Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कँटोन्मेंटमध्ये भरतीसाठी समिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे कँटोन्मेंट बोर्डामध्ये मनुष्यबळाची कमतरता असल्याने विविध खात्यांमध्ये कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. बोर्डाच्या अनेक खात्यांमध्ये कर्मचारी कमी असल्याने नागरिकांना वेळेवर सेवा मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही भरती प्रक्रिया करण्यासाठी समिती नेमण्यात येणार आहे. बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असणार आहे. त्यामध्ये सदस्य म्हणून सर्व नगरसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे.

बोर्डाच्या विविध खात्यांपैकी महसूल, आरोग्य आणि अतिक्रमण या प्रमुख खात्यांमध्येच मनुष्यबळ कमी आहे. महसूल विभागामध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने प्रॉपर्टी टॅक्स वसुलीवर त्याचा परिणाम होत आहे. अतिक्रमण विभागाला कर्मचाऱ्यांची गरज असतानाही अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांची भरती झालेली नाही. त्यामुळे अतिक्रमणांवर नियंत्रण आणणे बोर्डाला कठीण होत आहे. आरोग्य विभागामध्ये कर्मचारी कमी असल्याने दैनंदिन साफसफाई करताना बोर्डाला अडचणीला

सामोरे जावे लागते. त्यामुळे कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या खात्यांशिवाय इंजिनियरिंग, अग्निशमन दल आणि मोटार वाहन या विभागांमध्येही कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. प्रत्येक खात्यामध्ये जास्तीत जास्त २० कर्मचारी नेमण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कुमार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सध्या बोर्डाच्या आरोग्य खात्यामध्ये दैनंदिन वेतनावर काम करणारे कर्मचारी आहेत. त्या कर्मचाऱ्यांना आणखी तीन महिने मुदतवाढ देण्यास बोर्डाने मान्यता दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आनंदओवरी’चा अनुवाद ट्विटरवर

$
0
0

चिन्मय पाटणकर, पुणे

सोशल नेटवर्किंग साइट्सच्या वापराबाबत साधकबाधक चर्चा होत असताना ट्विटरवरील टिवटिवाटही साहित्यक्षेत्रात भर घालण्यासाठीही उपयुक्त ठरत आहे. अमेरिकेतील अभ्यासक जेफ ब्रेकेट यांनी मराठीतील श्रेष्ठ साहित्यिक दि. बा. मोकाशी यांच्या 'आनंदओवरी' या कादंबरीचा ट्विटरवर इंग्रजी अनुवाद करण्याची कामगिरी केली आहे.

यंदा दि. बा. मोकाशी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. जेफ ब्रॅकेट अमेरिकेतील बॉल स्टेट विद्यापीठात धार्मिक अभ्यास या विषयाचे सहयोगी प्राध्यापक आहेत. ट्विटरवर 'जेफभाऊ' या नावाने ते कार्यरत आहेत. मराठी, संत साहित्य, भारतातील धार्मिक परंपरा या विषयांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. ब्रॅकेट यांनी इ मेलच्या माध्यमातून अनुवादाबाबतची माहिती 'मटा'ला दिली. पीएचडी करत असताना त्यांनी सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात त्यांनी मराठीचा थोडा अभ्यास केला होता. मात्र, वारकरी पंथाविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी पुण्यात येऊन त्यांनी डॉ. विजया देव यांच्याकडे तीन वर्षे मराठीचे धडे गिरवले. डॉ. देव यांनीच ब्रॅकेट यांना 'आनंदओवरी' वाचण्याचा सल्ला दिला. 'आनंदओवरी' वाचल्यानंतर ब्रॅकेट भारावून गेले. त्यांनी पंढरपूरलाही काहीवेळा भेट दिली.

'आधुनिक मराठी साहित्यात मोकाशी यांचे योगदान महत्त्वाचे असल्याची जाणीव आनंदओवरी वाचल्यानंतर झाली. त्यांचे साहित्य इतर भाषांमध्ये विशेष अनुवादित झालेले नाही.

'प्रमोद काळे यांचे 'फेअरवेल टू गॉड' (देव चालले) आणि फिलिप इंगब्लोम यांचे 'पालखी : अन इंडियन पिलग्रिमेज' (पालखी) ही दोनच पुस्तके इंग्रजीत अनुवादित झाली आहेत. दिबांसारखा साहित्यिक इंग्रजीतही पोहोचण्याची गरज आहे, या विचारातून आनंदओवरीचा अनुवाद करण्याची कल्पना सुचली. दिबांची शब्दकळा वाटते तितकी सोपी नाही. त्यामुळे या अनुवाद करताना दोन्ही पुस्तकांचा संदर्भ घेतला,' असे ब्रॅकेट यांनी सांगितले.

'ट्विटरचा वापर माझ्या नेहमीच्या ट्विट करण्याव्यतिरिक्त अन्य कारणासाठी करण्याची इच्छा होती. अनुवाद करायचे ठरवल्यानंतर बराच काळ ते काम रखडले होते. मात्र, ट्विटरमुळे त्याला चालना मिळाली. अनुवादाचे ट्विट आणि बाकीची ट्विट अशा पद्धतीने काम करत राहिलो. आनंदओवरीचा अनुवाद हे कामच कठीण होते. भाकरी, फाल्गुन अशा बोलीभाषेतील काही शब्दांचा अनुवाद करणे अशक्य होते. अशा वेळी मी माझा प्रश्नाचे ट्विट करायचो. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने माझा उत्साह वाढत गेला. अनुवादकाचे काम किती अवघड असते, याचा प्रत्यय या अनुवादामुळे मिळाला, असे ब्रॅकेट यांनी सांगितले.

