Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

साखर, तेल स्वस्त; ज्वारी, बाजरी स्थिर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

येणारा नवीन माल अवकाळी पावसामुळे खराब झाल्याने मसूरडाळ, उडीदडाळीच्या दरात अनुक्रमे दोनशे आणि शंभर रुपयांनी वाढ झाली आहे. त्याशिवाय साखरेसह खाद्यतेलाचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत उतरले आहेत. ज्वारी, बाजरी, रवा, आटा, मैदा, धणे, मिरची, पोहे, मका, गोटा खोबऱ्याचे दर स्थिर आहेत. साखरेला उठाव कमी असून, पुरवठा अधिक आहे. साखरेच्या दरात क्विंटलमागे ५० रुपयांनी घट झाली आहे. शेंगदाणा, तसेच खोबरेल तेल वगळता अन्य सर्व खाद्यतेलांमध्ये पंधरा किलोमागे १० रुपयांनी घट झाली आहे. भाजक्या डाळीच्या दरात ४० किलोमागे ३० ते ४० रुपयांची घट झाली, तर बेसनाच्या दरात ५० किलोमागे ४० रुपये घट झाली आहे.

मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे नव्या उत्पादनाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मसूरडाळीच्या दरात क्विंटलमागे २०० रुपयांनी, तर उडीदडाळीच्या दरात १०० ते २०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. मटकी, मूगडाळ, तूरडाळ, हरभरा डाळीचे दर स्थिर आहेत. गुळाचे आठ ते दहा हजार डाग आणि दीड ते दोन हजार पेट्या आवक झाली आहे. पाडव्याला गुळाला अधिक मागणी असल्याने त्यात क्विंटलमागे ५० ते ७५ रुपये वाढ झाली आहे. पाटण, कराड, येथून गुळाची आवक होते. राहू तसेच कासार, सिरसी, निलंगा, सोलापूर येथून गावरान गुळाची आवक होते. चांगल्या दर्जाचे गहू बाजारात उपलब्ध असल्याने त्याच्या दरात ५० ते ७५ रुपये वाढ झाली आहे. ज्वारी, बाजरीचे दर स्थिर आहेत.

डाळ

तूरडाळ ७८०० ते ८८००

हरभरा डाळ ४४०० ते ५०००

मूगडाळ ९५०० ते १०५००

मसूरडाळ ६२०० ते ६४००

मटकीडाळ ८६०० ते ८८००

उडीदडाळ ८२०० ते ९०००

भुसार मालाचे भाव (₨)

साखर (क्विंटल)

२४०० ते २४५०

खाद्यतेलाचे भाव (१५ लिटर)

शेंगदाणा तेल १४५० ते १५५०

रिफाइंड तेल १४५० ते १८५०

सरकी तेल ८७० ते १०२०

सोयाबीन तेल ९७० ते १०५०

पामतेल ८०० ते ८७५

सूर्यफूल रिफाइंड

तेल ९९० ते ११००

वनस्पती तूप ७५० ते ९८०

खोबरेल तेल २२५०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घेवडा, मटार, कारली, पालेभाज्या महाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मार्केट यार्डातील घाऊक बाजारात गुढी पाडव्यामुळे रविवारी शेतीमालाची आवक घटली आहे. त्यामुळे कारली, डिंगरी, घेवडा आणि परराज्यातील मटारचे दर वीस ते तीस टक्क्यांनी वाढले आहेत. तसेच लसूण, गवार, हिरव्या मिरचीचे दरदेखील दहा ते वीस टक्क्यांनी उतरले आहेत. पालेभाज्यांचे भावही वाढले आहेत.

मार्केट यार्डातील बाजारात रविवारी दीडशे ट्रक फळभाज्यांची आवक झाली. मध्य प्रदेशातून चार ते पाच ट्रक मटार, राजस्थानमधून चार ट्रक गाजर, कर्नाटकातून तीन ट्रक कोबी या भाज्यांची आवक झाली. कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून आठ ते दहा टेम्पो हिरवी मिरची, तसेच आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमधून चार ते पाच टेम्पो शेवग्याची आवक झाली. कर्नाटकातून तीन ते चार टेम्पो तोतापुरी कैरीची आवक झाली.

सातारी आल्याची ३५० ते ४०० पोती, टोमॅटोच्या पाच ते साडेपाच हजार पेट्या, फ्लॉवरचे १४ ते १५ टेम्पो, सिमला मिरचीच्या आठ ते १० टेम्पोंची आवक झाली. सातारा, वाई, पुरंदर येथून मटारच्या २०० गोण्या, तर चिंचेच्या शंभर पोत्यांची आवक झाली. १५० ट्रक कांद्याचीही आवक झाली. इंदूर, आग्रा, गुजरात आणि स्थानिक भागातून बटाट्याचे ६० ते ७० ट्रक, तसेच मध्य प्रदेशातून लसणाच्या चार हजार गोणींची आवक झाली आहे, अशी माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत बाजारात फळभाज्यांची आवक घटली आहे. गुढी पाडव्यामुळे रविवारी शेतीमालाची आवक घटली. त्याचा परिणाम फळभाज्यांच्या किमतीवर झाला. काही भाज्यांचे दर वाढले आहेत, तर काहींचे कमी झाले आहेत. बटाट्याच्या दरात दहा किलोमागे ४० रुपयांची वाढ झाली. कांद्याच्या दरात ४० रुपये, लसणाच्या दरात २०० रुपये, तर सुरती गवारीच्या दरात १०० रुपये वाढ झाली. हिरव्या मिरचीचे दर १५० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. कोथिंबिरीच्या दोन लाख ५० हजार जुड्यांची, तर मेथीच्या ४० हजार जुड्यांची आवक झाली. कोथिंबिरीच्या दरात शंभर जुड्यांमागे १०० रुपयांनी घट झाली आहे. चाकवत, करडईत प्रत्येकी शंभर रुपयांची घट झाली आहे. मेथी, कांदापात, अंबाडीच्या दरात शंभर रुपयांची दरवाढ झाली आहे.

