Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पिंपरीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींना आव्हान

$
0
0

पिंपरीः पक्षशिस्त भंगाचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आलेले पिंपरी-चिंचवडचे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर आणि विनोद नढे यांनी पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाला शनिवारी (१४ फेब्रुवारी) आव्हान दिले. या भूमिकेला पालिकेच्या तेरापैकी दहा नगरसेवकांचा पाठिंबा असून, आमचीच कॉंग्रेस खरी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

काँग्रेसमधून निलंबित केल्यानंतर भोईर आणि नढे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. या वेळी नगरसेवक राहुल भोसले, गणेश लोंढे, आरती चोंधे, सविता आसवानी, विमल काळे, शकुंतला बनसोडे उपस्थित होत्या. नगरसेवक जालिंदर शिंदे आणि गीता मंचरकर हे दोघेही आमच्यासोबत असल्याचा दावा भोईर यांनी केला आहे.

भोईर म्हणाले, 'गेल्या २५ वर्षांपासून काँग्रेसचे काम करत आहे. पक्षविरोधात कधीही बंडखोरी केली नाही. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारीची चर्चा सुरू झाल्यानंतर स्वतःहून पक्षसंघटनेतून अंग काढून घेतले. शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतरही पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप केला नाही. तरीही मी आणि नढे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. आमच्या दोघांसारखीच पक्षाच्या उर्वरित आठ नगरसेवकांची भूमिका आहे.'

ते म्हणाले, 'आम्ही बैठकीत पक्षाच्या गटनेतेपदावरून कैलास कदम यांची हकालपट्टी करण्याचा ठराव मंजूर केला असून, त्याबाबत विभागीय आयुक्तांना कळविले आहे. त्यामुळे एक जूनपर्यंत गटनेतेपदी नढे हेच कायम राहतील. त्यानंतर राहुल भोसले यांची निवड करण्यात येईल. विरोधी पक्षनेतेपदावरही आम्ही दावा करणार आहोत.'


‘स्थायी’साठी जोरदार मोर्चेबांधणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिकेच्या तिजोरीची चावी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समितीमध्ये वर्णी लागावी, यासाठी सर्वपक्षीय सदस्यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या आठवड्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये नव्या आठ सदस्यांची निवड होणार असल्याने दोन वर्षांसाठी 'स्थायी' स्थान मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.

पालिकेमध्ये बजेट सादर करण्याचे; तसेच खर्चाचे सर्व अधिकार स्थायी समितीकडे असतात. दर दोन वर्षांनी समितीवरील आठ सदस्यांचा कार्यकाळ संपून त्यांच्या जागेवर नव्या सदस्यांची नियुक्ती केली जाते. समितीवरील सदस्यत्त्व पक्षीय बलाबलानुसार असते. यंदा भाजपच्या समितीवरील हेमंत रासने, मोनिका मोहोळ व योगेश टिळेकर या तिन्ही, तर काँग्रेसचे दोन सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने दोन्ही पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड्. अभय छाजेड आणि महिला प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे या दोन्ही वरिष्ठांचा कार्यकाळ संपुष्टात येणार असल्याने त्यांच्या जागेवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जावी, अशी मागणी केली जात आहे.

सत्ताधारी राष्ट्रवादी, मनसे आणि शिवसेना यांच्याकडून अनुक्रमे चेतन तुपे, रवींद्र धंगेकर आणि पृथ्वीराज सुतार यांच्या जागांवर नव्या सदस्यांची निवड केली जाणार आहे. नव्याने निवड होणाऱ्या सदस्यांना पुढील महापालिका निवडणुकांपर्यंतचा कालावधी मिळणार असल्याने त्यासाठी अधिक चुरस आहे.

'हम भी है रेस मैं'

भाजपचे तिन्ही सदस्य नव्याने येणार असल्याने दिलीप काळोखे, श्रीकांत जगताप, मंजुषा नागपुरे, धनंजय जाधव, राजेंद्र शिळीमकर, सुनील कांबळे, मनीषा चोरबेले, स्मिता वस्ते यांच्यासह काही वरिष्ठ सदस्यही उत्सुक असल्याचे समजते. काँग्रेसकडून सुधीर जानजोत, अविनाश बागवे, चंदू कदम, सुनंदा गडाळे व सुनीला गलांडे यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून अपक्ष नगरसेविका अश्विनी कदम, तसेच रिपाइंचे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे उत्सुक आहेत. मनसेकडून राजू बराटे, सुशीला नेटके, अॅड्. रुपाली पाटील, अजय तायडे व पुष्पा कनोजिया यांच्या नावांची चर्चा आहे. तर सेनेकडून भरत चौधरी, दीपाली ओसवाल आणि प्रशांत बधे यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.

ज्येष्ठांना ‘आधार’ची सक्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास सवलत देण्यासाठी ज्येष्ठ नागरीक ओळखपत्र रद्द करून त्याऐवजी आता आधार कार्डची सक्ती करण्यात आली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या या आदेशामुळे राज्यातील एक कोटी दहा लाख ज्येष्ठांना फटका बसणार आहे.
अशी माहिती 'फेडरेशन ऑफ सीनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन ऑफ महाराष्ट्र'चे (फेस्कॉम) अध्यक्ष एन. व्ही. कोडोलीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्या वेळी फेस्कॉमचे माजी अध्यक्ष रमणभाई शहा, अरुण रोडे आदी उपस्थित होते. अपंग, ज्येष्ठ नागरिक बनावट ओळखपत्र तपासणी मोहीम परिवहन खात्यांतर्गत घेण्यात येत आहे. या संदर्भात खात्याने काढलेल्या आदेशात ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र रद्द किंवा आधार कार्ड फक्त ग्राह्य असा उल्लेख नाही. परंतु, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काढलेल्या आदेशाने आतापर्यंत वापरात असलेले ज्येष्ठ नागरिक ओळख पत्राचा पुरावा रद्दबातल ठरविला आहे. यामुळे राज्यात सध्या एक कोटी दहा लाख ज्येष्ठ नागरिकांना फटका बसण्याची चिन्हे दिसू लागली आहे. याबाबत फेस्कॉमच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