इंग्रजी अनुवाद पुस्तकरूपातही

इंग्रजी आणि मराठी मिळून सुमारे पाच हजार ट्विट झाली. अनुवाद करण्यासाठी साधारणपणे एक वर्ष लागले. आता हा इंग्रजी अनुवाद पुस्तकरुपाने प्रकाशित करण्यासाठी ब्रॅकेट प्रयत्नशील आहेत. त्यासाठीची परवानगीची प्रक्रियाही ते करणार आहेत.

ब्रॅकेट यांचे मराठी प्रेम

मराठी भाषा दिनाच्या दिवशी ट्विटरवर मराठी दिन साजरा करण्यासाठी #मराठीदिन हा हॅशटॅग वापरला जात होता. त्या वेळी ही ब्रॅकेट यांनी आवर्जून हा हॅशटॅग वापरून ट्विट करत आपले मराठी प्रेम दाखवून दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडलाधिकाऱ्याला पकडले रंगेहाथ लाच घेताना

$
0
0

पुणे : खरेदी केलेल्या जमिनीवर आलेल्या हरकतींची सुनावणी घेवून त्यावर निकाल देण्यासाठी ८ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या इंदापूर येथील मंडलाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने इंदापूर तालुक्यातील आर्थुणे गावात सोमवारी सायंकाळी सापळ्याचे आयोजन केले होते. प्रमोद पाडुंरंग तोबरे (वय ४२, रा. आर्थुणे, इंदापूर) असे कारवाई करण्यात आलेल्या मंडलाधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी इंदापूर येथील जमीन खरेदी करणाऱ्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार नोंदवली होती.

तक्रादाराने जमीन खरेदी केली होती. या खरेदीबाबत काही हरकती आल्या होत्या. या हरकतींबाबत सुनावणी घेवून निकाल देण्यासाठी तोबरे यांनी तक्रारदाराकडे १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम आठ हजार रुपये ठरली होती. ठरल्यानुसार तक्रारदार हा तोबरे यांच्या कार्यालयात लाचेची रक्कम देण्यासाठी गेला असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगकर्मी जयंत बेंद्रे यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक जयंत बेंद्रे यांचे रविवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

बेंद्रे यांचे शिक्षण नगर येथे झाले. त्यांच्या वडिलांनीही नाटकांतून काम केले होते. कॉलेजमध्ये असताना रंगकर्मी सदाशिव अमरापूरकर यांच्यासह त्यांनी काम केले होते. पुढे किर्लोस्कर ऑइल इंजिन्समध्ये नोकरी करताना ज्येष्ठ अभिनेता मोहन जोशी यांच्यासह त्यांनी औद्योगिक नाट्य स्पर्धा केल्या. त्यांचे 'मोरूची मावशी' हे नाटक बरेच गाजले होते. विविध नाट्य संस्थांशी ते जोडलेले होते. व्यावसायिक रंगभूमीवरील 'नाथ हा माझा', 'मोरूची मावशी' आदी नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.

रंगभूमीवर काम करतानाच साहित्यातही त्यांनी योगदान दिले. 'माणसं आणि माणसं' हा कथासंग्रह, मुकी बिचारी कुणीही हाका, भुतासकी, रुपयाभोवती दुनिया, उद्या पुन्हा हाच खेळ आदी एकांकिका प्रसिद्ध आहेत. तसेच मोहन जोशी यांच्या नाट्य-चित्रपट क्षेत्रातील प्रवासावर आधारित 'नटखट' हे पुस्तकही बेंद्रे यांनीच लिहिले केले होते. वेगळ्या आकृतीबंधामुळे या पुस्तकाचे कौतुक झाले. राजन मोहाडीकर, मोहन जोशी आणि श्रीराम रानडे यांच्यासह मैत्री ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रातही ते कार्यरत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेट-नेट’साठी माहिती मागितली

$
0
0

पुणे : प्राध्यापक नियुक्तीसाठी सेट-नेट सक्तीचेच करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आपल्या कार्यक्षेत्रातील केवळ पीएचडीधारक प्राध्यापकांची माहिती मागविली आहे. केवळ पीएचडीधारक असलेल्या या प्राध्यापकांना नेट-सेट पात्र होणे गरजेचेच झाल्याने, अशा किती प्राध्यापकांना सेट-नेट द्यावी लागेल, हे यातून स्पष्ट होणार आहे.