फुलांची आवक घटली

गेल्या आठवड्याच्या तुलनेत फुलांची आक घटली आहे. पाडव्याच्या सणानंतर फुलांना मागणी घटली असून, फुलांच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी दरवाढ झाली आहे.

द्राक्षे, डाळिंब, पेरूचे दर तेजीत

गेल्या आठवड्याच्या तुलनेत द्राक्ष वगळता इतर फळांची आवक घटली आहे. परिणामी, द्राक्षे, डाळिंब आणि पेरूचे दर वाढले आहेत. लिंबाचीही आवक घटली असल्याने गोणीमागे ४०० रुपयांची दरवाढ झाली. गुलटेकडी येथील मार्केट यार्डात लिंबाच्या दोन ते तीन हजार गोण्यांची रविवारी आवक झाली. डाळिंबाची १५ टन, मोसंबीचे २० टेम्पो, संत्र्याचे १० टेम्पो, तर पपईच्या १० ते १५ टेम्पोंची आवक झाली. चिकूच्या ५०० गोण्या, पेरूच्या ५० क्रेटची आवक झाली. आंब्याच्या ४०० ते ५०० पेट्या, तसेच कलिंगडाचे साठ ते सत्तर टेम्पो, खरबुजाचे २० ते २५ टेम्पो एवढी आवक झाली आहे. द्राक्षाची २५ ते ३० टन, स्ट्रॉबेरीची दोन टन, तर रत्नागिरी हापूस आंब्याच्या एक हजार ते बाराशे पेट्यांची आवक झाली.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत डाळिंबाची आवक घटली असल्याने दरामध्ये ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. द्राक्षाची आवक स्थिर असून, मागणी जास्त झाल्याने एक टक्क्याने दरवाढ झाली आहे. स्ट्रॉबेरीमध्येही २० ते ३० टक्क्यांनी घट झाली. उन्हाचा तडाखा वाढू लागला असून, दिवसेंदिवस लिंबाला मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत बाजारात लिंबाची आवक घटली असल्याने दरामध्ये गोणीमागे चारशे रुपयांची दरवाढ झाली.

मागणीअभावी मासळीचे दर स्थिर

गेल्या आठवड्याच्या तुलनेत मासळीला मागणी घटली आहे. त्यातच आवकही कमी झाली आहे. त्यामुळे बाजारात आलेल्या सर्व मासळीचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. गणेश पेठ येथील मासळीच्या बाजारात खोल समुद्रातील मासळीची साडेसहा टन, खाडीच्या मासळीची शंभर ते दीडशे किलो, नदीच्या मासळीची दोनशे ते तीनशे किलो एवढी आवक रविवारी झाली. आंध्र प्रदेशातून दहा टन आवक झाली आहे. गुजरात आणि रत्नागिरी येथून मोठ्या प्रमाणावर मासळीची आवक सुरू आहे. आंध्रातील समुद्रातील मासळीची आवक कमी होऊ लागली असल्याने आगामी काळात आवक घटणार आहे. त्यामुळे मासळीचे दर वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज परदेशी यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्कॉलरशिप’ विद्यार्थ्यांची; परीक्षा पालकांची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या रविवारच्या स्कॉलरशिप परीक्षेने विद्यार्थ्यांसोबतच पालकांचाही कस लावल्याचे शहरातील विविध परीक्षा केंद्रांवरून अनुभवायला मिळाले. उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या पालकांना पाल्यांचे हसरे चेहरे पाहूनच काय ते समाधान मिळाले असले, तरी प्रश्नपत्रिकांच्या माध्यमाच्या गोंधळामुळे पालकांनी शिक्षण खात्याच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राज्यभरातील चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने रविवारी स्कॉलरशिपच्या परीक्षेचे आयोजन केले होते. यंदा चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी एकूण नऊ लाख २७ हजार ७८९ विद्यार्थ्यांनी, तर सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी एकूण सहा लाख ६७ हजार ६२५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पुणे जिल्ह्यातून चौथी आणि सातवीच्या एकूण एक लाख ३४ हजार ५६४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. शहर आणि जिल्हाभरातील एकूण ६७८ केंद्रांवरून विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. सकाळी ११ ते सायंकाळी चार या वेळेत तीन पेपर घेण्यात आले. परीक्षेसाठी पाल्यांची ने-आण करण्याची जबाबदारी आणि दोन पेपरदरम्यानच्या काळात त्यांच्यासाठी नाष्टा-जेवण पुरवणे आणि त्यांचा अभ्यास घेणे अशा जबाबदाऱ्यांमुळे परीक्षार्थींच्या पालकांचीही चांगलीच धांदल उडाल्याचे रविवारी शहरात दिसून आले. उन्हाचा चटका वाढल्याने, पेपर सुरू असताना अनेक पालकांनी परीक्षा केंद्रांच्या आवारामध्येच वामकुक्षी घेणे पसंत केल्याचेही दिसून आले.

