिले वेळेवर न मिळणे, नव्या वीजमीटरना विलंब अशा महावितरणच्या विविध प्रकारच्या ग्राहकसेवांमध्ये गंभीर त्रुटी असून त्यात वेळीच सुधारणा झाली पाहिजे,' अशा शब्दांमध्ये राज्य वीज नियामक आयोगाच्या अध्यक्ष चंद्रा अय्यंगार यांनी शुक्रवारी महावितरणला फटकारले.

आयोगाच्या अध्यक्षांनी जाहीर सुनावणीत महावितरणच्या कारभाराला धारेवर धरल्यामुळे त्याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. महावितरणने सादर केलेल्या वीज दरवाढीच्या प्रस्तावावर राज्याच्या विविध भागांमध्ये जाहीर सुनावणी झाली, त्यामध्ये शुक्रवारी पुण्यात सुनावणी पार पडली. विविध संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींनी बाजू मांडल्यानंतर समारोप करताना अय्यंगार यांनी महावितरणच्या कारभारावर ताशेरे ओढले. पुण्यासह अन्य ठिकाणच्या सुनावणीमध्ये महावितरणच्या ग्राहकसेवेबाबत काही समान तक्रारी आढळून आल्या आहेत. त्याची उत्तरे देणे, ही महावितरणची जबाबदारी आहे. प्रामुख्याने मीटरशिवाय होणाऱ्या शेतीच्या वीजपुरवठ्याबाबतची नेमकी आकडेवारी सादर करा, असा निर्देश अय्यंगार यांनी या वेळी दिला.

तसेच, महावितरणचा दृष्टिकोन ग्राहकाभिमुख नसल्याच्याही (कस्टमर्स अनफ्रेंडली) तक्रारी अनेकांनी मांडल्या. त्यामध्ये बिलिंगबाबत आणि बिलांच्या वितरणाबाबत अनेक तक्रारी आहेत. बिले वेळेवर न मिळाल्याने अनेक ग्राहकांना प्रॉम्प्ट पेमेंट डिस्काउंटपासून वंचित राहावे लागते. बिलांमध्ये अनेकदा चुका होतात, त्याचा फटका ग्राहकांना बसतो. बिलांच्या वितरणातील अडचणी सोडविण्याची यंत्रणा नसेल; तर उभारा आणि असेल तर ती दुरुस्त करा, असे अय्यंगार यांनी नमूद केले. तसेच शेतीला मीटर देण्यात काही अडचणी आहेत, हे मान्य केले तरी शेतीव्यतिरिक्त सर्वसामान्य ग्राहकांना मीटर मिळण्यास विलंब होण्याचे काही कारण नाही, असे त्या म्हणाल्या. त्याबरोबरच ग्राहकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी काही पावले उचलण्याची सूचना त्यांनी केली. वीजवाहिन्यांची देखभाल दुरुस्ती होते, तशीच ग्राहकजागृतीसाठीही वारंवार पावले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, अधिक औद्योगिक वीजदर आणि शेतीचा वीजपुरवठा हे दोन्ही चिंतेचे विषय आहेत, असे महावितरणचे एमडी ओमप्रकाश गुप्ता यांनी मान्य केले. तसेच, ग्राहकसेवेत सुधारणा करण्यासाठी सातत्याने पावले उचलण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हरामखोर’ निर्मात्याविरुद्ध गुन्हा

$
0
0

'बालभारती'चे बोधचिन्ह वापरणे भोवले

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'हरामखोर' या हिंदी सिनेमाच्या जाहिरात, प्रसिद्धीसाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) बोधचिन्हाचा वापर केल्याप्रकरणी सिनेमाचे निर्माता अजय यादव, दिग्दर्शक श्लोक शर्मा, डिझायनर तारिणी डी. यांच्यावर डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक, 'कॉपी राइट' कायद्याचा भंग तसेच 'आयटी अॅक्ट'खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'हरामखोर' या चित्रपटाच्या पोस्टरसाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) बोधचिन्हाचीच उचलेगिरी करण्यात आल्याचे उघडकीस आल्यावर टीका झाली होती. बालभारतीचे विधी सल्लागार मोहन वीर (वय ५६, रा. कोथरूड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिग्दर्शक श्लोक शर्मा यांनी 'हरामखोर' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले असून, सध्या ट्रेलर दाखविण्यात येत आहेत. प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी या चित्रपटात शिक्षकाची भूमिका बजावत आहे. अभिनेत्री श्वेता त्रिपाठीने विद्यार्थिनीची भूमिका साकारली आहे. बोधचिन्हावर असलेल्या विद्यार्थ्याच्या ठिकाणी नवाजउद्दीनचे, तर विद्यार्थिनीच्या जागेवर श्वेताचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.

'हरामखोर' सिनेमाच्या जाहिरातींमध्ये हे बोधचिन्ह झळकू लागल्यानंतर सहा एप्रिल रोजी 'बालभारती'मध्ये तक्रारींचे फोन खणखणू लागले. त्यानंतर 'बालभारती'ने कायदेशीर बाजू तपासल्यानंतर कारवाईची भूमिका घेण्याचे धोरण स्वीकारले. 'बालभारती'चे विधी सल्लागार वीर यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात सिनेमाच्या संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. चित्रपटासाठी बोधचिन्हाचा वापर करणाऱ्या डिझायनर तारिणी डी. यांच्यासह तंत्रज्ञांनाही या गुन्ह्यांत सहआरोपी करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक सुनील ताकवले करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>