सेट-नेट आणि पीएचडीला समकक्षता देण्याबाबतच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निर्णयावर आक्षेप घेत, सर्वोच्च न्यायालयाने ही समकक्षता योग्य नसल्याचे नुकतेच स्पष्ट केले. त्यामुळे २००९ पूर्वी पीएचडी झालेल्या किंवा त्यासाठी नोंदणी केलेल्या आणि प्राध्यापक होऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना आता सेट-नेट उत्तीर्ण होणे बंधनकारकच झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच विद्यापीठाने अशी माहिती मागविली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा सखोल अभ्यास करून, सरकारकडून मिळणाऱ्या निर्देशांनुसार विद्यापीठ पावले उचलणार असल्याचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२७ मार्चपूर्वी करा बँकांची महत्त्वाची कामे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुढील आठवड्यात बँकांमधील कामे उरकण्याचा विचार असेल, तर ती त्याआधीच उरकून घ्या. कारण, मार्च महिन्याचे शेवटचे चार दिवस आणि एप्रिल महिन्याचा पहिल्या आठवड्यातील पाच दिवस, या दहा दिवसात केवळ अडीच दिवस बँकांचे कामकाज होणार आहे. त्यामुळे खातेदारांना २७ मार्चपूर्वी बँकांतील कामे करावी लागतील. राष्ट्रीय व साप्ताहिक सुट्या, आर्थिक वर्षाचे क्लोजिंग यामुळे ही स्थिती निर्माण होणार आहे.

शनिवारी (२८ मार्च) श्रीरामनवमीची सुटी, तर २९ मार्च रोजी रविवारची साप्ताहिक सुटी आहे. त्यानंतर ३० व ३१ मार्चला बँका सुरू राहतील. एक एप्रिलला आर्थिक वर्षाच्या ताळेबंदाच्या कामासाठी बँका सुरू असल्या तरी खातेदारांसाठी मात्र, बँका बंद राहतील. दोन एप्रिल रोजी महावीर जयंतीची सुटी आणि ३ एप्रिलला गुड फ्रायडेची सलग सुटी आहे. शनिवारी (४ एप्रिल) बँकेचे कामकाज अर्धा दिवस चालेल, तर ५ एप्रिलला रविवारच्या साप्ताहिक सुटीमुळे बँका बंद असतील. सहा एप्रिलपासून बँकांचे कामकाज पूर्ववत सुरू राहतील. बँका सलग बंद

राहणार असल्याने मार्च महिन्याचा शेवटचा व एप्रिलचा पहिला आठवडाही याच कालावधीत येत असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन जमा होण्यासही विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २७ मार्च पूर्वीच बँकांची कामे उरकून घेणे फायद्याचे ठरेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढत्या उकाड्याने पुणेकर हैराण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वाढते तापमान आणि असह्य उकाड्यामुळे पुणेकर आता बैचेन होऊ लागले आहेत. वाढत्या तापमानामुळे शहरात चांगलाच उकाडा जाणवत आहे. उन्हापासून बचावासाठी टोप्या, जर्किन आणि सनकोटचा वापर वाढू लागला आहे. तसेच, भरदुपारी रस्त्यावरील गर्दीही कमी झाल्याचे चित्र आहे. स्थानिक पातळीवर तापमानात वाढ झाल्याने काही ठिकाणी पावसाच्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शहरात सोमवारी ३७.७ अंश सेल्सियस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान रविवारच्या तुलनेत किंचित कमी असले, तरी वातावरणातील उकाडा मात्र, कायम होता. प्रखर सूर्यकिरणांबरोबरच गरम हवेच्या झोतांमुळे अंगाची लाही लाही होत होती. असह्य उकाड्यामुळे भरदुपारी अनेक रस्त्यांवर तुरळक स्वरूपाची गर्दी होती. कामानिमित्त बाहेर पडावे लागणारे पुणेकर उन्हापासून संरक्षणासाठी टोपीबरोबरच, सनकोट किंवा जर्किन, पांढरे कपडे अशा जामानिम्यासहित बाहेर पडल्याचे चित्र होते. पुण्याबरोबर राज्यातही कडक उन्हामुळे तापमानात वाढ झाली आहे. राज्यात सोलापूर, नांदेड, चंद्रपूर, नागपूर येथेही पारा ४० अंशांच्या वर होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील ठेकेदाराला साडेआठ लाखांना गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'आमदारांच्या गाडीला अपघात झाला असून, त्यांच्या सोबत असलेल्या इतर व्यक्तींना रुग्णालयात दाखल करावयाचे आहे. तसेत त्यांच्या गाडीची दुरुस्ती करावयाची असून ताबडतोब पैसे पाठवा,' असे सांगून एका शासकीय ठेकेदाराला साडेआठ लाख रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ठेकेदाराने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

राजेंद्र सुरेश माळी (वय ३७, रा. द्वारका लॉडर्स, पिंपळे सौदागर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सांगवी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन फेब्रुवारी रोजी फिर्यादी माळी यांना ७०३६८३३६०५ या मोबाइल क्रमांकावरून फोन आला. 'मी आमदार विजयकुमार गावित बोलत असून, मर्सिडीज बेंझचा भालकी (कर्नाटक) येथे अपघात झाला आहे. जखमीला रुग्णालयात दाखल करायचे आहे; तसेच गाडी दुरुस्त करायची आहे,' असे सांगून आठ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. त्याप्रमाणे माळी पैसे घेऊन कर्नाटकातील बसवकल्याण येथे गेले. फोनवरील व्यक्तीने बसस्थानकात पाठविलेल्या अमित अग्रवाल नावाच्या व्यक्तीकडे पैसे देण्यास सांगितले. मात्र, नंतर आपली फसवणूक झाल्याचे माळी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी सायबर क्राइम विभागाकडे तक्रार केली.