आंबेगावमध्ये चुकीच्या माध्यमाचे पेपर

आंबेगाव बुद्रुक परिसरातील स्प्रिंगडेल स्कूलमधील परीक्षा केंद्रावर चौथीच्या इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातील प्रश्नपत्रिका देण्याचा प्रकार घडला. 'बुद्धिमत्ता चाचणी व परिसर अभ्यास २'च्या प्रश्नपत्रिकांच्या गठ्ठ्यावर नोंदवलेले माध्यम चुकल्याने हा प्रकार घडला. त्यानंतर लगेचच आजूबाजूच्या केंद्रांच्या मदतीने या केंद्रावरील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातील प्रश्नपत्रिका देण्यात आल्या; मात्र या दरम्यानच्या काळात परीक्षेला तासभर उशीर झाला. त्यामुळेच दुपारी तीन ते चार या वेळेतील हा पेपर सायंकाळी चार ते पाच या वेळेत घेण्यात आला. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागल्याची ओरड पालकांनी केली. या विषयी परीक्षा परिषदेमधील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक्स्प्रेस वेवर अपघातात दोन ठार

$
0
0

लोणावळाः मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर ताजे पेट्रोलपंपासमोर स्विफ्ट कार आणि आयशर टेम्पोच्या अपघातात दोन जण ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सत्यप्रकाश परतनाथ यादव (वय २९, रा. मुंबई), मंदार सिद्धेश्वर देव ( वय-५०, रा. माहिम, मुंबई) असे एक्स्प्रेस वेवर ताजे पेट्रोल पंपासमोरील अपघातातील मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर जुन्या राष्ट्रीय मार्गावरील वलवण पुलाखाली झालेल्या अपघातात प्रदीप बबल्या भताडे (२५, रा. अन्टॉपहिल, वडाळा, मुंबई) याचा मृत्यू झाला असून, दीपक लक्ष्मण गायकर (२५, रा. घाटकोपर, मुंबई) हा गंभीर जखमी झाला आहे. कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याकडे भरधाव वेगात जाणारी स्विफ्ट कार ही पुढे जात असलेल्या आयशर टेम्पोवर मागून जोरात आदळली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मलनि:सारण प्रकल्पाला मान्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या पहिल्या मलनि:सारण प्रकल्पाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. बुटी स्ट्रिट येथे शाळेच्या मैदानावर २० एमएलडी क्षमतेचा हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मात्र, हा प्रकल्प नागरी वस्तीत असून, त्यासाठी शाळा स्थलांतरीत करावी लागणार असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी प्रकल्पाला विरोध केला आहे. बोर्डाने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात या प्रकल्पाला मान्यता दिली होती. त्यानंतर या प्रकल्पाचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता. संरक्षण मंत्रालयाकडून या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बोर्डाकडून प्रथमच २० एमएलडी क्षमतेचा मलनि:सारण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मात्र, या प्रकल्पासाठी बुटी स्ट्रिट येथे असलेल्या रवींद्रनाथ टागोर शाळेचे स्थलांतर करावे लागणार आहे. त्यासाठी नवीन जागा बोर्डाकडून अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. बाबाजान चौकाजवळ असलेल्या बोर्डाच्या गोडाउनची जुनी इमारत त्यासाठी सुचविण्यात आलेली आहे. मात्र, या ठिकाणी मोकळी जागा नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.

या प्रकल्पाला सुरुवातीपासून अडथळे आले आहेत. हा प्रकल्प नागरी वस्तीत असल्याने प्रकल्पाच्या उभारणीस विरोध झाला होता. तरीही बोर्डाने या प्रकल्पाला मान्यता देऊन अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे पाठविला होता. तसेच या कामाचे कंत्राट देण्यात आलेल्या कंत्राटदाराविरुद्धही तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे अडचण निर्माण झाली होती. संबंधित कंत्राटदाराने शिर्डी येथे मलनि:सारण प्रकल्प बांधला आहे. शिर्डी नगरपरिषदेतर्फे उभारलेल्या या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी बोर्डाला सल्लागार नेमावा लागला. सल्लागाराचा पाहणी अहवाल सकारात्मक आल्यानंतर बोर्डाने या प्रकल्पाला मान्यता दिली होती.

प्रकल्प उभारू देणार नाही!

हा प्रकल्प नागरी वस्तीमध्ये आहे. तसेच या प्रकल्पामुळे रवींद्रनाथ टागोर शाळेतील विद्यार्थ्यांना त्रास होणार आहे. मैदान नसल्याने या परिसरातील मुलांनी खेळायचे कोठे, असे सवाल काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक अशोक पवार यांनी केला आहे. बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत या विषयावरून झालेल्या चर्चेच्या वेळीही त्यांनी विरोध दर्शविला. स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने त्रासदायक असलेला हा प्रकल्प उभारू देणार नाही, असा इशारा नगरसेवक पवार यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदाराच्या इन्स्टिट्यूटमध्ये पिंपरीत चोरीचा प्रयत्न

$
0
0

पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांच्या कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये चोरट्यांनी कम्प्युटर चोरीचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्यात यश आले नाही. पिंपरीच्या डिलक्स चौकातील नालंदा कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये शनिवारी (२१ मार्च) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

अमरदीप गुंडे (३०, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील डिलक्स चौकामध्ये आमदार अॅड. चाबुकस्वार यांची नालंदा या नावाने कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे. याच इमारतीमध्ये अॅड. चाबुकस्वार यांचे जनसंपर्क कार्यालय देखील आहे. शुक्रवारी मध्यरात्री ते शनिवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी इन्स्टिट्यूटच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कागदपत्रे फेकून दिली. कम्प्युटर चोरीचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांना अपयश आले. 'कागदपत्रे चोरट्यांनी तपासली याचा अर्थ हा राजकीय हेतूने केलेला प्रकार असून, माझ्या बाबतीत असे घडत असेल तर सामान्यांचे काय,' असा सवाल आमदार अॅड. चाबुकस्वार यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारूला पैसे न दिल्याने चाकू हल्ला