तत्कालीन कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने ३० सप्टेंबर २०१३ मध्ये घाईने ज्येष्ठ नागरिकांचे धोरण जाहीर केले. ज्येष्ठ संघटना, हेल्पेज इंडिया, डिग्निटी फाउंडेशन, सिव्हर इनिंग आयस्कॉन समाजशास्त्रज्ञ, यशदा यांनी ज्येष्ठ नागरिक धोरण तयार करून त्याचा मसुदा राज्य सरकारला दिला. त्यानंतर तीन माजी मुख्यमंत्री व सरकारने काहीच पावले उचलली नाहीत. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्येष्ठांची वयोमर्यादा साठ असताना राज्याने मात्र ६५ वर्षांपुढील व्यक्ती ज्येष्ठ अशी व्याख्या केली आहे. त्यामुळे ज्येष्ठांवर अन्याय झाला आहे. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही, असा इशारा देताना ज्येष्ठ नागरिकांचे धोरण कधी जाहीर होणार, असा सवाल फेस्कॉमने विचारला आहे.

आश्वासनांचा दुष्काळ, सूचनांची बरसात

$
0
0

बारामतीतील कार्यक्रमात मोदींकडून केवळ मार्गदर्शन

म. टा. प्रतिनिधी, बारामती

दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना मदत, ऊस उत्पादकांना वाजवी दर देण्यासाठी कारखान्यांना साह्य, दूध उत्पादकांना दिलासा आणि धनगर समाजाला आरक्षण... राज्यातील ऊस, दूध आणि फळ उत्पादक शेतकऱ्यांसह धनगर समाजाच्या विविध मागण्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शनिवारी मांडल्या. मात्र, मोदी यांनी यावर ठोस आश्वासन न देता, पाणी वाचवून विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर करण्याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

कृषिविकास प्रतिष्ठानच्या भाजीपाला गुणवत्ता प्रक्रिया केंद्राचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते झाले. राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री एकनाथ खडसे, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, अजित पवार, सुप्रिया सुळे, राजेंद्र पवार आदी या वेळी उपस्थित होते.

'साखरेचे दर कोसळल्यामुळे ऊस उत्पादकांना एफआरपी देण्याची कारखान्यांची आर्थिक स्थिती नाही. त्यामुळे निर्यातीसाठी काही प्रोत्साहन मिळाले, तर साखर बाहेर जाईल आणि दर सुधारल्यावर एफआरपी देण्यासाठी कारखान्यांना आर्थिक ताकद मिळेल,' असे मत पवार यांनी व्यक्त केले. दुधाचे दरही घटले असून निर्यातीवर मर्यादा असल्याने दूध उत्पादकही अडचणीत आहेत; तसेच शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठविले आहे, अशी आठवणही त्यांनी करून दिली.

या मागण्यांवर ठोस उत्तर मोदींनी दिले नाही. 'शेती आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांना गरिबीतून मुक्तीच्या लढ्यात महत्त्वाचे स्थान आहे. दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना माती परीक्षणाचे प्रशिक्षण देऊन शाळांमधील प्रयोगशाळा या माती परीक्षण प्रयोगशाळा बनाव्यात. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवून शेतीची उत्पादकता वाढवायला हवी,' अशा सूचना त्यांनी केल्या.

* 'सेनेच्या मतांची चिंता नाही'

'राजकारणात कोणीही अस्पृश्य नसते. त्यामुळे मोदी यांच्या बारामती भेटीबाबत शिवसेनेला काय वाटते, याची चिंता करण्याची आम्हाला गरज नाही,' अशा शब्दांत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी बारामतीच्या दौऱ्यावरून शिवसेनेवर नवी तोफ डागली. मोदी यांच्या बारामती भेटीवर शिवसेना नेत्यांनी नापसंती व्यक्त केली होती.

विजयाचा ‘षटकार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिंकलो!... काळ बदलला, चेहरे बदलले, पण इतिहास मात्र कायम राहिला!! भारतीय संघानं पाकिस्तानला वर्ल्ड कपच्या महामुकाबल्यात रविवारी सहाव्यांदा हरवलं आणि सगळा देश जल्लोषात न्हाऊन निघाला!!!

कोणी म्हटलं, आपण वर्ल्ड कपमधलं रेकॉर्ड अबाधित राखलं; कोणी म्हटलं, विजयाचा षटकार मारला; कोणी म्हटलं, जिरवली; तर कोणी म्हटलं, विजयाची सुरुवात झाली एकदाची... सगळ्याचं तात्पर्य काय?... जिंकलो!

भारत-पाकिस्तान मॅच १५ फेब्रुवारीला होणार, हे कधीचंच माहीत होतं की; पण हृदयाच्या ठोक्यांचं रूपांतर धडधडीत होण्यासाठी ठोक्यांची आवर्तनं वाढावी लागतात. अॅडलेडमध्ये जेव्हा राष्ट्रगीत सुरू झालं, तेव्हा हे खऱ्या अर्थानं जाणवलं. मग जी पहिल्या चेंडूपासून टीव्हीला नजर खिळली, ती खिळलीच. शिखर, विराटची बिनधोक खेळी, 'फ्लॅम्बॉयंट' रैनाचा 'फॅब्युलस' अवतार आणि जोडीला 'बॅरीटोन' बच्चन. आणखी काय हवं भारत-पाकिस्तान मॅचकडून?

पाकिस्तानच्या एकेक विकेट पडताना आपल्या बोलर्सबद्दल भरून आलं. आपणच अॅडलेडवर खेळत असल्यासारखा प्रत्येक विकेटचा जल्लोष; अजून मिस्बा आहे, असं म्हणून त्यावर लगेच कंट्रोल; पण आफ्रिदी गेल्यावर एकदम खात्री... ठोक्यांची धडधड, धडधडीची धाकधूक आणि मग एकदम

हुश्श हुश्श!