माळी पाणीपुरवठा विभागामध्ये ठेकेदार आहेत. त्यांना सोलापूर येथून एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोन आला होता. या अधिकाऱ्याने माळी यांना या घटनेची माहिती देऊन पैसे घेऊन जाण्यास सांगितले. या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. माळी यांना फोन करणारा वरिष्ठ अधिकरी कोण आहे? त्याने गावित यांचे नाव का घेतले? जर गावित यांचा खरेच अपघात झाला असता तर शासकीय यंत्रणा कामास लागली असती. परंतु अधिकाऱ्याने माळी यांना पैसे घेऊन का पाठवले असे अनेक प्रश्न गुलदस्त्यात आहेत. सायबर क्राईम विभागाचे पोलिस निरीक्षक गौतम पवार तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्वाइन फ्लू’ने एकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढू लागल्याने स्वाइन फ्लूच्या विषाणूंचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे आढळत आहेत. त्यामुळे मृतांची संख्या घटण्याबरोबर संसर्गाचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसत आहे. मात्र व्हेंटिलेटवरील पेशंटची संख्या जैसे थे अशीच आहे. शहरात आणखी एकाचा संसर्गाने मृत्यू झाला आहे. मृतांची एकूण संख्या ६७ वर पोहोचली आहे.

पुण्यात उन्हाचा चटका वाढू लागल्याचे जाणवत आहे. त्यामुळे नव्याने पॉझिटिव्ह पेशंटची संख्या घटली. आता अवघ्या तिघांनाच संसर्ग झाला आहे. तर २१ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. एकूण तपासणी केलेल्या पेशंटपैकी टॅमी फ्लूचे उपचार घेणाऱ्यांची संख्या देखील जैसे थेच आहे. आतापर्यंत शहरात ५८५ जणांना लागण झाली आहे.

राज्यात दोघांचा मृत्यू

पुण्यासारखी परिस्थिती राज्यात देखील आहे. राज्यात नव्याने ६५ जणांना लागण झाली. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३४९ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ४१ जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याच्या तरुणाचा साताऱ्यात मृत्यू

$
0
0

साताराः बामणोली (ता. जावळी) येथे शेंबडीनजीक कोयना जलाशयात पोहण्यासाठी गेलेल्या पुण्याच्या प्रसन्न मुकुंद नाईक (वय २२, रा. पिंपरी-चिंचवड, पुणे) या युवकाचा मृत्यू झाला. तो एमआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता. पाण्यात बुडाल्याने बेशुद्ध पडलेल्या प्रसन्नचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

पुणे येथील एमआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ८२ विद्यार्थ्यांचा कॅम्प शेंबडी येथे शुक्रवारी (दि २०) आला होता. सर्व विद्यार्थी वासोटा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले होते. कॅम्पमधील विद्यार्थ्यांपैकी दहा जण शेंबडी येथे कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात पोहण्यासाठी गेले. त्या वेळी तेथील छोट्या होडग्यात बसून, विद्यार्थी जलाशयात विहारण्याचा आनंद घेत होते. प्रसन्न बसलेले होडगे पाण्यात उलटले. प्रसन्न गटांगळ्या खात असतानाच बरोबरीच्या विद्यार्थ्यांनी त्याला जलाशयातून बाहेर काढले. त्या वेळी तो बेशुद्ध होता. उपचारासाठी त्याला जिल्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे जिल्हा हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह पुण्याला नेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बड्या नगरसेवकाच्या खुनाचा कट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुन्हे शाखेने तिघा सराईत गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या गुन्हेगारांनी दक्षिण पुण्यातील एका बड्या नगरसेवकाचा खून करण्याचा कट रचला होता, अशी धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे.

स्वप्नील कुलकर्णी (वय २२, रा. धनकवडी), गणेश खानापुरे (२६, रा. गुरुवार पेठ) आणि अविनाश कदम (४०, रा. गणेश पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांंची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट एकचे कर्मचारी प्रकाश लोखंडे यांना आरोपी हे पिस्तूल विक्रीसाठी सुभाषनगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रघुनाथ फुगे, सहायक निरीक्षक महेंद्र जाधव, कर्मचारी संभाजी भोइटे, रमेश भोसले, रवींद्र कदम, रिजवान जिनेडी, दिलीप मोरे, प्रवीण शिंदे यांनी सापळा रचला होता.

आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार असून त्यांच्यावर येरवडा, भारती विद्यापीठ, सहकारनगर, शिवाजीनगर, पिंपरी तसेच हवेली पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपांचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी कुलकर्णीने गुन्हे करण्यासाठी १५ मोबाइल कंपन्यांचे सिमकार्ड वापरले असल्याचे पोलिस निरीक्षक फुगे यांनी सांगितले.

पूर्ववैमन्यस्यातून रचला कट

दक्षिण पुण्यातील एका नगरसेवकाशी कुलकर्णी आणि कदम यांचे वाद आहेत. कुलकर्णी याचा एका फ्लॅटवरून वाद झाला होता. तर, नगरसेवकाच्या भाच्याचे आणि कदम यांच्यात मारहाण झाली असून त्यात कदम गंभीर जखमी झाला होता. या पूर्ववैमन्यस्यातून दोघाही आरोपींनी संबंधित नगरसेवकाचा खून करण्याचा कट रचला होता, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. नगरसेवकाच्या नावाबाबत पोलिसांनी मौन धारण केले आहे. मात्र, त्या नगरसेवकाकडे पोलिसांनी चौकशी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसस्थानकांचे ‘सेफ्टी ऑडिट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसला गेल्या आठवड्यात कात्रज बसस्थानकात झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर सर्व स्थानके आणि डेपोंचे 'सेफ्टी ऑडिट' करून घेण्यात येणार आहे. येत्या महिन्याभरात त्याबाबतचा अहवाल सादर केला जाणार असून, त्यानुसार संबंधित डेपो-स्थानकांवर आवश्यक सुधारणा केल्या जाणार आहेत.