$
0
0

पुणे : दारू पिण्यास पैसे न दिल्याने व्यावसायिकावर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार मार्केट यार्ड परिसरातील प्रेमनगर येथे घडला. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. प्रेमनगर येथे पुजा सुपर मार्केट दुकानाचे मालक गंगाराम चौधरी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. चौधरी यांच्यावर महादू काळू पुटगे (वय २०, रा. प्रेमनगर) याने चाकूने वार केले आहेत. मार्केट यार्ड पोलिसांनी पुटगे याला अटक केली आहे. पुटगे याने चौधरी यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. चौधरी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता पुटगेने त्यांच्यावर चाकूने वार केले. त्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय अधीक्षकांची परदेश वारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

राज्यासह शहरात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने सर्व आरोग्य अधिकाऱ्यांच्या, डॉक्टरांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. तसेच जे सुट्टीवर आहेत, त्यांना कामावर बोलावून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे असताना महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती हॉस्पिटलचे (वायसीएमएच) वैद्यकीय अधीक्षक परदेश वारीला गेले आहेत. तर उपअधीक्षक पदावर कोणत्याही डॉक्टरांची कायमस्वरूपी नियुक्ती अजून करण्यात आलेली नाही. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाचा गोंधळ अद्याप कायम असून, सरकार दरबारी हे प्रकरण प्रलंबित आहे.

राज्यात स्वाइन फ्लूचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. आत्तापर्यंत पिंपरी-चिंचवडमध्ये २४ जणांचा स्वाइन फ्लूने बळी गेला. तर सध्या लागण झालेल्या ४० पेशंटवर उपचार सुरू आहेत. वायसीएमचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख सध्या परदेशात गेले आहेत. ते सुट्टी घेऊन, परदेशात गेल्याचे प्रशासनाने म्हणणे आहे. मात्र, जर सरकारने सुट्ट्या रद्द करून सर्वांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले असताना, डॉ. देशमुखांना वेगळा न्याय का हा प्रश्न आहे.

दुसरीकडे वैद्यकीय उपाधीक्षक पदावरून काही दिवसांपूर्वी डॉ. प्रल्हाद भगत निवृत्त झाले. त्यांच्या जागेवर कोणत्याही डॉक्टरांची अद्याप कायम स्वरूपी नियुक्ती करण्यात आलेली नाही. तसेच डॉ. अनिल रॉय यांच्याकडे आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाचा पदभार सोपविण्यात आला. मात्र, त्यावरून वाद सुरू आहे. डॉ. रॉय यांच्याकडे राजकीय सोयीसाठी पदभार सोपविण्यात आल्याचा आरोप काही अधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच त्यांच्यासाठी काही नगर सदस्यांनी प्रशासनावर हेतूपुरस्कृत दबाव आणल्याचेही म्हणणे आहे. मात्र, डॉ. रॉय यांच्याकडे पदभार सोपविणे ही प्रक्रिया कायदेशीर असल्याचे प्रशासनाने म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी याबाबत सर्वसाधारण सभेतदेखील वादळी चर्चा झाली होती. पण सदस्यांनी देखील यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याकडे दुर्लक्ष केले आहे. तर काही सदस्यांनी प्रशासनावर फौजदारी करण्याचे सभागृहात बोलून दाखविले.

मुंबई महापालिका अधिनियमानुसार कोणत्याही अधिकाऱ्याकडे पदभार सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ कायम ठेवायचा असल्यास सरकारकडून तसा प्रस्ताव मंजूर करून घ्यावा लागतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. पण डॉ. रॉय यांना आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावर नियुक्त करून बराच कालावधी उलटला असून, यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

'कोणत्याही अधिकाऱ्याशिवाय काम अडले नाही'

वायसीएमचे वैद्यकीय अधीक्षक त्यांच्या महत्त्वाच्या कामासाठी परदेशात गेले आहेत. तसेच डॉ. रॉय यांच्याकडे सोपविण्यात आलेला पदभार कायम करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हे सर्व असले तरी स्वाइन फ्लू अथवा अन्य कोणत्याही प्रकारचे काम हे कोणत्याही अधिकाऱ्याच्या शिवाय अडलेले नाही. असे महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी 'मटा'ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘रुपी’चे विलीनीकरण २ महिन्यांत शक्य?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'अनेक दिवसांपासून रखडलेल्या रुपी बँकेच्या विलिनीकरणाबाबत लवकरच मार्ग निघण्याची चिन्हे आहेत. कॉर्पोरेशन बँकेने रुपी बँकेच्या विलिनीकरणाची तयारी दर्शवली आहे. त्याबाबत रिझर्व्ह बँकेने काही अटी घातल्या असून, त्याबाबत रुपी बँकेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय घ्यावा लागेल. हे निर्णय झाल्यास दोन महिन्यात बँकेचे विलिनीकरण होऊन ठेवीदारांना दिलासा मिळू शकेल,' असे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सांगितले.