या दरम्यान आठवणींचे पट उलगडत नव्हते, असं नाही. १९९२ला मियाँदादच्या माकडउड्यांचं झालेलं गर्वहरण, ९६ला उडालेलं आमीर सोहेलचं दांडकं, ९९ला प्रसादचं विकेटचं पंचक, २००३ला तेंडुलकरनं थर्डमॅनवरून भिरकावून दिलेला शोएब अख्तर आणि २०११ला मारलेलं मोहालीचं मैदान हे सगळं आठवलंच की. 'ज्वर' आणखी चढला आणि उत्स्फूर्त स्वर उमटला, 'जिंकलो!'... रस्ते जल्लोषानं फुलून गेले, मिठाई वाटली गेली, ढोल बडवले गेले, सामान्य माणसापासून सीमेवरच्या जवानापर्यंत सगळे जण खुलून ओरडले, 'जिंकलो!'

अॅडलेडमध्ये पाकिस्तानवर ७६ धावांनी मात

भारत : ५० षटकांत

७ बाद ३००

पाकिस्तान : ४७ षटकांत

सर्वबाद २२४

आर. अश्विनची

तीन षटके निर्धाव

PMP चे ब्रेकफेल; चालकाचे प्रसंगावधान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पीएमपी बसचा ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आल्यावर बसचालकाने बसवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रिक्षाला धडक बसल्याने झालेल्या अपघातात रिक्षामधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. रविवारी (१५ फेब्रुवारी) दुपारी पावणे बाराच्या सुमारास चिंचवड स्टेशन जवळ हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी पुणेस्टेशन ते निगडी ही बस निगडीच्या दिशेने जात होती. दुपारी पावणे बाराच्या सुमारास चिंचवड स्टेशन जवळील बसथांब्यावर आली असता बसचा ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. बसचालक बसवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात असतानाच त्या ठिकाणी थांबलेल्या रिक्षावर बस पाठीमागून आदळली.बसची धडक लागल्याने रिक्षा रिक्षाचालाकासाहित इतर तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले. दरम्यान, बसचालकाने प्रसंगावधान राखून मोठ्या कौशल्याने बसवर नियंत्रण मिळवले. प्रवासी असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती.

सौर पथदिव्यांची योजना अंधारातच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास अभिकरणाचे दरपत्रक (आरसी) न मिळाल्याने जिल्हा परिषदेची सौर पथदिव्यांची योजनाच अंधारात पडली आहे. दर पत्रकाअभावी या आर्थिक वर्षात दिव्यांचे अद्याप वाटप करण्यात आलेले नाही.

सौर पथदिवे बसविण्याचे कंत्राट देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास अभिकरणामार्फत सौर पथदिव्यांचे दर ठरवून दिले जातात. वर्ष २०१३-१४ मध्ये एका सौरदिव्यासाठी २० हजार ६८५ रुपयांचा दर निश्चित झाला होता. तेव्हा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत सुमारे दोन हजार ६७६ सौर पथदिवे बसविले होते. यंदाचे आर्थिक वर्ष संपत आले असले तरी, केवळ दर पत्रकाअभावी सौर पथदिव्यांचे वाटप करता आलेले नाही.

विजेची बचत करून अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर वाढवा आणि गावापासून दूर अंतरावर असलेल्या वाड्या-वस्त्यांना जाणाऱ्या रस्त्यांवर असलेला अंधार दूर करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील ग्रामीण भागात सौर पथदिव्यांचे वाटप करण्यात येते.

वीजजोडणी नसलेल्या वाड्या-वस्त्यांना यामध्ये प्राधान्य दिले जाते. यासाठी जिल्हा परिषद निधी, जिल्हा नियोजन मंडळाचा निधी, खासदार निधी,

'क' वर्ग पर्यटनस्थळ, 'क वर्ग तीर्थक्षेत्र विकासासाठी; तसेच वित्त आयोगातून निधी उपलब्ध होतो.

तालुकानिहाय बसविलेले सौर पथदिवे

आंबेगाव २२७, बारामती २७७, भोर १२८, दौंड २२२, हवेली ३७९, इंदापूर ३४७, जुन्नर १२७, खेड २३७, मावळ ८६, मुळशी ६१, पुरंदर १४२, शिरूर ३३४, वेल्हा १०९

खूनप्रकरणी ५ आरोपी अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

जुन्या भांडणाचा बदला घेण्यासाठी सहा जणांच्या टोळक्याने भोसरीतील बालाजीनगरमध्ये राहणाऱ्या रामा भीमराव गोटे या तरुणावर शस्त्राने वार करून, तसेच दगडाने ठेचून हत्या केली. शनिवारी (१४ फेब्रुवारी) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना बालाजीनगर मध्ये घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, त्यांना २१ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.नागेश गायकवाड (वय २०), महेश उर्फ जॅकी कांबळे (१९), ओंकार बांदल (२३), विकी ओव्हाळ (२०, सर्व राहणार बालाजीनगर वसाहत, भोसरी) यांना शनिवारी रात्री दिघीमधून अटक करण्यात आली.रामा गोटे शनिवारी सायंकाळी त्याच्या मित्रांसोबत बालाजीनगर मधील जयरत्न हॉटेलजवळ गप्पा मारत उभा होता. त्यावेळी नागेश गायकवाड व इतर पाच जणांनी याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून डोक्यात दगड घातला.

अनैसर्गिक कृत्य करणाऱ्यास अटक

चॉकलेटचे आमिष दाखवून बालकावर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या सैफन शेख (वय ३३, निगडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी सहा वर्षीय बालकाच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख याने पीडित बालकाला चॉकेलटचे आमिष दाखवून घरी नेले. त्यानंतर त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. स्थानिकांनी शेख याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. निगडी पोलिस तपास करीत आहेत.