त्रिसदस्यीय समितीतर्फे हे 'सेफ्टी ऑडिट' केले जाणार असून, त्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व सेवा-सुविधांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी सोमवारी दिली. पीएमपीची १२ प्रमुख बस स्थानके आणि १० डेपो यांची भौगोलिक रचना; तसेच प्रवासीहिताच्या दृष्टीने तेथे उपलब्ध असलेल्या सेवा-सुविधा यांचा आढावा 'सेफ्टी ऑडिट'द्वारे घेण्यात येणार आहे. पीएमपीचे तज्ज्ञ सल्लागार, आयटीडीपीचे तज्ज्ञ आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वाहतूक नियोजक बापू गायकवाड यांची समिती प्रत्येक स्थानक आणि डेपोला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी करेल, असे डॉ. परदेशी यांनी सांगितले.

'पालिकांनी थकित निधी द्यावा'

पीएमपीच्या कारभारात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न सुरू असले, तरी अद्याप पीएमपीची ७० कोटी रुपयांची देणी बाकी आहेत. त्यासाठी, दोन्ही महापालिकांनी त्यांच्याकडील २० कोटी रुपयांची थकबाकी त्वरेने द्यावी, अशी मागणी डॉ. परदेशी यांनी केली. तसेच, जकात नाक्यांच्या जागा पीएमपीच्या डेपोसाठी दिल्या जाव्या, याचाही त्यांनी पुनरूच्चार केला.

'पॅसेंजर अनाउन्समेंट सिस्टीम'

बस स्थानकांवर होणारा प्रवाशांचा गोंधळ कमी करण्यासाठी प्रायोगिक स्वरूपात चार स्थानकांवर 'पॅसेंजर अनाउन्समेंट सिस्टीम' सुरू केली जाणार असल्याचे डॉ. परदेशी यांनी जाहीर केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या येथील बस स्थानकावर सध्या ही व्यवस्था सुरू असून, कात्रज, स्वारगेट आणि महापालिका बसस्थानक येथेही ही सेवा सुरू केली जाणार आहे.

मार्गफलकांमध्येही होणार बदल

पीएमपीच्या बहुतांश मार्गफलकांवर सध्या बस सुटणाऱ्या आणि पोहोचणाऱ्या स्थानकांचा उल्लेख केला जातो. त्यात, अधिक जागा जात असल्याने या मार्गफलकांच्या रचनेतही बदल केले जात आहेत. बसचा क्रमांक आणि अखेरच्या बसस्थानकाची माहिती मार्गफलकावर असेल. तसेच, प्रवाशांच्या सोयीसाठी बसच्या मार्गातील प्रमुख ठिकाणांचाही त्यात अंतर्भाव केला जाईल. येत्या १५ दिवसांत सर्व मार्गफलक याच पद्धतीने तयार केले जाणार असून, ते बसच्या वरच्याच भागांत लावण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. गाडगीळ यांना टेलर पुरस्कार

$
0
0

पुणेः पश्चिम घाट जैवविविधता तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ आणि अमेरिकेतील सागरी जैवविविधता तज्ज्ञ डॉ. जेन लुब्केनो यांना जागतिक कीर्तीचा 'टेलर पुरस्कार २०१५' जाहीर झाला आहे. पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल युनिर्व्हर्सिटी ऑफ सदर्न अमेरिकेतर्फे हा पुरस्कार दिला जाणार असून, दोन लाख डॉलर आणि सन्मानपत्र असे त्याचे स्वरूप आहे. येत्या २४ एप्रिलला लॉस एंजेलिसमध्ये तो समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे. डॉ. गाडगीळ यांनी पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संशोधन करून तेथील समस्या राष्ट्रीय पातळीवर तळमळीने मांडल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होय! नववीच्या विद्यार्थ्यांनी तपासले पेपर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नववीच्या विद्यार्थिनींकडून दहावीच्या उत्तरपत्रिका तपासून घेणाऱ्या दशरथ बेल्हेकर या शिक्षकाला सोमवारी निलंबित करण्यात आले आहे. दहावीच्या उत्तरपत्रिकांच्या वाहतुकीबरोबरच तपासणीकामात देखील होत असलेल्या या गोंधळावर 'मटा'ने प्रकाश टाकला होता.

पुण्यात विमाननगर परिसरातील आनंद विद्यानिकेतन शाळेत दहावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी नववीच्या विद्यार्थिनींची मदत घेतली जात असल्याचे वृत्त 'मटा'ने शनिवारी (२१ मार्च) प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या पुणे विभागाने चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने चौकशी समिती नेमली होती. या समितीने सोमवारी शाळेला भेट देऊन मुख्याध्यापिका किरण तावरे, बेल्हेकर आणि संबंधित विद्यार्थिनींकडे स्वतंत्रपणे चौकशी करून आपला अहवाल सादर केला.