'नुकतेच मुख्यमंत्र्यांनी रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरांना भेटीसाठी बोलावले होते. त्या वेळी रुपी बँकेच्या विलिनीकरणाविषयी चर्चा झाली. कॉर्पोरेशन बँकेने रुपी बँकेचे विलिनीकरण करून घेण्याची तयारी दाखवली आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेने काही अटींवर 'एनओसी' दिली आहे. या अटींमध्ये व्हीआरएस व इतर आनुषंगिक खर्चांची रक्कम काही मोठ्या ठेवीदारांना भरावी लागेल, अशी अट आहे. अशा आशयाचा ठराव रुपी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मान्य करावा लागेल. रुपी बँकेच्या प्रशासक मंडळाची वाढीव मुदत संपणार असल्याने दोन महिन्यांतच निर्णय घ्यावा लागेल,' असे ते म्हणाले. 'एक लाखाहून अधिक सोसायट्यांचे अस्तित्व केवळ कागदोपत्री आहे. अशा संस्थांना नोटीस बजावून अस्तित्व सिद्ध करण्यास सांगण्यात येणार आहे,' असेही ते म्हणाले.

'गृहनिर्माण सोसायट्यांसाठी वेगळा विचार'

'सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांचा कारभारही सहकार विभागाअंतर्गतच चालतो. राज्यात सुमारे एक लाखभर सहकारी गृहनिर्माण सोसायट्या आहेत. या सोसायट्यांमध्ये अनेक प्रकार आहेत. या सर्व सोसायट्यांच्या केस सहकार विभागातच चालतात. त्यामुळे विभागावरील ताण कमी करण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांसाठी वेगळी व्यवस्था करण्याचा विचार करावा लागेल,' असे सूतोवाचही पाटील यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोरेगाव पार्कजवळ दुचाकीस्वार ठार

$
0
0

पुणे : कोरेगाव पार्क येथील नॉर्थ मेन रोडवर कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीतेश ईश्वरलाल जेटवाणी (वय १९, विश्रांतवाडी) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. शनिवारी मध्यरात्री नीतेश मोटारसायकलवरून जात असताना भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात कारने त्याला जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी होऊन नीतेशचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भामा आसखेड’चा निधी पळविण्याचा प्रयत्न अयशस्वी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भामा आसखेड प्रकल्पातून शहराच्या पूर्व भागाला पाणी आणण्यासाठी महापालिकेच्या बजेटमध्ये ठेवण्यात आलेल्या निधीतून २५ लाख रुपये वर्गीकरणाद्वारे पळविण्याचा भाजपच्या नगरसेवकाने केलेला प्रयत्न अपयशी ठरला. जेएनएनयूआरएम योजनेअतंर्गत या प्रकल्पासाठी निधी दिला जात असून याचे वर्गीकरण होणार नाही, असा खुलासा पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे सर्वसाधारण सभेने हा प्रस्ताव दफ्तरी दाखल केला.

वडगाव शेरी भागातील नागरिकांना जाणवणारी पाण्याची टंचाई सोडविण्यासाठी भामा आसखेड धरणातून पाणी आणले जाणार आहे. या कामाचा प्रारंभही गेल्या वर्षी करण्यात आला. भामा आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठी आवश्यक प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेच्या २०१४-१५ च्या बजेटमध्ये एक कोटी १४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातील २५ लाख रुपयांचे वर्गीकरण करून सादलबाबा दर्गा परिसरात पाण्याची टाकी बांधण्याचा प्रस्ताव स्थानिक नगरसेवक योगेश मुळीक आणि मीना परदेशी यांनी दिला होता. मुळीक स्थायी समितीचे सदस्य असल्याने समितीच्या बैठकीत हा वर्गीकरणाचा प्रस्ताव रेटून नेण्यात आला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेकडे हा प्रस्ताव मान्यतेसाठी आला असताना, सभागृहात काही सभासदांनी त्याची माहिती मागवून, त्याचा खुलासा करण्याची मागणी प्रशासनाकडे केली. हा निधी वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून दिल्यास भामा आसखेड प्रकल्पाच्या कामामध्ये काही व्यत्यय येईल का, अशी विचारणा प्रशासनाकडे करण्यात आली.

भामा आसखेड प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेच्या माध्यमातून निधी मिळाला आहे. यातील काही निधी महापालिकेला आपल्या तिजोरीतून टाकायचा असून, बजेटमध्ये या कामासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हा निधी वर्गीकरण करता येणार नाही, असा खुलासा पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाइन फ्लू’ने एका महिलेचा मृत्यू

$
0
0

पुणे : 'स्वाइन फ्लू'च्या संसर्गामुळे पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये राजगुरुनगर येथील एका महिलेचा मृत्यू झाला. यामुळे पिंपरीतील मृतांची संख्या २६ झाली आहे. तर पुण्यात चौघांना नव्याने लागण झाली. त्याशिवाय २३ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहेत.

पिंपरीच्या हॉस्पिटलमध्ये राजगुरुनगर येथील एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. संसर्गामुळे दगावलेल्या पेशंटची संख्या २६ वर गेली आहे. या महिलेला १५ मार्चला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. महिलेला संसर्ग झाल्याचे १७ मार्चला निदान झाले. मात्र, उपचारादरम्यान महिलेचा रविवारी दुपारी मृत्यू झाला. पुणे पालिकेच्या दवाखान्यात ६६२ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात १३८ जणांना टॅमी फ्लू देण्यात आले. त्यापैकी चौघांना लागण झाली आहे, तर २३ जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.