खासगी बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

पिंपरी येथील इंदिरा गांधी पुलावर एका खासगी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी (१५ फेब्रुवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी गावात जाणाऱ्या खासगी बसची धडक एका तरुणाला बसल्यामुळे तो बसच्या चाकाखाली आला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बसचालक तेथून बससह पळून गेला. अपघातानंतर घडनास्थळी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती.


अंतर्गत धुसफुस रोखत पुर्नबांधणी ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाची पुरती उडालेली दाणादाण, पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत धुसफुस यामुळे सध्या शहरातील कार्यकर्ते व्दिधा मनःस्थितीत पाहायाला मिळत आहेत. त्यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे आज यासर्वांवर काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. थेरगाव येथील हॉटेल 'नुर्या होमिटेल' मध्ये दिवसभर पिंपरी-चिंचवडमधील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी सोमवारी (१६ फेब्रुवारी) स्वतंत्रपणे संवाद साधणार आहेत.

शहरातील अंतर्गत परिस्थिती जाणून घेण्यासाठी, येथील पक्ष-संघटना बांधणी करिता ठाकरे पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवडमध्ये येत आहेत. यापूर्वी ठाकरे यांचा नियोजित दौरा ऐनवेळेस रद्द झाला होता. त्यामुळे सोमवारचा दौरा रद्द होऊ नये यासाठी मनविसेचे अध्यक्ष सचिन चिखले, महापालिकेती गटनेते अनंत को-हाळे, उपाध्यक्ष शशि राजेगांवकर, राजेश आवसरे, मयूर चिंचवडे हे गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करीत होते.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा शहरापुरता विचार करायचा झाल्यास येथील पदाधिकाऱ्यांनी पक्षविरोधी केलेल्या कामामुळे कार्यकर्ते सैरभैर झाले होते. त्यातच अंतर्गत दुफाळी माजल्याने पदवाटप चुकीचे झाल्याचा सूर आवळला जात होता. या सगळ्या गोष्टींमुळे पदाधिकारी ठाकरे यांनी शहरात लक्ष घालावे म्हणून प्रयत्नशील होते. संघटनेची पुर्नबांधणी झाल्यास आगामी महापालिका निवडणुकींमध्ये मोठे यश मिळवून देण्याची शाश्वती शहरातील काही पदाधिकारी आत्तापासूनच पहिल्या फळीतील पदाधिकाऱ्यांना देत आहेत.

मागील पंचवार्षिकला अनपेक्षितपणे मनसेला चार जागांवर विजय मिळाला होता. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाची मत वाढल्याचे दिसून आले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्या दिवसभराच्या दौऱ्यानंतर बंडाळी मोडून काढण्यासाठी आणि पक्ष विरोधी काम करणाऱ्यावर काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पिंपरीतही करवाढीचा बोजा?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २०१५-१६ अर्थसंकल्प फुगीर नाही तर तो वास्तववादी असेल, असे आयुक्त राजीव जाधव यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. तरी देखील पुण्याप्रमाणेच शहरवासीयांवर करवाढीचा बोजा पडेल का याची उत्सुकता आहे. त्यामुळे आज (सोमवार १६ फेब्रुवारी) स्थायी समितीसमोर सादरीकरण होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयुक्त जाधव यांचे हे पहिलेच बजेट आहे.

एकीकडे बजेटचे सादरीकरण तर दुसरीकडे महापालिकेच्या काही विभागांचे उत्पन्न सरत्या आर्थिक वर्षात घटलेले आहे. एलबीटी, करसंकलन उदिष्ट गाठण्यात सफल होत असला तरी पाणीपुरवठा व बांधकाम परवाना विभाग उत्पन्नात मागे आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पातून शहरवासीयांच्या पदरात काय पडणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. महापालिकेचा अर्थसंकल्प कधी सादर होणार, याबाबत मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र, महापालिका प्रशासनाकडून संपूर्ण अर्थसंकल्प तयार झाला आहे. त्याचे सादरीकरण महापालिका आयुक्त राजीव जाधव सोमवारी (आज) सकाळी अकरा वाजता करणार आहेत.

स्थायी समितीन अभ्यास करून चचेर्नंतर हा अर्थसंकल्प मंजूर करेल. त्यानंतर तो महापालिका सर्वसाधारण सभेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. सत्ताधारी पक्षाची उरलेली दोन वर्ष, काँग्रेसमध्ये अचानक उफाळून आलेली बंडाळी, सत्तांतर या सगळ्यांमुळे प्रत्येकजण आपापल्या नजरेतून यासगळ्याकडे पाहत आहे. तर आगामी महापालिका निवडणुकांची तयारी नगरसेवकांकडून सुरू झाल्याने काही जणांची विशेष कामे या बजेचमध्ये समाविष्ट करून घेतली जाण्याची शक्यता आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पात उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ कसा असेल ? पुढचे महत्त्वाकांशी प्रकल्प कोणते ? या सगळ्यामधून शहरवासियांच्या पदरात काय पडणार, याकरिता अर्थसंकल्पाविषयी उत्कंठा आहे.

बजेटबाबत या आहेत अपेक्षा

प्रशासनाला यापूर्वी भांडवली खर्च पूर्ण करता आलेला नाही. त्यामुळे आगामी बजेटचा खर्च तरी व्हावा.

स्वच्छतेबाबत जेवढा गाजावाजा झाला ते कालांतराने बारगळले; ते पुन्हा सुरू व्हावे.

बीआरटी आत्तापर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होती. ती यापुढील काळात तरी पूर्ण होईल.

नागरिकांना मुलभूत सोईमध्ये खिशाला मोठा खड्डा पडू नये.

बऱ्याच काळात शहरात मोठा प्रकल्प झालेला नाही. तो येत्या काळात हाती घेण्यात यावा.

पुणे-मुंबई आणि हिंजवडी-औंध तसेच बीआरटी रस्त्यांचे जाळे वाढले. त्याचप्रमाणे अंतर्गत रस्त्यांची स्थिती व्हावी.

फूटपाथ पूर्ण आणि सुस्थितीत करण्यासाठी तरतूद असावी.