उत्तरपत्रिका तपासण्याच्या या भानगडीत बेल्हेकर यांना दोषी ठरवून, त्याच्या निलंबनाला परवानगी देण्याचे या अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून मिळाली. त्यानुसार अंमलबजावणी केल्याचे मुख्याध्यापिका तावरे यांनी स्पष्ट केले. बोर्डाच्या उत्तरपत्रिकांच्या असुरक्षित वाहतुकीची बाब 'मटा'ने नुकतीच उघड केली आहे.

... हा प्रकार पूर्वीपासूनचाच!

दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्या तपासण्यासाठी घरी नेण्यास मनाई करण्यात आली. त्याऐवजी केंद्रीय तपासणी व्यवस्थेच्या माध्यमातून त्या तपासण्याचा आदेश बजाविण्यात आला. तरीदेखील कस्टडी आणि शिक्षकवर्गाच्या निष्काळजीपणामुळे उत्तरपत्रिका किती असुरक्षित आहेत, याची प्रचिती येत आहे. दहावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी वेळेत पूर्ण होण्यासाठी अनेक शिक्षक शाळेतील विद्यार्थांची मदत घेत असल्याचे प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असल्याची धक्कादायक माहिती शिक्षकांनीच 'मटा'ला दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅन्सरची औषधे स्वस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कॅन्सरवरील काही अॅलोपॅथिक आणि आयुर्वेदिक औषधे स्वस्त करण्याची घोषणा राज्याच्या अर्थमंत्र्यांनी केल्याने पेशंटना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे महाग वैद्यकीय उपचार थोडे स्वस्त होतील, अशी अपेक्षा वैद्यकक्षेत्रातून व्यक्त करण्यात आली.

राज्याचे अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यानी कॅन्सरची औषधे स्वस्त होणार अशी घोषणा केली. या घोषणेमुळे कॅन्सरच्या पेशंटना किमान आर्थिक दिलासा मिळणार आहे. वैद्यक तज्ज्ञांनी देखील या घोषणेचे स्वागत केले आहे.

'कॅन्सरच्या उपचारांत महागडी औषधे हा खूप मोठा अडथळा आहे. औषधांच्या किमती कमी केल्याने उपचारातील अडथळा दूर होईल. पेशंटना यामुळे आर्थिक दिलासा मिळेल. ही औषधे अनेक वर्षे घ्यावी लागतात.

कर अथवा सीमा शुल्काच्या स्वरूपात

राज्य सरकारने किमती कमी केल्या, तर कॅन्सरच्या अनेक पेशंटना फायदा होईल. या घोषणेच आम्ही स्वागत करतो,' अशी प्रतिक्रिया दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक आणि कॅन्सरतज्ज्ञ डॉ. धनंजय केळकर यांनी दिली.

'कॅन्सरवर आयुर्वेदाची कोणतीही औषधे नाही. मात्र रेडिओथेरपी, केमोथेरपी देण्यात येतात. त्याचा विपरित परिणाम शरीरावर होतात. आयुर्वेदाची औषधे स्वस्त केली त्याचे स्वागत आहे. सर्वच आयुर्वेदाची औषधे महाग झाली असून या औषधांच्या किंमती कमी करण्यासाठी त्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे,' अशी अपेक्षा ज्येष्ठ आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. सुहास परचुरे यांनी व्यक्त केली.

'कॅन्सरची औषधे स्वस्त करणे हे राज्य सरकारचे चांगले पाऊल आहे. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दडपणाखालील कॅन्सर पेशंटना औषधे स्वस्त होणे ही दिलासादायक गोष्ट आहे. केमोथेरपी, रेडिओथेरपीमुळे होणारे विपरित परिणाम कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेतले जातात. या उपचारांचा सरकारने विविध आरोग्य योजनात समावेश करावा,' अशी अपेक्षा वाघोलीच्या इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटरच्या उपसंचालिका डॉ. विनिता देशमुख यांनी केली.

कॅन्सरच्या उपचारांत महागडी औषधे हा खूप मोठा अडथळा आहे. औषधांच्या किमती कमी केल्याने उपचारातील अडथळा दूर होईल. पेशंटना यामुळे आर्थिक दिलासा मिळेल.

- डॉ. धनंजय केळकर, कॅन्सरतज्ज्ञ आणि वैद्यकीय संचालक, मंगेशकर हॉस्पिटल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऑनलाइन सातबारे एप्रिलपासून देणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सातबारा व फेरफार उतारे ऑनलाइन देण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचे काम पूर्णत्वाला आले असून येत्या १ एप्रिलपासून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत ऑनलाइन सातबारे देण्यास सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. काही तालुक्यांत ऑनलाइन उतारे देण्याचे काम प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले आहे.

पुणे शहर तहसील कार्यालयासह जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत ऑनलाइन सातबारे उतारे देण्यासाठी पंधरा लाखांहून अधिक सातबारा कम्प्युटराइज्ड करण्यात आले आहेत. सातबारा उतारे व फेरफार नोंदी संगणकावर नोंदवून ते ऑनलाइन देण्यापूर्वी राज्य सरकारकडून त्याला संमती घ्यावी लागते. त्यासंदर्भातील सीडी राज्य सरकारला पाठविण्यात आल्या असून त्यास मान्यताही मिळाली आहे.