राज्यात ७५ नवे पेशंट आढळले आहेत. राज्यातील लागण झालेल्यांची संख्या ४०८२ झाली आहे. आतापर्यंत राज्यात ३४७ जणांचा मृत्यू झाला आहे. विविध जिल्ह्यात ३७८ पेशंट हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आली. त्यापैकी ४२ जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वस्त औषधांसाठी सरकारतर्फे प्रयत्न करू’

$
0
0

पुणे : 'औषध संघटनेने सामान्यांना परवडणारी औषधे देण्याची आणलेली योजना चागंली आहे. ज्येष्ठ नागरिकांसह गरिबांना स्वस्तात औषधे देण्यासाठी राज्य सरकारमार्फत प्रयत्न करू,' असे आश्वासन राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले.

केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट, भारती विद्यापीठ परिसर ज्येष्ठ नागरिक संघ, श्रीधननगर परिसर ज्येष्ठ नागरिक संघ धनकवडी यांच्या वतीने 'क्यू मॅप' या स्वस्तातील औषध विभागाचे उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. महापौर दत्तात्रय धनकवडे, अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष आमदार जगन्नाथ शिंदे, आमदार भीमराव तापकीर, स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम, औषध विक्रेता संघटनेचे सचिव विनय श्रॉफ, सहसचिव मदन पाटील या वेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारकडे ६०० कोटी थकबाकी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिकेचे प्रमुख उत्पन्न स्रोत असलेला स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द होण्याची चिन्हे असतानाच, राज्य सरकारकडे पालिकेची तब्बल सहाशे कोटी रुपयांची थकबाकी आहे. भारतीय जनता पक्षाचे आठ आमदार पुणेकरांनी विधिमंडळात पाठविले असून, सरकारकडून महापालिकेची 'शत प्रतिशत' थकबाकी वसूल करून शहराच्या विकासाला चालना देण्याची अपेक्षा केली जात आहे.

महापालिकेच्या तिजोरीत एलबीटीतून एक हजार कोटी रुपयांहून अधिकचा महसूल गोळा होतो. हा करच रद्द करण्याचे सरकारने जाहीर केले, तर पालिकेच्या तिजोरीवर मोठा ताण येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे, थकबाकी वसुलीवर लक्ष केंद्रित करण्याचे पालिकेने ठरविले आहे. पालिकेच्या विविध विभागांसह राज्य सरकारकडेही पालिकेची तब्बल सहाशे कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्याबाबत, पालिकेकडून राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला गेला असला, तरी अद्याप थकबाकीचा प्रश्न मिटलेला नाही. त्यामुळे शहराच्या विकासकामांवर मर्यादा येत असून अनेक कामे प्रलंबित राहिली आहेत. शहराच्या विकासासाठी पुणेकरांनी भाजपच्या आठ आमदारांना विधिमंडळात पाठविले असून, आता त्यांनीच शहराच्या विकासासाठी हा थकित निधी पालिकेला मिळवून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी पुण्यात घेतलेल्या बैठकीमध्ये सरकारच्या प्रत्येक खात्याकडे असलेली पालिकेची थकित रक्कम तातडीने अदा करावी, असे आदेश दिले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही सरकारकडून पालिकेला अद्याप एक रुपयाही प्राप्त झालेला नाही. मुद्रांक शुल्कावरील एलबीटीसाठीच्या एक टक्का अधिभाराचे १३५ कोटी रुपयेही पालिकेच्या खात्यात जमा करावेत, असे आदेशही काढण्यात आले आहेत. परंतु, ही रक्कमही अद्याप मिळालेली नाही.

विभाग थकीत रक्कम

(सर्व आकडे कोटी रुपयांमध्ये)

जेएनएनयूआरएम

(राज्य सरकारचा हिस्सा) २२४.६३

एलबीटी १३५

पाणीपुरवठा ९३.२२

करआकारणी व करसंकलन ४५.८६

शिक्षण मंडळ ३९.९३

आरोग्य ३३.८४

डीपीडीसी (खासदार, आमदार निधी) २५.८५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवार-BJP ची पुन्हा ‘साखरपेरणी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती भेटीनंतर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये पुन्हा 'साखरपेरणी' होणार आहे. पवार यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत साखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पवार यांच्या उपस्थितीत भाजप सरकार साखर उद्योगाचे पुढील वीस वर्षांचे नियोजन करणार आहे.

एप्रिल महिन्यात मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दोन दिवसांच्या साखर परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिली. या परिषदेस राज्यातील साखर कारखान्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी, एमडी आणि तांत्रिक अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये साखर उद्योगापुढील प्रश्न आणि त्यावरील उपाययोजना, तसेच भविष्यातील धोरणे यावर विचारमंथन होणार आहे. गेल्या काही काळात साखर उद्योगाला विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. यंदा साखरेचे दर कोसळल्याने ऊस उत्पादकांना वाजवी दर (एफआरपी) देणे राज्यातील बहुसंख्य कारखान्यांना शक्य झालेले नाही. त्यामुळे या संदर्भात काय धोरणे असावीत, या विषयावर परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे. त्याबरोबरच साखरेचे वारेमाप उत्पादन मर्यादेत ठेवून दर स्थिर राखण्यासाठी उसापासून थेट इथेनॉलचे उत्पादन करण्यासंदर्भात काही धोरणे स्वीकारता येतील का, या विषयावरही परिषदेत मंथन होणार आहे.