पालिकेची भिंत कोसळून वानवडीत तिघे जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

वानवडीमध्ये महापालिकेची ३० फूट लांबीची भिंत कोसळल्याने फूटपाथवरील तिघेजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. नागरिकांनी त्यांना तात्काळ बाहेर काढले. यामध्ये एकाच्या पायाला गंभीर मार लागला आहे तर इतर किरकोळ जखमी झाले आहेत. शिवरकर रोडवर महात्मा फुले सांस्कृतिक भवन शेजारी कै. विलासराव देशमुख क्रीडा प्रबोधनीच्या कामाचे नुकतेच भूमी पूजन झाले होते. त्यातच मार्च अखेर बजेट संपवायच्या घाईत दिवसरात्र खोदकाम करून जेसीबीच्या सहायाने माती काढण्याचे काम चालू होते. तिथे २० फूट खड्डा पाडण्यात आला आणि त्यातील माती ३० फूट लांबीच्या भिंतीच्या बाजूने रचण्यात आली होती. भिंतीच्या पलीकडच्या बाजूला चायनीजची हातगाडी होती.

सायकांळी सात वाजता ही भींत चायनीजच्या हातगाडीवर कोसळली. त्यात एक आचारी व दोन ग्राहक गाडले गेले. नागरिकांनी ढिगाऱ्या खालील तिघांना बाहेर काढले. तसेच अग्निशामक दलाच्या जवानांनी जेसीबीच्या सहायाने माती बाजूला केली.

हजारो एकर शेतीवर गदा?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

राज्यात सात जिल्ह्यांत महाराष्ट्र शेती महामंडळाचे एकूण १४ ऊस मळे असून त्यातील शेत जमीन खंडकरी शेतकऱ्यांना वाटप करून सध्या शेती महामंडळाकडे ४६ हजार एकर जमीन शिल्लक आहे. गेल्या सात वर्षांपासून ही जमीन पडीक आहे. ही जमीन भाडेपट्टा करारावर त्या त्या जिल्ह्यातील महामंडळालगतच्या सहकारी तथा खाजगी साखर कारखान्यांना देण्याचा डाव महसूल विभागाकडून सुरू झाला आहे. ही प्रक्रिया त्वरित थांबवण्यात यावी अशी मागणी शेती महामंडळाच्या कामगारांनी केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास आठ हजार कामगारांवर बेकारीची कऱ्हाड पडणार आहे.

आघाडी सरकारने २००७ -२००८ पासून ही जमीन पिकवणे बंद केल्यामुळे हजारो एकर जमीन जाणीव पूर्वक पडीक ठेऊन या कामगारांना घरी बसून पाचव्या आयोगाप्रमाणे पगार दिला जातो. ही मेहरबानी राजकारण्यांच्या ताब्यातील सहकारी व खाजगी कारखान्यांना जमीन मिळवण्यासाठी असल्याचे कामगारांनी सांगितले. मात्र २०१४ विधानसभा निवडणुकांपूर्वी आघाडी सरकारने घाई करत शिल्लक जमीन खासगी पद्धतीने भाडे पट्ट्यावर देण्यासाठी जाहिरात प्रसिद्धी केली होती. त्यात कसण्यासाठी जमीन मागणाऱ्यांनी किमान शंभर एकर किंवा त्या पटीत जमीन मागावी त्यासाठी प्रती एकरी किती रक्कम देण्यास तयार आहे, असे नमूद करावे असा उल्लेख करण्यात आला होता. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील रत्नपूरी मळ्याकडील जमीन मागण्यासाठी नीरा - भीमा, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर, बारामती अॅग्रो, कर्मयोगी सहकारी आदी कारखान्यांच्या वतीने अंदाजे ४०० ते १२०० एकर जमीन मागितल्याचे समजते. एवढेच नाही तर त्या त्या भागातील धनदांडग्यांनी शेकडो एकरची मागणी केली असल्याचे बोलले जाते. मात्र सिलिंग जमीन अधिनियमानुसार १९६१ प्रमाणे कलम २७ (ब) या प्रमाणे महामंडळ जर जमीन कसत नसेल तर सदर कामगार जमीन मागू शकतात. संलग्न गटामध्ये पूर्वी शेतमजूर म्हणून काम करत असलेले कामगार किंवा तांत्रिक कर्मचारी अशी व्यक्ती बेकार झाल्यास सदर जमीन देऊ करण्यात येईल. कायद्याप्रमाणे कामगारांना जमीन मिळावी यासाठी १३ हजार कामगारांनी आप-आपल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केले आहे. ही मागणी सहा जिल्ह्यांत करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या नोटीफिकेशन प्रमाणे १० लाखांच्या पुढील टेंडर असल्यास इ -टेंडर पद्धतीने टेंडर कॉल करावे ते त्यांनी केले नाही. मात्र ही जमीन मिळाल्यास ती जमीन पुन्हा परत करण्यात येत नसल्यास ज्वलंत उदाहरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शेत मळ्याची जमीन होय. न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या कामगारांना राज्य सरकारने न्याय द्यावा अशी मागणी कामगारांनी केली आहे.

बेकारीची कुऱ्हाड वाचणार

शेत मळ्यातील शेतमजूर, अल्प भूधारक किंवा भूमिहीन शेत मजुरांना जमीन देण्यात आल्यास किंवा याच शेत मळ्यात चारा पिक घेतल्यास सरकारला दुष्काळातील चाऱ्याचा भेडसावणारा प्रश्न सुटण्यास मदत होईल. तसेच कामगारांच्या डोक्यावरील बेकारीची कुऱ्हाडही नाहिशी होईल.

शेती महामंडळाने स्वतः ही जमीन कसावी, कसणार नसेल तर ती जमीन शेत कामगारांना देण्यात यावी. या पूर्वी देण्यात आलेली जमीन पुन्हा महामंडळाकडे घ्यावी व येथून पुढे ही जमीन कोणासही भाडे पट्ट्यावर देण्यात येऊ नये. या मागण्या पूर्ण न झाल्यास शेती महामंडळाच्या पुणे कार्यालयावर मार्च महिन्यात मोर्चा काढणार आहे.