सातबारा उतारा व फेरफार मिळविण्यासाठी करावी लागणारी कसरत टाळण्यासाठी राष्ट्रीय भूमी आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत ऑनलाइन सातबाराची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात ही योजना राबविली जाणार आहे. पुणे जिल्ह्यात १ एप्रिलपासून ही योजना कार्यान्वित करण्याचा महसूल प्रशासनाचा प्रयत्न आहे. हवेली तालुक्यात सातबारा उताऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याने त्याच्या डाटा एन्ट्री करण्याचे काम अधिक काळ चालले आहे. हे कामही वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

या योजनेंतर्गतच दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात खरेदीच्या दस्ताची नोंद झाल्यावर त्याची माहिती तातडीने तहसील कार्यालयांतील म्युटेशन सेलना मिळणार आहे. त्या माहितीवर लगोलग फेरफार उतारा तयार होणार आहे. फेरफार झाल्यानंतर पंधरा दिवसांत खेरदीदाराला सातबारा उतारा देण्यात येणार आहे. दस्तनोंदणीच्या वेळेस विकणारे आणि खरेदीदार दोघेही उपस्थित असतील, तर सातबारावरील नोंदीसाठी नोटीस काढण्यात येणार नाही. या खरेदीसंबंधी गावांत चावडीवर नोटीस लावण्यात येईल. त्यावर हरकत न आल्यास पंधरा दिवसांत सातबारा मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रॉपर्टी कार्डही ऑनलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सातबारा आणि फेरफार नोंदींपाठोपाठ प्रॉपर्टी कार्डसुद्धा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला असून त्यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच प्रॉपर्टी कार्डही ऑनलाइन मिळू शकणार आहे.

राष्ट्रीय भूमी आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत ई-म्युटेशन ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून सातबारा ऑनलाइन देण्याची सुविधा लवकरच सुरू होत आहे. राज्यातील तीनशेहून अधिक तालुक्यांतील सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्णत्वाला गेले आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत सातबारा संगणकीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही तालुक्यांत सातबारा ऑनलाइन देण्याचे कामही सुरू झाले आहे.

सातबारा ऑनलाइन देण्याच्या सुविधेचा थेट लाभ नागरिकांना होणार आहे. त्यापाठोपाठच आता प्रॉपर्टी कार्डसुद्धा ऑनलाइन देण्याची योजना भूमी अभिलेख विभागाने हाती घेतली आहे. पुण्याबरोबरच राज्यातील अनेक शहरांत प्रॉपर्टी कार्ड देण्यात येत आहे. तसेच, तीन हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांच्या मोजणी करून प्रॉपर्टी कार्ड देण्याची महत्त्वाकांक्षी योजना राज्यात यापूर्वी सुरू करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात तुळापूर व वढूला हे काम झाले आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील मोजणी न झालेले गाव निवडून प्रॉपर्टी कार्ड देण्याचे कामही भूमी अभिलेख खात्याकडून सुरू करण्यात आले आहे. जमिनीच्या सातबारा उताऱ्याप्रमाणेच मालमत्तेचे प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन देणे ही काळाची गरज झाली आहे. त्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून पावले उचलण्यात येत असून त्यासाठीचे सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत उपचाराचा निर्णय जारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'स्वाइन फ्लू'च्या संसर्गामुळे खासगी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवरील गरीब, आर्थिक दुर्बल घटकांना मोफत उपचाराचा लाभ देण्यावर राज्य सरकारने अखेर शिक्कामोर्तब केले. परिणामी, दोन मार्चपासून उपचार घेणाऱ्या पेशंटना वैद्यकीय परतावा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 'स्वाइन फ्लू'ची साथ सुरू झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मोफत उपचाराची घोषणा केली होती.

दोघांच्या घोषणेत मोफत उपचाराचा कोणत्या वर्गाच्या पेशंटना लाभ मिळणार याची स्पष्टता नव्हती. यावरून आरोग्य खात्याच्या अधिकारांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. त्या संदर्भात 'मटा'ने सर्वप्रथम वृत्त देऊन वाचा फोडली होती. त्याशिवाय आरोग्यमंत्र्यांनी देखील आर्थिक दुर्बल व गरीब व्हेंटिलेटरवरील पेशंटनाच लाभ मिळणार असल्याचे जाहीर केल्याचे वृत्तही प्रसिद्ध केले होते. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना या आदेशाची प्रतीक्षा होती. राज्य सरकारने घोषणेनंतर अखेर १८ दिवसानंतर हा अध्यादेश जारी केला.

दोन मार्चनंतर खासगी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या गरीब, आर्थिक दुर्बल घटकांना मोफत उपचाराचा लाभ मिळेल. त्याशिवाय उपचारानंतर पेशंट घरी परतल्यास त्याला वैद्यकीय परतावा देखील दिला जाईल. पेशंट दगावला असल्यास त्याच्या नातेवाइकांची खातरजमा करून रक्कम दिली जाईल. केंद्रीय कर्मचारी आरोग्य योजनेनुसार (सीजीएचएस) बिले आकारली जातील. खासगी हॉस्पिटलमधील उपचाराच्या खर्चाच्या बिलांची छाननीसाठी सिव्हील सर्जनच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ही समिती बिलांची छाननी करेल. तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती वैद्यकीय परताव्यासाठी मंजुरी देणार आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीतून तीन कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद केली आहे. 'स्वाइन फ्लू'ची साथ संपेपर्यंर्यंत ही मोफत उपचाराची योजना लागू राहील, असेही अध्यादेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशामुळे आता मोफत उपचाराचा मार्ग मोकळा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसचालकांचे ड्रायव्हिंग ‘रडार’वर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमुळे कोणताही गंभीर अपघात घडू नये, यासाठी 'ड्रायव्हर-चेकर स्क्वाड'ची निर्मिती केली जाणार आहे. या स्क्वाडद्वारे पीएमपीच्या बसचालकांची, बस चालविण्याच्या पद्धतीची नियमित तपासणी केली जाणार असून, त्याचा अहवाल डेपो मॅनेजरना दिला जाणार आहे.