दरम्यान, गेल्या काही काळात राज्य व देशात घडलेल्या घडामोडींमुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जवळिकीची चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या राज्य सरकारला राष्ट्रवादीने न मागता दिलेला पाठिंबा, तसेच विधान परिषदेच्या सभापतीच्या निवडीमध्ये भाजपने राष्ट्रवादीला केलेली मदत, यांमुळे दोन्ही पक्षांत गुफ्तगू सुरू झाल्याची टीका होत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार यांच्या आमंत्रणावरून बारामतीला भेट दिली आणि दोन्ही नेत्यांनी परस्परांवर स्तुतिसुमनांचा वर्षावही केला होता. तसेच साखर उद्योगांच्या प्रश्नांतून मार्ग काढण्यासाठीही भाजप सरकार पवार यांच्याकडून मार्गदर्शन घेत असल्याचे समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर या परिषदेवरून राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

'केंद्राकडे जाणार'

साखरेच्या दरात सातत्याने घसरण सुरू झाल्यामुळे एफआरपीचा प्रश्न अधिक तीव्र होऊ लागला आहे. साखरेचा दर आणि एफआरपी यांच्यामध्ये किती तफावत येते, याचा अभ्यास सुरू असून या विषयावर लवकरच केंद्र सरकारकडे जाणार असल्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‍परशुराम वाडेकर स्वगृही परतणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न दिल्यामुळे नाराज होऊन शिवसेनेत गेलेले रिपब्लिकन पक्षाचे माजी शहराध्यक्ष परशुराम वाडेकर पुन्हा स्वगृही परतणार आहेत. 'आरपीआय'चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची भेट घेऊन वाडेकर यांनी पुन्हा पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शिवसेनेत मन रमत नसल्याने ते पुन्हा 'आरपीआय'मध्ये येणार असल्याच्या माहितीला शहर 'आरपीआय'च्या नेत्यांनी दुजोरा दिला.

विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये फूट पडल्याने 'आरपीआय'च्या स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या निवडणुकीच्या काळात वाडेकर यांनी विधानसभेचे तिकीट मिळण्यासाठी 'आरपीआय'ला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश करून सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होत‌ी. त्यामध्ये त्यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. निवडणुकीनंतर शिवसेनेच्या शहर कार्यकारिणीमध्ये त्यांना कोणतीही जबाबदारी देण्यात न आल्याने ते नाराज होते. त्यांनी पुन्हा आपल्या जुन्या घरी, 'आरपीआय'मध्ये येण्याची इच्छा व्यक्त करत त्यांनी पक्षाचे अध्यक्ष आठवले यांची भेट घेतली.

आठवले यांनी त्यांना 'कामाला लागा,' अशा सूचनाही दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मुंबई येथे जाऊन वाडेकर यांनी आठवले यांची भेट घेतली. त्या वेळी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, अशोक शिरोळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी मी पहिल्यापासून मनाने 'आरपीआय'मध्येच होतो. आंबेडकरी विचारांचा पगडा मनावर असल्याने शिवसेनेत मन लागत नव्हते. त्यामुळे पुन्हा 'आरपीआय'मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे नेते रामदास आठवले यांच‌ी भेट घेऊन चर्चा करण्यात आली आहे.

- परशुराम वाडेकर, माजी शहराध्यक्ष, आरपीआय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवना धरणात ४ विद्यार्थी बुडाले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

पवना धरणाच्या परिसरात फिरायला आलेले ताथवडे येथील जेएसपीएम कॉलेजचे चार विद्यार्थी रविवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास धरणात बुडाले. त्यातील एका विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, तिघांचा अद्याप शोध सुरू आहे.

भाऊसाहेब शिवाजी सोनवणे (वय २१, रा. थेरगाव, चिंचवड) असे बुडून मरण पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे, तर शुभम मुळे (वय २१, रा. गेवराई, बीड), निकेत येवले (वय २१, रा. मूळ अकोला, सध्या कात्रज), किरण अहंकारे (वय २१, रा. पिंपरी) हे तिघे जण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हे चौघेही डी. फार्मसीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होते.

जेएसपीएम कॉलेजचे नऊ विद्यार्थी रविवारी दुपारी चारच्या सुमारास पवना धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. साडेचारच्या सुमारास आंबेगावच्या हद्दीतील चोक्सी यांच्या बंगल्यासमोर हे सर्व विद्यार्थी पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने आणि पोहताना दम लागल्याने हे चौघेही पाण्यात बुडू लागले. इतर पाच जण बाहेर निघाले, त्यांनी आरडाओरडा करून या चौघांना वाचविण्यासाठी लोहगड बोट क्लबकडे धाव घेतली. तेथील अशोक राजिवडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनेसंदर्भात लोणावळा ग्रामीण पोलिसांनाही माहिती दिली. पोलिस निरीक्षक प्रदीप काळे, शिवाजी दरेकर, मोहन ठोंबरे यांनी स्थानिकांच्या मदतीने चौघांचा शोध सुरू केला. त्यानंतर सोनवणेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मात्र, अंधार पडल्याने शोधकार्य थांबवण्यात आले असून उद्या पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हार्ट-डायबेटिसची औषधे स्वस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

औषधांवरील खर्च ज्येष्ठ नागरिकांसह दारिद्र्य रेषेखालील तसेच दुर्बल घटकांना परवडत नाही. या घटकांसाठी 'क्यू मॅप'च्या माध्यमातून हृदयविकार, मधुमेहाची २३ प्रकारची औषधे इतर ब्रँडेड औषधांच्या तुलनेत ४० ते ५० टक्क्यांनी स्वस्त दरात उपलब्ध करण्यात आली आहेत. औषधांमध्ये गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकतेवर भर देण्यात आला आहे.