- सुभाष कुलकर्णी, सरचिटणीस, शेती महामंडळ लढा कृती समिती

‘व्हॉट्सअॅप’ मधून पोलिसांची जागृती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

व्हॉट्सअॅपचा प्रभावीपणे वापर केला तर होणारे संभाव्य गुन्हे रोखून नागरिकांमध्ये जनजागृती केली जावू शकते. वारजे पोलिसांनी शनिवारी व्हॉट्सअॅपचा प्रभावीपणे वापर करून वारजे भागात दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने फिरत असलेल्या टोळीबद्दल लोकांना सतर्क केले.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. शहाजी सोळुंके यांनी सर्व पोलिस स्टेशनला सतर्क राहून गस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या होत्या. शहरातील वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटना आणि दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. शहरात उत्तर प्रदेशातील एक टोळी दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती समजल्यानंतर पोलिसांनी लोकांना सतर्क करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा प्रभावी वापर केला. अशा प्रकारच्या टोळीपासून सावध राहण्याच्या मेसेज लोकांपर्यंत पोहचविण्यात आला. त्यामुळे लोकांना कमी वेळात सजग राहण्याच संदेश पोहचला. शहरात शनिवारी दिवसभरात एकही दागिने पॉलिश करून फसवणूक केल्याचा प्रकार घडला नसल्याचे डॉ. सोळुंके यांनी सांगितले.

जागतिक तापमानवाढ रोखायला हवी वनराई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'देशाचा विकास करण्यासाठी आज निसर्गाचे शोषण, मानवतेचे शोषण सुरू आहे. यातून प्रदूषण वाढतच जाणार आहे. त्यामुळे तापमान वाढीच्या संकटापासून देशाला वाचविण्यासाठी वनराई वाढली पाहिजे,' असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी व्यक्त केले.

वनराई पुणे आणि वनराई फाउंडेशनतर्फे संस्थापक मोहन धारिया यांच्या जयंतीनिमित्त हजारे यांना मोहन धारिया राष्ट्र निर्माण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. अध्यक्षस्थानी उल्हास पवार, ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, वनराईचे अध्यक्ष राजेंद्र धारिया, वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.

'वनराईतर्फे मिळालेल्या पुरस्काराचा मला विशेष आनंद आहे,' असे सांगून हजारे यांनी धारिया यांच्या वनराई चळवळीचा धावता आढवा मनोगतामध्ये घेतला. विकासामुळे निर्माण झालेल्या पर्यावरणीय समस्याही त्यांनी सांगितल्या. कुवळेकर यांनी हजारे यांचा जीवनप्रवास उलगडून, त्यांनी केलेल्या आंदोलनांची माहिती दिली. उल्हास पवार आणि कुवळेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

'धरणे जपायला हवीत'

'पाण्याची समस्या सध्या आहे. भविष्यात धरणाच्या बाबतीत गंभीर अनुभव येणार आहेत. प्रशासनाने धरणे बांधली पण त्यांच्या कॅचमेंटमध्ये बेसुमार वृक्षतोड झाल्याने तेथील माती धरणांमध्ये वाहून येत आहे. या मातीने धरणांची पाणी साठवण्याची क्षमता कमी होत चालली आहे. त्यामुळे या धरणांना आज ना उद्या मरण अटळ आहे. धरणे मेली तर लाखो लोक मरतील. त्यामुळे धरणांची काळजी घ्यायला हवी,' असे मत हजारे यांनी व्यक्त केले.

कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी मराठीतून प्रश्नपत्रिका

$
0
0

पुणेः कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेतून प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे. विद्यापीठाच्या अॅकॅडमिक कौन्सिलच्या बैठकीमध्ये या निर्णयाला मान्यता देण्यात आल्याने, येत्या शैक्षणिक वर्षापासून कायद्याच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीसह मराठीतूनही प्रश्नपत्रिका उपलब्ध होणार आहेत.

मराठीतून प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याची मागणी गेल्या काही काळापासून सातत्याने करण्यात येत होती. या मागणीचाच विचार करत विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शैक्षणिक वर्ष २०१५-१६ पासून ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली. हा बदल केवळ प्रश्नपत्रिकेच्या माध्यमापुरताच मर्यादीत असून, त्यामुळे विषय शिकविण्याच्या पद्धतीमध्ये वा विषयांच्या स्वरुपामध्ये कोणताही बदल केला जाणार नसल्याचेही विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

तज्ज्ञ प्राध्यापकांची कमतरता असल्याने, कला शाखेचे सर्व अभ्यासक्रम वगळता कॉमर्सच्या अभ्यासक्रमांसाठी श्रेणी पद्धती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली. बीबीए, बीसीएच्या अभ्यासक्रमांनाही श्रेणी पद्धतीमधून सवलत देण्यात आली आहे. एस. पी. कॉलेजच्या प्राचार्यांना झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर समाजकल्याण विभागाकडून स्कॉलरशिपचा निधी मिळण्यात होणारा विलंब आणि तो टाळण्यासाठी आवश्यक पावलांचीही या बैठकीत चर्चा झाली. चर्चेअंती या बाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णयही कौन्सिलने घेतल्याचे सांगण्यात आले.


बेवारस वाहने ओळखण्याचे आवाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या आवारात सध्या बेवारस वाहनांची चांगलीच गर्दी झाली आहे. अनेक वाहने नादुरुस्त अवस्थेत तर, काही सुस्थितीत वाहने बऱ्याच दिवसांपासून पडून आहेत. या वाहनांच्या मालकांनी ओळख पटवून आपली वाहने कायदेशीर बाबींची पूर्तता करून घेऊन जावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. वाहनांचे रजिस्टर आणि चासी नंबरची लिस्ट सर्व पोलिस ठाण्यात लावण्यात आली आहे.