गेल्या आठवड्यात कात्रज बसस्थानकात पीएमपी चालकाच्या चुकीमुळे दोन नागरिकांना प्राण गमवावा लागला. त्यांची गंभीर दखल पीएमपी प्रशासनाने घेतली असून, तिकीट तपासणीस पथकाप्रमाणेच चालकांच्या तपासणीसाठी नव्या विशेष पथकाची नियुक्ती केली जाणार असल्याचे सूतोवाच पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी केले.

या विशेष पथकाद्वारे पीएमपी चालकांच्या कौशल्याची तपासणी करण्यात येणार आहे. त्यात, चालक थांब्यांवर बस उभी करतात का, अधिक वेगाने बस चालवितात का, ब्रेक-क्लच आणि गिअर यांचा योग्य वापर करतात का, अशा विविध बाबींची निरीक्षणे नोंदविण्यात येणार आहेत. त्याबाबतचा, सविस्तर अहवाल डेपो मॅनेजरला सादर केला जाणार आहे, असेही डॉ. परदेशी यांनी सांगितले.

लवकरच 'बस बे'

पीएमपीच्या महत्त्वाच्या बसथांब्यांवर प्रवाशांना सुरक्षितपणे बसमध्ये चढता-उतरता यावे, यासाठी २० प्रमुख ठिकाणी 'बस बे' तयार केला जाणार असल्याचे संकेत डॉ. परदेशी यांनी दिले. यापूर्वी, केवळ बसथांब्यांवर पट्टे मारून 'बस बे' तयार केले होते; पण गर्दीच्या ठिकाणी आता बॅरिकेटिंग केले जाणार असून, बसव्यतिरिक्त इतर वाहने त्यात येऊ नयेत, याची खबरदारी घेतली जाणार आहे. वाहतूक पोलिस आणि महापालिकेच्या सहकार्याने १५ दिवसांत त्याबाबतची कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संसर्गजन्य आजारासाठी कायदा

$
0
0

मुस्तफा आतार, पुणे

स्वाइन फ्लू, चिकुनगुनिया, डेंगी, गॅस्ट्रोपासून इबोलासारख्या संसर्गजन्य आजारांवर भविष्यात नियंत्रण मिळविणे शक्य व्हावे आणि आरोग्य विभागाचा इतर खात्यांशी समन्वय साधला जावा, यासाठी महाराष्ट्र संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण कायदा करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी या संदर्भातील आदेश आरोग्य खात्याला दिले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा कायदा संमत करण्याचे सरकारचे नियोजन आहे.

'राज्यात स्वाइन फ्लू, इबोला, सिझनल फ्लू यासारख्या संसर्गजन्य आजारांबरोबरच डेंगी, मलेरिया, चिकुनगुनियासारख्या आजारांवर नियंत्रण मिळविणे हे भविष्यातील आव्हान आहे. हे आव्हान ओळखूनच संसर्गजन्य आजारांवर कायमस्वरुपी नियंत्रणासाठी आरोग्य, महापालिका, सार्वजनिक प्रशासन अशा सर्व विभागांमध्ये समन्वय गरजेचे आहे. त्यासाठी या कायद्याचा मसुदा तयार करण्याचे आदेश दिले आहेत,' अशी माहिती आरोग्य खात्याचे संचालक डॉ. सतीश पवार यांनी 'मटा'ला दिली.

संसर्गजन्य आजार असो की कोणत्याही एका आजाराची साथ नियंत्रण करणे ही एकट्या आरोग्य खात्याची जबाबदारी नाही. संसर्गजन्य तसेच साथीचे आजार नियंत्रणासाठी आरोग्य खात्याबरोबर अन्य खात्याचा संबंध येतो. परंतु त्या विभागांकडून मदत मिळेल याची खात्री नसते. आजार नियंत्रणामध्ये खासगी हॉस्पिटल, वैद्यकीय शिक्षण, महापालिका, नगरविकास, ग्रामविकास, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांच्या मदतीची आवश्यकता असते. विभागांशी समन्वय साधला गेला तरी त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही अथवा जबाबदारी स्वीकारली जात नाही. परिणामी, साथरोग नियंत्रणात अनेक अडचणी येतात. त्यामुळे संससर्गजन्य आजार प्रतिबंध कायदा अस्तित्वात आला तर विभागांशी समन्वय साधून आजार नियंत्रणात आणणे शक्य होणार आहे, असेही डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. कायद्याला येत्या महिन्याभरात निश्चित स्वरूप प्राप्त होईल. कायद्याच्या आधारे तांत्रिक मार्गदर्शनासाठी देखील स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीची देखील आम्ही मदत घेणार आहोत.

- डॉ. सतीश पवार, आरोग्य संचालक, आरोग्य खाते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images