'पुण्यात चार विक्रेत्यांकडे ही औषधे धनकवडी, बालाजीनगर, बिबवेवाडी सहकारनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी औषधे उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्या टप्प्याने पुणे पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यात उपलब्ध होतील. पेशंटच्या मागणीनुसार औषधांचा पुरवठा करण्यात येणार आहे,' अशी माहिती अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष आमदार जगन्नाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्या वेळी राज्य संघटनेचे विनय श्रॉफ, मदन पाटील, अनिल बेलकर, संतोष खिंवसरा, विजय चंगेडिया उपस्थित होते. या संदर्भात जानेवारी महिन्यात 'मटा'ने सर्वप्रथम वृत्त देऊन पेशंटना दिलासा दिला होता.

'गरजेपेक्षा अधिक औषधे स्वतःकडे ठेऊन त्याची विक्री कायद्याने डॉक्टरांना करता येत नाही. तरीही देशातील सात हजार कोटी रुपयांची जेनरिक औषधे डॉक्टर विकतात. उर्वरित सात हजार कोटींचा व्यवसाय औषधे विक्रेते करतात. स्वस्तात औषधे द्यावी, असे राज्य आणि केंद्र सरकार म्हणते, मात्र त्यांचा हा राजकीय अजेंडा आहे. ब्रँडेड औषधांना पर्यायी औषधे देण्यास मान्यता दिली तर आणखी ब्रँडेड औषधेही स्वस्त देऊ शकतो. तरीही सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही 'क्यू - मॅप'च्या माध्यमातून आणखी काही आजारांची औषधे बाजारात उपलब्ध करणार आहोत,' अशी माहिती आमदार जगन्नाथ शिंदे यांनी दिली.

डॉक्टरांनी स्वस्त औषधांचे प्रिस्क्रिप्शन द्यावे

औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्यानुसार औषध विक्रेत्यांना पर्यायी औषध देता येत नाही. कायद्याच्या कलमात बदल करून विक्रेत्यांना पर्यायी औषधांचे अधिकार द्यावेत असे केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. परंतु, तोपर्यंत गरीब पेशंटना हृदयविकार, मधुमेहावरील औषधांचा खर्च परवडणारा नाही. त्यामुळेच ही औषधे उपलब्ध केली असून डॉक्टरांनी देखील ही औषधे लिहून द्यावी, असे आवाहनही जगन्नाथ शिंदे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणीवर हल्ला; एकाला सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एकतर्फी प्रेमातून वीस वर्षीय तरुणीवर वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका तरुणाला सात वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एम. देशमुख यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

या प्रकरणी शिवाजी राजेंद्र जाधव (वय २९, नवी सांगवी) याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. तरुणीच्या आईने फिर्याद दिली होती. जाधव हा कारचालक असून तो फिर्यादी यांच्या मुलाचा मित्र होता. त्याची फिर्यादी यांच्या घरी ये-जा असे. जाधव हा फिर्यादीच्या मुलीवर एकतर्फी प्रेम करू लागला होता. त्याने मुलीशी लग्न करण्याची मागणी फिर्यादी यांच्याकडे केली. त्यांनी नकार दिल्याने चिडून जाऊन त्याने त्यांच्या २० वर्षीय मुलीवरच वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या वेळी फिर्यादी तिला सोडविण्यासाठी गेल्या तर त्यांच्यावरही त्याने वार केले. या प्रकरणी सरकारी वकील विलास घोरगे-पाटील यांनी कोर्टात सात साक्षीदार तपासले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोदाईशुल्क ठराव रद्द करण्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महावितरणला खोदाई शुल्कात सवलत न देण्याचा सर्वसाधारण सभेचा ठराव रद्द करण्यात यावा, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्त्रबुद्धे यांनी आयुक्त कुणालकुमार यांच्याकडे ही मागणी केली आहे. वीजवाहिन्यांचे जाळे भूमिगत करण्यासाठी, तसेच दुरूस्ती करण्यासाठी महावितरणला रस्ते खोदावे लागतात. त्यासाठी त्यांना अन्य खासगी कंपन्यांप्रमाणे पाच हजार रुपयांऐवजी तेवीसशे रुपये प्रतिमीटर या सवलतीच्या दराने शुल्क लागू करण्याचा प्रस्ताव महापालिकेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी अमान्य केला. मात्र, गेल्या नऊ वर्षांत महापालिकेनेच शहराच्या विविध भागांमध्ये महावितरणच्या वीजवाहिन्या भूमिगत करण्यासाठी स्वतः कामे केली आहेत. यामध्ये किमान दोनशे किलोमीटर अंतराच्या वाहिन्या भूमिगत करण्यासाठी महापालिकेने स्वतःच्या बजेटमधून किमान ९० कोटी रुपये खर्च केले असून त्यामध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्पर्धा करून आपापल्या वॉर्डांमध्ये कामे केली आहेत. हे महावितरणचे काम असताना आणि त्यांनी कोणतीही विनंती केली नसताना पालिकेने आपणहून ही कामे केली आहेत. त्यापुढे जाऊन ने या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी महावितरणला सुमारे एक कोटी रुपये देखरेख शुल्कही दिले आहे. या सर्व प्रकारामध्ये महापालिकेला जवळपास दीडशे कोटी रुपयांचा भुर्दंड बसल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

आता महावितरणची खोदाई शुल्काची सवलत काढून पुणेकरांवर वाढीव वीज दरांचा भार टाकण्याऐवजी महापालिकेने विनाकारण वीजवाहिन्या भूमिगत करण्याची कामे तातडीने बंद करावीत, तसेच आयुक्तांनी विशेषाधिकाराचा उपयोग करून सर्वसाधारण सभेचा ठराव फेटाळून लावून महावितरणला सवलतीचे खोदाईशुल्क मंजूर करावे, अशी मागणी या प्रतिनिधींनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images