एका पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेली वाहने अन्य पोलिस ठाण्यात पडून आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जाणे शक्य नसल्याने नागरिकांसाठी पुणे पोलिसांच्या punepolice.gov.in या वेबसाइटवरदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. ओळख पटवून न नेलेल्या वाहनांचा कोर्टाच्या परवानगीने लवकर लिलाव करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर आपली वाहने घेऊन जावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

नोकरांची-भाडेकरूंची नोंद करा

नोकरांची आणि भाडेकरूंची जवळच्या पोलिस ठाण्यात नोंद करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अतिरेकी कारवायांमुळे हायअलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नोकरीवर ठेवलेल्या व्यक्तीची माहिती-फोटो; तसेच भाडेकरूंची नोंद लवकर करावी. अन्यथा तसे न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांद्वारे कळविण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांविना कामकाज विस्कळित

$
0
0

रोहित आठवले, पिंपरी

महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या घटनांचे गुन्हे दाखल करण्यासाठी महिला अधिकारी प्रत्येक पोलिस ठाण्यात असणे आवश्यक आहे; पण सध्या पुणे पोलिस आयुक्तालयातील अनेक पोलिस ठाण्यात महिला पोलिस अधिकाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे अन्य विभागात कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्यांची गेल्या सोमवारी (९ फेब्रुवारी) अंतर्गत बदली करण्यात आली. ज्या पोलिस ठाण्यात महिला अधिकारी नाहीत, अशा ठिकाणी सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली; परंतु अद्याप हे अधिकारी नव्या नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झालेल्या नाहीत. त्यामुळे दैनंदिन कामकाजात वरिष्ठ अधिकाऱ्यांची तारांबळ उडत आहे. त्याचा थेट परिणाम नागरिकांना भोगावा लागत आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील महिला-बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ही वाढ म्हणजे आता गुन्हे दाखल करण्याची मानसिकता वाढल्याचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वास्तविक घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी पीडितेचा जबाब नोंदविण्यासाठी महिला अधिकारीच पोलिस ठाण्यात उपलब्ध नसल्याने जवळील पोलिस ठाण्यातून महिला अधिकाऱ्यांना बोलावून घ्यावे लागत आहे. तपास करताना फिर्यादीकडून योग्य सहकार्य मिळण्यासाठी तपास अधिकारी म्हणून महिला अधिकाऱ्यांचीच नेमणूक करावी असे मत काही अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे; परंतु सध्या साइड पोस्टिंग म्हणजेच अन्य शाखांमध्ये कार्यरत असलेल्या आणि बदली झालेल्या या अधिकारी नव्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर झालेल्या नाहीत.

दिल्ली येथील निर्भया प्रकरण, हिंजवडी आयटी युवतीचे अपहरण-बलात्कार-खून प्रकरण, एमआयडीसी भोसरी येथील छेडछाड-आत्महत्या प्रकरण, येरवडा, मुंढवा, कोंढवा, कात्रज, हडपसर, खडकी या शहराच्या सीमेवरील भाग आणि मध्यवस्तीच्या पेठ भागांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी सर्वांना हादरवून सोडले. सामाजिक मनाला काळिमा फासणाऱ्या अनेक घटनादेखील घडल्या आहेत; पण या घटनेतील पीडितेला ज्या प्रसंगाला सामोरे जावे लागते त्यानंतरच्या कायदेशीर प्रक्रियेत तिची जास्त ससेहोलपट होते. त्यामुळेच एखादी महिला साध्या वेशात पीडित महिला अथवा बालकांना विश्वासात घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत असेल तर, त्यांना थोडा धीर मिळत असतो.

एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा दाखल होताना महिला अधिकाऱ्याकडूनच योग्य वागणूक मिळाली नसल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाइकांनी केला होता. खरे तर गुन्हा दाखल करतेवेळी एक महिला दुसऱ्या महिलेला आधार देऊ शकते, अशी भावना आणि निरिक्षण नोंदविली गेली आहेत. त्याचबरोबर साइड पोस्टिंगला महिला अधिकाऱ्यांनी जास्त काळ न राहता त्यांनी थेट नागरिकांशी संबंधित विभागात काम करावे असा मानस नुकत्याच झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात पोलिस आयुक्त सतीश माथूर यांनी व्यक्त केला होता; तसेच हे लवकर अंमलात येईल असेही सांगितले होते.

सध्या काही पोलिस ठाण्यांमध्ये महिला फौजदार कार्यरत आहेत; परंतु यातील निम्याहून अधिक अधिकारी एक तर रजेवर आहेत किंवा त्या प्रशिक्षणार्थी अधिकारी आहेत. त्यामुळे काही ठिकाणी केवळ गुन्हा दाखल करतेवेळी तेथे उपस्थित राहणे एवढेच काम त्या करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या सोमवारी या ९ महिला सहाय्यक निरीक्षकांची विविध पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली. तसा आदेश दैनंदिन अहवालात(गॅझेट) प्रसिद्ध करण्यात आला आहे.

लोकसंख्या आणि पोलिसांचे संख्याबळ हा नेहमीच चर्चेचा विषय झाला आहे; पण मंजूर असलेली पदे आणि सध्या उपलब्ध अधिकारी यांची नियुक्तीची योग्य सांगड घातल्यास या समस्येवर नक्कीच मात करता येऊ शकते. महिला अधिकाऱ्यांच्या बरोबरीनेच महिला कर्मचाऱ्यांची कमतरता काही पोलिस ठाण्यात जाणवत आहे. जर कर्मचाऱ्यांची योग्य आणि आवश्यकतेनुसार नियुक्ती झाल्यास अनेक समस्यांवर मार्ग निघू शकतात असे तज्ज्ञांचे मत आहे.

शाळा-कॉलेजांबाहेर छेडछाडीचे प्रकार घडत असल्याने गस्त पथकाची अनेक ठिकाणी नियुक्तीदेखील करण्यात आली आहे. या पथकात महिला कर्मचारी आणि अधिकारी असल्यास घटना घडण्यापूर्वी त्या रोखता येणे शक्य होईल. एखाद्याकडून छेडछाडीचा प्रयत्न होत असल्यास या गस्ती पथकातील महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांशी मुली, महिला थेट संपर्क करू शकतील. त्यामुळे येत्या काळात या पथकात महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यास नागरिकांच्या फायद्याचे ठरू शकते. त्यातच पोलिस चौकीत गुन्हे दाखल करणे वैधानिक नसल्याचे कारण देऊन हे गुन्हे आता पोलिस ठाण्यात दाखल होऊ लागले आहेत. गुन्हे दाखल होतानाच योग्य खबरदारी घेतल्यास निकालावेळेस त्याचा फायदा होण्यास मदत होत असल्याचे निरिक्षण सहआयुक्त संजीवकुमार यांनी नोंदविले आहे. एका पोलिस ठाण्याच्या अखत्यारित किमान ३-४ पोलिसचौक्या आहेत. पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होत असल्याने आता किमान एक तरी महिला अधिकारी पोलिस ठाण्यात कार्यरत असणे पुरेसे आहे. त्या दृष्टीने नियुक्ती करण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्यांनी नव्या ठिकाणी लवकर रुजू होणे गरजेचे आहे.

बोगस सातबारा प्रकरणी तलाठ्याची चौकशी सुरू

$
0
0

पुणेः बोगस सातबारा उतारे देणारा पाषाण गावचा तलाठी एन. डी. दराडे याची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती हवेलीच्या प्रांत अधिकारी स्नेहल बर्गे यांनी दिली. या चौकशीत दोषी आढळल्यावर त्याच्यावर फौजदारी कारवाईही केली जाणार आहे.

पाषाण भागातील तलाठ्याने मोठ्या प्रमाणावर बोगस सातबारा उतारे दिल्याची तक्रार हवेलीच्या प्रांत अधिकारी बर्गे यांच्याकडे करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे पाषाणच्या तलाठी दप्तराची तपासणी करण्यात आली. त्यात तलाठी दराडे याने अनेक गैरप्रकार केल्याच निष्पन्न झाले. त्यामुळे त्याला तातडीने निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली. या निलंबनानंतर त्याची खातेनिहाय चौकशी करण्याचा प्रस्ताव अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांच्याकडे देण्यात आला होता. त्यांनी या चौकशीस मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पाषणच्या तलाठी दप्तराच्या तपासणीत सातबारा उतारा दिला, पण त्याची फेरफार नोंदच आढळत नाही; सातबाराची मूळ दफ्तरी नोंद घेतली गेली नाही. तसेच खरेदी खताचा दस्त झाला नसताना फेरफार नोंदी घातल्या गेल्या. सातबारा उतारा दिला गेला, पण मूळ दप्तरी नोंद घेतली गेली नाही. फेरफार मंजूर नसताना सातबारा उतारे दिले गेल्यासारख्या अनेक भानगडी झाल्याचे उघडकीस आले आहे.

दुचाकीच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू

$
0
0

पुणेः भरधाव दुचाकीची जोरदार धडक बसून एका पादचाऱ्याचा मृत्यु झाल्याची घटना शनिवारी शंकरशेठ रस्त्यावर सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. रवी बाबु पवार (५०, रा. पोर्णिमा टॉवर समोर, शंकर शेठ रोड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार हे शंकरशेठ रस्त्यावरील दुभाजक ओलांडून जात होते. त्यावेळी पी. बी. जैन चौकाच्या दिशेने स्वारगेटकडे जाणाऱ्या एका भरधाव दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली.

सोनसाखळी हिसकावली

नवी पेठेतील कान्हेरे रस्त्यावरून पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जबरदस्ती हिसकावून नेल्याची घटना रविवारी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी एका ३१ वर्षीय महिलेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात अनोळखी दोघांविरोधात फिर्याद दिली आहे.

‘ब्लेड रनर’ ची NDA ला भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय ब्लेड रनर अशी ओळख असलेले मेजर देवेंदर पाल सिंग यांनी नुकतीच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला भेट दिली. कारगिलच्या युद्धात अपंगत्व आल्यानंतरही खचून न जाता भारतातील एकमेव अपंग मॅरेथॉनपटू अशी ओळख मिळविलेल्या देवेंदर पाल सिंग यांनी एनडीएच्या छात्रांशी संवाद साधला.

आयुष्यात सतत प्रगती कशी करावी, या विषयावर त्यांना एनडीएच्या छात्रांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर ते एनडीएच्या छात्रांसोबत क्रॉस कंट्रीतही सहभागी झाले. रनिंगमध्ये सुधारणा करण्याबाबतही त्यांनी धावपटूंना मार्गदर्शन केले.

कारगिलच्या युद्धात सिंग गंभीर जखमी झाल्याने त्यांना मृत समजण्यात आले होते. परंतु, जीवावरचे डाव्या पायावर निभावले. एक पाय गमावलेल्या ४० वर्षीय मेजर सिंग आपल्याला आलेल्या अपंगत्वाची पर्वा न करता पायाच्या जागी धावण्यासाठीचे ब्लेड बसवून घेतले.

आणि त्याच्या आधारे मॅरेथॉन पूर्ण करण्याचे धाडस केले. आतापर्यंत १२ वेळा ४२ मॅरेथॉन पूर्ण केलेल्या यांचे नाव दोन लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेले आहे. एके काळी सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी अपंगत्व पत्करलेल्या सिंग यांना आता देशासाठी मेडल मिळविण्याची इच्छा आहे.

अपंग व्यक्तींना 'चॅलेंज्ड व्यक्ती' नव्हे तर 'चॅलेंजर' बनविण्यासाठीही ते सध्या काम करत आहेत. या व्यक्तींमध्ये अपंगत्वामुळे आलेले नैराश्य दूर करून त्यांना सकारात्मक दृष्टी देत त्यांना क्रीडा क्षेत्रात येण्यासाठी किंवा धाडसी कामासाठी ते प्रोत्साहन देत आहेत.

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images